सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०

सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०

सहकारी साखर कारखाने दिवाळखोरीत काढून विक्रीच्या नावाखाली ते स्वस्तात आपल्याच खिशात घालण्याचा राजकारण्यांचा नवा धंदा सध्या जोरात सुरू आहे. सहकाराच्या या स्वाहाकारामुळे शेतकरी व कामगार देशोधडीला लागले आहेत.

जन्म.. वर्ष १९५१
- आशिया खंडातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना
- ग्रामीण महाराष्ट्राची सहकारातून समृद्धीकडे वाटचाल
- सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका
- प्रत्येक शेतकरी मालक झाला

घरघर.. वर्ष २०१०
- नवीन सहकारी साखर कारखान्यांवर बंदी
- सहकारी कारखान्यांपुढे खासगी कारखान्यांचे आव्हान
- ४९ खासगी साखर कारखान्यांना परवानगी
- ३१ सहकारी साखर कारखाने विक्रीला काढले
- शेतकरी पुन्हा गुलाम झाले

मृत्यू.. वर्ष २०१४
- एक होता सहकार

ज्या महाराष्ट्रानं सहकाराचं वैभव अभिमानाने मिरवलं त्याच महाराष्ट्रातील उद्ध्वस्त केल्या जाणाऱ्या सहकाराची शकलं पाहता सहकारी साखर कारखान्यांचं हे अल्पचरित्र पूर्ण व्हायला आता फार वेळ लागेल असं वाटत नाही.
ज्या दिवशी हे अल्पचरित्र पूर्ण होईल त्या दिवशी स्वर्गात डॉ. गंगाधरराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, वैकुंठभाई मेहता आदी नेत्यांच्या डोळ्यात नक्कीच अश्रू दाटून येतील. ज्यांनी या मातीत सहकाराचं बीज वाढविण्यासाठी आपलं रक्त आटवलं ते हतबल होऊन लंगडा संताप व्यक्त करतील आणि प्रामाणिकपणे सहकाराची पालखी घेऊन चालणारे निराश होतील. आणि येणाऱ्या पिढय़ा सहकाराचा धडा केवळ अभ्यासक्रमात गिरवतील.

पाकीट मारणाऱ्याला या देशात काहीतरी शिक्षा होते, परंतु सर्वसामान्यांचे कोटय़वधी रुपये लुटणारे दरोडेखोर मात्र कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन सहिसलामात सुटतात, हा कुठला न्याय?
कारखान्यांना परवानगी देण्यापासून तो विक्री करण्यापर्यंत सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. जिथे कापूस पिकतो तिथे साखर कारखाने उभारले जातात आणि जिथे ऊस पिकतो तिथे सूतगिरण्या उभारल्या जातात. साहजिकच काही दिवसांतच कारखाना बंद पडतो. मग ऊस उपलब्ध नव्हता असं कारण दिलं जातं. आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर ऊस उपलब्ध नव्हता तर तिथे कारखाने काढायला परवानगी कोणी आणि कशी दिली? आज ते कारखाने बंद पडले आहेत त्याची जबाबदारी परवानगी देणाऱ्याचीदेखील नाही का? आणि ज्या संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे, कारखाने मोडीत निघाले, त्यांची काही जबाबदारी राहात नाही का? शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्यांवर जप्ती आणणाऱ्यांनी संचालक मंडळाला जबाबदार ठरवून त्यांच्या संपत्तीवर जप्ती का आणू नये?

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

पाखरं घरखाने

खराब न झालेल्या मशिनी आणि इतर मशिनरी दर वर्षी बदलून त्यावर मलई मारणारे लोक साखर कारखान्यांचे पाखरं घरखाने करणारच. त्यांना कुठे समाजकल्याण करायचे आहे?

तपशिलात दुरुस्ती हवी...

या माहितीच्या तपशिलात थोडी दुरुस्ती हवी.

तुम्ही सहकार क्षेत्राच्या विकासमूर्तींमध्ये चुकून धनंजयराव गाडगीळ यांच्या ऐवजी गंगाधरराव गाडगीळ यांचे नाव घेतले आहेत. कृपया ज्याचे श्रेय त्यालाच जावे.

स्वतंत्र भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून आपल्याला 'द बागाईतदार को-ऑपरेटिव्ह शुगर प्रोड्युसर्स सोसायटी लिमिटेड' (सध्याचे नाव प्रवरा सहकारी साखर कारखाना) असे म्हणता येईल कारण १९५० मध्ये स्थापन झालेला हा कारखाना आजही यशस्वी सुरू आहे, पण खरे तर तो भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना नव्हे. स्वातंत्र्यापूर्वी १९३३ ते १९३५ मध्ये आंध्र प्रदेशात ३ (एटिकोप्पका, थुम्मपाल व वुय्यरु येथे) व उत्तर प्रदेशात एक (बिस्वान) असे सहकारी साखर कारखाने सुरु झाले होते, पण ते अल्पावधीतच व्यवस्थापन अथवा निधीअभावी खासगी साखर उत्पादकांना विकले गेले.

सहकारी चळवळीचे बीज रुजवणारी घटना म्हणजे १८७२ मध्ये शेतकर्‍यांनी केलेला 'सावकारविरोधी दंगा'. त्यानंतर शेतकर्‍यांना स्वस्त कर्जपुरवठा व्हावा व सावकारांच्या शोषणातून सुटका व्हावी म्हणून केलेला सहकारी संस्था कायदा अमलात यायला १९०४ हे वर्ष (पुढची २७ वर्षे) उजाडावी लागली. त्यानंतर आणखी ३० वर्षांनी वर उल्लेखल्याप्रमाणे सहकारी चळवळ आकाराला येऊ लागली.

सहकारी चळवळीचा दुरुपयोग झाल्याने तिचे काय होणार हे दिसतेच आहे, पण हा काळाचा नियम आहे. कार्ल मार्क्सला अभिप्रेत कम्युनिझम तरी कुठे रशियात आदर्श पद्धतीने राबवला गेला? त्याचा परिणाम आज दिसतोच आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत काँग्रेस स्वातंत्र्यानंतर काय झाली तेही दिसते आहे. कुठल्याही चळवळीचा वापर जेव्हा स्वार्थासाठी होऊ लागतो तेव्हा त्याचे एकच उत्तर असते. हळहळून फायदा नसतो. काळच नव्या व्यवस्था बनवतो.

महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित व्हायला, येथील राजकारण बिघडायला आणि उसाच्या पैशाच्या मोहाला बळी पडून जमीन निकस व्हायला सहकारी साखर कारखाने कारणीभूत आहेत, हे नाही विसरता येणार आपल्याला.

कारणीभूत/पर्याय

>>महाराष्ट्रातील नद्या प्रदूषित व्हायला, येथील राजकारण बिघडायला आणि उसाच्या पैशाच्या मोहाला बळी पडून जमीन निकस व्हायला सहकारी साखर कारखाने कारणीभूत आहेत, हे नाही विसरता येणार आपल्याला.

या गोष्टींना साखरकारखान्यांना कारणीभूत म्हणणे हे हाईण्डसाईटने ठीक आहे. जर ५०-६० च्या दशकात हे परिणाम माहिती होते का? ८०-९० च्या दशकात हे परिणाम लक्षात येऊ लागले.

ते कळल्यावरसुद्धा तितक्याच ताकदीचा पर्याय मिळाल्याशिवाय सध्याची पद्धत तात्काळ बंद करता येत नाही. खनिज तेलाच्या वापराने प्रदूषण होते हे माहिती होऊनसुद्धा अजून पेट्रोल डिझेलचीच वाहने बनत आहेत वापरली जात आहेत. पर्याय नाही म्हणून जर चैनीची गोष्टही आपण सोडत नाही तर जिथे पोटाचा प्रश्न आहे ती गोष्ट लगेच सोडून द्यावी अशी अपेक्षा करणे योग्य नाही.
(शाकाहार करण्याचा बुद्धाचा उपदेश शेतीतून पुरेसे उत्पादन मिळते अशी परिस्थिती आल्याशिवाय अंमलात आणता येत नाही. म्हणूनच बौद्ध असलेल्या पूर्वेकडील देशात मांसाहार चालू राहिला).

हरितक्रांतीच्या काळात वापरलेल्या रासायनिक खतांनी जमीन खराब झाल्याचेही म्हटले जाते. त्यावर बोरलॉगने हल्लीहल्ली दिलेले उत्तर योग्य आहे असे मला वाटते. "पोट आणि पर्यावरण यात पोटाला जास्त महत्त्व". पर्यावरण ही किमान भूक भागल्यावर बोलायची गोष्ट आहे असे वाटते.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

बुद्धाचा मांसाहार

(शाकाहार करण्याचा बुद्धाचा उपदेश शेतीतून पुरेसे उत्पादन मिळते अशी परिस्थिती आल्याशिवाय अंमलात आणता येत नाही. म्हणूनच बौद्ध असलेल्या पूर्वेकडील देशात मांसाहार चालू राहिला).

बुद्धाला डुकराचे मांस आवडायचे. यात असे झाले की वयाच्या ८०व्या वर्षी त्याने डुकराचे मांस खाल्ले. त्यात हागवण होऊन तो निवर्तला. अशा बुद्धाने शाकाहाराचा उपदेश करणे कठीण.

हरितक्रांतीच्या काळात वापरलेल्या रासायनिक खतांनी जमीन खराब झाल्याचेही म्हटले जाते.

रासायनीक खतांनी नेमके काय होते? 'रासायनीक' हा शब्द पर्यावरणवादी अपशब्द म्हणून वापरताना दिसतात. बाकी तुमच्या मताशी सहमत.

प्रमोद

बुद्ध व शाकाहार

बुद्धाला डुकराचे मांस आवडायचे. यात असे झाले की वयाच्या ८०व्या वर्षी त्याने डुकराचे मांस खाल्ले. त्यात हागवण होऊन तो निवर्तला. अशा बुद्धाने शाकाहाराचा उपदेश करणे कठीण.

बुद्धाने जीवाची हत्या करुन खाउ नका असे म्हणले होते बहुतेक. आंबेडकरांच्या बुद्ध व त्याचा धम्म अश्या एका पुस्तकात जरी मांसाहाराचा शिधा दिला तरी तो भिख्खुने स्वीकारावा असे काहीतरी वाचल्याचे आठवते. बहुतेक दहा घरे शिधा मागायचा त्यापेक्षा नाही इ इ असे काहीतरी अधिकृत धोरण होते.

बाकी बुद्धाच्या महानिर्वाणाची तुम्ही म्हणाला ती माहीती नव्हती. :-)

शाकाहार

शाकाहारासंबंधी अशा धर्तीचे वाचले आहे की: त्यामुळे बळी दिल्याने काही साध्य होते अशा कल्पनांनी राजेरजवाडे यज्ञ करीत असत, ज्यात प्राण्यांचे बळी दिले जात. म्हणून अशा यज्ञात भाग घेऊ नये किंवा असे यज्ञ करू नयेत असे बुद्धाचे विचार होते असे नंतरच्या संकलनात आढळते.
(बुद्धाचे विचार हे संकलन आहे, जसे बायबल हे ख्रिस्ताने सांगितलेल्या विचारांचे संकलन आहे किंवा कृष्णाने गीता सांगितली असे म्हणतात तसे. संकलित विचारांमध्ये नंतरच्या काळात भर पडलेली असू शकते. बुद्धाने शाकाहारी व्हा असा संदेश दिला नसला तरी अशोकाच्या शिलालेखावरून अशोकाच्याच काळात बळी देणे, प्राण्यांची हत्या करणे कमी व्हायला लागले असावे असे वाटते. त्यामुळे बुद्धाचा नाही, तरी बौद्ध भिक्षूंचा शाकाहार प्रचलित करण्यात मोठा सहभाग असावा. इतर कारणे आर्थिकही असू शकतात. त्यामुळे शाकाहार हा बौद्ध आणि जैन विचारांमधून प्रामुख्याने आला, अशी माझी समजूत आहे. काही कोणाला वेगळे माहिती असल्यास वाचायला आवडेल).

बुद्धाची ही निर्वाणाची कथा माहिती होती.

कथा

आनंद दिघे यांनी बुद्धाच्या मृत्यूबद्दल पानभर छापले होते. (बहुदा रिडल्स ऑफ राम ला प्रत्युत्तर म्हणून)

अशोकाच्या म्हणजे काय? बुद्धाच्या नंतर २०० वर्षांनी अशोक झाला ना?

काय छापले होते?

काय छापले होते? आणि कुठे?!

बापरे, मला लक्षात आले आहे की मी दिलेला प्रतिसाद हा पूर्ण अवांतर प्रतिसाद आहे. :)

हॅहॅहॅ

सहकार->हरितक्रांती->मांसाहाराची गरज->गौतम->शिवसेना->???
पुढील पुष्प कोणते?

काय छापले? काय लिहिले?

आनंद दिघे यांनी बुद्धाच्या मृत्यूबद्दल पानभर छापले होते. (बहुदा रिडल्स ऑफ राम ला प्रत्युत्तर म्हणून)

काहीतरी आणखी सांगा. फक्त आनंद दीघे या व्यक्तिनी लिहिले यावरून काय समजणार?

आठवत नाही

बुद्धाच्या मृत्यूस कारणीभूत अन्नपदार्थाच्या शब्दाचे भाषांतर भूछत्र नसून डुक्करच आहे असे सांगितले होते इतकेच मला आठवते.

विकीपिडिया वरील

The Mahayana Vimalakirti Sutra claims, in Chapter 3, that the Buddha doesn't really become ill or old but purposely presents such an appearance only to teach those born into samsara about the impermanence and pain of defiled worlds and to encourage them to strive for Nirvana.

या उल्लेखामुळे दादामहाराज आठवितात.क्ष्

दादामहाराज

दादामहाराज कोण?

व्यर्थ आयुष्य

सार्थक झाले

अच्छा. हे आणि एक सापडले होते.

बरोबर

अशोकाच्याच म्हणजे, ज्या काळात बौद्ध विचार पुढे आला त्या काळी.
शाकाहार हा नंतरच्या काळात ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणात स्विकारला आहे (सारस्वतांसारख्या काही ब्राह्मण जाती असतील त्या वगळता).
पण त्याचा उगम हा बौद्ध काळात असावा. एवढाच म्हणण्याचा हेतू होता..

अरेरे

बुद्धाचे उदाहरण फक्त नियमाला साजेसे तंत्रज्ञान असल्याशिवाय नियम प्रस्थापित होऊ शकत नाही एवढ्याच साठी दिले होते.
त्यावरून एवढा भरकटलेपणा का व्हावा?

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

उत्सुक

या लेखात मात्र खरोखरच महत्त्वाच्या प्रश्नावरचं लेखन आहे. याबाबत फारशी माहिती नाहि. चर्चा वाचायला उत्सुक

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर