भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १

सध्या आपल्या आसपास एकस्व (पेटंट) ह्या विषयाबाबत अनेक चुकीच्या समजुती प्रचलित झाल्याचे दिसते. ह्या लेखमालिकेद्वारे मी माझ्या वकुबानुसार भारतीय एकस्व कायद्याची ओळख करून देण्याचा, तसेच ह्या चुकीच्या समजुती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्याविषयातले उपक्रमावरील तज्ज्ञ व इतर सुजाण सदस्य ह्या प्रयत्नात सहभागी होतील ह्याची मला आशा आहे. ह्यानिमित्ताने सगळ्यांच्या सोबतीने माझ्यासारख्या मामुली अभ्यासकाचे ह्या विषयाचे आकलन समृद्ध होईल ह्याचीही मला खात्री आहे.

बौद्धिक संपदा आणि बौद्धिक संपदेचे प्रकार

बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीने घडवलेली किंवा बुद्धीद्वारा घडलेली निर्मिती. नाटककार नाटके लिहितो, शिल्पकार शिल्पे घडवतो, फोटोग्राफर फोटो काढतो, कवी कविता लिहितो आणि संगीतकार त्याला संगीत देतो तेव्हा हे सगळे जण बौद्धिक संपदेची निर्मिती करत असतात. अशा साहित्यिक-वाङ्मयीन, नाट्यात्मक, सांगितिक आणि कलात्मक (लिटररी, ड्रमॅटिक, म्यूझिकल व आर्टिस्टिक) निर्मितीला प्रतलिपी अधिकार (कॉपिराइट) कायद्याचे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

एखादा संशोधक नव्या औषधाचा शोध लावतो. (प्रॉडक्ट) किंवा औषधनिर्मितीच्या नवी प्रक्रियेचा (प्रोसेस) शोध लावतो तेव्हा तोही बौद्धिक संपदेची निर्मिती करत असतो. अशा निर्मितीसाठी भारतीय पेटंट कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होऊ शकते.

एखादा सुर्वणकार सोन्याच्या दागिन्यांची आणि सुतार खुर्चीची नवी डिझाइने बनवतो तेव्हा त्यांच्या ह्या सृजनाला डिझाइन ऍक्टद्वारे संरक्षण प्राप्त करून घेऊ शकता येता. तर एखादा व्यापारी व्यापारासाठी नव्या व्यापारचिन्ह बनवतो तेव्हा त्याला ट्रेडमार्क कायद्यानुसार संरक्षण मिळू शकते.

एखादा प्रदेश विशिष्ट उत्पादनांसाठी प्रसिद्ध असतो. उदाहरणार्थ, कोल्हापूर कोल्हापुरी चपलांसाठी, गोवा फेणीसाठी, स्कॉटलंट स्कॉचसाठी आणि बेळगाव कुंद्यासाठी प्रसिद्ध आहे. ज्या उत्पादनांची खासियत विशिष्ट भौगोलिक प्रदेशांसाठी निगडित आहे अशा उत्पादनांची भारताच्या भौगोलिक उपदर्शनाच्या (जिओग्राफिकल इंडिकेशन) रजिस्ट्रीत नोंद करता येते अशा प्रकारे नोंद झालेल्या उत्पादनांची इतरत्र निर्मिती करून विकण्यावर निर्बंध येतात. उदाहणार्थ, स्कॉच ही स्कॉटलंडमध्ये गाळलेली असली पाहिजे. इतरत्र कुठेही गाळलेल्या स्कॉचसदृश मद्याला स्कॉच म्हणून विकता येत/येणार नाही.

एकंदर भारतात बौद्धिक संपदेची व्यवस्था राखण्यासाठी खालील कायदे अस्तित्वात आहेत:

१. एकस्व कायदा, १९७०;
२. प्रतिलिपी अधिकार कायदा, १९५७;
३. व्यापारचिन्हे कायदा, १९९९;
४. डिझाइन कायदा, २०००;
५. वस्तूंच्या भौगोलिक उपदर्शनाचा कायदा (नोंदणी व संरक्षण), १९९९ [जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ़ गुड्ज़ (रजिस्ट्रेशन अँड प्रटेक्शन) ऍक्ट, १९९९];
६. एकात्मीकृत अर्धवाहक परिपथ रेखांकन-डिझाइन कायदा, २०००1 [सेमिकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट-डिझाइन ऍक्ट, २०००];
७. वनस्पती-वैविध्य आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाचा कायदा, २००१ 2 [प्रटेक्शन ऑफ़ प्लांट वरायटीज़ अँड फार्मर्ज़ राइट्स ऍक्ट, २००१];
८. जैव-वैविध्य कायदा, २००२ 3 [द बायलॉजिकल डायवर्सिटी ऍक्ट २००२].

शेवटी महत्त्वाचे म्हणजे बौद्धिक संपदा ही अमूर्त मत्ता आहे. पण असे असले तरी मूर्त मत्तेसारखे तिचे हस्तांतरण करता येते. बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. पण ह्या कायद्यांद्वारे संरक्षण प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी मालमत्ताधारकाची आहे.

ह्या भागापुरते एवढेच. पुढच्या भागात आपण भारतीय पेटंट कायद्याच्या ठळक वैशिष्ट्यांची ओळख करून घेणार आहोत.


1,2,3 ह्या कायद्यांचा संबंध बौद्धिक संपदेशी आणि एकस्व कायद्याशी कसा आहे हे पुढच्या भागांत सांगण्याचा प्रयत्न करीन.

Comments

सुंदर सुरुवात

बौद्धिक संपदेसंदर्भातील प्रमुख कायद्यांची थोडक्यात तोंडओळख चांगली केली आहे. सुरुवात तर छान झाली आहे आता पुढील भाग वाचण्यास व जमेल तशी भर घालण्यास उत्सुक!

जयेश

चांगली सुरुवात

चांगली सुरुवात आणि सोप्या भाषेतली ओघवती माहिती आवडली.

कृपया, पुढील भागही मोजक्याच लांबीचे* ठेवा आणि भाषाही अशीच सोपी ठेवा.

* या लेखाच्या लांबीपेक्षा किंचित मोठी लांबी चालेल.

चांगली सुरुवात

सुस्पष्ट शैली आवडली.

लेखमाला उत्सूकतेने वाचत आहे.

छानच

चांगला विषय आहे आणि मांडणी पण छान जमली आहे. फार खंड न पाडता पुर्ण करावी लेख मालीका :)
संपादक/उपक्रम पंतांना विनंती - चांगली लेख मालिका होणार आहे तेंव्हा त्याचा योग्य ठिकाणी कायम स्वरुपी दुवा बनवावा.






सहमत

| संपादक/उपक्रम पंतांना विनंती - चांगली लेख मालिका होणार आहे तेंव्हा त्याचा योग्य ठिकाणी कायम स्वरुपी दुवा बनवावा.

सहमत..
||वाछितो विजयी होईबा||

धन्यवाद

छान विषय.

धन्यवाद

प्रियाली, हा भाग थोडा लांब असायला हवा होता असे मलाही वाटते आहे. ह्या भागांत थोडी भर घालण्यासाठी मी थोडा मजकूर व्यवस्थापनाकडे/संपादन विभागाकडे पाठवला आहे. ही भर लवकरच टाकण्यात येईल अशी आहे.

धन्यवाद जयेश, प्रियाली, धनंजय, चाणक्य, रिकामटेकडा. इतर वाचकांचाही मी आभारी आहे.

प्रॉडक्ट पेटंट

चांगला लेख.

