जर रेडा दूध देतो तर म्हैस दूध देते

हल्लीच्याच एका "तर्कक्रीडा" सदरात "जर-तर" वाक्यांबद्दल चर्चा झाली होती. त्यावरून असे लक्षात आले, की व्यवहारातल्या "जर-तर" विधानांचे तर्कशास्त्रातल्या गणिती भाषेत रूपांतर करण्याचे दोन वेगवेगळे प्रकार रूढ आहेत.

- - -
पहिले भाषांतर
तर्कक्रीडेच्या संदर्भात श्री. यनावाला यांनी एक गणिती-भाषांतर सांगितलेलेच आहे :

विधान P: अ च्या हातात ससा आहे.
Q; अ पारधी आहे.
P--->Q :जर अ च्या हातात ससा आहे तर अ पारधी आहे.
या जोड विधानाचा अर्थ असा की ज्याच्या हाती ससा आहे तो पारधी आहेच.मात्र तोच पारधी आहे असे नव्हे. हाती ससा नसलेले अनेक पारधी असतील.
* वरील वाक्यांत P & Q सत्य असतील तर P--->Q सत्य असते हे स्पष्ट आहे.
* P सत्य , Q असत्य असेल तर P----> Q असत्य असते.
* P असत्य , Q सत्य असेल तर P--->Q सत्य असते.
*P &Q दोन्ही असत्य असतील तरीही P---->Q, सत्य असते.

आता आपण हे विधान घेऊया :
(अ) ज्याच्या P{हातात रेड्याचे दूध आहे} तो Q{वांझ मायबापांचा औरसपुत्र आहे}.
(शेती-गोठे यांच्याशी फार संबंध आजकाल येत नाही. म्हणून येथे स्पष्टीकरण देऊया - रेड्यांपासून दूध मिळत नाही. शिवाय "वांझ मायबाप" म्हणजे "औरस-अपत्य नसणारे" असेच लोक असतात. येथे P नित्य असत्य आहे आणि Q नित्य असत्य आहे.)
*P &Q दोन्ही असत्य असतील तरीही P---->Q, सत्य असते.
या गणिती मांडणीतून आपल्याला दिसते, की वरील विधान सत्य आहे.

थोडा अधिक विचार करता आपल्याला दिसते, की "ज्याच्या हातात रेड्याचे दूध आहे तो वांझ मायबापांचा औरसपुत्र आहे" अशा प्रकारचे वाक्य माहितीपूर्ण विधान म्हणून व्यवहारात वापरलेले आपल्याला फारसे ऐकू येत नाही. इतकेच काय :
(आ) "जर माणसाच्या हातात रेड्याचे दूध आहे तर माणूस माणूस आहे
(इ) "(आ) ज्याच्या हातात रेड्याचे दूध आहे तो गवळी आहे
अशी विधानेही व्यवहारात वापरलेले आपल्याला फारशी ऐकू येत नाही.

वरील गणिती मांडणीप्रमाणे बघूया :
(आ) P नित्य असत्य आहे आणि Q नित्य सत्य आहे. P---->Q, सत्य आहे.
(इ) P नित्य असत्य आहे आणि Q कधीकधी सत्य आहे. P---->Q, सत्य आहे.

- - -
दुसरे भाषांतर : "व्याप्ती"

(अ), (आ), (इ) ही विधाने माहितीशून्य आहेत, असे आपण व्यवहारात म्हणतो. आपल्याला असे दिसते, की गणिती मांडणीचा व्यवहारातील उपयोगाशी फारकत आहे. श्री. यनावाला यांनी दिलेल्या गणिती मांडणीत व्यवहारातल्या विधानाच्यापेक्षा काहीतरी कमी-अधिक माहिती आहे, असे दिसून येते. हे तर्कशास्त्राचा अभ्यास करताना आपणा सर्वांना शिकवतात .

अर्थात तर्कशास्त्राची चौकट एक्सियोमॅटिक मानली, तर त्याचा व्यवहाराशी काहीच संबंध नसला तरी चालतो. (म्हणजे आधी काही स्वयंसिद्ध विधाने "आक्सियम" मानायची. वेगवेगळ्या गणित-ऑपरेशनच्या व्याख्या सांगायच्या. ऍक्सियमे-ऑपरेशनांमधून थियरम-सिद्धांतांच्या सिद्धता मांडायच्या.)

तरी व्यवहाराशी अर्थी-अर्थी संबंध असलेल्या शास्त्राबद्दलही आपल्याला कुतूहल असू शकते. "जर-तर" वाक्यांचा व्यवहारात जो अर्थ असतो, त्या प्रकारे तर्कशास्त्रात त्याचे भाषांतर करणे शक्य आहे काय? गंमत म्हणजे सहज शक्य आहे, आणि असे भाषांतर झालेलेही आहे.

"जर-तर" विधानांना भारतीय तर्कशास्त्राच्या भाषेत "व्याप्ती"-विधाने म्हणतात.
"जर ठिकाणावर धूर आहे तर ठिकाणावर आग आहे" = "धुराचे ठिकाण संकल्पना आगीचे ठिकाण संकल्पनेने व्यापलेली आहे."
व्याप्तीच्या दोषांमध्ये (म्हणजे व्याप्ति-विधानाचे ट्रुथ-टेबल म्हणा ना) एक दोष आहे "अतिव्याप्ती" : उदाहरणार्थ "जर हवा धूसर तर आग" धूर-आग हे ठीक, पण धुके-आग-खोटे ही अतिरिक्त व्याप्ती सांगितली जाते, हा दोष आहे.
... यातून वरील ट्रूथ टेबल सांगितले जातेच. परंतु व्याप्तीचा "अप्रसिद्ध व्याप्ती" हा दोषसुद्धा सांगितला जातो.
म्हणजे जर व्याप्तीमधील पूर्वपक्षाचे किंवा उत्तरपक्षाचे एकही उदाहरण सापडत नसेल, तर व्याप्तिविधान तर्कदुष्ट (ट्रुथ-टेबलात "फॉल्स") ठरते.
"हातात रेड्याचे दूध आहे" याचे उदाहरण मुळीच सापडत नाही. म्हणून वरील (अ), (आ), (इ) ही सर्व विधाने अप्रसिद्ध व्याप्तीच्या दोषाने ग्रस्त आहेत. म्हणून तर्कदुष्ट आहेत. असे स्पष्टीकरण आपल्याला मिळते.

आता "जर-तर" या व्यवहारातल्या शब्दप्रयोगाचे आपल्याला सुयोग्य तार्किक विश्लेषण मिळालेले आहे. अतिशय सोयीस्कर आणि उपयोगी चिह्नित-तर्कशास्त्रात आपण हे कसे म्हणू शकू?
P->Q ऐवजी आपण व्यवहारातील या संबंधासाठी एक नवे चिह्न देऊया
P>जरतर>Q असे चिह्न देऊया.

P->Q =
{(P आणि Q) किंवा (P-नाही आणि Q) किंवा (P-नाही आणि Q-नाही)}

P>जरतर>Q =
{(P आणि Q) किंवा (P-नाही आणि Q) किंवा (P-नाही आणि Q-नाही)} आणि {∃(P)} आणि {∃(Q)}

∃(P) म्हणजे "एकतरी P आहे"
- - -
सारांश / चर्चाप्रस्ताव :
"जर-तर" शब्दप्रयोगाचा वरील P>जरतर>Q अर्थ लावला, तर चिह्न-तर्कशास्त्रातली गणिते व्यवहारातील विधानांना लावता येतात. "जर-तर" शब्दप्रयोगाचा P->Q अर्थ लावला तर व्यावहारिक उपयोगाची गणिताशी तफावत येते. अर्थात या तफावतीने मनोरंजन होऊ शकते, ते मस्तच असते. मात्र ही तफावत जाणणे प्रत्यक्ष उपयोगाचे नसते, याबद्दल नजर ढळू नये.

- - -
संदर्भ :
१ (बूलियन तर्कशास्त्राचे पाठ्यपुस्तक सध्या माझ्याकडे नाही. मात्र व्यवहारातल्या if-then विधानांत ∃() अवयव अध्याहृत असतात, ही चर्चा वाचल्याचे आठवते.)
२ "अप्रसिद्ध्याव्याप्ति"= nonpervasion because one of the terms is unexampled. (स्रोत : David Ingalls: Materials for the Study of Navya-Nyaya Logic, पुनर्मुद्रण-प्रकाशक मोतीलाल बनारसीदास, १९८८, पृष्ठ ८१. मूळ प्रकाशन हार्वर्ड ओरिएंटल सीरीज १९५१)

लेखनविषय: दुवे:

Comments

सुलभीकरण

(P-नाही आणि Q) किंवा (P-नाही आणि Q-नाही) याचे P-नाही असे सुलभीकरण देता येईल.
त्यामुळे,
{(P आणि Q) किंवा (P-नाही आणि Q) किंवा (P-नाही आणि Q-नाही)} आणि {∃(P)} आणि {∃(Q)} या विधानाला {(P आणि Q) किंवा P-नाही } आणि {∃(P)} आणि {∃(Q)}
असेही म्हणता येईल.

पण, (P-नाही) आणि ∃(P) याची किंमत शून्य येते. त्यामुळे P आणि Q आणि ∃(P) आणि ∃(Q) असे सुलभीकरण करता येते.

पण P आणि ∃(P) याची किंमत P येते. म्हणून मूळ विधान P आणि Q इतकेच उरते.

गडबड आहे हे नक्की पण ती या विधानात आहे की माझ्या डोक्यात?

येथे गडबड आहे काय?

(P-नाही) आणि ∃(P) याची किंमत शून्य येते.

हे वाक्य ठीक नाही. (किंवा ठीक आहे, तिथवर त्याचा व्यवहारातील "जर-तर" विधानांशी संबंध नाही.)

श्री. यनावाला यांचे उदाहरण घेऊया.
विधान P: अ च्या हातात ससा आहे.
म्हणजे विधान (P-नाही) : अच्या हातात ससा नाही.
श्री. यनावाला यांच्या विधानातल्या माहितीत व्यक्ती "अ" विशेषनामाची विवक्षित व्यक्ती नाही. असे आपण का म्हणतो? ते विशद करतात : हाती ससा नसलेले अनेक पारधी असतील. म्हणजे जगात अनेक पारधी आहेत, जगात ससा नसलेले लोक आहेत... वगैरे हे सर्व या "जर-तर" वाक्याच्या संदर्भात आहे. विधान फक्त "अ" विशेषनामाच्या विवक्षित व्यक्तीबद्दल असते, तर या अन्य लोकांबद्दल स्पष्टीकरण नि:संदर्भ असते. "अ" हे विशेषनाम नसून विश्वातल्या विवक्षित व्यक्तीसाठी स्थानधारक आहे. "व्हेरिएबल" आहे. विवक्षित व्यक्ती म्हणून कदाचित "धनंजय-उपक्रम-आयडी-७९१" असे भरू शकू. उपक्रम-खरडवहीवरील चित्राचे निरीक्षण करता दिसते : धनंजय-उपक्रम-आयडी-७९१ च्या हातात ससा नाही. म्हणजे विधानफलनाच्या "धनंजय-उपक्रम-आयडी-७९१" या उदाहरणात (इन्स्टन्समध्ये) (P-नाही)

तर ∃(P) = असे एकतरी व्यक्त एकक आहे, ज्याच्या हातात ससा आहे. जर माझे स्नेही श्री. वाघमारे, मु.पो. कुडे बुद्रुक, जि, पुणे, या एका व्यक्तीच्या हातात ससा असल्याचे निरीक्षण झाले, तर ∃(P) सत्य आहे.

वरील दोन उदाहरणातून दिसते, की (P-नाही) मधले इन्स्टन्स आणि ∃(P) मधले इन्स्टन्स एकच विवक्षित व्यक्ती नसू शकते. एकच विवक्षित व्यक्ती आहे म्हणतात श्री. यनावालांचे वाक्य "हाती ससा नसलेले अनेक पारधी असतील" निसंदर्भ होऊ लागते.

वगैरे.

अ-समाधानकारक

"अ च्या हातात ससा आहे" हे विधान सदासत्य किंवा सदाअसत्य असते कारण ते ऍटॉमिक (अखंड) विधान आहे. ते विधान जर "चर्चेतील व्यक्ती अ असेल तर तिच्या हातात ससा आहे" असे जर-तरच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तर अनंत लांबीची किचकट वाक्ये (इन्फिनिट रीग्रेस) बनविता येतील.

नाही

इन्फिनिट रिग्रेस श्री. यनावाला यांच्या उदाहरणाला पुरता लावून दाखवा. आणि "अ" हे व्हेरिएबल नसेल, तर मग ∃(P)चा अर्थ मला समजावून सांगा. म्हणजे P पेक्षा वेगळा कसा, हे मला समजावून सांगा.

("अ" हा विवक्षित व्यक्ती असेल, तर त्याच्याबद्दल विधाने सदासत्य किंवा सदा-असत्य असतात, हे खरे आहे. मात्र "अ" हा विवक्षित व्यक्ती असेल, तर व्यवहारात "अ"बद्दल जर-तरची विधाने केल्याचे उदाहरण तुम्ही सांगू शकाल काय? "जर सॉक्रेटीस मानव आहे, तर सॉक्रेटीस मर्त्य आहे" मध्ये सॉक्रेटीस या विवक्षित व्यक्तीबद्दल विधान केल्यासारखे भासते. पण "सॉक्रेटीस" हा "जर कोणीही मानव आहे, तर कोणीही मर्त्य आहे"चे इन्स्टन्स आहे, असाच मथितार्थ असतो.)

(P-नाही) मधले इन्स्टन्स आणि ∃(P) मधले इन्स्टन्स जर कधीच समान नसतील तर (P-नाही) आणि ∃(P) हे विधान सदाअसत्य होईल.

अधोरेखित कुठून उत्पन्न झाले?

तरीही पटत नाही

इन्फिनिट रिग्रेस श्री. यनावाला यांच्या उदाहरणाला पुरता लावून दाखवा.

P->Q: ससाधारी पारधीसुद्धा आहे=ज्या व्यक्तीच्या हातात ससा असेल ती व्यक्ती पारधी आहे.
P: व्यक्तीच्या हातात ससा आहे=ज्या व्यक्तीविषयी चर्चा आहे, तिच्या हातात ससा आहे.
Q: व्यक्ती पारधी आहे=ज्या व्यक्तीविषयी चर्चा आहे, ती पारधी आहे.

PP: व्यक्तीविषयी चर्चा आहे=ज्या व्यक्तीविषयी चर्चेची चर्चा आहे त्या व्यक्तीविषयी चर्चा आहे
PQ: व्यक्तीच्या हातात ससा आहे=वरीलप्रमाणेच
QP: व्यक्तीविषयी चर्चा आहे=वरीलप्रमाणेच
QQ: व्यक्ती पारधी आहे=वरीलप्रमाणेच

... याडा याडा याडा ...

(P-नाही) मधले इन्स्टन्स आणि ∃(P) मधले इन्स्टन्स जर कधीच समान नसतील तर (P-नाही) आणि ∃(P) हे विधान सदाअसत्य होईल.

अधोरेखित कुठून उत्पन्न झाले?

तुम्ही प्रतिसाद देण्याआधी ते पूर्ण विधानच मी मागे घेतले. मला पुन्हा विचार करावा लागेल.
मला असे वाटते की P-नाही या विधानाचा अर्थ "∀ P; P-नाही" किंवा "~∃(P); P-आहे" असाच घेतला जातो. तर्कशात्रातील काही सिध्दता त्या गृहीतकावर अवलंबून असतील काय, अ ला वेरिएबल मानले तर त्या सिद्धतांना त्रास होईल काय, याचा विचार करतो आहे.

इन्फिनिट रिग्रेस करून काय साधले?

१. "इन्फिनिट रिग्रेस" हा तार्किक दोष आहे, ही कल्पना प्राचीन आहे खरे. पण तिच्यात काही अर्थ नाही. "इन्फिनिट रिग्रेस" चा तर्क दोष सांगून ऋणसंख्यांना तर्कदुष्ट म्हणत.

२. प्रत्यक्षापासून दूर नेणारी तार्किक अनवस्थिती - इन्फिनिट रिग्रेस प्रिक्ल्यूडिंग व्हेरिफिकेशन - हा तार्किक दोष आहे खरा. मात्र त्यात "कुठल्याही पायरीवर पुढली पायरी केल्याशिवाय व्हेरिफिकेशन करता येत नाही" असे दाखवावे लागते.

"एकमेकांनी एकमेकांना बघताना बघणे" ही कल्पना इन्फिनिट रिग्रेस शक्य आहे म्हणून तर्कदुष्ट आहे काय?

रामाने सीतेला बघितले.
सीतेने (रामाला तिला बघताना) बघितले.
रामाने (सीतेला (त्याला तिला बघताना) बघितलेले) बघितले.
...(इन्फिनिट)...
रामाने (सीतेला(((...त्याने(तिला(त्याला तिला बघताना) बघितलेले)...))) बघितले.

असा इन्फिनिट रिग्रेस भाषेत शक्य आहे, म्हणून "बघताना बघितले" ही कल्पना मुळीच तर्कदुष्ट होत नाही. "बघताना बघण्याचा" अनुभव मी खुद्द घेतलेला आहे.

हे प्राचीन लोकांना सुद्धा माहीत होते.
आता हा ऑपरेटर घ्या :
-(-( )) ; म्हणजे दोनदा ऋण किंवा तर्कशास्त्रातले " ()असे नाही असे नाही"

प्राचीन लोक सुद्धा सिद्धांत सांगत की
-(-(अ)) = अ
-(-(....-(-(अ))...)) असे अगणितवेळा करता येते म्हणून काही वरील सिद्धांत तर्कदुष्ट होत नाही. दोन (फायनाइट संख्या) पायर्‍या करूनही व्हेरिफिकेशन करता येते.

- - -
तर (१) केवळ इन्फिनिटची भीती म्हणून इन्फिनिट रिग्रेसचा बागूलबुवा काही शतकांपूर्वी मेला.
(२) "रिग्रेस प्रिक्ल्यूडिंग व्हेरिफिकेशन" तुम्ही दाखवलेले नाही.

जर-तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय यांचे, : "जर रेडा दूध देतो तर म्हैस दूध देते."
हे विधान सत्य आहेच. एवढेच नव्हे तर"जर रेडा दूध देतो तर सशाला शिंगे आहेत." असे विधान लिहिले तरी ते सत्यच आहे असे मला वाटते.कारण यांत P=रेडा दूध देतो हे असत्य आहे. मात्र इथे "एक तरी P,तसेच एक तरी Q (सशृंग ससा)नाही हे खरे. त्याने काही बिघडते असे वाटत नाही.
श्री.धनंजय यांचे आणखी एक विधानः "(अ) ज्याच्या P{हातात रेड्याचे दूध आहे} तो Q{वांझ मायबापांचा औरसपुत्र आहे}."
असले वाक्य व्यवहारात वापरले जात नसले तरी ते तर्कशास्त्रानुसार असत्य आहे असे मला म्हणवत नाही.मात्र ते:
"जर अ च्या हातात रेड्याचे दूध आहे तर अ वांझ मायाबापांचा औरसपुत्र आहे" असे लिहिणे अधिक चांगले.(अ कोणीही माणूस. विशिष्ट व्यक्ती नव्हे.)

एक भाषांतर सत्य आहे तर दुसरे नाही

तर्कशास्त्रानुसार एक भाषांतर सत्य आहे, तर दुसरे सत्य नाही.
पहिले सत्य असलेले भाषांतर व्यवहारोपयोगी नाही, आणि दुसरे असत्य असलेले भाषांतर व्यवहारोपयोगी आहे.

जर-तर या व्यावहारिक भाषेची दोन्ही भाषांतरे तर्कशास्त्रातच उपलब्ध आहेत.

- - -
व्यावहारिक भाषेचे शास्त्रातील काटेकोर चिह्नांत भाषांतर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
प्रीतिभोजनाच्या ठिकाणी आपण विचारतो "अरे पिण्याच्या पाण्याच्या पिंपात बर्फ दिसतो आहे - किती बर्फ आहे?"
आचार्‍याचा माणूस उत्तर देतो, "वजनाने बरोबर एक किलो बर्फ आहे, साहेब!"

आता "वजन" शब्दाचे एकच शास्त्रीय भाषांतर आहे, असे म्हटले, तर माणसाचे उत्तर सपशेल निरर्थक आहे. तरंगणार्‍या बर्फाचे वजनठीक शून्य आहे. असलेच तर बर्फाचे वस्तुमान १ किलो असेल.

त्या माणसाचे वाक्य माहितीशून्य म्हणावे का? त्या माणसाचे वाक्य संदिग्ध म्हणावे का? तर नाही.

व्यवहारातल्या "वजन" शब्दाचे संदर्भानुसार नि:संदिग्धपणे शास्त्रीय भाषांतर होते, असा आपला अनुभव असतो.
भाषांतर १ : व्यवहारातले वजन = भौतिकशास्त्रातले वजन
भाषांतर २ : व्यवहारातले वजन = भौतिकशास्त्रातले वस्तुमान

भाषांतर १ निवडावे, की भाषांतर २ निवडावे, याबाबतीत व्यवहारात जवळजवळ कधीच संदिग्धता नसते. संदर्भानुसार भाषांतर कुठले ते निश्चित कळून येते.

तर्कशास्त्र

तर्कशास्त्रातील विविध खुणांचा वापर मला नेहमीच कंटाळवाणा वाटला.
धनंजय यांनी त्यातील काही खुणा वापरल्या व यावेळी मला त्या कंटाळवाण्या वाटल्या नाहीत.

मला जे जाणवले ते म्हणजे सदा सत्य/असत्य विधाने केली की ती नेहमीच माहितीशून्य असतात. रेड्याचे दूध (ज्ञानेश्वरांचे काट्याच्या अणीवर बसले तीन गाव हे आठवते). वगैरे सदाअसत्य उदाहरणात हेच जाणवते. मग ती जरतर म्हणून वा आणि/किंवा वापरून करा. एकतरी उदाहरण असणे खरे असणे आणि एकतरी उदाहरण खोटे असणे महत्वाचे असते. (तरच माहिती मिळते.) धनंजय यांच्या उदाहरणात एकतरी उदाहरण खरे असणे आहे (म्हणजे सदाअसत्य नाही) त्याच बरोबर एकतरी उदाहरण खोटे असणे (म्हणजे सदासत्य नाही) हे देखील तेवढेच महत्वाचे.

रिकामटेकडा यांनी एक विधानं नाही आणि एकतरी विधान खरे याची किंमत शून्य केली आहे. ते कळले नाही. (या दोघांमधून काहीच साधत नाही.)

आता जरतर विधानातून काही साध्य होते का? (हा प्रश्न विचारला गेला नाही.) माझ्या मते इतर जोडण्यांपेक्षा यात जास्त माहिती मिळते. विज्ञानाला हीच जोडणी सर्वात उपयोगाची आहे.
जरतर हे सिमेट्रिक नाही. म्हणजे पी आणि क्यु ची अदलाबदल करून चालत नाही. या विधानाचा सिमेट्रिक भाऊ आहे त्याला 'जर आणि जरच' असे म्हणतात. जर आणि जरच पेक्षा माझ्या मते

ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती जाळे तो पारधी. ज्याच्या खांध्यावर बंदूक तो पारधी. (ही विधाने जर (सर्व) अ च्या हाती ससा असेल तर (सर्व) अ पारधी आहे अशी विस्तृतपणे लिहिता येतील.) यातून पारधीपणाची आपल्याला एक ओळख होते. हीच गोष्ट 'आणि' वा 'किंवा' जोडणीत होत नाही.

अवांतर थोडे जास्त झाले.

प्रमोद

सदासत्य वाक्ये कधीकधी व्यवहारात वापरतात

सदासत्य वाक्ये कधीकधी व्यवहारात वापरतात. उदाहरणार्थ :

जर {मिळकत+कर्ज = खर्च+शिल्लक}
तर {हिशोब जुळत नाही तिथे पाणी मुरते आहे}

येथे जर {सदासत्य} आहे. मात्र तो भाग कधीकधी सांगावा लागतो. कॉन्झर्व्हेशन कायदे हे सदासत्य असतात. वर पैशाच्या हिशोबाचे कॉन्झर्व्हेशन सांगितलेले आहे. तुम्ही दुसर्‍या कुठल्या बाबतीतही कॉन्झर्व्हेशन कायदा वापरलेला असेल. तो वापरताना त्या कायद्याचा संदर्भ दिलेला असेल. ते आठवून बघावे. वापर साधारण असा असतो : जर {सार्वत्रिक कायदा} तर {हातातल्या बाबतीत काही निष्कर्ष}.

सदासत्य वाक्य

असे वाक्य वापरलेले माझ्या आठवणीत नाही.
'मिळकत + कर्ज = खर्च + शिल्लक असा हिशोब जिथे जुळत नाही तिथे पाणी मुरते आहे' असे वाचले तर जास्त अर्थवाही होईल का?

अवांतर मिळकत + कर्ज + जुनी शिल्लक = खर्च + कर्जफेड + नवी शिल्लक हे वाक्य जास्त सदासत्य आहे.

कॉन्जर्वेशनचा कायदा (मिळकतीचा कायदा देखील) हा तार्किक दृष्ट्या सदासत्य असतो का? हा वेगळा मुद्दा.

प्रमोद

कॉन्झर्व्हेशन कायद्याचे प्रत्युदाहरण माहीत नसते

कॉन्झर्व्हेशन कायद्याचे प्रत्युदाहरण माहीत नसते. म्हणून "एकतरी नाही" असे सांगता येत नाही. हा मुद्दा आहे.
(विधान तार्किक सदा-सत्य नसते. पण तो तुमचा मुद्दा नव्हता ना?)

जर "कॉन्झर्वेशन कायदा" तर "ही पोथ्यांची खोली पुरणार नाही", अशा प्रकारची वाक्ये मी वापरलेली आहेत. (दुवा देण्यासाठी शोधून पटकन सापडत नाही.) मात्र ते वाक्य लिहिताना मला "तो कायदा नाही" असे उदाहरण माहीत नव्हते.

अशा प्रकारची वाक्ये पैशाच्या हिशोबाच्या बाबतीतही वापरता येत असावीत.

कॉन्झरव्हेशन

प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.

कॉन्झर्वेशन (अपरिवर्तनाचा कायदा?) चा कायदा हा माहिती म्हणून कित्येकदा सांगावा लागतो. माझ्या डोक्यात सदासत्य/असत्य विधाने (त्यांच्या जोडण्या नव्हे) माहितीशून्य असतात असे बसल्याने तुमचा मुद्दा लक्षात आला नाही. फक्त रेड्याचे दूध, सशाचे शिंग (ही देखिल तर्कशास्त्र दृष्ट्या सदा असत्य नाहीत) सदा असत्य म्हणून वापर केला जातो. तुमची उदाहरणे तशी आली म्हणून हे झाले असावे.

थोडे अवांतर
पर्पेच्युयल यंत्रांबाबत एनर्जी (शक्ति?) अपरिवर्तनीय राहते म्हणून विरोध केला जातो. मात्र हा कायदा बरोबर नाही आणि वस्तुमान-एनर्जी एकत्रित अपरिवर्तनीय असतात असा नवीन कायदा आहे. तरीही यंत्राबाबत (ज्यात वस्तुमान-एनर्जी परिवर्तनीयता उपयोजली नसते) एनर्जी कॉन्झर्वेशन कायदा (सदा सत्य नसला तरी) वापरायला हरकत नसते.

प्रमोद

जर तर

जरतर हे सिमेट्रिक नाही. म्हणजे पी आणि क्यु ची अदलाबदल करून चालत नाही. या विधानाचा सिमेट्रिक भाऊ आहे त्याला 'जर आणि जरच' असे म्हणतात. जर आणि जरच पेक्षा माझ्या मते

या पुढे लिहीलेले पुसून गेले. 'जर आणि जरच' पेक्षा 'जरतर' हे विधान जास्त मोकळीक देत असल्याने विज्ञानात जास्त वापरले जाते.

प्रमोद

 
^ वर