अनिल अवचट : एक न आवडणं २
ज्ञानदाताईंनी लेखक सतीश तांबे ह्यांची प्रश्नावली मागील चर्चेत डकवली होती. तिच्या अनुषंगाने चर्चा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले आहे:
या निमिताने एक प्रश्नावली लेखक सतीश तांबे यांनी पाठविली आहे.
ती पोस्ट करते.
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
या प्रश्नांच्या उत्तरातून वैयक्तिक टीकेपलीकडे काही अधिक उलगडेल असे वाटते.
असो. इच्छा असल्यास तांबे यांच्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते असे मला वाटते.
-ज्ञानदा.
त्यांची अपेक्षा बघता आणि आधीच्या चर्चेवरील प्रतिसादाची संख्या बघता अनिल अवचट : एक न आवडणं ह्या चर्चेचा दुसरा भाग सादर आहे. प्रश्नावलीच्या अनुषंगाने चर्चा करावी, ही विनंती. चला तर मग व्हा सुरू.
Comments
मत
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
तार्किक दृष्ट्या कोणत्याही लेखन स्वरूपास साहित्य असे संबोधले जाऊ शकते, मी देखील तशीच व्याख्या करतो. ॲन फ्रँक ची दैनंदिनी देखील मग साहित्य होऊ शकते, किवा चित्रपटाची कथा देखील साहित्य होऊ शकते किवा गीतेचे विवरण देखील साहित्य असू शकते.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
वृत्तपत्रीय लिखाण हा साहित्याचा एक प्रकार आहे असे मानले जाऊ शकते.
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
काल्पनिक, ललित, आणि अकाल्पनिक असे मूळ वर्ग असू शकतात, प्रकारांमध्ये कथा/कादंबरी, वैज्ञानिक लेखन, पत्रकारिता, नाटक, पटकथा, कविता,अनुवाद, दैनंदिनी , व्यक्तिचित्रण, ललित कथा, लोककथा, निबंध, इतिहास इत्यादी असू शकतात.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
पातळीची व्याख्या करावी लागेल, रूढ अर्थाने पातळी हि प्रत्येकाची निवड/आवड आहे, प्रत्येकाची जाणीव किती समृद्ध आहे ह्यावर किती आणि कोणचे लेखन आवडते हे अवलंबून असू शकते.
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
"थोर साहित्यिक" ची व्याख्या करावी लागेल, तरीही रूढ अर्थाने महाराष्ट्राचे लाडके दैवत असे संबोधले असेल तर आपल्या व्याख्येच्या अनुपस्थितीत हो ते थोर साहित्यिक असे मानावे लागेल अथवा ते नाहीत असे सिद्ध करावे लागेल. आपण जे साहित्य प्रकार पुलंच्या बाबतीत सांगितले आहेत तेवढेच केले कि माणूस साहित्यिक होतो असे आपले मत आहे काय? आणि अमुक लेखक तमुक लेखकापेक्षा जास्त आवडतो असे म्हणणे म्हणजे आपल्याच साहित्यिक जाणीवेचा/चवीचा तो अपमान आहे असे वाटत नाही का? तसेच काहीसे अवचट-ह्यांच्याबद्दल, तुम्हाला लेखकांचे असे वर्गीकरण करायला आवडते का? कि तो पत्रकारितेचा गुण आहे? मला पुलं/दुर्गा भागवत/वपू सगळेच आवडतात, मी अमुक एकाला थोर किवा बकवास असे वर्गीकरण करत नाही.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
लोकांना पुलं आवडतात म्हणून आपल्याला पुलं आवडत असतील तर मी आधी म्हणल्याप्रमाणे साहित्यिक-टेस्ट-बड्स मध्ये झोल आहे, पण एवढ्या लोकांना पुलं एवढ्या काळासाठी आवडत असतील तर त्यामध्ये आवडण्यासारखा नक्कीच काहीतरी असला पाहिजे हा तर्क असू शकतो, उगाच पुलं प्रभात रोड वर राहत होते म्हणून आवडतात असे असायची शक्यता कमी.
आता मुद्दा मान देण्याचा, एकाच व्यासपीठावर तुलना असावी. राखी सावंत, पुलं, गोलमाल३ हि तुलना म्हणजे तुम्हाला लेजचे वेफर्स आणि लुई फिलीप चे कपडे सारखेच आवडतात का असे विचारण्यासारखे आहे.
वाचक ज्याकडे "वाचनीय" म्हणून पाहतो ते साहीत्य
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
अगदी एखाद्याने पत्रे लिहीली तरी त्याचे अमक्याने तमक्याला लिहीलेली पत्रे असे पुस्तक निघु शकते.
म्हणून माझी साहीत्याची व्याख्या- वाचक ज्याकडे "वाचनीय" म्हणून पाहतो ते साहीत्य.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
वर उत्तर दिले आहे.
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
वर उत्तर दिले आहे.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
वर उत्तर दिले आहे.
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
आजुनकोणमी ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.
तुम्ही स्वतःला एक लेखिका म्हणून वरील व्यक्तिशी कशी तुलना कराल? तुलनेसाठी कोणते मुद्दे घ्याल? ते द्यावेत.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
आजुनकोणमी ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.
अवांतर प्रतिक्रिया
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
आधी देवाची मग खूर्चीची असा नंबर लागला आहे.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
किती टक्के साहित्य? टक्केवारीत बोलता येईल.
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
आधी व्याख्या मग आद्य साहित्यकार कोण त्यानंतर वर्गवारी.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
सगळीकडे लेवल प्लेईंग फिल्ड.
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
आजपर्यंतच्या बहुतेक साहित्यिकांनी आंतरजालावर कुठलेच लिखाण केले नसल्याने. ते सर्व निकृष्ट दर्जाचे आहेत.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
कुठले लोक हे फार महत्वाचे (जालीय साक्षर नसलेल्यांना लोक मानले नाही तर हा श्रेष्ठतेचा निकष आहे.). इकडील यादी वेगळी आहे.
प्रमोद
राखी सावंत
राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
भांडकुदळपणा आणि प्रसिद्धीलोलुपता म्हटले की राखी सावंत आठवते हे खरे असले तरी मराठी आंतरजालाशी राखी सावंत ह्यांचा संबंध काय? कळत नाही. आणि कुहू कुहू करीत नसले तरी अवचट हे आंतरजालावरही असतात. त्यामुळे तेदेखील नक्कीच मोठे लेखक आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
साहित्य की वाङ्मय?
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
माझ्या माहितीनुसार गूळ, मीठ, खोबरे, आमसूल, डाळ, मेथी इत्यादी चीजवस्तूदेखील साहित्यात मोडतात. (साहित्य हा शब्द ऐकला की "लिहून घ्या साहित्य आणि पाककृती" हे वाक्यदेखील आठवते.) बहुधा तांब्यांना वाङ्मय हा शब्द सुचला नसावा. किंवा त्यांनी जाणूनबुजून साहित्य हाच शब्द वापरला असावा. त्यामागे काहीतरी डिझाइन असावे. ह्या निमित्ताने साहित्य आणि वाङ्मय ह्या दोहोंतला फरक उपक्रमी जाणकारांनी समजावून सांगितल्यास बरे होईल.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उत्तरे
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
साहित्याची माझी सोपी सरळ व्याख्या म्हणजे लेखनकला. ती साध्य असणारे पांढर्यावर काळे केलेल्यापैकी अनेक लेखनप्रकार साहित्य म्हणता येतील.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
एकच कसे मानता येईल? परंतु वृत्तपत्रातील लिखाण साहित्य भासण्याची शक्यता आहे.
