देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1

सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे. विमानात माझ्याशेजारी बसलेल्या जर्मन जोडप्याला भारताविषयी खूप कुतुहल असल्याने सबंध प्रवासात त्यांनी माझ्याबरोबर खूप गप्पा मारलेल्या आहेत. समोर दिसणारा विमानतळ स्वच्छ व नीटनेटका वाटतो आहे. विमानतळाच्या इमारतीचे स्थापत्य मोठे वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. आगमन, निर्गमन हे सगळे एकाच पातळीवर आहे. कौलारू छप्पराची असावी अशी दिसणारी ही इमारत आहे. मी ‘आगमन‘ अशी पाटी लावलेल्या प्रवेशद्वारामधून आत शिरतो आहे. समोरच हत्तीच्या पाठीवर बसलेल्या एका मूर्तीचा शुभ्र रंगाचा एक मोठा पुतळा उभा आहे. माझ्या पुढे जाण्याच्या घाईगडबडीत, मी ती मूर्ती बुद्धाची आहे असे समजतो. बर्‍याच नंतर, इतर अनेक मूर्ती बघितल्यावर व हत्तीच्या पाठीवर बसलेली बुद्धाची मूर्ती दुसरीकडे कोठेच न बघितल्याने, ती मूर्ती बुद्धाची असणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले आहे.

आधी बरेच यत्न करून मी कंबोडिया देशाचा ई-व्हिसा मिळवलेला असल्याने मी चटकन इमिग्रेशन काउंटर्स कडे जातो आहे. विमानातले माझे बहुतेक सहप्रवासी, आगमनानंतर मिळणारा व्हिसा काढण्याची तजवीज करण्यात गुंतलेले असल्याने मला रांगेत उभे न राहता पुढे जायला मिळाले आहे. विमानतळावरचा कर्मचारी व अधिकारी वर्ग बघून मात्र एकंदरीत भारताची आठवण होते आहे. तशीच संशयी व उर्मट मनोवृत्ती या मंडळींचीही दिसते आहे. मात्र विमानतळाची अंतर्गत व्यवस्था व सोई या सर्व प्रवाशांना सुखकर वाटतील अशाच आहेत. मी माझी बॅग घेऊन विमानतळाच्या बाहेर येतो. सियाम रीप शहरात आमची सर्व व्यवस्था बघणार आहेत ते श्री बुनला, समोरच माझ्या नावाची पाटी हातात घेऊन माझी वाट पहात उभे आहेत. मी त्यांना हात हलवून अभिवादन करतो. ते लगेचच माझ्याजवळ येऊन औपचारिक गप्पागोष्टी करत आहेत. इतक्यात शेजारच्या कोपर्‍यात उभ्या केलेल्या एका मानवी आकाराच्या मूर्तीकडे माझे लक्ष जाते. मूर्तीचा चेहरा व डोक्यावरची पगडी हे जरा निराळेच वाटतात. मात्र त्या मूर्तीला असलेले चार हस्त व त्यापैकी दोन हातात् असलेल्या शंख व व चक्र या वस्तू त्या मूर्तीची लगेच मला ओळख पटवतात. ही मूर्ती नक्की विष्णूचीच आहे यात शंकाच नाही. म्हणजे देवांच्या सहवासातले माझे दिवस अगदी विमानतळापासूनच आता सुरू झाले आहेत.

माझे हॉटेल सियाम रीप शहराच्या अगदी मध्यवर्ती भागातच आहे. हॉटेलच्या खोल्या नीटनेटक्या, आरामदायी व स्वच्छ आहेत. फारशा ऐषारामी दिसत नाहीत. मी बरोबरच आणलेले भोजन पटकन उरकतो व देवांच्या भेटीला जायला लवकर तयार होतो. सियाम रीप हे शहर कंबोडिया देशाच्या मध्यवर्ती भागात पण पश्चिमेला आहे. सियाम रीप हे या गावाचे असलेले नावही मोठे विचित्र आणि गंमतीदार आहे. सियाम रीप चा ख्मेर भाषेतला अर्थ होतो सयामचा पराभव. अमृतसरला ‘पाकिस्तानचा पराभव‘ किंवा पेशावरला ‘अफगाणिस्तानचा पराभव‘ अशा नावाने ओळखण्यासारखेच हे नाव आहे. संस्कृतमधल्या रिपू शब्दावरूनच रीप हा शब्द आलेला आहे. कंबोडिया मधले लोक स्वत:ला ख्मेर असे म्हणतात. कंबोडियामधली एक मोठी नदी ‘टोनले साप‘ या नदीच्या जवळच असलेल्या या गावाजवळचा भाग अगदी पुरातन कालापासून या देशाच्या राजधानीचा भाग होता. ई.स.नंतरच्या ८व्या किंवा ९ व्या शतकात, इथल्या ख्मेर राजांनी आपली राजधानी या भागात प्रथम स्थापन केली. कंबोडिया हे या देशाचे नाव कुंबोज किंवा संस्कृतमधल्या कुंभ या शब्दावरून आलेले आहे. पंधराव्या शतकात, पश्चिम सीमेकडून होणार्‍या सततच्या सयामी किंवा थायलंडच्या आक्रमणांमुळे ही राजधानी ख्मेर राजांनी पूर्वेला नॉम पेन येथे हलवली व ती आजमितीपर्यंत तेथेच आहे.

ख्मेर संस्कृती व धर्म हे भारताशी नेहमीच जोडलेले किंवा संलग्न राहिलेले आहेत. इथल्या पुरातन राजांनी हिंदू नावे नेहमीच स्वत: धारण केलेली आहेत व हिंदू किंवा बौद्ध हेच धर्म या देशात गेली 1500 वर्षे प्रचलित राहिलेले आहेत. ख्मेर राजे स्वत: हिंदू किंवा बौद्ध धर्मांचे पालन करत व धर्मशास्त्रांप्रमाणे सर्व रूढ्या व विधींचे मन:पूर्वक पालन करत असत. आजही या देशातले 90% टक्क्याहून जास्त नागरिक हे स्थविर पंथाचे बौद्ध धर्मीय आहेत. दुसरी एक गोष्ट मला महत्वाची वाटली या देशावर इतिहासात कधीच इस्लामपंथियांची आक्रमणे झालेली नाहीत. त्यामुळेच बहुदा गेली 800 किंवा 900 वर्षे या देशातील देवळे व मूर्ती टिकून राहिल्या असाव्या.

ख्मेर भाषेत अंगकोर हा शब्द संस्कृत नगरी या शदावरून आलेला आहे व त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो. सियाम रीप जवळचे सर्वात मोठे असलेले व ख्मेर राजांनी स्थापना केलेले ‘अंगकोर थॉम‘ या नगराला भेट देण्यासाठी मी आता निघालो आहे. ख्मेर मधे थॉम या शब्दाचा अर्थ सर्वात मोठे असाच होतो. त्यामुळे या नगराच्या नावापासूनच त्याचा मोठेपणा दिसतो आहे. माझी गाडी थांबते व मी खाली उतरतो. समोर दिसणारे दृष्य़ मनाला थक्क व स्तिमित करणारे आहे हे मात्र नक्की. अंदाजे 25 फूट उंचीची एक भक्कम व लालसर रंगाची दगडी भिंत मला जरा लांबवर दिसते आहे व या भिंतीने, तिच्या वर दिसणारी उंच व घनदाट झाडी सोडली तर पलीकडचे बाकी सर्व दृष्य़ पडदा टाकल्यासारखे बंद केले आहे. ही भिंत आणि मी उभा आहे ती जागा यामधे निदान 325 फूट रूंद असलेला व डावी बाजू पाण्याने पूर्ण भरलेला असा एक खंदक दिसतो आहे. पाण्यावर मधून मधून विकसित झालेली कमल पुष्पे डोकावत आहेत. या खंदकावरून पलीकडे जाण्यासाठी दगडांपासून बनवलेला एक पूल माझ्या नजरेसमोर दिसतो आहे. या पुलाच्या टोकाला व खंदकाच्या पलीकडच्या काठावर एक भव्य गोपुर उभे आहे. या गोपुराच्या शिखरावर दगडात कोरलेले तीन भव्य चेहेरे दिसत आहेत. दगडी पुलाच्या कठड्याकडे माझे लक्ष जाते. हा दगडी कठडा(Railing) एखाद्या अंगावर खवले असलेल्या सर्पासारखा दिसणारा बनवलेला आहे. माझ्या डाव्या हाताला या सर्पाची हवेत वक्राकार वर जाणारी शेपूट मला दिसते आहे तर उजव्या बाजूच्या कठड्याच्या टोकाला मला याच पंचमुखी सर्पाने उंचावलेली त्याची निदान 5/6 फूट उंच अशी फणा दिसते आहे. डाव्या बाजूच्या कठड्याला 54 आधार आहेत हे सर्व आधार(Baluster) मानवी उर्ध्व शरीराच्या आकाराचे आहेत व त्यांचे चेहरे शांत व सौम्य भासत आहेत. उजव्या बाजूच्या कठड्याचे तसेच 54 आधार तशाच मानवी उर्ध्व शरिराचे आहेत परंतु त्यांचे चेहरे मात्र दुष्ट भाव असलेले दिसत आहेत. दोन्ही बाजूंच्या चेहर्‍यांची केशरचनाही अलग प्रकारची आहे. दोन्ही बाजूंच्या पुतळ्यांनी हातातील सर्प मात्र घट्ट पकडलेला आहे.

अंगकोर थॉमचे दक्षिण प्रवेशद्वार

असुरांच्या उर्ध्व शरीराच्या आकाराचे कठड्याचे आधार

माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो. माझ्या समोर देव आणि दानव यांनी पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाचे दृष्य साकारले आहे. माझ्या डाव्या बाजूचे देव आहेत तर उजव्या बाजूचे दानव. दोघांच्याही हातात वासुकी सर्प आहे व ते त्याला घट्ट पकडून समुद्र मंथन करत आहेत. मी समुद्र मंथनाची काल्पनिक चित्रे वर्षानुवर्षे बघत आलो आहे पण एवढ्या भव्य प्रमाणातले व त्रिमितीतले समुद्र मंथन या पुलाच्या कठड्यांच्या द्वारे साकार करण्याची ख्मेर स्थापत्य विशारदांची कल्पना मात्र अवर्णनीय आहे.

देवाचा चेहरा (मागे खंदक दिसतो आहे)

असुराचा चेहरा

देवाचा चेहरा

मी पुलावरून दोन्ही बाजूला असलेल्या देव व दानव यांच्या मूर्तींकडे दृष्टीक्षेप टाकत पुढे जातो आहे. पुलाच्या टोकाला असलेले गोपुर, सत्तर, पंचाहत्तर फूट तरी उंच आहे. शहरात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला, या गोपुराखालूनच जाणे आवश्यक असल्याने, इथल्या स्थापत्यकारांनी हे गोपुर अतिशय भव्य व देखणे बांधले आहे. अंगकोर थॉम मधे प्रवेश करण्यासाठी एकूण 5 मार्ग आहेत. यातल्या प्रत्येक मार्गावर असेच एक गोपुर बांधलेले आहे. या गोपुरावर भव्य आकाराचे चार चेहरे कोरलेले आहेत.हे चेहरे सातवा जयवर्मन किंवा अवलोकितेश्वर या राजाचे आहेत असे मानले जाते. या अंगकोर थॉम नगरात प्रवेश करू इच्छिणार्‍यांना हे चेहेरे सुखकर प्रवासासाठी अभयच प्रदान करत आहेत असे मला वाटते. गोपुराच्या दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला व या समुद्र मंथनातूनच बाहेर आलेल्या ऐरावत हत्तीचे शिल्प आहे व या हत्तीवर हातात वज्र घेतलेली इंद्रदेवाची स्वारी आरूढ झालेली दिसते आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची शिल्पे कोरलेली आहेत व वरच्या बाजूला इंद्रदेवाला साथ देण्यासाठी गंधर्व आहेत. इंद्राचे शिल्प बघितल्यावर समुद्र मंथनाचे शिल्प आता पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे.

3 मस्तके असलेल्या ऐरावतावर बसलेल्या इंद्राची मूर्ती (मधल्या मस्तकाची सोंड नष्ट झालेली दिसते.)

सातवा जयवर्मन राजाची 4 मुखे असलेले प्रवेश गोपुर

गोपुरामधल्या प्रवेशद्वाराची कॉरबेल प्रकारची कमान

या गोपुराच्या मधे असलेल्या प्रवेशद्वारामधून मी आत शिरतो. आत शिरताना सहज वर बघितले. नेहमीची कमान येथे दिसली नाही. कदाचित कमान बांधण्याचे कौशल्य त्या वेळी या शिल्पकाराना प्राप्त झालेले नसावे. भिंतीचे दगड थोडे थोडे पुढे बसवून (Corbel arch) कमानीसदृष्य आकार या ठिकाणे निर्माण केला गेला आहे. माझी गाडी पलीकडच्या बाजूस उभी आहे. समुद्र मंथनाचे हे शिल्प व त्याचे निर्माते यांच्या सृजनशीलतेबद्दलचे अपार कौतुक माझ्या मनात दाटत असतानाच मी गाडीत बसतो आहे व गाडी या नगराच्या भौमितिक केंद्रबिंदूवर असलेल्या बायॉन(Bayon) या देवळाकडे निघाली आहे.

