आंतरिक शक्तीचा शोध-२

प्रतिबंधक हृदयोपचारशाखा

तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा "अधिक्षेपक हृदयोपचार (इन्व्हेझिव्ह कार्डिओलॉजी)" शाखा म्हणून ओळखल्या जाते. वर्धित रक्तदाबावर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाब रक्तदाबशामक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यास रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास कार्डिओग्राम, ताणचाचणी, आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवितात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यावर हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

ह्या शाखेच्या मान्यतेनुसार हृदयविकार प्रगतीशील असतो. तो वयानुसार वाढतच जातो. औषधे व शस्त्रक्रियांच्या आधारे तो केवळ नियंत्रणात ठेवता येतो. नियंत्रणात न राहिल्यास जास्त औषधे व आणखीन शस्त्रक्रिया यांद्वारेच इलाज केल्या जातो. माझी उपाययोजनाही ह्याच वाटेवर वाटचाल करत होती. म्हणून मी ह्या वाटेवर माझ्याआधीच गेलेल्या चारपाच स्नेह्यांना भेटलो. त्यांच्या कहाण्या सविस्तर ऐकल्या. मला अनेक हृदयधमनी रुंदीकरणे व उल्लंघन शस्त्रक्रिया झालेले लोक भेटले. आपण आता पुन्हा कधीच पूर्णत: बरे होणार नाही असे मला वाटू लागले. आपली औषधे कधीच पूर्णपणे सुटणार नाहीत असेही वाटे.

तपास करता "प्रतिबंधक हृदयोपचार (प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी)" शाखा मला माझ्या उद्दिष्टांची पूर्तता करून देऊ शकेल असे वाटू लागले. प्रतिबंधक हृदयोपचारशाखा त्यामानाने नवोदित आहे. ह्या शाखेत औषधे आणि शस्त्रक्रियांविना हृदयविकार माघारी परतवता येतो अशी मान्यता आहे. हे समजताच मला ह्या पोकळ बढाया वाटू लागल्या. मी विचारले की "डॉक्टर मला तुम्ही औषधे पूर्णपणे थांबलेली आहेत असा हृदयरुग्ण दाखवू शकाल काय? ज्याला हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेचा उपाय सुचविण्यात आलेला आहे अशा रुग्णास, तुम्ही त्या शस्त्रक्रिया न करता त्याला बरे करू शकता काय? तसे काही बरे झालेले रुग्ण तुम्ही दाखवू शकाल काय’" अनपेक्षितरीत्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली. प्रत्यक्षात तशी काही उदाहरणे पाहिली आणि मग मी प्रतिबंधक हृदयोपचार घेण्याचा निर्णय घेतला.

आणि लौकरात लौकर, म्हणजेच २५ डिसेंबर २००४ रोजी मी 'हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रमात' सामिल झालो. औषधांविना आणि शस्त्रक्रियेविना, केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' हृदयधमनीविकार परत फिरवता येतो आणि माझ्या उद्दिष्टांची पूर्तताही होऊ शकते अशी आशा पल्लवित झाली. २५ मार्च २००५ रोजी तो कार्यक्रम माझ्यापुरता सुफळ संपूर्ण झाला. त्यात सुचविलेली, मी स्वीकारलेली आणि माझ्या दिन:चर्येत बसविलेली जीवनशैली आता मी आयुष्यभर पाळणार होतो.

सम्यक जीवनशैली परिवर्तन

माझ्या प्रकरणाचा अभ्यास करून, माझ्या समस्यांचा नीट विचार करून आणि माझ्या उद्दिष्टांच्या साधनेकरीता मला खालील "सम्यक जीवनशैली परिवर्तन" सुचविण्यात आले.

