'मना'चे खेळ!

'मना'चे खेळ!

लातूर - उस्मानाबाद कडील खेड्यातील दोन तरुण मित्र पुणे स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात घाईघाईने चढत आम्हाला जास्त वेळ नाही, तुम्ही आम्हाला पुणे विद्यापीठ दाखवून परत येथेच आणून सोडा. असे सांगतात. रिक्षावाला आपल्या कमाईचा हिशोब करत खुशीतच विद्यापीठ दाखवण्यासाठी या पाहुण्यांना घेऊन जातो.
विद्यापीठाच्या आवारातील जयकर ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, नामदेव सभागृह, ललित कलाकेंद्र, इ एम आर सी बिल्डिंग, विविध ज्ञानशाखेच्या वेगवेगळ्या इमारती, प्रयोगशाळा, फुले, आंबेडकर, व इतर न्यासपीठ असलेले बिल्डींग्स, कँटीन अशा अनेक विभागातून या तरूणांची वरात त्या रिक्षावाल्यानी काढली. दोन - तीन तास रिक्षामधून हिंडून परत स्टेशनवर आल्यानंतर त्या तरुणांकडून त्यानी दोनशे रुपये मागितले.
"ही तर निव्वळ लूट आहे." ते तरुण खवळून ओरडले "तुम्ही आम्हाला फक्त काही इमारती, ग्रंथालय, प्रयोगशाळा दाखवून आणलात. तुम्ही आम्हाला विद्यापीठ दाखवलेच नाही. "
"परंतु विद्यापीठ म्हणजे वेगळे असे काही नसते. लायब्ररी, लॅबोरेटरी, डिपार्टमेंट्स म्हणजेच विद्यापीठ!"
"काय राव, तुम्ही आम्हास्नी दुधखुळे समजता की काय? खेड्यातले आहोत म्हणून बावळट समजता की काय?" त्यांचा रागाचा पारा उतरायला तयार नव्हता. कसे बसे व्यवहार मिटला व दोघे तरूण गावी निघून गेले.
पुण्याबद्दल, पुण्याच्या रिक्षावाल्याबद्दल अनेक गैरसमजुती आहेत हे मान्य करूनसुद्धा या प्रसंगात रिक्षावाल्याला दोष देणे उचित ठरणार नाही. जेव्हा पुणेकर बाहेरगावी जातात तेव्हासुद्धा काही गोष्टींच्या बाबतीत यांची मतं त्या तरुणांसारखीच असतात हे मात्र नक्की!

Source: The Concept of Mind by Gilbert Ryle (1949)

वरील प्रकारासंबंधीचा उतारा पुण्याला बदनाम करण्यासाठी दिलेला नसून त्या तरुणांच्या विद्यापीठाबद्दलच्या चुकीच्या कल्पनेतून काही बोध होतो का हे तपासण्यासाठी दिला आहे. विद्यापीठ म्हणजे दिव्य, भव्य, काही तरी अद्भुत, अफलातून अशी या तरुणांची कल्पना असावी. मुळात विद्यापीठ म्हणजे एखादे प्रेक्षणीय स्थळ वा एखादी स्वतंत्र इमारत नसून ग्रंथालय, प्रयोगशाळा, अभ्यास विषयाचे विभाग, संशोधन केंद्र, प्रशासकीय सोई सुविधा, असलेली एक व्यवस्था असे तिचे स्वरूप असते. विद्यापीठाचा उल्लेख एकवचनात करत असल्यामुळे कदाचित हा गैरसमज झालेला असावा.
परंतु विद्यापीठ म्हणजे या सर्व इमारतीत अव्यक्तरित्या रहात असलेली एखादी शक्ती असे वाटत असल्यास तेसुद्धा चुकीचे ठरेल. विद्यापीठ ही काही बोट दाखवून सूचित करणारी वस्तू किंवा ती एक महान अद्भुत शक्ती पण नव्हे. मुळात हा भाषेतील व्याकरणाचा वा भाषेच्या आकलनाचा घोळ असावा.
मन या संकल्पनेबद्दलसुद्धा विद्यापीठाप्रमाणे अनेक गैरसमज आहेत. मन हासुद्धा एकवचनी शब्द असल्यामुळे त्याबद्दलही चुकीच्या समजुती आहेत. मन म्हणजे शरीरातील जणू एक अवयव असेच वाटत आले आहे. आपण दैनंदिन व्यवहारात मन हा शरीराचा एक भाग असल्यासारखेच त्याविषयी बोलत असतो. मनाचे सर्व व्यवहार मेंदूतून नियंत्रित होत असले तरी मन म्हणजे मेंदू नव्हे. कारण मेंदू करोडो पेशीतून तयार झालेला मांसाचा, स्नायूंचा गोळा असून त्याला एक निर्दिष्ट आकार व वजन आहे. त्याला आपण सूचित करू शकतो. त्याला इजा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परंतु मन, भावना, विचार इत्यादी संकल्पना अमूर्त आहेत, आपल्या शरीर नावाच्या यंत्रात एखादे भूतसंचार झाल्यासारखे आयुष्यभर ते वास्तव्य करून असतात.
एकदा मन ही वस्तू नाही हे दृढ झाल्यास आपण त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींना फाटा देऊ शकतो. मनाला बरे वाटते, मनाला दुखवू नये, मनाचे खेळ, मनापासून आवडते, मनाला पटते, मनाला शांती हवी, मन भिरभिरते, अशा वाक्यांना मग काही अर्थच उरत नाही.
तरीसुद्धा आपण असली वाक्ये पुन: पुन्हा वापरत असतो, कारण आपल्याकडे 'मन' आहे याची आपल्याला मनोमन खात्री असते. 'मना'च्या अस्तित्वाविषयी आपल्या मनात कधीच शंका नसते. त्यामुळे ते अस्तित्वात आहे हे मुद्दामहून दाखवण्याचे कारणच उरत नाही. परंतु ही गोष्ट तरुणांच्या कल्पनेत असलेल्या विद्यापीठ या संकल्पनेप्रमाणे विचित्र वाटू लागेल. मनाची (mind and matter) ही समस्या आजची नसून अती पुरातन अशी ती समस्या आहे. मनाच्या या समस्येचे उत्तर कधीतरी नक्कीच मिळेल.
मात्र भाषेमधून सूचित केलेले शब्द वा वाक्ये व प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले जग यात गुंतागुंत आहे हे तरी आपण तुर्तास मान्य करायला हवे!

