नातवाच्या जगात (भाग २: एलेक्ट्रीक गिटार)

गावाला कितीही शांतता असली आणि मी कितीही शांतताप्रियतेचा आव आणला, तरी इथे मुला-नातवांच्या आवाजात, गोंधळात, दंग्यात जी मजा, आनंद आहे तो रमणीय प्रदेश असला तरी गावच्या एकटेपणात नाही हे नक्की. आता इथे येऊन तसे बरेच दिवस झालेत. इथल्या परिस्थितीला, वेगाला बराच रुळलो होतो. माझं वाचन जरी दांडगं असलं तरी हल्ली इतक्या नव्या गोष्टी इतक्या वेगात होताहेत की प्रत्येक छोट्या बदलाची माहिती मिळवायची म्हणजे कठीण कसलं अशक्य झालंय.
पण इथे आल्यापासून बघत होतो की ही दोन्ही पोरं मात्र अनेक गोष्टी लीलया वापरतात. नुसते वापरत नाहीत तर त्यांना बर्‍याच गोष्टी माहीत असतात. आमच्या लहानपणी कोरडी शिस्त होती, घोकंपट्टी होती, छडीचा धाक होता. हल्लीची पोरं वरवर वाया गेल्यासारखी वाटतात पण एकदा का त्यांच्या डोक्यातली माहिती सांगू लागले की मलाच माझ्या नातवांचा शिष्य व्हावे लागते.
आता बघा मला साधा मोबाईल कसा वापरायचा हे देखील नातवाकडून शिकावे लागले. मात्र त्याने ते इतके छान शिकवले की तोड नाही. आता मोबाईल सराईतपणे वापरतो. धाकट्यासारखा त्याचा दादाही हुशार आहे हो! बेटा काय गिटार वाजवतो! वा! क्लासलाही जातो. परवा एवढंस्सं तोंड करून बसला होता. स्वारी गरम तरीही खट्टु दिसत होती
"काय रे काय झालं? असा का बसलायेस?"
"काही नाही बाबा आता गिटार घेत नाही आहेत"
"गिटार? का हवी तुला? आहे की तुझ्याकडे"
"अहो ती फार जुनी आहेच शिवाय बिघडते सारखी. आणि मला इलेक्ट्रिक गिटार हवी आहे"
"इलेक्ट्रिक गिटारने काय इतका फरक पडतो?"
"अहो तुम्ही आवाज ऐकलाय का? कसला सह्ही असतो. एक तार झंकारली की शहारा अंगावर थेट!"
"हं" मला एकदम माझ्या तरूणपणीचे दिवस आठवले. गिटारचं असलेलं आकर्षण हे त्याच्या आवाजाबरोबरच, इलेक्ट्रिक गिटार चालते कशी ह्या कुतूहलासोबत जोडलं गेलं होतं. म्हटलं हे कुतूहल नातू शमवेल बहुतेक, " अरे पण तुला माहीत तरी आहे का ह्या गिटारीतून आवाज कसा येतो? ती कशी कार्य करते? ती बनवतात कशी? नुसतं वाजवता येऊन काय फायदा इतकी महाग वस्तू घ्यायची तर त्याची माहिती पाहिजे की नाही" मी त्याला खिजवले.
"आजोबा! तुम्ही माझी परीक्षा घेताय का कळत नाहीये? पण याची उत्तरे मला माहीत आहेत""
"सांग बघू"
"गिटारचा इतिहास आता मी सांगत बसत नाही. हे वाद्य तुमच्या लहानपणापासूनही आहे. आता बघा आपल्याकडे ही गिटार आहे ना हिचे हे गिटारचे मुख्य भाग आहेत पोकळ बॉडी, तारांना (फ्रेट्सना) सांभाळणारी, ताणणारी ही मान (नेक), तारा ट्यून करण्यासाठीच्या कळा (ट्युनिंग पेंगांस) असलेला हा माथा (हेड्स). यात सर्वात मुख्य भाग म्हणजे हा भोक असलेला साऊंडबॉक्स."

गिटारचे भाग

"आजोबा, हा बॉक्स आहे ना याचं मुख्य काम म्हणजे ताणलेल्या तारांतून निघालेला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणे, याचं डिझाइन जितकं अचूक, तितका आवाज स्पष्ट्पणे व 'जसा काढला आहे तस्सा' आपल्यापर्यंत पोचतो. आता आपली गिटार बघा , इथे साऊंड बोर्डच्या कडेला कसं खडबडीत झालं आहे, त्यात अभीने त्यावर गम सांडला, त्याने आकारात मायनर वेरीएशन आलंय म्हणून नवी गिटार हवीये हो"

मी नव्या माहितीत गुंतलो असलो तरी याच्या डोक्यातून काही नवी इलेक्ट्रिक गिटार काही जात नव्हती. मला त्याने दिलेली माहिती फार नवी नव्हती. एके काळी गिटारच्या प्रेमात मीही होतो. फक्त तेव्हा भारतात इतकी सर्रास इलेक्ट्रिक गिटार मिळतही नव्हती आणि परवडत तर त्याहून नाही. तेव्हा त्याच्याबद्दल आयती माहिती मिळाली तर उत्तर म्हणून मीही विषय मूळपदावर आणला

"अरे पण मग इलेक्ट्रिक गिटारच का? नुसती नवी गिटार माग की!"

"अहो, इलेक्ट्रिक गिटार सांगतो कशी काम करते म्हणजे मग तुम्हाला कळेल की त्याचा आवाज इतका छान का येतो आणि मग तुम्हीही म्हणाल की एलेक्ट्रीक गिटार घेऊया म्हणून. आता माझ्या खोलीतलं हे गिटारचं इतकं भारी पोस्टर तुम्ही बर्‍याचदा बघितलं असेल. त्यातल्या गिटारीला आपल्या घरातल्या गिटारीसारखं भोक नाही हे तुम्ही बघितलंत का?"
खरंच इतक्यांदा हे चित्र बघुनही मी हा बारकावा कसा टिपला नव्हता कोण जाणे?
"तर, यात आवाज इलेक्ट्रीकली पकडला जातो व मोठा करून ऐकवला जातो. आता हे बघा" त्याने पुढे दिलेली आकृती काढली

विद्युतचुंबकीय आवाज

"हे खाली आहेत ना ते चुंबक आहेत त्याच्या भोवती जवळजवळ ७००० बारीक तारांनी वेटोळं केलं आहे. तेव्हा हा झाला 'इलेक्ट्रोमॅग्नेट' किंवा 'विद्युतचुंबक', आता हल्लीच्या गिटारींमधे प्रत्येक तारेला आतमध्ये वेगळा चुंबक असतो. आता तुम्हाला माहीत आहेच की जसे विद्युत व चुंबकीय शक्तीचं रुपांतर मोशनमध्ये करता येतं तसं मोशनला विद्युतचुंबकीय शक्तीद्वारे इलेक्ट्रिक सिनल्समधेही. इथे एखादी तार हलली की चुंबकीय क्षेत्र बदलते व एक विद्युत तरंग उमटतो. तो पकडून एका ऍम्लिफायर द्वारे तो मोठा केला जातो. यात हवेचा दाब, आर्द्रता, गिटारचे डिझाइन वगैरे गोष्टीमुळे तयार होणारा बराचसा नकोसा आवाज (नॉईज) गाळला जातो."

"अरे वा! इथे तारेतला बारीकातला बारीक बदलही पकडला जाऊन स्पष्ट ऐकू येत असणार. आता मीच तुझ्या बाबांच्या मागे लागतो"
हे म्हटल्यावर स्वारी एकदम खूश!! रात्री त्याच्या बाबाचे माझ्यापुढे थोडेच चालतेय! रविवारी दादोबाच्या हातात इलेक्ट्रिक गिटार होती आणि डोळ्यात प्रचंड आनंद!

लेखनविषय: दुवे:

Comments

अतिप्रचंड अंतर

आजी-आजोबांच्या वस्तूनंतर ही कल्पना डोक्यात आली होती. या मालिकेचा भाग १ पलिकडल्यावर्षी आपल्या 'उपक्रम'च्याच दिवाळी अंकात लिहिला होता तो इथे वाचता येईल. मात्र नंतर पुन्हा ह्या लेखमालेकडे लक्ष देणे राहून गेले ते गेलेच. त्यामुळे ह्या भागांत अतिप्रचंड अंतर पडले आहे, त्याबद्दल क्षमस्व. आता बघु जमेत तितकी लेखमाला पुढे लिहण्याचा मानस आहे.

कल्पना, मांडणी, माहिती कशी वाटली ते सांगालच. सुचनांचे स्वागत आहे.
पुनर्प्रकाशनाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. 'लोकमित्र' एकदा पुन:छपाईची परवानगी आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मस्त

लेखमालिकेची कल्पना छानच आहे.
शैली, माहिती - उत्तम.

+१

पूर्ण सहमत फार छान लेखमाला.
चन्द्रशेखर

+२

हेच म्हणतो.

लेखमालेची कल्पना आवडली.

माझ्यासाठी ही माहिती नवीनच आहे. साध्या शब्दांत संकल्पना उत्तमरित्या समजावली आहे.

असेच

म्हणतो. लेख, लेखमालिकेची कल्पना, दोन्ही सुरेख.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

वा वा!

माहितीपूर्ण लेख आहे.

त्यामुळे ह्या भागांत अतिप्रचंड अंतर पडले आहे, त्याबद्दल क्षमस्व. आता बघु जमेत तितकी लेखमाला पुढे लिहण्याचा मानस आहे.

आता पुढच्या लेखांत अंतर पडू नये अशी काळजी घेता येईल. :-)

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

छानच

नवीन उपक्रमाला शुभेच्छा!
लेख आवडला.

झकास

लेख झकास. येऊ द्या इतर वाद्ये.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

सर्व वाचकांचे, प्रतिसादकांचे अनेक आभार.

सौरभदा,
दोन भागांतील अंतराची खात्री देऊ शकत नसलो तरी फार अंतर न ठेवता लेखमालेच्या पुर्णत्त्वाची खात्री देतो :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हा लेख

हा लेख वाचायला घेतला (म्हणजे हळू हळू वाचन झाले) आणि त्याचवेळी घरात नॅनो गिटारची चर्चा सुरु होती.

असो. हा उपक्रम पुन्हा सुरु केल्याबद्दल अभिनंदन. लेख आवडला.

उत्तम लेखमाला

अशीच माहिती इतर गॅजेट्सबाबतही येऊ द्यात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मालिकेसाठी आणखी काही विषय....

छान कल्पना!

प्ले स्टेशन, आय.पॉड., डिजीटल कॅमेरा ह्या वर सुद्धा लिहा....

गौरी

 
^ वर