१. आहार: दररोज जास्तीत जास्त २ चमचे साखर, जास्तीत जास्त २ चमचे तेल/तुप आणि कमीत कमी मीठ असलेला आहार घ्यायचा. सकाळी एक पेला लिंबूपाणी (अर्थातच साखरेविना), काही काळया मनुका अथवा दोन भिजवलेले बदाम, दुधसाखरेविना चहा, सकाळच्या आहारात एक वाटी (मेदविरहित दुधाचे) दही, दोन्ही जेवणांनंतर एक एक तासाने एक एक फळ (केळ, आंबा, सीताफळ, द्राक्षे इत्यादी वगळून, संत्र, मोसंब इत्यादींना प्राधान्य), रात्री झोपतांना एक पेला गाईचे दूध आणि दिवसभरात कमीत कमी आठ पेले पाणी आवश्यक.
२. विहार: सकाळी कमीत कमी ४५ मिनिटे (३-४ किलोमीटर) जलद चालणे
३. शारीरिक लवचिकतेसाठीचे व्यायाम: उपाशीपोटी २० मिनिटे
४. योगासने: उपाशीपोटी २० मिनिटे
५. प्राणायाम: १० मिनिटे
६. ध्यानधारणा/दृश्यकल्पन/कल्पनाचित्रण: १० मिनिटे

सतत तीन महिने कर्मठपणे वरील जीवनशैली अंमलात आणल्यावर माझ्यात आणि माझ्या हृदयधमनीविकारात अनेक परिवर्तने घडून आली. ती अशी:

१. माझे वजन ७० किलोचे ६५ किलो झाले.
२. माझी कंबर ३६ इंचांपासून ३२ इंचांपर्यंत कमी झाली.
३. माझा रक्तदाब १२०/८० राहू लगला.
४. माझ्या रक्तदाबाच्या गोळ्या दरदिवशी दोन (५मिग्रॅ ऍम्लोडेपिन)वरून एकवर आल्या.
५. मी हृदयविकारासंदर्भात भरपूर वाचन करू लागलो.

आणि मला समजून चुकले की हृदयविकार केवळ 'जीवनशैली परिवर्तनाद्वारे' परत फिरवता येतो. मला तर ह्या माहितीचा उपयोग झालाच होता. आता ही माहिती माजी, आजी आणि भावी हृदयविकारग्रस्तांपर्यंत पोहोचविणे अत्यंत जरूर असल्याचे माझ्या मनानी घेतले. म्हणून, मी डॉ.डीन आर्निश यांच्या ‘हृदयविकार माघारी परतविण्याचा कार्यक्रम’ ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचे काम वेगाने सुरू केले. १६-०३-२००६ रोजी ते काम सुफळ संपूर्ण झाले.

हृदयस्पंदनदर वाढला होता

१४ जुलै २००५ रोजी पाठपुरावा तपासणी (फॉलोअप चेकअप) साठी आमच्या रुग्णालयात बोलाविले होते. टोकन घेऊन बसल्यानंतर दोन तासांनी माझा नंबर लागला. मला भीती वाटत होती की ह्या वाट बघत थांबण्यामुळे रक्तदाब वाढतो की काय. पण रक्तदाब सामान्य म्हणजे १२०/८० च भरला. मात्र हृदयस्पंदनदर ११० ठोके प्रतिमिनिट भरल्याचे डॉक्टर म्हणाल्या. ह्या निरीक्षणानंतर त्यांनी सकाळची ५ मिलीग्रॅम ऍम्लोडेपिनची गोळी बंद करून त्याऐवजी २५ मिलीग्रॅम ऍटेनोलोलची गोळी सुरू करण्यास सांगितले.

डाव्या खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला बधीरता येऊ लागली

नंतर काही दिवसांनी, खांद्यांच्या पाठीकडल्या भागात मुंग्या आल्यासारखा बधीरपणा जाणवत असे. डॉक्टरांनी तो अस्थिजन्य (ऑर्थोपेडिक) स्वरूपाचा असावा, असे सांगून त्यावर बी. जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या. ह्या गोळ्यांमुळे तसली बधीरता हळूहळू कमी होत गेली. साधारणत: तीन चार महिन्यांनंतर त्या गोळ्याही बंद केल्या. मात्र, नंतर पुन्हा तसली बधीरता कधीही जाणवली नाही.

