हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. माझ्या कार्यालयाच्या जवळच पीपल्स बुक हाऊस असल्याने मी ती ताबडतोब मिळवली आश्चर्य म्हणजे ६०० पानांची असून एव्हाना वाचून झाली.

या कादंबरीचे मुखपृष्ट सुभाष अवचट यांनी काढलेले सुंदर चित्र आहे. काळाच्या (उत्खननाच्या) तळाशी जाणारी एक आकृती. उत्तम रंगनिवड आणि सहजतेने काढलेले जाडसर फराटे हे त्याचे वैशिष्ट्य मानायला पाहिजे. चित्रविषय ही कादंबरीला शोभतो. जसे कादंबरीला उत्खनन हा चित्र विषय शोभतो तसाच 'अडगळ' हा चित्र विषय देखिल शोभला असता.

कादंबरीला प्रस्तावना, लेखक परिचय इत्यादी गोष्टी नाहीत ते ठीक वाटते. संदर्भ सूची आणि इंडेक्स असायला हवे होते असे वाटते. त्याच बरोबर नायकाचा वंशवृक्ष आणि पात्रपरिचय दिला असता तर बरे झाले असते. छपाई, कागद आणि आतील सजावट वाखाणण्यासारखी नाही. बांधणी मात्र चांगली आहे. काही शब्दांचे अर्थ नीट लागत नाहीत विशेषतः उर्दू शब्दांचे तसेच थोड्याफार खानदेशी शब्दांचे अर्थ शेवटी दिले असते तर अधिक मजा आली असती.

आपण एखाद्या अडगळीच्या खोलीत जातो. तिथे फेकून न देण्यासारख्या पण वापरण्यास अयोग्य अशा वस्तुंचे एक भांडार असते. आणि जर ती खोली आपल्या वस्तुंची असेल तर त्यासोबत आठवणी असतील. मग आपण आपल्या आठवणीत आणि वस्तुंमधे रमून जातो. त्यांची कुठलीही मांडणी नसेल तरी चालेल. पण त्यातून आपल्याला काहीतरी सुचतच जाते आणि त्यांची एक मांडणी तयार होते असे काहीसे कादंबरी वाचून वाटते.

ही कादंबरी खंडेराव विठ्ठल या कथानायकाच्या तोंडून आपण ऐकतो (वाचतो). हिला कथा अशी फारशीं नाही. त्यामुळे कथा सुरु झाली- पात्र परिचय देत पात्र वाढत गेले-शेवटचा क्लायमॅक्स अशी कोणाची अपेक्षा असेल तर तो फसेल. नायकाच्या लहानपणापासून ते साधारण पंचविशीपर्यंतचा प्रवास यात आहे. पण तो काळानुसार वदला गेला नाही. फ्लॅशबॅक आणि कधी त्यात फ्लॅशबॅक असे काहीसे हे तंत्र आहे. कादंबरीत विस्कळीत धागे खूप आहेत. की एखाद्या वस्त्राप्रमाणे आपण एका धाग्यावरून दुसर्‍या धाग्यावर येतो आणि परत थोड्यावेळाने जुन्या धाग्यावर येतो. हीच ती अडगळीची आणि वस्त्रविणीची खासियत आहे.

'आपला देश परदेश' का 'परदेश देश आपला'. अशा वाक्यातून कादंबरीची सुरुवात होते. आणि शेवटपर्यंत शब्द व त्यांची मांडणी यावर काहीना काहे कळत राहते. कवितेसदृष्य गद्य, गर्भितार्थ असलेले पद्य अशा सारख्यातून शब्दप्रवाह चालू राहतो. कधी हिंदू मुसलमान सारख्या शब्दांची अदलाबदल घडत राहते आणि त्यातून दोन विरोधी संकल्पनातील एकात्मता लक्षात येते. शब्दांचा अर्थ बनियन सारखा असतो जो फिट बसेल तो आणि व्यापक.

