मिस्टर इंडिया!

मिस्टर इंडिया!

जगात चमत्कार घडत नाहीत असे कितीही ठामपणाने, वैज्ञानिकरित्या पुराव्यासहित सिद्ध करून दाखवले तरीही बुवा - बाबांच्या नादी लागलेल्यांना या विधानावर विश्वास बसत नाही. कारण बुवा - बाबांचे तथाकथित चमत्कार त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी अगदी जवळून पाहिलेले असतात. हवेतून काही क्षणातच तुमच्या हातात आंगठी काढून दिल्यानंतरही त्यावर विश्वास ठेवू नका असे म्हणणार्‍यास नतद्रष्ट वा मूर्खच म्हटले पाहिजे असे त्या भक्तगणांना मनोमन वाटत असते.
हेमंतही असाच एका बाबाचा निस्सीम भक्त. दिवसातून 50 -60 वेळा तरी बाबांच्या तस्विरीला नमस्कार केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. बाबांच्या प्रत्येक शब्दावर त्याचा प्रचंड विश्वास. जगातील यच्चावत सर्व लोकांनी बाबांचे शिष्यत्व स्वीकारून बाबांना शरण गेल्यास या जगातील सर्व समस्या सुटतील, लोक सुख समाधानाने जीवन जगू शकतील, याची त्याला पूर्ण खात्री होती. परंतु काही भाविक कुठल्यातरी फुटकळ ताई -देवी, भगवान, महाराज, यांच्या मागे लागतात व स्वत:च्या आयुष्याचे नुकसान करून घेतात, असे त्याला मनोमन वाटत होते. नास्तिक, श्रद्धाचिकित्सक, संशयखोर मंडळींच्या डोक्यात मेंदूऐवजी भुस्सा भरलेला आहे असे त्याला नेहमीच वाटत असे. त्याच्या बाबांच्या सत्संगावेळची अफाट गर्दी बघत असताना त्याचा ऊर भरून येत असे. धन्य धन्य झालो असे खरोखरच वाटत असे.
एकदा बाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग जुळून आला. दर्शनाच्या वेळी बाबांनी त्याच्याही हातात एक आंगठी काढून दिली. त्याला आकाश ठेंगणे वाटू लागले. बाबानी दिलेली आंगठी भक्तीभावाने बोटात सरकवत असताना काही तरी वेगळे घडत आहे याची जाणीव त्याला होऊ लागली. आंगठीमुळे आपण अदृश्य झालो आहोत हे कळण्यास त्याला थोडा वेळ लागला.
त्या अदृश्यावस्थेत हेमंतनी मारलेला धक्का समोरच्याला न कळल्यामुळे समोरचा माणूस कावरा बावरा झाला. हेमंतला त्याचे हसू आले. आपण अदृश्य होऊ शकतो, आपल्याला कुणीही पाहू शकत नाही या जाणिवेने त्याच्या अंगावर मूठभर मास चढल्यासारखे त्याला वाटू लागले. पहिले काही तास अदृश्यावस्थेतच इकडून तिकडे, तिकडून इकडे हेमंत भटकत होता. जरी हा जोराने खोकला तरी त्याच्या भोवतीच्या, आजूबाजूच्या लोकांना ऐकूही आले नाही. या अदृश्यावस्थेत एकच खोट होती. तो स्वत:च्या पाऊलखुणा वा शारीरिकखुणा लपवू शकत नव्हता. हेमंत सोफ्यावर बसून उठल्यानंतर तेथे आताच कुणीतरी उठून गेले आहेत हे स्पष्टपणे कळत होते. समोरच्याला हा दिसत नसला तरी धक्का मारल्यानंतर काही तरी अडथळा आला याची समोरच्याला जाणवत असे.
एकदा आपल्याला कुणीही पाहू शकत नाही, काही करत असताना पकडू शकत नाही याची पुरेपूर खात्री झाल्यावर आपण नेमके काय करावे याचा विचार तो करू लागला. लाजिरवाणी गोष्ट अशी होती की त्याच्या मनात आलेल्या सर्व कल्पना वा विचार अत्यंत घाणेरड्या, अश्लील, वात्रट या सदरात मोडणार्‍या होत्या. उदाहरणार्थ, आपण एखादी सुंदर तरुण बाई आंघोळ करताना वा कपडे बदलत असताना बघू शकतो; एटीएम मधून पैसे काढणार्‍यांच्या हातातले पैसे हिसकावून घेवू शकतो; मोबाइलवर बोलणार्‍यांच्या हातातील मोबाइल हिसकावून फेकून देऊ शकतो; पॉश मॉलमधील अत्यंत महागड्या वस्तूंची (हिरेजडित पेन वा घड्याळाची!) चोरी सहजपणे करू शकतो; इत्यादी चित्र विचित्र घाणेरडे विचार त्याच्या मनात येवू लागले. परंतु हेमंतला अशा वाईट गोष्टीपासून चार हात दूरच रहायचे होते. काही तरी चांगले, भरीव, लोकोपयोगी कार्य करता येईल का? याचा विचार तो करू लागला. परंतु त्याला चांगले काही सुचेनासे झाले. शिवाय या अगोदर सुचलेल्या कल्पनेपासून परावृत्त होणे जड जाऊ लागले. अशा वाईट, आचरट गोष्टीपासून आपण फार काळ दूर राहू शकू याची त्याला खात्री नव्हती (मध्येच केव्हा तरी आंगठीतील ती शक्ती संपली तर!) एखाद्या निसटत्या क्षणी बाथरूममध्ये घुसून नग्न स्त्रीला पाहण्याचा वा कुठल्या तरी बँकेत शिरून कॅश काउंटरवरील नोटांची बंडलं लंपास करण्याचा मोह तो (फार काळ ) टाळू शकत नव्हता.
अशा प्रकारच्या मोहपाशातून दूर राहणे त्याला शक्य होईल का?

Source: Book Two of Republic Day by Plato (360 BC)

आपल्याला अदृश्य करणारी आंगठी ही आपल्यातील नीतीमत्तेच्या कसोटीचे मापक आहे असे ढोबळपणे म्हणता येईल. अदृश्यावस्थेत असताना आपण आपल्या नीतीमत्तेशी, मूल्य विचारांशी कितपत प्रामाणिक राहू शकतो याची चाचणी घेणे येथे सहज शक्य आहे. परंतु मोहजालात फसवणार्‍या वस्तू सहजपणे उपलब्ध होत असल्यास व त्यांचा उपयोग बिनधोक असल्यास आपल्यातील किती जणांना (व किती काळ!) त्यापासून दूर राहणे शक्य होईल? आपण खरोखरच प्रामाणिक असल्यास अशा प्रकारची अदृश्य करणारी आंगठी घातल्यानंतर आपणही भ्रष्ट होऊ शकतो हे प्रांजळपणे कबूल करावे लागेल. याचा अर्थ आपण मुळातच भ्रष्ट आहोत असे म्हणता येणार नाही.
कदाचित चमत्कार करणारी ही आंगठीच आपल्यातील दुष्टप्रवृत्तींना उत्तेजन देण्यास, आपल्यातील सुप्तपणे असलेल्या अशा दुष्टप्रवृत्तींना उफाळून बाहेर पडण्यास कारणीभूत ठरत असावी. एखादी अतीश्रीमंत व्यक्ती सर्व लाजलज्जा गुंडाळून, ताळतंत्र सोडून वागत असल्यास आपल्याला अशांचा तिरस्कार वाटेल. परंतु आपण त्याच्या जागी असतो व आपल्याकडेही उधळून टाकण्याइतकी संपत्ती, काहीही करण्याची संधी व मुभा, आवतीभोवती आपली थुंकी झेलणारे व उधो उधो करणारे 'चमचे ' असल्यास आपणही त्या व्यक्तीइतकेच भ्रष्ट रीतीने वर्तन केले असते, यात शंका नसावी. त्याच्याइतकी खालची पातळी गाठणार नाही याची आपण खात्री देऊ शकणार नाही.
काही मर्यादित काळासाठी अशा प्रकारची आंगठी वा तत्सम वस्तू आपल्याकडे आहे असे गृहित धरल्यास आपल्या नैतिक वागणुकीत नक्कीच फरक जाणवेल. डोक्यात भ्रष्ट विचार येणे व तशी प्रत्यक्ष कृती करणे यांच्यात फार मोठी दरी आहे. व ही आंगठी ती दरी भरून काढू शकते. आपण भ्रष्ट कृती करण्यास पकडले जावू ही भीती व कृती करण्यासाठी संधीचा अभाव हेच कारणीभूत असतात. आपल्याला कुणीही लाच देत नाहीत म्हणूनच लाचखोरीचा तिटकारा वाटत असावा. मुळातच आपण भ्रष्ट आहोत. म्हणूनच अदृश्य झाल्यानंतर आपल्याला भ्रष्ट कृती करण्यास संधी मिळते व अशाप्रसंगी कुणीतरी पकडतील याची भीती पण नाहिशी होते.
जन्मत:च आपण नीतीवान आहोत की सामाजिक रूढी, परंपरा, संस्कृती, प्रतिष्ठा, भीती, किंवा आपल्यातील पळपुटेपणा, इत्यादीमुळे आपण नीतीवान ठरतो? हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. याची चाचणी घेण्यासाठी ही अदृश्य करणारी आंगठी कामी येईल. आपण जोपासत असलेली तथाकथित मूल्ये व नैतिकतेच्या मागे असलेला मुखवटा जगजाहीर करण्यासाठी, आपल्याला उघडे पाडण्यासाठी अशा प्रकारची आंगठी उपयुक्त ठरू शकेल. एकदा हा (नैतिकतेचा आव आणणारा) पडदा बाजूला झाला की सत्य परिस्थिती समोर येईल. त्यानंतर मात्र आपल्यातील नीती व मूल्यांची संख्या नगण्य राहील.
आपण कुणाचाही खून करत नाही हे खरे असले तरी आपल्याला सतत त्रास देणार्‍या, आपल्यावर कुरघोडी करणार्‍या, एका-दोघांना अमानुष प्रकारे मारून टाकण्याचे विचार आपल्या डोक्यात कधीना कधी तरी नक्कीच आलेले असतील.(कदाचित अशी एक यादी असेलसुद्धा!) स्त्रीवाद्यांच्या मते तर प्रत्येक पुरुष - काळ, वेळ, वय, नाते, शिक्षण, हुद्दा, वर्ण, वर्ग, इत्यादींचे भान न ठेवता - संधी मिळाल्यास कुणावरही बलात्कार करू शकतो. आपण चोर, दरोडेखोर नाही याचा अर्थ आपला दुसर्‍यांच्या संपत्तीवर डोळा नाही असा अर्थ होत नाही.
काहींना ही अत्यंत टोकाची भूमिका आहे असेही वाटत असेल. ही आंगठी इतर कुणीतरी वापरत असताना कसे वागतील व स्वत: तुम्ही वापरत असताना कसे वागाल याचा क्षणभर विचार केल्यास त्यात नक्कीच तफावत जाणवेल. बहुतेक जणांना इतर भ्रष्ट होतील, मी मात्र माझ्या नैतिक मूल्यांशी प्रामाणिक असेन, असेच वाटेल.
जर हीच तुमची प्रतिक्रिया असल्यास आपण स्वत:ला वाजवीपेक्षा उच्च व इतरांना कमी लेखत आहोत असे तर होत नसेल ना?

Comments

आयडी

टोपणनावामागे लपणे हाही तसलाच प्रकार असू शकतो ना?

Tom Welles: Why would Christian want this? Why would he want a film of a... a little girl being butchered?
Daniel Longdale: Because he *could*!
--
8MMक्ष्

चांगला प्रश्न

सुरुवात वाचत असताना हा लेख या प्रश्नाशी जाऊन पोचणार आहे याची कल्पना आली नाही. तो एक चांगला धक्का होता. लेख आवडला.

अपरिमित शक्ति आल्यावर् कसे आणि का? (कुणाच्या भुवया उंचावतायतात :) ) वागावे. नीतिमत्ता म्हणजे घाबरटपणा का? (परंपरा, संस्कारांच्या खोड्यातून बाह्रेर पडा म्हणणारे येथे बरेच आहेत.) हे प्रश्न विचारात टाकणारे आहेत.

मला वाटते परस्परांविषयी वाटणारे प्रेम (शारिरीक आकर्षणवाले नाही) हा नितीमत्तेचा पाया आहे. ते असल्यास वागणुकीत फरक पडू शकतो.

अगदी अदृश्य अंगठी नसली तरी राज्यसत्ता वा अतोनात श्रीमंतीच्या जोरावर अनिर्बंध (जे अंगठीने मिळते) आयुष्य जगणारे खूप मिळतील (सध्या व इतिहासात.) त्यांच्यावरील अभ्यासाने यातील प्रश्नांची काही उत्तरे मिळतील. मला वाटते की अगदी सरसकट अनीतिमान आयुष्य जगणारे यातील टक्केवारीत ५०-५० मिळतील (हा अगदीच उडता अंदाज आहे.)

प्रमोद

तळे राखतो तो...

लेखातील गृहितकाशी काही अंशी असहमत आहे. याचे कारण नितिमत्ता ढळण्यासाठी चमत्कारी आंगठीची गरज नाही. मराठीत एक चांगली म्हण आहे "जो तळे राखतो, तो पाणी चाखतो." पाणी चाखण्यापर्यंतच जेव्हा मजल जाते त्यामुळे नितिमत्ता ढळली असे प्रत्येक वेळेस म्हणता येत नाही.

तसेच, डोक्यात घाणेरड्या, अश्लील, अनैतिक कल्पना येण्यासाठी आंगठीची गरज नाही हे जितके खरे तितके आंगठी मिळाली आता अनैतिक गोष्टी करू शकतो असा विचार येणेही खरे परंतु कुतूहलाने अशा गोष्टी करून पाहिल्यावर त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहणे होईलच असे सांगता येत नाही.

कुतूहलाने सिग्रेट ओढून पाहणारा प्रत्येकजण सिग्रेटच्या आहारी जातोच असे नाही.

आपल्या सर्वांकडे आंगठी असतेच असे म्हणण्यापेक्षा आपण सर्वच पाणी राखत असतो पण म्हणून त्या पाण्याचा दुरुपयोग करतोच असे नाही.

आम्ही कोण?

मुळात व्यक्ती म्हणजे तरी काय? जनुके आणि संस्कारांचे गुलाम यंत्र!
फ्रॉईडने इड, इगो आणि सुपरइगो असे मनाचे तीन भाग केले. इप्सित ध्येय प्राप्तीसाठी (उदा. मूत्रविसर्जन) इड आतुर असते. ध्येय नैतिक आहे की नाही (उदा. सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करू नये) ते इगो ठरवितो आणि नैतिकतेच्या व्याख्येत बसूनही ध्येय मिळविण्याचा मार्ग (उदा. स्वच्छ्तागृह) सुपरइगो शोधतो. कार्ल सगान यांच्या मते हे तीन भाग ढोबळपणे सरिसृपांपासून मिळालेला मेंदू, सस्तन प्राण्यांपासून मिळालेला मेंदू आणि मानवजातीत नव्यानेच निर्माण मेंदू असे कल्पिता येतात.
आपली नैतिकतासुद्धा स्वार्थाच्या उत्क्रांतीतूनच बनली आहे ना? 'नव्या' परिस्थितीत ती 'वेगळी' वागू शकते. पकडले जाण्याची भीती असल्यामुळेच तर जनुके नीतिमान असतात. शशशृंगासारख्या 'नव्या' परिस्थितीत 'नवी' वागणूक करण्याची कुवत जनुकांमध्ये नसते (त्यांच्या मृत्यूमुळेच उत्क्रांतीची दिशा ठरते आणि प्रजाती नव्या परिस्थितीला तोंड देण्यास शिकते). (विशेषत: मानवाचा) मेंदू मात्र, सजीवाच्या आयुष्यादरम्यानच, नव्या परिस्थितीत स्वार्थ मिळविण्याचे नवे मार्ग शिकतो.

यावरून

फ्रॉईडने इड, इगो आणि सुपरइगो असे मनाचे तीन भाग केले.

तुम्हाला फ्रॉइडची थिअरी मान्य आहे असा याचा अर्थ घ्यावा का?

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

कोणती?

फ्रॉईडने संपूर्ण आयुष्यात एकच सिद्धांत मांडला काय?

:)

मागे चर्चेत तुम्ही कल्ट उपचार यांच्या नावाखाली बडबड, कॅथार्सिस इ. चा उल्लेख केला होता. म्हणून शंका विचारली.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम

सहमत आहे.

मुळात व्यक्ती म्हणजे तरी काय? जनुके आणि संस्कारांचे गुलाम यंत्र!

सहमत आहे. काही लोक माणुस हा जैवरासायनिक यंत्रच मानतात. आधुनिक विज्ञान याविषयी काय म्हणते हे जाणण्यास उत्सुक आहे
प्रकाश घाटपांडे

अमानुष प्रकारे मारून यादीत पहिल्या एक ते दहा यादी पर्यंत ठणठणपा

आपण कुणाचाही खून करत नाही हे खरे असले तरी आपल्याला सतत त्रास देणार्‍या, आपल्यावर कुरघोडी करणार्‍या, एका-दोघांना अमानुष प्रकारे मारून टाकण्याचे विचार आपल्या डोक्यात कधीना कधी तरी नक्कीच आलेले असतील. या यादीत पहिल्या एक ते दहा यादी पर्यंत ठणठणपाळ यांचाच नंबर असेल यात शंका नाही. हे झाले यादीचे.
आता माणूस जन्माला येतो तेंव्हा राग ,मत्सर, लोभ, मत्सर हे भाव नसतात . पण हळूहळू सभोवतालच्या जगराहाटी चा प्रभाव त्याच्यावर पाडून त्याच्या स्वभावाची घडण होते तरी पण प्रत्येकाच्या मनात एक शैतान दडलेलाच असतो. आणि संधी मिळेल तेंव्हा हा शैतान उच्च-निचः वर्ग न पाहता प्रगट होत असतो . या करता अदृश वगैरे होण्याची सुद्धा गरज भासत नाही. ही संधी मिळत नाही म्हणूनच आपण प्रतिष्टीतपणाचा आव आणून इजतदारीचे , नैतिकतेचे डांगोरे पिटत जगत असतो. तर कोणी संधी मिळूनही ती नाकारण्याचे धैर्य दाखवतात.पण फार थोडे या वर्गात मोडतात

thanthanpal.blogspot.com

साई-सुट्यो

--या यादीत पहिल्या एक ते दहा यादी पर्यंत ठणठणपाळ यांचाच नंबर असेल यात शंका नाही--

साई-सुट्यो म्हणा! मला तरी तसे नाही वाटंत. ठणठणपाळ ह्यांना त्यांचे नाव देवनागरीत का लिहीता येत नाही हा प्रश्न पडतो.

अवांतर

माझ्यामते ठणठणपाळ (देवनागरीत) ही आयडी आधीच कोणीतरी घेतलेली आहे त्यामुळे "ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट" यांना ती घेता येत नसावी.

हा जाहीर खुलासा देण्याचे कारण या आधीही कोणीतरी त्यांना तशी पृच्छा केली होती आणि दुसरा ठणठणपाळ हल्लीच माझ्या नजरेस पडला.

आता दोन्ही व्यक्ती एक असतील तर कल्पना नाही. असो.

इंग्रजी ठणठणपाळ

बाकी हे इंग्रजी ठणठणपाळ कळकळीने लिहीतात पण मधेच अशी फुसकुली सोडून चर्चा भलत्याच वळणावर नेतात त्यामुळे त्यांचाच हुकूमाचा पत्ता आपोजिट पार्टीवाला त्यापेक्षा भारी हुकूम टाकून कापतो.

वरील विचारात ते एक ते दहा वाले वाक्य सोडले तर बाकी प्रतिसाद अत्यंत चांगला आहे. पण ते लोकांनी टुकटूक करुन पुढे गेले व त्या प्रतिसादाचे महत्व कमी केले.

भारतीय फक्त भारतीय नो इंडियन

है प्रीत जहां की रीत सदा मै गीत वहां के गाता हुं ! भारता रहनेवाला हुं भारत की बात करता हुं

thanthanpal.blogspot.com

लेख आवडला...

म्हणूनच कदाचित "तुम्हाला कुठल्या अतिंद्रिय शक्ती अंगात असायला आवडतील?" या प्रश्नाची उत्तरं बहुतेक वेळा "अदृश्य होता येणं, एक्ष्-रे व्हिजन ,किंवा उडता येणं" अशी मिळतात.

या अश्या अंगठीमुळे माझ्यातल्या नितीमत्तेची, तत्त्वांची परिक्षा होईल खरी. पण् त्या परिक्षेचे निकाल फक्त मलाच कळतील आणि मी पुरेसा निर्लज्ज असेन् तर् अश्या निकालांना काडीची किंमत देणार नाही.

असं वाटतं कि आपल्या मनात अश्या भावना असतातच पण त्या बाहेर् येण्यासाठी संधी मिळत नाही म्हणून आपल्याला सुसंस्कृत म्हणलं जातं का? मी एकपत्नीव्रती, अतिशय निष्ठावान, प्रामाणिक नवरा आहे. कुठपर्यंत? जो पर्यंत प्रियांका चोप्रा मला "ऑफर" देत नाही तो पर्यंत. मग माझ्यासाठी प्रियांका चोप्रा ही "अदृश्य करणारी अंगठी" ठरते.. ;)

तसच क्रौर्याबद्द्ल ही आहे. आपल्या मनात भयंकर क्रूर कल्पना येतात, माणसांवर-शत्रूवर त्या राबवता आपल्याला येतीलच असं नाही पण मग त्या आपण किड्यांवर राबवतो. "हॉस्टेल" नावाच्या एका चित्रपटा मधे ही कल्पना वापरली गेली आहे.. युरोपमधली एक कंपनी सभ्य-सुसंस्कृत लोकांना जिवंत माणसं, बंदिस्त खोल्या आणि हवी ती सामग्री (चेन् सॉ, खिळे, इ) पुरवत असते. अश्या विकत घेतलेल्या माणसाला बंदिस्त खोली मधे कितीही क्रौर्याने मारण्याची मुभा दिली जाते. "सभ्य-सुसंस्कृत-संपन्न" म्हणवली माणसं वेळ आणि संधी उपलब्ध झाली कि कुठच्या थराला जाऊ शकतात याच चित्रण् केलं आहे..

जंगली श्वापद

माणूस पृथ्वीवर जितकी वर्षे "सभ्य" वर्तणूक करत आहे त्याच्या लाखो पटीने जास्त वर्षे जंगली श्वापद म्हणून राहीला आहे. त्या काळातील शिकवणींनुसार तो करतच राहणार.

अस्सल नैतिकता अक्षयच

आपण खरोखरच प्रामाणिक असल्यास अशा प्रकारची अदृश्य करणारी आंगठी घातल्यानंतर आपणही भ्रष्ट होऊ शकतो हे प्रांजळपणे कबूल करावे लागेल. याचा अर्थ आपण मुळातच भ्रष्ट आहोत असे म्हणता येणार नाही.

अशी अंगठी घातल्यावर जर आपल्या मनात भ्रष्ट विचार येत असतील तर त्या अंगठीचा काहीच दोष नाही आपण मूळातच भ्रष्ट आहोत आणि आतापर्यंत लोकांना भामटेपणाने बनवत होतो हेच खरे मानायला हवे. तुम्ही जर मूळात भ्रष्ट नसाल तर अशी कुठलीही संधी (उदा. अंगठी, संपत्ती, सत्ता इत्यादी) तुम्हाला भ्रष्ट बनवू शकत नाही.

आपण मूळात प्रामाणिक आहोत आणि अंगठीमूळे भ्रष्ट बनलो हे मान्य करणे म्हणजे मी साधू आहे पण अप्सरेमूळे वितळलो असे म्हणण्या सारखे आहे. अशा पघळणाऱ्यांचे साधूत्वच मूळात भामटे असते हेच खरे आहे.

जन्मत:च आपण नीतीवान आहोत की सामाजिक रूढी, परंपरा, संस्कृती, प्रतिष्ठा, भीती, किंवा आपल्यातील पळपुटेपणा, इत्यादीमुळे आपण नीतीवान ठरतो? हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे.

हा प्रश्न आहे हे खरेच पण याचे उत्तरही साधे सोपे आहे. आपण जन्मतःच नितीवान नसतोच हे सांगण्यासाठी कुठल्याही मोठ्या अधिकाराची गरजच नाही. आपल्यावर ज्या परंपरेचे संस्कार होतात त्या परंपरेचा विवेक आपल्या नितीमत्तेच्या कल्पना ठरवतो. या कल्पना अर्थातच लवचिक असतात. जसेजसे आपण प्रगल्भ होत जातो तसतशा आपल्या नितीच्या संकल्पनाही प्रगत आणि अधिकाधिक व्यापक होत जातात. पण हे खरोखरे नीतीवान होणे वेगळे आणि आणि नितीवानाचा आव आणणे वेगळे. जर अंगठीसारख्या शुल्लक प्रकारांनी असली नितीमत्ता ढासळत असेल तर ती नितीमत्ता मूळातच खोटी असते.

बहुतेक जणांना इतर भ्रष्ट होतील, मी मात्र माझ्या नैतिक मूल्यांशी प्रामाणिक असेन, असेच वाटेल.

हे मात्र आपल्याच मापाने आपली बुद्धी मोजण्यासारखे झाले.
मला वाटते माझ्या बरोबर जगातले बहूतेक लोक नैतिक मूल्यांशी प्रामाणिक राहतील.
शेवटी हे जग जे काही थोड़ेबहूत सरळ चालले आहे ते काही कुण्या बुवाबाबांच्या अथवा देवदेवतांच्या भरवशावर नाहीच.

हॅरी पॉटरचा अंगरखा.

हॅरी पॉटरचा इन्विजिबिलिटी क्लोक आठवला. आणि आपल्याला काय हवे आहे ते दाखवणारा आरसा.

बहुतेक जणांना इतर भ्रष्ट होतील, मी मात्र माझ्या नैतिक मूल्यांशी प्रामाणिक असेन, असेच वाटेल.

हम्म. असे वाटेल खरे. पण करायला मिळाले तर वेडेवाकडे वागणे प्रत्येक जण करेल असे वाटत नाही. तशी इच्छा दडपून ठेवली असली तर मात्र होऊ शकेल.

सहमत

पण करायला मिळाले तर वेडेवाकडे वागणे प्रत्येक जण करेल असे वाटत नाही.

+१
सहमत

वाईट दिसण्याची बंधनं

कदाचित अदृश्य होण्याने काही बंधनांपासून मुक्तता होईल. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला कुठचीही हानी पोचवत नाही, तोपर्यंत जे काही कराल ते नैतिकच. तरीही अनेक बंधनं आपण स्वतःवर घालून घेतो - अमुक तमुक वाईट दिसेल म्हणून. अशा बंधनांतून जर सर्वच मुक्त झाले तर जग अधिक चांगलं होईल. त्यासाठी आपणही लोकांची खूप वागणूक अदृश्य केली पाहिजे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

लोक काय म्हणतील?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला कुठचीही हानी पोचवत नाही, तोपर्यंत जे काही कराल ते नैतिकच. तरीही अनेक बंधनं आपण स्वतःवर घालून घेतो - अमुक तमुक वाईट दिसेल म्हणून. अशा बंधनांतून जर सर्वच मुक्त झाले तर जग अधिक चांगलं होईल."
......श्री.राजेश घासकडवी यांच्या प्रतिसादातून.
श्री.राजेश यांनी अगदी योग्य विचार मांडला आहे.मला तो पूर्णतया पटतो.लोक काय म्हणतील या विचाराने आपल्या वर्तनावर अनेक बंधने येतात.यातून मुक्तता झाली तर जो तो अनैतिक वर्तन करील असे मुळीच नाही. भावनांवर- मनोविकारांवर- बुद्धीचे नियंत्रण असणारी विचारी माणसे असतातच.

मी कसा वागेल?

आता प्रामाणिक पणाला हात घातला तर, होय. मीही ते सर्व करू इच्छितो, जे वरती लिहिले आहे. सद्सद्विवेकबुद्धी कुठेतरी खोल गाडून टकली असती. पण 'त्या' अंगठीला जर दुसरा पैलु असता, की जर मी काही अनैतिक करायचा प्रयत्न केला तर ती पॉवर नष्ट होईल, तर मी त्या अंगठीचे काय केले असते? काही सुचत नाही बुवा..अशी पॉवर जवळ असताना मी काही नैतिक करायचा विचारही करू शकत नाही का?

अजूनही विचार करतो आहे...

||वाछितो विजयी होईबा||

माणूस एक जनावर

माणूस हे एक जनावर आहे व ते समाजाच्या सुरक्षेसाठी माणसांनीच नेमून दिलेल्या नियमांच्या चौकटीत वागत आहे कारण त्याला भीती आहे की तसे न वागल्यास त्याला शिक्षा होईल.

एखाद्या कुत्र्याला अंगठी मिळाली तर एखाद्या कुत्रीला स्नान करताना चोरून पाहण्याची इच्छा निर्माण होणार नाही. कारण ती इच्छा अंगठीशिवायच पूर्ण होऊ शकते. हा प्रॉब्लेम माणसाचा आहे व तो निर्माणही माणसानेच केलेला आहे.

लेखाशी पूर्ण सहमत! नीतीची व्याख्या दुटप्पी धोरणांनी प्रभावित व अनीती करणे आवाक्यात असण्या / नसण्यावर अवलंबून असते हे सत्य वाटतेच.

उपक्रम जिंदाबाद

 
^ वर