ज्युलियाचे धर्मांतर आणि हिंदू...

ज्युलिया रॉबर्टस या इंग्रजी अभिनेत्रीने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची बातमी नुकतीच टीव्हीवर वाचली. आपल्या इट, प्रे, लव्ह या चित्रपटासाठी भारतात आल्यावर हिंदुत्त्वाची ओळख झाल्याचे ज्युलियाने सांगितले आहे.
तर एकंदरच मला या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे कुणाला देता आली तर द्यावीत. कदाचित या प्रश्नांची उत्तरे आधीच बर्‍याच जणांना माहित असतील तर निदान ती मलादेखील कळू द्यावीत. मला पडलेले काही प्रश्न असे...

१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत? काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का? किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या? सध्या काय आहेत?

२) भारतात असलेल्या उपक्रमींना "तुमचा हिंदू धर्म काय आहे हो? तुम्ही कशाची भक्ती करता?" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का? अशावेळी ते काय उत्तर देतात?

३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे? असे विचारले तर मी काय उत्तर देऊ? विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत? मला याबाबत काहीच कसे माहित नाही? का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली? :-)

४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा? भगवदगीता? मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का? ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे?

५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का?

६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय? अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या?

७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे? याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत?

८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे " वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का? सगळे सामावून घेणारा म्हणजे काय? हे चांगले की वाईट?

९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे? या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे?

१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही? मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत? आणि हे चांगले की वाईट?

सध्या तरी इतकेच प्रश्न सुचले आहेत. बाकीचे सुचतील तसे विचारीन.

बाकी, ज्युलियाच्या धर्मांतराबाबत तुमचे काय मत आहे? चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीचा हा एक प्रसिद्धीस्टंट आहे असे वाटते का? की पुढच्या भविष्यात भारत सगळ्या जगाचे आध्यात्मिक (?) नेतृत्व करेल असा आशावाद, असे विचार अनेक जणांनी बोलून लिहून ठेवले आहेत त्याची ही सुरुवात आहे? ( किंवा ऍंजेलिना जोलीच्या मुलं दत्तक घेण्याला सुरुवात केल्यानंतर अशा दत्तक घेण्याला जे ग्लॅमर आले तसे याबाबतीत होण्याची शक्यता आहे का? हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे प्रमाण यापुढे वाढेल? आणि त्यातून मग पूर्वेचे आध्यात्मिक ज्ञान आणि पश्चिमेची वैज्ञानिक प्रगती, भौतिक ज्ञान यांचा मेळ घालून हे जग अधिक सुंदर करण्याचा विचार कुणीतरी मांडला आहे ( बहुतेक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ) त्याची ही सुरुवात आहे?

-सौरभ.

Comments

असहमत

त्यानंतर तुमचे आणि माझे भरपूर लिहून झाले आणि आता नंतर आठवण झाल्यासारखे नवीन नियम सांगत आहात असे वाटत नाही का?
नाही.

असहमत. तुम्हाला एक वाटते आणि मला ते पटत नाही, कारण तुम्ही मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात.

तर निव्वळ माणुसकीचाच अंतर्भाव हिंदू असण्याच्या व्याख्येत करणे अप्रामाणिकपणा आहे

मी कधी केला ते दाखवून् द्या मग पुढे बोला. नाहीतर उगाच वायफळ आरोप आहे असे समजावे लागेल. जे शब्द पण मी वापरले नाहीत ते माझ्या प्रतिसादातील कुठल्यातरी अर्ध्याच भागावर आधारीत अर्थ काढून त्यावर आरोपाचे इमले बांधत आहात.

प्रतिसाद

असहमत. तुम्हाला एक वाटते आणि मला ते पटत नाही, कारण तुम्ही मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत आहात.

तुम्हाला दिलेला प्रतिसाद आणि त्यांना दिलेला प्रतिसाद यांचा आशय सारखाच आहे.
वाचक्नवी यांना दिलेला प्रतिसादः
"क व्यक्ती हिंदू नाही" असे जाहीर करण्यासाठी 'क'ने इतर धर्म स्वीकारणे आवश्यक आहे हे प्रतिपादन अन्यायकारक वाटते कारण हा इहवाद्यांवर अन्याय आहे.
तुम्हाला दिलेला प्रतिसादः
इतर धर्म न स्वीकारलेला मानव असणे यालाच हिंदू असण्याची व्याख्या ठरविणे तद्दन हिंदूसापेक्ष आहे.

तर निव्वळ माणुसकीचाच अंतर्भाव हिंदू असण्याच्या व्याख्येत करणे अप्रामाणिकपणा आहे

मी कधी केला ते दाखवून् द्या मग पुढे बोला. नाहीतर उगाच वायफळ आरोप आहे असे समजावे लागेल. जे शब्द पण मी वापरले नाहीत ते माझ्या प्रतिसादातील कुठल्यातरी अर्ध्याच भागावर आधारीत अर्थ काढून त्यावर आरोपाचे इमले बांधत आहात.

तुकारामाचा जो अभंग तुम्ही उल्लेखिला आहे त्यात पहिल्या दोन ओळी केवळ माणुसकी (उपकार/सत्य चांगले, पीडा/असत्य वाईट) दाखविण्याविषयी आहेत. सत्कर्म हेच नामस्मरण आहे आणि संतसंगत (चांगल्या लोकांचा सहवास) असावी, याव्यतिरिक्त काही संदेश त्यात आहे काय?

संपूर्ण

"आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट" वाचून त्याला तटस्थ निरीक्षण म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. माझ्या प्रतिसादात तुकारामाच्या अभंगाच्या खाली शेवटी या ओळी आहेतः (अधोरेखीत भागाला अर्थातच महत्व आहे जे तुम्ही वाचले नाहीत अथवा तुमच्या तटस्थ निरीक्षणाचा भाग समजला नाहीत).

मात्र जर कोणी केवळ हे येशूच्या नावानेच अथवा अल्लाच्याच नावाने करणे म्हणजेच बरोबर आणि इतर सर्व चूक असे समजत असेल तर कदाचीत त्यांचे उपकार आणि परपीडा न करणे हे चांगले असू शकेल, पण ते त्यांच्या धर्माच्या चौकटीत. हिंदू तत्वज्ञानाला आणि म्हणूनच त्यानावाने ओळखल्या जाणार्‍या हिंदू व्यक्तीस ही चौकट असत नाही. म्हणूनच त्याच्या उलट, "अशी चौकट ज्या व्यक्तीस नसते ती हिंदू", असे समजणे मी "तत्वज्ञाच्या दृष्टीने तत्वतः म्हणता येईल", असे म्हणतो. आणि अर्थातच तुम्ही तसे म्हणायलाच हवे असे देखील म्हणत नाही, कारण मी तशी चौकट पाळत नाही.

थोडक्यात तुम्ही माझ्या प्रतिसादातील तुमच्या भाषेत ज्या माणूसकीचा उल्लेख करत आहात, ती सर्वांचीच चांगली असते. पण काहींची (रिलीजन या अर्थी) धर्माच्या चौकटीत असते आणि तशी चौकट हिंदू तत्वज्ञानात नाही. हेच मी परत परत सांगत आलो आहे. पण झोपलेल्याला जागे करता येते हेच खरे...

प्रतिसाद

'चौकटविहीन माणुसकी' हीच तुमची हिंदू तत्त्वज्ञानाची संपूर्ण व्याख्या आहे काय?

शब्द

'चौकटविहीन माणुसकी' हीच तुमची हिंदू तत्त्वज्ञानाची संपूर्ण व्याख्या आहे काय?

आधी धर्म, मग देव, आता काय माणूसकी, हे सगळे तुमचे शब्द आहेत, माझे नाहीत. पण तुम्हाला तुमच्याच शब्दाशी घोटाळत तुम्हाला चर्चा चालू ठेवायची आहे.

माझे?

आपण दशावतारातला नववा अवतार हा बुद्धाचा मानतो. त्या उलट दाक्षिणात्य (तमिळ नक्की इतरांचे माहीत नाही) हे बुद्धाला केवळ संत मानतात, अवतार नाही. तरी देखील असे हे मानतात तसे ते मानत नाही असे म्हणू शकतो. तेच अगदी देवांच्या बाबतीतही. गणपतीस आपल्याकडे दोन बायका आणि कार्तिकेय हा ब्रम्हचारी. दक्षिणेत याच्या उलट. तरी देखील समोर यातील कुठलाही देव आला तरी भाविक/श्रद्धावान नमस्कार करून पुढे जाऊ शकतो.

तुमच्या पोतडीत मेटॅफिजिकल बिलीफ सिस्टीम आणि कर्मकांडे आहेत.

ही व्याख्या मी देखील ऐकली होती. हिंदू धर्म/तत्वज्ञानचे व्यापक रूप पहाता काही अंशी पटते देखील.

धर्म शब्द तुमचाच आहे.

मी (म्हणजे कोणिही व्यक्ती) हिंदू आहे याचा अर्थ "देव" मानतेच असा कसा काय घेता? नास्तिकता पण हिंदूंमध्ये असू शकते आणि तेथेच तर ऑल्सो येते.

देव हा शब्द तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करीत आहात हे तर मला मान्यच आहे आणि माझी सर्व धडपड त्याच्याविरोधातच आहे. त्यामुळे तुमच्या विचारसरणीत देव असल्याचे मला सिद्ध करायचे आहेच. त्यासाठीच मी तुमच्यावर नास्तिक या शब्दाच्या गैरवापराचा आरोप केला.

रंजल्या-गांजल्यांची सेवा करणे (उपकार) आणि भ्रष्टाचार न करणे (परपीडा) वगैरे

ही माणुसकी नाही?

तुम्ही हिंदू तत्त्वज्ञानाची व्याख्या देणे टाळत असल्यामुळे मला वेगवेगळे प्रश्न विचारावे लागत आहेत. त्याशिवाय मला काउंटर उदाहरण देऊन "जन्मतःच व्यक्ती हिंदू तत्त्वज्ञानी असते" हे विधान खोटे ठरविता येणार नाही.

घ्या, सुधारित व्याख्या.

जेव्हा एखादी व्यक्ती कुठल्याच उपासनापंथाची(रिलिजनची) नसते तेव्हा तिचा धर्म हिंदू असतो.----वाचक्नवी

पहिला चौरस

विश्वास कल्याणकर यांचे तीन लेख वाचूनही विचारतो की धर्म म्हणजे काय? आणि तो उपासनापंथापेक्षा वेगळा कसा?

 
^ वर