Comments

शंका

एक अवयव, समजा 'हात', म्हणून तरी कोठे दाखविता येईल? "हे तर त्वचा/स्नायू/हाडे/मज्जातंतू/रक्तवाहिन्या आहे", असे म्हणता येईलच.

मनापेक्षा वेगळी, अधिक मोठी समस्या

नाम धारण करणार्‍या एककामध्ये (संकल्पनेतून) नेमक्या कुठल्या प्रत्यक्ष संवेदना अंतर्भूत असतात? हा प्रश्न पुरातन आहे, मूलभूत आहे. मात्र "मन-विरुद्ध-जडतत्त्वे" या प्रश्नाशी त्याचा संबंध थेट जोडू नये असे वाटते.

**नाहीतर "आंतरराष्ट्रीय दिनांक सीमारेषा - इंटरनॅशनल डेटलाईन" कुठे आखावी या प्रश्नाच्या मुळाशी "पृथ्वीच्या परिवलनाचे भौतिक गणित" आहे असे काही म्हटल्यासारखे होईल. अर्थातच दिनांक बदलण्याचा आणि परिवलनाचा मूलभूत संबंध आहे. परंतु ती रेषा आखताना "लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम"चा आधार घ्यावा लागत नाही.**

सहमत

+१
हेच म्हणतो

प्रमोद

विचारांचं सादरीकरण आवडलं.

विचारांचं सादरीकरण आवडलं!

"मुळात हा भाषेतील व्याकरणाचा वा भाषेच्या आकलनाचा घोळ असावा."

हो मी ही हेच म्हणेन. शब्द/ वाक्ये ह्या 'शेंगा' असतील, तर त्यातील 'गर' हे त्या शब्द/वाक्यांचे 'अर्थ' असतात. बोलताना/ऐकताना काही मंडळी 'गर' घेण्याऐवजी शब्दांची 'टरफले'च घेतात. व त्यावरतीच अडून बसतात किंवा 'आपण फसवले गेलो आहोत' अशी ओरड करतात.

मुंबईत ही अनेक नवखे येतात चित्रपटात हिरो/हिरोईन बनायला, ते मुंबईचे नावलौकिक एकून! पण इथे येवून येथील खडतर जीवन पाहून काहि दिवसात त्यांना कळून चूकते कि 'अरे देवा! 'मायानगरी मुंबई' हा तर आपला भ्रम होता.'

रोचक

गहन आणि रोचक विषय आहे.

एकदा मन ही वस्तू नाही हे दृढ झाल्यास आपण त्याच्याशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींना फाटा देऊ शकतो. मनाला बरे वाटते, मनाला दुखवू नये, मनाचे खेळ, मनापासून आवडते, मनाला पटते, मनाला शांती हवी, मन भिरभिरते, अशा वाक्यांना मग काही अर्थच उरत नाही.
याच्याशी सहमत नाही. मन असो वा नसो, या वाक्प्रचरांना रोजच्या आयुष्यात नक्कीच महत्व आहे.

मेन्दु

लेख् आवड्ला.

मेन्दुचे पूर्णपणे ज्ञान झाल्याशिवाय मन ही अमूर्त् कल्पना आहे, असे म्हणता येईल् का? असा प्रश्न् पड्तो.

हो

पुराव्याचा अभाव म्हणजेच अभावाचा पुरावा. या तत्त्वाला ऑकॅमचा वस्तरा असेही म्हणतात.