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
या दुव्यावर डावीकडे जे वर्गीकरण आहे ते मला साहित्याचे प्रकार आणि वर्गवारी म्हणून मान्य आहेत.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
नाही, समान नसावेत. ते समान असण्याची गरजही वाटत नाही. बाकी, पातळी कशी ठरवायची हा मूलभूत प्रश्न सुटलेला नाही.
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
पु.लंच्या लेखनाची यादी गेल्या चर्चेत दिली होती. त्यात त्यांचे अनेक लेखनप्रकार समाविष्ट दिसतात. प्रश्नकर्त्याचे थोर म्हणजे किती थोर हे माहित नाही परंतु मराठी साहित्यात आदराने नाव घेता येईल इतके थोर आहेत असे मला वाटते. अनिल अवचटांचे मी काहीही वाचलेले नाही त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही. त्यांना प्रसिद्धी मिळते, लोकप्रिय आहेत एवढेच माहित आहे.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
हो. लोकप्रियता हा श्रेष्ठतेचा निकष मानता येईल परंतु हा एकमेव निकष नाही. गोलमाल३ ही व्यक्ती नाही. असल्यास मला ठाऊक नाही. बाकी, लोकप्रियतेचा आणि मान देण्याचा परस्परसंबंध असेलच असे नाही. या व्यक्तिंच्या लोकप्रियतेला मान्यता देण्याचा प्रश्न असल्यास हो राखी सावंत, पु.ल. आणि अवचट यांची लोकप्रियता मला मान्य आहे.
माझीही उत्तरे
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
आम्ही साहित्याची व्याख्या करत नाही. आम्हाला जे वाचता येते ते साहित्य. निविदा सूचनेपासून कवितेपर्यंत.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
आधीच्या उत्तरासोबत वाचल्यास वृत्तपत्रीय लिखाण साहित्यात मोडते.
३) साहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
आम्ही वर्गवारी करीत नाही.
४) तुमच्या लेखी सर्व साहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
ते मूडवर अवलंबून आहे. कधी कधी तर पाककृती वाचूनही गहिवरून येते. तर कधी मार्क्वेझचा 'सरियलिझम' वाचून. (इथे मार्क्वेझचे नाव मुद्दाम घेतले आहे. म्हणजे काय! पुढच्या वेळी यमुनापर्यटनचा उल्लेख करणार आहे बरं का.)
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती? अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
नाही. नाही. पुलं टागोर नाहीत. आणि अवचट अवचट आहेत.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
लोकप्रियता नव्हे तर अतिशय कंटाळवाणे लेखन श्रेष्ठतेचा निकष आहे की काय? ह्याबाबत आमचा आदर्श तुकाराम.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
थोडी घाईत उत्तरे
साहित्य=वाङ्मय अशा अर्थी घेतले आहे. म्हणजे स्वयंपाकघरातले साहित्य वगैरे घ्यायला नको.
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
ढोबळ व्याख्या करतो, असे वाटते. पण ती व्याख्या अगदी मूलभूत वगैरे नाही. बोलल्या-बोलल्या (लिहिल्या-लिहिल्या) काही क्षणात संदेश विरून जावा असा हेतू असेल, तर त्याला साहित्य मानत नाही. म्हणजे "अरे ए आळशा, उठतोस की नाही आता" असे पालक मुलांना म्हणतात ते, प्रेमी जनांची कुजबुज, बाजारात जाताना बनवलेली यादी... या गोष्टींबद्दल साहित्यिक आस्वादविचार मी सहसा करत नाही. मात्र ही व्याख्या "काळ्या दगडावरची रेघ" वगैरे नाही. एखादी यादी आस्वाद्य असू शकते. प्रेमिकांची गुफ्तगूसुद्धा. "ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर" मध्ये नायक नायिकेचे नाव रागाने अनेकदा ओरडतो, तेसुद्धा. सामान्यपणे या सर्वांना "याचा आस्वाद घ्या" म्हणणारी चौकट लागते.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
"एकच"ला तांत्रिक अर्थ आहे ना? म्हणजे सर्व साहित्य वृत्तपत्रीय लिखाण असते, आणि सर्व वृत्तपत्रीय लिखाण साहित्य असते, असे? बहुधा येथे प्रश्न विचारायचा होता - "वृत्तपत्रीय लिखाणही साहित्य असते काय?" असे असेल तर माझे उत्तर "होय".
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
सोयीसाठी करावीशी वाटते. म्हणजे नाटकाच्या प्रयोगाच्या जाहिरातीत "नाटक" असे लिहिले असते, "कवितावाचन" असे लिहिलेले नसते, हे मला सोयीचे जाते. उपलब्ध साहित्यापैकी अस्वाद-मनःस्थिती अनुसार निवड करायला बरे.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
प्रश्न समजला नाही.
प्रश्न विचारणार्याचे अध्याहृत गृहीतक आहे "कथावस्तूची निर्मिती असते तेच साहित्य". मला ही व्याख्या माहीत नव्हती. ही व्याख्या फारशी उपयोगी वाटत नाही, म्हणून ती सध्यापुरती मानून उत्तर द्यायचे मन होत नाही.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का? असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
अनेक निकषांपैकी एक निकष मानतो खरा. सोयीस्कर निकष आहे, एवढेच. म्हणजे एखादे नाटक खूप लोकांना आवडले, आणि त्यांनी आवड मला सांगितली, तर ते नाटक बघण्याबद्दल अधिक कुतूहल होते. पण माझ्याशी आवड-निवड जुळणार्या मित्राने प्रशस्तीपत्र दिल्यास त्याला अधिक वजन देतो. असे असल्यास आवर्जून नाटक बघतो, पुस्तक वाचतो, वगैरे. या मुद्द्याचा "राखी सावंत, गोलमाल३..." यांशी काय संबंध आहे, ते कळलेले नाही.
सहमत
धनंजय यांच्या अक्षरा-अक्षराशी सहमत. माझीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे मी वेगळं काही लिहिण्याचा प्रश्नच येत नाही.
ही चर्चा भाग - २ असल्याने मूळ लेखनाचा संदर्भ धरूनच वरील प्रश्नांच्या आधारे चर्चा व्हावी अशी अपेक्षा दिसते आहे. मी ज्ञानदाताईंना विनंती करतो की त्यांनीही वरील प्रश्नांची उत्तरं देऊन मूळ लेखनात काढलेल्या निष्कर्षांचे आपले निकष सांगावेत.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
एक मासला
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
प्रश्न समजला नाही.
