मातृभाषाच का?

’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.

या छोट्याशा गोष्टीला मोठे यश म्हणण्याची वेळ यावी हे फारच मोठे दुर्दैव आहे. पोटासाठी धावताना आपण पायाखाली काय तुडवतो आहोत याचे भान आज भारतीयांना विशेषतः मराठी माणसांना राहिलेले नाही. आपल्या संपन्न मातृभाषेचा त्याग निव्वळ पोट भरण्यासाठी तो ही इतक्या सहजपणे करावा असे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कसे काय वाटते? हा भिकारडेपणा नसून आधुनिकतेची, प्रगतीची ओढ आहे असे म्हणावे तर त्याच वेळी हीच मंडळी अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यांना मात्र चिकटून बसतात. माझ्या मते हे सर्व बहुसंख्य असले तरी चुलीत चंदन जाळणार्‍या भिल्लिणीप्रमाणे अज्ञानी लोक आहेत. माणसाची किंवा एखाद्या जनसमूहाची जागतिक ओळख म्हणजे काय, स्वत्व, राष्ट्रभावना म्हणजे काय, आपली राष्ट्रीय संपत्ती कोणती, याचे काहीही भान यांना नाही. खरे तर १५ ऑगस्ट १९४७ च्या सकाळीच विदेशी भाषेच्या माध्यमातून शिक्षण देणे या देशात बंद व्हायला हवे होते. ते न झाल्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ लोकांना समजलेलाच नाही. चीन किंवा जपानमधे परभाषेच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देणे म्हणजे आपल्या देशाचा झेंडा खाली उतरवणे असे मानतात. परभाषा जरूर शिकावी परंतु शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असायला हवी हे भारत सोडून जगभर मानले गेले आहे. आपले शिक्षणतज्ज्ञ देखील हेच सांगत आले आहेत. त्यांची अक्षम्य उपेक्षा करण्याची परंपरा येथे आहे. सहजधनाच्या हव्यासापोटी राजकारण्यांनी शिक्षणाचे बाजारीकरण करून काळ्या पैशाचा प्रचंड स्रोत निर्माण केला आहे. कोणीही उठावे आणि भ्रष्ट राजकारण्यांचे दलालत्व पत्करून खासगी शिक्षणसंस्था काढाव्यात. साप साप करून भुई धोपटावी आणि मध्यम वर्गीयांना भयभीत करून आता फक्त इंग्रजी माध्यमच तुम्हाला तारू शकेल असा प्रचार करून पालकांना व बालकांना आपल्या कत्तलखान्यात आणून लूटमार करावी.

प्रत्येक स्वतंत्र देशाचे अस्तित्व व अस्मिता यांचे प्रतीक म्हणून तीन गोष्टी मानल्या जातात. त्या म्हणजे देशाचा झेंडा, चलन व शिक्षणाचे माध्यम मातृभाषा. ( भारतीय संविधानसुद्धा हेच सांगते. म्हणूनच तर संविधानाच्या स्वीकृतीनंतर देशातील शिक्षणाचे पायरी पायरीने मातृभाषीकरण करण्यासाठी सरकारला पंधरा वर्षांची मुदत दिली होती. ( तत्कालीन सरकारचे यात अपयश व सारवासारव हा भाग वेगळा.) यात कोणताही बदल करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नसते. जसे या देशाच्या भूमीवर प्रत्येकाने या देशाचाच झेंडा फडकविला पाहिजे. एखाद्याला दुसर्‍या देशाचा झेंडा आवडत असला तरी तो येथे फडकविण्याची मुभा नसणे हेच खरे देशाच्या स्वातंत्र्याचे लक्षण आहे. किंवा जसे या देशात या देशाच्या चलनातच अर्थव्यवहार झाला पाहिजे, त्याच प्रमाणे मातृभाषेच्या माध्यमातूनच या देशात शिक्षणव्यवहार झाला पाहिजे. ज्यांना या देशात आपसात डॉलरमध्ये व्यवहार करावयाचा आहे त्यांनी तो करावा असे जर स्वातंत्र्य दिले तर अर्थव्यवस्थेची काय अवस्था होईल तीच आज शिक्षणव्यवस्थेची झाली आहे. शिक्षणाचे माध्यम या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक देशांतर्गत देश तयार झाला आहे. राष्ट्रभावना ही खिल्ली उडवण्याची गोष्ट बनली आहे. गुलामगिरी भूषणावह मानली जात आहे. या देशावरची निष्ठा, प्रेम, बंधुत्व यांची तसेच इथल्या समृद्ध परंपरांशी इमान राखण्याची प्रतिज्ञा इथल्या बालकांना एका परभाषेतून घ्यायला लावणे; व ही गोष्ट कोणालाही हास्यास्पद व लाजिरवाणी न वाटणे हे राष्ट्रीय अस्मितेचा सार्वत्रिक लोप झाल्याचे अत्यंत दुर्दैवी ठळक लक्षण आहे. या सर्व गोष्टींचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षणव्यवहाराला असलेली परभाषेतून - इंग्रजीतून शिक्षणव्यवहाराची दुष्ट समांतर शिक्षणव्यवस्था! भारत हा जर का एक स्वतंत्र व सार्वभौम देश असेल तर या भूमीवर सर्व स्तरांवरील शिक्षण फक्त आणि फक्त मातृभाषांमधूनच (ज्या भाषेच्या निकषावर प्रत्येक घटक राज्याची निर्मिती झाली त्या भाषेतून) झाले पाहिजे. तरच प्रत्येक भाषेचा, लोकांचा व या देशाचा विकास होणार आहे. या देशातील काही नागरिकांनी जगातील धनिक देशांची सेवा करून मिळवलेले धन म्हणजे देशाचा विकास असे चुकीचे चित्र आज निर्माण केले जाते आहे. फार तर तो त्या व्यक्तींचा तोही फक्त आर्थिक विकास म्हणता येईल. हा देश म्हणजे विकसित देशांना सेवक पुरवणारी कंपनी आहे काय? सर्व भारतीय म्हणजे तिचे नोकर आहे काय? ज्यांना परभाषेतूनच शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी परदेशात जाऊन ते खुशाल घ्यावे.

याला घेण्यात येणारे सर्व आक्षेप हे अज्ञान व गुलामगिरीची मानसिकता यांतून घेतलेले असतात. किंबहुना प्रत्येकाने मतप्रदर्शन करण्याचा हा विषयच नाही. जगाच्या नकाशावर जेंव्हा एखादे नवीन राष्ट्र जन्माला येते तेंव्हा वरील बाब अध्याहृतच असते. अन्यथा कशासाठी हाकलून दिले इंग्रजांना एवढा प्रदीर्घ लढा देऊन आणि हजारो भारतीयांनी आपले प्राण देऊन; आणि आज हेच जर करायचे होते तर काय वाईट होते त्यांचे राज्य?

गुलामगिरीची मानसिकता हा एक हळूह्ळू जडणारा व पसरत जाणारा रोग असतो. हा रोग सामाजिक व मानसिक असल्याने रोग्याच्या लक्षात येत नाही. याशिवाय ध्येयहीन व भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना अशा रोग्यांवर राज्य करणे सोपे जात असल्याने ते गुलामगिरीच्या मानसिकतेला उत्तेजनच देतात.

शिकण्यासाठी कोणती भाषा सोपी व कोणती अवघड, किंवा कोणती सोयीची-गैरसोयीची हा येथे मुद्दाच होऊ शकत नाही. चिनी किंवा जपानी भाषा, लिप्या काय इंग्रजीपेक्षा सोप्या व सोयीच्या म्हणून ते देश त्यांच्या भाषेतूनच शिक्षणव्यवहार करतात की काय? मुद्दा अस्मितेचा व राष्ट्रीय, सांस्कृतिक अस्तित्वाचा आहे. --शिक्षणासाठी जेंव्हा मूल घराबाहेर पडते तेंव्हा मूल व समाज, मूल व देश यांची घट्ट सांगड घालण्याचे महान साधन म्हणजे मातृभाषा! मातृभाषेमधून शिक्षण! ते त्यांच्या देशात कसोशीने पाळले जाते. जगामध्ये आमची ही भाषा बोलणारे आणि या भाषेमधून व्यवहार करणारे आम्ही हा एक एकजिनसी समाज आहे. ही आमची जागतिक ओळख आहे. जगातल्या ज्यांना आमच्याशी व्यवहार करायचा असेल त्यांनी आमची भाषा शिकावी. ही भूमी हे आमचे घर आहे. हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे हे प्रत्येक बालकावर जन्मल्यापासून मातृभाषेचा सन्मान केल्यामुळे बिंबवले जाते.

आता आपण भारतीय काय करतो ते पाहू. खोट्या कल्पनांपायी आदर्श समाज निर्मितीचे हे महान साधन आम्ही कचर्‍यात फेकून मातृभाषेमधून शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना भारताच्याच भूमीवर निव्वळ शिक्षणाच्या माध्यमाच्या निकषावर दुय्यम दर्जाचे, नीच शैक्षणिक जातीचे ठरवतो. इथे परभाषेतून शिक्षण देऊन आम्ही बालकांना हे शिकवतो की तू उच्च शैक्षणिक जातीचा असून त्या लोकांसाठी आहेस जे इथे नाहीत, परदेशात आहेत. ते तुझे आप्त आहेत जरी ते तुला त्यांचे आप्त मानत नसले तरी. म्हणून तुला त्यांच्या भाषेमधून आम्ही शिकवतो आहोत. या देशात तू राहात असलास तरी इथल्या लोकांची भाषा, संस्कृती तुला शिकण्याची आवश्यकता नाही. ते तुझे कोणीही नाहीत. त्यांच्यात आणि तुझ्यात संवाद होण्याचीही काही गरज नाही. त्यांची भाषा, आचार-विचार, संस्कृती यांच्याशी तुला फारकत घ्यावयाची आहे. हा सर्व त्याग तुला तुझ्या जलद व्यक्तिगत आर्थिक समृद्धीसाठी करावयाचा आहे. कारण जगात तेच फक्त महत्वाचे आहे. तुझ्या प्रत्येक पाठ्यपुस्तकात छापलेली प्रतिज्ञा अर्थ लक्षात घेण्यासाठी नाही. कारण ती याच्या पूर्णपणे विपरीत असून केवळ नियमांच्या पूर्ततेसाठी आहे.

हे ज्यांना पटते त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींवर असे दडपण आणणे आवश्यक आहे की गुलामगिरीच्या मानसिकतेचा रोग न जडलेले आम्ही बरेच लोक या देशात आहोत. इंग्रजी ही भाषा राजकीय पारतंत्र्याची दीडशे वर्षे अधिक भाषिक पारतंत्र्याची त्रेसष्ठ अशी दोन शतकांहून अधिक काळ जनतेवर लादूनसुद्धा या देशातील जनतेत शिक्षणाचे माध्यम म्हणून अजिबात रुजलेली वा स्वीकारली गेलेली नाही. ज्या थोड्यांनी स्वीकारली आहे ते भयभीत व प्रवाहपतित आहेत. या देशातील २० टक्के लोकांना सुद्धा ती येत नाही. तेंव्हा ती लोकांच्या माथी मारण्याचा प्रयोग आता बंद करावा. कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही पातळीवरचे शिक्षण या देशात फक्त आणि फक्त मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे हे कितीही अवघड व विचित्र वाटले तरी घडलेच पाहिजे. तेंव्हा खासदारांच्या पगारवाढीच्या विधेयकाप्रमाणे हे विधेयक मांडून एकमताने संमत झाले पाहिजे. गोष्ट सोपी नसली तरी अशक्यही नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

मातृभाषेच्या ठेकेदारांच्या सनातनीपणाचे व अहंगंडाचे काय करायचे?

शिक्षण हे मातृभाषेतून हवे हे निर्विवादरित्या मान्य आहे. प्राथमिक पातळीवर तर ते मातृभाषेतूनच हवे.
मराठी बोलणाऱ्या कुटुंबात वाढणाऱ्या अपत्याचे जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु होते तेव्हा त्याचा भावनिक कोंडमारा होतो. त्याचा इंग्रजी संकल्पना समजून घेण्याचा प्रवास मराठी संकेत- इंग्रजी अर्थ -इंग्रजी संकेत या व अशा आडवळणांच्या मार्गाने चालतो.
उदा. त्याला स्काय शब्द शिकायचा तर स्काय शब्द ऐकल्याबरोबर पहिल्यांदा तो त्याचा मराठीतला अर्थ शोधतो जेव्हा आकाश हा शब्द सामोरा येतो तेव्हा कुठे मग स्काय ही संकल्पना स्पष्ट होते.

पण मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी ज्यांच्या कडे आहे त्यांना जगात जे काय श्रेष्ठ आहे ते आपल्याच कर्तृत्वाने कसे आहे हे लांड्यालबाड्या करुन का होईना जागोजाग पटवून द्यायची सवय जडलेली आहे. त्यामूळे जेव्हा विज्ञान मराठी भाषेतून शिकायचा प्रश्न येतो तेव्हा मराठी रुपांतर करतांना अवाजवी सनातनीपणा केल्याने व्यवहारात बोलल्या ऐकल्या जाणाऱ्या मराठी विज्ञानापेक्षा हे मराठीतले विज्ञान म्हणजे बोजडपणाचा उत्तम नमुना ठरते. यातली भाषा मराठी असते पण ती मातृभाषा मराठी नक्कीच नसते.
उदा. सनातनी पणाने इंग्रजी भाषेतील शब्दांचा मराठीत केलेला अनुवाद पहा
कॉम्प्यूटर - संगणक, डिस्क- चकती, टायपिंग-टंकलेखन, किबोर्ड-कळफलक, ऑपरेशन-शल्यचिकित्सा, आयसीयू- अतिवदक्षता कक्ष, सुपरवायझर- पर्यवेक्षक
या सर्व शब्दांपैकी जे मूळ इंग्रजी शब्द आहेत तेच वापरुन मराठी बोलली जाते. ती मराठीच असते इंग्रजी नव्हे.

मराठी भाषांतर करुन कायदा, विद्यूत अभियांत्रिकी (?) या विषयांवरची लिहीलेली पुस्तके वाचली की हा बोजडपणा अधिक प्रकर्षाने जाणवतो.
ज्या बाबी मूळात पाश्चात्य किंवा इंग्रजी जगतातल्या आहेत त्या फक्त लिपि व उच्चारात किरकोळ फेरफार करुन वापरल्या तर मराठी भाषेत विज्ञान व इतर तत्सम शाखांमधले ज्ञान घेणे अधिक सुलभ होईल.

१००+ सहमत

१००+ सहमत. उत्तम प्रतिसाद.

लेख

विज्ञान शाखेत भरपूर नवीन लेख/पुस्तके/मासिके प्रसिद्ध होत असतात. ही बहुतेक करून इंग्रजीत असतात. विज्ञान मराठीतून शिकलेल्यांनी याचा लाभ कसा घ्यावा? त्यांच्यासाठी यांचा अनुवाद कोण करणार?

चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी सगळीकडे पूर्ण देशात एकच भाषा आहे. आपल्याकडे २५-३० अधिकृत आहेत. मराठीतून विज्ञानाचे शिक्षण घेतलेला आणि कन्नडमधून विज्ञानाचे शिक्षण घेतलेला असे दोन लोक एकत्र आले तर त्यांनी संवाद कसा साधायचा?

चीन, जपान मध्ये इंग्रजी नाही याचे आणखी एक कारण म्हणजे तिथल्या लोकांना इंग्रजी शिकण्यात अडचणी येतात. यासाठी जगभर संपादन करणार्‍या कंपन्या निघाल्या आहेत. चिनी/जपानी लोकांना इंग्रजी मासिकात निबंध पाठवायचा असेल तर ते आधी या कंपन्यांकडे पाठवतात. या कंपन्या त्यातील भाषा सुधारून देतात. सुदैवने भारतीयांना असे करण्याची पाळी येत नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

भाषाशिक्षण आणि भाषेतूनशिक्षण

विज्ञान शाखेत भरपूर नवीन लेख/पुस्तके/मासिके प्रसिद्ध होत असतात. ही बहुतेक करून इंग्रजीत असतात.

हे म्हणणे मान्य पण मराठीतून किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतून जेव्हा विज्ञान शिकले जाते तेव्हा त्यातला मूळ शब्द संग्रह जो की बहूतेक करुन (वैज्ञानिक प्रगतीचे आद्यस्थान असल्याने) युरोपीय भाषांमधून येतो तो किरकोळ उच्चार व लिपीतले बदल करुन वापरला आणि इंग्रजीचे फक्त एक भाषा म्हणून (जसे की आजही घेतले जाते) शालेय जीवनात शिक्षण घेतले तर असे लेख किंवा मासिके इत्यादी वाचायला व समजून घ्यायला अडचण येणार नाही.

उदा.
Photosynthasis means the process in which light energy is transfer in to chemical energy with the help of chlorophyll.

या वाक्यातले फोटोसिंथेसिस आणि क्लोरोफिल हे शब्द जसेच्या तसे ठेऊन ही संकल्पना आपण मराठीतून शिकलेलो असलो आणि इंग्रजी फक्त एक भाषा म्हणून शिकलेलो असलो तरी चटकन लक्षात येते.

मूळात फोटोसिंथेसिस म्हटले की उर्जा रुपांतरणाची प्रक्रिया मनासमोर यायला हवी त्यात फोटोसिंथेसिसचा मराठी अर्थ प्रकाशसंश्लेषण, क्लोरोफिल चा अर्थ हरितद्रव्य (की लवके) आणि मग सारी प्रक्रीया असा किचकट प्रवास करायची गरजच नसावी.

इंग्रजीतले असे शब्द मराठीत भरमसाठ आले तर मूळ मराठी राहील का असा प्रश्न यावर हमखास येतो.
पण मूळ भाषा म्हणजे भाषेचे व्याकरण, त्यातली शब्दसंपत्ती तर भाषेला समृद्ध करते.
(पण संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार)
जोपर्यंत हे व्याकरण, भाषा व्यवहार करणाऱ्यांची भाषेची रुपे सुलभ करण्याची प्रवृत्ती (प्रमाणीकरणा वाल्यांच्या प्रमाण भाषेत गावंढळपणा) जो पर्यंत कायम आहे तो पर्यंत भाषा वेगवेगळी वळणे घेत समृद्ध होत राहणारच. पण आहे ते आपल्यापूरते मर्यादित ठेवण्याच्या अप्पलपोटेपणापोटी (मराठी भाषेतले तत्सम व तद्भव शब्द कोठले हे फक्त ठराविक लोकांनाच माहित असते परिणामी शुद्ध मराठी आम्हीच समजू शकतो हे ही आलेच) विज्ञान हवे इंग्रजीतूनच अशी भूमिका येते.

कालच कलेक्टरच्या पी.ए.ची आपाईंटमेंट घेऊन आलो. पूढच्या महीन्यात सेकंड विकला तुमचे काम सक्सेस होईलच अशी ग्यारंटी देलीय तेनं.
असं सहजपणाने बोलणारा सामान्य मराठी शेतकरी वर्गातल्या माणसाच्या घरातली मूलं फक्त भाषा म्हणून जरी इंग्रजी शिकले तरी चालेल.
इंग्रजी भाषेतून शिक्षण हा आग्रह नकोच.

जबरदस्त प्रतिसाद!

जबरदस्त प्रतिसाद!

फारच सुंदर. वाह.

फारच सुंदर. वाह.

सहमत

हे म्हणणे मान्य पण मराठीतून किंवा जगातल्या कुठल्याही भाषेतून जेव्हा विज्ञान शिकले जाते तेव्हा त्यातला मूळ शब्द संग्रह जो की बहूतेक करुन (वैज्ञानिक प्रगतीचे आद्यस्थान असल्याने) युरोपीय भाषांमधून येतो तो किरकोळ उच्चार व लिपीतले बदल करुन वापरला आणि इंग्रजीचे फक्त एक भाषा म्हणून (जसे की आजही घेतले जाते) शालेय जीवनात शिक्षण घेतले तर असे लेख किंवा मासिके इत्यादी वाचायला व समजून घ्यायला अडचण येणार नाही.

मान्य पण प्रत्यक्षात असे होत नाही. विज्ञान मराठीतून म्हणजे सर्व शब्दांचा अनुवाद केलाच पाहिजे असा अट्टाहास होतो आणि वाक्ये कळायला अवघड जातात. मघाशीच पलिकडच्या टेबलावरचा लेख वाचताना परिसरण, परियोजन हे सगळे बाउन्सर गेले. एका संकेतस्थळावर वापरला जाणारा नि:स्सारण हा ही शब्द तसाच.

(पण संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार)
संपूर्ण सहमत. यावर लोक म्हातारे होईपर्यंत चर्चा झाल्या आहेत. मुळात मारून मुटकून भाषाशुद्धी करता येते हा भ्रम आहे. किंबहुना भाषेला शुद्धीकरणाची गरज असते हा ही भ्रम आहे.

इंग्रजी भाषेतून शिक्षण हा आग्रह नकोच.
मान्य. माझे १० पर्यंतचे शिक्षण मराठीतच झाले आहे. पण भारतातील इतर भाषिक लोकांशी आणि जगातील विज्ञान शाखेतील लोकांशी संपर्क ठेवायचा असेल तर इंग्रजीतूनही विज्ञान मांडता यायला हवे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हेच

विज्ञान मराठीतून म्हणजे सर्व शब्दांचा अनुवाद केलाच पाहिजे असा अट्टाहास होतो आणि वाक्ये कळायला अवघड जातात.

हेच मला म्हणायचे आहे.

इंग्रजीतूनही विज्ञान मांडता यायला हवे.

तुम्ही एक भाषा म्हणून इंग्रजीचे शिक्षण घेतलेले असले आणि तुम्ही युरोपियन शब्द संकल्पना फक्त लिपी बदलून वापरत असाल हे मांडता येईल. साधी गोष्ट पहा कढी ला पर्यायी शब्द शोधतांना इंग्रजांनी त्याचे त्यांच्या उच्चारणतंत्राच्या सुलभतेनुसार करी केले. आम्ही गावंढळ लोकांनीही आता पर्यंत टाईम चे टैम, इलेक्ट्रीक चे विलेक्ट्रीक असे सुलभीकरण केले आहे. पण हे अशुद्ध समजले जाते.

इंटरनेटवरील बहूतांशी मराठी मंडळी ब्राउजर्स, इमेल, इंटरनेट, ब्लॉगिंग हे शब्द सहजपणाने मराठी भाषेतील संभाषणातून वापरत आहेत. ह्यामूळे भाषा अधिकाधिक सक्षम बनते आहे. पण
ब्राउजर्सच्या ऐवजी मी आत्ताच आंतरजाल न्याहाळक असा शब्द वाचला उद्या मायक्रोसॉफ्टचे सुक्ष्मगुळगुळीत कींवा तत्सम रुपांतर ऐकायला मिळू शकते. आता बोला.

यावर

यावर कितीतरी वेळा चर्चा झाली आहे. सुदैवाने भाषा "शुद्धीकरण" करणार्‍यांवर अवलंबून नाही. तिची प्रगती आपोआप होते आहे.

इंटरनेटवरील बहूतांशी मराठी मंडळी ब्राउजर्स, इमेल, इंटरनेट, ब्लॉगिंग हे शब्द सहजपणाने मराठी भाषेतील संभाषणातून वापरत आहेत. ह्यामूळे भाषा अधिकाधिक सक्षम बनते आहे. पण ब्राउजर्सच्या ऐवजी मी आत्ताच आंतरजाल न्याहाळक असा शब्द वाचला उद्या मायक्रोसॉफ्टचे सुक्ष्मगुळगुळीत कींवा तत्सम रुपांतर ऐकायला मिळू शकते. आता बोला.
युट्युबचे तूनळी असे रूपांतर ऐकले की मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

फरक

विशेषनामांचे भाषांतर करणे चूकच आहे. सामान्यनामांचे भाषांतर रूढ होते की मूळ शब्द स्वीकारला जातो ते लोकांना वाटलेल्या सुलभतेनुसार ठरेल. जर शब्द हळूहळू प्रसारित झाला असेल, उदा. संस्कृतोद्भव शब्द आवडणार्‍या गटांनी एखाद्या नव्या तंत्रज्ञानाची चर्चा करताना 'सावरकरी' शब्द वापरण्यास सुरुवात केली असेल, तर सामान्यांना तो शब्द वापरण्याची गरज भासेल तेव्हा एक-एक सामान्य व्यक्ती विरुद्ध बहुमत अशा परिस्थितीत मतदानाने तो शब्दच टिकून राहील. एखादे तंत्रज्ञान जेव्हा थेट लोकांमध्येच मुक्त केले जाईल तेव्हा मूळ पारिभाषिक शब्दच निवडला जाईल असे वाटते.

किंवा

गूगलसारखी एखादी सेवा सर्वव्यापी होते तेव्हा लोक आपोआप गुगलणे सारखी क्रियापदे वापरू लागतात.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मलाही

युट्युबचे तूनळी असे रूपांतर ऐकले की मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते.

युट्यूबचे तूनळी, विकेंडला विकांत, थँक्यू ला धन्यू हे सगळेच मला अंगावर पाल पडल्यासारखे वाटते.
विकांत म्हंटले की हा कोणी श्रीकांतचा भाऊ असल्या सारखे वाटते.

मजकूर संपादित.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

अधोविश्व

आज सकाळमध्ये अंडरवर्ल्ड या म्लेच्छ शब्दाला अधोविश्व हा प्रतिशब्द वाचला आणि आमची पंचेद्रिये धन्य जाहली. विश्व म्हणजे युनिव्हर्स, वर्ल्ड म्हणजे जग असा कांगावा करण्याचा प्रयत्न आमच्या मेंदूने केला पणा आम्ही तत्काळ त्याचा क्रीडाध्वनी केला (गेम वाजवली). अतिदक्षता विभागात असलेल्या मायमराठीला मिळणारी ही प्राणवायूची पिंपे पाहून आमचा आणंद मणात माइणा.

कुणाला श्री. रा. रा. दाउदभाय यांचा पत्ता माहित असल्यास व्यनि करावा. शब्दसूची तयार झाल्यावर त्यांना सूचीबद्दल सूचित करण्याचा मानस आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

विश्व आणि जग

भावनेच्या दृष्टीने मला या दोन संकल्पना फारशा वेगळ्या वाटत नाहीत.

मराठीत "विश्वशांती" आणि इंग्रजीत "वर्ल्डपीस" हे शब्दप्रयोग मला साधारण एकसारख्या अर्थाचे भासतात. आता मराठी बोलताना लोक पृथ्वीबाहेरील ग्रहांशीसुद्धा शांती इच्छितात, इंग्रजी बोलताना फक्त पृथ्वी-जगातील लोकांशीच शांती इच्छितात असे कोणी साधार सांगेल. पण मी फक्त हो-ला-हो म्हणून मान डोलवेन.

नाहीतरी "खालचे जग" हा अर्थ रूपकात्मक/लाक्षणिकच घ्यायचा आहे. (हे खालचे वर्ल्ड तरी कशाच्या खाली आहे?) "खालचे विश्व" म्हटले तरी अर्थ अलंकारिकच आहे.

क्रीडाध्वनी करणारे तुमचे मन सुज्ञच म्हणावे :-)

निओलॉजिझम

नवे शब्द, नवे अर्थ, प्रसविताना विरोध अनुभवण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. कोण जिंकेल, जिंकावे याचे फारसे नियम नाहीत असे वाटते.

मान्य

धनंजय आणि रिकामटेकडा,
सहमत आहे. फक्त अंडरवर्ल्ड हा रूळलेला शब्द असताना अट्टाहासाने अधोविश्व असा शब्द वापरणे थोडे वैतागवाणे वाटले. इंग्रजीमुळे मराठी भ्रष्ट होते, संस्कृतमुळे नाही हा त्यामागचा विचार आहे असे वाटते. अधोविश्व म्हटल्यावर दाउद मयसभेमध्ये मुकुट आणि हिरेजडित अलंकार घालून सिंहासनावर विराजमान झाला आहे असे काहीतरी वाटते. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

सहमत

संस्कृत शब्दानी भाषा समृद्ध होते आणि इंग्रजी, फार्सी शब्द भाषेचे प्रदुषण करतात हा दुटप्पीपणा आपण कधी सोडणार

त्रिवार सहमत!

बाकी इतर भाषिक शब्द जेव्हा जसेच्या तसे येतात तेव्हा खटकतात परंतू हळुहळू रुळले की त्याचे मराठीकरण आपोआप होते. जसे टेबल हा शब्द टेबल्सवर असा लिहिला तर इंग्रजी झाले पण टेबलांवर लिहिताच तो मराठी होतो . थोडक्यात परभाषिक शब्दांचे मराठीकरण होईपर्यंत वाट पाहवी लागते पण आपल्या शैलीत नियमित वापरले की त्या शब्दांचेही मराठी करण होते.

**बाकी जपानी भाषेत तांत्रिक दस्तऐवज आहेत मग आपल्यात का नाहित? हा प्रश्न विचारणार्‍यांना हे ही माहीत असेलच की जपानीमधे इतर भाषेतील शब्द उघडपणे वापरले जातात. फक्त ते ओळखु यावेत म्हणून ते काताकाना या वेगळ्या लिपित लिहिले जातात. उदा. कंप्युटर = कांप्युता, दिल्ली = देर्री , इंडीया = इंन्दो, चॉकलेट = चोकोरेतो वगैरे वगैरे**

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

समजले नाही

तुमचा आग्रह समजला नाही. दोन वेगवेगळे मुद्दे आहेत.

  • पारिभाषिक शब्दांचे पर्यायी शब्द संस्कृतोद्भव असल्यामुळे 'मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी' नसलेल्या समाजांना समजत नाहीत.

हे पटले नाही. 'नेत्रकाचांभ द्रव' हा शब्द 'मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी' असलेल्या घरातील मुलालाही दुर्बोध आहे. संस्कृत भाषेचे शालेय शिक्षण आठवीपासून दिले जाते. तोपर्यंत कोणत्याही मुलाला त्या शब्दाचा 'डोळ्यातील काचेसारखा पण पातळ (द्रव) पदार्थ' हा अर्थ समजणार नाही. तो शब्द एक विशेषनाम म्हणून स्वीकारला जातो. त्यांना 'विट्रिअस ह्यूमर' आणि 'नेत्रकाचांभ द्रव' यांपैकी एक शब्द घोकावाच लागेल. मुळात, इंग्रजीतील तांत्रिक शब्दसुद्धा ग्रीक आणि लॅटिनोद्भव असतात. तेथील मुलांना त्यांचे अर्थ समजून घेण्याची गरज भासत नाही.

  • 'मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी' नसलेल्या समाजांना प्रमाण मराठी भाषा समजत नाही.

सुलभ भाषेत मर्यादित ज्ञानच व्यक्त करता येते. वैज्ञानिक माहितीचे आदानप्रदान कोणत्याही प्रमाणभाषेत करता येईल. नवे (तांत्रिक) पारिभाषिक शब्द जरी मराठीत जसेच्या तसे वापरले तरी मराठीचे व्याकरण प्रमाण असल्याशिवाय नेमके विचार व्यक्त करता येणार नाहीत. पण 'मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी' नसलेले समाज मराठीच्या व्याकरणापासूनही वंचित होतेच ना? म्हणजे त्यांना इंग्रजी किंवा मराठी यांपैकी एका भाषेचे व्याकरण शिकावेच लागेल. किंबहुना जर इंग्रजीला ज्ञानभाषा केले तर व्याकरण शिकण्याचा त्यांचा 'हँडिकॅप' हा 'मराठी भाषाव्यवहाराची अघोषित मालकी' असलेल्या समाजांनाही लागू होईल (कारण "मराठी बोलणाऱ्या कुटुंबात वाढणाऱ्या अपत्याचे जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरु होते तेव्हा त्याचा भावनिक कोंडमारा होतो." हे वाक्य त्यांनाही लागू आहे.) आणि मग एक 'इव्हन प्लेईंग फील्ड' होईल. अर्थात ते क्रूरपणाचे होईल, त्यापेक्षा आरक्षणे वगैरे मार्ग अधिक चांगले आहेत.

तरीही, शालेय शिक्षण मातृभाषेतून द्यावे हे पूर्णपणे मान्य आहे.

सापेक्षता

सापेक्षता कोणीच कशी लक्षात घेत नाही? आपला मुद्दा बरोबर आहे असे मराठी मन म्हणते, पण संस्कृती वगैरे म्हणाल तर हे सापेक्ष आहे हो.
१००० वर्षापूर्वी प्राकृत अस्तित्वात होती, ५००० हजार वर्षापूर्वी संस्कृत अस्तित्वात होती, मग तुम्ही जिला मातृभाषा म्हणत आहात ती सापेक्ष आहे, आणि तिचे हे रूप म्हणजे संस्कृतमधील कालानुरूप बदल आहे, तो बदल केवळ या भूमीवरील लोकांनी 'सोयीसाठी' केला असेल तर अस्मिता कुठे आहे त्यात?

'सोय' नाही उत्कर्ष महत्वाचा आहे, त्यामध्ये तेच चाक २ वेगळ्या भाषेत बनवायचे कि चाकापासून उर्जा निर्माण करायची हे समजणे महत्वाचे आहे.

आणि मग भाषेवरून भांडणे आणि दुफळी हे तर आपले जन्मतः हक्क आहेत.

भाषा टिकवणे किवा तिचे सौंदर्य वाढवणे महत्वाचे आहे, पण असा अट्टाहास किती उपयोगाचा आहे?

अस्मिता

आपला सापेक्षतेचा मुद्दा सर्वच देशांना लागू आहे. भाषेत जे कालानुरूप बदल झाले त्या एकेका बदलाला शेकडो वर्षे लागली. कोणीही एकाने आपल्या हयातीत बदल केले नाहीत. शिवाय ते लोकांनीच वेळोवेळी आपली अस्मिता जपण्यासाठीच केले. त्यामुळे अस्मिता ही आहेच.

उर्जा ;)

तेच चाक वेगळ्या भाषेत बनवायचे कि चाकापासून उर्जा निर्माण करायची हे समजणे महत्वाचे आहे.

छे हो. आम्ही पहिल्यांदा त्याला चक्र म्हणू आणि मग बघू पुढे काय ते.

;)

मी तर म्हणतो

मी तर म्हणतो की आपली मराठी ईतकी सम्रूद्ध व्हावी की, ती ईंग्रजी प्रमाणे ती जगभर प्रसारीत व्हावी. पण महाराश्ट्र् हा वेगळा देश झाल्या शिवाय कसं शक्य आहे. अर्थात मी काही फुटीरवादी नाही. पण या भारत देशात महाराश्ट्र देशाची नेहमिच गळचेपी होत आहे. किंबहुना आपणच ती करून घेत असतो. ईतर भाषा आपापल्या डौलाने राहतात. सर्व हिंदी चित्रपट तमिळ, तेलुगु ई. भाषेत प्रसारीत होतात. मराठीत ते झालेले मी पाहीलेले नाही. ऊलट मराठी चित्रपटात व गाण्यात हींदी अढळते.

आता निव्वळ चर्चा करून उपयोगी नाही, क्रुति करायला हवी, आपण मराठी सम्रुद्ध करायला हवी. आपण मराठी भाषा जास्तित जास्त वापरात आणली पाहीजे.

प्रत्येक स्वतंत्र देशाचे अस्तित्व व अस्मिता यांचे प्रतीक म्हणून तीन गोष्टी मानल्या जातात. त्या म्हणजे देशाचा झेंडा, चलन व शिक्षणाचे माध्यम मातृभाषा. महाराष्ट्राला देखील ते होते. ही बाब आपण विसरून चालणार नाही.

पुर्वी मराठी टापांनी गाजवलेला व आज कुरतडुन वाट्याला आलेला महाराष्ट्र नावाचा तुकडा!!!

बाकी लेख उत्तम आहे. प्रश्नच नाही

कोणाचे मन दुखावले असेल तर जाहीर माफी.

उपक्रमावरील पूर्वीचा लेख

उपक्रमावरील पूर्वीचा एक लेख आणि हा लेख यांच्या आशयात साम्य दिसले.

त्या लेखातील हा प्रतिसाद मला आवडला होता.

चीन किंवा जपानमधे परभाषेच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देणे म्हणजे आपल्या देशाचा झेंडा खाली उतरवणे असे मानतात.

चीन आणि जपानबद्दल आपण लिहिता त्याबद्दल मला कुतुहल आहे. चीनमध्ये नेमक्या किती अधिकृत भाषा आहेत? मँडेरिन, कँटोनिज, पिंग, यीन अशी काहीशी नावे मी ऐकली आहेत. जपानचे तर मला काहीच माहित नाही पण तेथेही एकापेक्षा अधिक अधिकृत भाषा आहेत का? असल्यास नेमक्या किती भाषांतून शिक्षण उपलब्ध आहे आणि असल्यास त्या विद्यार्थ्यांना चीन मधल्या चीनमध्ये पण वेगवेगळ्या प्रदेशांत व्यवसाय-नोकरी करताना भाषेची अडचण जाणवते का? ती अडचण ते कशी निवारतात?

देशाचा झेंडा, चलन व शिक्षणाचे माध्यम मातृभाषा.

देशाचा झेंडा एक असतो. चलन एक असते. (काही अपवाद असतील तर कल्पना नाही.) आपल्या देशाची मातृभाषा कोणती बरे?

बायदवे, माझ्या सासरची मातृभाषा तुळू आहे पण या भाषेला स्वतंत्र लिपी नाही. कर्नाटकातल्या एका भागात ही भाषा बोलली जाते. आपल्या कोकणीचेही तसेच. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर या मुलांना नेमका कर्नाटक आणि महाराष्ट्रातच (स्वतःच्या राज्यातच) कसा कसा फायदा होईल ते विशद करावे. महाराष्ट्रातच १०-१५ (आकडा सपशेल चुकीचा असावा) "मातृ"भाषा बोलल्या जात असतील तर त्या समृद्ध करणे, त्यातील पाठ्यपुस्तके निर्माण करणे, शिक्षक निर्माण करणे वगैरे वगैरे साठी अंदाजे किती खर्च येईल?

तसेच, मातृ आणि पितृभाषा वेगवेगळ्या असल्यास मातृभाषेतूनच शिक्षण का द्यावे हे देखील समजवावे.

उत्तर

भारत हा अनेक घटक राज्यांचा मिळून बनलेला देश आहे. प्रत्येक घटक राज्य हे तेथे व्यवहारात येणार्‍या अधिकृत प्रमाण भाषेच्या निकषावर बनलेले आहे. तेंव्हा मातृभाषा याचा अर्थ या देशात ज्या भाषेच्या निकषावर घटक राज्याची निर्मिती झाली त्या राज्यात ती भाषा असा आहे. तसा लेखात उल्लेखही आहे. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या भागात राजभाषेशी साम्य असलेल्या इतर अनेक भाषा बोलल्या जातात. राज्यांच्या निर्मितीच्यावेळी त्या भाषांचा स्वतंत्रपणे विचार केला गेलेला नाही. किंवा तशी मागणीही तेथील लोकांनी केलेली नाही. व्यवहाराच्या दृष्टीने त्या भाषा राजभाषा होऊ शकत नसल्याने शिक्षणाचे माध्यम या बाबतीत त्या राजभाषेत विलीन झाल्या असे मानण्याचे धोरण आहे व ते बरोबरच आहे. प्रस्तुत लेखकाची मराठी इतकीच इंग्रजीही एक भाषा म्हणून आवडती आहे व तिच्यावर प्रभुत्वही आहे. हा लेख स्वतःपुरता विचार करून लिहिलेला नाही. चिनी, जपानी राज्यकर्ते किंवा तिथले शिक्षणतज्ज्ञ हे बुद्धू असल्याने त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून त्यांच्याकडे मातृभाषा हेच माध्यम आहे असे म्हणायचे आहे का? या देशात ईंग्रजी कोणालाही येता कामा नये असे मी लेखात कुठेही म्हटलेले नाही. इंग्रजी ही एक भाषा विषय म्हणून शिकणे पुरेसे आहे व त्याने भिन्न राज्यातल्या दोन व्यक्ती सहज संवाद साधू शकतात. मातृ - पितृभाषा हा शब्दांचा खेळ आहे. उत्तर देण्याच्या लायकीचा मुद्दा नाही.
खर्चाचे म्हणाल तर तुम्ही घरी स्वयंपाक करून पुरेसे जेवता ना? अंगभर कपडे घालता ना? की खर्च नको म्हणून दुसर्‍यांचे कपडे घालता? दुसर्‍यांकडे जेवता?

मातृभाषा

महाराष्ट्रात एक बंगाली कुटुंब येऊन स्थायिक झाले. त्यांना मराठी येत नाही त्यांची मातृभाषा कोणती?
बंगाली का मराठी?
एक मराठी कुटुंब कलकत्यात जाऊन स्थायिक झाले. त्यांना बंगाली येत नाही. त्यांची मातृभाषा कोणती मराठी का बंगाली?
चन्द्रशेखर

उत्तर पटले नाही

तेंव्हा मातृभाषा याचा अर्थ या देशात ज्या भाषेच्या निकषावर घटक राज्याची निर्मिती झाली त्या राज्यात ती भाषा असा आहे. तसा लेखात उल्लेखही आहे.

वर चंद्रशेखर यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहेच पण पुन्हा विचारते. नोकरी निमित्ताने महाराष्ट्रातील मनुष्याला ३ वर्षे बंगालला, ३ वर्षे पंजाबला आणि ३ वर्षे तमिळनाडूला असे राहावे लागले. (असे बँक ऑफिसर, सरकारी कर्मचारी, सैन्याधिकारी वगैरेंचे होते) त्यांच्या मुलांची मातृभाषा कोणती?

मुंबईत राहणार्‍या तमिळ, तेलगु कुटुंबातील लहान मुलाला मराठीचा गंध नसता त्याला मराठी शाळेत घालणे हे त्याच्यावर अन्यायकारक नाही का? की या लेखातून आडून तुम्ही भाषावार प्रांतरचनेचे आणि इतर भाषकांना आपल्या राज्यातून हाकलून देण्याचे समर्थन तर नाही ना करत?

त्यातूनही तुम्ही मूळ प्रश्नाचे उत्तर टाळले आहे. चीन आणि जपानमध्ये किती अधिकृत भाषांत शिक्षण दिले जाते. मी आपल्याला दुसर्‍या लेखाचा आणि त्यातील प्रतिसादाचा दुवाही दिला.

चिनी, जपानी राज्यकर्ते किंवा तिथले शिक्षणतज्ज्ञ हे बुद्धू असल्याने त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून त्यांच्याकडे मातृभाषा हेच माध्यम आहे असे म्हणायचे आहे का?

असे मी कुठेच म्हटलेले नाही पण जर चिनी जपानी राज्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ बुद्धू नसतील तर या लेखाद्वारे भारतीय राज्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ बुद्धू आहेत असे तुम्हाला म्हणायचे का? तसे असल्यास हे उपक्रम या संकेतस्थळाला अडचणीत आणणारे विधान आहे याची नोंद संबंधितांनी घ्यावी. तसे नसल्यास आपल्या वरील वाक्याला काहीच अर्थ उरत नाही.

असो. मी साधासरळ प्रश्न विचारला आहे. चीनमध्ये एकाच चिनी भाषेतून सर्वत्र शिक्षण होते की विविध भाषांतून होते. विविध भाषांतून झाल्यास त्यांना त्याचा देशातंर्गतच त्रास होतो का? जरा कुठे खुट्ट झाले की चीन, जपानचे नाव घेण्याची प्रथा दिसते. ते घेताना लेखकांना या देशांतील शिक्षणाची थोडीफार कल्पना असते का हा प्रश्न विचारण्यामागे उद्देश आहे.

मातृ - पितृभाषा हा शब्दांचा खेळ आहे. उत्तर देण्याच्या लायकीचा मुद्दा नाही.

हा शब्दांचा खेळ आपण सुरु केलात. :-) मातृभाषा आणि राज्याची अधिकृत भाषा हे वेगळे प्रकार आहेत. त्यांना आपण एकच गणलेत. एका राज्यात राहणार्‍यांची मातृभाषा निरनिराळी असेल ही वस्तुस्थिती आहे ज्याकडे सोयिस्कर रित्या आपण दुर्लक्ष करत आहात. पूर्वी परप्रांतातील सून आणली तर सासरची भाषाच तिच्या मुलांना अवलंबवावी लागे किंवा काही प्रसंगात उलटही होत असावे. आता जर दोन भिन्न भाषकांनी लग्न केले तर त्यांनी मुलांना नेमक्या कोणत्या भाषक माध्यमातून शिक्षण द्यावे.

खर्चाचे म्हणाल तर तुम्ही घरी स्वयंपाक करून पुरेसे जेवता ना? अंगभर कपडे घालता ना? की खर्च नको म्हणून दुसर्‍यांचे कपडे घालता? दुसर्‍यांकडे जेवता?

हे बालिश बोलणे झाले. प्रतिवाद करण्याची गरज मला वाटत नाही. असो.

लेख लिहिताना केवळ अस्मिता वगैरे शब्दांचा विचार केलेला वाटला. वस्तुस्थितीचा नाही.

खाली चंद्रशेखर म्हणतात -

चीनमधे भारतासारख्याच अनेक भाषा आहेत. परंतु मध्यवर्ती सरकारने असे ठरवून टाकले आहे की देशाची भाषा फक्त मॅंडरीन हीच राहील. श्री.डोके यांना भारत सरकारने हिंदी हीच फक्त भारताची अधिकृत भाषा राहील असे सांगितले तर चालेल का?

कृपया, या प्रश्नाचे उत्तर द्यावे.

उत्तर

कामानिमित्त आंतरराज्यीय निवास करावा लागणारे असे किती टक्के असतात? त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यम ICSE व CBSE या शाळा आपल्याकडे प्रथमपासूनच आहेत. त्या अपवादात्मक म्हणून खास त्यांच्यासाठी ठेवता येऊ शकतात. तशा चीनमध्येही परकीयांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. तेव्हढ्यासाठी सरसकट सर्वांना इंग्रजी माध्यमाची सक्ती करणे योग्य आहे का? तुम्ही म्हणाल मराठी माध्यमाचा पर्याय आहे की! पण माझ्या लेखातला शैक्षणिक जातीयवादाचा मुद्दा लक्षात घ्या. नीच शैक्षणिक जातीचा म्हणून जगण्याची सक्ती म्हणजे इंग्रजी माध्यमाचीच सक्ती झाली नाही का?

आपण मांडलेल्या समस्या अत्यंत क्षुल्लक असून त्यावर उपाय आहेत. अहो, उंच दुर्गम कड्यावर देवस्थानाचा शोध लागल्यावर तिथवर पोहोचायला संगमरवरी पायर्‍याही तयार व्हायला फार वेळ लागत नाही. शिवकालात रायगड किती दुर्गम असेल नाही? पण तेथे जायला आता पायर्‍याच काय, रोप वे सुद्धा झाला आहे की नाही? मातृभाषेतून शिक्षणाच्या गडाचेही असेच आहे.

इंग्रजीच्या प्रवाहात वाहवत न जाणारे कितीतरी देश जगात आहेत. चीन, जपान ही मी आशियाई म्हणून उदाहरणे दिली. त्या उदाहरणांशिवायही माझा लेख पूर्ण होऊ शकतो. चीन, जपान हे माझ्या लेखाचे विषय नाहीत. मी मांडलेले मुख्य मुद्दे दुर्लक्षून कुठलातरी बिनमहत्वाचा मुद्दा घेऊन चर्चा भरकटवणे याचा अर्थ माझे मुख्य मुद्दे बिनतोड आहेत असा होतो. माझ्या लेखाचे मुख्य मुद्दे हे राष्ट्रीय अस्मितेचा लोप, स्वातंत्र्याचा अर्थ, गुलामगिरीची मानसिकता, शिक्षणशास्त्राचा व शिक्षणतज्ज्ञांचा अवमान व उपेक्षा, इंग्लिश मीडियम शाळांमार्फत प्रचंड लूटमार व भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्थेचे राष्ट्रध्वज व अर्थव्यवस्था यांच्याशी साधर्म्य, शिक्षणव्यवस्था कोसळणे, शैक्षणिक जातीयवाद, मातृभाषेतून शिकणार्‍यांना आपल्याच भूमीवर दुय्यमता, विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून हास्यास्पद प्रतिज्ञा, देशाचे कंपनीकरण हे आहेत. कृपया त्यावर भाष्य करा.

अबब

माझ्या लेखाचे मुख्य मुद्दे हे राष्ट्रीय अस्मितेचा लोप, स्वातंत्र्याचा अर्थ, गुलामगिरीची मानसिकता, शिक्षणशास्त्राचा व शिक्षणतज्ज्ञांचा अवमान व उपेक्षा, इंग्लिश मीडियम शाळांमार्फत प्रचंड लूटमार व भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्थेचे राष्ट्रध्वज व अर्थव्यवस्था यांच्याशी साधर्म्य, शिक्षणव्यवस्था कोसळणे, शैक्षणिक जातीयवाद, मातृभाषेतून शिकणार्‍यांना आपल्याच भूमीवर दुय्यमता, विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून हास्यास्पद प्रतिज्ञा, देशाचे कंपनीकरण हे आहेत. कृपया त्यावर भाष्य करा.

कृपया वेळ मिळेल तेव्हा त्यांवर एक-एक वेगवेगळा धागा काढाल का? कारण प्रत्येक मुद्यावर उपक्रम्यांना एक स्वतंत्र परिसंवाद घेता येईल, पन्नास प्रतिसादात काय कात होणार आहे? medium आणि pledge या शब्दांच्या उच्चारांवरतरी एकमत होईल का?

मातृभाषा

श्री.डोके महोदय (साहेब लिहिणार होतो परंतु आपला मस्तक शूळ उठण्याची भिती वाटली. आपल्या लेखाचा मथळा मातृभाषाच का? असा असल्याने माझ्या सारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला तो लेख, मातृभाषेतून शिक्षणाची गरज का आहे? या विषयावर आहे असे साहजिकच वाटले. परंतु या मथळ्याच्या अवगुंठनाखाली आपण राष्ट्रीय अस्मितेचा लोप, स्वातंत्र्याचा अर्थ, गुलामगिरीची मानसिकता, शिक्षणशास्त्राचा व शिक्षणतज्ज्ञांचा अवमान व उपेक्षा, इंग्लिश मीडियम शाळांमार्फत प्रचंड लूटमार व भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्थेचे राष्ट्रध्वज व अर्थव्यवस्था यांच्याशी साधर्म्य, शिक्षणव्यवस्था कोसळणे, शैक्षणिक जातीयवाद, मातृभाषेतून शिकणार्‍यांना आपल्याच भूमीवर दुय्यमता, विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून हास्यास्पद प्रतिज्ञा, देशाचे कंपनीकरण इतक्या महत्वाच्या विषयांवरचे आपले मौलिक विचार मांडत आहात हे ध्यानातच न आल्याने आम्ही आपले वेड्यासारखे मातृभाषेबद्दलच प्रतिसाद देत राहिलो. आमच्या अक्षम्य चुकीबद्दल क्षमस्व.
ता.क.

शिक्षणव्यवस्थेचे राष्ट्रध्वजाशी कसे साधर्म्य असते
ते कळले नाही बुवा! कृपया विशद करून सांगावे. अर्थव्यवस्थेबरोबर शिक्षणव्यवस्थेचे साधर्म्य आहे हे दोन्हीकडे भ्रष्टाचार असतो यावरून मात्र अचूक ध्यानात आले हे खरे!

चन्द्रशेखर

क्षमस्व

माफ करा ती कॉपी पेस्ट करताना झालेली चूक होती. मला मातृभाषेचे राष्ट्रध्वजाशी व शिक्षणव्यवस्थेचे अर्थव्यवस्थेशी साधर्म्य असे म्हणावयाचे आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

अबब +१

कामानिमित्त आंतरराज्यीय निवास करावा लागणारे असे किती टक्के असतात? त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यम ICSE व CBSE या शाळा आपल्याकडे प्रथमपासूनच आहेत. त्या अपवादात्मक म्हणून खास त्यांच्यासाठी ठेवता येऊ शकतात.

खूप आहेत. ICSE व CBSE च्या शाळांत ऍडमिशन्स मिळणे ही मोठी आणि कठिण गोष्ट आहे असे ऐकून आहे. त्यावरूनच असे लोक किती आहेत याची कल्पना यावी. दिवसेंदिवस ग्लोबलायझेशनमुळे त्यांची संख्या वाढत जाईल. आंतर्देशीय निवास (तात्पुरता किंवा कायम) करणारेही खूप आहेत. या सर्वांच्या मुलांना इंग्रजी माध्यम योग्य आणि बिचार्‍या इतरत्र निवास न करू शकणार्‍या (जसे, मोलकरणीची मुले) यांना मातृभाषेतून शिक्षण?? अरेरे!

सरसकट सर्वांना इंग्रजी माध्यमाची सक्ती करणे योग्य आहे का?

सक्ती कोणीच कोणावर करू नये. अधिकृत रित्या आपल्या मुलांना कसे शिकवावे हे पालकांवर सोडावे.

चीन, जपान हे माझ्या लेखाचे विषय नाहीत. मी मांडलेले मुख्य मुद्दे दुर्लक्षून कुठलातरी बिनमहत्वाचा मुद्दा घेऊन चर्चा भरकटवणे याचा अर्थ माझे मुख्य मुद्दे बिनतोड आहेत असा होतो. माझ्या लेखाचे मुख्य मुद्दे हे राष्ट्रीय अस्मितेचा लोप, स्वातंत्र्याचा अर्थ, गुलामगिरीची मानसिकता, शिक्षणशास्त्राचा व शिक्षणतज्ज्ञांचा अवमान व उपेक्षा, इंग्लिश मीडियम शाळांमार्फत प्रचंड लूटमार व भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्थेचे राष्ट्रध्वज व अर्थव्यवस्था यांच्याशी साधर्म्य, शिक्षणव्यवस्था कोसळणे, शैक्षणिक जातीयवाद, मातृभाषेतून शिकणार्‍यांना आपल्याच भूमीवर दुय्यमता, विद्यार्थ्यांना इंग्लिशमधून हास्यास्पद प्रतिज्ञा, देशाचे कंपनीकरण हे आहेत. कृपया त्यावर भाष्य करा.

म्हणजे चीन-जपानच्या नावांवरून तुम्ही ज्या बंडला मारल्या त्या तुम्हाला मान्य आहेत असे दिसते. (तसेही चंद्रशेखर यांनी ते सिद्ध केले आहेच.) बाकी तिरक्या गोष्टींसाठी अबब! मला वाटत होते की आपण मातृभाषेतून शिक्षण का द्यावे या विषयावर बोलत होतो. तुम्ही उल्लेखलेल्या मुद्द्यांवर भाष्य करायला मला दिवस पुरणार नाही. तेव्हा तुम्ही तो आपला विजय माना. :-)

आता खरा मुद्दा -

मातृभाषा असा शब्द वापरून लोकांच्या नाळा भाषेशी जोडून उगीच भावनिक बंध तयार केले जातात. भारतीयांना असे भावनिक बंध फार आवडतात असे ऐकून आहेत. त्याचाच काही नेतेमंडळी गैरवापर करतात. अधिकृत भाषांत शिक्षण हवे ही गोष्ट योग्य आहे. सक्ती हवी ही गोष्ट अयोग्य. परंतु अधिकृत भाषांत शिक्षण हवे असे आपण लिहिण्यास धजणार नाही कारण इंग्रजी ही भारताची अधिकृत भाषा आहे. हिंदीत शिक्षण देणे तर आपल्याला नापसंतच असावे. इंग्रजीवर परकीय भाषा म्हणून आक्षेप घेणारे संस्कृतला कसे काय बॉ सहन करतात?

"क्ष" व्यक्तीच्या मुलांनी मराठी शाळांत जावे असे म्हणणे तर संपूर्णतः अयोग्य. आजूबाजूची मुले ज्या शाळेत जातात त्या शाळेत आपल्या मुलाला न घालणं हे देखील माझ्यामते अयोग्य (मग ती शाळा अतिचांगली असो किंवा अतिवाईट.)

या लेखावरून आपण जी दिशाभूल लावली आहे तिला अस्मिता, देशाचे कंपनीकरण वगैरे मोठमोठी नावे दिलीत त्यावर काय भाष्य करायचे? कप्पाळ!

असो. आपल्या म्हणण्याचा बटबटीतपणा रंगांतूनही दिसून येतो. रंगसंगती आकर्षक ठेवा. भडक नको.

अधिकृत भाषा

इंग्रजी ही भारताची अधिकृत भाषा आहे.
असे आपण म्हणता.
माझ्या माहितीप्रमाणे भारतातील अधिकृत अशा १८ भाषांची यादी भारतीय संविधानाच्या ८व्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्यात इंग्रजीचे नाव नाही. तसे अनेक अनधिकृत गोष्टी आपल्या देशात आधिकृत म्हणून खपवल्या गेल्या आहेत. त्यातीलच ही एक. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही आणखी एक. असो.
इंग्रजीवर परकीय भाषा म्हणून आक्षेप घेणारे संस्कृतला कसे काय बॉ सहन करतात?
संस्कृत माध्यमाची शाळा कोठे आहे की काय?

चीन जपान बद्दल मी लेखात केलेली विधाने पूर्णपणे खरी आहेत. त्यामुळे ती कोणीही खोटी सिद्ध वगैरे करू शकणार नाही. फक्त तो माझ्या लेखाचा विषय नसल्याने मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही असे मी म्हटले.

असा कसा लेख लिहिता?

माझ्या माहितीप्रमाणे भारतातील अधिकृत अशा १८ भाषांची यादी भारतीय संविधानाच्या ८व्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्यात इंग्रजीचे नाव नाही. तसे अनेक अनधिकृत गोष्टी आपल्या देशात आधिकृत म्हणून खपवल्या गेल्या आहेत. त्यातीलच ही एक. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ही आणखी एक. असो.

खरेच? सुप्रीम कोर्टाचे काम इंग्रजीतच चालते ना. आपण सुप्रीम कोर्ट अनधिकृत गोष्टी खपवते आहे असे म्हणताय का? हा कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट तर नव्हे? असो. अधिक माहिती येथे बघा. हिंदी ही राष्ट्रभाषा नसली तरी भारतात एकात्मता साधण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषाच कामी येतात हे साधे सत्य विसरता येते काय?

इंग्रजीवर परकीय भाषा म्हणून आक्षेप घेणारे संस्कृतला कसे काय बॉ सहन करतात?
संस्कृत माध्यमाची शाळा कोठे आहे की काय?

माझा प्रश्न भाषेबद्दल आहे. माध्यमाबद्दल नाही. आपण उत्तर टाळताय. बाकी, मथूर या संस्कृत बोलणार्‍या गावाचे उदाहरण नेहमी दिले जाते तेथील शाळा संस्कृत माध्यमाच्या आहेत असे ऐकून आहे. उदा. हा लेख. याचबरोबर, प्रथम भाषा संस्कृत असणार्‍या शाळाही आहेत. नावे सांगता येतील. (अर्थातच, तेथे गणित-विज्ञान हे विषय संस्कृतात शिकवत नाहीत.)

चीन जपान बद्दल मी लेखात केलेली विधाने पूर्णपणे खरी आहेत. त्यामुळे ती कोणीही खोटी सिद्ध वगैरे करू शकणार नाही. फक्त तो माझ्या लेखाचा विषय नसल्याने मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही असे मी म्हटले

आपल्याला विषयाची माहिती काहीच नाही आणि तरीही लेख लिहिला आहे. यात लोकांची दिशाभूल केली आहे. केवळ अस्मितेच्या वगैरे नावाखाली लोकांना पेटवून देऊन गंमत बघायचे काम अनेक करतात त्यातलाच हा एक लेख.
असो.

चीनमध्ये मँडेरिन या एका भाषेला प्रमाण मानून शिक्षण दिले जाते तसे भारतात हिंदीला प्रमाण मानून शिक्षण द्यावे का या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आलेले नाही.

विषयाची १०% माहिती नसताना, असा कसा लेख लिहितात हे महाशय?

आत्मप्रतारणा

प्रियालीताई, अहो एक तरी बॉल स्टंपवर टाका! कुठेही काय फेकता? नाही समजले का? अहो तुम्ही फक्त कोंबडं झाकताय, सूर्य नव्हे. तुमचे सर्व आक्षेप इतके क्षुल्लक आहेत की चला ते मी मान्य करून टाकतो. पण तरीही मी लेखात मांडलेले प्रश्न अनुत्तरितच राहातात; कारण लेखातली जी विधाने तुम्हाला झोंबली, नेमके त्यावरच भाष्य करण्याची हिंमत तुमच्यात नाही. तुमचे कोणते विधान मान्य केल्यामुळे या देशात शिक्षणशास्त्र व शिक्षणतज्ज्ञ यांची उपेक्षा व अवमान होत नाही असे सिद्ध होते? की गल्लोगल्ली उगवलेल्या इंग्लिश मीडियम शाळा हे राजकारण्यांनी भ्रष्टाचारासाठी पसरलेले जाळे व त्यात तुम्ही हे अडकलेले मासे नाहीत असे सिद्ध होते? की बालकांच्या मनात राष्ट्रभावना व देशप्रेम निर्माण करण्याच्या शिक्षणाच्या उद्दिष्टावर बोळा फिरवून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात बालकाच्या निव्वळ खासगी आर्थिक विकासाचा उद्देश असतो या माझ्या अरोपाचे खंडन होते? मी तुम्हाला शैक्षणिक जातीयवादाचे उदाहरण दिले. इतक्या गंभीर आरोपाचा इन्कार करण्याची झाली हिंमत? इंग्रजी माध्यमाच्या प्रतिशिक्षणामुळे शिक्षणव्यवस्था कोसळली आहे असा माझा आरोप आहे. त्याचे काय? देशविभाजनाचा माझा आरोप आहे. यापेक्षा गंभीर आरोप कोणता असू शकतो? पण देशाचा वगैरे विचार न करता स्वतःपुरता विचार करणे हीच तर या देशातल्या इंग्लिश माध्यमाच्या शिक्षणाची खासियत आहे.

देशाचा संसार। माझे शिरावर।
असे थोडे तरी। वाटू द्या हो॥
(सेनापती बापटांचे नाव ऐकले आहे का कधी?)

तुमचे सर्व आरोप मी मान्य केलेच आहेत तेंव्हा आता माझे एक गुपित तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा लेख माझा असला तरी हे विचार मूळचे माझे नाहीत. नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे काही लघुनिबंध व महात्मा गांधी यांची एक लेखमाला यावरून मी हा लेख लिहिला आहे. काही विधाने तर जशीच्यातशी उचलली आहेत. तीच तुम्हाला झोंबली असावीत. मी संपूर्ण देशाचा विचार करून लेख लिहिला आहे. तुम्ही फक्त स्वतःपुरता विचार करून प्रतिक्रिया देता आहात. म्हणूनच तुम्हाला हा लेख तुमच्यावरच लिहिला आहे असे वाटले. मला विषयाचे १० टक्केही ज्ञान नाही हा तुमचा आरोपही मला मान्य आहे; परंतु ही तुमची आत्मप्रतारणा आहे त्याचे काय? तुम्हाला जर तसे खरेच वाटत असते तर तुम्ही या लेखाची दखलही घेतली नसती. परंतु इथे सर्वात जास्त प्रतिक्रिया तुमच्याच आहेत. यावरून काय सिद्ध होते? आणि तुमचे १०० टक्के ज्ञान या ५ टक्के ज्ञानाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही; तरी लढायला आलात आणि ’कौरव’ झालात. कोणाच्या विचारांना आपण हीन लेखले हे आता कळल्यामुळे तर अगदी तोंडावरच आपटल्या आहात. असो. तरीही कृपया टागोरांचे चरित्र आपण वाचाच.

क्षुल्लक

तुमचे सर्व आक्षेप इतके क्षुल्लक आहेत की चला ते मी मान्य करून टाकतो.

माझा आरोप तुम्ही लोकांची दिशाभूल करता आहात असा आहे. तुम्ही मान्य केलात यात सर्व आले. :-) त्यामुळे आपण जे पुढे बरळलात तेथे पोहोचण्याची आवश्यकता नाही.

हा लेख माझा असला तरी हे विचार मूळचे माझे नाहीत.

हाहाहाहाहाहाहा! म्हणजे विरोध झाला नसता तर स्वतःचे म्हणून खपवणार होता वाटतं. अन्यथा, लेखात तसा खुलासा करणे आवश्यक आहे.

तुमचे कोणते विधान मान्य केल्यामुळे या देशात शिक्षणशास्त्र व शिक्षणतज्ज्ञ यांची उपेक्षा व अवमान होत नाही असे सिद्ध होते? की गल्लोगल्ली उगवलेल्या इंग्लिश मीडियम शाळा हे राजकारण्यांनी भ्रष्टाचारासाठी पसरलेले जाळे व त्यात तुम्ही हे अडकलेले मासे नाहीत असे सिद्ध होते? की बालकांच्या मनात राष्ट्रभावना व देशप्रेम निर्माण करण्याच्या शिक्षणाच्या उद्दिष्टावर बोळा फिरवून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात बालकाच्या निव्वळ खासगी आर्थिक विकासाचा उद्देश असतो या माझ्या अरोपाचे खंडन होते? मी तुम्हाला शैक्षणिक जातीयवादाचे उदाहरण दिले. इतक्या गंभीर आरोपाचा इन्कार करण्याची झाली हिंमत? इंग्रजी माध्यमाच्या प्रतिशिक्षणामुळे शिक्षणव्यवस्था कोसळली आहे असा माझा आरोप आहे. त्याचे काय? देशविभाजनाचा माझा आरोप आहे. यापेक्षा गंभीर आरोप कोणता असू शकतो?

अरे बापरे! हे पण गांधीजी आणि टागोरांनी लिहिलेले आहे का?

गांधीजी आणि टागोरांना ६०-७० वर्षांपूर्वी जे वाटले ते आज खपवणे आणि मनुला ३-४००० वर्षांपूर्वी (आकडा अंदाजपंचे) जे वाटले ते आज खपवण्यात मला फारसा फरक दिसत नाही. असो.

बायदवे, प्रश्न पुन्हा टाळलात.

हिंदीतून संपूर्ण भारतात शिक्षण द्यावे काय?

घातक प्रतिशिक्षणव्यवस्था

हिंदी माध्यम चालेल का? असे आपण विचारता आहात म्हणजे इंग्रजी माध्यम नको हे मी मांडलेल्या मुद्दयांच्या आधारे आपल्याला पटले आहे. अभिनंदन!

चीन्यांचे मातृभाषेवरील प्रेम व निष्ठा, राष्ट्रभावना हे गुण आपण घेण्यासारखे आहेत. असा माझ्या विधानांचा अर्थ आहे. आपण त्यांचे अंधानुकरण करावे असा नव्हे. हिंदीचे म्हणाल तर माझ्यापुरता विचार केल्यास मला हिंदीच काय इंग्रजीसुद्धा माध्यम म्हणून चालेल. पण मातृभाषेचा माझा आग्रह आहे कारण या बाबतीत व्यक्तीपुरता नव्हे तर देशाचा विचार करणे अपरिहार्य आहे म्हणून. बहुभाषिक देश ही भारताची खरी ओळख आहे. हिंदी भाषिक देश ही नव्हे. (आज भाषिक गुलाम देश ही नवी ओळख होऊ घातली आहे.)

हिंदी हा शब्द हिंदुस्थानी म्हणजेच भारतीय या शब्दाला समानार्थी म्हणून हिंदी भाषेत वापरला जातो. जसे ’हिंदी है हम, वतन है हिंदोस्तां हमारा’. त्यामुळे सगळ्या भारतीयांची मातृभाषा हिंदी आहे असा अर्थ कोठूनही निघत नाही. भाषावार राज्यरचना व प्रत्येक राज्यात त्यांच्या स्वीकृत भाषेतून शिक्षण ही व्यवस्था सध्या अस्तित्वात आहेच. त्यासाठी वेगळे काहीच करण्याची आवश्यकता नाही. इंग्रजी माध्यमाच्या सुमार शाळांचे गल्लोगल्ली पीक हे गेल्या दीड दोन दशकांतलेच असून भ्रष्टाचाराच्या व जनतेच्या शोषणाच्या उद्देशाने राजकारण्यांनी काढलेले आहे. देशाच्या विकासाच्या उद्देशाने शिक्षणतज्ज्ञांनी ते काढलेले नाही. ही इंग्रजी माध्यमातून निर्माण केलेली समांतर किंवा प्रतिशिक्षणव्यवस्था घातक असल्याने बंद व्हावी अशी माझी मागणी आहे. भारतीयांचे इंग्रजीचे ज्ञान, प्रभुत्व व व्यासंग त्यामुळे कमी होण्याचे काहीच कारण नाही. उलट इंग्रजी माध्यमातून शिकण्याची लाट जेंव्हा येथे नव्हती त्या काळातच या गुणांचा विकास झालेला आहे. आंतरराज्यीय संवादासाठी हिंदीला पर्याय म्हणून इंग्रजी असणारच आहे. तिचे व्यवहारातून उच्चाटन करावे अशी मागणी मी लेखात कुठेही केलेली नाही.
इंग्रजी हा एक अनिवार्य विषय म्हणून प्रत्येकाला शिकावा लागणारच आहे. शालेय पातळीवर त्याचे विशेष शिक्षणही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येईल, किंवा उच्च शिक्षणही इच्छुकांना घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्याला उत्तेजनही देता येईल. उलट प्रत्येकाने मातृभाषेच्या माध्यमातून ती भाषा शिकल्याने सर्वसामान्य भारतीयांच्या इंग्रजी भाषेचा दर्जा त्यामुळे सुधारू शकेल. इंग्रजीचे जागतिक महत्त्व हेच इतके आहे की प्रत्येकाला इंग्रजी भाषा शिकण्यास उद्युक्त करण्यासाठी ते पुरेसे आहे. त्यासाठी मातृभाषेला तिलांजली देण्याची गरज नाही.

त्यातून तुम्हाला जर हिंदी चालेल का, यावर माझ्याकडून होय व नाही पैकीच एक उत्तर हवे असेल तर मी होय असे म्हणेन; कारण हिंदी भाषिक देश ही जागतिक ओळख भाषिक गुलाम देश या ओळखीपेक्षा नक्कीच चांगली.
गांधी व टागोर यांची मनूशी तुलना अज्ञानमूलक आहे. दुर्लक्ष करतो व टागोर वाचा एवढेच सांगतो.

नाही हं!

हिंदी माध्यम चालेल का? असे आपण विचारता आहात म्हणजे इंग्रजी माध्यम नको हे मी मांडलेल्या मुद्दयांच्या आधारे आपल्याला पटले आहे. अभिनंदन!

नाही हं! उगीच नाही नाही त्या गैरसमजात राहू नका.

चीन्यांचे मातृभाषेवरील प्रेम व निष्ठा, राष्ट्रभावना हे गुण आपण घेण्यासारखे आहेत. असा माझ्या विधानांचा अर्थ आहे.

पण सर्व चिन्यांची मातृभाषा मँडेरिन नाही त्याचे काय?

पण मातृभाषेचा माझा आग्रह आहे कारण या बाबतीत व्यक्तीपुरता नव्हे तर देशाचा विचार करणे अपरिहार्य आहे म्हणून. बहुभाषिक देश ही भारताची खरी ओळख आहे. हिंदी भाषिक देश ही नव्हे. (आज भाषिक गुलाम देश ही नवी ओळख होऊ घातली आहे.)

तुमच्या मातृभाषेचा संपूर्ण देशाशी नेमका संबंध सांगा बघू. मराठीत डॉक्टरकीचे शिक्षण घेऊन मेघालयात प्रॅक्टिस करता येईल का? मेघालय लांब राहीलं. कर्नाटकात तरी करता येईल का?

इंग्रजी माध्यमाच्या सुमार शाळांचे गल्लोगल्ली पीक हे गेल्या दीड दोन दशकांतलेच असून भ्रष्टाचाराच्या व जनतेच्या शोषणाच्या उद्देशाने राजकारण्यांनी काढलेले आहे.

राजकारणी आपले ना! मग ती गुलामांची भाषा, परक्यांची भाषा म्हणून इंग्लिशला नावे ठेवायचा काय संबंध? इंग्रजीतून शिकवले की भ्रष्टाचार वाढतो असे तर नाही ना सांगायचे?

देशाच्या विकासाच्या उद्देशाने शिक्षणतज्ज्ञांनी ते काढलेले नाही. ही इंग्रजी माध्यमातून निर्माण केलेली समांतर किंवा प्रतिशिक्षणव्यवस्था घातक असल्याने बंद व्हावी अशी माझी मागणी आहे.

घुमजाव! मूळ लेखात तर असे काहीच सापडले नाही. तेथे तुम्ही इंग्रजीला विदेशी भाषा म्हणून अस्मिता वगैरेवर लेखन केले आहे.

मातृभाषेला तिलांजली देण्याची गरज नाही.

मातृभाषेला तिलांजली देण्याचे प्रयोजनच नाही. तसे कोणीच सांगत नाहीये हं!

त्यातून तुम्हाला जर हिंदी चालेल का, यावर माझ्याकडून होय व नाही पैकीच एक उत्तर हवे असेल तर मी होय असे म्हणेन; कारण हिंदी भाषिक देश ही जागतिक ओळख भाषिक गुलाम देश या ओळखीपेक्षा नक्कीच चांगली.

म्हणजे इंग्रजी अजूनही परक्यांची भाषा वाटते ना! मग ते राजकारणी, भ्रष्टाचार वगैरे मुद्दे कशाला मध्येच.

गांधी व टागोर यांची मनूशी तुलना अज्ञानमूलक आहे. दुर्लक्ष करतो व टागोर वाचा एवढेच सांगतो.

गांधी आणि टागोर यांची तुलना मनूशी केली असे वाटणेच अज्ञानमूलक आहे. -)

लाल रंग.

आपली मते हा परिस्थितीचा एक भाग असू शकतो त्यामुळेच आपण चर्चा करत आहोत.
पण लाल रंग हा रागाचे प्रतिक आहे, चर्चा करताना ती शांतपणे करावी, अन्यथा ती उगाच संपादन केली जाते किवा त्यातून अनर्थ काढला जातो आणि मग मूळ मुद्दा बाजूला राहतो.

चीनमधल्या भाषा

चीनमधे भारतासारख्याच अनेक भाषा आहेत. परंतु मध्यवर्ती सरकारने असे ठरवून टाकले आहे की देशाची भाषा फक्त मॅंडरीन हीच राहील. श्री.डोके यांना भारत सरकारने हिंदी हीच फक्त भारताची अधिकृत भाषा राहील असे सांगितले तर चालेल का?
ज्या भाषेचा वापर करून माणसाला रोजचे आयुष्य़ सहजपणे जगता येते ती भाषा माणसे व्यवहारात वापरतात मग ती मातृ असो नाहीतर पितृ असो किंवा परभाषा असो.
माझ्या स्वत:पुरते बोलायचे तर मला माझी मातृभाषा मराठी आणि व्यवसायास उपयुक्त भाषा इंग्रजी या दोन्ही बर्‍यापैकी लिहिता, वाचता आणि बोलता येतात याचा सार्थ अभिमान आहे. चांगले पुस्तक मग ते मराठी असो किंवा इंग्रजी, वाचनाचा आनंद तेवढाच मिळतो. मराठीतून ब्लॉगपोस्ट लिहिल्यावर मला जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा कांकणभर जास्त आनंद इंग्रजीमधून ब्लॉगपोस्ट लिहिल्यावर होतो कारण ती माझी मातृभाषा नसूनही त्या भाषेत बर्‍यापैकी अभिव्यक्ती मला साध्य करता आलेली आहे. भाषेचे साध्य दुसर्‍या माणसाशी संवाद साधणे आहे असे मी मानतो. कोणतीही भाषा वापरून हे ध्येय साध्य होणे हे महत्वाचे वाटते. टोकाचा भाषाभिमान असणे हे बहुधा स्वत:चे दुसर्‍या भाषेतील कौशल्य कमी आहे हे मान्य करण्यासारखे आहे असे मला वाटते.

चन्द्रशेखर

चंद्रशेखरजी! उत्तम प्रतिसाद...

चंद्रशेखरजी,
उत्तम प्रतिसाद दिलात. भाषा हे संपर्काचे आणि अभिव्यक्तीचे एक साधन आहे. एकाच भाषेचा अतिरेकी आग्रह धरण्यामुळे किंवा इतर भाषांचा दुस्वास करण्यामुळे एखादा समूह आजच्या बहुसांस्कृतिक जगात (मल्टीकल्चरल वर्ल्ड) उपलब्ध होत असलेल्या विकासाच्या नव्या संधी गमावतो.

आंधळेपणा नको

गेली कित्येक दशके "मराठीच्या पंख्याचा वारा गारगार" म्हणून इंग्रजीतून शिक्षण नकोच असे सूर आळविले जातात पण तसा मार्ग कुठल्याही स्तरावरील पिढीसाठी विघातक असा असेल तर नुसत्या मातृभाषेच्या उमाळ्याने, आंधळेपणाने त्या मार्गाने आपल्या पुढील पिढीला जा म्हणून सांगणेही इष्ट नाही. अनिष्ट प्रथेशी संगनमत करण्याने स्वघात नव्हे तर राष्ट्रघातही होतो. इंग्रजीविषयी आत्मियता दाखविणे म्हणजे मराठीशी दुश्मनी अजिबात नाही, किंबहुना तसे माननेही गैर आहे. दोन्ही भाषेचे ज्ञान तितकेच आवश्यक आहे. नळाच्या पाण्यात क्लोरिन मिसळले असते म्हणून मी फक्त नारळातीलच पाणी पिणार असे मानने व्यवहारशून्य आहे, तद्वतच मराठी ही मातृभाषा म्हणून अन्य भाषेतून माझ्या मुलाला मी विज्ञान शिकविणार नाही हे कुठलीही शिक्षणसंस्था मान्य करणार नाही.

मातृभाषेचे महत्व सांगणारे कायमपणे प्रामुख्याने जपान, जर्मनी, चीन या तीन देशांच्या भाषीक उन्नतीचे उदाहरण देतात. या तीन देशावर इंग्रजांनी राज्य केले नाही, पण म्हणून तिथे इंग्रजीचा दुस्वास केला जातो असे मानू नये. बिजिंग ऑलिम्पिकच्यावेळी तर चिनी राज्यकर्त्यानी जाणिवपूर्वक तरूणतरूणी स्वयंसेविकांना इंग्रजीचे धडे गिरविण्याची धडक योजना यशस्वीपणे राबविली होती. कुणी माना वा ना माना "इंग्रजी" ही आज "ग्लोबल लॅन्ग्वेज" झाली आहे आणि ती आपल्या मुलांनी शिकू नये असे कोणताही भारतीय पालक म्हणत नाही... म्हणूही नये.

इंग्रजी साहित्य चालते, इंग्रजी मनोरंजन चालते, इंग्रजीतून आलेली कॉम्प्युटर विद्या चालते, इंग्लंडमध्ये नोकरी करीत असलेला जावई चालतो (हे उदाहरण आमच्याच कॉलनीमध्ये घडले आहे), पण इंग्रजी भाषा चालत नाही हा नक्कीच दुराभिमान आहे.

भाषा

माझामते सगळ्यांना हा मुद्दा नक्कीच खटकतोय कि कुठे तरी मराठी हि भाषा म्हणून लय पावेल जर मराठी भाषिकांनी काही केला नाही तर, म्हणूनच राज ठाकरे ह्यांची कृती आवडली नाही तरी कुठे तरी मराठी मनामध्ये एक सुखद आनंद देते (निदान मला तरी), किवा उपक्रम सारख्या व्यवस्था ह्या चालताना पाहून देखील मन सुखावते, किवा संदीप खरे ह्यांच्या कविता 'यो' पिढीला पण आवडतात ह्याचाही आनंद होतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी जगावी हा एक समान धागा आहे.

पण हे कुठे तरी कमी पडतंय असा देखील सगळ्यांना वाटता आहे, म्हणूनच हा शिक्षणाचा मुद्दा, मराठीतून शिकलो तर कदाचित मराठी तगेल अशी एक आशा.

पण मला असा वाटता कि आपण माध्यामाबद्दल बोलत आहोत, मूळ त्रास हा आहे कि पुढील पिढीने मराठी भाषा शिकावी ह्यासाठी गरज निर्माण करणे महत्वाचे आहे. मराठी मध्ये विज्ञान आहे म्हणून कोणी मराठी शिकणार नाही, पण त्या मराठीमधील विज्ञानाचा व्यवहारात उपयोग केला जातो आहे हे दिसले तर मराठीतून विज्ञानाचे शिक्षण घेतले जाईल. मराठीतून भाषा-सौंदर्य नक्कीच शिकले जाऊ शकते आणि त्याचा उपयोग देखील होतो, पण सगळा काही मराठीतून शिकता येईल असा हट्ट विनाकारण आहे.

आज पुणे किवा पुण्यासारखी शहरे सोडल्यास बाकी सर्वदूर जी मराठी शिकवली जाते तिला मराठी म्हणायचा का हा ही मुद्दा आहेच.

प्रतिक म्हणतात त्याप्रमाणे इंग्रजी हि जागतिक भाषा आहे ह्यात शंका नाही, कोणत्यातरी समान धाग्याशिवाय हे जग बांधणे अशक्य आहे.

बऱ्याच जणांनी चीन आणि जपान ह्यांचा मुद्दा काढला आहे, पण मला असे वाटते कि त्यांच्या कार्य क्षमतेला त्यांच्या भाषेमुळे मर्यादा आहेत, मी पोकळ अभिमानाने नाही तर तर्काने सांगतो आहे, कि आज भारतीय माणूस जगात कुठेही काम करू शकतो, त्याच्या कार्यक्षेत्राला मर्यादा नाही ती केवळ इंग्रजीमुळेच असे मला वाटते, चीन आणि जपान ह्यांचे कर्तुत्व कमी लेखात नाहीये मी, पण त्यांच्या मर्यादा आज किवा उद्या सिद्ध होतील आणि हे तर्कानुसार पटते.

मला असेही वाटते कि भाषेकडे आपण एक माध्यम म्हणून पाहिल्यास कसे होईल ? - जसे इंग्रजी भाषा जागतिक स्तरावर चलन वळणासाठी योग्य आहे, मराठी/उर्दू/फ्रेंच अशा भाषा मनोगत अधिक प्रभावशाली मांडण्यासाठी योग्य आहेत.

इंग्रजी आणि चीनचा निर्धार

>>> मराठीतून शिकलो तर कदाचित मराठी तगेल अशी एक आशा. <<<
श्री.आजूनकोणमी यांच्या वरील विधानात किंचित बदल करून मी असे म्हणेन की, 'मराठीतून ऐवजी मराठी शिकलो तर कदाचित मराठी तगेल अशी एक आशा.' मी जरी इंग्रजी भाषेला जागतिक महत्व देत असलो तरीदेखील कोणत्याही स्थितीत मराठी तगेलच यात तीळमात्र संदेह नाही. विज्ञान वा अन्य कोणतीही शाखा मातृभाषेतूनच आत्मसात करायची असा अट्टाहास का केला जातो हे अनाकलनीय आहे. इंग्रजीच्या आक्रमणाने मराठी चिरडून जाईल हा एक "टिपिकल पोलिटिकल इश्शू" आहे जिचा काही विशिष्ट गट आपली "व्होट बँक" मजबूत करण्यासाठी नेहमीच करतात.

गेल्या महिन्यापासून श्री.भालचंद्र नेमाडे यांच्या "हिंदू" कादंबरीमुळे मराठीच्या प्रांगणात चर्चेचा जो सुखद सोहळा चालला आहे, तो पाहता "मराठी" भाषेवर जीवापाड प्रेम करणारे अगणित आहेत हे जाणवण्याइतपत दिसून येत आहे आणि त्याचा परिणाम आज महाविद्यालयात शिकत असलेल्या या पिढीवर दिसत आहे कारण आजचा "केबल" आहारी गेलेला युवकही "हिंदू" कादंबरीबद्दल विचारत आहे. ही नक्कीच "मराठी" कदापिही नष्ट होणार नाही याची खूण आहे. "इंग्रजी" तून विज्ञान शिकले म्हणजे ज्ञानोबा/तुकोबांच्या मराठीला खिंडार पडेल असे मानने फार बालिशपणाचे होईल. या महाकाय देशाच्या ३४ राज्यातील मुले इंग्रजीतून विज्ञान शिकून देशातील/परदेशातील कोणत्याही वैज्ञानिक संस्थेत प्रवेश घेणार आणि महाराष्ट्र या एकमेव राज्यातील मुले मराठीतून विज्ञान शिकुन "स्पर्धात्मक" दुनियेत कोणत्या ठिकाणी असतील याचा विचार कृपया अशी मागणी करणार्‍यांनी प्रथम करावा.

ज्या "चीन" चा मातृभाषेच्या आग्रहासाठी वारंवार उल्लेख केला जातो; तेथील सरकारने नुकताच जारी केलेला आदेश पाहायचा आहे? "चायना डेली" च्या ताज्या अंकातील खाली दिलेली सरकारी घोषणा पहा ~~~~~~

The Chinese government’s plan to improve English fluency in the city consists of 5 parts:

- Toddlers will begin learning the language in kindergarten, to better prepare them for more advanced classes in later grades.
- Every public servant under the age of 40 with a college degree must learn 1000 English sentences.
- By 2015, all government employees must learn at least 100 English sentences, whether they have a college degree or not.
- 60% of service employees, like waiters and hairdressers, must pass English tests covering vocabulary related to their jobs.
- By 2015, a certain number of guides in each museum in the city must be proficient in English as well.

काय सांगते ही बातमी? सरकारने जरी २०१५ ही अंतीम मुदत दिली असली तरी, २००८ पासून इंग्रजीच्या उपयुक्ततेची चीनी नागरिकांना उमज पडली आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे अव्याहत प्रयत्न चालू आहेतच. इंग्रजीच्या जोरावर चीनच्या युवा पिढीने येत्या पाच वर्षात "अंकल सॅम" च्या भूमीत आपल्या अर्थव्यवस्थेचा झेंडा रोवायचा आहे ही तेथील राज्यकर्त्यांची मनिषा आहे. आणि "लाल ड्रगन" तसे करून दाखविलही.

आभार

आपण दिलेल्या दाखल्याबद्दल आभार. त्याने माझ्या या मुद्यालाच पुष्टी मिळते की परभाषा शिकणे व मातृभाषेला तिलांजली देऊन परभाषेतून शिकणे यात फार मोठा फरक आहे.

न्यूनगंड

आजचाच प्रसंग.. आमच्या मोलकरणीच्या मुलाला शाळेत घालायचे आहे. ती सांगत होती, "मला व माझ्या नवर्‍याला दोघांना इंग्रजीतलं एबीसीडीही येत नाहि, पण मुलाला मराठी माध्यमात घालायला लाज वाटते". मोलकरीण ५वी तर तिचा नवरा ७वी शिकलेला आहे. मराठी लिहिता वाचता येते. इंग्रजी येत नाहि. नोकरी अशी नसल्याने शहरोशहरी बदलीचा प्रश्नच नाहि. तरी मुलाला कोणत्या भाषेत सगळे विषय शिकवावे हे तिला कळत नाहि.

मी ७वी पर्यंत मराठी व पुढे सेमी इंग्रजीत शिकलो. मात्र कधी न्यूनगंड जाणवणे सोडाच, मराठी व इंग्रजी दोन्ही बर्‍यापैकी येत असल्याने अभिमानच वाटत आला आहे. मात्र या आजच्या प्रसंगानंतर सध्या समाजात, मराठी माध्यमात घालणे म्हणजे जणू गुन्हा आहे किंवा लाज वाटते तो न्यूनगंड कमी कसा करता येईल? (माझे उदा. देण्यात अर्थ नाहि माझ्या वेळची व आताची परिस्थिती वेगळी आहे).

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

होय

शिवाय अधिकाधिक लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देत असल्यामुळे मराठी शाळांची मागणी आणि गुणवत्ता घसरली तर ते एक दुष्टचक्र ठरेल. चांगल्या शिक्षकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला प्राधान्य देणे, चांगल्या मुलांचा पियर ग्रूप (उच्चारांनुसार हा शब्द ग्रूप असा लिहावा की गृप?) न मिळणे, इ. अडचणी येऊ शकतात. मी दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो. अकरावी-बारावीतही मराठी हा १०० गुणांचा विषय होता. पण आमच्या शाळेची (खासगी, अनुदानित) गुणवत्ता आता घसरली आहे असे ऐकले आहे.

शाळेचा दर्जा

>>पण आमच्या शाळेची (खासगी, अनुदानित) गुणवत्ता आता घसरली आहे असे ऐकले आहे.

आमच्या शाळेबद्दलही असेच ऐकून आहे. पण त्याचे कारण हल्ली सगळे 'ते' शिक्षक भरल्यामुळे असे झाल्याचे 'आपले' लोक सांगतात.

रोचक गोष्ट ही की जेव्हा शाळेत सगळे 'आपले' शिक्षक होते तेव्हाही आमची शाळा ठाण्यातल्या चांगल्या शाळांमध्ये गणली जात नसे. माझ्या चौथीच्या वर्गातील २० एक मुलांच्या पालकांनी आपापल्या मुलांना पाचवीपासून एम एच आणि सरस्वती सारख्या 'चांगल्या' शाळांतून घातले.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

ग्रूप

(उच्चारांनुसार हा शब्द ग्रूप असा लिहावा की गृप?) अशी शंका यावी? मुळात दीर्घ ऊकार असलेला हा शब्द अगदी मराठीत येताना र्‍हस्व ऋकाराचा का व्हावा? असे होत असते तर श्रूडचे शृड, ब्रूडचे बृड होऊ शकेल.
अर्थात मराठी उच्चारांचा आणि लिखाणाचा काही भरवसा नाही. वर्तमानपत्रात पिन, झिप आणि लुक हे शब्द अनुक्रमे पीन(कोड), झीप आणि लूक असे रोजच वाचावे लागतात.--वाचक्‍नवी

टंकनदोष

दीर्घ स्वर (ॠ, लॄ) वापरले जातात असे शब्दच मला आठवत नाहीत त्यामुळे ॠ टंकायला हवा हेच विसरलो. (खरे तर कॢप्ति व्यतिरिक्त र्‍ह्स्ववाल्या ॡ चे शब्दही मला माहिती नाहीत.)
ग्रूप की गॄप असा प्रश्न मी विचारायला हवा होता.

दीर्घ ॠ आणि र्‍हस्व ऌ

संस्कृतमध्ये दीर्घ ॡ नाही, त्यामुळे तो असलेले शब्द असणे शक्य नाही. मराठी/संस्कृतमधले दीर्घ ॠ चेशब्द : भातृ + ऋण = भातॄण, मातॄण, पितॄण वगैरे. अनेक संस्कृत धातू जसे तॄ(१ परस्मै.)=तरून जाणे; जॄ(४, ९, १० प.)=जीर्ण होणे, स्तॄ(९ उ)=आच्छादणे, असेच वॄ, गॄ, भॄ इत्यादी.
मराठीतला र्‍हस्व ऌ चा एकमेव शब्द क्‍ऌप्‍ति(कॢप्‍ती). संस्कृतमधले आणखी शब्द : ऌकार(ऌ हा स्वर), ऌट्‌(दुसरा भविष्यकाळ), ऌङ्‌(संकेतार्थ काळ), शक्‍ऌ-गम्‍ऌ[शक्‌-गम्‌ या धातूंच्या अद्यतन भूतकाळाची रूपांच्या(अशकत्‌‌-अगमत्‌) आधी अ लागतो, ‌ हे सांगण्यासाठीचा ऌ हा प्रत्यय] वगैरे वगैरे. हे मुद्दाम सांगण्याचा हेतू एवढाच की लिपीतून ऌ काढून टाकता येणार नाही.
मराठीत दीर्घ ॡ हा स्वर आणि त्याचा उच्चारही आहे. भले, शब्द नसे ना, का ! --वाचक्‍नवी

 
^ वर