मातृभाषाच का?

’इयत्ता १२वीची विज्ञानाची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार’ ही बातमी वाचनात आली. शिक्षण, समाज व देश यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असे फार मोठे यश पुण्याच्या समर्थ मराठी संस्था या संस्थेने मिळवले आहे.

या छोट्याशा गोष्टीला मोठे यश म्हणण्याची वेळ यावी हे फारच मोठे दुर्दैव आहे. पोटासाठी धावताना आपण पायाखाली काय तुडवतो आहोत याचे भान आज भारतीयांना विशेषतः मराठी माणसांना राहिलेले नाही. आपल्या संपन्न मातृभाषेचा त्याग निव्वळ पोट भरण्यासाठी तो ही इतक्या सहजपणे करावा असे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कसे काय वाटते? हा भिकारडेपणा नसून आधुनिकतेची, प्रगतीची ओढ आहे असे म्हणावे तर त्याच वेळी हीच मंडळी अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा यांना मात्र चिकटून बसतात. माझ्या मते हे सर्व बहुसंख्य असले तरी चुलीत चंदन जाळणार्‍या भिल्लिणीप्रमाणे अज्ञानी लोक आहेत. माणसाची किंवा एखाद्या जनसमूहाची जागतिक ओळख म्हणजे काय, स्वत्व, राष्ट्रभावना म्हणजे काय, आपली राष्ट्रीय संपत्ती कोणती, याचे काहीही भान यांना नाही. खरे तर १५ ऑगस्ट १९४७ च्या सकाळीच विदेशी भाषेच्या माध्यमातून शिक्षण देणे या देशात बंद व्हायला हवे होते. ते न झाल्यामुळे स्वातंत्र्याचा खरा अर्थ लोकांना समजलेलाच नाही. चीन किंवा जपानमधे परभाषेच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देणे म्हणजे आपल्या देशाचा झेंडा खाली उतरवणे असे मानतात. परभाषा जरूर शिकावी परंतु शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असायला हवी हे भारत सोडून जगभर मानले गेले आहे. आपले शिक्षणतज्ज्ञ देखील हेच सांगत आले आहेत. त्यांची अक्षम्य उपेक्षा करण्याची परंपरा येथे आहे. सहजधनाच्या हव्यासापोटी राजकारण्यांनी शिक्षणाचे बाजारीकरण करून काळ्या पैशाचा प्रचंड स्रोत निर्माण केला आहे. कोणीही उठावे आणि भ्रष्ट राजकारण्यांचे दलालत्व पत्करून खासगी शिक्षणसंस्था काढाव्यात. साप साप करून भुई धोपटावी आणि मध्यम वर्गीयांना भयभीत करून आता फक्त इंग्रजी माध्यमच तुम्हाला तारू शकेल असा प्रचार करून पालकांना व बालकांना आपल्या कत्तलखान्यात आणून लूटमार करावी.

प्रत्येक स्वतंत्र देशाचे अस्तित्व व अस्मिता यांचे प्रतीक म्हणून तीन गोष्टी मानल्या जातात. त्या म्हणजे देशाचा झेंडा, चलन व शिक्षणाचे माध्यम मातृभाषा. ( भारतीय संविधानसुद्धा हेच सांगते. म्हणूनच तर संविधानाच्या स्वीकृतीनंतर देशातील शिक्षणाचे पायरी पायरीने मातृभाषीकरण करण्यासाठी सरकारला पंधरा वर्षांची मुदत दिली होती. ( तत्कालीन सरकारचे यात अपयश व सारवासारव हा भाग वेगळा.) यात कोणताही बदल करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही नसते. जसे या देशाच्या भूमीवर प्रत्येकाने या देशाचाच झेंडा फडकविला पाहिजे. एखाद्याला दुसर्‍या देशाचा झेंडा आवडत असला तरी तो येथे फडकविण्याची मुभा नसणे हेच खरे देशाच्या स्वातंत्र्याचे लक्षण आहे. किंवा जसे या देशात या देशाच्या चलनातच अर्थव्यवहार झाला पाहिजे, त्याच प्रमाणे मातृभाषेच्या माध्यमातूनच या देशात शिक्षणव्यवहार झाला पाहिजे. ज्यांना या देशात आपसात डॉलरमध्ये व्यवहार करावयाचा आहे त्यांनी तो करावा असे जर स्वातंत्र्य दिले तर अर्थव्यवस्थेची काय अवस्था होईल तीच आज शिक्षणव्यवस्थेची झाली आहे. शिक्षणाचे माध्यम या निकषावरून समाज दुभंगला आहे. नवा शैक्षणिक जातीयवाद व उच्चनीचता निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍यांचा एक देशांतर्गत देश तयार झाला आहे. राष्ट्रभावना ही खिल्ली उडवण्याची गोष्ट बनली आहे. गुलामगिरी भूषणावह मानली जात आहे. या देशावरची निष्ठा, प्रेम, बंधुत्व यांची तसेच इथल्या समृद्ध परंपरांशी इमान राखण्याची प्रतिज्ञा इथल्या बालकांना एका परभाषेतून घ्यायला लावणे; व ही गोष्ट कोणालाही हास्यास्पद व लाजिरवाणी न वाटणे हे राष्ट्रीय अस्मितेचा सार्वत्रिक लोप झाल्याचे अत्यंत दुर्दैवी ठळक लक्षण आहे. या सर्व गोष्टींचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षणव्यवहाराला असलेली परभाषेतून - इंग्रजीतून शिक्षणव्यवहाराची दुष्ट समांतर शिक्षणव्यवस्था! भारत हा जर का एक स्वतंत्र व सार्वभौम देश असेल तर या भूमीवर सर्व स्तरांवरील शिक्षण फक्त आणि फक्त मातृभाषांमधूनच (ज्या भाषेच्या निकषावर प्रत्येक घटक राज्याची निर्मिती झाली त्या भाषेतून) झाले पाहिजे. तरच प्रत्येक भाषेचा, लोकांचा व या देशाचा विकास होणार आहे. या देशातील काही नागरिकांनी जगातील धनिक देशांची सेवा करून मिळवलेले धन म्हणजे देशाचा विकास असे चुकीचे चित्र आज निर्माण केले जाते आहे. फार तर तो त्या व्यक्तींचा तोही फक्त आर्थिक विकास म्हणता येईल. हा देश म्हणजे विकसित देशांना सेवक पुरवणारी कंपनी आहे काय? सर्व भारतीय म्हणजे तिचे नोकर आहे काय? ज्यांना परभाषेतूनच शिक्षण घ्यायचे असेल त्यांनी परदेशात जाऊन ते खुशाल घ्यावे.

याला घेण्यात येणारे सर्व आक्षेप हे अज्ञान व गुलामगिरीची मानसिकता यांतून घेतलेले असतात. किंबहुना प्रत्येकाने मतप्रदर्शन करण्याचा हा विषयच नाही. जगाच्या नकाशावर जेंव्हा एखादे नवीन राष्ट्र जन्माला येते तेंव्हा वरील बाब अध्याहृतच असते. अन्यथा कशासाठी हाकलून दिले इंग्रजांना एवढा प्रदीर्घ लढा देऊन आणि हजारो भारतीयांनी आपले प्राण देऊन; आणि आज हेच जर करायचे होते तर काय वाईट होते त्यांचे राज्य?

गुलामगिरीची मानसिकता हा एक हळूह्ळू जडणारा व पसरत जाणारा रोग असतो. हा रोग सामाजिक व मानसिक असल्याने रोग्याच्या लक्षात येत नाही. याशिवाय ध्येयहीन व भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना अशा रोग्यांवर राज्य करणे सोपे जात असल्याने ते गुलामगिरीच्या मानसिकतेला उत्तेजनच देतात.

शिकण्यासाठी कोणती भाषा सोपी व कोणती अवघड, किंवा कोणती सोयीची-गैरसोयीची हा येथे मुद्दाच होऊ शकत नाही. चिनी किंवा जपानी भाषा, लिप्या काय इंग्रजीपेक्षा सोप्या व सोयीच्या म्हणून ते देश त्यांच्या भाषेतूनच शिक्षणव्यवहार करतात की काय? मुद्दा अस्मितेचा व राष्ट्रीय, सांस्कृतिक अस्तित्वाचा आहे. --शिक्षणासाठी जेंव्हा मूल घराबाहेर पडते तेंव्हा मूल व समाज, मूल व देश यांची घट्ट सांगड घालण्याचे महान साधन म्हणजे मातृभाषा! मातृभाषेमधून शिक्षण! ते त्यांच्या देशात कसोशीने पाळले जाते. जगामध्ये आमची ही भाषा बोलणारे आणि या भाषेमधून व्यवहार करणारे आम्ही हा एक एकजिनसी समाज आहे. ही आमची जागतिक ओळख आहे. जगातल्या ज्यांना आमच्याशी व्यवहार करायचा असेल त्यांनी आमची भाषा शिकावी. ही भूमी हे आमचे घर आहे. हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे हे प्रत्येक बालकावर जन्मल्यापासून मातृभाषेचा सन्मान केल्यामुळे बिंबवले जाते.

आता आपण भारतीय काय करतो ते पाहू. खोट्या कल्पनांपायी आदर्श समाज निर्मितीचे हे महान साधन आम्ही कचर्‍यात फेकून मातृभाषेमधून शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना भारताच्याच भूमीवर निव्वळ शिक्षणाच्या माध्यमाच्या निकषावर दुय्यम दर्जाचे, नीच शैक्षणिक जातीचे ठरवतो. इथे परभाषेतून शिक्षण देऊन आम्ही बालकांना हे शिकवतो की तू उच्च शैक्षणिक जातीचा असून त्या लोकांसाठी आहेस जे इथे नाहीत, परदेशात आहेत. ते तुझे आप्त आहेत जरी ते तुला त्यांचे आप्त मानत नसले तरी. म्हणून तुला त्यांच्या भाषेमधून आम्ही शिकवतो आहोत. या देशात तू राहात असलास तरी इथल्या लोकांची भाषा, संस्कृती तुला शिकण्याची आवश्यकता नाही. ते तुझे कोणीही नाहीत. त्यांच्यात आणि तुझ्यात संवाद होण्याचीही काही गरज नाही. त्यांची भाषा, आचार-विचार, संस्कृती यांच्याशी तुला फारकत घ्यावयाची आहे. हा सर्व त्याग तुला तुझ्या जलद व्यक्तिगत आर्थिक समृद्धीसाठी करावयाचा आहे. कारण जगात तेच फक्त महत्वाचे आहे. तुझ्या प्रत्येक पाठ्यपुस्तकात छापलेली प्रतिज्ञा अर्थ लक्षात घेण्यासाठी नाही. कारण ती याच्या पूर्णपणे विपरीत असून केवळ नियमांच्या पूर्ततेसाठी आहे.

हे ज्यांना पटते त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींवर असे दडपण आणणे आवश्यक आहे की गुलामगिरीच्या मानसिकतेचा रोग न जडलेले आम्ही बरेच लोक या देशात आहोत. इंग्रजी ही भाषा राजकीय पारतंत्र्याची दीडशे वर्षे अधिक भाषिक पारतंत्र्याची त्रेसष्ठ अशी दोन शतकांहून अधिक काळ जनतेवर लादूनसुद्धा या देशातील जनतेत शिक्षणाचे माध्यम म्हणून अजिबात रुजलेली वा स्वीकारली गेलेली नाही. ज्या थोड्यांनी स्वीकारली आहे ते भयभीत व प्रवाहपतित आहेत. या देशातील २० टक्के लोकांना सुद्धा ती येत नाही. तेंव्हा ती लोकांच्या माथी मारण्याचा प्रयोग आता बंद करावा. कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही पातळीवरचे शिक्षण या देशात फक्त आणि फक्त मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे हे कितीही अवघड व विचित्र वाटले तरी घडलेच पाहिजे. तेंव्हा खासदारांच्या पगारवाढीच्या विधेयकाप्रमाणे हे विधेयक मांडून एकमताने संमत झाले पाहिजे. गोष्ट सोपी नसली तरी अशक्यही नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

मराठी लिहिता वाचता येणे

मराठी लिहिता वाचता येणे आणि मराठी शिकवता येणे यात बराच मोठा फरक आहे. त्या अनुषंगाने विचार करता तुमच्या मोलकरणीला आणि नवर्‍याला शाळेतून येणारी पत्रके वाचण्यापेक्षा फार मोठी मदत मुलास करणे कठिण वाटते. म्हणजेच मूल मराठी शाळेत गेले काय किंवा इंग्रजी शाळेत; त्या दोघांना किंवा मुलाला खूप मोठा फरक पडेल असे नाही. (इतर पालकांप्रमाणेच शिकवण्या लावून ते मुलाला शिकवू शकतील.)

मराठी माध्यमात घालणे हा गुन्हा नाही आणि त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. परंतु, जर चांगल्या शाळांचे पर्याय उपलब्ध असतील तर आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवणे हे आपले कर्तव्य आहे असे पालकांना वाटणे सहाजिक आहे. मग त्या मराठी असोत किंवा इंग्रजी. अनेक मराठी शाळांचा दर्जा घसरत चालला आहे हे सत्य नाकारून चालणार नाही आणि तो दर्जा केवळ पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवण्याचे नाकारले म्हणून नसावा. मी शाळेत असतानाच आमच्या शाळेचा दर्जा घसरत चालल्याचे लक्षात येऊ लागले होते. अप्रमाण मराठी बोलणारे शिक्षक, कमी वेतनात असंतुष्ट राहणारे आणि त्याचा राग मुलांवर काढणारे शिक्षक, दुसरी बरी नोकरी मिळत नाही म्हणून शिक्षकी स्विकारलेले शिक्षक वगैरे शाळेत होतेच आणि असे असेल तर शिवाजी आपल्या घरातच जन्माला यावा अशी तुमच्या मोलकरणीची इच्छा नसावीच.

पार्ले टिळक आणि बालमोहन सारख्या शाळा आता-आता पर्यंत व्यवस्थित चालत होत्या असे दिसते. सद्य परिस्थिती माहित नाही परंतु बर्‍याच शाळांनी आठवीपासून सेमी-इंग्लिश पद्धती अवलंबली आहे त्यावरून इंग्रजीला पर्याय नाही हेच दिसून येते. आमच्या शाळेतही ही सेमी-इंग्रजी पद्धत लागू झाल्याचे मला हल्लीच कळले आणि आनंद झाला.

अजून नरी नाहि पटले

तो दर्जा केवळ पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवण्याचे नाकारले म्हणून नसावा. मी शाळेत असतानाच आमच्या शाळेचा दर्जा घसरत चालल्याचे लक्षात येऊ लागले होते. अप्रमाण मराठी बोलणारे शिक्षक, कमी वेतनात असंतुष्ट राहणारे आणि त्याचा राग मुलांवर काढणारे शिक्षक, दुसरी बरी नोकरी मिळत नाही म्हणून शिक्षकी स्विकारलेले शिक्षक वगैरे शाळेत होतेच

मात्र असे शिक्षक इंग्रजी माध्यमातही आहेतच (म्हणजे अप्रमाण इंग्रजी बोलणारे, कमी वेतनात असंतुष्ट राहणारे आणि त्याचा राग मुलांवर काढणारे शिक्षक, दुसरी बरी नोकरी मिळत नाही म्हणून शिक्षकी स्विकारलेले) कारण सद्यस्थितीत त्यांचे पगारही तसेच तुटपुंजेच आहेत. इंग्रजी माध्यमांचाच दर्जा सुधारला आहे असा भ्रम का?

इंग्रजी माध्यमांमधे दर्जा चांगला असण्यासारखे काय विषेश आहे हे त्या शाळांमधे जाणारे सांगु लागतात तेव्हा तिथे बर्‍या घरची मुले जातात किंवा आता इंग्रजी शिकणे कस्से गरजेचे आहे हेच कारण सांगितले जाते. शिक्षक चांगले असतात, उत्तम इंग्रजी बोलतात वगैरे कारण मला अजूनपर्यंत कोणी सांगितल्याचे आठवत नाहि.

तिच्याच भाषेत सांगायचे तर "आमचे इंग्रजी येत नसल्याने अडले तसे मुलांचे अडु नये" हे कारण आहे. मुळात तिचे इंग्रजी येत नसल्याने नव्हे तर शिक्षण कमी असल्याने अडले आहे मात्र सद्यपरिस्थितीत शिकलेल्यांची, अगदी मराठी माध्यमांतून शिकलेल्यांची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने (त्याची कारणे बदल्या होणार्‍या नोकर्‍यांपासून इतर अनेक आहेत तरी त्याच्याकडे डोळेझाक करून) असा मराठीला घातक असा सोयिस्कर गैरसमज तयार होत आहे असे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत तरिही...

मी सहमत आहे.

इंग्रजी शाळेचा दर्जा चांगलाच आहे असे एक मत बनले आहे, काही इंग्रजी शाळा उत्तम आहेत पण पालकांचा ओढा हा शाळा उत्तम आहे ह्याहीपेक्षा इंग्रजी येणे महत्वाचे आहे ह्याकडे जास्त आहे, निदान अजाण पालकांचा, किवा सदर काम करणाऱ्या बाईंचा (त्यांच्या परिस्थितीनुसार तो कदाचित योग्य निर्णय असेलही).

त्याही बरोबर मी थोडा प्रियाली ह्यांचाशी देखील सहमत आहे, कि ज्यांना मराठी किवा इंग्रजी दोन्ही येत नाही किवा केवळ भाषेमुळे चांगल्या संधी उपलब्ध होतील व त्यामुळे मुलाचे भविष्य सुरक्षित राहील असे वाटणे साहजिक आहे.

@ ऋषिकेश - तुम्ही ज्या नुनागंडाबद्दल बोलत आहात तो नुसता भाषेमुळे नाही तर तुमच्यावर घरात/शाळेत/घराबाहेर होणाऱ्या संस्कारांचा परिणाम आहे, त्यात तुमचा मुळचा स्वभावही आहेच, शाळा किवा भाषा हा एक भाग झाला.

हम्म!

मला सर्वच इंग्रजी शाळांचे माहित नाही परंतु हल्ली शाळांतून चांगले पगार आहेत. माझ्या ओळखीतल्या एका शिक्षिकेचा दरमहा पगार ४०,००० च्या पुढे आहे. शाळा बंगलोरमध्ये आहे. मुंबईतही अशा अनेक शाळा आहेत. असो. याचा अर्थ सर्वच इंग्रजी शाळांत अशी परिस्थिती आहे असे नाही हे मान्य आहे. इंग्रजी तोडकी-मोडकी बोलणार्‍यालाचे ज्या प्रमाणात फायदा होतो त्या प्रमाणात इंग्रजी न बोलणार्‍याचा होईलच असे सांगता येत नाही आणि हे मी पाहिलेले आहे. खूप सफाईदार इंग्रजी न येता कामापुरते इंग्रजी येत असेल तरी त्याचा अनेकांना फायदा होतो हे सत्य आहे. असो. शाळांबाबत इथे बहुधा खाजगी-अनुदानित आणि खाजगी-विनाअनुदानित वगैरे मुद्दे पुढे येतील.

शिक्षक चांगले असतात, उत्तम इंग्रजी बोलतात वगैरे कारण मला अजूनपर्यंत कोणी सांगितल्याचे आठवत नाहि.

हे मी ऐकलेले आहे. तुम्ही विचारून पाहावे, कदाचित ऐकू येईल.

तिच्याच भाषेत सांगायचे तर "आमचे इंग्रजी येत नसल्याने अडले तसे मुलांचे अडु नये" हे कारण आहे. मुळात तिचे इंग्रजी येत नसल्याने नव्हे तर शिक्षण कमी असल्याने अडले आहे मात्र सद्यपरिस्थितीत शिकलेल्यांची, अगदी मराठी माध्यमांतून शिकलेल्यांची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने (त्याची कारणे बदल्या होणार्‍या नोकर्‍यांपासून इतर अनेक आहेत तरी त्याच्याकडे डोळेझाक करून) असा मराठीला घातक असा सोयिस्कर गैरसमज तयार होत आहे असे वाटते.

यात नेमके काय चुकले? उद्या एखाद्या बी.कॉम किंवा इंटर/ बारावी झालेल्या माणसाला आपले मूल कम्प्युटर इंजिनिअर व्हावे असे वाटले कारण त्या शाखेला आज मागणी आहे तर कुठे बिघडले? की मोलकरीण आहे म्हणून तिच्या मुलांनी मराठी शाळेत जायला हवे? आणि कम्प्युटर इंजिनिअर होता येत असेल आणि सर्वांचा ओढा त्याच शाखेकडे आहे त्यामुळे सिविल इंजिनिअरींगला हे घातक आहे म्हणून सिविल इंजिनिअरींगला जावे?

काहि विदा

हे मी ऐकलेले आहे. तुम्ही विचारून पाहावे, कदाचित ऐकू येईल.

हा प्रतिसाद कालच वाचला होता म्हणून काल् दुपार ते संध्याकाळ यामधे भेटलेल्या तरूण व मुलांना नुकत्याच शाळांत घातलेल्या ३ जोडप्यांजवळ [त्यातल्या वडिलांबरोबर] हा विषय मुद्दामहून काढला. त्याचे प्रतिसाद रोचक वाटले म्हणून इथे देत आहे. वर तर्क केलेले लॉजिक (तुम्हीदेखील व मीदेखील) यापैकी कोणीच सांगितले नाहि :)
१.
"अरे काहि नाहि रे.. त्यांची स्कुलबसेस बघितल्या ना.. किती व्यवस्थित आहेत.. जास्त फी आहे पण मुलगा शाळेत व्यवस्थित जातो हे महत्त्वाचं... शिवाय लायब्ररी, पटांगण आहेच की. आपल्याही शाळेला ते आहेच म्हणा पण आम्ही दोघे घरात नाहि. कोणा रिक्षावाल्याबरोबर पोरांना शाळेत पाठवायचं नव्हतं.. या शाळेची बस छान आहे. बाकी काय शाळा इथून तिथून सारख्याच"
[या व्यक्तीच्या प्रतिक्रीयेवर मी फारसा विश्वास ठेऊ शकत नाहि; मात्र हे पर्सनल बायस्ड मत झालं. शिवाय याकडे एक विदा किंवा कारण म्हणून बघता येईलच :) ]
२.
"अरे मला एस्.एस्.सी. बोर्डच नको होतं.. सी.बी.एस्.सी मुळे काँपिटीटीव्ह परिक्षांना फायदा होतो."

३.
"आपल्या आजुबाजूची सगळी मुलं तिथे जातात. तिला सोबतही होते आणि इतरांपेक्षा वेगळं ही वाटत नाही. शिवाय तिला सोडायला गेलं की तिच्या आईचा वेळही इतक्या ओळखीच्या बायकांत मस्त जातो हे वेगळंच "

श्रेयअव्हेरः
प्रतिसाद नवर्‍यांनी दिले आहेत. तेव्हा कदाचित त्यांना बायकोच्या डोक्यात असलेली "खरी कारणे" जाहिर मांडण्यासारखी वाटली नसण्याची शक्यता गृहीत धरावी. :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ट्रेंड

ऋषीकेश, तुम्हाला खरेच वाटते का की हे सर्व पालक मूर्ख (इग्नोरंट या अर्थी) आहेत? ते मूर्ख आहेत असे समजणे हा आपला अहं कुरवाळणे आहे आणि अशा मूर्ख पालकांनी आपली मुले मराठी शाळांत घातली काय आणि इंग्रजी शाळांत घातली काय? काय फरक पडतो? :-) मला वाटते तुम्ही त्यांना शिक्षकांबद्दलच उत्तरे द्या असे सांगायला हवे होते. असो. वेळ गेलेली नाही. जेव्हा तुमची वेळ येईल ;-) तेव्हा तुम्ही अधिक चौकशी करालच. मी तशी केली होती आणि नंतरच निर्णय घेतला म्हणून इतक्या ठामपणे लिहिते आहे.

शिक्षणपद्धत हा ट्रेंड असावा. जो कालांतराने बदलत राहतो. पूर्वी गुरुगृही जाऊन त्याच्या घरी पाणी भरून, सरपणासाठी जंगलातली लाकडे तोडून आणून वगैरे शिक्षण घ्यावे लागे. गुरुकुल गेले. शाळांची पद्धत आली. आई वडिल मुलांना पूर्वी शाळेत सोडत. माझ्या लहानपणी शाळेच्या कौलांतून पावसाळ्यात पाणी ठिपकत असे. नंतर मोठी शाळा बांधली. आम्ही अजून जुन्या कौलारू शाळेच्या आठवणींचे उमाळे काढतो. आता स्कूलबसेस असतात कारण मोठमोठ्या शाळा दूर झाल्या आहेत. शिक्षणाचे विषय वेगळे झाले. इतर ऍक्टिविटिज वाढल्या. हे सर्व कालांतराने पुन्हा बदलेल. जो ट्रेंड आहे त्यावर चालणे हे अनेकांच्या पथ्यावर पडते. जी आजूबाजूची मुले करतात ते आपण करावे ही लहान मुलांच्या मनातील "व्यक्त" इच्छा असते. अशीच इच्छा पालकांचीही असते. असे करून प्रवाहासोबत वाहता येते. त्यात काहीही गैर नाही. मग तो मोलकरणीचा मुलगा असो किंवा एखाद्या कंपनीच्या सीईओचा. ज्याला जे परवडते त्याने ते करावे.

अधिक चांगल्या कशा किंवा का वाटतात?

तुम्हाला खरेच वाटते का की हे सर्व पालक मूर्ख (इग्नोरंट या अर्थी) आहेत?

कल्पना नाही. कधी विचार केला नाहि. काहि असतील काहि नसावेत. पालकांचा शहाणपणा/मूर्खपणा कसा मोजायचा हे सांगितल्यास ते मुर्ख आहेत की शहाणे हे ठरवता यावे :-)

ते मूर्ख आहेत असे समजणे हा आपला अहं कुरवाळणे आहे आणि अशा मूर्ख पालकांनी आपली मुले मराठी शाळांत घातली काय आणि इंग्रजी शाळांत घातली काय? काय फरक पडतो?

प्रश्न गैरलागु.

बाकी प्रश्न, इंग्रजी शाळा ह्या मराठी शाळांपेक्षा वेगळ्या किंबहुना अधिक चांगल्या कशा? किंवा का वाटतात हा आहे? काहि कारणाने माझे अनेक शिक्षकांशी थेट बोलणे होते. त्यात माझे बोलणे झालेल्या वेगवेगळ्या शाळांतील इंग्रजी माध्यमांतील बर्‍याचशा शिक्षकांचे इंग्रजी अशुद्ध आहे हे मी जाणतो तसेच मराठी माध्यमांतील शिक्षकांच्या मराठीचा दर्जाही जाणून आहे (जो तितकाच हालाखीचा आहे) . तेव्हा हे कारण मला पचायला जड जात आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची भूमिका

>>> सी.बी.एस्.सी मुळे काँपिटीटीव्ह परिक्षांना फायदा होतो <<<

ही खरंच सत्यपरिस्थिती आहे आणि राज्य सरकारच्या शिक्षण मंडळानेदेखील ही बाब मान्य केली असल्याचे राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डॉ.एस्.एन्.पवार यांनी "सह्याद्री" वरील एका मुलाखतीत सांगितले होते शिवाय त्यामुळेच अगदी इयत्ता ५ वी पासूनच अशा पद्धतीचाच पाठपुरावा करावा हाच हेतू मनी बाळगून "इंग्रजी" भाषेच्या पुस्तकाची मांडणी केल्याचे दिसून येते.

५ वी च्या याच पुस्तकात "शिक्षकांसाठी सूचना" यात "वर्गात इंग्रजी वर्तमानपत्रे ठेवून त्यातील जाहिराती, मथळे प्रत्यक्षात वाचण्याची संधी मुलांना द्यावी. हेडलाईन्ससाठी हे अंक वर्गातच मुलांना हवे तेव्हा पाहता येतील् अशा पद्धतीने ठेवावेत." ~~ ही आणि अशा प्रकारच्या सूचना "काँपिटीटीव्ह् एक्झाम." ना विद्यार्थी बसणार हे गृहीत धरूनच केल्या जात आहेत यात शंका नाही.

काहीही असो, या निमित्तीने का होईना, प्राथमिक वर्गातील विद्यार्थी क्रमिक पुस्तकाव्यतिरिक्त अन्य अवांतर वाचन (इंग्रजी असो वा मराठी) करत राहतील अशी आशा करू या.

विशेषनामांचे भाषांतर

विशेषनामांचे भाषांतर करणे चूकच आहे.

नेहमी चूकच असते असे नाही. उदाहरणार्थ जीजस क्राइस्ट याचे मराठी भाषांतर येशू ख्रिस्त, तर हिंदीत ईसा मसाही. निप्पॉनचे मराठी जपान किंवा त्याउलट. जॅपनीज़चे मराठी जपानी. Zhonghua Renmin Gonghe Guo किंवा थोडक्यात Zhongguo या नावाच्या देशाला इंग्रजीत चायना आणि मराठीत चीन म्हणतात. शार्मण्य नावाच्या देशाला मराठी-इंग्रजीत जर्मनी म्हणतात. त्याला खुद्द जर्मन भाषेत काय म्हणतात ते सर्वांना माहीतच आहे. इजिप्‍तला हिंदीत मिस्‍र म्हणतात. इंग्लिशचे भाषांतर इंग्रजी, अंग्रेजी किंवा आंग्ल. परकीय शब्दात असलेली मुळाक्षरे किंवा उच्चार जर दुसर्‍या भाषेत नसतील तर भाषांतर करावेच लागते. मराठी विशेषनामांचे तामीळमध्ये आणि त्याउलट करताना मूळ अक्षरे बदलावी लागली तर आश्चर्य नाही. तामीळ इट्टलि-दोसै मराठीत इडली-डोसा होतात. या शब्दांचा हिंदी-गुजराथीत आणखी भयंकर उच्चार होणे शक्य आहे. भाजीकरिता बाजी आणि भाताकरिता बाथ असे चक्क मद्रासी उपाहारगृहांच्या मेनूकार्डांवर छापलेले असते.
तेव्हा, विशेष नामांची भाषांतरे म्हणा की अपभ्रंश-रूपांतरे, ही अनेकदा करावी लागतात.--वाचक्‍नवी

गुजराथी

तामीळ इट्टलि-दोसै मराठीत इडली-डोसा होतात.

गुजराथीत इटली आणि ढोसा होतं. ;-) माझा अर्धगुजराथी भाचा त्याच्या आजीला नेहमी सांगतो - बा! इटली हा देश आहे. आपण तो खाऊ शकत नाही. ;-)

मी मागे संजय थुम्माची भटुर्‍यांची पाककृती शोधत होती. मिळतच नव्हती. नंतर मिळाली बथुरे या नावाखाली. ;-)

नुसतेच ढोसा नाही....

गुजराथी उपाहारगृहांच्या मेनूकार्डांवर किंवा आतील फळ्यावर ढोसा, धोसा किंवा ठोसा लिहिलेले मी वाचले आहे. इडलीला तर गुजराथीत ઇટલી( इटली) हाच शब्द असावा.--वाचक्‍नवी

इटालियन

इटलीमध्ये प्रत्येक शहराला दोन नावे आहेत. रोम-रोमा, फ्लोरेन्स-फिरेंझे, व्हेनिस-व्हिनिझ्झिया, नेपल्स-नापोली. इटालिअयन् लोक दुसरे नाव वापरतात, बाकीचे जग पहिले. त्यांना मुंबई-बॉम्बेसारखा इगो प्रॉब्लेम येत नाही असे दिसते. :)

अवांतर : मराठीत इटालियनला काही लोक इतालियन का लिहीतात? हिंदीत इतालवी वगैरे ठीक वाटते पण मला तरी मराठीत इटालियनच चांगले वाटते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बारीकसारीक फरक

"येशू ख्रिस्त" हे "जीझस क्राइस्ट"चे थेट मराठीकरण नव्हे. बहुधा मूळ लॅटिन "येसुस् क्रिस्तुस्"चे मराठीकरण आहे. त्यातही शेवटचा "उस्" विभक्तिप्रत्यय असल्यामुळे काढून टाकण्यास हरकत नाही.
लॅटिनमधून पोर्तुगीज "जेझूस् क्रिस्तो" मार्गे सुद्धा मराठीत शब्द आला असेल. मात्र आधी आलेल्या पाद्री लोकांनी मराठी बायबल लिहिताना लॅटिन किंवा हिब्रू मूळ उच्चार घ्यायचाही प्रयत्न केला.

हिंदीतला "ईसा मसीह" हा मात्र समुद्रमार्गे न येता आरामाइक->अरबी->हिंदी असा खुश्क प्रवास करून आला. हे सुद्धा थेट इंग्रजी शब्दाचे हिंदीकरण नव्हे. (इंग्रजी प्रतिशब्द "जीझस मेसायाह्", "जीझस क्राइस्ट" नव्हे.)

तमिऴ मध्ये "इड्लि" असेही असावे : (विकी இட்லி दुवा). अर्थात, त्याच दुव्यावर "இட்டலித் தட்டும்" = इ(ट्)टलि(त्)त(ट्)टुम्
असा शब्दही दिसत आहे. म्हणजे "इट्टलि" असेही काही परिस्थितीमध्ये असावे.
(तमिऴमध्ये दोन स्वरांच्यामध्ये कटतप->गडदब असा बदल संधिनियमामुळे आपोआप होतो. काही शब्दांमध्ये तो बदल रोखण्यासाठी क्क-ट्ट-त्त असे लिहितात. ही लेखनातली क्लृप्ती म्हणजे खरोखरची द्वित्त अक्षरे नव्हेत.)

उदाहरणांतले बारीकसारीक फरक सोडल्यास मुद्द्यांशी सहमत आहे.

 
^ वर