मध्यमवर्ग

आंतरजालावर नुकत्याच झालेल्या काही चर्चांमध्ये मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गाला आवडणार्‍या साहित्याबद्दल चर्चा वाचली. पु.लंचे लेखन मध्यमवर्गी लोकांवर असे आणि मध्यमवर्गी लोकांना आवडते असे प्रवाद आहे. अवचटांचे लेखनही तसेच आहे असाही प्रवाद आहे.

"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.

मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात. पुढे लिहितात -

'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.

गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.

आता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय? ३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का? असल्यास कोणता? त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का? उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते? त्यांचे साहित्य कोणते? ते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का? मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल? किंवा कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो? मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का? की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे?

तुम्ही यावर कधी विचार केला आहे का?

Comments

लेखक आणि लेखन

एखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याला लिहिण्याची आंतरिक उर्मी येते म्हणून लिहितो असे मला वाटते. लेखन करणारा हे लेखन मध्यमवर्गीयांसाठी, हे लेखन श्रीमंतांसाठी असे करत नसतो. विशिष्ट वर्गाला टार्गेट ठरवून लिहिलेले लेखन बहुदा राजकीय पत्रके किंवा वर्तमानपत्रांचे स्तंभलेख यात केले जाते. ज्ञानदाताई यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून लिहिलेले आहे असे मला वाटत नाही. त्या मध्यमवर्गीयांच्या बद्दलची आपली निरिक्षणे फक्त सांगत आहेत. हे लेखन कोणीही वाचावे, ज्याला रुची असेल त्याने.
आता वाचकांसंबधी थोडेसे. मध्यमवर्गीय वाचक फक्त त्यांना टार्गेट ठरवून केलेलेच लेखन वाचतात हा जावईशोध पा.रा. यांनी कोठून लावला. शोभा डे किंवा गौरी देशपांडे यांचे लेखन मध्यमवर्गीयांना टार्गेट ठेवून केलेले असते का? ते मधमवर्गीय वाचक वाचत नाहीत का? ज्या वाचकाला जे आवडते ते तो वाचतो. हे लेखन आपल्यासाठी केलेले आहे तेच आपण वाचावे अशी मनोवृत्ती वाचकांची नसते.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कुमारभारती, बालभारती

कुमारभारती, बालभारती मधील धडे मध्यमवर्गाला आवडणा-या लिखाणाचे उत्तम नमुने आहेत.
(पिंगला/ळा सारख्या प्राचीन भारतीय गणितद्न्याबद्दल माहीती दिली असती तर मराठी भाषा शिकता येणार नाही का असा प्रश्न पडतो. )

प्रतिसाद

@चंद्रशेखर -

ज्ञानदाताईंचे लेखन नुकतेच दिसले म्हणून त्यांच्या लेखनातील संदर्भ दिले आहेत. आपण म्हणता त्याप्रमाणे आम्ही येथे कोणताही जावईशोध लावलेला नाही. आमच्या जावईशोधाचे वाक्य आपण लिहिलेत तसे कोणतेही वाक्य आमच्या प्रश्नांमध्ये नाही. जे काही आहे ते आम्हालाच पडलेले प्रश्न आहेत. ज्ञानदाताईंचे लेखन मध्यमवर्गाला टार्गेट करणारे नसेल तर वरील तिरक्या अक्षरांचे प्रयोजन काय असावे? त्यांनी किती मध्यमवर्गीय घरांतील कार्पेटे उचलून पाहिली आहेत? ज्याला जे आवडते ते तो वाचतो असे साधे गणित असते तर मध्यमवर्गीयांच्या वाचनाबद्दल निरीक्षणे आलीच नसती.

@असा मी आसामी - प्रतिसाद विस्ताराने लिहा. त्रोटक वाटतो.

ज्ञानदाताई व मध्यमवर्गीय

ज्ञानदाताई काय लिहितात हा विषय निराळा आहे. माझा प्रतिसाद तुम्ही मध्यमवर्गीयांच्या वाचनसंबंधीचे जे जनरलायझेशन करू पाहत आहात त्या संबंधी आहे.
आपल्या मूळ लेखातील हे वाक्य पहावे.
३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का? असल्यास कोणता? त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का? उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते
Learning is not compulsory... neither is survival.

असहमत

मला शंका वाटल्याने मी प्रश्न विचारले आहेत की असे काही होते आहे का? जनरलायझेशन केलेले नाही. या स्पष्टीकरणानंतरही आपल्याला तसे वाटले असल्यास माझा नाइलाज आहे. आपल्याकडे दुर्लक्ष करणे मला बरे पडेल. बाकीचे सदस्य चर्चा बरी करत आहेत.

म्हणूनच बहुधा ते अवचट आहेत

मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं. - असं ज्ञानदाताई त्यांच्या लेखात म्हणतात.
कामप्रेरणा नष्ट झाल्याचं लक्षण म्हणजे काय? उच्चमध्यमवर्गीय ऐदी, कामचोर झाले आहेत असे ज्ञानदाताईंना म्हणायचे आहे काय? तसेच भेटलं की कशाबद्दल बोलावं तेही सांगून टाकावे.

"खा खा मटार उसळ खा, शिकरण खा" या पु.लं.च्या मध्यमवर्गीय चैनीच्या संकल्पनेतून आजचा मध्यमवर्ग कधीच सुटला आहे.
नक्कीच. पुलंची वरचे टाळ्याघेऊ वाक्य हे त्या काळात तरी पूर्णपणे लागू होते का? पण बंगाल्यांचे लाडके व्यक्तिमत्व टागोर आहे. तर मराठी लोकांचे पुलं. (नक्की का?) आता ह्यातून काय बरे निष्कर्ष काढायचा?


‘गुडी टु शूज’ माणसांना घासाघासानं संवेदनशीलता भरवणारे अवचट स्वत:च कसे कंटाळत नाहीत या प्रकाराला? असाही प्रश्न मला पडतो. पण मध्यमवर्गीय लोकेषणा भल्या भल्यांना सुटत नाही. त्यातल्या त्यात नीतिमान जगू इच्छिणारा हा वर्ग आहेच अ‍ॅडिक्टिव्ह. ‘अनिल अवचट लिहितात मध्यमवर्गासाठीच.

आता अवचट नाही कंटाळत तर नाही कंटाळत. म्हणूनच बहुधा ते अवचट आहेत. ज्ञानदाताईंच्यासारख्या विचक्षण वाचकांना आवडावे म्हणून त्यांनी बदलावे का?

३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का?
मध्यमवर्गात नक्कीच फरक पडला आहे. पूर्वी मध्यमवर्ग, विशेषतः शहरी मध्यमवर्ग म्हटले म्हणजे एक विशिष्ट जात किंवा समाज डोळ्यांपुढे यायचा. आता तसे राहिलेले नाही, असे वाटते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आम्ही जगतो ती किती मज्जा

काही वर्षांपूर्वी मध्यमवर्गाचे जे वर्णन केले जाई, उदा. मुंबईच्या मध्यमवर्गाचे वर्णन चाळकरी, टीनपाटा एवढ्या खोल्यांत टुकीने संसार करणारा, बस-ट्रेनला लटकून प्रवास करणारा, गणपतीच्या सुट्टीत कोकणची एसटी पकडणारा, चौपाटीवर बायका-पोरांना कधीतरी रविवारी भेळपुरी खायला घालणारा वगैरे वगैरे हे चित्र नक्कीच बदललेले आहे आणि हे चित्र बदललेले आहे हे सांगण्याचा (पक्षी: आम्ही जगतो ती किती मज्जा हे बोलून दाखवण्याचा) प्रयत्न होणे अपरिहार्य आहे पण त्या स्थितीतूनही मध्यमवर्ग पुढे सरकला आहे. हल्ली तो "मज्जा" असे बोलून दाखवत नाही. करून दाखवतो. (फेसबुकावर मद्याचे हिंदकळणारे चषक, फॉरिन ट्रिपांचे फोटो, मैत्रिणींना कवेत घेतलेले किंवा पाठीवर कांदेबटाटे केलेले फोटो प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या अकाउंटवर दिसतात. असो.)

ज्या वर्गातून लेखक येतो त्या वर्गाला तो अधिक योग्य रित्या रिप्रेझेंट करतो असे वाटते. मध्यमवर्गासाठी लेखन होते का माहित नाही पण लेखकाची मध्यमवर्गी विचारसरणी लेखनात उतरत असावी आणि साहजिकच वाचकांच्या पसंतीस उतरत असावी असे वाटते.

मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का?

अवचट, पुल, वपु यांच्याबरोबर दळवी, जीए, गौरी देशपांडे अगदी आताच्या कविता महाजन आणि मेघना पेठे वगैरे वगैरेही मध्यमवर्गाला आवडतात असे वाटते.

असो. बाकी बरेचसे मध्यमवर्गाबद्दलचे आक्षेप मला कळलेले नाहीत. :-)

आणखी एक प्रश्न

मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का? की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे?

"मध्यमवर्गीय" ही संज्ञा स्थलकालनिरपेक्ष हीनत्वसूचक (युनिव्हर्सली पेजोरेटीव्ह) आहे का ?

मार्क्सवादात या वर्गाचा बूर्ज्वासी असा उल्लेख असून तो शोषण करणार्‍या वर्गाचे हितसंबंध राखणारा - किंवा एकंदर वर्गलढ्यापासून दूर पळणारा , पर्यायाने क्रांतीचा वैरी - या अर्थाने वापरला गेल्याचे दिसते.(चूभूद्याघ्या). मार्क्सवादाच्या शाखाप्रशाखांच्या विकासानुसार विविध क्षेत्रांतल्या संघर्षामधे बूर्ज्वासी कोण , शोषित कोण याची सांगोपांग चर्चा होत गेली. अनेकदा विचारप्रवर्तक (मानले जाणार्‍या) लिखाणामधे मध्यमवर्गाबद्दलच्या या स्वरूपाच्या व्याख्येचा संदर्भ अभिप्रेत आहे असे वाटते. (ज्ञानदाबाईंच्या लिखाणाची अध्याहृत चौकट ही या अर्थाने मार्क्सिस्ट् आहे असे म्हणता येईल. )

याच बरोबर, गेल्या शंभरसव्वाशे वर्षांमधल्या केवळ मराठी साहित्याइतका मर्यादित विचार करायचा झाला तर, मध्यमवर्गीय आयुष्याशी निगडित असलेले लिखाण बरेच झाल्याचे दिसते. दलित , स्त्रीवादी, आणि समाजातल्या इतर उपेक्षित घटकांच्या साहित्य चळवळी बळकट व्हायच्या आधीच्या काळात या सोकॉल्ड् मध्यमवर्गीय वर्गाने लिहिलेल्या, छापलेल्या साहित्याचाच प्रभाव पडलेला दिसतो. या साहित्यातून व्यक्त झालेल्या मध्यमवर्गीय मूल्यांचाच प्रसार त्याच वर्गातल्या वाचकांमधे झालेला दिसतो.

१९९१ नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या बदललेल्या दिशेनंतर , आणि एकंदर गेल्या दोन दशकातल्या जागतिकीकरणाच्या लाटेमधे मध्यमवर्गाची एक बाजारपेठ म्हणून चर्चा होत असताना दिसते. या बाजारपेठेकडे कंपन्यांचे लक्ष आहे. या बाजारपेठेतलाच ग्राहकवर्ग हा निवडणुकीतल्या मतांच्या संदर्भातला महत्त्वाचा घटक बनला आहे. एकंदर राष्ट्रपातळीवरची आर्थिक धोरणे ठरवताना या वर्गाचे हितसंबंध लक्षांत घेऊन पावले उचलली जात आहेत. जितके जास्त शहरीकरण, औद्योगिकरण होईल तितके भौगोलिक , आर्थिक स्थलांतर होत राहील आणि तितका हा मध्यमवर्ग मोठा मोठा होत जाईल. थोडक्यात, व्याख्या नि व्याप्ती या दोन्ही अर्थाने मध्यमवर्ग प्रसरणशील आहे असे म्हणता येईल.

इतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, "मध्यमवर्ग" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.

पुल

इतरही अनेक संदर्भ देता येतील ज्याद्वारे असे दाखवता येईल की, "मध्यमवर्ग" ही संज्ञा निरनिराळ्या संदर्भात टीकेचा, अभिमानाचा, अपरिहार्य वास्तवाचा, लांच्छनाचा , ज्यात सामावून जायला पाहिजे अशा प्रकारच्या हव्यासाचा विषय आहे.

