समलिंगी विवाह

स्टार ट्रेक या मालिकेचे एक वैशिष्ट्य असे की त्यांच्या अनेक भागांमध्ये तत्कालीन सामाजिक 'समस्यांवर' संदेश असतो. 'आउटकास्ट' या भागामध्ये समलैंगिक संबंध ठेवावेसे वाटणार्‍यांना सोसाव्या लागणार्‍या अन्यायावर भाष्य आहे. तसेच, लैंगिक असमानता आणि तरीही (त्या काळात) प्रचलित लैंगिक समता यांचीही चर्चा आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर, 'समलिंगींचा विवाह' या संकल्पनेविषयी मी विचार केला.
ऐच्छिक समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारा कायदा २००९ साली चूक ठरला. त्यानंतर भारतात समलिंगी विवाहांच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याआधीही समलिंगी विवाह होतच होते.
कोणताही करार हा शोषण टाळण्यासाठी असतो. एका भागिदाराने गुंतवणूक केल्यानंतर दुसर्‍याला फसवणूक शक्य होऊ नये अशी कलमे करारात लिहिली जातात. भिन्नलिंगींच्या एकत्र येण्यात अशी फसवणूक सहज शक्य होण्याचे कारण जैविक आहे. पारंपारिक लिंगसत्ताक समाजाच्या (जो बहुदा जैविक कारणांनीच बनला) मानसिकतेमुळेही विरुद्धलिंगींचे शोषण शक्य होऊ शकते. या कारणांमुळे विवाह हा विधी बनला असावा.
परंतु समलिंगी संबंधामध्ये अशी असमानता दिसत नाही. जरी अशा जोडप्यांपैकी एकजण मानसिकरीत्या पुरुष आणि दुसरी व्यक्ती स्त्री असणे शक्य असले तरी त्यांचे जैविक कारणाने शोषण शक्य असेल असे मला वाटत नाही. त्यांना समाजात मिळणारी वागणूक, संस्कार समानच असल्यामुळे त्यांच्यापैकी एका व्यक्तीची मनोवृत्ती दुसर्‍या व्यक्तिपेक्षा खूप अधिक पडखाऊ, सोशिक बनेल असेही मला वाटत नाही. त्यांच्या एकत्रित येण्या/न येण्याने समाजाला काही फरकही पडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या एकत्र येण्याला समाजाने 'विवाह' असे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता मला समजत नाही.
अशा दोन किंवा व्यक्तींना एकत्र येऊन आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा झाल्यास, वेगळे व्हावे लागल्यानंतर आवश्यक होणार्‍या आर्थिक व्यवहारांच्या अटी इ. ची सोय त्यांना वैयक्तिक करारांनी लावता येईलच ना?
प्रश्न: समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

Comments

२००९ - नवीन माहिती कळली, धन्यवाद

आजवर मला वाटत होते की २००९ मधील दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय फक्त दिल्ली न्यायालयाच्या प्रदेशातच लागू होता. दिलेल्या दुव्यावरून समजते की निर्णय भारतभर लागू आहे.

नवी माहिती कळली, धन्यवाद.
- - -

अशा दोन किंवा व्यक्तींना एकत्र येऊन आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा झाल्यास, वेगळे व्हावे लागल्यानंतर आवश्यक होणार्‍या आर्थिक व्यवहारांच्या अटी इ. ची सोय त्यांना वैयक्तिक करारांनी लावता येईलच ना?

होय.

प्रश्न: समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

होय.

(असे भासते की चर्चाप्रस्तावकाच्या मते वरील दोन प्रश्नांची उत्तरे एकच येऊ शकत नसावीत. परंतु तशी तार्किक आवश्यकता नसावी, असे मला वाटते. थोडक्यात विचार करता मला दोन्ही प्रश्नांची उत्तरे "होय" अशीच सुचत आहेत.)

त्यांचे जैविक कारणाने शोषण शक्य असेल असे मला वाटत नाही. त्यांना समाजात मिळणारी वागणूक, संस्कार समानच असल्यामुळे त्यांच्यापैकी एका व्यक्तीची मनोवृत्ती दुसर्‍या व्यक्तिपेक्षा खूप अधिक पडखाऊ, सोशिक बनेल असेही मला वाटत नाही.

ही बाब निरीक्षणाने खरी-खोटी ठरवता येऊ शकेल.

त्यांच्या एकत्रित येण्या/न येण्याने समाजाला काही फरकही पडत नाही.

यातील दुव्यावरून समाजाला कशा-कशाने फरक पडतो, ते कळले नाही.

खुलासा

आजवर मला वाटत होते की २००९ मधील दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय फक्त दिल्ली न्यायालयाच्या प्रदेशातच लागू होता. दिलेल्या दुव्यावरून समजते की निर्णय भारतभर लागू आहे.

माझ्या माहितीनुसार, उच्च न्यायालयांचे केस लॉ भारतभर लागू होतात.

प्रश्न: समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

असे भासते की चर्चाप्रस्तावकाच्या मते वरील दोन प्रश्नांची उत्तरे एकच येऊ शकत नसावीत. परंतु तशी तार्किक आवश्यकता नसावी, असे मला वाटते.

'किंवा' हा शब्द xor या अर्थाने नसून or या अर्थाने आहे.
दोन्ही भागिदारांना फायदा शक्य असेल तेव्हाच भागिदारी होते. भागिदारीत प्रतारणा टाळण्यासाठी करार होतो. समाज हा कोणत्याही कराराचा रखवालदार असतो. त्यामुळे, एखाद्या करारामुळे समाजाचासुद्धा काही लाभ होत असेल तरच समाज त्या भागिदारीला मान्यता देईल. अन्य करारांसाठी (उदा. मालमत्तेची देवाणघेवाण) समाज घसघशीत शुल्क(=लाभ) आकारतो.

यातील दुव्यावरून समाजाला कशा-कशाने फरक पडतो, ते कळले नाही.

'पुनरुत्पादन' हे उत्तर तेथे सुचविलेले आहे.

नेहमीच नाही

>>माझ्या माहितीनुसार, उच्च न्यायालयांचे केस लॉ भारतभर लागू होतात.

तसे नसते. त्या निकालांचा रेफरन्स दुसर्‍या न्यायालयात देता येतो. पण दुसरे उच्च न्यायालय ते मान्य करीलच असे नाही.
सहसा तसे होत नाही- दोन् उच्च न्यायालये परस्परविरोधी भूमिका घेत नाहीत. म्हणून बाय डिफॉल्ट एका उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वत्र लागू होतो असे मानू शकतो. पण हाच खटला मुंबई उच्च न्यायालयात आला तर मुंबई उच्च न्यायालय ते कलम वैध आहे असा निर्णय देऊ शकते. अशा वेळी दिल्ली न्यायालयाचा निर्णय त्याचा कार्यक्षेत्रापुरता मर्यादित होतो.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

तर्क अंधुक रेखाटलेला आहे

मला वाचताना असे जाणवते, की तर्क अंधुक रेखाटलेला आहे. साखळीतील काही दुवे मला जोडलेले वाटत नाहीत.

कोणताही करार हा शोषण टाळण्यासाठी असतो. एका भागिदाराने गुंतवणूक केल्यानंतर दुसर्‍याला फसवणूक शक्य होऊ नये अशी कलमे करारात लिहिली जातात.

गृहीतक म्हणून ठीक वाटते.

भिन्नलिंगींच्या एकत्र येण्यात अशी फसवणूक सहज शक्य होण्याचे कारण जैविक आहे.

जोवर येथे "फक्त भिन्नलिंगींच्या" असे म्हटलेले नाही, तोवर वाक्य गृहीतक/ कदाचित पटण्यासारखे आहे. पुढच्या तर्कामुळे असे दिसते की या वाक्यात "फक्त" शब्द नजरचुकीने लिहायचा राहिलेला आहे. जर असा शब्द या वाक्यात घातला तर हे गृहीतक म्हणून स्वीकारता येत नाही. या गृहीतकातच एक अपेक्षित निष्कर्ष दडलेला आहे.

पारंपारिक लिंगसत्ताक समाजाच्या (जो बहुदा जैविक कारणांनीच बनला) मानसिकतेमुळेही विरुद्धलिंगींचे शोषण शक्य होऊ शकते.

वरच्या वाक्यात "फक्त" शब्द नसल्यास ठीक. "फक्त" शब्द असल्यास "नॉन-सेक्वितुर" असू शकतो.

या कारणांमुळे विवाह हा विधी बनला असावा.

"बनला असावा" या शंका-विधानानंतर नंतर निगमनात्मक [डिडक्क्टिव्ह] युक्तिवाद शक्य नाही. (ते ठीकच आहे. परंतु युक्तिवादाचा ढाचा निगमनात्मक दिसतो.)

परंतु समलिंगी संबंधामध्ये अशी असमानता दिसत नाही.

आता "सम" आणि "भिन्न" शब्दांमध्येच असे दिसते, की कुठल्यातरी प्रकारची असमानता दिसत नाही. बहुधा "भिन्न" म्हणजे "योनी आणि शिश्न यांची भिन्नता"; आणि "सम" म्हणजे "लिंग-अवयवांची सम-ता". मात्र या समान/भिन्नतेचा शोषणातील असमानतेशी काय संबंध आहे? वेगळी कुठली समान-असमानता असल्यास ते स्पष्ट केले पाहिजे.

जरी अशा जोडप्यांपैकी एकजण मानसिकरीत्या पुरुष आणि दुसरी व्यक्ती स्त्री असणे शक्य असले तरी त्यांचे जैविक कारणाने शोषण शक्य असेल असे मला वाटत नाही.

येथे "मला वाटत नाही"= "माझ्या निरीक्षणात नाही" असे आहे काय? मग तसे म्हटल्यास युक्तिवाद अधिक स्पष्ट होईल. (चर्चाप्रस्तावामध्ये "जैविक" म्हणजे काय ते मला नीट समजलेले नाही. त्यामुळे माझ्या अनुभवामधून युक्तिवादाला अर्थ लावून घेता येत नाही.)

त्यांना समाजात मिळणारी वागणूक, संस्कार समानच असल्यामुळे त्यांच्यापैकी एका व्यक्तीची मनोवृत्ती दुसर्‍या व्यक्तिपेक्षा खूप अधिक पडखाऊ, सोशिक बनेल असेही मला वाटत नाही.

या वाक्याचा ढाचा निगमनात्मक (डिडक्टिव्ह) निष्कर्षासारखा आहे. मात्र तथ्य तर निरीक्षणाने सिद्ध-असिद्ध करण्यासारखे आहे. (हे वरच्या प्रतिसादात सांगितलेच आहे.)

सारांश : चर्चाप्रस्तावकाने तर्क अधिक स्पष्टपणे मांडावा, अशी विनंती.

खुलासा

जोवर येथे "फक्त भिन्नलिंगींच्या" असे म्हटलेले नाही, तोवर वाक्य गृहीतक/ कदाचित पटण्यासारखे आहे. पुढच्या तर्कामुळे असे दिसते की या वाक्यात "फक्त" शब्द नजरचुकीने लिहायचा राहिलेला आहे. जर असा शब्द या वाक्यात घातला तर हे गृहीतक म्हणून स्वीकारता येत नाही. या गृहीतकातच एक अपेक्षित निष्कर्ष दडलेला आहे.

वरच्या वाक्यात "फक्त" शब्द नसल्यास ठीक. "फक्त" शब्द असल्यास "नॉन-सेक्वितुर" असू शकतो.

आता "सम" आणि "भिन्न" शब्दांमध्येच असे दिसते, की कुठल्यातरी प्रकारची असमानता दिसत नाही. बहुधा "भिन्न" म्हणजे "योनी आणि शिश्न यांची भिन्नता"; आणि "सम" म्हणजे "लिंग-अवयवांची सम-ता". मात्र या समान/भिन्नतेचा शोषणातील असमानतेशी काय संबंध आहे? वेगळी कुठली समान-असमानता असल्यास ते स्पष्ट केले पाहिजे.

चर्चाप्रस्तावामध्ये "जैविक" म्हणजे काय ते मला नीट समजलेले नाही. त्यामुळे माझ्या अनुभवामधून युक्तिवादाला अर्थ लावून घेता येत नाही.

लैंगिक असमानतेमुळे भागिदारांची गुंतवणूक वेगवेगळी असते. शुक्राणूपेक्षा बीजांडाचा आकार प्रचंड असतो. गुंतवणुकीतील असमानता येथेच सुरू होते. गर्भारपणामुळेही असमानता वाढते. पुनरुत्पादनाव्यतिरिक्तसुद्धा, फसवणूक, मेहेनत, इ. च्या प्रेरणा, कुवती संप्रेरकांमुळे भिन्न असतात. 'मुलीची जात' इ. मार्गांनी स्त्रियांवर शोषणक्षमता बिंबविली जाण्याचीही शक्यता आहे.
न्याय्य भागिदारीसाठी आवश्यक अटींची यादी करणे बहुसंख्यांना (स्त्रिया तसेच पुरुष) शक्य नसते. शिवाय शोषण होण्याची शक्यता मोठी असते. दुर्बल, बहुसंख्य व्यक्तींच्या संरक्षणासाठी आवश्यक अटींची डीफॉल्ट यादी म्हणजे विवाह होय. सुजाण भागीदार कस्टमाइज्ड करार करण्यास मोकळे आहेतच.

"बनला असावा" या शंका-विधानानंतर नंतर निगमनात्मक [डिडक्क्टिव्ह] युक्तिवाद शक्य नाही.

तो अभ्युपगम सिद्ध झाल्याचे येथे तात्पुरते गृहीत धरता येईल.

येथे "मला वाटत नाही"= "माझ्या निरीक्षणात नाही" असे आहे काय?

होय.

समानता

'शक्य होऊ शकते', 'बहुधा', 'बनला असावा' अशा विधानं संदिग्ध करणाऱ्या शब्दरचना रिकामटेकडा यांच्या लेखणीला शोभत नाहीत. या असंग्दिधततेमुळे वर धनंजय यांनी लिहिले तसे गोंधळ तर होतातच, पण मुख्य म्हणजे हा लेख त्यांनीच लिहिला आहे याबद्दलच संदिग्धता निर्माण होते.

'कोणताही करार हा शोषण टाळण्यासाठी असतो' हे कसं खणखणीत वाक्य आहे. पण करारांची शोषण टाळण्याची उपयुक्तता हीच केवळ आहे असं त्यातून सूचित केलं जातं. ...शोषण टाळण्यासाठी आहे...त्यामुळे जर समलिंगी विवाहांत शोषण नसेल तर विवाहकराराची उपयुक्तता नाही असा निष्कर्ष येतो. यात पुन्हा विवाह हा करार आहे केवळ, दुसरं काही नाही. हे दोन च काढून टाकले की मग उपयुक्ततेची दारं उघडी होतात.

विवाह हा केवळ करार नसून समाजातला राईट ऑफ पॅसेज देखील आहे. अमेरिकेत काळ्या मुलांना गोऱ्यांच्या शाळांमध्ये घालण्यात याच प्रकारचा युक्तिवाद होता. सेपरेट बट इक्वल ही समानतेचा कायदा असूनही वाळीत टाकण्याची, हीन लेखण्याची, जागा दाखवून देण्याची बहुजनसमाजाची पद्धत आहे. आता तुम्ही जर 'खरी समानता' ही तुमच्या उपयुक्ततेच्या व्याख्येत बसत नाही असं म्हणत असाल तर गोष्ट वेगळी.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अंशतः सहमत

हा लेख त्यांनीच लिहिला आहे याबद्दलच संदिग्धता निर्माण होते.

=))

विवाह हा केवळ करार नसून समाजातला राईट ऑफ पॅसेज देखील आहे.

म्हणूनच म्हणतो की "त्यांच्या एकत्रित येण्या/न येण्याने समाजाला काही फरकही पडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या एकत्र येण्याला समाजाने 'विवाह' असे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता मला समजत नाही." समाजाने न स्वीकारल्यास कोणताही करार हा केवळ कागद असतो. या स्वीकृतीलाच तुम्ही rite of passage म्हणत आहात असे वाटते. समाजाकडून what is in it for me? असा प्रश्न अपेक्षित आहे.

समानता

समाजाकडून what is in it for me? असा प्रश्न अपेक्षित आहे.

समाजाला समानता आवश्यक वाटते, व ती फायद्याचीही ठरते. एका विशिष्ट गटात आपल्याला असमान वागणुक मिळते आहे अशी भावना नष्ट झाल्याने समाज अधिक सुधृढ होतो.

पुन्हा, सेपरेट बट इक्वल च्या विरोधातली चळवळ पहावी. अमेरिकन समाजाला ती व्यवस्था मोडून पाडण्याची गरज वाटली.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

शंका

पण माझा मूळ प्रश्न हाच आहे की समलिंगी विवाह (केवळ संबंध नव्हे) आणि भिन्नलिंगी विवाह (केवळ संबंध नव्हे) हे दोन्हीही समाजासाठी किंवा त्यात सहभागी व्यक्तींसाठी सारखेच आहेत काय? जर समान नसतीलच तर त्यांना असमान वागणूक मिळाल्यास काय गैर आहे?

माझ्या मते

पण माझा मूळ प्रश्न हाच आहे की समलिंगी विवाह (केवळ संबंध नव्हे) आणि भिन्नलिंगी विवाह (केवळ संबंध नव्हे) हे दोन्हीही समाजासाठी किंवा त्यात सहभागी व्यक्तींसाठी सारखेच आहेत काय?

माझ्या मते समाजासाठी सध्यातरी समान नाहित.. मात्र याचा अर्थ यात काहि गैर नाहि असा कसा होईल? कित्येक चांगल्या गोष्टी कायद्याने आधी आल्या व नंतर समाजाने स्वीकारल्या जसे सतीबंदी वगैरे. त्याच धर्तीवर समलिंगी विवाहाचा कायदा आल्यावर समाजासाठी ते हळुहळु सर्वसंमत व कालांतराने सारखे होईल असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

तसे नव्हे

समाज म्हणजे मला एसएमएस मतदान अपेक्षित नव्हते. कृपया, विवेकी विचार करून समाजाचा सर्वाधिक फायदा बघणारे धुरिण असा अर्थ घ्यावा.

होय

प्रश्न: समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

होय. जर भिन्नलिंगींच्या विवाहांना कायदेशीर मान्यता असेल तर त्याच कारणांनी समलिंगींच्या विवाहाला मान्यता असणे उपयोगाचे आणि गरजेचे आहे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

समजले नाही

होय. जर भिन्नलिंगींच्या विवाहांना कायदेशीर मान्यता असेल तर त्याच कारणांनी समलिंगींच्या विवाहाला मान्यता असणे उपयोगाचे आणि गरजेचे आहे असे वाटते.

जर लैंगिक असमानता नसेल तर 'तीच' कारणे कशी असतील?

सुरक्षा हे मुख्य कारण

मुले होणे हेच जर फक्त लग्नाचे कारण असते तर सगळ्या निपुत्रिक (भिन्नलिंगी) जोडप्यांनी लग्ने मोडली असती. अर्थात तुम्हाला तसे म्हणायचे नाहि आहे. लैंगिक फरक हा नैसर्गिक आहे. विवाहामागे त्या नात्याची व त्यापेक्षा स्त्री व्यक्तीच्या "सुरक्षेची" हमी घेतली जाणे हे एक मुख्य कारण वाटते.

एक ही (अपत्यपूर्ती) नैसर्गिक मर्यादा सोडली (म्हणजे तुर्तास सोडु) तर दोन स्त्रिया (अथवा दोन पुरुष) यांच्यासंबंधात "वेगळे" असे काहिहि नाहि. ते ही प्रेम करतात, शारिरिक संबंध ठेवतात, एकमेकांची वाट बघतात, (बर्‍याचदा) आपापली घरे सोडून वेगळे राहतात, घर वसवतात-एकमेकांची आजारपणे बघतात, एकमेकांशी भांडतात. अर्थात याच बरोबर, भिन्नलिंगी जोडप्यांप्रमाणे 'विवाहबह्य संबंध' (इथे जोडीदारबाह्य म्हणा), फसवणूक, अत्याचार, जबरदस्ती वगैरे गोष्टी यातील काहि जोडप्यांमधे होतात. अश्यावेळी त्यांच्या संबंधांना "विवाह" म्हटल्यास अश्यावेळी अन्याय झालेल्या स्त्री/पुरूषास कायद्याने न्याय मागता येईल.

याशिवाय विवाहाबरोबरच त्यांना मुल दत्तक घेण्याची मान्यता द्यावी असे मला वाटते. म्हणजे जी नैसर्गिक मर्यादा आहे त्यावर ज्यांची इच्छा असेल ते काही अंशी पालकत्त्वाच्या नैसर्गिक इच्छेला न्याय देऊ शकतील.

बरेच अवांतर: एका आईच्या व वडीलांच्या पोटी जन्माला आलेले दोन 'पुरुष' हे भाऊ व स्त्री-पुरूष हे भाऊ-बहिणी असतात. मुलात व मुलीत नैसर्गिक फरक आहे. मुलगा वडिलांचा वंश वाढवतो. संपत्ती घरातच ठेवतो. तरीही वडिलांच्या मालमत्तेवर 'आता' दोघांचाही हक्क आहेच ना? तेव्हा मर्यादा असूनही (मुलगी वडिलांचा वंश वाढवत नाहि) वडिलांना मालमत्ता मुलीस देणे बंधनकारक झालेच ना?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वडिलांची मालमत्ता

तरीही वडिलांच्या मालमत्तेवर 'आता' दोघांचाही हक्क आहेच ना?

वडिलांच्या मालमत्तेवर पूर्वीही मुलीचा हक्क होताच. हुंडा या स्वरुपात तिचे वडील तिची मालमत्ता लग्नाच्या प्रसंगी तिच्या स्वाधीन करत असत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ठिक

हुंडा अर्थातच मुलीला दिला तरी तो तिच्या सासरच्यांना मिळत असे.. मुलीला फायदा किती हा वादाच मुद्दा असला तरी वरील कंटेस्टमधे ठिक.. आणि तरीही मुलीच्या वडिलांना काहि फायदा नसताना तो हक्क आहे/होता हे महत्त्वाचे.

बाकी चर्चा इच्छा असल्यास मुळ विषयाशी फारच अवांतर असल्यने ख.व.त करुयात का?

तुमचे मुळ प्रतिक्रीयेवर (काळ्या ठश्यातला) मत मात्र इथे जाणून घ्यायला उत्सूक आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अन्यायाची व्याख्या समजली नाही.

एक ही (अपत्यपूर्ती) नैसर्गिक मर्यादा सोडली (म्हणजे तुर्तास सोडु) तर दोन स्त्रिया (अथवा दोन पुरुष) यांच्यासंबंधात "वेगळे" असे काहिहि नाहि. ते ही प्रेम करतात, शारिरिक संबंध ठेवतात, एकमेकांची वाट बघतात, (बर्‍याचदा) आपापली घरे सोडून वेगळे राहतात, घर वसवतात-एकमेकांची आजारपणे बघतात, एकमेकांशी भांडतात. अर्थात याच बरोबर, भिन्नलिंगी जोडप्यांप्रमाणे 'विवाहबह्य संबंध' (इथे जोडीदारबाह्य म्हणा), फसवणूक, अत्याचार, जबरदस्ती वगैरे गोष्टी यातील काहि जोडप्यांमधे होतात. अश्यावेळी त्यांच्या संबंधांना "विवाह" म्हटल्यास अश्यावेळी अन्याय झालेल्या स्त्री/पुरूषास कायद्याने न्याय मागता येईल.

येथे नक्की कोणत्या स्वरुपाचा अन्याय अभिप्रेत आहे हे समजले नाही. रिकामटेकडा यांनी म्हटल्याप्रमाणे स्त्री-पुरुष विवाहात स्त्रियांची शारीरिक व मानसिक जडणघडण वेगळी असल्याने पुरुषांकडून स्त्रियांवर अन्याय होऊ शकतो असे गृहीतक मांडले जाते.

मात्र स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष अशा विवाहांमध्ये केस-बाय-केस विश्लेषण करुन दुर्बल घटकाची विवाहपूर्व निश्चिती करुन त्या व्यक्तीच्या संरक्षणासासाठी कायदा बनवणे अवघड होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अन्यायाचे स्वरूप

अन्याय करताना ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळावा इतकेच. कोणा एकाला दुर्बल घटक म्हणता येणार नसले तरी भिन्नलिंगी विवाहांत जसे नियम स्त्री व पुरुषांस वेगळे असतात तसे इथे नसून दोघांनाही सारखे नियम लागु होतील.
काहि उदा. बघु:
१. अन्याय न होणारे तरीही लग्नाने "आपोआप" हक्क मिळणे. उदा. जर 'लग्न' झाले असेल तर नव्या मालमत्तेवर दुसर्‍या पार्टनरचा "आपोआप" हक्क तयार होईल. एकाच्या मृत्यूनंतर दुसरा पार्टनर "आपोआप" वारसदार होईल. एकाचे राष्ट्रीयत्त्व दुसर्‍यास विनासायास मिळेल वगैरे वगैरे.
२. विविध अन्याय: जसे नातेबाह्य शारिरिक संबंध. दोघांपैकी एकानेही ठेवल्यास त्यास लग्न झाल्यावरच घटस्पोट व योग्य परतव्याची व सुरक्षेची हमी मिळेल. लग्नच न झाल्यास (म्हणजे समलिंगी विवाह ही कंसेप्टच नसल्यास) असे नातेबाह्य संबंध ठेवणार्‍याला किंवा आधिच्या पार्टनरला सोडून दुसर्‍याबरोबर घरोबा करणार्‍याला अथवा एकावेळी अनेकांशी संबंध ठेवणार्‍याला आडकाठी कशी करता येईल? अश्यावेळी जो प्रामाणिक आहे त्याच्यावर "अन्याय" झाला आहे त्यावर उपाय काय?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लग्न हा ब्रँड

लग्न या नावाला समाजात एक मान्यता आहे. दोन व्यक्तिंचे लैंगिक संबंध समाजाला माहित आहेत. त्याविषयी त्यांची मान्यता आहे. तोडण्याची वा ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. हे या मान्यतेत अंतर्भूत असते.

ही मान्यता मिळवण्याची (समाजाची) गरज समलिंगींना भासू शकते. म्हणून ते या करारास लग्न म्हणू इच्छितात. याशिवाय एक कुटुंब म्हणून मान्यता मिळवणे. आईवडील व मुलांची (दत्तक) काळजी घेणारे. एक जोडीदार गेला तर त्याच्या इस्टेटीचा हक्क दुसर्‍यास मिळणे. घरकाम व बाहेरकाम अशी कामे वाटून घेणे हे पण असू शकतील.

कुठलाही करार हा दोन्ही बाजूस हितकर असावा लागतो. असे नसले तर त्याची किंमत ज्या कागदावर लिहिले आहे तेवढी असते असे एक वचन आहे. शोषित-शोषक अशी जोडी असायचे कारण नाही.

जेव्हा विवाहबाह्य संबंध हे जगजाहीर करायचे असतात. तेंव्हा आमचे लग्न झाले असे म्हणतात. त्या लग्नास कायद्याची कुठलीच मान्यता नसते. पण समाजाची मान्यता मिळवण्याचा तो एक प्रकार असतो. (उदाहरणे द्यायची गरज नसावी.) एरवी समाजाची मान्यता सोडल्यास सर्व गोष्टी करारात मांडता येतात.

प्रमोद

परदेशी व्याख्या(?)

दोन व्यक्तिंचे लैंगिक संबंध समाजाला माहित आहेत. त्याविषयी त्यांची मान्यता आहे. तोडण्याची वा ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. हे या मान्यतेत अंतर्भूत असते.

ही थोडी परदेशी व्याख्या (का परकीय व्याख्या ;-)) झाली असे वाटते. ती आपण अंगिकारलेली असली तरीही दुसर्‍यकेका (देशी) व्याख्येत - दोन व्यक्तिंना लैंगिक संबंध स्थापन करायचे आहेत. त्यासाठी झाल्यास समाजाची मान्यता हवी आहे आणि ही मान्यता वय, जात, उंची, आवडनिवड, पैसा, पत वगैरे वगैरे विचारात घेऊन ठरते तेव्हा मान्यता मिळते.

ही मान्यता मिळवण्याची (समाजाची) गरज समलिंगींना भासू शकते. म्हणून ते या करारास लग्न म्हणू इच्छितात. याशिवाय एक कुटुंब म्हणून मान्यता मिळवणे. आईवडील व मुलांची (दत्तक) काळजी घेणारे. एक जोडीदार गेला तर त्याच्या इस्टेटीचा हक्क दुसर्‍यास मिळणे. घरकाम व बाहेरकाम अशी कामे वाटून घेणे हे पण असू शकतील.

कुठलाही करार हा दोन्ही बाजूस हितकर असावा लागतो. असे नसले तर त्याची किंमत ज्या कागदावर लिहिले आहे तेवढी असते असे एक वचन आहे. शोषित-शोषक अशी जोडी असायचे कारण नाही.

सहमत!

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

लग्न करणार्‍या व्यक्तिंना किंवा त्यांच्या संबंधितांना उपयोगी असू शकेल. (सद्य परिस्थितीत उपयोगी आहे असे म्हणता येणार नाही कारण समलिंगी संबंधांना काही समाज/ गटांकडून होणारा पराकोटीचा विरोध. मध्यंतरी एका प्रोफेसरांचे संबंध उघड झाल्याने त्यांना मारण्यात आले होते परंतु कायदा रुजल्यावर मदत नक्कीच होईल.) समाजाला नेमका उपयोग कोणता ते ठरवता आले नाही.

थोडा फरक

लग्न या नावाला समाजात एक मान्यता आहे. दोन व्यक्तिंचे लैंगिक संबंध समाजाला माहित आहेत. त्याविषयी त्यांची मान्यता आहे. तोडण्याची वा ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. हे या मान्यतेत अंतर्भूत असते.

ही मान्यता मिळवण्याची (समाजाची) गरज समलिंगींना भासू शकते. म्हणून ते या करारास लग्न म्हणू इच्छितात. याशिवाय एक कुटुंब म्हणून मान्यता मिळवणे. आईवडील व मुलांची (दत्तक) काळजी घेणारे. एक जोडीदार गेला तर त्याच्या इस्टेटीचा हक्क दुसर्‍यास मिळणे. घरकाम व बाहेरकाम अशी कामे वाटून घेणे हे पण असू शकतील.

समाजाची मान्यता ही सद्य परिस्थितीपेक्षा भविष्यासाठी अधिक उपयोगी ठरते, उदा. इस्टेटीचे हक्क, इ.
अन्यथा, लिव इन किंवा वन नाईट स्टँड हे संबंध भिन्नलिंगींमध्ये किंवा समलिंगींमध्ये कराराशिवायच असतात.

कुठलाही करार हा दोन्ही बाजूस हितकर असावा लागतो.

होय, परंतु समाजालासुद्धा त्याचा लाभ नसल्यास त्याची किंमत कागदाएवढी असते असे मला वाटते.

शोषित-शोषक अशी जोडी असायचे कारण नाही.

करार नसल्यास, नाडले जाऊन, शोषण होऊ शकते असा माझा युक्तिवाद आहे.

समाजाची गरज

समाजाला काय मिळते. हा मोठा गंभीर प्रश्न नाही. समाजातील घटक हे नेहमीच दुसर्‍या-तिसर्‍याने केलेला करार पाळावा याचा आग्रह करतात. याचे कारण ते स्वतः असे बरेच करार करत असतात आणि त्यांचा भंग झाला तर इतरांनी आपल्या पाठीशी उभे रहावे असे त्यांना वाटते. रेसिप्रोकॅलिटीमुळे ते अशा कराराच्या भांडणात सहभागी होतात.

आता विवाहातील करारा विषयी. समाजातील एकटे घटक जोडीदाराच्या शोधात असतात. एकटी सुयोग्य माणसे भेटली की कोर्टशीप (प्रणयाराधन?) सुरु होते. त्याची परिणती जोडप्यात होऊ शकते. आता सुयोग्य व्यक्ति 'एंगेज्ड' आहे कळल्यावर हा प्रयत्न सोडला जातो. असे घडत नसेल तर समाज त्या व्यक्तिस करार मोडणारा म्हणून शिक्षा करू लागतो. प्रस्थापित विवाहामुळे अशा प्रकारची सुरक्षा समाज देतो.

मला असे वाटते की समलिंगी विवाहातही हेच प्रामुख्याने घडत असावे. समजा आपण समाज म्हणजे समलिंगी संबंध ठेवणारे असे धरले तर. अशा विवाहाला त्या समाजात अर्थ असेल.

प्रमोद

चांगला मुद्दा

समाजाला काय मिळते. हा मोठा गंभीर प्रश्न नाही. समाजातील घटक हे नेहमीच दुसर्‍या-तिसर्‍याने केलेला करार पाळावा याचा आग्रह करतात. याचे कारण ते स्वतः असे बरेच करार करत असतात आणि त्यांचा भंग झाला तर इतरांनी आपल्या पाठीशी उभे रहावे असे त्यांना वाटते. रेसिप्रोकॅलिटीमुळे ते अशा कराराच्या भांडणात सहभागी होतात.

तेवढेच कारण पुरेसे नसावे असे वाटते. समाजाला फायदा नसेल तर काहीनाकाही शुल्क घेतले जाते असे निरीक्षण आहे.

समजा आपण समाज म्हणजे समलिंगी संबंध ठेवणारे असे धरले तर. अशा विवाहाला त्या समाजात अर्थ असेल.

भिन्नलिंगी समाजाला मात्र त्यांच्यासाठी 'सेपरेट बट इक्वल' परिस्थिती 'देणे'सुद्धा पुरेल.

सुयोग्य व्यक्ति 'एंगेज्ड' आहे कळल्यावर हा प्रयत्न सोडला जातो. असे घडत नसेल तर समाज त्या व्यक्तिस करार मोडणारा म्हणून शिक्षा करू लागतो. प्रस्थापित विवाहामुळे अशा प्रकारची सुरक्षा समाज देतो.

  1. "सुयोग्य व्यक्ति (क्र. १) 'एंगेज्ड' आहे (ही बाब क्र. २ ला) कळल्यावर हा प्रयत्न (क्र. २ कडून) सोडला जाण्याची बरीच शक्यता असते (अशी सोडण्याची प्रेरणा होण्यामागे ठोशास ठोसा रेसिप्रॉसिटीचे गणित असते.). असे घडत नसेल तर समाज त्या (क्र. १ या) व्यक्तीस करार मोडणारा म्हणून शिक्षा करू लागतो. प्रस्थापित विवाहामुळे अशा प्रकारची सुरक्षा (क्र. १ च्या जोडीदाराला) समाज देतो." असे विधान असेल तर ते नॅचरल लॉ ला धरून वाटते. परंतु क्र. २ लासुद्धा शिक्षा देणे अपेक्षित असेल तर ते मला चूक वाटते.
  2. भिन्नलिंगींच्या बाबतीत असा 'मालकी हक्क' गाजविण्याच्या प्रेरणेमागे अपत्यांच्या जैविक पितृत्वाबद्दल खात्री ठेवणे हा हेतु आहे. <गळ>स्त्रियांमध्येसुद्धा ही प्रेरणा कमीच असते.</गळ> समलिंगी प्रेरणा देणार्‍या जनुकांमध्ये असा पझेसिवनेस होईल काय? प्रतारणेस शिक्षा व्हावी असे त्या जनुकांना (अनुषंगाने जनुकधारी व्यक्तीला) का वाटेल? (अर्थात, आर्थिक हितसंबंध, स्थैर्य, इ. कारणांमुळे तसे 'क्षीणपणे' वाटू शकेल. हीच कारणे स्त्रियांच्या पझेसिवपणाला कारणीभूत असतील असे वाटते.)

विवाहाची आवश्यकता....

विवाह या गोष्टीचा मूळ हेतू 'पुरूषाच्या मालमत्तेचे संक्रमण' कोणाकडे करता येईल हे ठरवण्याची सोय हा आहे. म्हणजे लग्न हे 'औरस वारस' ठरवण्याच्या प्रक्रियेतले सहाय्यक आहे.

हा मूळ हेतू असल्याने विवाह करणारी स्त्री ही 'मी फक्त तुझीच संतती जन्माला घालीन' असा करार पुरुषाशी करते. त्याची भरपाई म्हणून पुरूष (जुन्या पद्धतीत) म्हटले तर काहीच ठोस वचन देत नाही. सध्याचा विवाहपद्धतीत यात बर्‍याच सुधारणा झाल्या आहेत.

या दृष्टीने विचार केल्यास समलैंगिकांमध्ये विवाह या गोष्टीची काय गरज आहे हे कळत नाही. दोन पुरूष अथवा दोन स्त्रिया नोकरीच्या ठिकाणी एकत्र रहात आहेत. अशांच्या बाबतीत जेवडे परस्पर सामंजस्य अपेक्षित आहे तेवढे असावे. या उदाहरणातील व्यक्तींपेक्षा काहीतरी अधिक संबंध त्यांच्यात आहेत एवढा फरक मात्र आहे.

समलैंगिक विवाहात आयुष्यभराची निष्ठा आणि बाहेर संबंध न ठेवण्याचा करार हे पण अपेक्षित आहे का?

भिन्नलिंगि विवाहातील (स्त्रीच्या) शोषणाचे दुसरे कारण समाजाच्या योनीशुचितेच्या कल्पनांमुळे एकदा लग्न झालेल्या स्त्रीचा दुसर्‍या पुरुषाकडून न होणारा स्वीकार हे आहे. दुसरीकडे जाता येणार नाही म्हणून पुरुष कसाही वागला तरी सोसण्याची सक्ती असते. समलिंगी विवाहातही तसे व्हायची शक्यता आहे का?
(समलैंगिकांच्या जगाशी परिचित नसल्याने हे प्रश्न मनात आहेत).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

हल्लीच्या हेतूंबद्दल निरीक्षणे काय आहेत?

विवाहसंस्थेचा मूळ हेतू काहीतरी असेल. सध्याचा हेतू काय आहे, असे तुमचे निरीक्षण आहे?

म्हणजे तुमच्या ओळखीच्या जोडप्यांत (किंवा तुम्हाला खुद्द अनुभव असल्यास) नेमका कुठला करार झाला? त्या कराराचा तुमच्या निरीक्षणातील जोडप्यांनी (किंवा तुम्हाला खुद्द अनुभव असल्यास तुम्ही) काय उपयोग केला?

सामंजस्य असलेली काही भिन्नलिंगी जोडपी सामंजस्य असूनही विवाह करतात असे माझे निरीक्षण आहे. (भारतात अशी उदाहरणे कमी दिसली, पण परदेशात मूल झाल्यानंतर काही वर्षांनी विवाह केलेली जोडपी माझ्या ओळखीत आहेत. आणि काही जोडपी मूल न झालेली माझ्या ओळखीत आहेत. आणि काही स्त्रिया ऋतुसंक्रमणानंतर विवाह करतात असे ओळखीत आहे. या सर्व स्त्रिया 'फक्त तुझीच औरस संतती जन्माला घालीन' असा करार बहुधा करत नसाव्यात.)

विवाह करण्यात या जोडप्यांचा काही हेतू असावा, असा माझा कयास आहे. हा हेतू काय आहे, हे जाणण्याबाबत कुतूहल आहे.

अपत्यास संपत्तीचे संक्रमण?
भिन्नलिंगी जोडप्यांच्या अपत्यांचा बाप (आणि आई) कोण याचे सर्टिफिकेट अपत्यापाशी असले, तर मालमत्तेच्या संक्रमणाचा प्रश्न सुटला. जोडप्याला एकत्र राहायचे असले, तर सामंजस्य पुरे. अपत्यास असे सर्टिफेकेट देण्याचा लघु-उपाय केल्यास हल्ली भिन्नलिंगी विवाहाची आवश्यकता काय आहे? काहीतरी उपयुक्तता असावी असा माझा कयास आहे. (विवाहसंस्था बरीच लोकप्रिय आहे, म्हणून असा कयास आहे. अपत्याबद्दल मी-आई-मी-बाप असे प्रतिज्ञापत्र नोंदवण्यापेक्षा विवाहसमारंभाचा खर्च अधिक येतो. तो अतिरिक्त खर्च तरी उपयुक्ततेबद्दल वस्तुनिष्ठ पुरावा आहे.) मात्र काय उपयुक्तता आहे, ती अनुभवी लोकांनी मला सांगावी.

समलैंगिक विवाहात आयुष्यभराची निष्ठा आणि बाहेर संबंध न ठेवण्याचा करार हे पण अपेक्षित आहे का?

मला वाटते की "विवाह घटस्फोटाने रद्दबातल न झाल्यास" आयुष्यभर निष्ठेचा करार असावा. नाहीतर घटस्फोटानंतरच्या आयुष्यात करार रद्द होतो. मात्र हे उत्तर बहुधा भिन्नलिंगी लोकांनाही लागू आहे. त्यामुळे अधोरेखित शब्दांसाठी विशेष असे प्रश्नाचे उत्तर दिले आहे की नाही, हे मला सांगता येत नाही.
- - -

विवाहामुळे केवळ एका पिढीतून दुसर्‍या पिढीत संपत्तीचे संक्रमण होत नाही, तर हल्ली जोडप्यामधील दोहोंतही संपत्तीचे/जबाबदारीचे संक्रमण होते, असे माझे निरीक्षण आहे. माझ्या मते हल्लीच्या परिस्थितीत अर्थशास्त्रीय विश्लेषण करताना ही बाब सुद्धा हिशोबात आली पाहिजे. (पूर्वी स्त्री ही उपभोग्य मालमत्ता होती, विवाहानंतर पुरुषाची मालमत्ता तिच्याशी सामायिक होण्याचा हक्कच नव्हता, त्या काळातला विवाहाचा मूळ हेतू काही का असेना -) हल्ली विवाहाचा आर्थिक हेतू वेगळा असू शकतो.

हेतु

>>या सर्व स्त्रिया 'फक्त तुझीच औरस संतती जन्माला घालीन' असा करार बहुधा करत नसाव्यात.

अजून करतातच. फक्त सध्याच्या कायद्यात हे दोन्ही बाजूंनी अपेक्षित झाले आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचे वैध कारण आहे. (आता संतती जन्माला घालीन आणि संबंध ठेवीन या दोहोंचा संबंध नाही पण ते ऐतिहासिक बॅगेज आहे असे समजावे).

>>भिन्नलिंगी जोडप्यांच्या अपत्यांचा बाप (आणि आई) कोण याचे सर्टिफिकेट अपत्यापाशी असले, तर मालमत्तेच्या संक्रमणाचा प्रश्न सुटला. जोडप्याला एकत्र राहायचे असले, तर सामंजस्य पुरे. अपत्यास असे सर्टिफेकेट देण्याचा लघु-उपाय केल्यास हल्ली भिन्नलिंगी विवाहाची आवश्यकता काय आहे?

माझ्यामते काहीही आवश्यकता नाही. परंतु पुन्हा ऐतिहासिक बॅगेजचा प्रश्न आहे. विवाह हेच ऐतिहासिक बॅगेज आहे. म्हणजे तशी शब्दरचना सक्सेशन ऍक्ट मध्ये केली तर विवाह अनावश्यक आहे. शिवाय हे समाजाने (म्हणजे केवळ कायद्याने नव्हे) मान्य करायला हवे.

>>मला वाटते की "विवाह घटस्फोटाने रद्दबातल न झाल्यास" आयुष्यभर निष्ठेचा करार असावा. नाहीतर घटस्फोटानंतरच्या आयुष्यात करार रद्द होतो.

मान्य. माहिती नसल्याने प्रश्न उत्पन्न झाला होता.

आपण म्हटलेले आर्थिक परिणाम सध्याच्या विवाहामुळे होतात हे खरे. पण ते परिणाम आहेत. विवाहाचे हेतू नाहीत. परिणामांकडेच लक्ष ठेवून विवाह करण्याचा घटना घडतातच. पण नवर्‍याकडे लग्नाच्या वेळी कोट रुपये होते. आता त्याने ते दान केले म्हणून आता विवाह चालू ठेवण्यात मला रस नाही या कारणासठी बायको घटस्फोट घेऊ शकणार नाही. नवर्‍याने फसवणूक केली असेही म्हणू शकणार नाही.

>>विवाहसंस्था बरीच लोकप्रिय आहे, म्हणून असा कयास आहे. अपत्याबद्दल मी-आई-मी-बाप असे प्रतिज्ञापत्र नोंदवण्यापेक्षा विवाहसमारंभाचा खर्च अधिक येतो. तो अतिरिक्त खर्च तरी उपयुक्ततेबद्दल वस्तुनिष्ठ पुरावा आहे

नाही. विवाह हे एक सामाजिक रिच्युअल आहे. आजोबांनी केला, वडिलांनी केला म्हणून मीही करतो. जसे कोर्ट मॅरेज हे खूप कमी खर्चिक असूनही लोक समारंभ करतात तसेच हे आहे. म्हणजे प्रतिज्ञापत्राचा पर्याय उपलब्ध झाला तरी लोक विवाह करणे सोडतील असे नाही.

भिन्नलिंगी विवाहापेक्षा वेगळ्या कारणांनी समलैंगिकांना करार करावेसे वाटत असतील तर ते विवाह म्हणून करायला माझ्या मनातून आडकाठी नाही.

भिन्नलैंगिक विवाहात असलेली ऐतिहासिक बॅगेजेस टाळून कायदे करावे असे वाटते. म्हणजे समलैंगिकांच्या विवाहाचे कायदे भिन्नलैंगिकांच्या विवाह कायद्याला समोर ठेवून न बनवता भागीदारीच्या किंवा असोसिएशन ऑफ पर्सन्स् च्या कायद्यांना समोर ठेवून करावेत.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

थत्ते यांच्याशी सहमत

श्री. थत्ते यांचे मताशी माझे मत बरोबर जुळते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझ्या मते आहे

समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?

माझ्या मते आहे. विवाह हा एक प्रकारचा करार असल्यास तो करार करण्याची मुभा समाजातील सर्व विवाहयोग्य वयाच्या व्यक्तींना असावी. ते समाजातील लोकांना समान न्याय देण्याच्या दॄष्टीने पाऊल असल्याने समाजाला उपयोगी आहे. लग्न करणार्‍यांना अर्थातच उपयोगी आहे (कारणे वर आहेतच - निष्ठा, प्रेम, जबाबदारी, संपत्ती यांना चॅनलाईझ करणे सोपे जावे.)
जसे काही प्रॉपर्टी घेण्याची (पैसे असले, इच्छा असली तर) मुभा सर्वांना असावी तसेच हे आहे असे माझे मत आहे. इथे पैशाच्या ऐवजी प्रेम/जोडीदार असणे इ. असे शब्द घालता येतील. इच्छा असल्यास लग्न करता यावे.

माझे वैयक्तिक विश्लेषण

येथे माझे वैयक्तिक विश्लेषण मांडत आहे. येथे वैयक्तिक म्हणजे "मला व्यक्तिगत लागू असल्याकारणाने केलेले विश्लेषण" असे काही आहे.

त्यामुळे वस्तुनिष्ठतेचा प्रयत्न जरी होत असला, तरी अनेक ठिकाणी वस्तुनिष्ठता शक्य नाही. यातील काही माहिती आत्त म्हणून (म्हणजे सर्वेक्षणातील एक डेटापॉइंट) म्हणून तरी घेता येईल, असे वाटते. "व्यक्तीला कशात मूल्य वाटते" हा सर्वेक्षणाचा मुद्दा आहे. (मला मूल्य कशात वाटते ते अन्य व्यक्ती 'वस्तुनिष्ठपणे' मला सांगू शकत नाही. माझ्या इच्छा-अनिच्छांचे निरीक्षण अन्य व्यक्ती माझ्यापेक्षा दुरूनच करू शकणार. निरीक्षणाची बारकाई असमानच असणार. त्यामुळे "समसमान निरीक्षण केल्यास निरीक्षण एकसारखे" ही वस्तुनिष्ठता या निरीक्षणात येऊ शकत नाही.)

या सैद्धांतिक मुद्द्यावर मी फार वेळ खर्च करणार नाही. परंतु "व्यक्तिगत इच्छा-अनिच्छा-मूल्य" सांगण्यातही काही वस्तुनिष्ठता आहे, ती अशी : अशी अनेक आत्मकथने जुळल्यास व्यक्तिनिष्ठेकडून वस्तुनिष्ठतेकडे प्रवास सुरू होतो.

- - - -

आकर्षण : जैविक की नाही, वगैरे
कोणाबद्दल आकर्षण असावे, ही इच्छा-प्रेरणा जाणवली, सारासार विचाराअंती पोचलेला कृति-संकल्प असल्याचे माझ्या आठवणीत नाही. शारिरिक आकर्षणाबद्दल माझ्यासारखीच स्मृती अन्य लोकांची आहे असे माझे निरीक्षण आहे. भिन्नलिंगी व्यक्तींचीसुद्धा.

काही लोकांचे असे मत असते, की त्यांच्या स्मृतीत व्यक्तींबद्दल आकर्षण असेनाका - खरी प्रेरणा प्रजोत्पादनाची असते. याचा उत्क्रांतीच्या सिद्धांताशी काहीतरी संबंध आहे. येथे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते, की सिद्धांतापेक्षा निरीक्षणे ही तथ्याच्या अधिक जवळ असतात. या लोकांच्या म्हणण्यात "स्वीय प्रजोत्पादन" या "खर्‍या" प्रेरणेच्या सिद्धांताने भिन्नलिंगी व्यक्तींना जाणवणार्‍या आकर्षणाचे स्पष्टीकरण मिळते. मात्र समलिंगी मनातल्या आकर्षणाचे स्पष्टीकरण करण्यास त्यांच्यापाशी सिद्धांतच नसतो. असे होत असेल, तर "स्वीय प्रजोत्पादन" हा सिद्धांत लंगडा मानावा. तथ्याचे निरीक्षण सिद्धांतविरोधी असल्यामुळे नकारता येत नाही. जर दुसरा कुठला सिद्धांत अनेक आकर्षणांचे स्पष्टीकरण देत असेल, तर तो सिद्धांत अधिक ग्राह्य. (अशा एका सिद्धांताचे उदाहरण असे : समलिंगी आकर्षणाने बहीणभावांची जनुके - काही प्रमाणात स्वीय जनुके - टिकण्यास मदत होते, वगैरे. "खरा सिद्धांत" काही का असेना. मी सांगितलेले कथन तथ्याच्या अधिक जवळ आहे. कोणाच्या सिद्धांतात निरीक्षण बसत नाही, तर सिद्धांत बदलावा.)

भिन्नलिंगी लोकांच्याही आकर्षणाचे मूळ कारण "प्रजोत्पादन" असेनाका. हे मूळ कारण आकर्षणाच्या मानसिकतेपासून तोडता येते, असे आपल्याला दिसलेले आहे. अनेक व्यक्ती संततिनियमन किंवा संततिप्रतिबंधाची साधने वापरताना दिसतात. काहीकाही देशांत "समाज"ही संततिनियमनाबद्दल प्रचार करताना दिसतो. म्हणजे "जैविक मूळ कारणास" नाहिसे करूनही आकर्षणाला फलद्रूप करण्याचा कृतिनिर्णय लोक करतात. "कृतिनिर्णयांचे अर्थकारण" किंवा "कृतिनिर्णयांची नैतिकता" किंवा "कृतिनिर्णयांची समाजाला उपयुक्तता" या सर्वांबद्दल कार्यक्षम भाकिते करायची असतील तर? "प्रजोत्पादन" हे "मूळ कारण" बाजूला ठेवून "आकर्षण" हे मनाला जाणवणारे कारणच हिशोबात घेतलेले बरे.

येथे "जैविक" शब्दाचा अर्थ संदिग्ध असल्याचे लक्षात आलेले बरे. जैविक-मूळ-कारण "प्रजोत्पादन" आहे, की जैविक-मूळ-प्रेरणा "आकर्षण" आहे, हा वाद वांझ आहे. ज्या सिद्धांताने सर्वाधिक निरीक्षणांची सोय सर्वात कमी गृहीत-संकल्पनांनी लावता येते, तो सिद्धांत घ्यावा. "जैविक" शब्दाच्या/संकल्पनेच्या वापराने अधिकाधिक निरीक्षणे नियमित होण्यासाठी त्याची योग्य व्याख्या करावी. निरीक्षणांची व्यवस्था बाजूला ठेवून शब्दात अडकू नये.

- - -
जोडीदार शोधण्याचा कृतिसंकल्प - प्रेरणा काय?
जोडी करण्याचा/जोडीदार शोधण्याबद्दल इच्छा-प्रेरणा आपोआप झाली. सारासार विचाराअंती पोचलेला कृति-संकल्प असल्याचे माझ्या आठवणीत नाही. काही आकर्षक व्यक्तींशी भेटीगाठी जुळवण्यात अधिक साफल्य मिळाले. त्या व्यक्तीशी भेटी पुन्हा-पुन्हा व्हाव्यात अशी इच्छाप्रेरणा होती. भेटीच्या शाश्वतीमध्ये काही विशेष आनंद आहे, असे माझ्या अनुभवात आणि स्मृतीमध्ये आहे. आता या आनंदाचे काही अर्थशास्त्रीय स्पष्टीकरण देता येईल. मात्र अर्थशास्त्रीय सिद्धांत असा काही म्हणू लागला : "असा आनंद होऊच शकत नाही", किंवा "सरासार विचार केल्यानंतर हा आनंद जाणवतो, त्याआधी नाही"... तर तो निरीक्षणविरोधी अर्थशास्त्रीय सिद्धांत मानून घेण्याची काहीही गरज नाही.

- - -

दीर्घकालीन साथीदाराशी आणि अल्पकालीन साथीदाराशी वागण्यात/अपेक्षेत फरक असतो
या बाबतीत श्री. नितिन थत्ते यांच्या अनुभवांनी मला आश्चर्य वाटले. मला वाटले की त्यांच्या ओळखीच्या दीर्घकालीन जोडप्यांच्या अंतर्गत अर्थकारणात (दोहोंना फायदेशीर असे) काही व्यवहार त्यांना आढळले असतील. त्यांनी सांगितलेली मर्यादित कलमांची भागीदारी (अपत्य- आणि योनिशुचिता) माझ्या अनुभव-निरीक्षणांमध्ये मी अजून सामावून घेतलेली नाही. त्यांनी अधिक विचार करून अन्य फायदेशीर व्यवहारांचे निरीक्षण नाही असे ठामपणे म्हटल्यास ती निरीक्षणेही मानून घ्यावी लागतील. मात्र श्री. थत्ते बहुधा माझ्या अनुभवाशी सुसंगत असे काही सांगत असावेत. शब्दांत फरक असावा. (त्याबद्दल पुढे - सामंजस्य आणि भागीदारी-कायदा).

माझ्या अनुभवांत आणि निरीक्षणांत असे आहे : दीर्घकालिक साथीदारी मध्ये कराराच्या कलमांमध्ये नसलेली, किंवा शब्दबद्ध न-झालेली बरीचशी जबाबदारी साथीदार स्वीकारतात. अलिखित हक्क मानून घेतात. याची टोकाची मान्यता काही परिस्थितींमध्ये झालेली आहे, म्हणून माझे हे मत अधिक दृढ झालेले आहे. काही देशांत (उदाहरणार्थ यूएस - संयुक्त राज्यांत) व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, आणि त्याच प्रकारे वैवाहिक जोडीदाराविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. (आणि गुन्ह्याच्या आरोपाबद्दल कुठलेही कलम विवाह-करारात नसते.) विवाहित जोडीदार दंडनीय नसले तरी एकमेकांच्या आयुष्यात फार मूलभूतरीत्या गुंतलेले असतात, अशी जाणीव या कायद्यामध्ये दिसते.

आता म्हणता येईल, की अमर्याद-अविवक्षित हक्क-जबाबदार्‍यांची बाब जोडीदारांमधील सामंजस्याची आहे. भागीदारीच्या कायद्यात बसण्यासारखी आहे. मला वाटते, की स्त्री-समानतेनंतर विवाहकायद्यात झालेल्या बदलांमुळे विवाह हा एक वैशिष्ट्यपूर्ण भागीदार-कायदाच झालेला आहे. यात वैशिष्ट्य असे असते, की सर्व हक्क-जबाबदार्‍यांची कलमे शब्दांकित नसतात. भविष्यकालीन अनपेक्षित परिस्थितीमध्ये भागीदारीची कुठलीशी जबाबदारी, कुठलेसे हक्क राहातीलच, असा करार असतो.

आता समलिंगी लोकांनी विवाहकायदा बदलून त्या करारनाम्याचा फायदा घ्यावा, की भागीदारी-कायदा वाढवून त्यात "अ-शब्दांकित जबाबदार्‍या आणि हक्क" असलेले करारपत्र बनवून घ्यावेत? हा सोयीचा प्रश्न आहे. भूक लागलेल्याला आपण सांगू शकतो - "समोरची पक्वान्ने अति-तैलयुक्त आहेत, ती न घेता तू नवीन अन्न शिजवून घे." आता भूक किती निकडीची आहे, पक्वान्ने किती त्रुटीयुक्त आहे, आणि नवीन स्वयंपाक करून घेणे किती सहज शक्य आहे, यावर निवड अवलंबून आहे.

{कायद्यातली उपमा : राजा या व्यक्तीचे सार्वभौमत्व असल्यामुळे पूर्वी "राज्ये" अस्तित्वात आली असतील. अनेक देशांमध्ये लोकशाही आली, तेव्हा राज्यशासन पुरते नवीन न बनवता असलेल्या राज्यघटनेतच काही फरक करून राजेशाहीची लोकशाही बनवली (इंग्लंड-ब्रिटन, कॅनडा, भारत). काही देशांत क्रांती आणि नवनिर्माण झाला (फ्रान्स किंवा रशिया). आता राजाला ठोडीशी ढुशी मारून पंतप्रधानाला सिंहासनावर जागा द्यायची, की राजाचा शिरच्छेद करून तिथे नवी खुर्ची ठेवायची? विवक्षित परिस्थितीमधली सोय बघितली पाहिजे.}

- - -
हेतू आणि परिणाम
एखाद्या संस्थेचा हेतू आणि परिणाम काय-काय आहेत? हे प्रश्न चांगले आहेत. "हेतू" हा बहुधा व्यक्तिगत असावा. "समाज" म्हणजे "व्यक्तींचे अन्य व्यक्तींवर असलेले सामायिक नियंत्रण" असे काही असावे. एखाद्या रूढीबाबत समाजाच्या दृष्टीने "हेतू" काय आणि "परिणाम" काय याबद्दल संदिग्धता आहे.

उदाहरणार्थ : जोडीदार असलेले व्यक्ती एकमेकांची काळजी घेतात - अधिक काळ जगतात आणि कमी व्याधींनी जगतात. "समाजा"ला त्यांच्यावर कमी खर्च करावा लागतो. जोडी बनवताना व्यक्तींचा हा हेतू नसावा - आकर्षण आणि सहवासात मिळणारा आनंद, हे हेतू असावे. दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य हा जोडीने जगण्याचा "परिणाम" असावा. मात्र समाजाच्या दृष्टीने हा संभाव्य परिणाम संस्था स्थापित ठेवण्याचा "हेतू" होऊ शकतो. हेच विश्लेषण "प्रजोत्पादन" या सुप्रसिद्ध "हेतू"ला लागू करता येते. व्यक्तींचा जोडीने रहाण्याचा हेतू "आकर्षण", "सहवासात मिळणारा आनंद" वगैरे असू शकतो. मात्र लैंगिक समागमातून मुले होतात हा परिणाम. मात्र हा परिणाम समाजासाठी "हेतू" म्हणून सांगितला जातो.

आता समाजाचा हेतू फक्त प्रजोत्पादन असा आहे काय? की अनेक हेतू आहेत? वंध्य जोडप्यांचे विवाह, ऋतुसंक्रमण झालेल्या स्त्रियांचे विवाह वगैरे बघता, अन्य काही हेतू असण्याबाबतही विचार केला पाहिजे. याबाबतीत विवाह-करारातील उघड बोललेल्या कलमांकडे पुरते दुर्लक्ष करणे योग्य नव्हे. त्यातूनही आपल्याला काही निर्देश मिळू शकतात.

हिंदू कराराचे शब्द जेव्हा रचले गेले तेव्हा ते दोघांच्या समान जोड्यासाठी नव्हते, खरे. एका पुरुषाने आणि एका-एका वेळी एका-एका स्त्रीशी केलेला करारनामा होता. करारनाम्यात दीर्घ काळानंतर होणार्‍या परिणामांचा उल्लेख सापडतो : ही भागीदारी धर्म-अर्थ-काम-मोक्ष या सर्व अंगांची होती. पुरुषप्रधान अर्थव्यवस्थेत नवरा स्त्रीला आणि तिच्या बापाला स्त्रीची काळजी घेण्याचे वचन देतो. ("मूल दिले तरच काळजी घेईन" अशी अट नसते.) धर्म-अर्थ-काम-(मोक्ष) यांच्यात पुत्रप्राप्ती हा एक अंश असतो, हे खरे. पण अन्य अंशही असतात. ते सर्व परिणाम "हेतू" मानण्यास हरकत नाही. स्त्री-समानतेनंतर जोडीदार एकमेकांना ही वचने देतात, आणि धर्म-अर्थ-काम-(मोक्ष) आणि एकमेकांची काळजी घेणे हे विवाहाचे सामाजिक हेतू असू शकतील, ही शक्यता पडताळायला हवी.

ख्रिस्ती विवाहात "श्रीमंती-दारिद्र्यात, आरोग्य-आजारात... एकमेकांची साथ देऊ..." वगैरे प्रकारची कलमे असतात. हे सर्व सुद्धा सामाजिक हेतू असावेत, ही शक्यता पडताळायला हवी.

(माझ्या मते हे सुद्धा हेतू आहेत.)

- - -
दीर्घकालिक वैयक्तिक सुपरिणाम हा "सामाजिक हेतू" का म्हणून म्हटले?
मला वाटते, हा प्रश्न श्री. रिकामटेकडा मला विचारतील. त्यांच्या मते "सामाजिक हेतू" हे काय असतात, हे मला अजून कळलेले नाही. म्हणून मी नेमके उत्तर देऊ शकणार नाही. समजा माझी कामचलाऊ व्याख्या वापरली "व्यक्तींचे अन्य व्यक्तींवर असलेले सामायिक नियंत्रण", तर काही फायदा सांगता येऊ शकतो. पुढे अशा काही शक्यता सांगितलेल्या आहेत.

- - -

करारास सामाजिक जबाबदारी बनवण्याचा विधी
विवाह हा अमर्याद-अविवक्षित जबाबदारी-हक्कांचा करार आहे. हा करार समाजात प्रसिद्ध करण्याचा प्रघात आहे. माझ्या मते याचा काही फायदा आहे. जोडप्यास एकत्र ठेवण्याची जबाबदारी समाज काही प्रमाणात घेतो. (ख्रिस्ती विवाहात अशा प्रकारची भाषा आहे. वैदिक विवाहातही असावी.)

व्यक्तीची दीर्घकालिक सुपरिणामांवरची नजर सहज विचलित होते. अल्पकालिक सुखाचे वजन निर्णयांत अधिक असते, असे निरीक्षणांतून आपल्याला दिसते. (अर्थशास्त्राच्या हिशोबात याला "डिस्काउंट" म्हणतात. उदाहरणार्थ : पोट बिघडणार असे समजत असून अती खाणे, वगैरे.)

जर जोडी कायम ठेवण्यात दीर्घकालिक सुपरिणाम असतील, तर स्वखुषीने जोडीदारांनी आपापसात आणि समाजाशी ठरवावे - "समाजाने जोडी मोडणे थोडे कठिण करावे". अशा तर्‍हेने अल्पकालिक सुखाची मात्रा थोडीच असली तर जोडी मोडणार नाही. समाजाच्या विरोधाला न-जुमानता जोडी मोडण्याइतकी मोठी अल्पकालिक सुखाची मात्रा असली, तरच जोडी मोडली जाईल. (उदाहरणार्थ : मारहाणीपासून वाचण्यास घटस्फोट घेतला जाईल - मारहाण टाळण्याचे सुख फार मोठे असते. जमल्यास समाजाने असे घटस्फोट सोपेही केले पाहिजे.) हा फायदा मला जाणवतो.

- - -
बरे तर : या बाबतीत माझे वर्तन काय आहे?
मी (आणि जोडीदाराने) सध्यापर्यंत तरी हा करार अंगीकारलेला नाही.

एक तर विधी बराच वेडावाकडा आहे. मी ज्या राज्यात राहातो, त्या राज्यात विवाह-करार करण्याची मुभा नाही. अन्य राज्यांत करार केला, तर माझे निवासी राज्य त्या विवाह-पत्राला मान्यता देते, खरे. पण यू-एस केंद्र सरकार मान्यता देत नाही. भारत सरकार मान्यता देत नाही. "शासन जोडी म्हणून ओळखते" याचा फरसे कुठले सुपरिणाम मिळत नाही. दुसर्‍या गावाला जाऊन कोर्ट-कचेरी-फी भरण्याचा खर्च मात्र येतो. समाज-कुटुंब "दीर्घकालिक सुखाची जाणीव करून तुमच्या अल्पकालिक भांडणात मध्यस्थी करू" असे वचन देत नाहीत. मग जाहीर संस्काराचा फायदा नाही, कायद्याचे पर्याप्त संरक्षण नाही. सध्या तरी विवाह-करार करून घ्यावासा वाटत नाही.

मात्र अशा अमर्याद-अविवक्षित करारात काही फायदे आहेत, हे मात्र मला जाणवते. पुढे कधी अशा करारात बद्ध होण्यात फायदा असू शकेल असे मला वाटते.

मला अशा "सोयी" देण्यात समाजाचा काय फायदा आहे? मला असे वाटते, की मला थोडी शास्वती वाटली, तर मी माझ्या उत्पादक-कामकाजात अधिक कार्यक्षम होईन. जोडीदारांना आणि यारांना पटवण्या-कटवण्यात कमी वेळ व्यर्थ घालवीन. कर-उत्पन्न वाढवेन. जोडीदाराकडून माझी काळजी घेतली जाईल, आणि माझ्याकडून जोडीदाराची. यामुळे कल्याणकारी व्यवस्थेला आम्हा दोघांवर थोडा कमी खर्च करावा लगेल.

- - -

समलिंगी विवाह आणि घटस्फोट
श्री. रिकामटेकडा यांचा "शोषण" मुद्दा या ठिकाणी मला उचलून धरावासा वाटतो. "समलिंगी विवाह"पेक्षा "समलिंगी घटस्फोट" ही मुभा मला अधिक आवश्यक वाटते. (आणि विवाह म्हणजे संभाव्य घटस्फोटात समाजाची मध्यस्थी मान्य करण्याची प्रतिज्ञा म्हणावी.)
श्री. रिकामटेकडा यांच्या अनुभवात किंवा ओळखीत नाहीत, परंतु माझ्या अनुभवात आणि ओळखीत असे आहे, की जवळजवळ प्रत्येक जोडीत आर्थिक आणि निर्णय-घेण्याच्या सामर्थ्यात असमानता असते. अशा स्वयंप्रेरित (?जैविक? भावुक?) जोडीत जोडीदार भरपूर आर्थिक, बिगर-आर्थिक आणि ऑपर्च्युनिटी-कॉस्ट गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक करण्याबाबत पुष्कळदा हिशोबी पर्याय नसतो. (या गावात मला चांगली नोकरी, तर त्या गावात त्याला चांगली नोकरी... असे असताना एकाने चांगली नोकरी सोडून दुसर्‍याच्या गावात दुय्यम नोकरी घेतली. हा खर्च स्वखुशीने झाला की अपरिहार्यपणे झाला? याचे उत्तर सहज देता येत नाही.)

अशा परिस्थितीत, आणि आयुष्यात पुढे बदलणार्‍या परिस्थितीच्या बाबतीत, आधीच करार करणे कठिण असते. प्रेम आणि आकर्षण बलवत्तर असताना वस्तुनिष्ठ-आपमतलबी करार करण्यास जोडीदार पात्र नसतात. अशा परिस्थितीत "समाजा"ला असा करारनामा बनवण्याची विनंती जोडीने करून देणे बरे, असे मला वाटते. प्रेमाच्या भरात स्वतःला असुरक्षित ठेवणारा करार केला, आणि पुढे घटस्फोट-सोडवणूक करण्याची वेळ आली, तर तोच करार अन्यायकारक वाटेल.

- - -
असो. पाल्हाळ फार झाले. मुद्दे विस्कळित आहेत. परंतु जाऊन पुन्हा मुद्दे व्यवस्थित करायची इच्छा होत नाही.

धन्यवाद पण

मला मूल्य कशात वाटते ते अन्य व्यक्ती 'वस्तुनिष्ठपणे' मला सांगू शकत नाही.

मान्य. बहुदा, या कारणामुळेच व्यक्तिस्वातंत्र्याला विशेष महत्व प्राप्त झाले असावे.

जैविक-मूळ-कारण "प्रजोत्पादन" आहे, की जैविक-मूळ-प्रेरणा "आकर्षण" आहे, हा वाद वांझ आहे.

या विषयावर मी वाद घातला नाही. केवळ 'शोषण शक्य असण्याची कारणे' या संदर्भात जैविक हा शब्द मी वापरला.
आकर्षणाची वैधता/अवैधता हा वाद ठरवित नाही हे मला मान्य आहे. परंतु त्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यास त्या भागिदारीचा समाजावर शक्य परिणाम ठरविता येईल असे वाटते.

जोडीदार शोधण्याचा कृतिसंकल्प - प्रेरणा काय?

याविषयीही माझा काही युक्तिवाद नाही.

हेतु

लोकांचे हेतु गौण आहेत. त्यांना आनंद मिळतो इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे. परंतु त्यांच्याशी समाजाने कसे वागावे याचे नियम ठरविताना परिणामांचाच विचार करावा लागतो. सर्वोत्कृष्ट परिणाम साधणे हाच हेतु असतो.

मूल दिले तरच काळजी घेईन" अशी अट नसते.

हे पटले नाही. घटस्फोटासाठी पर्याप्त कारणांमध्ये वंध्यत्वाचा समावेश आहे ना?

करारास सामाजिक जबाबदारी बनवण्याचा विधी

हे समजले नाही. प्रत्येक करार ही सामाजिक जवाबदारीच असते ना? सामाजिक जवाबदारीशिवाय करार हा केवळ कागदच असतो ना?

