स्वप्नवासवदत्तम्- लेखकपरिचय
संस्कृत नाटके म्हटली की तोंडात पहिले नाव येते ते कालिदासाचे. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटके पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावे माहित असतील.
मी स्वत: या सर्वांची नाटके वाचलेली नाहीत. मी कालिदासाची शाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम; विशाखदत्ताचं मुद्राराक्षस आणि भासाची प्रतिज्ञायौगन्धरायण, चारुदत्त, कर्णभार, स्वप्नवासवदत्तम अशी नाटके वाचली किंवा पाहिली आहेत. एक वाचक म्हणून मला सर्वाधिक आवडतो तो -भास’ म्हणूनच त्याने लिहिलेल्या माझ्या अत्यंत आवडत्या 'स्वप्नवासवदत्तम्' या नाटकाची माहिती करून द्यावी या उद्देशाने ही लेखमाला लिहिते आहे. (ही लेखमाला उपक्रमाच्या उद्दिष्टांशी विसंगत वाटल्यास संपादक मंडळाने उडवून टाकावी. )
नाटकाविषयी माहिती देण्यापूर्वी लेखकाचा म्हणजेच भासाचा थोडक्यात परिचय करून देते-
इतर नाटककारांप्रमाणेच भासाचीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. पण त्याच्या नाटकांतील काही संदर्भांवरून तो इसवीसन पूर्व ५व्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. सध्या उपलब्ध असलेली इतर संस्कृत नाटके भासाच्या नंतरच्या काळात लिहिली गेली असावीत असे म्हटले जाते. त्यामुळे उपलब्ध नाटकांच्या नाटककारांत भास अग्रस्थानी आहे.
त्याने एकूण १३ नाटके लिहिली असे मानले जाते. त्याच्या या १३ नाटकांना 'भासनाटकचक्र' म्हटले जाते. त्यांपैकी २ नाटके रामायणावर , ६ नाटके महाभारतावर, १ हरिवंशावर, २ लोककथांवर आधारित आहेत. आणि उरलेली २ नाटके उदयनकथेवर आधारित आहेत.
एक नाटककार म्हणून भासाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत-
त्याच्या नाटकांत 'वास्तवा'चं दर्शन घडते असे म्हणणे कदाचित पूर्णतया योग्य होणार नाही, पण एखाद्या घटनेवर त्याच्या एकेका पात्राच्या मनातली जी आंदोलने त्याने रेखाटलेली असतात ती खचितच वास्तविक असतात, खरी वाटतात. त्याच्या नाटकांतले 'नाट्य' दुहेरी असते. एक पात्रांच्या क्रियाप्रतिक्रियांतून घडणारे आणि ते घडायला कारणीभूत होणारे दुसरे, पात्रांच्या मनात घडणारे नाट्य!
भास त्याचे कुठलेही पात्र पूर्णत: काळ्या रंगात रंगवत नाही. त्याच्या प्रत्येक खलनायकी पात्रात कमी अधिक प्रमाणात दिसणारी grey ची छटा हे भासाचे दुसरे वैशिष्ट्य! त्याच्या कैकेयीच्या घरभेदी वागण्यामागेही एक तर्कसंगत कारण असते, त्याचा कंस वाईट वागत असतो तो नियतीमुळे.
त्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने त्याच्या नाटकांत केलेले वेगवेगळे प्रयोग. भास असा एकमेव संस्कृत नाटककार आहे, ज्याने शोकांतिका लिहिल्या. त्याने नाट्यधाराही लिहिल्या. त्याने पंचरात्र हे एक नाटक लिहून पूर्ण महाभारतच बदलून टाकले. अशी कित्येक वैशिष्ट्ये सांगता येतील. कित्येक वैशिष्ट्ये अजून लक्षात यायची असतील.
पुढील लेखांकात नाटकाचे कथानक!
Comments
उत्सुकता
भासाच्या परिचयाने उत्सुकता वाढवली आहे. पुढे लिहावे.
जमल्यास या प्रयोगांबद्दलही माहिती द्यावी.
आपलीही उत्सुकता वाढली.
माहिती आवडली.भासांच्या नाटकातील पात्रे कशी आहेत त्याची उत्सुकता आहे.(मला वाटले भवभूतीच वास्तवाचे चित्रण करणारा नाटककार होता.)
वा
फारच सुंदर. पुढचे लेख, भासाचे प्रयोग यासंबंधी वाचावयास आवडेल.
भासाच्या रामायणावरील नाटकात सीता हनुमानाला (?) सांगते की रावणाचा जीव त्याच्या डाव्यापायाच्या अंगठ्यात आहे. असे काहिसे कुठेतरी वाचलेले स्मरते. याशिवाय माझी भासाशी ओळख नाही.
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत,
-- लिखाळ.
सुरेख
सुंदर विषय आहे. भासाबद्दल फारशी माहिती नाही. यानिमित्ताने त्याची ओळख करून घ्यायला आवडेल.
हेच
हेच म्हणतो.
छान उपक्रम
राधिका,
छान उपक्रम. संस्कृत नाटकांबद्दल मला आवड वाटायला लागली ती 'किशोर'मुळे. लहान मुलांचे हे मासिक पूर्वी प्रसिद्ध् होत असे. त्यात ही नाटके गोष्टीरूपाने येत असत. त्यातले मुद्राराक्षस आणि स्वप्नवासवदत्तम् खूपच आवडली होती. पुन्हा एकदा ती वाचायला नक्कीच आवडेल.
- ओंकार.
किशोर
किशोरची आठवण करून देउन एकदम बालपणाकडे घेउन गेलात
किशोर अजूनही सुरु आहे का?
कल्पना नाही
बहुतेक बंद झाले असावे. कधीच कुणाकडे पाहिले नाही.
सुरेख उपक्रम
या चांगल्या उपक्रमाचे स्वागत आहे. स्वप्नवासवदत्तम् येथे बसून सहज वाचायला मिळणार याचा आनंद वाटतो. शुभेच्छा!
संस्कृत नाटक
ही लेखमाला वाचत असतानाच भासाचे मूळ संस्कृत नाटक त्याच्या
हिंदी भाषांतरासहीत येथे वाचायला मिळेल.
लई भारी!
आयच्यान! लई भारी!
भासशेठविषयी थोडक्यात परंतु नेटका परिचय करून दिला आहे, तो आम्हाला आवडला. आम्ही 'स्वप्नवासवदत्तम्' चे उपक्रमावर स्वागत करतो.
(ही लेखमाला उपक्रमाच्या उद्दिष्टांशी विसंगत वाटल्यास संपादक मंडळाने उडवून टाकावी. )
तुम्ही त्यात पडू नका हो. आम्ही आहोत ना इथे भांडायला बसलेले! ;)
बघू कोण काय करतो ते! तुमी लिवा बिनधास्त..;))
तात्या.
छान
लेखकपरिचय आवडला. कैकयीचा संवाद अभ्यासक्रमात होता असे आठवते.
भास.
बारावीला निरुपमा कुलकर्णी शिकवायच्या संस्कृत.त्यांनी भासावरच पी.एच.डी केली आहे.त्या खुपदा भासाविषयी भरभरुन बोलायच्या.शास्त्र शाखेला असले तरी मला फक्त हाच तास आवडायचा.त्यांनी भासाची माहिती सांगीतली होती,त्यामुळे भास समजुन वाचायची फार दिवसांपासुन इच्छा होती.ही लेखमाला वाचायला मिळाल्यामुळे काही प्रमाणात ती पुर्ण झाली.भासाच्या बाकीच्या नाटकांविषयी पण वाचायला आवडेल.