रक्तदाब कमी होऊ लागला

२८ सप्टेंबर २००५ रोजी सकाळी ९०० वाजता नियमित तपासणी निर्धारित होती. त्यावेळी डॉक्टरांना रक्तदाब ९४/७० व नाडी ७० ठोके प्रतिमिनिट चालतांना सापडली. त्यापूर्वीही दोनदा तपासणी करीत असतांना रक्तदाब कमी सापडला होता. २२-०८-२००५ रोजी सकाळी ११०० वाजता तो १००/७० तर २६-०८-२००५ रोजी सकाळी ९०० वाजता तो ११०/७० असा मोजल्या गेला होता. त्यावर त्यांनी कधी चक्कर येते का? डोळ्यांपुढे अंधेरी येते का? अशी विचारणा केली. गेल्या काही दिवसांपासून मला खरोखरीच झोपून उठल्यावर डोळ्यांपुढे क्षणभरच का होईना अंधेरी येत असे, तोल गेल्यासारखे वाटत असे. पण क्षणभरच. ते मी त्यांना सांगितले. ते म्हणाले की ही चांगली लक्षणे आहेत. मला आता रक्तदाब कमी ठेवण्यासाठी जास्तीची औषधे घेण्याची गरज राहिलेली नाही. आणि त्यांनी ऍम्लोडेपिनची ५ मिलीग्रॅमची गोळी बंद करून त्याऐवजी ऍम्लोडेपिनची २.५ मिलीग्रॅमची गोळी सुरू केली. आतापर्यंत मी १० मिग्रँ स्टोर्वासची मेदविदारक गोळी रोज नियमित घेत असे. ती कमी करता येईल का? किंवा बंद करता येईल का असे मी डॉक्टरांना विचारले. हे शक्य आहे का ते पाहण्यासाठी रक्ताची लिपीड-रूपरेषा करवून घ्यावी असा त्यांनी सल्ला दिला.

ट्रायग्लिसेराईडस वाढली

ही रक्ततपासणी ०८-११-२००५ रोजी करण्यात आली. एकूण कोलेस्टेरॉल १६५, उच्च्च सघन कोलेस्टेरॉल ३५, कमी सघन कोलेस्टेरॉल ९२ आणि ट्रायग्लिसेराईडस १९२ असा निकाल लागला. एकूण कोलेस्टेरॉल १३० पेक्षा कमी नसल्याने मेदविदारक गोळी कमी न करता तशीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ट्रायग्लिसेराईडस १९२ म्हणजे खूपच जास्त होती. मग शोध घेतल्यावर मला असे कळले की गोड खूप खाल्याने ती वाढतात. आणि रक्ततपासणीच्या आधी नुकतीच दिवाळी झालेली होती. म्हणून पथ्यावर अपथ्यकर परिणाम झालेलाच होता. त्यामुळे एरव्ही कमी राहत असलेली ट्रायग्लिसेराईडस नेमकी रक्ततपासणीच्या वेळीच वाढलेली असावित असा मी निष्कर्ष काढला.

पुन्हा रक्तदाब कमी होऊ लागला

माझा रक्तदाब तर नियंत्रणात राहत होता, १२०/८० पेक्षाही कमीच राहत होता. २८-०९-२००५ रोजी जेव्हा ९०/७० असा रक्तदाब मोजण्यात आला तेव्हा ५ मिग्र ऍम्लोडेपीन ची सुरू असलेली गोळी अर्धीच सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होतेच. नंतरही सातत्याने रक्तदाब कमीच राहत असल्याने १३-१२-२००५ रोजी २.५ मिग्र लोर्वास ची जी गोळी मी रक्तदाबशमनार्थ घेत होतो ती अर्धी बंद करण्यात आली. आणि मग ०९-०१-२००६ रोजी ती पूर्णपणे बंद करण्यात आली. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

इतर जीवनशैलीगत परिवर्तनांसाठी (म्हणजे चालणे, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसाधना इत्यादी) मी केवळ तास दीड तासच काय तो वेगळ्याने देत असे. पण माझ्या दिनचर्येत मी आमुलाग्र बदल घडवला होता. कार्यालयीन वेळात मी दूरवर चालण्याची कामे स्वत:वर ओढवून घेऊ लागलो. जातायेता चारचार मजले उद्-वाहकाऐवजी जिन्याचाच वापर करू लागलो. सतत संगणकावर बसावे लागे तेव्हा, दर तासातासाने मी उठून उभा राहत असे. आळोखे पिळोखे देत असे. जमल्यास सहकारी मित्रांच्या खोल्यांपर्यंत जावून त्यांच्याशी चार शब्द बोलूनही येत असे. याशिवाय आहारावरील नियंत्रण यथासांग सांभाळण्यात मला माझ्या पत्नीची अत्यंत मोलाची मदत झाली.

या सार्‍यांचा एकत्रित परिणाम म्हणून माझा रक्तदाब कायम १२०/८० पेक्षाही कमीच राहू लागला. त्यामुळे २६-०६-२००६ रोजी २५ मिग्र ऍटेनोलोल गोळीही कमी करून अर्धीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मेदविदारक गोळी कमी करण्याचे दृष्टीने, १०-०२-२००६ रोजी पुन्हा रक्ततपासणी करण्यात आली तेव्हा एकूण कोलेस्टेरॉल १४० व ट्रायग्लिसेराईडस ९३ असा निकाल लागला. मग १० मिग्र स्टोर्वासची गोळी अर्धी बंद करण्यात आली.

पुन्हा रक्त व मूत्र तपासणी केली

२२-०६-२००६ रोजी माझी रक्त व मूत्र तपासणी पुन्हा करण्यात आली. रक्तशर्करा उपाशीपोटी ८० तर जेवल्यावर दोन तासांनी ८९ भरली. त्यामुळे मधुमेह नाही आणि रक्तशर्करा उत्तम स्थितीत आहे हे स्पष्ट झाले. रक्तातील कोलेस्टेरॉल १५३ व ट्रायग्लिसेराईडस् १०३ आढळले. हे त्यांच्यावर व्यवस्थित नियंत्रण असल्याचे निदर्शक होते. मूत्रतपासणीवरून मूत्रपिंडांवर कसलाच विपरित परिणाम झाल्याचे दिसले नाही. रक्तदाबही पूर्णपणे नियंत्रणात होता. कमीच होता. म्हणून ह्या तपासणीनंतर रक्तदाबाच्या गोळीची मात्रा घटविण्यात आली. नंतर २२-०९-२००६ रोजी रक्त पातळ करणार्‍या अस्पिरीनचे प्रमाणही घटवून अर्धे (७५ मिग्र) करण्यात आले. हल्ली माझा रक्तदाब खालीलप्रमाणे मोजण्यात आलेला आहे.

दिनांक, रक्तदाव (मिमी पारा)
१९-०७-२००६, ११०/८०
२८-०७-२००६, ११२/७६

०७-१२-२००४ रोजी हृदयधमनी रुंदीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर
दोन वर्षांमध्ये औषधयोजनेत साधता आलेली घट

अक्र, औषधयोजना, मात्रा (मिग्रॅ), औषधप्रकार, मूळ उपाय, सध्याची उपाययोजना, शेवटल्या बदलाच्या तारखा, अभिप्राय

१, इकोस्प्रिन-१५०, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-१/२-०, २२-०९-२००६, ५० टक्के सुधारणा झाली
२, क्लोपिडोग्रेल/ग्रोविन/प्लेग्रिल-७५, रक्त-तरल-कर, ०-१-०, ०-०-०, ०७-१२-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
३, मोनोट्रेट-२०, धमनी विस्फारक, १/२-१/२-०, ०-०-० , १६-०८-२००५, १०० टक्के सुधारणा झाली
४, स्टोर्व्हास-१०, मेदविदारक, ०-०-१, ०-०-०, २६-०६-२००६, १०० टक्के सुधारणा झाली
५, ऍम्लोडेपिन-५, रक्तदाबशामक, १-०-१, १/२-०-०, २६-०६-२००६, खूपच सुधारणा झाली
६, लोर्व्हास-२.५, मूत्रल/रक्तदाबशामक, १-०-०, ०-०-०, ०९-०१-२००६, १०० टक्के सुधारणा झाली

आंतरिक शक्तीचा शोध

शरीर व्याधीग्रस्त कसे झाले? ते पूर्वपदावर आणण्याचा उपाय काय? आपल्या शरीरात ईश्वराने किती अद्-भूत स्वसुधारशक्ती भरलेली आहे? आणि तिचा साक्षात्कार आपल्याला कसा करून घेता येईल? ह्याच गोष्टींचा, ह्या दोन वर्षांच्या काळात मी निरंतर ध्यास घेतला होता. शरीरात खूपच स्वसुधारशक्ती असल्याचे मला कळून आले. ती शक्ती जागृत करण्यात मी बव्हंशी यशस्वी झालो. ही शोधकथा वाचून तसल्याच दुविधेत पडलेल्यांना निश्चितच लाभ होऊ शकेल, या हेतूनेच ती शब्दबद्ध केलेली आहे.
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Comments

सकारात्मक अनुभवकथन

अनुभवकथन आवडले. हा अनुभव निश्चितच अनेकांना फायद्याचा ठरेल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच बोल्तो

अनुभवकथन आवडले. हा अनुभव निश्चितच अनेकांना फायद्याचा ठरेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

अभिनंदन

तुमचा रक्तदाब नॉर्मलवर आला हे वाचून आनंद झाला. तारखांच्या नोंदीवरून त्याला ४ वर्षे झाल्याचे दिसते.
हेल्दी लाईफस्टाईल हे रक्तदाब कमी होण्यासाठी उपायकारक कारण आहेच. शिवाय ऍम्लोडोपीनमुळे (क्याल्शियम ऍन्टागोनिस्ट) तुमच्या धमन्या पुन्हा लवचिक झाल्या.
ऍम्लोडोपीन पूर्णपणे बंद करू नये असे वाटते.
तुमची क्रियाटिनीन क्लियरन्स टेस्ट केली आहे का?
यापुढेही योग्य ती खबरदारी घ्यावी आणि औषधोपचार सुरू ठेवावेत.

खुले मन!

डॉ. डीन ऑर्निश यांचे दावे मला आधुनिकोत्तर अवैज्ञानिक या प्रकारचे वाटतात. उदा.
डॉ. अभय बंग यांना ते आवडतात हे पॅकेज डीलचेच उदाहरण आहे.

लेख आवडला

फार उत्तम लेख आहे. आवडला.
प्रत्येकानी आपल्या जिवनशैलीत साधारण दर दहा वर्षानी परिवर्तन करायला हवा असे वाटते.

http://rashtravrat.blogspot.com

आभार

गोळेकाका,
विस्तृत माहीती दिल्याबद्दल आभार. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीबद्दल बरेच ऐकले/वाचले आहे. आमच्याच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या कार्डिओलॉजी हे "डर्टी फिल्ड" झाले आहे त्यामुळे बहुतेक डॉक्टर इन्व्हेजिव्ह कार्डिओलॉजीच्या मार्गाने जातात. त्यात अर्थातच त्यांचा आर्थिक फायदा असतो. मात्र यात हृदयरोग प्रतिबंध कसा करता येईल याबद्दल फारच कमी आस्था असते. अजूनही हृदयरोगाची नेमकी कारणे समजली आहेत असे म्हणता येणार नाही. रोझेटा मिस्टरीसारखी उदाहरणे प्रचलित समजांच्या विरूद्ध आहेत. यावरील अभय बंगांचे पुस्तकही छान आहे.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

अभिनंदन

विकार कमी झाल्याबद्दल अभिनंदन.
अनुभवकथन लोकांना उपयोगी पडेल.

मागच्या लेखांकात "जीवनशैली बदलायला, अन्न-व्यायामाबाबत फरक करायला वेळच नाही" अशा समजुतीच्या पायरीवर तुम्ही होता. तेव्हा "आता यांचे काय होईल" अशी धास्ती घेतली होती. ती गैरसमजूत तुम्ही बाजूला केली.

चांगला लेख

हा लेख पूर्वीही वाचला होताच पण लेख अनेकांना प्रेरणादायी ठरावा. आपण यापुढेही योग्य खबरदारी, औषधोपचार करत राहावे.

माहितीपुर्ण लेख

माझ्या आईची चार वर्षांपुर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली. त्यावेळेस ओळखीतल्या एका बाईंनी शस्त्रक्रिया करु नका जीवनशैली बदला असा सल्ला दिला होता. परंतु मी मात्र तीन नामांकित डॉक्टरांचे मत घेऊन शस्त्रक्रिया करुन् घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आपल्या अनुभवाप्रमाणे शस्त्रक्रियेनंतरही तिची तपासण्या व गोळ्या यापासून् सुटका झालेली नाही.

ज्या बाईंनी शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला होता, त्यांनाही डॉक्टरांनी हृदय शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. घरच्यांच्या आग्रहानंतरही त्यांनी ठाम नकार दिला. त्यांनीही थोडीफार् आपण सांगितल्याप्रमाणे जीवनशैली मात्र् बदलली. आज ६ वर्षांनंतरही त्यांची प्रकृती उत्तम आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या केवळ रक्तदाब नियमित ठेवण्यासाठीच्या गोळ्या घेतात.

आपल्या माहितीचा नक्किच उपयोग होईल. डॉक्टरांच्या सल्ल्याने आईस अशी जीवनशैली आत्मसात करणे योग्य राहिल का ते तपासून पाहतो.
धन्यवाद!

जयेश

सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद

आजानुकर्ण, विसुनाना, रिकामटेकडा, रणजित, आरागॉर्न, धनंजय, प्रियाली आणि जयेश सगळ्यांना प्रतिसादाखातर महःपूर्वक धन्यवाद.

विसुनाना,
ऍम्लोडोपीनमुळे (क्याल्शियम ऍन्टागोनिस्ट) तुमच्या धमन्या पुन्हा लवचिक झाल्या>>> निदान लक्षणे तरी नामशेष झालेली आहेत. ऍम्लोडोपीन-२.५ अजूनही सुरू ठेवले आहे. तुम्ही सुचवता त्याच प्रतिबंधात्मक कारणांनी. मात्र, त्यांची जरूर नसल्याचे आता निष्पन्न झालेलेच आहे. क्रिएटिनीनबाबतची तुमची शंका आता माझ्या प्रतिसादांमुळे निरस्त झालेली असावी.

रिकामटेकडा, माझे डीन ऑर्निश यांचेशी कोणतेही डील आजवर झालेले नाही. तरीही त्यांच्या पुस्तकावर माझे प्रेम जडले आहे. ते आहेच तसे. वस्तुनिष्ठ. कदाचित तुम्हीच वाचलेले नसावे. किंवा तुम्हाला सुदैवाने त्याची गरजच पडलेली नसावी. नसल्यास पडू नये हीच सदिच्छा!

आरागॉर्न, पैशासाठी सेवा विकणारे लोक जसे अधिक्षेपक हृदयोपचार पद्धतीत आढळून येतात, तसेच ते प्रतिबंधात्मक पद्धतींतही आढळून येतात. त्यावरून त्यांच्या गुणात्मक सामर्थ्यांची तुलना न केलेलीच बरी.
अजूनही हृदयरोगाची नेमकी कारणे समजली आहेत असे म्हणता येणार नाही.>>> हे चूक आहे. किमान वयपरत्वे येणर्‍या अवनतीकारक हृदयधमनीविकाराची कारणे जवळजवळ संपूर्णपणे समजली आहेत. न पेक्षा माझ्या हृदयविकाराची माघार घडवताच आली नसती. हेच तर खरे यातून आवर्जून सांगायचे आहे.

जयेश, हृदयविकार असो वा नसो. त्याकरता सुचवली जाणारी प्रतिबंधात्मक जीवनशैली सगळ्यांनीच स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळे वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची गती मंदावते. एकप्रकारे दीर्घायुष्याचीच ती मुहूर्तमेढ ठरू शकते. जगण्याची गुणवत्ता वाढवू शकते. म्हणूनच या विषयावर जागृतीची ज्योत तेवती ठेवावी म्हणून मी http://aarogyasvasthata.blogspot.com/ ही अनुदिनी लिहायला घेतली आहे. ती अवश्य वाचत राहावी.

खुलासा

रिकामटेकडा, माझे डीन ऑर्निश यांचेशी कोणतेही डील आजवर झालेले नाही.

माझा तो आरोप तुमच्यावर नसून डॉ. बंग यांच्यावर होता. पण तो थोडासा तुमच्यावरही शक्य आहे कारण तुम्हालाही मुळातच शाकाहार आवडत होता.

त्यांच्या पुस्तकावर माझे प्रेम जडले आहे. ते आहेच तसे. वस्तुनिष्ठ. कदाचित तुम्हीच वाचलेले नसावे.

कबूल.

किंवा तुम्हाला सुदैवाने त्याची गरजच पडलेली नसावी. नसल्यास पडू नये हीच सदिच्छा!

धन्यवाद.
संधिवात टाळण्यासाठी आयुष्यभर नेहमी स्नानासाठी थंड पाणीच वापरावे काय? -- जॉर्ज गॅमॉव

आवडले.

तांत्रिक माहिती आणि औषधांचा तपशील यांचा भडिमार असूनही लेख आवडले. इंग्रजी शब्दांचे अतिमराठीकरण हे आता आंतरजालावरील 'नेसेसरी एव्हिल' किंवा 'अपरिहार्य कुमती' म्हणून घ्यावे लागणार, असे दिसते.
अवांतरः 'अ बोर इज अ पर्सन हू, व्हेन आस्क्ड हाऊ ही इज, स्टार्टस टेलिंग इट' आणि 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही' हे दोन आठवले. का आठवले असावेत बरे?

सन्जोप राव
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं

सहमत आहे

तांत्रिक माहिती आणि औषधांचा तपशील यांचा भडिमार असूनही लेख आवडले

लेखाचा विषयच असा होता की तांत्रिक माहीती आणि औषधांचे तपशिल येणारच होते. ते मी दुर्लक्षिले असले तरी ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे किंवा रक्तदाबशमनाच्या औषधांची माहिती आहे त्यांच्यासाठी ती माहीती उपयुक्त ठरली असावी.

इंग्रजी शब्दांचे अतिमराठीकरण हे आता आंतरजालावरील 'नेसेसरी एव्हिल' किंवा 'अपरिहार्य कुमती' म्हणून घ्यावे लागणार, असे दिसते.

नाईलाज आहे. यावर पूर्वीही चर्चा झाली असावीच. दुवे शोधण्यातही काही अर्थ नाही. लेखाचा उद्देश आणि माहीती चांगली वाटल्याने वरील गोष्टीकडे मला दुर्लक्ष करावे वाटले. मराठी प्रतिशब्द वापरल्याने मराठी भाषा समृद्ध होणार की नाही हा प्रश्न कांद्याच्या वाढलेल्या किंमतीपेक्षा महत्त्वाचा नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

जीवन शैली परिवर्तन

आपण आपल्या लेखात जीवनशैलीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहार व आचार यात जे बदल केले आहेत त्यासंबंधी काही शंका आहेत.
1. आहार:- सर्वसाधारणपणे असे म्हणता येते की ज्येष्ठत्व आलेल्या व्यक्तींचा मेंदू आपले कार्य चांगले चालू ठेवण्यासाठी शरीराकडे सतत जास्त जास्त शर्करेची मागणी करत असतो. आपण आपल्या आहारातील शर्करेचे प्रमाण कमी केल्याने अर्थातच मेंदूची ही मागणी काही कमी होणार नाही. त्यामुळे शरीराला जास्त शर्करा खालेल्या अन्नापासून तयार करणे गरजेचे होईल. हे असंतुलन तुम्ही करत असलेल्या आहारातून कसे नियंत्रणात ठेवता येते? यामुळे शुगर क्रेव्हिंग वाढणार नाही का?
2. व्यायाम :- तुम्ही निर्देश केलेले व्यायाम सर्व व्यक्तींनीच करावे असे डॉक्टर सांगत असतात. मग हे व्यायाम केल्याने जीवन शैलीत परिवर्तन झाले असे कसे म्हणता ये ईल? एक आवश्यक गोष्ट जी आजपर्यंत तुम्ही करत नव्हता ती आता तुम्ही करू लागला आहेत एवढेच म्हणता येते.
3. आपले रोजचे आयुष्य ताणतणाव मुक्त कसे करता ये ईल या साठी तुम्ही काय करता याचा काहीच उल्लेख तुमच्या लेखात नाही. यासाठी काही डॉक्टर मांजर किंवा कुत्रा यारखे प्राणी पाळा किंवा नवीन छंद लावून घ्या अशा प्रकारचा सल्ला देतात. यापैकी आपण काही केले आहे का?
आपल्या निरोगी जीवनासाठी शुभेच्छा.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आपल्या शंकांबाबतची स्पष्टीकरणे

आपल्या शंकांबाबतची स्पष्टीकरणे:

1. आहार:- सर्वसाधारणपणे असे म्हणता येते की ज्येष्ठत्व आलेल्या व्यक्तींचा मेंदू आपले कार्य चांगले चालू ठेवण्यासाठी शरीराकडे सतत जास्त जास्त शर्करेची मागणी करत असतो. आपण आपल्या आहारातील शर्करेचे प्रमाण कमी केल्याने अर्थातच मेंदूची ही मागणी काही कमी होणार नाही. त्यामुळे शरीराला जास्त शर्करा खालेल्या अन्नापासून तयार करणे गरजेचे होईल. हे असंतुलन तुम्ही करत असलेल्या आहारातून कसे नियंत्रणात ठेवता येते? यामुळे शुगर क्रेव्हिंग वाढणार नाही का?>>>>
उपाशी राहण्याची मुळीच गरज नाही. खाद्यपदार्थांची योग्य निवड, खाण्यातील वारंवारता आणि शारीरिक गरज यांचा मेळ घालावाच लागतो. साखर, गूळ हे मानवनिर्मित संहत पदार्थ असतात. त्यांचे ऐवजी निसर्गनिर्मित पदार्थांची आहारार्थ निवड करावी. बहुतांश खाद्यपदार्थ कमी-अधिक प्रमाणात गोड असतातच. दुधीचा बेचव रसही, साखर बंद केल्यावर, गोड असल्याचे समजू लागते.

2. व्यायाम :- तुम्ही निर्देश केलेले व्यायाम सर्व व्यक्तींनीच करावे असे डॉक्टर सांगत असतात. मग हे व्यायाम केल्याने जीवन शैलीत परिवर्तन झाले असे कसे म्हणता ये ईल? एक आवश्यक गोष्ट जी आजपर्यंत तुम्ही करत नव्हता ती आता तुम्ही करू लागला आहेत एवढेच म्हणता येते.>>>
नाही. हे खरे नाही. आपण नैसर्गिक जीवनापासून खूप दूर गेलेले असल्यामुळेच आपल्याला व्यायामाची गरज भासते. एरव्ही तो आपल्या दिनचर्येतूनच संपादन व्हायला हवा. आपले कृत्रिमरीत्या बैठे केले गेलेले जीवनच व्यायाम करण्याची गरज निर्माण करत असते.

3. आपले रोजचे आयुष्य ताणतणाव मुक्त कसे करता ये ईल या साठी तुम्ही काय करता याचा काहीच उल्लेख तुमच्या लेखात नाही. यासाठी काही डॉक्टर मांजर किंवा कुत्रा यारखे प्राणी पाळा किंवा नवीन छंद लावून घ्या अशा प्रकारचा सल्ला देतात. यापैकी आपण काही केले आहे का?>>>>
बरेच काही केलेले आहे. ते सर्व सांगण्याकरता मनोगत डॉट कॉम वर ३० भागांची एक संपूर्ण मालिकाच त्यावेळी लिहीली होती. ती आजही तिथे उपलब्ध आहे. http://www.manogat.com/node/5150/ या दुव्यावर ते आपण पाहू शकाल. तेच लेख एक एक करून इथेही देता येतील.

तरीच!

यासाठी काही डॉक्टर मांजर किंवा कुत्रा यारखे प्राणी पाळा किंवा नवीन छंद लावून घ्या अशा प्रकारचा सल्ला देतात.

हं! अभय बंगांचे पुस्तक आवडणारे हजारो मुक्या पाहुण्यांचे आतिथ्य करतात पण अल्बर्ट एलिस न आवडणार्‍यांना कुत्री बाळगण्यात त्रास वाटतो हा योगायोग नसावा असे दिसते.

 
^ वर