पानिपतच्या निमित्ताने...

मित्रहो,
पानिपतची बखर, शेजवलकर व विश्वास पाटील यांची या विषयावरील पुस्तके आपण वाचली असतीलच. मी पानिपतविषयी बाजूबाजूने काही माहिती मिळते का, या कुतुहलापोटी जालाचा धांडोळा घेतला. त्या वाचनात काही अनवट असे मुद्दे आढळून आले. आपल्यालाही काही वेगळे वाचायला मिळाले असल्यास ते येथे नमूद करावेत, या हेतूने हा चर्चाप्रस्ताव.

१) प्रियाली यांच्या अलेक्झांडरच्या धाग्यात ग्रीक सैन्याने नौकांचा पूल सिंधु नदीवर बांधल्याचा उल्लेख केला आहे. पानिपत लढाईच्या वेळीही या तंत्राचा उल्लेख मिळाला. गंगा नदीवर होड्यांचा पूल बांधून मराठा सैन्य नदीपार करुन द्यावे, यासाठी अयोध्येचा नबाब शुजाउद्दौला याच्याशी मराठे बोलणी करत होते. म्हणजे मोठ्या नद्या पार करण्यासाठी आपत्कालीन लष्करी साधन म्हणून होड्यांना होड्या जोडण्याची पद्धत होती.

२) पानिपत लढाई हरल्यानंतर हजारो मराठा सैनिक व त्यांचे कुटूंबीय पुन्हा महाराष्ट्रात परतू शकले नाहीत. ते हरयानातच स्थाईक झाले. अशा लोकांना रोड मराठा म्हटले जाते. त्यांची मराठी नावेही बदलली. अभिनेत्री प्रीती झिंटा हिने एका मुलाखतीत आपले पूर्वज मराठी असल्याचे सांगितले होते. त्यांचे पूर्वीचे नाव झिंट्ये होते व हरयाणवी प्रदेशात ते झिंटा झाले.

३) मराठ्यांना मदत करणार्‍या सूरजमल जाटाचे आणि भाऊसाहेबांचे मतभेद झाले आणि जाटाने ऐनवेळी कुमक केली नाही, पण नंतर मराठ्यांना महाराष्ट्रात परतण्यासाठी किंवा त्यांच्या पोटापाण्याची, उपचाराची सोय करण्यासाठी त्याने मदत केल्याचा उल्लेख आहे. तर या सूरजमल जाटाचा मृत्यू अगदी प्रतापराव गुजर स्टाईलने म्हणजे 'वेडात मराठे वीर दौडले सात' प्रकारचा झाला. ही मिळतीजुळती घटना नव्याने समजली.

येथील व्यासंगी वाचकांनी इतर काही सांगावे. माहितीत भर पडणारी चर्चा व्हावी, ही विनंती. तेवढेच आपल्याकडून पानिपतचे स्मरण..

लेखनविषय: दुवे:

Comments

१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस !

{ दिनांक १४ जानेवारी रोजी, पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो व सूर्यास्त संध्याकाळी, ५ वाजून २० मिनिटांनी होतो अशी, शेजवलकरांची नोंद आहे. याविषयी अधिक माहिती मिळत नसल्याने, पानिपत युद्धाच्या विवेचानासाठी मी, शेजवलकरांच्या नोंदीचा आधार घेतलेला आहे.}

उभय सैन्याची दृष्टादृष्ट :- १४ जानेवारी १७६१ रोजी, सूर्योदयापूर्वी मराठी सैन्य, पानिपत गाव सोडून पूर्वेला असलेल्या यमुना नदीच्या दिशेने जाऊ लागले. खंदक पार करून फौज जसजशी पुढे मोकळ्या मैदानात जाऊ लागली, तसतशी लष्कराची गोलाची रचना बनत गेली. तत्कालीन रिवाजानुसार, लष्कराचे कूच होत असताना किंवा फौज प्रवासाला निघण्यापूर्वीचं सूचक अशी वाद्ये वाजवली जात. परंतु, आज शत्रू सैन्याच्या नकळत जमेल तितके अंतर वेगाने कापायचे असल्याने, अशी वाद्ये वाजवली गेली नाहीत. अर्थात, याचा अर्थ असा कोणी घेऊ नये कि, मराठी सैन्यावर भीतीचे सावट पसरले होते अथवा औदासिन्याची छाया पसरली होती ! मराठ्यांनी आपल्या बाजूने कितीही काळजी घेतली तरी त्या दिवशी निसर्ग देखील काहीसा शत्रूला अनुकूल असाच होता. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने, उत्तर भारतात विलक्षण थंडीचे असतात. विशेषतः दिल्लीच्या उत्तरेकडील भागात तर कल्पनातीत थंडी असते. त्यातही जानेवारी महिन्यात थंडी व धुके यांचा प्रभाव विशेष असा असतो कि, सकाळी दहा - अकरानंतर देखील धुक्याचा पडदा फारसा विरळ होत नाही, तर कधी - कधी धुके फारसे पडतचं नाही ! जानेवारी महिन्यात पडणाऱ्या दाट धुक्याचा भाऊला बराच अनुभव आला असावा. या दाट धुक्याचा फायदा घेऊन, भल्या पहाटे जर आपण छावणी सोडून निघालो, तर दुपारपर्यंत, शत्रूच्या नकळत कमीतकमी दोन कोस अंतर तरी पार करून जाऊ असा त्याचा विचार असावा. किंवा असेही असू शकते कि, नैसर्गिक परिस्थितीचा अशा प्रकारे फायदा घेण्याचा सल्ला त्याला सरदारांनी दिला असावा. ते काहीही असले तरी, जानेवारी महिन्यात पडत असलेल्या दाट धुक्याचा फायदा घेण्याचे मराठी लष्कराने ठरवले नव्हतेचं असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! पानिपत ते यमुना नदीचा किनारा यादरम्यान जवळपास ५ कोसांचे अंतर आहे. त्यातील दोन - सव्वा दोन कोसांचे अंतर जर शत्रूच्या नकळत पार करता आले तर मोठीच मजल मारल्यासारखे होणार होते. त्यानुसार भाऊने १४ जानेवारी रोजी सुर्योदयापूर्वी, बहुतेक पाच ते सहाच्या दरम्यान केव्हातरी पानिपतहून आपला मुक्काम हलवला. भाऊचे दुदैव म्हणा किंवा निसर्गाचा लहरीपणा म्हणा, त्या दिवशी धुक्याने अब्दालीला साथ दिली ! नेहमीपेक्षा, त्या दिवशी धुके फार कमी पडले व सूर्योदय होतांच, मराठी सैन्याप्रमाणे त्यानेही आपला मुक्काम गुंडाळण्यास आरंभ केला !!
सूर्योदय झाल्यावर, भाऊच्या लक्षात वस्तुस्थिती आली असावी. मराठी सैन्य, छावणीतून बाहेर पडल्याची बातमी शत्रूला समजून, तो कधीही चालून येण्याची शक्यता होती. एकूण, शत्रूच्या नकळत जास्तीत जास्त अंतर कापून पुढे निघून जाण्याचा बेत आता फार काळ गुप्त राहाण्याची शक्यता नव्हती. असे असले तरी भाऊवर किंवा मराठी सैन्यावर त्याचा फारसा विपरीत परिणाम झाला नाही. यामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे, मराठी लष्कराने अफगाण सैन्याची अजिबात दहशत खाल्लेली नव्हती. दुसरे म्हणजे, पानिपत सोडण्याचे निश्चित झाले होते. धुके असो वा नसो, पण पानिपत सोडून जायचे हा मराठ्यांचा बेत पक्का होता. पहाटे पडणाऱ्या धुक्याचा फायदा घेऊन, शत्रू सैन्यापासून त्यांना काही काळ आपले अस्तित्व लपवायचे होते. या काळात शक्य तितक्या वेगाने त्यांना पानिपतपासून लांब व यमुनेच्या जवळ जाऊन पोहोचायचे होते. परंतु, धुक्याचा पडदा जवळपास अदृश्य झाल्याने, बहुतेक लवकरचं आपणांस शत्रू सैन्याच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल याची जाणीव मराठी लष्कराच्या सेनापतीला व त्याच्या सरदारांना झाली असावी.
भाऊची कैफियत, बखर सांगते त्यानुसार सूर्योदयानंतर सकाळी सहा / सात- आठ घटका उलटून गेल्यावर, हत्तीवर निशाणे देऊन नौबत व चौघडा सुरु केला. यावेळपर्यंत मराठी सैन्य पानिपतपासून दीड कोस पुढे निघून आले होते. शेजवलकर यांच्या मते, १४ जानेवारी रोजी पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो. कैफियत व बखर सांगते कि सुर्योदयानंतर सुमारे सहा ते आठ घटका उलटून गेल्यावर लष्करातील नौबत व चौघडा वाजू लागले. १ घटका म्हणजे २४ मिनिटे हे प्रमाण गृहीत धरले असता ६ घटका म्हणजे १४४ मिनिटे किंवा ८ घटका म्हणजे १९२ मिनिटे. याचा अर्थ असा कि, सूर्योदय झाल्यावर साडे नऊ ते सव्वा दहाच्या सुमारास मराठी सैन्यात नौबत, चौघडा वाजू लागले. लष्करात नौबत, चौघडा वाजल्याची नेमकी वेळ शोधून काढण्याच्या प्रयत्नामागील मुख्य कारण म्हणजे, अफगाण सैन्य दृष्टीक्षेपात आल्यावर लष्कराला युद्धाच्या तयारीने सज्ज राहण्याचा इशारा देण्यासाठी नौबत, चौघडा वाजवण्यात आला. हत्तींवर निशाणे देण्यात आली. या ठिकाणी हत्तींवर निशाणे देणे किंवा नौबत व चौघडा वाजवण्यामागील कारण काय असावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी हजारो - लाखोंच्या संख्येने लोकं लढायांमध्ये सहभागी होत. एवढ्या मोठ्या जनसमुदायास किंवा दूर अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या सेनाधिकाऱ्यांना व्यक्तीशः आज्ञा देणे मुख्य सेनापतीला शक्य नसे. तसेच, आजच्या काळी उपलब्ध असलेली संपर्कसाधने देखील त्यावेळी अस्तित्वात आलेली नव्हती. अशा स्थितीत लष्कराला आदेश कशा प्रकारे दिला जात असेल ? शांततेच्या वेळी, म्हणजे युद्धापूर्वी किंवा मुक्कामाहून कूच करतानाच्या वेळी लष्कराला मार्गदर्शन करण्यास भरपूर वेळ उपलब्ध असतो पण प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी हे कार्य कसे केले जात असावे ?
तुम्ही कधी लष्कराची किंवा पोलिसांची परेड पाहिली आहे का ? Marching Band च्या तालावर, पावले उचलत जाणाऱ्या लष्करी पथकाची किंवा पोलिसांची सर्व हालचाल हि त्या Band च्या सुरावर, तालावर होत असते. अर्थात, परेड प्रसंगी ऑर्डर देणारा अधिकारी आघाडीवर असतो, नाही असे नाही, पण परेड करणाऱ्या लोकांना त्याचा आवाज ऐकू नाही आला तर निदान Band चा आवाज तरी ऐकू येतोच कि, त्यामुळे परेड करताना जरी त्यांना तुकडी प्रमुखाचा आवाज ऐकू नाही आला तरी Band च्या सुरावटीवर त्यांना आपल्या हालचालींत बदल करता येतात ! सध्याच्या काळात Marching Band चा वापर परेड प्रसंगी होत असला तरी, त्यावेळी मात्र त्याचा उपयोग हा लष्करी तुकड्यांना आदेश देण्यासाठी होत असे. आजच्या काळात, परेड प्रसंगी लष्कराच्या प्रत्येक विभागाची किंवा पथकाची वाद्यांची एक विशिष्ट सुरावट ठरलेले असते. त्याकाळात देखील घोडदळ, पायदळ, धनुर्धारी इ. पथकांसाठी विशिष्ट अशी एक वाद्यांची सुरावट ठरलेली असे. त्याचप्रमाणे, आजच्या काळात जसे लष्कराच्या विविध विभागांना एक विशिष्ट निशाण दिलेले असते, त्याचप्रमाणे तेव्हाही लष्करातील विविध पथकांना त्यांची निशाणे ठरवून दिलेली असत. लढाईप्रसंगी वाद्ये व निशाणे या दोन्हींचा वापर केला जात असे. मुख्य सेनापतीने आदेश दिल्यावर जवळ जे निशाणाचे हत्ती असत, त्यांवर विशिष्ट आज्ञेचे निशाण फडकवले जाई. दूर अंतरावरील जे लष्करी अधिकारी असत, त्यांचे किंवा त्यांच्या हस्त्कांचे त्या निशाणाकडे लक्ष असे. निशाण घेऊन बसलेली व्यक्ती, त्या निशाणाची, सेनापतीच्या आज्ञेनुसार, पूर्वसंकेतानुसार निश्चित केलेली सांकेतिक हालचाल करीत असे. दूर अंतरावरील लष्करी अधिकारी त्या सांकेतिक हालचालीनुसार आपापल्या पथकांना हल्ल्याच्या किंवा माघारीच्या सूचना देत. या सेनाधिकाऱ्यांच्या हाताखाली विविध पथकांतील असे हजारो सैनिक असत. या पथकांचे प्रमुख, त्या सैन्याधिकाऱ्याच्या आसपास उभे असत. युद्ध प्रसंगी ज्या वेळी, ज्या पथकाची गरज असेल, त्यावेळी त्या पथकाच्या प्रमुखास तशी आज्ञा दिली जात असे. लगेच तो आपल्या पथकाजवळ जात असे. त्या पथकाला एक विशिष्ट निशाण असे. ते निशाण घेतलेली व्यक्ती हत्ती अथवा घोड्यावर बसलेली असे किंवा जमिनीवर उभी असे. पथक प्रमुखाचा आदेश मिळताच ती व्यक्ती निशाणाची पूर्व संकेतानुसार हालचाल करत असे. त्या अनुरोधाने, या विशिष्ट पथकातील सैनिक एकत्र येत असत. प्रत्येक पथकाला जसे निशाण असे त्याचप्रमाणे वाजंत्री पथक देखील असे. या वाजंत्री पथकाचे काम म्हणजे, लष्कराचे नीतिधैर्य, उत्साह वाढवणे व लष्कराला मार्गदर्शन करणे ! युद्धातील प्रत्येक हालचालीसाठी ज्या प्रमाणे निशाणाची सांकेतिक हालचाल केली जाई, त्याचप्रमाणे त्या निशाणाच्या अनुरोधाने वाद्ये देखील वाजवली जात असत. दरवेळी सैनिक, निशाण ज्या ठिकाणी फडकावले जात आहे त्या ठिकाणी पाहू शकत नाहीत, पण वाद्यांचे आवाज तरी ऐकू शकतात ना ! एकूण, तत्कालीन युद्धपद्धती आपण समजतो तशी मागास किंवा गोंधळाची नसून, ती अतिशय विचारपूर्वक व नियोजनबद्ध असलेली दिसून येते. अर्थात, याविषयीचे माझे विवेचन काहीसे अपुरे आहे हे मला मान्य आहे. याचे कारण म्हणजे मी काही यातील तज्ञ नाही. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करणे हे माझे काम आहे व हे कार्य पार पाडत असताना, इतिहास संशोधकांनी किंवा अभ्यासकांनी आजवर ज्या ज्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले ते मुद्दे प्रकाशात आणणे मला गरजेचे वाटते.{ तत्कालीन लष्करांत होणारा वाद्यांचा व निशाणांचा उपयोग, याविषयीचा थोडा तपशीलवार उल्लेख ना. वि. बापट यांच्या ' पानपतची मोहीम ' या कादंबरीत आलेला आहे. }
पानिपतपासून सुमारे सहा ते सात किलोमीटर्स अंतरावर अब्दालीची छावणी सीवा व दिमाना या गावांच्या दरम्यान साधारण पूर्व - पश्चिम अथवा नैऋत्य - ईशान्य अशी तीन ते चार किलोमीटर्स अंतरावर किंवा सहा किलोमीटर्स अंतरापर्यंत पसरली असावी. मराठी सैन्य पानिपतमधून बाहेर पडल्याची जरी बातमी अब्दालीला मिळाली असली तरी ते सैन्य यमुनेकडे जात आहे याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्या दृष्टीने मराठी फौजा त्याच्या छावणीवर चालून येत होत्या. मराठे आपल्यावर चालून आले तर ते गनिमी पद्धतीने म्हणजे दोन ते तीन टोळ्या बनवून आपल्यावर हल्ला करणार अशी अब्दालीची खात्री होती. त्यानुसार, मराठी लष्कराला रोखण्यासाठी त्यानेही आपल्या लष्कराची तीन टोळ्यांमध्ये विभागणी केली. पहिली टोळी, उजव्या बाजूला रोहिला - अफगाण सरदारांच्या सोबतीने पाठवली. रोहिला सरदारांचे तळ उजव्या बाजूला म्हणजे, यमुनेच्या दिशेला असल्याने त्या बाजूने मराठ्यांचा हल्ला आल्यास तो रोखण्याची जबाबदारी साहजिक त्यांची होती. रोहिल्यांच्या मदतीला म्हणून त्याने आपल्या काही अफगाण तुकड्या देखील सोबत दिल्या होत्या. छावणीच्या मधोमध अब्दालीच्या सैन्याचा तळ होता. त्यामुळे आघाडीच्या मध्य भागाची जबाबदारी अब्दालीने आपल्या वजीरावर सोपवली. छावणीच्या डाव्या बाजूला सुजा , नजीब यांचे गोट होते. साहजिकचं त्यांची नेमणूक आघाडीच्या डाव्या फळीवर झाली. त्यांच्या मदतीला म्हणून अब्दालीने काही अफगाण पथके नेमलेली होती. वास्तविक, या हिंदुस्थानी मुस्लिमांचा त्याला अजिबात भरवसा नव्हता ! ऐन युद्धात हे लोक कच खाऊन किंवा आपल्या व आपल्या सैन्याला मराठ्यांच्या दाढेला देऊन पळून जातील याविषयी त्याच्या मनी तिळमात्र शंका नव्हती !! यासाठीच मदतीच्या नावाखाली त्याने आपली काही अफगाण पथके या हिंदुस्थानी मित्रांच्या आजूबाजूला व मागच्या बाजूला उभी केली होती. मराठी फौज बुधवारी बाहेर पडणार असल्याची बातमी यापूर्वीच अब्दालीला मिळालेली होती. पण ते बुधवारी बाहेर पडतीलचं असेही नव्हते. तेव्हा लष्कराला सावध व तयारीने राहाण्याचा इशारा देण्यापलीकडे अब्दालीने काही केले नव्हते. अब्दालीच्या या कृत्यामुळे त्याचा काहीसा फायदा झाला. लष्कराला सज्जतेचे आदेश आधीच दिल्याने, मराठी सैन्य बाहेर पडत असल्याची बातमी मिळताच, त्याचे सैन्य त्वरेने रणभूमीकडे जाऊ शकले. शक्य तितक्या जड, लांब पल्ल्याच्या तोफा आघाडीवर जाणाऱ्या पथकांनी सोबत घेतल्या. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो कि, मैदानी युद्धात वापरल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या जड तोफांच्या माऱ्याची रेंज किती किलोमीटर असावी ? याविषयी स्पष्ट असे उल्लेख मिळत नाही. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा मराठे - अब्दाली आमनेसामने होते, त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये साधारण पाच ते सहा किलोमीटर्सच्या दरम्यान अंतर असावे. त्यावेळी मराठ्यांच्या तोफांनी अफगाण लष्कराची व अफगाणी तोफांच्या माऱ्याने मराठ्यांची बरीच हानी होत असे. ते पाहता, अशा तोफांचा पल्ला साधारण दहा किलोमीटर्सच्या आसपास असावा असे अनुमान बांधण्यास काहीचं हरकत नसावी. त्याशिवाय आणखी एका मुद्द्याकडे मी अभ्यासू वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो व तो मुद्दा असा कि, जयपूरच्या किल्ल्यावर असलेल्या एका मोठय तोफेची रेंज ३५ किलोमीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. या तोफेची रेंज मोठी असल्याने तिचे वजन देखील जास्त आहे. म्हणजे यावरून असे म्हणता येते कि, मैदानी युद्धातील लांब पल्ल्याच्या तोफांची रेंज हि गडावरील तोफांच्या तुलनेने कमी असल्याने त्यांचे वजन देखील तितकेसे जास्त नसावे. याचाच अर्थ असा कि, पानिपतावर मराठ्यांनी ज्या जड व लांब पल्ल्याच्या तोफा वापरल्या त्या वाहून नेण्यासाठी तीनशे - साडेतीनशे बैलांच्या दोन किंवा तीन माळा लावण्याइतपत फारशा जड नसाव्यात. अर्थात, या मुद्द्यावर अजून संशोधनाची गरज आहे. माझा मुद्दा याक्षणी तरी तर्कावर आधारीत आहे. परंतु, ज्याअर्थी मराठी सैन्याने साधारण तीन ते चार तासांत साडेचार - पाच किलोमीटर्सचे अंतर पार केले ते पाहता, तीनचारशे बैलांच्या दोन - तीन माळा लावून ओढायच्या तोफा मराठी सैन्यात नव्हत्या हे सहज सिद्ध होते असे माझे मत आहे.
अब्दालीच्या फौजा मुख्य छावणीतून साधारणतः सात - आठच्या दरम्यान आघाडीकडे रवाना झाल्या असाव्यात. अफगाण लष्कराची उजवी बाजू सांभाळणाऱ्या रोहिल्यांच्या सैन्यात मुख्यतः घोडेस्वारांचा भरणा अधिक होता. त्याशिवाय काही प्रमाणात पायदळ देखील होते. रोहिल्यांच्या या फौजेचे नेतृत्व हाफिज रहमत खान, दुंदेखान, फैजुल्लाखान इ. सरदार करत होते. रहमत खान आजारी असल्याने पालखीत बसला होता तर त्याचा मुलगा इनायतखान व चुलत भाऊ दुंदेखान हे रहमत खानाच्या सैन्याचे नेतृत्व करीत होते. रोहिल्यांची मुख्य शस्त्रे तलवार, ढाल, धनुष्य - बाण, भाले, कट्यारी इ. असून बंदुका फार क्वचित लोकांकडे असाव्यात. या सैन्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या कि नाही याची माहिती मिळत नाही. कदाचित असाव्यात अथवा असल्यास त्यांचे प्रमाण नगण्य असेच असावे. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला अमीरबेग, बरकुरदारखान यांची अफगाण पथके होती. यात सर्व घोडेस्वार असून यांच्याकडे देखील तलवारी, कट्यारी अशीचं शस्त्रे होती. या अफगाण पथकासोबत बहुतेक हलक्या अशा तोफा असव्यात अथवा नसाव्यात.
अब्दालीच्या उजव्या आघाडीवर असलेली फौज पानिपतच्या रोखाने म्हणजे वायव्येकडे न वळता काहीशी उत्तर - ईशान्य दिशेने पुढे सरकत गेली. यामागील कारण काय असावे ? या सैन्याचा रोख सरळ उत्तरेस असायला हवा होता पण यांचा मोहरा ईशान्य दिशेकडे वळत गेला. यामागील कारण माझ्या मते असे आहे कि, मराठी सैन्य गनिमी काव्याने हल्ला करणार हे निश्चित होते. अशा स्थितीत त्यांचा अब्दालीच्या छावणीवर हल्ला आलाचं तर त्यांची एक तुकडी छावणीच्या उजव्या बाजूवर येऊन आदळणार, म्हणजे ती थेट उत्तरेकडून न येता ईशान्येकडून येणार हे निश्चित ! अर्थात, दिशांचे हे भान त्याकाळी लोकांना फारसे नव्हते. परंतु रोहिला सैन्य व त्यांच्या डावीकडे असलेले अफगाण वजीराचे सैन्य, यांमध्ये दीड ते दोन किलोमीटर्सचे अंतर असावे. किंवा याहून कमी. हे जर लक्षात घेतले तर रोहिला सैन्याचा रोख ईशान्येकडे का वळला असावा याचे उत्तर मिळते. आपल्या व वजीराच्या तुकडीत फार कमी अंतर आहे, याचा अर्थ मराठी सैन्य आपल्या दोघांच्या मधून लढाई न देता तरी जाऊ शकत नाही पण उजव्या बगलेवरून निसटून गेले तर ? बहुतेक याच भयाने, रोहिल्यांची फौज काहीशी ईशान्येकडे सरकली. नऊ - साडेनऊच्या सुमारास हि फौज, मराठी सैन्याच्या गोलाच्या आघाडीवर असलेल्या गारदी पथकांच्या नजीक जाऊन पोहोचली. माझ्या मते या दोन सैन्यांच्या दरम्यान कमीतकमी एक ते दीड किलोमीटर्सचे अंतर असावे. अब्दालीच्या छावणीचा पसारा पूर्व - पश्चिम असा चार - सहा किलोमीटर्स अंतरावर पसरला होता असे जर गृहीत धरले तर, छावणीच्या उजव्या अंगाला असलेल्या या रोहिला फौजेला, गारदी सैन्याच्या अंगावर चालून जाण्यासाठी कमीतकमी तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर तुडवावे लागले असावे. रोहिला सैन्याने सात - आठच्या दरम्यान मुख्य छावणी सोडली असे जर गृहीत धरले तर तीन - साडेतीन किलोमीटर्सचे अंतर कापायला त्यांना सुमारे दीड - दोन तासांचा अवधी लागला असावा. सकाळी नऊ - साडेनऊच्या सुमारास गारदी सैन्याच्या उजव्या हाताला, सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागली. बहुतेक याच वेळेस अफगाण वजीर हुजुरातीच्या उजव्या बाजूनजीक येऊन पोहोचला असावा. त्यामुळेचं मराठी सैन्यात चौघडा - नौबत वाजवण्यास सुरवात झाली असावी.

पानिपतच्या युद्धाला आरंभ प्रथम कधी झाला असावा ? :- भाऊची कैफियत, भाऊची बखर, काशिराजची बखर, नुरुद्दीनकृत नजीब चरित्र, महंमद जाफर शाम्लू, शिवप्रसादची बखर, अब्दालीचा पानिपत विजयाचा जाहीरनामा, पानिपतच्या युद्धानंतर अब्दालीने जयपूरच्या सवाई माधवसिंगास लिहिलेलं पत्र, नाना फडणीसचे आत्मवृत्त इ. मधील पानिपतच्या लढाईचा आलेला वृत्तांत पाहिला असता असे दिसून येते कि, पानिपतच्या युद्धाला नेमकी कोणत्या पक्षाकडून सुरवात झाली असावी याविषयी माहिती वरीलपैकी एकाही संदर्भ साधनांत आलेली नाही. त्यामुळे युद्धाला आरंभ नेमका गारदी - रोहिला या मोर्च्यावर झाला कि भाऊ - शहावली यांच्या मोर्च्यावर झाला हे निश्चित करणे अवघड होऊन बसले आहे. रोहिला सैन्य वेगाने पुढे सरकून गेल्यामुळे त्यांची व गारद्यांची लढाई जुंपली असे म्हणावे तर मग शहावलीखान जेव्हा हुजुरातीच्या दिशेने चालून आला त्यावेळी, तोफांची लढाई सुरु असताना हुजुरातीने गोलातून बाहेर पडून त्याच्यावर स्वारी का केली असावी ? गारदी - रोहिले यांच्यात संघर्ष सुरु झाल्यावर विंचूरकर, गायकवाड हे सरदार गोलातून बाहेर पडले कि तत्पूर्वीच त्यांनी रोहिल्यांवर चाल केली होती ? सारांश, पानिपतच्या लढाईचे शक्य तितके बिनचूक वर्णन करण्यासाठी या व अशा इतर अनेक प्रश्नंची उत्तरे मिळणे अत्यावश्यक आहे. अर्थात, या प्रकरणाविषयी मला जितकी संदर्भ साधने उपलब्ध झाली त्यांच्या आधारे आणि तर्काच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यानुसार पानिपतच्या लढाईचे वर्णन खाली देत आहे.
युद्धाला प्रथम आरंभ गारदी - रोहिला यांच्या बाजूला झाला असावा असे भाऊची कैफियत, काशीराजची बखर व नुरुद्दीनकृत नजीब चरित्र यांवरून दिसून येते. अर्थात, या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, गारदी - रोहिला मोर्चा ज्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी वरील तिन्ही ग्रंथांचे लेखक हजर नव्हते. कैफियतकार यावेळी हुजुरातीच्या आसपास, म्हणजे मुख्य सैन्याच्या मागे गोलाच्या आत असावा. याचा अर्थ असा होतो कि, युद्धाला आरंभ नेमका कुठे झाला याविषयी त्याच्याकडे नेमकी माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे. पण, कैफियत नाना पुरंदरे याने लिहिलेली आहे असे जर धरून चालले तर प्रथम हे बघावे लागेल कि, गोलाच्या रचनेत तो नेमका कुठे होता ? माझ्या मते, तो हुजुरातीच्या उजव्या बाजूला असावा. कारण, नाना पुरंदरेच्या पत्रात, तो व होळकर एकाच सुमारास व बहुतेक सोबतीनेचं पानिपतहून निघाल्याचा उल्लेख आहे. हे लक्षात घेतले असता, युद्धाला प्रथम आरंभ गारद्यांच्या बाजूला झाला असल्यास त्याची बातमी नाना पुरंदरेला माहिती असणे शक्य आहे. परंतु, नाना पुरंदरे हाच भाऊच्या कैफियतीचा लेखक आहे, हे अजूनही निश्चित न झाल्याने कैफियतीवर पूर्णतः भरवसा ठेवता येत नाही !
काशीराज पानिपत युद्धाच्या वेळी आघाडीवर असला तरी तो सुजासोबत, शिंदे - होळकरांच्या समोर उभा होता. त्यामुळे त्याला, शहावलीच्या पलीकडे उभ्या असलेल्या रोहिल्यांच्या हालचालींची फारशी माहिती असणे शक्य नाही. नजीबचा चरित्र लेखक यावेळी नजीबसोबत रणभूमीवर हजर होताच असे म्हणता येत नाही. एकूण, भाऊ कैफियतीचा लेखक, नुरुद्दीन व काशीराज हे त्रिकुट, युद्धाला प्रारंभ झाला त्या ठिकाणी हजर नव्हते हे सिद्ध होते. परंतु, तरीही या तिघांनी पानिपतच्या लढाईला आरंभ गारद्यांच्या बाजूला झाल्याचा उल्लेख केलेला आहे. यामागील कारण काय असावे ते माहिती नाही, पण या तिघांचे या विशिष्ट मुद्द्याविषयी झालेले एकमत पाहता, त्यांच्या माहितीवर विश्वास ठेवण्याशिवाय इतर पर्याय नाही. अर्थात, जोवर अधिक विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही तोवर या तिघांच्या लेखनावर थोडाफार विश्वास ठेवावाचं लागेल !
भाऊची कैफियत, काशीराज व नुरुद्दीन यांची माहिती गृहीत धरून असे म्हणता येईल कि, पानिपतच्या लढाईला आरंभ प्रथम गारद्यांच्या बाजूला झाला. साधारणतः नऊ - साडेनऊच्या दरम्यान गारदी - रोहिला फौजा समोरासमोर आल्या असाव्यात. आपल्या उजव्या बाजूने शत्रू सैन्य चालून येत आहे हे लक्षात येतांच, यमुनेच्या दिशेने निघालेली गारदी फौज जागीच थांबली. पानिपत लढाईच्या वेळी गारदी पथके नेमकी कुठे असावीत ? कैफियतकाराच्या मते, पानिपत सोडून दीड कोस म्हणजे साडेचार - पावणेपाच किलोमीटर्स अंतर पार करून मराठी लष्कर पुढे निघून आले त्यावेळी शत्रू सैन्य त्यांच्या दृष्टीस पडले. कैफियतकार कोण होता हा मुद्दा बाजूला ठेऊन, तो हुजुरातीच्या सोबत होता हे लक्षात घेतल्यास, दीड कोसांचे अंतर पार केल्याचा जो उल्लेख त्याने केला आहे तो हुजुरातीला अनुलक्षून आहे हे उघड आहे. याचा अर्थ असा होतो कि, सध्याचे जे पानिपतचे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या आसपास हुजुरातीची फौज येऊन उभी राहिली असावी. हुजुरात जर स्मारकाच्या आसपास उभी होती असे गृहीत धरले तर गारदी फौज तेथून एक - दीड किलोमीटर्स पुढे उभी असणार हे उघड आहे. पानिपतपासून सुमारे पाच - सहा किलोमीटर्स अंतर चालून आल्यावर गारद्यांना आपल्या उजव्या बाजूला शत्रू सैन्याची निशाणे दिसू लागल्यावर त्यांची चाल थांबली. शत्रू सैन्य सुमारे एक - दीड किलोमीटर्स पेक्षाही लांब अंतरावर उभे असावे. गारदी पथके ज्या ठिकाणी उभी होती, ती जागा उंचवट्यावर होती कि सपाटीला होती ते समजणे आता अशक्य आहे. उंचवट्यावर जर ते उभे असतील तर त्यांना लांबून, दक्षिणेच्या बाजूने येणाऱ्या शत्रूसैन्याच्या रांगा दृष्टीस पडल्या असण्याची शक्यता आहे. असे असेल तर त्यांनी तातडीने आपल्या तोफांचे मोर्चे दक्षिणेच्या बाजूला तोंड करून उभारले असावेत. जर ते सपाटीला असतील तर दुरून दिसणारी शत्रू सैन्याची निशाणे पाहून ते जागीच थांबले असावेत पण मग त्यांनी तोफांचे मोर्चे उभारण्याची घाई केली असावी कि नसावी ? कारण, फक्त निशाणांवरून समोरून येणारी शत्रूच्या सैन्याची एखादी लहानशी तुकडी आहे कि मोठी फौज आहे हे समजून येत नाही. पण अधिक माहिती उपलब्ध नसल्याने या मुद्द्यावर जास्त चर्चा करणे चुकीचे आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतो कि, भाऊच्या कैफियतीनुसार प्रथम विंचूरकर, यशवंतराव पवार, माणिकराव कापरे हे सरदार पुढे सरकले. रोहिल्यांशी त्यांचा संघर्ष झाला व एकप्रकारे पराभूत होऊन हे लोक परत गोलात येऊन उभे राहिले. याविषयी विरुद्धपक्षीय बखरींमध्ये कसलाच उल्लेख मिळत नाही.
मराठी सरदारांनी गोल फोडला असे शेजवलकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. शेजवलकरांच्या विधानाचा आधारे सरदारांनी गोल फोडल्याचे वर्णन, विश्वास पाटलांनी आपल्या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी रंगविले आहे. परंतु, या ठिकाणी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे कि, मराठी सरदारांनी गोल फोडला होता का ? माझ्या मते, विंचूरकर प्रभूती सरदारांनी गोल फोडला नाही. पहिली गोष्ट अशी कि, या लोकांनी गोल फोडला असे कैफियतकार अजिबात लिहित नाही. भाऊचा बखरकार हा सरदारांचा पक्ष घेऊन लेखन करणारा आहे व भाऊचा विरोधक आहे तर कैफियतकार हा भाऊचा पक्षपाती आहे असे सर्वसामान्यतः मानले जाते. जर हे खरे असेल तर कैफियतकाराने पवार, विंचूरकर इ. सरदारांनी गोल फोडला असे स्पष्टपणे का लिहिले नसावे हा प्रश्न निर्माण होतोचं.
माझ्या मते गोलाच्या लढाईचे स्वरूप, व्यवस्थितरित्या स्पष्ट न झाल्याने हा सर्व गोंधळ निर्माण झाला असावा. त्यासाठी प्रथम गोलाची लढाई म्हणजे काय हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. गोलाच्या लढाईचा प्रसार हा युरोपियन लोकांनी हिंदुस्थानात केला. त्यांच्या सैन्याची रचना जर लक्षात घेतली तर अशा तऱ्हेची लढाई हि बचावात्मक प्रसंगी, त्यांना अतिशय उपयुक्त अशीच होती. त्यांचे सैन्य मुख्यतः बंदुकधारी पायदळ पलटणींचे असे. त्यामानाने घोडदळाचे प्रमाण, तुलनेने अल्प असेच होते. या सैन्याची मुख्य शस्त्रे तोफा - बंदुका हि असून, यांच्या सहाय्याने शत्रूशी प्रत्यक्ष न भिडता दुरूनचं त्याचा संहार करणे त्यांना सोयीचे होते. अडचणीचा प्रसंग उद्भवल्यास या सैन्याचा पोकळ गोल बांधून व सभोवती तोफा पेरून, लढाई देत वाट चालत जायचे त्यांना यामुळे शक्य होत असे. यांच्याकडे बंदुका व तोफा असल्याने, या सैन्याच्या पोकळ गोलावर शत्रू चालून जरी आला तरी त्याच्याशी प्रत्यक्ष हातघाईचे झुंज न देता दुरूनचं तोफा - बंदुकांच्या सहाय्याने त्याची राळ उडविणे किंवा त्याची नासाडी करणे त्यांना सोयीचे जात असे. युरोपियन लोक व्यापारी कंपन्या स्थापन करून हिंदुस्थानात आले. पुढे प्रसंगानुसार त्यांना आपल्या सैन्याची उभारणी करावी लागली. स्वदेशातून इकडे सैनिक आणण्यापेक्षा इथल्याच लोकांना, आपल्या पद्धतीचे लष्करी शिक्षण देऊन, कमी खर्चात इकडेचं फौज उभारणे आपल्या फायद्याचे आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी इथल्या लोकांना हाताशी धरून आपले सैन्यदल उभारले. या सैन्यदलांवरील वरिष्ठ अधिकारी हे युरोपियन असले तरी हाताखालील अंमलदार मात्र एतद्देशीय असत. या अंमलदारांना युरोपियन लोक जे लष्करी शिक्षण देत ते युरोपियन पद्धतीचे म्हणजे कवायती सैन्याच्या लढाईचेचं असे. याचा परिणाम म्हणजे, हे अंमलदार युरोपियन लढाईची पद्धती शिकले पण त्याचा इथल्या परिस्थितीत कितपत उपयोग आहे किंवा त्याचा वापर परिस्थितीनुसार कसा करायचा हे त्यांना समजू शकले नाही. गोलाची रचना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्य लष्करात तोफखाना व बंदुकधारी पायदळाची मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे. जर ते नसेल तर तलवार - भाल्यांनी लढणारे लोक शत्रू सैन्याला, आपल्या गोलानजीक येण्यापासून कसे रोखणार ? तोफा जरी सोबत असल्या तरी नुसत्या तोफांचा या कमी फारसा उपयोग होत नाही. तोफांचा मारा चुकवता येऊ शकतो. तसेच अल्पावधीत तोफांच्या जागा बदलणे देखील अवघड पडते. याचा अर्थ असा होतो कि,गोलाची रचना हि एतद्देशीय फौजांसाठी उपयुक्त अशी नव्हतीच ! याच गोलाची रचना करून निजामाने, उदगीर मोहिमेत मार खाल्ला होता. त्याच्या लष्कराच्या गोलावर हल्ला करताना, जिकडे गारदी पलटणी नव्हत्या तिकडेच मराठ्यांनी जोरदार हल्ले चढवले होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. गारदी सरदारांना गोलाच्या रचनेची उपयुक्तता माहिती होती पण ज्या ठिकाणी बंदुकधारी पलटणी अल्प असून घोडदळ अधिक प्रमाणात आहे, त्या ठिकाणी हि गोलाची रचना कशी वापरायची हे त्यांना बहुतेक माहिती नसावे किंवा याचा त्यांनी विचार देखील केलेला नव्हता.
पानिपत सोडून जाण्याचा जेव्हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा लष्कराची गोलाची रचना करण्याचे ठरले. त्यावेळी, गोलाच्या रचनेत आपल्या लष्कराला अनुकूल असे काही बदल करण्यात आले होते का ? माझ्या मते, भाऊ व त्याचे सरदार यांनी असे बदल केले होते. शत्रू सैन्याने जर आपल्या गोलावर हल्ला केला तर, आपल्या जवळ पुरेसे बंदुकधारी पायदळ नसल्याने त्याला आपण गोलाजवळ येण्यापासून रोखू शकत नाही हे मराठी सरदार जाणून होते. आपल्या सैन्यात घोडदळ अधिक संख्येत असल्यामुळे, आपण गोलाच्या बाहेर पडून शत्रूवर चालून जायचे व त्याचा पराभव करून परत गोलात येऊन उभे राहायचे असे त्यांनी ठरवले होते. गोलाच्या रचनेमुळे सर्व सैन्य एकवटून चालणार असल्याने, प्रसंगी कोणत्याही मोर्च्यावर अल्पावधीत कुमक पाठविणे शक्य होणार होते. सारांश, शेजवलकर यांनी मराठी सरदारांनी गोल फोडल्याचे जे विधान केले आहे ते साफ चुकीचे आहे हे स्पष्ट होते. प्रसंग पडल्यास मराठी सरदार गोलातून बाहेर पडणार हे एकप्रकारे पूर्वनियोजित होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरातसुद्धा गोलातून बाहेर पडून अफगाण सैन्यावर चालून गेली होती. त्यावरून भाऊने गोल फोडला असे म्हणायचे का ? तात्पर्य, मराठी सरदारांनी गोल फोडला म्हणून पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला असे जे अलीकडे सांगितले जाते ते साफ चुकीचे आहे. विंचूरकर, पवार हे सरदार जरी गोलातून बाहेर पडले असले तरी परत ते आपल्या जागी येऊन उभे राहिले होते हे विसरून चालणार नाही. त्याचप्रमाणे, ते गोलातून बाहेर का पडले असावेत हे पाहाणे देखील गरजेचे आहे.
{ या ठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट करतो कि, प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या प्रसंगी जमिनीचे चढ - उतार कसे होते किंवा कोणत्या फौजा चढावर होत्या अथवा उतारावर होत्या / सपाटीवर होत्या याची माहिती उपलब्ध नसल्याने व अशी माहिती आता उपलब्ध होणे जवळपास अशक्य असल्याने याविषयी अंदाजे किंवा तर्काने देखील लिहिणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. }
गारदी सैन्याची चाल ज्या ठिकाणी थांबली, त्या ठिकाणाहून सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर दक्षिणेच्या बाजूला शत्रूसैन्याची निशाणे दिसू लागली. शत्रू सैन्याची निशाणे दृष्टीस पडल्यावर गारदी पथकांनी पूर्वेचा रोख सोडून दक्षिणेकडे, म्हणजे उजवीकडे आपला मोहरा वळवला. गारद्यांची चाल थांबताच, पाठोपाठ येणारे मराठी सैन्य देखील जागच्याजागी थांबले. गारद्यांनी आपल्या तोफांचे मोर्चे शत्रू सैन्याच्या रोखाने, दक्षिणेकडे तोंड करून उभारले. दरम्यान, याच सुमारास कधीतरी अफगाण वजीर शहावलीखान हा आपल्या लष्करासह हुजुरातीच्या अंगावर धावून आला.
गारदी - रोहिला सैन्याची लढाई :- सकाळी दहाच्या आसपास गारद्यांचा तोफखाना सुरु झाल्यावर गारद्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले विंचूरकर, गायकवाड, पवार हे सरदार गोलातून बाहेर पडून रोहिल्यांवर चालून गेले. यांच्यासोबत उभे असलेले माणकेश्वर व समशेर बहाद्दर हे दोघे या वेळी गोलात उभे होते कि तेसुद्धा इतर सरदारांसोबत गोलातून बाहेर पडले याची माहिती मिळत नाही. गारद्यांच्या उजव्या अंगाला उभ्या असलेल्या मराठी सरदारांना गोलातून बाहेर पडण्याची गरज का भासली असावी ? ते गोलातून कधी बाहेर पडले असावेत ?
आपणांस गारदी सैन्याचा मुकाबला करावा लागेल अशी रोहिला सरदारांना, आरंभी तरी अजिबात कल्पना नव्हती. त्यांच्या अपेक्षेनुसार गारदी सैन्य एकतर दिल्लीकडे जाणाऱ्या राजरस्त्याने चालून येईल किंवा शहावलीच्या दिशेने जाईल. आपणांस फारतर मराठ्यांच्या घोडदळाशी सामना करावा लागेल अशी त्यांची कल्पना होती. परंतु, जेव्हा ते गारदी सैन्यापासून दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर पोहोचले तेव्हा त्यांना थोडा आश्चर्याचा धक्का बसला. दूर अंतरावर गारद्यांची निशाणे दिसल्यावर ते काहीसे हादरले. बहुतेक आहे त्याच ठिकाणी ते काही काळ उभे राहिले. सोबत ज्या काही लांब पल्ल्याच्या तोफा उपलब्ध होत्या त्यांचे मोर्चे उभारून ते लांबूनचं युद्ध करण्यास सिद्ध झाले. काही वेळाने दोन्ही बाजूंकडून तोफांचा मारा होऊ लागला. गारदी तोपची प्रशिक्षित असल्याने, त्यांच्या तोफांचा मारा बराचसा अचूक असा होता. त्याउलट, रोहिल्यांच्या तोफांचे गोळे गारदी सैन्यावर पडत होतेचं असे नाही. रोहिल्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले अमीरबेग व बरकुरदारखान यावेळी पुढे सरकले होते कि नाही याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, याच सुमारास केव्हातरी हाजी जमालखान हा काही हजार अफगाण स्वारांसह व बहुतेक जड तोफांसह, रोहिल्यांच्या मागे सुमारे एक - दीड किलोमीटर्सच्या अंतरावर येऊन उभा राहिला होता.
अब्दालीने आपल्या लष्कराची रचना करताना मुद्दाम डाव्या व उजव्या फळीच्या मागे आपली पथके उभी केली होती. सर्व लष्कर रवाना झाल्यावर तो स्वतः, डाव्या व उजव्या फळीच्या मागे उभ्या असलेल्या सैन्य पथकांना जवळपास समांतर येईल अशा पद्धतीने राखीव फौज, तोफखाना घेऊन उभा राहिला. अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा उल्लेख शेजवलकर करतात. परंतु काशीराज, नुरुद्दीन, शिवप्रसाद किंवा महंमद शाम्लू यांनी आपापल्या लेखांत असा उल्लेख केलेला आढळून येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा, पानिपत युद्धाच्या वेळी अब्दालीकडे दुर्बीण असल्याचा जो उल्लेख केला जातो तो साफ चुकीचा आहे. जर अब्दालीकडे दुर्बीण आहे असे जर गृहीत धरले तर भाऊकडे पण दुर्बीण होती असेच म्हणावे लागेल. अशा तऱ्हेच्या वस्तू इकडे बनत नसल्या तरी त्या मुद्दामहून मागवल्या जात होत्या हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु भाऊकडे, पानिपत प्रसंगी दुर्बीण असल्याचा उल्लेख मिळत नसल्याने त्याच्याकडे ती नसावी असे मानले जाते. मग हाच न्याय अब्दालीला का लावला जात नाही ? केवळ, पानिपतचे युध्द अब्दाली जिंकला म्हणून त्याचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी या दुर्बिणीच्या भाकड कथा सांगितल्या जातात, असेच म्हणावे लागेल !
गारद्यांच्या तोफांमुळे रोहिला सैन्याची भयंकर हानी होऊ लागली तेव्हा रोहिला सरदारांनी हळूहळू पुढे सरकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सहेतुक असा होता. जर शत्रूच्या तोफा तुमच्या लष्कराची नासाडी करत असतील तर दोन प्रकारे तुम्हाला स्वतःच्या फौजेचा बचाव करता येतो. शत्रूच्या तोफांच्या पल्ल्याबाहेर जाऊन, म्हणजे मागे जाऊन उभे राहाणे किंवा तसेच पुढे चालत जाणे. पुढे निघून गेल्यास शत्रूच्या पल्लेदार तोफांचे गोळे आपोआप तुमच्या सैन्याच्या पिछाडीच्या मागे जाऊन पडतात. या दरम्यान काही प्रमाणात तुमच्या सैन्याचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी एकवटलेल्या सैन्याला विखरून उभे केले तर हि हानी काही प्रमाणात कमी होऊ शकते. १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण - रोहिल्यांनी याच पद्धतीचा वापर करून मराठ्यांचा तोफखाना एकप्रकारे निष्प्रभ केला.
रोहिल्यांची फौज जसजशी पुढे सरकू लागली तसतसे गारद्यांच्या तोफांचे गोळे, आरंभी त्या सैन्याच्या मध्यभागी व नंतर पिछाडीला पडू लागले. आपल्या तोफांचे गोळे फुकट जात आहेत हे लक्षात आल्यावर गारद्यांनी आपल्या पल्लेदार तोफा बंद केल्या. गारद्यांच्या पल्लेदार तोफांचा मारा निष्प्रभ करण्यासाठी रोहिला सैन्य जेव्हा पुढे सरकत होते तेव्हा, ते आपल्या गोलाला भिडण्यापूर्वीचं त्याचा संहार करावा या हेतूने मराठी सरदार गोलातून बाहेर पडले असावेत. हि शक्यता जर गृहीत धरली तर विंचूरकर, गायकवाड, पवार यांनी लष्कराचा गोल अजाणतेपणी किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने अथवा गोलाची रचना समजून न घेता फोडला असा जो आरोप त्यांच्यावर केला जातो तो साफ चुकीचा ठरतो.
मराठी घोडदळ जेव्हा रोहिला सैन्यावर चालून गेले त्यावेळी गारद्यांनी आपला तोफखाना बंद केला. गारद्यांच्या बंदुकधारी पलटणी, रोहिल्यांवर गोळीबार करण्यासाठी बाहेर कधी पडल्या असाव्यात ? मराठी सरदार रोहिल्यांचा पराभव करून त्यांना पळवून लावतील अथवा माघार घेऊन परत येतील या दोन्ही शक्यतांचा विचार करून इब्राहिमने आपले बंदुकधारी पायदळ गोलाच्या बाहेर आणले. हीच शक्यता अधिक ग्राह्य अशी वाटते. कारण, गारदी पलटणी जर अशा गोलाच्या बाहेर आधीच येऊन तयारीने उभ्या राहिल्या नसत्या तर मराठी स्वारांचा पाठलाग करत आलेले रोहिले थेट गोलात शिरले असते व त्या ठिकाणी रोहिल्यांचा सामना करणे गारद्यांना अवघड असे गेले असते. त्यावेळी बंदुकधारी पलटणींची गोळीबाराची पद्धत कशी असावी ? एक पलटण खाली गुडघ्यावर बसलेली असे तर दुसरी तिच्या मागे उभी असे. एका पलटणीने गोळीबार केला कि, लगेच दुसरी पलटण बंदुकीच्या फैरी झाडत असे. तोवर पहिल्या तुकडीने आपल्या बंदुका ठासून भरलेल्या असत. अशा प्रकारे शत्रूवर गोळ्यांचा अविरत वर्षाव करता येई. या ठिकाणी आणखी एका मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे व तो म्हणजे तत्कालीन बंदुकांना संगिनी / Bayonet लावण्याची पद्धत होती का ? याविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही. बंदुकींना संगीन जोडण्यास नेमका आरंभ कधी झाला असावा ? हिंदुस्थानात या प्रकारच्या बंदुका कधी वापरात आल्या असाव्यात याची नेमकी व विश्वसनीय माहिती मिळत नसल्याने पानिपत प्रसंगी गारदी सैन्याकडे अशा प्रकारच्या बंदुका होत्या कि नव्हत्या याविषयी काहीही लिहिणे चुकीचे ठरेल.
विंचूरकर, पवार प्रभूती सरदार रोहिल्यांवर चालून गेले. मराठी घोडेस्वार वेगाने धावून येत असल्याचे पाहिल्यावर रोहिले देखील मोर्च्यातून बाहेर पडले. रोहिल्यांच्या फौजेत स्वार किती होते व पायदळ किती होते याची निश्चित आकडेवारी मिळत नाही पण, त्यांच्या सैन्यात घोडेस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांच्याकडे पायदळ होते पण त्याचे प्रमाण एकूण सैन्याच्या मानाने किती होते हे सांगता येत नाही. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, रोहिला पायदळ हे बंदुकधारी असल्याचे जे सांगितले जाते ते अर्धसत्य आहे ! सर्वचं रोहिला शिपायांकडे बंदुका होत्याचं असे नाही.
मराठी घोडदळ जेव्हा रोहिल्यांवर चालून गेले तेव्हा त्यांचा मुकाबला प्रथम कोणी केला असावा ? रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी कि पायदळ शिपायांनी ? तेव्हाची हल्ल्याची किंवा बचावाची पद्धत कशी असावी ? शत्रूवर चालून जाताना आक्रमक सैन्य, विशेषतः घोडदळ हे एकमेकांना काहीसे बिलगून, फळी धरून जात असे. पायदळ सैन्य असेल तर काही एक अंतरापर्यंत ते शिस्तीने चालत जात असे व त्यानंतर पुढे धावून जाताना मात्र सैन्याची शिस्त बिगडून ते काहीसे विस्कळीत होत असे. बचाव करणारे सैन्य, जर घोडेस्वार असतील तर, मोर्च्याच्या बाहेर येऊन काही एक अंतरावर फळी धरून उभे राहात किंवा ते देखील शत्रूवर चालून जात. परंतु बचावाची जबाबदारी जर पायदळावर असेल व घोडदळ त्यांच्यावर चालून येत असेल तर पायदळ सैनिक आपले भाले रोखून घोडेस्वारांचा मुकाबला करत. भाल्यांची लांबी सामान्यतः सात - आठ फूट असे. त्यामुळे भालाईत सैनिक आपल्या भाल्याच्या लांबीचा फायदा घेऊन स्वार अथवा घोड्यास लक्ष्य करत असे. एकदा स्वार घोड्यावरून खाली आला कि तो सावरेपर्यंत त्याचा निकाल लावता येई अथवा सरळ स्वारास लक्ष्य करता येत असे. त्यावेळी लढाईची देखील एक विशिष्ट पद्धत असे. आक्रमण करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या सैन्याच्या लागोपाठ अशा रांगा असत. जोवर पुढील रांगेतील सैनिक / स्वार मृत वा जखमी होऊन खाली पडत नसे तोवर मागच्या रांगेत उभे असलेल्या सैनिकाला पुढे जाता येत नसे. आघाडीच्या फळीतील सैन्य लढत असे तेव्हा मागील रांगांतील शिपाई आरोळ्या ठोकून आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवीत असत. आघाडीवर ज्या ठिकाणी सैन्य लढत असे त्या ठिकाणी हातातील शस्त्रांचा पुरेपूर वापर करण्याइतपत फारशी मोकळी जागा उपलब्ध नसे. त्यामुळे कित्येकदा तलवार, भाले बाजूला राहून कट्यारी, सुरे यांचा वापर केला जात असे किंवा मग सरळ गुद्दागुद्दी सुरु होत असे. लढाईत माघारीचा जेव्हा प्रसंग येई, तेव्हा मागचे सैनिक प्रथम पळत असत व पाठोपाठ आघाडीचे सैनिक येत असत. सैन्याची माघार कधी शिस्तबद्ध अशी असे तर कधी बेशिस्तपणे ! सैन्याने कच खाऊन माघार घेतल्यास त्याला पळाचे स्वरूप येत असे. कित्येकदा सैनिक हातातील शस्त्रे टाकून पळ काढत असत. सारांश, तत्कालीन युद्धपद्धतीचे स्वरूप काहीसे असे होते.
मराठी घोडेस्वार जेव्हा रोहिल्यांच्या मोर्च्यावर चालून गेले तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी रोहिला घोडेस्वार पुढे सरसावले. आरंभी रोहिला स्वारांनी नेटाने झुंज दिली खरी पण लवकरचं त्यांना माघार घ्यावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली. अशा स्थितीत रोहिल्यांचे पायदळ, आपल्या स्वारांच्या मदतीला धावून आले. रोहिला स्वारांना नवीन कुमक आल्यामुळे त्यांचा जोर वाढला. तुलनेने मराठी सैन्याची संख्या कमी असल्याने त्यांना माघार घेणे क्रमप्राप्त होते. मुळात, या मराठी सैन्याची संख्या साधारणतः पाच - सहा हजारांच्या आसपास असावी. समशेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर या हल्ल्यात सहभागी होते कि नव्हते याची माहिती मिळत नाही. हे जर अशा हल्ल्यात सहभागी असतील तर मराठी सैन्याची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास जाते. परंतु यांचा सहभाग असल्याबद्दल निश्चित माहिती मिळत नसल्याने हे यावेळी गोलात उभे होते असेच गृहीत धरावे लागते. असो, सुमारे पाच - सहा हजार मराठी स्वारांनी, अठरा ते वीस हजार रोहिल्यांवर चाल करून आरंभी जरी थोडेफार यश मिळवले असले तरी, शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना माघार घेणे एकप्रकारे भाग पडले. रोहिला पायदळ सैन्याने, मराठी स्वारांवर बंदुकींचा मारा केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असे जे सांगितले जाते त्यात फारसे तथ्य नाही. याचे कारण म्हणजे, रोहिल्यांपैकी फक्त नजीबाकडे अशा तऱ्हेचे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख मिळतो. इतर रोहिला सरदारांकडे अशा धर्तीची बंदुकधारी पलटणे असल्याचा उल्लेख आढळत नाही. अर्थात, ज्या रोहिला पायदळ सैनिकांकडे बंदुका होत्या त्यांनी, मराठी स्वारांवर गोळीबार केलाच नसेल असे म्हणता येत नाही पण, रोहिल्यांच्या गोळीबारामुळे मराठी घोडेस्वार मागे फिरले असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! त्याचप्रमाणे, मराठी घोडेस्वार माघार घेऊन आपल्या गोलाकडे निघाले तेव्हा रोहिला सैन्याने त्याचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चाल केली असे म्हणता येत नाही ! वस्तुस्थिती लक्षात न घेता आपल्या इतिहासकारांनी या घटनेचे बरेच अतिरंजित वर्णन केले आहे. समजा, काही क्षण असे गृहीत धरू कि, मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलात परत निघाले असताना रोहिला सैन्य त्यांच्या पाठी लागले व गारदी पलटणींवर तुटून पडले. आता अशा प्रकारचे वर्णन लिहिण्यास फक्त कल्पनाशक्तीची गरज आहे, पण असे काही वास्तवात घडू शकते का ? पाच ते सहा हजार मराठी स्वारांशी आरंभी आठ - दहा हजार रोहिला घोडेस्वार लढत होते. नंतर जवळपास तीन - चार हजार पायदळ शिपाई त्यांच्या मदतीस आल्याने मराठी घोडदळ मागे फिरले. याचा अर्थ असा कि, रोहिल्यांचे पायदळ व घोडदळ एकमेकांत मिसळून गेले असल्याने एकाचवेळी, मराठी स्वारांवर शत्रूच्या घोडेस्वाराशी व पायदळ सैनिकाशी झुंज देण्याचा प्रसंग ओढवला. अशा स्थितीत माघार घेण्याशिवाय त्यांच्यासमोर इतर पर्याय नसल्याने त्यांनी काढता पाय घेतला. मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलाच्या दिशेने परत जात आहेत हे पाहिल्यावर, लगेचचं रोहिल्यांचे घोडेस्वार आणि पायदळ, सरमिसळ झालेल्या स्थितीत, एकप्रकारे धावत त्यांच्या पाठी लागून गेले असे म्हणायचे तर रोहिला शिपाई आपल्या स्वारांच्या बरोबरीने धावत गेले असे गृहीत धरावे लागेल. त्याशिवाय, ज्या सैनिकांना आपल्या स्वारांच्या सोबत धावायला जमले नाही अथवा जे धावता - धावता तोल जाऊन किंवा ठेच लागून पडले त्यांना मागच्या बाजूने येणाऱ्या पायदळ सैनिकांनी / स्वारांनी तुडवले असेही मग गृहीत धरावे लागेल. याचा अर्थ असा होतो कि, अशा घाई - गडबडीच्या स्थितीत रोहिल्यांचे सर्वसाधारण हजार - दोन हजार शिपाई तरी निकामी झाले असावेत. आता प्रश्न असा निर्माण होतो कि, त्यावेळचे रोहिला सरदार किंवा त्यांचे अधिकारी काय मूर्ख होते ? आपल्या सैन्याला असे स्वतःच्या लष्कराच्या व जनावरांच्या पायाखाली तुडवून मारण्याची त्यांना हौस होती ? लढायांची काल्पनिक वर्णने देताना कमीतकमी वस्तुस्थितीची जाणीव ठेवण्याचे भान, निदान इतिहास लेखकांनी तरी बाळगण्याची गरज आहे ! वस्तुतः, मराठी सैन्याचा निर्णायक पराभव झाला नसून त्यांनी फक्त माघार घेतली होती. त्यांचे मुख्य लष्कर अजून कायम होते. मराठी स्वारांच्या माघारीला पळाचे स्वरूप आले नव्हते. या कारणांमुळे रोहिला सैन्य, मराठी स्वारांचा पाठलाग करत थेट गारदी पलटणींवर चालून गेले नाही. उलट, मराठी लष्कर मागे फिरताच, रोहिल्यांनी प्रथम आपल्या सैन्याची शिस्त बांधली. पायदळ - घोडदळ जे एकत्र झाले होते, ते वेगवेगळे होऊन उभे राहू लागले. दरम्यान रोहिला सरदार व अफगाण सरदार अमीरबेग, बरकुरदारखान यांच्यात चढाई विषयी चर्चा किंवा सल्ला मसलत घडून आली. त्यानुसार रोहिल्यांनी, गारदी पलटणींवर समोरून हल्ला करायचा तर अफगाण सरदारांनी, गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून जायचे असे ठरवण्यात आले. अमीरबेग व बरकुरदार सोबत साधारणतः चार - पाच हजार स्वार असावेत. या सैन्याजवळ तोफखाना बहुतेक नसावा, आणि असल्यास त्या तोफा फारतर लहान व वजनाला हलक्या अशा असाव्यात. त्यामुळेचं या सैन्याला अल्पावधीत, गारद्यांच्या डाव्या अंगावर चालून जाता आले.
शत्रू सैन्याचा एक विभाग, मुख्य फळी पासून अलग होऊन पुढे सरकत असल्याचे गारद्यांच्या लक्षात आले. शत्रूचा बेत आपल्या डाव्या बगलेवर चालून यायचा असल्याचे गारदी अंमलदारांनी हेरून, डाव्या बाजूने चालून येणाऱ्या शत्रू सैन्याला रोखण्यासाठी त्यांनी, त्या बाजूला दोन पलटणी तैनात केल्या.
रोहिला फौज आक्रमणासाठी सिद्ध होताच सरदारांच्या आज्ञेने इशारतीची निशाणे फडकली, वाद्ये वाजू लागली व पाठोपाठ रोहिल्यांची फौज गारद्यांच्या दिशेने पुढे सरकू लागली. गारदी पलटणींवर प्रथम रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी हल्ला केला असावा कि पायदळाने ? पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, आरंभी रोहिल्यांचे घोडदळ, गारदी पलटणींवर चालून गेले. याचा परिणाम म्हणजे, शेकडो स्वार जखमी मरण पावले तर कित्येक जखमी झाले.
शत्रूसैन्य एका विशिष्ट अंतरावर येताच गारद्यांनी गोळीबारास आरंभ केला. तत्कालीन बंदुकांची रेंज काय असावी ? माझ्या मते ती काही मीटर्स पर्यंत मर्यादित असावी, पण नेमकी किती हा प्रश्न शिल्लक राहतोच ! अमेरिकेच्या यादवी युद्धांत ज्या बंदुका वापरण्यात आल्या, त्यांची रेंज ३०० यार्ड, अर्थात सुमारे पावणे तीनशे मीटर्स इतकी असल्याचा उल्लेख इंटरनेटवर मिळतो. जर हि रेंज गृहीत धरली तर, स. १७५- ६० च्या काळातील बंदुकांची रेंज १०० - १५० मीटर्स इतकी तरी असावी असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी हे मान्य करतो कि, या आकडेवारीस याहून अधिक सबळ पुरावा, निदान या क्षणी माझ्याकडे नाही. तसेच याशिवाय इतरत्र कोठून माहिती मिळत नसल्याने, मला हीच आकडेवारी गृहीत धरून चालणे भाग आहे.
गारद्यांच्या गोळीबारामुळे रोहिला घोडेस्वार हतबल झाले. रोहिल्यांकडे किती प्रमाणात पायदळ होते याची निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, घोडदळाच्या मानाने ते फारचं कमी असावे हे निश्चित ! या रोहिला सैनिकांची शस्त्रे सामान्यतः तलवार, भाले, जंबिये, कट्यारी, सुरे इ. होती. त्याशिवाय काही जणांकडे बंदुका देखील होत्या. परंतु, नजीब वगळता इतर कोणत्याही रोहिला सरदाराकडे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख आढळत नाही ! रोहिला घोडेस्वार, गारद्यांची फळी फोडण्यास अपयशी ठरत आहेत हे पाहून बहुतेक, रोहिला सरदारांनी आपल्या घोडदळास मागे बोलावले असावे व पायदळ विभागाला गारद्यांवर चालून जाण्याचा आदेश दिला असावा. किंवा असेही असू शकते कि, रोहिल्यांचे घोडदळ जेव्हा गारद्यांवर चालून गेले, त्याचवेळी त्यांचे पायदळ देखील पाठोपाठ पुढे सरकले असावे. रोहिला स्वार, गारद्यांच्या गोळीबारामुळे अथवा सरदारांच्या आदेशाने बाजूला सटकले असावे किंवा मागे निघून गेले असावेत. घोडदळ बाजूला सरकताच / मागे हटताच रोहिला पायदळ गारदी पलटणींवर तुटून पडले असावे. गारदी सैन्यावर, रोहिल्यांनी कशा प्रकारे हल्ले केले असावेत याविषयी कसलाच अंदाज किंवा तर्क करता येत नाही अथवा केल्यास, अमुक एक प्रकारे हल्ला झाला असावा असेही ठासून सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे व ती म्हणजे, गारद्यांची फळी फोडण्याचे कार्य रोहिला पायदळाने केले ! रोहिल्यांच्या पायदळाने, गारद्यांची फळी फोडून हातघाईची लढाई आरंभली. गारद्यांनी देखील शक्य तितक्या ताकदीने शत्रूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. अखेर, दुपारी एकच्या आसपास गारदी - रोहिला सैन्याची हि भयंकर झुंज संपुष्टात आली. प्रचंड प्रमाणात नुकसान सोसून रोहिले मागे हटले.
या चढाईने रोहिल्यांच्या पदरात काय पडले ? युद्धाच्या आरंभी रोहिल्यांची फौज अठरा ते वीस हजाराच्या दरम्यान होती. यातील हजार - पाचशे लोक आरंभी गारद्यांच्या तोफांमुळे निकामी झाले असावेत. पुढे काहीजण, मराठी स्वारांशी लढताना ठार वा घायाळ झाले तरी अशांची संख्या पाचशेपेक्षा कमी किंवा हजारपेक्षा जास्त असणे शक्य नाही. सारांश, जवळपास सतरा - अठरा हजार रोहिले गारद्यांवर चालून गेले असे म्हणता येईल. त्यापैकी तीन ते पाच हजाराच्या आसपास लोक, गारदी सैनिकांच्या बंदुकींना बळी पडले असतील. पुढे गारद्यांशी झालेल्या हातघाईच्या लढाईत देखील जवळपास पाच ते सहा हजार मनुष्य जखमी / मृत झाले असतील. याचा अर्थ असा होतो कि, दुपारी एकच्या सुमारास रोहिला सैन्य जेव्हा परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले, त्यावेळी त्याची संख्या आठ - दहा हजारांच्या दरम्यान असावी. थोडक्यात, मोठ्या प्रमाणावर आपली माणसे मारून घेण्यापलीकडे, रोहिला सरदारांच्या पदरात फारसे यश पडले नाही असे प्रथमदर्शनी तरी दिसून येते. परंतु अधिक विचार करता, रोहिल्यांना या चढाईत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असावे असे वाटते.
पानिपत मोहिमेत सहभागी झालेल्या गारदी सैन्याची संख्या एकूण किती होती याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नाही. उदगीर मोहिमेत गारद्यांचे पथक पाच हजारांचे होते असा उल्लेख शेजवलकर करतात. पुढे उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरल्यावर त्यात आणखी भर घालून ते आठ हजाराचे बनवण्यात आले. पुढे या सैन्यात आणखी भरती झाली असल्याची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या सैन्याचे स्वरूप देखील फारसे स्पष्ट होत नाही. कवायती पलटणे म्हटल्यावर त्यासोबत काही हजार स्वारांचा रिसाला असतो. इब्राहिमच्या पलटणींसोबत असा रिसाला होता का ? काशीराजच्या मते, इब्राहिमकडे दोन हजार स्वार होते. परंतु कैफियतीमध्ये असा उल्लेख आढळत नाही. पानिपत लढाईची उपलब्ध वर्णने पाहता, इब्राहिमजवळ दोन हजार स्वारांचा रिसाला असावा असे वाटत नाही. एखादवेळेस, त्याच्याकडे स्वारांचे लहानसे पथक असू शकते. जर काशीराजच्या मतानुसार, इब्राहिमकडे दोन हजार स्वारांचा रिसाला असता तर, रोहिला सैन्य सहजासहजी माघार घेऊ शकले नसते. गारद्यांच्या घोडदळ पथकाने त्यांची कत्तल उडवली असती. परंतु, असे काही झाल्याचा उल्लेख नसल्याने व रोहिला सैन्य देखील यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभी राहिल्याने, गारदी पलटणींसोबत दोन हजार स्वारांचा
रिसाला नसल्याचे सहज सिद्ध होते. पानिपत युद्धाच्या वेळी इब्राहिमकडे सामान्यतः आठ ते नऊ पलटणी असाव्यात. त्यातील दोन त्याने अफगाण सैन्याच्या समाचारासाठी डाव्या बाजूला ठेवल्या होत्या तर उर्वरीत सात पलटणींच्या मदतीने त्याने रोहिल्यांच्या सामना केला. रोहिला फौजेचा सामना करून त्यांना पळवून लावण्यात गारदी यशस्वी झाले. पण या संघर्षात त्यांच्या जवळपास पाच पलटणी निकालात निघाल्याने त्यांचे सामर्थ्य देखील खच्ची झाले. फिरून लढाईला उभे राहण्याचा प्रसंग उद्भवला तर अवघ्या तीन - चार पलटणी हाताशी असल्याने, त्यांना शत्रूचा मुकाबला करणे तितकेसे सोपे जाणार नव्हते. याचा अर्थ असाही होतो कि, मराठी सैन्याची डावी बाजू यावेळी निकालात निघाली नसली तरी पक्षाघात झाल्याप्रमाणे ती काहीशी लुळी पडू लागली होती. गारदी सैन्याची हि स्थिती पाहता, रोहिल्यांची चढाई पूर्णतः नसली तरी अंशतः यशस्वी झाल्याचे दिसून येते. जरी गारद्यांनी, रोहिला सैन्याला पळवून लावले असले तरी त्यांचा मोर्चा कायम होता. आपल्या मोर्च्याच्या आधाराने त्यांना फिरून फळी बांधून, गारद्यांवर चढाई करण्यास मोकळीक राहिली.

हुजुरातीची अफगाण सैन्यावर निरर्थक चढाई :- सकाळी दहाच्या सुमारास अफगाण वजीर शहावलीखान हा सोळा - सतरा हजार फौजेसह, हुजुरातीच्या समोर अंदाजे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर येऊन ठेपला. शहावलीच्या सैन्यात मुख्यतः घोडेस्वारांचा भरणा असला तरी काही प्रमाणात पायदळ पथके देखील होती. अफगाण स्वारांची मुख्य शस्त्रे सामान्यतः तलवार - भाला हीच असून, त्याशिवाय हातघाईच्या लढाईसाठी अनुकूल अशी कट्यारी, सुरे इ. प्रकारची हत्यारे देखील त्यांच्याकडे होती. काही अफगाण स्वार बंदुका बाळगून असले तरी, त्यांचा लढाईमध्ये वापर करणे शक्य नव्हते. काही अंतरावरून एखाद - दुसरी फैर
झाडण्यापुरताच त्यांचा उपयोग होता. अफगाण पायदळ देखील सामान्यतः वरील शस्त्रे बाळगत होते. त्याशिवाय धनुष्य - बाण वापरणाऱ्या लोकांची काही पथके सोबत होती. शहावलीखानाच्या सोबत काही लांब पल्ल्याच्या तोफा असून, अनेक जंबूरके देखील होते. शहावली सकाळी सात - आठच्या सुमारास मुख्य छावणीतून निघाला असावा. सर्व सरंजामासह, हुजुरातीच्या रोखाने यायला त्याला जवळपास दोन - अडीच तास लागले. या दोन - अडीच तासांत त्याने सुमारे, चार - पाच किलोमीटर्सचे अंतर पार केले, हे लक्षात घेतले असता त्याच्या लष्कराच्या वेगवान हालचालींचा अंदाज येतो.
पानिपतहून भल्या पहाटे मराठी सैन्य निघाले. मराठ्यांची आरंभी कल्पना अशी होती कि, सकाळी पडणाऱ्या दाट धुक्याचा फायदा घेऊन, शत्रूच्या नकळत जास्तीत जास्त अंतर पार करून यमुनेच्या दिशेने निघून जायचे. परंतु, त्या दिवशी धुक्याने हात दिला नाही. त्याशिवाय, पानिपतची छावणी गुंडाळून इतरत्र तळ ठोकायचा असल्याने, त्यासाठी आवश्यक तो सर्व सरंजाम देखील सोबत घेण्यात आला होता. परिणामी, मराठी सैन्याचा वेग फारचं मंदावला. मराठ्यांनी, पानिपत किती वाजता सोडले हे निश्चितपणे आता सांगता येणे शक्य नाही, तरीही, सूर्योदयापूर्वीचं त्यांनी पानिपतहून मुक्काम हलविण्यास आरंभ केल्याचे, शाम्लूच्या माहितीवरून लक्षात येते. असे असले तरी, अफगाण सैन्याच्या तुलनेने मराठी लष्कराचा वेग हा फारचं मंद असल्याचे दिसून येते. सूर्योदयापूर्वी पानिपत सोडून देखील, मराठी फौजांना दीड कोसाचे अंतर पार करण्यास साधारणतः नऊ - साडेनऊ वाजले. त्याउलट, सात - आठच्या दरम्यान अफगाण लष्कर मुख्य छावणीतून रवाना होऊन देखील, दहाच्या सुमारास जवळपास तितकेच अंतर कापून मराठी सैन्याच्या बगलेवर चालून आले. अर्थात, या ठिकाणी हे विसरून चालणार नाही कि, नऊ - साडेनऊच्या आसपास रोहिला फौज, गारद्यांच्या उजव्या बाजूवर आल्यामुळे मराठी सैन्याची चाल थांबली होती.
मुख्य छावणीतून निघाल्यावर, शहावलीखानाचा रोख हा काहीसा उत्तरेकडे होता. दिल्लीकडे जाणार राजमार्ग सांभाळण्याचे काम नजीब - शहापसंदकडे असल्याने व हा राजमार्ग, पानिपत गावातून जात असल्याने, शहावलीला पानिपतच्या दिशेने जायची काहीचं गरज नव्हती. मराठे जर सरळ राजमार्गाने चालून आले तर त्यांना काही काळ रोखून धरण्याइतपत आपली डावी फळी सक्षम आहे हे त्याला माहिती होते. त्यामुळे, तो काहीसा उत्तर - ईशान्य अशी दिशा धरून पुढे सरकत होता. कदाचित त्याने, आघाडीला टेहळणी स्वार पाठवले असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळेचं, मराठी सैन्याचा माग काढून तो अचूकपणे हुजुरातीच्या कुशीवर येऊन ठेपला.
सकाळी दहाच्या सुमारास हुजुरातीच्या उजव्या कुशीवर सुमारे दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर गिलच्यांची निशाणे दिसू लागली. यावेळी हुजुरातीच्या सैन्याचे तोंड कोणत्या दिशेला असावे ? ते पूर्वेकडे तोंड करून उभे होते कि दक्षिणेकडे ? यासुमारास, गारदी - रोहिल्यांची लढाई सुरु झाली होती. या लढ्याचा निकाल लागायची वाट बघत हुजुरात किंवा सबंध उर्वरीत गोल हा, पूर्वेकडेचं तोंड करून उभा असावा. किंवा अशीही एक शक्यता आहे व ती म्हणजे, गारद्यांच्या बाजूने शत्रू सैन्य चालून आले याचा अर्थ, आपला बेत अब्दालीच्या लक्षात आला असून तो आपल्यावर निर्णायक हल्ले चढवण्याचा प्रयत्न करणार हे भाऊच्या लक्षात आले असावे व त्यानुसार त्याने आपल्या सैन्याचा मोहरा दक्षिणेकडे वळवला असावा. याचा अर्थ असा होतो कि, वजीराची फौज दृष्टीक्षेपात येण्यापूर्वीच किंवा त्या सुमारास हुजुरातीच्या सैन्याने दक्षिणेकडे तोंड फिरवले होते.
भाऊच्या नेतृत्वाखाली हुजुरात व इतर सरदारांची मिळून सुमारे पंधरा - वीस हजार फौज असावी. यात मुख्यतः स्वारांचा भरणा अधिक असून त्यांची शस्त्रे, सामान्यतः अफगाण सैन्याप्रमाणेचं होती. वस्तुतः लष्करातील प्रत्येक विभागात अफगाण सैनिक, मराठी शिपायापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा होता किंवा त्याचे शस्त्र - सामान उच्च प्रतीचे होते हा अपसमज आपल्या इतिहासकारांनी निर्माण केलेला आहे. लष्करीदृष्ट्या अफगाण - मराठे समपातळीवर होते. कदाचित, अफगाण स्वारांच्या तुलनेने, बंदुका बाळगणारे मराठी घोडेस्वार कमी असतील, हाच काय तो उभय सैन्यांतील फरक असावा. परंतु, या किरकोळ बाबींना आपल्या इतिहासकारांनी भलतेच महत्त्व दिल्याचे दिसून येते. अफगाण स्वाराकडे जरी बंदूक असली, तरी तिचा वापर फारतर एकदाच तो करू शकत होता. एकदा गोळीबार केला कि झाडलेली बंदूक परत भरण्यासाठी त्याला थोड्याफार अवधीची गरज लागणारचं होती. याचा अर्थ, अशा पद्धतीने एखाद - दुसऱ्या स्वाराने गोळीबार केल्याने सबंध लढाईवर त्याचा काही परिणाम होणार नव्हता. त्यासाठी बंदुकधारी घोडेस्वारांच्या पथकांची गरज होती. अशी पथके अब्दालीकडे होती का ? याचे उत्तर नकारार्थी मिळते. याचा अर्थ असा कि, एखाद - दुसऱ्या अफगाण स्वाराकडे असलेल्या बंदुकीचा, आपल्या इतिहासकारांनी भलताच विपर्यास केलेला आहे. मराठी सैन्यात पायदळ असून त्यांची शस्त्रे देखील ढाल - तलवार, भाले, धनुष्य - बाण इ. होती. त्याशिवाय दारूच्या बाणांचा मारा करणारे देखील होते. परंतु यांची संख्या उपलब्ध नाही. दारूच्या बाणांविषयी देखील फारशी माहिती मिळत नाही. क्षेपणास्त्र किंवा ज्याला आपण रॉकेट्स म्हणतो तशा प्रकारचे हे बाण होते का ? कदाचित असावेत. अब्दाली, नजीबकडे देखील अशा प्रकारचे बाण असल्याचा उल्लेख आढळतो. अब्दालीकडे असलेले जंबूरके मराठ्यांकडे देखील होते. त्याशिवाय जेजालांचा देखील उल्लेख मिळतो. जेजाला म्हणजे लांब नळीची बंदूक अशी माहिती, पाणिपत बखरीचे संपादक देतात. त्याचप्रमाणे सुतरनाला नावाच्या उंटावरील तोफा देखील मराठी लष्करात होत्या. जेजाला, सुतरनाला, जंबूरके, दारूने भरलेल्या बाणांच्या कैच्या इ. जी काही शस्त्रे मराठी सैन्यात होती, त्याचप्रमाणे अब्दालीच्या सैन्यात देखील होती. तात्पर्य, लष्करी सामग्रीच्या बाबतीत अब्दाली - मराठे दोघेही तुल्यबळ असेच होते. हे पाहिले असता, इतिहासकारांनी शस्त्रांच्या बाबतीत अब्दालीचे जरा जास्तचं गुणगान केल्याचे दिसून येते.
असो, तर दहाच्या सुमारास गिलच्यांची निशाणे दिसू लागल्यावर भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरात व डाव्या - उजव्या बाजूला उभी असलेली काही सरदारांची पथके युद्धाच्या तयारीने उभी राहू लागली. माऱ्याच्या जागा पाहून, सरदार पानशांनी आपल्या तोफांचे मोर्चे उभारले. तोफांचे मोर्चे उभारण्याची एक पद्धत होती. सबंध आघाडीच्या समोर तोफा कधीच पेरल्या जात नसत. ज्या ठिकाणाहून, शत्रूसैन्यावर तोफांचा परिणामकारकपणे भडीमार करता येणे शक्य आहे, अशाच ठिकाणी तोफांचे मोर्चे उभारले जात. यासाठी शक्यतो, त्यातल्या त्यात उंचवट्याची जागा निवडली जाई. यामागे दोन हेतू असत. पहिला म्हणजे, शत्रू सैन्य खालच्या बाजूला असल्याने त्यावर अचूक मारा करता येत असे व दुसरा म्हणजे, प्रतिपक्षाच्या तोफांच्या जागा पाहून, त्यावर मारा करता येत असे. पानिपतच्या लढाई प्रसंगी, मराठ्यांनी आपल्या तोफांचे मोर्चे कशा प्रकारे उभारले असावेत हे सांगणे आता अशक्य असेच आहे. परंतु, मराठी तोफखान्याचे जे वर्णन अब्दालीच्या पत्रांत व फारसी बखरींमध्ये आलेले आहे ते पाहता, पानशांनी आपले काम चोख बजावल्याचे लक्षात येते.
दहाच्या आसपास अफगाण वजीर शहावलीखान हुजुरातीपासून जवळपास दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर येऊन धडकला. दूरवर दिसणारी मराठी सैन्याची निशाणे दृष्टीस पडल्यावर किंवा टेहळणीसाठी पुढे गेलेल्या स्वारांनी आणलेल्या बातमीवरून, एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर त्याने आपल्या सैन्याला मोर्चे बांधणीचा आदेश दिला. अफगाण लोक आपल्या तोफांचे मोर्चे उभारत असताना किंवा ते काम जवळपास पूर्ण होत आले असताना, मराठ्यांचा तोफखाना धडाडू लागला. मोर्चेबांधणी पूर्ण झाल्यावर अफगाणी तोफा देखील, मराठ्यांना उलटून उत्तर देऊ लागल्या. दोन्ही पक्षांकडून जवळपास अकरा वाजेपर्यंत तरी तोफांची लढाई चालली असावी. दरम्यान भाऊने, अफगाण सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला. वास्तविक अब्दालीच्या उजव्या बगलेवरील पथके, गारद्यांशी लढण्यात दंग होती. डाव्या बाजूला असलेल्या पथकांवर दिल्लीचा राजमार्ग रोखून धरण्याची जबाबदारी असल्यामुळे, ती पानिपतच्या आसपास घुटमळत होती. त्या पथकांच्या समोर, जवळपास ईशान्य दिशेला अंदाजे चार - सहा किलोमीटर्स अंतरावर होळकरांची फौज उभी होती. तर गिलच्यांची मधली फळी सांभाळणारी फौज, मराठी लष्कराच्या जवळ येऊन ठेपली होती. अशा स्थितीत, मुख्य अफगाण फौज काहीशी एकाकी स्थितीत पुढे वाढून आल्याचे पाहून, त्या फौजेचा घास घेण्याचा निर्णय भाऊने घेतला. बेत ठरल्यानंतर, त्यानुसार हल्ल्याची इशारत देणाऱ्या बावट्यांची हालचाल झाली. वाद्ये वाजू लागली. मराठ्यांचे घोडेस्वार फळी धरून गोलातून बाहेर पडू लागले. फौजा जेव्हा मोर्च्यातून बाहेर पडत, तेव्हा तोफा चालू असत कि बंद ? तोफांचे मोर्चे जर उंचवट्यावर किंवा टेकडीवर असतील तर, फौजा मोर्च्यातून बाहेर पडल्या तरी तोफखाना बंद करण्याची गरज पडत नसावी. परंतु, सपाटीवर जर तोफांचे मोर्चे असतील तर ? अशा वेळी लष्कर जेव्हा मोर्च्यातून बाहेर पडत असेल त्यावेळी तोफा बंद करण्यावाचून इतर काही पर्याय नसतो. पानिपतच्या युद्धात, मराठ्यांच्या तोफांचे मोर्चे अगदीच सपाट जमिनीवर किंवा टेकडीवर होत असे म्हणता येत नाही. सपाट जमिनीवरील, त्यातल्या त्यात थोड्याशा उंचवट्याचा आधार घेऊन उभारले असावेत. परिणामी, जेव्हा घोडदळ हल्ल्यासाठी मोर्च्यातून बाहेर पडू लागले, तेव्हा आपोआपचं मराठ्यांचा तोफखाना बंद झाला. मराठ्यांचा तोफखाना बंद झाल्यावर अफगाण लष्करातील तोफा सुरु राहिल्या असाव्यात कि त्या सुद्धा बंद करण्यात आल्या असाव्यात ? माझ्या मते, मराठी तोफांचा मारा बंद होताचं, अफगाण तोफखाना देखील थंडावला. यामागील कारण असे कि, त्यावेळी हल्ल्याची / लढाईची एक विशिष्ट पद्धत ठरलेली असे. समजा, दोन पक्षांत तोफांनी युद्धाचा आरंभ झाला आहे. दोन्ही पक्षाच्या फौजा, तोफा सपाट मैदानावर आहेत. अशा स्थितीत, एका पक्षाचा तोफखाना बंद झाला तर द्वितीय पक्षाचा काय ग्रह होईल ? माझ्या मते, यातून तीन ग्रह तरी सहजपणे निर्माण होतात. (१) आपल्या तोफांमुळे, प्रतिस्पर्ध्याच्या तोफा निकामी झाल्या आहेत. (२) आपल्या शत्रूचा तोफखाना कमजोर आहे. (३) समोरच्या बाजूकडून लवकरचं आपल्या मोर्च्यावर चढाई होणार आहे. या तिन्ही शक्यता विचारात घेतल्यास, यापैकी कोणतीही परिस्थिती उद्भवली असता, द्वितीय पक्षासमोर फक्त एकचं पर्याय उपलब्ध असतो व तो म्हणजे, आपला तोफखाना बंद करून शत्रूपक्षावर हल्ला चढवणे !
पानिपत युद्धात देखील हेच घडून आले. मराठ्यांच्या तोफा बंद झाल्या याचा योग्य तोच अर्थ घेऊन, शहावलीने आपल्या सैन्यास, मराठी फौजेवर हल्ला चढवण्याचा आदेश दिला. हुजुरातीच्या स्वारांचा व गिलच्यांचा संघर्ष कुठे घडून आला असावा ? अफगाण सैन्य, मोर्च्यातून बाहेर पडल्यावर फळी धरत असतानाचं किंवा फळी बांधून पुढे सरकण्यापूर्वीचं मराठी लष्कर चालून आले असावे. या दोन्ही शक्यता ग्राह्य असल्या तरी एक बाब मात्र स्पष्ट आहे व ती म्हणजे, अफगाण - हुजुरातीची लढाई हि, शहावलीने उभारलेल्या मोर्च्याजवळ घडून आली असावी. अफगाण - मराठ्यांची हि झुंज सकळी अकराच्या आसपास किंवा साडे अकराच्या दरम्यान सुरु होऊन, दुपारी साडेबाराच्या - एकच्या आसपास केव्हातरी संपुष्टात आली असावी असा माझा निष्कर्ष आहे.
अफगाण लष्करावर चढाई करून भाऊने नेमके काय साधले ? हा प्रश्न निरर्थक किंवा मूर्खपणाचा वाटेल पण थोडा विचार केल्यास यातील गांभीर्य लक्षात येईल. हुजुरातीच्या पथकांनी व इतर सरदारांनी केलेल्या या हल्ल्यात, मराठी सैन्याला लक्षणीय असे यश मिळाले. शहावलीखानाचा चुलतभाऊ अताईखान यांस, त्याच्या तीन हजार साथीदारांसह मराठ्यांनी कापून काढले, असा उल्लेख काशीराजच्या बखरीत मिळतो. जर हे खरे असेल तर अताईखानाच्या मृत्यूमुळे गिलच्यांचे धैर्य खचून त्यांनी माघार घेतली असे म्हणता येते. अर्थात, काशीराजच्या बखरीतील उल्लेख खरा असेल तरचं असे म्हणता येईल, कारण ; अताईखानाचा मृत्यू, हुजुरातीशी लढताना झाला असल्याचा उल्लेख फक्त काशीराज करतो. इतरत्र हा उल्लेख आढळत नाही व काशीराजने आपली बखर १९ वर्षांनी लिहिलेली असल्याने, त्यातील सर्वचं माहिती सत्य आहे असेही म्हणता येत नाही. अताईखान हा अफगाण वजीर शहावलीखान याचा चुलतभाऊ असल्याने तो यावेळी, वजीराच्या मोर्च्यात हजर होता असे गृहीत धरता येते. परंतु तो नेमका या लढाईत मारला गेला किंवा नंतर मारला गेला असावा. अर्थात या दोन्ही शक्यता ग्राह्य अशाच आहेत. त्याहीपलीकडे जाऊन एका मुद्द्याचा विचार करणे गरजेचे आहे व तो म्हणजे, अताईखान मारला गेल्यामुळे अफगाण सैन्य पळून गेले का ? माझ्या मते हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असा आहे. या ठिकाणी, प्रथम एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे व ती म्हणजे, आपले इतिहासकार सांगतात त्यानुसार, मराठ्यांनी गिलच्यांची हैबत खाल्लेली नव्हती. उलट धिप्पाड, मांसाहारी अशा अफगाण सैनिकांनी सुकुमार, शाकाहारी मराठ्यांची धास्ती घेतली होती. दिल्ली, कुंजपुरा येथील लढाया व पानिपत मुक्कामातील चकमकींमध्ये मराठ्यांनी, गिलच्यांची हाडे चांगलीच खिळखिळी करून टाकली होती. गोविंदपंतावर घातलेला छापा जर वगळला तर अफगाण लष्कराला स्वबळावर, मराठी सैन्याविरुद्ध एकाही लढाईत यश मिळवता आले नाही, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. तरीही, मराठ्यांनी गिलच्यांची दहशत घेतली होती असे लिहिणाऱ्या आमच्या इतिहासकारांना काय म्हणावे तेच समजत नाही !
पानिपतावर मराठे हरले, हे कोणीचं अमान्य करत नाही, पण पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याऐवजी बव्हंशी मराठे हे शाकाहारी होते, त्यांच्या अंगावर गिलच्यांप्रमाणे चामड्याची जाड जाकिटे नव्हती किंवा अंगी चिलखत नव्हते अशा तऱ्हेची फालतू कारणे सांगून आपल्या इतिहासकारांनी, स्वतःच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून दिले आहे. युद्धातील विजयाची किंवा घटनांमागची कारणे याच कोटीक्रमाने शोधायची म्हटल्यास, मग असेही म्हणता येते कि, अताईखान हा शुद्ध शाकाहारी होता ! पानिपतच्या युद्धात मारले गेलेले सर्व अफगाण हे ' उघड्या पाठीचे ' होते !! आहार - पोशाख हि जर मराठ्यांच्या पराभवाची कारणे आहेत, तर हीच कारणे / हेच नियम अब्दालीच्या बाजूने लढून मृत्यू पावणाऱ्या लोकांना लावता येऊ शकतात. एवढी हिंमत आमच्या विद्वान इतिहासकारांमध्ये आहे का ? सारांश, खाण - पान अथवा वस्त्रे यांच्या माध्यमातून एखाद्या समुदायाच्या संस्कृतीचा मागोवा घेता येतो पण युद्धातील पराभवाच्या कारणांचा आढावा घेता येत नाही. आमच्या इतिहासकारांच्या लक्षात हि साधी गोष्ट कशी आली नाही, याचे आश्चर्य वाटते ! अर्थात, पराभूत मनोवृत्तीने इतिहास लेखन करणाऱ्यांच्या टाळक्यात अशा मामुली गोष्टी येणे शक्य नाही हे देखील तितकेच खरे आहे म्हणा !!
हुजुरातीने केलेल्या हल्ल्यात अताईखान मारला गेला कि नाही हे निश्चित सांगणे अवघड आहे पण हे मात्र तितकेचं खरे आहे कि, गिलच्यांनी केवळ अताईखान मारला गेल्यामुळे माघार घेतली नसून मराठ्यांनी केलेल्या निर्धारपूर्वक चढाईमुळे त्यांना पळून जावे लागले. अफगाण लष्कराने मराठ्यांची इतकी धास्ती खाल्ली होती कि, माघार घेऊन आपल्या गोलात परतणाऱ्या मराठी स्वारांवर तोफा - जंबूरक्यांचा मारा करण्याचे देखील त्यांना भान राहिले नाही. परिणामी, मराठी स्वार यशस्वीपणे माघार घेत आपल्या गोलात परतले. मराठ्यांच्या या चढाईमुळे अब्दालीचे सुमारे पाच - सहा हजार सैनिक निकामी झाले असावेत. असे असले तरी मराठ्यांची हि चढाई पूर्णतः अपयशी किंवा निरर्थक ठरल्याचे परिणामावरून दिसून येते. मराठी सैन्याची चढाई अपयशी किंवा निरर्थक कशी ठरली हे पाहण्याआधी, प्रथम मराठ्यांनी या चढाईतून काय साध्य केले किंवा त्यांच्या या आक्रमणाचे परिणाम काय झाले ते पाहाणे गरजेचे आहे.
हुजुरातीने केलेल्या चढाईमध्ये अब्दालीचे पाच - सहा हजार सैन्य निकामी झाले. बव्हंशी गिलचे, मराठ्यांना पाठ दाखवून आपल्या मुख्य छावणीकडे पळत सुटले. काशीराजच्या बखरीतील वर्णन जमेस धरले तर अफगाण वजीर यावेळी घोड्यावरून उतरून खाली जमिनीवर बसला होता. पळणाऱ्या शिपायांना शिव्या - शाप देत तोंडात माती घालून घेत होता ! काशीराजच्या बखरीतील हे वर्णन मराठी मनाला कितीही सुखावणारे असले तरी ते खोटे आहे किंवा अतिशयोक्तीपूर्ण आहे असेच म्हणावे लागते. अफगाण वजीर हा काही नवखा सेनापती नव्हता. अब्दालीसोबत त्याने कित्येक लढायांमध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय त्याला किंवा त्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याला कधीही पराभवाचे तोंड बघावे लागले नव्हते अशातला देखील भाग नव्हता. सारांश, काशीराजने आपल्या बखरीत अब्दालीच्या सैन्याच्या पराभवाचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे. अफगाण सैन्य पळून गेले असले तरी सर्वच्या सर्व गिलचे पळाले नव्हते. बव्हंशी अफगाण अजूनही शहावलीच्या सोबतीने रणात पाय गाडून उभे होते. माझ्या मते, पळून गेलेल्या सैन्याची संख्या पाच - सात हजार इतकी असावी. याचा अर्थ, सुमारे तीन - चार हजार गिलचे शहावलीसोबत असावेत. काशीराज आपल्या बखरीत लिहितो त्यानुसार, अफगाण वजीरासोबत दोनशे स्वार होते, हे साफ खोटे आहे. इतके कमी सैन्य जर शहावली सोबत असते तर मराठ्यांनी त्याच वेळी शहावलीला जेरबंद केले असते. पानिपत युद्धाचा निकाल कदाचित त्याच वेळेस व तो देखील मराठ्यांच्या बाजूने लागला असता. सारांश, पानिपत युद्धाच्या संदर्भात पाहिल्यास, काशीराजची बखर हि फारशी विश्वसनीय अशी नाही हे परत एकदा सिद्ध होते. असो, शहावलीच्या सोबत तीन - चार हजाराचे लष्कर होते. त्याशिवाय काही प्रमाणात जंबूरके देखील होते. विशेष म्हणजे, अफगाण सैन्याच्या तोफांचे मोर्चे कायम होते. दोन्ही पक्षांच्या फौजांची सरमिसळ झाल्यावर काही वेळाने उधळलेले गिलचे मागे पळू लागले. तेव्हा हलक्या झुंजी देत मराठ्यांनी सुद्धा माघार घेण्यास आरंभ केला. वस्तुतः मराठ्यांची माघार हि अनाकलनीय अशीच होती. शत्रूची मुख्य फौज पराभूत होऊन एकप्रकारे सैरावैरा धावत सुटली होती. अशा स्थितीत, पळत सुटलेल्या गिलच्यांचा पाठलाग करत अफगाण सैन्याचा मुख्य मोर्चा उध्वस्त करण्याची संधी मराठ्यांना प्राप्त झाली होती. अफगाण वजीर हा केवळ तीन - चार हजार सैन्यासह, कसाबसा फळी धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. अशा वेळी जर मराठी स्वारांनी आणखी जोर लावून पुढे चाल केली असती तर ...? परंतु असे काही घडून आले नाही. अफगाण सैन्य मागे निघून जाताच, हुजुरात देखील आपल्या मोर्च्यात येऊन परत उभी राहिली. एकप्रकारे, अर्धामुर्धा विजय पदरात पाडून घेऊन हुजुरातीने / भाऊने काय साधले ?
माझ्या मते, मराठ्यांच्या या अनाकलनीय माघारीचे कारण म्हणजे, त्यांनी निवडलेली गोलाची रचना व निर्णायक युद्ध टाळण्याचा, त्यांच्या सेनापतीचा अट्टाहास !!! भाऊने अब्दालीशी तह केला नाही किंवा योग्यवेळी त्याने लढाईचा निर्णय घेतला नाही म्हणून सर्व इतिहासकार त्याला गर्विष्ठ, घमेंडी, दुराग्रही, हट्टी इ. विशेषणांनी संबोधतात. वास्तविक हि दुषणे इतर ठिकाणी किंवा प्रसंगी म्हणा, अयोग्य अशीच आहेत. परंतु, पानिपत युद्धाच्या संदर्भात जर बोलायचे झाले तर हि विशेषणे भाऊसाठी योग्य अशीच आहेत !! पानिपतचे युद्ध चालू झाल्यावर त्याने आपला दुराग्रह जर बाजूला ठेवला असता तर अंती परिणाम निश्चित वेगळा झाला असता असे म्हणता येईल. भाऊचा मुख्य उद्देश म्हणजे, अब्दालीसोबत निर्णायक युद्ध टाळून, किरकोळ झुंजी देत यमुनेकडे निघून जाणे हा होय ! निर्णायक युद्ध न करता लढाई देत यमुनेकडे जायचे असल्यामुळे, लष्करी गोलाची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोलाच्या रचनेत, आपल्या सैन्यातील घोडदळाचा मोठा भरणा लक्षात घेऊन, जरुरीपुरते काही बदल करण्यात आले. त्यानुसार, शत्रू सैन्य गोलाच्या नजीक आल्यास, गोलाच्या त्या बाजूला उभ्या असलेल्या सरदाराने गोलातून बाहेर पडून शत्रू सैन्याला सडकून काढावे आणि परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहावे असे ठरवण्यात आले. याचा परिणाम म्हणजे, शहावलीचा पराभव झाला आहे व त्याचे सैन्य पळत सुटले आहे हे पाहून देखील हुजुरातीचे सरदार परत मागे फिरले. कारण ; शत्रू सैन्याला पळवून लावण्याचे मुख्य काम त्यांनी बजावले होते. आता काही काळापुरता तरी त्यांचा मार्ग निर्धोक राहणार होता. सारांश, मुख्य सेनापतीच्या आज्ञेनुसार त्यांनी, आपल्या लष्करी गोलाभोवती घोंगावणाऱ्या अफगाणी माशा तात्पुरत्या स्वरूपात का होईनात, पळवून लावल्या होत्या. अर्थात, गिलचे पुन्हा बळ बांधून येणारचं नाही अशी त्यांचीही खात्री नसावी, परंतु सेनापतीच्या हुकुमानुसार त्यांनी आपले कार्य चोखपणे बजावले होते हे निश्चित ! याचा सरळ अर्थ असा आहे कि, हुजुरातीच्या या अनाकलनीय माघारीची सर्व जबाबदारी सेनापती या नात्याने भाऊवर येते. भाऊची इच्छा काहीही असो, पण अब्दाली तर याच वेळी निर्णायक युद्ध करण्यासाठी उतावीळ झाला होता. हट्टाला पेटला होता. अशा स्थितीत, भाऊ निर्णायक युद्ध कोणत्या प्रकारे टाळणार होता ? भाऊने उभारलेल्या गोलाच्या आघाडीवर आणि मध्यभागी शत्रूची फौज येऊन आदळली होती. गोलाच्या पिछाडीवर कोणत्याही क्षणी शत्रुसैन्याचा हल्ला होण्याची शक्यता होती. अशा स्थितीत, निर्णायक युद्ध टाळणे भाऊला खरोखर शक्य होते का ? माझ्या मते अजिबात नाही. वास्तविक, भाऊने यावेळी आपल्या लष्करी धोरणात बदल करून, शत्रूशी निर्णायक युद्ध करण्याचा निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु, अंतिम लढाई टाळण्याचा हेका त्याने सोडला नाही. जर त्याने प्रसंग पाहून व शत्रूचे धोरण पाहून त्याच वेळी आपल्या युद्धविषयक डावपेचांत अनुकूल असे बदल केले असते तर पानिपतवर मराठ्यांचा विजय झालाचं नसता असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! सारांश, पानिपत युद्धातील भाऊच्या दुराग्रही किंवा नानासाहेब पेशवा आपल्या पत्रात लिहितो त्यानुसार, ' आधी उगीच कुतर्क करावा हा भाऊचा जातिस्वभाव ' असल्याने त्याचा व मराठी सैन्याचा अंती घात झाला !! आपल्या लष्कराच्या कार्यक्षमतेवर त्याचा पुरेपूर विश्वास होता. आपली फौज गिलच्यांना भारी आहे हे त्याला माहिती होते. इथपर्यंत त्याचा तर्क ठीक होता असे म्हणता येईल, परंतु त्याचबरोबर गोलाच्या रचनेचा वापर करून, शत्रूचे निर्णायक हल्ले परतवून लावत, एकप्रकारे आक्रमण - बचाव अशी संमिश्र लढाई खेळत आपण यमुना गाठू हा त्याचा कुतर्क म्हणता येईल. या ठिकाणी आक्रमण - बचाव हे शब्द मुद्दाम योजले आहेत. याचे कारण असे कि, शत्रूसैन्य गोलाच्या जवळ आले कि, गोलाच्या बचावासाठी मोर्च्यातून बाहेर पडून शत्रूवर आक्रमण करणे असेच भाऊच्या युद्धनीतीचे स्वरूप होते. याचा परिणाम असा झाला कि, धड मराठी सैन्याला आपला नीट बचाव करता आला नाही कि धडपणे आक्रमण देखील करता आले नाही ! गारदी - रोहिला किंवा हुजुरात - शहावली यांच्या ज्या लढाया, पानिपत युद्धाच्या पूर्वार्धात झाल्या, त्यावरून तरी असाच निष्कर्ष निघतो. तिकडे, पराभूत होऊनसुद्धा रोहिले यशस्वीपणे माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभे राहिले. परिणामी, गारद्यांना धड पुढे जाता आले नाही किंवा रोहिल्यांचा पूर्णतः निःपात देखील करता आला नाही. शहावली - हुजुरातीच्या लढ्यात देखील असेच घडून आले. या ठिकाणी तर शत्रुसैन्य पाय लावून पळत सुटले होते, तरी देखील मराठी लष्कर मागे फिरून आले. कारण ; त्यांच्या सेनापतीची आज्ञाचं मुळी फसव्या आक्रमणाची किंवा चढाईची होती ! या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, हुजुरातीमार्फत अफगाण सैन्यावर चढाई करण्यामागे भाऊचा नेमका उद्देश काय होता ? जर त्याचा मुख्य उद्देश, शत्रूचे मोर्चे उध्वस्त करण्याचा असेल तर ते कार्य हुजुरातीने पार पाडले नाही हे उघड आहे. पण जर त्याचा उद्देश शत्रूला तात्पुरते दुर्बल करण्याचा असेल तर तो यशस्वी झाला होता असे असे म्हणता येईल. पण यांमुळे त्याचा विशेष काही फायदा न होता, उलट त्याच्या सैन्याची हानी व दमणूक झाली. सारांश, भाऊच्या दुराग्रही वृत्तीचा फटका, मराठी सैन्याला पानिपतच्या युद्धांत चांगलाच बसला असे म्हटल्यास चूक ठरू नये.
अर्थात, मी हे मान्य करतो कि, माझे विवेचन कित्येकांना पटणार नाही. काहीजण यावर अनेक प्रकारांनी आक्षेप घेतली. त्यातील महत्त्वाचा आक्षेप म्हणजे, माझ्या या विवेचनाची सर्व मदार हि तर्कावर अवलंबून आहे. जर तर्कचं करायचा असेल तर असेही लिहिता येते कि, हुजुरातीची माघार हि पूर्वनियोजित नसून अगदी ऐनवेळी किंवा विचारपूर्वक अशी घेण्यात आली होती. तर्काच्या आधारे हा मुद्दा असाही मांडता येतो कि, अफगाण सैन्याची संभाव्य चढाई रोखण्यासाठी हुजुरातीने प्रतिचढाईचे धोरण स्वीकारले. शत्रूवर मराठे तुटून पडले. गिलच्यांना त्यांनी पळवून लावले. पण आणखी पुढे ते जाऊ शकले नाहीत. किंवा असेही म्हणता येईल कि मराठ्यांना आपली चढाई पुढे तशीच चालू ठेवता आली नाही. यामागील कारण म्हणजे, अफगाण सैन्याशी लढताना मराठी लष्कराची देखील बरीच हानी झाली होती. त्याशिवाय, ते जर तसेच पुढे चालून जाते तर काही काळ झुंज देऊन किंवा लढाई न देता शहावलीखान मागे पळून गेला असता. पर्यायाने, हुजुरातीला आणखी पुढे जावे लागले असते व मराठे जर तसेच पुढे रेटून गेले असते तर अब्दालीच्या ताज्या दमाच्या फौजेशी लढण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवणार होता आणि या लढ्यात मराठे जिंकलेचं असते असे ठामपणे सांगता येत नाही. सारांश, सारासार विचार करूनचं संभाव्य हानी टाळण्यासाठी मराठ्यांनी माघार घेतली असेही सांगितले जाऊ शकते. अर्थात, अशा पद्धतीच्या युक्तिवादात देखील तथ्य आहे, नाही असे नाही. परंतु अधिक विचार केला असल्यास या किंवा अशा प्रकारच्या युक्तिवादातील फोलपणा लक्षात येतो. उदाहरणार्थ, शहावलीची फौज उधळल्याचे लक्षात आल्यावर किंवा तशी बातमी मिळाल्यावर, हुजुरातीच्या सरदारांना भाऊ आज्ञा पाठवू शकत होता कि, ' चढाई तशीच पुढे चालू राहू द्या. पाठोपाठ कुमक पाठवत आहे.' मग भाऊने असे का केले नाही ? गोलाच्या उत्तरेला उभी असलेली आपली फौज त्याने, मदतीसाठी पुढे का आणली नाही ? असे कित्येक प्रश्न उपस्थित करता येतात नाही असे नाही. तात्पर्य, कितीही सारवासारव केली तरी पानिपत युद्धातील भाऊच्या चुकांवर पांघरूण घालता येत नाही !
या ठिकाणी आणखी दोन मुद्द्यांवर चर्चा करणे मला आवश्यक वाटते. ते दोन मुद्दे म्हणजे, हुजुरातीच्या हल्ल्यात सहभागी असलेले इतर मराठी सरदार व गोलाच्या उत्तरेकडे उभ्या असलेल्या मराठी फौजेचा पानिपत युद्धातील सहभाग हे होय. यापैकी पहिला मुद्दा आपण विचारात घेऊ. शहावलीखानावर जेव्हा हुजुरातीने चढाई केली तेव्हा कित्येक सरदार आपापली पथके घेऊन, या हल्ल्यात सहभागी झाले होते. त्यापैकी विंचूरकर, पवार, गायकवाड, माणकेश्वर, समशेर बहाद्दर या पाच सरदारांच्या हालचालींविषयी जी माहिती आहे ती काहीशी गोंधळात टाकणारी आहे. पानिपत युद्धाला आरंभ झाला तेव्हा विंचूरकर, पवार व कापरे हे सरदार प्रथम रोहिल्यांवर चालून गेले व कचरून मागे आले असे कैफियतकार लिहितो. भाऊचा बखरकार सांगतो त्यानुसार पवार, विंचूरकर पुढे गेले व लढाईत मार खाऊन मागे आले. गायकवाड पुढे गेला कि नाही हे न सांगता, गिलच्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याने तो माघार घेत गोलात येऊन उभा राहिला असे भाऊचा बखरकार सांगतो. याचा उघड अर्थ असा आहे कि, गारद्यांच्या उजव्या हाताला असलेल्या सरदारांनी, माणकेश्वर व समशेर अपवाद केल्यास, रोहिल्यांवर चढाई करून परत माघार घेतली होती. मराठी सरदारांच्या, रोहिल्यांवरील हल्ल्याची किंवा माघारीची वेळ अंदाजे अकराच्या आसपासची असावी. इकडे दहाच्या सुमारास शहावली हुजुरातीच्या उजव्या बाजूला येऊन ठेपला. त्यांच्यातील लढाईला प्रथम तोफांनी आरंभ झाला. तोफांची हि लढाई काही काळ चालली, पण लवकरचं दोन्ही बाजूच्या तोफा थंडावून उभय पक्षांच्या सैन्याची लढाई जुंपली. माझ्या अंदाजानुसार हि वेळ सकाळी अकराच्या आसपासची असावी. जर हि वेळ गृहीत धरली तर असे सिद्ध होते कि, रोहिल्यांवर चाल करून गेलेले मराठी सरदार, हुजुराती सोबत गिलच्यांवर चढाई करण्यास गेले नाहीत ! याचे कारण उघड आहे. दहा ते अकराच्या दरम्यान पवार, विंचूरकर, गायकवाड हे सरदार रोहिल्यांवर चाल करून गेले. रोहिल्यांना बडवून व थोडा मार खाऊन हे लोक परत गोलात येऊन उभे राहिले. तोपर्यंत हुजुरात जर पुढे निघून गेली असेल तर हे सरदार पाठोपाठ लगेच पुढे जाणे शक्य नाही. तसेच, जर हुजुरात गिलच्यांवर चालून जायच्या तयारीत असेल तरीसुद्धा हे सरदार हुजुरातीसोबत जाऊ शकत नव्हते. नुकत्याच झालेल्या संघर्षात त्यांच्या फौजेची थोडी - फार हानी झाली होती. झुंजात ज्यांना जबर जखमा झाल्या होत्या त्या सैनिकांना आघाडीवरून मागे पाठवायचे होते. ज्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या, त्यांवर तात्पुरत्या इलाजाची गरज होती. अर्थात, किरकोळ जखमा बांधल्या जात किंवा त्यांवर त्वरीत इलाज केलेचं जात असे नाही ! त्यानंतर पथकांची शिस्त बांधून मग नव्या लढाईस सज्ज होणे इ. कामे पार पाडण्यासाठी बऱ्याच अवधीची गरज होती. हे सर्व लक्षात घेता विंचूरकर प्रभूती सरदार हुजुरातीसोबत गिलच्यांवर चालून गेले नव्हते असे सिद्ध होते. मग आता प्रश्न असा उद्भवतो कि, गारद्यांशी झुंज देऊन व पराभव पत्करून जेव्हा रोहिले माघार घेत होते त्यावेळी विंचूरकर, गायकवाड इ. सरदारांनी माघार घेणाऱ्या रोहिल्यांवर चाल का केली नाही ? याचा अर्थ असा होतो कि, माघार घेत असलेल्या रोहिल्यांची कत्तल उडवून त्यांची फळी पूर्णतः उध्वस्त करण्याची,चालून आलेली सुवर्णसंधी या सरदारांनी साफ वाया घालवली. या सरदारांनी जर वेळीच चाल केली असती तर रोहिले सुखरूपपणे माघार घेऊन शकले नसते. उलट, हे सरदार निष्क्रिय राहिल्याने त्यांना यशस्वीपणे माघार तर घेता आलीचं, पण त्यांचे मोर्चे कायम राहिल्याने पुन्हा फळी बांधून मराठ्यांवर चाल करण्यास रोहिल्यांना मोकळीक मिळाली. माझ्या मते, सरदारांच्या या निष्क्रिय धोरणाची सर्व जबाबदारी सेनापती या नात्याने भाऊच्या शिरावर येते ! निर्णायक युद्ध टाळून, किरकोळ लढाया देत यमुनेकडे जाण्याचा भाऊचा बेत असल्याने, शत्रू चालून येत असले तरचं लढाई करण्याचा हुकुम त्याने सरदारांना दिलेला होता. मराठी सरदार किंवा सैनिक हे बेशिस्त होते असे सर्रासपणे म्हटले जाते, ते साफ चुकीचे असल्याचे या उदाहरणावरून सिद्ध होते. इतरवेळी जर असा प्रसंग उद्भवला असता तर, मराठी सरदारांनी पळत सुटलेल्या शत्रूसैन्याची लांडगेतोड निश्चित केली असती, पण यावेळी सेनापतीची सक्त आज्ञा असल्याने त्यांनी शत्रूची पाठ बघत, आहे त्याच जागी उभे राहण्यात धन्यता मानली ! सारांश, भाऊच्या निर्णायक युद्ध टाळण्याच्या अट्टाहासामुळे, पानिपतच्या संग्रामावरील मराठ्यांची मजबूत पकड हळूहळू सैल होऊ लागली.
मराठी सैन्याने उभारलेल्या लष्करी गोलात, उत्तरेच्या बाजूला असलेल्या मराठी पथकांनी पानिपत युद्धात कितपत सहभाग घेतला हे, याच ठिकाणी पाहाणे गरजेचे ठरेल. निर्णायक झुंज टाळण्याचा भाऊचा कितीही विचार असला तरी याच वेळी काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी अब्दाली कमालीचा उतावीळ झाला होता. त्यासाठी मराठी फौजेवर तो वारंवार हल्ले चढवणार हे उघड होते. जेव्हा शहावलीच्या नेतृत्वाखाली अफगाण फौज, हुजुराती नजीक येऊन भिडली तेव्हाचं शत्रूचे बेत भाऊच्या लक्षात यायला हवे होते, पण असे घडले नाही. बरे, हि वेळ निघून गेली. अफगाण सैन्याला पळवून लावून हुजुरात परत गोलात येऊन उभी राहिली. अफगाण लष्कराचा पराभव झाला असला तरी त्यांचे मोर्चे कायम असल्याने अधूनमधून ते तोफांचा मारा करीत होतेचं. मराठ्यांचा तोफखाना देखील उलटून उत्तर देत होताचं. माझ्या मते मराठी सैन्याच्या दृष्टीने हि धोक्याची पूर्वसूचना होती. परंतु, मराठी नेतृत्वाने त्याकडे सरळ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गिलच्यांचे मोर्चे कायम आहेत, याचा अर्थ कोणत्याही क्षणी बळ बांधून परत एकदा ते चालून येणार हे उघड होते. पण हि साधी गोष्ट भाऊच्या किंवा त्याच्या सरदारांच्या लक्षात आली नाही. परिस्थितीवर नजर देऊन भाऊने, गोलाच्या उत्तरेस उभी असलेली पथके, मुख्य लष्कराच्या मदतीसाठी पुढे आणायला हवी होती. त्या बाजूला शत्रूचा हल्ला येण्याची शक्यता आता फारशी राहिली नव्हती. लढाईचा जो काय निकाल लागायचा आहे तो आता आपल्याचं मोर्च्यावर लागणार आहे हे त्याने लक्षात घ्यायला हवे होते. परंतु, भाऊ हा ' पार्ट टाईम ' सेनानी असल्याने त्याच्याकडून अशा पद्धतीच्या हालचाली घडून आल्या नाहीत. मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते व ते म्हणजे, भाऊसोबत असलेल्या एकाही सरदाराला आपल्या सेनापतीचा मूर्खपणा लक्षात कसा आला नाही ? निर्णायक युद्ध टाळण्याच्या प्रयत्नात भाऊ फुकट आपल्या सैन्याची कत्तल घडवून आणत होता, दमणूक करून घेत होता. भाऊच्या या हट्टाचा परिणाम असा झाला कि, गोलाच्या उजव्या बाजूवर म्हणजे दक्षिणेकडे उभ्या असलेल्या सैन्यावर त्या दिवशी कमालीचा ताण पडला. उलट गोलाच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या, उत्तरेकडील लष्करी पथकांवर युद्धात सहभागी होण्याची वेळचं आली नाही. मराठ्यांचा पराभव झाल्यावर हि पथके वाट मिळेल त्या दिशेला निसटून गेली.
युद्धाच्या पूर्वार्धानंतरच्या उभय पक्षांच्या हालचाली :- रोहिला - गारदी सैन्याची लढाई दुपारी एकच्या आसपास संपुष्टात आली. रोहिले माघार घेऊन आपल्या मोर्च्यात उभे राहिले. रोहिल्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे मोर्चे कायम असल्याने व रोहिला सैन्याशी झालेल्या संग्रामात गारद्यांची भयंकर हानी झाल्याने, गारदी पथके आहे त्या जागीचं उभी राहिली. वस्तुतः याचवेळी त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तर अमीरबेग, बरकुरदारखानच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या अफगाण पथकांशी लढण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवणार होता. रोहिल्यांसोबत झालेल्या लढ्यात, गारद्यांची बरीच दमणूक झालेली असल्याने लगेच दुसऱ्या संग्रामास उभे राहाण्याची त्यांची तयारी नव्हती. माझ्या मते यावेळी भाऊने आपल्या प्रमुख सरदारांशी सल्ला मसलत करायला हवी होती. त्यांच्या विचाराने / सल्ल्याने बचावाचे धोरण सोडून सरळ आक्रमक धोरण स्वीकारायला पाहिजे होते. पण असे घडून आल्याचे दिसून येत नाही. रोहिला फौज जरी माघार घेऊन गेली असली तरी त्यांचे मोर्चे कायम असल्याने, अधून मधून तोफा डागून ते आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. गारद्यांच्या तोफा देखील राहून राहून गुरगुरत होत्या. असाच तासाभराचा कालावधी निघून गेला. दरम्यान या वेळांत, गारद्यांनी आपली पोटपूजा आटोपून घेतली. थोडावेळ विश्रांती घेतली. जे जबर जखमी होते त्यांना आघाडीवरून मागे पाठवण्यात आले. ज्यांच्या जखमा किरकोळ होत्या व पुढील लढाईत जे भाग घेऊ शकत होते त्यांच्या जखमांवर तात्पुरते उपचार करण्यात आले. पलटणांची पुनर्रचना करण्यात आली. या ठिकाणी एक मुद्दा असा उद्भवतो कि, दुपारी १ ते २ च्या दरम्यान भाऊ व इब्राहिमखान यांच्यात काही निरोपांची देवाण - घेवाण झाली होती का ? किंवा या दोघांची लहानशी का होईना भेट झाली होती का ? याविषयी उपलब्ध कागदपत्रांत कसलाच उल्लेख आढळत नाही. भविष्यात या मुद्द्यावर प्रकाश टाकणारी कागदपत्रे उपलब्ध होतील असे आता वाटत नाही. जर याविषयी माहिती देणारी कागदपत्रे उपलब्ध झाली तर पानिपतच्या युद्धात घडलेल्या कित्येक गूढ घटनांचा उलगडा होऊ शकतो. भाऊ व इब्राहिम यांच्या भेटीला इतके महत्त्व देण्याचे कारण म्हणजे, युद्धाच्या बदलत्या स्वरूपाचा अंदाज, इब्राहिमच्या लक्षात येणे जितके स्वाभाविक होते तितके इतरांच्या ध्यानी येणे तितकेसे सोपे नव्हते. याचे कारण असे कि, अफगाण - रोहिल्यांनी मराठी लष्कराच्या गोलाची वाट अडवली होती. पहिल्याच लढाईमध्ये रोहिल्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचा संपूर्ण निःपात झाला नव्हता. अशा स्थितीत, बचावाचे धोरण स्वीकारून गोलाची लढाई खेळत यमुना गाठणे तितकेसे सोपे नाही याची जाणीव त्याला झाली असावी. परिस्थिती पाहता, बचावाचे धोरण सोडून आक्रमक पवित्रा घेण्याची जास्त गरजेचे आहे हे त्याने ओळखले असावे. त्यानुसार त्याने भाऊला निरोप पाठवला असावा किंवा तो स्वतः भाऊच्या भेटीला गेला असावा. अर्थात, याविषयी कसलीच माहिती उपलब्ध नसल्याने याविषयी अधिक लिहिणे चुकीचे होईल.
गारद्यांवर चालून गेलेली रोहिला फौज पराभूत होऊन पण यशस्वीपणे माघार घेत आपल्या मोर्च्यांत येऊन उभी राहिली. या सैन्याच्या मागे सुमारे एक - दीड किलोमीटर्स अंतरावर हाजी जमालखान अफगाण पथकांसह उभा होता. लढाईतील प्रत्येक घटनेची बातमी आपल्याला समजावी म्हणून, प्रत्येक मोर्च्यावर अब्दालीने बातमीदारांची पथके नेमली होती. त्यांच्यामार्फत अब्दालीला युद्धातील प्रत्येक घटनेची माहिती मिळत होती. अर्थात, जासूदांकडून अब्दालीला मिळणाऱ्या बातम्या अचूक असत असे म्हणता येत नाही ! दुपारी साडेबारा - एकच्या दरम्यान त्याला रोहिल्यांच्या व वजीराच्या मोर्च्याकडून पराभवाच्या बातम्या मिळू लागल्या. पाठोपाठ, शहावलीच्या मोर्च्यातील पळून आलेल्या गिलच्यांच्या टोळ्या त्याच्या दृष्टीस पडू लागल्या. विपरीत वार्ता कानी पडताच त्याने काही निर्णय तातडीने घेतले. अहमदखान बंगष, यांस त्याने रोहिल्यांच्या मदतीसाठी ताबडतोब रवाना केले. हुजुरातीकडून मार खाऊन आलेले गिलचे, अब्दाली जिथे उभा होता तिकडे येऊन उभे राहिले. सकाळी मुख्य फौजा आघाडीवर रवाना केल्यावर खुद्द अब्दाली राखीव सैन्यासह, आपल्या मुख्य तळापासून पुढे जवळपास अर्धा मैल अंतरावर येऊन उभा राहिला होता. लढाईतून पळून आलेले अफगाण सैनिक, अब्दालीला टाळून अथवा बगल देऊन तडक छावणीकडे गेले असे म्हणता येत नाही. ते अब्दालीच्या जवळ येऊन उभे राहिले असेच म्हणावे लागेल. रणभूमीवरून माघार घेत असलेल्या सैनिकांना पाहून अब्दालीला काही खास आनंद झाला असे म्हणता येणार नाही. त्याने या शिपायांची कडक शब्दांत हजेरी घेतली असावी. पण तत्पूर्वी, जवळचं उभ्या असलेल्या नसक्ची पथकांच्या प्रमुखांना त्याने, आपापल्या पथकांसाहित त्वरीत रणभूमीच्या दिशेने पाठवले. मोर्चा सोडून मागे येणाऱ्या गिलच्यांना फटकावून परत युद्धात लोटण्याची त्याने, नसक्ची पथकांच्या म्होरक्यांना आज्ञा केली. या कामात त्यांना मदत करण्यासाठी अब्दालीने, यतीमांच्या टोळ्या देखील पाठवल्या असाव्यात. पळून येणाऱ्या सैनिकांना अडवण्याची व्यवस्था केल्यावर, जे सैनिक पळून येऊन त्याच्या आसपास थांबले होते, त्यांची कडक शब्दांत हजेरी घेऊन व जोडीला ताज्या दमाची काही पथके देऊन, त्यांना शहावलीकडे परत पाठवून दिले. त्याशिवाय जंबूरके लादलेले काही उंट, सुमारे सहा हजार गुलामांचे बंदुकधारी पायदळ देखील त्याने आपल्या वजीराच्या मदतीसाठी रवाना केले. राखीव व ताज्या दमाच्या फौजा आघाडीला रवाना करून अब्दाली स्वस्थ बसला नाही. त्याने वजीराला आज्ञा केली कि, फळी बांधून परत एकदा त्याने मराठ्यांवर जोरदार चढाई करावी. तसेच आघाडीच्या डाव्या - उजव्या फळीवरील पथकांना त्याने, ताबडतोब मराठ्यांवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. त्याशिवाय मुख्य आघाडीच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या सरदारांना देखील त्याने शत्रूवर चालून जाण्यची आज्ञा केली. सारांश, एकाचवेळी तिन्ही बाजूंनी मराठ्यांवर हल्ला चढवून त्यांना कोणत्याही एका ठिकाणी बळ बांधून / फळी बांधून आपल्या सैन्याचा प्रतिकार करणे शक्य होऊ नये किंवा कोणत्याही आघाडीवर लढणाऱ्या मराठी सरदारांना कुमक पाठवणे भाऊला शक्य होऊ नये हा, यामागील त्याचा प्रमुख हेतू होता. अब्दालीने आखलेल्या या डावपेचामागील त्याची भूमिका समजून घेणे अत्यावश्यक आहे. पानिपत युद्धाचा पूर्वार्ध संपून उत्तरार्धास आरंभ होणार असला तरी अजूनही अब्दालीची अशीच कल्पना होती कि, मराठ्यांचा उद्देश त्याच्या छावणीवर चाल करून येण्याचा आहे ! शाम्लू आपल्या ग्रंथात लिहितो कि, ' सुरवातीला भाऊ आणि विश्वासराव यांनी इतके मोठे आणि सतत हल्ले केले कीं अहमदशहाला आपला निभाव लागणार नाहीं असें वाटले. त्यानें माणसें पाठवून बायकांना घोड्यावर स्वार होऊन तयार राहाण्याची व्यवस्था केली. काफरांचा विजय झाला तर त्यांनी ताबडतोब निघून जाऊन सुरक्षित स्थळ गांठावे अशी व्यवस्था करण्यात आली.' शाम्लूची हि माहिती प्रथमदर्शनी तरी विश्वसनीय आहे असे म्हणता येत नाही. कारण, शाम्लू यावेळी शहापसंदखानाच्या सोबत असून, शहापसंद यावेळी जवळपास पानिपतजवळ जाऊन पोहोचला होता. अब्दाली जिथे उभा होता ती जागा किंवा अब्दालीची छावणी यावेळी, शहापसंदखानाच्या मोर्च्यापासून सुमारे ४ - ५ किलोमीटर्स लांब असावी. इतक्या लांब अंतरावरून शाम्लूला अब्दालीच्या या हालचालींची माहिती मिळाली हे पाहता, अब्दालीकडे दुर्बिणीपेक्षा ' दूरदृष्टी ' असणारी माणसे अधिक होती असे दिसून येते. वस्तुतः युद्धाला आरंभ होण्यापूर्वी सकाळीचं अब्दालीने आपल्या जनानखान्यास सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केलेली होती. माझ्या मते, अब्दालीने आपल्या बेगमांना रोहिलखंडात पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. रोहिल्यांच्या प्रदेशातून, पुढे प्रसंग पडल्यास बेगमांची रवानगी अफगाणिस्तानला करणे त्यातल्या त्यात सोपे होते. अर्थात, हे सर्व बेत सकाळीचं ठरलेले होते. तत्कालीन प्रघातानुसार, लढाईस आरंभ होण्यापूर्वीचं लष्करासोबत असलेल्या कुटुंब - कबिल्यांची योग्य ती व्यवस्था लावण्याच्या कामास प्राधान्य दिले जात असे. हे लक्षात घेता, शाम्लूने जी माहिती दिलेली आहे ती सकाळच्या वेळची, म्हणजे पानिपत युद्धाला आरंभ होण्यापूर्वीची आहे. घडून गेलेल्या घटनेचे वर्णन करताना, शाम्लूने घटनाक्रमात गोंधळ केला आहे. अर्थात, याबद्दल त्याला दोष देणे चुकीचे आहे. पानिपत युद्धातील, आपल्याला माहित असलेली प्रत्येक घटना लोकांना समजावी अशी शाम्लूची किंवा जवळपास सर्वचं बखरकारांची इच्छा असल्याने, घडून गेलेल्या प्रसंगाची समग्र माहिती देण्याच्या नादात त्यांच्याकडून कालानुक्रमाची गल्लत झालेली दिसून येते. सारांश, बखरी या अगदीच विश्वसनीय नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे ! शाम्लूची माहिती बरोबर आहे पण ती विश्वसनीय न वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे घटनेचा नेमका काळ देण्यात त्याने केलेला गोंधळ, हे होय ! शाम्लूने दिलेली माहिती दुपारची नसून, पानिपत युद्धास आरंभ होण्यापूर्वीची आहे, हे सिद्ध झाल्यावर प्रश्न असा उपस्थित होतो कि, पानिपत युद्धाच्या दिवशी शहावलीखानाचा पराभव झाल्यावर अब्दालीने आपल्या जनानखान्याची सुरक्षित स्थळी रवानगी केली कि नाही ? माझे असे स्पष्ट मत आहे कि, शहावलीखानाचा पराभव झाल्यावर अब्दालीने आपल्या जनानखान्यास सुरक्षित स्थळी निघून जाण्याच्या तयारीत राहाण्याचा आदेश दिला असावा किंवा छावणीतून निघून जाण्यास देखील सांगितले असावे. अब्दालीच्या बेगमा, आपल्या रक्षक सैन्यासह यमुनेच्या दिशेने रवाना जाणार होत्या. कारण ; इतरत्र निघून जाण्यासाठी त्यांना मोकळा मार्ग होताचं कुठे ? पानिपतच्या पश्चिमेला त्या जाऊ शकत नव्हत्या. तिकडे अब्दालीचे कोणी शत्रू नव्हते त्याचप्रमाणे मित्र देखील नव्हते ! दक्षिणेला दिल्लीकडे जायची तर सोयचं नव्हती. दिल्लीत मराठ्यांचे लष्करी ठाणे होते. सारांश, रोहिलखंड अपवाद केल्यास, अब्दालीच्या जनानखान्यासाठी सुरक्षित स्थळ / ठिकाण इतरत्र नव्हते. अब्दालीच्या बेगमा, यमुनापार जाण्यासाठी जर छावणीतून बाहेर पडल्या असतील तर त्या बापौली गावाच्याचं दिशेने निघाल्या असतील. बापौली गाव गृहीत धरण्यामागे काही कारणे आहेत. बापौली गावी जवळपास महिनाभर अब्दालीच्या लष्कराची छावणी होती. या ठिकाणी कदाचित यमुनेला उतार देखील असावा. जर तसे असेल तर नावांचा पूल उभारून रोहिले, याच ठिकाणाहून अब्दालीला रसद पुरवीत असावेत. जवळपास महिनाभर अब्दालीची छावणी या ठिकाणी होती हे लक्षात घेता असा काही प्रकार त्या ठिकाणी घडलाचं नसावा असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शेजवलकरांना बहुतेक याची कल्पना असावी. यासाठीचं त्यांनी मराठी सैन्याचा रोख हा पूर्वेकडे नसून आग्नेय दिशेला असल्याचे लिहिले असावे. अब्दालीला यमुनेच्या पलीकडून येणारी रसद, बापौली गावाजवळून येत होती व शत्रूचा हा रसदमार्ग ताब्यात घेण्यासाठी भाऊ, पानिपत सोडून बापौलीच्या दिशेने निघाला होता असा तर्क शेजवलकरांच्या ग्रंथावरून करता येतो. परंतु, उपलब्ध पुराव्यांच्या कसोटीवर हा तर्क अजिबात टिकत नाही. वस्तुतः असा तर्क खोडून काढणे तितकेसे सोपे नाही, परंतु उपलब्ध पुरावे या तर्कास अजिबात पाठबळ देत नाहीत. लष्करीदृष्ट्या असा एखादा डाव रचून शत्रूची रसद तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नाही असे नाही, पण मग कैफियत अथवा भाऊ बखरीत, मराठी सैन्याचा इरादा पूर्वेकडे जायचा होता असे का लिहिले आहे ? मान्य आहे कि, त्यावेळी दिशांच्या बाबतीत किंवा भूगोलाच्या बाबतीत सामान्य जनतेचे ज्ञान अतिशय तोकडे होते परंतु ज्या चार प्रमुख दिशा आहेत, त्या तर त्यांच्या नित्य परिचयाच्या होत्या ना ? त्यातल्या त्यात पूर्व दिशा तर जास्तचं परीचायची असणार, विशेषतः ब्राम्हण वर्गाला ! भाऊ व त्याचे कित्येक सरदार बाम्हण असल्याने, पूर्व दिशेचे महत्त्व अधिक सांगण्याची गरज नाही. तसेच, बापौली गावी जाण्याचा भाऊचा विचार असता तर त्याने त्यादृष्टीने सैन्य रचना केली असती. शत्रूच्या बगलेवर जायचे असल्याने, लष्कराचा गोल न बांधता अर्धगोल किंवा इतर काही रचना करून तो पानिपतमधून बाहेर पडला असता. समजा, गोल बांधून जर तो बापौलीकडे जाणार असता तर, युद्धात मराठ्यांना शत्रूचे मोर्चे उधवस्त करून आपल्या ताब्यात घेण्याच्या ज्या संध्या चालून आल्या होत्या, त्या त्यांनी दवडल्या नसत्या. उदाहरणार्थ, रोहिले ज्यावेळी गारद्यांकडून पराभूत होऊन माघार घेत होते, त्याचवेळी जर गायकवाड, विंचूरकर इ. सरदारांनी त्यांचा पाठलाग केला असता, त्यांची कत्तल केली असती तर रोहिल्यांचा मोर्चा मराठ्यांच्या ताब्यात येऊन, गारदी पुढे सरकले असते. असे घडून आले असते तर पानिपतच्या युद्धाला कदाचित कलाटणी मिळाली असती. कारण, गारदी जर रोहिल्यांच्या मोर्च्यावर येऊन उभे राहिले असते तर त्यांचा व हाजी जमालखानाचा मुकाबला घडून आला असता. मराठी सरदारांच्या मदतीने त्यांनी, जमालखानास पराभूत केले असते व परिणामी, अब्दालीची उजवी फळी साफ निकालात निघाली असती. अब्दालीचा वजीर, भाऊ व गारद्यांच्या मध्ये कोंडला गेला असता. तात्पर्य, जर मराठ्यांचा हेतू बापौली गावी जायचा असता तर पानिपत युद्धातील घटना कदाचित अशा पद्धतीने देखील घडून आल्या असत्या ! परंतु, मराठी सैन्याचा रोख बापौली गावाकडे नसून, पूर्वेकडे असल्याने असे काही घडून आले नाही. सारांश, बापौली गावाचे महत्त्व लक्षात घेता, अब्दालीने जर आपल्या जनानखान्यास सुरक्षित स्थळी जाण्याची आज्ञा केली असेल तर त्याच्या बेगमा, बापौली गावाच्या दिशेने निघाल्या असाव्यात. अजूनही रोहिल्यांचे मोर्चे कायम असल्याने व रोहिल्यांच्या मागे हाजी जमालखानाची फौज उभी असल्याने, बापौली गावी जाणे अब्दालीच्या बेगमांना सहज शक्य होते. अर्थात, अब्दालीचा जनानखाना, पानिपतचे युद्ध चालू असताना मुख्य छावणीतून इतरत्र कुठे गेला होता कि नाही, याचा स्पष्ट उल्लेख कुठेच मिळत नाही. परंतु, जर अब्दालीच्या बेगमा, मुख्य छावणीतून सुरक्षित ठिकाणाकडे जाणार असतील किंवा निघाल्या असतील तर बापौली गावी जाऊन, तिथे यमुनापार करण्याशिवाय त्यांच्याकडे इतर पर्याय नव्हता हे निश्चित !
पानिपत युद्धाच्या दिवशी, अब्दालीच्या डाव्या व मराठ्यांच्या उजव्या बाजूवर दुपारी एकच्या सुमारास काय परिस्थिती होती ? पानिपत गावाच्या पूर्वेला साधारण तीन - चार किलोमीटर्स अंतरावर होळकर - शिंद्यांची फौज उभी होती. त्यांच्या नैऋत्येला जवळपास तितक्याच अंतरावर मुल्ला सरदार रोहिला, शहापसंद खान, नजीब, जहानखान व सुजा यांची पथके फळी धरून उभी होती. सकाळी सात - आठच्या सुमारास मुख्य छावणीतून निघालेले हे सरदार दुपारी एकच्या - दीडच्या सुमारास पानिपतच्या दक्षिणेस साधारणतः दीड - दोन किलोमीटर्स अंतरावर येऊन उभे राहिले असावेत. या पाच सरदारांपैकी सुजा, जहानखान व नजीब यांची पथके पूर्वेकडे जास्त पसरली असावीत. असे होण्याचे कारण म्हणजे, शहावली व आपल्या फौजेच्या दरम्यान अधिक अंतर राहू नये यासाठी बहुतेक सुजा शहावलीच्या सैन्याच्या आसपास सुमारे एक दीड किलोमीटर्स अंतरावर, समांतर असा उभा राहिला असावा. शहावलीच्या बाजूला सुजा सरकल्याने, फळी धरण्यासाठी जहानखान देखील पूर्वेकडे सरकला तर त्याच्यासोबत नजीब देखील उजवीकडे सटकला. या तिघांच्या फौजांच्या दरम्यान हजार - पाचशे मीटर्सचे अंतर असावे. शहापसंद व नजीबच्या सैन्यात देखील तितकेच अंतर असावे पण, या ठिकाणी आणखी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे सुजा, जहान आणि नजीब या तिघांच्या लष्कराचा रोख यावेळी ईशान्येकडे वळला होता. अर्थात, होळकर - शिंद्यांच्या सैन्याचे मोर्चे त्या दिशेला असल्याने असे होणे स्वाभाविक होते. इथपर्यंतची माहिती उपलब्ध पुराव्याच्या व तर्काच्या आधारे मांडता येते. पण यापुढील भागाविषयी निव्वळ तर्कावर भिस्त ठेवावी लागते. नुरुद्दीनकृत नजीबच्या चरित्रात अशी माहिती मिळते कि, सुजा व नजीबच्या मोर्च्यावर त्या दिवशी कोणताच आघात झाला नाही. काशीराज देखील नजीब - सुजा यांनी मराठ्यांशी युद्ध केल्याचा प्रत्यक्ष उल्लेख करत नाही. शाम्लू आपल्या ग्रंथात लिहितो त्यानुसार, शिंदे - होळकरांना शहापसंदखानाने पळवून लावले. शिवप्रसादच्या मते हाफिज रहमत, अहमदखान बंगश, नजीब इ. रोहिले - पठाणांमुळे अब्दालीला विजय मिळाला. भाऊच्या कैफियतनुसार शिंदे - होळकरांवर सुजा व त्याच्या गोसावी सरदारांनी हल्ला केला. भाऊ बखरीत देखील जवळपास अशीच माहिती आहे. हि सर्व माहिती परस्परविरोधी स्वरूपाची असल्याचे दिसून येते. मग नेमके घडले काय असावे ? माझ्या मते दुपारी बारा ते एकच्या सुमारास सुजा, जहानखान व नजीब हे त्रिकुट शहापसंद व मुल्ला सरदार रोहिला या दुकलीला मागे सोडून थोडेसे पुढे सरकून आले. दिल्ली व अब्दालीच्या छावणीकडे जाणारा मोगल राजमार्ग रोखून धरण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने ते, त्या रस्त्याभोवतीचं घुटमळत होते. त्याउलट, शहावलीसोबत आघाडी सलग राखण्याच्या नादात सुजा, जहान व नजीब थोडेसे पुढे सरकून गेले. हे त्रिकुट पानिपत नजीक आले त्यावेळी, सुजाची फौज शिंद्यांच्या मोर्च्यासमोर येऊन उभी राहिली तर जहानखान होळकरांच्या समोर येऊन थडकला. नजीबची फौज, जहानखानाच्या पुढे सरकून ईशान्येकडे तोंड करून होळकरांच्या कुशीवर हल्ला करण्याच्या इराद्याने उभी राहिली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये अंदाजे दोन - तीन किलोमीटर्स इतके अंतर असावे. शत्रू सैन्याची निशाणे दृष्टीस पडतांच होळकर - शिंद्यांनी आपापल्या तोफखान्यास सज्जतेचे आदेश दिले. पुढे चालून येणाऱ्या शत्रूवर अधून मधून तोफगोळे सोडण्यात येऊ लागले. परंतु त्यामुळे मराठ्यांना विशेष असा फायदा झाला नाही, त्याचप्रमाणे शत्रूचे देखील फारसे नुकसान झाले नाही. रोहिले - गिलचे पुढे सरकत असल्यामुळे मराठी तोफांचा मारा आरंभी त्यांच्या सैन्याच्या मध्ये व नंतर पिछाडीच्या पलीकडे होऊ लागला. त्यामुळे, मराठ्यांच्या तोफखाना काहीसा निष्प्रभ झाला. शत्रू सैन्य तोफांच्या टप्प्यातून पुढे सरकत आहे हे लक्षात येतांच मराठ्यांनी आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा बंद केल्या असाव्यात.
अब्दालीच्या डाव्या बाजूला असलेली फौज काहीशी संमिश्र स्वरूपाची होती. या बाजूला जी अफगाण पथके होती, त्यात बव्हंशी घोडेस्वार होते. सुजाच्या सैन्यात पायदळ - घोडदळ जवळपास सारख्याच प्रमाणात होते. नजीबच्या लष्करांत पायदळाचा मोठा भरणा होता. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत पाहिले असता, अब्दाली - सुजाची फौज पारंपारिक आयुधांनी सुसज्ज होती. त्याशिवाय काहीजणांकडे बंदुका होत्या. त्यामानाने, नजीबचे लष्कर थोडेसे आधुनिक पद्धतीचे होते असे म्हणता येईल. त्याच्याकडे असलेले पायदळ बंदूकधारी शिपायांचे होते. अर्थात, गुणवत्तेच्या दृष्टीने नजीबचे रोहिले, गारद्यांच्या तोडीचे असल्याचे दिसून येत नाही. परंतु, मराठी सैन्याचा दृष्टीने पाहिल्यास, नजीबचे बंदुकधारी रोहिले म्हणजे यमदूतचं होते असे म्हणता येईल. मराठ्यांकडे जसे दारूचे बाण होते, तसेच नजीबकडे देखील असल्याचा उल्लेख मिळतो. एकावेळी तो हजार - हजार बाणांचा मारा करत असे. या बाणांच्या दणदणाटाने ' आकाश आणि पृथ्वी दिसेनाशी होत आणि कान फुटून जात ' अशी माहिती काशीराज आपल्या बखरीत देतो. मराठ्यांनी त्या दिवशी शत्रूवर चाल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण या बाणांच्या माऱ्यापुढे त्यांचे काहीएक चालले नाही अशा आशयाचे विधान काशीराज आपल्या बखरीत करतो. शेजवलकरांचे देखील जवळपास असेच मत आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बाणांची रेंज काय होती ? किती अंतरापर्यंत यांचा मारा करता येत असे याविषयी माहिती मिळत नाही. या बाणांची जी माहिती मिळते त्यावरून आजच्या काळातील रॉकेट्स / क्षेपणास्त्रांचे ते पूर्वज असावेत असा तर्क करता येतो. असे असले तरी त्यांचा मारा हा किती दूरवर करता येत असे याविषयी कसलाच अंदाज बांधता येत नाही. त्यावेळच्या ठासणीच्या बंदुकींची रेंज जवळपास १०० -१५० मीटर्सपेक्षा जास्त नसावी हा अंदाज आहे. अशा स्थितीत, या दारूच्या बाणांची रेंज हजार - पाचशे मीटर इतकी असणे शक्य नाही. नाहीतर, बंदुकधारी पथकांच्या ऐवजी सर्वांनीचं असे दारूचे बाण वापरले असते. त्याशिवाय लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हुजुरातीच्या सैन्यात देखील अशा बाणांचा साठा होता. शिंदे - होळकरांकडे देखील काही प्रमाणात असे बाण असावेत. असे असले तरी या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे कि, या दारूच्या बाणांमुळे शिंदे - होळकरांना शत्रूवर चाल करून जाता आले नाही किंवा या बाणांचा शत्रूला अधिक फायदा झाला का ? माझे स्पष्ट मत असे आहे कि, या बाणांचा शत्रूला अधिक फायदा झाला नाही त्याचप्रमाणे शिंदे - होळकरांना या बाणांमुळे शत्रूवर आक्रमण करता आले नाही हे देखील चुकीचे विधान आहे. या ठिकाणी प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, हुजुरातीकडे अशा बाणांचा साठा असून देखील अफगाण सैन्याला ते फारसे त्रस्त करू शकले नाहीत त्याचप्रमाणे, या बाणांचा काही विशेष फायदा देखील हुजुरातीला मिळाला नाही. तात्पर्य, काशीराज किंवा शेजवलकर म्हणतात त्यानुसार दारूच्या बाणांचा नजीबला काही विशेष फायदा मिळाला असे म्हणता येत नाही. तसेच, नजीबने मुक्तहस्ताने केलेल्या या बाणांच्या वापरामुळे शिंदे - होळकरांना त्याच्यावर आक्रमण करता आले नाही हे देखील साफ खोटे आहे. मुळात शत्रू सैन्य व शिंदे - होळकरांच्या फौजा समोरासमोर म्हणजे दोन - तीन किलोमीटर्स अंतरावर समोरासमोर आल्या त्याच मुळी दुपारी एकच्या सुमारास. तिथून पुढे दोन्ही बाजूंचे काही काळ तोफांचे युद्ध झाले. त्यानंतर जे काही पुढे झाले त्याची चर्चा पुढे येईल.
शिंदे - होळकरांच्या फौजेविषयी या ठिकाणी थोडी अधिक माहिती देणे मला गरजेचे वाटते. शिंदे - होळकर हे उत्तर हिंदुस्थानातीलचं नव्हे तर सबंध हिंदुस्थानात पसरलेल्या पेशव्यांच्या सरदारांपैकी सर्वांत बलिष्ठ असे सरदार होते. या सरदारांचा वावर मुख्यतः उत्तर हिंदुस्थानात अधिक असल्याने, त्यांच्या लष्करांत उत्तर हिंदुस्थानी लोकांचा मोठा भरणा असणे स्वाभाविक आहे. यामध्ये विविध प्रांतांतील, धर्मांतील लोक होते. रोहिले, पठाण, अफगाण, अरब, गोसावी, पूरभय्ये, राजपूत, मारवाडी, जाट इ. समुदायांतील लोक त्यांच्या सैन्यात असून, त्याव्यतिरिक्त खास माराठी लोकांची देखील काही पथके त्यांच्या लष्करांत होती. सारांश, या सरदारांच्या सैन्याचे स्वरूप काहीसे संमिश्र स्वरूपाचे होते. शस्त्रांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्यावेळी प्रचलित असलेली सर्व प्रकारची शस्त्रे वापरणारे लोक शिंदे - होळकरांच्या सैन्यात होते. अर्थात, शस्त्रास्त्रांचे विषयीचे विधान फक्त शिंदे - होळकरांच्या लष्करातील लोकांनाचं उद्देशून आहे असे नाही ! इतरांच्या सैन्यात देखील अशाच प्रकारची शस्त्रास्त्रे वापरणारी माणसे होतीचं. होळकरांच्या फौजेविषयी सर्रासपणे असे लिहिले जाते कि, त्यांच्या सैन्यात भालाईत स्वारांचा मोठा भरणा होता. अर्थात, यात किती तथ्य आहे हे माहिती नाही, पण होळकरांकडे निव्वळ भालाईत स्वार होते असा कोणी गैरसमज करून घेऊ नये. भालाईत स्वारांचा विषय निघाला आहेचं तर या ठिकाणी त्यांच्याविषयी अधिक माहिती देणे योग्य ठरेल. तत्कालीन भाल्यांची लांबी सात ते आठ फूट किंवा याहून अधिक असे. या भाल्यांना साधारण दहा - बारा फुटाची एक दोरी बांधलेली असे व या दोरीचे दुसरे टोक स्वाराच्या, भाला घेतलेल्या हाताच्या, खांद्याला बांधलेले असे. शत्रूवर हल्ला करताना किंवा या भाल्याचा मारा करताना नेम धरून भाल्याची फेक केली जात असे व दोरीच्या सहाय्याने भाल्याला परत एकदा मागे खेचून घेतले जात असे. अर्थात, भाल्याच्या वापराची हि पद्धत तेव्हा सर्वत्र प्रचलित होती. कदाचित असे म्हणता येईल कि, नामांकित भालाईत लोकांचे पथक उभारण्याची मल्हाररावाला आवड असावी. अर्थात, या ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे व ती म्हणजे जरी या भालाईत स्वारांचा, भाले चालवण्यात हातखंडा असला तरी प्रसंगी तलवार देखील ते तितक्याच सफाईने चालवत. त्याशिवाय आणखी एक विशेष माहिती अशी कि, भालाईत घोडेस्वार किंवा विनाभालाईत स्वार आपल्या तलवारी सदासर्वकाळ कमरेला अडकवून ठेवत नसत. घोड्याच्या पाठीवर जे खोगीर असे, त्या खोगीरावर आडवी ठेऊन मांडीखाली घट्ट दाबून धरलेली असे. धावपळीच्या वा स्वारीच्या प्रसंगी मांडीखालची तलवार काडीभरसुद्धा सरकू न देण्यात स्वाराला मोठे भूषण वाटे. प्रसंग पडल्यास शस्त्र पटकन हाती घेता यावे यासाठी, तलवारीची मुठ त्वरीत हाताशी लागेल अशा पद्धतीने तलवार मांडीखाली दाबून धरलेली असे. गनिमी काव्याने लष्करी मोहीम चालली असेल तर प्रवासात विश्रांती घेण्याची पद्धत कशी असे माहिती आहे ? एखादे चांगले डेरेदार झाड पाहून त्या झाडाच्या सावलीत काही वेळ झोप घेतली जात असे किंवा असे झाड न सापडल्यास चार पाच सैनिक स्वतःजवळील भाले जमिनीवर रोवून त्यावर घोंगडी, चादरी सारखी वस्त्रे टाकून तात्पुरता आडोसा तयार केला जाई व त्या सावलीत लोक विश्रांती घेत. अर्थात, अशा पद्धतीने कृत्रिम आडोसा तयार केला जाई तेव्हा अर्धे शरीर, कमरेच्या वरील, हे त्या आडोश्याच्या सावलीत असे तर अर्धे बाहेर उन्हात भाजून निघे. अशा प्रकारे घटका दोन घटका विश्रांती घेऊन मंडळी पुढील प्रवासास निघत. सारांश, तत्कालीन मराठी सैनिकांचे लष्करी जीवन अशा पद्धतीचे असे. मल्हारराव होळकराने आजवर अशाच पद्धतीने धावपळीच्या मोहिमा पार पाडलेल्या होत्या. पानिपत मोहिमेत ज्या पद्धतीने भाऊ लष्करी हालचाली करत होता ते कदाचित त्यास पसंत नसावे परंतु, सर्व हयात लढायांमध्ये गेलेली असल्याने पानिपतसारख्या प्रसंगी मुख्य सेनापतीच्या आज्ञेचे पालन न करणे किती धोक्याचे ठरू शकते याची त्याला जाणीव नसेलचं असे म्हणता येत नाही. त्यामुळे, पानिपतच्या लढाईत होळकराचे मन नव्हते किंवा तो पळून जायची संधी शोधात होता अशा आशयाची जी वर्णने केली जातात ती साफ खोटी असल्याचे दिसून येते. अर्थात, याची चर्चा या ठिकाणी सध्या तरी अनावश्यक असून, योग्य त्या ठिकाणी याविषयी तपशीलवार चर्चा केली जाईल.

रोहिला - अफगाणांची गारद्यांवर चढाई :- दुपारी एकच्या आसपास रोहिला सैन्य, गारद्यांकडून पराभूत होऊन पण यशस्वीपणे माघार घेत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले. यावेळी मराठ्यांकडून त्यांचा पाठलाग न झाल्यामुळेचं त्यांना सुखरूपपणे माघार घेता आली. त्याचप्रमाणे त्यांच्या तोफांचे मोर्चे कायम राहिल्याने त्यांना, तोफखान्याचा आसरा घेऊन रणांगणावर पाय रोवून उभे राहता आले. रोहिला सैन्य आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहिले. त्यांच्या पाठीवर लागलीच मराठे चालून न आल्याने त्यांना विश्रांती घेण्यास व खाणे - पिणे उरकून घेण्यास काही अवधी मिळाला. दरम्यान अधूनमधून रोहिले - गारदी एकमेकांवर तोफांचा मारा करीत होतेचं. जवळपास एक तास असाच निघून गेला. या मधल्या काळात मराठ्यांनी आक्रमण न केल्याने शत्रूला नव्याने रणनीती आखण्याची व ती प्रत्यक्षात उतरवण्याची संधी प्राप्त झाली. रोहिला सरदार व अमीरबेग, बरकुरदार यांच्यात निरोपांची देवाण - घेवाण होऊन किंवा प्रत्यक्ष भेट घडून एकाचवेळी गारद्यांवर दोन्ही बाजूंनी हल्ला चढवण्याचे निश्चित करण्यात आले. मधल्या काळात अहमदखान बंगषने आपण मदतीस येत असल्याची बातमी रोहिल्यांना कळवली. तेव्हा ताज्या दमाची फौज मदतीस आल्यावर शत्रूवर चढाई करण्याचा निर्णय रोहिला - अफगाण सरदारांनी घेतला. अहमदखान बंगष साधारणतः दुपारी पावणेएक - सव्वा एकच्या दरम्यान केव्हातरी आघाडीवर रवाना झाला असावा. रोहिल्यांच्या मोर्च्याकडे जाण्यासाठी त्याला अंदाजे तीन ते पाच किलोमीटर्सचे अंतर तुडवावे लागले. बंगषसोबत दोन हजार व काही पायदळ पथके असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच्या सैन्याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी त्याची फौज चार - पाच हजारांपेक्षा नसावी असा तर्क करता येतो. यामागील कारण असे कि, हिंदुस्थानी संस्थानिक आपली सर्वच्या सर्व फौज घेऊन अब्दालीच्या मदतीस आलेले नव्हते. सुजाप्रमाणेचं सर्वांनी आपल्या सैन्याचा अर्धा हिस्सा स्वतःच्या राज्याच्या संरक्षणासाठी मागे ठेवला होता. तेव्हा बंगषसोबत चार - पाच हजारांपेक्षा अधिक फौज नसणे स्वाभाविक आहे. त्याच्या लष्करातील पायदळाची निश्चित आकडेवारी मिळत नाही. कदाचित जितके स्वार तितकेचं पायदळ असावे. बंगषने अर्ध्या - पाऊण तासात सुमारे तीन ते पाच किलोमीटर्सचे अंतर पार केले हे लक्षात घेता त्याच्या सैन्याची चाल बरीच वेगवान असल्याचे दिसून येते. यावरून असाही तर्क केला जाऊ शकतो कि, त्याच्या फौजेत पायदळ अल्प प्रमाणात असावे. ते काहीही असले तरी, जवळपास अर्ध्या - पाऊण तासात चार - पाच हजार सैन्य व काही तोफा घेऊन बंगष आघाडीवर येऊन थडकला हे स्पष्ट आहे. दुपारी दोनच्या सुमारास अहमदखान रोहिल्यांच्या मोर्च्यात येऊन उभा राहिला. बंगष सोबत किंवा त्याच्या पाठोपाठ अब्दालीच्या आज्ञेनुसार हाजी जमालखान हा देखील रोहिल्यांच्या मोर्च्याजवळ येऊन उभा राहिला. बंगष व जमालखान मदतीस आल्याने रोहिला - अफगाण सरदारांना गारदी सैन्यावर परत एकदा चालून जाण्यासाठी उत्साह आला. या आक्रमणात रोहिल्यांची बहुतेक आठ - नऊ हजार फौज, बंगषचे चार - पाच हजार सैनिक, जमालखानचे चार - पाच हजारांचे लष्कर मिळून सुमारे अठरा हजारांवर सैन्य गारद्यांवर समोरून हल्ला करणार होते. अमीरबेग, बरकुरदारखान हे दोघे गारद्यांच्या डाव्या बगलेवर तीन - चार हजार फौजेसह चालून जाणार होते. सारांश, गारद्यांवर परत एकदा शत्रूच्या अफाट लष्करी सामर्थ्याचा मुकाबला करण्याचा प्रसंग ओढवणार होता. रोहिला - अफगाण सैन्याचे, गारदी पथकांवरील आक्रमण दुपारी अडीच नंतर सुरु झाले. रोहिल्यांनी बहुतेक यावेळी तोफांचा बराच भडीमार केला असावा. गारद्यांनी देखील त्यांना तितक्याच जोराने प्रत्युत्तर दिले असावे. सुमारे अर्धातास तरी तोफांचे हे युद्ध चालले असावे. त्या दरम्यान, शत्रूवर चालून जाण्यासाठी रोहिला पथके तयार होत असावीत. दुपारी तीन नंतर रोहिल्यांच्या तोफा बंद होऊन त्यांचे स्वार व पाठोपाठ पायदळ मोर्च्यातून बाहेर पडू लागले. या सुमारास गारदी सैन्याची स्थिती काय असावी ?
दुपारी एक ते दोन - अडीच पर्यंत साधारणतः एक - दीड तासांची विश्रांती घेऊन गारदी पथके काहीशी ताजीतवानी झाली असली तरी आपल्या सैन्याची घटलेली संख्या गारदी सरदाराच्या लक्षात आली नसावी हे शक्य नाही. शत्रूचा आणखी एखादा जोराचा हल्ला आल्यास, आपल्याकडून आघाडी राखण्याचे कार्य पार पाडले जाईल किंवा नाही याविषयी त्याच्याही मनात शंका असणारचं ! इब्राहिमने, परिस्थिती पाहून आपल्या उजव्या बाजूला असलेल्या मराठी सरदारांना प्रसंग पडल्यास कुमकेस येण्याची सूचना केली असावी का ? किंवा त्याने भाऊकडे अधिक सैन्याची मदत मागितली असावी का ? अथवा रणनीतीमध्ये काही बदल करण्याची सूचना त्याने भाऊला निरोप पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटून केली असावी का ? या व अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आता शक्य नाही. अशा स्थितीत निव्वळ तर्कावर भिस्त न ठेवता उलब्ध माहिती व तर्कसंगती यांच्या आधारेचं वरील प्रश्न / शंकांची उत्तरे शोधणे भाग आहे.
पानिपत युद्धाची उपलब्ध माहिती विचारात घेतली असता असे दिसून येते कि, इब्राहिमने आपल्या उजव्या बगलेवर उभ्या असलेल्या मराठी सरदारांकडे किंवा भाऊकडे प्रसंगी कुमक करण्याची सूचना / विनंती केली असावी. या ठिकाणी अशीही शंका उपस्थित केली जाऊ शकते कि, इब्राहिमच्या उजव्या बाजूला उभे असलेले सरदार, प्रसंग पडल्यास गारद्यांच्या मदतीला जाणार होतेचं. लष्कराची आघाडी / गोल अभंग राखण्यासाठी त्यांना गारद्यांच्या मदतीस जाणे भाग होते. ती त्यांची जबाबदारी होती. अशा स्थितीत इब्राहिम त्यांना मदतीची विनंती / सूचना का करेल ? याचा अर्थ असा होतो कि, एक तर इब्राहीम मूर्ख होता अथवा मराठी सरदार अननुभवी होते. अशा प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ शकतो, नाही असे नाही. त्यावर माझे उत्तर असे आहे कि, इब्राहिमला अशा तऱ्हेची विनंती मराठी सरदारांना करणे भाग होते. याचे कारण, मराठी सरदार त्याच्यावर जळत होते हे नसून, शत्रूने जर एकाचवेळी हुजुरातीवर व गारदी पथकांवर हल्ला केला तर भाऊ आणि इब्राहिमच्या दरम्यान उभी असलेली मराठी पथके कदाचित हुजुरातीच्या मदतीला जाण्याची शक्यता होती. संभाव्य सर्व शक्यता लक्षात घेऊनचं इब्राहिमने मराठी सरदारांना अशी विनंती / सूचना करणे स्वाभाविक आहे. अर्थात, या ठिकाणी हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे कि, सकाळी जेव्हा रोहिला - गारद्यांची हातघाई जुंपली होती तेव्हा मराठी सरदारांनी त्यांना मदत केली नव्हती. हि बाब इब्राहिमच्या लक्षात आली नसावी किंवा त्याला या घटनेचे विस्मरण झाले असावे असे म्हणता येत नाही. तात्पर्य, प्रसंग पडला असता मदत करण्याविषयी इब्राहिमने आपल्या उजव्या बगलेवर उभ्या असलेल्या सरदारांना किंवा भाऊला सूचना / विनंती केली होती.
दुपारी अडीचच्या सुमारास रोहिल्यांकडून तोफांचा जोरदार भडीमार होऊ लागला. याचा योग्य तो अर्थ घेऊन गारदी पथके शत्रूच्या समाचारास सज्ज होऊ लागली. तोपर्यंत गारद्यांच्या तोफा देखील शत्रू सैन्यावर आगीचा वर्षाव करू लागल्या. साधारणतः तीनच्या सुमारास रोहिल्यांचा तोफखाना थंडावला. पाठोपाठ गिलचे - रोहिले वेगाने पुढे चालून येऊ लागली. यावेळी गारद्यांची रणनीती कोणत्या प्रकारची असावी ? त्यांच्याकडे उण्यापुऱ्या चारचं पलटणी होत्या. आसपास मराठी सैन्याची पथके उभी असली तरी याच वेळी अफगाण वजीराने हुजुरातीवर चढाई करण्यास आरंभ केलेला असल्याने, प्रसंग पडला असता मराठी सरदारांची आपणांस मदत मिळेल कि नाही याविषयी कदाचित इब्राहिमच्या मनात देखील शंका असावी. असो, ज्यावेळी रोहिल्यांचा तोफखाना बंद होऊन त्यांची पथके, गारद्यांवर चढाई करण्याच्या हेतुस्तव मोर्च्यातून बाहेर पडू लागली होती, त्याच सुमारास अमीरबेग व बरकुरदारचे अफगाण घोडेस्वार गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून येऊ लागले होते. शत्रूने आक्रमक चढाईचे धोरण स्वीकारलेलं असल्याने अपरिहार्यपणे गारद्यांना बचावाचे धोरण स्वीकारणे भाग होते. यावेळी त्यांची पथके गोलातून बाहेर पडली असावीत कि आहे त्याच ठिकाणी उभी राहून, फळी धरून शत्रू सैन्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहिली असावीत ? माझ्या मते, त्यांनी तोफांच्या मागे उभे राहूनचं फळी धरली असावी. तोफा - बंदुकांच्या सहाय्याने गोलाची डावी बाजू सांभाळण्याचा इब्राहिमने निर्णय घेतला. यावेळी त्याने आपल्या चार पलटणींपैकी किती पलटणी रोहिल्यांच्या तसेच अफगाण सैन्याच्या तोंडावर ठेवल्या असाव्यात याविषयी अंदाज करणे तितकेसे सोपे नाही. अफगाण - रोहिले पुढे सरकू लागल्याने स्वाभाविकचं गारद्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा एकप्रकारे निष्प्रभ झाला. तेव्हा गारद्यांनी आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा बंद करून लहान तोफांचा मारा करण्यास आरंभ केला. हा प्रसंग गारद्यांच्या दृष्टीने आणीबाणीचा असल्याने त्यांनी विलक्षण वेगाने तोफा डागण्यास आरंभ केला. याप्रसंगी गारद्यांनी रोहिला - अफगाण सैन्यावर आगीचा पाऊस पाडला असेही म्हणता येईल. गारद्यांच्या तोफा आगीचा वर्षाव करू लागले तरीही रोहिले - अफगाण निकराने पुढे चालून आले. शत्रूचे प्रारंभिक लक्ष्य होते गारदी तोपची ! परंतु, गारद्यांच्या पलटणी तोफखान्याला लागून, फळी धरून उभी राहिली असल्याने अफगाण - रोहिल्यांचा फारसे काही करता येईना. त्यांचे हात गारद्यांचे गळे घोटण्यासाठी शिवशिवत होते पण गारदी सैनिकांच्या बंदुकांपुढे त्यांचा इलाज चालेनासा झाला. रोहिले - अफगाण आपल्या जवळील धनुष्य - बाण, भाले, बंदुकी इ. शस्त्रांच्या सहाय्याने गारद्यांची फळी फोडण्याचा प्रयत्न करत होते. गारद्यांवर डाव्या बाजूने चालून येणाऱ्या अफगाण सरदारांची फौज कमी असल्याने, आपल्या पथकांतील जखमी - मृतांचे वाढते प्रमाण पाहून अमीरबेग व बरकुरदार यांनी थोडासा बचावात्मक पवित्र घेतला. गारद्यांच्या बंदुकींच्या टप्प्याबाहेर उभे राहून ते गारद्यांशी आपल्या जवळील बंदुका, भाले, बाण इ. शस्त्रांच्या आधाराने लढू लागले. डाव्या बाजूच्या अफगाण पथकांनी बचावात्मक पवित्र घेतला असला तरी रोहिले मात्र हट्टाला पेटले होते. सकाळच्या प्रमाणेचं त्यांनी यावेळी देखील आपली घोडदळ पथके बहुतेक बाजूला हटवली असावीत व पायदळाच्या सहाय्याने गारदी पलटणींवर ते तुटून पडले. गारदी - रोहिले अटीतटीने लढू लागले. गारद्यांनी निकराने झुंज दिली पण शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने हळूहळू गारदी पथके मागे हटून हुजुरातीच्या आसऱ्यास जाऊ लागली. वस्तुतः गारद्यांच्या उजव्या अंगाला मराठी सरदारांची पथके उभी होती. परंतु या आणीबाणीच्या वेळी, मराठी सरदारांना गारद्यांची कुमक करता आली नाही. यामागील कारण काय असावे ?

शहावलीखानाची हुजुरातीवर चढाई :- सकाळी हुजुरातीसोबत झालेल्या युद्धात अफगाण सैन्य पराभूत होऊन छावणीकडे पळत सुटल्याने शहावलीवर बिकट प्रसंग ओढवला होता, परंतु मराठ्यांनी आपली चढाई आटोपती घेतल्याने त्याचा काहीसा बचाव झाला होता. मराठ्यांच्या माघारीमुळे अफगाण सैन्याचा मोर्चा कायम राहिला. हाताशी असलेल्या तीन - चार हजार फौजेसह शहावलीखान आघाडी अभंग राखण्याची धडपड करत होता. त्याच्या सुदैवाने, हुजुरातीची पथके पुढे चालून न आल्याने त्याला आपले विस्कळीत झालेले सैन्य सावरण्याची संधी मिळाली. त्याशिवाय अब्दालीने देखील प्रसंगाचे गांभीर्य ओळखून राखीव पथके तातडीने आपल्या वजीराच्या मदतीला पाठवून दिली. अफगाण लष्करांत मुख्यतः घोडेस्वारांचा मोठा भरणा होता. अब्दालीने शहावलीच्या मदतीला जी राखीव सैन्याची पथके रवाना केली त्यात बव्हंशी घोडेस्वार असल्याने, सुमारे चार - साडेचार किलोमीटर्सचे अंतर अर्ध्या - पाऊण तासात कापून हि फौज वजीराच्या मोर्च्यात दुपारी दोनच्या आसपास दाखल झाली. पाठोपाठ काही वेळाने सकाळी लढाईतून पळून गेलेली अफगाण पथके देखील शहावलीच्या मोर्च्यात येऊन उभी राहू लागली. त्याखेरीज अब्दालीने पाठवलेले बंदुकधारी पायदळ व जंबूरके देखील याच सुमारास वजीराजवळ येऊन पोहोचले. दुपारी अडीचच्या सुमारास बव्हंशी फौज गोळा झाल्यावर शहावलीने, अब्दालीच्या आज्ञेनुसार चढाई करण्याचा निर्णय घेतला. मराठी लष्करावर आक्रमण करताना त्याने यावेळी हाताशी असलेली जवळपास सर्व पथके वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बंदुकधारी पायदळ, जंबूरके लादलेले उंट, धनुर्धारी पथके, घोडेस्वार, पायदळ इ. विभागांना त्याने युद्धात लोटण्याचे ठरवले. त्याच्या इशाऱ्यानुसार अफगाणी तोफा धडाडू लागल्या. अफगाण लष्करातून तोफगोळ्यांचा वर्षाव होऊ लागल्यावर मराठी तोफा देखील गर्जू लागल्या. माझ्या मते, दुपारी तीनच्या आसपास अफगाणांचा तोफखाना बंद झाला व त्यांची फौज मराठ्यांना निर्णायक भीमटोला देण्याच्या हेतूने मोर्च्यातून बाहेर पडू लागली.
शहावलीच्या नेतृत्वाखालील अफगाण लष्कराला खडे चारून हुजुरातीची व इतर मराठी सरदारांची पथके दुपारी एक - दीडच्या दरम्यान गोलात येऊन आपापल्या जागी उभी राहिली. नुकत्याच झालेल्या संघर्षात मराठ्यांना जरी विजय मिळाला असला तरी त्याची बरीच मोठी किंमत त्यांनाही चुकवावी लागली होती.सुमारे पाच - सहा हजार सैनिक मृत वा जखमी झाले होते. इतकी मोठी किंमत देऊन सुद्धा शत्रूचे मोर्चे कायम राहिले असल्याने, मराठ्यांचा हा विजय एकप्रकारे निष्फळ ठरला. असो, अफगाण लष्कराला पळवून लावून मराठी सैनिक गोलात येऊन उभे राहिले. तोपर्यंत गारदी - रोहिला यांचा संघर्ष संपुष्टात आलेला होता. परंतु, गारद्यांची पथके थकलेली असल्याने व रोहिला - अफगाण सैन्याचे मोर्चे कायम असल्यामुळे मराठी लष्कराला यमुनेच्या दिशेने पुढे सरकता आले नाही. वास्तविक, याच वेळी मराठी नेतृत्वाने आपल्या युद्ध विषयक धोरणांत, डावपेचांत बदल करण्याची गरज होती पण असे बदल करणे मराठी लष्कराच्या सेनापतीला गरजेचे वाटले नाही. परिणामी दुपारी एक - दीड पासून अडीच पर्यंत, मराठी सैन्य एकप्रकारे निष्क्रिय राहिले. त्याउलट, याच तासभराच्या अवधीचा फायदा घेऊन अफगाण नेतृत्वाने आपल्या लष्करी धोरणांत बदल केले. पळपुट्या सैनिकांना युद्धभूमीवर परत जाण्यास भाग पाडले, राखीव पथके आघाडीवर रवाना केली, एकाच वेळी तिन्ही बाजूंनी मराठ्यांवर हल्ला चढवण्याची सरदारांना आज्ञा दिली. सारांश, वेळेचे महत्त्व जाणून अब्दालीने तातडीने हालचाली केल्या. अब्दालीच्या तुलनेने भाऊ याबाबतीत अगदीच कमी पडला असे म्हणावे लागते. अर्थात, भाऊच्या बाजूने फक्त इतकेच म्हणता येईल कि, पानिपत युद्धाच्या दरम्यान त्याने कोणते निर्णय घेतले किंवा काय डावपेच योजले याची माहिती देणारी साधने उपलब्ध नसल्याने याबाबतीत त्याच्यावर टीका करणे अन्यायाचे होईल. असे असले तरी, उपलब्ध पुराव्यांच्या आधारेचं पानिपत युद्धाचे विवेचन करण्याशिवाय इतर पर्याय नसल्यामुळे प्रसंगी, आवश्यक त्या ठिकाणी भाऊवर टीका करणे अपरिहार्य आहे. मात्र टीका करताना ती अस्थानी होऊ नये एवढी खबरदारी घेणे गरेजेचे आहे !
दुपारी दोन - अडीच पर्यंत हुजुरात व इतर मराठी सरदारांची पथके, मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन खाणे - पिणे उरकून परत एकदा लढण्यासाठी सज्ज झाली. याशिवाय मधल्या काळात जबर जखमी सैनिक वेगळे करणे, ज्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत त्यांच्यावर शक्य तितके तात्पुरते इलाज करणे इ. कामे उरकून घेण्यात आली. यादरम्यान अफगाण लष्करातून अधून मधून तोफांचा मारा होत होताचं. परंतु त्यामुळे मराठी सैन्याचे फारसे नुकसान झाले असे म्हणता येत नाही. कारण ; अफगाण तोफांच्या माऱ्याच्या जागा लक्षात आल्यावर, त्या जागा टाळून मराठी लष्कर उभे राहिले असावे. दुपारी अडीच नंतर अफगाणी तोफांचा अविश्रांत भडीमार होऊ लागल्यावर मराठी सरदार सावध झाले. लवकरचं आपणांस अफगाण सैन्याच्या चढाईला तोंड द्यावे लागेल किंवा आपल्याला शत्रूवर चालून जाण्याची आज्ञा मिळेल हे त्यांनी ओळखले. त्यानुसार त्यांनी आपापल्या पथकांना सज्जतेचे इशारे दिले. इकडे, अफगाण सैन्यातून तोफांचा भडीमार सुरु झाल्यानंतर पानशांनी देखील त्याला तोडीस तोड असे उत्तर देण्यास आरंभ केला. याप्रसंगी भाऊच्या मनात नेमके काय चालले असावे ? शत्रूकडून होणाऱ्या तोफांच्या मारगिरीवरून लवकरचं आपल्याला अफगाण लष्कराच्या आक्रमणाचा मुकाबला करावा लागणार हे त्याने ओळखले असावे. याच सुमारास गारदी सैन्याच्या बाजूला सुद्धा तोफांचा धडाका सुरु झाला असल्याने त्या बाजूने देखील शत्रू चाल करून येणार याचीही त्याला कल्पना आली असावी. अशा स्थितीत, सकाळप्रमाणेचं मोर्च्यातून बाहेर पडून अफगाणी सैन्याचा समाचार घ्यावा कि बचावाचे धोरण स्वीकारून आपल्या गोलाच्या जवळचं शत्रूला अडवून धरावे याविषयी त्याला पटकन निर्णय घेणे अवघड गेले असावे. यामागील कारण म्हणजे, सकाळच्या लढाईत त्याचे पाच - सहा हजार सैन्य निकामी झाल्याने यावेळी भाऊजवळ हुजुरात व इतर सरदारांची पथके मिळून सुमारे तेरा - चौदा हजार सैन्य असावे. त्याशिवाय डाव्या बाजूची समशेरबहाद्दर, गायकवाड, विंचूरकर इ. सरदारांची पथके सोबतीला होतीचं. अर्थात, या ठिकाणी हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि एकाच वेळेस हुजुरात व गारद्यांना मदत करण्याची जबाबदारी पवार, गायकवाड, विंचूरकर इ. सरदारांवर येऊन पडली. वास्तविक, अफगाण सैन्याने चढाई करण्यापूर्वी जो मधला तासाभराचा कालावधी उलटून गेला, त्या अवधीत गोलाच्या पलीकडे, उत्तरेस उभी असलेली पथके भाऊने आघाडीवर बोलावली असती तर प्रसंग इतका बिकट बनला नसता. परंतु, त्याने तसे काहीही न केल्यामुळे लष्कराच्या एकाच बाजूवर युद्धाचा कल्पनातीत ताण पडला. असो, तर गोलाच्या आधारावर बचावात्मक पवित्रा घेऊन लढाई करण्याचा यावेळी भाऊने निर्णय घेतला. अफगाण लष्करातून होणारा तोफांचा भडीमार बंद होतांच भाऊने देखील आपल्या तोफा बंद करण्यास सांगून घोडदळ पथके तोफखान्याच्या पुढे काही अंतरावर उभी केली. मराठी स्वार रांगा धरून उभे राहिले, त्याच सुमारास या स्वारांच्या मागे किंवा डाव्या - उजव्या बाजूला दारूचे बाण उडवणारे लोक येऊन उभे राहिले असावेत. त्याशिवाय साधे धनुष्य - बाण घेतलेले लोक देखील मराठी स्वारांच्या मागे उभे राहिले असावेत.
विश्वासरावाचा मृत्यू :- मराठी सैन्यावर जेव्हा अफगाण घोडदळ चालून आले तेव्हा भाऊ व विश्वासराव नेमके कुठे होते ? कैफियत अथवा इतर बखरींमध्ये आलेली माहिती पाहिली असता असे लक्षात येते कि, शत्रूची फौज चढाईच्या हेतून पुढे सरकू लागली तेव्हा भाऊ आणि विश्वासराव हत्तीवरील अंबारीतून खाली उतरले व आपापल्या घोड्यांवर स्वार होऊन आपल्या आघाडीचे नेतृत्व करू लागले. एकाच वेळी मराठी सैन्याचे दोन्ही सरसेनापती ( एक नामधारी व एक प्रत्यक्ष ) अंबारीतून खाली उतरून घोड्यावर स्वार झाले हा उल्लेख निश्चितचं मनाला खटकतो. भाऊ अंबारीतून खाली उतरून घोड्यावर स्वार झाला, यामागील कारणपरंपरा लक्षात येते. परंतु विश्वासरावाचे वर्तन कुठेतरी खटकते. भाऊच्या कृतीचे समर्थन करताना असे म्हणता येते कि, सकाळच्या तुलनेने मराठी सैन्याचे सामर्थ्य काहीसे घटलेले असल्याने आपल्या फौजेचे मनोबल उंचावण्यासाठी त्याला हे कार्य करावे लागले. अर्थात, एक सेनापती या नात्याने प्रसंगाला अनुसरून त्याने कृती केली असेचं म्हणता येईल. पण विश्वासरावास त्याने आपल्या सोबत येण्याची आज्ञा केली किंवा तशी सूचना दिली असे म्हणता येत नाही. भाऊ ' पार्ट टाईम ' सेनापती असला तरी लढाईच्या कामी तो अगदीच अननुभवी असावा असे वाटत नाही. माझे असे स्पष्ट मत आहे कि, विश्वासराव हा स्वतःच्या मनाने काहीसा अविचाराने, उतावीळपणे अंबारीतून खाली उतरून घोड्यावर स्वार झाला. विश्वासरावाचे वय यावेळी जवळपास साडे अठरा वर्षाचे होते. हे जर लक्षात घेतले तर त्याच्या या आततायी वर्तनाचा किंवा उतावीळपणाचा उलगडा होतो. विश्वासरावाच्या या हालचालींची कल्पना भाऊला नव्हती. तो यावेळी तोफखान्याच्या आसपास उभा राहून, अफगाण लष्करासोबत लढणाऱ्या आपल्या सैनिकांना उत्तेजन देत होता. घोड्यावर स्वार झालेला विश्वासराव यावेळी बहुतेक भाऊच्या शेजारी किंवा आसपास येऊन उभा राहिला असावा. विश्वासराव मोर्च्यात येऊन उभा राहिल्याची बातमी भाऊला मिळाली असावी पण समोर चाललेल्या हातघाईच्या युद्धामुळे त्याला बहुतेक, विश्वासरावाकडे लक्ष देण्यास किंवा त्याची मागे रवानगी करण्यास वेळ मिळाला नसावा.
शहावलीच्या आदेशानुसार दुपारी तीनच्या सुमारास अफगाणी तोफा थंडावल्या व गिलच्यांची पथके मोर्च्यातून बाहेर पडली. फळी धरून जेव्हा अफगाण सैन्य मराठी लष्कराच्या जवळ आले त्यावेळी त्यांच्यावर दारूच्या बाणांचा, साध्या बाणांचा मारा झाला. परिणामी शेकडो अफगाण मातीत मिसळले तरी देखील इतर गिलचे नेटाने पुढे सरकून आले. मराठी घोडदळ पथके तोफखान्याच्या पुढे उभी राहिलेली असल्याने, गोलाजवळचं त्यांचा व गिलच्यांचा सामना भिडला. दोन्ही बाजूंनी विलक्षण कापाकापी सुरु झाली. या वेळी हुजुरातीच्या डाव्या हाताला उभे असलेल्या समशेर, पवार. गायकवाड, विंचूरकर, माणकेश्वर या सरदारांनी प्रसंगावर नजर देऊन भाऊच्या मदतीला जायचा निर्णय घेतला. अर्थात, हा निर्णय सर्वानुमते किंवा विचारपूर्वक घेतलाचं असेल असे म्हणणे चुकीचे हरेल. कदाचित, भावनेच्या भरात / प्रसंगाचे अवधान सुटून हे सर्वच्या सर्व सरदार हुजुरातीच्या वतीने गिलच्यांशी झगडू लागले. परिणामी, हुजुरातीचा प्रतिकार तिखट होऊ लागला तर त्या तुलनेने, त्याच वेळी गारद्यांची पथके पुरेशी कुमक न मिळाल्याने रोहिल्यांसमोर माघार घेऊ लागली होती. गारदी पथकांच्या उजव्या अंगाला असलेली मराठी सरदारांची पथके अफगाण सैन्याशी झुंजण्यासाठी पुढे निघून गेल्यामुळे, गोलातील त्यांची जागा तशी रिकामीचं होती. त्या जागी जाऊन, हुजुरातीशी संधान साधून आपला बचाव करण्याच्या हेतुस्तव लढता - लढता इब्राहिमचे गारदी उजवीकडे सरकू लागले. वास्तविक, गारद्यांच्या पाठीमागे अनेक दुय्यम सरदारांची पथके हजर होती. त्या पथकांनी गारद्यांना मदत केलीचं नाही असे म्हणता येणार नाही, परंतु यावेळी शत्रूचा जोर अधिक असल्याने मराठ्यांचे फारसे काही साधले नाही असेचं म्हणावे लागेल.
हुजुरातीचे स्वार ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी हातघाईचे झुंज चालले होते. दोन्ही बाजूचे शेकडो सैनिक मातीत मिसळले जात होते, पण कोणी मागे हटत नव्हते. एकप्रकारे निर्णायक लढाईचं तिथे चालू होती. हुजुरातीची फळी फोडून मराठ्यांच्या मोर्च्यात शिरण्यासाठी गिलचे अधीर झाले होते तर फळी एकसंध राखण्यासाठी मराठी लोकं जीवावर उदार झाली होती. गिलच्यांनी जंबूरक्यांच्या व बंदूकधारी पायदळाच्या सहाय्याने निकराने मराठ्यांवर हल्ले चढवले. त्यांच्या तिरंदाज पथकांनी देखील बाणांचा मराठी सैन्यावर बाणांचा पाऊस पाडला. परंतु, मराठी फौज आपल्या मोर्च्याच्या आधाराने लढत होती. त्यांचेही धनुर्धारी पथके, दारूचे बाण उडविणारे लोक गिलच्यांवर बाणांचा वर्षाव करत होते. जवळपास अर्धा - पाऊण तास अशी लढाई होऊन अखेर गिलच्यांचा काटा ढिला झाला. त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. हलक्या झुंजी देत त्यांनी काढता पाय घेण्यास आरंभ केला. अतिशय अटीतटीच्या या लढ्यात मराठ्यांचा विजय झाला खरा, पण या विजयाचा निर्भेळ आनंद कोणाला झाला नाही. याचे कारण म्हणजे, गिलच्यांचे आक्रमण परतवत असताना विश्वासरावाचा मृत्यू झाला होता !
विश्वासरावाचा मृत्यू कसा झाला याविषयी निश्चित काही सांगणे अवघड आहे परंतु त्याचा मृत्यू दुपारी सव्वा तीन ते पावणेचारच्या दरम्यान झाला हे उघड आहे. विश्वासरावाचा मृत्यू कुठे व कसा झाला याविषयी मात्र निश्चित माहिती उपलब्ध नाही आणि पुढे होईलचं असेही ठामपणे सांगता येत नाही. विश्वासराव हुजुरातीच्या सैन्याला मार्गदर्शन करत तोफखान्यात उभा होता. तो स्वतः आघाडीवर लढत असल्याचा उल्लेख केला जातो ते साफ चूक आहे. तेव्हा आता प्रश्न असा निर्माण होतो कि, मुख्य आघाडीच्या मागे उभ्या असलेल्या विश्वासरावाचा मृत्यू नेमका कसा झाला असावा ? कैफियत, भाऊ बखर, पाणिपतची बखर, नाना फडणीसचे आत्मवृत्त, मराठी सरदारांची लढाईनंतरची पत्रे पाहिली असता असे लक्षात येते कि, विश्वासरावास गोळी लागून तो ठार झाला. आता हि गोळी बंदूक, जेजाला किंवा जंबूरका यांपैकी कशातून चालवली गेली याची स्पष्टता होत नाही. होळकराच्या थैलीमध्ये, विश्वासराव बाण लागल्यामुळे मरण पावला असा उल्लेख आहे पण, होळकराची थैली अजिबात विश्वसनीय नसल्याचे माझे स्पष्ट मत आहे.
विरुद्ध पक्षातील नुरुद्दीनच्या माहितीप्रमाणे,विश्वासराव हत्तीवरील अंबारीत बसलेला असताना त्यास गोळी लागून तो मरण पावला. काशीराजने आपल्या बखरीत, विश्वासरावाच्या मृतदेहाचे जे वर्णन दिलेले आहे त्यानुसार, विश्वासरावाच्या मानेवर दोन्ही कानांच्यामध्ये तलवारीची अर्ध्या बोटाएवढी खोल जखम होती. त्याशिवाय त्याच्या भुवईजवळ बाणाची जखम असून तेथील बोटभर कातडे निघाले होते. शाम्लूच्या वृतांतानुसार जंबूरकची गोळी कपाळावर लागल्यामुळे विश्वासराव मरण पावला. सारांश,' हत्ती आणि सात आंधळे ' या कथेप्रमाणे शत्रूपक्षीय लेखकांनी विश्वासरावाच्या मृत्यूचे प्रकरण रंगवलेले आहे.
माझ्या मते, मराठी स्वारांची फळी फोडून आता शिरण्याचा प्रयत्न अफगाण सैनिक करत होते तर फळी अभंग राखण्यासाठी मराठी स्वार धडपडत होते. अशा स्थितीत, कधीतरी अफगाणांच्या प्रयत्नांना यश मिळून मराठी स्वारांची फळी फोडण्यास अल्पसे यश मिळून काही गिलचे आत घुसले असावेत. कदाचित विश्वासराव ज्या ठिकाणी घोड्यावर स्वार होऊन सैन्याचे नेतृत्व करत होता, त्याच जागी मराठी स्वारांची फळी फुटली असावी. आत आलेल्या गिलच्यांच्या टोळीचा व विश्वासरावाच्या रक्षक पथकांचा त्या ठिकाणीचं सामना भिडला असावा. समोरच्या मराठी पथकामध्ये पेशव्याचा मुलगा आहे हे गिलच्यांना माहिती असण्याचे काहीचं कारण नव्हते. विश्वासरावाच्या अंगावरील भारी पोषाख - सामानामुळे हा मराठ्यांचा कोणीतरी बडा सरदार किंवा सरदाराचा मुलगा असावा असे त्यांना वाटले असावे. त्यामुळेचं विश्वासरावाच्या रक्षकांसह लढत असताना एखाद - दुसऱ्या अफगाण स्वाराने / सैनिकाने आपल्या जवळील बंदुकीने मराठ्यांच्या या कोवळ्या सेनापतीचा अचूक वेध घेतला. विश्वासरावावर चालून गेलेली अफगाण टोळी कापून काढण्यात आली असावी किंवा त्यातील काही लोक जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाले असावेत. आपण मराठ्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एकाला ठार करून आलो आहोत याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. फारतर एखादा बडा सरदार आपण मारला आहे अशीच त्यांची भावना असावी. गोळी लागल्यावर विश्वासराव जागीच मेला कि, जखमी अवस्थेत त्याला भाऊकडे नेण्यात आले अथवा तो घायाळ झाल्याची बातमी मिळाल्यावर भाऊ त्याच्या भेटीस तातडीने आला याविषयी निश्चित असे काही सांगणे आता शक्य नाही. परंतु, विश्वासरावाच्या मृत्यूने भाऊ बराचसा विचलित झाला असे निश्चित ! विश्वासरावाचा मृत्यू बहुतेक त्याच्या मनाला चटका लावून गेला असावा असे पुढील घटनाक्रमावरून दिसून येते. भाऊने विश्वासरावाचा मृतदेह अंबारीत ठेवण्याची आज्ञा दिली व सेनापतीचे कर्तव्य बजावण्यासाठी तो परत एकदा आघाडीवर रवाना झाला. यावेळी त्याने समशेर बहाद्दरला आपल्या जवळ मदतीसाठी बोलावले असावे किंवा विश्वासरावाच्या मृत्यूची बातमी समजल्यावर समशेर स्वतःहून भाऊकडे आला असावा. समशेर व भाऊने आपल्या कोसळणाऱ्या आघाडीला सावरले. विश्वासराव मरण पावल्याची बातमी एव्हाना मराठी लष्करांत पसरली होती. परंतु, अजून भाऊसाहेब स्वतः जातीने सैन्यात हजर असल्याने, या बातमीचा मराठी सैन्यावर फारसा विपरीत परिणाम झाला नाही.
वस्तुतः, विश्वासराव मेल्याची बातमी समजतांच मराठी सैन्याचा धीर खचला असे सर्रासपणे सांगितले जाते पण ते साफ खोटे आहे. विश्वासरावाच्या मृत्यूने फारतर हुजुरातीची पथके हादरली, बुणगे घाबरले असे म्हणता येईल. पण सर्वचं मराठी सैन्य विश्वासरावाच्या मृत्यूने घाबरले किंवा मराठी लष्कराचा धीर खचला असे म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे, मराठी लष्कराची विशिष्ट रचना ! त्यावेळी लष्करातील प्रत्येक सैनिक आपापल्या पथकाशी व पथक प्रमुखाशी बांधील असे. लष्कराच्या मुख्य सेनापतीशी किंवा सैन्यातील इतर सरदारांशी त्याचे काहीही देणे - घेणे नसे. मराठी लष्कराची किंवा तत्कालीन एतद्देशीय संस्थानांची सैन्य व्यवस्था कित्येक इतिहासकारांनी तपशीलवारपणे दिलेली आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक चर्चा या ठिकाणी करत नाही व त्यासाठी हे स्थळ योग्य देखील नाही. पण एक गोष्ट उघड आहे कि, विश्वासरावाचा मृत्यू झाल्यामुळे मराठी सैन्याचा धीर खचला हे पूर्णतः असत्य आहे ! विश्वासराव हा हुजुरातीचा नामधारी का होईना पण प्रमुख सरदार असल्याने फारतर हुजुरातीच्या सैन्याचा धीर खचला, अशा आशयाच्या विधानावर एकवेळ भरवसा ठेवता येऊ शकतो पण विश्वासरावाच्या मृत्यूमुळे सबंध मराठी सैन्याने कच खाल्ली हे विधान चुकीचे आहे. उलट, विश्वासराव मेला आहे हे समजूनसुद्धा मराठी पथके रणभूमीवरून रेसभरसुद्धा मागे हटली नाहीत ! कदाचित यावर असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो कि, भाऊ रणात हजर असल्यामुळे विश्वासराव मेला तरी मराठी सैन्य लढले. पण अशा तऱ्हेच्या युक्तिवादात काही दम नाही. कारण ; मग भाऊ जिवंत असतानाचं मराठी लष्कर पळत सुटले होते, त्याचे कारण काय असावे ? सारांश, वस्तुस्थिती लक्षात न घेता भावनिक व पराभूतवृत्तीने लेखन करत आपल्या इतिहासकारांनी बराच गोंधळ घातला आहे !
विश्वासरावाचा देह हत्तीवरील अंबारीत ठेवण्याची आज्ञा देऊन भाऊने समशेरबहाद्दरच्या सोबतीने गिलच्यांशी लढणाऱ्या आपल्या फौजेचे नेतृत्व केले. मराठी लष्कराच्या हिंमतीची खरोखर दाद दिली पाहिजे कि, त्यांनी गिलच्यांचा हा हल्ला निकराने परतवून लावला. मराठी सैनिकांच्या पराक्रमापुढे अफगाणी लोक हतबल होऊन, पावणे चार - चारच्या सुमारास हळूहळू मागे हटू लागले. शत्रू माघार घेत आहे हे पाहून मराठी सैनिकांनी कदाचित सुटकेचा निःश्वास टाकला असेल.
शिंदे - होळकर युद्धांत उतरले :- अब्दालीच्या आज्ञेनुसार दुपारी दीड - पावणेदोनच्या सुमारास डाव्या आघाडीच्या मागे उभा असलेला नसरूल्लाखान नूरजाई हा शहापसंदखान व मुल्ला सरदार रोहिला यांच्यासह होळकरांच्या दिशेला निघाला. हे सरदार होळकरांच्या दिशेला, म्हणजे ईशान्येला वळल्यामुळे दिल्लीकडे जाणार राजमार्ग दुपारी दोनच्या आसपास रिकामा होऊ लागला. साधारणतः अडीचच्या सुमारास शहापसंदखान व इतर अफगाण सरदार होळकरांच्या उजव्या कुशीवर एक - सव्वा एक किलोमीटर अंतरावर येऊन ठेपले. जवळपास याच सुमारास नजीब, जहानखान व सुजा यांच्या फौजा शिंदे - होळकरांच्या सैन्यासमोर एक - सव्वा एक किलोमीटर्स अंतरावर येऊन ठेपल्या. शत्रूची सर्व मिळून फौज पंचवीस ते तीस हजाराच्या घरात होती तर शिंदे - होळकरांची फौज सर्व मिळून सोळा - सतरा हजार असावी. होळकर व नजीब यांच्यात बरीच जवळीक असल्याचे सांगितले जाते. परंतु, प्रसंग पडला असता हे दोघे आपापली मैत्री बाजूला ठेऊन एकमेकांविरुद्ध कित्येकदा लढण्यासाठी उभे राहिले होते हे विसरले जाते ! पानिपतच्या युद्धांत होळकरांची फौज लढाईत सहभागी झाली नाही. त्यांनी न लढताच पळ काढला. होळकर व नजीबची मैत्री असल्याने नजीबाने होळकरास सुखरूपपणे जाऊ दिले. होळकरासमोर नजीबच्या सैन्याचे मोर्चे असल्यामुळे लढाई न करता होळकर पळून गेला अशा आशयाची कित्येक विधाने आधुनिक इतिहासकारांनी पानिपतच्या लढाईसंदर्भात लेखन करताना, मल्हाररावाविषयी लिहिलेली आहेत. अर्थात, होळकराविषयी असलेला हा गैरसमज केवळ आजचा नसून त्यावेळी देखील तत्कालीन लोकांच्या मनात होता हे फारसी बखरींवरून लक्षात येते. अर्थात यात तथ्य कितपत असावे ? माझ्या मते यात अजिबात तथ्य नाही. होळकराने पानिपतच्या लढाईतून माघार घेतली, नाही असे नाही, पण ती कधी घेतली ? तत्पूर्वी तो लढला कि नाही ? याविषयी कोणी फारशी चर्चा केल्याचे दिसून येत नाही.
पानिपतच्या युद्धांत होळकराने सक्रीय सहभाग घेतला होता असे माझे ठाम मत आहे. मुळात, दुपारी सव्वा तीन ते पावणेचारच्या दरम्यान विश्वासरावाचा मृत्यू होईपर्यंत पानिपतच्या लढाईवर मराठ्यांची बऱ्यापैकी पकड होती. तोपर्यंत अफगाण सैन्याला त्यांनी मान वर करून दिली नव्हती. याचा अर्थ स्पष्ट आहे कि, पावणेचार पर्यंत तरी होळकर पानिपतच्या युद्धांत हजर होता. आता त्याने लढाईमध्ये सक्रीय सहभाग घेतला कि नाही हा प्रश्न उपस्थित होतो. माझे स्पष्ट मत आहे कि, होळकाराने पानिपतच्या लढाईत सक्रीय सहभाग घेतला होता. तो जर लढला नसता तर साडेतीन - चारच्या दरम्यानचं अब्दालीच्या डाव्या आघाडीवरील पथके हुजुरातीच्या उजव्या कुशीवर येऊन आदळली असती ! परंतु, या मुद्द्याकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. एखाद - दुसऱ्या लेखकाचा किंवा संशोधकाचा हा दृष्टीदोष असू शकतो असे म्हणता येईल पण सर्वच्या सर्व इतिहासकार या बाबतीत इतके आंधळे असावेत याचे मला आश्चर्य वाटते. समजा, हे लोक म्हणतात त्यानुसार नजीबने होळकरास पळून जाण्यासाठी वाट दिली असे मान्य केले तर मग प्रश्न असा उद्भवतो कि, नजीबच्या डाव्या बाजूला असलेल्या शहापसंदखान, मुल्ला सरदार रोहिला या दोघांनी होळकरास सहजासहजी कसे जाऊ दिले ? होळकर व नजीब यांच्यात वैयक्तिकरित्या एकमेकांच्या बचावाचा करार झाला असावा. नजीब मराठ्यांच्या हाती लागला किंवा होळकर अब्दालीच्या हाती लागला तर एकमेकांचे प्राणरक्षण करण्याचा त्यांच्या व्यक्तिगत करार झाला असावा. यात अशक्यप्राय असे काही नाही. पण याच अर्थ असा होत नाही कि, त्यांनी एकमेकांशी न लढण्याचा निर्धार केला होता. सारांश, व्यक्तिगतरित्या एकमेकांचा बचाव करण्याचा करार जरी नजीब व मल्हारराव यांच्यात झाला असला तरी एकमेकांशी न लढण्याचा त्यांनी करार केला नव्हता. पानिपतच्या लढाईमध्ये आणि पानिपत घडून गेल्यावर देखील कित्येकदा होळकर व नजीब एकमेकांच्या विरोधात लढल्याचे इतिहासकारांनी नमूद केलेले आहे. हे लक्षात घेता, पानिपतावर होळकर - नजीब एकमेकांविरुद्ध अजिबात लढले नाहीत असे म्हणणे एकदम चुकीचे आहे, होळकरावर अन्याय करणारे आहे !
दुपारी अडीचच्या सुमारास शत्रूचे अफाट सैन्य शिंदे - होळकरांच्या मोर्च्यासमोर पसरले होते. त्यापैकी सुजा व जहानखानाची फौज शिंद्यांच्या समोर उभी होती तर नजीबचे सैन्य होळकरांच्या मोर्च्यासमोर पसरले होते. काही वेळापूर्वी नजीबच्या लष्कराचा रोख होळकरांच्या उजव्या बगलेवर होता पण आता नजीबच्या डाव्या हाताला अफगाण पथके येऊन उभी राहिल्यामुळे स्वाभाविकचं नजीबचे सैन्य उजवीकडे सरकून होळकरांच्या समोर उभे राहिले. शहापसंद, मुल्ला सरदार रोहिला, नसरूल्लाखान हे आता होळकरांच्या उजव्या बाजूला येऊन ठाकले. दुपारी अडीचनंतर शिंदे - होळकरांसमोरील शत्रू सैन्य फळी धरून हळूहळू पुढे सरकू लागले. दरम्यान शिंदे - होळकरांची फौज देखील मोर्च्यातून बाहेर पडून फरा धरून उभी राहू लागली होती.
नजीबच्या सैन्यात बंदुकधारी पायदळ मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, त्यांचा त्याने वापर केला नसल्याचे पानिपत लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून दिसून येते. बहुतेक सुजा व अफगाण सरदारांनी घोडदळाच्या मदतीने मराठ्यांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे, सुरवातीला तरी नजीबला, आपल्या बंदुकधारी पायदळ सैनिकांना लढाईत उतरवता आले नाही. साधारण पावणे तीन - तीनच्या सुमारास शिंदे - होळकरांच्या बाजूला युद्ध पेटले. नजीबचे बंदुकधारी पायदळ लढाईत सहभागी नसल्याचा पुरेपूर फायदा शिंदे - होळकरांच्या अनुभवी सैन्याने उचलला. साडेतीन - पावणेचार पर्यंत तरी त्यांनी शत्रू सैन्याला मान वर करू दिली नाही.
मराठी सैन्याचा पळ सुटला :- दुपारी दोन - तीनच्या दरम्यान अब्दालीच्या डाव्या - उजव्या बाजूची आघाडी - पिछाडीची पथके मराठी सैन्यावर कोसळून पडली होती. यावेळी शेजवलकर किंवा सरकार म्हणतात त्यानुसार अब्दालीच्या सैन्याचा आकार चंद्रकोरीसारखा बनला होता. याचा अर्थ उघड आहे कि, हि रचना अपघाताने बनली होती. पण मला एक समजत नाही, स्वतःला हिंदू म्हणविणाऱ्या इतिहासकारांना अब्दालीच्या चंद्रकोरीचे इतके आकर्षण का ? खुद्द अब्दाली देखील आपल्या पत्रात अशा लष्करी रचनेचा उल्लेख करत नाही मग या इतिहास संशोधकांनी हा भलताच शोध कुठून लावला ?
दुपारी दोन - अडीचच्या सुमारास अब्दालीच्या आज्ञेनुसार त्याच्या डाव्या - उजव्या आघाडीवरील पथके मराठी सैन्यावर चालून गेली. बहुतेक याच सुमारास खासा अब्दाली आपल्या वजीराच्या मागे येऊन एक - दीड किलोमीटर अंतरावर येऊन उभा राहिला असावा असे माझे मत आहे. कारण, मराठी सैन्याचा यमुनेकडे जायचा हेतू जरी त्याच्या लक्षात आला नसला तरी मराठ्यांचा मुख्य सेनापती वजीराच्या सैन्यासमोर उभा असल्याची त्याला बातमी मिळाली होती. लढाईचा जो काही निकाल लागायचा आहे तो याच ठिकाणी लागेल अशी अब्दालीची खात्री असावी.
दुपारी तीनच्या सुमारास अफगाण - रोहिले गारद्यांवर चढाई करून गेले होते. शत्रूच्या अफाट सैन्यसंख्येसमोर इब्राहिमचे मुठभर गारदी फार काळ तग धरू शकत नव्हते. प्रसंग पाहून गारदी पथके हुजुरातीच्या दिशेने, उजवीकडे सरकू लागली. हुजुरातीच्या व इतर सरदारांच्या मदतीने आपला बचाव करण्याचा त्यांचा विचार असावा. परंतु, याबाबतीत त्यांना फारसे यश लाभले नाही. साडेतीन - पावणेचारच्या आसपास त्यांचा संपूर्ण निकाल लागला. बव्हंशी गारदी मारले गेले. फार थोडे जखमी अवस्थेत निसटून जाण्यात यशस्वी झाले असावेत. परंतु अशांची संख्या पाचशेच्या आतचं असावी. गारद्यांचा प्रमुख सरदार इब्राहिमखान यास त्याच्या मुलासह रोहिल्यांनी आपल्या ताब्यात घेतले. सोबतच्या अफगाण सरदारांना इब्राहिम कैद झाल्याची बातमी लागू न देता इनायतखान व दुंदेखान यांनी त्याला त्वरीत आपल्या गोटात पाठवण्याची व्यवस्था केली.
गारद्यांची विल्हेवाट लावून रोहिले - गिलचे तसेच पुढे सरकून विंचूरकर, पवार, गायकवाड, माणकेश्वर या सरदारांवर तुटून पडले. वास्तविक याच वेळी शहावलीच्या फौजेला पराभूत करून हे सरदार आपापल्या मोर्च्यात येऊन परतले होते किंवा येत होते. अशा स्थितीत त्यांना अकल्पितपणे शत्रूच्या या नव्या हल्ल्याला तोंड द्यावे लागले. गोलाच्या आत शत्रू चालून आल्याने सरदार काहीसे गोंधळले असले तरी लगेच स्वतःला व सैन्याला सावरून त्यांनी अफगाण - रोहिल्यांचा प्रतिकार करण्यास आरंभ केला. मराठी सैन्याच्या डाव्या बाजूची हि लढाई निर्णायक ठरली. या ठिकाणी, या प्रसंगी घटना अशा काही विलक्षण वेगाने घडून आल्या कि त्याची संगती लावणे तत्कालीन लोकांना जमले नाही. तेव्हा, तुटपुंज्या पुराव्यांच्या आधारावर आत्ताच्या काळी त्या गोंधळाचे तर्कसंगत विश्लेषण करणे किती अवघड आहे याची वाचकांनी कल्पना करावी !
मराठी सैन्याच्या डाव्या बगलेवरील गारदी पथके नष्ट झाल्याने ती बाजू साफ उधवस्त होऊन गेली. तिकडच्या बाजूने गिलचे - रोहिले थेट मराठी लष्कराच्या गोलात, बुणग्यांमध्ये घुसले. परिणामी त्या ठिकाणी लोकांची मोठी घबराट उडाली. कारण, शत्रूच्या लोकांनी अबालवृद्ध वा स्त्री- पुरुष अशा भेद न करता थेट कापाकापीस आरंभ केल्याने लोकांचा गोंधळ उडणे, घबराट माजणे स्वाभाविक असेच होते. याच वेळी एक विलक्षण घटना घडून आली. ज्या ठिकाणी उपरोक्त मराठी सरदार रोहिला - अफगाण लष्करासोबत झुंजत होते, त्या ठिकाणच्या जवळपास सरदार विंचूरकरांचे बुणगे उभे होते. शत्रुसैन्य गोलात आल्याचे पाहून त्यांच्यात बरीच खळबळ माजली होती. त्यात एका अनिष्ट घटनेची भर पडली. कुंजपुऱ्याच्या लढाईनंतर शरण आलेले दोन - तीन हजार रोहिले - अफगाण विंचूरकरांच्या सेवेत दाखल झाले होते. या लोकांना त्यांनी बहुतेक मुख्य लष्करात सामील न करता इतर कामांसाठी आपल्या सैन्यात घेतले होते. पानिपत सोडून जेव्हा यमुनेकडे जायचा बेत ठरला त्यावेळी प्रसंगी आपणांस लढाई देत मार्ग कापावा लागेल याची विंचूरकरास कल्पना होती. यदाकदाचित प्रसंग पडल्यास उभय सैन्याची सरमिसळ झाली तर आपल्या सैन्यातील रोहिले - अफगाण ओळखून यावेत यासाठी त्यांना भगव्या रंगाची फडकी डोक्याभोवती गुंडाळण्यास / बांधण्यास दिली होती. पानिपत युद्धाच्या वेळी, गारद्यांना मारून ज्यावेळी रोहिले - गिलचे मराठी सैन्याच्या गोलात घुसले, त्यावेळी आपल्या भाईबंदांना पाहून उत्स्फूर्तपणे किंवा कदाचित पूर्वसंकेतानुसार विंचूरकरांच्या पथकातील रोहिले - अफगाण आपल्या डोक्याभोवती गुंडाळलेली फडकी काढून बुणग्यांना मारू लागले, लुटू लागले. त्याशिवाय मराठे पराभूत झाल्याची व अब्दाली जिंकल्याची घोषणा देखील ते तोंडाने करू लागले. आधीच, शत्रू गोलात शिरल्याने बुणग्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात या मोहरमच्या वाघांची भर पडली ! मराठी गोलाच्या डावीकडील बुणग्यांमधील घबराटीचा संसर्ग लवकरचं सबंध गोलातील बुणग्यांमध्ये पसरला व घाबरलेली लोकं गोलाच्या पश्चिमेकडे म्हणजे पानिपतच्या दिशेने पळू लागली. काहीजण उत्तर दिशेला पंजाब - कुरुक्षेत्राच्या रोखाने जाऊ लागली. परंतु बहुसंख्य लोकांचा भर पश्चिमेला जाण्यावर होता. कारण, पूर्व बाजूची गारद्यांची पथके नष्ट झाल्याने तिकडे रोहिल्यांच्या - गिलच्यांच्या टोळ्या फिरू लागल्या होत्या. लष्करी - बिनलष्करी लोकांना ते सर्रास कापून काढू लागले होते. दक्षिणेकडे जायचे तर तिकडे परत एकदा हुजुरातीचा व अफगाण लष्कराचा सामना भिडला होता. अशा स्थितीत, थेट पश्चिमेकडे आल्या पावली पानिपतास मागे जाणे श्रेयस्कर, असा कित्येकांनी विचार केला. ज्यांना पुढील परिणामांची कल्पना आली होती ते मात्र उत्तरेकडे जाऊ लागले. मराठ्यांच्या लष्करी गोलाच्या पलीकडील, म्हणजे उत्तरेकडील बाजूला असलेल्या सैन्य तुकड्यांवर अजून शत्रूचा आघात झाला नव्हता. त्या बिचाऱ्यांना आघाडीवरील घडामोडींची तितकीशी माहिती देखील नव्हती. अशा स्थितीत, जेव्हा बुणग्यांचे जथे धावत - पळत येऊन या सैनिकांवर आदळले तेव्हा हि लष्करी पथके देखील गडबडली. पळणाऱ्या लोकांनी पराभवाची व गिलच्यांच्या पाठलागाची बातमी दिली. तेव्हा, या बाजूला असलेली लष्करी पथके देखील गोल सोडून पानिपत, पंजाब किंवा यमुनेच्या दिशेने पळत सुटली. या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो व तो म्हणजे, निव्वळ अफवांवर भरवंसा ठेऊन लढाई सोडून पळून जाण्याइतके मराठी सैनिक अननुभवी किंवा भोळसट होते का ? वस्तुतः गर्दीचे मानसशास्त्र हे काही औरचं असते. मनुष्य कितीही विद्वान, पंडित वगैरे असला तर तो समाजाचा / समुदायाचा एक भाग असतो. काही वर्षांमागे ' गणपती दूध पितो ' अशा आशयाची अफवा उठली होती, ते जरा आठवून पाहा. गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी वरिष्ठ - कनिष्ठ थरांतील माणसे, ठिकठीकाणच्या गणपतीच्या मंदिरांसमोर रांगा लावून उभी होती. आता हि सर्व माणसे अडाणी किंवा भोळसट होती का ? अर्थात, नाही ! परंतु समुदायाचे / गर्दीचे मानसशास्त्रचं असे आहे कि, मनुष्य वाहवत जातो. त्यामुळे, पानिपतसारख्या प्रसंगी, लढाईची धामधूम माजली असता जर बुणगे पळत सुटले आहेत तर आपला पराभव झाला आहे असे समजून, गोलाच्या उत्तरेस उभी असलेली लष्करी पथके पळून गेल्यास त्यात नवल ते काय ? वस्तुतः, आघाडीवर चाललेल्या लढाईविषयी, गोलाच्या उत्तरेस उभ्या असलेल्या लष्करी पथकांना फारशी माहिती नव्हती. त्यावेळची दळण - वळण साधनांची मर्यादा लक्षात घेता यात अशक्य असे काही दिसत नाही. गोलाच्या मध्यभागी असलेले बुणगे ज्याअर्थी पळत सुटले आहेत त्याअर्थी आपला पराभव झाला आहे यावर त्यांचा विश्वास बसणे स्वाभाविक आहे. सकाळी नऊ - साडे नऊच्या सुमारास युद्धाला आरंभ झाला होता. लढाईला सुरवात होऊन साधारणतः सहा - सात तासांचा अवधी उलटून गेला होता. अशा परिस्थितीत, अचानक बुणगे पळत सुटले आहेत हे पाहतांच गोलाच्या पलीकडे म्हणजे उत्तरेकडे उभ्या असलेल्या मराठी सैनिकांचा, आपला खरोखरचं पराभव झाला असल्याच्या बातमीवर विश्वास बसला व ते पळून जाऊ लागले असावेत. कदाचित याच वेळी त्यांना बुणग्यांकडून विश्वासराव मारला गेल्याची बातमी समजली असावी. त्यामुळे देखील त्यांनी पळ काढला असावा. पण निव्वळ विश्वासरावाच्या मृत्यूची बातमी समजल्यामुळे ते पळाले असे म्हणणे चुकीचे आहे. बुणग्यांचा सुटलेला पळ, विश्वासरावाच्या मृत्यूची बातमी व बुणग्यांच्या पाठीवर आलेले गिलचे - रोहिले पाहून गोलाच्या उत्तरेकडील बाजूला उभी असलेली मराठ्यांची लष्करी पथके पळून जाऊ लागली असे म्हणता येईल.
चार - सव्वा चारच्या सुमारास आपल्याच पथकातील रोहिले - अफगाण, आपल्याच बुणग्यांना लुटत असल्याचे विंचूरकराच्या लक्षात आले असावे. परंतु याक्षणी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे त्यालाही फारसे काही करता आले नसावे. कारण, अजूनही त्याची फौज इतर मराठी सरदारांच्या साथीने मराठी सैन्याची डावी आघाडी सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. परंतु काही वेळांतचं मराठी सैन्याची फळी फुटली. बुणग्यांमध्ये उडालेल्या घबराटीचा परिणाम, शत्रूशी लढणाऱ्या मराठी सैन्यावर देखील झाला. विंचूरकर व इतर सरदारांची पथके हळूहळू माघार घेऊ लागली. बहुतेक याच वेळेस यशवंतराव पवार मारला जाऊन त्याची फौज साफ उधळली. पवारांची फौज पळून जात असल्याचे दृश्य नजरेस पडतांच, इतर सरदारांच्या फौजेची हिंमत खचली. विपरीत प्रसंग पाहून विंचूरकर, गायकवाड व माणकेश्वर यांनी लढाई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. या क्षणी माघार घेणे हेच श्रेयस्कर असे त्यांचे मत बनले. त्यानुसार गोलाच्या मधून हे सरदार आपापल्या निवडक लोकांसह पानिपतच्या दिशेने सटकले. या सरदारांनी अंदाजे साडे चारच्या आसपास डावी बाजू सोडली असावी. गोलाच्या डाव्या बाजूचे सरदार निघून गेल्यावर मराठी लष्कराची गळती सुरु झाली. या सरदारांपासून प्रेरणा घेऊन भाऊच्या खास वर्तुळातील नाना पुरंदरे लढाई सोडून निघून गेला. नाना पुरंदरे साधारण पावणेपाचच्या आसपास होळकरांच्या मोर्च्याजवळ पोहोचला. यावेळी मल्हारराव होळकर लढाई सोडून निघाला होता किंवा निघण्याच्या तयारीत होता. नाना पुरंदरे निघून गेल्यावर काही मिनिटांनी नाना फडणीसने देखील आपल्या घोड्याचे तोंड पानिपतकडे वळवले.
विश्वासरावाचा मृत्यू झाल्याची बातमी चारच्या सुमारास शिंदे - होळकरांना मिळाली. परंतु, या बातमीमुळे त्यांच्या सैन्यावर किंवा नेतृत्वाच्या मनावर कसलाही विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. पण लवकरचं पुढे, मराठी बुणग्यांचा पळ सुटला. त्यातील बव्हंशी लोक शिंदे - होळकरांच्या लष्कराच्या मागच्या बाजूने पानिपतकडे पळत सुटले. अर्थात, पळणारी माणसे निव्वळ पळत नव्हती तर मराठी सैन्य हरले, विश्वासराव मेला व अब्दाली जिंकला अशा बातम्यांचा शक्य तितका कंठशोष करून प्रचार करत होती. याचा विपरीत परिणाम, होळकरांच्या मागे उभ्या असलेल्या मराठी पथकांवर झाला. त्यांनी काढता पाय घेण्यास आरंभ केला. पाठीमागची दुय्यम पथके सटकू लागतांच होळकरांची मुख्य फौज देखील बिथरू लागली असावी. किंवा असेही म्हणता येते कि, प्रसंगावर नजर देऊन मल्हाररावाने यावेळी लढाई सोडून जाण्याचा निर्णय घेतला असावा. चार - साडेचारच्या आसपास मल्हाररावाने पानिपतच्या दिशेने प्रस्थान केले. होळकराने पाठ फिरवतांच बरेचसे गिलचे त्याच्या पाठीवर गेले. मराठी सैन्य पळत सुटले आहे हे त्यांच्या लक्षात आल्याने लुटीच्या आशेने अनेकांचे लढाईकडे दुर्लक्ष झाले. तरीही अशांची संख्या फारशी नसावी. होळकरांची फौज निघून जाऊ लागल्याचे दिसतांच, शिंद्यांची पथके देखील माघार घेऊ लागली. त्यांचे मुख्य सरदार आपापल्या तुकड्यांसह पानिपतच्या दिशेने जाऊ लागले. मल्हाररावाची पाठ फिरली त्यावेळी किंवा शिंद्यांचे मुख्य सरदार पानिपतकडे सटकू लागले त्या सुमारास महादजी शिंदे पानिपतच्या दिशेने निघून गेला. जनकोजी उर्वरीत पथकांसह लढत - लढत भाऊकडे सरकू लागला. त्याच्या पाठोपाठ गिलचे, गोसावी, रोहिले येत होतेचं. अशा प्रकारे मराठ्यांची उजवी बगल देखील साफ निकालात निघाली.
मराठ्यांची डावी - उजवी आघाडी उध्वस्त करून मोकळे झालेले गिलचे, मोगल, गोसावी, रोहिले आता हुजुरातीच्या दोन्ही बाजूंवर येऊन आदळू लागले. वास्तविक यावेळी पानिपतच्या लढाईचा निकाल अब्दालीच्या बाजूने लागला होता. मराठ्यांचा साफ धुव्वा उडाला होता. त्यांची बव्हंशी फौज पळून गेली होती. मुख्य सरदार निघून गेले होते. अशा स्थितीत फक्त मराठ्यांचा मुख्य सेनापती, त्याचे काही सरदार आणि निवडक स्वार - सैनिक रणभूमीवर ठासून उभे राहिले होते. या क्षणी भाऊच्या मनात नेमके काय चालले असावे ? कैफियत सांगते त्यानुसार त्याने लढाईत आत्माहुती देण्याचा खरोखर निर्धार केला होता का ? माझ्या मते कैफियतीमधील वर्णन हे खोटे आहे, कपोलकल्पित आहे. कैफियतीचा लेखक जर नाना पुरंदरे आहे असे गृहीत धरले तर नाना पुरंदरे आपल्या पत्रात लिहितो त्यानुसार, होळकरासोबत तो लढाईतून निघून गेला होता. याचा अर्थ असा कि, कैफियतीमध्ये भाऊचा सोनजी भापकर किंवा मुकुंदजी शिंदे यांच्यासोबत घडलेला जो संवाद दिला आहे, तो पूर्णतः काल्पनिक आहे. जर समजा, कैफियतीचा लेखक नाना पुरंदरे नसून इतर कोणी असल्यास, ती व्यक्ती पानिपतच्या युद्धांत साधारणतः चार - साडेचार नंतर हजर राहू शकते का याचा वाचकांनीचं विचार करावा. ज्या रणधुमाळीत विंचूरकर, गायकवाड, होळकर इ. अनुभवी सरदारांना थांबणे शक्य झाले नाही, त्या बिकट प्रसंगी कैफियत लिहिणारा एखादा कारकुनी पेशाचा इसम कसा काय थांबला असावा ? सारांश, भाऊची कैफियत पानिपत युद्धाच्या अखेरच्या भागापुरती अजिबात विश्वसनीय नाही. साधे उदाहरण आहे. लोक पळत आहेत हे पाहून भाऊने जवळ उभ्या असलेल्या वाजंत्र्यांना वाद्ये वाजवण्यास सांगितली. वाद्ये वाजत आहेत त्याअर्थी आपला विजय झाला असे समजून पळणारे लोक मागे फिरतील अशी भाऊची अपेक्षा होती, असे कैफियत सांगते. या ठिकाणी विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्यांच्या कमरेला तलवारी आहेत, हाती भाला आहे असे सैनिक संध्याकाळी चार - साडेचार नंतर रणभूमीवरून पळून जात होते व त्यावेळी जवळपास निःशस्त्र अशी वाजंत्री पथके भाऊजवळ उभी राहून वाद्ये वाजवीत होते, हा उल्लेख एकूण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर विसंगत वाटत नाही का ? तात्पर्य, कैफियतीमधील वाजंत्र्यांचा उल्लेख संपूर्णतः काल्पनिक आहे. मग अखेरच्या पर्वात काय घडले असावे ?
पावणेचार - चारच्या सुमारास शहावलीची फौज मागे हटली. त्यानंतर काही मिनिटांनीचं मराठ्यांची डावी बगल निकालात निघून तिकडचे सरदार निघून जाऊ लागले. त्यामुळे, डाव्या बाजूचे अफगाण - रोहिले सरळ हुजुरातीला येऊन भिडले. यावेळी भाऊला रणभूमीवरून निघून जायची संधी होती पण त्यावेळी तो निघून गेला नाही हे निश्चित ! विश्वासरावाच्या अपघाती मृत्यूचा तर हा परिणाम नसावा ? या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे व तो म्हणजे, पानिपतपूर्वी कधीही अशा भयंकर संग्रामात भाग घेण्याची वेळ भाऊवर आलेली नव्हती ! याचा अर्थ असा होतो कि, अशा परिस्थितीला कशा प्रकारे तोंड द्यावे याचा त्याला अजिबात पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे, डाव्या बाजूचे सरदार उधळून गेल्यावर जेव्हा गिलचे - रोहिले हुजुरातीवर येऊन आदळले तेव्हा प्रसंग विपरीत बनलेला पाहून माघार घेण्याऐवजी तो डाव्या बाजूने चालून आलेल्या शत्रूशी लढण्यात गुंतला. त्याचा परिणाम असा झाला कि, अल्पावधीतचं शहावलीची उधळून गेलेली फौज परत एकदा बळ बांधून हुजुरातीवर चालून आली. याच वेळी उजव्या बाजूने सुजा, नजीब व इतर अफगाण सरदार देखील शिंद्यांची उरली सुरली फौज कापून काढत हुजुरातीवर तुटून पडले. यावेळी भाऊसोबत जनकोजी, समशेरबहाद्दर हे दोन बडे सरदार होते. त्याशिवाय काही हजार स्वार होते. यांच्यासह तो उत्तर दिशेला सटकू शकत होता. किंबहुना त्याचा तोच विचार असावा. परंतु, वेळ निघून गेल्यावर त्याला हा विचार सुचला होता. कारण ; इतका वेळ खुल्या असलेल्या उत्तर दिशेला अमीरबेग व बरकुरदारच्या स्वारांच्या टोळ्या फिरू लागल्या होत्या. मघापासून चाललेल्या घनघोर संघर्षात जखमी वा मृत मनुष्य - प्राण्यांचा बराच खच हुजुरातीच्या अवतीभोवती पडला होता. त्यामुळे शत्रूच्या स्वार - शिपायांना वेगाने पुढे सरकणे जमत नव्हते. अजूनही भाऊ सोबत असलेले मराठे पूर्णतः घेरले नव्हते. माझ्या मते, यावेळी भाऊने आपल्या उर्वरीत सैन्यासह व सरदारांसह शत्रूची फळी फोडून निसटून जायचा प्रयत्न करून पाहिला. याप्रसंगी झालेल्या चकमकीत व गोंधळात समशेरबहाद्दर जखमी अवस्थेत कसाबसा निसटून गेला. अंगावरील भारी पोशाख, अलंकारांमुळे जनकोजी शिंदे बरकुरदारच्या कचाट्यात सापडला. वास्तविक आता गिलच्यांना कत्तलीपेक्षा लुटीचे वेध अधिक लागले होते. अर्थात, या कामी त्यांचे सरदार देखील मागे नव्हते. मराठी सरदारांना जिवंत पकडण्यामागे त्यांचा मुख्य हेतू म्हणजे भरपूर खंडणी उकळून पैसे मिळवण्याचा होता. यासाठीचं जनकोजीला मारून टाकणे सहज शक्य असून देखील बरकुरदारने त्याला जिवंत कैद केले. इतर अफगाण - रोहिला सरदारांना या गोष्टीचा पत्ता लागू नये यासाठी त्याने त्वरीत जनकोजीला आपल्या तळावर रवाना केले. अर्थात, या ठिकाणी हे नमूद केले पाहिजे कि, कैद झालेला सरदार जनकोजी शिंदे आहे, हे बरकुरदारला नंतर समजले असावे. कारण, जनकोजीची ओळख त्या विशिष्ट प्रसंगी बरकुरदारलाचं काय पण इतर अफगाण - रोहिला सरदारांनादेखील पटणे शक्यचं नव्हते. जनकोजीसोबत शिंद्यांचे निशाण वगैरे असण्याची शक्यता फारचं कमी आहे. अंगावरील अलंकार व कदाचित इतरांच्यापेक्षा वेगळा पोशाख यांमुळे तो मराठ्यांचा बडा सरदार आहे एवढीच त्याची ओळख शत्रूपक्षाच्या सरदारांना निदान, त्या क्षणी तरी पटणे शक्य आहे ! शत्रूसैन्याची फळी फोडून जायच्या प्रयत्नात समशेर जखमी अवस्थेत सटकून जाण्यात यशस्वी झाला तर जनकोजी शत्रूहाती जिवंत सापडला व मराठ्यांचा सेनापती सदाशिवरावभाऊ त्या प्रसंगी मारला गेला !!!

प्रियाली

लेख बराच मोठा असल्याने या ठिकाणी पोस्ट करणे तसे अवघड आहे. त्याशिवाय मी पुढील प्रकरणांच्या लेखनात व्यस्त आहे , तेव्हा तुम्ही या ठिकाणी तो लेख पोस्ट करणार असाल तर माझी काही हरकत नाही.

संजय, वेगळी चर्चा/ लेख टाका.

इथे प्रतिसादात तुमचा लेख देऊ नका. स्वतंत्र चर्चा/ लेख म्हणून टाका. लेख तुमचा असल्याने मी तो पोस्ट करू नये. तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट तर करावे लागेल. करून बघा!

 
^ वर