15 नोव्हेंबर 2010

Comments

क्षमस्व

वरील लेखामधील छायाचित्रे मोठ्या आकाराची टाकणे मला न जमल्यामुळे लहान टाकावी लागली आहेत. मोठ्या आकाराची छायाचित्रे माझ्या ब्लॉगवरील ब्लॉगपोस्टमधे उपलब्ध आहेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मोठ्या आकारातील फोटो

south gate angkor thom merged c" alt="">

अंगकोर थॉमचे दक्षिण प्रवेशद्वार

demons line up c
असुरांच्या उर्ध्व शरीराच्या आकाराचे कठड्याचे आधार

deva's face with moat behind c
देवाचा चेहरा (मागे खंदक दिसतो आहे)

deva's face c
देवाचा चेहरा

demon's face c
असुराचा चेहरा

3 headed elephant with Indra c sharpened
3 मस्तके असलेल्या ऐरावतावर बसलेल्या इंद्राची मूर्ती (मधल्या मस्तकाची सोंड नष्ट झालेली दिसते.)

gopur 1 c sharpened
सातवा जयवर्मन राजाची 4 मुखे असलेले प्रवेश गोपुर

gopur 2 c sharpened
गोपुरामधल्या प्रवेशद्वाराची कॉरबेल प्रकारची कमान

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हेवा वाटला

चंद्रशेखर यांनी आंग्कोर वटला भेट दिली हे कळल्यावर मला प्रचंड हेवा वाटला.

सुरेख लेख. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. चित्रे मोठ्या आकारांत लावता आली असती तर आवडले असते. चंद्रशेखर यांनी प्रतिसादातून ती पुन्हा लावावीत अशी विनंती.

माझ्या पुढे जाण्याच्या घाईगडबडीत, मी ती मूर्ती बुद्धाची आहे असे समजतो. बर्‍याच नंतर, इतर अनेक मूर्ती बघितल्यावर व हत्तीच्या पाठीवर बसलेली बुद्धाची मूर्ती दुसरीकडे कोठेच न बघितल्याने, ती मूर्ती बुद्धाची असणे शक्य नाही हे माझ्या लक्षात आले आहे.

तर मग ती मूर्ती कुणाची होती हे कळले का? ऐरावतावर बसलेला इंद्र तर नव्हे?

कंबोडियाचा थोडाफार इतिहास* येथे वाचता येईल.

* मूळ लेखात विकीवरील घेतलेले कंभोज हे राज्य तेच आहे का याबद्दल मला नेहमीच शंका वाटत आली आहे. कौंडिण्य हा ब्राह्मण कौंडिण्यपुरी नगरीतील तर नसावा असे मला राहून राहून वाटते. अर्थातच, तसे काही संदर्भ माझ्याकडे नाहीत.

मूर्ती

ती मूर्ती कोणाची होती हे ती मूर्ती इमिग्रेशन भागात असल्याने व मला तिथे परत जाणे शक्य नसल्याने कळू शकले नाही. पण ती बुद्धाची नक्की नव्हती.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मूर्ती

हीच का?
--
हत्तीवर बसलेला बुद्ध
--
वर्णन आवडले परंतु वर्तमानकाळात केलेले वर्णन कृत्रिम वाटते. श्राव्य माध्यमातच तसे वर्णन सवयीचे आहे. भूतकाळ वापरला असता तर अधिक चांगले झाले असते असे वाटते.

दुव्यावर असलेले चित्र

आपण दिलेल्या दुव्यावर असलेले चित्र हे बान्ते स्ताय या शिव मंदिरातील शिल्पाचे आहे. हे मंदिर शिव मंदिर होते. या ठिकाणची सर्व शिल्पे ही हिंदू पुराणांच्या गोष्टींवरची आहेत. या शिल्पातील देव बहुदा इंद्र आहे कारण त्यात ३ मस्तके असलेला ऐरावत हत्ती दाखवलेला आहे. तो बुद्ध खास नाही.
तसेच माझ्या लेखात मी विमानतळावरच्या ज्या मूर्तीचा उल्लेख केला आहे त्याचा फोटो दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मताने ही मूर्ती हत्तीवर बसलेल्या सातव्या जयवर्मन राजाची असावी.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

वर्णन आवडले परंतु वर्तमानकाळात केलेले वर्णन कृत्रिम वाटते.

-दिलीप बिरुटे

छान

श्री. चंद्रशेखर ह्यांची लेखन शैली छान :) लेख आवडला.
तसेच प्रियाली ह्यानी दिलेला इतिहासाचा दुवा मिळाल्यामुळे माहितीत अजुन भर पडली, त्यांचे देखिल आभार.

उत्तम

चंद्रशेखर यांच्या अनुदिनीवर ह्या लेखमालेचे काही भाग वाचले होते, पण संपूर्ण लेखमाला वाचायची राहून गेली होती. उपक्रमावर आतापर्यंत केवळ वाचून माहीत असलेल्या जागेचे प्रत्यक्ष वर्णन यावे, हे फारच छान. पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुरेख

सुरेख वर्णन. मलाही हेवा वाटला. :)
तांत्रिक अडचण दूर करून मोठी चित्रे टाकता आली तर लेखाची रंगत आणखी वाढेल.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

सियेम रिप (अंगकोर)या ठिकाणी गेल्या वर्षी मी गेलो होतो. त्यावर लिहिण्यासारखे खूप आहे. आम्ही गावात दोन पूर्ण दिवस होतो. एवढ्या वेळातही अंगकोर पूर्ण होत नाही. चालून पायाचा पिट्या पडतो एवढी विस्तीर्ण देवळे. रंगभंग नको म्हणून अधिक लिहीत नाही. एकवेळ बॅकॉक पट्टाया सिंगापूर/कौलालंपूरला गेला नाहीत तर चालेल पण अंगकोर आणि बाली/जोगजकार्ता (इंडोनेशिया) येथे प्रत्येकाने जाण्यासारखे आहे. दोष एवढाच की भारतीय पर्यटकांच्या नकाशावर हे दोन देश नाहीत. भारतातून इकडे जायला थेट विमानसेवा पण नाही.

हिंदू धर्मांने नवव्या शतकानंतर (कदाचित आधीही.) दक्षिणपूर्वेकडे मोठी मुसंडी मारली होती. पहिल्यांदा हिंदू मग बौद्ध वा इस्लाम अशी प्रचाराची अहिंसक परंपरा इथे आहे. बालीतील हिंदू धर्म हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे. (जकार्तावाले काळे यांना लेख लिहा अशी विनंती केली होती. )

तुम्ही लिहित असलेल्या सफरीच्या वर्णनाने या सगळ्याची परत आठवण आली. लेख चांगला होत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रमोद

समजले नाही !

पहिल्यांदा हिंदू मग बौद्ध वा इस्लाम अशी प्रचाराची अहिंसक परंपरा.... ? इस्लामची अहिंसक परंपरा ही गोष्ट माझ्यासाठी नवीनच आहे. थोडा अधिक प्रकाश टाकता येईल काय ? की तो "टायपो" आहे ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

तो टायपो नाही

तो टायपो नाही. इस्लामची अहिंसक धर्मप्रसार परंपरा आहे. विषयांतर नको म्हणून जास्त लिहित नाही.

प्रमोद

मी खरोखरीच उत्सुक आहे....

मी ह्याबद्दल खरोखरीच उत्सुक आहे. ह्या विषयावर वेगळा धागा काढावा ही विनंती. अथवा व्यनी ने माहिती दिली तरी चालेल.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

प्रवासवर्णन

एका वेगळ्या शैलीतील प्रवासवर्णन वाचायला मिळणार आहे हे पहिल्या दोनेक वाक्यातच समजले.

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. अंगकोरवट मंदीराबद्दल वाचण्यास उत्सुक.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

लेख आणि चित्रे आवडली

लेख आणि चित्रे आवडली.
चालू वर्तमान/हल्लीच पूर्ण वर्तमान अशा प्रकारे लिहिलेली रचना आधी आश्चर्यकारक वाटली. पण मग वाचत गेलो.

+१/कोसला

'कोसला'तला काही भाग 'बुद्धदर्शन' म्हणून मराठीच्या शालेय पाठ्यपुस्तकात होता. त्यात याच प्रकारे चालू वर्तमानकाळाचा उपयोग केला होता (मी लेण्यांमागून लेणी पाहत आहे....हे दु:ख मला पेलवत नाही), त्याची लेख वाचताना आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर