ते समीकरण सुटेना

नुकतेच 'द इक्वेशन दॅट कुडन्ट बी सॉल्व्ड' हे मारिओ लिविओ यांचे पुस्तक पाहिले. गणितातील विशेषतः ग्रुप थियरीतील तपशील फारसा न वाचल्यामुळे हे पुस्तक वाचले असे म्हणता येणार नाही. याच दरम्यान 'द ओपन युनिवर्स' हे पॉपरचे पुस्तक वाचत होतो. धनंजयांनी अनुवादित केलेल्या रसेलच्या 'कारण' विषयक निबंधानंतर हे पुस्तक (पॉपरचे) वाचण्याची उत्सुकता होती. मात्र त्याविषयी पुन्हा कधीतरी.

या पुस्तकाचा विषय आहे मुख्य विषय आहे बीजगणीत. मला यातले जे भावले ते म्हणजे त्यातील इतिहासाचा भाग. आणि विशेषतः एबल (Niels Henrik Abel) आणि गॅलोईस (Galois) (उच्चार शब्दकोशातून ताडून घेतलेला नाही.) या दोघांच्या कथा. आपल्या शाळेतल्या बीजगणितात सहसा दोन वा प्रसंगी तीन माहित नसलेल्या संख्यांचे गणित (अननोन्स) आणि द्विघाती (क्वाड्रॅटीक) समीकरणे सोडवतो. त्रिघाती (क्युबिक) समीकरण कसे सोडवावे हे मी एका पुस्तकात वाचले होते. त्यानंतरचे म्हणजे अधिक उच्चघातीय समीकरणांचे काय होते हे मला माहित नव्हते. हल्लीच्या संगणकतंत्राने व न्युमरिकल पद्धतीने अशी समीकरणे पटापट सोडवता येतात. पण त्यांचे उत्तर जसे न्युमरिकल (अंकगणितीय?) पद्धतीने काढले असल्याने उत्तर क्लोजडफॉर्म (समीकरणात्मक? ) येत नाही.

कथा आहे ह्या हायर ऑर्डर समीकरणांची.

त्रिघाती समीकरणे

पंधराव्या शतका पर्यंत त्रिघाती समीकरण कोणी फारसे सोडवू शकत नव्हता. म्हणजे अगदी साधी त्रिघाती समीकरणे सुटत होती (क्ष^३ =२७ ). पण सर्व त्रिघाती समीकरणे सोडवण्याचा मार्ग माहित नव्हता. Luca Pacioli या गणिततज्ञाने (१४९४) असे लिहून ठेवले होते की अजून कोणाला ही समीकरणे सुटली नाहीत. Sciopione dal Ferro ने त्यानंतर काही वर्षात अ क्ष^३+ ब क्ष + क =० हे समीकरण कसे सोडवायचे हे शोधून काढले. मात्र गंमत अशी (असे त्यावेळी बरेचदा घडत होते.) की त्याने आपला हा शोध गुपित म्हणून राखला. पुढे त्याच्या मृत्युनंतर काही वर्षांनी ते संशोधन Maria Fiore याच्याकडे आली. Niccolo (निकोलो) Tartaglia हा याचा समकालीन. निकोलोने १५३० साली अशी समीकरणे कशी सोडवायची याची पद्धत काढली. आणि गंमत म्हणजे त्यानेही हा शोध गुप्त ठेवला. निकोलो हा अत्यंत गरीब घरातून आला होता. त्यामुळे त्याने स्वयंशिक्षण करत मोठी मजल मारली. हळू हळू बातमी पसरली की निकोलोने काही त्रिघाती समीकरण सोडवलीत. ही बातमी Maria Fiore पर्यंत पोचली ज्याच्याकडे वरील पद्धतीचे समीकरण कसे सोडवायचे याची माहिती होती. निकोलोच्या कमी शिक्षणामुळे तो बढाया मारतो असे Fiore ला वाटले. मग काय झाले की त्याने असे ठरवले की निकोलेला आव्हान द्यायचे. दोघात असे ठरले की प्रत्येकाने दुसर्‍याला ३० गणिते द्यायची. जो आधी सोडवेल तो जिंकला. आसपासचे गणिती बघे म्हणून सामिल झाले. १२ फेब्रु. १५३५ मधे हा सामना झाला. निकोलेने ३० वेगवेगळे प्रश्न काढून दिले होते. तर Fioreने तीसच्या तीस प्रश्न त्रिघाती समीकरणावर (फेरो ने सोडवलेल्या पद्धतीचे) काढले होते. झाले असे की निकोलोने ते सर्व दोन तासात सोडवून टाकले. आणि Fiore त्या दरम्यान काहीच करू शकला नाही ! हे सर्व घडूनही निकोलोने आपली पद्धत जाहीर केली नाही.

पुस्तकात यापुढची कथा आहे. पण ती जरा जास्त होईल म्हणून देत नाही. निकोलोने आपली पद्धत एकास सांगितली पण अट घातली की ती गुप्त ठेवायला हवी पण नंतर ती वेगळ्या मार्गाने प्रकाशात आली. असे करत करत त्रिघाती समीकरणे सोडवण्याची रीत सापडली. आता लक्ष लागले लोकांचे त्याहून जास्त मोठी समीकरणे सोडवायची.

ऍबलः

आता आपण एकोणिसव्या शतकाकडे वळू या. ऍबलचा जन्म १८०२ सालचा नॉर्वेतला. वडील पाद्री परिस्थिती साधारण. नॉर्वे हे देखील गणिताविषयी फारसे प्रगत नव्हते. १८१६-१७ पर्यंत ऍबल शाळेतल्या शिक्षणात यथातथाच होता. त्यांचे गणिताचे मास्तर हे मारकुटे असावे. वर्गातील एका विद्यार्थ्याचा त्यांनी मारल्यामुळे मृत्यु झाला असा आरोप त्यांच्यावर आला आणि त्यांची नोकरी गेली. मारकुटे मास्तरांच्या ऐवजी जे दुसरे गणित शिक्षक आले त्यांनी मात्र ऍबलचे पाणी जोखले. १८१९ साली त्याची गणिताची प्रगती जिनियस स्वरुपापर्यंत येऊन पोचली. शाळेच्या शेवटच्या वर्षी ऍबल ला वाटले की त्याने पाचव्याघाताचे (Quintic) समीकरण सोडवले. वर्गशिक्षकांना त्याने ते दाखवले त्यांना आणि अजून काही जणांना त्यात काही चूक आढळले नाही. मग ते एका गणितज्ञाकडे पाठवले. त्याने केलेल्या सूचनेनुसार शोध घेतल्यावर ऍबलला आपली चुक उमजली. यादरम्यान वडीलांवर बालंट आले आणि १८२० सली त्यांचा मृत्यु झाला. ऍबलची परिस्थिती अधिक खालावली.

या पूर्वी अशा समीकरणाचे उत्तर शोधण्याचे खूप असफल प्रयत्न झाले होते. पण ऍबलच्या ते गावी नसल्यासारखे तो त्यामागे होता. १८२३ मधे वयाच्या एकविसाव्या वर्षी तो हे सिद्ध करू शकला की 'पंचमघातीय समीकरणाचे सूत्र सापडणे अशक्य आहे.' आता पर्यंतच्या पूर्वीच्या प्रयत्नात असे काही सिद्ध झाले नव्हते. आणि असे सिद्ध झाल्यावर त्यामागे लागणे हे मुर्खपणाचे झाले असते. या दोन्ही कारणांनी 'अशक्यतेची सिद्धता' ही मोठी मोलाची होती. त्याचे शिकवणारे प्राध्यापकपण त्यावर खुश होते. मात्र अशा संशोधनाची खरी किंमत पॅरीसमधेच कळली असती. नॉर्वे सरकारने नॉर्वे ते पॅरीस प्रवासखर्चासाठी ऍबलची तरतूद केली. आपले सत्तावन पानांची सिद्धता घेऊन ऍबल पॅरिसला आला. (१८२६). फ्रेंच ऍकडमी ऑफ सायन्सला त्याने आपला निबंध सादर केला. फोरियर त्यावेळी संस्था सचीव होता त्याने कॉची आणि लिजेन्ड्रे (ही तिनही नावे गणितात आज येत असतात.) या दोघांना तपासायला दिला. ऍबलला खूप आशा होती. पण कॉचीने आपल्या अहंतेच्या धुंदीत होता तर लिजेंड्रे त्यावेळी ७४ वर्षाचा होता. पुढे असे झाले की कॉचीने ते कागद हरवले. लिजेंड्रे म्हणाला की ते हस्ताक्षर चांगले नाही म्हणून वाचू शकलो नाही. १८२७ साली निष्कांचन अवस्थेत ऍबल परतला. १८२९ साली त्याचा आजारात आणि हलाकीत मृत्यु झाला. याच सुमारास जॅकोबीने (अजून एक माहितीचे नाव) या संशोधनाची खूप तारिफ केली. १८३० साली फ्रेंच ऍकडमीने त्याला मरणोत्तर पारितोषिक दिले.

आता २००२ साली नॉर्वेजीयन सरकारने गणितात संशोधन करणार्‍यांसाठी नोबेल तोडीचे ऍबल प्राइज देण्याचे ठरवले आहे.

गॅलोइस

गेलोईस हा १८११ साली फ्रांसमधे जन्मला. घरची सुस्थिती होती. पण हा मुलगा (मृत्यु १८३१) विद्रोही विचारांचा (उदारमतवादी). याच्या आयुष्याच्या दरम्यान फ्रांस मधे खूप उलाढाली झाल्या त्याचा तो शिकार झाला. ऍबलप्रमाणे शाळेत असताना यानेही पंचघातीय समीकरणांची उत्तरांचा शोध घेतला. त्यालाही वाटले की आपण हे समीकरण सोडवले. ऍबल प्रमाणे त्यालाही कळले की त्याचे काय चुकले होते. गणितात त्याची इतकी रुची होती की इतर विषय त्याला आवडायचे नाहीत. इतके की नापास व्हायची पाळी. कॉलेजला जाण्यासाठी त्याने एंट्रंस टेस्ट दिली त्यात तो नापास झाला. कसाबसा दुय्यम दर्जाच्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला.

१८२९ साली त्याने असे सिद्ध केले की त्रिघातापूढील कुठलेच समीकरण सूत्रमय रितीने सोडवणे अशक्य आहे. ऍबलच्या फक्त पंचघातीय समीकरणाच्या असिद्धतेपेक्षा ही एक मोठी उडी आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने ज्या पद्धतीचा वापर केला ती पद्धत त्यावेळी खूप नवीन होती (गुप थियरी). त्याचा निबंध कॉचीकडेच आला. आणि काही दिवसांनी कॉचीने कळवले की यावर तो रिपोर्ट देणार होता पण तो नंतर कधीतरी देईल. त्यानंतर गेलोइसने तो निबंध परत लिहून पाठवला. तो निबंध फोरियर आपल्या घरी घेऊन गेला आणि काही दिवसात त्याचा मृत्यु झाला. या गडबडीत गॅलोईसचा निबंध कुठेतरी हरवला.

याच दरम्यान फ्रांस मधे सत्तापालट होत होती. या राजकीय उलाढालीत व आपल्या राजकीय चळवळींमुळे गॅलोईसला दोनदा अटक झाली एकदा सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्यानंतर एकाशी केलेल्या द्वंद्वयुद्धात तो जखमी झाला आणि मरण पावला. त्याच्या राजकीय चळवळींमुळे तो थोडा लोकप्रिय होता. मात्र त्याच्या गणिती शोधांची अजून दखल घेतली नव्हती. त्याचा भाऊ आणि मित्र यांनी प्रयत्नपूर्वक त्याचे कागद एकत्र केले. १८४३ साली त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले. फ्रेंच ऍकॅडमीत त्याच्या निबंधाचा चांगला उल्लेख केला. १८५६ मधे त्याने सुरु केलेल्या पद्धतीचा गणिताच्या शिक्षणात वापर केला जाऊ लागला.

----

दोन कारुण्यमय जीवने वाचून त्यावर लिहावेसे वाटले. म्हणून एवढे.

प्रमोद

Comments

गणितातील कलाकार

कलाकारांचे जशे भारावलेले कलंदर जगणे असते, तसे काही गणितज्ञांचे असते.

नॉर्वेमधून पॅरिसमध्ये आलेल्या आबलची कथा वाचून इंग्लंड मध्ये गेलेल्या एकाकी रामानुजमची उगाच आठवण आली. (मात्र रामानुजमला मानणारे उच्चपदस्थ गणितज्ञ होते, हे तरी बरे...)

गणित हे मनोवृत्तीने भौतिक जिज्ञासेपेक्षा कलासाधनेच्या जवळ जाते.

असेच

असेच म्हणतो. रोचक लेख.

अनोखा विषय - सुंदर परिचय

गणिताच्या विश्वात घडणाऱ्या घडामोडींची सर्वसाधारणपणे काहीच कल्पना नसते. यातल्या एका अंगाच्या प्रगतीचे टप्पे व त्यावर धडपड करूनही पाहिजे तसं यश न मिळाल्याच्या कथा म्हणजे अमुंडसेन-स्कॉट यांच्या चित्तरकथांप्रमाणे आहे...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सहमत

गणिताच्या विश्वात घडणाऱ्या घडामोडींची सर्वसाधारणपणे काहीच कल्पना नसते. यातल्या एका अंगाच्या प्रगतीचे टप्पे व त्यावर धडपड करूनही पाहिजे तसं यश न मिळाल्याच्या कथा म्हणजे अमुंडसेन-स्कॉट यांच्या चित्तरकथांप्रमाणे आहे..
सहमत आहे. साध्यासोप्या ओघवत्या भाषेतला सुरेख लेख. आणखी येऊ द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गॉसही अनुत्सुक

एबलच्या सिद्धतेबद्दलची कीर्ती गॉसपर्यंत पोचली होती. एबल गॉटिंजेनमध्ये गॉसची भेट घ्यायला उत्सुक होता, पण गॉसने उत्साह न दाखवल्याने तो न भेटताच नॉर्वेला परत गेला. पुढे गॉसच्या निधनानंतर एबलने त्याला पाठवलेले पत्र न उघडलेल्या स्वरूपात त्याच्या संग्रहात सापडले.

विनायक

बिनमहत्त्वाचे अवांतर : कॉची ऐवजी कोशे हा उच्चार बरोबर असावा असे वाटते.

गॉसच्या अनुत्सुकतेविषयी

गॉसच्या अनुत्सुकतेविषयी काही माहिती येथे मिळाली. खाली देत आहे:

It is uncertain why Gauss took this attitude towards Abel's work since he certainly never read it - the paper was found unopened after Gauss's death. Ayoub gives two possible reasons [6]:-

... the first possibility is that Gauss had proved the result himself and was willing to let Abel take the credit. ... The other explanation is that he did not attach very much importance to solvability by radicals...

भारतीय तज्ज्ञाने सोडविले जागतिक कूटगणित..

आजच वर्तमान पत्रात हि बातमी वाचली, आनंद झाला,
ह्या बाबतीत काही अजून माहिती मिळेल काय ?
भारतीय तज्ज्ञाने सोडविले जागतिक कूटगणित

सिद्धता

देवळालीकर यांनी सिद्धता मांडली आहे. ती बरोबर की चूक अजून निर्णय व्हायचा आहे. अर्थात जगातील बरेचसे गणितज्ञ/संगणकतज्ञ सिद्धता वाचत आहेत त्यामुळे निर्णय लवकर होईल असे वाटते. अधिक माहिती इथे.

उपक्रमी संगणक तज्ञांनी अधिक माहिती दिल्यास उत्तमच.

अवांतर : आपली वर्तमानपत्रे अचूक बातम्या द्यायला कधी शिकणार? देवळालीकर भारतीय आहेत त्यामुळे यामागची उत्सुकता समजू शकतो. मात्र सिद्धतेला मान्यता मिळाली आहे किंवा नाही हे आंतरजालावरून सहज कळू शकते. निबंध १०० च्या वर पानांचा आहे. तो समजायला तज्ञांनाही वेळ लागतो आहे. अशा वेळी उत्तर शोधले आहे असे ठासून सांगणे कितपत बरोबर आहे?

सिद्धता मांडली आहे आणि त्यावर विचार चालू आहे अशी बातमी योग्य ठरली असती.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत

अवांतर : आपली वर्तमानपत्रे अचूक बातम्या द्यायला कधी शिकणार? देवळालीकर भारतीय आहेत त्यामुळे यामागची उत्सुकता समजू शकतो. मात्र सिद्धतेला मान्यता मिळाली आहे किंवा नाही हे आंतरजालावरून सहज कळू शकते. निबंध १०० च्या वर पानांचा आहे. तो समजायला तज्ञांनाही वेळ लागतो आहे. अशा वेळी उत्तर शोधले आहे असे ठासून सांगणे कितपत बरोबर आहे?

सिद्धता मांडली आहे आणि त्यावर विचार चालू आहे अशी बातमी योग्य ठरली असती.

+१

उसंडू, मुरावि वगैरे वगैरे...

याचे प्रमाण आपल्याकडे खूपच आहे. बातमी देणार्‍या लोकांचे सामान्यज्ञान सामान्यच असते. कालपरवा वाचलेल्या सकाळमधल्या एका बातमीत ऍन्सेल ऍडम्स या प्रसिद्ध अमेरिकन फोटोग्राफरचे नाव एंजल ऍडम्स असे छापले होते. कपाळावर हात मारुन घेतला.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

घाई

>>> बातमी देणार्‍या लोकांचे सामान्यज्ञान सामान्यच असते. <<<

श्री.आरागॉर्न आणि श्री.सौरभ यांनी प्रसारमाध्यमाचा दाखविलेल्या या "नसत्या" उत्साहाची उदाहरणे वाचली/पाहिली की असे वाटू लागते जणू काही त्या वर्तमानपत्रात "जाणकार संपादक वा उपसंपादक" नावाचा प्राणी जागेवर नाहीच. फक्त घाईघाईने कॉलम भरण्यासाठी कंपोझिटरकडे मजकूर (त्याची सत्यता वा योग्यता पडताळून न पाहता) पाठवित राहायचे.

बातम्यातील "उथळपणा" हा एक प्रकार आहेच. अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायिका "नोरा जोन्स". नोराला तिच्या "कम् अवे वुईथ मी" या अल्बमला अलोट प्रसिद्धी लाभली आणि त्याच्या लक्षावधी प्रती खपल्या. पुढे तिला संगीत क्षेत्रातील मानाचा असा "ग्रॅमी" पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याची बातमी आली काय आणि भारतातील प्रसार माध्यमांना आनंदाच्या जणू उकळ्या काय फुटू लागल्या. का? तर ही "नोरा" आमच्या भारताच्या सितारवादक पं.रविशंकर यांची कन्या; म्हणजेच नोराने "भारताचे नाव उज्ज्वल केले !! सरकारने अभिनंदन करावे" इ. इ. बातम्यांचा वर्षाव. त्या नोराला जगाच्या नकाशावर भारत कुठे आहे याचा पत्ताही नव्हता (अजूनही नसेल.) तिच्या नजरेत रविशंकर म्हणजे आपली आई "स्यू जोन्स्" चा एक मित्र, त्याच्या जनुकामुळे आपला जन्म झाला. अमेरिकेत "सिंगल मदर" ला मान्यता आहे, दर्जाही आहे. त्यामुळे नोराच्या जन्मास रविशंकर कारणीभूत. बस्स इतपतच. तिची करीअर तिच्या आईने घडवली अन् त्यामध्ये रविशंकरच्या सितारीची एक तारही झंकारलेली नाही. इतकेच नव्हे तर नोरा जोन्सने कधी कुठल्याही मुलाखतीत बापाचा उल्लेखही केलेला नाही, अल्बमवर त्यांचे नावही ती लावत नाही. मग "महान भारत देशा"ची तर बात साता समुद्रापलिकडे.

पण हे प्रसार माध्यमांना कोण सांगणार?

नोरा

नोरा जोन्सबद्दल माहिती नव्हते. आता नोराला भारतरत्न मिळायला हरकत नसावी. :प्

अपडेट

देवळालीकर यांच्या सिद्धतेमध्ये अडचणी असल्याचे इतर तज्ञांचे मत आहे आणि बहुधा सिद्धता स्वीकारली जाणार नाही. (त्यातही हो किंवा नाही असे स्पष्ट उत्तर मिळाले का हे सांगणे कठीण दिसते. )

दुवा १

दुवा २

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

क्लासिक लेख. खूपच आवडला.

क्लासिक लेख. खूपच आवडला.

खालील वाक्ये वाचतांना वाटले की, मनुष्यस्वभाव बदलत् नाही व सगळीकडे सारखाच आहे. ह्या सगळ्या करामती आजही पाह्यला मिळतात.
---मात्र गंमत अशी (असे त्यावेळी बरेचदा घडत होते.) की त्याने आपला हा शोध गुपित म्हणून राखला. ---
आजही, नॉलेज लपवुन ठेवले जाते.
-- ही बातमी Maria Fiore पर्यंत पोचली ज्याच्याकडे वरील पद्धतीचे समीकरण कसे सोडवायचे याची माहिती होती. निकोलोच्या कमी शिक्षणामुळे तो बढाया मारतो असे Fiore ला वाटले.---
कमी शिकलेला म्हणजे मठ्ठ असे "जास्त" शिकलेल्यांचे मत असते.

--आता २००२ साली नॉर्वेजीयन सरकारने गणितात संशोधन करणार्‍यांसाठी नोबेल तोडीचे ऍबल प्राइज देण्याचे ठरवले आहे.---
आपल्याकडे ज्या गोष्टीला गांधी घराण्याचे नाव देता येत नाही ते होत नाही. असे एकही भव्य पारीतोषिक नाही जे क्रिडा-साहित्य-कलाक्षेत्राच्या बाहेर आहे. जसे काही इतर व्यावसायिकांची ह्या देशाला गरजच नाहि.

साधना

लेख रोचक आहे.वर धनंजय म्हणतात तसे गणिताची सिद्धता आणि कलेची साधना एकाच पातळीवर असाव्यात असे वाटते.
अवघड गणिते आणि कूटप्रश्न सोडवणार्‍या गणितज्ञ मंडळींबद्दल फार आदर वाटतो.
अवांतरः
परवा-परवाच आमचे शाळा-बंधू (बरेच ज्युनिअर) श्री. सुभाष खोत यांना वॉटरमन आवार्ड मिळाले.
ते हैदराबादेत भरणार्‍या 'इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ म्याथेम्याटिक्स' (आंतराष्ट्रीय गणित परिषद)मध्ये
"Inapproximability of NP-complete Problems, Discrete Fourier Analysis, and Geometry"- या विषयावर निमंत्रित व्याख्यान देणार आहेत असे समजते.

उत्तम परिचय

लेख आवडला. या दुव्यावर बर्‍याच गणितींची संक्षिप्त चरित्रे उपलब्ध आहेत.

+१

असेच म्हणतो. लेख आवडला.

एबलविषयी आणखी माहिती

माझ्या मते Niels Henrik Abel बिषयी जास्त विस्ताराने लिहायला हवे होते. या लेखात अनवधानाने काही अपुरी व काही ठिकाणी चुकीची माहिती दिल्यासारखी वाटते. यादरम्यान वडीलांवर बालंट आले आणि १८२० साली त्यांचा मृत्यु झाला. एबलचे वडील पाद्री होते. सुसंकृत घराण्यातले होते. घरची कंगाल परिस्थिती, नार्वेची हला़खीची स्थिती, दुष्काळ इत्यादीमुळे वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांचा मृत्यु झाला. त्या दंपतीला सहा मुलं होती. वडिलांच्या मृत्युपश्चात्त आईच्या व भावंडाच्या पालन पोषणाचा भार एबलवर पडला. मृत्युच्या वेळेपर्यंत त्यानी राजिखुशीने कुटुंबाची काळजी घेतली. १९व्या वर्षी भेटलेल्या Bernt Michael Holmboe (1795-1850) या गणित बिषयात अभिरुची असलेला शिक्षक एबलला शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः गरीब असूनसुद्धा मदत करत होता. एबलच्या मृत्युनंतर त्याचे सर्व अप्रकाशित लेखन त्यानी प्रसिद्ध केले.बर्लिनमध्ये भेटलेल्याAugust Leopold Crelle या होतकरू संपादकामुळे एबलच्या सिद्धांताना प्रसिद्धी मिळाली. त्यानी नवीनच काढलेल्या फक्त गणित संशोधन विषयक Crelle's Journal त्रैमासिकात 50-60 टक्के लेख एबलचेच होते. गेली 180 वर्षे जर्मन भाषेतील हे नियतकालिक चालू आहे. त्रैमासिक बंद पडू नये म्हणून दुसर्‍या महायुद्धाच्या काळातही प्रयत्न केले गेले. हा उल्लेख यायला हवा होता.
एबलचा मृत्यु क्षय रोगामुळे झाला. त्याच्या समकालीन mathematicians नी त्याची घोर निराशा केली. गरीबीमुळे पोटा- पाण्यासाठी झगडावे लागले. विद्यापीठात प्राध्यापकीची नोकरी मिळाल्यास सगळे कष्ट दूर होतील या आशेवर तो जगत्त होता. परंतु कफल्लक अवस्थेतच मृत्युनी त्याला गाठले. अगदी लहानपणापासूनच Think about masters; not of pupils असे त्याला वाटत होते. पुढील 500वर्ष पुरतील एवढे गणिताबद्दलच्या संशोधनाविषयीचे सिद्धांत त्यानी केवळ 10-12 वर्षात मांडलेले आहेत.

बालंट

पुस्तकातली बालंटाबद्दलची माहिती अशी.

एबलचे वडील १८१७ मधे पार्लमेन्टवर निवडून आले. २ एप्रिल १८१८ मधे त्यांनी दुसर्‍या 'खासदारांवर' एका कॉन्स्टेबलला पकडून ठेवल्याचे आरोप केले. ते आरोप पूर्ण पणे निराधार निघाले. त्यामुळे लोकांचा रोष ओढवला गेला. काढून टाकण्याची (इम्पीचमेन्ट) मागणी लोकसभेत होऊ लागली. माफी मागण्याची संधी त्यांनी नाकारली. आणि शेवटी हताश होऊन ते परतले. त्यानंतर मुख्यतः दारूत बुडाले आणि १८२० साली त्यांचा मृत्यु झाला. (पान ९४-९५)

कदाचित पुस्तकातली माहिती चुकीची असेल.

अधिक माहिती बद्दल धन्यवाद

प्रमोद

 
^ वर