पूर्वी डब्लू टी ओ पूर्वी एखादे औषध बाजारात आले की भारतीय औषध कंपन्या ते औषध बनवण्याची वेगळी पद्धत विकसित करीत आणि ते औषध खूप कमी दरात उपलब्ध करून देत. याचे कारण मूळ औषध शोधण्यात आणि त्याच्या ट्रायल वगैरे घेण्यात होणारा खर्च या कंपन्यांनी केलेला नसे. प्रॉडक्ट पेटंट नसल्याने मूळ शोधकर्त्या कंपनीला हात चोळीत बसावे लागे. पाश्चात्य जगात प्रॉडक्ट पेटंटची कल्पना पूर्वीपासून होती.

डंकेल प्रस्तावात या ऐवजी प्रॉडक्ट पेटंटचा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे आता पहिली काही वर्षे मूळ शोधक कंपनीचा स्वामित्वहक्क राहतो. तेच औषध दुसर्‍याप्रकारे बनवून विकता येत नाही.

नितिन थत्ते

धन्यवाद.

धन्यवाद नितीन. ट्रिप्सशी (ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा बौद्धिक संपदेची व्यापारविषयक अंगे) जुळवून घेण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यांत सुधारणा करण्यात आल्या. त्याविषयी पुढच्या भागात.

आक्षेप

प्रॉडक्ट पेटंट पद्धतीवर बरेच आक्षेप आहेत. या विषयात रुची असणार्‍यांनी हा लेख जरुर वाचावा. लेख २००५ सालचा आहे परंतु दुसरी बाजू समजण्यासाठी वाचला पाहिजे.
जयेश

चांगला लेख

सोप्या शब्दात माहितीपूर्ण लेख.

भारतातील एकस्व रक्षण कायद्यांप्रमाणेच त्या संदर्भात काही "केस स्टडीज्" असतील तर त्या पण नंतरच्या भागात सांगितल्या तर वाचायला आवडतील.

लेख चांगला आहे

लेख चांगला व माहितीपूर्ण आहे. विशय नवीन आहे (माझ्यासाठी)!

तुम्ही वर

एखादा संशोधक नवे औषध शोधतो1
हे वाक्य लिहीले आहे ते इंग्रजीत विचार करून लिहीले असावे. "(व्हेन) अ सायंटिस्ट इंव्हेंटस अ मेडिसीन" अशा पद्धतीने विचार केल्यामुळे व मराठीतून विचार न केल्यामुळे 'मराठीशैली' वरील वाक्यातून व्यक्त झालेली नाही.

"जेंव्हा एखादा संशोधक नव्या औशधाचा शोध लावतो." किंवा
"जेंव्हा एखादा संशोधक नव्या औशधाच्या विधीचा शोध लावतो."
अशाप्रकारचे वाक्य आपल्याला सुचले असते, आपण तसे लिहीले असते.

"शोधणे" व "शोध लावणे" हे दोन वेगवेगळे अर्थवाही शब्द आहेत. इंग्रजीत जसे दोन दोन वेगवेगळे 'दिसणारे शब्द' आहेत तसे मराठीत हवेत. असे म्हणत असाल तर, -

'युक्तीयोज' हा शब्द 'इनव्हेंट' साठी कसा वाटतो?
वाक्यप्रयोग:- 'टू इनव्हेंट'- 'युक्तीयोज करणे' हा असा होवू शकेल का?

धन्यवाद

शोध लावणे हा पर्याय चांगला वाटतो आहे. संपादकांना मी तसा बदल करण्याची विनंती करतो.

कॉपीकरण की देशीकरण

एकस्व कायदा १९७० साली केला गेला. तो कायदा कोणत्या केस अथवा संदर्भातून निर्माण केला गेला? की, नेहमी प्रमाणे गो-या देशातील कायद्याचे कॉपीकरण आहे?- देशीकरण न करता?

किती ट्याक्स

पेटंट मिळवून जर व्यावसायिक वापरासाठी ते दिले तर त्यावरील पैशांना किती ट्याक्स लागतो? कारण जी वस्तू अस्तित्वात नव्हती ती जर मी विकसित केली आणि "विकली" तर ती कोणत्या कराच्या प्रकाराखाली येते?

युरेका

इन्वेन्शन = शोध लावणे (अस्तित्वात नसलेल्या गोष्टीचा शोध लावायचा)
डिस्कवरी = शोधून काढणे (अस्तित्वात असलेली गोष्ट शोधून काढायची)
असा फरक करता येईल का??

||वाछितो विजयी होईबा||

सुरेखा, सुरेखा!!!

विठाबाई शाळेत शिकली. सुशिक्शीत विठाबाई आज ग्रामपंचाईतीच्या निवडणूकीला उभी राहतेय. शिक्शणामुळे आज तीचा आत्मविश्वास दुणावला आहे.
वरील वाक्यांमधील 'शिक्शा' या शब्दाप्रमाणे 'शोध लावणे' हा (एक) अर्थवाही शब्द खालील वाक्यात तुम्ही कसा वापरणार?

अ न्यू सायंटिस्ट हॅज इनव्हेंटेड अ ड्रग. दी इनव्हेंटर सायंटिस्ट इज नाऊ बीकेम टॉक ऑफ द टाऊन. दिस न्यू इनव्हेंशन हॅज इम्प्रूव्हड द लाईफ ऑफ मेनी पीपल.

फारच छान!

अतिशय उपयुक्त माहिती देणारा सोप्या शब्दातील लेख. क्लिष्ट संकल्पना सोप्या होत आहेत. पुढील भागांसाठी शुभेच्छा!!

अवांतर: मध्यंतरी एका संकेतस्थळावर योगा आणि त्याच्या पेटंटवरुन चर्चा झाली होती. ह्या लेखमालेतून तिथले काही गैरसमज होण्यास मदत होईल असे करता येईल का?

इन्व्हेन्शन

इन्व्हेन्शनसाठी शब्दकोशात नवशोध हा शब्द दिला आहे. त्याहून चांगला शब्द, म्हणजे हिंदीत वापरला जाणारा आणि मराठीतही रूढ होऊ शकेल असा आविष्कार हा शब्द!
क्रियापद : आविष्कार केला/झाला/घडला वगैरे.--वाचक्नवी

व्हॉट अबाऊट 'युक्तीयोज'?

एखाद्या संशोधनाची प्रक्रिया अविरत होण्यातून जेंव्हा ती प्रक्रिया सत्याच्या जवळ येते तेंव्हा हवे ते सत्य गवसते. आणि ते सत्य गवसणे म्हणजे 'शोध लागणे' असते. 'शोध लागतो' तेंव्हा कमीत कमी दोन गोश्टी घडतात. एका अंगाने असतो -(इंग्रजी) 'वॉव इफेक्ट' व दुसर्‍या अंगाने असतो 'त्या सत्यापर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेचे शब्दबद्ध प्रारूप/पायर्‍या/'.

हे दुसरे अंग असते 'त्या सापडलेल्या युक्तीच्या योजनाचा नियम/ सूत्र/पायर्‍या/विधी इत्यादी.
मराठीतील 'अविश्कार' हा शब्द तो त्या 'वॉव' साठी, 'सादरीकरणा','पेश करण्यासाठी (इथे होण्यासाठी)' साठी असतो.
उदा.: नृत्यांगनेने तिच्या नृत्याविश्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

'दुसर्‍या बाजूसाठी 'युक्तीयोज' हा शब्द कसा वाटतो?' असे वर मी यासाठीच विचारलेले होते.
अ न्यू सायंटिस्ट हॅज इनव्हेंटेड अ ड्रग. दी इनव्हेंटर सायंटिस्ट इज नाऊ बीकेम टॉक ऑफ द टाऊन. दिस न्यू इनव्हेंशन हॅज इम्प्रूव्हड द लाईफ ऑफ मेनी पीपल.
एका नव्या संशोधकाने एक नवा शोध लावला आहे. हा युक्तीयोजक संशोधनकर्ता आज सर्व शहरात चर्चेचा विशय बनून राहिला आहे. ह्या नव्या युक्तीयोजनामुळे सामान्य जनांचे आयुश्य सुधारले आहे.

 
^ वर