धन्यवाद

मार्ग्द्र्श्क तत्त्व् म्हणून 'ऑकॅमचा वस्तरा' ठीक आहे. पण् ऑकॅमचा वस्तरा वापर्ल्यास SETI सार्ख्या प्रकल्पांवर बंदी घालावी लागेल्.

चूक

  1. 'पलिकडे कोणीतरी आहे' हे त्यांचे गृहीतक नाही. पण पलिकडे कोणीतरी असण्याची शक्यता पृथ्वी/मानवकेंद्रित विश्वसिद्धांतांच्या अभावामुळे खुली आहे. विश्व एवढे मोठे आहे की आजवरील अपयशामुळे परग्रहवासी अस्तित्वात असण्याची प्रोबॅबिलिटी कमी झालेली नाही. मेंदूत आत्मा असण्याच्या शक्यतेचे तसे नाही.
  2. आजवरच्या त्यांच्या निरीक्षणाचा निष्कर्ष आपण एकटे आहोत हाच आहे.
  3. पृथ्वीवरील कोणत्याही घटनेचे वर्णन/स्पष्टीकरण करण्यासाठी परग्रहवासीयांचा शोध चालू नाही. आज पृथ्वीवर घडणार्‍या घटनांमध्ये 'परग्रही हात' असल्याच्या शक्यतेचा तपास (एक्स फाईल्स सारखा) मात्र 'मेंदूत आत्मा आहे' या दाव्यासारखा आहे.

मेंदूच्या काही गुणधर्मांच्या (उदा. मुक्त इच्छाशक्ती - फ्री विल) स्पष्टीकरणासाठी तुम्ही 'मेंदूत आत्मा आहे' हे गृहीतक विकत आहात. तुम्ही स्वतःच्या खर्चाने ते तपासण्यास माझा विरोध नाही. त्या अभ्युपगमाच्या समर्थनार्थ 'हाय इम्प्याक्ट मासिकात' लेख छापला जात नाही तोवर 'मेंदूत आत्मा नाही' हे विधान सत्य ठरते. 'आजवरच्या निरीक्षणांचा तसाच निष्कर्ष आहे' हे तुम्हाला मान्य आहे का? नाणे दहा वेळा उडविल्यावर दर वेळी 'काटा' बाजू वर आली तर दोन्ही बाजूंना 'काटा' हेच चित्र असण्याची शक्यता ९९.९% असते.. आधी तुम्ही आत्म्याची व्याख्या करा (परग्रहवासी या शब्दाची व्याख्या सोपी आहे).

मेन्दु आणि अन्तराळ

१, २, ३ मुद्दे शब्द बद्लुन् मनाच्या बाबतही सान्ग्ता येतील्. थोडा वेळ् द्या सविस्तर् लिहितो.

सभासदांचे नाव घेऊन केलेले 'मानसिक' उल्लेख

लेख छानच आहे. हृदय हा अवयवही आणि अमूर्त कल्पनाही. काळजाचेही तसेच. ह्या दोघांच्याबाबतीत काय करायचे कळत नाही.

पण "मनाला बरे वाटते, मनाला दुखवू नये, मनाचे खेळ, मनापासून आवडते, मनाला पटते, मनाला शांती हवी, मन भिरभिरते..."
सभासदांचे नाव घेऊन केलेले 'मानसिक' उल्लेख आवडले ;)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उगिच काय् काहितरी

मी कसलेही खेळ केलेले नाहित.

(मन काय् आहे?
मन आय् डी आहे.

"मना "ची निर्मिती वर्ष-दीड वर्षा पुर्वी झालीय.
)
आपलाच मनोबा.
(लेख आवडला.हे वे सां न ल.)

विचाराला चालना देणारा लेख

नेहमीप्रमाणेच विचारांना चालना देणारा. पण विचार म्हणजे काय? चालना ही तर जड वस्तूंच्या चलनाची क्रिया आहे. मग विचारासारखी अमूर्त गोष्ट (अस्तित्वात तरी आहे की नाही कोण जाणे) कशी चालू शकेल? असे असंख्य प्रश्न मनात (म्हणजे कशात?) उठवणारा.

छान

लेख आवडला. मागे मी मन म्हणजे काय? विचारले होते तेव्हा त्यातील 'वैज्ञानिक' ह्या शब्दावरच चर्चा अड(व)ली होती. तेव्हा आता तरी त्याप्रश्नाचे उत्तरे मिळते का पुन्हा मंडळी "माझ्या मनीचे हितगुज सारे" यानिमित्ताने मोकळे करतात ते पहायचे.

मनाची (mind and matter) ही समस्या आजची नसून अती पुरातन अशी ती समस्या आहे. मनाच्या या समस्येचे उत्तर कधीतरी नक्कीच मिळेल.

+१

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

असहमत

मागील चर्चेतच उत्तर दिले होते.

 
^ वर