पिल्लई तेव्हा का नाहि बोलले जेव्हा त्यांचे वरिष्ठ (बॉस) पाकिस्तानला आले होते?

आजच्या डॉन ह्या पाकिस्तानमधून प्रसिद्ध होणार्‍या वृत्तपत्रातही पिल्लई हा विषय न येता तर नवल. यावरच्या ह्या लेखाचे "स्वैर भाषांतर" इथे देत आहे. मुळ लेख इथे वाचता येईल (यासाठी सदस्यत्त्व घ्यावे लागते). लेखन पिल्लई यांच्यापासून सुरू होते ते पुढे आग्रा शिखर परिषदेच्या पराभवाची कारणे यांची चर्चा करू लागते. लेख फार नीट बांधलेला अथवा फार नवा निष्कर्ष काढणारा नसला तरी रोजच्या वृत्तपत्रातील एक 'नेहमीचा' लेख इतपत आणि म्हणूनच त्याचे महत्त्व अधिक वाटते. पाकिस्तानमधील जनतेचा भारताबद्दलचा एक प्रकारच्या मतांचा धांदोळा (आणि काहि प्रमाणातला गोंधळ) यात छान उतरला आहे.

लेखाच्या भाषांतराची आणि त्याच्या उपक्रमावरील प्रकाशनाची व चर्चेची परवानगी श्री नक्वी यांनी दिल्याचा विरोप माझ्याकडे आहे. उपक्रम प्रशासनाला आवश्यकता भासल्यास तो मी देऊ शकतो

=====
स्वैर भाषांतरः Why didn’t Pillai speak up when his boss was visiting Pakistan?

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय टिव्ही च्यानेलला दिलेल्या मुलाखतीत योग्य कबुलीजवाब दिला की त्यांचे उत्तराधिकारी शाह महमुद कुरेशी यांनी त्यांचे भरतीय परराष्ट्रमंत्री एस्.एम्. कृष्णा यांच्याबद्दल काढलेले उद्गार प्रशासकीय सीमारेषा ओलांडणारे होते. श्री. कुरेशी यांचे (कृष्णा यांना पाकिस्तानबरोबर) व्यवस्थित वाटाघाटी करण्यासाठी - चर्चेसाठी आवश्यक अधिकार दिले नव्हते हे बोलणे बालिश आणि चुकीचे आहेच. शिवाय श्री. कृष्णा वाटघाटीं दरम्यान दिल्लीत कोणाचा सल्ला घेत असतील किंवा नसतील हा खरंतर त्यांचा स्वतःचा सोडल्यास कोणाचाही प्रश्न असता कामा नये.
(मात्र) अर्थातच श्री. कुरेशी यांना भारतीय गृह सचिव जी.के.पिल्लई यांच्या श्री. कृष्णा यांच्या इस्लामाबादभेटीच्या पूर्वसंध्येला विनाकारण व हानीकारक टिप्पणीला विरोध करण्याचा हक्क होताच. भारतीयांचं सोडा, आता मला माहित आहे की माझे कित्येक पाकिस्तानी मित्र आणि सहचारी श्री. पिल्लई यांच्या आय.एस्.आय. चा मुंबई दहशतवादी हल्ल्यात हात आहे ह्या आरोपात तथ्य असल्याने मान्य करतील. आणि जरी ते तसं असण्याची शक्यता आहे, तरीही भारतीय परराष्ट्र मंत्र्यांच्या, ज्याच्याकडे सारं जग डोळे लाऊन बसलं आहे अश्या महत्त्वाच्या भेटीच्या आधी त्यांची ही टिप्पणीची भलामण करता येणार नाहि. का ते सांगतो.
जेव्हा श्री. पिल्लई यांचे वरिष्ठ (बॉस) २६ जून रोजी इस्लामाबादला आले होते व नंतर स्वतः श्री पिल्लई यांची स्वतःची अशी उपयुक्त भेटही झाली होती, तेव्हाही श्री. पिल्लई यांच्याकडे तो सारा तपशील उपलब्ध होता. मात्र जर त्यांनी तेव्हाच त्यांची "ISIचा-मुंबई-हल्ल्यात-सहभाग" असणारी टिप्पणी केली असती तर ते एक ठळक आणि अर्थपूर्ण निरिक्षण असतं. पण त्यांनी ते केलं नाहि. त्यांनी श्री. कृष्णा यांच्यापुढ्यातील पाणी का गढूळ केलं? त्यांना ह्या विविक्षित प्रसंगी अशी टिप्पणी करण्याचा अधिकार कोणी दिला होता? त्यांना त्या बरेच दिवस चाललेल्या विवादित प्रश्नाला भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना हाताळायला सोडता नसता का आला? श्री कृष्णा (या प्रश्नाला) नक्कीच एकांतात (प्रायव्हसी) अथवा पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हाताळु शकले असते.
आणि तरीही श्री. कुरेशी श्री. पिल्लई यांची टोकाचा भारत विरोधी आणि जनमानसाला आपल्या बोलण्याने गुंगवणार्‍या हाफिज सईद बरोबर करणे चुकीचेच होते. सईद भारतद्वेष पसरवतोच आहे, आणि भारतातील काहि शक्तीशाली द्वेष पसरवणार्‍या मुंबई व गुजरात मधील व्यक्तींप्रमाणेच, पाकिस्तानमधील कायद्याचे रक्षकही त्याच्या स्वतःच्या देशात आणि शेजारी अशांतता माजवण्याच्या शक्तीच्या भीतीने (सईदवर) कारवाई करू शकलेले नाहित. माजी भारतीय माहिती मंत्री सुषमा स्वराज यांच्या पत्रकार परिषदेतील, १६ जुलै २००१ रोजी झालेल्या मुशर्र्फ-वाजपेयी यांच्यातील आग्रा शिखरपरिषदेला संपवून पूर्णपणे नाकारण्याच्या विचित्र भुमिकेला खतपाणी देणारी आहे (सुसंगत आहे)
श्रीमती स्वराज यांच्या आग्रा परिषदेचा विचका करण्याच्या भुमिकेवर येण्याआधी मी श्री पिल्लई व तत्सम लोकांच्या भुमिकेवर एक प्रश्न विचारू इच्छितो. प्रश्न असा आहे: कारगिल वाद व मुंबई हल्ला यापैकी भारतासाठी अधिक विनाशकारी(कॅटास्ट्रोफिक) काय होते? जर हा प्रश्न कोणाला अन्यायकारक वाटत असेल तर श्री पिल्लई यांच्या आय.एस्.आय.च्यासंबंधीत चिंतेच्या निमित्ताने अधिक थेट प्रश्न विचारतो: या दोन घटनापैकी कोणत्या घटनेवर आय.एस्.आय.चा 'छाप' होता - कारगिल, जे सगळ्यांना माहित आहे की ते पाकिस्तानी सैन्याचे ऑपरेशन होते - की मुंबई, ज्यात आयएस्.आयचा हात अजूनही केवळ एक आरोप आहे. अर्थातच कारगिल. पाकिस्तानच्या शासकीय संस्थाचा स्पष्ट सहभाग असल्याने (कारगिल) भारत पाकिस्तान संबंधाना अधिक हानी पोहोचवणारे होते.
