पानिपतच्या निमित्ताने...

मित्रहो,
पानिपतची बखर, शेजवलकर व विश्वास पाटील यांची या विषयावरील पुस्तके आपण वाचली असतीलच. मी पानिपतविषयी बाजूबाजूने काही माहिती मिळते का, या कुतुहलापोटी जालाचा धांडोळा घेतला. त्या वाचनात काही अनवट असे मुद्दे आढळून आले. आपल्यालाही काही वेगळे वाचायला मिळाले असल्यास ते येथे नमूद करावेत, या हेतूने हा चर्चाप्रस्ताव.

१) प्रियाली यांच्या अलेक्झांडरच्या धाग्यात ग्रीक सैन्याने नौकांचा पूल सिंधु नदीवर बांधल्याचा उल्लेख केला आहे. पानिपत लढाईच्या वेळीही या तंत्राचा उल्लेख मिळाला. गंगा नदीवर होड्यांचा पूल बांधून मराठा सैन्य नदीपार करुन द्यावे, यासाठी अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला याच्याशी मराठे बोलणी करत होते. म्हणजे मोठ्या नद्या पार करण्यासाठी आपत्कालीन लष्करी साधन म्हणून होड्यांना होड्या जोडण्याची पद्धत होती.

२) पानिपत लढाई हरल्यानंतर हजारो मराठा सैनिक व त्यांचे कुटूंबीय पुन्हा महाराष्ट्रात परतू शकले नाहीत. ते हरयानातच स्थाईक झाले. अशा लोकांना रोड मराठा म्हटले जाते. त्यांची मराठी नावेही बदलली. अभिनेत्री प्रीती झिंटा हिने एका मुलाखतीत आपले पूर्वज मराठी असल्याचे सांगितले होते. त्यांचे पूर्वीचे नाव झिंट्ये होते व हरयाणवी प्रदेशात ते झिंटा झाले.

३) मराठ्यांना मदत करणार्‍या सूरजमल जाटाचे आणि भाऊसाहेबांचे मतभेद झाले आणि जाटाने ऐनवेळी कुमक केली नाही, पण नंतर मराठ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी किंवा त्यांच्या पोटापाण्याची, उपचाराची सोय करण्यासाठी त्याने मदत केल्याचा उल्लेख आहे. तर या सूरजमल जाटाचा मृत्यू अगदी प्रतापराव गुजर स्टाईलने म्हणजे 'वेडात मराठे वीर दौडले सात' प्रकारचा झाला. ही मिळतीजुळती घटना नव्याने समजली.

येथील व्यासंगी वाचकांनी इतर काही सांगावे. माहितीत भर पडणारी चर्चा व्हावी, ही विनंती. तेवढेच आपल्याकडून पानिपतचे स्मरण..

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रीतीताई झिंटा

प्रीती झिंटा हिने एका मुलाखतीत आपले पूर्वज मराठी असल्याचे सांगितले होते. त्यांचे पूर्वीचे नाव झिंट्ये होते व हरयाणवी प्रदेशात ते झिंटा झाले.

प्रीती झिंटा मूळची मराठी हे माहित नव्हते परंतु रोड मराठा हरयाणांत आहेत. त्यांनी जाटांशी रोटीबेटी व्यवहार केल्याने आता मराठीपणाच्या खुणा पुसल्या जाऊ लागल्या आहेत परंतु तरीही अद्याप मराठी नावे ठेवली जातात असे ऐकून आहे.

असो.

रुडयार्ड किपलिंगला पानिपताच्या निमित्ताने सुचलेली कविता.

The wreath of banquet overnight lay withered on the neck,
Our hands and scarfs were saffron-dyed for signal of despair,
When we went forth to Paniput to battle with the ~Mlech~, --
Ere we came back from Paniput and left a kingdom there.

संपूर्ण कविता येथे वाचा.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. - काय हा दुष्टपणा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. - काय हा दुष्टपणा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. - काय हा दुष्टपणा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. - काय हा दुष्टपणा! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. - काय हा दुष्टपणा!

ही एक गोष्टपण वाचनात आली..

पानिपतावर अब्दाली आणि मराठ्यांच्या फौजा तळ देऊन होत्या. सायंकाळी अब्दाली मराठ्यांच्या छावणीचा अदमास घेत होता. मराठ्यांच्या तळावर जागोजागी चुली पेटवून स्वयंपाकाची तयारी सुरू होती. त्या हजारो चुलींचा जाळ बघून अब्दालीला प्रारंभी मराठ्यांची फौज संख्येने प्रचंड असावी, अशी धास्ती वाटली. त्याने बरोबरच्या हेरांना विचारले तेव्हा मराठा सैनिक चुलीवर भाकर्‍या भाजत असल्याचे त्याला समजले. त्यावर त्याने नवलाने विचारले, 'पण त्यासाठी हजारो चुली पेटवण्याची गरज काय?' माहितगारांनी तपशील पुरवला, ' या लोकांमध्ये खालच्या जातीच्या हातचे अन्न खात नाहीत. प्रत्येक जातीत अशी उतरंड असल्याने जो तो स्वतःचे अन्न स्वतः रांधून खातो' त्यावर अब्दाली आत्मविश्वासाने म्हणाला, 'बहोत खूब. मग उद्याचे युद्ध आपण नक्की जिंकणार. मरणाच्या दारात असतानाही जे लोक एकमेकांच्या हातची भाकरी खात नाहीत आणि एकत्र स्वयंपाक करु शकत नाहीत ते एकीने काय लढणार?'

:-)

मरणाच्या दारात असतानाही जे लोक एकमेकांच्या हातची भाकरी खात नाहीत आणि एकत्र स्वयंपाक करु शकत नाहीत ते एकीने काय लढणार?

ही कथा माहिती नव्हती. पण अब्दालीला शत्रू कसा होता हे चांगलेच कळले होते असे दिसते.

पानिपतावर आलेले धागे वाचते आहे.

मीदेखील

पानिपतावर आलेले धागे वाचते आहे.

मी देखील वाचतो आहे. उपक्रमींचे आभार.

शंका

ही कथा ऐकली होती आणि मतितार्थाविषयी आक्षेप नाही.
एक भाकरी भाजण्यासाठी ३० सेकंद गृहीत धरले तर एका तासात एका चुलीवर केवळ १२० भाकरीच भाजता येतील. त्यामुळे, जरी प्रत्येक चूल प्रत्येक जेवणाआधी तीन-चार तास चालू ठेवली तरी तिच्यावर ४००-५०० पेक्षा अधिक भाकर्‍या बनविता येणार नाहीत. पेशव्यांकडे ~७०००० सैन्य आणि २-३ लाख नागरिक होते. त्यांच्यासाठी हजारो चुली आवश्यकच वाटतात.
(प्रत्येक चूल बारा तास चालवून बनविलेल्या) भाकर्‍यांच्या वितरणात सुसूत्रता ठेवणे अवघड झाले असते असेही मला वाटते. (गळः आयोजनातील अक्षमतेवर विकेंद्रीकरण हा तोडगा काढला जातो.) दुरून आलेल्या थंड भाकर्‍या खाण्यापेक्षा लोकांनी (विशेषतः नागरिकांनी) स्वतःच्या चुली मांडल्या असण्याची शक्यताही सुचवितो.
चर्चाप्रस्तावः भाकर-भाकरी की भाकरी-भाकर्‍या?

बी निगेटिव्ह

मी जर तिथे असती तर् असे म्हटले असते......काय? मरणाच्या दारात् असुनही स्वतःची भाकरी स्वतः रांधताहेत? वा! माझी लढाइ एका स्वभिमानी व बलाढ्य शतृबरोबर आहे.
दुसर्याला कमी लेखणारा कसली लढाइ लढणार्??

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

गोलाची लढाई|सूरजमल जाट

पानिपतात गोलाची लढाई ही व्यूहरचना आखली गेली होती. त्याबद्दल कुणी लिहू शकेल काय? मला पानिपत ही कादंबरी वाचून अनेक वर्षे झाली. त्यात काय आहे हे ही आता आठवत नाही. :-(

सूरजमल जाटाचा मृत्यू कुडतोजी गुजरांच्या स्टाईलने झाला असे का म्हटले? माझ्यामते मराठ्यांना मिळणे हा सूरजमलचा नाईलाज होता. त्यातून तो त्या प्रदेशाचा जाणकार होता पण सदाशिवराव भाऊंनी त्याचे म्हणणे ऐकले नाही. नंतर अनेक मतभेदांतून तो मराठ्यांची साथ सोडून निघून गेला. पुढे त्याने राहिलेल्या मराठ्यांना मदत केली पण त्याच्या मृत्यूबद्दल काय नवी माहिती मिळते?

