म्युच्युअल फंडातील गुंतवणुक

आज भारतामध्ये अनेक् देशी व विदेशी म्युच्युअल फंड्स् कार्यन्वित आहेत, हे आपल्यासारख्या सुजाण वाचकांना माहितच आहे. ज्यांना शेअर बाजाराचा अनुभव नाही त्यांनी या फंडांमध्ये गुंतवणुक करणे हे जास्त उचित समजले जाते. तरी एखादा म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी कसा उपयुक्त ठरवावा याबाबतचे मार्गदर्शन आपल्यातील अनुभवी व्यक्तींनी माझ्यासारख्या तरुणांना करावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. त्याकरिता खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांचा संदर्भ घेऊन मार्गदर्शन अपेक्षित आहे.
१] म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे(टॅक्सशी संबंधित)
२] गुंतवणुकीचे अन्य पर्याय व फंडातील गुंतवणुकीची सुरक्षितता
३] इकॉनॉमिक टाईम्समध्ये जी सारणी(टेबल) येते, त्यातून कोणत्या गोष्टी समजतात? त्यातील कोणत्या बाबी पाहाव्यात? त्यांचा इंपॉर्टन्स काय?
याशिवाय अन्य सदस्यांनीही काही प्रश्न मांडावेत. मला खात्री आहे की योगेश, सर्किट, तात्या(विसोबा) यांसारखे अनुभवी सदस्य उत्तम मार्गदर्शन करतील.

आपला
अनिरुद्ध दातार

लेखनविषय: दुवे:

Comments

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे

१. करबचतः
साधारणपणे एका विशिष्ट पातळीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणार्‍या व्यक्तीस प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी करभरणा करणे आवश्यक असते. गुंतवणूकदारांनी त्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीतून मिळवलेल्या फायद्याचा काही भाग हा कररुपाने सरकारजमा करावा लागतो. कर वजा करुन जाता राहिलेल्या रकमेची पुनर्गुंतवणूक करता येते. अर्थात हे करभरणा करण्याचे हे तत्त्व म्युच्युअल फंडांमध्ये होणार्‍या गुंतवणुकीस लागू नाही. :)
म्युच्युअल फंड योजनांना गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्यावर काहीही कर द्यावा लागत नाही. त्यामुळे जास्त रकमेची पुनर्गुंतवणूक करणे शक्य होते. म्युच्युअल फंडांमध्ये मिळणारे डिव्हिडंड्स हे करमुक्त असतात.

गुंतवणुकदाराने त्याचे गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य झाल्यानंतर म्युच्युअल फंड्स ची विक्री* केल्यास त्याला झालेल्या फायद्याचा कर-आकारणीसाठी विचार केला जातो. मात्र ही विक्री जर दीर्घकालीन भांडवली फायद्याच्या निकषानुसार योग्य कालावधीनंतर केली तर हा फायदाही करमुक्त आहे.
सध्या भारतात समभागाधारित गुंतवणुकींवर दीर्घकालीन भांडवली फायदा मोजण्यासाठीचा कालावधी हा एक वर्ष इतका आहे.

उदा. जर तुम्ही १५ एप्रिल २००७ रोजी एचडीएफसी टॉप २०० फंड विकत घेतला व १४ एप्रिल २००८ नंतर त्याची विक्री केली तर तुम्हाला होणारा फायदा हा संपूर्णपणे करमुक्त आहे. मात्र जर तुम्ही १४ एप्रिल २००८ पूर्वी त्याची विक्री केली तर होणार्‍या फायद्यावर अल्पकालीन फायद्याच्या तरतुदींप्रमाणे फायद्याच्या १०% इतका कर भरणे आवश्यक आहे.
शिवाय या अवधीमध्ये एचडीएफसी टॉप २०० या फंडाने जाहीर केलेला कोणताही डिव्हिडंड हा पूर्णपणे करमुक्त आहे.

२. व्यावसायिक व्यवस्थापनः
समभाग-रोखे बाजारातील गुंतवणूक ही अतिशय वेळखाऊ व तज्ज्ञ लोकांनी अभ्यास करुन करण्याची अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सामान्य गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीसाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ व सर्व साधने उपलब्ध असणे अतिशय अवघड असते. आपल्या पैशाच्या वृद्धीसाठी व्यावसायिक व्यवस्थापनाचा वापर करून घेण्याची संधी अतिशय कमी खर्चामध्ये गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनांद्वारे मिळते.

३. सुलभ गुंतवणूकः
अनेक म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकरेज हाऊसेस, दलाल यांनी त्यांच्या ठिकठिकाणच्या केंद्रांद्वारे, इंटरनेटद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हे अधिक सोपे केले आहे. आगाऊ सूचनांद्वारे गुंतवणूकदार हे नियमित गुंतवणूक(एस.आय.पी.), नियमित विक्री(एस.डब्लू.पी.), व नियमित योजनाबदल(एस.टी.पी.) याचे आदेश म्युच्युअल फंड कंपन्यांना देऊ शकतात.

४. लिक्विडिटी
म्युच्युअल फंडांच्या ओपन एन्डेड योजनांची विक्री हवी तेव्हा करणे गुंतवणूकदारांना शक्य असते. समभाग बाजारातील व्यवहारांप्रमाणे या विक्रीसाठी कोणी ग्राहक मिळेल का याची चिंता करण्याची गरज नसते.

५. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन
अतिशय कमी रकमेमध्ये उत्तम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करणे गुंतवणूकदारांना शक्य होते.
उदा. इन्फोसिस या कंपनीच्या समभागाची किंमत बाजारात २००० रुपये आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे केवळ १००० रुपये असतील तर त्याला इन्फोसिसचा शेअर घेणे शक्य नाही. मात्र याऐवजी त्याने इन्फोसिसचा अंतर्भाव असलेल्या इंडेक्सवर आधारित म्युच्युअल फंडचे युनिट घेतले तर त्याच्य पोर्टफोलिओमध्ये आपोआप इन्फोसिसचा समावेश होईल.

रिलायन्स व आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल सारख्या अग्रगण्य फंड हाऊसेसनी लहान गुंतवणूकदारांना आपल्या योजनांकडे आकर्षित करण्यासाठी ५०-१०० रुपयांनी सुरू होणार्‍या समभागाधारित म्युच्युअल फंडांचा प्रस्ताव आता ठेवला आहे. यावरुन अतिशय लहान रकमेपासून समभागांमध्ये अप्रत्यक्ष गुंतवणूक करणे हे शक्य होणार आहे.

तुमच्या दुसर्‍या प्नश्नाचे उत्तर विस्तारभयास्तव या प्रतिसादात दिलेले नाही. ते वेगळ्या प्रतिसादात जसे जमेल तसे देतो.

इकॉनॉमिक टाईम्समध्ये येणार्‍या कोणत्या सारणी(टेबल) विषयी तुम्हाला शंका आहे हे समजले नाही. या वॄत्तपत्रात सारण्याच सारण्या असतात. :)

*(येथे गोंधळ टाळण्यासाठी युनिट हा शब्द मुद्दाम वापरलेला नाही)

चूक भूल देणे घेणे.

मराठी टंकलेखनासाठी वापरा.

 
^ वर