जनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती

आताच मला 'ग्रीनपीस' (हिरवी शांती - या नावाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही हे सुजाण वाचक जाणतातच!) या संघटनेकडून एका उघडपत्रावर सही करण्यासाठी
विपत्र आले. राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. या पत्राचा मसुदा येथे पहावयास मिळेल.

सदर पत्रात ज्या 'एक-खिडकी' प्राधिकरणाचा उल्लेख झालेला आहे त्या 'भारतीय जनुकतंत्रज्ञान नियमन प्राधिकरण' ( BRAI) या संस्थेच्या घटनेचा मसुदा येथे आहे.

या (ग्रीनपीसच्या) पत्रात अशी मागणी केलेली आहे की - सध्याच्या ज्या स्वरूपात स्वरूपात केंद्रीय मंत्रीमंडळाने या मसुद्याला १६ ऑगस्ट २०१० रोजी मान्यता दिलेली आहे त्या मसुद्यावर प्राधिकरण निर्माण करण्यापूर्वी देशभर उघड चर्चा व्हावी आणि त्यावर जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय होतात ते जाणून घेऊन योग्य ते बदल करावेत. असे केल्यावरच हे प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयक संमतीसाठी संसदेपुढे मांडण्यात यावे.

'जनुक-रूपांतरित पिके व अन्न' (Genetically modified/engineered Crops and Food) या विषयावर इथेच (उपक्रमावर) थोडीशी चर्चा झालेली होती. पण त्या चर्चेत सदस्यांचे मतप्रदर्शन फारसे झाले नाही.

जनुक-रूपांतरण ही एक पुरोगामी प्रक्रिया आहेच. तिचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. परंतु ती केवळ पुरोगामी प्रक्रिया आहे म्हणून स्विकारावी काय? 'वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' (WHO) या संस्थेनेही हा विषय महत्त्वाचा मानून त्यावर सांगोपांग चर्चा केलेली आहे. इथे पहा.
WHO सारखी आंतरराष्ट्रीय आणि संतुलित संघटनाही अजून जनुक रूपांतरित अन्नाविषयी साशंक आहे. त्यामुळेच ती या विषयावर बारकाईने विचार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशी उत्पादने बाजारपेठेत उतरवत असताना अनेक बंधने आहेत.

असे असताना भारतात मात्र जनुकीय बदल केलेली बियाणे, अन्न अथवा इतर गोष्टी बाजारात आणणे ही केवळ एक कागदोपत्री प्रक्रिया ठरेल असे दिसत आहे. अशा सरकारी नियामक मंडळांचे काम फारसे काटेकोरपणे चालत नसते असा एकंदर अनुभव आहे. त्यामुळे एकीकडे नवे तंत्रज्ञान हवे, त्यावर असे नियमन हवे - त्यातून चांगले तेच निष्पन्न होईल असे वाटत असतानाच दुसरीकडे त्या नियंत्रणांचे वाभाडे निघून अंधाधुंद गैरवापर होईल अशीही एक शक्यता वाटते. हे प्राधिकरण निर्माण करून भारत घाई करत आहे का?

वरील पत्रामुळे प्रक्रियेत अडसर निर्माण होऊ शकेल. तेव्हा या पत्रावर सही करावी की नको? तुम्ही कराल का?
या विषयावर येथील सदस्यांची मते जाणून घेऊ इच्छितो.

Comments

नाही

विवेकवादी संघटना आणि ग्रीनपीस यांच्यात कोणी सामायिक प्रसिद्ध व्यक्ति आहे काय? माझ्या माहितीनुसार ग्रीनपीस आक्रस्ताळे आहे. त्यांचे 'कार्यकर्ते' वी.टी. स्थानकात देणगी मागत फिरताना पाहिले आहेत.
बहुगुणा प्रकारच्या लोकांना काय भाव द्यायचा?
--------

  1. जनुक-रूपांतरण ही एक नवी, अज्ञात परिणामांची, तुटपुंज्या वर्षांच्या अनुभवाची अशी प्रक्रिया आहे.
  2. जनुक-रूपांतरणाची उत्पादने वापरण्यात धोका असल्याचा सैद्धांतिक निष्कर्ष मिळाले आहेत.
  3. जनुक-रूपांतरणाची उत्पादने धोकादायक असल्याचे प्रायोगिक अनुभवांतून कळले आहे.

अशी तीन कारणे शक्य आहेत. कारण २ मला मान्य नाही. कारण १ माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही. कारण ३ विषयी काहीही विश्वासार्ह स्रोत मिळालेले नाहीत.

नाही

जनुक रूपांतरणाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिकरित्या जनुकात बदल होण्याची (म्यूटेशन) वाट न बघता आपणच हवा तो बदल घडवून आणणे. नैसर्गिक किंवा मनुष्यप्रेरित रूपांतरणाचे फायदे आणि तोटे असणारच. प्रत्येक बियाण्याच्या, प्रत्येक रूपांतरणाचे काय फायदे आणि तोटे आहेत ते पाहून, थोडक्यात म्हणजे केस बाय केस निर्णय घेणे योग्य ठरेल.

म्हणजे

जनुक रूपांतरणाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिकरित्या जनुकात बदल होण्याची (म्यूटेशन) वाट न बघता आपणच हवा तो बदल घडवून आणणे.

नैसर्गिक रित्या बदल हे होतात त्याचा कालावधी मोठा असावा असे मी समजते आहे. शिवाय हे बदल नैसर्गिक असले तर ते आपल्याला हवे तसेच असतील असे नाही. म्हणजे वांगी मोठी - मोठी होणे हे वांग्यामधील नैसर्गिक बदलावर सोडले तर तसे होईलच याची खात्री नसावी. तेव्हा आपल्याला हवे ते गुणधर्म आणायचे त्याची वाट न बघणे असे नसून आपल्याला हवे ते बदल करायचे असा मी धरते (वाट बघूनही हवे ते गुणधर्म येण्याची खात्री नसणार). या समजुतीत काही चूक आहे का?

म्हणजे

नैसर्गिक बदल, जेव्हा उत्क्रांतीमुळे, म्हणजे स्पर्धेमुळे होतात तेव्हा बदलाचा कालावधी मोठा हे खरे.
तसेच जनुके म्यूटेट होऊन झालेले बदल मूळ धरायलाही काही पिढ्या जातील हेही खरे. पण सावकाश उत्क्रांतीपेक्षा हा बदल वेगात झालेला असू शकेल.

उदाहरण म्हणजे, गवताचे साधे बी ते जगातील सगळ्यात महत्त्वाचे पीक हा गव्हाचा प्रवास उत्क्रांतीच्या वेगाने झाला. वाणाची निवड नैसर्गिक स्पर्धेने न होता प्राचीन शेतकर्‍यांनी केली. आता ही निवड सावकाश पिढी दर पिढी करण्यापेक्षा थेट जनुकात घुसून करण्याचे तंत्र निर्माण झाले आहे ते नैसर्गिकरित्या होणार्‍या म्यूटेशनच्या तुलनेचे आहे.

जनुक रूपांतरण् म्हणजे आपल्याला हवे ते बदल घडवून आणणे हे ढोबळमानाने बरोबर आहे. नेमकी कुठली जनुके बदलून काय काय परिणाम होतील याचा अंदाज लावता येऊ शकतो. पण पूर्ण परिणाम तपासण्यांसाठी पुष्कळ प्रयोग, विश्लेषण करणे आवश्यक आहे. म्हणजे वांगे मोठे झाले तर जोडीला त्याचा गर गुलाबी झाला तर काय करायचे? मला वाटते, जनुकीय रूपांतरणाला संपूर्ण विरोध करण्यापेक्षा सखोल विश्लेषण कसे करता येईल यावर जास्त ऊर्जा खर्च केली तर बरे आहे. अवाढव्य लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नधान्य उत्पादनात असे मूलभूत बदल होणे अनिवार्य आहे.

मुद्दाम-नैसर्गिक

जनुकीय बदल नैसर्गिकरीत्य होऊ शकतात.
ज्या जनुकीय बदलांवर आपला आक्षेप आहे तो नैसर्गिकरीत्या झाला तर आपण काय करणार आहोत? तो आपण रोखू शकणार आहोत काय?

त्याला आपल्याला प्रतिसाद द्यावाच लागेल. मग जाणीवपूर्वक केलेल्या बदलात काय त्रास आहे.
नैसर्गिक बदल डिझायरेबल दिशेनेच होतील असे नाही. त्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेले बदल डिझायरेबलच (उत्पादकता, रोगप्रतिकारकता इ) असतील.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मूळ मुद्दा

जनुक रूपांतरणाचे फायदे तर आहेतच.
परंतु मूळ मुद्दा हा 'आयपीआर' संदर्भात आहे.

असे संशोधन करणार्‍या मसान्टो सारख्या कंपन्यांच्या हाती शेतकी व्यवसायाची सूत्रे एकवटतील काय? असा प्रश्न आहे.
संशोधन व्हावे पण त्यासाठी शेतकर्‍याच्या भवितव्याला वेठीला धरले जाऊ नये.
याबद्द्ल कायद्यात काही तरतुदी करता येतील का?

 
^ वर