मराठीतले एक उदाहरण देतो म्हणजे कदाचित समजायला उपयोग होईल. भालचंद्र नेमाडे यांनी (बहुदा टीकास्वयंवर या ग्रंथात समाविष्ट केला गेलेल्या ) एका लेखात असे म्हण्टलेले आहे की, कथालेखन वगैरे कलाप्रकार कादंबरी लिखाणापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. जी ए कुलकर्णी या बहुचर्चित कथाकाराच्या ग्रीककथा, पुराणकथा, मिथककथा, रूपककथा इत्यादि गोष्टींवर आधारलेल्या कथांना नेमाड्यांनी "चांदोबातल्या कथा" असे म्हण्टलेले आहे.
मासल्यात थोडा मसाला
नेमाडेंच्या या तिरकस मताला प्रस्थापित मासिके ( सत्यकथा) , त्यांचा कथालेखकांवर अप्रत्यक्ष दबाव (मागणी - पुरवठा, प्रसिद्धी , त्या अनुरुप संपादन: भागवत - पटवर्धन) , त्यामुळे खुरटलेली (उगाच टोकेरी झालेली )अभिव्यक्ती , कादंबरी सारखा बहुसूत्री प्रकार समर्थपणे हाताळता न येणे असे तत्कालीन अस्सल देशी पैलू होते. चेकाव्ह वगैरेच्या कथांना नेमाडे थोरच मानतात असे त्यांच्या मुलाखतीत वाचल्याचे आठवते.
टीकास्वयंवरात नेमाडेंनी कवितेला शीर्षस्थानी बसवले आहे.
कादंबर्यांमध्ये जगण्याला सर्वोच्च मूल्य देऊन साहित्याला त्याखाली दाबले आहे.
मसाल्यात अजून थोडी फोडणी
सतीश तांबे यांनी आपल्या "राज्य राणीचं होतं" या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेमध्ये नेमाड्यांचे नाव घातलेले आहे ! तेव्हा या धाग्याचे वर्तुळही येथे पूर्ण होते, बरे ! :-)
सांस्कृतिक संदर्भानुसार
सांस्कृतिक संदर्भानुसार असे काही होत असेल असे वाटते.
एखाद्या प्रकारची रचना अभिजात मानली जात असेल, तर अनेक कुशल साहित्यनिर्माते त्या प्रकारात आपले कौशल्य पणाला लावत असतील. त्या समाजापुरती ती "सेल्फ फुल्फिलिंग प्रॉफेसी" होत असेल.
येथे काही विस्कळित विचार मनात येतात.
"हायकू" विरुद्ध "चारोळी" : काही जपानी कवींचे मोजकेच हायकू शतकानुशतके आस्वाद्य राहिलेले आहेत. म्हणजे कृती किती लहान आहे यावर तिची उच्चनीचता ठरत नाही. कवितांच्या बाबतीत अल्पाक्षरत्वात पुष्कळदा हुन्नर दिसते. विसाव्या शतकातल्या मराठी "चारोळी"ला अशी आस्वादपरंपरा नाही. अभिजात कौशल्याचा सांस्कृतिक संदर्भ असता, तर उच्च कोटीच्या चारोळ्या निर्माण झाल्या असत्या, असे मला वाटते. चोखंदळ वाचकवर्गाने अव्वल चारोळीकारांना समर्थन दिले असते, निकृष्ट चारोळीकारांना झोडपले असते... एखाद्या कवीची महत्त्वाकांक्षा असती - आज हजार वाचकांचा क्षणिक वाहवाह! मिळवायचा नाही. मोजक्याच वचकांच्या मनात कविता टिकून राहिली पाहिजे - उद्याच्या मोजक्या वाचकांनी कविता वाचली पाहिजे... मात्र झाले काय - एकसुरी अकुशल चारोळ्याचा सुळसुळाट झालेला आहे.
इंग्रजीत आणि अन्य काही युरोपीय भाषांतले सॉनेट घ्यावे. अनेक कुशल कवींनी कवितेसाठी ही चौकट निवडली. १० मात्रांच्या १४ ओळी या आकड्यांत वैश्विक जादू, श्रेष्ठता नाही. सॉनेट हा काव्यप्रकार श्रेष्ठ आहे, कारण त्याला कुशल लखनाची परंपरा आहे. सॉनेट लिहिणार्या प्रत्येक कवीची कविता वाचताना रसिक पेत्रार्क/शेक्सपियर...फ्रॉस्ट सर्वांशी आपसूख तुलना करतो. मला वाटते, वेगळ्या कुठल्या मात्रासंख्येत इतक्या दर्जेदार साहित्याची परंपरा उपलब्ध असती, तरी चालले असते.
काही बाबतीत आकारमानातही भव्यता असते. कादंबरीत जर प्रतिविश्व निर्माण होत असेल, तर ते बारकाव्यांसह निर्माण होण्यात कलाकारी आहे. आकारमानात नुसती खोगीरभरती असू शकते, हे खरे आहे. पण रचनेमध्ये जर समृद्धी असली, तर कर्तबगारी मोठ्या आवाक्यामुळे श्रेष्ठ होऊ शकते.
कविता विरुद्ध कादंबरी यांची श्रेष्ठकनिष्ठता मला सांगता येत नाही. त्यांच्यात कौशल्य दिसते, ते अगदी वेगवेगळ्या गुणांचे.
लघुकथा/व्यक्तिचित्रे वगैरेंबद्दल सुद्धा श्रेष्ठकनिष्ठतेचा वाद भाकड आहे, असे मला वाटते. तरी कोणी युक्तीने माझ्याकडून उत्तर वदवून घेऊ शकेल. कुशल कादंबरीकारांच्या कादंबर्या, दर्जेदार दिवाळी अंक, लघुकथासंच... अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके माझ्यापुढे पुस्तकाच्या दुकानात असली, आणि खर्चासाठी मर्यादित रक्कम असली, तर मी काय विकत घेईन? मला पटकन उत्तर सांगता येत नाही. दिवसा-दिवसानुसार उत्तर बदलेल असे वाटते. आजवर प्रत्यक्षात कादंबर्या आणि कवितासंग्रह विकत घेतलेले आहेत. आणि नाटके. पण थोडे कथासंग्रहसुद्धा विकत घेतलेले आहेत.
अच्छा - टीकास्वयंवरातले विश्लेषण वाचून बघतो.
कुशल साहित्यनिर्माते
कुशल साहित्यनिर्माते ही शब्दयोजना करताना धनंजय ह्यांच्या मनात सद्हेतूच होता असे वाटते. पण कुशलता, कौशल्य हा शब्द साहित्यनिर्मितीसाठी आला की की सरावाने जमणारी कारागिरी/क्राफ्ट्समनशिप अभिप्रेत असते, असे वाटते. पण एखाद्या लेखकाला थोडे किंवा बहुत कमी लेखण्यासाठी अनेकदा हे शब्द वापरले जातात हे धनंजय ह्यांना कदाचित माहीत नसावे. असो. पण केवळ कौशल्य हा निकष असू शकतो का?
एखाद्या कवीची महत्त्वाकांक्षा असती - आज हजार वाचकांचा क्षणिक वाहवाह! मिळवायचा नाही. मोजक्याच वचकांच्या मनात कविता टिकून राहिली पाहिजे - उद्याच्या मोजक्या वाचकांनी कविता वाचली पाहिजे...
'मोजक्या' वाचकांची 'मोजकी' कविता किती दिवस टिकणार? कवितेला का बरे मोजके करायचे. जी कविता अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचू शकते ती दीर्घायुषी असते. दुसरी बाजू अशी की ह्या तथाकथित आधुनिक किंवा आधुनिकोत्तर कवींची कंटाळवाणी कविता वाचकापर्यंत पोचतच नाही. आपापसांत रमलेले इनसेस्च्युअस कंपू आहेत. रेवपार्टीवाले हे पण. केतकर म्हणतात दिवटे महत्त्वाचे कवी. दिवटे म्हणतात वाघ. वाघ सोळंकीचे नाव घेतात. (ही काल्पनिक नावे/पात्रे आहेत बरं का. अशा प्रकारे कुणी एकमेकांचे नाव घेत असल्यास केवळ योगायोग.) असो. मजा आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गुंतागुंतीचा प्रश्न आहे खरा, पण अनाकलनीय नाही
कलात्मकता, कारागिरी आणि लोकप्रियता या वेगवेगळ्या मिती आहे, असे नरहर कुरुंदकरांचे मत आज वाचत होतो. मात्र या मिती पूर्णपणे ऑर्थॉगॉनल (परस्पर-असंबद्ध) आहेत, असे मला पटलेले नाही (आणि त्यांनी थेट तसे म्हटलेलेही नाही).
मला वाटते कलाकाराला कमी लेखण्यासाठी "कुशल" असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा "कलात्मक नसून कुशल" असे अभिप्रेत असते. असा शब्दप्रयोग वापरतात हे मला माहीत आहे, परंतु तसा माझा अभिप्राय नाही. "कलेशिवाय कौशल्य" असू शकते, हे खरे आहे. पण "कौशल्याशिवाय कला" असू शकते असे मला पटत नाही. कृतीमध्ये गबाळेपणा असला तर कलेचा आस्वाद निश्चितच कमी होतो. ज्यांना आपण उत्तम कलात्मक गायक म्हणतो, बहुतेक सर्व कसून रियाझ करतात. "कुशल" हा शब्द हीन म्हणून बहुसंख्य लोक वापरत असले, त्याचा हीनार्थ वापर आता रूढ मानला, समजा. तरी "कुशल"च्या पूर्वीच्या अर्थासाठी चिह्न किंवा शब्दाची गरज राहातेच. म्हणजे चांगला कलाकार रियाझ करून नेमके काय साधत असतो, त्या साधनेसाठी त्या नव्या चिह्नाचा/शब्दाचा वापर करता येईल. नवीन शब्द रूढ होईस्तोवर "कुशल" हाच शब्द मी वापरणार आहे.
(जवळजवळ सर्व उत्तम कलाकार कुशल असतात, पण सर्व कुशल लोक कलाकार असत नाहीत. असा एकतर्फी "सबसेट"संबंध असावा, असे मला वाटते. ठाम मतच आहे, म्हणा ना.)
लोकप्रिय, मोजकेपणा वगैरे हा प्रकारही गुंतागुंतीचा आहे. पण तरी विश्लेषण करता येण्यासारखा आहे. येथेसुद्धा शब्द सापडण्यासाठी मला कुरुंदकरांच्या विश्लेषणाचा उपयोग झाला. कला आस्वादायच्या अधिक-अधिक अनुभवांनी रसिकाच्या आस्वादक्षमतेची प्रगती होते. प्रगतीचा कुठलाही टप्पा मूलभूत मानसशास्त्रीय रीत्या वेगळा नाही. पण कुठल्या कलाकृती भावतात ते टप्प्या-टप्प्यानुसार बदलते.(यापुढील मते माझी, कुरुंदकरांनी थेट सांगितलेली नव्हेत : ) अधिक आस्वाद-अनुभव आलेले लोक हे कमी आस्वाद-अनुभव असलेल्या लोकांपेक्षा संख्येने कमीच असतात. (हा निव्वळ अंकगणिताचा हिशोब आहे - अधिक-अनुभव असलेला कधीकाळी कमी-अनुभव असलेला होता. मात्र सर्व कमी-अनुभव असलेले पुढे जाऊन अधिक-अनुभव घेणारे होत नाहीत. म्हणून अधिक-अनुभव घेतलेले लोक संख्येने कमी असतात.)
मला वाटते, "मोजकी कविता, मोजके वाचक" याबाबत वरील टिप्पणी या स्पष्टीकरणानंतर काहीशी बदलावी. "अमुक एक चौकट आवडणारे रसिक इतके मोजके आहेत की आस्वाद-परंपरा नामशेष होईल" हा मुद्दा पटण्यासारखा आहे. परंतु अनेक मोजक्या-रसिकांच्या परंपरांपैकी कुठल्या नामशेष होतील, आणि कुठल्या टिकून राहातील, ते आधीच सांगता येत नाही. किंवा त्याबद्दल विश्लेषण वेगळे होईल. काही मोजक्या-रसिकांच्या परंपरा टिकावू असतात, त्या निवडाव्या. त्या परंपरा पिढी-पिढीमध्ये संक्रांत करण्यासाठी ते मोजके रसिक विशेष प्रयत्न करतात का? अशा तर्हेने अभ्यास करावा लागेल.
कृतीमध्ये गबाळेपणा
कृतीमध्ये गबाळेपणा असला तर कलेचा आस्वाद निश्चितच कमी होतो.
गबाळेपणाचे माहीत नाही पण विचारगुरुत्व आणि गुंतागुंत अधिक तेवढा लिखाणात ओबडधोबडपणा जास्त असे एक सूत्र आहे असे वाटते. मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांनी अनिलांच्या कवितेला (संग्रहाचे नाव आठवत नाही) लिहिलेल्या प्रस्तावनेत हे मांडले आहे. जेवढा लेखक 'कुशल' तेवढे लेखन गुळगुळीत, सफाईदा, पॉलिश्ट.
काही मोजक्या-रसिकांच्या परंपरा टिकावू असतात, त्या निवडाव्या.
हे ठरवणार कसे ? आणि हे तर उत्क्रांतीसारखे झाले म्हणजे. माझ्या मते जो कवी टिकतो-- जसे शेक्सपिअर, तुकाराम, कबीर --- तो लोकांनी निवडलेलाच असतो. म्हणूनच ह्या तथाकथित किडुकमिडुक पण महत्त्वाच्या कवींना टाळायला हवे असे मला वाटते. त्यांना निवडून काही फारसे हशील होणार नाही. असो. काळच काय ते ठरवतो आणि ठरवेल. समकालीनांकडून समकालीनांचे मूल्यमापन नीट होतेच असे नाही. अनेक महत्त्वाचे कवी नंतर चिल्लरून जातात.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चर्चा उदाहरणांसह व्हावी - नंतर कधी
गबाळेपणा आणि ओबडधोबडपणा यांच्यातल्या फरकांची चर्चा उदाहरणांसह व्हावी. पण त्याबद्दल सवडीने.
- - -
सॉमरसेट मॉमच्या एका कादंबरीत (ख्रिस्मस हॉलिडे) असा काही उल्लेख आहे, की एक उच्च-मध्यम-व्यापारीवर्गातील तरुण अतिशय सफाईदार पण कंटाळवाणा पियानो वाजवत असे. त्याला धसमुसळ्या आवेशाने भावपूर्ण पियानो वाजवणारी एक वेश्या भेटली. थोडेसे सैल, पण आकंठ जगायला तो शिकला, वगैरे.
मात्र सॉमरसेट मॉमच्या साहित्य-आस्वाद विषयक चर्चेत "एखाद-एखाद अपवादात्मक 'महात्मा' रशियन लेखक धसमुसळेपणे लिहू शकतो, पण बाकी सर्व लेखकांनी खर्डे पुन्हा-पुन्हा तपासून बघितले पाहिजेत, सुधारणा केल्या पाहिजेत..." अशा प्रकारचे मत आहे. आणि भावुक-धसमुसळ्या-वेश्येच्या पियानोवादनाबद्दल नीट विचार करूया - मॉमने हे पात्र "जगप्रसिद्ध पियानोवादक" बनवलेले नाही. सर्वात उत्तम पियानोवादक भावनापूर्ण+कुशल वादन करतात.
- - -
तुम्हाला वाटेल ते घ्या. "मोजक्या लोकांसाठी लिहिण्याऐवजी खूप लोकांसाठी लिहावे" वगैरे तुमची मते आहेत. ती अभ्यासण्याजोगी आहेत, याबाबत मी सहमत आहे. समकालीन "खूप" म्हणजे किती टक्के, समकालीन "मोजके" म्हणजे किती टक्के, याबबत तुमचे जे काय निकष असतील, ते मी बहुधा मान्य करेन. शेक्सपियरच्या काळातले अनेक साहित्यिक बघावेत आणि त्यांच्यात समकालीन बहुसंख्यप्रिय कोण-कोण होते, कोणकोण नव्हते, ते बघावे. (फक्त शेक्सपियर नव्हे.)
बाकी "अभिजात" म्हणतात त्या कला समकालीन-बहुसंख्यप्रिय कधी होत्या? खूप काळ मोजक्या लोकांना आवडलेल्या कृती अभिजात कलांमध्ये भरपूर सापडतील, असे वाटते.
- - -
कबीर, तुकाराम ही मंडळी कलाकार होती आणि काही झपाटण्यासारखा जीवनविषयक संदेश देणारीसुद्धा होती. अशा मंडळींचा विचार वेगळा करायला हवा. कबीर-तुकाराम उच्च कोटीचे कलाकारही होते. (तुम्हाला या दोघांच्या छंद-वृत्तांमध्ये, काव्यालंकारांमध्ये गडबड दिसते??? दिसतही असेल...) म्हणून माझा मुद्दा सांगण्यासाठी अधिक गडद उदाहरण घेऊया :
पुढील माहिती वसंतराव देशपांड्यांनी "संगीतातली लय" व्याख्यानाच्या सुरुवातीला दिली. मिसळपावावर कोणीतरी ध्वनिफितीचा दुवा दिलेला होता. वसंतराव देशपांडे तुकडोजी महाराजांबद्दल सांगतात, की त्यांचे गाणे लय-तालाला बांधलेले नसले, तरी स्फूर्तिदायक होते. त्यांच्या गाण्याला लयबद्ध आणि सुरेल असण्याची गरज नव्हती.
पण तुकडोजी महाराजांनी गायकीची परंपरा स्थापित केली नाही. "स्फूर्ती असली तर लय-ताल काही गरजेचे नाही" हे स्फूर्तिदायक संवाद साधण्यासाठी पुरे. हिंदुस्थानी संगीतात बेताल-बेसुरे गाता येते, असा काही त्याचा अर्थ होत नाही. तुकडोजी महाराजांबद्दल माहिती देऊन मग वसंतराव देशपांड्यांनी "तर लयीला घालू खड्ड्यात" म्हणून व्याख्यान संपवले नाही!
आता तुम्हाला कलेच्या यशाबद्दल वोलायचे आहे, की लोकोत्तर महात्म्यांच्या लोकसंग्रहाच्या यशाबद्दल? - ही चौकट कळल्याशिवाय तुकाराम-कबीरांची, ओबडधोबड-गबाळेपणाची वगैरे चर्चा फार विस्कळित होईल.
- - -
"काळच ठरवेल" म्हणजे "कालांतराने लोक ठरवतील" असे म्हणायचे आहे. आणि यालासुद्धा काही मर्यादा आहेत. खूप काळ थांबले तर सर्वच साहित्य नाहिसे होईल. कुठे गेली ती पाली-अर्धमागधीमधील लोकप्रिय लोकगीते? पालीमधले साहित्य राहिले आहे कुठले - तर फक्त बौद्ध धर्मग्रंथ (=जीवनविषयक सूत्र!). मध्यंतरी प्राकृतात लिहिलेले लोकसाहित्य जर टिकले असेल आपण आजकाल उलटे संस्कृतात भाषांतरित करून वाचतो!
- - -
समकालीन बहुसंख्यांना अभिमुख असावे की कालांतराने मोजक्या लोकांना अभिमुख असावे? हा विचार वेगवेगळ्या विषयांत येतो. लाखो लोकांना दर आठवड्यात काही तास आनंद देणार्या "व्हायाग्रा" औषधाबद्दल संशोधन करावे, की दरवर्षी दहा-वीस मुलांना जीवदान करणार्या शस्त्रक्रियेचा विकास करावा? दोन्ही प्रकारच्या संशोधनात/कार्यात गुंगलेले, आनंद मिळवणारे, संशोधक सापडतील. या दोघांमध्ये उगाच "कोण अधिक महान" म्हणायचा अट्टाहास मला तरी निरर्थक वाटतो. (त्या दोन संशोधकांचा पगार तुम्ही स्वखर्चातून देत असाल, आणि एकाला कामावरून काढून टाकायचे असेल, तर त्यांच्यामध्ये उजवे-डावे करण्याचा तुम्हाला हक्क आहेच.)
पण पैकी कुठल्याही संशोधनात अकुशलता असणे (चंचुपात्रे किंवा हत्यारे अस्वच्छ/बोथट वापरणे) कसे चालेल बरे?
(सुगरणीच्या हाताला चव असेल फार, पण तरी विधी उरकल्यावर स्वयंपाकापूर्वी तिने हात धुवावेतच.)
हे सगळे भरकटत चालले आहे. क्षमस्व.
या चर्चेत सुसंदर्भ मूळ मुद्दा काय आहे?
मर्यादित अमरत्व
गबाळेपणा आणि ओबडधोबडपणा यांच्यातल्या फरकांची चर्चा उदाहरणांसह व्हावी. पण त्याबद्दल सवडीने.
सवडीने वेगळी चर्चा करता येईल.
शेक्सपियरच्या काळातले अनेक साहित्यिक बघावेत आणि त्यांच्यात समकालीन बहुसंख्यप्रिय कोण-कोण होते, कोणकोण नव्हते, ते बघावे.
हरकत नाही. लोक निवड कशी करतात हे जाणून घेण्यात मला रुची आहे. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इथे लावता येईल काय? मोजक्या लोकांची मोजकी निवड पुढे कुठवर टिकते हेदेखील बघायला हवे असे मला वाटते. शेक्सपिअर का टिकला आहे अजून हे बघायला हवे. ( शेक्सपियरला 'अपस्टार्ट क्रो' म्हणणारा रॉबर्ट ग्रीनला कोणाच्या लक्षात नसतो ;) इथे ज्ञानदाताईंची ग्रीनशी तुलना केलेली नाही. तसेच अवचट आणि शेक्सपिअर ह्यांत दाढी सोडल्यास कुठलेही साम्य आढळल्यास कृपया जाणकारांनी तसे सांगावे)
पण तुकडोजी महाराजांनी गायकीची परंपरा स्थापित केली नाही. "स्फूर्ती असली तर लय-ताल काही गरजेचे नाही" हे स्फूर्तिदायक संवाद साधण्यासाठी पुरे. हिंदुस्थानी संगीतात बेताल-बेसुरे गाता येते, असा काही त्याचा अर्थ होत नाही. तुकडोजी महाराजांबद्दल माहिती देऊन मग वसंतराव देशपांड्यांनी "तर लयीला घालू खड्ड्यात" म्हणून व्याख्यान संपवले नाही!
खरे आहे. भीमसेन जोशींनी म्हटल्याप्रमाणे एखाद्याचे व्याकरण उत्तम आहे म्हणून तो काही श्रेष्ठ कवी होईलच असे नाही. त्याचप्रमाणे एखाद्याला रागदारीचे उत्तम ज्ञान आहे म्हणून तो श्रेष्ठ गवई होईलच असे नाही. बाय द वे, ताल थोडासा खड्ड्यात गेला तर एकदा चालेल पण बेसुर होता कामा नये असे बहुतेक बुजुर्ग म्हणतात आणि एरंडवणीय सुखवस्तू गळ्यातून 'दिल को चोट करनेवाली' गायकी निघत नाही असेही.
आता तुम्हाला कलेच्या यशाबद्दल वोलायचे आहे, की लोकोत्तर महात्म्यांच्या लोकसंग्रहाच्या यशाबद्दल? - ही चौकट कळल्याशिवाय तुकाराम-कबीरांची, ओबडधोबड-गबाळेपणाची वगैरे चर्चा फार विस्कळित होईल.
यशापयाशाची चर्चा नाहीच. आधी म्हटल्याप्रमाणे टिकाऊपणाबद्दल चर्चा व्हायला हवी.
"काळच ठरवेल" म्हणजे "कालांतराने लोक ठरवतील" असे म्हणायचे आहे. आणि यालासुद्धा काही मर्यादा आहेत. खूप काळ थांबले तर सर्वच साहित्य नाहिसे होईल. कुठे गेली ती पाली-अर्धमागधीमधील लोकप्रिय लोकगीते? पालीमधले साहित्य राहिले आहे कुठले - तर फक्त बौद्ध धर्मग्रंथ (=जीवनविषयक सूत्र!). मध्यंतरी प्राकृतात लिहिलेले लोकसाहित्य जर टिकले असेल आपण आजकाल उलटे संस्कृतात भाषांतरित करून वाचतो!
प्रत्येक कृतीचे 'अमरत्व मर्यादित' असतेच. पण काही कृती इतरांपेक्षा का जास्त तगतात हे बघायला हवे. काही बाबतीत निव्वळ योगायोग असावा. पण काही बाबतीत योगायोगाशिवाय इतर काही ठोस कारणे असावीत. अधिकाधिक लोकांपर्यत पोचलेली, झिरपलेल्या कृतीचे मर्यादित अमरत्व अधिक काळ टिकणारे असावे. शेक्सपिअर आणि तुकाराम ही दोन्ही ह्याबाबतीत अभ्यासायला हवे. ह्या दोहोंची वचने आपल्या रोजच्या बोलण्यात नकळतपणे येत असतात.
पण पैकी कुठल्याही संशोधनात अकुशलता असणे (चंचुपात्रे किंवा हत्यारे अस्वच्छ/बोथट वापरणे) कसे चालेल बरे?
हे खरेच.
(सुगरणीच्या हाताला चव असेल फार, पण तरी विधी उरकल्यावर स्वयंपाकापूर्वी तिने हात धुवावेतच.)
हाहाहा. आमच्या काही मित्रांनी घरची भेळ चांगली का बनत नाही ह्यावर संशोधन केले. त्यात त्यांनी घरी स्वच्छता असते हा एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला.
हे सगळे भरकटत चालले आहे. क्षमस्व.
असे वाटते आहे खरे किंबहुना भरकटल्याशिवाय अनेकदा नव्या प्रदेशांचा, नवे इलाख्यांचा शोध लागत नसावा.
या चर्चेत सुसंदर्भ मूळ मुद्दा काय आहे?
कुशलपणापासून सुरवात झाली होती असे वाटते ;)
असो. वेगळी चर्चा टाकायला हवी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
किंचित अवांतर
>>> शेक्सपियरला 'अपस्टार्ट क्रो' म्हणणारा रॉबर्ट ग्रीनला कोणाच्या लक्षात नसतो ;)
--- टॉलस्टॉयनेही शेक्सपिअरच्या नाटकांवर सडकून टीका केली आहे.
जॉर्ज ऑर्वेलचा (सम-आर-मोअर-इक्वल-फेम :)) 'लिअर, टॉलस्टॉय अँड द फूल' हा लेखही या संदर्भात वाचण्यासारखा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
थोडी सुधारणा
तुमच्या प्रतिसादात चूक सापडणे अशक्य आहे. पण 'घाईत उत्तरे' आहेत म्हणून थोडीशी सुधारणा करत आहे.
कथावस्तूची निर्मीती करतो तोच थोर साहित्यिक, असे अध्याहृत गृहीतक असावे.
पळवाट: चूभूद्याघ्या
दोन पैसे
साहित्याची व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहे, हे प्रश्नात मान्य केलेले आहे. एकदा ते तसे मान्य केल्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरे काय द्यावीत असा प्रश्न पडतो. उदा. मी साहित्याची व्याख्या जे मला वाचावेसे वाटते अशी करतो. मला पुल, वपु, सुशि वाचावेसे वाटत नाही याचा अर्थ माझ्या ते दृष्टिने त्यांचे लेखन साहित्य नाही. मग चर्चा करण्यासारखे काय उरते?
