रंग म्हणजे काय?

श्री. विशाल तेलंग्रे एका यांच्या धाग्यात हा प्रश्न मी उपस्थित केला होता. श्री धनंजय यांच्या प्रतिसादाप्रमाणे हा प्रश्न फारच कठिण आहे. श्री. धनंजय यांच्याशी मी पूर्ण सहमत आहे. म्हणून या बाबतीत चर्चा करण्यासाठी निराळा धागा सुरू करावा असे मला वाटते.

मी हा प्रश्न उपस्थित करण्याचे एक प्रमुख कारण माझी एक जुनी आठवण आहे. ती प्रथम सांगतो. मी इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत असताना एक दिवस आमचा इलेक्ट्रॉनिक सर्किट्स नामक विषयाचा तास चालू असताना दारावर टकटक झाली व खड्या आवाजात "मे आय कम इन?" अशी दाराबाहेरून पृच्छा झाली. आमच्या व्याख्यात्यांनी निरिच्छेनेच " यस" म्हणून प्रतिसाद दिल्यावर मैसूरी पद्धतीचा फेटा बांधलेली एक व्यक्ती व तिचे दोन सहाय्यक आत शिरले. आमच्या व्याख्यात्यांनी जमिनीवर लोटांगण घेण्याचेच फक्त बाकी होते. ही व्यक्ती सर सी.व्ही.रामन असल्याचे त्यांनी आम्हाला हळूच सांगितले. सी. व्ही. रामन यांनी मग आम्हाला सगळ्यांनी काही कार्डस दिली. प्रत्येक कार्डवर एका रंगातील चौकोन रंगवलेला होता. मग प्रत्येकाने त्याच्या कार्डावरचा रंग कोणता आहे हे सांगावे असे त्यांनी सांगितले. ते आम्ही सांगितल्यावर त्यांच्या सहाय्यकांनी त्या कार्डांचे नबर व आमची उत्तरे हे टिपून घेतले. यानंतर कार्डांचे रीवाटप करून परत एकदा हाच प्रयोग करण्यात आला.
हे सगळे झाल्यावर आम्ही साहजिकच श्री. रामन यांना ते काय टेस्ट करत आहेत? अशी पृच्छा केली. त्यावेळी त्यांनी जे काय सांगितले ते माझ्या पक्के स्मरणात आहे.
ते म्हणाले की एखादी वस्तू अमूक रंगाची आहे हा अनुभव व्यक्तीनिष्ठ आहे किंवा फक्त मानवालाच येणारा आहे का? हे मी शोधतो आहे. आपल्याला एखादे फूल लाल पिवळे व खूप मोहक वाटते. पण कीटकांनी आकर्षित व्हावे म्हणून निर्माण होणारे ते फूल कीटकांना वास्तविक कसे दिसते? हे आपल्याला कोठे माहित आहे? रानातील वन्य पशु पक्षी यांना तरी रंग दिसतात का? हे आपल्याला माहीत नाही. प्रत्यक्षात रंग म्हणजे काय? हे मी शोधण्याचा प्रयत्न करतो आहे?
माझ्या माहिती प्रमाणे श्री. रामन या प्रसंगानंतर काही कालानंतर कालवश झाले व त्यांचे संशोधन अपुरे राहिले.
श्री. रामन यांच्यासारख्या वैज्ञानिकाला उत्तर न देता येणार्‍या प्रश्नाचे उत्तर मला देता येईल हे संभवनीय नाही. त्यामुळे तो प्रयत्न न करता मी फक्त माझे काही विचार मांडतो. व्हिजिबल स्पेक्ट्रम मधले रंग म्हणजे एका विशिष्ट वारंवारितेच्या विद्युत चुंबकीय लहरी असतात ही आपल्याला माहीत आहे. मानवी डोळा या विशिष्ट लहरीचे अस्तित्व डिटेक्ट करू शकतो व मेंदूला तसा संदेश पाठवतो. रंगांध असलेल्या व्यक्तींचा डोळा या लहरी डिटेक्ट करू शकत नाही. कीटक, पशु व पक्षी हे करू शकतात किंवा नाही याची मला तरी माहिती नाही.
मेंदूकडे संदेश येणे या पायरी पर्यंत सर्व सरळ आणि सोपे आहे. यापुढे काय होते हे सांगणे खरोखरच कठिण आहे. अलीकडे जालावर डीप स्पेस मधे असलेल्या गॅलॅक्सी, अवकाश धूळ वगैरे गोष्टींचे हबल सारख्या दुर्बिणीने घेतलेले फोटो आपल्या पहाण्यात येतात. प्रत्यक्ष दुर्बिणीने बघितल्यास या गोष्टी पांढरट धुरकट दिसतात. मात्र अलीकडे कोणी या गोष्टी प्रत्यक्षात बघत नाही. दुर्बिणीतून येणारी इमेज इलेक्ट्रॉनिक डिजिटल संदेशात बदलून नंतर ही छबी संगणकाच्या पडद्यावर घेतली जाते. ही घेताना रंग हायलाइट केले जातात व आपल्याला आकर्षक असा एक फोटो पडद्यावर दिसतो.
उपग्रहांच्या सहाय्याने जेंव्हा पृथ्वीच्या अती रक्त इमेजेस घेतल्या जातात तेंव्हा त्यांचे आपल्याला आकलन होण्यासाठी नंतर मानवी डोळ्याला समजतील अशा रंगांच्यात त्या बदलून पडद्यावर घेण्यात येतात.
याच पद्धतीने रंगांचे आकलन आपल्याला होत असावे असे मला वाटते. डोळ्याकडून एखाद्या रंगाची विशिष्ट वारंवारितेची लहर डिटेक्ट होऊन त्याचा संदेश मेंदूकडे गेला की मेंदू आपल्या मेमरीचा वापर करून जुन्या तयार केलेल्या बेंचमार्क्सचा संदर्भ घेतो व आता डोळ्यासमोर अमूक रंग आहे अशी आज्ञा सोडतो.
आता हे बेंचमार्क्स आपल्याला वंशपरंपरेने येतात की ते तयार केले जातात हे मला सांगणे अशक्य आहे. त्याच प्रमाणे हे सगळे चुकीचेही असू शकते. परंतू रंग हा वस्तूचा गुणधर्म नसून मेंदूने तयार केलेला एक बेंचमार्क असावा असे मला ठामपणे वाटते.
उपक्रमींना काय वाटते हे मला समजून घ्यायला आवडेल.

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रश्न

डोळ्यांमार्फत आलेल्या संदेशाचे आणि लहानपणापासून असलेल्या रंग-संस्कारांचे गणित मांडून जे उत्तर येते त्याला रंग असे म्हणतात, हे सर्वसाधारण उत्तर आहे असे मला वाटत होते पण ते तितकेच असते तर रंग-अंध लोकांना ते रंग का दिसत नाहीत हा प्रश्न सुटत नाही, ह्यावर इथे रंगाची जाणीव कशी केली जाते ह्याबद्दल उत्तम विवरण आहे कदाचित हे आपल्याला मदतीचे ठरेल.

