अनुभव!

अनुभव!

दुसर्‍याच्या डोळ्यातून जग कसे दिसते हे जर आपण पाहू शकलो तर नेमके काय दिसेल याची कल्पना करणे मजेशीर ठरेल. इतके दिवस ही कल्पना अमूर्त, सैद्धांतिक व तात्विक स्वरूपात होती. परंतु संगणक व ऑप्टिक्समधील प्रगत तंत्रज्ञान वापरून युनिव्हर्सल व्हिज्युअल इन्फॉर्मेशन एक्स्चेंज कार्पोरेशन या कंपनीने तयार केलेल्या यू-व्ह्यू या साधनामुळे आपल्याला हव्या त्या व्यक्तीच्या डोळ्यामधून जग कसे दिसत असेल हे संगणकासमोर बसून एका क्लिकमध्ये सहजपणे आपल्याला कळू शकेल, अशी ती व्यवस्था होती. संगणकामुळे रंगांची नावे व त्यातील बारकावे, आकारमान, वस्तूंचे परिमाण, डोळ्यापासून वस्तूचे अंतर, इत्यादी गोष्टी सहजपणे कळणार होत्या.
प्रकाश या साधनाचा उपयोग करून त्याच्या मित्राच्या डोळ्यातून त्याला भोवतीचे जग कसे दिसत असावे याचा शोध घेवू लागला. मित्राच्या डोळ्याच्या संबंधातील काही माहिती भरल्यानंतर यू-व्ह्यूमधून भोवतालचे जग बघताना त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सर्व टोमॅटो निळे दिसू लागले. आकाश लालभडक होता. पिकलेल्या केळ्यांचा रंग हिरवेगार व झाडांची पाने पिवळे धमक. प्रकाशला क्षणभर काही कळेनासे झले. प्रकाशच्या मित्राच्या डोळ्यात कुठलाही दृष्टीदोष नव्हता याची त्यानी खात्री करून घेतली. संगणकाचा स्क्रीन व्यवस्थित होता.
यू-व्ह्यूतच काही तरी दोष असावा म्हणून इंटरनेटवरून कार्पोरेशनशी संपर्क साधून आपली हकीकत सांगितली. तेथील डिझाइन इंजिनीयर्ससुद्धा ऐकून अवाक झाले. काही तंत्रज्ञ त्याच्याकडे चौकशीसाठी आले. त्यानाही प्रकाशचा हा अनुभव बुचकळ्यात टाकत होता. आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते. त्या तंत्रज्ञांनी आणखी काही चाचण्या घेतल्या. इतर काही जणांनी यू-व्ह्यू मधून बघितल्यावर त्यांना टोमॅटोचा रंग लालच दिसत होता. पानं हिरवे दिसत होत्या. प्रकाशला मात्र हा सर्व वेगळा अनुभव होता.
तंत्रज्ञांच्या मते प्रकाशच्या आकलनामध्येच काही तरी घोळ होता. एक मात्र खरे की रंगांचे आकलन वैज्ञानिकरित्या पद्धतशीरपणे होत असल्यामुळे प्रकाशच्या डोळ्यात दोष असावा या संशयाला पण जागा नव्हती. वर्णपटावरील परस्पर पूरक परंतु उलटे रंग त्याला दिसत होते. लालच्या जागी निळा, हिरव्याच्या जागी पिवळा... यूव्ह्यूचा वापर केला नसता तर प्रकाशला स्वत:तील दोषाची कधीच कल्पना आली नसती. प्रकाश निळ्या रंगालाच तांबडा म्हणत होता. तांबड्याला निळा.... पिवळ्याला हिरवा..... व हिरव्याला पिवळा......

------ -------- ----------

प्रकाशला जग कसे दिसते तसेच तुम्हालाही दिसत असेल का? मी तुमच्या डोळ्यामधून सूर्यास्ताकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यास सूर्यास्त समयीचा सूर्य निळा दिसेल का? कदाचित नाही. तुमच्या व माझ्या ज्ञानेंद्रियांच्या जैविक रचनेमध्ये फार मोठा फरक नसल्यास रंगामधील अदलाबदल कधीच कळणार नाही. आपल्या दोघांनाही झाडांची पानं हिरवीच दिसणार. पाचशेची नोट हिरवीच असणार. माणूस रागाने लालबुंदच होणार. हे सर्व ठरलेलेच असेल.
रंगाच्या नावावरून रंगाचा नेमकेपणा आपण ओळखत असतो. वस्तूचा रंग हा वैयक्तिक अनुभव नसून तो सर्वांच्या आकलनाचा विषय असतो. तुमच्या डोळ्यांच्या मागे जाऊन तुम्हाला निळा रंग कसा दिसत असावा याचा शोध घेता येत नाही. आपल्या दोघांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेमध्ये सारखेपणा असल्यास सूर्यास्त समयीचा सूर्य कसा दिसतो हा वादाचा विषय होऊ शकत नाही.
जर हेच खरे असल्यास काहींना आपण रंगांधळे म्हणून वेगळे कसे काय काढू शकतो? मुळातच रंगांधळेपणामध्ये वर्णपटातील काही रंगांचा अनुभवच रंगांधळ्यांना नसतो. त्यांना दोन रंगामधील फरकच कळत नसतो. हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील तांबडा ठिपका त्यांना अजिबात दिसत नाही. हा त्यांचा वैयक्तिक अनुभव नसतो. डोळे व मेंदूमधील काही दोष त्याला कारणीभूत असतात. रंगांधळेपणामध्ये रंगामधील फरक न ओळखण्याचा एका प्रकारचा तो सार्वत्रिक अनुभव असतो. जोपर्यंत रंगामधील फरक ओळखून स्पष्टीकरण देता येत नाही तोपर्यंत आपण रंगा-रंगामधील सूक्ष्म फरकासंबंधी अज्ञानातच वावरत असतो. एके काळचे सात रंग आता संगणकावर 256 झालेले आहेत. रंग आहेत तेवढेच आहेत . परंतु आपण वेगवेगळे रंगछटा ओळखण्यात पटाइत झालेलो आहोत. व त्या रंगछटांना नावानिशी ओळखू शकतो. हा रंगछटांचा आलेख अजूनही विस्तारत असून प्रत्यक्ष स्क्रीनवर बघितल्याशिवाय आपल्याला त्यातील फरक जाणवत नाही.
रंगछटांचा हा अनुभव पूर्णपणे ज्ञानेंद्रियांचा व्यक्तिगत अनुभव या सदरात मोडतो. सर्वांना सर्व रंगछटा ठळकपणे दिसतीलच याची खात्री देता येत नाही. सामान्यपणे दुसर्‍या व्यक्तीला ज्या प्रकारे ढोबळपणाने रंग ओळखता य़ेतात इतपत आपल्याला ओळखता येत असल्यास आपणही सर्वसामान्य आहोत असे म्हणावयास हरकत नसावी. थोडा फार फरक असला तरी त्यात काळजी करण्यासारखे काही नसते.
बाह्य जगाचा अनुभव घेत असताना आपण डोळे, कान, नाक, इत्यादी ज्ञानेंद्रियांचा वापर करत असतो. परंतु ज्ञानेंद्रियांच्या अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी भाषेचा वापर अनिवार्य ठरतो. अनुभवातील सूक्ष्म फरक व नेमकेपणा आपण शब्दात पकडू न शकल्यास ती चूक आपली नसते; आपल्या अनुभवांची वा ज्ञानेंद्रियांची नसते; ती भाषेची असू शकते. उदाहरणार्थ निळ्या रंगाला आपण तांबडा म्हणू लागल्यास निळ्या रंगाच्या मूळ गुणधर्मामध्ये काहीही फरक पडणार नाही. टोमॅटो लाल आहे असे म्हणत असताना आपल्या आकलनातील लाल रंगाविषयी आपण बोलत नसून टोमॅटो या वस्तूला जग कसे ओळखते यासंबंधीचे ते वर्णन असते. त्यामुळे प्रकाश व प्रकाशचा मित्र या दोघांनाही आकाश निळेच दिसत असावे. परंतु निळेपणाचे शब्दीकरण करण्यात प्रकाशला अडचण आलेली आहे.
हे फक्त रंगांच्या बाबतीतच घडत असते असे नसून इतर अनेक अनुभवांच्या बाबतीतही असेच घडत असावे. देव - धर्म, नीती - अनीती, संस्कृती - संस्कार, पाप - पुण्य, इत्यादी बाबतीत आपण इतरांच्या ज्ञानेंद्रियांना त्या कसे काय भावतात याचा विचार करू लागल्यास आपण करत असलेली चूक आपल्याला नक्कीच कळू शकेल. चूक उमगल्यास सुधारणा होवू शकेल. आपल्याला वेदना होतात म्हणजे नेमके काय होत असावे? तो एक अनुभव की अनुभवाची प्रतिक्रिया? एकाच घटनेविषयी टोकाची भिन्न मतं कसे काय असू शकतात? कारण मुळातच आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या अनुभवातून काही गोष्टी गृहित धरलेले असतो. त्यात काही बदल करण्याची गरज भासत नाही. प्रकाशला यू-व्ह्यू मिळाला नसता तर त्याचे रंगाविषयीच्या आकलनामध्ये काहीही फरक पडला नसता. जेव्हा आपण दुसर्‍याच्या अनुभवाशी आपल्या अनुभवाची तुलना करू लागतो तेव्हाच आपल्यातील कच्चे दुवे सापडू लागतात. व यासाठी आपल्या 'मनाची एक वेगळी भाषा' असते. एखाद्या घटनेविषयी आकलनात फार मोठा फरक असल्यास इतरांशी आपल्याला नीटपणे संवाद साधता येणार नाही.
इतर अनेक अनुभवांच्या बाबतीतही असेच काही तरी घडत असावे. ईश्वरी प्रेरणा, साक्षात्कार, चमत्काराचे अनुभव, इत्यादी विषयी (तावातावाने!) वाद घालत असताना तो एक वैयक्तिक अनुभव असू शकतो ही शक्यताच लक्षात घेतली जात नाही. असे अनुभव 'मनाचे खेळ' या सदरातही मोडू शकतात, या पर्यायाचा विचारही केला जात नाही. आपण मात्र वृथा त्यांच्या सार्वत्रिकपणाबद्दल हट्टी भूमिका घेत असतो. आकाशात दिसणारा धूसर ढग ईश्वरासारखा वाटत असल्यास चूक आपल्या आकलनात आहे हेच आपण लक्षात घेत नाही.
कदाचित आपल्या 'मनाची भाषा' आम आदमीच्यापेक्षा अगदीच वेगळी असेल!

लेखनविषय: दुवे:

Comments

देजा व्हू - पुनर्दर्शनाभासी लेख?

देजा व्हू - पुनर्दर्शनाभासी लेख?

श्री. प्रभाकर नानावटी यांचा साधारण याच आशयाचा लेख आधीही वाचल्याचा आभास होत आहे.
- - -

अमेरिकेत वाढलेल्या प्रकाशला आणि गोव्यात वाढलेल्या धनंजयला असे वाटायचे की आपल्याला पाढे एकसारखेच कळतात. दोघांच्या आयांनी अगदी शुद्ध मराठीमध्ये पाढे पाठ करवून घेतलेले होते. दोघे अगदी एकसुरी कोरसमध्ये म्हणत :
बे एके बेऽए
बे दुनी चाऽआर
बे त्रिक सऽहा
बे चोक आऽठ
...

मग धनंजयने एकदा चुकून प्रकाशची अंकलिपी बघितली तर तो चक्रावूनच गेला.
धनंजयच्या अंकलिपीत अशी चिह्ने होती :
२×१=२
२×२=४
२×३=६
२×४=८
...
मात्र प्रकाशच्या अंकलिपीमध्ये भलतीच चित्रे होती
2×1=2
2×2=4
2×3=6
2×4=8
...

"चार" ध्वनी उच्चारताना आपल्याला "४" अशी खाली गाठ असलेली वस्तू दिसते, प्रकाशला मात्र डावीकडे गाठ असलेली "4" अशी वस्तू दिसते. अबब. पाढे म्हणजे काहीतरी वेगळीच पूर्वी न समजलेली गोष्ट असावी, असे धनंजयला कळून आले.

प्रकाशला यू-व्ह्यू मिळाला नसता तर त्याचे रंगाविषयीच्या आकलनामध्ये काहीही फरक पडला नसता.

धनंजयला प्रकाशची अंकलिपी मिळाली नसती तर त्याच्या गणिताच्या आकलनामध्ये काहीही फरक पडला नसता. पण प्रकाशची अंकलिपी मिळाली म्हणून तरी गणिताच्या आकलनामध्ये फरक पडला आहे काय?

अनुग्रह

ईश्वरी प्रेरणा, साक्षात्कार, चमत्काराचे अनुभव, इत्यादी विषयी (तावातावाने!) वाद घालत असताना तो एक वैयक्तिक अनुभव असू शकतो ही शक्यताच लक्षात घेतली जात नाही. असे अनुभव 'मनाचे खेळ' या सदरातही मोडू शकतात, या पर्यायाचा विचारही केला जात नाही.