"करार करण्याची इच्छा असलेल्या दोन किंवा अधिक भागिदारांना करार केल्यामुळे सुख मिळेल आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल." हा एक नवा मुद्दा मला सापडला.
हा युक्तिवाद कोणत्याही करारासाठी लागू आहे. परंतु निव्वळ या वाढीव कार्यक्षमतेच्या मोबदल्यात समाज अशा करारांचे संरक्षण करीत नाही असे दिसते. पुनरुत्पादनासारखा एखादा थेट (आनंदामुळे वाढणार्‍या कार्यक्षमतेव्यतिरिक्त असा) परिणाम आहे काय?

"समलिंगी जोड्यांमध्येही असमानता असते. म्हणून करार आवश्यक आहे." हा एक मुद्दा मला सापडला.
करार करण्याची मुभा तर मिळालीच पाहिजे. सर्व अटी एकाच ठिकाणी किंवा लिखित स्वरूपात नसल्या (उदा. "दीर्घकालिक साथीदारी मध्ये कराराच्या कलमांमध्ये नसलेली, किंवा शब्दबद्ध न-झालेली बरीचशी जबाबदारी साथीदार स्वीकारतात.") तरीही विवाह हा करार विवक्षित जैविक कर्तव्ये आणि मर्यादा लक्षात घेऊन बनलेला आहे. समलिंगी जोड्यांतील असमानता ही शारिरीक नसल्यामुळे (मानसिक कणखरपणा, इ पातळीवर असल्यामुळे) शोषण कमी असेल असा माझा अभ्युपगम होता (व्यावसायिक भागिदारीतही आर्थिक आणि निर्णय-घेण्याच्या सामर्थ्यात असमानता असू शकतेच).

शिवाय, समलिंगी आकर्षण हे 'काही 'नवी' जनुके, गर्भावस्थेतील संप्रेरकांतील बदल, अशा 'उपर्‍या' कारणांमुळे आले असेल तर त्या आकर्षणाने वहावत जाऊन "प्रेमाच्या भरात स्वतःला असुरक्षित ठेवणारा करार" करण्याची शक्यता ही आदिम भिन्नलिंगी प्रेरणांमुळे वहावत जाऊन केलेल्या करारांच्या शक्यतेपेक्षा कमी असेल असाही माझा अभ्युपगम होता. ("वंध्य जोडप्यांचे विवाह, ऋतुसंक्रमण झालेल्या स्त्रियांचे विवाह वगैरे" उदाहरणांनाही हेच विधान लागू होऊ शकेल असे वाटते.)

त्यावर "आता समलिंगी लोकांनी विवाहकायदा बदलून त्या करारनाम्याचा फायदा घ्यावा, की भागीदारी-कायदा वाढवून त्यात 'अ-शब्दांकित जबाबदार्‍या आणि हक्क' असलेले करारपत्र बनवून घ्यावेत? हा सोयीचा प्रश्न आहे." हा युक्तिवाद आल्यास प्रश्नच मिटला.

वा छान!

हा प्रतिसाद आवडला. चांगले विश्लेषण आहे.

मुद्दे विस्कळित आहेत.

हल्लीच हिंदू वाचल्याने सर्व विस्कळीत मुद्देसूद तर वाटत नाही ना? :)

प्रमोद

अरे वा !! समलिंगी विवाह समाजात बराच ज्वलंत विषय आहे

अरे वा !! समलिंगी विवाह समाजात बराच ज्वलंत विषय आहे हे या उपक्रमा वरील चर्चे वरून समजले. भारतातील समाजाचे सर्व प्रश्न संपले आहेत . आता फक्त एडस आणि समलिंगी विवाह
या दोनच समस्या उरल्या . त्या संपल्या की आनंदी आनंद . मला फक्त या प्रश्ना संबंधी आकडेवारी हवी आहे. समाजात किती टक्के लोकांचा हा प्रश्न आहे. यांच्या मुळे समाजाला कांही त्रास आहे का? समाज स्वाथा वर यांचा वाईट परिणाम किती % होतो.

तुमचे चालू द्या ना!

तुम्हाला धागे काढायला कोणी बंदी केली आहे का?

राहुल महाजन

तुमचा काय प्रॉब्लेम आहे?
तुम्ही राहुल महाजनविषयी लेख लिहिला तेव्हा देशापुढचे सर्व प्रॉब्लेम सुटले होते का?

(भुणभुणफार) नितिन थत्ते

हेच म्हणतो

तुम्ही राहुल महाजनविषयी लेख लिहिला तेव्हा देशापुढचे सर्व प्रॉब्लेम सुटले होते का?

असेच.

(तुणतुणबाळ) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कोंबडी-अंडे

आधी कोंबडी की आधी अंडे यापेक्षा हा प्रश्न निदान काहि नागरीकांशी निगडीत असल्याने अधिक महत्त्वाचा असावा असे मला वाटते. :)

असो परंतू खरंच भारतात समलिंगी किती हा प्रश्न महत्त्वाचा आहे व कायद्याच्या व सामाजिक रोषाच्या आडकाठीमुळे खरे उत्तर शोधण्यास कठीण असा आहे (अंदाज देण्यात येतात मात्र नेमका आकडा - काहि मार्जिन धरून - देणे तुर्तास कठीण वाटते)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मी राहुल महाजन विषयी मुद्दाम लिहिले होते . ... ........

मी राहुल महाजन विषयी मुद्दाम लिहिले होते . ... कारण समाजातील महा-जनानचा मुखवटा कसा बेगडी आहे हे दाखवून द्यायचे होते. पण हा बुरखा फाडणे कोणास फारसे रुचले नाही. असो......
आहो ! माझा लढा चालूच राहणार आहे. मी फक्त आकडेवारी आणि समाजावर त्याचा होणारा दुष्परिणाम विचारला. भ्रष्ट्राचार , बेईमानी, लाच खाणे, धर्मवाद , जातिवाद , उच्च-निचः वाद यांचा जो समाजावर वाईट परिणाम होतो त्याच्या टक्केवारी मध्ये या एडस , समलिंगी विवाह याचा समाजावर किती टक्के वाईट परिणाम होतो याचा अभ्यास करावयाचा होता. या मुळे समजा पुढे सध्या कोणता प्रश्न जास्त गंभीर आहे याचा अभ्यास करता आला असता.एडस बद्दल मला वाटते जरा जास्तच ओरड होत आहे. त्याच्या नावा खाली NGO कोट्यावधीचा अपहार करत आहेत.

एड्स

एड्स हा मोठा धोका नाही असे आपणांस का वाटते?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अंशतः सहमत

"एडस बद्दल मला वाटते जरा जास्तच ओरड होत आहे. त्याच्या नावा खाली NGO कोट्यावधीचा अपहार करत आहेत." हे अंशतः मान्य आहे पण त्यासाठी कृपया स्वतःचा धागा काढा.
समलिंगींचा समाजाला त्रास होतो असे येथे कोणीच म्हटले नाही. उलट त्यांना समाजामुळे त्रास होतो आणि तो कसा कमी करता येईल याचीच चर्चा चालू आहे.

- बडबडत्रास

चांगली चर्चा

चर्चा चांगली चालली आहे. मला जे मुद्दा मांडायचे होते ते मान्यवरांनी आधीच मांडले आहेत.असो.

प्रश्न: समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असणे (समाजाला किंवा लग्न करणार्‍यांना) उपयोगी आहे काय?
नक्कीच उपयोगी ठरावे. उदाहरणार्थ एखादे हुंडाबळी प्रकरण झाले, लग्नात छळ झाला, फसवणूक झाली, दुसऱ्या लग्नाचा प्रकार झाला तर कोर्टात जाऊन दाद मागता येईल.

अवांतर:
अमेरिकेतल्या काही राज्यांत व युरोपांतल्या काही देशांत समलिंगी विवाहाला मान्यता आहे. काही चर्च तर समलिंगी विवाहदेखील लावून देतात. भारतात हिंदू धर्मात हे व्हायला हवे का? झाल्यास मग ज्या आपल्या पंरपरा आहेत, विधी आहे त्यांत समलिंगी जोडप्यांसाठी कुठले बदल होतील ह्याचा विचार करतो आहे. उदा. वटसावित्री, मंगळागौर, गौरीगणपती आदी सणांना समलिंगी जोडपे कसे साजरे करणार?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विवाहाचे हेतू आणि फायदे

कॅलिफोर्निआच्या 'प्रोपोझिशन ८' विरोधात नुकताच जो न्यायालयीन निकाल दिला गेला त्यात विवाहाचे हेतू आणि फायदे यांच्याविषयी काही मतप्रदर्शन आहे असं दिसतं. उदा:

  • भिन्नलिंगी वा समलिंगी जोडप्यांच्या 'लग्न' यशस्वी करण्याच्या क्षमतेमध्ये आणि मूल वाढवण्याच्या क्षमतेमध्ये फरक नाही.
  • प्रजोत्पादन हा लग्नाचा हेतू असण्याची गरज नाही.
  • तरीही, आपल्या पालकांच्या विवाहाला मान्यता असण्यामुळे जे स्थैर्य मुलांना लाभतं ते आता समलिंगी जोडप्यांच्या मुलांनाही मिळू शकेल, हा अशा विवाहांचा फायदा आहे. याचा समाजालाही फायदा होईल, असा दावा निकालात केलेला आहे.

पारंपरिक लिंगभूमिकांमध्ये (gender roles) कालानुरूप जे बदल झाले, त्यानुसार आता भिन्नलिंगी जोडप्यांमध्ये लग्न हे दोन समसमान व्यक्तींमध्ये होतं (म्हणजे त्यात स्त्री पुरुषाहून कनिष्ठ असा पारंपरिक भेदभाव नाही). ही समानता (किंवा हा भेदभावाचा अभाव) समलिंगी जोड्यांपर्यंतसुध्दा पोहोचली पाहिजे. ती पोहोचू दिली नाही तर त्यांचा या समसमान नात्यात सहभागी व्हायचा हक्क डावलला जाईल आणि तो समलिंगी जोडप्यांप्रती भेदभाव होईल, असंही त्यात म्हटलं आहे.

विवाहाचे हेतू आणि फायदे यांविषयीचे हे मुद्दे वैश्विक मानता येतील का? माझ्या मते यावेत.

(मी मूळ निकाल वाचलेला नाही, पण न्यू यॉर्क टाईम्स मधलं संपादकीय वाचून त्याचा संबंध या धाग्यातल्या उहापोहाशी लावता येईल असं वाटलं.)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर