परमेश्वराची आज्ञा!

परमेश्वराची आज्ञा!

एका भल्या पहाटे दस्तुरखुद्द परमेश्वर एका तत्वज्ञासमोर प्रगट होऊन म्हणाला:
"मी तुझा कर्ता, करविता. तुझा परमेश्वर. तू या तुझ्या लहान मुलाचा मला बळी दे. मी प्रसन्न होईन. "
"परमेश्वरा, तुझे काही तरी चुकत असावे. मुळात तू दयाळू. करुणासिंधू, कृपाळू, करुणाळू. किडा मुंग्यांचीसुद्धा हत्या करू नये असे सांगणारा. आज तू असे भलते सलते काय सांगत आहेस?"
"जो देव देवू शकतो तोच देव घेवूही शकतो, या दैवी नियमाचे तुला विस्मरण झालेले दिसते."
"परंतु असे काही बाही मागणी करणारा तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस हे कशावरून?" तत्वज्ञानी शंका उपस्थित केली. "कदचित तू माझ्या मनातल्या परमेश्वराचा सोंग घेतलेला भूत वा पिशाच्चसुद्धा असू शकशील"
"अरे मर्त्य मानवा, माझ्यावरील तुझी श्रद्धा, भक्ती कुठे गेली? तू माझ्या शब्दावर श्रद्धा ठेव. नास्तिकासारखे बरळू नकोस. भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे."
"ही श्रद्धा की बुद्धीभ्रष्टता? काही तरी घोटाळा दिसतो. यात कुणाचा तरी कुटिल डाव दिसतो. तुझ्या या नाटकी स्वरूपाला फसून एका निरागस बालकाचा खून मी कधीच करणार नाही. तुझी ही वाईट इच्छा कधीच मी पूर्ण करणार नाही. जी काही थोडी फार नीतीमत्ता माझ्यात शिल्लक आहे तिला वार्‍यावर सोडून देणार नाही." तत्वज्ञाचा आवाज चढत गेला. त्याच्या सांगण्यात ठामपणा होता.
"अरे मी तुझा लाडका परमेश्वर. तुझ्या श्रद्धेवर भाळलेला. तुझ्या आयुष्याला आकार देणारा. तू एक य:कश्चित मर्त्य मानव. माझ्या आज्ञाचे पालन न केल्यास काय होऊ शकते याची कदाचित तुला नक्कीच कल्पना नसेल. माझ्या आज्ञेची अवहेलना करण्यापर्यंत तुझी मजल गेली कशी? जरा पुरातन इतिहासात, पुराण कथेत डोकावून पहा. तुला माझे म्हणणे पटेल. "
"त्याकाळी ते योग्य असेलही. परंतु आज मी तुझी आज्ञा का पाळावी याचे योग्य कारण तू अजूनही देवू शकला नाहीस. केवळ ईश्वराज्ञा वा ईश्वरी प्रकोप टाळण्यासाठी असले हेय कृत्य मी कधीच करणार नाही."
तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत परमेश्वर अंतर्धान पावला.

Source: Fear and Trembling - Soren Kierkegaard (1843)

जगभरातील यच्चावत धर्मातील पुराणकथामध्ये स्वत:च्या मुलाला बळी दिलेले, आईला मारून टाकलेले, हजारो बांधवांचा शिरच्छेद करण्यास उद्युक्त करणार्‍या प्रसंगांची भरपूर रेलचेल आहे. असली देवाज्ञा पाळणारा शेवटच्या क्षणी बळी देण्यासाठी जेव्हा हत्यार उगारतो, तेव्हा हा दयाघन परमेश्वर भक्तावर प्रसन्न होऊन निरपराध्याला वाचवतो व थोडीशीसुद्धा शंका न घेता त्याची आज्ञा पालन करण्यास तयार असलेल्या भक्ताला स्वर्गप्राप्तीचे बक्षीस मिळून शेवट गोड होतो. (व ऐकणारे, वाचणारे डोळे पुसत देवाची महिमा अपार असे म्हणत श्रद्धेची खुंटी आणखी घट्ट करतात!) अशा प्रकारच्या गोड गोड शेवट झालेल्या कथांची पेरणी प्रत्येक धर्मग्रंथात आहेत. व अशा भाकड कथावर विश्वास ठेवणार्‍या आस्तिकांना यात विसंगती आहे वा असू शकते याचे भान नसते. पिढ्या न पिढ्या अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत व ऐकणारेही यात काही चूक नाही याच आविर्भावाने भक्तीपूर्वक ऐकत आले आहेत.
अशा भाकडकथा ऐकणारा आपल्या लाडक्यांचा बळी देण्याइतका मूर्ख असू शकतो का? असा प्रश्न सहजपणे विचारता येईल. या गोष्टीवर विश्वास ठेवणार्‍या भक्तांची ईश्वराच्या अस्तित्वावर वा ईश्वरावर कितीही गाढ श्रद्धा असली तरी खून, हत्या, बळी सारखे निंद्य कृत्य करावेत का? एखाद्या नास्तिकाची नेहमीची भुणभुण म्हणून हा प्रश्न नाकारण्यात अर्थ नाही. कुणीतरी स्वत:ला ईश्वर म्हणून घेणारा तुमच्यासमोर येतो व पोटच्या मुलाला मारून टाक असे सांगितल्यावर आपण निमूटपणे तसे करावे का? त्यामुळे वर उल्लेख केलेल्या प्रसंगातील संवादाप्रमाणे ऐकणारा भक्त ठार वेडा तरी असावा किंवा त्याला कुणीतरी फसवत असावे किंवा मुळातच ती ईश्वराज्ञा नसावी, असा तर्क लढवता येईल. यातून ईश्वराला त्या मुलाचा बळी हवा यापेक्षा त्या निरागस मुलाचा खून व्हावा असे कुणाला तरी तीव्रतेने वाटत असावे, ही गोष्ट स्पष्ट होते. कुठल्याही धर्माचा ईश्वर असले दुष्कृत्य करण्यास सांगणार नाही हे मात्र निश्चित.
पुराणकाळातील प्रसंगांचे विश्लेषण करताना कदाचित माणसांचा ईश्वराशी थेट संवाद होत असावा, असे वाटते. ते दोघे शेजारी शेजारी वा समोरासमोर बसून चर्चा, गप्पागोष्टी करत असावेत. आजकाल तसे काही घडताना दिसत नाही. फार फार तर एखादा बाबा, बुवा, महाराज, संत, महंत, मुल्ला, मौलवी, पोप, पाद्री, एखादी ताई, माई, माँ, मध्यस्थ (दलाल!) म्हणून काम करतात व त्यांच्या कानात सांगितलेली ईश्वराची खास 'आज्ञा' भक्तापर्यंत पोचवतात.(व प्रसंगी काही वेळा भक्ताला अडकवून स्वत: नामानिराळे होतात!) पुराणकथेतल्या जगात हत्या करण्यास सांगणा्र्‍यांची इत्थंभूत माहिती ऐकणार्‍याकडे असावी. त्यामुळे सांगणार्‍यांच्या अंतस्थ हेतूबद्दल संशय घेण्यास वाव नसावा. तेथे सर्व व्यवहार रोख ठोक, पारदर्शी. परंतु आताच्या आपल्या या ज्ञात जगात ही आज्ञा ईश्वराचीच आहे असे ठामपणाने म्हणता येणार नाही. कुणीतरी आपल्याला अडकवण्याच्या प्रयत्नात तर नाही ना? आपला सूड तर घेत नाहीत ना? माझ्या इस्टेटीवर कुणाचा डोळा तर नाही ना? असे अनेक प्रश्नं विचारण्यास वाव आहे. कदाचित खरोखरच ती आज्ञा देवाची असल्यास या लाडक्या भक्ताला नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे का? हा माझा देव माझी सत्वपरिक्षा तर घेत नसेल ना? पुराणकथेप्रमाणे शेवट गोड न झाल्यास कुणाला जवाबदार धरावे? या व अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील.
जर वर उल्लेख केलेला संवाद तत्वज्ञाऐवजी ईश्वरावरील सश्रद्धाशी झाल्यास काय झाले असते? चित्तभ्रम (insanity) झालेल्या वा मानसिक संतुलन हरवलेल्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर कुठलाही माणूस - कितीही तो सश्रद्ध असला तरी (वा सश्रद्धेचा आव आणत असला तरी) - ईश्वर सांगत आहे म्हणून पोटच्या पोराचा (वा इतर कुणाचा) खून करण्यास धजावणार नाही. मुळात ही ईश्वराचीच आज्ञा होती हे कळण्याचा कुठलाही मार्ग सश्रद्धाला ज्ञात नाही. श्रद्धा ही डोक्यात असते. कृतीला सश्रद्धाची वा अश्रद्धाची असे लेबल चिकटवता येत नाही. प्रत्यक्ष कृतीत श्रद्धेचा मागमूसही नसतो. मुळात ज्याला कुठलाही पुरावा देता येत नाही अशा गोष्टीवर विश्वास ठेवणार्‍या मानसिकतेला श्रद्धा म्हणत असतात. ही श्रद्धा वेळ प्रसंगी पुराव्यांना नजरेआड करण्यास भाग पाडते. पुराव्यांना नाकारते. ही श्रद्धा आजपर्यंत ज्याला खरे वा योग्य मानत होते त्याच्या विरुद्ध जाण्यास भाग पाडते. उदाहरणार्थ, ईश्वर कधीच हिंसेला उत्तेजन देणार नाही यावर आपला विश्वास असल्यास आपण (अंध)श्रद्धेला बळी पडून या विश्वासाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त होतो. (मात्रअनुभूती आली असेल तर काहीही होवू शकते!)
श्रद्धा आपल्याला जास्त कणखर बनवते, श्रद्धा कितीही दु:ख, संकटं, अडचणी आल्या तरी त्या सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती देते, अंतर्मनाला उभारी देते. इ.इ. दावे श्रद्धेचे पुरस्कर्ते नेहमीच करत असतात. परंतु त्याच मनाच्या कणखरपणाने आपण आपल्या मुला-बाळांचाही खून करू शकतो का? श्रद्धा आपल्या एकूण एक संवेदनांना मारून टाकते का?
तुम्हाला हा तर्क पटत नसेल तर ईश्वराचीच आज्ञा आहे म्हणून गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब फेकून शेकडो लोकांना नाहक मारणारे (व स्वत:चाही जीव गमावणारे!) धर्मांध सश्रद्ध तरुणांची फौज कुठल्या ईश्वराच्या आज्ञेचे पालन करत असते? याचे उत्तर शोधावे लागेल. कुठला ईश्वर - वा धर्म - निरपराध स्त्रियांना, पुरुषांना, गर्भिणींना, बालकांना, इलेक्ट्रिक शॉक देऊन, गोळ्या घालून, जाळून, बॉम्बस्फोट घडवून, मारण्याचा आदेश देवू शकतो? मुळात देव-धर्मांचे नाव घेत आपण आपला स्वार्थ जपत असतो. विध्वंसक वृत्ती जपत असतो. माणसातील विध्वंसक वृत्तीला तात्विक अधिष्ठान देणार्‍या देव-धर्माची ही कालबाह्य संकल्पना अजून नाहिशी का होत नाही?
ईश्वर असे काहीही सांगणार नाही हे विधान करण्यापूर्वी पुराणकथेतील ईश्वराच्या आज्ञांची यादी पुन्हा एकदा तपासावी लागेल. मुलांचा बळी, आईचा खून, स्त्रियावर बलात्कार, भावांना - नातलगांना मारहाण, इतर धर्मीयांची कत्तल, असे अनेक प्रकारच्या आज्ञांची यादी प्रत्येक धर्मात सापडेल. ईश्वराच्या क्रूर, निंदनीय आज्ञांची तेथे कमतरता नाही. त्याच प्रमाणे अशा आज्ञांना शिरसावंद्य मानून आज्ञांचे तंतोतंत पालन करणार्‍या आज्ञाधारक सश्रद्ध भक्तांचीसुद्धा (कधीच) कमतरता भासणार नाही!

लेखनविषय: दुवे:

Comments

देव/धर्म हे फक्त कारण आहे.

आपला विरोध हा वृत्तीला आहे की देवाला आहे? जे तूम्ही सांगताय तो अविवेकाचा परिणाम आहे, ती एक वृत्ती आहे, ती आज त्याला देवाचे नाव देत आहे, उद्या पैशाचे नाव देईल, नाव बदलेल पण वृत्ती नाही बदलणार.

आणि धर्म ही एक सामाजिक वृत्ती आहे, आणि समाज हा आपल्यापासून चालू होतो, आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकलो तर ती एक सुरुवात असू शकेल.

पण ह्याचा संबंध जर देवाशी आणि धर्माशी लावला गेला तर त्यातून चुकीच्या शंकांचे निरसन केले जाईल असे मला वाटते.

पटले नाही

चिरकाल मोक्ष किंवा असे काहीतरी गाजर असताना कोणतेही कृत्य समर्थनीय आहे. अगदी शुद्ध तर्ककर्कश विचार केला तरी जनुकांच्या दृष्टीने अपत्य हेही एक साधन (मीन्स टू ऍन एन्ड) असते.

असे काही आदेश देणारा 'परमेश्वर आहे/प्रामाणिक मध्यस्थ आहे' याची खात्री करताना लोक कुवतीपेक्षा कमी पुरावे तपासतात (एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेम्स नीड एक्स्ट्राऑर्डिनरी एविडन्स) वगैरे मान्यच आहे.

स्वामीनिष्ठा

हायरार्किअल समाजात स्वामिनिष्ठा हा एक आवश्यक गुण असतो. जन्माने येणार्‍या स्वामित्वाच्या परिस्थितीत सेवक स्वामीपेक्षा वरचढ असण्याची परिस्थिती बर्‍याच वेळा येत असणार. अशा वरचढ असलेल्या सेवकाच्या मनात बंडाचे विचार येऊ नयेत याची व्यवस्था या स्वामीनिष्ठेच्या गुणाने होते. या गुणाचा परिपोष करण्याचा एक मार्ग म्हणून असल्या कथा तसेच "प्राण जाये पर वचन न जाये" अशी वचने निर्माण झाले. ज्याला स्वामी मानले त्याने सांगितल्यावर काहीही करायला तयार असणे हा एक उच्च कोटीचा गुण असल्याचे अशा कथेतून मनावर बिंबवले जाते.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

हेच म्हणतो

पोलिस लष्कर अशा ठिकाणी आदेशाचे पालन हा भाग इतका मनावर बिंबवला जातो कि तिथे योग्य/ अयोग्य हा विचारच मनात येउ नये अशी मानसिकता तयार केली जाते.
प्रकाश घाटपांडे

बायबल मधली ही घटना

ही घटना बायबल मधली आहे. माझ्या आठवणीत अब्राहम (इब्राहिम) ने मूल होण्यासाठी नवस केला होता. त्यात त्याने असे सांगितले की मला मुले झालीत तर त्यातील पहिल्या मुलाचा बळी देईन. मात्र तशी वेळ आल्यावर् (मूळ कथेत, देव येऊन बळी मागीतला.) तो त्यापासून मागे हटला. व नंतर कोकराचा बळी दिला. यावरूनच बकरी ईद हा सण आला. यातील देव अब्राहम संवाद काहीसा आठवणीत आहे. भारतीय परंपरेत मात्र मुलाचे बळी देणारी दोन उदाहरणे आठवतात. हरिश्चंद्राने आपल्या मुलाचा बळी दिला होता. तसेच शिबीराजाने चिलियाबाळाचा बळी दिला होता.

प्रमोद

ग्रीक

ऍगॅमेम्नॉनने स्वतःची मुलगी इफिजिनिआ हिचा बळी देऊन समुद्राला शांत करण्याचे ठरविले. ऐन वेळी आर्टेमिस देवीने तिच्या जागी हरीण ठेवले.

नेपच्यूनला दिलेल्या एका बळीचीही अशीच काही गोष्ट आहे.

चिलया बाळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चांगुणेच्या सत्त्वपरीक्षेसाठी श्रीशंकर अतिथी रूपाने आला. त्याने केलेली मागणी आणि त्या मागणीची चांगुणेने केलेली पूर्ती हा भाग वाचताना( ही भाकडकथा आहे हे ठाऊक असून सुद्धा) कसेसेच वाटते.अंगावर शहारे येतात.मुलाचे शीर कापून ते उखळात घालून कुटायची आज्ञा जो मातेला देतो तो देव कसला? अशा देवावर लोक श्रद्धा ठेवतात याचे आश्चर्य वाटते.

पुन्हा जिवंत करतो

चिलया बाळाला देव पुन्हा जिवंत करतो असेही कथेत असल्याचे आठवते. चू.भू.द्या.घ्या.

त्यामुळे लोक देवावर श्रद्धा ठेवत असावेत. फक्त उखळात घालून कुटल्यावर कथा संपली असती तर लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली नसती असेही वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सत्त्वपरीक्षा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
देवाने चिलया बाळाला जिवंत केले असे आहेच. पण स्वतःच्या मुलाचे शीर कापून ते उखळात घालून मुसळाने कुटताना चांगुणेची मनःस्थिती काय असेल? असे कोणी कधी करील काय? बहुतेक पुराणकथा,व्रतकथा या निरर्थक आणि काहीच्या बाही आहेत. त्यांत साहित्यिक गुणही दिसत नाहीत.

कर्तव्य

<स्पॉइलर ऍलर्ट>इंडियन, मदर इंडिया, वास्तव</स्पॉइलर ऍलर्ट> अशा अनेक चित्रपटांमध्ये असा संदेश आहे की पुत्रप्रेमापेक्षा मोठी कर्तव्ये असू शकतात. देवाला खूष करणे हे तर कर्तव्यसुद्धा नाही, त्यात परम स्वार्थ आहे. मुळात जनुकांनी अपत्यप्रेम बाणविले तेही त्यांच्या स्वार्थासाठीच. ही गुलामगिरी झुगारण्यातच मेंदूचे श्रेष्ठत्व आहे.

बळी

देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी, देव स्वप्नात आला म्हणून वगैरे वगैरे अनेक कारणांनी पोटच्या मुलांचे बळी देण्याचे प्रकार घडलेलेच नाहीत असे म्हणायचे आहेत काय?

बहुतेक पुराणकथा* या समाजाला जोडून किंवा विशिष्ट अधिपत्याखाली ठेवण्यासाठी रचवलेल्या असतात. त्यात अर्थ कसे शोधावे याची माहिती हवी. त्यात साहित्यिक गुण वगैरे शोधायला गेल्यास त्या निरर्थक वाटण्याची शक्यता आहेच.

* व्रतकथा गाळलेल्या आहेत. त्या भयंकर बकवास असतात असे मला वाटते पण त्यांचा उद्देशही वरीलप्रमाणेच असावा.

व्याख्या

त्यांत साहित्यिक गुणही दिसत नाहीत.

आपली साहित्यिक गुणांची व्याख्या जाणून घ्यायला आवडेल. शांता शेळकेंना पुराणकथांमध्येही साहित्यिक मूल्य दिसत असे. याचा अर्थ आपली व्याख्या वेगळी असावी.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर