ईश्वरें तृणे करून रक्षण केलें

ईश्वरे तृणे करून रक्षण केले
............................"आपापले हितगुज"(श्री.म.माटे,१९४२) या पुस्तकात प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्मचरित्रांतील काही भाग दिले आहेत.प्रस्तावनेत लेखक म्हणतात,
"आत्मचरित्रे वाचायची मला फार हौस.आपल्याला जे आवडते त्याचा रसास्वाद इतरांनाही प्राप्त करून देणे युक्त वाटले.
... पाश्चिमात्यांत आत्मचरित्रे लिहिण्याची प्रथा आहे.आपल्याकडे ज्ञानेश्वर ,हेमाद्री,कृष्णदेवराय,शिवाजी महाराज, बाजीराव, मोरोपंत अशांची आत्मचरित्रे असती तर त्यांतील भाग देण्यात आनंद वाटला असता.तरी नाना फडणीस, विष्णुबुवा ब्रह्मचारी, ल.रा.पांगारकर यांचे काही घेता आले ही भाग्याची गोष्ट!"
प्रस्तुत लेखाच्या (ईश्वरे.....केले) प्रारंभिक निवेदनात माटे लिहितात,
"....भाऊसाहेब पेशवे पानिपताच्या लढाईसाठी गेले तेव्हा नाना त्यांच्या बरोबर होते.पानपतास वाताहत झाली.नानांवर मोठा प्रसंग आला.त्यांच्या आईस गिलच्यांनी धरून नेले.नाना कित्येक दिवस जीव लपवीत दक्षिणेचा मार्ग आक्रमित होते.ते गिलच्यांच्या हाती लागले नाहीत हा केवळ योगायोग."
नानांनी एक लहानसे स्वचरित्र लिहिले आहे.त्यांतील काही भाग हितगुज पुस्तकात आहे.त्यांतील थोडे अंश असे:
......."विद्याभ्यासाकरिता मातोश्रींनी मारही दिला.मातापितर जे त्यांची ही शिक्षा. तेणे करून लहानपणी अज्ञानाकरिता चित्तास वाईट वाटून त्यांचेही अनिष्ट चिंतीत असे.
.....दहावे वर्षी विवाह झाला.बारावे वर्षी कामाविर्भाव शरींरी होऊ लागला.तेणेकरून असत्समागम झाला.तेणेकरून पाप प्रवृत्ती होऊ लागली.
....घोड्यावरून पडलो.व्यवस्था अति कठिण.दोन दिवस शरीरभान नव्हते.गोविंद जो त्याचे कृपेने बरे झाले...
...पापदृष्टी एके समयी झाली.अपराध झाला.पाप व शरीरनाश समजू लागले.तेव्हा ते सोडून देण्याचा निश्चय केला.परंतु कामाविर्भाव विशेष.तेणेकरून पापबुद्धी होत असे.
....कर्नाटक प्रांती श्रीरंगपट्टणास गेलो.घरी परतल्यावर रमणीयोग आला.परंतु पापबुद्धी नि:शेष सुटेना.चित्तांत विचार केला की पितामह यांची बुद्धी धर्मशील आणि सात्त्विक.निषिद्धकर्म करणेच नाही.असे असता माझे चित्त पापाकडे कसे जाते? विचार करता मातामह पक्ष अति व्यभिचारी.तो संस्कार आहे. बुद्धीचा निश्चय करावा, तत्रापि स्थिरता राहू नये,तेव्हा संस्कार बलवत्तर असे वाटते.
......मातोश्री व कुटुंबासहवर्तमान त्रिस्थळी यात्रा करावी या भावनेने भाऊ बरोबर हिंदुस्थानात गेलो.चित्त वैराग्यशील झाले.मार्गात आवेची व्यथा बहुत जाहली.रेचन बहुत. उठावयास शक्ती नाही.तरी ईश्वरे बरे केले.
...चरमणवतीतीरी गेलो.तेथे ग्रहण पडले.स्नानादिकांनी आत्मा पवित्र होत्साता ध्याने करून कालक्षेप चालत असे.
....पुढे दिल्लीस गेलो.पृथ्वीपतीचे दर्शन घेतले.त्यांणी कृपायुक्त भाषण केले. वस्त्रे दिली.संतोष जाहला.भगवंताचे कृपेचे अंतर्वर्ती ही कृपा आहे.दिल्लीतील चित्रे वगैरे विषय,ज्यांत पाप नाही ती, घेतली.
...युद्धास गोळा गोळीचा प्रारंभ झाला.श्रीमंत अति बुद्धिमान, धैर्यवान.गर्व मात्र विशिष्ट.
...तोडातोडी होऊ लागली.श्रीमंत दिसेनासे झाले.तेव्हा ईश्वरे बुद्धी दिली.माघारे फिरलो.पूर्वी बापूजीपंतीं बोध केला की अशा समयी श्रीमंतांस सोडणे ठीक नाही.परंतु येणेप्रमाणे झाले.
....सायंकाळचे घोड्यावरून पाणिपतास आलो.रामाजीपंत होते.म्हणाले घोडे वस्त्रे टाकून द्यावी.तेणे प्रमाणे सर्व टाकून शुद्ध लंगोटी लावली.इतरांसमवेत चालू लागलो.तो एका कोसांत तीन वेळा टोपीवाल्यांनी झाडा घेतला.दरवेळे समागमीचे दहा वीस तोडून टाकीत.दहा बारा कोस पश्चिमेकडे गेलो तों शत्रू येऊन रामाजीपंत,बापूजीपंत वगैरे यांस मारले.मी गवतात गेलो.वाचलो. ईश्वरे तृणे करून रक्षण केले.
......शरीर अशक्त. ऊन पाहिलेच नाही व पादचारी अभ्यास नसता सोळा सतरा कोस अन्न उदकाव्यतिरिक्त चाललो.क्षुधा बहुत लागली.बोरीचा पाला सापडला तो खाऊन पाहिला.तोंडात जाईना.
......सायंकाळी एका बैराग्याने पीठ दिले.त्याची भाकर खादली. अमृतप्रमाण लागली......."
********************
माझे मत(भाष्य):
*नानांच्या आत्मनिवेदनाची पद्धत पाहात असे वाटते की ते विस्तृत आत्मचरित्र लिहिते तर ऐतिहासिक साहित्यात मोलाची भर पडती.पेशवे कालीन राजकारण आणि समाजस्थिती यांचे सत्यदर्शन घडते (घडले असते.).
*पानिपतीं मराठ्यांच्या पराभवाची वास्तविक कारणे कोणती? यावर या लेखनातून काही प्रकाश पडतो.
..असो. येणेप्रमाणे प्रस्तुतलेखविस्तार बहुत जाहला.तरी आता कथा मूळपदीं आणावी हे बरे !
"ईश्वरे तृणे करून रक्षण केले."हे नाना फडणवीस यांचे वचन खरे मानावे तर, "ईश्वरे गिलचें करून मातेचे अपहरण केले."असे विधान सत्य मानणे अपरिहार्य ठरते.नाही काय?
*********************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

आनंद

माझे निरिक्षण् असे कि, ज्या गोष्टीमुळे त्याना आनंद प्राप्त झाला त्याच् गोष्टीला त्यानी "इश्वरे केले" असे म्हटलेय...

ह्म्म्म

तसे पाहता इतिहास हा घडवला जातो, हे चरित्र ज्यांनी लिहिले त्यांनी नानांचा इतिहास घडवला. (निदान काही भाग तरी.) तसाच एक असाही इतिहास आहे कि नाना हे पेशवेकालीन राजकारणातील सर्वात कुशल राजकारणी होते, ते पाहता त्यांच्या आत्मचरित्राचे हे तुकडे एक विरोधाभास वाटतो. पण दोन्हीही घडविलेले इतिहास असू शकतात. आत्ता इथेच पहा, तुम्ही जे तुकडे दिले आहेत त्यामधून नाना हे अतिशय सामान्य व्यक्तिमत्व असावे असे वाटते, जसे लिहिले जाते तसे मत बनण्यास अधिक मदत होते.

>>>*नानांच्या आत्मनिवेदनाची पद्धत पाहात असे वाटते की ते विस्तृत आत्मचरित्र लिहिते तर ऐतिहासिक साहित्यात मोलाची भर पडती.पेशवे कालीन राजकारण आणि समाजस्थिती यांचे सत्यदर्शन घडते (घडले असते.).
इतिहासकार कसा आहे ह्यावर बरेच काही अवलंबून आहे, तशा बऱ्याच बखरी उपलब्ध आहेत. पण विस्तृत आत्मचरित्र असते तर काही गोष्टींचा उलगडा नक्कीच झाला असता हे मान्य.

>>"ईश्वरे तृणे करून रक्षण केले."हे नाना फडणवीस यांचे वचन खरे मानावे तर, "ईश्वरे गिलचें करून मातेचे अपहरण केले."असे विधान सत्य मानणे अपरिहार्य ठरते.नाही काय?
:) हा हा हा, तर्क बरोबर आहे. पण ईश्वर कोणाचे वाईट करत नाही, सबब वाईट झाल्यास ते सैतानाचे काम असावे व चांगले झाल्यास ते ईश्वराचे काम असावे असे मानले जाते.

अवांतर - मध्यंतरी १६व्या शतकातील एक इंग्रजी वर्तमानपत्र सापडले ज्यामध्ये शिवरायांच्या सुरत-लुटीची बातमी दिली आहे, असे लेखन जास्त authentic असण्याची शक्यता आहे.

:)

"अगर आप भगवान पर विश्वास करते हैं तो आपको शैतान पर भी विश्वास करना पडेगा|" - राझ

बिल्कुल!

:) हॅ हॅ हॅ, हि ओळ कोणाची हे आठवत नाही, पण बिपाशा असे म्हणाली तर कोण 'विश्वास' ठेवणार नाही?

पण कुठेतरी असे वाचल्याचे स्मरते कि 'उसने' फिर जिन्न और शैतान पैदा किया, म्हणजे सैतान हि देखील त्याचीच औलाद.

:)

ते उद्गार आशुतोष राणाच्या तोंडी आहेत असे वाटते.

सैतान प्रसन्न

आम्ही फक्त सैतानावरच विश्वास ठेवतो.
;-)

किंबहुना, सैतानामुळेच देवाची निर्मिती झाली असेही मला वाटते. ;-)

कळावे.

सहानभूती

सैतानाबद्दल मनात एक सहानभूती आहे.

कायमच घृणेचा तो receiver , आम्ही त्याचे उपासक.
देव त्याचं भला करो. (मन भरून आलं).

कळवले.

काहीच्या बाही

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजूनकोणीमी म्हणतात,"तसे पाहता इतिहास हा घडवला जातो, हे चरित्र ज्यांनी लिहिले त्यांनी नानांचा इतिहास घडवला."
लेखात निळ्या अक्षरांत जे लिहिले आहे ते सर्व नाना फडणीसांनी स्वहस्ते लिहिलेल्या आत्मचरित्रातील आहे.ते सर्व बनावट ,खोटे आहे असे श्री.आकोमींना म्हणायचे आहे काय? बरे यात नानांचे चारित्र्यहनन नाही. "भले बुद्धिचे सागर नाना ऐसे नाही होणार." ही त्यांची प्रतिमा या चरित्रामुळे मुळीच डागाळत नाही."
"... नाना हे पेशवेकालीन राजकारणातील सर्वात कुशल राजकारणी होते, ते पाहता त्यांच्या आत्मचरित्राचे हे तुकडे एक विरोधाभास वाटतो."
..श्री.आकोमी.
हे कशाच्या आधारे म्हणतात? मला तर विरोधाभास कुठेच दिसत नाही.

शरदकाका

शरदकाकांना विनंती की याला उत्तर देणार असलात तर इथेच द्यावे. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

जिवंत अंधश्रद्धाळू

जिवंत अंधश्रद्धाळू सर्व खपले वाटतं? ;-)

बाकी, नानांच्या आत्मचरित्रातील भाग देण्याबद्दल धन्यवाद. यावर चांगली ऐतिहासिक चर्चा झाली असती परंतु सर्व चर्चा श्रद्दा आणि चिकित्सेच्या दिशेने वळवण्याचे आपल्या प्रयत्न पटले नाहीत.

असो.

दिवाळीच्या शुभेच्छा!

शेजवलकर

*पानिपतीं मराठ्यांच्या पराभवाची वास्तविक कारणे कोणती? यावर या लेखनातून काही प्रकाश पडतो.

शेजवलकरांनी ही कारणे विस्तृत वर्णन केली आहेत.
वरील लेखातून नाना या शिपाईगडी नसलेल्या माणसाचे श्रीमंतांबद्दलचे (सदाशिवराव?) यांच्याबद्दलचे मत दिसते आहे. त्यातून त्यांना गर्व विशिष्ट होता एवढे कळते, त्या गर्वातून त्यांनी काही चुकीचे निर्णय केले असतील असे कळते, पण मराठ्यांच्या पराभवाची कारणे काही पुरेशी कळत नाहीत असे माझे मत झाले.

बाकी माहिती रोचक आहे. नाना फडणवीस यांना लहानपणापासून भरपूर (ब्रह्मचर्य, पापबुद्धी इ.) गिल्ट कॉम्प्लेक्स होता असे दिसते आहे :)

अवांतर -जे काही बरेवाईट ते देवानेच केले, ही श्रद्धा असते हे खरे तसेच असे म्हणण्याची पद्धतही असते, नकळत बोलले जाते. जेव्हा आपल्या चुका होतात तेव्हा त्या चुकांचे खापर देवाच्या म्हणजे दुसर्‍याच्या माथी फोडण्याच्या वृत्तीतूनही देव तयार झाला असावा असे वाटते.

