देवाची व्याख्या

आंतरजालावरील चर्चांमध्ये असे कधी कधी दिसते की चर्चेत सहभागी सदस्यांमध्ये चर्चाविषयातील मूलभूत संज्ञांच्या व्याख्यांविषयीच एकमत नसते. चर्चा फिसकटण्यामागे हे एक महत्वाचे आणि टाळता येण्याजोगे कारण असते असे मला वाटते. हेवेदावे, जुने हिशोब, इ. कारणे टाळता येणार नाहीत/टाळू नयेत असेही वाटते.
त्या धाग्यांमध्ये व्याख्येची चर्चा केल्यास मूळ विषय बाजूला पडतो आणि अनेकांना तिरपे तिरपे प्रतिसाद नकोसे वाटत असल्यामुळे किंवा प्रति-प्रतिसादांचा संदर्भ लक्षात ठेवण्यासाठीचा वेळ नसल्यामुळे चर्चा अर्धवट राहतात.

एका सुपरिचित असलेल्या आणि अनेक चर्चांमध्ये मूलभूत अशा संज्ञेची येथील सदस्य कशी व्याख्या करतात हे जाणून घेण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे. मी त्या संकल्पनेसाठी देव, ईश्वर, परमेश्वर, भगवान, इ. कोणताही शब्द वापरण्यास तयार आहे. विष्णू, अल्ला, गॉड, ज्युपिटर, इ. विशेषनामेही चालतील. येथे अपेक्षित असे आहे की प्रत्येकाने

 1. वर्णन/व्याख्या सांगावी.
 2. ती व्याख्या समाजात अव्यक्तपणे वापरल्या जाणार्‍या अर्थांपैकी एखाद्या अर्थाशी सुसंगत आहे काय ते सांगावे.
 3. ती व्याख्यावस्तू तपासण्याजोगी आहे काय ते सांगावे.
  • जर संकल्पनेसाठी पुरावा सापडणे शक्य असेल तर किती सापडलेला आहे ते सांगावे.
 4. निष्कर्ष/टिपण्णी द्यावी. या संकल्पनेच्या इतर प्रचलित व्याख्यांविषयी काही महत्वाची टिपण्णी शक्य असल्यास करावी.

इतर काही संज्ञा महत्वाच्या वाटत असतील तर त्यांच्या व्याख्यांची चर्चा करण्यासाठीही हा धागा वापरता येईल.

मी सुरुवात करतो:

मी देत असलेली देवाची व्याख्या ही समाजात प्रचलित बहुतेक व्याख्यांतील समान भागाशी सुसंगत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.
देव या शब्दाची व्याख्या सांगण्याआधी मला विज्ञान, सजीवत्व आणि निर्णयस्वातंत्र्य/स्वेच्छा (फ्री विल) यांविषयी लिहावे लागेल.
परिस्थितीचे निरीक्षण करून 'क असेल तर ख असते' या प्रकारचे नियम शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान होय. त्यासाठी निरीक्षणे करून अभ्युपगम बनविले जातात. त्या अभ्युपगमाला खोटे ठरवू शकणारे प्रयोग जोवर फसतात तोवर त्याला सिद्धांत म्हटले जाते. हा सिद्धांत म्हणजे वस्तुस्थितीचे वर्णन करणारा नियम असतो. जेव्हा "'क'च्या सान्निध्यात कधीकधी 'ख' घडते आणि कधीकधी घडत नाही" असे निरीक्षण मिळते तेव्हा 'क'ला निर्णयस्वातंत्र्य असल्याचे म्हटले जाते. उलट, एखादी व्यक्ती रस्त्यात पडलेली प्रत्येक नोट उचलीत असेल तर तिचे वागणे नियत म्हणता येते. म्हणजे, सजीवत्व, स्वेच्छा, इ. गुणधर्म हे आभासी असून "विज्ञानाला अजून नियम सापडलेला नाही" असे सांगण्यासाठी वापरले जाणारे लघुरूप आहेत. हे गुणधर्म ही वर्णने नाहीत, तर वर्णननियमांच्या ज्ञानाचे अभाव आहेत. उदा., एका संख्येच्या चौपटीपेक्षा तिचा वर्ग 'चार'ने लहान असल्यास ती संख्या कोणती? या प्रश्नाचे उत्तर शोधताना सुरुवातीला आपण म्हणतो की ती संख्या 'ग' मानू आणि मग आपण लिहितो की ग-४ग+४=०. जेव्हा ती संख्या २ असल्याचे ज्ञान होते तेव्हा 'ग' नष्ट होतो. 'ग' हे त्या संख्येचे वर्णन नसते, २ हे त्या संख्येचे वर्णन असते.
परंतु, विज्ञानातील सारीच मते तात्पुरती असतात आणि नवी माहिती मिळाल्यावर यदृच्छेमागचे नियम सापडू शकतात. उदा., भाकित करण्याची विज्ञानाची कुवत वाढली की 'लहरी हवामान' सुद्धा नियत असल्याचे सिद्ध होते. विज्ञान ही एक अव्याहत प्रक्रिया असून, "या घटनांमागचा नियम आम्हाला सापडत नसल्यामुळे त्यामागे वास्तव प्रकारचे सजीवत्व असल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत" असे विधान कधीच केले जाणार नाही. गेलाबाजार, निरीक्षणांची यादी ही नेहमीच सांत असते. त्यामुळे, 'च', 'छ', 'ज', आणि 'झ' या निरीक्षणांमागील नियम सापडला नाही तरीही "'च' घडते, 'छ' घडते, 'ज' घडते', आणि 'झ' घडते" असे चार ऍड-हॉक 'नियम' जाहीर करणे शक्य असतेच. त्यामुळे, सजीवत्वाला विज्ञानात कधीही स्थान मिळणार नाही.
'देव' या संकल्पनेची व्याख्या मी पुढीलप्रमाणे करतो. 'देव' विश्वाच्या निर्मितीस कारण आहे. येथे 'कारण' हा शब्द "'क' असेल तर 'ख' असते" असा 'कोरिलेशन' या अर्थाने नसून 'निर्णय' या अर्थाने वापरणे आवश्यक आहे. 'निर्णय घेणे' हे अपरिहार्यतेपेक्षा वेगळे असते. "देव अस्तित्वात होता आणि विश्व निर्माण करण्याशिवाय त्याला पर्यायच नव्हता" असे देव या संकल्पनेत मान्य नाही. या विश्वाचे 'नियम' बदलण्याची कुवत देवाकडे आहे. परंतु, "नियम बदलण्यासाठी प्रार्थना केली की ती ऐकलीच पाहिजे" या नियमाने देव बद्ध नाही, कुवत कधी वापरावी आणि कधी नाही याचे निर्णय घेण्यास देव सक्षम आहे. "देवालाही उचलता येणार नाही इतका जड दगड बनविणे", "चार बाजूवाला त्रिकोण आखणे", इ. कामे देव करू शकत नाही (परंतु तसा इतरांचा आभास तो करून देऊ शकतो).
ही व्याख्या तपासण्याजोगी नाही याची दोन वेगवेगळी कारणे आहेत.

 1. "निर्णयक्षमता ही आभासी नसल्याचा निष्कर्ष मर्यादित निरीक्षणांमधून शक्य नसतो" या आधी केलेल्या विवेचनानुसार देव ही संकल्पना व्याख्येनुसारच अशक्य आहे. 'व्याख्येनुसारच अशक्य' संकल्पनांचे अस्तित्व कोणत्याही नव्या माहितीने, प्रायोगिक निष्कर्षांनी सिद्ध करता येत नाही.
 2. प्रार्थनेवर कृती करण्याची देवावर सक्ती नाही. त्यामुळे, या व्याख्येनुसार "देव अस्तित्वात आहे" असा अभ्युपगम लिहिला तर त्याला खोटा ठरवू शकणारा प्रयोगच शक्य होणार नाही. "प्रार्थनेला फल मिळाले नाही" असा निष्कर्ष सापडेल तेव्हा "देवाने प्रार्थनेला दाद न देण्याचे ठरविले होते" असा बचाव शक्य आहे.

निष्कर्षः (डोंगर पोखरून उंदीर?)
व्याख्या तपासण्याजोगी नसल्यामुळे देव ही संकल्पना अवैज्ञानिक आहे. "प्रार्थनेनुसार कृती करणारे यंत्र" ही व्याख्या तपासण्याजोगी आहे आणि परंतु तिच्या समर्थनार्थ काहीही पुरावा सापडलेला नसल्यामुळे ऑकॅमच्या नियमानुसार ती तात्पुरती नाकारावी लागते. "ज्यांची प्रार्थना करू नये, प्रार्थनेवर कृती करण्याची क्षमता ज्यांच्याकडे नाही, असे विश्वाचे नियंते 'सजीव' 'नियम'" ही स्पिनोझाचा देव नावाची संकल्पना मला निरर्थक आणि निरुपयोगी वाटते, पँथेईजमला डॉकिन्सने sexed-up atheism असेच संबोधिले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

फरक

>>पण अणु-रेणूही मूर्तच आहेत की!
तुमच्या भाषेला चैतन्यासाठी समानार्थी शब्द नाही. जाणकारांना माहित असेल तर कळवावा.

>>डिटर्मिनिजम आणि केऑस यांच्यातील फरकच असा की केऑस रँडम भासतो. संचितही सरळसरळ जोडता येत नसेल तर "जाणतेपणे/जाणीवपूर्वक घडणाऱ्या प्रत्येक वाईट कर्माची शिक्षा मिळेल ह्याची हमी" कशी मिळेल? यदृच्छा असेल तर अशी हमी देता येणार नाही
सरळ सरळ जोडता येणार नाही ह्या माझ्या विधानाचा अर्थ असा होता कि सामान्य 'डोळ्यांना' १+१=२ असे दिसणार नाही जसे फुलपाखरू परिणाम दिसत नाही, जाणवू शकतो किवा तर्क लावता येतो. हमी आहेच.

>>असे मानण्यास काय पुरावा आहे? लोक स्वतःच्या तोट्याच्या अनेक कृती करतात त्यांपैकीच ती एक असू शकते की!
तुमच्या/तुम्ही व्य्ख्या सांगितलेल्या श्रद्धेचे एखादे उदाहरण द्या, मग सोपे जाईल.

ठीक

तुमच्या भाषेला चैतन्यासाठी समानार्थी शब्द नाही.

अरेरे.

सरळ सरळ जोडता येणार नाही ह्या माझ्या विधानाचा अर्थ असा होता कि सामान्य 'डोळ्यांना' १+१=२ असे दिसणार नाही जसे फुलपाखरू परिणाम दिसत नाही, जाणवू शकतो किवा तर्क लावता येतो. हमी आहेच.

फुलपाखरू परिणाम म्हणजे एकदा पंख फडफडविले की पाऊस पडणे, पुन्हा पंख फडफडविले की दुष्काळ, असा काहीही अनागोंदी अनुभव. "पाप केले की पुढच्या जन्मात शिक्षा" अशी हमी असेल तर तिला केऑस म्हणू नये. असा 'संबंध' प्रयोगाने तपासता आला पाहिजे ही आमची मागणी आहे.

तुमच्या/तुम्ही व्य्ख्या सांगितलेल्या श्रद्धेचे एखादे उदाहरण द्या, मग सोपे जाईल.

"मृत्यूनंतर आपल्याला काहीतरी अस्तित्व असते, त्याला पुनर्जन्म मिळतो आणि संचिताचा हिशोबही केला जातो" हे श्रद्धेचे उदाहरण, तर "नवस केल्याने इच्छा पूर्ण होतात" हे अंधश्रद्धेचे उदाहरण आहे.

नाहि.

>>अरेरे
खरच अरेरे!!!

>>फुलपाखरू परिणाम म्हणजे एकदा पंख फडफडविले की पाऊस पडणे, पुन्हा पंख फडफडविले की दुष्काळ, असा काहीही अनागोंदी अनुभव. "पाप केले की पुढच्या जन्मात शिक्षा" अशी हमी असेल तर तिला केऑस म्हणू नये. असा 'संबंध' प्रयोगाने तपासता आला पाहिजे ही आमची मागणी आहे.
मी क्रियमाण/संचित/प्रारब्ध हे शब्द वापरले, त्यामध्ये कर्माची शिक्षा हि जीवाला मिळते, मग तो जीव दुसरे शरीर धारण करू नाही तर तिसरे शरीर धारण करू देत. timeline हि जीवासाठी आहे, शरीर हे फक्त माध्यम आहे.
आणि संबंध तपासता येतो, तुमच्या विज्ञानात तपासण्याची सोय आहे, नसल्यास तर्क मांडून ठेवता येतो. तशी सोय "आज" 'आमच्या' इथे नाही, म्हणून आम्ही देखील तर्क मांडून त्या तर्कावर श्रद्धा ठेवून, तर्क कसा सिद्ध करता येईल ह्यासाठी प्रयत्न करीत आहोत. बाकी ते फुलपाखरू कधी पंख फडफडवते, आणि पाउस कधी पडतो ह्याचे गणित एकदम डोळ्याला दिसेल असे आहे वाटते?

>>"मृत्यूनंतर आपल्याला काहीतरी अस्तित्व असते, त्याला पुनर्जन्म मिळतो आणि संचिताचा हिशोबही केला जातो"
ह्या श्रद्धेपोटी काय करता? संचित निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करता कि नुसतीच श्रद्धा आहे नावाला?

खुलासा

मी क्रियमाण/संचित/प्रारब्ध हे शब्द वापरले, त्यामध्ये कर्माची शिक्षा हि जीवाला मिळते, मग तो जीव दुसरे शरीर धारण करू नाही तर तिसरे शरीर धारण करू देत. timeline हि जीवासाठी आहे, शरीर हे फक्त माध्यम आहे.
आणि संबंध तपासता येतो, तुमच्या विज्ञानात तपासण्याची सोय आहे, नसल्यास तर्क मांडून ठेवता येतो. तशी सोय "आज" 'आमच्या' इथे नाही, म्हणून आम्ही देखील तर्क मांडून त्या तर्कावर श्रद्धा ठेवून, तर्क कसा सिद्ध करता येईल ह्यासाठी प्रयत्न करीत आहोत.

तुमच्या तर्काच्या पायर्‍या जाणून घेणे हाच तर उद्देश आहे!

बाकी ते फुलपाखरू कधी पंख फडफडवते, आणि पाउस कधी पडतो ह्याचे गणित एकदम डोळ्याला दिसेल असे आहे वाटते?

नाही नां! म्हणून तर त्याला केऑस म्हणतात, त्यामागचे गणित सापडले की त्याला डिटर्मिनिजमच म्हटले जाईल.

ह्या श्रद्धेपोटी काय करता? संचित निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करता कि नुसतीच श्रद्धा आहे नावाला?

माझी नाही, समाजात अस्तित्वात श्रद्धेचे एक उदाहरण दिले.

फरक?

>>तुमच्या तर्काच्या पायर्‍या जाणून घेणे हाच तर उद्देश आहे!
तेच सांगत होतो, मूर्त/अमूर्त/ध्येय/क्रियमाण/संचित/प्रारब्ध हे सगळे त्याचेच पैलू आहेत, ते पटत असेल तर तो मार्ग सापडला असेच होईल. सिद्ध करून दाखवता येणे शक्य नाही, तर्क सांगितला.

>>नाही नां! म्हणून तर त्याला केऑस म्हणतात, त्यामागचे गणित सापडले की त्याला डिटर्मिनिजमच म्हटले जाईल
तेच...मग केऑस स्वीकारताना डोळ्याला दिसत नसून देखील, मग आमचा तर्क केऑस म्हणून स्वीकारा, आम्हाला तसे देखील चालेल.

>>माझी नाही, समाजात अस्तित्वात श्रद्धेचे एक उदाहरण दिले.
माझे उदाहरण देखील समाजातील एक असेच होते. माझा मुद्दा कायम राहतो.

नाही

तेच सांगत होतो, मूर्त/अमूर्त/ध्येय/क्रियमाण/संचित/प्रारब्ध हे सगळे त्याचेच पैलू आहेत, ते पटत असेल तर तो मार्ग सापडला असेच होईल. सिद्ध करून दाखवता येणे शक्य नाही, तर्क सांगितला.

तुमची तर्काचीही व्याख्या वेगळीच दिसते. तर्क म्हणजे केवळ अनुमान नव्हे!

तेच...मग केऑस स्वीकारताना डोळ्याला दिसत नसून देखील, मग आमचा तर्क केऑस म्हणून स्वीकारा, आम्हाला तसे देखील चालेल.

मुळात फुलपाखराची गोष्ट तरी कोठे स्वीकारली आहे? ती गंमत आहे, विज्ञान नव्हे. केऑसमागचे गणित सापडते तेव्हाच त्याला भाव मिळतो.

माझे उदाहरण देखील समाजातील एक असेच होते. माझा मुद्दा कायम राहतो.

म्हंजे तुम्ही स्वतः पुनर्जन्म, संचित मानत नाही? केवळ 'डेविल्स' ऍडवोकसी करीत आहात काय?

गणित

>>तुमची तर्काचीही व्याख्या वेगळीच दिसते. तर्क म्हणजे केवळ अनुमान नव्हे!
मी आत्तापर्यंत जो काही उहापोह केला त्यामध्ये तर्क/श्रद्धा/अनुमान/विज्ञान हे सगळेच पैलू आहेत, आपण काहीच मान्य करायला तयार नाही हे स्पष्ट आहे, आणि तुमचे समाधान करणे हे माझे ध्येय नाही सो आपल्याला माझे काही मुद्दे पटले असल्यास तसे सांगावे मग आपण त्यावर चर्चा करू शकू.

>>मुळात फुलपाखराची गोष्ट तरी कोठे स्वीकारली आहे? ती गंमत आहे, विज्ञान नव्हे. केऑसमागचे गणित सापडते तेव्हाच त्याला भाव मिळतो
अच्छा आपण ते देखील स्वीकारले नाही तर! :) गमंतच आहे. 'केऑसमागे गणित आहे', हे मान्य करून ते शोधायचा तर प्रयत्न करता ना?

>>म्हंजे तुम्ही स्वतः पुनर्जन्म, संचित मानत नाही? केवळ 'डेविल्स' ऍडवोकसी करीत आहात काय?
अहो तुमच्या मानण्याबद्दल बोलत आहोत, तुमचे आणि माझे उदाहरण एकच आहे हे सांगितले मी. तुम्ही संचित असते असे सांगितले, तसेच मी देव आपल्या कार्यात मदत करील हि संकल्पना सांगितली. ह्या 'अधारांसाठी' लोक तर्क न लावता अमुक एक गोष्ट करतात त्याला श्रद्धा असे म्हणू शकतो. हे मान्य का? असेल तर मग आपण 'डेविल्स' ऍडवोकसी बद्दल बोलू.

नाही

तुमचे समाधान करणे हे माझे ध्येय नाही

ठीक.

'केऑसमागे गणित आहे', हे मान्य करून ते शोधायचा तर प्रयत्न करता ना?

होय. म्हणूनच, "या घटनांमागचा नियम आम्हाला सापडत नसल्यामुळे त्यामागे वास्तव प्रकारचे सजीवत्व असल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत" असे विधान कधीच केले जाणार नाही. असे मूळ चर्चाप्रस्तावात दिलेले आहे.

अहो तुमच्या मानण्याबद्दल बोलत आहोत, तुमचे आणि माझे उदाहरण एकच आहे हे सांगितले मी. तुम्ही संचित असते असे सांगितले, तसेच मी देव आपल्या कार्यात मदत करील हि संकल्पना सांगितली. ह्या 'अधारांसाठी' लोक तर्क न लावता अमुक एक गोष्ट करतात त्याला श्रद्धा असे म्हणू शकतो. हे मान्य का? असेल तर मग आपण 'डेविल्स' ऍडवोकसी बद्दल बोलू.

"मृत्यूनंतर आपल्याला काहीतरी अस्तित्व असते, त्याला पुनर्जन्म मिळतो आणि संचिताचा हिशोबही केला जातो" हे विधान मी 'समाजातील एक श्रद्धा' म्हणून सांगितलेले आहे, 'संचित असते' हे माझे मत नाही. "श्रद्धा म्हणजे तर्क न लावणे" ही व्याख्या कदाचित चालू शकेल. श्रद्धेलाही मी विरोधच करतो.

ठीक

>>होय. म्हणूनच, "या घटनांमागचा नियम आम्हाला सापडत नसल्यामुळे त्यामागे वास्तव प्रकारचे सजीवत्व असल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत" असे विधान कधीच केले जाणार नाही. असे मूळ चर्चाप्रस्तावात दिलेले आहे.

ठीक.

>>"श्रद्धा म्हणजे तर्क न लावणे" ही व्याख्या कदाचित चालू शकेल. श्रद्धेलाही मी विरोधच करतो.

नकारात्मक व्याख्या नसते पण तर्काच्या भाषेत तुम्ही केलेली ठीक आहे.

:)

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अहो मनाचा थांग कुठे तुमच्या तर्काला लागणार, इथे तुमचे विज्ञान अजून शोध करतच आहे कि, माणूस अमुक एक घटना घडली तर तमुक असेच वागणार. मग शक्यता शास्त्राचा तुम्ही हात धरणार, तसे पाहता तुमच्याच विज्ञानाच्या व्याखेनुसार शक्यता हे देखील शास्त्र होऊ शकत नाही पण तो मुद्दा दुसर्या चर्चेसाठी, इथे अवांतर नको.

या विषयावरील चर्चा या धाग्यात अवांतर ठरणार नाही. किंबहुना, हाच एक मुख्य मुद्दा आहे आणि त्याचाच प्रतिवाद चर्चाप्रस्तावात केलेला आहे.

श्री रिकामटेकडे, ह्या धाग्यांचा उपयोग देव/धर्म ह्या व्याख्या बेसलाईन करण्यासाठी करत आहेत का? जेणेकरून पुढील चर्चांमध्ये इथले दुवे देता येतील :)

होय. शिवाय, अज्ञेयवादाला विरोध करणे हाही एक उद्देश आहे.

शक्यता शास्त्र

>>या विषयावरील चर्चा या धाग्यात अवांतर ठरणार नाही. किंबहुना, हाच एक मुख्य मुद्दा आहे आणि त्याचाच प्रतिवाद चर्चाप्रस्तावात केलेला आहे

मी शक्यता शास्त्रा बद्दल बोलत होतो, किवा तर्क आणि मानसिकता हे देखील थोडे अवांतर ठरेल असे मला वाटले.

:)

आधीच्या पानावरील राडा बघता काहीही अवांतर ठरणार नाही.

तशी सगळी बोंबच आहे.

:) हा हा. हो तेही आहेच, हे लोक नेहमीच होळी खेळतात (बोंब मारतात ती).

धन्यवाद

अरे हो. लेख(न) उत्तम आहे हे सांगण्यास विसरलो. आणि हा मुद्दा चर्चेस मांडण्यासाठी देखील धन्यवाद.

व्याख्या

देव माणुस नक्किच् नाहि. तो एखादी घटनासुदधा असु शकतो. त्यामुळे माणसाच्या निती अनितीच्या कल्पना त्याला आपण लावु शकत नाहि. त्यामुळे हे जग् निर्माण करण्यामगचे त्याचे उद्देश आपल्याला कसे समजणार्?

--(पाहुणी )सुवर्णा

?

देव माणुस नक्किच् नाहि. तो एखादी घटनासुदधा असु शकतो.

"देवही नियमबद्ध आहे" असा या विधानांचा अर्थ आहे काय?

त्यामुळे माणसाच्या निती अनितीच्या कल्पना त्याला आपण लावु शकत नाहि.

चर्चाप्रस्तावात नीती-अनीतीविषयी काहीही उल्लेख नाही.

त्यामुळे हे जग् निर्माण करण्यामगचे त्याचे उद्देश आपल्याला कसे समजणार्?

देवाच्या उद्देशाविषयीही चर्चाप्रस्तावात काही उल्लेख नाही.

?? आनंद

>>"देवही नियमबद्ध आहे" असा या विधानांचा अर्थ आहे काय?
असुही शकतो. जर घटना नियमबद्ध असतील तर..... मला बिग बॅन्ग म्हणायच होतं.

>> चर्चाप्रस्तावात नीती-अनीतीविषयी काहीही उल्लेख नाही.
प्रार्थनेला प्रतिसाद् देणे हि निती नाही का??

>>देवाच्या उद्देशाविषयीही चर्चाप्रस्तावात काही उल्लेख नाही.
व्याख्या द्यायला त्याचा उद्देश आधी महिती नको का ?? देव निर्माण व्हायचा उद्देश.

खुलासा

असुही शकतो. जर घटना नियमबद्ध असतील तर..... मला बिग बॅन्ग म्हणायच होतं.

म्हंजे बिग ब्यांगला दुसरे नाव देव का? ठीक आहे.

प्रार्थनेला प्रतिसाद् देणे हि निती नाही का??

होय, पण त्याने प्रतिसाद देणे योग्य/अयोग्य इ. वर माझी काहीही अपेक्षा मी सांगितलेली नाही. मानवांना जे कृत्य नीतीमत्तेचे वाटते तेच त्यालाही वाटावे इ. माझी अपेक्षा नाही.

व्याख्या द्यायला त्याचा उद्देश आधी महिती नको का ?? देव निर्माण व्हायचा उद्देश.

 1. देव निर्माण झाला अशी व्याख्या असेल तर त्यात देवाच्या निर्मात्याचा उद्देश असू शकतो, त्याला देवाचा उद्देश म्हणू नये.
 2. देवनिर्मात्याचा उद्देश अज्ञात असतानाही देवाचे वर्णन करता येते. ऍटमबाँब का बनविला गेला ते माहिती नसेल तेव्हाही ऍटमबाँब म्हणजे काय ते वर्णन सांगता येते.

घेव

>>देव निर्माण झाला अशी व्याख्या असेल तर त्यात देवाच्या निर्मात्याचा उद्देश असू शकतो, त्याला देवाचा उद्देश म्हणू नये.
>>देवनिर्मात्याचा उद्देश अज्ञात असतानाही देवाचे वर्णन करता येते. ऍटमबाँब का बनविला गेला ते माहिती नसेल तेव्हाही ऍटमबाँब म्हणजे काय ते वर्णन सांगता येते.

ओके ओके. ठिक आहे.
देव ---आपल्याला दिसतय् ते जग चांगल्या प्रकारे चालण्यासठि वेगवेगळ्या चाली (बुद्धिबळात असतात तश्या) खेळणारा "एक" ; तोच तो देव!!
हि व्याख्या.

ठीक

 1. जगात वाईट का घडते? सैतानही देवासारखाच चांगला खेळाडू आहे काय?
 2. मूळ प्रस्तावातील दुसर्‍या अपेक्षेनुसार, "देवाची ही व्याख्या तपासता येण्याजोगी आहे काय?" तेही कृपया सांगा.

मे बी

>>जगात वाईट का घडते? सैतानही देवासारखाच चांगला खेळाडू आहे काय?
असु शकतो.

>>मूळ प्रस्तावातील दुसर्‍या अपेक्षेनुसार, "देवाची ही व्याख्या तपासता येण्याजोगी आहे काय?" तेही कृपया सांगा.
अर्थातच्.

चर्चाशुचिता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
चर्चेत भाग घेताना काही पथ्ये पाळावी असे मला वाटते.वादविवाद तर्कसंगत असावा.आपले मत पटवून देताना तर्कशुद्ध युक्तिवाद करावा.भूमितील प्रमेयाची सिद्धता लिहितात त्याप्रमाणे :ज्याअर्थी असे म्हणून तसे.त्यावरून हा निष्कर्ष..असे सर्व लॉजिकल असावे.चर्चाविषयापासून फार दूरवर भटकू नये.म्हणजे मूळ मुद्द्याला धरून लिहावे.तसेच विवादविनय/चर्चाशुचिता(डिसेन्सी ऑफ डिस्कशन) असणे आवश्यक वाटते.वैयक्तिक पातळीवर घसरू नये. विरोध /निषेध विचारंचा करावा.व्यक्तीचा नव्हे.

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते

'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते'

देवाची व्याख्या - एक प्रयत्न :

This comment has been moved here.

श्रद्धा-अंधश्रद्धा हा मुख्य मुद्दा!

This comment has been moved here.

ऍटमबाँब का बनविला गेला ते माहिती नसेल तेव्हाही???कस् काय् बोवा??

या धग्याचे मला पुनरावलोकन करावेसे वाटले व त्यातुन् पुढिल गोष्टी माझ्या लक्षात आल्या-------

रिटे@देव निर्माण झाला अशी व्याख्या असेल तर त्यात देवाच्या निर्मात्याचा उद्देश असू शकतो, त्याला देवाचा उद्देश म्हणू नये.
निर्मात्याने ज्या कामासाठी (देवाचा उद्देश जो त्याच्या निर्मात्याच्या मनात् होता) देव निर्मान केला तोच जर देवाचा उद्देश नसेल तर त्याला (देव जो निर्मात्याने निर्मान केला व जो त्याच्या मनातिल मुख्य उद्देश मानत् नाहि) देव म्हणता येणार नाही.
रिते@देवनिर्मात्याचा उद्देश अज्ञात असतानाही देवाचे वर्णन करता येते. ऍटमबाँब का बनविला गेला ते माहिती नसेल तेव्हाही ऍटमबाँब म्हणजे काय ते वर्णन सांगता येते.
फक्त वरवरचे वर्णन् म्हणजे तो कसा तयार झाला तो कुठे कुठे अढळतो कशाचा बनलेला आहे वगैरे वगैरे याला मझ्या लेखी काहिहि महत्त्व नाही जोपर्यंत त्याचे या जगातील उद्देश (त्याचे कार्य) कळत नाही.
उद्देश वर्नन केल्याशिवाय् केलेले वर्णन् मी अर्धवट् मानते.
________________________________
आणि सैतान म्हणजे मी तुम्ही हा तो ते आपण सगळेच्..... ;)
______________________________________
स्पे. मि. चु. भु. द्या. घ्या.

 
^ वर