इथे प्राण्यांना दिसणाऱ्या रंगाबद्दल देखील थोडे लेखन आहे.

न्युमेरीकल रेप्रेझेंटशन

मी ह्या विषयाचे अतिसुलभीकरण करण्याच्या प्रयत्नात नाही. पण सी. व्ही रामन ह्यांना पडलेला प्रश्न मला वाटते पुढील प्रमाणे सोडवता येऊ शकतो.
प्रत्येक व्यक्तिची रंगाची जाणीव वेगळी असेल तर ज्याला एखादी व्यक्ति लाल समजते आहे त्यास दुसरी व्यक्ति निळा समजते असे असेल तर कंप्युटरच्या वापराने आपणास ते सहज सिद्ध करता येइल. अभ्यासक स्वतःही हे रंग त्याच्या स्वतःच्या जाणीवेनुसार पहाणार असल्यामुळे अशी यंत्रणा लागेल की, जी निर्पेक्ष असेल.
कंप्युटरच्या स्क्रीनवर रेंडर होणाऱ्या प्रत्येक रंगाच्या पिक्सेलचे न्युमेरीकल रेप्रेझेंटशन वेगळे असते व तेच तेथे कामी येइल.
प्रत्येकास लाल, निळा, पिवळा रंग त्याच क्रमाने दाखवला तर आणि त्यांनी दिलेली उत्तरे अशी असतील तर ते शोधणे फारसे अवघड नाही.

कंप्युटर्वरील रंगाचे नाव कंप्युटर्वरील रंगाचे पिक्सेल
लाल 255, 0, 0
निळा 0, 0, 255
पिवळा 255, 255, 0

व्यक्ति दाखवलेला रंग व्यक्तिचे उत्तर
१ 255, 0, 0 पिवळा
२ 0, 0, 255 लाल
३ 255, 255, 0 पिवळा
४ 0, 0, 255 लाल
५ 255, 0, 0 निळा
६ 255, 255, निळा

असे आले तर उत्तर स्पष्ट आहे.

काही स्पष्टीकरणे

1.मी सांगितलेली आठवण 1963 या वर्षीची आहे. सी.व्ही रामन यांना संगणकाचे कोणतेही सहाय्य त्या वेळी शक्य नव्हते.
2. रंग अंध लोकांना रंगाचे ज्ञान होत नसण्याची दोन कारणे शक्य वाटतात. पहिले मी माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांचे डोळे या वारंवारितेच्या लहरी डिटेक्ट करू शकत नसावेत. या शिवाय दुसरी अशीही शक्यता आहे की काही जनुकीय दोषांमुळे त्यांच्यामधे रंगांचे बेन्चमार्क तयार करण्याची क्षमताच नसेल. माझ्या ओळखीची एक अशी व्यक्ती आहे जी रंग अंध आहे. मी एकदा या गृहस्थांना ते चौकातले वाहतुक नियंत्रण दिवे कसे समजू शकतात असे विचारले होते. तेंव्हा असे समजले की ही मंडळी वरचा दिवा थांबण्याचा व खालचा पुढे जाण्याचा असे लक्षात ठेवतात. त्यांना हा दिवा लागला आहे हे दिसत असते. या शिवाय काही रंग अंध मंडळी रंग ओळखू शकतात पण त्यांना लाल आणि हिरवा यातील फरक समजत नाही.
3. नवजात अर्भकाला रंग ओळखता येत नाहीत. 2 ते 3 वर्षांनंतर आई-वडील व आजूबाजूला असलेली इतर माणसे हा अमूक रंग, हा तमूक रंग असे त्यांना पढवत राहतात. असे कित्येक दिवस केल्यावर मूल हळू हळू रंग ओळखू शकते. प्रथम त्याला बहुदा निळा व लाल हे रंग ओळखता येऊ लागतात. मग इतर. या उदाहरणामुळे मला रंगांचे बेन्चमार्क मेंदू तयार करत असण्याची शक्यता वाटते.
4. गॅलॅक्सी किंवा इतर डीप स्पेस ऑब्जेक्ट्स यांच्या अंतर्भागामधे असणार्‍या तपमानाप्रमाणे त्या भागाला संगणक तपमाननिदर्शक रंग संगणक देत असतो. अती रक्त इमेजेस पडद्यावर घेताना भूभागांना त्यांच्या तपमानाप्रमाणे असेच रंग संगणक प्रदान करतो. पडद्यावर दिसणारे चित्र कितीही नयन मनोहर वाटले तरी प्रत्यक्षात ते तसे नसते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अवकाशीय रंग

गॅलॅक्सी किंवा इतर डीप स्पेस ऑब्जेक्ट्स यांच्या अंतर्भागामधे असणार्‍या तपमानाप्रमाणे त्या भागाला संगणक तपमाननिदर्शक रंग संगणक देत असतो. अती रक्त इमेजेस पडद्यावर घेताना भूभागांना त्यांच्या तपमानाप्रमाणे असेच रंग संगणक प्रदान करतो. पडद्यावर दिसणारे चित्र कितीही नयन मनोहर वाटले तरी प्रत्यक्षात ते तसे नसते.

हबलसारख्या शक्तिशाली दुर्बिणींनी घेतलेल्या अवरक्तवर्णी किंवा श्वेत न् कृष्णवर्णी(?) प्रकाशचित्रांना नंतर प्रोसेस करुन आपल्याला समजण्यासाठी रंगीत चित्रे तयार केली जातात. यासाठी तापमाननिदर्शक रंगांचा—देखाव्यातील दिसणार्‍या निरनिराळ्या भूभागांमधील/गोष्टींमधील विविध मुलद्रव्ये आणि इतर पदार्थांच्या घनतेनुसार फरक दर्शवण्यासाठी त्या चित्रांना रंगवण्यासाठी उपयोग होत असावा. माझा प्रश्न असा आहे की, दुर्बिणींकडून मिळालेली आंतरजालावर उपलब्ध चित्रे ज्याप्रमाणे रंगीत दिसतात, त्याचप्रमाणे मुळात अवकाशातील या गोष्टींना खरेच रंग असतो का, तो विविध प्रकारचा असतो का, म्हणजे लाल, निळा, अवरक्त, अतिनील इत्यादींप्रमाणे? अवकाशाचा (किंवा अवकाशीय पोकळीचा रंग कुठला असतो, जर काळा असेल, तर म्हणूनच रात्री पृथ्वीवरुन दिसणारे अवकाश काळेकुट्ट दिसते का?) जर अवकाशीय वस्तूंना विविध प्रकारचा व विशिष्ट रंग असतो तर दुर्बिणींद्वारे त्यांची जशीच्या तशी (म्हणजे त्याच रंगांमध्ये) प्रकाशचित्रे का टिपले जात नाहीत?

उत्तर तुम्हास ठावुक आहे.

--अवकाशाचा (किंवा अवकाशीय पोकळीचा रंग कुठला असतो, जर काळा असेल, तर म्हणूनच रात्री पृथ्वीवरुन दिसणारे अवकाश काळेकुट्ट दिसते का?)---
हा प्रश्न तुम्ही का विचारला आहे ते कळले नाही. त्याचे उत्तर तुम्हास ठावुक आहे.

तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

अवकाशातील गोष्टींना असे रंग प्रत्यक्षात असतात किंवा नाही हेच सांगणे कठिण असते. या गोष्टींकडून येणारे रेडिएशन इतके मंद असते की त्या रेडिअशनला कोणता रंग आहे किंवा नाही हे आपला डोळा सांगू शकत नाही. या शिवाय नेब्यूला सारख्या अनेक अवकाश वस्तू स्वत: प्रकाश किरण रेडिएट करतच नाहीत. अशा गोष्टी पुष्कळदा परावर्तित प्रकाशामुळे किंवा त्यांच्या तपमानावरून डिटेक्ट होतात. या साठी अती रक्त किंवा अती नील सेन्सॉर्स वापरले जातात. या इमेजेस तर आपल्या डोळ्यांना दिसणे शक्यच नसते. त्यामुळे बहुतेक वेळा या अवकाशवस्तूंना संगणक रंग देतो. ग्रह किंवा चंद्र हे तेजस्वी असल्याने त्यांचे प्रकाशकिरण जो रंग रेडिएट करतात तो आपल्याला दिसू शकतो.

या शिवाय रंग तपमान म्हणून एक कन्सेप्ट आहे. रंग हा तपमानाचे युनिट म्हणून पुष्कळदा (डिग्री केव्हिन)वापरला जातो. या सगळ्या अडचणींमुळे आपल्याला जालावर छान वाटणार्‍या इमेजेस प्रत्यक्ष दुर्बिणीतून बघण्याचा प्रयत्न केला तर त्या फक्त धुरकट दिसतात. मृग नक्षत्रातला प्रसिद्ध नेब्यूला(ओरायन नेब्यूला) अगदी लो पॉवरच्या दुर्बिणीतूनही दिसू शकतो पण तो धुरकट पांढरट दिसतो जालावरचे त्याचे चित्र इतके सुंदर दिसते की विचारू नका. या दुव्यावर थोडी जास्त माहीती आहे .
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ओरायनमुळे विषयांतर

मृगशीर्ष नक्षत्रातील खालचा व्याध (Sirius) तारा आठवला. त्याची भारतातून (जमिनीवरुन) अन्यथा उपग्रहांद्वारे घेतलेली चित्रे आंतरजालावर पाहता येतील का? माझ्या उबुन्टूवर मी [स्टेलॅरिअम], [सेलेस्टिआ] सारख्या प्लॅनेटेरिअम प्रकारातील मुक्त स्रोत प्रणाल्या प्रस्थापित केलेल्या आहेत. यामधील स्टेलॅरिअम द्वारे कुठल्याही इच्छित स्थळाहून इच्छित गोष्टीचा अवकाशात वेध घेता येतो. मी या प्रणालीच्या मदतीने तारा किती वाजता, कुठे उगवेल याची माहिती काढतो पण आमच्या औरंगाबादेत लख्ख प्रकाशामुळे आकाशात चंद्राशिवाय बाकीचे तारे खूपच अंधुक दिसतात किंवा दिसतही नाही.

व्याधाची चित्रे असलेल्या दुव्यांच्या प्रतिक्षेत!

सिरियस तारा

सिरियस किंवा व्याध हा तारा मृग नक्षत्रात मोडत नाही. भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्राप्रमाणे हा तारा ज्या तारका समुहात आहे त्याला नक्षत्र मानले जात नव्हते. जगात बाकी ठिकाणी हे नक्षत्र (कॉन्स्टेलेशन) मोठा कुत्रा (कॅनाइन मेजर) या नावाने ओळखले जाते. मात्र लो.टिळकांच्या मताप्रमाणे ऋग्वेदात या तारका समुहाचा. कुत्रा या नावानेच उल्लेख आहे. हे नक्षत्र उगवले की शरद संपात दिन जवळ आला असे समजले जात असे व त्यामुळे वार्षिक धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी आर्य लोकांची गडबड उडे. डॉग डेज हा वाक्प्रचार त्यामुळेच आला असावा असे टिळक ओरायन या आपल्या ग्रंथात म्हणतात.
प्रत्यक्षात सिरियस हा एक तारा नसून जोडी आहे यातील सिरियस ए हा तारा अतिशय तेजस्वी आहे तर सिरियस बी हा तारा मंद आहे.
हबल दुर्बिणीने या तार्‍यांच्या जोडीचा घेतलेला फोटो या दुव्यावर बघता येईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

फोटोच्या दुव्याबद्दल धन्यवाद!

व्याध बायनरी स्टार आहे, पाहतांना जरी तो एकच तारा दिसत असला तरी ते एकमेकांभोवती फिरणारे दोन तारे आहेत, हे मात्र मला माहित नव्हते! इतर माहितीबद्दलही मनःपूर्वक आभार!

:)

व्याध बायनरी स्टार आहे, पाहतांना जरी तो एकच तारा दिसत असला तरी ते एकमेकांभोवती फिरणारे दोन तारे आहेत, हे मात्र मला माहित नव्हते!

आश्चर्य आहे ;)
डॅनिकेन यांच्या मते ते ज्ञान पृथ्वीवर हजारो वर्षे आहे!
Who told the Dogons about Sirius and about the other space science secrets? Author Robert K. G· Temple (The Sirius Mystery, St, Martin's Press, 1975) claims to be able to trace the Sirius-B myth back through Egyptian mythology to Sumerian mythology, thus establishing the certainty that the informants were extraterrestrials. Ancient astronauts entrepreneur Erich von Daniken endorses and adopts Temple's explanations in his latest book, Von Daniken's Proof. संदर्भ
क्ष्

याबद्दल कधी वाचनात आले नाही

मला सिरिअस बद्दल माहिती होऊन केवळ महिना झाला असेल (एक ट्रेकिंग संदर्भात लेख वाचत असताना), आणि डॅनिकेन यांची ओळख होऊन केवळ २-३ महिने झालेत—त्यांचे पुस्तक "चॅरिओट्स ऑफ गॉड्स" वाचल्यामुळे... टेम्पल यांच्या सिरिअस संदर्भातील ऐतिहासिक गोष्टींशी संबंध असल्याचे डॅनिकेन यांनी या पुस्तकात लिहिल्याचे आठवत नाही, शिवाय जरी याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलं असलं तरी वाचताना त्याकडे दुर्लक्ष झालं असावं... तूर्तास दुव्याबद्दल धन्यवाद. Von Daniken's Proof पुस्तकाबद्दल माहित नाही, बघतो त्यावरील माहिती आता...

अवांतर.

थोडीशी चांगली दुर्बिण आणि स्वच्छ आकाश असेल् तर दोन्ही तारे दिसतात. मी पाहिले आहेत. (त्या दिवशी त्यांच्या मागे(बहुदा), आणि पुष्कळ जवळ तिसराच् तारा आल्याने मात्र प्रथम इतक्या सहजी दिसल्याने आश्चर्य वाटले होते.) अवांतरबद्दल क्षमस्व.

-Nile

टेस्ट

जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे वेळी रंगांधळेपणाची टेस्ट घेतात तेव्हा एक रंग दाखवून तो ओळखण्यास सांगत नाहीत तर एका रंगाच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या रंगाची अक्षरे किंवा आकार काढलेले असतात आणि ते दिसतात की नाही ते पाहिले जाते. त्याअर्थी रंगांधळेपणा हा रिलेटिव्ह रंग ओळखण्याची पात्रता नसणे याच्याशी निगडित असावे. म्हणजे हिरव्या पार्श्वभूमीवर निळे अक्षर न दिसणे वगैरे.

नितिन थत्ते

रोचक

रोचक चर्चा विषय.. चर्चा वाचतो आहे. मात्र अधिक भर घालण्यास असमर्थ आहे

(थोडे अवांतरः रंगाधळेपणाच्या टेस्टच्या वेळी दरवेळी, हिरवे-तपकिरी, नारंगी-पिवळे, (बहुदा) निळे-करडे ह्याच जोड्या दिसतात. रंगाधळे हे ठराविक जोड्यांसाठीच रंगाधळे असतात का?)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अवकाशातील आणि सूक्ष्म वस्तुंचे रंग

अवकाशातील रंग हे निश्चित पणे बदलून दिले जातात. अर्थात तसे करण्यात काही स्वार्थ असतो (म्हणजे वेगवेगळ्या वस्तु कुठल्या ते कळणे. सूक्ष्म चित्रातील रंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मधील चित्रांचे रंग असेच दिले जातात. याशिवाय कित्येक चित्रे ही कल्पनाचित्रे असतात काही काही वेळा असा उल्लेख केला जात नाही. त्यातही रंग भरपूर भरलेले असतात. वातावरणाच्या चित्रांनाही रंगांचे आवरण चढवले जाते.

हे सर्व नकली आहेत. अशा वेळी रंग हा तयार केला आहे असे उल्लेख हवेत. नेमके तेच नसतात (बरेचदा.)

याहून दुसरे उदाहरण म्हणजे आपण नेहमी करतो ती फोटोग्राफी. पूर्वी केमिकलने व्हायची आता डिजिटलने. केमिकलच्या वेळची आठवण म्हणजे कोनिकाचे रंग कोडॅक पेक्षा वेगळे यायचे. फोटो बरेचदा प्रत्यक्षातल्यापेक्षा जास्त गडद यायचे. त्यानंतर एकाच निगेटीव्ह पासून काढलेल्या प्रिंटस मधे भरपूर फरक असायचा. तेंव्हा मला एका लॅबवाल्याने सांगितले होते की कुठल्या रंगाचे किती एक्स्पोजर द्यायचे याचे ठरलेले नियम नाहीत ते ऑपरेटरच्या मनावर आहेत. डिजिटल मधे तर आता प्रत्येक गोष्ट बदलणे शक्य असते.

कुठला प्रकाश पडतो यावर रंग अवलंबून असतो. हा फरक लोकरीच्या कपड्यांवर जास्त पटकन कळतो असा माझा अनुभव आहे. दिवसाचे रंग, दुकानातले रंग (मर्क्युरी लँप खालील), रस्त्यावरच्या सोडीयम लँप मधील रंग सर्वच वेगवेगळे दिसतात. अशा वेळी सूर्यप्रकाशातील रंग हा खरा रंग समजता येतो. याच कारणाने डे-लाईट सारखा आभास करणारे निरनिराळे बल्ब एकत्र लावावे लागतात.

सॉयकॉलॉजिकल कारणे अजून वेगळी.

प्रमोद

रस्त्यावरील सोडीअमचे दिवे


कुठला प्रकाश पडतो यावर रंग अवलंबून असतो.[...]रस्त्यावरच्या सोडीयम लँप मधील रंग[...]

हा अनुभव रोज रात्री नाइट-वॉकला जाताना येतो... सोडिअमच्या दिव्याखाली सोबतच्याकडे पाहिले की तो कुठलातरी विचित्र प्राणी दिसतो. त्वचेचा रंग एकदम किळसवाणा दिसतो. :P

तरंग लांबी

आधी चर्चा झाली असल्यास त्याचा पॉईंटर द्यावा-

मुळ प्रकाश (पांढरा की बिनरंगी) जेव्हा एखाद्या उत्सर्गबिंदूतून बाहेर पडतो (ऊदा- बल्ब), तेव्हा त्याप्रकाशाच्या रंगाची ची तरंग लांबी जितकी असते ती एखादी रंगीत काच मधे आणली तर का बदलल्ते?

(प्रश्न चुकीचा असल्यास दुरुस्ती सुचवावी)

रोचक प्रश्न

मला याचे कारण माहित नाही, पण उत्तर जाणून घ्यायला आवडेल... :)

?

प्रश्न मला कळला असेल तर स्रोतापासून निघालेल्या पांढर्‍या (सर्वरंगी) प्रकाशात सर्व लांबीच्या लहरी असतात (मिश्रण). मध्ये रंगीत काच आणली असता त्या काचेत तो विशिष्ट रंग सोडून बाकीच्या तरंग लांबीच्या लहरी शोषल्या जातात. म्हणून इतर रंगांचे (तरंगलांबी असलेले) किरण पार होत नाहीत पण त्या विशिष्ट रंगाचे होतात. (मूळ प्रकाशाची तरंगलांबी बदलत नाही).

नितिन थत्ते

प्रकाशाची आणि रंगाची तरंग लांबी

प्रकाशाची आणि रंगाची तरंग लांबी- फरक / साधर्म्य- जरा समजावुन सांगा!

सहमत

केवळ एक दुरुस्ती:
भौतिकशास्त्रातील पांढरा प्रकाश हा वरीलप्रमाणेच असतो. पण मानवांसाठी केवळ तीनच तरंगलांब्या (RBG) मिसळल्या तरी पांढर्‍यासारख्याच दिसतात, शुद्ध पिवळ्या रंगाचे तरंग पाहिले तर ते शुद्ध लाल आणि शुद्ध हिरवा या दोन तरंगांच्या मिश्रणासारखेच दिसतात, इ.

रंग (तरंगलांबी) आणि (ब्लॅकबॉडी) तापमान एकच

विश्वाचा कॅन्व्हास हा दृष्य रंगांनी रंगवता येणाऱ्या चित्र-पटापेक्षा खुपच मोठा आहे. पण क्ष-किरणे ही देखील एका प्रकारे रंगातच मोडणार (वेगळ्या तरंगलांबीचे प्रकाशकण).

काही महिन्यांपुर्वी रंगांवर लिहिलेल्या एका लेखातील दोन परिच्छेद खाली देतो आहे:

ताऱ्याकडुन येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट मिळवल्यास त्या ताऱ्यामध्ये असलेल्या रासायनीक तत्वांबद्दल माहिती प्राप्त होते. हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन इ. प्रत्येकी ठरावीक तरंगलांबीचा प्रकाश उत्सर्जीत करतात. (ताऱ्यांच्या तापमानाला, घनतेला इ. अनुसरुन कोणते अणु किती विद्युतभारीत आहेत, आणि इलेक्ट्रॉन्स कोणत्या कक्षेतून कोणत्या कक्षेत उड्या मारताहेत हे देखिल कळते ). वर्णपट मिळवायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात वेगवेगळे फिल्टर्स वापरून रासायनीक तत्वांबद्दल अंदाज बांधता येतात (प्रत्येक फिल्टर हे वर्णपटाच्या विशिष्ठ भागातील प्रकाशकणांनाच आत शिरु देते). दिर्घीका या अब्जावधी ताऱ्यांच्या बनलेल्या असतात. त्यांच्यापासुन जो प्रकाश येतो त्यावरुन त्यांच्यातील जास्त तारे म्हातारे (लाल) आहेत का तरुण (निळे) हे कळते.

तुम्ही जी खगोलशास्त्रातील सुंदर, रंगीत चित्रे पहाता (उदा. दिर्घीका, तारकासमुह) ती बरेचदा तीन वेगवेगळ्या फिल्टर्स मधिल चित्रांचा संयोग करुन बनविली असतात. दोन टक्कर होत असलेल्या दिर्घीकांचे उदाहरण घेऊ या*. जर आपण त्यांचे चित्र लाल, हिरव्या व निळ्या फिल्टर्सनी मिळवले तर जिथे टक्कर होते आहे त्या भागात होणाऱ्या ढवळाढवळीमुळे नविन तारे जन्माला येत असणार. त्या उष्ण वायुमुळे निळ्या फिल्टरमध्ये जास्त प्रकाशकण प्राप्त होणार. या उलट, बाहेरच्या भागात प्राचीन ताऱ्यांपासुनचे लाल प्रकाशकण जास्त असणार. प्रत्येक चित्रकणात (pixel) किती लाल, हिरवे व निळे प्रकाशकण आहेत यावरुन त्याचित्रकणाचा अंतिम रंग रंगांच्या मिश्रणाच्या न्यायाने ठरविला जातो. असे चित्रातील प्रत्येक चित्रकणाकरता केले की एक सुंदर वास्तववादी चित्र तयार होते.

* http://apod.nasa.gov/apod/ap030812.html हे चीत्र व त्याचा मथळा:
चंद्रा दुर्बिणीच्या सहाय्याने मिळविलेले क्ष-किरण चित्र (निळा रंग) आणि कॅलटेकच्या पालोमार दुर्बिणीतून मिळवलेले दृष्य (पिवळा रंग) एकत्र करुन बनविलेले हे Stephan's Quintet चे फसव्या रंगांमधिल चित्र. दिर्घिकांच्या टकरीमुळे होत असलेल्या उलथापालथीची कल्पना दोन्ही चित्र अशा प्रकारे एकत्रीत केल्यावरच जास्त योग्य प्रकारे मिळते.

श्री. रामन यांनी अति-सोपा करून सांगितला असावा

श्री. रामन यांनि त्यांचा संशोधनप्रश्न अति-सोपा करून सांगितला असावा असे वाटते. (किंवा त्यांच्यापाशी वेळ कमी असल्यामुळे इतक्या संक्षेपाने सांगितला असावा की कॉलेज विद्यार्थ्यांना प्रश्न स्पष्टपणे कळणे कठिण होते.)

ते म्हणाले की एखादी वस्तू अमूक रंगाची आहे हा अनुभव व्यक्तीनिष्ठ आहे किंवा फक्त मानवालाच येणारा आहे का? हे मी शोधतो आहे.

(अ) "फक्त मानवालाच" या प्रश्नाचे उत्तर ते करत असलेल्या प्रयोगातून कळण्याचा काहीच मार्ग नाही. असे करण्यासाठी अशा प्रकारची कार्डे आणि प्रश्नावली मनुष्येतर प्राण्यांकडून भरून घेणे आवश्यक आहे. हे करता येणार नाही, असे वाटते. या प्रश्नाचे संशोधन करण्यास काय करावे लागेल? रंगांचे फलक दाखवून प्रतिसादाखातर मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी दोहोंना समप्रमाणात शक्य असलेली प्रतिक्षिप्त क्रिया वापरणे अपरिहार्य आहे.

आता ज्या प्रकारची रंगद्रव्ये मनुष्याच्या रेटिनामध्ये असतात, त्याप्रकारची रंगद्रव्ये, आणि मज्जातंतूंची त्याप्रकारची संरचना मनुष्येतर प्राण्यांमध्ये कमी-अधिक सामांतर्याने सापडते. त्या रंगद्रव्यांवर कुठल्या वेव्हलेंग्थच्या प्रकाशलहरींनी परिणाम होतो, त्याबद्दल बरेच संशोधन झालेले आहे. गुरे आणि कुत्री "रंगांधळी" असतात. काही भुंग्यांच्या आणि मधमाशांच्या डोळ्यातील रंगद्रव्यांवर अतिनील किरणांचा परिणाम होतो. काही फुले सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे विशेषकरून प्रतिबिंबित करतात, पण मानवी-रंग-रेंज मधील किरणे वेगळ्या प्रमाणात प्रतिबिंबित करतात. अर्थात भुंग्या-मधमाशांना ते फूल गडद-"रंगीत" म्हणून अनुभवायला येईल, मनुष्यांना मात्र फिकट किंवा वेगळ्या कुठल्या रंगाचे अनुभवायला येईल. (दुवा)

(आ) अनुभव व्यक्तिनिष्ठ आहे का? याबाबत दोन संशोधन-प्रवाह आधीपासून उपलब्ध आहेत :
१. रंग छटांचे वेगवेगळ्या समाजांत वेगवेगळे वर्गीकरण होते. रंगांची नावे मर्यादित आहेत, रम्गांच्या छटा मात्र त्या मानाने प्रचंड प्रमाणात आहेत, कदाचित अगणित आहेत. म्हणून कित्येक छटांच्या "पट्ट्या"चे एका नावाखाली वर्गीकरण होते, हे तर ओघानेच आले. हा प्रकार भाषाविज्ञानाच्या अंगाने जातो. रोजव्यवहारातले उदाहरण देतो. स्वयंपाकात कांदा मंद परतून मराठीत "गुलाबी" होतो, तर इंग्रजीमध्ये "ब्राऊन" होतो. स्वयंपाक करायला शिकलेल्या व्यक्तींना रंगातला फरक सारखाच दिसत असावा. पण कांद्याचा तो जो काय रंग असतो, तो आणि देशी-रानटी गुलाबांचा नैसर्गिक रंग असतो त्याचे वर्गीकरण मराठी लोक एकत्र करतात. तर इंग्रजीभाषक समाजांत त्या रंगाचे वर्गीकरण मातीच्या रंगांसह करतात. इंग्रजी भाषक मित्रांना कांद्याचा रंग "पिंक"सारखा आहे सांगून मी बघितलेले आहे. ते कधीच कबूल होत नाही. आणि मराठी भाषक कांद्याचा रंग "मातकट-सारखा" होतो याबाबतीत कधीच कबूल होणार नाहीत असे वाटते. (मी तरी होणार नाही.) तरी कांद्याचा रंग नेहमीच अमुक प्रकारे बदलतो, त्याचा अनुभव आम्हा दोघांना सारखाच असावा, असे वाटते. (या "ब्राऊन"चे त्रांगडेच फार आहे. फ्रेंच भाषेत ज्या रंग छटांना "jaune" म्हणतात, त्यांच्यापैकी काही रंगछटांना इंग्रजीत yellow म्हणतात, तर काही रंगछटांना brown.) मी स्वतः इंग्रजीत बोलताना मंद परतलेल्या कांद्यांना "ब्राऊन" म्हणतो, तर मराठी बोलताना "गुलाबी". दोन्ही अगदी नैसर्गिक रीत्या होते. पण माझा रंग-अनुभव एकच आहे, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो.

२. वेगवेगळ्या मनुष्यांना तोच रंग वेगवेगळा दिसतो. रंगांधळेपणा हा याचा टोकाचा प्रकार. या प्रकाराचा प्रायोगिक अभ्यास करणे शक्य आहे. आपणापैकी खूप लोकांनी कधी ना कधी इशिहाराची कार्डे बघितली असतील. (नोकरीच्या मुलाखतीच्या वेळेला वापरली जाणारी कार्डे वर कोणी उल्लेखलेलीच आहेत.) रंगाधळेपणा हा जर अतिरेकी फरक म्हणावा, तर दोन निरोगी व्यक्तींमध्ये सूक्ष्म फरक असतातच! तुमच्या वर्णनावरून माझी अशी कल्पना झाली आहे, की रामन या विषयाचे सखोल संशोधन करत होते. त्यांच्या अकालमृत्यूनंतरही सुदैवाने अन्य लोक या प्रकारचे संशोधन करत आहे. (संशोधनविषयाला "सायकोफिजिक्स" म्हणतात.)

(!३) वेगवेगळ्या मनुष्यांना तोच रंग कमालीचा वेगवेगळा दिसतो, पण प्रत्येक रंगछटा प्रत्येकाला वेगवेगळी दिसते, ही कल्पना. ("क्वालिया" - याबद्दल मागच्या धाग्यावर चर्चा झालीच होती.) म्हणून इशिहाराच्या कार्डांनी कळण्यासारखा गोंधळ कधीच होत नाही. मला जी "लाल-७००नॅनोमीटर"ने शुद्ध-मानसिक अनुभूती होते, ती शुद्ध-मानसिक अनुभूती माझ्या शेजार्‍याला "जांभळा-४००नॅनोमीटर" प्रकाशाचा ठिपका बघताना होते. मात्र या शेजार्‍याला "लाल-७००नॅनोमीटर" ठिपका बघताना कुठलीतरी अनुभूती होतेच. आम्ही दोघे बाळपणी त्या-त्या वेगळ्या अनुभूतीला "लाल" म्हणायला शिकलो, म्हणून संवादात तफावत कधीच होत नाही. हा प्रश्न, हे कुतूहल म्हणा, प्रायोगिकतेच्या बाहेर आहे. (बाय डेफिनिशन!) म्हणून रामन याबाबतीत संशोधन करत नव्हते - ते प्रयोग करत होते ना!

प्रत्यक्ष दुर्बिणीने बघितल्यास या गोष्टी पांढरट धुरकट दिसतात.

प्रत्यक्ष दुर्बिणीने बघितल्यास या गोष्टी पांढरट धुरकट दिसतात.

:-) !!!

तुमची दुर्बीण कितपत चांगली आहे? आणि दुर्बिणीच्या काचेतून कमीजास्त झालेल्या प्रकाशाला "प्रत्यक्ष" कसे म्हणावे?

(येथे तुम्ही खरोखर "व्हिजिबल स्पेक्ट्रम" प्रकाशाबद्दल म्हणत आहात असे मानले आहे. अतिनील/रेडियो लहरींनी पाडलेल्या बिंबाला दृश्य रंगात चितारलेल्याबद्दल नाही ना? अशा चित्रांना कुठल्याही मानचित्रासारखे बघावे. नकाशात काढतात तसा महाराष्ट्र खरोखरच "पिवळा" नसतो, की कर्नाटक खरोखरच "जांभळा" नसतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बघता कित्येकदा कुठलाच रंगाचा फरक दिसून येत नाही. पण तरी नकाशा उपयोगी असतो.)

उजेड कमी असला (दुर्बीण त्याहून अधिक प्रकाश एकत्रित करूच शकली नाही), तर लहरीची लांबी सुयोग्य असली, तरी "रंगीत-मज्जातंतूं"च्या ("कोन"=शंकू पेशी) रंगद्रव्यावर जाणवेल इतकी रासायनिक प्रक्रिया होत नाही. मात्र कृष्णधवल इतपतच जाणवणारे मज्जातंतू ("रॉड" पेशी) अगदी थोडे फोटॉन पडूनही कधीकधी उत्तेजित होतात. (त्यासाठी फार वेळ काळोखात राहावे लागते.) काही का असेना, जी वस्तू दुर्बिणीतून अगदी अंधुक दिसते, तिने कोन-पेशी उत्तेजित होणार नाहीत, पण रॉड-पेशी उत्तेजित होतील. अर्थात ही जाणीव कृष्णधवल असते. "अंधुक गोष्टी कृष्णधवल दिसतात" ही बाब फार प्राचीन काळापासून लोकांना ठाऊक होती. इंग्रजीत एक म्हण आहे "ऍट नाईट ऑल कॅट्स् आर ग्रे" - रात्री सर्व मांजरी करड्या दिसतात. प्राचीन काळात जीवरासायनिक कारण माहीत नव्हते, हे तर आलेच. पण या मिष्किल म्हणीत "मांजरींचा रंग खरोखरच रात्री बदलतो" असा मुळीच नसावा. कमीतकमी म्हणीचा वापर असा होत नाही.

आता दृश्य-रेंजमधील प्रकाशाचे प्रिंटिंग करताना एखादा संगणक/प्रिंटर कमी-अधिक गडद करून रंगीत शाई वापरत असेल, हे तर आलेच. वर श्री. प्रमोद सहस्रबुद्धे कोडाक/कोनिका फिल्मच्या वेगवेगळ्या गडद प्रिंटिंगबद्दल म्हणतात तोच हा प्रकार. पण हा मूलभूत भौतिकशास्त्रीय प्रकार नाही, असे मला वाटते.

- - -

दुर्बिणीबद्दल सी. व्ही. रामन यांचा मुद्दा होता, की रेटिनाच्या ज्या "फोव्हिया" भागात आपण धुरकट गॅलॅक्सीचे चित्र केंद्रित करतो, तिथे "रॉड"पेशी मुळी नसतातच. हे म्हणणे ठीक आहे.
(असे दिसते, की
१. कमी उजेडाच्या प्रसंगी बाजू-बाजूच्या कोन-पेशी एकत्रित सिग्नलिंग करतात. - दुवा - अशा प्रसंगी संवेदना करडी होते.
२. "फोव्हिया" मध्ये लहान प्रमाणात रॉड असतात. मधल्या अतिसूक्ष्म "फोव्हियोला" भागात मुळीच रॉड-पेशी नसतात. तो भाग पुरता रातांधळा असतो.
मात्र हे नवीन प्रयोग रामन यांना माहीत असणे शक्य नाही.)

सी व्ही रामन यांच्या रंगसंशोधनाबाबत दुवा

सी व्ही रामन यांच्या रंगसंशोधनाबाबत दुवा.

दुव्यावरील लेखात म्हटले आहे की त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सी व्ही रामन यांनी "ऍनल्स ऑफ द इंडियन ऍकॅडेमी ऑफ सायन्सेस" या रंग-संवेदनेबाबत अनेक निबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या संशोधनाची काही फलिते शोधल्यास मिळू शकतील, असे वाटते.

काही खुलासे

प्रथम श्री. धनंजय यांच्या विस्तृत आणि अभ्यासपूर्वक दिलेल्या प्रतिसादांबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. आता त्यांच्या प्रतिसादामधे त्यांनी मांडलेल्या काही मुद्यांबद्दल.
1. कै. सी.व्ही. रामन हे आमच्या वर्गात कोणत्याही संशोधनावर व्याख्यान देण्यासाठी आलेले नव्हते. ते डेटा कलेक्शनसाठी आले होते ते उघड आहे. त्यामुळे सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत 2/3 मिनिटात त्यांनी त्यांच्या संशोधनाबद्दल सांगितले असावे असे मला वाटते. या शिवाय अशी ही शक्यता वाटते की 1963 सालामधे त्यांच्या मनातच संशोधन कोणत्या दिशेला न्यायचे हे पक्के झाले नसावे. कारण ते पुढे 7 वर्षे हयात होते व आपल्या संशोधन कार्यात मग्न होते. तसेच आम्हाला जी कार्डे त्यांनी दाखविली ती, रंग व्यक्तिनिष्ठ असतात का यासाठीच्या संशोधनासाठी असणार. प्राण्यांसाठी दुसरी कोणती तरी पद्धत वापरात असावी. या बाबतीत मी संपूर्ण अज्ञानी आहे हे मी मान्य करतो.
2. माझ्याजवळ मीड कंपनीची ईटीएक्स 90 सी ही दुर्बिण आहे व 2000-2005 या वर्षांत ही दुर्बिण मी अमेरिकेतील बे एरिया व पुणे या दोन्ही ठिकाणी भरपूर वापरलेली आहे. या दुर्बिणीतून मी ओरायन नेब्युला, देवयानी किंवा ऍंन्ड्रोमीडा मधली गॅलॅक्सी या सारख्या बर्‍याच आकाशस्थ ज्योती बघितल्या आहेत. त्याच प्रमाणे बे एरियामधल्या माऊन्ट हॅमिल्टन या ठिकाणी काही रात्री ओपन हाऊस असे व अनेक हौशी अस्ट्रॉनॉमर्स आपल्या दुर्बिणी घेऊन येत असत व लोकांना त्यातून आकाशस्थ ज्योती दाखवत असत. या ठिकाणी मी अभिजित नक्षत्रातला प्रसिद्ध रिंग नेब्युला उत्तम बघितलेला आहे. या सर्व अनुभवामुळे माझ्या (मी रंगाधळा नाही) डोळ्यांना या सर्व आकाशस्थ ज्योती धुरकट पांढरट दिसल्या असल्याने तसे माझे निरिक्षण मी नोंदवले आहे.
3. रामन यांच्या संशोधनाबद्दल दिलेल्या दुव्याबद्दल मी खरोखरच ऋणी आहे. मी हा संदर्भ शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

दुर्बीण - थोडासा विनोद फक्त

"कुठली दुर्बीण" हा थोडासा विनोद होता... :-)

कुठलीही दुर्बीण घेतली, तरी, त्यात काहीतरी अंधुकच दिसणार. नाण्याची दुसरी बाजू - दुर्बिणीशी शक्ती क्रमाक्रमाने वाढवली, तर प्रत्येक पायरीवर पूर्वीच्या-पायरीवर-धुरकट-अंधुक असलेल्या स्रोतात रंग दिसू लागणार.

असहमत

> दुर्बिणीशी शक्ती क्रमाक्रमाने वाढवली, तर प्रत्येक पायरीवर पूर्वीच्या-पायरीवर-धुरकट-अंधुक असलेल्या स्रोतात रंग दिसू लागणार.

हे स्त्रोताकडुन उत्स्रजीत होणार्‍या प्रकाशाच्या तरंगलांबीवर तसेच वापरलेल्या फिल्टरवर अवलंबुन असणार.

??अर्थात्??

हे स्त्रोताकडुन उत्स्रजीत होणार्‍या प्रकाशाच्या तरंगलांबीवर तसेच वापरलेल्या फिल्टरवर अवलंबुन असणार.

??अर्थात्??

मात्र याबाबतीत मी आधीच श्री. चंद्रशेखर यांच्याकडून सूट घेतलेली आहे. तमी त्यांच्या संदर्भास योग्य अशी मर्यादा घालतो :

येथे तुम्ही खरोखर "व्हिजिबल स्पेक्ट्रम" प्रकाशाबद्दल म्हणत आहात असे मानले आहे.

पुढे म्हटले आहे :

तुमची दुर्बीण कितपत चांगली आहे? आणि दुर्बिणीच्या काचेतून कमीजास्त झालेल्या प्रकाशाला "प्रत्यक्ष" कसे म्हणावे?

कित्येकदा उत्तम व्हिजिबल रेंज दुर्बिणी करताना व्हिजिबल रेंजमध्ये क्रोमॅटिक ऍबरेशन आणि कमीजास्त ऍब्सॉर्प्शन टाळण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे "काच व्हिजिबल रेंजमध्ये लहरींचे प्रमाण कमीजास्त करत नाही असे मानूया" ही सूट मी आधीच घेऊन-देऊन ठेवलेली आहे.

आता विचार करूया स्रोताबद्दल. तुम्ही म्हणता की उत्सर्जित तरंगलांबीवर अवलंबून आहे. म्हणजे काय म्हणता? आपला सूर्य ज्या प्रमाणात व्हिजिबल रेंजमधील विविध तरंगलांबीच्या प्रकाशलहरी पाठवतो, बरोबर त्याच प्रमाणात जर तो दूरस्थ स्रोत पाठवत असेल, तर तुमचे म्हणणे ठीक आहे. दुर्बीण किती का मॅग्निफाय करणारी बनवा, रंग "पांढरा"च दिसेल. पण श्री. चंद्रशेखर आणि डॉ. सी.व्ही.रामन यांचा संदर्भ बघा ना! हे दोघे अशा कुठल्या दूरस्थ वस्तूचा उल्लेख करतात, जी खरोखर कमी मॅग्निफिक्शनमध्ये धुरकट दिसते, पण जास्त मॅग्निफिकेशनमध्ये रंगीत दिसते. त्यांच्या युक्तिवादापुरती त्यांनी सांगितलेली दूरस्थ वस्तू तशीच मानली पाहिजे.

सी.व्ही रामन यांचा युक्तिवाद काय आहे?
- "क्ष" वस्तू हाय-मॅग्निफिकेशन मध्ये पांढर्‍यावेगळ्या रंगाची दिसते, त्याअर्थी त्या स्रोतामध्ये विविध तरंगलांबीच्या लहरींचे प्रमाण सूर्यप्रकाशापेक्षा वेगळे आहे.
- लहरींच्या मिश्रणाचे प्रमाण लो-मॅग्निफिकेशनमध्येसुद्धा तसेच असते, पण रंग मात्र स्पष्ट दिसत नाही, धुरकट दिसतो.
तस्मात्, सी.व्ही रामन म्हणतात : विविध तरंगलांबीच्या लहरींच्या मिश्रणाच्या प्रमाणावरती रंग अवलंबून नसतो, तर आब्सोल्यूट इन्टेन्सिटी वरही अवलंबून असतो.

आता सर्वश्री रामन व चंद्रशेखर यांना गंभीरपणे उत्तर द्यायचे, तर "दुर्बिणीत व्हिजिबल रेंजमध्ये डिस्टॉर्शन नसलेली काच" आणि " मुळात सूर्यापेक्षा वेगळ्या प्रमाणात प्रकाशलहरींचे मिश्रण" ही गृहीतके म्हणून स्वीकारली पाहिजेत. कारण विश्वातील अब्जावधी स्रोतांपैकी सूर्यापेक्षा वेगळे स्रोतच अधिक आहेत, आणि चांगल्या काचांचे तंत्रही बर्‍यापैकी उपलब्ध आहे. सी.व्ही. रामन म्हणतात त्या मर्यादा घालून प्रयोग करणे सहज शक्य आहे.

मात्र रामन म्हणतात की "रेटिनाच्या फोव्हिया भागात रॉड-पेशी मुळीच नसतात" हे गृहीतक म्हणून मानावे लागत नाही. कारण अब्जावधी स्रोतांपैकी प्रयोगासाठी सूर्यावेगळा सहस्रावधी स्रोत निवडता येतात, पण रॉडपेशी मुळीच नसलेली फोव्हिया सापडतच नाही. आणि फोव्हियाच्या ज्या सूक्ष्म भागात रॉडपेशी नसतात, तो भाग पुरता रातांधळा असतो, त्या भागात धुरकट-असे सुद्धा काही दिसणार नाही. सी.व्ही.रामन यांच्या युक्तिवादातला हा भाग प्रयोगाने असिद्ध करता येतो. (यात सी.व्ही.रामन यांचा अवमान नाही. त्यांनी प्रयोग सुचवले, पण त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाहीत.)

आता माझ्या वाक्याबाबत : "व्हिजिबल रेंजमध्ये लहरींना समसमान प्रमाणात पार करणार्‍या काचेच्या दुर्बिणी घेतल्या, क्रमाक्रमाने मॅग्निफिकेशन वाढवले, तर आदल्या दुर्बिणीत धुरकट दिसणारे जे अंधुक स्रोत होते, त्यांच्यापैकी बहुतेकांत तरंगलांबींचे मिश्रण सूर्यापेक्षा वेगळे असल्याकारणाने बहुतेक स्रोत सूर्यावेगळ्या रंगाचे दिसू लागतील. या नव्या दुर्बिणीतही पूर्वीच्या पायरीवर मुळीच न दिसणारे काही नवे स्रोत दिसू लागतील, ते मात्र अंधुक आणि धुरकट दिसतील."
कदाचित आणखी काही गोष्टी अजून संदिग्ध असतील. पण त्या ठीक करायला सध्या वेळ नाही...

ठीक

तशी गृहीतके असली तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे.

रंग म्हणजे—

मला वाटते,

रंग म्हणजे प्रकाश किंवा प्रकाश लहरी. उदाहरणार्थ: "अंधारात" सफरचंदावर जेव्हा पांढरा प्रकाश पडतो तेव्हा ते लाल रंगाचा दिसते, इतर प्रकाश (कुठल्याही तरंग लांबी असणारा, ह्म्म मात्र डोळ्यांना दिसू शकेल असा) पाडला तर सफरचंदाचा रंग जरा विचित्र दिसतो. अंधार म्हणजे काय, तर प्रकाशाचा अभाव. याअर्थी "रंग" ही गोष्ट फक्त प्रकाश असतानाच कळू शकते, दिसू शकते किंवा तीची संवेदना डोळ्यांना जाणवू शकते. म्हणजेच विविध लांबी असणार्‍या 'प्रकाश लहरी' म्हणजे तो-तो विशिष्ट रंग.
प्रकाशाच्या तीव्रतेनुसार(?) कमी-अधिक-धुसर-प्रखर-अंधूक असं आपण त्या-त्या वेळी म्हणतो, यावेळी रंगाचीसुद्धा अनुक्रमे तीव्रता बदलते.

एखाद्या गोष्टीला अमुक-अमुक रंग का दिसत असावा? उदाहरणार्थ: दिवसा म्हणजेच सूर्याच्या प्रकाशात रंग बदलणारा सरडा जागा बदलली की काही क्षणांत आजूबाजूच्या गोष्टींनुरुप रंगबदल करतो. यावरून जरी त्याच्यावर एकच प्रकाश पडत असला (सूर्यापासून येणारा-पांढरा) तरी त्याचा रंग बदलतो. यावरून प्रकाशाचा आणि रंगाचा काही संबंध नाही असे मला वाटते, पण त्या सरड्याने उत्सर्जित केलेल्या काही रसायनांमुळे त्याचा रंग बदलतो, हे कळाले. याअर्थी कुठल्याही गोष्टीमध्ये असलेल्या रसायनांच्या विशिष्ट प्रमाणावरुन त्या गोष्टीचा रंग ठरतो. काही रसायनांच्या अणूंवर विशिष्ट लांबीच्या लहरी पडल्या की त्यांना त्वरण प्राप्त होते व येथेच 'अभिसरण' ही सुद्धा प्रक्रिया घडते (कारण अणूकणांवर प्रकाश पडला की अभिसरण घडते.[]) यावेळी अभिसरणामुळे विशिष्ट प्रकाशलहरी अभिसारीत होते व जो रंग अभिसारीत होत नाही, तो त्या रसायन असलेल्या गोष्टीचा (येथे उदाहरणातील सरडा, सफरचंद इत्यादींचा) रंग ठरतो, नाही?

 
^ वर