पानिपतच्या पराभवाची कारणे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
...मातोश्री व कुटुंबासहवर्तमान त्रिस्थळी यात्रा करावी या भावनेने भाऊ बरोबर हिंदुस्थानात गेलो.
....चरमणवतीतीरी गेलो.तेथे ग्रहण पडले.स्नानादिकांनी आत्मा पवित्र होत्साता ध्याने करून कालक्षेप चालत असे.
.....
१) वरील वाक्यांवरून समजते की नाना सहकुटुंब गेले ते यात्रेसाठी.अशी अनेक कुटुंबे केवळ यात्रेसाठी सैन्याबरोबर जात होती.या बाजारबुणग्यांमुळे कूच करण्याचा वेग मंदावला .रसद लौकर संपली .
२) वाटेत ग्रहण लागले. तेव्हा नदीतीरी तळ ठोकला.स्नान,संध्या,ध्यान करण्यात कालक्षेप चाले. ब्राह्मणभोजने होत. ग्रहणकालात असे केले तर पुण्य लाभते आणि युद्धात विजयप्राप्ती होते असा समज आहे. याप्रमाणे आठ दिवस मुक्काम होता. या काळात किती दाणा गोटा संपला असेल त्याची कल्पना करावी.
रसद संपली म्हणून पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.

अपूर्ण माहिती

वरील निदान केवळ नानासाहेबांच्या आत्मचरीत्रातील चार ओळी, वाचून काढणे हे संशोधनात्मक जाउंदेत पण आपणच म्हणत असल्याप्रमाणे प्रकाश पाडणारे पण ठरत नाही. मी आधी देखील खालील एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे त्यात प्रत्येक घटनेचा काल सांगितला गेलेला नाही. म्हणजे असे की, "मातोश्री व कुटुंबासहवर्तमान त्रिस्थळी यात्रा करावी या भावनेने भाऊ बरोबर हिंदुस्थानात गेलो." या त्यांच्या वाक्याआधी, "कर्नाटक प्रांती श्रीरंगपट्टणास गेलो.घरी परतल्यावर रमणीयोग आला." असे वाक्य आहे. याचा अर्थ पानीपताला पुण्याहून उत्तरेत जाताना ते काय दक्षिणेत जाऊन पुढे गेले असे म्हणायचे का? तसे केले असल्यास गोष्ट वेगळी आहे. तसेच "मातोश्री..." नंतरच्या वाक्यात ते दिल्लीत जाऊन "पृथ्वीपतीस..." भेटले असे देखील म्हणत आहेत, ते कोण?

थोडक्यात, मराठे का हरले याची कारणे जगजाहीर आहेतच आणि त्यावर चर्चा करणे, माहीती करून घेणे हे जास्त आवडेल. विशेष करून आत्ताच्या काळात जेंव्ह अफगाण आणि युद्ध हे परत मोठ्या प्रमाणावर एकत्र आलेले शब्द असताना...

पण या धाग्यात मात्र, जसा एखादा अंधश्रद्धाळू संदर्भावीना देव-धर्म् बोलतो तसेच येथे संदर्भावीना अनुमान काढले जात आहे असे वाटले. थोडक्यात वृत्ती एकच वाटते कृती भिन्न असली तरी.

न समजण्यासारखे काही नाही.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोणीही व्यक्ती आत्मचरित्र उत्तर वयात लिहिते. बालपणापासूनच्या ज्या धटना आठवतील त्या, अथवा नोंदी ठेवल्या असतील त्यावरून , लेखन होते. घटना कालानुक्रमे लिहिलेल्या असतात. काही फ्लॅश बॅक असतील तर तसे समजेल असे लिहिलेले असते.
लेखातील घटना नानांच्या बालपणापासून पानिपतच्या पराभवानंतरच्या परतीच्या प्रवासापर्यंत आहेत. सर्व सलग घेतलेले नाही हे उघड आहे. विजोड टिंबांनी दाखवला आहे. प्रत्येक घटनेचा काळ देण्याची काही आवश्यकता नाही. सर्व काही समजण्यासारखे आहे. नाना श्रीरंगपट्टणला जाऊन आले. नंतर कांही काळाने सदाशिवराव भाऊंबरोबर उत्तर हिंदुस्थानात गेले ते पानिपतच्या युद्धाच्या निमित्ताने, तिथे दिल्लीत बादशहाला भेटले. हे कोणालाली सहजतेने कळण्यासारखे आहे.शंका समर्थनीय दिसत नाहीत.

आत्मचरित्र

नाना फडणवीसाच्या आत्मचरित्रातील भाग दिल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण पुस्तक वाचायची इच्छा होत आहे. कुठे मिळेल ?

त्यांच्या आत्मनिवेदनाची पद्धत चांगल्यापैकी प्रामाणिक आहे. हे आत्मचरित्र कधी लिहिले हे कळले नाही. मात्र पानिपत युद्धाचा उल्लेख कुठल्याही मोठ्या घटनेसारखा दिसत नाही. (का गाळला गेला?) जाण्याचे कारण यात्रा, त्यात पृथ्वीपतीचे (बादशहा?) दर्शन वगैरे उल्लेख गमतीदार वाटतात.

'ईश्वरे तृणे... ' उल्लेख वाक्प्रचारी वाटला. असाच एक उल्लेख म्हणजे 'इन्शाल्ला' (देव करो) ही एक नकार द्यायची पद्धत आहे.

प्रमोद

+१

>>नाना फडणवीसाच्या आत्मचरित्रातील भाग दिल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण पुस्तक वाचायची इच्छा होत आहे. कुठे मिळेल ?

+१. फडणवीसांचे चरित्र वाचले आहे, पण आत्मचरित्राबद्दल उत्सुकता आहे.

'ईश्वरे तृणे... ' उल्लेख वाक्प्रचारी वाटला.

असेच. दुसरे वाक्य, "दुर्दैवे गिलचें करून मातेचे अपहरण केले" यासारखे काही असते तर? 'दुर्दैवाने अमुकतमुक झाले' म्हणजे किंवा 'नशीब् माझं अमुकतमुक..' वगैरे वाकप्रचार वापरणारे आस्तिकच असतील असे नाही.

-Nile

अंशतः सहमत

एखादा आस्तिकही जेव्हा देव/दैव इ. संकल्पना वापरतो तेव्हा वि़ज्ञानाच्या दृष्टीने तो त्या "'क' या घटनेने मला आनंद झाला पण ती घटना मला अनपेक्षित होती/तिचे कारण मला माहिती नाही" किंवा "'ख' या घटनेने मला दु:ख झाले पण ती घटना मला अनपेक्षित होती/तिचे कारण मला माहिती नाही" याच अर्थाने वापरत असतो. याला वाक्प्रचारी अर्थ म्हटले तर तो एकच अर्थ शक्य आहे."क ही घटना व्यक्तीने घडविली" या वाक्यात विज्ञानाच्या दृष्टीने काहीही माहिती नाही.

नाना फडणिसांचे आत्मवृत्त

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
नानांनी एक लहानसे आत्मवृत्त स्वहस्ते लिहिले आहे असे ऐकिवात होते. ते मी वाचलेले नाही.श्री.म.माटे यांच्या आपापले हितगुज पुस्तकात त्यांतील काही भाग आहे.(पुस्तकाची लहान आकाराची दहा पृष्ठे) तेव्हढाच मी वाचला आहे.
(आताच मला एक व्य. नि. आला. त्या सदस्यांकडे नानांचे पूर्ण आत्मचरित्र आहे. तसेच नाना आणि माधवराव पेशवे यांच्यांतील गुप्त पत्रव्यवहार आहे. त्यावर त्यांनी इथे लेख लिहावा अशी त्यांना विनंती केली आहे.)

नानांच्या शब्दांत पानिपत

विश्वास पाटलांच्या पानिपतमध्ये कादंबरीच्या शेवटी आधार-साधनांची यादी दिली आहे, यादीत 'नाना फडणीस यांचे शब्दांत पानिपतचा रणसंग्राम संपादक : शं. ना. जोशी, लिमये, सोहोनी ' आहे. --वाचक्‍नवी

वाचायला आवडेल

नानांचे आत्मचरीत्र मुळातून वाचायला आवडेल. येथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. ही वाक्ये लहानपणापासून ते मोठे असतानापर्यंतची एकत्रीत आहेत का? कारण पहील्या वाक्यातून त्यांचे असत्समागम् हे बाराव्या वर्षीचे दिसते तर पानीपताचे गमन हे इतिहासातील माहीतीप्रमाणे विसाव्या वर्षीचे आहे.

पानिपतीं मराठ्यांच्या पराभवाची वास्तविक कारणे कोणती? यावर या लेखनातून काही प्रकाश पडतो.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही. ज्या विषयावर संशोधने केली गेली, ग्रंथ लिहीले गेले, त्यावर इतक्या कमी वाक्यांमधे नक्की काय प्रकाश पडला ह्यावर विस्तृत लिहीले तर बरे होईल. मग त्यावर चर्चा घडू शकेल.

"ईश्वरे तृणे करून रक्षण केले."हे नाना फडणवीस यांचे वचन खरे मानावे तर, "ईश्वरे गिलचें करून मातेचे अपहरण केले."असे विधान सत्य मानणे अपरिहार्य ठरते.नाही काय?

वर इतरांनी पण म्हणल्याप्रमाणे मला देखील हा केवळ वाक्प्रचारच वाटतो. पण तुर्तास असे समजूया की हे शब्दशः विधान आहे (म्हणजे वाक्प्रचार नाही, तर जे वाटले ते, अनुभवले असे नानांना वाटले ते). मग त्यातील प्रत्येक वाक्येच शब्दशः विधाने म्हणून मानली पाहीजे.

"त्याची भाकर खादली. अमृतप्रमाण लागली" या वाक्यातून मग असा अर्थ घेयचा का नानासाहेबांनी घोटभर का होईना अमृत प्यायलेले होते? (अमृततुल्य चहा नाही, अमृत!)

पुढे दिल्लीस गेलो.पृथ्वीपतीचे दर्शन घेतले."
हे पृथ्वीपती कोण? पृथ्वी दिल्लीकरांच्या कधीपासून ताब्यात होती, म्हणून नानासाहेब "पृथ्वीपती" हा शब्द वापरता आहेत?

तेच आवेच्या व्यथेत ईश्वराने बरे करणे अथवा माघारी फिरण्याची ईश्वराने दिलेली बुद्धी यात त्यांना नक्की काय म्हणायचे आहे असे वाटते?

देव आणि आनंद

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
नानांनी आनंदालाच देव मानले असेल असे सुवर्णा यांचे "निरीक्षण" आहे. हे असले काहीतरी लिहिले जाते म्हणून श्री.रिटे.यांनी प्रस्ताव मांडला होता की देवाची व्याख्या करावी. पण त्याचे महत्त्व न समजल्यामुळे कोणी म्हणाले," तुम्ही देव, आम्ही देव,हे देव, ते देव,महादेव,सहदेव,रमेश देव,यशवंत देव. देवच देव. " चला! आपण सारे देव देव खेळूंया."....असो. मनात होते एक आणि लिहिले दुसरेच!
. सुवर्णा यांना वाटते तसे नानांनी आनंदाला देव म्हटले असेल हे संभवत नाही. कारण देवानंद हे (वयाचा विचार करता एकेरी उल्लेख प्रशस्त नाही) खूप, खूप म्हणजे खूपच पूर्वीचे वाटत असले तरी ते पेशवेकालीन नाहीत !

कोणी कशाला, मीच म्हणालो

--पण त्याचे महत्त्व न समजल्यामुळे कोणी म्हणाले,-- कोणी कशाला, मीच म्हणालो. बुद्धीमान लोक स्पष्टतेला टाळतात का ते नाही समजले.

हा

सुवर्णा यांना वाटते तसे नानांनी आनंदाला देव म्हटले असेल हे संभवत नाही. कारण देवानंद हे (वयाचा विचार करता एकेरी उल्लेख प्रशस्त नाही) खूप, खूप म्हणजे खूपच पूर्वीचे वाटत असले तरी ते पेशवेकालीन नाहीत !

हा इनोद म्हणावा का?

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

नसावा

नसावा. कारण इनोद खन्ना पण बर्‍याच नंतरच्या काळातील आहे. :-)

हल्ली

हल्ली इनोदला ओळखणे अवघड झाले आहे कारण हसू आले पाहिजे ही अट शिथिल झाली आहे ;)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

विनोदाचा हेतू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
देव आणि आनंद हा प्रतिसाद लिहिण्याचा हेतू एवढाच की "तू देव, मी देव ,हा देव तो देव,आनंद देव .. " असे म्हणत गेले तर देव हा शब्द निरर्थक ठरतो.देव या संकल्पनेची काही निश्चित व्याख्या हवी, काही गुणधर्म हवेत.
एकाने देवाचे अस्तित्व पुढील प्रमाणे सिद्ध(?) केले:
"मातृदेवो भव| असे म्हटले आहे. म्हणजे प्रत्येकाने आईलाच देव मानावे.मी दुसरा कोणताही देव मानत नाही तर माझ्या आईलाच देव मानतो.प्रत्येकाला आई असतेच. म्हणजे देव अस्तित्वात आहेच."
हा युक्तिवाद पटतो का? थोडा विचार केला तर लक्षात येईल की अधोरेखित वाक्य निरर्थक आहे.

निरर्थक.

निरर्थक.

'अधोरेखित वाक्य निरर्थक आहे' असे म्हणतां आठविले: इस्लाम कुबूल करतानाचा सहा कलिमांपैकीचा पहिला शहादा अश्दु' अ'न ला इलाह् इल्ल् अल्लाह् व अश्दु' अ'न मुहम्मदुन् रसूल अल्लाह् असा आहे. अरबाक्षरांत أشهد أن لا إله إلاَّ الله و أشهد أن محمدا رسول الله. अर्थ असा: मी असे सत्यप्रमाणित करतो की अल्लाहच्या शिवाय दुसर्‍या कोणी देवता नाहीत आणि असेही सत्यप्रमाणित करतो की मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम्) हेच अल्लाहचे प्रेषित होत.

आपल्या वाक्यरचनापद्धतींत बसवावयाचे म्हटल्यासः मी दुसर्‍या कोणत्याही देवता मानत नाही, तर माझ्या अल्लाहलाच देवता मानतो.

---

मी दुसरा कोणताही देव मानत नाही तर माझ्या आईलाच देव मानतो. प्रत्येकाला आई असतेच. म्हणजे देव अस्तित्वात आहेच.

'मानण्याने' आईचे अस्तित्त्व सिद्ध होत असल्यास केवळ 'मानण्यानेच' देवतेचेही अस्तित्त्व सिद्ध होते असे म्हणावे लागेल हा आपला गणिती वितर्क आवडला. अर्थात् असा वितर्क अर्धवट आहे, म्हणून निरर्थक आणि म्हणूनच त्याज्यही आहे.

हैयो हैयैयो!

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

निरर्थकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
>"मी दुसरा कोणताही देव मानत नाही तर माझ्या आईलाच देव मानतो."
...
वरील वाक्यातील पुत्र : आईला देव मानतो. तो अन्य कोणताही देव मानत नाही.
मग तो आईला देव मानतो म्हणजे कोण मानतो ? आईसाठी देव हा प्रतिशब्द वापरण्यात काय अर्थ आहे? माता, जननी, जन्मदात्री, मा, अम्मा इ.पर्यायी शब्द आहेत ना!
खरे तर देव आहे असे तो मानतोच. त्या देवाचे गुणधर्म आपल्या आईत आहेत असे त्याला प्रतीत होते. त्याला आपली आई देवासमान वाटते.मग ती देवच आहे असे तो म्हणतो. म्हणजे आधी देव मानल्याशिवाय "आईला देव मानतो" असे म्हणणे निरर्थक ठरते.

'अनपेक्षित चांगलं नशीब'

नानांचं आत्मचरित्रातलं लेखन आवडलं. यातल्या एका वाक्यावरून श्रद्धा-देवविषयक कल्पना याबाबत चर्चा तितकीशी योग्य वाटत नाही. मात्र या (व अशाच इतर) निरीक्षणाने देवाच्या व्याख्यांमध्ये भर पडू शकते. मला वाटतं की 'अनपेक्षित चांगलं नशीब' यालाच 'देवाची कृपा' असं म्हणतात. किंबहुना देवाकडे प्रार्थना करणं, चमत्काराची अपेक्षा करणं यामागे अतीव कमी संभवतेच्या गोष्टी घडून याव्यात हीच इच्छा असते. किंवा दुसऱ्या शब्दात

Existence of favorable, low probability events is tantamount to existence of God.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सोपी युक्ती

आचार्य अत्र्यांनी एका कवितेत देशभक्त होण्याची सोपी युक्ती सांगितली आहे.

मना सज्जना चार आण्यात फक्त
जरी व्हावयाचे असे देशभक्त
तरी तूजला सांगतो युक्ती सोपी
खिशामाजि ठेवी सदा गांधीटोपी

याच धर्तीवर पुरोगामी विचारवंत व्हायची सोपी युक्ती सुचली आहे. खिशामध्ये प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाची एक यादी ठेवावी. त्या यादीतील एक एक व्यक्ती घेऊन त्याचे चरित्र, आत्मचरित्र वगैरे वाचावे. बिनमहत्त्वाचे तपशील सोडून द्यावेत. शुभ प्रसंगी "ईश्वरकृपेने झाले" किंवा अशुभप्रसंगी "ईश्वरेच्छा बलीयसी" असे किंवा या अर्थाचे काही म्हटल्याचे हटकून आढळेलच. लगेच त्यावर एक लेख लिहून "बघा किती अंधश्रद्ध हे लोक" असा लेख लिहावा. शंभरेक लोक असले तरी हा मसाला दोनेक वर्षे पुरेल.

आता या यादीमध्ये कोण असावे/ नसावे याबद्दल थोडक्यात.

१. व्यक्ती शक्यतो मृत असावी. जिवंत असल्यास उपक्रमावर लिहिणारी वा उपक्रम वाचणारी नाही याची खात्री करून मगच लिहावे. नाहीतर उगीच "मऊ माती" वगैरे वादाची धूळ उडून पुरोगामी लोकांमध्ये फूट पडते आणि मुख्य कार्य लांब जाते. अपवाद काही खोटे बोलणार्‍या प्रतिगामी उपक्रमींचा. त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले इथे चालते.

२. व्यक्ती शक्यतो ब्राह्मण असावी. शिवाजी महाराज किती धार्मिक होते, भवानीमातेने त्यांना तलवार दिली (हे कसे शक्य आहे?), साधू, फकीर यांच्या कृपेसाठी ते हातात तस्त धरून तासनतास कसे उभे राहत वगैरे विषय आणू नयेत.

३. महाराष्ट्रामधली किंबहुना भारतातली संपूर्णपणे आधुनिक अशी पहिली व्यक्ती म्हणजे गोपाळ गणेश आगरकर असे काही मूर्ख लोक* बडबडतात. (आगरकर कोकणस्थ ब्राह्मण असल्याने) त्याकडे दुर्लक्ष करून पहिली आधुनिक व्यक्ती आपणच आहोत हे लोकांच्या मनावर बिंबवावे.

४. सूत्ररूपाने सांगायचे तर कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी उदाहरण अब्राह्मण व्यक्तीचे द्यावे आणि वाईट गोष्टीसाठी ब्राह्मण व्यक्तीचे द्यावे

* य. दि. फडके

हा हा हा.

हा हा हा. प्रतिसाद आवडला. विनोद म्हणून ठीक, पण विरोध करू नका, मनातील जेवढे बाहेर येईल तेवढे चांगले, ब्राह्मणांनी बॅटिंग करावी, काही लोक बॉडीलाईन बॉलींग करतात म्हणून काय झाले, आपणहि ठोकत राहावे.

आणि हो, तर्कच करायचा झाला तर - विरोध ब्राह्मणांना नाही, तर मनुस्मृतीचे पालन करणाऱ्या कोणच्याही वर्णाला आहे, आज पालन कोणीच करत नाही पण एखाद्या वर्णाला जास्त बडवले जाते हा वर्षानुवर्षाचा राग असावा.

पाठभेद

"तरी सांगतो शेवटी युक्ति सोपी" असे वाचल्याचे स्मरते. उगीच गुलाबाच्या गुच्छात तूमचा झेंडू नको!
बाकी चालू द्या.

श्री.विनायक यांची युक्ती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.माटे यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे,"नानांच्या आईला. गिलच्यांनी धरून नेले.. नाना जीव लपवीत दक्षिणेचा मार्ग आक्रमित होते.ते शत्रूच्या हाती लागले नाहीत हा केवळ योगायोग..."
..पानिपतच्या युद्धात वाचलेली मराठी माणसे सुचेल त्या वाटेने गटागटाने दक्षिणेला निघाली.शत्रू पाठलागावर होताच...
....शत्रूची चाहूल लागताच नाना प्रसंगावधानाने गवतात शिरून दडले.इतरांची पळापळ झाली. शत्रूच्या हाती लागले ते मेले.
या प्रसंगाविषयी लिहिताना,"ईश्वरे तृणे करून रक्षण केले." असे नानांनी म्हटले आहे.
नानांना गवताच्या रूपाने देवाने वाचवले हे खरे मानले तर त्यांच्या आईला गिलच्यांच्या रूपाने देवाने पळविळले असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. (सैतानाची संकल्पना हिंदुधर्मात नाही.)
..भीषण अपघाताची बातमी येते.एकजण मुलाखतीत म्हणतो,"गाडीत आम्ही सगळे मिळून बारा जण होतो. त्यांतील अकरा मृत्यू पावले.एकटा मी वाचलो."
आता या एकाला देवाने वाचवले हे खरे तर इतर अकरांना देवानेच मारले असे म्हणणे भाग आहे ना?..
तेवढेच मी म्हटले.त्यात कोणतीही तर्कविसंगती नाही.हे कोणाही विचारी व्यक्तीला पटावे.पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करावा.म्हणजे श्री. विनायक यांचे प्रतिसाद लेखन किती निराधार, असंबद्ध अत एव पूर्वग्रहदूषित आहे हे लक्षात येईल.
कोणाही विषयी बोलताना/लिहिताना त्या व्यक्तीची जात माझ्या कधी मनातही येत नाही. कुणाला पटो वा न पटो हे सत्य आहे.

हा हा हा

अत्रे असते तर "माझ्या ताजमहालाला तुमची वीट लावू नका" म्हणाले असते.

विनायक

दुरुस्ती

माझा संगमरवर काढुन तुमचा कडप्पा लावु नका.--इति अत्रे

 
^ वर