खान ऍकॅडमी

खान ऍकॅडमी, सलमान खान वगैरे नावे ऐकून पहिल्यांदा मला वाटले ही आपल्या सल्लूने काढलेली नविन टूम आहे की काय. पण हा लेख फोर्च्युनमधे वाचत होतो त्यामूळे आपल्या सल्लूशी ह्याचा संबंध नसणार असे वाटतच होते. लेख पूर्ण वाचून झाल्यावर खूपच उत्सुकता ताणली गेली. लगेच खान ऍकॅडमीची वेबसाइट उघडली. खान ऍकॅडमी हा एक कॅलीफोर्नियातील सलमान खान (सॅल) ह्यांनी सुरू केलेला अभिनव प्रकल्प आहे. हा सलमान खान म्हणजे बॉलीवूड मधला सल्लू नसुन हार्वर्ड मधून एमबीए केलेला हेजफंडात काम करणारा सलमान खान उर्फ सॅल. आपल्या छोट्याश्या होम ऑफिसमधे एक संगणक आणि काही जुजबी उपकरणांच्या आधारे ह्याने माध्यमिक शिक्षणासाठी उपयोगी अक्षरशः शेकडो विडियोज बनवले आहेत. बीजगणित, भुमिती, विज्ञान ह्याच बरोबर इतिहास भूगोल इ.इ. अनेक विषयांवर अप्रतिम आणि सखोल मार्गदर्शन करणारे विडोयोज मोफत उपलब्ध केले आहेत.

सहज म्हणून उघडलेल्या ह्या साईटवर मी अक्षशः तासभर रेंगाळलो. फ्रेंच रेवल्युशन पासून ते कॅलक्युलस परेंत अनेक विडियोज चाळून काढले. किती वेळात किती माहिती शिकवावी, कुठल्या मुद्यावर किती भर द्यावा आणि जमेल तितके रुक्ष विषय रंजक कसे करावेत ह्याचा पराकोटीचा समन्वय सॅलने साधला आहे. शाळेत जाणार्‍या मुलांसाठी उजळणीसाठी आणि संकल्पना स्पष्ट करुन घेण्यासाठी तर हा खजिनाच आहे. पण शाळा संपून बरीच वर्षे झालेल्या माझ्यासारख्यांनाही ताजेतवाने करणारा प्रकल्प वाटला.

खान ऍकॅडमीच्या वेबसाइटला इथे भेट देता येईल. तुम्ही पालक असाल तर तुमच्या पाल्याच्या अभ्यासासाठी ह्याची जरूर मदत घ्या. इंटरनेटचा खजिना येऊन आता इतकी वर्षे झाली तरी असे काहीतरी सापडले की अजूनही इंटरनेटची नवलाई वाटत राहते.

Comments

धन्यवाद

मस्तच! कुठे सल्लू, कुठे सॅल! इंटरनेटचा खजिना येऊन आता इतकी वर्षे झाली तरी असे काहीतरी सापडले की अजूनही इंटरनेटची नवलाई वाटत राहते.
खरे आहे. हा खजिना दाखविल्याबद्दल धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असेच म्हणतो -

हा खजिना दाखविल्याबद्दल धन्यवाद.

+१

धन्यवाद.

-Nile

शिक्षण विभाग कार्यवाई करू शकेल.

माझ्या शाळेत एक खास अडगळीची खोली आहे. त्यात मुलांना फक्त धिंगाणा आणि
http://www.arvindguptatoys.com/films.htm / http://www.khanacademy.org या दोन आणि अश्या इतर साईट वरील उठाठेवी करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रत्येक शाळेत अशी खोली असावी. पण असे शासनाच्या शिक्षण तत्वाच्या विरुद्ध हे आहे, शिक्षण विभाग कार्यवाई करू शकेल.

खान 'श्रवणालय' आवडलं!

आधी वाटलं होतं की पुस्तक वा नोट्स वाचून रेकॉर्डींग केले असेल. पण तसे दिसले नाही. संकल्पना आधी स्वतः समजून घेवून मग स्वतःच्या शब्दात त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत.

सलमानने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्याने त्याच्या फावल्या वेळेचा चांगलाच उपयोग केला आहे.

चांगला खजिना

एक दोन फिल्म्स पाहिल्या. आवडल्या. अशा गोष्टी मराठीत आणाव्यात असे वाटते. (डब करून.)

यावरून आठवले. माझे एक मित्र डॉ. वसंत बर्वे यांचे कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स. डो.बर्वे हे इंजिनियर्रिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. आता आधुनिक (जावा) प्रोग्रॅमिंग शिकून त्यांनी शैक्षणिक जगताला उपयोगी अशा अनेक प्रोग्रॅम्सची निर्मीती केली आहे. त्यांचे काम येथे पाहता येईल.

प्रमोद

छान

एक-दोन धडे बघितले. (गायटनर प्लॅन, डिफरेन्शियल इक्वेशन) छान आहेत.

व्याख्याने "एक्स टेम्पोरे" (अपूर्वनियोजित) आहेत. त्यामुळे फळ्यावरती लिहिता-लिहिता खाडाखोड वगैरे आहे. ती टाळता आली तर एकदम झकपक होईल. (पण अशा प्रकारची खाडाखोड खर्‍याखुर्‍या वर्गात शिकवणार्‍या शिक्षकाकडूनही होते. मोठा दोष नाही...)

आवडल्या

एक दोन चित्रफिती पाहिल्या आणि आवडल्या. उपयोगी आहेत.

मला हल्ली ९वीचे गणित समजवून घ्यायचे म्हणजे वैताग येतो. अगदी वेळेवर मिळाला हा दुवा.

उत्तम

उपयुक्त धागा. वाचनखूण साठवून ठेवते आहे.

 
^ वर