शेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न
शेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत. मला स्वतःला या मालिकांमधील ब्रेटने साकारलेले पात्र आवडलेले असले तरी वॉटसन थोडासा बेंगरूळ वाटला. (गाय रिचीच्या चित्रपटातील ज्यूड लॉने साकारलेला वॉटसन उत्तम होता हे माझे वैयक्तिक मत.) मात्र चर्चाप्रस्तावाचा मूळ हेतू हा नाही. होम्सकथांचे इथवर जाणवलेले वैशिष्ट्य असे की स्वतः होम्स हा कोणत्याही पेचप्रसंगामध्ये न्यायनिवाडा करण्याची भूमिका घेत नाही. प्रोफेसर मॉरिआर्टी किंवा तत्सम स्वतःच्या जीवावर बेतणारे प्रसंग वगळल्यास होम्स कधी कोणाला शिक्षाही करत नाही.
मात्र आतापर्यंतच्या कथाप्रवासात ठसठशीतपणे जाणवणारा एक अपवाद म्हणजे ऍबी ग्रांज (उच्चार समजून घ्या).
या कथेच्या उत्तरार्धात होम्सने स्वतः न्यायनिवाडा करण्याची भूमिका घेतली आहे. पतीशी प्रतारणा करणारी स्त्री व तिचा प्रियकर यांना कोणतीही शिक्षा होऊ नये या कारणास्तव स्वतःच्या नजरेतून काही बंधनकारक अटी घालून त्यांना कोणत्याही खटल्यात अडकावे लागणार नाही अशी व्यवस्था होम्स करतो.
शेरलॉकचा मोठा भाऊ मायक्रॉफ्टच्या मते होम्सचा स्त्रीविषयक दृष्टीकोण थोडा विचित्र आहे. त्यामुळे ह्या कथेची वीण थोडीशी विसविशीत वाटली. होम्सने घेतलेली भूमिका न्याय्य व नैतिक वाटते का? उपक्रमींचे मत यावर जाणून घ्यायला आवडेल.
Comments
ब्रिटिश कायदा
भारतीय न्यायव्यवस्था ही बर्यापैकी ब्रिटिश व्यवस्थेवर आधारित असल्याने, आपण त्या दृष्टीने विचार करू शकतो. ऍबी ग्रांज मधील गुन्हेगार व त्याला सामील असलेली मेरी यांनी शरणागती पत्कारून गुन्ह्याची कबुली दिली असती तर; स्वसंरक्षणार्थ झालेली मनुष्यहत्या म्हणून त्यांना सहानुभूती/चांगली पार्श्वभूमी/नो क्रिमिनल रेकॉर्ड या सर्वांचा विचार करून कमी शिक्षा मिळाली असती.
अवांतरः डॉयल यांचे लेखन इतके सुंदर आहे की माहिती असूनही होम्स ही खरी व्यक्ती असावी, असा कल्पनाविलास करायचा मोह आवरत नाही.
||वाछितो विजयी होईबा||
स्वसंरक्षणार्थ?
दुसऱ्या माणसाच्या घरात घुसून त्याच्या बायकोशी प्रेमालाप करणाऱ्याशी त्या बाईच्या नवऱ्याने कसे वागणे अपेक्षित होते? उलट त्या बाईच्या नवऱ्याने स्वसंरक्षणार्थ त्या माणसावर हल्ला केला असे म्हणता येईल. त्यामुळे आरोपींच्या बाजून स्वसंरक्षणाचा मुद्दा येथे उपस्थित होणे पटत नाही.
डॉयल यांच्या लेखनाबाबत सहमत
सहमत. डॉयल यांच्या द लॉस्ट वर्ल्ड (उच्चार वाचक्नवींना विचारावा) या पुस्तकावर आधारित एक सुरेख डॉक्युमेंट्री डिस्कवरीने काढलेली आहे. तीही अवश्य पाहा.
भूमिका
होम्सची भूमिका थोडी वेगळी आहे. एक तर स्कॉटलंड यार्ड आणि त्याचे नाते जरा नाजुकच आहे. ते कधीही त्याला पूर्ण श्रेय देत नाहीत. मग त्याचे म्हणणे, की मी त्यांना न मागता मदत का करावी?
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
तुम्हाला होम्स कळला नाही अशी शंका येते.
होम्सच्या पात्राचे अधोरेखित करावेसे वाटणारे वैशिष्ट्य म्हणजे तो कामाबाबत ऑब्सेसिव आहे. (काम नसल्यास त्याला ०.७ टक्के कोकेनचा सहारा घ्यावा लागतो.) वॉटसनही एकदा असे म्हणतो की वर्क इटसेल्फ इज हिज ओन रिवार्ड. थोडक्यात लीस्ट्रेड किंवा इतर इनिस्पेक्टर लोकांनी श्रेय घेतले तरी होम्सला त्याचे वाईट वाटत नाही. त्यामुळे स्कॉटलंड यार्डने मदत मागितली नाही तरी होम्स लुडबूड करणारच.
;)
शंका कशाला? डायरेक्ट निर्णयच देऊन टाकावा. :)
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
माफी
भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो.
गरज नाही
मी लॉग इन करण्याआधी भावना बाजूला ठेवून येतो.
माझा प्रतिसाद ब्लू कारबंकलच्या शेवटी होम्स जे म्हणतो त्यावर आधारलेला होता. तिथेही होम्स स्वतः निर्णय घेऊन चोराला सोडून देतो.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
चांगला चर्चाप्रस्ताव
होम्सशी मराठी अनुवादातून परिचय झाला आहे. तीनचार इंग्रजी कथा मुळातून वाचल्या आहेत. यानिमित्ताने अधिक माहिती होईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नैतिकता
आपल्या प्रतिसादावरून आपण मूळ कथा वाचलेली आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे होम्सने इतरही काही मोजक्या कथांमध्ये अशी भूमिका केलेली आहे (चू भू द्या घ्या). त्यासंबंधात विचारल्यावर 'मी पोलिस नाही, तेव्हा गुन्हेगाराला पकडून देण्यास मी बांधिल नाही' अशा अर्थाचे काहीतरी उत्तर त्याने दिल्याचे अंधूक स्मरते.
ऍबी ग्रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, आपण म्हटले आहे, त्याप्रमाणे मृताची पत्नी त्याच्याशी प्रतारणा करत होती, हे मला पटत नाही. तिच्या विवाहापूर्वीच तिची क्रोकरशी ओळख झालेली होती. परंतू क्रोकरच्या जबानीवर विश्वास ठेवायचा झाल्यास, तिचे तेव्हा त्याच्यावर प्रेम नव्हते. लग्नानंतर तिची तिच्या नवर्याकडून खूप छळवणूक झाली व त्या दरम्यान कधीतरी तिच्या मनात क्रोकरबद्दल प्रेम उत्पन्न झाले. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाल्यापासून झालेली ही त्यांची पहिलीच भेट होती असे क्रोकरच्या निवेदनावरून वाटते. आणि या पहिल्या भेटीदरम्यान बोलत असताना तिचा नवरा त्या खोलीत आला, त्याने तिला मारले व म्हणून क्रोकरने चिडून त्याला ठार केले असे स्पष्टीकरण दिलेले आहे. यावरून हा खून प्रियकर-प्रेयसीने मिळवून पूर्वनियोजित केलेला नव्हता हे दिसून येते. शिवाय त्याने नवर्याचा काटा काढून तिच्याशी लग्न करण्याच्या इराद्याने हा खून केलेला नाही. मूळात मृत व्यक्ती ही अन्यायकारकपणे वागत होती. त्यामुळे होम्सने या खूनाकडे निष्पाप व्यक्तींनी आपली करून घेतलेली सुटका या दृष्टीकोनातून पाहिलेले आहे.
येथे लक्षात घेण्याची गोष्ट ही की ही कर्मकहाणी ऐकून होम्सने लगेच पाघळून जाऊन त्या दोघांना सोडून दिलेले नाही. त्याने आधी क्रोकरची परीक्षा घेतली. कोणत्याही परिस्थितीत तो तिला पोलिसांच्या तोंडी देऊन आपली सुटका करून घेणार नाही याची खात्री पटल्यावर होम्सने त्याच्याबद्दल पक्के चांगले मत बनवले. तरीही त्याला तसेच सोडून देण्यापूर्वी ब्रिटीश न्यायव्यवस्थेनुसार त्याने वॉटसनला ज्युरी म्हणून व आपल्याला जज म्हणून नियुक्त केले व ज्युरीला निवाडा करायचे आवाहन केले. म्हणजे यावरून केवळ् आपल्याच बुद्धीवर विसंबून न राहता वॉटसनचेही मत घेतलेले दिसते. याही पुढे जाऊन त्याने आणखी दोन गोष्टींची खबरदारी घेतलेली आहे. एक म्हणजे प्रकरण पूर्णपणे दाबले असे होऊ नये म्हणून त्याने पोलिसांना एक हिंट देऊन ठेवली आणि दुसरे म्हणजे उगाच एखाद्या तिसर्याच निरपराध व्यक्तीवर आळ आला तर तिचे जीवन उध्वस्त होऊ नये यासाठी यांचा अपराध उघड केला जाईल याची पूर्वकल्पना देऊन ठेवलेली आहे. मला तरी या केसमध्ये होम्सच्या 'नैतिकते'मध्ये काही वावगे वाटत नाही.
माझ्या मते होम्स स्त्रीद्वेष्टा होता म्हणजे तो स्त्रियांचा दुस्वास करत होता असे नाही, तर स्त्रिया या त्याच्या कामातीतील अडथळे आहेत अशी काहीशी त्याची धारणा होती. पण त्या मूळातच वाईट असतात असा समज करून घेऊन त्याने कधीही उगाच त्यांना त्रास दिलेला नाही. उलट ब्नर्याचदा एखादी तरूण अशील आली की तो तिला आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे वागणूक देत असे.
राधिका
मूळ कथा वाचलेली नाही
होम्सबाबत माझे निरीक्षण मी पाहिलेल्या सीझन १ व सीझन २ पुरतेच मर्यादित आहे. माझ्या वाचनात होम्सकथा किंवा त्यांचे अनुवाद आलेले नाहीत. तुम्ही म्हणता ते विस्तृत वर्णन कदाचित पुस्तकात असावे. मालिकेमध्ये पाहिले तेव्हा होम्सने क्रोकरची कोणतीही परीक्षा घेतली नाही असेच दिसते. एकंदर गफलत पुस्तकाच्या मालिकाकरणामध्ये झाली असावी.
होम्स स्त्रीद्वेष्टा असल्याबाबतचा एक सूचक टोमणा मायक्रॉफ्टने एका भागात मारला आहे. मात्र त्याबाबतचा पुरेसा तपशील अद्यापि उघड झालेला नाही.
विस्ताराने प्रतिसाद दिल्याबद्दल फार आभारी आहे.
परीक्षा
खालील प्रसंग मालिकेतील भागात आहे.
क्रोकरने सर्व हकीकत सांगितल्यानंतर होम्स त्याला म्हणतो की २४ तासात इथून निघून जा. क्रोकर नकार देतो कारण तो म्हणतो, "मेरी वुड बी लेफ्ट टू फेस द म्युझिक". त्यावर होम्स म्हणतो, "आय वॉज ओन्ली टेस्टींग यू. वॉटसन, धिस फेलो रिंग्ज ट्रू एव्ह्री टाइम. " (हे वाक्य पुस्तकातही आहे.)
भाग सबटायटलसहित परत बघावा असे सुचवावेसे वाटते.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/
आभारी आहे
आभारी आहे
द साइन ऑफ फोर
चर्चाप्रस्ताव आवडला.
सध्या मी शेरलॉक होम्सची 'द साइन ऑफ फोर' ऐकते आहे. त्यात एक तरुणी अशील असून डॉ. वॉटसनला तिच्याविषयी प्रेमभावना जागृत झाली आहे. (मला वाटते या गोष्टीचे पर्यवसन डॉ.ने तिच्याशी लग्न करण्यात होत असावे.) होम्स मात्र या स्त्रीविषयी थंडच आहे. आपल्या मित्राच्या भावना (कदाचित त्याला जाणवत असूनही दुर्लक्ष करत असावा) त्याला कळवून घेण्यात इंटरेश्ट आहे असे जाणवत नाही.
बाकी नैतिकतेविषयी भाष्य करता येणार नाही.
सर्वांचे आभार
सर्वांनी अवांतर प्रतिसाद न देता व मारामारी न करता खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा पार पाडली यानिमित्त सर्वांचे हार्दिक आभार.
राधिका यांचे विशेष आभार, त्यांच्या प्रतिसादामुळे होम्समालिकांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला. होम्समालिकेचा रसास्वाद घेणे अशा प्रतिसादांमुळे आनंददायी ठरते.
तिसरा कौन?
बंगांविषयी नैतिक प्रश्न, शेरलॉकविषयी नैतिक प्रश्न... अब तिसरा कौन?
-राजीव.
नैतिकता आणि हक्क
संपादकांना विनंती: विषयांतर वाटल्यास कृपया प्रतिसाद उडवावा, पण हे मटेरियल नव्या धाग्याइतके महत्वाचे वाटत नसल्यामुळे केवळ प्रतिसाद म्हणूनच देतो आहे.
नैतिकतेची तिसरी चर्चा करण्यासाठी कृपया ताजी बातमी पहा: "एकांत हवा" असे सांगून एका मुलाने वसतिगृहातील खोली-भागीदाराला बाहेर जाण्यास सांगितले. भागीदार बाहेर गेला पण जाण्यापूर्वी खोलीमध्ये चित्रीकरणाची सोय केली. पहिल्या मुलाने खोलीत (समलिंगी) शारीर संबंध ठेवले ही बाब उघड करणारी चित्रफीत त्याने जालावर प्रसिद्ध केली तेव्हा पहिल्या मुलाने आत्महत्या केली.
'रिकामी खोली मागणे' यात काही लेखी करार तर नक्कीच नसणार. अशा परिस्थितीत हे केवळ विश्वासघाताचे उदाहरण वाटते आहे. 'अमेरिकन पाय', इ. चित्रपटांमध्ये माहिती असलेली आयडिया शोधण्यासाठी 'एनिमी ऑफ द स्टेट' चित्रपटासारखी काळजी न घेणे हा त्या मुलाचा बावळटपणा आहे (अशा व्यक्तीला कायद्याचे संरक्षण द्यावे काय?). दुसर्या मुलाचे कृत्य अनैतिक असले तरी त्याने काहीही गुन्हा केल्याचा दावा मला पटत नाही. एखाद्याच्या घरात कॅमेरा घुसविणे बेकायदेशीर ठरविणे मला पटते पण स्वतःच्या हक्काच्या खोलीत चित्रिकरण करणे बेकायदा का ठरावे?
नैतिकतेचा मुद्दा बेकायदेशीरपणाच्या मुद्यापेक्षा वेगळा असतो असे मला वाटते. होम्सचे कृत्य तत्कालीन कायद्यानुसार चूक असले (न्यायालयीन चौकशीत क्रोकरला स्वसंरक्षणाच्या मुद्यावर निर्दोष सोडले असते) तरी ते मला नैतिकच वाटते.
नैतिक प्रश्न ?
अवांतर : प्रश्न नैतिक की नैतिकतेवर प्रश्न? प्रश्न तर सरळच वाटतो आहे.
गुप्तहेरांच्या कथा वाचताना नैतिक अनैतिक या संदर्भात विचार करावया
221B Baker Street शेरलॉक होम्स. मला लंडन ला भेट देण्याचा योग आला तर मी सर्व प्रथम बेकर स्ट्रीट ला भेट देईन . तो प्रत्यक्षात होता का काल्पनिक आहे याचाशी मला कांही देणे घेणे नाही. माझ्या जीवनात ती पुस्तके वाचल्या मुळे आनंद निर्माण झाला हे महत्वाचे. जसा मी काळापहाड च्या घराच्या शोधात मुंबई ला भटकलो. गुप्तहेरांच्या कथा वाचताना नैतिक अनैतिक या संदर्भात विचार करावयाचा नसतो. आपला नायक जिंकला हेच महत्वाचे. कथेचा आनंद लुटणे महत्वाचे. गुरुनाथ नाईक, अर्नाळकर यांच्या ६० व्या दशकातील कथा कोठे मिळत असल्यास मला पत्ता कळवावा.
thanthanpal.blogspot.com
सहमत
आनंद महत्वाचा आहेच !
||वाछितो विजयी होईबा||
अजुन एक अपवाद
द डेव्हिल्स फूट कथेत ज्या पद्धतीने खून होतात त्याचे रहस्य होम्स, वॉटसन व स्टर्नडेल यांच्यातच रहाते. पोलीसांना काही कळत नाही व एक खून केला (हिंदी फिल्म बदला) असुन स्टर्नडेला, होम्स सोडून देतो व वर उल्लेख आला आहे ते कारण पुन्हा एकदा देतो. (पोलीसांना त्यांचे काम करु दे.) त्या कथेत पोलीस देखील कृपया
संपादकांच्याअधीकृत कारभारात ढवळाढवळ करु नये असा होम्सला सल्ला देतात.अवांतर - सीझन १ मधील डॉ. वॉटसन डेव्हिड बर्क (नॉट बेंगरुळू) व शेरलॉक जेरेमी ब्रेट परफेक्ट