आणि तरीही २३ मार्च २००१ रोजी, पाकिस्तानात कोणतेही विषेश बदल न होता अथवा पाकिस्तानने माफी न मागता भारताच्या तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपायी यांनी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना निमंत्रणपत्र धाडले. त्यात म्हटले होते "आपल्या जनतेच्या भल्यासाठी, उपयुक्त संवाद आणि विश्वासपूर्ण आणि सौहार्दपुर्ण वातावरण निर्माणकरून वाटाघाटी करणे सोडल्यास अन्य कुठलाही मार्ग नाही." वाजपायींच्या निमंत्रणपत्राचा शेवट पुढील शब्दांनी झाला होता "put in place a stable structure of cooperation and address all outstanding issues, including Jammu and Kashmir".
आग्रा शिखर परिषद –मुंबईसारख्या हल्ल्यांनी नाहि- तर पिल्लई यांच्यासारख्या अधिकार्‍यांमुळे आणि स्वराज यांच्यासारख्या राजकारण्यांनुळे फसली. श्री. ए.जी नुरानी यांनी या घटनाक्रमाचा, झालेल्या विचक्याचा आणि तो का झाला याचा करूण परामर्थ घेतला आहे. नुरानी म्हणता त्याप्रमाणे, सुषमा स्वराजांपासून सुरवात करुया. १५ जुलै २००१ रोजी आग्रा परिषदेला सुरूवात झाली तेव्हा त्यांनी पत्रकारांना ज्या प्रश्नावर चर्चा झाली त्याची माहिती देताना पाकिस्तानी लोकांना डिवचण्यासाठी काश्मिरला गाळले. त्याच्या याच्या स्पष्टीकरणातही विरोधाभास आहे. "मी काश्मिरचा उल्लेख केला नाहि कारण स्वाभाविक आहे, (कारण) मुशर्रफ त्यासाठीच तर इथे आले आहेत" (टाईम्स ऑफ इंडीया, जुलै १७) आणि त्याच दिवशी त्या दुसरीकडे म्हणतात "हे मुद्दाम गाळलेले नव्हते" (द टेलिग्राफ, जुलै १७).
मात्र पुढे ६ ऑगष्ट रोजी तत्कालिन परराष्ट्रमंत्री लोकसभेत सांगतात की हे मुद्दाम केले होते."जेव्हा त्यांनी (श्रीमती स्वराज यांनी) पत्रकारांना काय केले हे सांगितले तेव्हा सांगितले होते की असे सांगायला वाजपेयी कॅबिनेटची परवानगी आहे व मला ते अधिकार आहेत.". ते बरोबर आहेत. आग्र्यातून आलेला १७ जुलैचा विस्ताराने आलेला वृत्तांत उघड करतो: "आता (ह्या विचक्यानंतर) हे सांगता येतं की काहि मंडळी भारतीय बाजुकडून जाणीवपूर्वक काश्मिरबद्दल चर्चाच होऊ नये आणि परिषद अतिशय वाईट जावी याचीच वाट बघत होते." नुरानी यांच्यामते यामागे तीन कारणे आहेत - १६ जौलै रोजी मुशर्रफ यांची भारतातील वरिष्ठ पत्रकारांबरोबर केलेला वार्तालाप, ज्यात त्यांनी काश्मिर हाच मुख्य मुद्दा आहे असा घोषा लावणे आणि "सीमेपारच्या दहशतवादावर" चर्चा करण्यास दिलेला नकार
जर ब्रेकफास्ट मिटींग नसेल तर आग्र्याच्या विचक्यामागे काय कारण आहे? जसवंत सिंग यांनी १७ जुलै रोजी तीन कारणे सांगितली होती. एक मुशर्र्फ यांची "जम्मु काश्मिर याला चर्चेचा मुख्य मुद्दा केल्याशिवाय चर्चा पुढे नेता येणार नाहि" व भारताची "सगळ्या प्रश्नांवर चर्चा" करण्याची भुमिका. त्यामुळे भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप होता की पाकिस्तानला फक्त काश्मिरवर स्वतंत्र चर्चा हवी होती आणि इतर वाटाघाटी करायच्या नव्हत्या.
दुसरा मुद्दा "सीमापार दहशतवादाचा" आहे. आणि तिसरा सिमला आणि लाहोर या पूर्वकरारांना गाळण्याविषयक आरोप, जो पाकिस्तानचे तत्कालिन परराष्ट्र सचिव इनामुल हक यांनी तेव्हाच खंडित केला होता. (१५ जुलैच्या थ हिंदुमधे हा आरोप व त्याचे खंडन शेजारी छापले आहे). खरंतर ६ ऑगष्टला, स्वतळ् जसवंत सिंह यांनी लोकसभेतच सिमला व ताश्कंद कराराला अवैध ठरवले होते, मात्र नंतर त्यांनी ते उद्गार रेकॉर्दवरून काढले. (इंडियन एक्सप्रेस, ९ ऑगस्ट)
आता भारत-पाकिस्तानच्या पुढील भेटीचा प्रसंग काबुलला होईल यास शंका नाहि, जेव्हा दोन्ही बाजु आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित राहतील. बीजेपी प्रार्थना करेल की दोन्ही बाजुंमधे संवाद होऊ नये जेणेकरून पुढे कधी त्यांना हे संबंध सुधारता यावेत व काँग्रेस किंवा इतरांना त्याचे श्रेय मि़ळु नये. श्री. पिल्लई हे आपल्या रिटायर्मेंट नंतरच्या राजकीय कारकिर्दीची तजवीज करत असावेत. आणि आपण पत्रकार मात्र ह्या पुन्हाचालु-बंदपुन्हा चर्चांच्या वार्तांकनातच म्हातारे होऊ
दरम्यान, काश्मिरच्या रस्त्यांवर सर्वात बलाढ्य अश्या सैन्यापैकी एक अशा सैन्याचा दगदांनी मुकाबला करु पाहत आहे. ह्या शासकीय बुद्धीभेदाच्या खेळाची त्या युवकांना खरी भयंकर किंमत चुकवावी लागत आहे.

- जावेद नक्वी

====

Comments

चांगला अनुवाद

चांगला अनुवाद. (तूर्तास पोच.)

*भाषांतर प्रसिद्ध करण्यापूर्वी अनुमती घेतली हे उत्तम. मराठी संस्थळांवर हा पायंडा पडण्यात तुमचे पाऊल अग्रेसर आहे.

छान

छान अनुवाद.
मुख्य म्हणजे परवानगीचा मुद्दा ज्या पद्धतीने तर्कसंगत हाताळला ती आवडली. भविष्यात इतरांसाठीही मार्गदर्शक.

छान

छान अनुवाद. धनंजय यांच्याशी सहमत आहे. अनुमती घेतली हे उत्तम.

लेख विस्कळीत वाटला. कारगिल आणि मुंबई तुलना पटली नाही. शिवाय २६/११ च्या आरोपींना शिक्षा होईल किंवा नाही याबद्दल मौन पाळलेले दिसले. पिल्लइंचे वक्तव्य अस्थानी होते हे पटले. तसेच कुरेशी यांचेही होते. एक सोडून दिले आणि दुसरे नाही हे पटत नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

उत्तम

छान लेख.
ऋषिकेश यांना वाण नाही पण गुण लागला म्हणायचा लांबलचक शीर्षकाचा.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

असफल भेट

"डॉन" मधील लेखाच्या सुंदर अनुवादाबद्दल श्री.ऋषिकेश यांचे आभार. लेखामधील श्री.पिल्लई यांच्यावरील आक्षेप दोन्ही देशातील राजकारणाचा परिपाक आहे, कारण प्रत्येक असफल भेटीच्या शेवटी विच्छेदनासाठी कोणतीतरी प्रतिमा पाकिस्तानला हवीच असते, ती या खेपेस श्री.पिल्लई यांच्या रूपात मिळाली हीच त्या लेखाची "समरी" आहे. पाक विदेश मंत्री श्री.कुरेशी यांना टिव्हीवरील त्या पत्रकार परिषदेत ज्यांनी पाहिले असेल तर त्यांची देहबोली किती आक्रमक होती याची त्यांना जाणीव झाली असेल. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर पाकने कोणत्याही परिस्थितीत श्री.कृष्णांच्या भेटीचा फज्जा उडवायचाच हे जणू निश्चितच केले होते, त्यासाठी पिल्लई हे सॉफ्ट टार्गेट आयतेच त्यांच्या हातात आलेच होते. कुरेशी यांच्या म्हणण्याचा थेट अर्थ असा आहे की, जोपर्यंत काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला हवा तसा सोडविला जात नाही, तोपर्यंत भारतातील दहशतवाद व घुसखोरीच्या प्रश्नावर चर्चा होणार नाही. श्री.कुरेशीच काय पण त्यांच्या बोलावित्या धन्यांची आजपर्यंतची हीच भूमिका होती, आहे अन् राहिल की, "काश्मिर नाही तर घाटीत अमन नाही". अशा प्रकारच्या विखारी परिषदेची सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकास भुरळ पडते, म्हणजे जणू काय काश्मिर त्यांच्याकडे आले तर "पूरा पाक पाक हो जायेगा !"

भेटीच्या अगोदर गृहसचिव पिल्लई यांनी केलेल्या 'हेडलीच्या जबानीवरून मुंबई हल्ल्यात आयएसआयचा हात सुरुवातीपासून शेवटपर्यंत होता, हे स्पष्ट झाले आहे' विधानावरून पाकिस्तान ही चर्चा यशस्वी होऊ देण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. कारण समजा काही प्रमाणात ही चर्चा यशस्वी झाली असती (अर्थात एका बैठकीतच हे शक्य नसतेच, तरीही) तर आयएसआयबाबत भारताच्या गृहसचिवांचा निष्कर्ष पाकने मान्य केला आहे, असे चित्र उभे राहिले असते. दोन्ही देशांतील संबंध इतके गुंतागुंतीचे आहेत की, एका बैठकीत चर्चा पुढे जाईल असे कुणीही मानीत नव्हते.तथापि, ज्या पद्धतीने भारताच्या विदेश मंत्र्याचा अपमान तिथे झाला ते पाहता "आम्ही भारत करीत असलेल्या शांतता प्रयत्नाला केराची टोपली दाखवितो. कारण शांतता हवीच असेल तर प्रथम काश्मिर प्रश्न टेबलवर घ्या, आणि तोही आमच्या अटीस अधिन राहून." असे करणे भारताला परवडणारे नाही हे नेहरू जमान्यापासून आपण पाहतोच आहोत. मग अशा परिस्थितीत श्री.पिल्लई यांच्या शेर्‍याचा पाक कसा आणि कितपत उपयोग करून घेईल हे नवी दिल्लीला माहित असायलाच हवे.

भारताने या असफल भेटीचे फलित इतकेच मानावे की, आपण इथून पुढे चर्चेची जपमाळा ओढीत बसू नये कारण त्यातून शून्य फळ मिळणार हे पाकनेच सांगितले आहे. अमेरिका कितीही चर्चेचे प्रस्ताव ठेवीत असली तरी व्हाईट हाऊसला दिल्लीपेक्षा इस्लामाबादची काळजी अधिक वाटते.

(या विषयाच्या अनुषंगाने इथे "उपक्रमा"वर अधिकाधिक सदस्यांनी भाग घेऊन मते प्रदर्शित करावीत असे सुचवितो. प्रतीक)

ब्लो हॉट ब्लो कोल्ड

कृष्णांची फस(व)लेली भेट व आग्रापरिषदेच्या विचक्यातील संदर्भ (किंबहुना साधर्म्य) केवळ याच लेखात नाहि तर अगदी आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखातही आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

डावपेच चांगलेच होते.

तसे मला कॉंग्रेसपक्ष हा आवडत नाही. पण राजकिय वाटाघाटी करत असताना, जो पहिला लबाडपणे चलाखपणा (सोप्या शब्दात 'विश्वासघात') करतो, तो जिंकतो. हा नियम काँग्रेसचे सरकार व्यवस्थित पाळते. भाजप प्रणीत सरकारला हे डावपेच (वाजपेयी व नवाज शेरीफ यांच्या भेटी दरम्यान...त्याआधीच) जमले नव्हते.

डावपेच चांगलेच होते, म्हणून तर कुरेशी चिडला.

रोचक

हा तर्क रोचक आणि माझ्यासाठी नवा आहे.
हाच तर्क पुढे नेला तर आग्रा परिषदेवेळी भाजपाने योग्य खेळी खेळली असे वाटते का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

जग पहावं तसं दिसतं!!

तो 'तर्क' नाही. ते नियम असतात.
शिवाजी महाराजांची कारकिर्द ही तर्कावर आधारलेली नव्हती. बारीक अवलोकनातून ते शिकता येतात. त्यांच्या कहाण्या वाचून डावपेच कसे लढवायचे? कसा बचाव करायचा? हे शिकणारा शिकू शकतो. त्यासाठी राजकिय घराण्यातच जन्मायला हवे असेही नाही.
भाजपातील मंडळींनी 'नेमके काय डावपेच लढवले होते' मला माहीत नाहीत. पण 'डावपेच चूकले, वा यशस्वी झाले नाहीत की सत्ता धोक्यात येवू शकते.' हा नियम मी ओळखू शकतो. भाजप सत्तेवर असताना पाकिस्तान कडून हल्ला झाला. भाजप सत्तेवर असताना आग्रा परिशदेत डावपेच (तसा त्यांनी विचार तरी केला होता का? तेही वाटत नाही.) जमलेच नाहीत, मुशरर्फला (या माकडाला) तर अजिबात जमले नव्हते. असा माझा कयास आहे. (या माकडाने जे युद्ध करून कमावले होते ते डावपेचानंतर गमावले.)

पिल्लई तुम्हारा चुक्याच

आता तर स्वतः कृष्णा सांगताहेत की पिल्लई तुम्हारा चुक्याच

या पातळीवरचे अंतर्गत मतभेद इतके चव्हाट्यावर येणे मला धोक्याची आणि शरमेची गोष्ट वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

श्री. पिल्ले यांची विधाने

श्री. पिल्ले यांची विधाने ही एक प्रकारचा मास्टर स्ट्रोक आहे यात शंकाच नाही. त्यांनी ही विधाने स्वत:च्या डोक्याने या वेळी का केली असे प्रथमदर्शी वाटणे साहजिक आहे. परंतु एक लक्षात घेतले पाहिजे की भारत सरकारचा आणि त्यात फॉरिन अफेअर्स मंत्रालयाचा कोणताही अधिकारी त्याला सूचना मिळालेल्या असल्याशिवाय अशी विधाने स्वत:च्या डोक्याने करणार नाही.
श्री. पिल्ले यांच्या विधानांच्या टायमिंगने दोन गोष्टी भारत सरकारने पाकिस्तानला दर्शवून दिल्या असे मला तरी वाटते.
1. श्री. कृष्णा व मिया कुरेशी यांच्यातील चर्चेला भारत सरकारच्या दृष्टीने असलेले न्यूनतम महत्व.

2. या आधी श्री. चिदंबरम यांनी ठणकावून सांगितलेल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असा इशारा.

3. श्री. कृष्णा यांचे रियल पॉलिटिक मधले स्थान.
वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे हा प्रसंग खूपसा आग्र्याच्या वेळच्या श्री. सुषमा स्वराज यांच्या पत्रकार परिषदेसारखाच आहे यात शंकाच नाही. या अशा प्रसंगांनी मूळ वाटाघाटींना सरकार काहीही किंमत देत नाही हे दोन्ही वेळा दर्शवले गेले आहे. चिनी सरकार अशा ट्रिक्स नेहमीच वापरते. फक्त चीनमधे सरकारी प्रवक्ते अशी विरोधी विधाने न करता ती दुसर्‍या कोणत्यातरी राजकीय अभ्यास करणार्‍या संस्थेमार्फत केली जातात.
आज श्री. कृष्णा यांनी नवीन प्रवक्त्याची केलेली नियुक्ती हा फक्त देखावा आहे. या सर्व गोष्टी मियां कुरेशी यांना समजल्यामुळे ते चिडले परंतु त्यांचे चिडणे फक्त त्यांची अपरिपक्वता दाखवते.
गेल्या काही वर्षात भारताचे फॉरिन अफेअर्स मंत्रालय जी काही व्ह्युहात्मक पावले उचलते आहे ती मोठी रोचक असतात. त्यातलेच हे समजावे. जिथे संदेश पोचायला पाहिजे होता तिथे तो पोचला आहे. चन्द्रशेखर

मस्त प्रतिसाद

प्रतिसाद आवडला. परिस्थितीचा एकुणात घेतलेला धांदोळा आणि त्यातून दिसणारी परिस्थिती रोचक आहे. मात्र कृष्णा यांच्या काल दिलेल्या मुलाखतीवरून (वरचा दुवा) त्यांनाच हा व्युह कळला आहे की नाहि अशी शंका येते.

गेल्या काही वर्षात भारताचे फॉरिन अफेअर्स मंत्रालय जी काही व्ह्युहात्मक पावले उचलते आहे ती मोठी रोचक असतात.

याबद्दल अधिक वाचायला आवडेल. बुद्धीबळ खेळताना मजा येतेच पण जर कोणी समोरच्याचा खेळ उलगडून दाखवला तर अधिक मजा येते. यावर वेळ झाला की (इथे किंवा वेगळ्या लेखात) सविस्तर लिहावे ही विनंती.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

बुद्धीबळाचा खेळ

आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून तुम्हाला वानगीदाखल एक उदाहरण देतो.
मागच्या महिन्यात श्री लंकेचे राष्ट्राध्यक्ष श्री राजपक्ष भारत भेटीवर आले होते. त्यांच्या भेटीनंतर जे करार दोन्ही देशात झाले त्यामधे एका करारानुसार श्री लंकेतील हाम्बांटोटा या शहरामधे भारतीय कॉं न्सुलेट उघडण्यात येणार आहे. आता आपल्याला हे हाम्बांटोटा आहे कुठे हे ही माहिती नाही. श्री लंकेच्या दक्षिण किनारपट्टीला (भारताच्या विरूद्ध बाजूच्या ) असलेले हे एक फिशिंग हार्बर आहे. या ठिकाणी भारतीय कॉ न्सुलेट कशासाठी उघडणार? हा प्रश्न कोणासही पडेल. परंतु आंतर्राष्ट्रीय राजकारणात केल्या जाणार्‍या खेळ्यांना नेहमी आगळेच महत्व असते.

या हाम्बांटोटा बंदराचा मोठा विकास करण्याचे श्री लंका सरकारने ठरवले आहे. त्यांनी प्रथम भारताकडे या बाबतीत विचारणा केली होती. परंतु भारताच्या दृष्टीने या बंदराचे महत्व नगण्य असल्याने त्यांनी काहीही मदत करण्याचे नाकारले. चीनने या संधीचा फायदा घेऊन 360 मिलियन डॉलर्सची मदत देऊ केली. चीनच्या मदतीने या बंदराचे विकासकार्य सुरू आहे. हे सर्वश्रुत आहे की चीन गेली कित्येक दशके हिंदी महासागरात नाविक तळ मिळवण्याच्या खटपटीत आहे. श्री लंका नाकारत असली तरी आज उद्या चीन या बंदरात चंचू प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन हाम्बांटोटा मधे भारतीय कॉ न्सुलेट उघडली जाणार आहे. म्हणजे तिथे प्रत्यक्ष काय होते आहे यावर भारताची बारीक नजर राहील व भारताच्या हिताविरुद्ध काही होते आहे असे वाटले तर आवश्यक पावले उचलता येतील.
चन्द्रशेखर

मस्त!

मस्त! तुम्ही वानगी दाखल चव दिलीत आता उत्सुकता शमण्या ऐवजी वाढली आहे.. :)
एका स्वतंत्र लेखात / लेखमालेत भारताच्या अशा ऐतिहासिक खेळ्यांचं संकलन करता येईल का? वाचनीय दस्ताऐवज ठरावा

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आंतर्राष्ट्रीय खेळ्या

माझ्या सॅ न्ड प्रि न्ट्स या इंग्रजी ब्लॉगवर मी असल्या आंतर्राष्ट्रीय व्ह्युहात्मक खेळ्यांबद्दल लिहित असतो. आपल्याला रस असल्यास आपण हा ब्लॉग जरूर वाचावा

चन्द्रशेखर

अफगाणिस्थान

अफगाणिस्थानात काबूल ह्या राजधानीच्या शहराव्यतिरिक्त कंदाहार, हेरात, जलालाबाद आणि मझारे शरीफ ह्या शहरांतदेखिल भारताने आपल्या कॉन्स्युलेट उघडल्या आहेत. (कारण उघडच आहे!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रोचक

रोचक प्रतिसाद. ऋषिकेशशी सहमत आहे. यावर आणखी लिहावे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

उद्या पुन्हा हाच खेळ

>>> या पातळीवरचे अंतर्गत मतभेद इतके चव्हाट्यावर येणे मला धोक्याची आणि शरमेची गोष्ट वाटते <<<

धोक्यापेक्षा "शरमेची" हीच थप्पड बरोबर आहे या नादान आणि अर्धवट राजकारण्यांना. मुत्सद्देगिरीतला आपला दुबळेपणा लपविण्यासाठी यांना प्रशासनातील कुठलातरी "बकरा" लागतोच. आता पहा, एक दोन महिन्यात पिल्लईची त्या पदावरून उचलबांगडी होईल आणि रा.रा.नेमाडे "बिढार" मध्ये म्हणतात त्याप्रमाणे "उद्या पुन्हा हाच खेळ" सुरू.

 
^ वर