मुलं हवीत कुणाला?

(विनंती : या विषयावर किंवा संबंधित उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली असल्यास कृपया दुवे द्यावेत. नसल्यास आपला दृष्टीकोन आवर्जून मांडावा.)

आमचा एक मित्र आहे. त्याच्या लग्नाला पाच-सहा वर्षे होऊन गेली आहेत. नवरा-बायको दोघेही आनंदी, उत्साही आहेत. मुख्य म्हणजे दोघांतही काही कमतरता नाही. आम्ही कुटुंबवत्सल मित्रांनी आजवर अनेक वेळा या जोडीला चिडवले आहे. स्पष्ट शब्दात 'आता बास झाले की नियोजन' असे सांगून पाहिले, पण दोघेही ठाम आहेत. संतती होऊ द्यायची नाही, असा त्यांचा निर्धार आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि दुसर्‍या कुणी का लक्ष घालावे? असले काही व्यक्तीस्वातंत्र्याचे टोक आम्ही मित्र मानत नाही. त्यामुळे या विषयावर एकदा त्यांची मते स्पष्टपणे जाणून घेतली. आम्ही प्रश्न विचारले, 'तुम्हा दोघांना 'डबल इन्कम नो किड्स' (डिंक) कॅटॅगरीतील जोडपे म्हणून राहायचे आहे का? कोणतीही समस्या नसताना तुम्ही हा निर्णय का घेताय? आजच्या चंगळवादी आणि स्वान्तसुखाय जीवनशैलीचा तुमच्यावर प्रभाव आहे का? अजून २५-३० वर्षांनी निर्माण होणार्‍या स्थितीचा तुम्ही विचार केलाय का? अशा अनेक प्रश्नांवर त्या जोडीने त्यांची रोखठोक मते मांडली. ती इथे देत आहे.

१) भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?
२) आम्ही आमच्या आयुष्यात मानसिक/शारीरिक पातळीवर समाधानी आहोत. मुले जन्माला घालण्यात सुख असते, असे आम्ही मानत नाही.
३) पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.
४) प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.
५) आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.
६) अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही. आम्ही आहे ते आयुष्य संपवून शांतपणे मातीत विलीन होऊ.
७) दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.
८) बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.

यावर तुम्हाला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

रोखठोक मते....

उपरोक्त जोडप्याची मते आणि त्यांचा निर्णय त्यांच्या दृष्टीने नक्कीच योग्य आहे.
प्रत्येकाला रोखठोक मते मांडण्याचा आणी वेळप्रसंगी ती बदलण्याचा हक्क आहे. हे जोडपे जर शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचा पश्चाताप न करता त्यांच्या निर्णयाशी ठाम राहिले तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

मात्र मुले जन्माला घालण्यात सुख असते की नसते हे मातांना विचारले तर ते जास्त बरोबर उत्तर देऊ शकतील. व्यक्तीशः मी बाप झाल्यानंतर जो आनंद झाला होता तो मी अनुभवलेल्या अत्युच्च आनंदाच्या क्षणांपैकी एक होता हे खात्रीने सांगू शकतो. एवढेच नव्हे तर त्या क्षणाने माझी स्वतःच्या आईवडीलांकडे बघण्याची दृष्टी देखील बदलली.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

यापूर्वी झालेली चर्चा

ऐच्छिक अपत्यहीनता या चर्चाप्रस्तावात प्रस्तुत विषयावर थोडीशी चर्चा झाली आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

योग्य

निर्णय योग्य आहे. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मात्र असा विचार करणारी जोडपी आहेत हे पाहून आनंद झाला. जगातील प्रत्येक मानवाने मुलांना जन्म दिलाच पाहिजे असे कुठे लिहीले आहे?
आम्हाला अंबाडीची भाजी आवडते म्हणून प्रत्येकानी ती खाल्लीच पाहिजे असे नाही.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

अंबाडीची भाजी

आम्हालाही आवडते. बरेच दिवस खायला मिळाली नाही. मुंबईत तर आजकाल कुणाला माहित ही नाही. वर्षातून एखाद्या वेळी गावी गेल्यास खायला मिळते.
अंबाडीची भाजी आणी बाजरीची भाकर - खरोखरच अप्रतिम मेनू.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

लग्न तरी कशाला?

त्या कुटुंबाने मांडलेले मुद्दे त्यांच्यापुरते खरे आहेत. इतरांना ते पटतीलच असे नाही परंतु ते पटावेत किंवा त्या कुटुंबाने इतरांचे मुद्दे पटवून घ्यावेत अशी त्यांच्यावर/इतरांवर सक्ती नाही.

बाकी, काही गोष्टींविषयी त्यांचा गैरसमज दिसतो तो तुम्हाला चर्चेतून दूर करता येईल.

१) भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?

याने फारसा फरक पडेल असे नाही. त्यांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला असता तरीही कालांतराने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार. :-)

३) पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.

स्त्रीने मुलाला जन्म दिला की तिचे पत्नीत्व संपून केवळ मातृत्व सुरू होते वगैरे भंपकपणा चित्रपट आणि बाबा कदम टाईप लेखकांच्या लेखनात बरा दिसतो.

४) प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.

भविष्याचा इतका विचार करण्यापेक्षा वर्तमानात कसे जगावे हे या दांपत्याला कळले तर बरे होईल. प्रश्न विचारणारे प्रश्न विचारतातच. आता त्यांना मुले नाहीत म्हणून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेतच.

५) आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.

हेहेहे! यालाच गिल्टी कॉन्शंस म्हणायचे काय? ;-)

६) अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही

इतक्या वर्षांनी काय होणार हे त्यांना कसे कळले असावे? ज्योतिषी आहेत का? :-) कदाचित, पुढे त्यांचे इतर मित्र-मैत्रिणी आपल्या मुलांच्या वाढदिवस, मुंजीला, ग्रॅज्युएशन पार्टीला वगैरे त्यांना बोलावू लागले/ टाळू लागले तर पोकळी जाणवेलही.

७) दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.

गरजू मुलांना मदत करणे आणि स्वतःची मुले असणे/ नसणे यांचा परस्परसंबंध नाही. इतरांना तुम्ही त्यांच्या मुलांवर प्रेम करणे हवे आहे काय? उगीच काहीतरी.

८) बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत.

अशी संभ्रमित पिढी निर्माण केल्याचा दोष तुमच्या पालकांना द्यायला हवा. ;-)

वरील मुद्दे इतके भंपक आहेत की सरळ उत्तरे द्यावी असे वाटले नाही. आपल्या कृतीची इतकी समर्थने लोकांना का द्यावीशी वाटत असावी? असा प्रश्न पडला.

आम्हाला मुले नकोत. आम्हाला स्वतःचे आयुष्य जगायचे आहे, अधिक जबाबदारी नको असे म्हटले की पुरेसे नाही का? आपण काहीतरी उदात्त करत आहोत असे सांगण्याचा हा निष्फळ प्रयत्न वाटतो.

असो.

बायदवे,

त्याच्या लग्नाला पाच-सहा वर्षे होऊन गेली आहेत.

यांच्या लग्नाला अजून एखादे वर्ष उलटू दे. कदाचित, त्यांच्या विचारसरणीत बदल घडू शकेल. ;-)

प्रत्येक मुद्याशी सहमत

आम्हाला मुले नकोत. आम्हाला स्वतःचे आयुष्य जगायचे आहे, अधिक जबाबदारी नको असे म्हटले की पुरेसे नाही का? आपण काहीतरी उदात्त करत आहोत असे सांगण्याचा हा निष्फळ प्रयत्न वाटतो.

हे पटले.
हे दोघे एवढे उद्दात्त विचार करतात तर मग ते जगातल्या आणि भारतातल्या इतर समस्यांबद्दल नक्कीच जागरुक असतील. प्रदुषण, गरिबी, भ्रष्टाचार, इत्यादी.
जगात काही लोकांना खायला मिळत नाही. म्हणून आम्ही सुद्धा अन्न खाणार नाहीत असे म्हणतात का हो ते? कि एक अनामिक भिती आहे साथिदार साथ न देण्याची? प्रियाली म्हणते त्या प्रमाणे एवढी स्पष्टीकरणे द्यायचे कारण नाही.






+१

प्रत्येक मुद्याशी सहमत
+१

कदाचित

आपल्या कृतीची इतकी समर्थने लोकांना का द्यावीशी वाटत असावी? असा प्रश्न पडला.

कदाचित दर येणार्‍याजाणार्‍याने काय यंदा गोड बातमी आहे का? असे विचारल्यामुळे वैतागले असतील. :)

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

नव्हे!

कदाचित दर येणार्‍याजाणार्‍याने काय यंदा गोड बातमी आहे का?

त्यासाठी वरील समर्थने द्यावी लागत नाहीत. आम्हाला जबाबदारी नको आहे असे म्हणणे पुरेसे असते. परंतु सदर व्यक्तिंना तसे सांगण्याचे धाडस नसते कारण जगावेगळे निर्णय घेताना जगावेगळे होऊन राहायचे नसते. :-)

अनेक

आम्ही प्रश्न विचारले, 'तुम्हा दोघांना 'डबल इन्कम नो किड्स' (डिंक) कॅटॅगरीतील जोडपे म्हणून राहायचे आहे का? कोणतीही समस्या नसताना तुम्ही हा निर्णय का घेताय? आजच्या चंगळवादी आणि स्वान्तसुखाय जीवनशैलीचा तुमच्यावर प्रभाव आहे का? अजून २५-३० वर्षांनी निर्माण होणार्‍या स्थितीचा तुम्ही विचार केलाय का?

त्यांना अनेक प्रश्न विचारले असे लेखात म्हटले आहे. त्याची त्यांनी जमतील तशी उत्तरे दिली.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

हम्म!

त्यांना अनेक प्रश्न विचारले असे लेखात म्हटले आहे. त्याची त्यांनी जमतील तशी उत्तरे दिली.

कळले. कदाचित त्यांनीही वैतागून दिली असतील उत्तरे.

----

हे मूळ चर्चेशी संबंधित. आरॉगॉर्न यांना उपप्रतिसाद नाही.

हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि दुसर्‍या कुणी का लक्ष घालावे? असले काही व्यक्तीस्वातंत्र्याचे टोक आम्ही मित्र मानत नाही.

मला वाटते हे १००% योग्य नाही. मित्र म्हणून आस्थेने चौकशी करणे आणि भोचकपणा करणे यात फरक आहे.

हेच मुद्दे

याच मुद्यांवर ते अजुन दहा वर्षांनी ठाम राहतील का या बाबत साशंकता वाटते.
मुद्दा क्रं ६ बाबत ते आत्ताच कसे ठाम सांगु शकतात.
प्रकाश घाटपांडे

शुद्ध पळवाट तर नाही ?

लग्न तरी कशाला केले असे एक उत्तर प्रस्ताव वाचल्याबरोबर माझ्याही मनात आला. पण कोणी कसे जगायचे हा प्रत्येकाचा हक्क आहे. जागतिक लोकसंख्या कमी करण्याची एखादी चळवळ असती आणि अशा चळवळीतील काही कोटी लोकांनी असे ठरवले आहे की आपल्याला मुले होऊ द्यायची नाही त्यातील ते एक कुटुंब असते तर खरेच त्यामागील विचारांचा-कृतीचा अभिमान वाटला असता त्यांच्या कृतीचा फारसा परिणाम नसल्यामुळे त्यांच्या विचारांचे फार वेगळेपण असे वाटले नाही. अर्थात अजून काही संपलेच नाही आताशी सुरुवात आहे. कधीतरी आपली मुले हा विचार येईलच तो पर्यंत वाट पाहू या. मुले, सुना,नातवंडे,कटकटी, खर्च, या आणि अशा कितीतरी गोष्ट जगतांना काही एक आनंद आणि दु:खही देतात. तेव्हा हा सर्व व्याप टळत असला तरी ते काही जगणे नसावे.[विचार व्यक्तीसापेक्ष असेल] लोकसंख्या हा उद्देश पटण्यासारखा नाही. असो, आपल्या हातात फक्त त्यांच्या विचारांसारखी लाखो-कोटी कुटुंबे उभी राहावीत यासाठी आकाशातील देवाकडे आपण सर्व प्रार्थना करु या....!

-दिलीप बिरुटे

आकाशातील देवाकडे ?

सापडले.... अजून एक माझ्यासारखे अंधश्रद्धाळू सापडले.

आकाशातील देवाकडे प्रार्थना करुन काय साध्य होणार ? त्यापेक्षा हा विचार पुढे नेण्यासाठी विचारवंतांची पलटण कशी उभारता येईल हे पहा.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

देवा हे काय बोलतात यांना कळत नाही.

>>>>सापडले.... अजून एक माझ्यासारखे अंधश्रद्धाळू सापडले.
आपलं आहे ते असं आहे. श्रद्धाळू म्हणा की अंधश्रद्धाळू म्हणा. त्याला आपला काय विलाज नाही.
>>>आकाशातील देवाकडे प्रार्थना करुन काय साध्य होणार ?
असं काय करता राव ! देवाची करणी अन् नारळात पाणी म्हणतात ते काय खोटं नाही.
देवाच्या मनात असल्याशिवाय गवताला पातं फुटत नाही.आपण केवळ निमितमात्र असतो भो...!

>>>त्यापेक्षा हा विचार पुढे नेण्यासाठी विचारवंतांची पलटण कशी उभारता येईल हे पहा.
अशी फलटन उभी राहण्यासाठी अशा कुटुंबांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा....!!!

-दिलीप बिरुटे

देवाच्या मनात असल्याशिवाय गवताला पातं फुटत नाही.

मग तुमचा आणी आमचा देव वेगळा आहे.
तुमच्या देवाच्या मनात असल्याशिवाय गवताला पातं फुटत नाही. आमच्या देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं पान हालत नाही.

विनोद बाजूला ठेऊन म्हणावेसे वाटते की तारुण्यात आपले निर्णय योग्यच आहेत आणी म्हातारपणाकडे झुकल्यानंतर आपलं तेव्हा चुकलच अशी मनोवस्था बरेचदा होते. तेव्हा ह्या जोडप्याने आपल्या म्हणण्याला पश्चाताप न करता चिकटून रहावे हेच योग्य होईल. ते समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करु शकतील. ह्या महान कार्यासाठी आपण त्यांना सध्यातरी फक्त शुभेच्छा देऊ शकतो.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

असे का?

ह्या जोडप्याने आपल्या म्हणण्याला पश्चाताप न करता चिकटून रहावे हेच योग्य होईल.

असे का? काळ बदलेल तसे अनुभवाने एखाद्याला आपला निर्णय बदलावा असे वाटले तर त्यात गैर काय आहे? आणि आदर्श कोणी निर्माण करावा हे ठरवणारे आपण कोण? प्रत्येकाला आपले निर्णय बदलण्याचे स्वातंत्र्य असावे. एखादा निर्णय चुकू शकतो असे मान्य करायला काय हरकत आहे?






एखादा निर्णय चुकू शकतो असे मान्य करायला काय हरकत आहे?

माझा या चर्चेतील प्रथम प्रतिसाद वाचा.

वाचला

वाचला. तेथे पण तुम्ही तेच लिहिले आहे की निर्णयाला चिकटून राहिले तर अभिनंदन. (अहो पुणकरांप्रमाणे दुवा द्यायचा ना. शोधायला कशाला लावता?)
त्या पेक्षा असे का नाही म्हणत, त्यांनी निर्णय बदला आणि आधिचा चुकीचा होता हे मान्य केले तरी अभिनंदन करु. माझा मुद्दा सरळ आहे. उगाच एखादा हट्ट शेवट पर्यंत सोडला नाही म्हणून कौतुक कशाला?






अवांतर

>>>जोडप्याने आपल्या म्हणण्याला पश्चाताप न करता चिकटून रहावे हेच योग्य होईल.
हम्म, एखादे तरी होऊ द्यावे असे वाटते. लोकसंख्या हळूहळू कमी करु या. एकदम कमी नको असे वाटते. अर्थात अशा विचारांना चिकटून् राहणार्‍याचे आपण स्वागत करु या.आपलं झालं गेलं गंगेला मिळालं आपण केवळ आता शुभेच्छा देऊ शकतो. वरील जोडप्याला आजूबाजूचे लोक कै है का नाही ? काही प्रॉब्लेम तर नाही ? असे विचारुन भंडावून सोडत असतील.

म्हातारपणाकडे झुकल्यानंतर आपलं तेव्हा चुकलच अशी मनोवस्था बरेचदा होते.
माझा एक प्राध्यापक मित्र वधुवर सुचक मंडळ चालवतो. युवक युवीतींच्या प्रचंड नोंदण्या त्यांच्याकडे आहेत, विवाह जुळविण्याचे त्यांचे काम चालूच असते. आता त्यांच्याकडे साठी ओलांडलेल्या आजोबांचे नोंदणी अर्ज येऊ लागलेत, त्यात स्त्रियाही आहेत. सधनता आहे पण समाधान नाही. मानसिक आधार नाही. म्हणून केवळ गप्पा-टप्पांसाठी आता अशा एकट्या लोकांना आधाराची गरज वाटू लागली आहे. मुले आहेत पण सोडून गेले आहेत. तेव्हा अशा लोकांचा एक नाजूक प्रश्न आता उभा राहिला आहे. वरील जोडप्यांचा भविष्यात विचार बदलूही शकतो, काय सांगता येते ?

-दिलीप बिरुटे

आदर्श

ते समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करु शकतील.

यात आदर्श वगैरे काही वाटले नाही. म्हणजे ज्यांना पोरे झाली (त्यात आपल्या सगळ्यांचे आईवडीलही येतात) ते काय केवळ मुले जन्माला घातली म्हणून कमी ठरतात का?

बाकी तो त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे आणि तसा निर्णय घेणे यात काही गैर नाही इतके नक्की म्हणेन. पण लोकसंख्येचा भस्मासूर वगैरे कारणे देत इतरांना (म्हणजे ज्यांना अपत्य आहेत अथवा अपत्यप्राप्तीची इच्छा आहे) कमी लेखणे अथवा अपराधीपणाची भावना देणे हे योग्य वाटत नाही.

मला असे देखील (अमेरिकेत गोरे अमेरिकन्स बरेच पण अगदी भारतातपण) माहीत आहेत ज्यांना स्वतःचे मूळ असूनही अजून दत्तक घेऊन त्याच्यावर पण तितकेच जीवापाड प्रेम करतात...

प्रियाली.. थोडेसे लक्षात घ्या.

प्रियाली,
सर्वप्रथम लक्षात घ्या, की त्या जोडप्याने आपणहून आपल्या कृतीचे समर्थन जगापुढे केलेले नाही. आम्ही मित्रांनी जेव्हा त्यांना बोलते केले आणि स्पष्टपणे विचार मांडा, असे सांगितले तेव्हाच ते ओपन झाले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली. साधारणपणे अशा विषयांवर कुणी विचारत नाही आणि कुणी बोलतही नाही (वैयक्तिक निर्णय या दोनच शब्दांत विषयावर पडदा टाकला जातो.)

मला स्वतःला हे मुद्दे भंपक वाटत नाहीत कारण त्यामुळे मीही विचारात पडलोय. असो. चर्चेच्या अंती पुन्हा थोडेसे मनातले लिहीनच.

लक्षात घेतले

मी लक्षात घेतले तेव्हा असे वाटले की ते तुमच्या चौकशीला कंटाळून अशी उत्तरे देण्याची शक्यता आहे परंतु उत्तरे भंपक आहेत याबाबत माझा गोंधळ नाही.

आम्ही मित्रांनी जेव्हा त्यांना बोलते केले आणि स्पष्टपणे विचार मांडा, असे सांगितले तेव्हाच ते ओपन झाले आणि त्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

असे असते की आम्हाला मुले नकोत; आम्हाला जबाबदारी नको असे रोकडे आणि सुके शब्द सांगण्याची हिम्मत अनेकांत नसते तेव्हा ही स्पष्टीकरणे पुढे केली जातात. अन्यथा, अधोरेखित वाक्याशिवाय इतर स्पष्टीकरणाची गरज ती कोणती?

मुले नसण्याने पोकळी?

या विशिष्ट दांपत्याविषयी सांगू शकत नाही, पण मुलं नसण्यानं पोकळी निर्माण झाली नाही अशी उदाहरणं व्यक्तिगत ओळखीची आहेत. पु.लं-सुनीताबाई हे उदाहरण तर सार्वजनिक आहे. तशीच इतरांच्या मुलांवर प्रेम करणारीही दांपत्यं/आजन्म अविवाहित/विधुर-विधवा वगैरे व्यक्तिगत ओळखीत आहेत. विशिष्ट नात्यांच्या मर्यादेत (शेजारी-पाजारी, दूरचे नातेवाईक वगैरे) माझ्या परिसरातल्या अनेकांचं असं प्रेम मी स्वतःच्या लहानपणीही अनुभवलं आहे. त्यामुळे अशी (या दांपत्यासारखी या दोन मुद्द्यांवरची) विधानं मूलतः पोरकट किंवा अविश्वसनीय वाटत नाहीत. अर्थात, या दांपत्याला नंतर उपरती व्हायची शक्यताही (शक्यतेच्या पातळीवर) आहेच.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

सहमत/असहमत

या विशिष्ट दांपत्याविषयी सांगू शकत नाही, पण मुलं नसण्यानं पोकळी निर्माण झाली नाही अशी उदाहरणं व्यक्तिगत ओळखीची आहेत.पु.लं-सुनीताबाई हे उदाहरण तर सार्वजनिक आहे.

अगदी शक्य आहे. मुलं नसल्याने पोकळी निर्माण होतेच असे नाही, होत नाही असेही नाही, भविष्यात होईल असे नाही आणि होणार नाही असे नाही. कायम पोकळी वाटेल असे नाही आणि एखाद्या एकाकी संध्याकाळी ती प्रकर्षाने जाणेवलही. एक मूल आहे पण दुसरे नाही म्हणून खंतावणारी कुटुंबेही मी पाहिली आहेत. मुलगी आहे पण मुलगा नाही आणि मुलगा आहे पण मुलगी नाही म्हणून पोकळी वाटणारी; फॅमिली पिच्चर पूर्ण नाही असे म्हणणारी माणसेही पाहिली आहेत. प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो आणि दोन वेगळी माणसे एकत्र आली की त्यांच्या संयोगाने आणखी वेगळेपण निर्माण होत असावे. त्यामुळे, कुटुंबात आज असे आहे म्हणून उद्याही असेच होईल असे सांगता येत नाही.

अर्थात, या कुटुंबाच्या स्वातंत्र्याबद्दल काहीच बोलायचे नाही. त्यांचा निर्णय योग्य आहे.

अनेकदा खंत असली तरी ती त्या चौकटीतच बंद होऊन राहते. तिचे रडगाणे माणूस गातोच असे नाही. त्यामुळे मुले नसूनही पोकळी नाही अशा (दाखवणार्‍या) कुटुंबांत पोकळी आहेच किंवा नाहीच असे ठाम विधान कोणीही तिसरा मनुष्य करू शकत नाही.

अशीही शक्यता आहे की मुले न होण्याची कारणे वेगळी आहेत परंतु ती ते दोघे सोडून इतरांना सांगायची नाहीत त्यामुळे असा पावित्रा घेणे. (आमच्या एका शेजार्‍यांच्या बाबत असे होते. त्या बाईंना उपचारांनंतर मूल होणे शक्य होते/ नव्हते. वैवाहिक जीवनात अडचण नव्हती. उपाचार बरेच वर्षे चालले होते पण हे सासरी सांगितले तर सासू नाराज होण्याची शक्यता होती म्हणून ते लोकांना सांगत की आम्हाला मूल नकोच आहे.)

विशिष्ट नात्यांच्या मर्यादेत (शेजारी-पाजारी, दूरचे नातेवाईक वगैरे) माझ्या परिसरातल्या अनेकांचं असं प्रेम मी स्वतःच्या लहानपणीही अनुभवलं आहे.

हे देखील खरे. असे प्रेम माझ्या आई-वडिलांनी शेजार्‍यांच्या मुलांना दिले आहे. इतके की आज सुमारे २५ वर्षांनी ती मोठी मुले माझ्या आई वडिलांचा उल्लेख आई आणि बाबा असा करतात आणि आजही मुंबईत आली की हक्काने आमच्या घरात उतरतात आणि कधीकधी खाणे-पिणे, भेटींवर वगैरे आमच्यापेक्षा अधिक हक्क सांगतात.

परंतु, हे सर्व होताना माझ्या आईवडिलांनी कधीही त्यांच्या जन्मदात्यांच्या पायावर पाय दिलेला नाही (अरेरे! हे स्टेपिंग ऑन टोजचे वाईट्ट भाषांतर आहे पण सध्या दुसरे काही सुचले नाही. माफ करावे.) तसे केले असते तर त्या जन्मदात्यांना आवडले नसते असे अनुभवांवरून वाटते. त्यामुळे अशा प्रेमाला मर्यादा असते. इतरांची मुले ही (दत्तक घेतली नसतील तर) आपली होत नाहीत किंवा संध्याकाळी ६ ते ७ (म्हणजे आपल्या फावल्या वेळात. हे माझ्या घरातले उदाहरण आहे. माझा नवरा त्याच्या मित्राच्या मुलीला कधीतरी खेळवायला घेऊन येतो. या काळात तिची झोप झालेली असते, पोट भरलेले असते, डायपर लावलेला असतो. ती समाधानी असते, खेळण्यास उत्सुक असते. ७ नंतर तिची भुकेची वेळ होते आम्ही तिला घरी पोचती करतो.) मध्ये केलेल्या प्रेमाला आई-वडिलांचे प्रेम म्हणता येत नाही. तो फक्त विरंगुळा/ टाइमपास झाला.

तशीच इतरांच्या मुलांवर प्रेम करणारीही दांपत्यं/आजन्म अविवाहित/विधुर-विधवा वगैरे व्यक्तिगत ओळखीत आहेत.

यांत वरील व्यक्तिंना मुले नकोत असे प्रतीत होत नाही. फक्त त्यांना मुले नाहीत असे प्रतीत होते. त्यामुळे ज्यांना मुले नकोत त्यांनी इतरांच्या मुलांना प्रेम देण्यात आणि ज्यांना मुले नाहीत किंवा हवी असून झाली नाहीत त्यांनी इतरांच्या मुलांना प्रेम देण्यात फरक असण्याची शक्यता आहे.

जगू द्या त्यांना हवे तसे!

योगप्रभू,
आपण ज्या जोडप्याबद्दल म्हणत आहात त्यांची वये काय आहेत? तुम्ही त्याबाबत लिहीलेले नाहीत.

माझ्या मते त्या दोघांनाही प्रणयाचे आकर्शण नसावे. तसे असल्यासच नवरा- बायको अशी प्रामाणिक मते व्यक्त करू शकतात. प्रणयाचे आकर्शण असते तर त्या दृश्टीने प्रयत्न झाला असता. प्रयत्न अपयशी झाला/होतोय हे जाणले असते तर मुल दत्तक घेण्याविशयी मनात भाव आले असते.

दोघेही पोक्तपणे वागत राहिल्यास मतांमध्ये फरक पडणार नाही. दोघापैकी एकानेतरी खट्याळपणा-चावटपणा जपायला हवा. पण हे झाले माझे मत!
भुमिकेबद्दल म्हणायचे झाले तर-,
'प्रत्येकाला आप-आपल्या मताप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे.'

?

त्या दृश्टीने प्रयत्न झाला असता.

'त्या दृष्टीने प्रयत्न' म्हणजे काय? प्रणयाची इच्छा आणि संततीप्राप्तीची इच्छा यांची मानवप्राण्यामध्ये फारकत झालेली आहे. प्रणय करण्यसाठी संततीनिर्मितीची काय आवश्यकता असते?

अब्बा, जब्बा, डब्बा!!!

रिकामटेकडा उर्फ 'जुदाई चित्रपटातील परेश रावल'
तुम्हाला -' प्रणयाची इच्छा आणि संततीप्राप्तीची इच्छा यांची मानवप्राण्यामध्ये फारकत झालेली आहे.' हे माहित आहे. पण स्त्री-पुरूशांमध्ये ह्या दोन इच्छांपैकी कोणती इच्छा पहिली निर्माण होते? हे माहित नाही? कमाल आहे?
प्रणय करण्यसाठी संततीनिर्मितीची काय आवश्यकता असते? तुमच्या हा प्रश्न विचित्र आहे.

आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवाला प्रत्यक्श कृती करावी लागते.

विवाहानंतर वा प्रेमात पडल्यानंतर मानवांमध्ये आधि इच्छा 'प्रणयाची' होते. त्या इच्छेची पूर्तता झाली कि मग, दुसरी इच्छा -'संततीप्राप्ती' बाबत निर्माण होते. आधीची इच्छा पूर्ण झाली की मग पुढची इच्छा मनात निर्माण होत जातात.

होय

"त्यांच्यात संततीनिर्मितीची इच्छा नाही" हे मूळ निरीक्षण आहे. त्याचे स्पष्टीकरण म्हणून तुम्ही सांगितले की "त्या दोघांनाही प्रणयाचे आकर्शण नसावे". यावर माझे स्पष्टीकरण असे की "संततीनिर्मितीची इच्छा नाही" यावरून "प्रणयाचीच इच्छा नाही" असे खात्रीने सांगता येत नाही. मानवप्राण्याच्या बाबतीत, प्रणयाची इच्छा निर्माण होऊन, पूर्ण होऊनही, संततीनिर्मितीची इच्छा नसणे शक्य असते.

प्रतिसाद

'संतती निर्मीती' हा शब्द चूकीचा आहे. 'संततीप्राप्ती' हा शब्द वापरणे योग्य आहे.

माझ्या प्रतिसादात मी *'प्रणयाचे आकर्शण' हा शब्द लिहीला होता. तिथे *'प्रणयक्रिडेची आसक्ती' असे लिहायला हवे होते.
एखादी 'कृती करणे' व 'इच्छा पूर्ण होणे'. ह्या दोन गोश्टीत मला भेद वाटतो.
'प्रणय' या शब्दाचा अर्थ 'दोन प्राण एकत्र येणं'.
प्रणयाची कृती करत 'केवळ शरीरावर शरीर किती दिवस आदळत बसणार?'
हा असा विचार करून मी म्हटले होते कि ' *प्रणयाचे आकर्शण असते तर 'त्या दृश्टीने'** प्रयत्न झाला असता.'
(**मूल होण्यासाठी)
नित्यनेमाने कृती झाली असेल तर काही कालांतराने मूल होणारच. शाररीक अडचणी असतील तर डॉक्टरांना भेटून सल्ला घेता येवू शकतो. थोडं देवा-धर्माचं देखील केलं असतं. हे भाव त्या वाक्यात होते.

पण हे जग खूप मोठे आहे. कोण कसे वागेल? कोणाला काय वाटेल? ह्याचे आपण आपल्या अल्पमतीने अंदाज बांधणे कितपत योग्य होईल? त्यासाठीच मी माझी धारणा देखील व्यक्त केली होती. तुम्ही त्याकडे दुर्लक्श करीत भावनिकदृश्ट्या शूश्क होवून प्रश्न विचारलात.

मला माझे विचार व मते मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्यात उगीचच औपचारीकता न पाळता, भावनिकदृश्ट्या शूश्क होवून कोणी किसपट काढलेले मला आवडत नाही.

प्रति: प्रतिसाद

प्रणयाची कृती करत 'केवळ शरीरावर शरीर किती दिवस आदळत बसणार?'

हा विचार प्रत्येक मानवाच्या मनात येतोच, याची तुम्हाला खात्री का आहे?

पण हे जग खूप मोठे आहे. कोण कसे वागेल? कोणाला काय वाटेल? ह्याचे आपण आपल्या अल्पमतीने अंदाज बांधणे कितपत योग्य होईल? त्यासाठीच मी माझी धारणा देखील व्यक्त केली होती. तुम्ही त्याकडे दुर्लक्श करीत भावनिकदृश्ट्या शूश्क होवून प्रश्न विचारलात.

हे आधीच सांगायचेत ना!

मला माझे विचार व मते मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्यात उगीचच औपचारीकता न पाळता, भावनिकदृश्ट्या शूश्क होवून कोणी किसपट काढलेले मला आवडत नाही.

मला मात्र तुमचा प्र॑तिसाद आवडला. धन्यवाद.

'संतती निर्मीती' हा शब्द चूकीचा आहे. 'संततीप्राप्ती' हा शब्द वापरणे योग्य आहे.

'निर्मीती' हा शब्द चूकच आहे. मी 'निर्मिती' हा शब्द वापरला आहे. 'प्राप्ती' या घटनेमध्ये वस्तूचे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थानांतर होते. मुले आधीच अस्तित्वात असतात आणि आईवडिलांच्या प्रणयामुळे त्यांचे गर्भाशयात स्थानांतर होते असे काही तुम्हाला वाटते काय?

चांगली माहिती

या प्रश्नांबद्दल लोकांत कायकाय विचार आहेत हे जाणून घ्यायला आवडेल. या जोडप्याची मते त्या दृष्टीने माहितीपूर्ण आहे.

"आम्हाला जबाबदारी नको" असे थोडक्यात म्हटले असते, तर विचार तितकेसे नीट कळले नसते. "जोडप्यांची जबाबदारी असते, पण आम्ही ती झिडकारत आहोत" असा अर्थही निघतो.

येथे "अमुक-अमुक वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी समाजात सांगतात, ती आम्हाला मान्य नाही" असा लाईन-आयटेम विचार कळतो आहे.

- - -
(बाकी "जबाबदारी नको" असा आरोप माझ्यावरही कुटुंबीयांकडून मागे झालेला आहे. प्रेमळ व्यक्तींनी केलेली कान-उघडणी थोडी तरी विचार करण्यालायक असते. पण "जबाबदारी नको" हे खरे की नाही? याबद्दल विचार करताना जाणवते, की विश्लेषण म्हणून हे "जबाबदारी नको" वाक्य अतिरेकी अल्पाक्षर आहे. अल्पाक्षरत्व हा सद्गुण आहे, पण क्रिया करण्यास उपयोगी अशी वास्तववादी गुंतागुंत हरवली, तर तो दुर्गुण होतो.)
- - -

रधों कर्व्यांचा या बाबतीत त्यांच्या पत्नीशी पत्रव्यवहार झाला होता, तो बहुधा उपलब्ध आहे. ("ध्यासपर्व" मध्ये त्याबद्दल उल्लेख आहे.) निपुत्रिक स्थितीतच ते स्वतःची नसबंदी करून घेण्याचा विचार करत होते, आणि त्याबद्दल पति-पत्नीची पत्र-चर्चा झाली. चित्रपटात उद्धृत केलेली वाक्ये गंभीर पण प्रेमळ आहेत. जोडप्याने नसबंदी करण्याचा निर्णय घेतला.

जबाबदारी नको

माझी मुलगी आमच्यामागे दर दोनचार महिन्यांनी कटकटते की मला एक कुत्र्याचे पिल्लू आणून द्या. आम्हाला आणखी एका सदस्याची जबाबदारी नको आहे. आम्ही खालील कारणे देतो.

१. कुत्र्याला लहान मुलासारखे जन्मभर सांभाळायला हवे. ट्रेनिंग द्यायला हवे. त्याचे खाणेपिणे, आजार, डॉक्टर, लसी, इन्शुरन्स सांभाळायला हवा.

२. जो पर्यंत त्याला ट्रेनिंग नाही तोपर्यंत तो घरात घाण करणार. ती साफ करा. जमिनीवर चरे पाडणार, काही तरी चावून ठेवणार म्हणजे नुकसान.

३. त्याला रोज फिरवायला हवे (त्याची तंत्रे सांभाळायला हवीत.) आपल्याला जायचे नसले तरी ही शिक्षा डोक्यावर आली. नोकरी, घर आणि तुला सांभाळून हे आपल्याला झेपणारे नाही.

४. आपण जेथे जातो तेथे सर्वत्रच या कुत्र्याला घेऊन जाता येणार नाही म्हणजे आपल्या जाण्यायेण्यावर निर्बंध आले.

वगैरे वगैरे. थोडक्यात आम्हाला आता आणखी एक जबाबदारी नको.

उद्या मुलीने भावा/बहीणीचा हट्ट धरला तरी बहुधा आमची कारणे यापेक्षा फारशी वेगळी नसतील.

बरेचसे लोक पाळीव प्राण्यांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम देतात तर त्यांच्यात आणि वरील कारणांत एवढा फरक का असावा? मुले आणि प्राणी यांत फरक आहे हे मान्य. प्राण्यांना आपल्या देशाचे जबाबदार नागरीक वगैरे बनण्याची मुभा नसावी. ;-) परंतु माणसाच्या पिल्लाबाबत सर्व विचार इतके उदात्त कसे हे कोडे आहे.

पूर्वी ही जबाबदारी सामाजिक असावी

पूर्वी औरस मुले उत्पन्न करण्याची "जबाबदारी" सामाजिक असावी. येथे "जबाब"दारी असा थोडा तांत्रिक शब्द वापरतो आहे. ज्याला प्रश्न विचारून "जबाबा"ची अपेक्षा असते, त्याची "जबाबदारी" असते.

मुलांना जन्म घातला नाही, तर संयुक्त कुटुंबात पुढच्या पिढीत मिळकत कमी होते. वगैरे. एखाद्या देशात मुले उत्पन्न करायला करात सूट देतात किंवा अक्षरशः बक्षीस देतात. जबाबदारीचे उदात्तीकरण होते. (ते तेव्हा ठीकच.)

या "जबाब"दारीत बदल होत आहे, तर मला ट्रॅक करण्यात रस वाटतो.

पूर्वी औरस मुले उत्पन्न करण्याची "जबाबदारी" सामाजिक असावी

काहीतरी चुकतयं. बहूधा तुम्हाला "पूर्वी औरस मुले उत्पन्न करा" हे सांगण्याची जबाबदारी सामाजिक असावी.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

"उत्पन्न का केली नाही" प्रश्नाचे उत्तर व्यक्तीला द्यावे लागत असे

"अपत्ये उत्पन्न का केली नाही" प्रश्नाचे उत्तर व्यक्तीला द्यावे लागत असे.

समाजातील कोणी सन्माननीय व्यक्ती (उदाहरणार्थ आईवडील) प्रश्न विचारणारे होते, आणि जोडपे उत्तर द्यायला बांधील होते, अशी सामाजिक परिस्थिती होती.

वडीलधार्‍यांना प्रश्न विचारण्यात रस असा : "मुलांनी नातू उत्पन्न केले नाहीत, तर पुढच्या पिढीत संयुक्त कुटुंब कसे चालणार?" अपत्ये होत नसतील, तर पुरुषाने दुसर्‍या बायकोशी लग्न करणे, वगैरे मार्ग उपलब्ध होते.

"का नाही?" प्रश्नाचे उत्तर देताना जोडप्यांना असे निश्चित वाटत असे, की अपत्ये उत्पन्न करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

असा वरील प्रतिसादात मथितार्थ होता.

पूर्वग्रह नको.

प्रियाली, तुमची उत्तरंच इतरांनी दिली पाहिजेत नाहीतर हा भंपकपणा आहे हे तुमचं म्हणणं अतिरेकी वाटतं. त्यांना मित्रांनी विचारलेले प्रश्न काय स्वरूपाचे असतील त्यावरून उत्तरं ठरतात. (थत्तेंनी काल्पनिक मांडणी केलेली आहे) लेखकाने केलेल्या मांडणीमुळे उगाच प्राथमिकता क्रम वगैरे वाटतो. धनंजय यांनी लाईन आयटम स्वरूप अधोरेखित केलं आहे हे देखील पटतं.

मुलं असणं हा आनंद असतो, पण त्याबरोबरच अनेकांना ते प्रचंड ओझं वाटू शकेल हे मी समजू शकतो. अशा महत्त्वाच्या निर्णयांबाबत फायदेतोटे यांची तुलना करूनच त्यांनी तो घेतला आहे हे स्पष्ट असावं. मुलं होणं इतकं सार्वत्रिक आहे की त्यापेक्षा वेगळी वागणूक दिसली की समाज आपले निकष लावून प्रश्न उपस्थित करतो. पूर्वग्रहाशिवाय विचार करणं महत्त्वाचं. कारण पूर्वग्रहांइतकं भंपक दुसरं काही नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असे कसे?

प्रियाली, तुमची उत्तरंच इतरांनी दिली पाहिजेत नाहीतर हा भंपकपणा आहे हे तुमचं म्हणणं अतिरेकी वाटतं.

माझी उत्तरेच द्यायला हवीत असे मी कुठेच म्हटलेले नाही परंतु ही उत्तरे मला भंपक वाटत असतील तर त्यात अयोग्य काय आहे?

अशा महत्त्वाच्या निर्णयांबाबत फायदेतोटे यांची तुलना करूनच त्यांनी तो घेतला आहे हे स्पष्ट असावं.

स्वतःचे फायदे तोटे ठीक आहेत पण वरील दांपत्य तसे म्हणत नाही. ते जगाचे फायदे तोटे बघत उदात्तता आणत आहेत जे माझ्यामते भंपक आहे.

पूर्वग्रहाशिवाय विचार करणं महत्त्वाचं. कारण पूर्वग्रहांइतकं भंपक दुसरं काही नाही.

इथे पूर्वग्रह आहे हे मानणे हा ही भंपक पूर्वग्रह मानता येईल.

मुलं असणं आनंद असतो आणि त्याचे ओझेही वाटू शकते.

मला मूल नको कारण मला ते झेपणार नाही हे उत्तर योग्य असेल पण मला मूल नको कारण मग शाळेतल्या ६० विद्यार्थ्यांच्या वर्गात ६१ वा विद्यार्थी वाढेल किंवा बिल्डींगमधल्या सायकल स्टँडमध्ये एक सायकल वाढेल अशी उत्तरे भंपकच वाटतात.

डबल इन्कम घेणारी कुटुंबे आजही 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' असा विचार करतात तेव्हा मला तो भंपकपणाच वाटतो.

अर्थात, तुम्हाला तसे वाटत नसेल तर मी काही करू शकत नाही. :-)

निर्णयावर उडी

अयोग्य नाही, प्रत्येकाला काय वाटेल ते वाटणं याचं व ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहेच. पण एका जोडप्याच्या निर्णयाबद्दलचे तिसऱ्याने मांडलेले विचार पाहून 'जबाबदारी टाळायची आहे असं सरळ का सांगत नाहीत' असं म्हणणं म्हणजे निर्णयावर उडी घेणं (जंपिंग टू कन्क्लुजन) वाटलं. आणि जगाचे फायदे बघणारे, उदात्त विचार करणारे लोकं आहेत यावर विश्वास ठेवणं जड का जावं? या जोडप्याची उदात्तता दुर्दिश (मिसगायडेड) आहे असं म्हणा हवं तर.

'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' असा विचार करतात तेव्हा मला तो भंपकपणाच वाटतो.

थोडं काळजीपूर्वक (लिहिण्यापूर्वी दहा वेळा - ह. घे.) वाचावं. यावर आमचा विश्वास नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. भंपक विचार कोट करून त्यांना नकार देणं यात भंपकपणा नाही.

पूर्वग्रहाविषयी काही बोलणं हेच पूर्वग्रहदूषित आहे हे वाक्य न्यूस्पीकमधून उचललं आहे का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जबाबदारी टाळणे

पण एका जोडप्याच्या निर्णयाबद्दलचे तिसऱ्याने मांडलेले विचार पाहून 'जबाबदारी टाळायची आहे असं सरळ का सांगत नाहीत' असं म्हणणं म्हणजे निर्णयावर उडी घेणं (जंपिंग टू कन्क्लुजन) वाटलं. आणि जगाचे फायदे बघणारे, उदात्त विचार करणारे लोकं आहेत यावर विश्वास ठेवणं जड का जावं?

एक तर मला यात जगाचा कोणताही फायदा दिसत नाही. दुसरे म्हणजे येथे हे जोडपे खरा प्रकार दडवत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जेव्हा गोष्ट तिसर्‍या व्यक्तींची चाललेली असते आणि त्याच्याशी आपल्याला देणेघेणे नसते तेव्हा माणसे चटकन निर्णयावर येतात. येथेही त्या दोन्ही व्यक्तींत काही अडचण नाही हे नक्कीच कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे न पाहता चर्चाप्रस्तावक आणि त्याच्या मित्राने ठरवले आहे. उपलब्ध पुराव्यांवरूनच तिर्‍हाईताविषयी मनुष्य निष्कर्ष काढतो.

उदा. रस्त्यातून एखादा माणूस भेलकांड्या खात चाललेला असेल तर असेल बेवडा मला काय त्याचं? असा विचार करणारी माणसे अधिक दिसतात. माझा येथे पूर्वग्रह आहे असे विधान तुम्हीही झटक्यात केलेत. तसा पूर्वग्रह कोणता हे मला कळलेच नाही. ख. व.तून कळवा. :-)

आम्ही चंगळवादी नाही पण आम्हाला सुखाचा मार्ग हवा, आम्ही प्रसूती वेदनांना घाबरत नाही पण रिस्क नको अशी गो-नो गो विधाने एका वाक्यात करणारी मंडळी काहीतरी टाळंटाळ करत असतात (हेच मी माझ्या हाताखाली काम करणार्‍यांबद्दलही म्हणेन.) असे मला वाटते.

हो आम्ही चंगळवादी आहोत किंवा मला प्रसूती वेदनांची भीती वाटते असे ठाम उत्तर का देता येऊ नये?

या जोडप्याची उदात्तता दुर्दिश (मिसगायडेड) आहे असं म्हणा हवं तर.

त्या मिसगायडेड उदात्ततेची हेटाळणी करण्यासाठीच साधा शब्द भंपकपणा असा वापरला आहे. पाळीव प्राणी का नको या उदाहरणातील एकही वास्तविक कारण या दांपत्याच्या बोलण्यात येत नाही याचे मला मनापासून आश्चर्य वाटले आहे.

थोडं काळजीपूर्वक (लिहिण्यापूर्वी दहा वेळा - ह. घे.) वाचावं. यावर आमचा विश्वास नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. भंपक विचार कोट करून त्यांना नकार देणं यात भंपकपणा नाही.

काळजीपूर्वक वाचूनच मत दिले आहे कारण जेव्हा अशी कारणे पुढे कराविशी वाटतात (यात वंशवृद्धी हे धरलेले नाही) तेव्हा त्यातला भंपकपणा गृहित धरलेला आहे. अन्यथा,स्त्री ही अनंत काळची माता आहे वगैरे वाक्याचा प्रयोग या दोघांच्या मातोश्रीही आजच्या काळात न करण्याची शक्यता मला अधिक वाटते.

पूर्वग्रहाविषयी काही बोलणं हेच पूर्वग्रहदूषित आहे हे वाक्य न्यूस्पीकमधून उचललं आहे का?

माझे काही पूर्वग्रह आहेत हे तुम्ही धरून चाललात एवढेच मला सांगायचे होते. मी न्यूस्पीक वाचलेले नाही.

खव

रागावू नका. अधिक चर्चा खवमधून.
(न्यूस्पीक हे पुस्तक नाही, '१९८४' मधली भाषा आहे...)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की बोलो प्रती निभओगी क्य

१) भारताच्या आणि एकूणच जगाच्या वाढत्या पैदाशीत भर घालण्याची आमची इच्छा नाही. उलट आमच्या निर्णयाने जागतिक लोकसंख्येतून तीनजण कमीच होणार आहेत. ते चांगलेच नाही का?
१A) समुद्रातून चमचा पाणी काढले काय किंवा एक चमचा पाणी भरले काय समुद्राला कांही फरक पडणार नाही. पण ....... तुम्हाला नक्कीच पडेल.
२) आम्ही आमच्या आयुष्यात मानसिक/शारीरिक पातळीवर समाधानी आहोत. मुले जन्माला घालण्यात सुख असते, असे आम्ही मानत नाही.
२ A) मूल असण्याचे काय सुख असते हे तुम्ही उपभोगलेच नाही तर तुम्ही असा युक्तिवाद करू कसे शकता?
३) पूर्वजांप्रती कर्तव्य, वंश चालवणे किंवा 'स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते' अशा समजुतींवर आमचा विश्वास नाही.
3A ) स्त्रीला मुलगा/मुलगी झाले तर या म्हणी प्रमाणे आपले महत्व कमी होईल या भीती पोटी पुरुष असा निर्णय घेतो मग स्त्रीलाही ही भूमिका घ्यावी लागते.
४) प्रसूती वेदना, अपत्याचे संगोपन, त्यांच्यासाठी गुंतवणूक, भविष्याची तरतूद याला आम्ही घाबरत नाही, पण आम्हाला ती रिस्कही नको आणि उद्या मुलांनी ' झेपत नव्हते तर जन्माला का घातलेत?' असे विचारणेही आम्हाला नकोय.
४A) हा शुद्ध पलायनवाद झाला. मुळात मुले असा प्रश्न आई वडिलांच्या अतिरेकी वागण्या मुळे विचारतात आणि त्याचे प्रमाण०.०००१% इतके सुद्धा नसेल.
५) आम्ही चंगळवादी नाही, पण सुखाने जगण्याचा मार्ग प्रत्येकजणच शोधतो. त्याला दोष देता येणार नाही. आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे.
५A) समाजोपयोगी उपक्रमांना मदत करत असतो. हाही त्याच सुखाचा भाग आहे. आपणाला मुलंच नाही तर हा युक्तिवाद तुम्ही कशाच्या तुलने आधारे करतात .
६) अजून २५-३० वर्षांनी आमच्या आयुष्यात काही पोकळी येणार नाही. आम्ही आहे ते आयुष्य संपवून शांतपणे मातीत विलीन होऊ.
6A ) मूल जन्म न देण्या चे तुमच्या हातात आहे याच बरोबर मरण सुद्धा तुमच्या हातात आहे असे तुम्हाला वाटते काय?
७) दत्तक घेणार नाही, पण गरजू अनाथ मुलांना मदत करु. इतरांच्या मुलांवर प्रेम करु.
७A) आपल्याला मुलांवर प्रेम कसे करतात प्रेम काय असते हेच जर माहित नसेल तर इतरांवर त्याचा प्रयोग कसा करणार
८) बाहेरच्या जगात स्वार्थ, वासना, भ्रष्टाचार, अनैतिकता यांचा इतका बुजबुजाट झाला आहे, की त्या स्थितीत नव्या पिढीला आपण काही चांगले देऊ शकू का, याबाबत आम्ही संभ्रमित आहोत. अशा वेळी सगळे नवे घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकणे आम्हाला पटत नाही.
८A) या बुजबुजाट परिस्थितीत मुलांना जन्म आणि त्याने चांगले पालनपोषण करून चांगले संस्कार करणे आणि नवे आव्हान स्वीकारण्यास लावणे हे न करता क्षणभंगुर आनंदात तुम्ही इति कर्तव्य मानता. आणि आखरी हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन की बोलो प्रती निभओगी क्या तब भी अपनी जवानी की
thanthanpal.blogspot.com

तसे नसते

२ A) मूल असण्याचे काय सुख असते हे तुम्ही उपभोगलेच नाही तर तुम्ही असा युक्तिवाद करू कसे शकता?

अमली पदार्थांचे सेवन करण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय?
भ्रष्टाचार करण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय? 'नाही रे' वर्गाची बाजू न घेण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय?

आपण गांधारी सारखी डोळ्यावर बेइमनीच्या तरफदारीची पट्टी बांधल्या म

अमली पदार्थांचे सेवन करण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय?
भ्रष्टाचार करण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय? 'नाही रे' वर्गाची बाजू न घेण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय?

भ्रष्ट्राचारा मुळे काय नुकसान होते हे मी नाही तर सर्व भारतीयांनी अनेकदा देशात होणारे दहशदवादी हमले, शेअर मार्केटचा घोटाळा, भूखंड घोटाळा यामधून अनुभवले आहे त्या मुळे आपण गांधारी सारखी डोळ्यावर बेइमनीच्या तरफदारीची पट्टी बांधल्या मुळे किंवा त्यातील साखळीतील एक कडी असल्या मुळे असले प्रश्न आपण विचारात आहात. असे वाटते. नाही रे' वर्गाची बाजू न घेण्यात काय सुख असते ते तुम्ही उपभोगले आहे काय? ते सुख मी उपभोगले नाही म्हणूनच आज मी जगात सर्वात सुखी माणूस आहे. चंगळवादाचे काय नुकसान आहे हे सुद्धा मी आपल्या सारख्यांच्या वागण्यावरून समजू शकतो. हा सामाजिक बांधिलकीचा प्रश्न आहे. त्याचा वयक्तिक मुल न होण्याच्या प्रश्नाशी संबंध नाही.

thanthanpal.blogspot.com

तसे नाही

"भ्रष्टाचार करणार्‍याला सुख मिळते, ते तुम्ही अनुभवलेले नसल्यामुळे तुम्ही भ्रष्टाचार करीत नाही अन्यथा तुम्हीही कराल" असा सिद्धांत होता, असो.
माझा मुद्दा असा आहे की एखाद्या कृतीत काय सुख/दु:ख असते ते ती कृती न करताही समजू शकते.

भ्रष्टाचार - बाह्य

भ्रष्टाचार ही बाह्य गोष्ट आहे. "मूल असण्याचे काय सुख असते हे तुम्ही उपभोगलेच नाही तर तुम्ही असा युक्तिवाद..." याच्या प्रतिवादाला हे उदाहरण चुकीचे आहे.

"आमली पदर्थाचे सेवन.." हे आंतरीक आहे (मूल असण्याचे सुख हे सुद्धा आंतरीक आहे) त्यामूळे हे उदाहरण प्रतीवादाला योग्य आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

समजले नाही

हे बाह्य/आंतरिक काय असते?

दोन गट -

अ-
ताजमहल (अथवा इतर काहिही भव्य/अप्रतीम) पाहुन मिळनारे सुख , सुन्दर संगीत ऐकन्याचे सुख, फुलाच्या सुवासाने मिळनारे सुख , स्पर्श सुख ,
पदार्थ सेवन करण्याचे सुख , माता बनन्याचे सूख ..वगैरे.

ब -
खोदकाम करणे , मुलांना शिकवणे , निबंध लिहिने , भ्रष्टाचार करणे , खोट बोलणे , कांदा चिरणे किंवा असेच अनेक ...

अ प्रकारातील उदाहरणे तुम्हाला जो प्रतीवाद करायचा आहे त्याला योग्य आहेत.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

अजूनही समजले नाही

बाह्य आणि आंतरिक कृतींची वर्गवारी मान्यच आहे परंतु त्या दोन्हींतून मिळणारे सुख शेवटी आंतरिकच असते ना?

शेवटी जाल तर ...

| परंतु त्या दोन्हींतून मिळणारे सुख शेवटी आंतरिकच असते ना...

एवढा शेवट केलात तर चर्चा कशी होणार :) .

शेवटी प्रत्येक गोष्टीचं कारण हे मेंदुच असतं पण म्हणुन तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही ओफीसला बाइक ने का जाता तर तुम्ही
"माझ्या मेंदुला अस वाटतं " असं उत्तर देत नाहीत.

किती रूट लेवलला जायचं ते आपण ठरवा . :) पण इन्द्रियांद्वारे मिळनार्‍या सुखांमधे "भ्रष्टाचाराचे सूख " येत नाही.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर