ऐच्छिक अपत्यहीनता.
आजकाल समाजांत DINC (डबल इन्कम् नो चाइल्ड्) चे फॅड येऊ लागले आहे. या (डिंक्) विचारसरणीची जोडपी अपत्याकडे आर्थिक बोजा, जबाबदारीचे ओझे, मौजमजेवरचे बंधन व करीयरमधील अडथळा म्हणून पाहात असतात. हा अपत्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन झाला. सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास अपत्य हे आयुष्यांत जीवनाच्या अखंडत्वाचा अनोखा अनुभव देते. अपत्यामुळे माणसांमध्ये आपलेपणा, त्यागाची वृत्ति, सहनशीलता, इत्यादि गुण विकसित होतात, जुन्या आणि नव्या पिढींतील माणसे अधिक जवळ येतात व माणसांना समाजासाठी कर्तृत्ववान् व्यक्ति घडवण्याची व त्यायोगे नावलौकिक मिळवण्याची संधि मिळते.
'डिंक' विचारसरणीच्या समर्थनासाठी वाढत्या लोकसंख्येसारखी सामाजिक कारणे पुढे केली जातात. हा स्वतःच्या पळपुटेपणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मुळांत 'डिंक्' विचारसरणी ही जबाबदारी टाळण्याच्या आत्मकेंद्रित वृत्तींतून निर्माण झालेली आहे. अशा विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे.
आपणांस कय वाटते?
Comments
विचार करण्याजोगे!
शरद [कि शरद् ? ] कोर्डे यानी मांडलेले जर सत्य असेल तर हे सर्व विचार करण्याजोगे आहे.
नविन पिढी खरेच असा विचार करत असेल तर अतिशय गंभीर बाब आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी - किंवा स्वच्छंद पणासाठि - हे असले अघोरी विचार बाळगणे निश्चितच मुर्खपणाचे आहे. ' तुझ्यामुळे मी झाले आई ' म्हणणा-या आया कुठे आणि ह्या आया कुठे?{ अपत्य नसल्यामुळे त्या आया होतच नाहित हे अलाहिदा. ]
असा विचार बाळगणा-यांचा धि:कार करावा कि त्यांचे समूपदेशन करणे आवश्यक आहे ?
वैयक्तिक
मूल होऊ देणे न देणे हा त्या दांपत्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे
"विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे." ही टीका करण्याचा त्रयस्थ माणसाला काय हक्क आहे?
सामाजिक भान!
शरदजी आपण जो विचार इथे मांडला आहे तो खूपच एकांगी आहे. मूल जन्माला घातल्यास त्याचे नीट पालनपोषण करणे हे कोणत्याही मात्यापित्याचे आद्य कर्तव्य असते.तेव्हा मूल जन्माला घालून त्याची नीट काळजी घेता येणार नाही ह्या कारणास्तव असो अथवा जाणीवपूर्वक कुणाला अशा तर्हेचे (अपत्यहीन)आयुष्य जगायचेच असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय मानून त्याचा आदरच केला पाहिजे.
र.धों.कर्व्यांचे कुटुंबनियोजनावरील पुस्तक वाचून मी देखिल असेच ठरवले होते की वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याच्या प्रक्रियेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून लग्न केले तरी अपत्य होऊ न देणे. अर्थात तो निर्णय मी स्वतः अंमलात आणू शकलो नाही त्याची तीन महत्वाची कारणे होती. १) मी माझ्या बायकोच्या मताचा आधी विचारच केला नव्हता. तिच्या मनाविरुध्द जाऊन माझ्या निर्णयावर ठाम राहिलो असतो तर तो तिच्यावर अन्याय ठरला असता.त्याऐवजी लग्नच न करणे उचित ठरले असते. २) समजा मी माझा निर्णय माझ्या बायकोला पटवून देऊ शकलो असतो तरीही चारचौघात वावरताना अपत्यहीन बायकांना ऐकून घ्यावे लागणारे टोमणे ती सहन करू शकणार नव्हती. आणि ३) मी एक पूर्ण पुरुष आहे आणि माझी पत्नी ही देखिल एक पूर्ण स्त्री आहे हे सिध्द करण्यासाठी मला माझा निर्णय बदलावा लागला आणि फक्त एकाच अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घ्यावा लागला.(तो मात्र मी पाळला!)
मी केले ते आदर्श आहे असा माझा मुळीच दावा नाही;मात्र जर काही जोडपी असा अपत्यहीन राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेत असतील आणि त्याचे ठामपणे पालन करू शकत असतील तर माझा त्यांना मानाचा मुजरा आहे. अहो जगाची लोकसंख्या ज्या झपाट्याने वाढते आहे त्याचा विचार केल्यास समाजात अशा विचारांची माणसे जास्त प्रमाणात निर्माण होणे आवश्यक आहे असे माझे प्रांजळ मत आहे. जे मी करू शकलो नाही ते कुणीतरी जाणीवपूर्वक आणि इमानेइतबारे करत असेल तर ती मानवजातीची सेवाच ठरेल आणि असे लोक माझ्यासाठी नेहमीच आदर्शवत असतील. तेव्हा कृपा करून अशा लोकांना जबाबदारी टाळणारे,पळपुटे वगैरे संबोधून त्यांची हेटाळणी करणे थांबवा ही विनंती. त्यांच्या ह्या निर्णयाचे दूरगामी परिणाम हे मानवाच्या भल्यासाठीचेच ठरतील ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.
कोर्डेसाहेब, माझी उत्तरे..
आजकाल समाजांत DINC (डबल इन्कम् नो चाइल्ड्) चे फॅड येऊ लागले आहे.
मग पूर्वी एकेका घरात आठ आठ, दहा दहा मुलं व्ह्यायची, त्याला आपण (लेस इन्कम, मेनी चिल्ड्रन!) चे फॅड किंवा आचरटपणा म्हणणार आहात का? बोला कोर्डेसाहेब! ;)
हा अपत्याविषयी नकारात्मक दृष्टीकोन झाला.
हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण??
हा स्वतःच्या पळपुटेपणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
एखाद्या जोडप्याने आपापसात ठरवून मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला असेल तर तो पळपुटेपणा ठरतो, हा माझ्या मते एक मोठ्ठा विनोद आहे!
अशा विचारसरणीची जोडपी कितीही उच्चविद्याविभूषित असली तरी बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे आहेत असेच म्हणायला हवे.
आपणांस कय वाटते?
कोर्डेसाहेब,
जोडपी उच्चविद्याविभूषित असोत वा अशिक्षित असोत. मुल होऊ देणं किंवा न देणं हा माझ्या मते पूर्णत: त्यांचा खाजगी मामला आहे. त्यांच्या निर्णयाबद्दल 'फॅड', 'नकारात्मक दृष्टीकोन', 'पळपुटेपणा', 'आत्मकेंद्रित वृत्ती', 'बाल्यावस्था न संपलेली अपरिपक्व माणसे' असले रिमार्क्स पास करून त्यावर जाहीर चर्चा करणे हे माझ्यामते असभ्यपणाचे लक्षण आहे!
तात्या.
सहमत आहे
मुले होऊ द्यायची की नाही , किंवा किती, हा निर्णय त्या जोडप्याचा आणि फक्त त्यांचाच आहे. समाजाने फक्त उपदेश (गाईडलाईन) द्यावा, पण ज्यांचा निर्णय आहे, त्यांचा निर्णय कसाही असो, तो स्वीकार करावा.
सन्जोप राव
वैयक्तिक.
मुलं होऊ द्यायची किंवा नाही हा प्रत्येक दांपत्याचा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्याबद्दल इतर कुणीही काहीही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
माधवी.
नियोजन
एखाद्याला नसेल झेपत तर दोघानी मिळून तसा निर्णय घेतला तर काय चूक. मूल जन्माला घालण्यापेक्षा ते वाढवणं, सुसंस्कृत करणं अवघड असतं. असं असताना सर्वच जोडप्यांच्या ठायी तेवढी इच्छाशक्ती असेल असं नाही. किंबहुना जन्म देऊन मग त्या मुलांची हेळ्सांड करण्यापेक्षा तुम्ही म्हणता त्या पुळपुटेपणामुळे जरी मूल होऊ दिलं नाही तरी काय् बिघडलं?
स्वतःची कुवत, आवडनिवड ओळखता आली म्हणजे चांगलच् आहे. आजीला नातू खेळवायचाय आणि घरात बाळकृष्ण नांदवायचाय म्हणून मूल जन्माला घालण्यापेक्षा स्वतःला त्याची जबाबदारी कितपत व्यवस्थित् पार् पाडता येईल ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
देशाची लोकसंख्या हे कारण हास्यास्पद आहे. कारण आज चीनसारख्या देशाला तरूण मनुष्यबळाची कमतरता जाणवत् आहे.
आपला..
एक-अपत्यवादी आभ्या
सत्य??
मी ज्या प्रतिक्रियेमुळे माझी प्रतिक्रिया लिहायला घेतली तीच कुठेतरी गायब् झाली. असो.
हा विषय अगदीच व्यक्तिगत नाहीये. कुठे न कुठेतरी समाजाशी निगडीत आहे.(उदा: चीन परत् एकदा.) शरद म्हणताहेत ते अगदी सर्वसामान्यपणे खरं नसलं तरी त्यांनी नक्कीच असं जोडपं पाहीलं असणार् आहे जे जबाबदारी झटकण्यासाठी मूल् जन्माला येऊ देत् नाहीये.
वैयक्तिक
लग्न करावे की नाही, अपत्य असावे की नाही हा संपूर्णे वैयक्तिक प्रश्न आहे. मूल वाढवणे ही जबाबदारीची गोष्ट आहे. समजा कुणाला ही जबाबदारी नको असेल तर मुलांचे वाईट रीतीने संगोपन करण्यापेक्षा मूल नको हा निर्णय नक्कीच योग्य वाटतो. असे लोक अपरिपक्व असतात ह्याच्याशी सहमत नाही.
कोर्डे साहेब
कोर्डे साहेब,
छान मुद्दे मांडलेत. मुलांपेक्षा करिअर महत्वाची वाटणे हा दैवदुर्विलास आहे. पण पैशाची हाव सुटत नाही. आणि त्याच त्याच गुर्हाळात हे लोक पिळले जातात.
मरतांना पैसाही बरोबर नेता येत नाही. आरती प्रभू यांनी म्हटल्याप्रमाणे अवस्था होते --
"अंत झाला अस्ताआधी , जन्म एक व्याधी"
"वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी"
आपला,
(सहमत) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
असहमत
करीयर ही केवळ पैशाच्या हावेसाठी केली जात नाही. कामाचाही एक आनंद असतो. आपल्या आवडत्या कामासाठी मनमुसराद वेळ देता यावा म्हणूनही काही लोक अपत्यहीनतेचा स्वीकार करतात आणि त्यामध्ये मला काहीही अयोग्य वाटत नाही. मुले झाली की मुलांसाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. मग करीयरसाठी/कामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही आणि मुलांसाठी वेळ देता येत नाही अशी रुखरुख मनांत कायम राहण्यापेक्षा करीयर वा मुले यापैकी एकच स्विकारणे कोणाला योग्य वाटत असेल तर त्याला पळपुटेपणा कसे म्हणावे? आजकाल नोकरी म्हणजे ८ ते ५ अशा ठराविक वेळात काम करणे असे राहिलेले नाही. १०-१२ तास नोकरीमध्ये, शिवाय जाण्यायेण्यात गेलेला वेळ ह्या सगळ्याचा विचार करता मुलांसाठी वेळ काढणे काहींना जमत नसेल आणि म्हणून परस्परांत विचार करून त्यांनी अपत्यहीनतेचा निर्णय घेतला असेल तर त्याला पळपुटेपणा कसे म्हणावे? लग्न झाले म्हणजे पाळणा हाललाच पाहिजे हा नियम आता कालबाह्य होत आहे, आणि त्यात गैर काहीही नाही. अपत्यांमुळे जीवनाच्या अखंडत्वाचा अनुभव मिळत असेलही. पण हा अनुभव घेण्याची गरज प्रत्येकाला वाटलीच पाहिजे असे नाही.
कोर्डेकाकांनी एखादा चर्चाविषय ऐरणीवर घेतल्यावर, त्यावर अनेकांनी पूरक, सहमती/असहमतीदर्शक विधाने केल्यावर, ते वाचून कोर्डेकाकांना त्यांच्या मूळ मतामध्ये बदल करावासा वाटला का? हे जरूर सांगावे. नाहीतर चर्चाविषय सोडून दिल्यासारखे होईल.
थोडं थांबा.......
एक-दोन दिवसांत अजून काही प्रतिसाद येतात का ते पाहून मी माझे म्हणणे मांडीन.
अर्थात
जरूर. मी थांबेन. मात्र ह्या आधीच्या चर्चाप्रस्तावांबद्दलही माझे हेच म्हणणे आहे. उदा. लैंगिक शिक्षण वा वेगळा विषय असावा का? ह्या चर्चेवर काहींनी आपली मते मांडली, मात्र त्यार् तुम्ही तुमच्या मतात बदल झाला का? का झाला? का झाला नाही? वगैरे काहीही न लिहिता चर्चा सोडून दिलीत. असो.
सहमत..
मात्र त्यार् तुम्ही तुमच्या मतात बदल झाला का? का झाला? का झाला नाही? वगैरे काहीही न लिहिता चर्चा सोडून दिलीत. असो.
वरदाजींच्या मताशी सहमत..
(व्यक्तिगत रोख असलेला मजकूर संपादित केला आहे)
तात्या.
चर्चेवर प्रतिक्रिया
वरदा यांस,
सर्वसाधारणपणे मी जेव्हा एखाद्या चर्चाप्रस्तावावर माझे मत मांडतो त्यावेळी प्रस्ताव मांडणार्याला आपल्या मतांत फरक करावासा वाटला की नाही असे कधी विचारले नाही. त्यामुळे माझ्याकडून तशा प्रकारची अपेक्षा असेल असे वाटले नाही. पण तुम्ही मुद्दाम विचारणा केल्यामुळे मी माझी प्रतिक्रिया कळवीत आहे.
आलेल्या प्रतिसादांत अनेक असहमतीदर्शक विधाने असली तरी त्यांत मुख्य मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्य हा आहे. माझ्या मते लग्न व अपत्य या गोष्टींना सामाजिक परिमाणही आहे. शिवाय माझ्या लेखांतील एक मुद्दा अपत्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन असावा हाही आहे. अपत्याकडे liability म्हणून न पाहाता human resource म्हणून पाहावे व त्यांतून समाजाला asset ठरेल अशा व्यक्ति घडवावी. काही फारशा अनुकूल स्थितींत नसणारी जोडपीही हे करीत असतात. त्यांत त्यांचा स्वार्थ असला तरी समाजाचाही फायदा होतो. मग सुस्थितींत (Double Income) असलेल्या जोडप्यांनी या बाबतींत उदासीन का रहावे?
लैंगिक शिक्षणाच्या बाबतींत मी माझ्या लेखांत प्रामुख्याने 'उत्कट'तेचा (कृपया मूळ लेख पहावा) सहसा लक्षांत न येणारा मुद्दा संदर्भासहित मांडला आहे . आलेल्या प्रतिसादांत त्यावर मतप्रदर्शन नाही. लेखाच्या शेवटी लैंगिक शिक्षणाचे स्वरूप ठरवतांना मानसशास्त्रांतील अत्याधुनिक संशोधनाची मदत घ्यावी असे म्हंटले आहे. यावरून माझी आग्रही भूमिका नाही हे लक्षांत येईल.
(आपले मतपरिवर्तन व्हावे असा आग्रह नाही)
सहमत!
वरदा यांच्याशी १००% सहमत
माझे प्रश्न
अपत्य असावे कि नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. चर्चा विषया वाचून काही प्रश्न मनात आले. ते येथे विचारत आहे...
माझं मत!
माझ्या मते जो चुकून होतो, (उदा पडल्याने, किंवा काही चुकीचं औषध खाल्ल्याने, किंवा अन्य कुठल्या कारणाने) तो गर्भपात, आणि जी डॉक्टरी देखरेखीखाली मुद्दामून केली जाते ती भृणहत्या!
आपला,
तात्या कोर्डे!
मुद्दा..
समजा एखाद्या स्त्रीवर बलात्कार झालाय, आणि त्यामुळे तिच्या गर्भी एक भृण राहिला. तर तिने त्या गर्भातील भृणाला संपवले, तर ते चांगले की वाईट ?
मुद्दा चांगले किंवा वाईटचा नसून गर्भपात आणि भृणहत्येचा आहे. मी वर सांगितल्याप्रमाणे जी मुद्दामून आणि जाणूनबुजून केली जाते ती भृणहत्या, आणि जो चुकून होतो तो गर्भपात.
समजा तो गर्भ ३ महिन्यांच्या आधी संपवला तर ? तीन महिन्यांनंतर संपवला तर ? काही फरक आहे का ?
माझ्या मते नाही.
जाऊ दे रे
जाऊ दे रे मिलिंदा,
मला जेवढी माहिती होती तेवढी दिली.
आता अजून किती पिडशील? ;)
तात्या.
चर्चेवरील माझी प्रतिक्रिया
आपण नेहमी असे विषय चर्चेला घेता, आणि नंतर तिथून निघून जाता.......
वरदा यांनी विचारणा केल्याप्रमाणे त्यांच्या प्रतिसादावर मी त्यांना उत्तर दिले आहे ते पहावे.
आपापसातला प्रश्न.
मुले होऊ द्यायची की नाही हा पतीपत्नीतला आपापसातला प्रश्न आहे. या प्रश्नाशी समाजाचा काहीही संबंध नाही असे मला वाटते.
ईश्वरी.
का?
हे मान्य केले तरी अश्या बाल्यावस्थेतल्या माणसांना मुले न झालेलीच चांगली, नाही का!
चाणक्य यांनी माणसांना मुले व्हावीशी का वाटतात असा प्रश्न विचारला आहे, त्याचे थोडक्यात उत्तर द्यायचा प्रयत्न करते. कोणत्याही प्राण्याला आपला वंश पुढे वाढावा असे 'वाटत असते'. असे न वाटणारे 'प्राणी' जगाच्या सुरुवातीलाच नामशेष झाले! हे वाटणे म्हणजे एखादी भावना, विचार असे नसून नैसर्गिक सहजप्रेरणा असते. म्हणजे मेंदूतील सॉफ्टवेअर नसून हार्डकोड असतो असे म्हणता येईल. असे असताना मनापासून आपल्याला मुले नकोत असे कसे वाटू शकते? याचे शास्त्रज्ञांना प्रयोगांतून दिसणारे उत्तर म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. उंदरांमध्ये एका पिंजर्यात खूप उंदीर झाले तर त्यांना ताण येतो, ताणातून उद्भवणारे मानसिक आजार होतात; लेमिंग या मूषकवर्गातील प्राण्यात अतिप्रजनन झाले तर नैसर्गिक स्थितीतही (म्हणजे पिंजर्यात नाही) अतिताणामुळे ते दिशा फुटेल तिकडे पळत राहतात व मरतात! तसेच अतिलोकसंख्येमुळे अपत्य हवेसे वाटण्याची नैसर्गिक सहजप्रेरणा कमी होते आहे. आम्हाला मुले नकोत म्हणणारे लोक ओसंडून वाहणार्या शहरातले असतात. मुले म्हणजे आधीच ताणलेल्या आयुष्यात आणखी एक पीळ असे त्यांना वाटल्यास नवल नाही.
मुले असावीत की नसावीत, लग्न करावे की नाही असले प्रश्न खरोखर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यातले आहेत. समजा या चर्चेतून मुले असायलाच हवीत असे निष्पन्न झाले, अगदी तसा कायदा झाला तरी ज्यांना ती नको आहेत त्यांच्याकडे ती होणे हे त्या मुलांच्या दृष्टीनेही वाईटच असे मला वाटते. चर्चेतून विचाराभिसरण होते ते चांगलेच आहे, पण त्याहून जास्त काही नाही.