न्यूयॉर्क येथील हवेत चालणार्‍या आगगाड्या (सन १८९०)

न्यूयॉर्क येथील हवेवर चालणार्‍या गाड्या

"सुधारकातील निवडक निबंध" ले.गो.ग.आगरकर ,या 1891 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात वरील शीर्षकाचा लेख आहे.त्यातील कांही अंश:--
.......
*...सामान्य रस्त्यांनी व्यापारी घडामोडी करण्याची आणि दळणवळण ठेवण्याची जी सोय असते त्याहून एखादी विशेष सोय निघाली तर बरे असे न्यूयॉर्कच्या लोकांना वाटून त्यांनी ही खांबावर घातलेल्या आडव्या तुळवटांत बसविलेल्या रुळांवरून आगगाड्या चालवण्याची युक्ती काढली.एकदा असा विचार होता की एका ठिकाणी स्थाईक असलेल्या इंजिनाने आणि साखळदंडाने या गाड्या चालवाव्या. पण तो विचार रद्द हो्ऊन गाडी बरोबर जाणारी इंजिने लाविण्याचा बेत कायम झाला.
* ...लंडन येथे या कामासाठी पातालगामी आगगाड्या केल्या आहेत.एका दृष्टीने पाहाता खांबावरील रूळ जमिनीखालील रस्त्यांपेक्षा बरे, कारण ते करण्यास खर्च कमी.पण अरुंद गल्लीतील खांबावरून गाड्या नेताना खालच्या रस्त्यांवरून चालणार्‍या गाड्यांचे घोडे आणि इतर जनावरे फार बुजतात.
*.. या रस्त्यांची एक दोन चित्रे देण्याची व्यवस्था आम्हापाशी असती तर बरे झाले असते.
*....भाड्याच्या दरांची व्यवस्था फारच सोपी आहे.सकाळचे पाच ते आठ आणि सायंकाळचे चार ते सात या दरम्यान पाहिजे त्या स्टेशनपासून दुसर्‍या हव्या त्या स्टेशनास जाण्यास एक आणा आठ पई द्याव्या लागतात तर इतर वेळी तीन आणे चार पै.दूरच्या अंतरावर जाणे असल्यास हे भाडे बरे पडते.पण जवळपास जाणे असल्यास ट्रॉमवे स्वस्त.या गाड्यांचे दर वरच्या दरांच्या निम्मे असतात.
*न्यूयॉर्कमधे प्रवास करणे लंडन येथील प्रवासापेक्षा थोडे महाग आहे.पण कसेही झाले तरी घोडागाडी करणे बरे नाही.या गाडीस दोन मैलांकरिता दोन रुपये एक आणा चार पै पडतात.
*सन १८८० साली न्यूयॉर्क येथे १२०६५०० लोक होते.केवळ लोकसंख्येचा विचार करता इतक्या लोखंडी रस्त्यांची गरज दिसत नाही.पण युनायटेड स्टेटच्या परदेशी व्यापाराचा तीन पंचमांश संबंध या शहराशी घडतो हेही लक्षात घ्यायला हवे.

Comments

अरे वा चान चान

ह्या गाड्या "हवेत किंवा हवेवर" (केबल कार म्हणजे रोप वे वाल्या की ट्राम?)म्हणजे नेमक्या कश्या चालल्या हे सांगीतलेच नाहीत की!

हा एक रोचक दुवा. १८९१ मधले काही फोटो, रुळाची कामे दिसतील.

ही पहा जगातली पहीली दुरध्वनी सूची (टेलेफोन डिरेक्टरी) टेलेफोन नंबर नाहीत कारण तेव्हा फोन उचलून "हॅलो ऑपरेटर. कनेक्ट मी टू सो एन्ड सो" म्हणायचे (चु.भू. दे.घे.)

रोचक

एकुणच बातमी रोचक आहे. तेव्हाच्या समस्या, "केवळ लोकसंख्येचा विचार करता इतक्या लोखंडी रस्त्यांची गरज दिसत नाही" वगैरे विधानगेका वेगळ्या काळात नेतात.

एकदा असा विचार होता की एका ठिकाणी स्थाईक असलेल्या इंजिनाने आणि साखळदंडाने या गाड्या चालवाव्या.

आता हा विचार गमतीशीर वाटत असला तरी त्यावरही विचार झाला होता हे वाचून अधिक गंमत वाटली.

वेचा इथे दिल्याबद्द्ल आभार

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सॅन फ्रान्सिस्को मधल्या केबल कार

एकदा असा विचार होता की एका ठिकाणी स्थाईक असलेल्या इंजिनाने आणि साखळदंडाने या गाड्या चालवाव्या.हा विचार गमतीदार वाटण्याचे काहीच कारण नाही. सॅन फ्रान्सिस्कोच्या डाउनटाऊन भागातल्या केबल कार्स याच पद्धतीने आजही चालतात. रस्त्याच्या खाली असलेल्या चॅनेल्समधून या केबल्स वरच्या ट्रॅम्सना रुळावरून ओढत नेत असतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असो..

माझ्या डोळ्यासमोर यापेक्षा बरेच वेगळे चित्र आल्याने गंमत वाटली.. असो.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ऐतिहासिक माहितीचा तुकडा

ऐतिहासिक माहितीचा तुकडा आवडला.

आता हे लोहमार्ग नाहीत

खांबावरून जाणारी प्रवासी आगगाडी आता न्यूयॉर्कमध्ये नाही. शिकागोमध्ये मात्र अजून "एल" (एलेव्हेटेड) गाड्या आहेत. यासुद्धा मुळात १८९०-१९०० काळात सुरू झाल्या. पूर्वी वाफेची इंजिने होती.

न्यूयॉर्कमधील दुसरा एक "आकाश-लोह-मार्ग" आता उद्यान आहे. मात्र यावर मालगाड्या जात. (दुवा)

अबब किमती! दीड ते सव्वातीन आणे म्हणजे तसे त्या काळाच्या मानाने महाग वाटते. पण घोडागाडीचे भाडे कल्पनातीत वाटते - (अडीच शिलिंग = १ रुपया = १ डॉलर असे धरले आहे) - त्या काळात सरासरी शाळाशिक्षकाची वार्षिक मिळकत केवळ ३२८ डॉलर होती. म्हणजे घोडागाडीचे भाडे मध्यमवर्गीय व्यावसायिकाच्या दोन-तीन दिवसांच्या उत्पन्नाइतके!

कूल.

खूप आवडला लेख!

ईंटरेस्टिंग

सध्या पुण्या-मुंबईत मेट्रोवरून असेच प्रश्न विचारले जात आहेतः जसे, याची गरज आहे का? एलेव्हेटेड मेट्रोमार्गिकेसाठी खालील रस्त्यांवर अडचण निर्माण होऊन वाहनचालक 'बुजतील'. इ.

||वाछितो विजयी होईबा||

घोडागाडीचे भाडे कल्पनातीत....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
..... हे श्री.धनंजय यांच्या प्रतिसादात वाचून "माझ्या टंकलेखनात काही चूक झाली की काय?" या शंकेने पुस्तकातील लेख पुन्हा पाहिला.त्यात पुढील प्रमाणे आहे:--

" कसेही झाले तरी घोड्यांची गाडी करणे बरे पडत नाही.या गाडीस पहिल्या दोन मैलांकरिता दोन रुपये एक आणा चार पै पडतात.त्या पुढे प्रत्येक तासास तितकेच भाडे द्यावे लागते."
 
^ वर