दोघांच्या मृत्यूतील साधर्म्य..

प्रियाली,
प्रतापराव गुजरला ज्याप्रमाणे नेसरीच्या खिंडीत घेरल्यावर त्याने हाराकिरी करुन मरणाला कवटाळले तशीच घटना सूरजमल जाटाच्या बाबत घडली होती, एवढाच योगायोग मला नमूद करायचा होता. थोडक्यात जीव वाचवण्यापेक्षा दिव्यावर झेप घेऊन मरण्याचा वेडेपणा इतिहासात तसाच पुनरावृत्त झालेला दिसतो. (मला हे साधर्म्य वाचताना उमगले म्हणून नवे म्हटले)

मला माहित नाही

प्रतापराव गुजरला ज्याप्रमाणे नेसरीच्या खिंडीत घेरल्यावर त्याने हाराकिरी करुन मरणाला कवटाळले तशीच घटना सूरजमल जाटाच्या बाबत घडली होती,

हेच विचारते आहे की नेमके काय झाले? :-) कारण मी विकीवरही घाईत नजर टाकली पण सूरजमलचा मृत्यू असा काही खास झाला असे वाटले नाही म्हणून विचारत होते. तुम्हाला कथा माहित असल्यास येथे द्यावी. अवांतर असली तरी माहितीपूर्ण असेल. हे लिहिताना माझा सूर चेष्टेचा नाही हे ही नमूद करते. ;-)

विचारण्यामागे दुसरे कुतूहल हा माझा हाराकिरी करून मरण्याबाबतचा जुना लेख होता एवढेच.

सूरजमलचा मृत्यू..

पानिपतच्या पराभवानंतर मराठे काही काळ निस्तेज झाले. अशा वेळी सूरजमल जाटाने आपले प्रबळ साम्राज्य उभे केले. भरतपूर, आग्रा, मथुरा, रोहतक, गाझियाबाद या सगळ्या परिसरात सूरजमलचे वर्चस्व होते. पानिपत युद्धाला कारणीभूत ठरलेला नजिबुद्दौला आणि सूरजमल एकमेकांचे हाडवैरी होते. पानिपतानंतर रजपूत, होळकर आणि सूरजमल यांनी नजिबाची पाठ धरली. नजिबाला आपली सुटका नाही हे कळून चुकले त्यामुळे तो सूरजमलपुढे वारंवार सामोपचाराची बोलणी करु लागला, पण सूरजमलने तह फेटाळून लावला. २३ डिसेंबर १७६३ रोजी त्याने नजिबावर स्वारी केली. यमुनेच्या एका काठावर सूरजमल तर दुसर्‍या काठावर नजिबाचे सैन्य होते. नजिबाचे सैन्य फार कमी म्हणजे १०००० होते, तर सूरजमलकडे ३०००० सैन्य व तोफखानाही होता. नजिबाकडे स्वतःचे रोहिले सैन्य, गुलाबसिंग गुज्जर याचे गुज्जर सैन्य व सय्यद मुहम्मद खान बलोच याचे बलुची सैन्य, अफजलखान व झैविता खान अशी कुमक होती. सूरजमलच्या तावडीतून आपली सुटका नाही, म्हटल्यावर नजिब त्याच्य सैन्याला समोर जायलाही बिचकत होता. पण प्रत्यक्षात मात्र नजिब घातकी आणि गनिमी काव्याचे डावपेच खेळत होता. त्याचे सैन्य सूर्योदयापूर्वीच यमुना ओलांडून आले व त्यांनी दिल्लीच्या नैऋत्येस १० मैलावर हिंदानच्या पश्चिम किनार्‍यावर मोर्चेबंदी केली. सूरजमल जाट नजिबला संपवायला एवढा उतावीळ झाला होता, की त्याने नजिबाच्या दहा हजार फौजेला कोंडून मारण्याची व्यूहरचना आखली. त्यानुसार सूरजमलने आपल्या फौजेच्या तुकड्या करुन चारी बाजूला पांगवल्या. नजिबाच्या पाठलागावरच त्याने ५००० सैन्य सोडले आणि यात त्याच्या स्वतःकडे अगदी कमी म्हणजे २००० सैनिक होते. सय्यद मुहम्मद खान याने अन्यत्र लक्ष न देता सूरजमलचा काटा काढण्याचा डाव आखला. त्याने दोन्ही काठांवर सैन्य उभे केले व मधोमध सूरजमलला कोंडले. २५ डिसेंबर १७६३ रोजी सायंकाळपर्यंत चाललेल्या या लढाईत सूरजमल वीरगतीला प्राप्त झाला. सय्यदूने सूरजमलचे डोके व उजवा हात कापून घेतला आणि नजिबाला दाखवला. इकडे सूरजमल पडल्याचे समजताच त्याची मोठी जाट फौज कच खाऊन पांगली. नजिबखान रोहिल्याला बसल्याजागी काहीही हानी न होता विजय मिळाला. जो मरणाला भिऊन लपला होता तो एकदम विजेता ठरला.

(प्रियाली आता प्रतापराव गुजर व सूरजमल या घटनेत साम्य काय, तर शत्रू संख्येने भारी पडत असेल तर बिनदिक्कतपणे पळून जायचे, हा मराठ्यांचा गनिमी कावा होता. जोहार करणे, आत्मघात किंवा हौतात्म्य पत्करणे, हे रजपुतांमध्ये असले तरी शिवाजी महाराजांनी तसे केले नाही. मुख्य म्हणजे प्रतापराव व सूरजमल यांनी स्वतःच्या पराक्रमाच्या फाजील आत्मविश्वासामुळे शत्रूला क्षुल्लक लेखण्याची चूक केली.)

धन्यवाद

कथेबद्दल धन्यवाद!

अवांतरः

प्रतापराव गुजर व सूरजमल या घटनेत साम्य काय, तर शत्रू संख्येने भारी पडत असेल तर बिनदिक्कतपणे पळून जायचे, हा मराठ्यांचा गनिमी कावा होता.

महाराष्ट्रात गनिमी काव्याने लढण्याची सवय असणे आणि मोठ्या खुल्या मैदानावर लढण्याची सवय नसणे हे ही पानिपताच्या पराभवाचे एक कारण मानले जाते.

पानिपत लढाईतील व्यूहरचना...

प्रियाली,
ही बघा पानिपत लढाईतील दोन्ही पक्षांची व्यूहरचना

मराठ्यांची फौज पानिपतावरील काला आंब म्हणून जे ठिकाण आहे त्याच्या थोड्याशा उत्तरेकडून पुढे सुमारे १२ किलोमीटर लांब पसरत गेली होती. मराठ्यांनी गोलाची व्यूहरचना आखली होती. त्यानुसार सैन्याच्या अगदी पुढे इब्राहिमखानाच्या तोफांचे रिंगण होते. तोफखाना दळामागे रक्षणासाठी पायदळ, पेंढारी, भालाईत व तिरंदाजांच्या तुकड्या होत्या. त्यामागे घोडेस्वार म्हणजे शिलेदारांच्या तुकड्या होत्या. या घोडदळामागे ३०००० तरुण आणि अद्याप युद्धाचा कोणताही अनुभव नसलेले पायदळ होते. त्यांच्यामागे मराठा सैन्याबरोबर उत्तरेत तीर्थयात्रा करायला आलेले बिगरलष्करी लोक (ज्यात बायका, लहान मुले व प्रौढ नागरिक) असे ३०००० लोक होते आणि सगळ्यात पिछाडीला पुन्हा अननुभवी तरुण सैनिकांचे साधारणतः ४-५ हजार सैन्य होते. हा गोल करण्यामागे मराठा कुटूंबांचे रक्षण करण्याचाही विचार होता. गोलाच्या तोंडावर पुढे जे सैन्य प्रत्यक्ष लढणार होते त्यात डाव्या आघाडीवर इब्राहिमखान व त्याचे गारदी सैन्य होते. मध्य आघाडीवर सदाशिवरावभाऊ हत्तीवर, तर विश्वासराव घोड्यावर स्वार होऊन नेतृत्व करत होते. त्यांच्यासोबत खाशी हुजरातीची फौज होती. उजव्या आघाडीवर शिंदे व होळकरांचे घोडदळ व पायदळ होते.

दुसरीकडे अब्दालीची व्यूहरचना अशी होती. आजच्या सनौली रोडच्या दक्षिणेपासून अब्दालीची फौज सुरू झाली. डाव्या आघाडीला नजिबखान व त्याचे रोहिले सैन्य, तर उजव्या आघाडीला इराणी फौजेच्या दोन तुकड्या होत्या. मध्यभागी शुजाउद्दौला ३००० सैनिक व ५०-६० तोफांसह, तसेच अब्दालीचा वजीर शाहवली १९ हजार अफगाण घोडदळासह होता. उजव्या आघाडीच्या मध्यभागी १५००० रोहिले हफीज रहमत व रोहिले पठाण सरदारांच्या नेतृत्वाखाली होते. डाव्या आघाडीला पसंद खान हा ५००० घोडदळ घेऊन तर उजव्या आघाडीला बर्खुदार खान व आमीर बेग हे ३००० घोडदळ घेऊन उभे ठाकले होते. अब्दाली या सर्वांच्या मागे सुरक्षित अंतरावरुन लढाईचे नेतृत्व करत होता. त्याच्या छावणीत कडवे १०००० अफगाणांचे राखीव सैन्य प्रत्यक्ष युद्धात भाग न घेता खडे होते.

(अवांतर - युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिमखानाच्या तोफखान्याने अब्दालीच्या फौजेला भाजून काढले. त्यातच गारद्यांनी नजिबाच्या १२००० रोहिल्यांची कत्तल केली. यात ८००० गारदीही मारले गेले. भाऊसाहेबांनीही शाहवलीच्या सैन्यावर निकराचा हल्ला चढवून अफगाण सैन्याला बिथरवून टाकले. अफगाण सैनिकांनी मोर्चे सोडताच अब्दालीच्या फौजेची डावी फळी कमकुवत झाली. खरे तर इथेच भाऊसाहेबांनी युद्ध जिंकले होते, परंतु नशिबाचा विचित्र खेळ. घोड्यावर बसलेल्या विश्वासरावांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घुसली. त्यांना पाहायला भाऊ हत्तीवरुन घोड्यावर उतरले. पेशव्यांच्या हत्तीची अंबारी रिकामी दिसताच मराठा सैन्य भांबावले. तिकडे शिंदे-होळकरांच्या उजव्या आघाडीवरील घोडदळाने पुढे धाव घेतली. इथेही मोठी चूक झाली. इब्राहिमखानाचा गोल मोडला गेला. त्याला शिंद्यांच्या फौजेवर गोळे टाकता येईनात. अब्दाली हे सगळे दुर्बिणीतून बघत होता. आपली डावी आघाडी कापली जात असल्याचे समजताच त्याने तातडीने ३ महत्त्वाचे निर्णय घेतले. (अब्दालीच्या युद्धपटुत्वाला इथे दाद द्यावी लागेल) १) ताज्या दमाचे १०००० राखीव अफगाण सैन्य लढायला बोलावणे २) मराठ्यांच्या तोफा बंद झाल्याचे दिसताच अब्दालीने आपला उंटांवरच्या तोफा (शुत्तरनाला) पुढे आणल्या. त्यांच्या उंचीमुळे पुढे येणारे मराठ्यांचे घोडदळ अचूक टिपले जाऊ लागले ३) अब्दालीने १५०० कडव्या सैन्याला आपल्याच बाजूच्या पिछाडीवर पाठवले आणि जे कुणी रोहिले, पठाण अथवा अफगाण सैनिक माघार घेऊन पळत असतील त्यांची कत्तल करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे त्याचे सैनिक पुन्हा परत रणांगणात लढायला आले. यात आणखी दोन गोष्टी निर्णायक ठरल्या. अफगाण राखीव सैन्याने चामड्याची चिलखते घातली होती. लढून दमलेल्या मराठा सैन्याचे वार हव्या त्या ताकदीने अफगाण सैनिकांच्या अंगावर पडेनात. त्याउलट ताज्या दमाच्या अफगाण सैन्याने जखमी मराठा सैन्यावर त्वेषाने वार करुन त्यांची कत्तल केली. त्या दिवशी संक्रांत होती. सूर्य वृत्त बदलतो तसा त्याच्या किरणांचा कोनही या दिवशी बदलतो. भर दुपारी ही किरणे नेमकी मराठ्यांच्या घोड्यांच्या डोळ्यावर प्रखर पडू लागली. आधीच माणसे आणि घोडी उपाशी त्यात ती जवळजवळ १२ किलोमीटरच्या वर्तुळात धावत होती आणि भरीला हा सूर्यप्रकाश. त्यामुळे अनेक उपाशी घोडी व सैनिक भोवळ येऊन पडू लागले. म्हणून बखरीतही उल्लेख आहे, की संक्रांत मराठ्यांच्या अंगावर कोसळली.)

धन्यवाद

गोलाच्या व्यूहरचनेचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. अशाप्रकारची व्यूहरचना इतिहासात आधीही कुणी केली होती का पाहायला हवे (महाभारत युद्ध सोडून) कारण अब्दालीच्या व्यूहरचनेसारखी व्यूहरचना सामान्यतः युद्धांमध्ये केली जाते परंतु ही गोलाची लढाई करण्याचे श्रेय/ कल्पना नेमके कुणाचे ते माहित आहे का?

गरदे

कॉलेजात असतांना आमच्या वर्गात गरदे आडनावाची मुलगी होती. ती इतरांशी चांगले मराठी बोलत असे. तिचे गाव पानिपत होते. इब्राहीम गारदीचा आणि गरदे आडनावाचा काही संबंध असावा असे मला तेव्हा वाटत असे. पण काहीच बोलणे नसल्याने विचारले नाही.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

गारदी

गारदी हे गार्ड (पहारेकरी) ह्या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. "ध" चा " मा" फेम आनंदीबाईंकडे सुमेर सिंग आणि खडग सिंग हे गारदी होते, असे वाचल्याचे आठवते. (थोडक्यात उत्तरेकडून चौकीदार आणण्याची परंपरा बरीच जुनी आहे!)

प्रत्येक मोठी घटना भाषेला काही ना काही नवे शब्द वा म्हण देत असते. कोंढाण्याच्या लढाईने "गड आला पण सिंह गेला" ही म्हण मराठीला दिली. पानिपतचा आघात महाराष्ट्रावर सर्वाधिक. तेव्हा त्या लढाईतून मराठीला बहाल झालेले शब्द जाणण्यास उत्सुक.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गारदी

गारदी म्हणजे पहारेकरी, भालदार, चोपदार वगैरे सारखा हुद्दा असावा. तो इंग्रजी गार्डचे रुपांतर वाटत नाही. :-( म्हणजे काळाशी सुसंगत वाटत नाही. चू. भू. दे. घे.

इब्राहिम खान, खडगसिंग, सुमेरसिंग अशी हिंदु-मुसलमान नावे बघता ते आडनाव नसावे परंतु नंतर स्वीकारण्यात आले असावे का (गरदे) याची कल्पना नाही.

गारदी - अवांतर

जालावर फिरताना ही मनोरंजक माहिती मिळाली.

धन्यवाद

दुव्यावर खालील माहिती मिळाली.
Rarely does one come across a person with Gardi as a last name, although some still can be located in Rasta Peth in Pune, in the motor transport business. Gardi as surname has mostly been dropped, or was changed to Garde.

माझ्या वर्गातील मुलगी ब्राह्मण असावी. पण दुव्यावर भिल्ल असा उल्लेख आहे.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

स्पष्टीकरण

विकीवरील माहिती होतीच. ;-) पण गारदी हा शब्द मला अरबी/ फार्सी वाटत होता. धनंजय यांनी माझ्या खरडवहीत दिलेले मोल्जवर्थचा संदर्भ आणि विकीवरील हा परिच्छेद पाहता

During the period around 1600 AD concept of using muskets or guns by local powers was acknowledged to keep the numerically powerful enemy at bay such as Adilshahi of Bijapur, Kutubshahi of Golconda, and Nizamshahi of Ahmednagar who with their trading activities with the Portuguese, Dutch, and English secured a few guns and muskets.

या शब्दाचे मूळ युरोपीय आहे असे मानण्यास जागा आहे.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त! प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.... शी बै अच्र्त!

गारदी

इब्राहिम गारदीकडे तोफांची जबाबदारी होती असे पानिपत कादंबरीत वाचल्याचे आठवते.

शंका: सदाशिवरावभाऊला सोडून पळणार्‍यांत कोणी परांजपे होते का?

अवांतरः

प्रत्येक मोठी घटना भाषेला काही ना काही नवे शब्द वा म्हण देत असते. कोंढाण्याच्या लढाईने "गड आला पण सिंह गेला" ही म्हण मराठीला दिली. पानिपतचा आघात महाराष्ट्रावर सर्वाधिक. तेव्हा त्या लढाईतून मराठीला बहाल झालेले शब्द जाणण्यास उत्सुक.

तुमच्या प्रतिसादाचा हा भाग या चर्चेत असायला हवा होता का?

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

हम्म - अवांतर

एक सारखे दोन धागे एकाचवेळी आल्यामुळे थोडा घोळ झाला खरा!

शंका

सदाशिवरावभाऊला सोडून पळणार्‍यांत कोणी परांजपे होते का?_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

एकच

जालावर सदाशिवरावभाऊंच्या संदर्भात केवळ "रामचंद्रनाईक परांजपे" यांचा उल्लेख दिसला ज्यांनी रत्नागिरीचे पेशवेकालीन तुरूंगाधिकारी या नात्याने स्वतःस सदाशीवरावभाऊ म्हणवणार्‍या व्यक्तीस तुरूंगातून सोडून दिले होते.

धन्यवाद

धन्यवाद, विकास. मलाही जालावर बराच शोध घेऊन फारसे काहीच सापडलेले नाही.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

संबंध नसावा

कॉलेजात असतांना आमच्या वर्गात गरदे आडनावाची मुलगी होती. ती इतरांशी चांगले मराठी बोलत असे.

गरदे गर्देच असावे. हे अतिशय मराठी आडनाव आहे. बहुधा कऱ्हाडे ब्राह्मणांत हे आढळते. आणि ही मंडळी सागर, झाशी, ग्वाल्हेर भागातही बऱ्या प्रमाणात आहेत. त्यांना सगरैय्ये म्हणूनही ओळखले जाते. आमच्या महाविद्यालयीन दिवसांत एक गर्दे नावाची मुलगी होती. ती फार सुरेख होती.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असू शकेल

संबंध नसेल् असे असू शकेल. पण पानिपत, गारदी आणि गर्दे मुळे मला वाटले असावे.

ती फार सुरेख होती.

असेच माझ्या वर्गातील मुलीविषयी म्हणता येईल. पण मला तिचे दात आवडत नसत. इतरांनाही आवडत नसावेत. कुणाशी चर्चा केलेली नसल्याने खात्री नाही.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

सगरैय्येवरुन आठवले...

मध्यप्रदेशातील सागर हे गाव पेशव्यांचे उत्तरेतील कारभारी गोविंदपंत बुंदेले (खेर) यांनी वसवले. या गोविंदपंतांचा जन्म १७१० च्या सुमारास खेर या कर्‍हाडे ब्राह्मण कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे या गावचे कुलकर्णीपण होते. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्याने गोविंदा अत्यंत हूड झाला. त्याच्या त्या वागण्यामुळे घरात चालत असलेले कुलकर्णीपण गेलेच, परंतु गोविंदाची गावातूनही हकालपट्टी झाली. चरितार्थासाठी कोकण सोडून गोविंदा घाटावर आला. त्याला प्रारंभी मल्हारराव होळकरांकडे व नंतर पेशव्यांचे सरदार अंताजी माणकेश्वर यांच्या पदरी आश्रय मिळाला. त्या अनुभवामुळे लवकरच हा हूड मुलगा गनिमी काव्याचे डावपेच व प्रशासन यात पारंगत झाला. अंताजीने थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडे या मुलाची शिफारस केली. बाजीरावला छत्रसालाकडून बुंदेलखंडाचा एक त्रृतियांश हिस्सा जहागिरी म्हणून मिळाला होता. त्याची व्यवस्था बघण्यासाठी कोणी तरी माहितगार हवाच होता. त्यामुळे गोविंदपंत हा पेशव्यांचा मुख्त्यार म्हणून बुंदेलखंडात रवाना झाला. त्याचे खेर हे आडनाव मागे पडून तो गोविंदपंत बुंदेले म्हणून प्रसिद्ध झाला. गोविंदपंताने पेशव्यांचा कारभारी म्हणून उत्तम कामगिरी केली व सागर शहर वसवून तेथून तो कारभार पाहू लागला. तो त्या भागात स्थिरावताच स्वाभाविकपणे अनेक कर्‍हाडे ब्राह्मण कुटूंबे महाराष्ट्रातून तिकडे स्थलांतरित झाली. (झाशीची राणी लक्ष्मीबाई हीसुद्धा कर्‍हाडे ब्राह्मण. माहेरची तांबे आणि सासरची नेवाळकर. कवी भा. रा. तांबे हे तर ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवि होते.)

त्यामुळे कर्‍हाडे ब्राह्मण मंडळी सागर, झाशी, ग्वाल्हेर भागात बर्‍यापैकी प्रमाणात स्थाईक आहेत, हे धम्मकलाडू यांचे निरीक्षण बरोबर आहे.

पानिपताविषयी नेमाडे

भालचंद्र नेमाडे यांच्याकडून पानिपताविषयी सहसा ऐकण्यात नसलेली एक गोष्ट ऐकली होती. पेशव्यांच्या जातीयवादी राजकारणापोटी काही जातींचा रोष त्यांनी ओढवला (अगदी देशस्थ आणि कर्‍हाडे यांचाही). याचा एक परिणाम म्हणजे काही जातींचे लढवय्ये पानपतावर गेलेच नाहीत (उदा: महार आणि कायस्थ). त्याउलट १८१८ मधल्या इंग्रजांविरोधातल्या लढायांत महार इंग्रजांच्या बाजूनं लढले कारण त्यांना पेशवाईविषयी काहीच आत्मीयता नव्हती. थोडक्यात, पेशवाईच्या अस्तामध्ये जातीयवादी राजकारणाचा हातभार होता अशी नेमाड्यांची मांडणी होती.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

पटणारे

थोडक्यात, पेशवाईच्या अस्तामध्ये जातीयवादी राजकारणाचा हातभार होता अशी नेमाड्यांची मांडणी होती.

हे विधान पटणारेच आहे. राज्यकर्ते म्हणून पेशव्यांची चूक मोठीच - त्यात जातीयवाद आलाच, पण त्याच बरोबरचे सत्तेचे राजकारण, भाऊबंदकी वगैरे पण सर्व आले. पण पानिपताच्या वेळेस त्याला प्रतिक्रीया देताना आपण नक्की कुणाला जवळ करत आहोत ह्याकडे देखील दुर्लक्ष करण्याचा परीणाम आपल्याला काय भोगावा लागेल ह्याचा विचार देखील पेशव्यांच्या विरोधकांच्या डोक्यात कसा आला नाही, हे राहून राहून वाटते.

म्हणूनच पानीपताचा विचार करताना त्यातून आपण आज देखील काय शिकले पाहीजे ह्याचा देखील विचार करावासा वाटतो. मात्र आपण (म्हणजे एकंदरीत समाज) इतिहासाचा उपयोग हा त्यातील ठेचेतून शहाणपण शिकण्यासाठी करायचा का वर्तमानातील अहंकार फुलवण्यासाठी करत नवीन जखमांसाठी करायचा, हे आजही ध्यानात घेत वागत आहोत, असे वाटत नाही.

विषयाला धरून पण अवांतरः पानीपताची जी जखम आजही मराठी मनास आहे तशीच तितक्या नाही पण आता जुन्या झालेल्या घटनेची जखम अमेरिकन समाजात आजही दिसते, ती म्हणजे व्हिएटनाम. दोन्ही घटनांमधील एक साम्य - ज्याच्या विरुद्ध पाऊल उचलले ती सत्ता (अब्दाली/कम्युनिस्ट) पण उलट हल्ला करण्याकरता खिळखिळी झाली. आणि भेद - अनेक सुधारणा करत (त्यातील एक महत्वाचे - सक्तीच्या सैनिकभरतीवर बंदी) एकमेकांशी अंतर्गत लाथाळ्या न करता, अमेरिका आवडो-न आवडो बलाढ्य होत गेली. मात्र त्याच त्याच जुन्या थडग्यांना उकरत भांडणे करत बसलेले मराठा साम्राज्य मात्र लयास गेले.

दुरदर्शीपणा

त्याउलट १८१८ मधल्या इंग्रजांविरोधातल्या लढायांत महार इंग्रजांच्या बाजूनं लढले कारण त्यांना पेशवाईविषयी काहीच आत्मीयता नव्हती.

हा महारांचा दुरदर्शीपणाच म्हटला पाहीजे. पेशवाई कायम राहिली असती तर महारांचा उद्धार होणे कठिण होते.

_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.

अगदी योग्य निरीक्षण

हा महारांचा दुरदर्शीपणाच म्हटला पाहीजे. पेशवाई कायम राहिली असती तर महारांचा उद्धार होणे कठिण होते.

अगदी योग्य. म्हणूनच १८५७च्या उठावाला म. फुल्यांनी पाठिंबा दिला नाही. ब्रिटिश राजवटीत ते तर पुण्यात महिलांसाठी शाळा काढू शकले होते. पुन्हा पेशव्यांना गादीवर बसवून काय साधणार होते? या सर्व पेशवाई कारभारातून प्रबोधनकारांचा ब्राह्मणद्वेष उत्पन्न झाला. म्हणून तर सर्वसमावेशक काँग्रेस आणि टिळकांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर एकत्र आणता आणता नाकीनऊ आले.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नेतृत्व?

बहुजनांचे ज्योतिबा हे नेते होते, त्यांनी १८५७ च्या युद्धाला पाठिंबा न देण्याचे ठरवलेले असू शकते.
पण पेशवेकाळातील महारांचे नेतृत्व कोणाकडे होते? मला खरेच कल्पना नाही, म्हणून विचारते आहे.
जसे मल्हारराव होळकरांचे पेशव्यांबद्दलचे मत वाचले आहे - की लढाईनंतर आपल्याला पेशवे आपल्या स्त्रियांची लुगडी धुवायला ठेवतील, तसे काही महारांचे प्रतिनिधी म्हणाले असल्याचे माहिती आहे का?

शंका

पेशवे किंवा मुघलांच्या राजवटीत आलेल्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळ ब्रिटिश राजवटीत पडले आणि ते दुष्काळ भौगोलिक कारणापेक्षा मुख्यतः व्यावस्थापकीय निर्णयांमुळे पडले होते. ब्रिटिशांच्या दृष्टीने सारेच भारतीय दुय्यम दर्जाचे होते, पेशव्यांच्या पराभवाने बाकीच्या जातींचे पुनरुत्थान कसे झाले? त्याला गेम थिअरीचे मत्सर हे धोरण म्हणावे काय? ब्राह्मणांचे राजकीय वर्चस्व नष्ट झाल्यामुळे त्यांचे सामाजिक वर्चस्वही कमी झाले काय? पेशव्यांच्या आधी देशस्थ कोब्रांना 'खालचे' समजत, राजकीय वर्चस्वामुळे कोब्रांना वरचे स्थान मिळाले. ब्रिटिशांची मर्जी सांभाळणार्‍या जातींना असा काही (रोल रिवर्सल प्रकारचा) लाभ घेता आला काय?
आफ्रिकनांना गुलामगिरीत मिळालेली वागणूक आणि दलितांना जातिव्यवस्थेत मिळालेली वागणूक यांपैकी अधिक नीच कोणती होती?
--
फुले यांची शाळा 'भावे' यांच्या वाड्यात भरविली जाई असे वाचल्याचे स्मरते.

प्रश्न

पेशवे किंवा मुघलांच्या राजवटीत आलेल्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळ ब्रिटिश राजवटीत पडले आणि ते दुष्काळ भौगोलिक कारणापेक्षा मुख्यतः व्यावस्थापकीय निर्णयांमुळे पडले होते
याच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ मिळू शकतात काय ? विशेषकरून ब्रिटीश अमदानीच्या आधी दुष्काळादि परिस्थितचा काही लेखाजोखा ठेवला गेला आहे का याबाबत कुतुहल आहे.

खुलासा

पुढे चिंतातुर जंतूंनी नमूद केलेलेच आहे, माझ्या विधानांचा मुख्य संदर्भ अमर्त्य सेन यांचाच होता. केंद्रीकरण झालेल्या समाजात व्यापारीकरण वाढले आणि कल्याणकारी शासन नसल्यामुळे साठेबाजीचे भयानक परिणाम झाले असे त्यांचे मत आहे असे वाटते.

भावे नाही भिडे

फुले यांची शाळा 'भावे' यांच्या वाड्यात भरविली जाई असे वाचल्याचे स्मरते.

फुले यांची शाळा 'भिडे' यांच्या वाड्यात भरविली जात असावी.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2684723.cms


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

चूक सुधारल्याबद्दल आभार.

घोडचूक

फारच् मोठी चूक होति.

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

सुधारणा

पेशव्यांच्या पराभवाने बाकीच्या जातींचे पुनरुत्थान कसे झाले? त्याला गेम थिअरीचे मत्सर हे धोरण म्हणावे काय? ब्राह्मणांचे राजकीय वर्चस्व नष्ट झाल्यामुळे त्यांचे सामाजिक वर्चस्वही कमी झाले काय? पेशव्यांच्या आधी देशस्थ कोब्रांना 'खालचे' समजत, राजकीय वर्चस्वामुळे कोब्रांना वरचे स्थान मिळाले. ब्रिटिशांची मर्जी सांभाळणार्‍या जातींना असा काही (रोल रिवर्सल प्रकारचा) लाभ घेता आला काय?

ब्रिटिशांच्या राजवटीत ब्रिटिश शिक्षण घेऊन एतद्देशीय समाज व्यापक विचार करू लागेल आणि सामाजिक सुधारणांना बळ मिळेल असा एक नेमस्त, सुधारणावादी, आशावादी विचारप्रवाह त्या काळी होता. सतीची प्रथा बंद करणे, संमतिवयाचा कायदा वगैरे गोष्टी झाल्याही. त्यामुळे हा 'ब्राह्मणेतर जातींचा ब्राह्मणविरोध' किंवा मत्सर वगैरे एवढ्यापुरताच मुद्दा नव्हता. प्रबोधनकारांची उपाधीही याची साक्ष देते.

ब्राह्मणांचे सामाजिक वर्चस्व, रोल रिवर्सल वगैरे - ब्रिटिश राजवटीत इंग्रजीशिक्षित वर्गाला उत्थापनाच्या संधी उपलब्ध झाल्या. शिकलेल्या माणसाचे सामाजिक स्थान वरचेच राहिले, पण पुराण-वेदप्राविण्यापेक्षा व्यावहारिक शिक्षण अधिक सामाजिक उत्थापन करू लागले. प्रत्येक जातीजमातीने आपापल्या वकुबानुसार आणि इच्छा-उपलब्धतेनुसार त्या संधींचा कमीअधिक फायदा घेतला. त्या (सुशिक्षित) वर्गात ब्राह्मणेतर जातीही हळूहळू समाविष्ट झाल्या, पण ब्राह्मण शिक्षणात मागे का पडावेत? त्यांकडे तर शिक्षणाची संस्कृती पहिल्यापासून होतीच. पहिली शाळा फुल्यांनी काढली, पण ब्राह्मणांनी मुलींना शिकवण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे रोल रिवर्सलपेक्षा हा व्यापक होण्याचा प्रकार म्हणता येईल.

(कदाचित आधीच्या सत्तांचा हा एक अवगुण असेल की सत्ताधारी कोण यावरून रोल-रिव्हर्सल होत राही; अर्थात शिवाजीचे राज्य याला अपवाद होते कारण ते अधिक सर्वसमावेशक होते. म्हणूनच ते अधिक लोकाधार असलेले होते; म्हणजे या नियमालाही अपवाद आहेत.)

दुष्काळः अमर्त्य सेन यांच्या मांडणीनुसार ब्रिटिश राजवटीतले केंद्रीकरण हे आधीच्या स्थानिक सत्तांपेक्षा अधिक व्यापक आणि म्हणून दूरगामी परिणाम करणारे होते असे वाचल्याचे स्मरते. याचा फायदा: अनिष्ट सामाजिक प्रथा देशभर कायद्याने बंद झाल्या. याचा तोटा: चुकीच्या व्यवस्थापकीय निर्णयांतून दुष्काळ अधिक भयंकर झाला.

असो, पण हे धाग्यात फार अवांतर होते आहे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

नजीब

नजिबाने शेवटपर्यंत स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले नाही. कदाचित त्याची ताकद तो ओळखून असावा. रोहिलखंड म्हणून त्याचा भाग प्रसिद्ध झाला. दिल्लीवर १० वर्षे सत्ता मात्र गाजवली. महादजी शिंद्यांनी त्याची अंतर्वेदीतली कबर फोडली असे विश्वास पाटील यांच्या पानिपतावरील टिपणांत म्हटले आहे. नजीबाबादमध्ये त्याची कबर असल्याचे मात्र विकीवर कळते. पण जिवंत असेपर्यंत मराठ्यांना त्याचे जास्त बिघडवता आले नसावे असे दिसते.

नजीब याचे नशीब...

चित्रा,
जो पानिपतच्या युद्धाला कारणीभूत ठरला त्या नजिबाचे नशिब जोरावर होते म्हणावे लागेल.

पानिपत युद्धानंतर अब्दालीला भारतात राहणे अशक्य झाले कारण पानिपतच्या लढाईत मराठ्यांची कत्तल झाली असली तरी मराठ्यांनीही अफगाणांना असा जबरदस्त मार दिला होता, की त्या सैन्याला इथे राहणे नको वाटत होते. त्यांना केव्हा एकदा आपल्या मुलखात पोचतो याची घाई झाली होती. त्यामुळे त्यांनी अब्दालीविरुद्ध चक्क बंड पुकारले. ते हाताबाहेर गेले असते तर अब्दालीची कबर इथेच उभारली गेली असती. दुसरी गोष्ट म्हणजे मराठे पंजाबातून हटताच तेथील शिखांनी लाहोर मुलतान भागात व अफगाण सरहद्दीच्या प्रदेशात लूटमार सुरू केली. त्यामुळे अब्दालीने नजिबाला येथील वजीर नेमले व खंडणी घेऊन तो स्वमुलखाला रवाना झाला.

इकडे मराठ्यांना जोरदार धक्का बसल्याने त्यांनी पुढची दहा वर्षे नव्या मोहिमा हाती घेतल्या नाहीत. एकटा सूरजमल जाट तेवढा नजीबच्या मागे हात धुऊन लागला, पण त्याचाही मृत्यू घातपाताने घडल्यावर नजिबाचा प्रबळ शत्रू नाहीसा झाला. १७६३ नंतर नजिबाने कुरापत काढली नाही. उलट पुढच्या काळात तो मराठ्यांना (शिंदे-होळकर) वारंवार सलोखा करण्यासाठी बोलणी करत होता. नजिबाने मराठ्यांशी तह केला (१७६८) आणि गंगा व यमुनेच्या दुआबातील मराठ्यांनी पानिपतपूर्वी जिंकलेला प्रदेश (अंतर्वेदी) त्याने मराठ्यांना परत दिला. गंमत म्हणजे नजिबखान वृद्धापकाळात आजारी पडून मेला. त्यावेळी तो मराठ्यांबरोबरच एका मोहिमेत सामील होता. त्याच्या पोराचे आणि मराठ्यांचे जमले नाही आणि पुढे महादजी शिंद्यांच्या फौजेने नजिबच्या पोराचा पराभव करुन त्याला स्वतःच्या जहागिरीच्या गावी पिटाळून लावले.

त्यामुळे तुम्ही उल्लेखले ते बरोबर आहे. नजिबाचे फार काही बिघडले नाही. म्हणतात ना 'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान'

किस्त्रीम दिवाळी अंकातील संजय सोनवणी यांचा लेख

पानिपत वरील आपल्या ऐतिहासिक धारणा विश्वास पाटील यांच्या भव्यदिव्य कादंबरीमुळे बर्‍याच प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत असे वाटते.

या पार्श्वभूमीवर २०१० किस्त्रीम दिवाळी अंकातील संजय सोनवणी यांचा लेख किंवा त्यांनी लावलेला पानिपताच्या इतिहासचा अन्वय काही वेगळे मुद्दे मांडतो.
लेख मुळातून वाचणे उत्तम पण मला आठवतात तसे त्यातील मुद्दे खाली देतो आहे-

१. मराठे म्हणजे धीरोदात्त नायक व इतर सर्व वेगवेगळ्या दर्जाचे खलनायक असे आपण समजतो. सोनवणींच्या मते मराठ्यांच्यासह सगळेच आपापला स्वार्थ व फायदा पहाणारे होते - अमुक बरे व तमुक वाईट असे काही नव्हते. जनतेच्या भल्याबुर्‍याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते, तीच गत धर्माचीही.
२. शिवाय ही सर्व पात्रे (त्यांच्या पूर्वजांच्या तुलनेत) सुमार करतबगारीची होती. मराठे चौथाई वगैरे सारखे वायदे केले की पुढे उपद्रव देत नसत. शिन्दे, होळकर, गायकवाड, इ. सरदार आपापली तळी भरण्यात दक्ष होते पण एकूण पेशवे वसुलीबाबत फारसे कार्यक्षम नसत.
३. औरंगजेबानंतरचे पादशहा नालायक होते. दिल्लीमध्ये सरदारांचे अंतर्गत कलह व राजकारण संघर्ष हेच अधिक होते व पादशहाला महत्व उरले नव्हते. नादिरशहाने दिल्लीची लूट केल्यावर त्या भागात फारसे काही मिळण्याजोगे राहिलेले नव्हते. शाह वली उल्लाह् हा मात्र नजीबखानासारख्याना हाताशी धरून धार्मिक राजकारण चालवीत होता.
(पानिपत संघर्ष सुरू असताना व मराठे स्वतःला दिल्लीच्या पादशाहीचे व तख्ताचे रक्षणकर्ते म्हणवत असताना स्वतः पादशहा दुसरीकडेच - बिहारमध्ये - या घडामोडींपासून अलिप्त व दूर होता आणि त्याने नजीबाच्या नावाने आपण त्याला अमुक अधिकारी नेमल्याचे पत्रही दिले होते.)
४. त्यामुळे राघोबांनी अटक घेतली वगैरे मध्ये खास कर्तबगारी तर नव्हतीच पण फायदाही नव्हता. याचमुळे ते कोटींचे कर्ज करून आले.
५. भाऊ हे युद्धसेनापती होण्याच्या योग्यतेचे नव्हतेच. शिवाय् युद्ध करण्याचा त्यांचा हेतूही नसावा, नाहीतर त्यांनी २-३ लाख बाजारबुणगे बरोबर घेतलेच नसते. शेवटपर्यंत त्यांनी युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला. पेशव्यांनाही युद्ध अपेक्षित नसावे नाहीतर त्यांनी विश्वासरावाला पाठवले नसते. लढायचेच असते तर भाऊंऐवजी रघुनाथरावांची नेमणूक योग्य झाली असती.
दत्ताजीचा मृत्यू हा अपघात होता पण त्याने झालेल्या मानहानीबद्दल "काहीतरी" केले पाहिजे म्हणून ही पानिपताची मोहीम आखली गेली.
६. नजीबाविषयी मराठ्यांचे धोरण व आकलन एकसूत्र नव्हते. दत्ताजी शिंदेही इतकी वर्षे उत्तरेत राहूनही नावांचा पूल बांधून देण्यासाठी नजीबावर अवलंबून राहिले व त्यानेही या ना त्या सबबीखाली ते करायचे टाळले. होळकरांचे तर शेवटपर्यंत नजीबाशी संवाद् होतेच.
७. इतके करून जो मराठ्यांचा मित्र ठरू शकला असता, त्या सफदरजंगाशी व शुजाउद्दौल्याशी पैशाच्या लोभाने त्यांनी नाहक शत्रुत्व घेतले. एकूणच मराठ्यांनी आपल्या क्षुद्र स्वार्थापोटी बहुतेकांना दुखावले, आपले शत्रू बनवले व शेवटी दिल्लीचे तख्त फोडून जनतेचाही असंतोष पत्करला.
८. लढाईत रस नसल्यामुळे एकूण भाऊच्या हालचाली धीम्या गतीने चालल्या होत्या. कुंजपुरा जिंकल्यावर उपाशी मराठ्यांची पोटे भरली व मग ते सुस्तावले नि लढाईचा पाठपुरावा न करता केवळ कुरुक्षेत्रावर धर्मकार्ये करण्यासाठी यमुना ओलांडून गेले -- आणि कचाट्यात् सापडले.
९. अगदी लढाईच्या शेवटच्या दिवशीही भाऊंचा इरादा पलायनाचाच होता, गोलाची लढाई ही सुरक्षित पलायनासाठीच योग्य असते.
भाऊंनी स्वतःसुद्धा विश्वासराव पडल्यावर पळ काढला. भाऊ पानपतात मरण पावले याची कुठेही नोंद-पुरावा नाही. तोतयाप्रकरणीदेखील त्याकाळात फारशी चिकित्सा झालेली इतिहासात दिसत नाही, तपशीलांबद्दल मौनच दिसते.

(एक सांगितले पाहिजे की मला स्वतःला इतिहासाचे तितकेसे द्न्यान नाही, पण वाचलेले त्या विषयात स्वारस्य असणार्‍यांच्या नजरेला आणून द्यावे एवढ्याच हेतूने हे लिहिले आहे. अधिक माहितीसाठी मूळ लेख पहावा ही विनंती.)

- दिगम्भा

मुद्दा ४ आणि ५

मुद्दा ४ आणि ५ बद्दल बोलायचे झाले तर राघोबादादांनी कर्ज करून ठेवले हे खरे असले तरी उत्तरेकडील स्वारीवर त्यांना पाठवणे योग्य झाले असते. कारण केवळ त्यांना असणारा पूर्वानुभव एवढेच. त्याचा फायदा झाला असता तसेच ज्याप्रमाणे सूरजमलच्या सुचवण्या भाऊंनी धुडकावून लावल्या तशा राघोबांच्या सूचना (असत्याच तर) धुडकावणे भाऊंना कठिण गेले असते असे वाटते. इतकी मोठी लढाई करण्याकरता भाऊंसारखा अननुभवी सेनापती निवडण्यामागचे कारण कळत नाही. गृहकलह किंवा बायकी राजकारण तर नव्हे?

दिल्लीचे तख्त फोडणे हा ऐतिहासिक वस्तू/ वास्तु नष्ट करण्याचा अपराध आहे परंतु सैन्याच्या पोटाचा विचार करता त्याला फार महत्त्व देणे योग्य नाही. नादिरशहाने त्यापेक्षा खूप मोठी लूट केली होती तेव्हा लोकांच्या भावना दुखावल्या नाहीत का? लोकांच्या भावना वगैरे दुखावण्यामागचे कारण उत्तरेकडील लोकांना मराठ्यांविषयी सहानुभूती/ आपुलकी नसणे, एकजूटीची कोणतीही भावना लोकांमध्ये निर्माण झालेली नसणे हा होता.

मूळ लेखाची स्कॅन्ड कॉपी मिळाली असती तर आवडले असते.

आणि पानिपत

संजय सोनवणींची नवीन कादंबरी "...आणि पानिपत" ची ओळख करुन देणार्‍या ब्लॉग पोस्ट चा दुवा.

शिपाईगडी

पानिपत विषयी काही माहिती ..

भाऊची पानिपत स्वारीच्या सेनापतीपदाची नेमणूक हि योग्यचं मानली पाहिजे. भाऊ उत्तरेत आल्यापासून अब्दालीला त्याच्यावर कुरघोडी करण्यास फारशी संधी मिळाली नाही. कुंजपुरा ताब्यात घेतल्यावर तडक पंजाबात जाणे किंवा परत दिल्लीला येणे अथवा कुंजपुरा येथेच यामुनेस उतार मिळवणे हे तीन मार्ग भाऊ समोर होते. त्यापैकी त्याने पंजाबात जाण्याचा निर्णय घेतला पण तत्पूर्वी कुंजपु-याचा किल्ला खणत्या लावून जमीनदोस्त करण्यात जवळपास एक आठवडा वाया घालवला. या अवधीत अब्दाली यमुनापार भाऊच्या पाठीवर आला. अब्दाली यमुनापार झाल्याने त्याने काही फार मोठा डाव जिंकला असतील भाग नव्हता. मराठ्यांनी पानिपतावर आपली मजबूत छावणी ठोकली, त्यात जवळपास अडीच - तीन महिने त्यांनी वास्तव्य केले. या कालावधीत काही चकमकींमध्ये त्यांनी अफगाण सैन्याचा पराभव केला. डिसेंबर अखेर सैन्यात धान्याचा दुष्काळ पडू लागला तेव्हा प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचा विचार सुरु झाला.
या ठिकाणी आणखी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे मराठ्यांच्या लष्करात धान्याचा तुटवडा कितपत होता. बखरीमधील उपासमारीचे वर्णन तर आहेच पण सोबत बखर हे देखील सांगते कि जेव्हा भाऊने पानिपतचा तळ सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी २-४ दिवस पानिपत येथेच मुक्काम करावा असे शिंदे - होळकरांचे मत होते. एकाच बखरीतील हे वर्णन आहे. ( भाऊ बखर )
याचे कारण म्हणजे शिंदे - होळकर व उत्तर हिंदुस्थानात असणारे जे सरदार होते त्यांना त्यांच्या जहागिरीतून रसद मिळत होती. रसदेचा तुटवडा फक्त पेशव्यांच्या सैन्याला व दक्षिणेतील सरदारांच्या पथकांना होता.
भाऊसोबत किती बुणगे, यात्रेकरू होते यांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. त्याशिवाय बुनग्यांची चर्चा करताना हे लक्षात घायला हवे कि त्यात दक्षिणेतील किती आणि उत्तरेतील किती असतील. याचे कारण म्हणजे लष्कराचा तळ जिथे पडेल तिथे आसपासच्या भागातील बेकारांच्या टोळ्या कामाच्या आशेने येत असत. भाऊचा मथुरा, दिल्ली, कुंजपुरा व पानिपत येथे मुक्काम झाला. तेव्हा आसपासच्या भागातील बरेच लोक चाकरीसाठी मराठ्यांच्या छावणीत आले असावेत. हे लोक पानिपतावर मराठ्यांची कुचंबणा होऊ लागली तेव्हा साहजिकच पानिपतची छावणी सोडून गेले असावेत. कारण पानिपतची छावणी सर्व बाजूंनी घेरली गेली ती अखेरच्या ४ -५ दिवसात. त्यापूर्वी दिल्लीचा रस्ता वगळता पंजाबचा किंवा आसपासच्या प्रदेशात जाण्याचा मार्ग खुलाच होता. जी कथा बुणग्यांची तीच लष्कराची. उत्तरेत आल्यावर प्रसंगानुसार भाऊने सैन्यभरती केली होती. त्याची निश्चित संख्या उपलब्ध नाही. त्यापैकी पानिपतच्या लढाईत किती सैन्य लढले ( नव्या भरतीमधील ) याचा कसलाही अंदाज लावता येत नाही.
भाऊने पानिपतची छावणी सोडण्याचा निर्णय घेतला होता पण दिल्लीकडे जाण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. जवळपास पाच ते सहा कोसांवर असलेल्या यमुनेच्या किनारी आपली छावणी उभारण्याचा त्याचा हेतू होता. यमुनेच्या नजीक छावणी नेल्यास मराठयांचे दिल्लीशी तुटलेले दळणवळण पुन्हा सुरु होणार होते. त्याशिवाय अब्दालीला येणारी रसद यमुनापार रोहील्यांच्या प्रदेशातून येणार होती, ती अडवता येत होती. ज्यामुळे अब्दालीचे सैन्य कोंडीत पकडता येण्यासारखे होते. एकूण भाऊचा हा निर्णय योग्य होता असे म्हणावे लागते. त्याने सैन्याची रचना देखील त्यानुसार केली होती व आघाडीला इब्राहीम खानाची पथके नेमली होती. जर त्याला दिल्लीकडे जायचे असते तर गारदी सैन्य त्याने लष्कराच्या बगलेस न ठेवता मध्यभागी ठेवले असते.
पानिपतचा रणसंग्राम सुरु असताना मराठ्यांनी शत्रूचे ३ हल्ले मारून काढले. या ३ हल्ल्यांमध्ये शत्रू सैन्य पराभूत होऊन मागे पळाले होते. दुदैवाने तिस-या हल्ल्यात विश्वासराव मारला गेल्याने युद्धाचे स्वरूप बदलले आणि मराठे पराभूत झाले. कुंजपुरा येथे काही अफगाण - रोहिले शिपाई मराठ्यांच्या सैन्यात दाखल झाले होते. विश्वासराव मेल्याची बातमी सैन्यात पसरायला फारसा वेळ लागला नाही अशातच हे मराठ्यांच्या आश्रयास आलेले अफगाण - रोहिले शिपाई बुणग्यांमध्ये हुल्लड माजवू लागले. विश्वासराव मेल्याची व मराठ्यांचा पराभव झाल्याची तोंडाने घोषणाही करत होते. त्यामुळे मराठ्यांच्या बुणग्यांमध्ये व गोलाच्या मागील बाजूला असलेल्या सैन्यामध्ये गोंधळ माजला. गोलाच्या मध्यभागी असलेले अफगाण - रोहिले बुणग्यांना लुटू लागले हे पाहताच पिछाडीवरील सैन्याचा समाज झाला कि आपला खरंच पराभव झाला असून शत्रू सेना आत घुसली आहे. तेव्हा पाठीमागे उभे असलेले सैन्य पळू लागले. हा पळ सुरु होताच त्या संसर्गाने मराठ्यांची उर्वरित सेनाही पळू लागली. शिंदे - होळकर यांची पथके देखील उधळून गेली. भाऊंची हुजुरात यावेळी अफगाण हल्ला परतवून परत गोलात आली तर मागे हा गोंधळ माजलेला ! पळणा-या सैन्याला अडविण्याची भाऊने व त्याच्या सरदारांनी पराकाष्ठा केली पण त्यांना अपयश आले. पानिपतचे रण या घटनेने अब्दालीच्या ताब्यात आले. सर्वत्र हा गोंधळ पाहून भाऊने रणकुंडात आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. यामागे कदाचित अपराधीपणाची भावना देखील असू शकेल आणि ती बखरीत दिली आहे की, नानासाहेबाने आपल्या मुलास मोठ्या विश्वासाने भाऊच्या सोबत मोहिमेत पाठविले होते पण पानिपतच्या युद्धात विश्वासराव शत्रूच्या हल्ल्याला बळी पडला तेव्हा आता नानासाहेबास कोणत्या तोंडाने सामोरे जावे हा विचार त्याच्या मनी येणे साहजिकच आहे. पानिपतचा निकाल तसाही विपरीत लागलाच होता तेव्हा भाऊने अखेरचा निर्णय घेतला व हाती घेतलेल्या समशेरीचे पाणी शत्रूला पुरेपूर पाजूनच त्याने आपला देह ठेवला !!

भाऊ पानपतात मरण पावला नव्हता..

लोकसत्ताच्या नुकत्याच ९ जानेवारीच्या लोकरंग पुरवणीत पानिपतवर दोन लेख आले आहेत. पानिपतचे जिल्हाधिकारी असलेले श्री. अजित जोशी यांच्या लेखामध्ये काही नवीन महिती मिळाली आहे. प्रत्यक्ष घटना घडली त्या परिसरात असलेल्या रुढ कथा/कहाण्या जरी अस्सल साधने मानले जात नसले तरी तोही इतिहास जाणून घेण्याचा आणि सत्यशोधनाचा एक दुवा आहे. तर या लेखामध्ये भाऊ हा पानपतात मरण पावला नव्हता असे म्हटले आहे.

पानिपतावर भाऊचे वीरमरण ..!

भाऊचा मृत्यू पानिपतावर झाला हे आता स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. पानिपतची लढाई झाल्यावर दुस-या दिवशी रणात पडलेल्या मराठी सरदारांचे मृतदेह शोधून त्यांचे अग्निसंस्कार पार पाडण्याची जबाबदारी सुजाने आपणहून स्वीकारली. या शोध मोहिमेदरम्यान बिन मस्तकाचे पण भारी पोशाख परिधान केलेले एक शव हाती लागले. सुजाच्या आश्रयास असलेल्या मराठी लोकांनी, ज्यात भाऊचे काही सेवक आणि वकील हिंगणे हे होते, त्यांनी त्या मृतदेहाची काळजीपूर्वक तपासणी करून तो देह भाऊचा असल्याचे सांगितले. या घटनेनंतर भाऊच्या देहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. हे घडून गेल्यावर एका अफगाण शिपायाकडून भाऊचे मस्तक ताब्यात घेण्यात आले. भाउच्या गळ्यातील अलंकारांच्या आशेने त्याने भाऊचे मस्तक आपल्या राहुटीच्या जवळ जमिनीत गाडून ठेवले होते. या अफगाण शिपायाने सांगितलेल्या माहितीनुसार पानिपतचे रण अफगाण सैन्याने ताब्यात घेतल्यावर भाऊ हा जखमी अवस्थेत रणातून बाहेर पडत होता. तेव्हा काही अफगाण शिपायांनी त्याचा पाठलाग केला व त्याला घेरून त्याची ओळख विचारली. त्याने काहीही उत्तर न देता या अफगाण शिपायांवर हल्ला चढवला. त्यावेळी झालेल्या संघर्षात भाऊचा मृत्यू झाला.
भाऊच्या या अखेरच्या चकमकीचे वर्णन काशिराजच्या बखरीत आले असून ते त्याने आपल्या आठवणीवर दिलेले आहे. पानिपत झाल्यावर खूप वर्षांनी त्याने आपली बखर लिहिली असून त्यात तपशिलात बराच गोंधळ आहे. हा दोष मान्य केला तरी भाऊचा मृत्यू पानिपतावर झाल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे.
या बखरीशिवाय खुद्द काशीराज व सुजाचे गोसावी सरदार यांनी स्वतः पेशव्यास वैयक्तिक पत्रे पाठवून भाऊच्या मृत्यूची बातमी दिलेली आहे. या पत्रांना नाकारता येत नाही. हि पत्रे मिळेपर्यंत भाऊसाहेब जिवंत असावा अशी पेशव्याला आशा होती पण हि पत्रे मिळताच भाऊच्या मरणाची खात्री पटली व पेशव्याने हाय खाल्ली. तत्कालीन सर्व मुत्सद्द्यांची भाऊच्या मृत्यूविषयी खात्री झाली होती पण राजकारणाचा भाग म्हणून सर्वांनी आपली तोंडे बंद ठेवली ती अखेरपर्यंत !

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार

या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

आजच्या तारखेला बरोबर २५० वर्षांपूर्वी पानिपतावर जे मराठा वीर लढता लढता वीरगतीला प्राप्त झाले त्यांचे विनम्र भावाने स्मरण.

१४ जानेवारी १७६१, पानिपत युद्धाचे विश्लेषण !

पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे विश्लेषण खालील संकेत स्थळावर प्रसिद्ध केले आहे. तरी ते वाचून त्यावरील आपला अभिप्राय कळवावा हि विनंती. तसेच काही त्रुटी असल्यास तसे सांगावे.
http://peshwekalinitihas.blogspot.com/2011/12/blog-post.html

लेख इथे का नाही टाकत?

संजय, तुमचा लेख तुम्ही इथे उपक्रमावर का नाही टाकत? त्यामुळे अनेक सदस्यांना येथेच चर्चा करता येईल.

 
^ वर