सल्ला देणार्‍या लेखांचे (व सल्लागारांचे) उदंड पीक!

व्यवस्थापनशास्त्राला चांगले दिवस आल्यापासून या विषयावरील लेखांच्या संख्येत भरपूर वाढ झाली आहे. व्यवस्थापनशास्त्राची संपूर्ण भिस्त योग्य अशा सल्ल्यावर निर्भर असते यात दुमत नसावे. त्यामुळे सल्लागारांनी लिहिलेल्या (फुकटचा!) सल्ला देणार्‍या पुस्तकांच्या ढीगच्या ढीग फुटपाथवर दिसतात. पुस्तकांच्या दुकानात व्यवस्थापनशास्त्रावरील पुस्तकांनाच दर्शनी भाग राखून ठेवलेला असतो. एक अंदाजानुसार या विषयावर सुमारे तीस हजार शीर्षकं दरवर्षी प्रकाशित होतात. दर वर्षी चार पाच हजार नवीन शीर्षकांची त्यात भर पडत असते. अशा पुस्तकांचे लाखो प्रती खपतात. याव्यतिरिक्त अनेक छोटे मोठे लेख छापून वर्तमानपत्रे, पुरवणीची पाने, नियतकालिके, पानं भरत असतात. इंटरनेटच्या संस्थळावर अशा लेखांचे रतीब चालूच असते. जुन्या गाजलेल्या चार-पाचशे पानांचा चोथा पुन्हा पुन्हा प्रसिद्ध होत असतो. त्यामुळे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळत असलेला (अनाहूत!) सल्ला, उपदेशांचे डोज, समुपदेशन इत्यादीमुळे वाचकांची व तरुण उद्योजकांची दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे. अशा लेखातील वा वाचलेल्या पुस्तकातील सल्लागारांच्या (उलट-सुलट) सल्ल्याप्रमाणे वागायचे ठरविल्यास उद्योजकांना कदाचित आपला उद्योग बंद करून घरी बसावे लागेल.

पुस्तकं किंवा लेख वाचून एखादा उद्योजक आपल्या उद्योगात सुधारणा वा व्यवसायात बदल करत असल्यास हा लेख वाचूनच पुढचे पाऊल ठेवावे अशी आग्रहाची विनंती आहे. चकचकीत मुखपृष्ठ असलेली (महागडी) पुस्तकं वाचून व्यवसाय/उद्योगांची पुनर्रचना केलेल्यापैकी सुमारे सत्तर टक्के उद्योजक / व्यवस्थापकांनी आपले हात पोळून घेतलेले आहेत. काही अपवाद वगळता बहुतेकांच्या पदरी निराशाच आली आहे. या संबंधातील पूर्वानुभव फार वाईट आहे. एन्ऱॉनसारख्या कंपनीचा एवढा मोठा गवगवा होता. त्यातील नेतृत्वाच्या ठेकेदारांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या लाखो प्रती हातोहात खपल्या. परंतु शेवटी हीच कंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यांनी मांडलेली व्यूहरचना सपशेल फसली.

पुस्तकांबरोबरच सल्लागारांचे उदंड पीक आले आहे. सल्लागाराशिवाय व्यवस्थापन हा विचार कुणालाच पटणार नाही. या सल्लागारांनी मात्र कंपन्यांना सळो की पळो करून सोडले आहे. काही कंपन्या दरवर्षी सल्लागारांवर लाखो रुपये खर्च करत असतात. अशा कंपन्यांच्या दिमतीला पंधरा- वीस सल्लागार नेहमीच असतात. परंतु त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. अपेक्षेइतका फायदा (कधीच!) होत नाही. होत असलेले नुकसान थांबवता येत नाही. यातून फक्त आपण कंपनीच्या भल्यासाठी काही तरी करत आहोत एवढे मानसिक समाधान मात्र मिळते. अनेक वेळा दोन -तीन तज्ञांनी दिलेले सल्ले एकमेकांना छेद देणारे असतात. परस्पर विरोधी असतात. त्यामुळे हे विकतचे श्राद्ध नकोसे वाटू लागते. शेवटी कंटाळून आपल्या उपजत शहाणपणावर व अनुभवावर विसंबून राहण्याची पाळी उद्योजकावर येते. आपल्या कल्पकतेवर विश्वास ठेऊन स्वत:च निर्णय घेणे या निष्कर्षाप्रत उद्योजक/व्यवस्थापक येतात. या संबंधातील काही अत्यंत व्यावहारिक पथ्यांचा धावता आढावा घेतल्यास त्या कशा उपयुक्त ठरतील हे लक्षात येईल.

नाविन्यापासून चार हात दूर असलेले फायदेशीर ठरू शकते. वैज्ञानिक व वैद्यकीय क्षेत्रातील संशोधक बहुतेक वेळा आपापल्या संशोधनाचे श्रेय यापूर्वी केलेल्या संशोधनांना देत असतात. त्यांच्या मते जगात 'नवीन' असे काहीही नसते. सुरुवातीला व्हियाग्राच्या गोळ्या रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी घेतल्या जात होत्या. आज त्या कामोत्तेजक /उत्साहवर्धक या सदरात मोडतात व त्यांचा खप प्रचंड प्रमाणात आहे. संगणकासाठी म्हणून विकसित केलेला वेब कॅमेरा सुरक्षा व्यवस्थेचा अविभाज्य अंग बनत आहे. वैज्ञानिकांमध्ये परस्पर संवादासाठी तयार केलेले इंटरनेट तंत्रज्ञान संपूर्ण जागतिक बाजारपेठ व्यापून टाकले आहे. 'नवीन' काय आहे हे बघण्यापेक्षा उपयुक्त काय ठरेल याचा विचार करणे शहाणपणाचे ठरेल. फोर्ड मोटर कंपनीने आपल्या उत्पादनात नाविन्यता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. करोडो डॉलर्स खर्ची घातले. परंतु नाविन्यतेच्या या वेडापायी आपल्या मूळ उत्पादनावरील लक्ष ढासळले. या गदारोळात नाविन्यपूर्ण कार बाजारात आणण्याचे स्वप्न पार धुळीस मिळाले. त्याच सुमारास फोर्डचे प्रतिस्पर्धी टोयोटा कंपनी आपल्या नेहमीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून, कार्समध्ये आवश्यक त्या सुधारणा करत बाजारपेठेत उतरत होती, फोर्ड कंपनीला टक्कर देत होती व करोडोनी कमवत होती. म्हणूनच नाविन्याची हौस फार महागात पडू शकेल याचे भान ठेवूनच निर्णय घेणे उचित ठरेल.

गोष्टी किंवा उदाहरणं पुरावे म्हणून खात्रीलायक नसतात. ऐकीव गोष्टी किंवा काही उदाहरणावरून निर्णयाप्रत पोचणे योग्य ठरणार नाही. गोष्टीतून वा उदाहरणातून आपण करत असलेली मांडणी स्पष्ट होते हे जरी खरे असले तरी बहुतेक वेळा आपला मुद्दा पटविणार्‍यांचे ते एक कौशल्य असते. गोष्ट किंवा उदाहरणावरून निखळ सत्य समोर येईलच याची खात्री देता येत नाही. मॅकेंझी या सल्लागार कंपनीच्या द वॉर ऑफ टॅलेंट या पुस्तकात व्यवस्थापनाविषयीची शेकडो उदाहरणं/गोष्टी खच्चून भरल्या आहेत. परंतु यातून कंपनीच्या सेवा/उत्पादन क्षमतेचा नेमका अंदाज बांधता येत नाही. कंपनीची आर्थिक क्षमता कशामुळे वाढली हेच शेवटपर्यंत कळत नाही.

माहितीची विश्वासार्‍हता तपासून घेणे इष्ट. अनेक वेळा माहितीचा काही भागच खरा असतो व इतर माहिती सपशेल खोटी ठरण्याची शक्यता असू शकते. मिळालेल्या माहितीची पूर्णपणे शहानिशा न करता भावनेच्या भरात ती कल्पना उचलून धरली जाते व त्यामुळे नंतर गोत्यात आलेली उदाहरणं अनेक आहेत. उत्तेजनार्थ म्हणून रोखीने पैसे दिल्यास कामगार मन लावून वेळेवर काम पूर्ण करतात हे अनेक वेळा चुकीचे ठरू शकते. एखाद्याला सल्ला दिला की तो त्या सल्ल्याप्रमाणे वागेल याची काही खात्री नाही. यामुळे संपूर्ण माहिती मिळवून त्याचे विश्लेषण करूनच निर्णय घेणे हितकारक ठरेल.

स्वयंघोषित 'गुरू'पासून दूर राहणे शहाणपणाचे ठरू शकते. व्यवस्थापन क्षेत्रात पहिल्यांदा जेव्हा 'गुरू' हा शब्द वापरला गेला तेव्हा तो खर्‍या अर्थाने वापरला गेला. त्या काळातील 'गुरू'सुद्धा नि:स्वार्थपणे आपल्या अनुभवांच्या आधारे, हातचे काहीही राखून न ठेवता, तर्कसुसंगत व योग्य सल्ला देत असत. त्यांच्यातील tacit ज्ञानाचा उद्योगासाठी खरोखर उपयोग होत होता. आता मात्र भरपूर बिदागी घेऊन व्यवस्थापनेचे फड गाजविणार्‍यांचाच त्यात भरणा होत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज भासत आहे.

पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार व कल्पना स्वीकाराव्यात. आपल्यातील पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे विचार व कल्पना विद्रूप स्वरूप धारण करू शकतात. पूर्वग्रहदूषित दृष्टी स्वभावविशेष बनल्यास कुठलेही विचार व कल्पना अजिबात स्वीकारल्या जात नाहीत. आपल्याला आवडतील त्याच गोष्टी, तोच विचार किंवा चांगलीच बातमी ऐकण्याची सवय जडते. आपले प्रत्येक शब्द न शब्द झेलणार्‍यांच्या, होकाराला होकार देणार्‍यांच्या गराड्यात राहणे पसंत केली जाते. रचनात्मक टीका करणार्‍यांना अव्हेरले जाते. त्यांना दूर ठेवले जाते. खरे पाहता हे चिकित्सक प्रशिक्षण देत देत आपल्याला शहाणे करत असतात. परंतु आपल्यातील स्वभाव दोषामुळे या प्रशिक्षणाला आपण पारखे होतो व आलेली संधी दवडतो. व्यवस्थापनासाठी दिलेला सल्ला किंवा उपदेश नेहमीच कडवट असला पाहिजे असा त्याचा अर्थ नव्हे.

डॉक्टरांनी सांगितलेल्या पथ्याप्रमाणे आहारावर नियंत्रण ठेवत नसल्यास प्रकृतीवर दुष्परिणाम होण्याची संभाव्यता जास्त असते. टीका करणारे नेहमीच धोक्याची घंटा वाजवत असतात. व धोका ओळखून वेळीच सावध होण्यातच खरे शहाणपण आहे. वर उल्लेख केलेली पथ्ये पाळल्यास सल्लागारांच्या संदर्भात होणारे नुकसान टाळता येईल असे वाटते. हा शहाणपणा केवळ उद्योजकांसाठी नसून इतरांनीसुद्धा ही पथ्ये पाळून शहाणे होण्यास कुणाचीच हरकत नसावी.

Comments

सल्लागार

चांगला लेख.

शीर्षक वाचून वाटले की हल्ली उपक्रमवर येत असलेल्या लेखांबाबत असावा. :)

लेख 'व्यवस्थापकीय सल्लागार' सबंधी प्रामुख्याने आहे. त्यांचे पीक उदंड वाढले याची कारणे कदाचित, एम् बी ए सारख्या ठिकाणी संभाषण (कम्युनिकेशन) कौशल्यावर दिला गेलेला भर, हे असेल. ही मंडळी 'हाती काही नसताना विकणे', या मार्गाकडे जात असावेत. (एस्किमोला रेफ्रिजरेटर विकणे हा एक मानाचा प्रसंग मानला जातो.)

दुसरे म्हणजे व्यवस्थापकीय कौशल्यात अनुभवांपेक्षा काहीच नाही . ( ऑपरेशन रिसर्च सारखे विषय व्यवस्थापकीय कौशल्यातून कधीच हद्दपार झाले आहेत. ) कुठलेही सामायिक तत्व लागु न होण्यामुळे अनुभवांना मोठी मागणी आहेत. वैज्ञानिक जगतात अनेक अनुभव एकाच समीकरणात बद्ध केले जातात तसे इथे होत नाही. अनेक प्रकाशित होणारी पुस्तके ही बहुतेक अनुभवांची जत्री आहेत.

वैज्ञानिक प्रगती कमी असल्याने, अनुभवाच्या जोरावर कधी नुकसान होणे साहजिक वाटते. कधी असे वाटते की उद्योजक (किंवा इतर सेवा संघटना) हे एका विशिष्ट कार्यपद्धतीत अडकून राहिले असतात. त्यांची सुटका असे बाहेरचे सल्लागार मंडळी करत असावेत. यातच त्यांची चलती आहे.

प्रमोद

मार्केटींगचे चांगले धडे

चकचकीत मुखपृष्ठाची व्यवस्थापन कौशल्याची पुस्तके विकत घेऊन उदयोग सुधारण्याचा निर्णय घेणारे खरच त्या पदासाठी योग्य असावेत का ही वेगळी चर्चा होऊ शकते. तरीही मला पुस्तक विक्रेत्यांचे कौतुक वाटते- ते अशी पुस्तके खपवुन धंदा करतात. वरील उद्योजकांनी ते पुस्तक त्यांनी का विकत घेतले हे समजुन घेतले तरी त्यांना मार्केटींगचे चांगले धडे मिळतील.

 
^ वर