स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिर)

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती. पण नंतर हिंदुनी या स्तुपांचे हळू हळू हिंदु मंदिरात रुपांतर केले. पण विठठल मंदिर हे हिंदु मदिर नसुन ते मुळात बौद्ध मंदिर कसे होते याचे काही पुरावे बघु या.

१) १९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.
२) कागदाचा शोध लागण्या आधी किंवा त्या नंतरही महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जात असत. या पुरातन पंचांगाच्या मुखपृष्ठांवर नवग्रहाची किंवा दशावताराची चित्रं छापली जात असतं. या सर्व शिलापंचांगात सर्वत्र नववा अवतार म्हणून विठठलाचे चित्र छापले जात असतं व नावाबद्द्ल शंका येऊ नये म्हणून विठठलाच्या चित्राखाली बुद्ध असे लिहले जात असे. श्री. वा.ल. मंजुळ व डॉ. के जमनादास यानी अशा प्रकारच्या पंचांगाचा संग्रह तयार केला आहे. विठठलाच्या शिल्पाला बुध्द नाव असलेली काही ठिकाणं येणेप्रमाणे आहेत.

अ) तासगांव (जि. सांगली) येथे विंचुरकरानी बांधलेल्या दक्षीणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपुरावर विठठलाचे मुर्तीला बुद्ध असे नाव आहे.

ब) कोल्हापुरच्या महाल़क्ष्मी मंदिराच्या प्राकाराअतिल एक ओवरीत बुद्ध नावाने विठाबो दिसेल.

क) राजापुर (जि. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकेशव मंदिरात मुर्तीच्या प्रभावळीत जे दशावतार कोरलेले आहेत त्यातही बुद्ध म्हणून जी मुर्ती कोरलेली आहे, ती आज झिजुन गेलेली असली तरी तिच्या उर्वरित आकारातुन ती विठठलाची मुर्ती असल्याचे स्पष्ट होते.

आता बघु या काही पुस्तकांचे व ईतिहासकारांचे या वरिल मत.

डॉ. भाऊ लोखंडे:
यानी संपुर्ण मराठी संतांच्या वाड.मयाची समिक्षा करुन त्यांचा सारांश काढलेला आहे. ज्यानुसार मध्ययुगीन मराठी संतकवीनी विठठलाला, दुसरे काहि नसुन बुद्धच मानलेले आहे. मी तो जशाचं तसं ईथे देतो (लोखंडे : १९७९ पान १२३) “बाराव्या शतकातील ’गीत गोविंद’ कर्ते कवि जयदे वुद्धाची स्तुती नवव्या अवताराच्या स्वरुपात करतात. ती पुराणावर आधारित आहे. मराठी संत त्यांचे प्रमुख दैवत यांना बुद्धच मानतात (विठोबाच्या रुपाने) कारण विठोबाच बुद्ध आहेत असं दशावतारात मांडलेलं आहे. संत एकनाथ विठठलाला बुद्ध मानुन पुढिल प्रमाणे म्हणतात
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त।
न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात।
नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
व वारक-याची दिक्षा देताना जी पाच वचने वधविली जातात ती पंचशिलापेक्षा काहि वेगळी नाही.”

श्री. ए. आर. कुळकर्णी.:
श्री कुळकर्णी यांचे मत सर्वविदीत असुन त्यानी संपादन केलेल्या ’धर्मपद’ या ग्रंथाच्य अपरिशिष्टात देलेले आहे. त्यानी मराठी संतकवींव्या साहित्याची समिक्षा करुन निष्कर्ष काढले आहेत जसे कि, आपण पाहिल्या प्रमाणे भाऊ लोखंडे यानी काढले आहेत. कुळकर्णी म्हणतात कि मंदिराच्या मंडपातील खांबावर ध्यानी बुद्धाच्या आकृत्या आहेत. ते असे सुद्धा म्हणतात कि, विख्यात पाश्चिमात्य विद्वान जॉन विल्सन “मेमॉयस ऑन दि केव्ह टेम्पल” नामक आपल्या ग्रंथात विठठल मंदिर हे बुद्ध मंदिर असल्याचे प्रमाण दिलेले आहेत.
पांडुरंगाची मुर्ती हि झिल्लिदार पंजाची एक अप्रतिम नमुना आहे. झिल्लीदार पंजा बुद्धाचे परंपरागत चिन्ह आहे. यावरुन ती बुद्ध मुर्ती आहे हेच स्पष्ट होते.

आर. डी. भांडारकर:
विठालाची मुर्ती हि बुद्ध मुर्ती असल्याचे पुरावे देताना भांडारकर दोन शिलालेखाचे पुरावे देतात. बेळगाव नजीक एका गावाचे दान पुंडरिक क्षेत्रासाठी दिलेले आहे. हे क्षेत्र भिमारथी च्या काठी असुन ते पवित्र आहे. इ. १२४९ व १२७० चा आप्तोराम्य यज्ञ व शिलालेखात पांडुरंग आणि पुंडरिक हि नावे आह्ते. हि दोन्ही नावे बौद्ध परंपरेची आहेत. ’सधर्म पुंडरिक’ नामक ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. विठ्ठल हे नाव ब-याच नंतरच्या काळात आले हे स्पष्टच आहे असे भांडारकारांचे म्हणने आहे.

रा. चि. ढेरे
ढेरे यांचे “श्री विठ्ठल एक महासमन्वय” (दक्षिण गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णविकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा) ॥ढेरे: १९८४॥ या ग्रंथात विठठलाच्या अनेक पैलुंचे विश्लेषण केलेले आहे. सर्वच स्थल पुराणांचे विवरण दिलेले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि, सर्वच स्थल-पुराणातिल “पांडुरंग महात्म्य” विठ्ठल या देवतेचे वैष्णविकरण करण्याचा प्रयास आहे. ते म्हणतात कि वैष्णवानी बुद्ध स्विकारला परंतु बुद्धाच्या विचाराना छेद दिला व त्यात हिंदुत्व पेरलं.

-------------------------------------
पुढिल भागात येणारे लेख
१) आय्यापा मंदिर
२) पुरिचे जगन्नाथ मंदिर
३) द्राक्षाराम
४) श्रीशैलम
५) तिरुपती बालाजी

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचतोय

>>>पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही अशी महाराष्ट्रात खुप खोल रुजलेली परंपरा पुरातन काळापासुन चालत आलेली होती.

''पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध मंदिर असुन अन्य काहिही नाही'' या परंपरेच्या बाबतीत काही संदर्भ देऊ शकाल काय ? दिलेच पाहिजे असा आग्रह नाही.

श्री.रा.चि.ढेरे म्हणतात '' महाराष्ट्रात हजार दीड हजार वर्षापर्यंत नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करुणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात जाता जाता इथे उपडा केला अन् मग त्याची धारा हृष्ट-पुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळवले'' इतकाच तो संदर्भ आहे. संताच्या रचनेत आलेले उल्लेख हे असेच प्रभावाचे आहे. म्हणून विठ्ठल काही बुद्ध ठरत नाही.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

ठोस् पुरावा नाही.

ठोस् पुरावा नाहि,
पण् लेखात् उल्लेखलेल्या इतर् बाबीवरुन् तरी असा तर्क् बांधता येतो कि हे बुद्ध मंदिर् होते (असावे).
बाकी विठ्ठल्लाच्या मुर्तीचे निट् निरिक्षण् केल्यास् ती मुर्ती हिंदु देवतेची वाटत् नाहिये.
पण् बुद्धाच्या उभ्या मुर्तीशी ( खर् तर् अशा मुर्त्या फार् कमी आहेत्) मेळ् खाते. व कुलकर्ण्यांच्या संदर्भा प्रमाणे मंदिरातील् खांबावर् बुद्दमुर्त्या कोरलेल्या आहेत्.

पण् एकंदरित् हा सगळा तर्कावरचा निवाळा आहे.
-------------------
भवतु सब्ब मंगलम.

मंदिर..

>>>लेखात् उल्लेखलेल्या इतर् बाबीवरुन् तरी असा तर्क् बांधता येतो कि हे बुद्ध मंदिर् होते
मला या बाबी कोणत्या त्याची उत्सुकता आहे. आपण श्री.रा.चि.ढेर्‍यांचे पुस्तक वाचलेले आहे त्यामुळे मूर्ती हिंदू देवतेची वाटत नाही हा आक्षेप तितकासा न पटणारा.

असो, माढ्याच्या विठ्ठलाचे मंदिराचे बाह्य रुप हे मशिदीप्रमाणे आहे म्हणून तिथे 'पीर' होते असे म्हणता येत नाही. तर ती आक्रमकांचे दिशाभुल करण्यासाठी तो शोधलेला एक मार्ग होता. आमच्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा या गावी मंदिर तोडून त्याचे बाह्यस्वरुप मशिदीचे केले आहे, आत मात्र महादेवाची पिंड आहे. असो, लेखन माहितीपूर्ण आहे. फक्त संदर्भ पूर्ण यावे इतकीच अपेक्षा आहे. आपल्या लेखनासाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

जेजुरी

जेजुरीच्या खंडोबाच्या मंदीराचेही बाह्यरुपही मशिदीसारखे आहे. पण तो एकतर तत्कालीन बांधकाम शैलीचा प्रभाव असेल किंवा प्रा. बिरुटेसाहेब म्हणतात तसे माढ्याच्या मंदिराप्रमाणे दिशाभूलीचाही प्रकार असेल. म्हणून काय तेथे देवांतरण झाले असा निष्कर्ष काढता येणार नाही.

||वाछितो विजयी होईबा||

मूर्ती

बुद्धाची उभी मूर्ती गुगलली असता जी चित्रे मिळतात त्यात बहुतेक मुर्त्या पुढील प्रकारच्या आहेतः
१. एक हात आशीर्वाद/उपदेशासाठी वरती, दुसरा सरळ खाली.
२. दोन्ही हात सरळ खाली.

दोन्ही हात जोडलेले, दोन्ही हात आशीर्वादासाठी उंचावलेले इ. अशी इतरही रुपे आहेत. पण उपरोल्लेखित २ प्रामुख्याने मिळाली.
गुगल म्हणजे माहितीचा अल्टिमेट स्रोत नाही, हे जरी मान्य केले, तरी बुद्धाची एकही मूर्ती 'कर कटीवरी' अशा रुपात नेटावर/प्रत्यक्षात पाहायला मिळत नाही. आणि 'कर कटीवरी' हे रुप तर विठ्ठलाचे ट्रेडमार्क रुप आहे.
त्यामूळे विठ्ठल आणि बुद्ध यांच्या मूर्तींमध्ये सकृतदर्शनी तरी साम्य आढळत नाही. बाकी मुद्दे माझ्या क्षमते बाहेरचे आहेत, पण मुर्त्यांवरून तरी विठ्ठल आणि बुद्ध हे एकच आहेत असे वाटत नाही.

||वाछितो विजयी होईबा||

तर्कट

श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा श्वसनाचे नेहमीचे स्नायू दमले असतील किंवा ओरडायचे असेल तर कमरेवर हात ठेवावेसे वाटतात. ही मूर्ती बुद्धाच्या वृद्धापकाळातील असू शकेल.
तंबाखूचे वर्णन करणार्‍या एका लोककथेमध्ये 'कर कटिवरी' अवस्थेचे retcon आहे.

हा हा हा

अरे यांना कोणी आवरा रे....! [ह्.घ्या]

-दिलीप बिरुटे

ताजमहाल की तेजोमहालय

लेख थोडासा ताजमहाल की तेजोमहालय धाटणीचा वाटला.

लेखासोबत काही चित्रे लावली असती तर विधानांना पुष्टी मिळाली असती. फक्त लेखन वाचून विश्वासार्हता वाढत नाही असे वाटते.

हेच...

लेख थोडासा ताजमहाल की तेजोमहालय धाटणीचा वाटला.

लेखासोबत काही चित्रे लावली असती तर विधानांना पुष्टी मिळाली असती. फक्त लेखन वाचून विश्वासार्हता वाढत नाही असे वाटते.

:-)

हेच म्हणतो...

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

शक्य पण

१९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.

ते चित्र जालावर बघण्यासाठी मिळेल काय? शिवाय, मुळात पंढरीची मूर्ती ही मूळ मूर्तीच नाही असाही काही दावा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या एका लेखात वाचला होता. त्यामुळे हे चित्र कोणत्या मूर्तीचे आहे त्याविषयी अधिक माहिती आवश्यक वाटते.
दशावतारात बुद्धाला नंतर घातला गेला (इतर कोणतातरी अवतार हटवून) असणार ना? त्यामुळे निष्कर्षच काढायचा तर "विठोबाचे नाव नंतर बुद्ध असे केले गेले" असा काढता येईल ना?

बाकी, बुद्ध आजानुबाहु (मार्फन?) होता असे कोठेतरी वाचले आहे (संदर्भ आठवत नाही). पंढरीच्या मूर्ती तशाच आहेत काय?

"There's more than one mosque in the world that used to be a church and before that was a temple. Because it's a lot easier to just change the sign on the top and say "under new management" than it is to change the whole building. I worked a lot of comedy clubs in the eighties that still had the disco ball on the ceiling. And in the nineties they became strip clubs. And now they're a Starbucks." - बिल माहर (रिलिज्युलस)क्ष्

दुरुस्ती

>>>पंढरीची मूर्ती ही मूळ मूर्तीच नाही असाही काही दावा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या एका लेखात वाचला होता.
मुळ मूर्तीच्या बाबतीतला दावा आणि मोठे संशोधन श्री.रा.चि.ढेरे यांचे आहे. आद्यमुर्तीबाबत सांगितलेली काही लक्षणे मूर्तीच्या निमित्ताने मी थेट पाहिली आहे. ते सर्व विचार मला पटणारे आहे. त्या निमित्ताने सदरील लेखन केले होते. इतकाच तो संदर्भ.

धन्यवाद....!

[वीज भारनियमन सुरु असल्यामुळे पुढे चर्चेत असणार नाही]

-दिलीप बिरुटे

विठ्ठलाची `अनुपस्थिती`


महाराष्ट्राचे; विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे आराध्यदैवत म्हणजे पंढरीचा विठ्ठल-विठोबा-विठू ऊर्फ पांडुरंग !
राम-कृष्णांसारखाच, त्यांच्याइतकाच पूजनीय देव. भारताच्या दोन धर्मग्रंथांत राम-कृष्ण यांचे ठळक उल्लेख आहेत. रामायण हे तर शीर्षकावरूनच कळते की ते रामावरील आहे. महाभारताच्या शीर्षकात कृष्णाचा उल्लेख नसला तरी महाभारतात कृष्णाचे ठळक, ठसठशीत उल्लेख आहेत. महाभारताचाच एक भरीव भाग असलेली गीता तर कृष्णानेच सांगितलेली !
राम-कृष्ण यांच्याइतकाच महाराष्ट्रात विठोबाही पूजला जातो, तर मग त्याचा उल्लेख रामायण-महाभारतात किंवा त्यासारख्याच अन्य जाडजूड धर्मग्रंथांत का नाही, का नसावा ? (की आहे ? मला ठाऊक नाही. ज्ञानवंतांनी प्रकाश टाकावा.) माझ्या मनात ही शंका अनेक वर्षांपासून आहे... या धाग्यानिमित्त ती प्रकट करण्याची संधी मिळाली.

वरील धर्मग्रंथांतील विठ्ठलाची `अनुपस्थिती` काय दर्शविते ???

रामायण-महाभारत

तसे तर दत्तात्रेय, तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी देवी, तिरुपतीचा बालाजी अशा कितीतरी श्रद्धास्थानांचा उल्लेख रामायणात-महाभारतात(किंवा त्यासारख्याच अन्य जाडजूड धर्मग्रंथांत) येतो का? (की आहे ? मलाही ठाऊक नाही. ज्ञानवंतांनी येथेही प्रकाश टाकावा.)
यावरून काय निष्कर्ष काढायचा?

||वाछितो विजयी होईबा||

संबंध नसावा

वेदांमध्ये उल्लेख असलेले इंद्र, वरुण, हे देव कुठे पुजले जातात?
राम/कृष्ण यांची पूजा तर मुख्यत्वेकरून उत्तरेकडे होते ना? महाराष्ट्रात तर गणपती आणि विठोबाच अधिक होते असे वाटते. आता साईबाबा आणि दत्त (आणि दत्ताचे मानवी अवतार) ही दोन दैवते अधिक लोकप्रिय होत आहेत असे दिसते. (उत्तरेकडे संतोषी मां हे समांतर फॅशनचे उदाहरण ठरेल काय?)

स्पष्टीकरण

सर्वप्रथम रामायण आणि महाभारत हे धर्मग्रंथ नाहीत. ती केवळ महाकाव्येच आहेत. गीता हा महाभारताचा भाग नसून त्याची महाभारतात कालांतराने भरणा केली गेली. कृष्ण हे महाभारताचे मुख्य पात्र नाही. ते हरिविजय, भागवत् वगैरे नंतर अधिक प्रसिद्ध झाले असावे.

विठ्ठल, अय्याप्पा, व्यंकटेश वगैरे अनेक देव हे कालांतराने भारतीय संस्कृतीत आले. अर्थातच, त्यांचा समावेश पुरातन ग्रंथात नाही. (तसा तो घालता आला असता [स्कंदपुराणात सत्यनारायण येतो असे सांगितले जातेच] परंतु तसे कवी (तुलसीदास) किंवा परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली नसावी.)

मोठ्ठा पुरावा

१९४०-१९६५ या कालावधित पुण्यावरुन प्राथमिक शाळेचे उजळणीचे (मुळाक्षर व अंकगणित) पुस्तक प्रकाशित होत असे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र असे. त्यात नववा अवतार बुध्द असल्याचे दाखविले जास्त असुन जे चित्र छापले जायचे ते अजिंठा किंवा वेरुळच्या बुद्धाचे नसुन पंढरिनाथ “विठठलाचे” चित्र असे. विट्ठ्ल हाच बुद्ध आहे असे स्पष्ट करणारा हा सगळ्य़ात मोठा पुरावा.

वरील पुरावा वाचून हा विठ्ठल हतबुद्ध झाला. ;)

रोचक

अधिक ठोस माहिती हवी.
"तेजो-महालय"ची आठवण आली +१

ओरिसाच्या धौली येथील पुरातत्त्व क्षेत्रात बौद्धविहारावर बांधलेले शिवमंदिर आहे, खरे. पण तो वेगळा प्रकार. तिथे उघड-उघड-बौद्ध शिल्पे खाली सापडतात.

महाराष्ट्रात अजिंठा काळात बौद्धांचे बरेच वर्चस्व होते - सत्ताधीशांचा पाठिंबा होता, पण ते वर्चस्व हळूहळू जैन-हिंदू सत्ताधीशांकडे गेले. कोण जाणे, त्या काळात काही बौद्ध पूजागृहांचे परिवर्तन करून पौराणिक देवांच्या मूर्ती स्थापन केल्याही असतील - पण ठोस पुरावा पाहिजे. उलट वेरूळमध्ये जुन्या लेण्यांची पडझड होऊ देऊन नव्या लेण्या खोदण्याची पद्धत दिसते.

येथील लेखक मात्र अजिंठा-वेरूळ काळाबद्दल बोलत नाहीत, तर हल्लीहल्लीच्या छापील पाठ्यपुस्तक-आणि-पंचांगकरांकडे बोट दाखवत आहेत. कॉन्स्पिरसी थियर्‍या चुकलेल्याच असतात, असे मला म्हणायचे नाही, पण त्यांच्याबद्दल साशंकता वाटते खरी. पुन्हा : अधिक ठोस पुरावा पाहिजे.

नवा वापर?

'असहमत' किंवा 'अग्राह्य' या अर्थाने 'इंटरेस्टिंग' या शब्दाचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे 'रोचक' या शब्दाचाही वापर सुरू होणार की काय?

रोचक

रोचक शब्दाबद्दल मोल्सवर्थ काय म्हणतो ते पाहिले.
भयंकरच रोचक निघाले.

रोचक (p. 702) [ rōcaka ] n (S) Black salt. See पादेलोण.

हा अर्थ खरेच ठाउक नव्हता.

स्वागत

विठोबाबद्दल मांडलेले पुरावे पटण्यासारखे वाटत नाही आहेत. पुरीच्या मंदिराबाबत अनेक इतिहासकारांनी, इतकेच काय अगदी विवेकानंदांनीही, ते मंदिर स्तूपच होते हे नमूद केल्याचे आठवते. बौद्धगयेचे मंदिरही हिंदूनी ताब्यात घेतलेले आहे. चूभूद्य़ाघ्या.

असो. उपक्रमावर स्वागत आहे.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

पुरावे

विषय नक्कीच विचारकरण्याजोगा आहे. पण पहिले एक दोन पुरावे शेवटी दिले असते तर बरे झाले असते कारण ते अलिकडचे आहेत.

ती मूर्ती बुद्ध नसल्याचे काय पुरावे आहेत याचाही या सोबत विचार केला पाहिजे.

माझ्या मते कर कटावर ही फारशी अडचण नसावी. मात्र मुकुटधारी (आहे का?) बुद्ध असू शकतो का?
एकनाथांच्या शब्दात वेगळा अर्थ असू शकतो. पण तत्पूर्वीचे म्हणजे तीनशे वर्ष पूर्वीचे नामदेव ज्ञानदेव काय म्हणतात?
लोककथांप्रमाणे विठ्ठलाच्या दोन बायकांची सांगड कशी घालायची?
विठ्ठलाचे सावळेपण (बुद्ध गोरा होता असे जातक कथांमध्ये लिहिल्याचे आठवते.) हे बुद्ध प्रतीमेशी कसे जुळते?

याशिवाय. जगात पुण्य खूप झाले म्हणून मोह माया तयार करण्यासाठी विष्णूने बुद्धाचा अवतार घेतला असे काहीसे वाचले होते. http://www.bvml.org/SBBTM/buddha.html
त्यामुळे बुद्ध जरी अवतार धरला तरी तो मोहिनी अवतारासारखा दिशाभूल करणारा दिसतो.

प्रमोद

मुकुटधारी बुद्ध

मात्र मुकुटधारी (आहे का?) बुद्ध असू शकतो का?

या पुस्तकात बरीच चित्रे (अवलोकितेश्वर) आहेत ज्यात बुद्धाला मुकुट असल्याचे दिसते.

अवलोकितेश्वर, मैत्रेय वगैरे

अवलोकितेश्वर, मैत्रेय वगैरे बोधीसत्त्वांच्या डोक्यावर मुकुट असतो हे खरेच आहे. माझ्याकडे काही जुन्या मूर्तींचे फोटो आहेत. त्यात अवलोकितेश्वर आणि मैत्रेय दोन्ही आहेत आणि मुकुटधारी आहेत. मात्र त्यांना प्रत्यक्ष बुद्ध म्हणणे कितपत योग्य ते माहित नाही. मुकुटधारी बुद्ध पौर्वात्य संस्कृतींमध्ये दिसतो त्यामानाने भारतात दिसत नाही असे वाटते (चू. भू. दे. घे. तुमचे फोटो कुठले आहेत ते तपासायला वेळ मिळाला नाही.) गांधार शिल्पकलेतील बुद्ध हा कुरळ्या केसांचा, जटाधारी असतो. (विठ्ठलाचे केस कसे असतात?)

परंतु त्यात अवलोकितेश्वरालाच मैत्रेय म्हटले आहे ते बरोबर नसावे असे वाटते. अर्थात हे अवांतर आहे.

अवलोकितेश्वर

मला याविषयी फारशी माहिती नाही. या धाग्याच्या निमित्ताने मुकुटधारी बुद्धाचा शोध घेतला. अवलोकितेश्वराबाबत विकिवर शोध घेतला तर काही रोचक मते वाचण्यात आली. या धाग्याच्या विषयाला अनुसरूनच ती मते असल्याने येथे देत आहे.

Western scholars have not reached a consensus on the origin of the reverence for Avalokiteśvara. Some have suggested that Avalokiteśvara, along with many other supernatural beings in Buddhism, was a borrowing or absorption by Mahayana Buddhism of one or more Hindu deities, in particular Shiva or Vishnu (though the reason for this suggestion is because the current name of the bodhisattva not the original one.)

पद्मपाणि हा सुद्धा बुद्धच ना?

पद्मपाणि हा सुद्धा बुद्धच ना?

अजिंठ्याचा पद्मपाणि

विठ्ठल आणि बुद्ध

आपल्या सोयीचा विचार मांडायचा असला की साहित्य संदर्भाची मोडतोड करता येते. श्री.रा.चि.ढेर्‍यांनीच 'विठ्ठल आणि बुद्ध' असे एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे. विविध अभंग,विविध मूर्ती पुरावे, बुद्ध विठ्ठलाची चित्रे व शिल्पे यावरही त्यांनी विवेचन केले आहे. पण त्याचा नेमका सारांश काय याकडे 'स्तुपांची मंदिरं- भाग १ (विठ्ठल मंदिरा)चे लेखक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तटस्थ संशोधकाची आणि अभ्यासकाची नाही असे माझे मत आहे.

सोयीचे संदर्भ वापरून विठ्ठल हा बुद्धच कसा आहे असे पुराव्यासहीत लेखन करता येऊ शकते. 'विठ्ठल आणि जीन' असेही एक स्वतंत्र प्रकरण श्री.रा.चि.ढेर्‍यांच्या पुस्तकात आहे. एखादा 'जैन' मित्र पंढरपूरचा विठ्ठल 'जैनांचा देव' कसा आहे हेही सिद्ध करु शकतो. तेव्हा संदर्भांचा योग्य उपयोग करुन तटस्थपणे विचार मांडला पाहिजे असे वाटते. असो, थांबतो.

-दिलीप बिरुटे

युगे अठ्ठावीस्

युगे अठ्ठावीस उभे असलेल्या विठ्ठलाला कुठल्या कुठल्या संशोधनाला सामोरे जावे लागेल, नेम नाही. मागे एकदा तरंगा नावाच्या कन्नड साप्ताहिकात, कृष्ण हा कसा मूळ कानडी होता याचं रसभरीत वर्णन लेखिकेने केले होते. (कृष्ण कन्नडीगने?) त्यासाठी विठ्ठलालाच वेठीला धरला होता.

येणे मज लावियला वेडु

दाक्षिणात्य चित्रपटांमधील पौराणिक चित्रपटांचे प्रमाण बघता कृष्ण कानडी असण्याची शक्यता नाकारता येईल असे मला वाटत नाही. उजळणीच्या पुस्तकापेक्षाही चित्रपट हा नक्कीच मोठ्ठा पुरावा समजला जाईल असेही मला वाटते.

पुरावे

नक्कीच मोठा पुरावा. असे पुरावे दिले जातात म्हणून महाराष्ट्र शासनाला कितीतरी पाठ्यपुस्तकांची उस्तवार करावी लागली.

काही

बदलत्या समाजात काही देवतांचा स्विकार हा होत राहतो. हे स्विकारणे / न स्विकारणे आर्थिक आणि सामाजिक गरजांवर अवलंबून असते.

उदा. खंडोबा, भैरव हे स्थानिक देव शंकराची रूपे झाली. शंकराच्या रूपाने हे देव सामावून घेतले.
बाकी डोळ्यात भरणारे फरक सोडून दिले ( विठोबाचे कमरेवरचे हात, बुद्धाचे योगमुद्रांमधील किंवा आशीर्वाद देणारे हात) आणि विठ्ठलाच्या गोष्टींचा आधार घेतला, तर विठ्ठल हा धनगरांचा/गोरगरिबांचा देव, त्याचे त्याच्या बायकोशी न पटणे (किंवा बायकोचे त्याच्याशी न पटणे), पदुबाई/विठोबा अशा काही गोष्टी प्रचलित आहेत. त्यावरून विठोबा हा स्थानिक देवांच्या प्रभावाने बनला असावा.

विठोबा हा कुटुंबवत्सल देव आहे. त्याला बायको आहे, तो तिच्यापासून थोडा अलिप्त आहे, पण त्याने तिला सोडलेले नाही. त्याउलट बुद्ध हा सर्वसंगपरित्याग केलेला आहे. विठ्ठलाचा बुद्धाशी संबंध असेलही कदाचित, पण दूरचा असावा.

मुळात बौद्ध शिल्पकलेतही फरक पडत गेला आहे. अगदी सुरूवातीला बुद्धाला मनुष्यरूपात दाखवणे मान्य नव्हते. त्यामुळे शिल्पकलेमध्ये बोधिवृक्ष किंवा पादुका असे दाखवले जाई. नंतर हळूहळू बुद्धाच्या मोठ्या मूर्ती तयार होऊ लागल्या. यातही इतर बौद्ध देवतांची भर पडली. तारा, छिन्नमुंडा इ. हे सर्व परिस्थितीप्रमाणे घडत गेले असावे. बुद्धाच्या शिकवणीचे पालन करण्यात तत्कालिन बौद्धच कमी पडले असावेत असे मला वाटते.

त्याआधीही बौद्ध समाजरचना होण्याआधी श्रमण (जैन) आणि वैदिक संस्कृती भराला आल्या होत्या. त्यांचेही बरेच काही बौद्धांनी उचलले असावे. आणि त्यातले जे त्या काळी योग्य नव्हते ते टाकले असावे असे गृहितक धरले तर नंतरच्या संस्कृतींनीही तेच केले असू शकते. बौद्धांचे सर्व विचार तेव्हा सर्वसामान्यांना परवडणारे असतीलच असे नाही. पण त्या विचारांचा अभ्यास मात्र व्हायला हवा, असे वाटते.

दोन बायका फजिती ऐका

त्याला बायको आहे, तो तिच्यापासून थोडा अलिप्त आहे, पण त्याने तिला सोडलेले नाही

विठ्ठलाला राही आणि रखुमाई अशा दोन बायका आहेत असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रखुमाई,राही ,सत्यभामा

तीन बायका! रुक्मिणी (रखुमाई), राधा (राही?) आणि सत्यभामा.

नाही

लोककथेमध्ये पदुबाई ही एकच बायको ऐकली आहे. कदाचित पद्मा (लक्ष्मी) वरून आले असावे. आपल्याला माहिती असलेले नाव रखुमाई, कारण कृष्णाशी विठ्ठलाचे साधर्म्य असावे.

नावांबद्दल अधिक माहिती इथे पहा.. http://mr.upakram.org/node/2353

रखुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा

एक दुवा
व दुव्यावर टिचकी मारण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी त्यातील 2 चित्रे...


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरोबर आहे :)

फक्त लोककथेत पदुबाई आहे असे म्हटले.. :)
बाकी विठोबाचे साधर्म्य बुद्धापेक्षा कृष्णाशी आहे असे वाटते. त्याप्रमाणे त्याला एकाहून अधिक बायका असणारच, पण लोककथेत मात्र एकच असावी असे वाटते.

दशावतारात बुद्धाऐवजी विठोबा

येथे बघा. गोव्यातील देवळावरील फोटो.

अवतार

अवतार क्रमशः दिसत नाहीत असे दिसते.

हे रूप प्रचलित असलेले ओळखीचे विठोबाचेच रूप आहे. कदाचित बर्‍यापैकी अलिकडच्या काळातील (फारच झाले तर तीन चार शतके पूर्वीचे) असावे.

काही लोक म्हणतात नंतरच्या काळात बुद्धाला नववा अवतार मानले गेले. पण विठोबाच्या जागी बुद्धाला नववा अवतार केले, का आधी बुद्ध नववा अवतार होता त्याच्याऐवजी विठोबाला केले?! कसेही असले तरी बुद्धाला अवतार म्हणून मान्यता काही शतकांपूर्वी मिळालेली दिसते.

विष्णूचे दहा अवतार

विष्णूच्या दहा अवतारात कुठले अवतार सामील नाहीत याची मनाशी एक यादी करत होतो.

१. भगवद्गीतेत सांगितलेले अवतार, यात नारायण (ऋषी), जेष्ट (महिना) अशा अनेक नावांचा समावेश आहे पण परशुराम राम वामन वगैरे नाहीत.
२. विठोबा
३. बालाजी कन्याकुमारी वा महालक्ष्मी कोल्हापुरची या सोबत केलेला विष्णूचा विवाह.
४. मोहिनी
५. जगन्नाथ
६. वृंदा वा तुळशी बरोबर विवाह करणारा.
७. वेदातील विष्णू (उपेन्द्र) हा इन्द्राचा भाऊ.
८. कुठल्याशा कथेत कमळे कमी पडतात म्हणून आपले डोळे काढून देणारा.
९. प्रत्येक राजा विष्णूचा अवतार असावा असे म्हणणे.
याशिवाय दत्त (तीघांचा मिळून एक अवतार) अय्यप्पा (मोहिनी व शंकर यांचा मुलगा.),

बोधिसत्व (बुद्ध नव्हे बुद्धाचे मागले जन्म) जातककथांमध्ये बुद्धाचे अनेक (२७?) अवतार (?) होऊन गेले. यातील काही मुकुट धारी होते.
यातील माझ्या आठवणीत राहिलेला अवतार म्हणजे प्रल्हाद जो कधी इंद्र होता. या कथांमध्येही पुराणातील कथांची सरमिसळ आढळते.

मी लेह (लडाख) मधे जवळपास महिषासुरमर्दिनीसारखी मूर्ती पाहिली. तेथील बुद्ध लोकांच्या मते ती यक्षिणी होती.

मला असे वाटते की आपला भूतकाळ एवढा सरमिसळ होऊन राहिला की मूळ काय आणि नंतरचे काय हा शोध घेणे फार कठीण झाले आहे.

प्रमोद

लडाखमधील मुकुटधारी बुद्ध

हिंदु आणि बुद्ध धर्मातील साम्यस्थळे दाखवल्याबद्दल अभिनंदन!

लडाखच्या स्तुपांमधील आणि गोम्पांमधील सगळेच बुद्ध दागिन्यांनी सजलेले दिसतात. तेथील थिकसे मोनास्टेरीमध्ये बुद्धाच्या स्त्री अवताराच्या मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात.
डिस्कीटच्या बुद्धाची मूर्ती तर फ़ारच मोहक आहे.
गौरी

तर्क पटला नाही.

मधुकर, आपला तर्क पटला नाही व त्या तर्कामागची दिलेली कारणमिमांसा देखील पटली नाही.

गृहीतकाविषयी शंका

वर प्रियालींनी म्हटल्याप्रमाणे लिखाण "तेजोमहालय" धाटणीचे तर वाटलेच, पण अजून म्हणजे, एक गृहीतक जाणवले - बौद्ध हा एखादा अगदी वेगळा "रिलिजन" होता/ आहे; "हिंदू रिलिजन" शी त्याचा काही संबंध नाही, आणि बघा बघा बौद्ध खाणाखुणा पुसल्या जाऊन त्याजागी हिंदू मंदिरे उभी राहिली आहेत.

असे गृहीतक नसेल तर छानच. असेल तर नमस्कार!

मूळभूत षंका

"रिलिजन" म्हंजे क्काय?

भवतु सब्ब मंगलम !!!

पण अजून म्हणजे, एक गृहीतक जाणवले - बौद्ध हा एखादा अगदी वेगळा "रिलिजन" होता/ आहे; "हिंदू रिलिजन" शी त्याचा काही संबंध नाही, आणि बघा बघा बौद्ध खाणाखुणा पुसल्या जाऊन त्याजागी हिंदू मंदिरे उभी राहिली आहेत.

नक्कीच. बेलाशक. ज्यांना थोडीबहुत ऐतिहासिक (म्हणजे इतिहासविषयक) अक्कल आहे त्यांना हे एव्हाना माहीत असेलच. अर्थात बाहेर समाज नावाची अत्यंत गुंतागुंतीची चीज आहे, तिला हे सगळे बहुधा माहीत नाही.

असे गृहीतक नसेल तर छानच. असेल तर नमस्कार!

उत्तम! भवतु सब्ब मंगलम !!!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हरकत नसावी

पण अजून म्हणजे, एक गृहीतक जाणवले -

असे गृहितक जाणवण्यास हरकत नसावी. त्या गृहितकातून आपल्याला जे पटते ते घेता येते.

बौद्ध हा एखादा अगदी वेगळा "रिलिजन" होता/ आहे;

अगदी वेगळा नसला तरी वेगळा धर्म आहे.

"हिंदू रिलिजन" शी त्याचा काही संबंध नाही,

संबंध नक्कीच आहे. असो. असे गृहितक वरील लेखात वाटले नाही.

आणि बघा बघा बौद्ध खाणाखुणा पुसल्या जाऊन त्याजागी हिंदू मंदिरे उभी राहिली आहेत.

याची शक्यता आहे. सर्वच मंदिरांचे असे झाले असेल असे नाही परंतु काही मंदिरांचे असे ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच झाले असावे.

एका मालमत्तेचे किती ते दावेदार?

विठोबा आणि पंढरपूर या मालमत्तेवर आतापर्यंत चार पंथियांनी दावे केले आहेत.

१) सध्या ही मालमत्ता वैष्णवांच्या ताब्यात असून ते विठ्ठलाला विष्णूचा किंवा कृष्णाचा अवतार समजतात. पदुबाई म्हणजे पद्मावती आणि रखुमाई म्हणजे रुक्मिणी अशी विठ्ठलाच्या दोन बायकांची नावे आहेत आणि हा देव कर्नाटकातून येथे आला, अशी मुख्य धारणा आहे.
२) विठ्ठल हा विष्णूचा अवतार वगैरे काही नसून स्थानिक देव आहे (बहुधा गवळ्यांचा म्हणजेच पशुपालक जमातींचा) असा दुसरा दावा आहे.
३) संजय सोनवणी यांनी वेगळीच थिअरी मांडली आहे. 'हिंदू धर्माचे शैव रहस्य' आणि इतर लेखनातून त्यांनी पंढरपूर हे मूळ शैवांचे स्थान असल्याचे आणि वैष्णवांनी त्यावर कब्जा केल्याचे प्रतिपादन केले आहे. सोनवणी यांचे 'असूरवेद' नावाचे पुस्तक (फिक्शन) वाचले तर त्यातील कथानकात याच थिअरीचा उल्लेख आहे. रा. चिं. ढेरे यांनी ही 'विठ्ठल एक महासमन्वय' म्हटले आहे.
४) आता मधुकर यांनी काही लेखकांचा हवाला देऊन पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे बौद्ध स्तूप कसे होते ते मांडले आहे.

या सगळ्यातून एक जाणवते, की विठ्ठल मंदिर हे वैष्णवांनी कुणाचे तरी ढापलेले देवस्थान आहे, असा इतरांचा दावा दिसतो. या दावेदारांनी यासंदर्भात सध्या या स्थानाची वहिवाट कब्जात असलेल्या वारकरी संप्रदायाशी चर्चा केली आहे की नाही कुणास ठाऊक? नसल्यास ह. भ. प. बंडातात्या कराडकर आदी मान्यवरांना भेटून त्यांच्याशी सविस्तर मंथन करावे, असे वाटते.

विठ्ठल मंदिर ही मूळची मशीद असल्याचा मुस्लिमांचा दावा असल्यास त्यांनी स्वतंत्रपणे पुरावे सादर करावेत.

विठ्ठलाच्या डोक्यावरील मुकूट गवळी घालतात तो टोप आहे, असे म्हटले जाते, परंतु अशी शिरस्त्राणे इजिप्शियन संस्कृतीत पण पाहायला मिळतात. पारशांमध्येही अशा टोप्या असतात. त्यावरुन उद्या कुणी विठ्ठल हा परदेशातून आलेला असल्याचे संशोधन केले तरी त्यास वाव आहे.

विठ्ठला! कोणता झेंडा घेऊ हाती?

 
^ वर