महाराजांचा ताप मोजता येत नाही

"तुम्हाला दादामहाराज ठाऊक आहेत ना?"
" हो, अंगावर शाल पांघरलेला त्यांचा फोटो पाहिला आहे. काही महाराजांचे ते उघडेबंब फोटो अगदी ओंगळवाणे,किळसवाणे दिसतात.सि़क्स पॅक्सधारी तरुणाचा उघडा फोटो शोभतो. पण लवथवती होऊन लोंबणारे सॅक्स असतील तर त्यावर शाल पांघरलेली बरी ! असो. दादा महाराज मागेच निवर्तले ना?"
"हो. सात वर्षे झाली. त्यांच्याविषयीचा एक विलक्षण अनुभव आहे."
"विलक्षण अनुभव? वा ! वा ! माझ्या आवडीचा (पण आमच्या काही उपक्रमींच्या नावडीचा) विषय."
"काय म्हणालात?"
"काही नाही. मी स्वगत बोललो.अनुभव सांगा"
"सांगतो. पण चेष्टा नाही करायची."
"महाराजांची चेष्टा? शान्तम् पापम् । शान्तम् पापम् ।"
"आमच्या घरून महाराजांना अकरा वर्षे डबा जात असे. एकदा डबा घेऊन गेलो. डबा ठेवला. महाराज नेहमीप्रमाणे लोडाला टेकून गादीवर बसले होते. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पाय गरम लागले.ताप आला होता. डॉक्टरांना फोन केला. ते दादाजींचे भक्तच. त्वरित आले.त्यांनी दादाजींना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या पायाला हात लावला.ताप आल्याचे त्यांनाही समजले.
डॉक्टरांनी थर्मामीटर झटकून लावायला दिला.अर्ध्या मिनिटाने बघितला.पारा चढलाच नव्हता. पुन्हा थर्मामीटर दिला.चाळीस सेकंदांनी पाहिला. पारा जिथल्या तिथेच.
"डॉक्टर थर्मामीटर ठीक आहे ना?" असे विचारल्यावर ’थर्मामीटरमधे काय बिघडणार? तासाभरापूर्वीच तर एका पेशंटचा ताप पाहिला ’ असे त्यांनी सांगितले."
" म्हणजे महाराजांच्या अंगात ताप असूनसुद्धा तो थर्मामीटरवर दिसू शकला नाही , असे तुम्हांला म्हणायचे आहे काय?"
" होय असेच. कारण दोन्ही वेळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की पारा ९६/९७ ०फॅ. च्या मधे होता.दादा महाराजांच्या दैवी शक्तीचीच ही प्रचीती नाही काय? सांगा."
यातील निवेदकांवर माझा विश्वास आहे. त्यांचे सर्व कथन खरे आहे.
.................
आता दोन प्रश्न:
(१) महाराजांच्या अंगात ताप असूनही पारा वर चढला नाही हे कसे घडले असावे? असे करण्यामागे काय हेतू असावा ?
(२) ही साधी गोष्ट त्या दोन उच्चशिक्षित भक्तांच्या लक्षात कशी आली नाही?
..( उत्तरांसाठी व्य.नि. नको.)

लेखनविषय: दुवे:

Comments

तपशील

तापमापक दादामहाराजांच्या शरिराच्या कोणत्या अवयवाच्या संपर्कात होता याविषयी माहिती मिळू शकेल काय? 'शास्त्रात' तीन ते पाच मिनिटे सांगितले आहे. भारतात थोडे कमी चालेल असे वाटते. अर्धे मिनिट अगदीच अपुरे वाटते.

वेळेची चूक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तापमापी किती वेळ लावावा याची मला निश्चित अशी माहिती नाही. पण डॉक्टर अर्ध्या पाऊण मिनिटात काढतात असा माझा समज होता. तो चुकीचा आहे.(आत्ताच थर्मामीटर लावून पाहिले.चाळीस सेकंदात पारा १.१ ०फॅ वर सरकला.९६ ते ९७.१)

डॉक्टरांनी थर्मामीटर झटकून लावायला दिला.अर्ध्या मिनिटाने बघितला.

डॉक्टरांनी थर्मामीटर झटकून लावायला दिला.अर्ध्या मिनिटाने बघितला.
डॉक्टरांनी थर्मामीटर लावायला दिला होता. दादामहाराजांनी तो लावला असे कुठे या सत्य कथनात आहे. मग कितीही वेळा बघितले तरी ताप दिसेल कसा?

चन्द्रशेखर

तर्क?

ताप असतानाही तापमापकाला गंडविण्याचे बुवाबाजांचे मार्ग या विषयावर तर्कक्रीडा करता येईल.

दुसरा आक्षेप

तापमापकासारख्या वस्तुनिष्ठ निरीक्षकासही गंडवू शकणारे दादामहाराज प्लॅसिबोच्या बळी भक्ताला का गंडवू इच्छित नव्हते?

हे

( उत्तरांसाठी व्य.नि. नको.)

हे आवडले. :)

दुनिया झुकती है , झुकाने वाला चाहिये.

दुनिया झुकती है , झुकाने वाला चाहिये. १०-१२ वर्षा पूर्वीचे आपणास आठवते का? इतकी वर्ष यावर कांही लिहिले का? ते डॉक्टर कोण होते त्यांचे नाव काय ? आपणास महाराजांचे ताप का पाप या पैकी नक्की काय मोजता येत नाही कधी कधी ध चा मा होवू शकतो हा पेशवाई इतिहास आहे. महाराजांचे आणखी कांही ....... या तापा पेक्षा आज समाजात जास्त ताप आहे त्यावर विचार करणे श्रेयस्कर आहे.

कोण कोणाला म्हणाले?

शेंडा बुडखा नसलेली गंमतीदार गोष्ट आहे. ती कोणी कुणाला सांगितली? इथे सांगणारे यनावाला त्या गोष्टीत एक पार्टी होते का? वगैरे कळत नाही.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

मग?

इथे सांगणारे यनावाला त्या गोष्टीत एक पार्टी होते का? वगैरे कळत नाही.

त्याने काय फरक पडतो? (भोचकपणाच्या कंडशमनाखेरीज)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये

पेडिक्योर

(१) महाराजांच्या अंगात ताप असूनही पारा वर चढला नाही हे कसे घडले असावे? असे करण्यामागे काय हेतू असावा ?

थर्मामीटर पायाला लावला होता का? पाय गरम असले म्हणजे ताप आला हे गृहितक कसे मांडले? मी पेडिक्योर करून घेते तेव्हा पाय छान कोमट, गरम, उबदार असे उष्म शब्दाशी संबंधित होतात. महाराज गरम पाण्यात पाय बुडवून अध्येमध्ये बाहेर काढत असावेत का? वरील प्रसंगातील निरीक्षणे त्रोटक आहेत. बाकी थर्मामीटरच्या अर्ध्या मिनिटाबद्दल उहापोह वर आहेच.

(२) ही साधी गोष्ट त्या दोन उच्चशिक्षित भक्तांच्या लक्षात कशी आली नाही?

भक्तांचे उच्चशिक्षण वरील कथेवरून कोठेही कळून येत नाही. उच्चशिक्षित नसणारे आमचा भाजीवाला आणि मोलकरीणही प्रमाण मराठी बोलतात.

उच्चशिक्षण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितातः"भक्तांचे उच्चशिक्षण वरील कथेवरून कोठेही कळून येत नाही.
लेखा खालील प्रश्नांत "उच्चशिक्षित भक्त " असे म्हटले आहे ते कळण्यास पुरेसे आहे.

अं?

"काल आमच्या बंड्याचे लग्न बबिताबरोबर झाले."
"बंड्या आणि बबिता आता एकत्र कुटुंबात राहणार नाहीत."

प्रश्नः

१. खुनी बंड्याने बबिताला घेऊन वेगळे रहावे का?

कथाकाराने सुयोग्य कथा न मांडता असले प्रश्न उपस्थित केल्यास वाचकांचा गोंधळ उडेल असे वाटते.

डागदर

डॉक्टर म्हंजे उच्चशिक्षितच की!

डागदर

डॉक्टर म्हणजे उच्चशिक्षित. कबूल.;-) पण वरील संवादात दोन व्यक्ती आधीच आहेत त्या डॉक्टर आहेत याचा स्पष्ट उल्लेख नाही. डॉक्टर नंतर येतात ना! आणि डॉक्टरही भक्त आहेत असे कुठे म्हटलेले नाही. की माझाच गोंधळ होतो आहे?

??

भक्तांचे उच्चशिक्षण वरील कथेवरून कोठेही कळून येत नाही.

म्हणूनच प्रश्नात तसे नमूद केले आहे ना?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

प्रश्नात नमूद केले?

प्रश्नांत नमूद केल्याने काय साधले?

प्रश्नांचा आणि लेखाचा संबंध हवा हे "बालवाडीतलं" पोर ही जाणतं. अर्थात, बाबांच्या भक्तांना त्याची जाणीव होत नाही कारण त्यांच्या डोळ्यांवर पडदा पडलेला असतो हे या चर्चेत सिद्ध झालेच. :-)

संबंध

अर्थातच प्रश्नांचा आणि लेखाचा संबंध आहे. दोन्ही भक्त उच्चशिक्षीत ही अधिक माहिती प्रश्नांतून समजते. त्याचा अर्थ प्रश्न लेखाशी असंबद्ध आहेत असा होतो का? नावडतीचं मीठ अळणी असं असेल तर मात्र संबध दिसणे कठीण आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

"बालवाडीतलं" पोर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"प्रश्नांचा आणि लेखाचा संबंध हवा हे "बालवाडीतलं" पोर ही जाणतं."
---प्रियाली यांच्या प्रतिसादातून.
शालेय प्रश्नपत्रिकेतः "पुढील परिच्छेद वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा" अशा प्रकारचा प्रश्न असतो. प्रस्तुत लेखाच्या संदर्भात पुढील प्रश्न संभवतात:
....
प्र.१:विलक्षण अनुभव कोणाला आवडत नाही?
उ. विलक्षण अनुभव आमच्या काही उपक्रमींना आवडत नाही.
..
प्र.२: दादामहाराजांचे निधन होऊन किती वर्षे झाली?
उ. दादामहाराजांचे निधन होऊन सात वर्षे झाली.
..
प्र.३: डबा आणणार्‍या व्यक्तीने कोणाला फोन केला?
उ: डबा आणणार्‍या व्यक्तीने डॉक्टरांना फोन केला.
..
पण प्रस्तुत संवादलेखनाखाली दिलेल्या कोणत्याही प्रश्नाचे थेट उत्तर लेखात सापडणार नाही. ते तर्क लढवून शोधायला हवे.शाळा आणि हे संस्थळ यांत असा भेद आहे.तो सर्वांना समजतो.
उगीच" दोन भक्त उच्चशिक्षित आहेत असे लेखात कुठे आहे?.मग प्रश्नात कसे दिले? चूक ! चूक !! चूक!!!" असे म्हणणे बालवाडीतील मुलासारखे बालिश वाटते.

चूक!चूक!! चूक!!! :-)

चूक ! चूक !! चूक!!!" असे म्हणणे बालवाडीतील मुलासारखे बालिश वाटते.

असे त्रिवार चूक लिहिल्याचे मला आठवत नाही बॉ! ;-) तेव्हा ते बालवाडीतल्या मुलासारखे बालिश वाटते यावर उहापोह करणे मला मूर्खपणाचे :-) वाटते तेव्हा मी ते सोडून देते. फक्त एवढेच की यनांनी हिंदी सिरिअल्स पाहणे सोडून द्यावे हा मोलाचा सल्ला. त्या पाहून अनेकांना एकच शब्द त्रिवार उच्चारायची सवय लागल्याचे कळते. ;-)

जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे स्पष्टीकरण लेखात येणे गरजेचे होते यावर मी ठाम आहे. कोणा महाराज आणि त्यांच्या भक्तांचा त्यावर विश्वास नसेल तर नसो बापडा! यावर आता आणखी उपप्रतिसाद आले तर उत्तरे मिळणार नाहीत. कारण आता फक्त आम्हीच कसे बरोबर ते दाखवण्याची क्षीण धडपड सुरु आहे.

स्पष्टीकरण म्हणून वर अलरेडी खुनी बंड्याचे चपखल उदाहरण दिलेले आहे. लेख वाचून एकांना दोन भक्तांपैकीच एक डॉक्टर आहेत असेही वाटले होते. ते वाचूनही ज्यांना आपणच कसे बरोबर हे दाखवायचे आहे त्यांच्यात आणि दादामहाराजांत फारसा फरक नाही. :-)

शाळा आणि हे संस्थळ यांत असा भेद आहे.तो सर्वांना समजतो.

हाहाहा!!!!! चालू द्या.

दोन की तीन?

डॉक्टरांनी दादामहाराजांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. माझ्या मते तेच भक्त क्र. २ होते. यनावालांचे आजचे स्पष्टीकरण पटले नाही. प्रश्नाच्या पूर्वार्धातील छुपी विधाने (पत्नीस अजूनही मारहाण इ.) गृहीत धरविण्याचे बंधन अन्यायकारक वाटते.

दोन की तीन

दोन की तीन याबाबत माझाही गोंधळ आहे. तसे वर म्हटले आहेच. पण पुन्हा वाचता डॉक्टर भक्त आहेत असे लेखात म्हटले आहे असे जाणवले. परंतु लेखात तीन व्यक्ती आहेत आणि त्यातील कोणी एक भक्त नाही असे स्पष्टपणे म्हटलेले नाही. तेव्हा नेमके भक्त किती? भक्त कोण नाही किंवा प्रश्न ज्या दोन व्यक्तींबद्दल विचारला त्यातील नेमक्या दोन व्यक्ती कोण हे नीटसे स्पष्ट झाले नाही.

श्रद्धा

१) महाराजांवर श्रद्धा असेल तर थर्मामीटरमधे ताप दिसणार नाही.
२) मूळात महाराजांना ताप आहे हे श्रद्धायुक्त चिंतेतुन आलेली बाब आहे
प्रकाश घाटपांडे

तापमापनः स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे तर्कक्रीडा कोडे नव्हे. एक साधा प्रसंग आहे. दोन भक्त आणि त्यांचे महाराज. महाराजांच्या अंगात ताप आहे याविषयी दोन्ही भक्तांचे ,(त्यातील एक डॉक्टर), एकमत आहे. ताप मोजताना तापमापी तोंडात धरण्याची पद्धत आपल्याकडे फारशी प्रचलित नाही.तापमापी कसा लावायचा हे महाराजांना ठाऊक असणार हे गृहीत धरायला हवे. (शेवटी प्रश्न विचारले आहेत म्हणून हे काही कोडे नव्हे.एकमेव उत्तराची अपेक्षा नाही. )
प्रश्न स्पष्ट आहेत.
* निवेदक भक्त माझ्या परिचयाचे आहेत.त्यांच्या मूळ कथनात महाराजांच्या अद्भुत दैवी शक्तीचे दोन अनुभव अनुस्यूत होते.त्यांतील एकच ठेवला आहे.

कयास

(१) महाराजांच्या अंगात ताप असूनही पारा वर चढला नाही हे कसे घडले असावे? असे करण्यामागे काय हेतू असावा ?
असे करण्यामागे पाऱ्याचा कुठलाही हेतू नसावा. बहुधा पाऱ्याचा मूड नसल्यामुळे तो वर चढला नसावा. कदाचित सारखे खालीवर केल्यामुळे थकला असावा. त्यात महाराजांची चूक नाही.
(२) ही साधी गोष्ट त्या दोन उच्चशिक्षित भक्तांच्या लक्षात कशी आली नाही?
पाऱ्याचा मूड जाणे ही मुळात साधी गोष्ट नसावी. त्यामुळे लक्षात न आल्यास नवल नाही.

मूडी पारा कयास २

(१) महाराजांच्या अंगात ताप असूनही पारा वर चढला नाही हे कसे घडले असावे? असे करण्यामागे काय हेतू असावा ?
इश्वराची सत्ता सर्वत्र असते. महाराज तर बोलून चालून इश्वराचा अवतार. तर पारा काय चीज आहे?
पारा स्वःता महाराजांचा भक्त होता. तर तो महाराजांच्या पुढे नतमस्तकच [पक्षी: खालीच रहाणार] असणार. थोडाच वरचढ होणार. पारा काय नास्तीक वाटला का? पार्‍याने मनात आणले तरी महाराजांच्या तापाची कल्पना करु शकणार नाही, इतका वितळला असता की नष्टच झाला असता. जा घ्या पार्‍याने सुर्याचे तापमान, जमेल? महाराजांचे तेज म्हणजे कोटी कोटी सूर्यांच्या......

२) ही साधी गोष्ट त्या दोन उच्चशिक्षित भक्तांच्या लक्षात कशी आली नाही?
कसली साधी गोष्ट? कोण म्हणते नाही आले? अजुन काय् लक्षात यायचे आहे? एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आले.

