एका साधनेची समिधा
आतापर्यंत अनेक मोठ्या, कर्तृत्त्वावान पुरुषांच्या पत्नींनी आपापले आत्मचरीत्र लिहिले आहे आणि प्रत्येकवेळी त्या त्या पुरुषांच्या एका नव्या आयामाची ओळख समाजाला झाली. अशाच काहिश्या आशेने साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचायला घेतलं. वाचु लागलो आणि वाचतच गेलो. बर्याच गोष्टी वाचताना स्तब्ध झालो पण तरीही न थांबता पुढचा शब्द वाचत गेलो. पुस्तक एका बैठकीत संपलं आणि शेवटी हाती बरंच काहि लागूनही ते आपल्याला पेलवेल का या भीतीने त्या हाती लागलेल्या खजिन्याकडे विस्फारून बघत राहिलो.
प्रांजळ लेखन कशास म्हणावे असे विचाराल तर मी या पुस्तकाचे नाव घेईन. जसे आठवेल तसे, त्या क्रमात लेखिकेने ते मांडले आहे. लेखिकेच्याच भाषेत सांगायचे तर "स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलताना जे हाती लागले ते तुमच्या समोर देत आहे, जे विस्मृतीत गेले ते प्रभुचे देणे होते. त्याचे त्याने परत नेले."
एका उच्चभ्रु, सनातनी, धार्मिक कुटुंबांत जन्मलेल्या इंदुच्या आणि ब्रह्मचारी राहण्याचे ठरवलेल्या दाढी वाढवून फिरणार्या मुरली आमटेच्या प्रेमविवाहाच्या रोचक कहाणीपासून साधनाताईंचा प्रवास सुरू होतो. बाबांशी लग्न लागल्यावर सुरवातीला त्यांच्या सावलीप्रमाणे त्या त्यांच्या मागे जातात, मात्र बाबांच्या सहवात त्यांना स्वत्त्व गवसते आणि त्या मग नुसत्याच मागे जात नाहित तर त्यांच्या बरोबरीने त्यांची सावली न बनता त्या प्रकाशामागची शक्ती बनतात.
बाबांच्या जीवनातील संघर्ष हा सर्वांना ज्ञात आहे. या पुस्तकातही तो आपल्याला दिसतो. हे पुस्तक साधनाताईंबरोबर आपल्यालाही बाबांच्या दुनियेत फिरवते. बाबांची दुनिया एका तिर्हाईताच्या नजरेला जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी व्यापक आणि स्तिमित करणारी दुनिया पत्नीच्या नजरेतून दिसते.
तसं पाहता साधनाताई देवाला मानणार्या तरीही नवर्यासाठी देवापासून दूर रहाणार्या. जेव्हा घरात देव येतात तेव्हाचा त्यांचा आनंद आपल्यालाही जाणवतो. बाबांना सर्पदंश झाल्यावर, वादळाने घरे उडाल्यावर, बाबांनी वाघाशी झुंजल्यावर त्यांच्यातली पत्नी सारा कारभार बाबांच्या अनुपस्थितीत उत्तम सांभाळते. दुध काढण्यापासून शेण सारवणे- सगळ्यांची जेवणे करण्याची ताक्द त्या बाळगून असतात. पत्नी प्रमाणे त्यांच्यातील आई आपल्याला भेटते. त्यांचा आणि लहानग्यांच्या दुनियेत आपणही शिरतो. त्यांची कधीही न आटणारी माया चकीत करते. बाबांप्रमाणेच आपल्याला प्रकाश भेटतो, विकास भेटतो, रेणूका भेटते.. साधनाताईंच्य नजरेतून त्यांचं कार्य भेटतं.. हेमलकसा भेटतं आणि तिथे प्रकाशने मांडलेल्या नव्या आणि अधिक खडतर दुनियेची प्रशंसा करताना मात्र साधनाताईंचे शब्दही कमी पडताना दिसतात.
अगदी शुन्यातून उभे राहीलेले समाजसेवेचे साम्राज्य उभारताना बाबांना झालेले अतोनात कष्ट, स्वतःच्या तब्येतीची झालेली परवड, त्यांची प्रयत्नवादी भुमिका, त्यांची जिद्द, त्यांची (प्रसंगी वेड्या) साहसाबद्दलची ओढ, त्यांच्यातील पती, पिता, आणि कुष्टरोग्यांचे घेतलेले पितृत्त्व जसे दिसते, त्याचवेळेला साधनाताईंच्या एक स्त्री म्हणून उपसावे लागणारे कष्ट आणि असंख्य अग्निदिव्यांना पार करण्याचे अचंभित करणारे कसब साधनाताई अगदी प्रांजळपणे सोप्या, चित्रदर्शी शब्दांत सांगतात.. पुस्तक वाचल्यावर वाचकाबरोबर राहते ती त्या दुनियेची ओढ. बाबांनी सुरु केलेल्या या यज्ञात एखाद्या समिधेप्रमाणे आपण होऊन शिरून आपलेच जीवन प्रकाशित करण्याचा हा प्रवास साधनाताईंबरोबर वाचकही करतो.
कालिदासाने अज राजाच्या इंदुमतीचे वर्णन करताना रघुवंशाच्या आठव्या सर्गात एका आदर्श पत्नीचे, सहधर्मचारिणीचे वर्णन केले आहे.
गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ ।
करूणाविमुखेन मृत्युना हरता त्वां वद किं न मे हृतम्||
तर अशी गृहिणी, सचिव, सखी, प्रियशिष्या, विविधकलागुणसंपन्न अशी सहधर्मचारीणी हल्लीच्या आत्मकेंद्रित जगात असेल का असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे आत्मचरीत्र वाचल्यावर त्याचे उत्तर तुम्ही नक्कीच होकारार्थी द्याल!
पुस्तकः समिधा
लेखिका: साधना आमटे
प्रकाशकः पॉप्युलर प्रकाशन
किंमतः रू.२००
Comments
सुंदर ओळख
अगदी थोडक्या पण मार्मिक शब्दात करून दिलेली ओळख आवडली.
छान.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
+१
छान आहे पुस्तक परिचय. नक्की वाचणार.
पुस्तक परिचय आवडला
पुस्तक परिचय आवडला
धन्यवाद
ऋषिकेश, पुस्तकाच्या सुंदर परिचया बद्दल धन्यवाद.
बरेच महिने हे पुस्तक वाचेन म्हणतो अन् राहून जाते. आता मात्र नक्की वाचेन.
जयेश
आवडला
नेहमी प्रमाणेच ऋषिकेशने करून दिलेला परिचय आवडला.
पुस्तक वाचलेले आहेच.
त्यातील साधनाताईंचे योगदान लक्षात आल्यावर मला तर बाबा आमटेंपेक्षा त्याच जास्त भावल्या.
बाबा तर काय कुणालाही घरी घेउन येत असत. (वाचा: अंगाला विष्ठा फासून घेणारा वेडा)
पण त्या नंतर त्या व्यक्तीची सेवा करणे मात्र साधनाताईंच्या मागे असे.
म्हणजे बाबांकडे अनुकंपा असली तरी त्यासाठी सदैव लागणारी सेवेची बांधिलकी मात्र साधनाताईंनी दाखवली आहे असे ठामपणे मला वाटले.
आपला
गुंडोपंत
सहमत
बाबांच्या अनुकंपेबरोबरच कुणालाहि घेऊन येणे याबाबत सहमत असलो तरी इथे केवळ बांधिलकी म्हणून नव्हे तर साधनाताई त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांच्यातील "आई" पणामुळे आणि नैसर्गिक मायेमुळे हे सारं करत.. आणि या सार्या धबडग्यात इतकी न आटणारी माया बघून मी तरी स्तिमित झालो
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
संक्षिप्त आणि नेमकी
ओळख आवडली. पुस्तक पाहूनही न घेतल्याचा पश्चाताप होत आहे.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
भारावलेली अवस्था
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"समिधा" वाचून श्री.ऋषीकेश भारावून गेले आणि त्या भारावलेल्या अवस्थेत त्यांनी पुस्तकाचा परिचय लिहिला. आपल्याला जे उत्कटपणे आवडले ते इतरांना सांगावेसे वाटतेच. त्यामुळे पुस्तकाचा इतका उत्तम परिचय लिहून झाला. धन्यवाद !
उत्तम
एका सुरेख पुस्तकाचा तितकाच नेटका परिचय.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आभार
प्रोत्साहनपर प्रतिक्रीयांबद्दल सगळ्यांचे अनेक आभार!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?