हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग १
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा
प्रास्ताविक
प्रसिद्ध ब्रिटीश सेनानी फिल्ड मार्शल फिलिप चेटवुडच्या शब्दात थोडा बदल करुन राष्ट्रव्रती कसा असावा हे थोडक्यात सांगतो -
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – पहील्या भागात खालील निर्देशित मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
हिंदु धर्म - विषय प्रवेश
मानवाचे अस्तीत्व
त्या अस्तीत्वाचे उद्दीष्ट – मानसिक प्रगती व उत्कर्ष
देश व राष्ट्रांची संकल्पना
राष्ट्राची विचारसरणी
राष्ट्रासमोर ठाकलेले महत्वाचे प्रश्न
राष्ट्राबद्दलची तळमळ
बहुतेक वेळा प्रस्तुत संकल्पना किंवा विचारसरणी मनाला पटेल अशी व आकर्शक वाटते पण ती अनुसरायची म्हणजे नक्की काय करायचे ह्या प्रश्नाचे उत्तर न दिल्या मुळे – वाचायला छान वाटते, अध्ययन करायला आवडते पण तुमच्या आमच्या सारख्याने प्रस्तुत विचारसरणी रोजच्या जिवनात उपयोगात कशी आणायची असा प्रश्न पडतो.
आपण जेव्हा म्हणतो व ऐकतो की प्रत्येक हिंदु मनाला आपण हिंदु आहोत ह्याचा आभिमान असला पाहीजे व तो योग्य त-हेने प्रगट करता आला पाहीजे हे महत्वाचे. हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य त-हेने प्रगट करणे म्हणजे नक्की काय करणे? कारण हे जर स्पष्ट केले नाही तर लोकांच्या मनात आधी गोंधळ उडतो, नंतर संभ्रम उत्पन्न होतो व तदनंतर आपल्या कृतीवरचा व धर्मावरचा विश्वास उडतो. काही लोकं मग वाटेल ते करुन हिंदु धर्माचा आभिमान प्रगट करायला निघतात त्यात – प्रामुख्याने राष्ट्रिय संपत्तीची तोडफोड करणे, दारु पिऊन गणपतीच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे, आचार विचार सोडुन वागणे, दुस-यांशी उर्मटपणाने वागणे वा बोलणे इत्यादी गोष्टी प्रामुख्याने आढळतात.
भाग २ व ३ मध्ये राष्ट्रव्रताच्या दहा सु्त्रांबद्दल लिहीले आहे. धर्मा बद्दल अभिमान बाळगणे म्हणजे नक्की काय करणे हे स्पष्ट केले आहे. दहा सुत्र अशी आहेत.
- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.
- अहंभाव कमी करणे.
- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.
- लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे.
- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.
- कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे.
- नितीमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे.
- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.
- दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.
- आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.
ह्या सुत्रांचे बारकाईने वर्णन भाग २ व ३ मध्ये केले आहे. ब-याच वेळेला वाचणा-यांना असे वाटेल की इतक्या बारकाईने वर्णन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटते आहे. आपला धर्म सोपा, आकर्षक व आकलनिय करण्यासाठी एवढ्या बारकाईची गरज आहे. कारण विचारसरणीचा गोषवारा माहीती असला तरी नेमके प्रत्येकाने कसे वागयचे हे स्पष्ट नसेल तर आधळीकोशिंबीरीचा खेळ ठरेल. माझी अशी विनंती आहे की
वाचणा-यांनी हे विचारात घेऊन लेख वाचावा.
शेवटच्या भागात राष्ट्रव्रत घेण्यास कोण पात्र आहे, ते कसे घ्यायचे व ते घेतल्याने काय होईल ह्या संबंधाने रुपरेषा दिली आहे.
आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करायचे असेल व ते तसे टिकवुन ठेवायचे असेल तर पिढ्यां पिढ्यांचा प्रयत्न सतत झाला पाहीजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा आपला राष्ट्रधर्म झाला पाहीजे, आपला स्वभाव झाला पाहीजे. राष्ट्रव्रताची अशी आपली संस्कृती निर्माण झाली पाहीजे. राष्ट्रव्रत हे प्रत्येकाने त्याच्या कुवतीला धरुन घेतलेले पवित्र व्रत आहे. रामाच्या खारुटली प्रमाणे राष्ट्रबांधणी रुपी सेतू मध्ये घातलेले खारुटलीचे छोटे दगड आहेत. हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रासाठी लागणारे सुकार्य आपल्या हातुन घडवुन आणणारे आहे.
तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?
राष्ट्रार्पण
हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग १
हनुमानाची गोष्ट अशी सांगतात की, त्याला असा शाप ऋषींनी दिला होता की जो पर्यंत त्याला त्याच्या शक्तीची कोणी जाणीव करुन देणार नाही, तो पर्यंत त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव असणार नाही, व त्या मुळे तो तिचा योग्य उपयोग करु शकणार नाही. ह्या शापा मुळे त्याला माहीतीच नव्हते पडले की त्याच्या कडे एवढी प्रचंड शक्ती आहे. हि जाणिव करुन दण्याचे काम जांबुवंताने केले. आपण लहानपणा पासून शिकतो की सगळे धर्म तत्त्वतः चांगलेच असतात. कोणताही धर्म मानव जातीचा उत्कर्ष कसा साध्य होईल ह्याच एका उद्देशाने शिकवण देत असतो. मग सध्या जो हिंदुत्त्वाचा उद्घोष चालला आहे तो बरोबर आहे का? व त्याची गरज खरोखरीच आहे का? असे प्रश्न सहजच उद्भवतात. आपण सगळे येथे सामंजस्याने राहू, उगाच हे प्रश्न उकरुन जातियवाद का निर्माण करा? व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ह्याचा सामान्य माणसांवर काय फरक पडणार आहे? त्यांचे रोजचे सतावणारे प्रश्न सुटणार आहेत का?
ह्या सगळ्याचा विचार करायचा म्हणजे आपल्याला काही गोष्ठींचा खुलासा करुन घ्यावा लागेल. विचारवंतांचे व तत्त्वज्ञानी लोकांचे ध्येय, हे सर्व सामावणा-या, सगळ्या अस्तीत्त्वात असलेल्या जिवसृष्टीला पोषक व समृध्द करण्याचे असते. ज्ञानेश्वरांचे पसायदान हे त्याच दृष्टीकोनातून मागीतले आहे देवाजवळ.
जोजे वांछेल तो ते लाहो। प्राणिजात सकळा।।
जो ज्याची इच्छा करेल त्याची प्राप्ती त्याला व्हावी. इथे इच्छा – ह्याचा अर्थ भौतिक इच्छा नव्हे. ज्ञानेश्वरांना आत्म्याची परमोच्च प्रगती हा अर्थ अभिप्रेत आहे. ह्यालाच जिववाद म्हणतात व ह्याच साठी हे संतलोक आपला जीव खर्ची घालवतात. सर्व जिवमात्रांची अशा दृष्टीने प्रगती होण्यास हे जरुरी आहे की ह्या जिवसृष्टी चे सगळे जे घटक आहेत ते सुध्दृढ झाले पाहीजेत. आपल्या सोयी साठी ह्या जिवसृष्टीचा प्रमुख दोन घटकां मध्ये भाग करु. प्राणीमात्र व मानव. एकुणच मानव व प्राणीमात्र ह्यांचे संवर्धन - जिवसृष्टीचे अस्तीत्त्व व शारिरीक प्रगती, ह्या नियमां मुळे चालु असते. एक म्हणजे निसर्गाचा समतोल राखणे – ह्याचे थोडक्यात विश्लेषण द्यायचे झाले तर, आपण आपल्या भुतळावरचा कोणताही जीव हा एकटा असा बघायचाच नाही. सगळी पृथ्वी हा एक जिवंत. जगणारा ग्रह आहे असे गृहीत धरले म्हणजे. ह्यातले प्रत्येक जीव हे स्वतंत्र पणे जगण्याचे नियंत्रण करत नाहीत, तर सर्व जिवमात्र मिळुन त्यांच्या जगण्याने पृथ्वीच्या वातावरणाचे नियमन करत राहतात व पृथ्वीच्या वातावरणाचा फरक इथल्या जिवांवर सहाजिकच पडतो. दोन्ही घटक हा समतोल सतत सांभाळायच्या प्रयत्नात असतात. असा प्रबंध प्रोफेसर लव्हलिक ह्या अमेरिकन शास्त्रज्ञानाने मांडला आहे. आपल्या पृथ्वी वर २१ टक्के प्राणवायू आहे. जर तो, १५ टक्के असता तर कोणताही जीव जगू शकला नसता व प्राणवायू चे हेच प्रमाण जर २५ टक्के झाले तर, झाडांचे हिरवे बुंधे सुद्धा पेट घेतिल. एवढेच काय पण आपल्या श्वासनलीका सुद्धा जळतील. प्रणवायूचे इतके नाजुक प्रमाण, कोट्यावधी वर्ष पृथ्वीची होऊनही कसे राहीले. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रोफेसर लव्हलीक यांच्या मता प्रमाणे, ह्या सगळ्या पृथ्वीवरच्या जिवसृष्टींच्या जगण्यानी आपोआपच संतुलन होत असते व पूढे ही होत राहील जो पर्यंत अनैसर्गिकरित्त्या आपण वातावरण बदलणार नाही तो पर्यंत.
ही झाली आपल्या अस्तित्त्वा बद्दलची ग्वाही व ह्या बाजुने काही इतक्यात काळजी करण्याचे कारण नाही. दुसरी म्हणजे जिवमत्रांची शारिरीक व मानसिक प्रगती. हे सर्वज्ञातच आहे की, प्राणीमात्रांचा प्रवास एका पेशिंच्या जिवांपासून, मानवा सारख्या प्रगत जीवा पर्यंत कसा झाला तो. चार्लस् डार्विन ह्यांच्या सर्व्हाइवल ऑफ द फिट्टेस्ट व प्रोफेसर लव्हलीक ह्यांच्या कारणमीमांसे वरुन अजुन एक गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणजे पुढे आत्ताच्या मानवाच्यादृष्टीने, प्रतीकूल असे आपल्या पृथ्वीचे वातावरण जरी बदलले तरीही जी नवीन वातावरणाला तोंड देऊन जिवंत राहू शकेल अशी एखादी नविन मानवजात निर्माण होईल व ती ह्या आपल्याला प्रतिकूल वाटणा-या वातावरणात मोठ्या ऐषारामात राहील. अस्तीत्त्व व शारिरीक प्रगती हे न थांबणारे स्त्रोत आहेत ह्याची काळजी संपली की मग येते मानसिक प्रगती. मानसिक प्रगती ही ख-या रुपाने जिवमात्रांमध्ये मानवालाच लागु आहे. तेव्हा आपण आतापासून मानवजातीचा विचार करुया.
मानवाचे अंतीम लक्ष्य, हे मानव जातीची मानसिक प्रगती करणे आहे. ज्ञानेश्वरांनी ह्याच ध्येयाचे प्रतिपादन त्यांच्या पसायदानात केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मताने, आपण सगळे ह्या आखिल मानवजातीच्या मानसिक उत्कर्षासाठी सतत खपले पाहीजे. आपली प्रत्येक कृती त्यालाच पोषक अशी असली पहीजे. आपली वृत्ती अशीच सर्वव्यापी झाली पाहीजे. आपले प्रयत्न त्याच दिशेने नित्य नेमाने झाले पाहीजेत. ह्यालाच म्हणतात मानवतावाद.
शरीर सुध्दृढ व निकोप होण्यासाठी हे जरुरी आहे की, शरीराचे सगळे अवयव निकोप व बलवान असले पाहीजेत. म्हणजे जो शरीर सुद्धृढ होण्यासाठी झटतो, त्याने शरीराचे सगळे अवयव धष्ट पुष्ट होण्याची काळजी गेतली पाहीजे. तसेच, सा-या मानवजातीने प्रगती करायची असेल तर ती, ज्याने बनलेली आहे ते सगळे मनुष्य समुह समृद्ध झाले पाहीजेत. हे मनुष्य समुह म्हणजेच भुतलावर असलेले वेगवेगळे देश. हे शरीररुपी मानवजातीचे, देशरुपी अवयव आहेत. मग प्रत्येक देशावर साहजीकच ही जबाबदारी पडते की, त्या त्या देशाने आपापला मानवजात समृध्द करण्याच्या दृष्टीने कार्यभाग सांभाळावा. महान इटालीयन क्रांतीकारी नेता, जोसेफ मॅझीनी हेच सांगत आला आहे. ह्या विश्वात जन्म झालेल्या प्रत्येक प्रणिमात्रांचे विशीष्ट असे करायचे कार्य आहे. प्रत्येकाच्या शिरावर कोणतीनाकोणती जबाबदारी असते. ती त्याने पारखून त्या प्रमाणे कार्य करायचे असते. हे त्याचे कार्य वाया जात नाही, अखील विश्वाचे कल्याण होण्यात त्या कार्याचा उपयोग होतो. अगदी तसेच देशांचे आहे. प्रत्येक देशाच्या वाट्याला मानवजातीची मानसिक प्रगती करण्यासाठी, ठरावीक जबाबदारी आलेली असते. ती त्या त्या देशाने पार पाडल्या वाचून गत्त्यंतर नसते. सगळ्या मानवजातीचे कल्याण करण्याचा मक्ता कोणा एका देशावर नसतो व तसे चालणार पण नाही. प्रत्येक दशाने आपले कार्य ओळखावे, पहिल्यांदा स्वतः समृद्ध व बलिष्ठ व्हावे मग इतरांना बरोबर घेऊन पुढे जावे. आत्ता पर्यंत आपण ह्या मनुष्य समुहांना देश असे संबोधत होतो. पण हा सर्वव्याप्त शब्द नव्हे. देश म्हणजे – मनुष्य समुहानी व्यापलेला विशिष्ठ भौगोलिक परिसर. ह्याला जीव नसतो. कोणत्याही देशाला स्थिर अशी सिमा असते. देश स्वतः काही कार्य करणारा नसतो. फक्त कार्य करणा-यां साठी जागा देतो.
ह्याच देशाला अर्थ देणारी, जिवंत करणारी, त्यात राहणारी माणसे असतात. आता ही माणसे सगळ्या देशात सारख्याच विचारसरणीचा उच्चार व आचार करणारी असती तर मग ह्या देशांना काही अर्थ प्राप्त झाला नसता. पण तसे नाही होत. ते, ते मनुष्य समुह जे विशिष्ठ प्रकारची विचारसिणी आचरतात, जी विचारसरणी ते ते मनुष्य समुह अंगिकारण्यास प्रबळ अशी कारणे असतात. जी विचारसरणी त्या त्या देशात राहाणा-या मनुष्य समुहानी वर्षों वर्षे जोपासलेली असते. जी विचीरसरणी वर्षों वर्षीच्या विचारमंथनातून निर्माण झालेली असते. जी विचारसरणी त्या त्या मनुष्य समुहांना मार्ग दाखवते, प्रगती करण्यास आत्मविश्वास प्रदान करते, ही विचारसरणी त्या त्या मनुष्य समुहांचे मनोबल वाढवते, कारण ती विचारसरणी त्या समुहाच्या वाडवडीलांनी अनुभवानी व गाढ विचारांनी सिद्ध केलेली असते. अशी विचारसरणी व तीचा अंगीकार करणारे लोकसमुह त्या त्या देशांना अर्थ प्राप्त करुन देतात. तो देश जिवंत होतो. त्या देशाला राष्ट्र म्हणतात. देशाला सीमा असतात आणि त्याच सीमेत राहुन राष्ट्र विकासाची परिसीमा गाठू शकतो. राष्ट्राला अधोगती नसते – प्रगती असते. कारण प्रगती फक्त जिवंत गोष्टीच करु शकतात. मग ते ते राष्ट्र जगात त्या त्या विचारसरणी मुळे ओळखले जाऊ लागते व स्वतःचे अस्तित्त्व बनवते. आपोआपच राष्ट्र ज्या विचारसरणी वर बनले आहे, त्या विचारसरणी वर, व ती अनुसरणा-या लोकांवर, जबाबदारी येते की आपले राष्ट्र जर जिवंत व प्रगत बनवायचे असेल तर आपली विचारसरणी जोपासली पाहीजे. तीचा उच्चार केला पाहीजे. तीचा आचार केला पाहीजे. बहुतेक बलाढ्य राष्ट्रांनी हेच केले आहे व करत आहेत. जी राष्ट्र त्यांची विचारसरणी बदलण्याच्या मागे लागतात, त्या राष्ट्रातली लोकं गोंधळलेल्या मनस्थितीत राहतात. आपोआपच प्रगती थांबते. रशियाची सध्या हीच व्दिधा मनस्तिथी झाली आहे. कम्युनीझम् सोडवत नाही आणि कॅपिटॅलीझम् धरवत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये आयन रँड यांच्या कॅपिटॅलीझम् ह्या विचारसरणीचा पगडा कायम आहे, आणि ही विचारसरणी ज्या पासुन उद्भवली तो त्यांचा देश पण अबाधीत आहे. पाया भक्कम आहे. लोकं गोंधळलेली नाहीत, परिणाम स्वरुप, पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रगती न थांबता होत आहे.
मग आपल्या राष्ट्रची अशी गोंधळेली परिस्थीती का. आपल्या देशाचा प्रवास समृद्धीच्या वाटेवर सुरू झाला आहे त्यात शंका नाही, पण त्याची गती बरीच संथ आहे. आपल्या राष्ट्रचा जीडीपी (GDP) जरी सातत्त्याने वाढत असला, व आपले उद्दयोग धंधे बाहेरील बाजारपेठेत जास्त नफा कमवायला लागले असले तरी ते किती नितीनीयमानूसरुन व कीती आपल्या सरकारी नियमांची भलावण करुन पुढे जात आहेत ह्याचा विचार आपण करायला पाहीजे. ब-याच वेळा पैसा कमवायचा म्हणुन प्रस्थापित नितिमत्ता सुद्धा ठोकरली जाऊ लागली आहे. नितिमत्तेला धरुन पैसा कमावणे व काहीही करुन पैसा कमावणे ह्यातला फरक फार थोड्यांना कळु शकतो व त्याहुन थोड्यांना त्याचे महत्त्व कळु शकते. नाहीतर हल्ली सगळ्यानी गृहीत धरले आहे की, पैसा कमावण्यासाठी सरकारचे नियम आपल्याला पाहीजे तसे लाच देऊन वळवता येतात. ह्याला उद्योगपती – ‘सरकारी शिक्षण’ म्हणतात, किंवा मग मोठमोठाली कॉनफरनसेस आयोजीत करण्यात येतात, त्यात हवे तसे कायदे बनवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जातात. त्याचा परीणाम – आपल्याला मिळणा-या विविध निकृष्ट सेवेतून दिसुन येतो. प्रसिद्ध उद्योगपती श्री जे आर डी टाटा यांनी किती मार्मीक टिप्पणी करुन ठेवली आहे ते पहा – “मला भारत आर्थिक दृष्ट्या बलाढ्य राष्ट्र नको आहे. मला भारत सुखी व समृद्ध राष्ट्र हव आहे”. आपला दृष्टीकोण ब-याच महत्त्वाच्या बाबींवर स्पष्ट नाही. आपला राजकिय दृष्टीकोण पण त्या मुळे शिड उडालेल्या जहाजा सारखा झाला आहे.
- आपला शत्रु देश व त्याच्याशी आपला व्यवहार कसा असला पाहीजे ह्या वर एकमत अजुन नाही.
- समान नागरी कायदा व त्या संबंधातले धोरण कायम नाही.
- आपल्या देशाच्या सिमा पुर्णपणे निश्छित अजुन झाल्या नाहीत. पाक व्याप्त काश्मीर वर आपण बोलु शकत नाही.
- काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग आपण मानत असु तर पीकिस्तान बरोबर काश्मीर मुद्द्यावर आपण का म्हणुन बोलायचे? आपला देश, आपले राज्य त्यात आणखीन पाकिस्तान कोठुन आले? बोलायचेच तर फक्त पाक व्याप्त काश्मीर वर बोलायला पाहीजे. काश्मीरीयत पाहीजे असे अजुन सुद्धा म्हणणारी मंडळी येथे सापडतात.
- हिच गोष्ट अरुणाचल प्रदेश बद्दल. चीन आपला मित्र आहे की शत्रु राष्ट्र आहे हे अजुन आपल्याला आळखायचे आहे.
- आपल्या देशा साठी काय बरे व काय वाईट हे आपण ठरवणार का जगाचे बलाढ्य आंतरराष्ट्रीय उद्द्योग ठरवणार – हा संभ्रम अजुन आहे आपल्याकडे. भोपाळ वायु गळती मुळे हजारो लोकं मेली पण कोण्या एकाच्या अमेरीकेहून आलेल्या दुरध्वनी वरुन अँडरसन महाशयांना चॅर्टर विमानाने अमेरीकेला परत पोहचविले जाते. ह्या वरुनच आपली विचारशक्ति गोंधळलेली दिसते.
- आपल्याला जो इतिहास शिकवला जातो तो आपण पारखुन घेतला पाहीजे. त्या संबंधाने आपले धोरण ठरवणारी कोणतीही संस्था अजुन नाही.
आपली विचारसरणी एवढी प्रखर असताना, आपल्या पुर्वजांनी भरभक्कम तत्त्वांवर आधारलेल्या विचारांचे देणे आपल्या पदरात घातले ते फक्त जाहीरातींवर दाखवण्यासाठीच आहे काय? ती अनुसरायला आपण लाजतो का?
आपल्या देशाने ‘सेक्यूलॅरीझम’ (सर्व धर्म समभाव) अंगीकारला आहे, पण त्याला अजुन जाणीव झालेली दिसत नाही की हा - सर्व धर्म समभाव ज्या विशिष्ठ विचारसरणीचा भाग आहे, जी विचारसरणी भारताला ज्ञात अशा ५००० वर्षा पासून मिळालेली आहे, जी विचारसरणी आपल्या पुर्वजांनी आचारुन आपला देश समृद्ध केला होता, ज्या विचारसरणी चे आजही भारतात ८० टक्के सदस्य आहेत, असा जो हिंदू धर्म आहे, त्याचाच ‘सेक्यलर’ हा अर्धवट लचका तोडून त्याला सजवून ठेवलेला भाग आहे. अहो सगळीच्या सगळीच विचारसरणी अंगीकारा ना. गणित शिकायचे तर पाढे म्हणायची लाज का. आपल्या पुर्वजांनी हिंदु विचारसरणीरुपी पक्वान्नाचा घास आपल्या तोंडाशी आणून ठेवलेला असताना, गिळायचा कंटाळा का. आपल्या देशाचे भाग्य समजा की आपल्याला सगळ्या विचारांचे सार तयार मिळालेले आहे. कोणा देशां सारखे विचारांचे दारिद्र्य आपलाकडे नाही मग हा करंटे पणा कसला. ओरपा ते विचारसरणी रुपी अमृत.
हिंदु धर्म अनुसरणा-यांनी ही जबाबदारी आपणहून घ्यावी – ही जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच पडते, कि ते भारताच्या प्रगतीचे प्रहरी ठरो. सावरकरांच्याच शैलीत बोलायचे म्हणजे – आपला भारत, सांस्कृतिक दृष्ट्या जगाला मार्ग दाखवणारा एवं शिरोग्राह्य बनवण्यासाठी हिंदु लोकांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहीजेत. भारत अग्रेसर बनवण्यात आपल्याला कधी यश मिळेल? असे कोणते लोक जबाबदारीने पुढे येऊन काम करतील?
ज्यांना भारत खरोखरच बलाढ्य व समृद्ध देश व्हावा, ह्याची तीव्र कळकळ आहे, ज्यांची देशासाठी झटण्याची तयारी आहे, जे स्वतःचा उत्कर्ष भारताच्याच उत्कर्षात बघतात, त्यांच्याच हातून भारताची प्रगती होणार आहे. तेच लोक भारताचे खङगहस्त बनण्यास पात्र आहेत. तेच नेते आहेत व तेच जेते ठरणार आहेत. पण ही अशी प्रबळ इच्छा लोकांच्या मनात उत्पन्न कशी होणार. कि जेणे करुन ही इच्छा अस्वस्थ करणा-या कळवळीला जन्म देईल व त्याच अस्वस्थ करणा-या कळवळीच्या पोटी देशासाठी झटण्याचा मनोनिग्रह निर्माण होऊन लागणारा आत्मविश्वास प्रदान करील व जेणे करुन, अशा प्रबळ इच्छेची व त्या इच्छेतून, प्रचंड प्रमाणात काम करणारी अशी न संपणारी मानवी साखळी तयार होईल, व हळुहळू भारतात रहाणा-या प्रत्येकाचे मन ह्या लाटेने चिंब भिजून, आपल्या देशासाठी कोणचेही काम, माझे स्वतःचे काम आहे व मी ते मन ओतून करीन असे वाटायला लावणारी तळमळ व तसे काम करणारे लोकसैन्य निर्माण होईल. हे कधी होईल? हे कसे होईल? हे होईल का?
(क्रमशः)
http://bolghevda.blogspot.com (मराठीतुन)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com
Comments
ह्ये काय फार्ट?
कोंबड्या झुंजविण्याच्या खोडसाळ हेतूने असल्या लेखकांना उपक्रमवर पुनर्प्रकाशन करण्यासाठी मिसळपाववरील कोणी उद्युक्त करीत आहे काय?
:-)
जळजळ पोहोचली! धन्यवाद. :-)
पुनःप्रकाशन
पुनःकथन, पुनःप्रकाशन, पुनःप्रक्षेपण, पुनःप्रदर्शन, पुनःप्रार्थना, पुनःप्राप्ती, पुनःपुनः, पुनःप्रत्यय, पयःपान, कःपदार्थ. परंतु परस्पर, पुरस्कार, नमस्कार इ.इ.!--वाचक्नवी
धन्यवाद
अशुद्धलेखन करताना असे कधीकधी होते की शब्द चुकला आहे हे जाणवते पण योग्य शब्द काही आठवत नाही :D
छान लेखन ....
राष्ट्रव्रताबाबतचे मुद्दे पटण्यासारखे आहे. बाकी, बलाढ्य आणि समृद्ध भारत करण्यासाठी झटले पाहिजे.
प्रगतीचा विचार मनात यावा यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे त्याचबरोबर आपण म्हणता तसे 'आपल्या देशासाठी कोणतेही काम, माझे स्वतःचे काम आहे व मी ते मन ओतून करीन असे वाटायला लावणारी तळमळ व तसे काम करणारे लोकसैन्य निर्माण' झाला पाहिजे या विचारातील आशावादाने एक उपक्रमी वाचक म्हणून मनात अधिक उत्साह निर्माण झाला. बाकी, मुद्यांवर उपक्रमी चर्चा करतीलच. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
'विचारांशिवाय केलेली कृती ही आंधळी असते आणि कृती शिवाय केलेला विचार हा वांझोटा असतो' -लेनिन
[सकाळच्या एका बातमीतून साभार]
-दिलीप बिरुटे
सुंदर टंकन!
बापरे बाप! केवढा मोठा लेख! सुरवातीला वाचायला घेतला, पण लेखकाला काय म्हणायचंय हे कळत नव्हतं म्हणून न वाचताच पान खाली-खाली स्क्रोल करत गेलो, तर शेवटी लिहीलय, 'क्रमश'!
अरे देवा! म्हणजे अजून लेख बाकि आहे? लेखकाला 'काहितरी सांगण्यापेक्शा' 'टंकायला भारी आवडते' असे दिसतय.
असो! टंकनासाठी खूप खूप शुभेच्छा!
तेच म्हणणावेसे वाटते.. कर्नल..
तेच म्हणावेसे वाटते; कर्नल चितळ्यांनी उपक्रमावर आल्याच्या पहिल्याच दिवशी तोफांचा भडिमार सुरू केला. --वाचक्नवी
राष्ट्रव्रत
ऍक्चुअली असे "भारत देशाला" जगात सर्वोत्तम बनवायचा आहे असा ध्यास घेऊन कोणी* काम करू शकतात का/करतात का? असा प्रश्न मनात येतो.
* धोरण निश्चिती करणारे, सरकार मध्ये सहभागी असलेले लोक सोडून.
एडिसन/हेन्री फोर्ड/बिल गेटस यांनी त्यांच्या कंपन्यांच्या फायद्यासाठी काम केले की अमेरिकेला बलवान करण्यासाठी? (उलट कंपनीच्या फायद्यासाठी कामे भारतात आउटसोर्स करून अमेरिकी उद्योजक अमेरिकेचे नुकसान करतात असे म्हटले जाते).
अगदी रॉबर्ट क्लाईव्हने सुद्धा इंग्लंडच्या हितासाठी भारतात कार्य केले नाही.
टाटांसारखे सन्माननीय उद्योगपतीसुद्धा भारताला बलवान करण्यासाठी काम करीत नाहीत. करूही नये. त्यांच्या कंपन्या बलवान झाल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला जो फायदा होईल त्याने भारत देश बलवान होईल.
नितिन थत्ते
राष्ट्रव्रत
उपक्रमवर स्वागत.
लेख मोठा व शब्दबंबाळ झाला आहे. लेख वाचताना भाषण तेही प्रचारकी ऐकल्यासारखे वाटते. माहिती तर फारशी काहीच मिळत नाही. कुठल्या संघटनेचे तत्वज्ञान असेल तर त्यांचे नाव कळवावे. तेवढीच अधिक माहिती मिळेल.
