देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 2

अंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे. या शहराच्या परिमितीवर, 8 मीटर उंच अशी भक्कम दगडी भिंत बांधलेली आहे व आत प्रवेश करण्यासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांना प्रत्येकी एक व पूर्व दिशेला दोन अशी 5 प्रवेशद्वारे आहेत. मी ज्या दक्षिणेकडच्या प्रवेशद्वारामधून आत आलो होतो तशीच गोपुरे व त्यातील प्रवेशद्वारे प्रत्येक दिशेला आहेत. दगडी भिंतीच्या बाजूला 100 मीटर रूंद असा खोल खंदक खणून त्यात पाणी सोडलेले असल्याने या नगरीच्या संरक्षणाची उत्तम व्यवस्था केलेली होती असे म्हणता येते. या शहराचे एकूण क्षेत्रफळ 145.8 हेक्टर किंवा 360 एकर एवढे आहे. शहराच्या भौमितिक मध्यावर, एक भव्य बुद्ध मंदीर, जयवर्मन राजाने उभारले होते. या मंदिराचे नाव आहे बायॉन(Bayon) व तेच बघण्यासाठी मी आता निघालो आहे. झाऊ डागुआन (Zhou Daguan) हा चिनी राजदूत त्यावेळी जयवर्मन राजाच्या दरबारात होता. त्याने त्या कालातील अंगकोर थॉम शहर कसे दिसत असे याचे बारकाईने केलेले वर्णन लिहून ठेवले आहे. त्या काळातल्या बायॉन मंदिरावर असलेल्या मधल्या मनोर्‍यावर सोन्याचा पत्रा चढवलेला होता. याच प्रमाणे मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला खंदकावरचा पूल व त्याच्या बाजूला असलेल्या दोन सिंह मूर्ती यावरही सोन्याचा पत्रा चढवलेला होता.
Bayon grand view c

Magnificence of Bayon Temple

दक्षिण प्रवेश द्वारापासून 1.5 किलोमीटरवर बायॉन देवळाचा परिसर नजरेसमोर दिसू लागला. माझ्या गाडीने डावीकडे वळण घेतले व एका प्रशस्त अशा चौथर्‍यासमोर गाडी उभी राहिली. समोर दिसणारे देऊळ भव्य दिसत असले तरी एकूण दृष्य गोंधळात टाकणारे वाटत होते. मी चौथर्‍याच्या पायर्‍या चढून वर गेलो व तसाच पुढे चालत मंदिराच्या जरा जवळ जाउन थांबतो आहे. मध्यभागी एक उंच मनोरा दिसतो आहे व त्याच्या भोवती 54 जरा कमी उंचीचे मनोरे दिसत आहेत. जरा आणखी जवळ जाऊन बघितल्यावर लक्षात आले की यातल्या प्रत्येक मनोर्‍यावर, मी आधी दक्षिण गोपुरावर बघितले होते त्याच प्रमाणे , प्रत्येक दिशेला एक, असे चार चेहेरे दगडात बनवलेले आहेत. मला प्रथम कसली आठवण होते ती जॉर्ज ऑरवेल या सुप्रसिद्ध इंग्रजी लेखकाच्या ‘ Big Brother is watching you’ या वाक्याची. पण बायॉनच्या देवळावर दिसणारे चेहेरे ऑरवेलच्या बिग ब्रदर सारखे संशयी व लोकांच्यावर लक्ष ठेवणारे नाहीत तर ते सतत स्मित करत आहेत. ते लोकांचे हित व्हावे अशीच इच्छा करत आहेत. हे चेहेरे राजा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर याचे आहेत असे समजतात. ख्मेर राजांची नावे त्यांच्या निधनानंतर बदलण्यात येत असत. या पद्धतीनुसार सातवा जयवर्मन राजा परलोकवासी झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते.
smile of angkor c

अंगकोरचे हास्य

बायॉन मंदिराची रचना तशी साधी सरळ व तिमजली आहे. थोड्या पायर्‍या चढून गेले की पहिल्या मजल्यावर असलेल्या व गाभार्‍याच्या चारी बाजूला असलेल्या, व्हरांड्यासारख्या गॅलरीज आपल्याला दिसतात. यामधे असणार्‍या कोणत्याही प्रवेशद्वारामधून आत गेले की पायर्‍या चढून दुसर्‍या मजल्यावर जाता येते. दुसर्‍या मजल्याची रचना जरा गुंतागुंतीची आहे यात अनेक कमी अधिक उंचीवर असलेल्या कक्षांमुळे आपण नक्की कोठे आहोत हे समजेनासे होते. मी 3/4 वेळा तरी येथे गोंधळून रस्ता चुकलो आहे. प्रत्येक वेळी परत पहिल्या मजल्यावर जाऊन परत पायर्‍या चढून वर जाणे एवढाच मार्ग मला दिसतो आहे. दुसर्‍या मजल्यावर परत तशाच, चारी बाजूने असलेल्या गॅलरीज दिसतात. या मजल्याच्या डोक्यावर मंदिराचा मुख्य गाभारा व त्याच्या चहुबाजूंनी चेहरे कोरलेले मनोरे उभे राहिलेले आहेत. बायॉनच्या वास्तूचा एकूण आवाका लक्षात आल्यावर या वास्तूचे वर्णन करण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नाहीत असे मला वाटू लागले आहे. इंग्रजी भाषेतला Magnificence हाच शब्द फक्त बायॉनचे वर्णन करण्यासाठी माझ्या मनात रुंजी घालतो आहे.
magnificent Bayon c

खंदकातल्या पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब

बायॉन मंदिराच्या पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर असलेल्या गॅलरीजच्या भिंतीच्यावर अतिशय उत्कृष्ट दर्जाची भित्तिशिल्पे दगडात कोरलेली आहेत.ती बघण्यासाठी मी आता परत पहिल्या मजल्यावर आलो आहे. ख्मेर राजांची त्यांच्या शत्रूंबरोबर(Chams) झालेली जमिनीवरची व पाण्यावरची युद्धे, सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यातले प्रसंग, कोंबड्यांची झुंज, पशुपक्षी, प्रासाद, देवळे सर्व काही या शिल्पांच्यात कोरलेले सापडते आहे. बायॉन बुद्ध मंदीर असले तरी विष्णू, शंकर हे हिंदू देव अनेक ठिकाणी कोरलेले आहेत. आणि या सर्वांबरोबर स्वर्गलोकातल्या अप्सरा तर ठायी ठायी दिसत आहेत.
Khmer army goes to war c

जयवर्मन राजाचे सैन्य
enemy troops c

शत्रू सैनिक (चिनी वंशाचे, छोटी दाढी व डोक्यावरची पगडी तसे दर्शवते)
food for the army c

सैन्ये पोटावर चालतात (ख्मेर सैन्यासाठी अन्न घेउन जाणारी गाडी व बकर्‍या)

hand to hand fight bet khmers and chams c
ख्मेर सैनिक व शत्रू यांच्यातील हातघाईची लढाई
catching a bull c

बैलाची शिकार

cooking food c
Cooking Dinner
cooking a pig c

वराह शिजवणे

a cock fight c

टाईम पास- कोंबड्यांची झुंज
ascetic and a lion c

वाघाला घाबरून झाडावर चढून बसलेला साधू
shivalinga temple c

शिवलिंगाचे मंदिर
apsara dance on music c

संगीताच्या तालावर नाचणार्‍या अप्सरा
Vishnu worshipped

विष्णू आराधना
lord shiva in his palace c

शिव व त्याचे भक्तगण

Lord Shiva c
शिव त्याच्या स्वर्गातील मंदिरात
Vishnu riding on garuda fights demons c

गरुडावर आरूढ झालेल्या विष्णूचे राक्षसांशी युद्ध

पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरच्या गॅलरीज बघताना मधेच माझे घड्याळाकडे लक्ष जाते. या मंदिरात मी गेले 2 तास मंत्रमुग्ध होऊन ही शिल्पकला बघत राहलो आहे व या पद्धतीने आज बाकी काहीच बघून होणार नाही या जाणिवेने मी बायॉन मंदिरामधून पाय काढता घेतो. मंदिराच्या पश्चिम द्वाराजवळ जुन्या खंदकाच्या भागात पाणी साठलेले आहे त्यात दिसणारे बायॉनचे प्रतिबिंब बघण्यासाठी मी थोडा थबकतो. माझ्या समोरच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून, सरसर पाणी कापत जाणारा एक हंसांचा थवा मला दिसतो. कॅमेर्‍यात त्यांची छबी बंदिस्त करण्यापुरताच वेळ ते मला देतात व नाहीसे होतात.
swans in front of Bayon temple c

बायॉन मंदिरासमोर जलक्रीडा करणारे हंस

काहीशा जड अंत:करणाने मी बायॉन परिसरातून निघून, उत्तरेला अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या बाफुऑन(Baphuon) या मंदिराकडे निघालो आहे. दुसरा उदयादित्यवर्मन या ख्मेर राजाने 1060च्या सुमारास हे शिवमंदिर बांधले होते. या मंदिराची बरीच पडझड झाल्याने याच्या पुनर्बांधणीचे कार्य 1970 मधे हातात घेण्यात आले होते. या मंदिराचे सर्व दगड क्रमांक घालून सुटे केले गेले होते. परंतु या सुमारास कंबोडिया मधे यादवी युद्ध सुरू झाले व हे कार्य सोडून द्यावे लागले. परिस्थिती शांत झाल्यावर 1995 मधे परत हे काम हातात घेण्यात आले. त्यावेळी असे लक्षात आले की ख्मेर रूज या कम्युनिस्ट पक्षाने सत्ता ताब्यात घेतल्यावर या मंदिराचे आराखडे नष्ट करून टाकलेले आहेत. त्यामुळे खचून न जाता संगणकाच्या मदतीने व जपानी सहकार्याने हे मंदिर परत बांधण्याचे काम हातात घेण्यात आले. मला आता समोर एक मोठा चौथरा दिसतो आहे. यावर चढून गेल्यावर पश्चिम दिशेला निदान 200 मीटर लांबीचा एक पूल दिसतो आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना हजारो पांढरे क्रमांक घातलेले दगड मला दिसत आहेत. हे सगळे दगड अजून त्यांच्या मंदिरातील योग्य जागी बसवायचे आहेत. या पुलाच्या पलीकडे बाफुऑनची भव्य वास्तू मला दिसते आहे. हा पूल पार करून मी शेवटपर्यंत जातो. मात्र पलीकडे मंदिराचे प्रवेशद्वार एक अडथळा टाकून द्वार बंद करण्यात आलेले आहे. सध्या जा मंदिराला भेट देणे शक्य होणार नाही असे दिसते. मी मंदिराचा एक फोटो काढतो व परत फिरतो.
Baphuon temple under rennovation c
बाफुऑन मंदिर

उत्तर दिशेने आणखी थोडे पुढे गेल्यावर एक प्रशस्त व निदान 6/7 फूट उंचीचा चौथरा मला दिसतो आहे. या चौथर्‍याच्या दर्शनीय भागावर अनेक हत्तींची शिल्पे कोरलेली दिसत आहेत. काही ठिकाणी तीन मस्तके असलेला ऐरावत व बर्‍याच ठिकाणी विष्णूचे वाहन असलेला गरूड सुद्धा दिसतो आहे. राजा सातवा जयवर्मन याने हा चौथरा आपल्याला सैन्याचे निरिक्षण करता यावे व सभा समारंभात जनतेबरोबर सहभागी होता व्हावे म्हणून बांधला होता. हा चौथरा तीन चार पायर्‍यांचा आहे व यावर राजासाठी एक लाकडी वास्तू उभारलेली होती असे सांगतात. लहानपणी मी हॉलीवूडचे बेन हर किंवा क्लिओपात्रा हे सिनेमे बघितल्याचे मला स्मरते. त्या सिनेमात असेच भव्य चौथरे व त्यावर उभा राहिलेला राजा दाखवलेले होते. त्या प्रकारचा एखादा खराखुरा चौथरा मला प्रत्यक्षात बघता येईल असे मला स्वप्नात सुद्धा कधी वाटले नसेल. या चौथर्‍याला Terrace of the Elephants असे नाव आहे व तो 1000 फूट तरी लांब आहे.
terrace of elephants c
हत्तींचा चौथरा
garuda figures on terrace of elephants c

हत्ती चौथर्‍यावरील गरूड शिल्पे

या हत्ती चौथर्‍याच्या पूर्वेला आणखी एक चौथरा आहे याला महारोगी राजाचा चौथरा, Terrace of the Leper King, असे नाव आहे. या चौथर्‍याला हे नाव का पडले यासंबंधी विश्वासार्ह माहिती नाही. परंतु आता असे समजले जाते की हा चौथरा म्हणजे ख्मेर राजांची स्मशानभूमी असली पाहिजे. या चौथर्‍यावर एक भव्य पुतळा होता (तो आता नॉम पेन्ह च्या वस्तूसंग्रहालयात ठेवलेला आहे.) हा पुतळा यमराजांचा आहे असे आता मानतात. या चौथर्‍याच्या दर्शनी भागावर जी भित्तिशिल्पे कोरलेली आहेत त्यात सर्व सामान्य नागरिक आहेत, सैनिक आहेत अक्षरश: हजारो मनुष्याकृती या चौथर्‍यावर आहेत. त्या बघताना मला एक गोष्ट जाणवली. या हजारो मूर्तींपैकी एकाही मूर्तीचा चेहरा हसरा नाही. सर्व चेहरे गंभीर किंवा दु:खी दिसत आहेत. या चौथर्‍यावर जर ख्मेर राजांच्यावर अग्नीसंस्कार केला जात असला तर त्यावरच्या शिल्पातले चेहरे गंभीर असणे स्वाभाविकच आहे असे मला वाटते. या दोन्ही चौथर्‍यांच्या समोरच्या बाजूला मला दोन भग्न इमारती दिसत आहेत. या इमारती क्लिन्ग्ज (Kleangs) या नावाने ओळखल्या जातात. ही गोदामे होती असे मानले जाते. या इमारतींच्या अलिकडेच कार पार्क मधे माझी गाडी माझी वाट पहाताना आता मला दिसते. एव्हांना सूर्य मावळायलाच आला आहे आणि पाय पण बर्‍यापैकी बोलू लागले आहेत. मी निमूटपणे गाडीत बसतो व गाडी हॉटेलकडे जायला निघते. वाटेत परत एकदा बायॉनच्या वास्तूचे क्षणभर दर्शन होते. ते मनात साठवत मी हॉटेलवर परततो.
kleanings c

क्लीन्ग्ज

उद्या लवकर उठायचे आहे कारण धार्मिक उपयोगासाठी म्हणून बांधलेले जगातील सर्वात मोठे स्थापत्य ज्याला म्हणतात ते अंगकोर वाट हे मंदिर उद्या मला बघायचे आहे.

17 नोव्हेंबर 2010

Comments

वाट बघतो आहे.

या मालिकेतील पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहातो आहे.
भिंती वरील शिल्पे पहाण्यात तुमचे दोन तास कसे गेले ते तुम्हाला समजले नाही हे साहजिकच आहे. कारण ती शिल्पे तशीच सुंदर आहेत. ते शिवलिंग मंदीराचे शिल्प तर उभाछेद कापून काढल्या गत दिसते. कॉलेजातले इंजिनीयरींग ड्रॉइंग मधले फ्रंटव्ह्यू/ साइडव्ह्यू वगैरे आठवले. काय माझे डोके आहे बघा, इतके छान फोटो पाहून आठवले काय तर त्या इंजिनीयरीग ड्रॉइंग मधल्या किचकट आकृत्या!!

उत्तम| अवलोकितेश्वर

मी लेख आधी घरून पाहिला तेव्हा चित्रे दिसली पण आता ऑफिसातून दिसत नाहीत. त्यामुळे सविस्तर प्रतिसाद नंतर देईन. तूर्तास, वर्णन आणि माहिती आवडली असे नमूद करते.

सुरेख चित्रे, डोळ्यांचे पारणे फिटले. तत्कालीन जीवनमानाचा अंदाज येण्यासाठी ही शिल्पे अतिशय उपयुक्त वाटतात. विशेषतः लांब कानाच्या पाळ्यांचे, आखूड केसांचे लोक, त्यांच्या विरुद्ध बुचडे बांधलेले, दाढीवाले लोक, शिवाची दाढी, बुचड्यांवर बांधलेल्या रुद्राक्ष माळा वगैरे रोचक आहे. हिंदु वि. बौद्ध संघर्ष येथे झाला असावा का (झाल्याचे वाचलेले नाही) अशी शंका येते.

अवलोकितेश्वर हा बुद्धस्वरूप आहे. जयवर्मनाला मेल्यावर अवलोकितेश्वर म्हणणे म्हणजे राजा देवस्वरुप झाल्याचे मानणे तर नव्हे. राजा हा देवाचा अंश असतो याच धारणेवर ख्मेर संस्कृती नांदत होती असे वाटते तेव्हा मेल्यावर त्याचे नाव बदलण्याचे नेमके प्रयोजन कळले नाही.

हिंदू बौद्ध संघर्ष

एका विविक्षित राजापासून पुढचे सगळे राजे बौद्ध धर्माचे पालन करणारे असे काही घडले नाही. एखादा राजा बौद्ध धर्मीय असला तरी त्याच्या पुढचा राजा परत हिंदू असे घडलेले आहे. त्यामुळे हिंदू बौद्ध संघर्ष झाला असल्याची शक्यता फार कमी आहे. अर्थात राजा जर बौद्ध असला तर पूर्वीच्या विष्णूच्या मूर्तीचे डोके बदलून त्याला बुद्ध करणे वगैरे प्रकार घडत होते. त्यामुळे 8 हाताचा बुद्धही आपल्याला बघायला मिळतो.
मेल्यानंतर राजाचे नाव बदलण्याच्या रूढीचा अर्थ मलाही समजला नाही. एकच शक्यता वाटते. राजा हा ईश्वराचा अवतार आहे असे समजले जात असल्याने त्याचा मृत्यू ही बाब योग्य वाटत नसल्याने मृत्यूच्या पश्चात त्याचे नाव बदलून टाकण्यात येत असावे. म्हणजे राजा मेला असे म्हटले जाणार नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वा!

हा ही भाग सुरेख. चित्रांचा आकार मोठा झाल्याने अधिक रोचक.
अंगकोर वाटची वाट बघतो आहे. :)

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

आवडले

सुंदर चित्रे आणि माहिती. वर्तमान काळ/भूतकाळाचे मिश्रण करणारी लिहीण्याची शैली वेगळी वाटली.

अप्रतिम

घरबसल्या अंगकोरची सहल होत आहे.

अत्यंत स्पृहणीय (किंवा स्पृह्य ;-)) उपक्रम आहे. एवढं लिहायचं म्हणजेसुद्धा जिद्द लागते. तेही एकदा अनुसरलेली शैली न सोडता.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

सुरेख

अनुदिनीच्या शैलीत लिहिलेले वर्णन खूप आवडले.
ओघवती भाषा आणि अतिशय सुरेख फोटो यांच्यामुळे तर मलाही अंगकोरला भेट दिल्यासारखे वाटत आहे.
उद्याच्या दिवसाच्या प्रतिक्षेत!

 
^ वर