समजा यु व्ह्यु ऐवजी प्रकाशला गुरुचा अनुग्रह मिळाला असता तर? अशी कल्पना मनात चमकून गेली.
प्रकाश घाटपांडे

अनुभूती आणि संकल्पना वेगळे

मला जो रंग निळा म्हणून दिसतो त्याची मला जी अनुभूती येते ती दुसर्‍यास कळणे अशक्य आहे. अगदी युव्ह्युला पण. कदाचित व्रेन मॅपिंग झाले आणि तेच सिग्नलस दुसर्‍याच्या मेंदूत उमटवले गेले तर हे शक्र्य असेल. पण असे तंत्रझान विकसीत होण्यासाठी पहिल्यांदा त्याचे टेस्टींग व्हावे लागेल आणि तिथेच तो मार खाईल. हेच सगळे स्वर, वास, चव स्पर्शाबाबत खरे असेल. एक कविकल्पना म्हणून हे मान्य केले तर असे अनुभूतींचे आदान प्रदान होऊ शकेल. मात्र यामुळे अडचण होत नाही. कदाचित लेखाचा मतितार्थ हाच असावा.

संकल्पनेत मात्र ही गल्लत होत नाही. ती सामायिक असू शकते म्हणजे मी निळा रंग ज्याला म्हणतो त्यालाच इतरजण निळा रंग म्हणतात. हेध गरम/थंड गोड/तिखट याबद्दल बोलता येईल.

देव - धर्म, नीती - अनीती, संस्कृती - संस्कार, पाप - पुण्य, इत्यादी बाबतीत आपण इतरांच्या ज्ञानेंद्रियांना त्या कसे काय भावतात याचा विचार करू लागल्यास आपण करत असलेली चूक आपल्याला नक्कीच कळू शकेल.

या सर्व संकल्पना आहेत. त्यांचा अनुभूतींशी काय संबंध हे मला कळले नाही.

जोपर्यंत रंगामधील फरक ओळखून स्पष्टीकरण देता येत नाही तोपर्यंत आपण रंगा-रंगामधील सूक्ष्म फरकासंबंधी अज्ञानातच वावरत असतो. एके काळचे सात रंग आता संगणकावर 256 झालेले आहेत. रंग आहेत तेवढेच आहेत . परंतु आपण वेगवेगळे रंगछटा ओळखण्यात पटाइत झालेलो आहोत. व त्या रंगछटांना नावानिशी ओळखू शकतो. हा रंगछटांचा आलेख अजूनही विस्तारत असून प्रत्यक्ष स्क्रीनवर बघितल्याशिवाय आपल्याला त्यातील फरक जाणवत नाही.

हे काहीच समजले नाही. संगणकावर २५६ रंग येण्यापूर्वी आपण रंग फरकांच्या जाणकारीत तरबेज नव्हतो असे म्हणायचे आहे का? मुळात तीन रंग असतात तामुळे ७ वा २५६ या संख्यांना काहीच अर्थ नाही.

ईश्वरी प्रेरणा, साक्षात्कार, चमत्काराचे अनुभव, इत्यादी विषयी (तावातावाने!) वाद घालत असताना तो एक वैयक्तिक अनुभव असू शकतो ही शक्यताच लक्षात घेतली जात नाही. असे अनुभव 'मनाचे खेळ' या सदरातही मोडू शकतात, या पर्यायाचा विचारही केला जात नाही. आपण मात्र वृथा त्यांच्या सार्वत्रिकपणाबद्दल हट्टी भूमिका घेत असतो. आकाशात दिसणारा धूसर ढग ईश्वरासारखा वाटत असल्यास चूक आपल्या आकलनात आहे हेच आपण लक्षात घेत नाही.

या संकल्पना सार्वत्रिक आहेत असा दावा असेल तर हा वाद घालणे (तावातावाने देखिल) योग्य नाही का? आकाशात दिसणारा धूसर ढग हा ईश्वरासारखा वाटणे म्हणजे 'एक सार्वत्रिक ईश्वर संकल्पना' आहे ती वैयक्तिक नाही असाच होतो ना? बाकी वैयक्तिक अनुभवावर वाद घालू नये हे मत मला मान्य.

प्रमोद

क्वालियाचा घोळ

आपल्याला यु-व्ह्यू तयार करता येईल या गृहितकातच सगळा गोंधळ आहे. कुठेतरी मेंदूच्या आतमध्ये 'स्व' बसलेला असतो व त्याला मेंदू डोळ्यांच्या सहाय्याने चित्रपट दाखवत असल्याप्रमाणे अनुभुतींच्या बाबतीत घडतं असं गृहित आहे. मग ती 'स्व' ची अदलाबदली करून हे कथित पॅराडॉक्स निर्माण होतात. मग एका स्व चं मॅपिंग दुसर्‍या स्व पेक्षा वेगळं असू शकेल असे तर्क लढवता येतात.

दुसरा, तांत्रिक आक्षेप असा की आपल्याला जे रंग दिसतात ते नुसतं सत्य रंग व प्रतीत रंग एवढंच मॅपिंग नसतं. तर त्यातले दोन रंग मिसळल्यावर तयार होणार्‍या रंगाला आपण कसं प्रतीत करतो किंवा काय म्हणतो याचंही ते मॅपिंग असतं. हे सर्व नियम पाळून वेगळ्या प्रतीती करता येऊ शकतात हे तितकं उघड नाही. माझी खात्री आहे की ते अशक्य असेल. कारण सर्व रंग हे एका रेषेवरचे बिंदू आहेत - सूर्याचा दृश्य स्पेक्ट्रम (मराठी शब्द?). त्या रेषेवरचे दोन रंग मिसळले की त्यांच्या मधला रंग तयार होतो. हे गणित दर वेळी बरोबर सुटण्यासाठी, सर्वसाधारणपणे हिरव्याला हिरवाच म्हटलं पाहिजे. ती रेषा थोडी ताणली जाऊ शकते -किंवा एका स्व ला त्यातले काही दिसतच नाहीत असं होऊ शकेल. पण त्यात विशेष काय? रंगांधळेपणा असतोच की...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

स्पेक्ट्रम

रंगपट/वर्णपट (परंतु ही व्याख्या केवळ दृष्य स्पेक्ट्रम साठीच अचूक आहे.).

वटवाघळे कानांनी बघतात त्यामुळे मानवी मेंदूतील दृष्टी जाणविणारी (त्रिमिती वगैरे मॉडेल) मोड्यूल त्यांच्या कानांशी जोडली गेली आहेत. म्हणजे जर मानवाच्या मोड्यूलला वटवाघळाच्या कानांतून येणारे संदेश (थेट आवाज नव्हे, थेट ऑडिटरी नर्वचे विद्युत संदेशही नव्हे पण वटवाघळाच्या ऑडिटरी एरियातून निघणारे विद्युत संदेश) दिले तर मानवाला तो ध्वनी 'दिसेल', तो ध्वनी 'ऐकू' येणार नाही.

माइंड्स आय

मध्ये हॉफ्स्टॅडरने अशाच 'आपण वटवाघुळ झालो तर' सदृश लेखावरती स्व च्या अदलाबदली करणार्‍या विचारप्रयोगावर आक्षेप घेतलेला आहे. अतिशय वाचनीय आहे.

तसंच एका आंधळ्या माणसाला स्पर्शाने दिसण्यासाठी पुढील प्रयोग केला होता. त्याच्या कपाळावर कॅमेरा लावला. त्यातून येणार्‍या चित्राचे काही शे पिक्सेल केले. तेच मॅपिंग त्याच्या पाठीवर केलं. व त्यांतील प्रकाशाच्या समप्रमाणात दाब पाठीच्या त्या बिंदूवर पडेल अशी यंत्राने व्यवस्था केली. माणसाला स्पर्श ही भावना 'विसरून' जाऊन त्याला 'चित्रं' (अस्पष्ट का होईना) 'दिसायची'

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अविश्वसनीय

त्वचेच्या पातळीवर जोडणी केल्याने असे का घडेल? ब्रेल वाचली जाते का?

वटवाघुळाबद्दल लेख

त्या लेखाचा उल्लेख श्री. नानावटींच्या मागल्या एका लेखावरच्या प्रतिसादात मी केला होता (दुवा). प्रतिसादात मूळ "वटवाघूळ" लेखाचा दुवाही आहे.

उगाच नाही म्हटले "देजा व्ह्यू"!

कल्पना

कल्पना रोचक आहे. पण दिसणे हा प्रकार वाटतो त्यापेक्षा बराच गुंतागुंतीचा आहे. मागे यावर एक पुस्तक वाचले होते त्यात दिसण्याच्या प्रक्रियेत मेंदूला किती एक्स्ट्रापोलेशन करावे लागते हे वाचून आपल्याला रोजच्या जगात वावराता येते याचेच आश्चर्य वाटले होते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

 
^ वर