परत एकदा पुल आठवले. ;)

मला वाटते बटाट्याच्या चाळीत त्यांनी केलेली व्याख्या माझ्यालेखी चपखल आहे: "घुमी श्रीमंती आणि तोंडाळ दारीद्र्य यांच्या मधला वर्ग म्हणजे मध्यमवर्ग..."

चूभूदेघे

माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या "बटाट्याच्या चाळीत"ल्या ऐवजी "काही अप् काही डाऊन्" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.

शक्य आहे...

माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे , वरील गमतीशीर व्याख्या "बटाट्याच्या चाळीत"ल्या ऐवजी "काही अप् काही डाऊन्" या लेखातल्या सेकंड-क्लास् चे वर्णन करताना लिहिलेली आहे.

तुम्ही म्हणता ते शक्य आहे कारण मी देखील आठवणीतूनच देत होतो.

मध्यमवर्ग

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे व इतरत्र नाटक पहाणार्‍या मराठी मंडळींना मी मध्यमवर्ग समजत असे. इथे उत्पन्न-बित्पन्नावर आधारित मध्यमवर्ग अपेक्षित आहे का?

की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे?

नुकतेच हे वाक्य दुसर्‍या एका संकेतस्थळावर ब्राह्मणांच्यासंदर्भात वाचले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.

नसावे

माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.

जुन्या धार्मिक कथांची सुरुवात ही एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता, अशी होते. एका गावात एक मध्यमवर्गीय ब्राह्मण राहत होता, अशी सुरुवात असलेली कथा मी अद्याप ऐकली वा वाचली नाही!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गेल्या शतकातील


जुन्या धार्मिक कथांची...

माझा समज गेल्या शतकाबद्दल आहे, याची नोंद घ्यावी. मला वाटले ते अध्यारूत होते पण काळाचा संदर्भ देणे आवश्यक होते. थोडासा स्थलसापेक्षपणा ही माझ्या प्रतिसादात हरवला आहे. इतरत्र म्हणजे उर्वरीत महाराष्ट्रात व झाशी, पानिपत, इंदुर, बडोदा, बेळगाव वगैरे.

अपेक्षित

आपण उत्पन्नावर लिहिलेत, नाटकांच्या अभिरुचीवर लिहिलेत किंवा चित्रपट, संगीत, आवडीनिवडींवर लिहिलेत तरी चालेल. चर्चेचा कल मध्यमवर्गाच्या अभिरुचीबद्दल आहे. उत्पन्नावरून अभिरुची ठरत असेल तर तसे लिहावे.

अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्ग आणि ब्राह्मण या दोन संचांमध्ये फारसा फरक नाही.

मग माशी शिंकायला नकोच.

एक किस्सा

शाळेत असताना बहुधा हिंदीच्या पुस्तकात धडा होता की इतरत्र कुठे वाचले ते आठवत नाही परंतु तीन भावांची एक गोष्ट होती. प्रत्येकाला काहीतरी तक्रारी आहेत.

मोठा भाऊ म्हणतो मी मोठा त्यामुळे सर्व भार माझ्यावर पडतो. धाकटा म्हणतो मी धाकटा त्यामुळे मला कोणी गंभीरपणे घेत नाही. मला महत्त्व मिळत नाही. मधला म्हणतो, सर्वात दुर्दैवी मी. मोठ्याला मोठा म्हणून मोठेपणा मिळतो. मान मिळतो. तो सर्वांवर हक्क गाजवतो. तो सर्वांत सबळ असल्याने त्याची दादागिरी चालते. धाकटा लहान म्हणून त्याला सांभाळून घेतले जाते. तो सर्वात दुर्बळ म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष पुरवले जाते. त्याचे लाड केले जातात. हट्ट पुरवले जातात. मी मात्र मधल्यामध्ये गटांगळ्या खातो. ना मोठा होऊ शकत ना धाकटा. ना मान मिळत ना लाड होत. आई वडिल मला सोयिस्कर रित्या विसरूनच जातात. :-)

चर्चाप्रस्तावकाच्या मते हे मध्यमवर्गाचे दुखणे तर नव्हे?

दोन पैसे

वर माझी मध्यमवर्गासंदर्भातील समज स्पष्ट केली आहे. माझा प्रतिसाद त्या समजेला अनुसरून आहे.

आता प्रश्न पडतो की मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे काय?

मध्यमवर्गासाठी लेखन म्हणजे त्या वर्गाच्या अभिरुचीला धरून, पचनी पडेल असे लेखन.

३०-४० वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गात आणि आताच्या मध्यमवर्गाच्या साहित्यिक रुचीत फरक पडला आहे का?

अर्थातच पडला आहे. पुर्वी वाचनालयातून पुस्तके आणणारे आता पुस्तके विकत घेऊ लागले आहेत. आजकालचे मध्यमवर्गीय देश-विदेशांत फिरतात, तिकडचे लेखन ऍक्सेसिबल झाले आहे. या सगळ्यामुळे अभिरुची बदलली असणार, असे वाटते. माझ्याकडे याबद्दल लगेच सापडणारे उदाहरण नाही पण कालांतराने सगळ्यांच्याच अभिरुचीत फरक पडत असावा. मध्यमवर्गीयांतही उच्च व हीन अभिरुची असे प्रकार असावेत असे वाटते.

त्यांची साहित्यिक आवडनिवड बदलली आहे का?

आजकाल मेघना पेठे, कविता महाजन वगैरे नावे ऐकायला मिळतात. (या लोकांचे मी काहीही वाचलेले नाही.) पण काही लोकांना आजही पुल, सुशि, वपु झालेच तर जीए आवडत असावेत असे वाटते.

उच्चवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यासाठी लिहिणारे लेखक कोणते?

महाराष्ट्रातील उच्च वर्ग मराठी फारसे वाचत असावा असे वाटत नाही. कनिष्ठ वर्गाविषयी कल्पना नाही पण लेखनापेक्षा इतर माध्यमांतून त्यांची कलासक्ति व्यक्त होत असावी. यात ऍक्सेसिबिलिटीचा अभाव हाही मुद्दा आहेच. (कनिष्ठ व उच्चवर्ग हे माझ्या समजातील मध्यमवर्ग सोडल्यास इतर.)

ते मध्यमवर्गीयांना आवडत नाही असे जाणवते का?

होय. मागे एका संकेतस्थळावर नेमाडेंचे लिखाण कसे वाचवत नाही हे सांगण्याची अहमअहमिका लागल्याचे स्मरते. पण त्यातील बरेचसे लोक स्थानिक लायब्रर्‍यांत मिळणारे, दोर्‍याने बाइंड केलेले, जाड मेणकापडाने वेष्टण केलेले 'नेहमीचेच यशस्वी' लेखन वाचणारे वाटले. अर्थात माझ्या समजातील मध्यमवर्गात त्यांना स्थान आहेच.

मध्यमवर्गाने काय वाचल्याने त्यांचा उत्कर्ष होईल?

सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल. नावे फेकण्यासाठी अधुनमधून इंग्रजी ब्लॉग वाचल्यासही काही लघुकालीन फायदे होणे शक्य आहे. दुर्गा भागवत, इरावती कर्वे अशांची पुस्तके त्यातल्या त्यात जालीय करियरात अपवर्ड मोबिलिटीसाठी उपयोगी ठरतात असा अनुभव आहे. 'नातिचरामी' वगैरे पुस्तकेही फायद्याची ठरू शकतील. शिवाजी सावंत, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, नासं इनामदार यांच्या पुस्तकांना इतिहास समजू नये ही मध्यमवर्गास कळकळीची विनंती.

कोणते वाचन करण्यात मध्यमवर्ग कमी पडतो?

माहीत नाही.

मध्यमवर्गाबद्दल काही चुकीचे प्रवाद रुजू आहेत का?

आहेत. माझा समज हाही एक चुकीचा प्रवाद असू शकेल.

की झोडपण्यास सोपा म्हणून कुणीही उठावे दोन टपल्या मारून जावे अशी मध्यमवर्गाची गत आहे?

मध्यमवर्गीय सोडून इतर मराठी वाचण्या-फिचण्याविषयी फार लोड घेत नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गातील खालचे वरचेच एक्मेकांना टपल्या हाणत असतात.

तुम्ही यावर कधी विचार केला आहे का?

आजकाल करू लागलो आहे. 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' या पुस्तकाची प्रस्तावना वाचतांना (फक्त प्रस्तावनाच वाचली आहे.) काहीबाही विचार आले होते, पण जास्ती काही नाही.

पळवाट: अशा प्रकारच्या सामान्यीकरणास माझा विरोध आहे पण चर्चा मध्यमवर्गाच्या डेफिनिशनपुढे सरकावी म्हणुन प्रतिसाद लिहिला आहे.

हा हा

सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तके वाचल्यास होणार नाही एवढेच सांगता येईल.

एका बाणात किती पक्षी मारणार पंत? :)

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

मध्यमवर्ग आणि अभिरुची

मध्यमवर्ग हे आर्थिक स्थितीचेच निदर्शक आहे असे मला वाटते.

त्या दृष्टीने मध्यमवर्गाची अभिरुची बदलली आहे असे सांगता येत नाही. मुळात मध्यमवर्गाची अभिरुची असे काही असते का हेच माहिती नाही.

पूर्वीच्या मध्यमवर्गातील काही मंडळी उच्चमध्यमवर्गात किंवा उच्च वर्गात गेली आहेत.

माझ्या आयुष्यातल्या निरीक्षणातून सांगतो. लहानपणी आम्ही चाळीत रहात होतो. त्या चाळीत सुमारे २४ बिर्‍हाडे होती. ती त्यावेळी एकाच ठिकाणी रहात असली तरी त्यातली काही तेथे मिसफिट होती. म्हणजे त्यांतली माणसे अधिक कर्तबगार होती. अशी माणसे काही काळानंतर चाळ सोडून फ्लॅटमध्ये रहायला (भाड्याच्या) जात असत.

माझ्या नातेवाईकांपैकी काही नातेवाईक दादरला चाळीत रहात असत. तसेच काही शिवाजी पार्कमध्ये किंवा काही हिंदू कॉलनीत रहात असत. हे सगळे आमच्या सकट स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवून घेत असत. पण ते सर्व एका आर्थिक स्तरातले नसत. दादरच्या चाळीतल्या नातेवाइकापेक्षा हिंदू कॉलनीतल्या नातेवाईकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे. (किंवा पेठेतल्यांपेक्षा जिमखान्यावरील लोकांचे विश्व आणि अभिरुची वेगळी असे). हे मुळातल्या वेगवेगळ्या स्तरातले लोक असत. परंतु यांत जे चाळ टु फ्लॅट संक्रमण झालेले लोक असत त्यांची नाळ अजूनही चाळीच्या संस्कृतीशी/अभिरुचीशी जुळलेली असे. परंतु लहानपणापासूनच फ्लॅटमध्ये वाढलेली त्यांची मुले पूर्णपणे वेगळ्या विश्वात असत.

त्याचप्रमाणे आपल्यातल्या बर्‍याच जणांचे (जुन्या पिढीच्या) कनिष्ठ मध्यमवर्गातून (नव्या पिढीच्या) उच्च मध्यमवर्गात संक्रमण झाले आहे. बहुतांश कारकून असलेल्या पिढीतल्या काहींची मुले इंजिनिअर वगैरे होऊन वरच्या वर्गात गेली आहेत. त्या वरच्या वर्गाच्या अनुषंगाने त्यांची लाइफस्टाइल आणि अभिरुची बदलली आहे. त्या कारकून पिढीच्या मुलांपैकी जी अशी संक्रमित झाली नाहीत (होऊ शकली नाहीत) त्यांची अभिरुची संक्रमित झालेल्यांच्या अभिरुचीपेक्षा नक्कीच वेगळी असणार.

नितिन थत्ते

नाटक-वेडा

मराठी माणूस म्हणजे नाटक-वेडा, असे म्हणतांना ह्यातील वेडा तो मध्यमवर्गी आहे का? अनेक मराठी अजिबात नाटक वेडे नाही.
पुण्यातील सायकली गायब होउन आता त्याची जागा मोटरसायकलींनी घेतली आहे, असा विश्वास ठेवणारा तो मध्यमवर्गी का?

मध्यम वर्ग

संतोष देसाई यांचे मदर पायस लेडी हे पुस्तक असेच मध्यम वर्गासाठी आहे. मध्यम वर्ग हा वाचणा-यांच्या यादीत पहीला येतो (असे मला वाटते) व त्या मुळेच त्यांच्या बद्दल लिहीलेल्या वाङमया बद्दल जास्ती बोललेजाते, चर्चा होते व कानोकानी जाऊन लोक उत्सुकता दाखवतात व पुढे ते साहीत्य प्रसिद्ध होते.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

 
^ वर