राष्ट्रव्रतात शुद्धलेखन नाही (त्याबद्दल धन्यवाद).
विरोधाभास
आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.
तर थोडे खाली:
हे राष्ट्रव्रत आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या आड न येणारे असे आहे. स्वतःवर ओझे न पाडणारे आहे, आपली गैरसोय न करणारे आहे
कोणताही धर्म मानव जातीचा उत्कर्ष कसा साध्य होईल ह्याच एका उद्देशाने शिकवण देत असतो. हे नवीनच कळले.
जोजे वांछेल तो ते लाहो। प्राणिजात सकळा।। ....... ह्याचा अर्थ भौतिक इच्छा नव्हे. ज्ञानेश्वरांना आत्म्याची परमोच्च प्रगती हा अर्थ अभिप्रेत आहे.
मग राष्ट्रव्रतातील भौतिक गोष्टी काय कामाच्या?
पाश्चिमात्य राष्ट्रांचा
पाया भक्कम आहे. लोकं गोंधळलेली नाहीत, परिणाम स्वरुप, पाश्चिमात्य राष्ट्रांची प्रगती न थांबता होत आहे.
त्यांना हल्ली भरपूर दिलासा हवाच होता.
प्रमोद
तळमळ खरोखर स्तुत्य आहे!
प्रमोद यांनी वर म्हटल्याप्रमाणे लेख खूपच मोठा आणि शब्दबंबाळ झाला आहे!
व्याकरण दृष्ट्या अचूक (शुद्ध) लेखन, आवश्यक ते मुद्दे, समर्पक उदाहरणे, ह्या सर्व मुद्यांची व उदाहरणांची मुख्य विचारधारेला धरून योग्य ती मांडणी आणि विश्लेषण असं काहीसं लेखनात असतं तर लेख अधिक आकर्षक असता. राष्ट्रव्रत ही प्रेरणा/उपक्रम/संकल्पना म्हणून चांगली जरूर आहे; व्यवहारांत त्याची अंमलबजावणी अवघड आहे पण अशक्य नाही.
लेखकाची तळमळ मात्र स्तुत्य आहे!
नव्या उगवत्या ले़खकांना/लेखिकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अपेक्षित असतं, ते ह्या उपक्रमच्या मंचावर मिळालं की त्यांच्या पुढील लेखनाला अधिक धार येईल असे राहून-राहून वाटते.
राष्ट्रव्रत
राष्ट्रव्रत म्हणजे पॉवेलच्या स्काउट चळवळी सारखे काही आहे का?
क्रम उलटा हवा
> आपल्या राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचा सन्मान आणि राष्ट्राचे कल्याण - नेहमीच सगळ्यात आधी.
> तदनंतर आपल्या परिवाराचा सन्मान, परिवाराचे कल्याण आणि परिवाराची सोय.
> स्वतःची सोय, स्वतःचे कल्याण व स्वतःची - सुरक्षा शेवटी, नेहमीच शेवटी.
याउलट सर्वांनी आपली सोय (दुसर्यांचे पाय न ओढता) पाहिली तर आपोआपच परिवाराचे, समाजाचे, देशाचे व मानवतेचे कल्याण होईल.
देशाला सर्वात महत्वाचे का समजायचे हे कळत नाही.
छान वाटले
लेख वाचलात छान वाटले.
भारतीय सेनेचे ब्रिद वाक्य देत आहे. येथे
बाकी आपण योग्य विचार करणारे आहाच.
धन्यवाद
आपल्या प्रतिसादा साठी धन्यवाद
ह्या सुत्रांचे बारकाईने वर्णन भाग २ व ३ मध्ये केले आहे. ब-याच वेळेला वाचणा-यांना असे वाटेल की इतक्या बारकाईने वर्णन करायची गरज आहे का? मला स्वतःला वाटते आहे. आपला धर्म सोपा, आकर्षक व आकलनिय करण्यासाठी एवढ्या बारकाईची गरज आहे. कारण विचारसरणीचा गोषवारा माहीती असला तरी नेमके प्रत्येकाने कसे वागयचे हे स्पष्ट नसेल तर आधळीकोशिंबीरीचा खेळ ठरेल. माझी अशी विनंती आहे की
वाचणा-यांनी हे विचारात घेऊन लेख वाचावा.
राष्ट्रव्रत हा विचार किंवा संकल्पना मांडण्यासाठी हा लेख लिहीला आहे.