बोला, बाबा महाराज की जय!

अनुमाने

गोष्टीत खूप जास्त संकेत दिले गेले आहेत. (स्वामींचे शाल पांघरणे, पाच सहा वर्षापूर्वी निवर्तणे, लोडावर टेकून बसणे, पायाचे तापमान हाताने बघणे, भक्ताचा डबा खाणे, डॉक्टर भक्ताने येणे, थर्मामिटर दोनदा लावून खातरजमा करणे.) मला असे वाटते की यातील काही संकेतांनी हाताला गरम लागणे व पार्‍यावर न दिसणे सांगता येईल. याशिवाय महाराजांना हे भक्तांना दाखवायचे असेल तर हा एकदम मामुली चमत्कार झाला. साधी शेकायची पिशवी घेऊन हे करणे सहज शक्य आहे.

त्यामुळे अनुमाने बांधायची तर याशिवाय बांधली पाहिजेत. यातील काही गृहितके पहिल्यांदा. पहिले म्हणजे यातील दोन्ही भक्तांनी यात अप्रामाणिकपणा दाखवला नाही हे आहे. आणि दुसरे म्हणजे महाराजांनी हे जाणीवपूर्वक केले. पहिले गृहितक यनावालांच्या मते योग्य आहे. दुसरे गृहितक हे भक्तांच्या दृष्टीने योग्य आहे. म्हणजे महाराजांनी त्यांची शक्ति यात दाखवली (ती साहजिक झाली नाही.) विवेकी विचाराचे म्हणतील की महाराजांनी जाणीवपूर्वक फसवले.

आता यनावालांचे प्रश्न: हे कसे घडले? यात काय हेतू होता? त्यांची भक्तांच्या लक्षात का आले नाही?

१. कसे ? यातील पहिला प्रश्न ट्रिवियल आहे. (म्हणजे अनेक कारणे काही स्वाभाविक काही जाणीवपूर्वक असू शकतात.)

२. हेतू जे घडले ते स्वाभाविकरित्या घडले नाही म्हणून त्यातील हेतू विचारला आहे. स्वाभाविकपणे घडले असेल तर त्यात हेतूचा प्रश्न ट्रिवियल होतो.

आता पहिल्यांदा भक्त आणि महाराजांच्या बाजूचा विचार करू. म्हणजे त्यांना अशी काही विद्या/सिद्धी अवगत आहे की ज्यामुळे पाय गरम होतील (ज्ञानेश्वरांच्यापाठी सारखे) पण इतर शरीरात ताप राहणार नाही. भक्तांच्या मते महाराज आपल्या विद्येची साधना करत बसले होते. आणि त्यात ही घटना घडली. मात्र असे मानण्यात काही कच्चे दुवे वाटतात.
एकंदर वर्णनावरून हे महाराज घरदारवाले (मठाधिपती नाही) पण एकटे असे दिसतात (त्यांना डबा लागणे.) त्यांच्या भक्तांचे ते चांगले ऐकताना दिसतात. (थर्मामिटर लावून घेणे.) त्यामुळे अशी काही विद्या त्यांच्याकडे असती तर त्याचा पाठपुरावा भक्त करु शकले असते. त्यांनी तो केला नाही असे दिसते. महाराज पहिल्या भक्ताला म्हणू शकले असते की डॉक्टरला त्रास देण्यात अर्थ नाही. तेही त्यांनी म्हटले नाही. (वर्णनावरून दिसत नाही.)

आता सहेतुक व फसवण्यासाठी केलेले कृत्य लक्षात घेऊ या. यातील हेतू काहीसा स्पष्ट दिसतो. (डबा मिळवणे.) मात्र तो खूप मोठा दिसत नाही.

आता एक तिसरा हेतू बघु. हा हेतू भक्तांचा आहे पण कदाचित स्वाभाविक (निर्हेतुक) आहे. म्हणजे भक्तांच्या मानसशास्त्रात सतत महाराजांकडून दैवी चमत्काराची अपेक्षा केली जाते. त्यामुळे अशा साध्या प्रसंगांचा नीट पाठपुरावा केला जात नाही. आणि असेल त्याला गुरुची लीला अगम्य आहे असे म्हणून गप्प बसायचे. नंतर लगेच ही गोष्ट न काढता काही वर्षांनंतर काढायची म्हणजे जास्त उलटतपासणी, इतर शहानिशा होणार नाही.

या तिन्हीतील तिसरा हेतू जास्त संभव वाटतो.

का लक्षात आले नाही? कित्येकांच्या बाबतीत हे घडते. मला स्वतःला कित्येक जादूचे प्रयोग कसे केले समजत नाहीत. हा प्रश्न तसा ट्रिवियलच धरायला हवा.

प्रमोद

+१

उत्तम परिपूर्ण/हासरे विश्लेषण

मस्त

हा हा हा. धमाल प्रतिसाद. उपक्रमावर अशी मजा विरळाच.

-Nile

पायाचे तापमान

पायाचे तापमान हे इतर शरीराच्या तापमानापेक्षा अधिक असते असे ऐकले आहे (माझ्या वडिलांनी सांगितलेली हिंदी म्हण आठवली "पैर गरम, पेट नरम, सिर थंडा तो बैदजी को मारो दंडा" त्यावरून हा अंदाज, शास्त्रिय माहिती नव्हे. अर्थात म्हण द्वर्थी आहे खूप चाला, कमी खा व डोके शांत ठेवा हा दुसरा आरोग्यपूर्ण अर्थही निघतो).
तसे असेल तर कारण सरळ आहे. थर्मामिटर पायाला तसेही कोणी लावत नाहि.

**शिवाय बाबांच्या जवळ पायाशी निरांजने/समई वगैरे असेल तर प्रश्नच मिटला पण कोड्यात हे दिलेले नसल्याने शक्यता लक्षात घेतलेली नाहि**

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

या महाराजांचा ताप मोजता येत नाही

प्रकाटाआ

आग जब दोनो तरफ हो तो...

आणि यासुद्धा!

हा हा हा!!

दोनच शब्दात खतरा प्रतिसाद!
मस्त!

आपला
गुंडोपंत

या महाराजांचाही आम्हाला होणारा ताप मोजता येण्यासारखा नाही!

या महाराजांचाही आम्हाला होणारा ताप मोजता येण्यासारखा नाही!
--------------------------------------------------------
"तुम्हाला यनामहाराज ठाऊक आहेत ना?"
" हो, किबोर्डवर हात धरलेला त्यांचा फोटो पाहिला आहे. काही महाराजांचे ते शर्टपँट घातलेले फोटो अगदी भारी दिसतात.सि़क्स पॅक्सधारी तरुणाचा उघडा फोटो शोभतो. पण लवथवती प्रज्ञा घेऊन तर्कटी विचार असतील तर त्यावर विवेकवादाची झुल पांघरलेली बरी ! असो. यना महाराज मागेच निवृत्तले ना?"
"हो. सात वर्षे झाली. त्यांच्याविषयीचा एक विलक्षण अनुभव आहे."
"विलक्षण अनुभव? वा ! वा ! माझ्या आवडीचा (पण आमच्या काही उपक्रमींच्या नावडीचा) विषय."
"काय म्हणालात?"
"काही नाही. मी स्वगत बोललो.अनुभव सांगा"
"सांगतो. पण चेष्टा नाही करायची."
"महाराजांची चेष्टा? शान्तम् पापम् । शान्तम् पापम् ।"
"आमच्या घरून महाराजांना अकरा वर्षे डबा जात असे. एकदा डबा घेऊन गेलो. डबा ठेवला. महाराज नेहमीप्रमाणे खुर्चीला टेकून बसले होते. त्यांना पाहून लांबूनच नमस्कार केला. त्यांचे गरम तोंड वाजू लागले. विवेकवादी विचारांचा ताप आला होता. डॉकिन्सना फोन केला. ते दादाजींचे भक्तच. त्वरित आले.त्यांनी दादाजींचा विवेकवाद थांबवण्यासाठी करण्यासाठी त्यांच्या डोक्याला चाप लावला. विचारांचा ताप झाल्याचे त्यांनाही समजले.
डॉकिन्सनी थेसिस टेकू लावायला दिला. अर्ध्या वाचनानंतर बघितला. विचार उतरलाच नव्हता. पुन्हा थेसिस दिला. चाळीस पानांनी पाहिला. विचार जिथल्या तिथेच.
"डॉकिन्स, थेसिस ठीक आहे ना?" असे विचारल्यावर ’ थेसिसमधे काय बिघडणार? तासाभरापूर्वीच तर एका विचाराचा व्याप पाहिला’ असे त्यांनी सांगितले."
" म्हणजे महाराजांच्या डोक्यात विचार असूनसुद्धा तो थेसिसवर दिसू शकला नाही , असे तुम्हांला म्हणायचे आहे काय?"
" होय असेच. कारण दोन्ही वेळा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की वाचन ९६/९७ पानाच्या मधे होते. यनामहाराजांच्या विवेकीशक्तीचीच ही प्रचीती नाही काय? सांगा."
यातील निवेदकांवर माझा विश्वास आहे. त्यांचे सर्व कथन खरे आहे.
.................
आता दोन प्रश्न:
(१) महाराजांच्या डोक्यात विवेकी विचार असूनही थेसिस मध्ये उतरला नाही हे कसे घडले असावे? असे करण्यामागे काय विवेकवादीहेतू असावा ?
(२) ही साधी गोष्ट त्या दोन विवेकवादी भक्तांच्या लक्षात कशी आली नाही?
..( उत्तरांसाठीही ध्वनि नको.)

आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला कंटाळा येतो. त्याच त्या विषयावर चर्चा करायला काही मजा येत नाही!~

जबरी.. पण अजून् एक् पद्धत आहे.

कोणाच्यातरी (बहुतेक ओकॅम महाराज) वस्तर्‍याने तापाच्या मुळावरच हल्ला केला असतात तर्?

तर्कशुद्ध अनुमाने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांनी सांगोपांग विचार करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढले आहेत आणि ते नेमक्या शब्दांत सुसंगतपणे मांडले आहेत. उत्कृष्ट प्रतिसादाप्रीत्यर्थ धन्यवाद!
*कसे? :
निवेदक जेव्हा सांगत होते तेव्हाच माझ्या लक्षात आले की महाराज काहीतरी लबाडी करत आहेत. त्यांच्या अंगात ताप होता हे निश्चित.( काही अन्य पर्याय सुचवले आहेत ते वावदूक आहेत.) उष्णता लागली तर तापमापीतील पारा चढणारच. दादाजींनी थर्मामीटर काखेतून आरपार घातले.केवळ मधला भाग काखेत पकडला असणार.
*हेतू :
महाराजांनी हे हेतुतः केले हे निश्चितच.सगळ्या बुवा बाबांना आपले माहात्म्य वाढवायचे असते. ते भक्तांकरवी वाढवता येते. महाराजांचा ताप थर्मामीटरवर दिसत नाही हे या दोन भक्तांनी पाहिले की ते दुसर्‍या अनेकांना सांगणार. महाराजांचे दैवी सामर्थ्य त्यांना पटणार. महाराजांचा महिमा आणि त्याबरोबर भक्तगण वाढणार.(निवेदक हा विलक्षण(!)अनुभव सात वर्षे उलटली तरी उत्साहाने सांगत आहेत.महाराजांच्या दैवी शक्तीविषयी त्यांच्या मनात तिळमात्र संशय नाही.)
*ही लबाडी दोन उच्चशिक्षित भक्तांच्या लक्षात का आली नाही?
महाराजांचा भक्त होणे म्हणजे आपली बुद्धी त्यांच्या चरणी गहाण ठेवणे. हे मानसिक दास्य आहे.गुलामगिरी आहे. त्यामुळे स्वामींच्या संदर्भात विचारशक्ती ठप्प होते.स्वामींनी काही लबाडी केली असेल असा संशय भक्तांना येऊच शकत नाही.
मला प्रतीत झालेली उत्तरे थोडक्यात वरील प्रमाणे आहेत.

फुस्स्स्स्स्

भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात ते असे. यनावालांचा मूळ लेख वाचून उंचावलेल्या अपेक्षा फुग्यातून हवा जावी तशा खाली आल्या. काय हे यना? "Brutus you too?"
चन्द्रशेखर

आमचा

आमचा तरी अपेक्षाभंग झाला नाई बॉ.

--

म्हणजे?

आप तारीफ कर रहे हो या बेइज्जती?

अपेक्षा

अपेक्षा ठेवल्या नाहीत म्हणजे अपेक्षाभंग होत नाही असे आमचे महाराज म्हणतात. :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

+१ फुस्स्स्

+१ फुस्स्स्

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर