अ‍ॅनिमल फार्म (मला कळलेले)

पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना आमच्या ग्रूप ने एक टी शर्ट डिझाइन केला होता. त्यावरचे वाक्य होते (COEP-All Men are Equal but Some are more equal). त्यावेळी माझी इंग्लिश साहित्याची वाचन कुवत फार नसल्याने त्या वाक्याबद्दल फार जास्त काही कळत नव्हते. फक्त ते वाक्य बोलताना फार भारी वाटायचे. नंतर पुढे कधीतरी मित्रांशी झालेल्या चर्चेत हे वाक्य जॉर्ज ऑर्वेल या लेखकाच्या "अ‍ॅनिमल फार्म " या पुस्तकातील "All animals are equal but some are more equal than others" या वाक्यावर बेतलेले आहे असे कळले. त्यावेळी हे पुस्तक कधीतरी वाचेन असे ठरवले होते आणि ते, आपण बरेच संकल्प करुन सोडून देतो, तसे अर्धवट राहिले.

काल लायब्ररी मधे एक पुस्तक शोधताना Relevant Search मधे अ‍ॅनिमल फार्म दिसले. लगेच बैठक मारली आणि ३-४ तासात इनमिन १५० पानांचे पुस्तक संपवून टाकले. पुस्तक संपवले खरे, पण ऑर्वेल ने मनात जी बैठक मारली ती मारलीच वर लिहायलाही उद्युक्त केलय. बर्‍याच जणानी हे पुस्तक वाचले असेल, तरीही माझे हे दिन पैसे या पुस्तकाबद्दल.

जॉर्ज ऑर्वेल ने १९३७ साली लिहायला घेतलेले, पण १९४३ पर्यंत प्रकाशित न झालेले १५० पानांचे हे "अ‍ॅनिमल फार्म - अ फेअरी स्टोरी " नावाचे पुस्तक. सरळपणे बघायला गेल्यास, एखादी इसापनीती, हितोपदेश सारखी गोष्ट. पण एका छोट्या शेतावर राहणार्‍या प्राण्यांच्या जीवनात घडणारी ही गोष्ट वाचून संपल्यावर इतिहास, समाजजीवन, संस्कृती, मानव स्वभाव या इतर अनेक पैलूंवर प्रकाश टाकून आपल्याला स्वतःबद्दल आणि परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडते.

मूळ कथा अगदी साधीसरळ. जोन्स नावाच्या एका शेतकर्‍याच्या शेतावर बैल, गायी, घोडे, डुकरे, कुत्रे, गाढव, कोंबड्या, मेंढ्या असे बरेच प्राणी राहत असतात. आपापले काम प्रामाणिक पणे करत असतात. पण मेजर म्हणून एक सर्वात वयस्कर डुक्कर ज्याला सर्व प्राणी फार मान देत असतात, त्याला सारखे वाटत असते की 'अरे, आपल्याला यातून काय मिळते? जेमतेम जगण्यापुरते खायला आणि राहायला. बाकी सर्व फायदा या मनुष्यांना. तर नाही, आपण यांची गुलामी आता नाही करायची.' तो सर्व प्राण्याना एकत्र करुन त्यांच्या मनात या पारतंत्र्या विरुद्ध लढायची प्रेरणा निर्माण करतो. तो मेल्यावर त्या कळपातील दोन हुशार डुकरे, नेपोलिअन आणि स्नोबॉल, त्याचा वारसा पुढे चालवताना जोडीने सर्व प्राण्याना लिहावाचायला शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरुन सुशिक्षित झालेले प्राणी नीट विचार करुन जागरुक होतील. काही प्राणी , जे चलाख असतात ते शिकतात , काहीजण नाहीत. पुढे एकदा जोन्स च्या चुकीने उपाशी राहायला लागते आणि तिथेच क्रांतीची ठिणगी पडते. सर्व प्राणी माणसांवर हल्ला करून त्यांना हाकलून लावतात आणि शेताचा ताबा घेतात. सर्व जणाना गुण्यागोविंदाने राहता यावे म्हणून कामे वाटून घेतली जातात. स्नोबॉल आणि नेपोलिअन सर्वात जास्त ज्ञानी असल्याने सर्व मॅनेजमेंट चे काम बघतात. घोडे शेतीकाम आणि ओझी वाहणे तर बाकी सर्व प्राणी आपापल्यानुसार ताकदीची कामे वाटून धेतात. सर्वांचे चांगले व्हावे, शांततेत सर्व कामे पार पडावी म्हणून सात नियमांची घटना लिहीली जाते.ती अशी

१. जे कोणी दोन पायांवर चालतील ते शत्रू
२. जे कोणी चार पायांवर चालतील किंवा ज्याना पंख आहेत ते मित्र.
३. कोणताही प्राणी माणसासारखे कपडे घालणार नाही.
४. कोणताही प्राणी माणसासारखा बिछान्यात झोपणार नाही.
५. कोणताही प्राणी दारु पिणार नाही.
६. कोणताही प्राणी दुसर्‍या प्राण्याची हत्या करणार नाही.
७. सर्व प्राणी समान आहेत. (All animals are equal.)

अशाप्रकारे काही दिवस आनंदात जातात. पण जसा जसा काळ जायला लागतो तसतशी प्राण्यांमधे धुसफुशी सुरु होतात. आपणच शेताचे सर्वेसर्वा व्हावे असे काही प्राण्यांना वाटू लागते. राजकारण खेळले जाउ लागते. एकाएका जातीला हाताशी धरून दुसर्‍याचा काटा काढणे, इतर प्राण्यांची मने कलुषित करुन भांडणे लावून आपला स्वार्थ साधणे, सर्वांचे हित साधण्याचा देखावा करुन फक्त आपले आणि आपल्या बगल्बच्चांचे हित साधणे असे प्रकार होउ लागतात. आपल्या अकलेच्या जोरावर आणि फोडा आणि झोडा या तत्वाने डुकरे स्वतःला श्रेष्ठ घोषित करतात. त्यानंतर ते जपण्यासाठी नियमांमधे सोयीस्कर बदल करणे, इतराना तुच्छतेने वागवणे, सत्ता टिकवायला शेवटी माणसांबरोबरही हातमिळवणी करणे, विरोध करणार्‍याचा काटा काढणे अशा सर्व थरांना गोष्टी नेल्या जातात. मात्र एवढे करुनही सामान्य प्राण्याना 'तुमच्या भल्यासाठीच आम्ही हे करतोय' अशी भ्रामक समजूत करुन दिली जाते. सर्व आपल्या मनासारखे करण्यासाठी हे मूठ्भर प्राणी सर्व नियमांवर बोळा फिरवून शेवटी एकच नियम बनवतात की "all animal ara equal but some are more qual than others" . आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने आणि भाषणांनी सर्व सामान्य प्राण्यांच्या मनावर हा नियम कोरला जातो. मग त्यांच्या कष्टावर हे मोजके प्राणी गब्बर होतात आणि बाहेरच्या जगाला 'आम्ही किती प्रगती केलीय' याचा देखावा निर्माण करतात. हा सर्व सुखाचा देखावा तयार झाला म्हणजे "ऑल इज वेल अ‍ॅण्ड वी लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर" याचाच अर्थ परीकथा संपली.

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात बेतलेली आणि मुख्यत्वे साम्यवाद (मार्क्सवाद) आणि त्याच्या तत्वावर टीका करुन त्यातला फोलपणा दाखवणारी ही कथा काल, आज आणि उद्याच्या देखील परिस्थितीवर प्रभावीपणे भाष्य करते. कारण ऑर्वेल ची माणसाचा स्वभाब अचूक टिपण्याची हातोटी. आतापर्यंतच्या माझ्या वाचनात आलेले सर्वात प्रभावी असे हे व्यक्तिचित्रण. साम्यवाद, कॅपिटॅलिझम, क्रांतीवाद, गांधीवाद, कोणताही वाद घ्या, किंवा कोणतेही तत्वज्ञान्/संस्कृती घ्या, तिच्या उदयाची, भरभराटीची कारणे आणि त्याछ बरोबर अस्ताचीही कारणे या छोट्याश्या गोष्टीच्या आधारे स्पष्ट करता येतात कारण सर्वांच्या मागे असलेली एकच मानवी स्वभावाची जडणघडण. सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी ही या सर्वांची मूलभूत प्रेरणा. मानवसमूहावर संकट आले की, ते कोणतेही असो, धर्माचा र्‍हास, परकीय आक्रमण असो, सर्व समूह आपल्या रक्षणासाठी एकत्र येतो. एखादा महान आत्मा त्या समाजाला नेतृत्व देतो, चांगल्या जगण्यासाठी तयार करतो. पण एकदा समाजात शांतता नांदू लागली की पुन्हा ती सत्ता , अधिकार गाजवण्याची उर्मी डोके वर काढते. महात्म्यांच्या विचारांच पराभव त्यांचेच अनुयायी म्हणून घेणार्‍यांकडूनच केला जातो. पुन्हा संघर्ष, नवी संस्कृती, नवे विचार. प्रवृत्ती तीच.

आजचे जगातले कोणतेही प्रश्न उदाहरणार्थ जातीवाद, वंशवाद, भूभागावरील संघर्ष हे सर्व आपण या कथेशी सहज जोडू शकतो. ते आपल्यावर आहे की कोणता प्रश्न आपल्या जीवनाशी जास्त निगडीत आहे. मग तो भ्रष्टाचार असेल, दैनंदिन गरजांची उणीव असेल अथवा देशभक्ती असेल. पूर्ण कथा वाचताना क्षणभर असे जाणवेल की अरे याचे कारण हेच आहे आणि उत्तर हे असेल. पुढच्याच क्षणी असे वाटेल की ते निसटून गेले. पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्‍याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते.

हे माझे दोन पैसे. ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही. तो कथेचा दोष. कारण शेवटी "All men are equal, but nobdy is same" हेच खरे.

Comments

आवाका

इतक्या साध्या गोष्टीचा इतका मोठा आवाका असणे हे ऑर्वेलसारख्या जिनियस लोकांनाच जमू शकते. तेव्हा कम्युनिझ्मवर बेतलेली कथा अगदी आत्ताच्या मराठी सायटींनाही लागू पडते यावरून कुठलाही देश, संस्कृती असली तरी माणसाच्या स्वभावातील काही पैलू समान असतात हे जाणवते. बहुधा अभिजात साहित्य यालाच म्हणत असावेत.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत

तेव्हा कम्युनिझ्मवर बेतलेली कथा अगदी आत्ताच्या मराठी सायटींनाही लागू पडते यावरून........

अगदी मनापासून सहमत....अंदाजे दीड वर्षापूर्वी एका बंडखोर मराठी सायटीच्या आगमनानंतर येथे उडालेला धुराळा आठवला.

||वाछितो विजयी होईबा||

नावडलेले पुस्तक

अ‍ॅनिमल फार्म हे पुस्तक मला फारसे आवडले नव्हते. १९८४ ला मी फक्त उत्कृष्ट हॉरर कथा म्हणू शकलो असतो (काळ ओळखणारी कथा नाही.).

कदाचित पुस्तक वाचले त्यावेळी मार्क्स विचारांबाबत मृदु कोपरा असल्याने ते झाले असेल. पण त्यापेक्षा महत्वाचे कारण वेगळे होते. पुस्तकाचे वर्णन एका अन्यायकारी व्यवस्थेपासून दुसर्‍या अन्यायकारी व्यवस्थेपर्यंत घडणार्‍या घटना असे करता येईल. त्यात पहिली अशी काय वाईट असा मतितार्थ असावा असे वाटते. पुस्तकाच्या लिखाणावरून ते पुस्तक मार्क्सवादी राज्यसंस्थे ऐवजी ब्रिटीश राज विरुद्ध आंदोलन करणार्‍यांविरुद्ध लिहिले आहे असे वाटले. आम्हाला काढले तर तुमचे काही फारसे बरे चालणार नाही. असे सांगण्याचा प्रयत्न वाटला होता. हे पुस्तक न आवडण्याचे मुख्य कारण.

पुस्तकातील मुख्य दोष म्हणजे सर्व प्राणी सारखे नाहीत. त्यांच्या गरजा आणि काम करण्याच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत. या गोष्टीचा वापर पुस्तकात केला गेला आहे. सॅटायर म्हटले की थोडीफार ढील दिली पाहिजे. पण मानवी समुहांना ऑर्वेल जेव्हा हे रुपक लावतात तेव्हा राग येतो. घोड्यंनी काम करतच रहावे असे कुठल्याशा मानवीसमुहाला ते बोलतात.

इसापच्या गोष्टी, पंचतंत्र, गलिवर ट्रॅवल अशांशी हे पुस्तक नाते सांगते. कदाचित एक प्रकारच्या भांडवली (एम् बी ए ?) संस्कृतीला ते आपलेसे वाटेल. सध्याचे राजकारणी (डुकरे?) असेच आहेत असे वाटणार्‍यांसाठी हे पुस्तक योग्य वाटू शकेल. पुस्तकातील अधिकचे मुद्दे म्हणजे चांगली भाषा, बोलुन दाखवण्यासारखे दाखले आणि वाक्ये.

प्रमोद

अंशत: सहमत

मला आवडलेल्या भयकथांपैकी १९८४ ही प्रथम क्रमांकावर आहे.

कदाचित पुस्तक वाचले त्यावेळी मार्क्स विचारांबाबत मृदु कोपरा असल्याने ते झाले असेल.

+१

पुस्तकाच्या लिखाणावरून ते पुस्तक मार्क्सवादी राज्यसंस्थे ऐवजी ब्रिटीश राज विरुद्ध आंदोलन करणार्‍यांविरुद्ध लिहिले आहे असे वाटले.

कोणत्या रूपकामुळे असे वाटले?

पुस्तकातील मुख्य दोष म्हणजे सर्व प्राणी सारखे नाहीत. त्यांच्या गरजा आणि काम करण्याच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत.

कोरी पाटी (ब्लँक स्लेट) या विषयावर जेम्स वॉटसन, स्टीवन पिंकर, नोम्स चोम्स्की, इ. लोकांची मते मला पटतात. अगदी प्राण्यांइतके फरक नसले तरी मानवांच्या क्षमता आणि गरजा वेगवेगळ्या असू शकतात किंवा आल्डस हक्स्लेच्या ब्रेव न्यू वर्ल्ड प्रमाणे 'मारून मुटकून' बदलताही येतात.

पुस्तकातील अधिकचे मुद्दे म्हणजे चांगली भाषा, बोलुन दाखवण्यासारखे दाखले आणि वाक्ये.

+१००

रुपक

पुस्तकाच्या लिखाणावरून ते पुस्तक मार्क्सवादी राज्यसंस्थे ऐवजी ब्रिटीश राज विरुद्ध आंदोलन करणार्‍यांविरुद्ध लिहिले आहे असे वाटले.

कोणत्या रूपकामुळे असे वाटले?

पहिले कोणी शेतकरी फार्मची देखभाल करीत असतो. तो झार असून त्याविरुद्ध बंड केले असे न वाटले नाही. तो प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. मला तो ब्रिटीश आणि इतर वसाहतकर्ते आणि स्थानिक प्रजा असा वाटला. (ज्यावेळी हे पुस्तक वाचले त्याच वेळी वाटला.)

प्रमोद

आधुनिक इसापनिती

आधुनिक इसापनितीचा उत्तम नमुना म्हणजे "अँनिमल फार्म". मुळात "सेव्हन कमांडमेन्ट्स" ची घटना अखेरीस एकाच तत्वावर (अखेरच्या all animals are equal, but some animals are more equal than others” कशी येते व इथपर्यन्तचा विलक्षण प्रवास वाचणे ही ऑर्वेलच्या उपरोधिक लिखाणाचे वैशिष्ट्य जे त्यानंतरच्या "१९८४" मधील "बिग ब्रदर इज वॉचिंग यू" पर्यंत कायम राहिले. कॉलेज जीवनात ज्या कादंबर्‍यानी भुरळ घातलेली असते त्याची जादू काही काळानंतर (विशेषतः "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी" अशी कधीतरी आयुष्यात वेळ आली तर्....) विरते. एफ.स्कॉट फिट्झेराल्डच्या कादंबर्‍याबाबत असे होते. पण ऑरवेलच्या या दोन्ही कादंबर्‍या तसेच The Catcher in the Rye : J.D.Salinger, Slaughterhouse Five : Kurt Vonnegut आदी कलाकृती कालातीत आहेत, केव्हाही वाचाव्यात त्या वाचकाला अस्वस्थ करतातच, म्हणून श्री.लॉजिकल "पुस्तक संपले की ते अस्वस्थ करतेच पण आपल्याला कारणे कळून पण बर्‍याच वेळा आपण काही करू शकत नाही याची चुटपूट ही लावते." असे जे म्हणतात ते सर्वार्थानी योग्य भावना व्यक्त करणारे वाक्य आहे.

(एक गंमत म्हणून : अमेरिकेच्या एका मातब्बर प्रकाशकाकडे प्रकाशनासाठी "अँनिमल फार्म" चे बाड गेले, त्यावेळी त्या महाभागाने "सध्याचा काळ बालवाङ्मय खपण्याच्या दृष्टीने योग्य नाही" असा महान शेरा मारून कादंबरी नाकारली होती.)

अजूनही

ऍनिमल फार्म हे पुस्तक मला काही मॉल्समधील दुकानांत बालवाङ्मयात सापडलेले आहे. (मी आधीच इतरत्र विकत घेतलेल्या पुस्तकांच्या किंमतींची तुलना करून मी नव्या दुकानातील इतर पुस्तके घ्यावी की नाही याचा निर्णय घेतो.)
डिस्नी ने ऍनिमल फार्म नावाचा एक ऍनिमेशनपटसुद्धा बनविला होता.

अमर सत्य

all animals are equal, but some animals are more equal than others
या सत्याला इटर्नल ट्रूथ किवा अमर सत्य असे म्हणता येईल. ज्या ठिकाणी एकाच पातळीच्या अनेक व्यक्ती कार्यरत असतात अशा कोणत्याही संस्थेत किंवा ऑर्गनायझेशनमधे काही व्यक्ती या नेहमीच जास्त समान असतात. त्या व्यक्तींना सर्व बाबतीत जास्त प्रसिद्धी जास्त रिटर्नस मिळतात. ऑरवेलची महानता ही आहे की त्याने प्रथम हे सत्य शब्दांच्यात मांडले.
चन्द्रशेखर

परिचय आवडला

परिचय आवडला.

"सर्व प्राणी समान आहे, पण काही प्राणी अधिक समान आहेत"
"ईक्वल" शब्दाचा अर्थ बदलून "अधिकार असलेला" असा भलताच होतो, आणि त्यायोगे "समसमान" ही संकल्पनाच पुसली जाते. या वाक्याच्या पाळण्यात १९८४ मधील न्यूस्पीक चे पाय दिसतात. न्यूस्पीक या सैद्धांतिक संकल्पनेबद्दल मी ५०%च पटलेलो आहे. पण ललित संकल्पना म्हणून केवळ भ-न्ना-ट. *हे प्रतिभावंत वाक्य घिसूनपिटून निरर्थकरीत्या वापरले जाते. ही शोकांतिका बघून हळहळ वाटते.*

छान

छान परिचय. ऑरवेलची साधीसोपी इंग्रजी मला आवडते. त्याने इंग्रजी भाषेविषयी लिहिलेले काही निबंधही वाचनीय आहेत.

COEP-All Men are Equal but Some are more equal या वाक्यात COEP कसे काय आले?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद.

पुस्तक परिचयाबद्दल आभार. कुणी काही म्हटले तरी पुस्तक रंजक आहे. हळूहळू होत जाणारे बदल बघायला जाम मजा येते. पवनचक्की बांधायचा प्रकार तर लईच भारी आहे.

ही सर्व माझी मते कुणालाही मूर्खपणाची , विचारजंती वाटू शकतात पण त्याला इलाज नाही.

हा विचारजंती शब्द नवीनच ऐकला. याचा अर्थ काय?

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

विचारजंत

कोणत्याही विषयावर दोन्ही बाजूंच्या मतांचा विचार करुन माझ्या मतापेक्षा वेगळे मत मांडणे म्हणजे विचारजंतीपणा. आणि असे लेखन करणारा लेखक म्हणजे विचारजंत


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद...

:-०

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

चांगला परिचय

ही कादंबरी मी प्रत्यक्षात वाचलेली नाही पण तिच्याबद्दल बरेच वाचले आहे. त्यात हे आणखी एक पान.

धन्यवाद!

all animal are equal but some are more qual than others

ही कथा आवडून आणि पटूनही वरील तत्वज्ञान लोकांना उमजत नाही आणि या तत्त्वज्ञानातील मोअर इक्वल कोठेनाकोठे आपणही आहोत किंवा भविष्यात होऊ यावर विश्वास नसणे हीच मोठी गंमत आहे. असो.

छान भाष्य

सुंदर परिचय व भाष्य. पुस्तक वाचले आहे. अर्थातच आवडले.
वर श्री. रिकामटेकडा व श्री. प्रमोद सहस्त्रबुद्धे यांनी १९८४ चा उल्लेख केला आहे . त्यांना त्या पुस्तकाचा परिचय देण्याची विनंती.

सुचना: कृपया पुस्तक परिचय पुस्तकविश्व वरही द्यावेत. भविष्यात परिचयाचा एके ठिकाणी शोध घ्यायला सोपे जाईल

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर