स्वप्नवासवदत्तम्- कथानक

भासाने उदयनकथेवर २ नाटके लिहिली. त्यापैकी पहिले 'प्रतिज्ञायौगंधरायण' आणि दुसरे 'स्वप्नवासवदत्तम'. 'प्रतिज्ञायौगंधरायण' जिथे संपते त्याच्या काही काळानंतर 'स्वप्नवासवदत्तम'चे कथानक उलगडते. त्यामुळे 'प्रतिज्ञायौगंधरायण' ची थोडी ओळख करून देणे गरजेचे आहे.

उदयन हा एक नवतरुण राजा आणि त्याला राज्यकारभारात सल्ला देऊन मदत करणारा त्याचा तीक्ष्णबुद्धी, अत्यंत विश्वासू असा अमात्य- यौगंधरायण यांच्याभोवती अख्खे कथानक फिरते. नाटकाचा नायक- उदयन म्हणजे मोठा शौकिन राजा. तो वीणावादनात व त्यायोगे रानटी हत्तींना भुलवून पकडण्यात प्रवीण असतो. त्याचा शत्रूराजा प्रद्योत महासेन उदयनाच्या याच गुणांचा गैरफायदा घेतो. अशाच हत्तींच्या शिकारीवर उदयन निघालेला असताना, महासेन कपटाने खोट्या हत्तीत सैनिक लपवून पाठवतो आणि त्याला पकडून आणून आपल्या कैदेत ठेवतो. तिथे त्याला प्रद्योत महासेनाची अत्यंत देखणी आणि स्वभावाने सुंदर अशी कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकवण्याची शिक्षा देण्यात येते. त्यादरम्यान दोघांचे एकमेकांवर प्रेम जडते. यौगंधरायण नाना क्लृप्त्या लढवून त्या दोघांना कैदेतून् सोडवून आणतो. येथे हे नाटक संपते.

तांत्रिकदृष्ट्या, ज्याला 'फलप्राप्ती' होते तो नाटकाचा नायक मानला जातो. त्या दृष्टीने उदयन हा या नाटकाचा नायक असला पाहिजे. कारण त्याला राज्य आणि वासवदत्ता अशी दुहेरी फलप्राप्ती होते. परंतू उदयन व वासवदत्ता संपूर्ण नाटकात एकदाही रंगमंचावर अवतरत नाहीत. फक्त त्यांच्याबद्दलच्या बातम्याच आपल्याला कळतात आणि रंगमंचावर जे नाट्य घडते ते म्हणजे यौगंधरायणाच्या क्लृप्त्या, त्यांना आलेलं अपयश, अखेर यश, मग त्याला झालेली अटक आणि मग सुटका अशा घडामोडी. त्या अर्थाने हे सगळं घडवून आणणारा यौगंधरायण हा या नाटकाचा नायक म्हणायला हवा.

त्यानंतर उदयन- वासवदत्ता यांचे लग्न होते. ते सुखाने नांदू लागतात. पण या सुखातच उदयन इतका गुरफटून जातो, की राज्यकारभाराकडे त्याचे दूर्लक्ष होते. जवळजवळ सगळेच राज्य शत्रूच्या ताब्यात जाते. उदयनाला परिस्थितीचे भान आणून त्याला समस्येवर उपाय शोधण्यासाठी प्रवृत्त करण्याकरता यौगंधरायण वासवदत्तेला विश्वासात घेऊन एक वेगळीच योजना आखतो व त्यातून निर्माण होते पुढचे नाट्य- 'स्वप्नवासवदत्तम्'!

या नाटकात मात्र उदयन, वासवदत्ता व यौगंधरायण ही तिनही पात्रे रंगमंचावर वावरतात व उदयन-वासवदत्ता हेच नाटकाचे खरे नायक-नायिका आहेत. अंकवार कथानक पुढीलप्रमाणे-

अंक पहिला- प्रेमातून बाहेर काढून राज्यकारभारात पुन्हा लक्ष घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचा अमात्य यौगंधरायण स्वत:च्या व वासवदत्तेच्या मृत्युचं नाटक करतो. ते दोघे वेषांतर करून अज्ञातवासात जातात. एका तपोवनात आले असता त्यांना मगधराजकन्या 'पद्मावती' भेटते. वासवदत्ता ही स्वत:ची 'प्रोषितभर्तृका' (जिचा नवरा परगावी गेला आहे अशी स्त्री) बहिण असून तिचा सांभाळ करण्याची विनंती यौगंधरायण पद्मावतीला करतो. ती मान्य झाल्यावर वासवदत्ता पद्मावतीच्या सखीपरिवारात सामिल होते.

अंक दुसरा व तिसरा- उदयन काही कामानिमित्त मगधदेशी गेला असता राजा दर्शक आपली बहिण पद्मावती हिच्यासाठी उदयनाला मागणी घालतो. उदयनाने होकार देताच लगेच त्याच दिवशी त्यांचे लग्न होते. त्यातच पद्मावतीची विवाहमाला गुंफण्याचे काम वासवदत्तेकडे आल्याने तिच्या दु:खात आणखीनच भर पडते.

हे २ अंक खूपच छोटे आहेत. शिवाय या अंकांतून ज्या घटनेबद्दल माहिती मिळते- म्हणजे उदयन- पद्मावती यांचं लग्न, ते प्रत्यक्षात रंगमंचावर घडतच नाही. याचे कारण म्हणजे वासवदत्तेच्या स्वगत/ प्रकट संवादांतून तिच्या मनोवस्थेचं खूप सुंदर चित्रण त्याला करायचे आहे.

अंक चौथा- उदयनाचे पद्मावतीशी लग्न झाल्यानंतर चौथा अंक सुरू होतो. पद्मावती वासवदत्ता व एका दासीसोबत फिरायला गेली असता उदयन वसंतकासोबत त्याच उद्यानात येतो. पण त्या तिघी त्या दोघांच्या नजरेस पडत नाहीत. त्या दोघांच्या गप्पांतून उदयनाला पद्मावतीविषयी आपुलकी जरी वाटत असली, तरीही त्याचे मन अजूनही वासवदत्तेतच अडकून राहिले आहे, हे वासवदत्तेला कळते व ती खूश होते.

अंक पाचवा- पद्मावतीला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे वृत्त समजताच उदयन आणि वासवदत्ता तिला भेटायला जातात. पद्मावती तेथे नसतेच व उदयन वासवदत्तेची भेट होते, पण एका वेगळ्याच प्रकारे- उदयन झोपी जातो व स्वप्नातल्या वासवदत्तेला प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्यक्षातली वासवदत्ता त्याच्या समोर उभी राहून त्याला उत्तरे देते. निघताना त्याच्या हाताला स्पर्श करण्याचे निमित्त होते व अर्धवट जागा झालेल्या उदयनाला वासवदत्ता जिवंत असल्याची खात्री पटते. इतक्यात उदयनाच्या शत्रुचा नायनाट होऊन उदयनाचे सर्व राज्य परत मिळाल्याची बातमी घेऊन कांचुकीय येतो.

अंक सहावा- इतक्यात वासवदत्तेच्या माहेराहून त्यांचा कांचुकीय वासवदत्तेची दाई- वसुंधरा हिच्यासोबत उदयनाला भेटायला येतो. ते आपल्यासोबत उदयन वा वासवदत्ता यांची हुबेहुब् २ चित्रे घेऊन येतात. ती चित्रे पाहून पद्मावती वासवदत्तेला ओळखते. इतक्यात ब्राह्मणवेषातला यौंगधरायण प्रवेश करतो व आपल्या बहिणीची मागणी करतो. नीट पाहिल्यावर वसुंधरा वासवदत्तेला ओळखते. लगेच यौगंधरायण आणि वासवदत्ता आपले खरे रूप प्रकट करतात, यौगंधरायण राजाला नेमके काय व कसे झाले ते समजावून सांगतो. पद्मावती व वासवदत्ता यांच्या मनात एकमेकींबद्दल प्रचंड आदर व प्रेम असल्याने त्या सवत म्हणून एकमेकींचा स्वीकार करतात.आणि भरतवाक्याने नाटकाचा शेवट होतो.

प्रत्येक अंकातील सर्व प्रसंग मी माझ्या इ-अनुदिनीवर अंकवार लिहिले आहेत. ते आपण http://pandharyavarachekale.wordpress.com/2007/04/19/svapna1/ येथपासून् पुढे वाचू शकता.

पुढच्या लेखात या नाटकातल्या मला आवडलेल्या काही सौंदर्यस्थळांविषयी माहिती.

आधी स्वप्नवासवदत्तम्- लेखकपरिचय | पुढे स्वप्नवासवदत्तम्- मला आवडलेले

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख!

राधिका, सुरेख उपक्रम.
लहानपणी आम्हाला "स्वप्नेद्रष्टा वासवदत्ता" का असा कायसा प्रयोग संस्कृतात अभ्यासाला होता. त्यात राजाला तिचा हात लागल्याने अंगावर रोमांच वैगेरे येतात असे अगदी रोमँटिक वर्णन होते.:):)

आमच्या संस्कृतच्या गुरुजींनी सगळेच नाटक या धड्याच्या निमित्ताने उलगडून सांगितले होते.
बाय द् वे "काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे" असे कोण म्हणाले होते भास की भवभूती ते सांगाल का?मला कुठेतरी संदर्भासाठी हवे आहे.
धन्यवाद्!
---मी

धन्यवाद/श्लोक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्या धड्याचे नाव 'स्वप्ने दृष्टा वासवदत्ता' असे होते. त्यात स्वप्नप्रसंगाचे वर्णन होते. तो प्रसंग माझ्या अनुदिनीवर वाचायला मिळेल

आपण उल्लेखिलेला श्लोक् भवभूती याचा असून तो पुढीलप्रमाणे-
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञा जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः|
उत्पत्स्यते मम कदापि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी||
- जे कोणी, माझी अवमानना, जगभर पसरवीत आहेत, त्यांना मी सांगतो की, माझे काव्य तुमच्यासाठी नाही. (या देशात/काळात माझे काव्य कुणास कळले नाही, तरी मला पूर्ण आशा आहे की,) माझा समानधर्मा केव्हातरी (व कोठेतरी) जन्माला येईलच येईल. कारण काळास अंत नाही व पृथ्वी अफाट आहे.
(संदर्भ- संस्कृत-मराठी सुभाषितकोश)

राधिका

छान!

छान! दोन्ही नाटकांची कथानके समजली. 'प्लॉट' मस्त आहे. कथानक कसे रंगवले असेल हे वाचण्याची उत्सुकता आहे.

अवांतर
१ - 'उदयन' हे काल्पनिक पात्र आहे का?
२ - "आणि भरतवाक्याने नाटकाचा शेवट होतो." हे वाक्य कोणते?

अवांतर

धन्यवाद. दोन्ही नाटकांची कथानके सविस्तर अनुदिनीवर दिली आहेत. परंतु उपक्रमाच्या उद्दिष्टांशी विसंगत ठरतील या भीतीपोटी ती येथे दिली नाहीत.

अवांतर-
१- उदयन हा एक इतिहासप्रसिद्ध राजा असून तो इ.स.पू. ६व्या शतकाच्या सुमारास होऊन गेला. कथासरित्सागर, बौद्ध व जैन कथावाङ्मयात उदयनाच्या कथा आढळतात. तसेच वरील दोन नाटकांखेरीज श्रीहर्षाची रत्नावली व प्रियदर्शिका, शक्तिभद्राचे उन्मादवासवदत्ता, अनंगहर्षाचे तापसवत्सराजचरित ही नाटकेही उदयनकथेवर आधारित आहेत.
(संदर्भः- अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास)

२- ज्याप्रमाणे प्रत्येक नाटकाची सुरुवात नांदीने होते, त्याचप्रमाणे शेवट हा भरतवाक्याने होतो. प्रत्येक नांदी व भरतवाक्य वेगवेगळे असते व मुख्य नाटकाप्रमाणेच नांदी व भरतवाक्यदेखिल नाटककाराची स्वतंत्र प्रतिभा असते. सर्वसाधारणपणे ती सर्वांचे कल्याण कर अशा स्वरुपाची प्रार्थना असते.
स्वप्नवासवदत्तम् चे भरतवाक्य-
इमां सागरपर्यन्तां हिमवद्विन्ध्यकुण्डलाम्|
महीमेकातपत्राङ्कां राजसिंहः प्रशास्तु नः||
-सागराची सीमा असलेल्या, हिमालय व विंध्य पर्वतांची कुंडले धारण करणार्‍या, एका छत्राखाली असलेल्या पृथ्वीचे आमचा सिंहासारखा राजा राज्य करो!

राधिका

धन्यवाद!

या माहितीबद्दल धन्यवाद! उदयनराजाबद्दल अधिक माहितीचा शोध घ्यावा लागेल. (भरतवाक्यात उल्लेखलेली 'पृथ्वी' म्हणजे 'भारत' देश असावा असे वाटले.)

संपूर्ण नाटक

संपूर्ण नाटक जालावर कुठे मिळेल का?

 
^ वर