कादंबरीत दोन मुख्य धागे आहेत. एक पुरातत्व (आर्किओलॉजी) च्या अंगाने इतिहासातील जाणीवा शोधणारा. तर दुसरा कथा नायकाच्या मोरगावच्या घटना सांगणारा. यासोबतचा अजून एक धागा म्हणजे खंडेरावाच्या घरच्यांबद्दलचा. पुरातत्वातून जाणीवा शोधणे ही कविकल्पना आहे कारण तेथे तर फक्त वस्तुनिष्ठतेला महत्व.

लेखनाला काही भूमिका आहे. लेखक इतिहासाकडे बघायची एक दृष्टी आहे. एकेकाळचे ग्राम्यजीवन आधुनिकीकरणाने कसे दुभंगले ही त्यातली एक भूमिका. थोडीफार राजकीय भूमिका आहे. या सर्वच भूमिका पटत नाहीत. (सगळेच पटले तर काय राहिले.)

लेखकाने मोठ्या प्रमाणात लोककथांचा, काव्याचा आनि चुटक्यांचा वापर केला आहे. कधी कधी तो अती झाल्यासारखे वाटते. इतिहासाची अभ्यासपूर्णता जाणवते. बहुदा काही चुका नसाव्यात. कित्येक धागे अर्धवट सोडून दिले आहेत. (म्हणजे पुढच्या कादंबर्‍या वाचणे आले.)

एकंदरीत हल्ली वाचलेल्या पुस्तकांपैकी एक चांगले पुस्तक.

Comments

उत्तम तोंडओळख

पुस्तकात काय आहे? त्याची ही उत्तम तोंडओळख आहे.
हे सगळे तर त्या कादंबरीत आहेच.
पण महत्त्वाचे म्हणजे आपणही साधारण १९४४ ते १९७१ या कालखंडात एका लहानशा खेड्यात लहानाचे मोठे होत आहोत असे वाचताना वाटत रहाते.

असेच म्हणतो

कादंबरी एका वाचनात पूर्णपणे समजणे मला शक्य नाही. पुन्हा एकदा वाचावी लागेल. असेही म्हणतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वाचत आहे

"हिंदू" वाचत आहे. श्री.प्रमोद जी यांनी उल्लेख केलेले कादंबरीतील पहिलेच वाक्य "'आपला देश परदेश' का 'परदेश देश आपला' ~~ खास नेमाडी टच देते आणि त्यांचा असा जो एक खास वाचकवर्ग आहे (पार अगदी "कोसला" पासून) त्याला "आपला माणूस" भेटला अशी जाणीव होते.

(जाता जाता ~ ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मला कुरिअरने आलेली प्रत खूपच छान वाटली, अगदी छपाई, कागद आणि बांधणीसह....आपण घेतलेली प्रत "दुसर्‍या एडिशन" ची आहे का? हे विचारण्याचे कारण म्हणजे "ऑनलाईन" बुकींग लागलीच संपले होते, पहिली एडिशन संपली असे पॉप्युलरने प्रकाशन सोहळ्यातच सांगितले होते. मग अशा या "चालू बाजारमूल्य" असलेल्या पुस्तकाची दुसरी-तिसरी एडिशन कशाही रितीने काढण्याचा प्रकाशकांचा "जन्मसिद्ध हक्क" असतो आणि तो ते मिळवितातच.)

निर्मिती मूल्य

(जाता जाता ~ ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मला कुरिअरने आलेली प्रत खूपच छान वाटली, अगदी छपाई, कागद आणि बांधणीसह....

माझी प्रत पहिल्या आवृत्तीतलीच आहे. मुखपृष्टावरून जी अपेक्षा झाली होती ती आतल्या सजावटीत नाही. आत मुखपृष्टावरील चित्र काळेपांढरे छापले आहे (प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला). ते चित्र काळ्यापांढर्‍यात व्यवस्थित दिसत नाही. त्या ऐवजी पेन्सिल् स्केचेस चांगली दिसली असती. छपाई आणि कागद बांधणी आणि मुखपृष्टाच्या तोडीचे नाही असे मला वाटले.

प्रमोद

छान परिचय

वाचली पाहिजे. धर्म यावर विद्वत्तापुर्ण चर्चा करायला कितपत उपयोगाची आहे? सध्या तरी हिंदु विरोधी आहे काय? अशा संशयाने लोक पहातात.
प्रकाश घाटपांडे

चांगली ओळख .....पण संपललेली (?) आवृत्ती

पुस्तकाची ओळख चांगली दिली आहे.

नेमाड्यांच्या लेखनाबद्दल उत्सुकता असल्याने मी सुद्धा महिन्याभरापूर्वी आगावू नोंदणीचा आगावूपणा केलेला आहे. पण गेल्या दोन आठवड्यांपासून कांदबरी प्रकाशित होऊनही औरंगाबादला आलेली नाही. मध्यंतरी पहिली आवृत्ती संपल्याचेही पेपरला वाचले. आता आगावू नोंदणी करुनही दुसऱ्या आवृत्तीची किंवा पहिल्याच आवृत्तीच्या दुसऱ्या छपाईची (!)वाट पहातो आहे.

+१

पुस्तकाची ओळख चांगली दिली आहे.

असेच म्हणतो.

चांगला परिचय

चांगला परिचय... पुस्तक वाचावेसे वाटते आहे.. मात्र अजूनही आमच्या ग्रंथालयात आलेले नाहि :( .. पुस्तक वाचल्याशिवाय मी सहसा विकत घेत नाहि.

परिचय खास पुस्तकांना वाहिलेल्या पुस्तकविश्ववरही टाकावा ही विनंती

बाकी

शब्दांचा अर्थ बनियन सारखा असतो जो फिट बसेल तो आणि व्यापक.

हे वाक्य वाचून गंमत वाटली

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धन्यु....!

प्रमोदराव, पुस्तक परिचय आवडला. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहेच.
नुकतीच नेमाडे यांची मुलाखत दोन भागात दै. लोकमत मधे प्रसिद्ध झाली होती. त्यात हिंदू चार खंडात प्रसिद्ध होणार आहे असे वाचले होते. तसे असेल तर पहिल्या भागाचा पुस्तक परिचय पाहता आणि भालचंद्र नेमाडे यांचे विचार पाहता हिंदू कादंबरीच चांगलीच झाली असावी, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

वा!

चांगला परिचय. पुस्तक केव्हा मिळेल आणि केव्हा वाचता येईल त्याची सध्या कल्पना नाही.

हिंदू शब्दावर जोर का दिला गेला आहे?

मला मुळात कादंबर्‍या वाचायला आवडत नाहीत. मी हे पुस्तक विकत घ्यायच्या विचारात होतो ते त्या पुस्तकाच्या नावात 'हिंदू' शब्दावर जोर दिला गेला असल्यामुळे. पण पुस्तकाचे वरील परिक्षण वाचून तरी वाटत नाही कि यामध्ये हिंदू, हिंदुत्वा यावर काहि भाष्य केले असावे.

प्रमोद साहेब, व इतर मंडळी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे,
या पुस्तकात (कथेच्या माध्यमातून) हिंदू या विचारपद्धतीवर/ धर्मावर काही भाष्य केले गेले आहे का?
ह्या बद्दल माहिती द्याल का?

हिंदू

हिंदू विषयावर कादंबरीत भरपूर (सगळेच?) आहे. मात्र हिंदू हे नाव स्थलवाचक धरले तर.
हिंदूत्व या आधुनिक संकल्पनेवर मात्र त्यामानाने कमी आहे.

अवांतरः भारत म्हणून आपण हल्ली जो देशाचा स्थलवाचक उल्लेख करतो तो भरतवंशीय अशी वंशीय फोड ठरतो. तर हिंदू हे मात्र सिंधूच्या पलिकडचे हे मात्र स्थल दर्शवणारे नाव आज धर्मदर्शक झाले आहे.

प्रमोद

विचार आणि धर्म

>>> हिंदू या विचारपद्धतीवर/ धर्मावर काही भाष्य केले गेले आहे का? <<<

हिंदू "विचारपद्धती"वर भरपूर भाष्य आहे, मात्र "हिंदू एक धर्म" या संकल्पनेशी श्री.नेमाडे फटकून वागतात त्यामुळे धर्म दृष्टीने भाष्य जवळजवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. अर्थात जी काही विचारसरणी आहे ती त्यांनी मुलाखतीमध्येदेखील उल्लेखिलेली होतीच.

आणि एक ~~ ही 'कथा' नाहीच. जे आहे तो म्हणजे एका संस्कृतीचा हजारो वर्षांचा अथक प्रवास.... फार वाचनीय आहे, हे मात्र तितकेच सत्य.

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला

चांगला परिचय

परिचय आवडला.

अवांतर: पॉप्युलर प्रकाशनाने भारताबाहेर पुस्तक पाठवण्याचे अतिरिक्त पैसे घेऊन आता पुस्तक अमेरिकेत पाठवण्यास असमर्थता दर्शवली आहे. वैताग. वैताग. वैताग.

ओळख आवडली.

सर्वसाधारणपणे विचारप्रधान कादंबऱ्या या लिहायला अतिशय कठीण असतात, आत्तापर्यंत ज्या वैचारिक म्हणून वाचलेल्या आहेत त्यात विचार जास्त व कांदबरी कमी असं झालेलं दिसलं आहे. तरीही वाचण्याची इच्छा होत आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उदाहरणे

"वैचारिक कादंबरी"ची उदाहरणे दिलीत तर तुमचा मुद्दा समजून घ्यायला थोडी मदत होईल.

उदाहरणे आणि काहीशी असहमती

दोस्तोएव्हस्कीच्या काही कादंबर्‍या "वैचारिक" म्हटल्या जाऊ शकतात. पैकी मी वाचलेली "क्राइम अँड पनिशमेंट" [इंग्रजी भाषांतरित]) ही कादंबरी कादंबरी म्हणूनही उभी राहाते.
हल्लीच्या लेखकांपैकी उम्बेर्तो एको याची "फुको'ज् पेंड्युलम" [इंग्रजी भाषांतर] कादंबरी थरार/रहस्यकथा म्हणूनही आवडली.
भारतीय लेखकांपैकी अमितव घोष यांची "इन् ऍन अँटीक लँड" कथा म्हणूनही मला भावली.

मराठी कादंबर्‍यांचे माझे वाचन तोकडे असल्यामुळे उदाहरणे माहीत नाहीत.

काहीशी असहमती असे का म्हटले? एखाद्या लेखकाला पेलत नाही. अशी उदाहरणे खूप असतील. पण शुद्ध ललित कादंबर्‍यासुद्धा काही लेखकांना पेलत नाहीत...

आणखी काही वैचारिक कादंबर्‍या

उम्बेर्तो एकोचीच 'नेम ऑफ द रोज' हिचीही गणना यात होऊ शकेल. काहीशी तशाच धाटणीची ओरहान पामुक यांची 'माय नेम इज रेड' आहे. हिंदूविषयी वाचताना या कादंबर्‍यांची आठवण झाली. कारण या पुस्तकांतही एका संस्कृतीच्या इतिहासाच्या धांडोळ्यातून हळूहळू, अस्पष्ट उमटत जाणार्‍या विचारांद्वारे त्या संस्कृतीविषयीचं विवेचन केलेलं आहे.

वैचारिक कादंबरीकारांमध्ये मिलन कुंदेरा यांचं नाव घेता येईल. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांतून एका खास युरोपिअन पण तरीही वैश्विक म्हणता येईल अशा विचारांचा धागा सहज गुंफलेला असतो.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

आणखी

द प्लेग - अल्बेर कमू

नो एक्झिट (नाटक) - सार्त

याखेरीज दोस्तोयेव्ह्स्की, काफ्का आणि हर्मन हेस, हे सर्व लेखक अस्तित्ववाद (existentialism) च्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येतात.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

आणखी

ब्रेव्ह न्यू वर्ल्ड, १९८४ आणि एंजल्स ऍन्ड डीमन्स/दा विंची कोड?

हो आणि नाही

ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आणि १९८४. तसेच फॅरनहाइट ४५१.
दा विंची कोडबद्दल साशंक आहे.

एंजल्स अँड डीमन्स वाचलेली नाही पण यावरचा चित्रपट कालच पाहिला. ही आणि दा विंची कोड दोन्ही माहितीपूर्ण आहेत. प्राचीन काळातील सत्य घटना, दस्तावेज यांचा सुरेख उपयोग केला आहे. मात्र यांना वैचारिक म्हणता येईल का याबाबत शंका आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पॉलो कोह्लो

पॉलो कोह्लोच्या 'अल्केमिस्ट' आणि 'जहिर' देखील वैचारीक भाष्य करणार्‍या उत्तम कथाप्रधान कादंबर्‍यांमधे गणता याव्यात.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आवडल्या नाहीत

या दोन कादंब्र्या मला फारशा आवडल्या नाहीत. :( का ते सांगता येणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अल्केमिस्ट

अल्केमिस्टबद्दल भरभरून ऐकले आहे पण अजून वाचलेली नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

अल्केमिस्ट

परवा-परवाच वाचली. (किमयागार नावाने नितीन कोत्तापल्ले यांनी भाषांतरित केलेली.)तीन तासात.
व्यक्तीचं वय जर < २८ वर्षे असेल तर तिला फारच आवडेल. भारावण्याइतपत.
जर वय >२८ वर्षे - वयाशी व्यस्त प्रमाणात.
नंतर गंमत म्हणून.

२८

निकष रोचक आहे.
२८ हा आकडा कसा काढला? (साधारणपणे २५, ३० किंवा ४० असा आकडा येतो.)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हेच म्हणतो

28 कां कां कां?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

७ एके सात

सातचा पाढा म्हणा - प्रत्येक सात वर्षानंतर माणूस बदलतो -
असं बादल सरकारांच्या 'सारी रात' नाटकात म्हटलं आहे. :)
कां?कां?कां?
-नाटक वाचा म्हणजे कळेल. ;)

अलकेमीस्ट

अलकेमीस्ट अजिबात आवडली नाही, वाचले तेव्हा वय २१ पेक्षा अधिक पण २८ पेक्षा कमी.

दोन्ही(हे आणि सौरभदा यांचे) परिक्षणे आवडली. हिंदू कधी मिळेल/जमेल वाचायला माहित नाही.
-Nile

बॅ, अनिरुद्ध धोपेश्वरकर

भाऊ पाध्येंच्या कादंबर्‍या मला वैचारिक कादंबर्‍या वाटतात. नेमाड्यांचे चांगदेव चतुष्टयही वैचारिक कादंबरीचे उदाहरण होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो

मराठी वैचारिक कादंबर्‍या

जुन्या पिढीच्या लेखकांपैकी पटकन आठवणारं नाव म्हणजे दि. बा. मोकाशींची आनंदओवरी. तुकारामाच्या मृत्यूनंतर तुकारामाच्या भावाला पडलेले अस्तित्वविषयक प्रश्न आणि त्यांची उकल करण्याचा त्याचा प्रयत्न असं काहीसं तिचं वर्णन करता येईल.
नव्या पिढीमध्ये मकरंद साठे यांच्या 'अच्युत आठवले आणि आठवण' आणि 'ऑपरेशन यमू' या कादंबरीद्वयीचा या प्रकारात समावेश करता यावा.

(अवांतरः द्वंद्व नीट कसं टंकतात?)
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

साठेंचं काय करायचं...

मलाही पटकन ऑपरेशन यमू आणि अच्युत आठवले आठवले होते. पण लेखकाचे नाव काही केल्या आठवत नव्हते. गूगलले असते तर सापडले असते.

आनंदओवरी सध्या उपलब्ध आहे कां? देव चालले आणि आनंदओवरी संग्रही ठेवण्यासाठी मला विकत घ्यायची आहेत. मी खूप ठिकाणी चौकशी केली. पण मिळाली नाहीत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दि. बा. मोकाशी

'देव चालले' गेली कित्येक वर्षं अनुपलब्ध आहे. मी बहुधा मॅजेस्टिक प्रकाशनाची आवॄत्ती पाहिली होती. 'आनंदओवरी' ७-८ वर्षांपूर्वी पुनर्मुद्रित झाल्याचं स्मरतं आहे, पण बहुधा आता तेही अनुपलब्ध असावं. चू.भू.द्या.घ्या.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

 
^ वर