गणेशोत्सव, गणेशपूजा आणि गणेश विसर्जन

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे मानले जाते. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने खालील प्रथा पाळल्या जातात. पर्यावरण व प्रदुषण या दोन्ही बाबींचा विचार करता खालील प्रथा बंद करून त्या जागी बदल करण्याची आवश्यकता मला वाटते. उपक्रमींचे या बद्दल मत काय आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल. याच प्रमाणे बंद कराव्यात अशा आणखी काही अनिष्ट प्रथा आहेत का?

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

लेखनविषय: दुवे:

Comments

जनतेची मानसिकता

उत्सव मरगळलेल्या मनाला चैतन्य आणतात. व्यावहारीक बाजूने विचार करता, पैसा एक्सचेंज होतो आणी ह्या दोन्ही गोष्टींची गरज समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे. कोणत्याही रुजलेल्या रीवाजांना फाटा द्यायचा असेल तर त्यात ज्यांचे नुकसान होणार आहे त्यांना सावरायला वेळ दिला गेला तर त्या-त्या गोष्टी रडत-खडत का होईना स्वीकारल्या जाऊ शकतील.

मा़झा असा समज आहे की, वरील यादीतील क्र. १ सोडला तर सगळे पुर्वापार प्रथेनुसार म्याग्न्यानिमसली चालले आहे. धर्ममार्तंडांनी ह्यात बदल सुचवावेत. म्हणजे त्यांचे ऐकणारे त्यांचे ऐकतील. बाकी जे बदल स्वीकारायला राजी असतात त्यांनी केव्हाच ह्या प्रथा बंद करुन सोयीनुसार उत्सव साजरा करायला सुरुवात केलीही आहे.

राजकारण्यांना दोष देऊन उपयोग नाही. जनतेची मानसिकता काय आहे त्यानुसार बदल घडतील.

--गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?-- ह्या प्रश्नाला माझे उत्तर असे आहे की, हो आहे! खूप धमाल येते. (स्पेनक-यांना टोम्याटोची धुळवड-कत्तल बंद करा असे सांगितले तर ते चालेल का?)

बदल टप्प्या-टप्प्याने झाले तर स्वीकारले जातीलही.

पूर्वापार प्रथा

आपण पुण्याचे उदाहरण घेऊ. पुण्याची लोकसंख्या 3 किंवा 4 लाख होती. तेंव्हा मिरवणूक निघत होती. रात्री 12 पर्यंत संपत होती. आता दुसर्‍या दिवशीची संध्याकाळ उजाडली तरी मिरवणूक संपत नाही. आता 40 लाख लोकसंख्या असताना आम्ही पूर्वापार पद्धतीनेच मिरवणूक काढणार हा हट्ट कितपत योग्य म्हणता ये ईल. शहरातील रस्ते 40 तास बंद ठेवून सर्व लोकांचे हाल करण्याचा व त्यांना वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हा उत्सवप्रिय लोकांना कोणी दिला? उत्सव साजरा करायचा असला तर दुसर्‍याना उपद्रव होणार नाही या पद्धतीने करावयास नको का? हे होत नाही मग मिरवणूकच का बंद करू नये?

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

चंद्रशेखर यांच्याशी सहमत.

@असा मी आसामी
प्रथांची अनेक उदाहरणे आहेत, घटकंचुकी, सती, ...

स्पेनक-यांना टोम्याटोची धुळवड-कत्तल बंद करा असे सांगितले तर ते चालेल का?

हो!

बदल

नाही. मिरवणूक बंद न करता ती छोटी कमी वेळात संपेल अशी व्यवस्था असावी.
गणेशाला कला आवडते म्हणून त्याच्या समोर कला सादर केली जाते, लोक "नृत्य" करतात. त्याला आपण हिडीस रुप आलेले पाहतो; ते कसे नाहीसे होईल हे पाहील्यास तो उपाय ठरेल- नृत्य बंद करणे नव्हे.

मिरवणुक असावीच्

मिरवणुकच् का बंद करु नये हा टोकाचा विचार् झाला. यामुळेच् पर्यावरणवादी चळवळी बदनाम झाल्या आहेत.
त्यापेक्षा, सध्या जी वारेमाप वाढलेली मंडळ आहे त्यांची संख्या कमी करून त्यांना जवळच्याच् मुख्य मंडळात विलीन का करू नये? उदा.- पुण्यातिल मानाच्या ५ गणपतींमध्ये इतर गणपती (?)सामिल करावे. ५च् मिरवणुका निघतिल मग! या ५ बाप्पांच विसर्जन् करायला असा कितीसा वेळ लागणार आहे?

अगदी खरे आहे तुमचे...

सर्वात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा मर्यादित झाली पाहिजे. ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला त्याचे प्रयोजन संपले आहे (सामाजिक ऐक्य व त्यातून पुढे स्वातंत्र्य प्राप्ती हे उद्दिष्ट्य साध्य झाले आहे) पूर्वी गणपतीत मेळे असत. स्थानिक कलाकारांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी असे. ही चांगली प्रथा लोप पावली आहे. आता बहुतेक मंडळे व्यावसायिक कलाकारांना बोलवून त्यांचे कार्यक्रम सादर करताना दिसतात. 'एक गाव एक गणपती' किंवा शहरात 'एक पेठ एक गणपती' यालाच परवानगी दिली पाहिजे.

प्रत्येकाच्या घरात गणपती उत्सव होतो. त्याशिवाय सोसायटीचा गणपती असतो आणि बाहेर पडले की परिसरात दोन-तीन मंडळे असतातच. नोकरीच्या ठिकाणी कामगार संघटना कार्यालयांच्या आवारात गणपती बसवतात. हे कमी म्हणून की काय, पण गल्लीतील चिल्ली-पिल्ली हौसेने 'बाल गणेश मंडळे' स्थापन करत असतात. ही 'बाल गणेश मंडळे' आधी बंद झाली पाहिजेत. मोठे मंडळ असताना पुन्हा बारकी बारकी मंडळे कशासाठी? बरे या सर्व ठिकाणी वर्गणी द्यावीच लागते. हल्ली वर्गणी ऐच्छिक राहिली नसून सूचनेनुसार द्यावी लागते. हा उत्सव कुठे तरी एकाच ठिकाणी साजरा करण्याबाबत समाजाने विचार करावा. म्हणजेच सार्वजनिक नको असेल तर घरातील प्रथा बंद करावी किंवा घरातील प्रथा बंद करायची नसल्यास सार्वजनिक प्रथा बंद करावी.

धाग्यापुरते मर्यादित राहतो.
1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.
... हे टाळणे शक्य आहे. अनेकजण कल्पकतेने पर्याय सुचवत असतात. कागद्याच्या लगद्याचा, साध्या मातीचा गणपती करता येतो. त्याचे विसर्जन घरच्या बादलीत करावे. आठवड्यानंतर माती विरघळल्यावर ती फुलांच्या कुंडीत भरावी. पुण्यात नुकत्याच एका दुकानात मुलतानी मातीच्या आणि हळद, पानाफुलांपासून बनवलेल्या रंगांच्या मूर्ती आल्या होत्या. आज विचारले तर संपल्या होत्या. यावरुन पर्यावरणाबाबत अनेक लोक जागरुक होत आहेत, हे जाणवले. ही मुलतानी माती आपण चेहर्‍याला लेप म्हणून वापरु शकतो. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना नकार द्यावा.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.
... शहरांमध्ये गणेश विसर्जनासाठी हौद बांधलेले असतात, जवळच निर्माल्यासाठी कुंभ केलेले असतात. त्यात निर्माल्य टाकता येतो. पण घरातील निर्माल्यापासून उत्तम खत बनवता येते. अर्थात हे मनावर घेतले तरच. त्याऐवजी लोक पुलावरुन नदीत निर्माल्य फेकण्याचा सोपा पर्याय निवडतात. निर्माल्य नदीत टाकण्याचा इतका धसका घेण्याचे कारण नसते कारण नदी स्वतःकडे काही ठेऊन घेत नाही. तो कुजलेला निर्माल्य कुठेतरी काठालाच साचतो. मातीत-चिखलात अडकतो आणि त्याची माती होते. धोका फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून असतो.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?
... होय. याच कल्पनेची आवश्यकता आहे. पूर्वी मी एका प्रतिसादात उल्लेख केला होता. गणेशाची मूर्ती बाहेरुन आणून चार दिवस पूजन करायची प्रथा ३०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नव्हती, असे दिसते. त्यावेळी देव्हार्‍यातील गणेशमूर्ती ताम्हनात काढून तिला स्नान घालून सजवून बैठकीवर स्थापना करत. चार दिवसांनी पुन्हा ती देव्हार्‍यात विराजमान होई. (असे मी जुन्या लोकांकडून ऐकले आहे) सुरवातीच्या काळातील गणेशमूर्ती चिकणमातीच्या आणि साध्या रंगांनी (गेरु) रंगवलेल्या असत. आपण त्याचा आग्रह धरला तरी चालेल.
4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण
... लाऊड स्पीकर आणि डेक यांना बंदी करावी. आरत्या या पारंपरिक वाद्यांचा वापर करुन टाळ्यांच्या गजरात म्हणाव्यात, हा पायंडा रुढ झाला पाहिजे.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?
... मिरवणूक काढायला हरकत नाही, पण ३० तास चालणार्‍या, वाहतूक-रस्ते बंद करणार्‍या, पोलिस खात्यावर बंदोबस्ताचा असह्य ताण आणणार्‍या मिरवणुका नकोत. मिरवणूक जास्तीत जास्त सहा-आठ तासात संपावी. मंडळांच्या संख्येवर नियंत्रण आणावे.
6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.
... याला बंदी करावी. अर्थात अलिकडे महापालिका हौद बांधते. लोक तिथे मूर्ती विसर्जन करतात, गणपती दान देतात. दृष्टीकोनातील हा बदल स्वागतार्ह आहे.

विसर्जनाचे हौद

महापालिका हौद बांधते. लोक तिथे मूर्ती विसर्जन करतात,
या हौदातल्या प्रदुषणयुक्त पाण्याची महानगरपालिका कशी विल्हेवाट लावते? काही कल्पना आहे का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सोल्यूशन...

या हौदातल्या प्रदुषणयुक्त पाण्याची महानगरपालिका कशी विल्हेवाट लावते?

पर्यावरण शास्त्रात कधी कधी उपहासार्थ विनोदाने म्हणले जाते ते आठवले: "सोल्यूशन ऑफ पोल्यूशन इज् डायल्यूशन" :-)

सहमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.योगप्रभू यांच्या विचारांशी सहमत आहे. बालगणेश मंडळांना मान्यता न देणेच इष्ट. त्यांना त्यात्या भागातील मोठ्या मंडळात समाविष्ट करून घ्यावे. प्रौढ कर्यकर्त्यांनी या बाल/तरुण कार्यकर्त्यांना वाव द्यावा.त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे.खरे तर एक वॉर्ड एक गणपती हे तत्त्व अंमलात आणल्यास पुष्कळशा समस्यांचे निराकरण होईल.
...
श्री.चन्द्रशेखर लिहितातः"दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?"

ही सुधारणा झाली तर फारच छान. मात्र प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा.तरच सुपरिणाम दिसेल. इतर काय करतात याचा विचार न करता प्रत्येकाने असे ठरवले पाहिजे.मग परिवर्तन घडून येईल.

माझी मते

माझी मते : -

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

मूर्ती मातीचीच असायला हवी. रंग पाण्यात सहजपणे विरघळणारे असावेत.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

ह्या निर्माल्याचे नैसर्गिकपद्धतीने बनणारे खत होवू शकते का? होत असल्यास त्या प्रकारच्या प्रकल्प चालू व्हावेत. व सारे निर्माल्य त्या प्रकल्पांकडे वळवले जावेत.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

मान्य नाही. हा कंजुशपणा वाटतो. त्यातून आनंद मिळणार नाही.
'निर्मिती', 'संवर्धन/सक्शतीकरण' व 'विघटन' ह्या प्रक्रियेतच आनंद दडलेला असतो.
दरवर्शी नव्या मातीच्या 'निर्मीत' मूर्तीं सोबत येणारा 'उत्साह' तर नाहीच व त्या उत्साहातून प्रसवणार्‍या उर्जेचे 'विसर्जना'च्या माध्यमातून 'विघटन' ही नाही. तर मग त्यातून आनंद कसा मिळणार?

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

आधी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणार्‍या मंडळांच्या संख्या वाढीवर आवर घालायला हवा. त्यांच्या आप-आपसातील स्पर्धा ध्वनीप्रदुशण अजून वाढवते.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

हो आहे. पण मिरवणूक आटोपशीर हवी.
अगोदर आमच्या शेजारी आंध्रातील कुटुंब होते. ते दिडदिवसाच्या गणेशमुर्तीचे घरातील बादलीतच विसर्जन करीत. व ती बादली बाहेर जावून रिकामी करण्यासाठी कामवाल्या बाईला पैसे देत. हा मूर्ती विसर्जनातील सगळ्यात शॉर्टकट मार्ग आमच्यासाठी मात्र खूपच क्लेशदायक असायचा. त्यांना म्हणे लाज वाटायची, मिरवणूकीची!

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

वरील उत्तर पुन्हा.

कंजुषपणा

मान्य नाही. हा कंजुशपणा वाटतो. त्यातून आनंद मिळणार नाही.
शाडूच्या मातीच्या गणपतींची जी किंमत असते त्याच्या कितीतरी पटीनी जास्त धातूच्या मूर्तीची असते. त्यामुळे कंजुषपणा हा मुद्दा योग्य वाटत. नाही. तुम्हाला मिळत असलेल्या आनंदापेक्षा पर्यावरण जास्त महत्वाचे आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत

आपल्या टिचभर आनंदासाठी किति ओरबाडणार आहोत आपण या धरणीला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.....

काँपोस्टींग

ह्या निर्माल्याचे नैसर्गिकपद्धतीने बनणारे खत होवू शकते का? होत असल्यास त्या प्रकारच्या प्रकल्प चालू व्हावेत. व सारे निर्माल्य त्या प्रकल्पांकडे वळवले जावेत.

त्या मध्ये जर कुठेही प्लॅस्टीक आणि तयार खाद्य पदार्थ मिश्रीत झाले नसले तर त्याचे चांगले ऑर्गॅनिक काँपोस्ट होऊ शकते.

आमच्याकडे नारळाच्या झाडाला निर्माल्य घालायचे. काही दिवसात ते मातीत मिसळून जायचे...

माझी उत्तरे

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

करू नये.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

आमच्याघरी निर्माल्य झाडाला घालत असे आठवते.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

होय. माझ्या माहेरी गणपती नव्हते. आम्हा मुलांच्या हट्टासाठी प्लास्टिकची एक मूर्ती आणली होती ती वर्षानुवर्षे वापरली. तीच अजून घरी आहे. सासरी गणपती बसवण्याची प्रथा आहे. पण आम्ही धातूची मूर्ती (लग्नात मिळालेली) तीच वापरतो. पूजेला भटजी बोलवत नाही. पण जेवायला आणि आरतीला मित्र बोलावतो. त्यातील काहींना (त्यात अमराठीही आले) मराठी आरत्या म्हणण्याचा भयंकर उत्साह आहे. ते मनापासून आरत्या म्हणतात. मलाही घरात जरा गलका झालेला आवडतो. कदाचित उत्सव माणसातील काही आदिम टेन्डसीजना खतपाणी घालीत असावा.

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

ध्वनीप्रदूषण आरतीमुळे जेवढे होते तेवढे.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

नाही. पण विसर्जनाच्या मिरवणुकी बघायला जात असू ते आठवते. लोक मिरवणुकीपुढे नाचायचे त्याचे फार आश्चर्य वाटत असे.
आजही विसर्जनाचे ढोलके/ताशे हे ऐकायला आवडतात. मध्ये कुठेतरी आफ्रिकी ड्रम पाहिले, त्यांची लय अशीच वाटली, तेव्हा खूप आश्चर्य वाटले होते.

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

करत नाही.

बाकी असामींशी पैशाच्या एक्स्चेंजबद्दल सहमत. उत्सवांमुळे आणि एकंदरीतच पूजांमुळे आपल्याकडे काही उद्योगांना आपोआप चलती मिळते. अन्यथा गाणगापुराला कोण गेले असते? (गाणगापूरला राहणार्‍या लोकांनी क्षमा करावी. मी गाणगापूर बघितले नाही, कोणीतरी दत्तगुरूंचे स्थान आहे ते सांगितल्याचे आठवले). श्रद्धानिर्मूलन करताना या उद्योगात असलेल्या लोकांसाठी वेगळे, पैसे मिळतील असे पर्याय तयार केले पाहिजेत. तसे केले की श्रद्धेचे निर्मूलन सोपे होईल.

माझी उत्तरे

इतरांची उत्तरे न वाचता दिलेली माझी उत्तरे.

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

जर मूर्तीचे विसर्जन होणार नसेल तर प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर करण्यास हरकत नाही. अन्यथा आहे.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

करू नये. कचर्‍याचा डबा वापरावा.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

उत्तम. अमेरिकेतील अनेक मराठी कुटुंबे असेच करतात.

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

कोणत्याही प्रकारच्या आणि प्रसंगाच्या ध्वनीप्रदूषणास आक्षेप आहे.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

कोणत्याही प्रकारच्या आणि प्रसंगाच्या मिरवणूकीस आक्षेप आहे.

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

विसर्जनासाठीच म्हणून एखादा जलाशय उपलब्ध करून दिला असल्यास नाही परंतु सर्रास वाट मिळेल त्या जलाशयाचा वापर थांबवणे योग्य.

विसर्जनासाठी जलाशय

असा जलाशय उपलब्ध करून दिला व त्यात 10000 मूर्तींचे विसर्जन झाले तर त्या प्रदुषणयुक्त पाण्याचे काय करायचे?

चन्द्रशेखर

उपाययोजना हवी

असा जलाशय उपलब्ध करून दिला व त्यात 10000 मूर्तींचे विसर्जन झाले तर त्या प्रदुषणयुक्त पाण्याचे काय करायचे?

विसर्जनानंतर (चतुर्दशीनंतर) त्या पाण्यातील गाळ काढणे किंवा पाणी प्रदूषणमुक्त करणे असे उपाय नसतील तर कठिणच आहे. जलाशय उपलब्ध करून देताना वरील गोष्टींची आणि इतर अनेक बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

उदात्त भावना हिंदी महासागरात बापूच्या अस्थी बरोबर बुडाली आहे

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे मानले जाते.सहाबजी आपण कोणत्या युगात वावरत आहात. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली आहेत. आणि लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त देशप्रेमाने,सामाजिक भावनेने हा गणपती उत्सव सुरु केला होता ती भावना आस्था स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर हिंदी महासागरात बापूच्या अस्थी बरोबर बुडाली आहे.

"" आता उरला आहे तो बाजार .आणि एकदा बाजाराचा बाजारूपणा मान्य केला तर तुमच्या आमच्या कवी कल्पनांना ,भावनांना विचारतो कोण. आम्ही गणपती आणि हो नवरात्र दांडिया उत्सव हे आमच्या पद्धतीने साजरे करतो तर आपल्या पोटात का दुखते. आपले विचार हे आमच्या स्वातंत्र्या वर घाला घालणारे आहेत. भले या उत्सव नंतर कांही महिन्याने गर्भपाताचे प्रमाण वाढते पण तो महत्वाचा सामाजिक प्रश्न नाही. उलट या मुळे डॉक्टर चा फायदाच होतो. आणि समाजात पैश्या च्या मोठ्या उलाढाली व्हाव्यात म्हणूनच हे साजरे होतात ना? या उलाढालीला हातभार लावण्या साठीच आम्ही गणपती, देवीच्या मूर्ती मागे पत्त्यांचे डाव मांडतो.लक्षावधी रुपयांची या निमित्त्याने उलाढाल होते हे आपण विसरत आहात. या उत्सवा मुळे आमच्या कार्यकर्त्यांची वर्षभराची आर्थिक तरतूद होते वर्गणीच्या रूपाने तर करोडो रुपये जमा होतात, आता पहा बाप्पाच्या भक्तां करता आम्ही वातानुकुलीत मांडव सुद्धा १०-१२ दीवस घालत आहोत , भल्ये देशात वीज टंचाई असेना का? आणि हो आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक असल्या मुळे आमच्या ध्वनी प्रादुर्षणाला , रस्ता आडवून नाच करण्यास मज्जाव करण्यास कोणास ही अधिकार आपणास नाही. आपण घरात बसतात या बद्दल आम्ही कांही आक्षेप घेतो का? आणि येथे शासनच सर्व गावातील घाण नाल्यांचे, मानवी विष्टेचे मलमुत्राचे चे विसर्जन भारतातील सर्व पवित्र नद्यात करतेच ना.त्यापेक्षा आम्ही पवित्र मूर्तीचे विसर्जन करून पवित्र नद्या अधिक पवित्र करत असतो ह्या कडे आपले लक्ष वेधून आमचा युक्तिवाद समाप्त करतो. आशा आहे आपण आमच्या वरील आरोप मागे घेत आमची जाहीर माफी मागाल. ""

thanthanpal.blogspot.com

गणेशोत्सव

मी गणेशोत्सव असा शब्द वापरला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव असा नाही. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे.
चन्द्रशेखर

पुढील मुद्दे हे सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित नाही का?

मी गणेशोत्सव असा शब्द वापरला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव असा नाही. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे.कृपया आपल्या लेखातील पुढील मुद्दे हे सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित नाही का? मी गोल-गोल मत न मांडता आजच्या आजच्या उत्सवाचे वास्तव विदारक स्वरूप काय आहे हे सांगितले.

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण
5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?
6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

thanthanpal.blogspot.com

महाराष्ट्राची संस्कृती

तुम्ही गोंधळ करत आहात.
मी महाराष्ट्राच्या संस्कृतीसंबंधात गणेशोत्सव हा शब्द वापरतो आहे. मला कौटुंबिक किंवा एखाद्या गटाने साजरा केलेला गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा भाग वाटतो. सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे हे मला पटत नाही. परंतु इथे माझा चर्चा विषय फक्त कौटुंबिक किंवा एखाद्या गटाचा गणेशोत्सव नसून त्यात सार्वजनिक गणेशोत्सव ही अंतर्भूत आहे. त्यामुळे त्या संबंधातील मुद्दे चर्चेत असणारच.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सप्टेंबर २०१० म्धील लेखांचा अंदाज

राजकुमार यांचा गणेशोत्सवाबद्दलच्या चर्चेचा अंदाज खरा ठरला.

अंदाज नव्हे

राजकुमार यांचा गणेशोत्सवाबद्दलच्या चर्चेचा अंदाज खरा ठरला.

हा अंदाज नसून भविष्यवाणी होती! यातून केवळ भविष्य सांगता येऊ शकते हेसिद्ध झाले. ;)

गणेश विसर्जन

या चळवळीत काही वर्षांपूर्वी सहभाग घेतला होता. त्यावेळेला आम्ही विसर्जित गणपतीची मूर्ती दान करा या नावाखाली चळवळ चालवली होती.
आमचा अनुभव असा की विनंती केलेल्यातल्या जवळपास ५० टक्यांच्या वर गणेशभक्त यात खुल्या दिलाने सहभागी झाले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने दान घेण्याची पद्धत स्वतः सुरु केली. या चळवळी दरम्यान यातील काही मुद्यांनर जाणकार लोकांमध्ये चर्चा झाली होती.

धार्मिक लोकांचे म्हणणे असे होते की गणेशमूर्ती मातीचीच असली पाहिजे आणि तिचे वाहत्या (?) पाण्यात विसर्जन केले पाहिजे. माझ्या आठवणीत आम्ही दान घेतलेल्या मूर्तींमधे साधारण एक टक्का मूर्ती मातीच्या होत्या. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती मोठ्या दिसल्यातरी त्या आतून पोकळ होत्या. त्यामुळे एकंदर ऐवज कमी असे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या मूर्ती पोकळ असल्याने विसर्जन केल्यावर वर येण्याची शक्यता असायची. त्याबरोबर जास्त मजबूत असल्याने विसर्जित केल्यावर अवयव दिसण्याजोगे शिल्लक राहायचे.

समुद्रावर अनंत चतुर्दशीच्या रात्री (१२ वाजता) भरती असल्याने कित्येक मूर्ती या किनार्‍यालगत विसर्जित होणार. पुढची मूर्ती विसर्जित करताना आधीची मूर्ती तुडवावी लागायची. या शिवाय दुसर्‍या दिवशी ओहोटीच्या वेळी किनार्‍यावर त्यांचे अवशेष पडले असायचे. (याच्या छायाचित्राला बंदी आहे.). ठाण्यातील बरेचसे तलाव खाजगी केले आहेत त्यात मासे (पीक म्हणून) आणि बोटींग सारखे व्यवसाय कंत्राटदार करायचे. या कंत्राटदारांचे विसर्जनामुळे धाबे दणाणायचे. पुण्यात असे ऐकले होते की विसर्जनाच्या दिवशी नदीत धरणाचे पाणी सोडायला लागायचे. (एरवी विसर्जन होऊ शकले नसते.) यावरून आठवले, अशीच कथा कुंभमेळ्याची (उज्जैनची) क्षिप्रा नदीत नेहमी पाणीच नसते. कुंभमेळ्या दरम्यान तात्पुरता बांध घालून आणि धरणातले पाणी सोडून लोकांची सोय केली जाते.

आता प्रश्नांसंबंधी

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

माझ्या मते प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध असण्याचे फारसे कारण असू नये. (ते हानी कारक नसावे.) नैसर्गिक रंगांचा पर्याय हा अजूनही फारसा उपलब्ध नाही /बाजारात मिळत नाहीत. (गेरु सोडल्यास. पण गेरु चे केमिकल कॉम्पोजिशन मला माहित नाही.).
या ऐवजी मूर्तीच्या आकारमानावर/वजनावर नियंत्रण असावे. त्यावरून विसर्जन कर घेता आला तर घ्यावा. वा अमुक पेक्षा मोठ्या मूर्ती विसर्जित करण्याची जागा दूरवरची ठेवावी.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

हे ठाण्यात बर्‍याच अंशी पाळले जाते. बहुतेक ठिकाणी निर्माल्य कुंभ (कचर्‍याचा कुंभात्मक डबा) आहे. विसर्जनाच्या दिवशी लोक निर्माल्य टाकतात असे आम्ही पाहिले आहे.
मात्र रोजचे निर्माल्य खाडीत (पुलावरून रेल्वे किंवा बसमधून सरळ) टाकणारे बरेच दिसतात. त्यांनाही अडसर केला गेला पाहिजे.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

धार्मिकांचा याला विरोध असावा. शिवाय मिरवणूकीने आणणे व पोचवणे अशा आनंदाचा (?) यात क्षय होत असल्याने याला थोडा विरोध असतो. मात्र असे करणारे हल्ली बरेच वाढलेले दिसतात.

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

बोलण्याची गरज नाही.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

ठाण्यात मध्यंतरी रस्त्यावरील मिरवणूकीत आवाज केला की पोलिस पायावर लाठी मारायचे. विसर्जन हा प्रकार जवळपास १० दिवस रोज चालू असतो. त्यामुळे तलावाकाठच्या लोकांना विशेष त्रास होतो. मिरवणूकीत ढोल व ध्वनीक्षेपकास बंदी आणली तर मिरवणूकी बर्‍याच आटोपशीर होतील.

माझ्या मामांची आठवण. त्यांच्याकडे गणपती असायचा. पण विसर्जनाच्या दिवशी घरातील व शेजारी तरुण मंडळी अचानक गायब व्हायची. मग त्यांनाच पिशवीत घालून गणपती विसर्जनाला जावे लागायचे. शेवटी त्यांनी तो आणणे बंद केला.

प्रमोद

सहमत

केवळ एक लोहखनिज असल्यामुळे गेरू सुरक्षितच असावा.
विसर्जन नीट न झालेल्या मूर्तींची छायाचित्रे जालावर मुबलक आहेत.

धार्मिकता नसावी असे वाटले तरी उधळपट्टीच करू नये असे मात्र मला वाटत नाही.

पाण्याचे प्रदूषण हा मुद्दा मला ध्वनिप्रदूषणापेक्षा दुय्यम वाटतो.

पौराणिक देखावे

दरवर्षी महराष्ट्रातील गावागावात तेच ते पौराणिक देखावे पाहून अत्यंत बोर झाले आहे. कमीतकमी पुढील १०० वर्षे आधीचे देखावे दाखवता येणार नाही अशी सक्ति केली पाहीजे.

समूहन्माद

प्रथम सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव अशी विभागणी केली पाहिजे. मगच विश्लेषण करता येईल.

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

गणेश मुर्ती ही विसर्जित होणार आहे हे गृहितक असल्याने असा वापर अमान्य. शाडुची मुर्ती वापरावी. सार्वजनिक उत्सवात काही मंडळे विसर्जनाचा गणपती वेगळा व प्रत्यक्ष मिरवणुकीचा वा देखाव्याचा गणपती वेगळा. तो मोठा व प्लास्टिक ऑफ पॅरिस चा सुबक आकर्षक वगैरे.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

पुण्यात सुबक निर्माल्य कलश बनवले आहेत. त्यात फक्त निर्माल्य टाकले जावे अशी कल्पना आहे. तेथील निर्माल्य हे वेगळे काढुन त्याचे खत केले जाते. कचरा पेटीत निर्माल्य टाकणे हे भाविक मनाला त्रासदायक वाटते. मग तो नदीत निर्माल्य टाकु पहातो.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

गणेश मुर्तीची विक्री हा मोठा अर्थकारणाचा भाग आहे. अनेकांची उपजीविका त्यावर आहे. ते विरोध करतील. शिवाय अशी देवघरातील आहे ती मुर्ती वापरणे 'शास्त्रीय' नाही असा मतप्रवाह निर्माण होईल. मग मुर्ती तरी कशाला सुपारी ही गणपतीचे प्रतिक म्हणून वापरतातच की पुजेत.
खर तर गणेश मुर्तीचे विसर्जन करण्याऐवजी प्रतिकात्मक म्हणुन सुपारीचे विसर्जन करण्याची कल्पना अधिक चांगली आहे. जसे कि बळी द्यायच्या ऐवजी नारळ फोडला जाणे एका टप्प्यात रुजवले गेले. पण आमच्या या कल्पनांना विचारतो कोण?

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

पहिल्या टप्प्यात मर्यादित करता येईल. सायलेन्स झोन मधे सार्वजनिक गणेश उत्सवाला परवानगीच देउ नये.सार्वजनिक कार्यक्रमात ध्वनीवर्धक वापरणे अपरिहार्य पण त्याची मर्यादा क्ष डेसीबेल पेक्षा कमी असावी. ( आता हा क्ष कसा ठरवावा)

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

तो गणेश उत्सवाचा अपरिहार्य भाग आहे.मिरवणुकीत ध्वनीवर्धक कमी ठेवावा.

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

पुण्यात विसर्जनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी हौद केले आहेत तिथे विसर्जन करावे.

समांतर- मुळात सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव राहिला नाही. ती जत्रा झाली आहे. समुहउन्मादाचा महोत्सव. अनेक गुन्हेगार भाविकाचा मुखवटा घालून या अभयारण्यात मुक्तपणे वावरतात. गणेशोत्सवात कोट्यावधींची उलाढाल होत असते. अनेकांचे परस्पर हितसंबंध यात गुंतलेले आहेत. यातुनही काही सकारात्मक प्रबोधन करावे असा काहींचा प्रयत्न असतो.
गणपती नुसता नावाला|
चैन पाहिजे आम्हाला||
अवांतर- गणपती म्हणल कि गणपती बंदोबस्त असाच शब्दप्रयोग आमच्या डोळ्यासमोर येतो. रजा, सा.सु बंद. असो आता त्यातुन मुक्ती
प्रकाश घाटपांडे

माझ्याकडे कोणताही विदा नाही

माझ्याकडे कोणताही विदा नाही, पुढील आकडे अंदाजे(पण बर्‍यापैकी लॉजिकल) आहेत.
पुण्याची लोकसंख्या अंदाजे ४० लाख. म्हणजे ७-८ लाख घरे. त्यातील ५ लाख हिंदू घरे. १ - १.५ लाख घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना. घरगुती मूर्तीचे सरासरी वजन १-२ किलो. सर्व मूर्ती मुळा-मुठेत विसर्जित केल्या तर जास्तीत जास्त ३ लाख् किलो / ३०० टन माती नदीत जमा होइल. पावसाळ्यात त्याच्या कितीतरी पट अधिक माती दररोज नदीत वाहून आणली जाते. त्यामुळे गणपती-विसर्जनामुळे नदी प्रदुषणात भर पडते, हे गृहितक योग्य वाटत नाही. (पण त्यासाठी सर्व मूर्ती मातीच्या असाव्यात, पी.ओ.पी. ने मात्र प्रदुषण होइलच!)

२. निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत न घालता टाकले तर ते ठीक आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीने त्या निर्माल्याचे विघटन व्हायला विलंब होईल.
३. विसर्जनानंतर पुढच्या वर्षी नवीन मूर्ती आणण्यात जो उत्साह आणि आनंद असतो, तो कदाचित तुम्ही अनुभवला नसेल.

४. ध्वनि-प्रदुषण चुकीचेच आहे. २-३ मजली म्युझिक सिस्टम्स वर कायद्याने बंदी हवी. एखाद्या ध्वनिवर्धक/प्रक्षेपकाची डेसीबल मर्यादा निश्चित करायला हवी.

५. १० दिवसांच्या उत्सवानंतर मिरवणुक म्हणजे केकवरील आइसिंग+चेरी! आता केक आइसिंगशिवायही असतो, पण आइसिंग शिवाय केकची आणि विसर्जन-मिरवणुकिशिवाय गणेशोत्सवाची मजा नाही. वेळ मात्र २४ तासांच्या आत आली तर बरे होईल.

६. तलावात नको. नदीत वाहते पाणी असल्याने चालेल.

||वाछितो विजयी होईबा||

नागरिक शास्त्र

१. गणपती-विसर्जनामुळे नदी प्रदुषणात भर पडते, हे गृहितक योग्य वाटत नाही
प्रदुषण मातीमुळे होत नाही.अलीकडे मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनवतात. मूर्ती ज्या रंगांनी रंगवलेल्या असतात त्या रंगांनी व प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदुषण होते. त्यामुळे हे गृहितक योग्य नाही हे आपले विधान आधारहीन वाटते.
2 पुढच्या वर्षी नवीन मूर्ती आणण्यात जो उत्साह आणि आनंद असतो. अनेक गोष्टींनी आनंद व उत्साह वाटतो. प्रश्न एवढाच आहे की आनंद व उत्साह महत्वाचा की पर्यावरण?

3. विसर्जन-मिरवणुकिशिवाय गणेशोत्सवाची मजा नाही आपल्याला मजा वाटत असेल पण माझ्यासारखे हजारो ज्येष्ठ नागरिक जे पण पुण्यात राहतात, त्यांच्या दृष्टीने या मिरवणूकीमधे जे ध्वनी प्रदुषण होते ते सहन करण्याच्या पलीकडचे असते. या लोकांनी तुमच्या मजेसाठी हाल व मानसिक तणाव का म्हणून सहन करावा? नागरिक शास्त्राचा मूलभूत नियम आहे की ज्या वर्तनाने दुसर्‍याला त्रास होतो ते वर्तन त्याज्य समजावे. विसर्जन मिरवणूक नागरिक शास्त्रात बसते का? (केक वरचे आईसिंग खाल्याने मेदवृद्धी होते तेंव्हा आईसिंग बिगरचीच केक खावी)
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मग जगावेच कशाला?

आनंद व उत्साह महत्वाचा की पर्यावरण?

गणेश विसर्जनाविरुद्धचा हाच युक्तिवाद फटाके फोडणे, मांसाहार करणे, जॉयरायडिंग, अशा कृतींविरुद्धसुद्धा करता येईल (अंनिस फटाके फोडणे, जेवणावळी, अक्षता, इ. चैनींविरुद्ध चळवळी करतेच). पण मला वाटते की जोवर एकूण प्रदूषणाच्या तुलनेत एकूण पर्यावरण भक्कम असेल तोवर अशा कृती बिनदिक्कत कराव्या. चंद्रावरील वसाहतीत सिगरेट ओढण्यावरही बंदी येईल. आज मात्र हा कृतींमुळे होणार्‍या प्रदूषणाच्या गंभीरतेपेक्षा त्यांतून मिळणारा आनंदच मोठा वाटतो.
ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत मात्र तसे नाही. (रोमानियामध्ये Ceausescu यांनी, कम्युनिस्टांनी पूर्व जर्मनीत, टंकलेखनावर जसे निर्बंध आणले तसे) ध्वनिक्षेपकांच्या निर्मिती आणि मालकीवरच निर्बंध आणले पाहिजेत.

जगा व जगू द्या?? कशाला??

स्वतः फक्त आनंद उपभोगून दुसर्‍याना त्रास देणार असाल तर काही गरज नाही अश्या जगण्याची.... उपभोगायला काळ आणि भुईला ......कोण म्हणतय् रे असं?? चुप् बस् आणि पुढे ऐक्..

>>जोवर एकूण प्रदूषणाच्या तुलनेत एकूण पर्यावरण भक्कम असेल तोवर अशा कृती बिनदिक्कत कराव्या.
जरुर, जरुर ...जितकं ओरबाडता येतय् तितक ओरबडा!!! बाकिचे झक् मरेनात्!! अतिशय् उत्तम विचार.... आगे बढो.
भविष्य उज्ज्वल आहे, पर्यावरणाचे! चंद्रावर मंगळावर सर्वत्र वसाहती करुया..आणि तिथेही सारे मिळुन डॉल्बी लावुन दणक्यात् विसर्जन करुया (आता तिथे हवा नाहि मग आम्हि ऐकु कसं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला!!) पाण्याचे साठे आहेत ना तिथे?? मग विसर्जन कुठे करयच हा प्रश्नच् सुट्ला!!
पर्यावरण रक्षण केवढा बोजड शब्द् आहे नकोच त्या बाजूला जायला...खाओ,पिओ, ऐश करो..ब्बास्!!

बापरे!

(रोमानियामध्ये Ceausescu यांनी, कम्युनिस्टांनी पूर्व जर्मनीत, टंकलेखनावर जसे निर्बंध आणले तसे) ध्वनिक्षेपकांच्या निर्मिती आणि मालकीवरच निर्बंध आणले पाहिजेत.

तुम्ही डावखुरे आहात हे माहित नव्हते.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

नागरिकशास्त्राचा पराभव्

- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या तुलनेत माती व शाडूच्या मूर्तींची संख्या वाढतच आहे. लोकंही आता आवर्जून अशा मूर्ती घेतात व विसर्जित करतात. शिवाय महाराष्ट्रातील एकूण जलस्रोतांच्या प्रदूषणात मूर्तींमुळे होणारे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर होतंय, अशातला भाग नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी केलेल्या पाहणीनुसार, पुण्यातील नदीच्या प्रदूषणात सांडपाण्याचा वाटा मोठा आहे, गणपतींच्या मूर्तींचा नाही.
- ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत बोलायचं तर गणेशोत्सवातील मिरवणुका या आजार नाहीत, आजाराचे लक्षण आहेत. उथळपणा, सवंगपणा आणि प्रत्येक गोष्ट 'दणक्यात' करण्याचा जो सामाजिक आजार पसरला, त्याचे अत्यंत उग्र स्वरूप या मिरवणुकीत पाहायला मिळते. पोलिस, प्रशासन व 'सभ्य नागरिक' या अशा अपप्रवृत्तींवर नियंत्रण ठेवू शकणाऱ्या संस्थांचे अपयश म्हणून या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. साध्या गल्लीतील पुढाऱ्याच्या वाढदिवसासाठी जेथे मोठ-मोठ्या भिंती उभारण्यात येतात, तिथे मिरवणुकांत गलका तर होणारच. जोपर्यंत हा आजार आहे, तोपर्यंत त्रास असणार. विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली, तर अन्य कोण्या निमित्ताने तो उफाळून येणारच.
- आणखी एक मु्द्दा म्हणजे, ही मिरवणुक आधी सुरू झाल्या व वस्ती नंतर वाढली. पूर्ण वर्षभर (शहरातील मध्यवर्ती) मोक्याची जागा म्हणून उपभोग घेतल्यानंतर, वर्षातील काही भाग उपद्रव सहन करावा लागेलच. माणसांनी आधी अतिक्रमण करायचे आणि नंतर गैरसोयीच्या नावाखाली जुन्यांना घालवून देण्याचे आणखी एक उदाहरण पुण्यात ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे आहे. दोन-तीनशे वर्षांपासून ते मंदिर तिथेच होते. मात्र लोकांनी नंतर वर्दळ वाढविली आणि वाहतुकीला त्रास होतो म्हणून ते मंदिर तिथून हालवून टाकले. अर्थात नियंत्रक संस्थांनी आपली जबाबदारी पार पाडली, तर ही समस्या यायचे कारण नाही.
- निर्माल्याच्या बाबतीत पुण्यात एक चांगला प्रयोग होतो. विसर्जनाच्या वेळी नदीच्या कडेला मोठ-मोठे कलश ठेवलेले असतात. त्यात टाकलेले निर्माल्य नंतर 'स्वच्छ' संस्थेच्या कार्यकर्त्या गोळा करून फुल-पाने वेगळे करतात. त्या फुलांपासून येरवडा तुरुंगातील महिला कैद्यांच्या साहाय्याने नैसर्गिक रंग तयार केले जातात. गेली तीन वर्षे हा प्रयोग उत्तम चालू आहे. आता आपल्याकडे 'नियम केलाच आहे तर मोडा' हाच सार्वत्रिक नियम असल्यामुळे या कलशात निर्माल्य न टाकता नदीत किंवा इतरत्र टाकणारेच लोक जास्त आहेत. हाही नागरिकशास्त्राचा पराभव नाही का?

वर्षेभर अतिशय घाणेरडे पाणी नदीत

वर्षेभर अतिशय घाणेरडे पाणी नदीत सोडणारे पुणेकर त्याच नियमाने मुर्तींचे विसर्जन तरी त्यातच करणार नाही असे वाटणे चुकीचे आहे.

आणखी गंमत

पुणे पालिका विसर्जनासाठी छोटे हौद बांधते. मग लोकांनी विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती जास्त झाल्या, की पालिकेची माणसे दुसरे दिवशी त्या सगळ्या उचलून परत नदीपात्रात नेऊन टाकतात. लोकांनी थेट नदीत मूर्ती विसर्जित करणे मग चुकीचे कसे काय ठरेल?

असे कसे?

अन्यथा, वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत केल्याचे पुण्य कसे मिळेल?

यंदाची गंमत्

आता यंदा पालिकेने काढलेल्या निवेदनात वैज्ञानिक दृष्टीकोन किंवा पर्यावरण, असा काही मामलाच नाही. 'पालिकेने हौदाची सोय प्रदूषण टाळण्यासाठी पुरविलेली नसून केवळ नागरिकांच्या सोयीसाठी ती आहे,' असे स्वच्छ वाक्य आहे. म्हणजे गाढवही गेले आणि ब्रह्यचर्यही...तुमच्या मताप्रमाणे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्याचे पुण्यही पालिकेने गमावले आहे.

हाहाहा

इसापनीतीतील बेडकांचा ओंडकाराजा ही कथा आठविली.

स्वसंपादित्

एकूण पहाता

या चर्चेला चांगले प्रतिसाद आले. एकूण प्रतिसाद पहाता बहुतेक लोकांचा सूर असा दिसतो आहे की सध्याचे गणेशोत्सवाचे स्वरूप मनाला आनंद व उल्हास देते. ध्वनी प्रदुषण सोडले तर बाकी होणारे प्रदुषण व त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी फारशी महत्वाची नाही.
माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना दहीहंडी व विसर्जन मिरवणूक याचा अतिशय उपद्रव होतो. चर्चेतून असा सूर दिसला की ज्येष्ठ नागरिकांनी हे सहन केलेच पाहिजे कारण काही मंडळींना त्यातून आनंद मिळतो.

व्यक्ती म्हणून मी यावर माझा वैयत्क्तिक उपाय शोधून काढलाच आहे. मी शक्यतो या दोन्ही दिवशी (दहीहंडी व विसर्जन) पुणे सोडून जगात इतर कोठेतरी (जेथे अजूनही नागरिक शास्त्र पाळले जाते) जातो व 2 दिवसांनी परत येतो.
चर्चेत भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मुर्ती विसर्जनाची काळजी

दिड दिवस-१२ दिवस भाविकतेने गणपतीबाप्पाची पुजा करणारे, त्यात पंचप्राण फुंकणारे, मुर्ती विसर्जनाची काळजी ज्यापद्धतीने घेतात ते पाहून हा देश इतका घाणेरडा का आहे त्याचे कारण मिळते.

गैरसमज

चंद्रशेखरजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पुणे सोडून जाण्याचा जो उपाय तुम्ही म्हणता, तो दुर्दैवाने अनेक पुणेकर योजत आहेत. अशा रितीने उपद्रवांचे निमित्तप्रसंग वाढतच जाणार आहेत. जोपर्यंत गैर-उच्छादवादी मंडळी एकत्र येऊन कार्यकर्तांवर दबाव निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तरी हे असंच चालणार आहे. त्याला इलाज नाही. अशी मंडळी एकत्र आली, तर ध्वनिप्रदूषणाची पातळीही सुसह्य मर्यादेपर्यंत आणता येईल.

दिड दिवस-१२ दिवस भाविकतेने गणपतीबाप्पाची पुजा करणारे, त्यात पंचप्राण फुंकणारे, मुर्ती विसर्जनाची काळजी ज्यापद्धतीने घेतात ते पाहून हा देश इतका घाणेरडा का आहे त्याचे कारण मिळते.

(H1N1 चे) तीनशेच्या वर बळी जाऊनही ज्या शहरातील (राज्यातील) लोक जागोजागी पचापच थुंकतात आणि स्वतःसकट इतरांच्या आरोग्याशी खेळतात, त्या राज्यातील लोकांचा तारणहार गणपतीशिवाय आणखी कोण असणार? अन् जो स्वतःच तारणहार आहे, त्याच्याबाबतीत काळजी करणारे आपण कोण? :)

सहमत आहे

जोपर्यंत गैर-उच्छादवादी मंडळी एकत्र येऊन कार्यकर्तांवर दबाव निर्माण करत नाहीत, तोपर्यंत तरी हे असंच चालणार आहे. त्याला इलाज नाही. अशी मंडळी एकत्र आली, तर ध्वनिप्रदूषणाची पातळीही सुसह्य मर्यादेपर्यंत आणता येईल.

सहमत आहे.
हा मुलतः जनजागृतीचा उत्सव आहे.

प्रकाश घाटपांडे

अगदी बरोबर्!

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. यानिमित्ताने कोणी का होईना, जागे झाल्याशी मतलब.

माझी मते / अनुभव/ सध्या काय करतो

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.
पार्थिव मूर्ती ३ वर्षांपूर्वी बंद केली आहे. पंचधातूची कायम मूर्ती वापरतो. तेव्हा हे माझ्यासाठी आता गैरलागु :)

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.
गणपतीची सजावट करताना, यंदा रद्दीपेपर, पुठ्ठे, रंगीत कागद वगैरे डिग्रेडेबल वस्तु वापरल्या होत्या त्या कालच खड्ड्यात पुरल्या. निर्माल्य दर महिन्याला सोसायटीत खड्डा करून एकत्र केले जाते व वर्षाने ती माती खत म्हणून वापरता येते.. झाडे उत्तम वाढतात.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?
उत्तर क्र. १ प्रमाणे. आधीच अमलात आणले आहे.
4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण
घरगुती गणपती. प्रश्न गैरलागु. सार्वजनिक गणपतीत, सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम सोडल्यास ध्वनीवर्धकास बंदी असावी असे वाटते.

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?
होय. मात्र येथे ध्वनीक्षेपकांऐवजी (किंवा ध्वनीवर्धकांऐवजी) ढोल, ताशे, लेझीम वगैरे लाईव परफॉर्मन्सेस बघायला आवडतात. शिवाय मिरवणूका अधिक वेगात व ठराविक वेळेत सुरू होऊन संपायला हव्यात याच्याशी सहमत.

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.
धातूच्या मूर्तीमुळे प्रश्नच येत नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उत्तम प्रतिसादलेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री.ऋषीकेश यांचा प्रतिसाद आवडला.मूळ लेखात विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी मोजक्या शब्दांत,बिंदुगामी, यथायोग्य उत्तरे दिली आहेत. अशा प्रकारे प्रतिसाद लिहिल्यास चर्चा भटकणार नाही.
** त्यांनी परंपरा मोडली नाही. पण गणपतिपूजनाच्या प्रथेत कालानुरूप योग्य ते बदल केले. अशा प्रकारे कालसुसंगत सुधारणा केल्यास अनेक समस्या कमी होऊ शकतील.

अनिरुद्ध बापूंचे इको फ्रेंडली गणपती

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

मस्त गोची!

=))
छाणच त्रांगडे आहे हे!
श्री साई समर्थ विज्ञान(विज्ञानाला लिपजॉब दिला ना! बाकी काही बोलू नका.) प्रबोधिनीच्या रामनाम बँकेत समन्वयवादी लोकांनीही बापूंच्या नावाच्या पोथ्या लिहून देऊन (फारतर अथर्वशीर्ष लिहावे) वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायला मदत करावी.
बापूभक्तांना कल्ट म्हटलेत तर खबरदार!

Weyoun: I'm not sure how much faith I have in this...what did he call it?
Damar: A Pah-Wraith.
Weyoun: Pah-Wraiths and Prophets? All this talk of gods strikes me as nothing more than superstitious nonsense.
Damar: You believe the Founders are gods, don't you?
Weyoun: That's different.
Damar: [Laughs] In what way?
Weyoun: The Founders are gods.
--
Tears of the Prophets (Star Trek: Deep Space Nine)
क्ष्

मोरया..

Ganesh_mimarjanam_EDITED

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

हरकत

मूर्ती छान आहे. पण 'वन बिलियन हिन्दुज् काण्ट बी राँग'-हे पटले नाही. तसे तर जगात हिंदूंच्या कितीतरी पट जास्त मुस्लिम व ख्रिश्चन आहेत.
हिंदू-अंदाजे ९०-१०० कोटी
मुस्लिम- अंदाजे ११०-१२० कोटी
ख्रिश्चन- अंदाजे २३०-२५० कोटी

१०० कोटी हिंदू जर चुकीचे नसतील तर सव्वाशे कोटी मुस्लिम व अडीचशे कोटी ख्रिश्चन कसे चुकीचे असतील.
(मला इतर धर्मांची तरफदारी करायची नाही. मी बर्‍यापैकी (म्हणजे सहिष्णु) हिंदुत्ववादी आहे.)

||वाछितो विजयी होईबा||

 
^ वर