यापेक्षा साहित्याची सर्वसामान्य व्याख्या मान्य केल्यानंतर काही चर्चा संभवते. व्यक्तिसापेक्षता चर्चेत मोठाच घोळ करून ठेवते. साहित्याच्या सर्वसामान्य व्याख्येला अनुसरून चर्चा करण्याचे ठरवल्यास कुठले साहित्य अमक्याला चांगले वाटते यावर चर्चा होऊ शकते. तुम्हाला अनिल अवचटांचे हल्लीचे लिखाण आवडत नाही पण काही वाचकांना आवडते. त्यांच्या आवडीची कारणे निरनिराळी असू शकतील. पण त्या सर्व आवडींची प्रेरणा एकसूरी आहे, हे सुलभीकरण आहे.
अनिल अवचट, बंग वगैरे हे फॅशन अक्सेसरीज झाले आहेत असे तुमचे मत असल्यास त्याच्याशी मी सहमत आहे. त्याकरता साहित्य वगैरे चर्चा कशाला करायची?
अनाहूत सल्ला
ज्ञानदाताईंना एक अनाहूत सल्ला:
या संकेतस्थळावर लोक डिक्शनर्या, एन्साय्क्लोपिडिया घेऊन बसतात. प्रत्येक विधानासाठी डेटा, संदर्भ आवश्यक आहे. इकडे लिहितांना काळजीपूर्वक लिहावे लागते. एखादे सैल वाक्य सापडले की लोक तुटून पडतात. एखादे वाक्य तसे लिहिल्यास अध्यारूते, गृहितके वगैरे एस्केप रुट्स वापरण्यास सज्ज रहावे. तसेच इथे काहींना सिनेमांची नावे, हिंदी गाण्यांचे मुखडे शीर्षकात वापरून प्रतिसाद द्यायला आवडते. अशा रितीने कुठल्याही चर्चेला ट्रिवियलाइज करता येते.
सजन रे झूठ मत बोलो...
ती मी नव्हेच पण प्रॅक्टिस करून पाहिली. गाणे आठवले हे महत्त्वाचे. ;-)
असे खरेच होते का? जरा संदर्भ द्या बघू.
असो. अवांतर प्रतिसादासाठी क्षमस्व! ज्ञानदा देशपांडे यांचे उपक्रमावर स्वागतच आहे. त्यांनी इतर चर्चांमध्येही भाग घ्यावा आणि लेखनही करावे. सतीश तांब्यांनाही येथे आमंत्रण द्यावे. हे प्रश्न त्यांचे आहेत. त्यांची उत्तरे वाचायला आवडतील.
!
पळवाट: सध्या वेळ नाही.
सनसनाटी
सनसनाटी असे काहीतरी लिहीले की, छान प्रसिद्धी मिळते राव! लोक चर्चा-बिर्चा करतात, वगैरे.
उपलब्ध प्रवाद
प्रकार म्हणजे विधा (Genre) असे अपेक्षित आहे का? तसे असल्यास इथे एक जंत्री मिळेल. वर्गवारी म्हणजे दर्जात्मक वर्गवारी का? वाङमयाची समीक्षा करण्याचे विविध परिप्रेक्ष्य आणि पध्दती आहेत. इथे एक जंत्री मिळेल.
पातळी म्हणजे पुन्हा दर्जात्मक पातळी का? साहित्यात दर्जाची अशी काही एकमेवाद्वितीय उतरंड आहे आणि प्रत्येक वाङमयप्रकार त्यात कुठेतरी बसतो असे मानण्याचा काळ आता संपला असे आता मानले जाते. आताचे समीक्षक उपलब्ध पद्धतींपैकी हवे ते आणि हवे तितके निवडून त्या आधारे समीक्षा करतात. उदा: इथे पाहावे.
टीप १: इतर प्रश्न फारसे महत्त्वाचे वाटले नाहीत किंवा दिलेल्या उत्तरांतूनच ज्यांची उत्तरे सापडावीत असे वाटले म्हणून त्यांना उत्तरे दिली नाहीत.
टीप २: Genreसाठी 'विधा' हा प्रतिशब्द अंदाजे वापरला. चुकीचा असल्यास क्षमस्व.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
.....कामे पडली अनंत
@का आणि धम्मकलाडू यांना वेगवेगळ्या कारणांसाठी धन्यवाद.
सविस्तर उत्तरास वेळ लागतो आहे. कारण मराठी टायपिंगचा वेग कमी.
माझ्या मतप्रदर्शनामुळे मी बरीच ढवळाढवळ केली. त्या मतांबद्दल थोडं कौतुक- थोडा संताप स्वीकारणं क्रमप्राप्त होतंच. 'संतापाची धनीण' होण्यात वाईट काही नाही. या निमित्ताने माझी चरित्रात्मक पाशवी समीक्षा दिसली. हे सारे होणारच. अभिरुचीचे आणि विवेकाचे धडे देणारी मी कोण? पानपट्टीवर उभं राहिलं कि शिन्तोडे उडणारच. आपल्यावर दुसर्यांचे दुसर्यांवर आपले.
निकष समजले म्हणजे संवाद सोपा जातो असे मला वाटले म्हणून प्रश्नावली डकवली. अवचट चांगले किंवा वाईट किंवा कंटाळवाणे हे मत एका मनोमन निकष व्यवस्थेचा भाग आहे. 'मला पुलं अतिशय रंजक वाटतात मात्र भाऊ पाध्यांची साहित्यदृष्टी महत्त्वाची वाटते.' हे विधान एका निकष व्यवस्थेचा भाग आहे. त्या माझ्या वैयक्तिक निकषांवर आधारित अवचटांबद्द्लही माझे वाचक म्हणून मत बनत गेले. आयबीएन लोकमत मध्ये काम करत असताना मी ग्रेटभेट कार्यक्रमासाठी रिसर्च करत असे. त्यावेळी माझी अवचटांशी मुलाखतपूर्व भेटही झाली होती. तेव्हाही ही माझी मते त्यांना सांगितली होती. तेव्हा मी त्यांच्या साहित्यावर समी़क्षात्मक लेख लिहिणार होते आणि तो नक्की लिहावा असे अवचटांनी सुचवलेही होते. कदाचित आता त्यांना ही भेट/ संवाद आठवेल की नाही माहित नाही. त्यांनी एक कविता ' न्यांदा गं न्यांदा - डोक्यावर हांडा' अशी लिहून दिली होती. लोंढा प्रसारमाध्यमांसाठी काम करताना बरीच सहनशक्ती लागते. असो. हे मुद्द्याला धरून नाही. आणि तो सविस्तर लेख मी अजून लिहिलेला नाही- लिहीन नंतर.
अवचटांना 'तुम्ही जे लिहिता त्यापेक्षा तुम्ही जे एडिट करता ते मला महत्वाचे वाटते' हे माझे मत आहे हे सांगितले होते - आता ब्लॉग मध्ये लिहिले. त्यात नवीन असे काही नाही. घरात रट्ट पडले कि घर आवरण्यापेक्षा बाल्कनीत जाऊन उभे रहावे तसे ते लेखन आहे. (ही उपमा बॉरोड आहे.)
