दिलसे या दिमागसे?

शांता व सुधा या सख्या बहिणी बहिणी. त्यांच्या वडिलांनी या बहिणींच्या नावे भरपूर इस्टेटी करून ठेवल्यामुळे त्या इस्टेटीच्या उत्पन्नावरच गुजराण करत. कालक्रमेण आई -वडिलांचा मृत्यु झाला. काही कारणामुळे या दोघी अविवाहितच राहिल्या. एकेकटेच असल्यामुळे खर्चही कमी असे. मिळत असलेल्या उत्पन्नातील बहुतांश वाटा त्या दोघी गोरगरीबात वाटत होत्या. सढळ हाताने मदत करत होत्या.

शांता नावाप्रमाणे शांत चित्तवृत्तीची. अत्यंत करुणाळू. कुठल्याही प्रकारचे आढेवेढे न घेता सढळ हाताने कुणालाही मदत करणारी. कुणीही अडला - नडला माणूस भेटला की तिला फार वाईट वाटत असे. आपल्याजवळ जे काही आहे ते ताबडतोब देवून टाकत असे. तिच्या या उदार वृत्तीमुळे अनेक गरीब तिची कदर करत होते. खात्रीशीर मदतीचा हात म्हणून तिची ख्याती होती. गोर गरीबांच्या वस्तीत, झोपडपट्टीत ती फार लोकप्रिय होती.

सुधा मात्र तुलनेने थंड डोक्याची होती. मुळातच तिला लोकांचा संपर्क आवडत नसे. याचा अर्थ ती लोकांचा द्वेष करत होती असे नव्हे. उलट लोकांना मदत करणे ही तिची जवाबदारी आहे व मदतीचा हात पुढे केल्याशिवाय गरीबी लवकर हटणार नाही याची तिला पुरेपूर खात्री होती. परंतु समोर दिसेल त्यांना किंवा हात पसरेल त्यांना सर्व वाटून देणे तिच्या हिशोबात बसत नव्हते व तिच्या नियमातही बसत नव्हते. आपण दिलेली मदत सार्थकी लागले पाहिजे यावर तिचा कटाक्ष होता. आपल्या मदतीचे दीर्घकालीन परिणाम व्हावेत अशी तिची इच्छा होती. त्यामुळे असे एकेकटे गरीब किंवा त्यांची बायका- मुलं यांना प्रत्यक्ष मदत न करता गरीबी निर्मूलनासाठी झगडणार्‍या, त्यासाठी काम करत असलेल्या संघटना - संस्थांच्याकडे आपली मदत सुपूर्द करत असे. नेमके कशासाठी व किती खर्च करायचे याची तिला पूर्ण कल्पना असे. व त्या प्रमाणे आपल्या मदतीचा वाटा ती पाठवत होती. कुणाला किती व केव्हा द्यायचे त्याचा एक निश्चित आराखडाच तिच्या डोळ्यासमोर असायचा.

गरीबांना मदत हे एक मूल्य म्हणून निकष ठरवल्यास या दोघीपैकी कोण जास्त नैतिक जीवन जगत आहेत, हे यावरून ठरवता येईल का?

------- --------- --------

सर्वसामान्यपणे आपल्यासारख्यांना मदतीला सदैव तयार असलेल्या शांतासारख्या भावनाप्रधान व्यक्ती आवडतात. अशा व्यक्ती उदारतेचा वसा घेवून आपल्यासारख्यांना मदत करतात. त्यांच्यातील करुणा, दया, परोपकार यासारख्या वृत्ती जन्मत:च असतात असे वाटत असते. या गोष्टी नैसर्गिकच आहेत याची आपल्याला खात्री असते. ज्या उत्स्फूर्ततेतून शांता मदत करत असते, त्यावरूनच तिच्या चांगुलपणाचा अंदाज आपल्याला घेता येतो. इतरांच्या उपयोगी पडणार्‍या अशा व्यक्तींना आपण नैतिक ठरवत असतो.

परंतु भावनोद्रेकाला बळी न पडता पूर्ण विचारांती निर्णय घेवून मदत करणार्‍या सुधासारख्यांच्या बाबतीत आपल्याला नितांत आदर असला तरी तुलनेने (नैतिकतेच्या बाबतीत) आपण तिला दुसरा क्रमांक देतो. अशा व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात नसल्यामुळे त्यांचा गवगवा होत नाही. कर्तव्य भावनेतून मदत करणारे दुर्लक्षिले जातात, त्यांच्या वाटेला उपेक्षा येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.

आपल्या दृष्टिकोनात हा फरक का जाणवतो याचा विचार करण्याची गरज आहे. नैतिकता चांगले कर्तव्य करण्यातच असते हे मान्य केल्यास सुधापेक्षा शांता सरस आहे असे मानणे चुकीचे ठरेल. किंबहुना शांताच्या करुणेच्या अतिरेकामुळे चांगले घडण्याऐवजी काही वाईट घडण्याचीच शक्यता जास्त आहे. उदाहरणार्थ, या दोघी बहिणी गडचिरोली वा चंद्रपूरच्या जंगलातील आदिवासींना मदत करण्यासाठी जंगलात प्रत्यक्ष गेल्यास शांताभोवती गोळा झालेल्या नागड्या - उघड्या आदिवासी कुपोषित गरीब मुलां-मुलींकडे बघून शांता स्वत:जवळील जे काही आहे ते - खाण्याचे जिन्नस, पाट्या, पेन्सिल, पुस्तकं, कपडे, पैसे, इ.इ. - सर्व काही वाटून टाकेल. परंतु सुधा मात्र तसे न करता त्या परिसरातील गरीबांच्या गरजा ओळखून तिथल्या विकासप्रक्रियेला हातभार लावणार्‍या एखाद्या संघ- संस्थेला मोठी देणगी देईल. कारण गरीबांना प्रत्यक्षपणे दान म्हणून मदत वाटत सुटल्यास त्यांच्यामध्ये एका प्रकारे असहाय्यता व परावलंबित्वाला उत्तेजन दिल्यासारखे होईल. त्याऐवजी त्यांची गरज शाळा वा दवाखाना असल्यास त्यांच्या स्वाभिमानाला धक्का न पोचविता देणगी दिली जाईल.

शांतासारख्यांच्या 'दानशूरते'बाबतीत अजून एक मुद्दा उपस्थित करता येईल. शांताच्या सर्व कृती भावनाप्रधान, उत्स्फूर्तेतून प्रेरित झालेल्या असतात. त्यात कुठलाही पूर्व विचार नसतो. अंतिम परिणामाचा अंदाज नसतो. नियोजन नसते. त्यामुळे शांतानी केलेली मदत अळवावरच्या पाण्यासारखी - केव्हाही उडून जाईल. तिच्याकडून मिळालेली मदत एखाद्याच्या नशीबाचा भाग असू शकतो. मला का मिळाले, त्याला का नाही, या प्रश्नांना येथे उत्तर नाही. त्यांच्यातील जन्मत:च असलेल्या या दानी वृत्तीचे एवढे कौतुक का म्हणून करायचे? कदाचित यातून शांतासारख्यांचा अहम् सुखावत असेल. आपण आपल्या भावनांच्या आहारी जात असल्यास त्या आपल्याला भलत्याच ठिकाणी नेऊन सोडतील. उदाहरणार्थ, शांतासारख्या व्यक्तीमधील ही भावुकता समाजातील विषमतेला खत पाणी घालण्यास - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष - मदत करेल. त्याच्यासमोर असलेल्या गोर-गरीबांना मदत करण्याच्या त्यांच्या सहज प्रवृत्तीमुळे कुणीही येवून त्यांची फसवणूक करू शकतो व त्यांचा गैरफायदा घेवू शकतात.

त्या तुलनेने विचार केल्यास सुधाची मदत विचारपूर्वक केलेली कृती वाटते. कदाचित त्यात कोरडी सहानुभूती आहे असे वाटेल. कदाचित त्यात उत्स्फूर्ततेला किंवा करुणेला स्थान नसेलही. परंतु काही तरी चांगले घडावे म्हणून बुद्ध्यापुरस्कर घेतलेला तो निर्णय असतो. अशा प्रकारच्या विचारपूर्वक केलेल्या मदतीतून त्यांना मानसिक समाधान लाभते, भावनिक नव्हे! सुधाच्या मदतीमागे काही विचार आहेत, प्रयत्नशील कृती आहे. परंतु शांताच्या कृतीत कुठलेही प्रयत्न नाहीत. खरे पाहता शांतापेक्षा सुधाचे व्यवहार मानवी समाजाला जास्त उपकारक ठरतील.

सुधाच्या नैतिकतेविषयी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला यासंबंधात अजून काही गोष्टींचा विचार करावा लागेल. दया, करुणा, परोपकारी वृत्ती, क्षमाशीलता, या जन्मत:च असणार्‍यापेक्षा केवळ कर्तव्यबुद्धीने म्हणून कृती करत असणारे खरोखरच श्रेष्ठ ठरतील का? यात कदाचित त्यांचा हिशोबीपणा असू शकेल. बुद्धीचे बुजगावणे उभे करून ही मंडळी आपल्या भावनांची कदर करण्यास मागे पुढे पहात असतील. व दुसर्‍यांच्या भावनाविश्वालाच सुरुंग लावत असतील. त्यांची वाटचाल संवेदनाहीनतेकडे जात आहे. अशा प्रकारे भावनांना अव्हेरणे, कोरडेपणाने व्यवहार करणे, मानवी समाजाला हितकारक ठरेल का?

दिल या दिमाग यांच्या या द्वंद्वातून बाहेर पडण्यासाठी आपल्याजवळ एकच मार्ग शिल्लक आहे. काही भले करण्याच्या नादात केवळ भावनेवर विसंबून न राहता भावना व बुद्धी या दोन्हींच्या वापर करून घेतलेला निर्णय व केलेली कृती कदाचित योग्य ठरेल. सुधा व शांता यांनी केवळ कर्तव्यबुद्धी वा केवळ भावना यांची कास न धरता भावनेतून निर्माण झालेल्या प्रतिसादांना बुद्धीची जोड देणे गरजेचे आहे. सुधा वा शांता यांचे आताचे वर्तन आदर्श प्रारूप (रोल मॉडेल) म्हणून उपयोगाचे ठरणार नाहीत. मदतीचा हात पुढे करताना, त्यासंबंधात विचारपूर्वक अंतिम निर्णय घेवून प्रत्यक्ष कृती करताना भावना व बुद्धी या दोन्ही घटकांना समप्रमाणात स्थान देत असल्यास हा तिढा सुटू शकेल.

तरीसुद्धा मानवाच्या हितासाठी नैतिकतेच्या मार्गाचा अवलंब करताना आपल्या मनाला जे भावते ते योग्य की आपल्या विचारातून जे सुचते ते योग्य हा प्रश्न अजूनही उत्तराविना भिजत पडलेला आहे.....

Comments

आपले म्हणणे पटते

बुद्धी आणि भावुकता आपल्या आपल्या जागी शोभून दिसतात. समाजात दोन्ही प्रकारच्या लोकांची गरज आहे.

>>परंतु शांताच्या कृतीत कुठलेही प्रयत्न नाहीत. >>
हे म्हणणे पटत नाही. आपण भावुकतेची अशी उदाहरणे घेतली आहेत ज्यात प्रयत्न नाहीत याचा अर्थ हा होत नाही की भावुक लोक प्रयत्न करत नाहीत. बुद्धीने निर्णय घेणे हे प्रयत्नसाध्य आणि भावनेने निर्णय घेणे हे सहकसाध्य असे नसते.

शांता उद्या याच भावुकतेमधुन अनाथ बाळाला आपलसं करेलही. एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन आजी-अजोबांना पुस्तके वाचून दाखवेल, मायेने त्यांची सेवा करेल जी सेवा सुधाने पैसे दिलेल्या रूक्ष संस्था पुरवू शकल्या नसत्या. ती एक्सलंट समुपदेशक अथवा शिक्षिका बनून समाजाची एक्सेप्शनल सेवा करेल.

तेव्हा एव्हरीबडी ऑन हिज ओन.

>> दिल या दिमाग यांच्या या द्वंद्वातून बाहेर पडण्यासाठी आपल्याजवळ एकच मार्ग शिल्लक आहे. काही भले करण्याच्या नादात केवळ भावनेवर विसंबून न राहता भावना व बुद्धी या दोन्हींच्या वापर करून घेतलेला निर्णय व केलेली कृती कदाचित योग्य ठरेल. >>
हे आपले म्हणणे पटते.

भावना की बुद्धी

लेखातील प्रश्न आवडला. थोडासा संभ्रमात पडलो. हे संभ्रमात पडणे हे या लेखाचे यशच समजतो. विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.

भावना की बुद्धी हा प्रश्न फक्त मदतीसाठी नसतो तर इतर अनेक ठिकाणी तो भेडसावतो. माझी नेहमीची वस्तु सोडून नवीन घ्यावी का इतक्या साध्या प्रश्नातही हेच द्वंद्व येत असते. ज्या ज्या गोष्टीत भावना गुंतली आहे त्या वस्तु, व्यक्ति, ठिकाणे या सर्वांबाबत निर्णय घेताना हेच जाणवते. प्रकल्पातील गावे, घरे,देवस्थाने ह्या ठिकाणांबाबत 'कठोर' (भावनांचा त्याग करून) निर्णय घ्यावे लागतात.

भावनांची किंमत केल्याशिवाय बुद्धीवादातून असे प्रश्न सुटत नाही. तर भावनांची किंमत ठरवणे हे देखिल त्यात गुंतलेल्यांना कसेसे वाटत असणार.

परिस्थितीची पूर्ण कल्पना नसणे हे बुद्धी वापरण्यास अडथळा करते. समोर असलेल्या प्रत्येक पर्यायाच्या फायद्या तोट्याचे गणित बहुतेक वेळा अशक्य असते. अशावेळी बहुतेक जण अंदाजाने व्यवहार करतात. अशावेळी भावना वापरणे हितकर आहे का? असा उपप्रश्न त्यातून निघतो. शांता सुधा विचारप्रवृत्तीत या प्रश्नाचे स्थान मोठे आहे. संस्थेला मदत देण्यात त्यातील किती अंश किती वेळाने जरूर पडणार्‍यांकडे वळतो? हा बुद्धीवादी निकष पार करता येत नसेल तर भावनेप्रमाणे गरजवंताला तात्काळ द्यावी का? असे हे द्वंद्व आहे.

प्रमोद

सहमत

प्रत्येक पर्यायाच्या फायद्या तोट्याचे गणित बहुतेक वेळा अशक्य असते. अशावेळी बहुतेक जण अंदाजाने व्यवहार करतात. अशावेळी भावना वापरणे हितकर आहे का? असा उपप्रश्न त्यातून निघतो.

ब्लिंक या 'सेल्फ हेल्प (आत्मविश्वास संवर्धनार्थ?)' पुस्तकात तसा दावा आहे असे वाटते.

नैतिक पेक्षा संयुक्तिक जास्त योग्य

काही कारणामुळे या दोघी अविवाहितच राहिल्या

हे कारण जर गोरगरीबांना मदत करणे हे असेल तर दोन्ही पद्धती नैतिक आहेत.

त्यांच्या वडिलांनी या बहिणींच्या नावे भरपूर इस्टेटी करून ठेवल्यामुळे त्या इस्टेटीच्या उत्पन्नावरच गुजराण करत

असेल तर दिलेले दान सार्थकी लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण त्या पैसे कमावत नाहीत आणि इस्टेटीत भर घालत नाहीत. (म्हणजे हे पैसे कधीतरी संपतील). शांताची मदत ही मुख्यतः आणीबाणी परिस्थीत केलेल्या मदतीमध्ये मध्ये मोडते. त्यामुळे ती जास्त लक्षात राहते. सुधाची मदत गोरगरीबीचे समूळ उच्चाटन करणे या पद्धतीत मोडते. गृहीत धरा की ज्या संस्थांना ती मदत करते त्या संस्था काही शाळा चालवत असाव्यात. शिक्षणाने उद्धार ही दूरदृष्टी आहे. किंवा दवाखाने, व्यसनमुक्ती , लघु-उदयोग वगैरे. गरीबाला पैसे देऊन त्याची फक्त तात्कालिक निकड दूर होईल पण गरीबी दूर होणार नाही. तिने स्वतःचीच संस्था काढली किंवा त्या संस्थांच्या संचालक मंडळात सहभागी झाली तर पैशाच्या विनियोगावर अधिक लक्ष ठेवता येईल.

सुधाच्या वाटणीची २० टक्के रक्कम तिने रोकड स्वरूपात आणीबाणीसाठी त्वरीत उपलब्ध ठेवली असेल तर शांता करते तशी मदत तीही करू शकते. तिच्या एकूण वर्णनावरून ती तसे करतही असावी. त्यामुळे माझ्या मते वडीलांच्या इस्टेटीतून मिळणार्‍या पैशाचा विनियोग सुधा अधिक चांगल्या प्रकारे करत आहे.

भविष्यात शांता आणि सुधा दोघी नसल्या तरी संध्याने केलेलं कार्यच गरीबांच्या उपयोगी पडणार आहे. शांता ही एखाद्या कर्ण टाईप दानशूर राजाप्रमाणे आहे. आणि संध्या फुले टाईप समाज-सुधारक. राजा आणि राजाचं राज्य गेलं की गरीब पुन्हा उघडे पडतील.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

प्रश्न चुकीचा

"जास्त नैतिक जीवन जगणारी दोघीपैकी कोण" हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. थोडेसे एखादा माणूस हिन्दु आणि एखादा मुस्लीम आहे तर त्यात जास्त धार्मिक कोण असं विचारल्यासारखंसं आहे.

 
^ वर