सुरक्षितता की स्वातंत्र्य?

बातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप
--------
चर्चाविषय १.१
अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?
समांतर प्रसंग
उदाहरण १
उदाहरण २
उदाहरण ३.१, ३.२, ३.३
उपाय
उल्लेख १
उल्लेख २
उल्लेख ३
--------
चर्चाविषय १.२
निर्बंध लादताना "तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय?
--------
चर्चाविषय २
काल्पनिकांमध्येच (, ) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय? अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय? शक्य तरी आहे काय?

Comments

शक्य

असे शब्द असलेले फोन, मेल टॅप करणे कदाचित तंत्रज्ञानामुळे शक्य असेल. पण त्याचा वापर करणे शक्य नाही असे वाटते. सर्व मेल, फोन वगैरे वाचणे अर्थ लावणे आणि संदिग्ध व्यक्तींवर कारवाई करणे फिजिकली शक्य आहे असे वाटत नाही.

नितिन थत्ते

बाकी विषयावरील मत: स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांतून माणूस नेहमी सुरक्षितता निवडतो आणि स्वातंत्र्य सोडतो. पण स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता जातेच. कारण सुरक्षितता ज्याच्याकडे आता स्वातंत्र्य गहाण ठेवले त्याच्या मर्जीवर अवलंबून राहते. (मत माझे नाही पण खरे आहे).

दोन्ही

स्वातंत्र्य की सुरक्षितता: मला दोन्ही हवे आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माझे मत

बातमी हास्यास्पदही आहे व गंभीरही आहे.

चर्चाविषय १.१
अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?

१.विरोध करावा.
२.विरोध केल्यामुळे, अधिक निर्दोष प्रणाली शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
३.किवा, विरोध केल्यामुळे, गुप्तरीत्या या धोरणाचे अवलंबन केले जाऊ शकते, ते तसेही चालू असण्याची शक्यता आहे.
४.नेहमीप्रमाणे जन आंदोलन, आंतरजालावर जागृती, हुजूर-अर्जी वगैरे 'सरळ' पण कठीण उपाय करून विरोध दर्शवला जाऊ शकतो.
५.किवा, असे शब्द असलेल्या इमैल्स आणि दूरध्वनी संभाषणाचे स्प्याम करणे, एवढा आत्त निर्माण करणे कि कोणचीही प्रणाली कोसळली पाहिजे.


अतिरेकी कार्यामुळे होणारे नुकसान पाहता धोरण असावे असे वाटते खरे, पण सोय असणे हेच तिचा गैरवापर होणे ह्याचे कारण असते, म्हणून ह्या प्रश्नांचे उत्तर हो किवा नाही असे असू शकत नाही असे मला वाटते, दोनीही बाजू असाव्यात विरोध असावा व धोरणही असावे, तसे असल्यामुळे अति-दुरुपयोग कमी होऊ शकतो व धोरणाचा फायदाही होऊ शकतो.

चर्चाविषय १.२
निर्बंध लादताना "तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय?

भयंकर ची व्याख्या करावी लागेल...तसा डेटा उपलब्ध नाही, तुम्ही दिलेल्या दुव्यावरदेखील केवळ माहिती आहे, त्याधारे असे होण्याचे प्रमाण किती हे कळत नाही, हा डेटा उपलब्ध झाल्यास स्कॅन चे दुष्परिणाम अधिक कि स्कॅन न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम अधिक हे समजण्यास हातभार लागेल व उत्तर कळेल. प्रथमदर्शनी हे घातक आहे असेच वाटते. पण मी आधी म्हणल्याप्रमाणे धोरण/सोय असावे पण त्यात वेळोवेळी जनहिताचा कौल घेऊन योग्य बदल अपेक्षित आहेत. ह्यात भांडवलशाहिचे नकारात्मक घटक आहेतच, ते त्यांची सोय बघतात व अशी यंत्रे खपवतात.

चर्चाविषय २
काल्पनिकांमध्येच (१, २) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय? अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय? शक्य तरी आहे काय?

असे करता येऊ शकते का? तर हो तशी सोय असू शकते, पण आत्त विस्तार(volume of data)बघता ते करण्याचा प्रकार हा वेडेपणा ठरेल असे वाटते.

तथ्य वाटत नाही...


गुप्तचर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएसएच्या कम्प्युटर नेटवर्क अटॅक प्रणालीद्वारेतर जगातील कुठल्याही देशातील कुठलेही संगणक हॅक करून त्यातील माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा मिळवू शकतात.

च्यायला ही एवढी सोपी बाब असते काय? "डाय हार्ड ४.०" ची आठवण झाली. हॅक की क्रॅक? जर यात तथ्य असेल तर ते खूपच विकसीत आहेत. बाकी जार्गन फाइलनुसार "हॅकर्स" स्वार्थापोटीच काड्या करतात. राष्ट्रपती होण्याअगोदरच्या मतदानपूर्व काळात ओबामावर हल्ला झाला होता बहुतेक, पण नंतर राष्ट्रपती झाल्यापासून अजुनपर्यंत एकही आत्मघाती हल्ला त्यांच्यावर झाल्याचे ऐकिवात नाही. काही "लग्गा (सेटिंग)" तर नाही? ;-P


अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?


नक्कीच विरोध करावे. पटण्यापलिकडचे असल्यास माझा यासमांतर गोष्टींना विरोध असेल. ज्यांचा-ज्यांचा विरोध आहे त्यांनी एकत्र येऊन शक्य त्या मार्गाने (पुढे गुन्हेगार, दहशतवादी, इत्यादी पदव्या नावासोबत जोडल्या जाणार नाहीत, याची काळजी बाळगून) विरोध करावा. आमरण-उपोषण, आत्मदहन, मुक-आंदोलन या गोष्टींमध्ये आर्थिक, मानसिक, शारिरिक नि सामाजिक नुकसान होण्याचे जास्त चान्सेस असतात, शिवाय ज्यासाठी ह्या गोष्टी केल्या, त्यांची पूर्तता होण्याचे चान्सेस मात्र खूपच कमी असतात. याउलट बहिष्कार, रास्ता रोको, तोड-फोड, सील करणे अशा समुहाने मिळून करायच्या गोष्टींचा आधार घेऊन विरोध प्रकट केल्याने कुठलेही नुकसान होण्याचे चान्सेस कमी, आणि ज्या मागण्या आहेत, त्या नाइलाजास्तव काही काळातच पूर्ण होण्याचे चान्सेस अधिक असू शकतात.
ह्म्म, जर एकट्याचाच विरोध असेल तर मात्र अवघड आहे. बरेच थ्रिलर पिच्चर पहावे लागतील, ज्यात एकच नायक असतो आणि इतर सर्व पात्रांना कुठल्यातरी कारणास्तव त्याचा विरोध असतो.

हम्म

अशी सुविधा असणे आणि तिचा वापर करणे सद्यकाळात प्रॅक्टिकल वाटत नाही.

या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय?

हे औषध कोण कितीवेळा वापरतो यावर त्याला भयंकर ठरवायचे की नाही हे अवलंबून आहे. संसदभवन, विधिमंडळ वगैरेमध्ये असे स्कॅनिंग रोज होत असावे. तिथे या औषधाचा मारा करण्यास माझी हरकत नाहीत. (देशातले सर्वात मोठे गुन्हेगार दुसरीकडे एकत्र कुठे सापडणार?)

बाकी वर थत्ते म्हणतात तसे - सुरक्षितता गेली की स्वातंत्र्य जाते आणि स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता.

काळं पांढरं

सुरक्षा व स्वातंत्र्य या दोन डिजिटल संकल्पना असून हे नाही तर ते अशी अस व्हर्सेस देम निवड करण्याचा प्रश्न आहे अशा अविर्भावात हा विचार मांडलेला आहे. प्रत्यक्ष जीवनात असं नसतं. मुळात काही बाबतीत काही मर्यादित निर्बंध असणं म्हणजे स्वातंत्र्य नष्ट होणं नव्हे. आपण कितीतरी निर्बंध घालून घेतो, अनेक स्वातंत्र्यं मर्यादित करतो.
- गाडी बेलगाम हाकण्याचं, चौकात न थांबण्याचं स्वातंत्र्य
- वाटेल ते पाणी पिण्याचं स्वातंत्र्य
वगैरे वगैरे...

एका अर्थाने बघितलं तर सुरक्षा ही स्वातंत्र्याच्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आपला जीव सुरक्षित राहिला की इतर स्वातंत्र्यं उपभोगण्याची शक्यता वाढते. गाडी न थांबता हाकण्याचं स्वातंत्र्य कमी केलं तर अपघातात पाय जाण्याची शक्यता कमी होते व चालण्याचं स्वातंत्र्य वाढतं. तेव्हा आपल्या वागणुकींतून व त्यांना घातलेल्या मर्यादांतून स्वातंत्र्य जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो असा प्राथमिक हायपोथिसिस मांडायला हरकत नाही. निर्बंध क्ष अक्षावर व स्वातंत्र्य य अक्षावर मांडलं तर काहीसा घंटेचा आकार (बेल-शेप) तयार होईल (उजवीकडे लांब शेपूट असलेला).

प्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का? किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का?

फोन, इमेल टॅप - ही अतिरेकी सनसनाटी बातमी वाटते. वाचून असं वाटतं की राजेश घासकडवी या व्यक्तीकडे, केवळ त्याने कुठल्यातरी लेखात बराक ओबामाचा उल्लेख केला म्हणून काही पोलिसांचं बारीक लक्ष आहे. त्याचा प्रत्येक शब्द ऐकून, वाचून त्याच्या आयुष्याविषयी माहिती काढली जाते आहे. आपली गुपितं जाणणारी व्यक्ती किंवा संघटना आहे ही कल्पना काहीशी भीतीदायक आहे. तसं नसावं. संभाव्य गुन्हेगार ओळखण्यासाठी ज्या आठ दहा चाळण्या लावल्या जातात त्यातली ही एक चाळणी असावी. अशा चाळणीतून उरतील ते पुढच्या चाळणीत जातील, असं करत करत शेवटी जे मोजके उरतील त्यांच्याकडेच बारीक लक्ष देणं कुठच्याही संघटनेला परवडत असावं.

फुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा? हे स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे समजा एखाद्या रोगामुळे शंभरातले दहा जण मरतात. औषधामुळे त्या रोगापासून एकच मरतो. मात्र औषधाच्या दुष्परिणामांमुळे आणखीन एक जण मरतो. मात्र जर कोणी म्हटलं की (औषध द्यायला लागल्यानंतर) रोगाने मरणाऱ्यांची व औषधामुळे मरणाऱ्यांची संख्या सारखीच आहे - त्यामुळे औषध देऊ नये. तर त्यात गल्लत आहे. रोगावर औषध द्यावंच - कारण दहा मेले असते तिथे दोनच मरतात. मृत्यूंची संख्या पाच पटीने कमी होते. शिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षेपेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.

बाकी बंधनं, विशेषतः सरकारी खात्यांमधून आलेली ही बऱ्याच वेळा या बेल कर्व्हच्या माथ्यापासून दूर नेणारी असतात याबद्दल वाद नाही. सामान्य माणसांना धरणांजवळ फोटो काढायला बंदी होती - शत्रूला नकाशे तयार करता येऊ नयेत म्हणून. कदाचित अजूनही असेल. शत्रूच्या हेरांना असा उघड दिसणारा कॅमेरा वापरण्याची गरज नसावी. म्हणजे हा निर्बंध अनाठायी होता. फक्त अतिरेकी बंधनं झाली की जनता सरकार बदलून ती बंधनं नष्ट करू शकतं. आणीबाणीनंतर बंधनांना विरोध हे सरकार पडण्याचं मुख्य कारण होतं. हे सर्व देशांमध्ये लागू नाही...

जाताजाता - इतके दुवे नका हो देऊ. विशेषतः त्या दुव्यांमध्ये दिलेली गोष्ट एका वाक्यात किंवा काही शब्दात सांगता येत असेल तेव्हा. वाचनाचा अनुभव तुटक तुटक होतो. तुम्ही दिलेल्या बारापैकी आठ-दहा दुवे सहज उडवता आले असते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+

सहमत आहे.

नितिन थत्ते

इतके दुवे नका हो देऊ.

सहमत! च्यायला, टेक्नीकल पेपर वाचताना सुद्धा इतका त्रास नाही हो होत! ;-)

-Nile

खुलासा

प्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का? किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का?

मान्य, पण आचरट वाटलेल्या निर्बंधांचीच उदाहरणे दिली आहेत.

फोन, इमेल टॅप

हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही असे मला वाटते.

  1. दूरध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक दूरध्वनी केंद्रात आणि भ्रमणध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक मनोर्‍यात तशी यंत्रणा बसवावी लागेल.
  2. उच्चार ओळखण्याचे तंत्रज्ञान पुरेसे विकसित झालेले नाही.
  3. इमेल वाचण्यासाठी सर्व इमेल कंपन्यांनी सहकार्य दिलेले आहे असे गृहीत धरू. तरीही, इमेल सर्वर बनविणे खूपच सोपे असते. त्यासाठी वेबसाईट बनविण्याचीही आवश्यकता नाही. आंतरजालाशी सतत जोडलेल्या (थेट जोडणी हवी, लॅन मधील संगणक चालणार नाही) कोणत्याही संगणकात इमेल सर्वर बनविता येतो. सध्याच्या आयपी४ प्रकारच्या आंतरजालाशी थेटपणे सुमारे ४ कोटी संगणक जोडलेले असू शकतात. त्या सर्वच संगणकांत घुसून इमेल शोधाव्या लागतील. किंबहुना, अशा संगणकात इमेल सर्वरचीही आवश्यकता नाही. परवलीचा शब्द वापरून संगणकात शिरून एखाद्या सामायिक फाईलमध्ये अतिरेकी एकमेकांसाठी संदेश लिहून ठेवू शकतील.
  4. इमेल किंवा केवळ खासगी संगणक किंवा ध्वनीचा वापर करून सांकेतिक भाषेत (एनक्रिप्ट करून) संदेश पाठविले तर तिचा अर्थ लावावा लागेल. परवल्यांच्या (पासवर्ड) कोणत्याही तंत्रज्ञानाला तोडणारे असे तंत्रज्ञानही उपलब्ध नाही. (साधेच उदाहरण द्यायचे तर पोलिसांना मामू म्हणत असत अशी बातमी प्रसिद्ध झाली होती, आता काही वेगळा शब्दही असू शकतो.)

मुद्दा असा आहे की ड्रायविंग वेन ब्लॅक हे जसे संशय घेण्यासाठी पर्याप्त कारण नसते त्याप्रमाणे हे शब्द वापरणे (पुढच्या उदाहरणांमध्ये मोठा कॅमेरा घेऊन फिरणे) हेही पर्याप्त कारण ठरू नये. ड्रायविंग वेन ब्लॅक प्रकारचा संशय घेऊन होणार्‍या अतिक्रमणाला विरोध करण्यासाठी तोंडाला काळे फासून फिरणे हा उपाय फोल ठरेल परंतु इमेल वाचणारे तंत्रज्ञान आले तर 'मुद्दाम हे शब्द असलेले (निष्पाप अर्थ असलेले, गुन्हा करण्याचा काहीही हेतू नसलेले) इमेल पाठविणे' हा उपाय ठरेल असे मी सुचविले आहे. मुद्दा असा आहे की शंभर दहशतवादी सुटले तरी चालेल परंतु संशयित कोणाला म्हणावे त्याचे नियम आचरट करू नये.

फुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा? हे स्पष्ट केलेलं नाही.

होय, तसा स्पष्ट उल्लेख नाही परंतु हा साधा मुद्दा त्यांनी लक्षात घेतलाच असेल असे वाटते.

शिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षेपेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.

त्यांच्या वाटण्याचे समर्थन होऊ शकत नाही.
--------

इतके दुवे

सर्वांना झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व.
--------
"In fact," said Mustapha Mond, "you're claiming the right to be unhappy."
"All right then," said the Savage defiantly, "I'm claiming the right to be unhappy." "Not to mention the right to grow old and ugly and impotent; the right to have syphilis and cancer; the right to have too little to eat; the right to be lousy; the right to live in constant apprehension of what may happen to-morrow; the right to catch typhoid; the right to be tortured by unspeakable pains of every kind."

बेन फ्रँकलिन्

"Those who sacrifice freedom for security deserve neither."
बेन फ्रँकलिन्

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

 
^ वर