अवचट मला बोअर करतात असे मी म्हटले आहे. का ते लिहिले आहे. ते त्रोटक आहे. परंतु ' का कोण जाणे नाही बाई मला अवचट आवडत' असे न म्हणता माझी कारणेही मांडली. अलीकडे अवचट नॉनफिक्शन ( दुय्यम दर्जाच्या ) फिक्शन प्रमाणे लिहितात हा माझा कंद आक्षेप. (या संदर्भात या महिन्याच्या नव-अनुष्ठुभ मध्ये चंप्र देशपांडे यांचा लेख आहे तो मूळातून वाचावा असा आहे). लेखनाने (ललित तसेच तांब्याच्या विवेचनाप्रमणे साहित्यिक ) आयुष्य उलगडण्याचा प्रयोग करावा असे मला वाटते. पत्रकरिता माहिती देते, विश्लेषण करते. लेखन (साहित्यिक/ आत्मनिष्ठ) हे जगण्याला उलगडते, जगण्यातून निर्माण होणाऱ्या नैतिक प्रश्नांची उकल करण्याचा, त्याचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न करते. श्रेष्ठ लेखन काळाच्या संदर्भासकट 'मनुष्य असण्याचे' कंगोरे मांडते (कोसला) , मनुष्याचे अस्तित्ववादी प्रश्न रचते (हे ईश्वरराव हे पुरुषोत्तमराव, सात सक्कं त्रेचाळीस ) , आशयाला विशिष्ठ घाटात /मुशीत घडवते (महानिर्वाण, चिरीमिरी- कोलटकर) किंवा जगण्याचा , मानवी विकारांचा, कार्यकारण भावांचा अन्वय लावते (जीए, तेंडुलकर, पेठे इत्यादि), मुख्य म्हणजे दंभ नाकारते (भाऊ पाध्ये, मन्या ओक) . मला घाट आणि आशयाचे द्वैत जिथे संपते तो प्रत्येक साहित्यप्रकार श्रेष्ठ वाटतो. उदा- मोकाशींची 'आमोद सुनास आले', कोलटकरांची 'वामांगी. ( घाशीरामचा/ बेगम बर्वेचा परफॉर्मन्स, सत्यजित रे ची 'चारुलता'- साहित्यबाह्य). आशयाला पूर्ण व्यक्त करणारा घाट मला श्रेष्ठ वाटतो.
या पलीकडेही लेखन होते-- ते मी वाचते. त्यातील कित्येक गोष्टी आवडतात. म्हणजे सध्या माझी मापकं अंतिम आहेत/ बरोबर आहेत असा माझा समज नाही. अनेकांना त्यांच्या रुचीनुसार गोष्टी आवडणार आणि माझ्या ब्लॉगवर मी मला जे वाटतं तेच मत मांडणार.
पत्रकारितेच्या मापाने अवचट सेन्सेटिव्ह, चांगले रिपोर्ताज लिहिणारे आहेत मात्र काहीसे (समाजवादी) रोम्यांटिक म्हणून रोम्यांटिक खोटेपणासकट लिहितात. हे पण खरे की 'पूर्णिया' मधील अवचट आताशा जे अवचट आहेत त्यापेक्षा निराळे आहेत. सध्याच्या लेखनात 'बाबाडम' खूपच येते.
ललित/ आत्मचरित्रात्मक लेखक म्हणून ते सतीश तांब्याच्या एका कथाशीर्षकाप्रमाणे 'वरवर अचूक आणि खोलवर चूकच चूक' आहेत असे मला वाटते. याबद्दल सविस्तर लिहावे लागेल. तूर्त इथेच थांबते. (इथे खूप लिहिण्यासारखे होते- उदा- गुर्जिएफ ची एक गोष्ट, स्युडो / दांभिक असण्याचे निकष इत्यादी. असो)
कोणी काय वाचावे हा वैयक्तिक चॉईस आहे. काय आवडावे हा देखील. लोकप्रियता हे मूल्य निरुपयोगी आहे असं मला वाटतं. अवचटांचे सामाजिक काम आणि लेखन या दोन्ही गोष्टींची एकत्र समीक्षा वैयक्तिक संवादात होईल मात्र पब्लिक डोमेन मध्ये 'लेखन लेखनाच्या तराजूत' -सामाजिक काम सामाजिक कामाच्या तराजूत' जाणे योग्य. त्या दोन्ही गोष्टी मापण्याच्या कसोट्या निराळ्या आहेत. गंगाधर गाडगीळांना आपण अर्थशास्त्रज्ञ म्हणतो का?
असो.
-माझ्या न-आवडलेल्या ब्लॉगने बरेच फुटेज खाल्ले आहे. तेव्हा थांबते.
ता.क.-- यानंतर मला उपक्रमवर चर्चेत सहभागी होता येणार नाही. माझ्या सध्याच्या कामात या तऱ्हेचा वेळ कमी आहे.i could agree to disagree and would like to move on. उपक्रमला आणि तुमच्या इतर चर्चांना शुभेच्छा . वैयक्तिक संवाद आणि ब्लॉग - हे दोन्ही मला जमते. त्या माध्यमातून संवाद होतच राहील अशी अपे़क्षा.
ता.ता.क. --- पळवाट- आधुनिकोत्तर. :)))
गम्मत जम्मत
अनिल अवचटांची 'गम्मत जम्मत' का असं काय तरी पुस्तक हाये
त्यायच्या त्या पुस्तकातली 'शाळा'नावाची कथा लंबर एक .
१) साहित्याची व्याख्या तुम्ही काय करता?
सह येतं ते साहित्य.
२)वृत्तपत्रीय लिखाण आणि साहित्य तुम्ही एकच मानता का?
नाही.
३) सहित्याचे प्रकार आणि त्याची वर्गवारी तुम्हाला कशी कराविशी वाटते?
पारंपरिक पद्धतीनं.
४) तुमच्या लेखी सर्व सहित्यप्रकार समान पातळी वरचे आहेत का?
नाही.
५) पु.ल. देशपांडे ह्यांनी कविता , कथा , कादंबरी असा कोणताही सहित्यप्रकार (एक नाटक वगळता) न हाताळताही ते तुम्हाला मराठीतील कोणत्याही कवी, कथाकार, कादंबरीकार यांपेक्षा थोर साहित्यिक वाटतात का? वाटत असल्यास त्याची कारणे कोणती?
ज्याची उत्तरं सांगत येत नाय. त्याला नमस्कार कराचा असं गुरुजींनी सांगला होतं.
अनिल अवचटांनी नाही म्हणायला काही कविता केल्या आहेत. एरवी त्यांनी कथावस्तू असणारं काहिही प्रसवलं नसूनही तुम्हाला ते थोर सहित्यिक वाटतात का?
व्यक्तिसापेक्ष विचार हायेत.
६) लोकप्रियता हा तुम्ही श्रेष्ठतेचा निकष मानता का?
लोकप्रियता काय फुकट येत नाय.
श्रेष्ठतेच्या काही गोष्टी आस्सन ना त्यायच्यात.
असल्यास राखी सावंत, गोलमाल३, पुलं, अवचट यांना सारखाच मान् देता का?
कोणाशी काय् तुलना करता साहेब.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)