म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे

म्युच्युअल फंडातील गुंतवणुक या चर्चेत योगेश यांनी दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादाचा हा वेगळा लेख बनवण्यात आला आहे.

१. करबचतः
साधारणपणे एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्‍या व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी करभरणा करणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या फायद्याचा काही भाग हा कररुपाने सरकारजमा करावा लागतो. कर वजा करुन जाता राहिलेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक करता येते. अर्थात हे करभरणा करण्याचे हे तत्त्व म्युच्युअल फंडांमध्ये होणार्‍या गुंतवणुकीस लागू नाही. :)
म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्यावर काहीही कर द्यावा लागत नाही. त्यामुळे जास्त रकमेची पुनर्गुंतवणूक करणे शक्य होते. म्युच्युअल फंडांमध्ये मिळणारे डिव्हिडंड्स हे करमुक्त असतात.

गुंतवणुकदाराने त्याचे गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर म्युच्युअल फंड्स ची विक्री* केल्यास त्याला झालेल्या फायद्याचा कर-आकारणीसाठी विचार केला जातो. मात्र ही विक्री जर दीर्घकालीन भांडवली फायद्याच्या निकषानुसार योग्य कालावधीनंतर केली तर हा फायदाही करमुक्त आहे.
सध्या भारतात समभागाधारित गुंतवणुकींवर दीर्घकालीन भांडवली फायदा मोजण्यासाठीचा कालावधी हा एक वर्ष इतका आहे.

उदा. जर तुम्ही १५ एप्रिल २००७ रोजी एचडीएफसी टॉप २०० फंड विकत घेतला व १४ एप्रिल २००८ नंतर त्याची विक्री केली तर तुम्हाला होणारा फायदा हा संपूर्णपणे करमुक्त आहे. मात्र जर तुम्ही १४ एप्रिल २००८ पूर्वी त्याची विक्री केली तर होणार्‍या फायद्यावर अल्पकालीन फायद्याच्या तरतुदींप्रमाणे फायद्याच्या १०% इतका कर भरणे आवश्यक आहे.
शिवाय या अवधीमध्ये एचडीएफसी टॉप २०० या फंडाने जाहीर केलेला कोणताही डिव्हिडंड हा पूर्णपणे करमुक्त आहे.

२. व्यावसायिक व्यवस्थापनः
समभाग-रोखे बाजारातील गुंतवणूक ही अतिशय वेळखाऊ व तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करुन करण्याची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सामान्य गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीसाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ व सर्व साधने उपलब्ध असणे अतिशय अवघड असते. आपल्या पैशाच्या वृद्धीसाठी व्यावसायिक व्यवस्थापनाचा वापर करून घेण्याची संधी अतिशय कमी खर्चामध्ये गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांद्वारे मिळते.

३. सुलभ गुंतवणूकः
अनेक म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकरेज हाऊसेस, दलाल यांनी त्यांच्या ठिकठिकाणच्या केंद्रांद्वारे, इंटरनेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हे अधिक सोपे केले आहे. आगाऊ सूचनांद्वारे गुंतवणूकदार हे नियमित गुंतवणूक(एस.आय.पी.), नियमित विक्री(एस.डब्लू.पी.), व नियमित योजनाबदल(एस.टी.पी.) याचे आदेश म्युच्युअल फंड कंपन्यांना देऊ शकतात.

४. लिक्विडिटी
म्युच्युअल फंडांच्या ओपन एन्डेड योजनांची विक्री हवी तेव्हा करणे गुंतवणूकदारांना शक्य असते. समभाग बाजारातील व्यवहारांप्रमाणे या विक्रीसाठी कोणी ग्राहक मिळेल का याची चिंता करण्याची गरज नसते.

५. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन
अतिशय कमी रकमेमध्ये उत्तम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करणे गुंतवणूकदारांना शक्य होते.
उदा. इन्फोसिस या कंपनीच्या समभागाची किंमत बाजारात २००० रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे केवळ १००० रुपये असतील तर त्याला इन्फोसिसचा शेअर घेणे शक्य नाही. मात्र याऐवजी त्याने इन्फोसिसचा अंतर्भाव असलेल्या इंडेक्सवर आधारित म्युच्युअल फंडचे युनिट घेतले तर त्याच्य पोर्टफोलिओमध्ये आपोआप इन्फोसिसचा समावेश होईल.

रिलायन्स व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल सारख्या अग्रगण्य फंड हाऊसेसनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या योजनांकडे आकर्षित करण्यासाठी ५०-१०० रुपयांनी सुरू होणार्‍या समभागाधारित म्युच्युअल फंडांचा प्रस्ताव आता ठेवला आहे. यावरुन अतिशय लहान रकमेपासून समभागांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणे हे शक्य होणार आहे.

तुमच्या दुसर्‍या प्नश्नाचे उत्तर विस्तारभयास्तव या प्रतिसादात दिलेले नाही. ते वेगळ्या प्रतिसादात जसे जमेल तसे देतो.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये येणार्‍या कोणत्या सारणी(टेबल) विषयी तुम्हाला शंका आहे हे समजले नाही. या वॄत्तपत्रात सारण्याच सारण्या असतात. :)

*(येथे गोंधळ टाळण्यासाठी युनिट हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही)

चूक भूल देणे घेणे.

Comments

फायदे/गुंतवणुकीची पद्धत

योगेश, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या फायद्यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! फायदे कंपीलिंग (जबरदस्ती करणारे?:) आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी काय करावे लागेल? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची पद्धत काय आहे?

म्यु. फ. खरेदी

१. दलाल(एजंट)
२. ट्रेडिंग अकाउंट
३. बँकेच्या शाखेतून(थोडक्यात बँका दलाल)

तरी योगेश सांगेलच अधिक सविस्तर. :-)

चांगला म्यु. फ. कसा ठरवावा याबाबत काही निदर्शके (वा मानके )आहेत् काय?

अभिजित

खरेदी.

एक्स्चेंज ट्रेडेड फंडव्यतिरिक्त इतर म्युच्युअल फंड्स खरेदी साठी तुम्हाला ट्रेडिंग-डिमॅट अकाउंट असण्याची गरज नाही.
बहुतेक म्युच्युअल फंड्स कंपन्यांची सेवा केंद्रे शहरांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे दलालांकडे किंवा बँकांमध्ये जाण्याचीही गरज नाही.

म्युच्युअल फंड खरेदीसाठीचा २ पानांचा एक अर्ज भरुन देणे. ५०००० पेक्षा अधिक गुंतवणूक असल्यास पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. एकदा कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा हे ठरले की बँकेमध्ये खाते उघडण्याइतके सोपे काम आहे हे.

धन्यवाद!

अभिजित आणि शॉर्ट सर्किट महोदय, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! अभिजित यांना पडलेल्या प्रश्नासारखा प्रश्न या क्षेत्रातील सर्वच नवोदितांना पडेल असे वाटते. कृपया माहितगरांनी अधिक माहिती द्यावी.

चांगला म्यु. फं. - निकष

चांगला म्यु. फ. कसा ठरवावा याबाबत काही निदर्शके (वा मानके )आहेत् काय?

रेडिफ वर हा लेख पाहण्यात आला. यातून बरीच माहिती मिळू शकेल असे वाटते. त्यातल्या बर्‍याच गोष्टी मला समजल्या नाहीत, तज्ज्ञांनी प्रकाश टाकल्यास बरे होईल.

छान लेख

छान लेख.... आवडला... हवी ती माहीती मिळाली... धन्यवाद...

म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक..

भारतीय समभाग बाजारात आमच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास कोणत्याही म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक परतावा मिळेल/मिळतो असा आम्ही अभिमानाने दावा करत आहोत. असा व्यावसायिक पातळीवर सल्ला देणे हा आमच्या रोजीरोटीचाच भाग आहे.

अधिक माहितीकरता कृपया आमच्या हिंडत्याफिरत्या दूरध्वनीवर (९८२०४९४७२०) संपर्क साधावा ही विनंती,

तात्या.

समजलो नाही,

आम्ही ह्या वर्षीच्या पहिल्या पाच महिन्यात आमचे २०% चे वाढीचे टार्गेट अचिव्ह केले.

नीटसा खुलासा झाला नाही.

एक साधा प्रश्न विचारतो. त्याचं साधं उत्तर द्या, म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे त्याचा आम्हाला नीट खुलासा होईल.

१ जानेवारीला १०० रुपये गुंतवल्यास ५ महिन्यांच्या हिशेबाने ३१ मे रोजी त्याचे किती झाले एवढं सांगा!

१२०?

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

सल्ला

आपला सल्ला गुंतवणूकदारांसाठी कितपत खर्चिक आहे? उदा. मी १०००० रुपये तुमच्या सल्ल्याने गुंतवण्याचे ठरवले तर त्यात तुमचा हिस्सा कितपत?

गफलत

योगेश यांच्या लेखात

मात्र ही विक्री जर दीर्घकालीन भांडवली फायद्याच्या निकषानुसार योग्य कालावधीनंतर केली तर हा फायदाही करमुक्त आहे.
सध्या भारतात समभागाधारित गुंतवणुकींवर दीर्घकालीन भांडवली फायदा मोजण्यासाठीचा कालावधी हा एक वर्ष इतका आहे.

लिहिलेले समभागाव्यतिरिक्त इतर साधनांमध्ये गुंतवणूक करणार्‍या फंडांना लागू नाही. आयकर खात्याच्या धोरणांनुसार अशा म्युच्युअल फंड युनिटांची अंतिम विक्री केल्यानंतर झालेला फायदा जर दीर्घकालीन असेल तर त्यावर इंडेक्सेशन आधारे २० टक्के किंवा इंडेक्सेशन चा आधार घेतला नाही तर १० टक्के इतका कर भरणे अपेक्षित आहे.

आयकर खाते महागाई दरानुसार प्रतिवर्षी एक इंडेक्स जाहीर करत असते.
उदा. १ मे २००४ रोजी १००० रुपये इतके खरेदी मूल्य असलेले युनिट्स जर ३१ एप्रिल २००५ नंतर १२०० रु. ला विकले तर झालेल्या फायद्यावर करमोजणी ही दोनपैकी एका प्रकाराने होऊ शकते
१. इंडेक्सेशन आधारे:
२००४ चा इंडेक्स समजा ४००
२००५ चा इंडेक्स समजा ४५०

खरेदी मूल्यः १०००*४५०/४०० = ११२५
विक्री मूल्य: १२००
फायदा = १२०० - ११२५ = ७५
अपेक्षित कर: ७५ * २० % = १५

२. इंडेक्सेशन चा आधार न घेता.
खरेदी मूल्य: १०००
विक्री मूल्य: १२००
फायदा: १२०० - १००० = २००
अपेक्षित करः २०० * १० % = २०

दोन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारे करांची मोजणी करुन जो कमी असेल तो कर भरणे ही कायदेशीर मान्यता असलेली गोष्ट आहे.
समभागाधारित साधनांवर मात्र हा कर लागू नाही. आयकर कायद्यातील मूळ वाक्य खालीलप्रमाणे.

Equity shares purchased after 1st March 2003 and equity mutual funds bought after 1st October 2004 are exempt from long-term capital gains tax. The intention is to encourage long-term savings in equities.

 
^ वर