नशीब की योगायोग
बहुतेक सर्वसामान्य माणसे कांही प्रमाणात दैववादी आणि कांही प्रमाणात प्रयत्नवादी असतात. माझ्या बाबतीत प्रयत्नवादाचे प्रमाण जास्त असल्यामुळे माझे दैववाद्यांबरोबर खटके उडत असतात. अशाच एका चर्चेत एकाने मला विचारले, "तुमचा नशीबावर विश्वासच नाही कां?"
मी सांगितले, "म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर नाही."
"म्हणजे?"
"कधी कधी एकादा हुषार, समजूतदार आणि कष्टाळू माणूस खूप धडपड करतो, पण त्याला मिळावे तेवढे यश मिळत नाही आणि बेताची बुध्दी आणि कुवत असलेला दुसरा आळशी माणूस सगळे कांही मिळवून जातो. एकाद्या गोष्टीसाठी आपण जीवतोड मेहनत करूनही ती प्राप्त होत नाही आणि दुसरी एकादी गोष्ट आपसूक पदरात पडते. कोणाला बंपर लॉटरी लागते तर कोणी विमान अपघातात सापडून दगावतो. हे सगळे नशीबामुळे घडले असेच इतर सगळ्यांच्याबरोबर मीसुध्दा म्हणतो. याचा अर्थ मी सुध्दा नशीबावर विश्वास दाखवतो असा होतो. पण खरे सांगायचे तर माझ्या मते या सर्व घटना परिस्थितीजन्य असतात आणि आपल्याला त्या परिस्थितींचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ढोबळपणे विचार करतां लॉटरीमध्ये नंबर निघणे एवढे कारण बक्षिस मिळण्यासाठी पुरेसे असते आणि कोसळलेल्या विमानात तो प्रवासी बसला होता यापलीकडे त्याच्या मृत्यूसाठी दुसरे कारण असायची गरज नसते, पण आपण इथे थांबत नाही. लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वरेच्छा, भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो."
"म्हणजे या गोष्टी नसतात कां?"
"ते मला माहीत नाही. पण त्या आहेत असे म्हणण्यात बरेच फायदे नक्की असतात. आपण भांडून मिळवलेली गोष्टसुध्दा नशीबाने मिळाली असे म्हणून विनयशील होता येते आणि आपल्या गाढवपणामुळे हातातून निसटलेली गोष्ट आपल्या नशीबातच नव्हती अशी मखलाशी करून तो लपवता येतो. तसेच दुसर्याच्या उत्कर्षाचे श्रेय त्याच्या भाग्याला देऊन त्याची मिजास उतरवता येते किंवा त्याच्या लबाडपणाकडे काणाडोळा करता येतो आणि त्याच्या नशीबाला दोष देऊन त्याच्या चुकांवर पांघरूण घालता येते, त्याची मर्जी राखणे किंवा त्याची समजूत घालणे वगैरे जमते. "
"लॉटरी लागण्यात आणि विमान अपघातात तर त्या माणसाचे कर्त़त्व किंवा चूक नसतेच. त्या गोष्टी तर निव्वळ दैवयोगानेच घडतात ना?"
"लॉटरीची सोडत काढतांना जो नंबर येईल त्याला बक्षिस मिळेल आणि तांत्रिक बिघाडामुळे जी कांही परिस्थिती तयार होईल त्यामुळे अपघात घडेल. त्यासाठी याखेरीज वेगळी कारणे असण्याची कांही आवश्यकता नाही असे मला वाटते. त्यामुळे कोणा माणसाचा फायदा होईल किंवा नुकसान होईल. पण ती गोष्ट त्याच्या भाग्यात असल्यामुळे लॉटरीत अमका नंबर निघाला किंवा विमानाला अपघात झाला असे मानणे तर्काला धरून नाही. आपले भाग्य जन्माच्या वेळीच सटवाई कपाळावर लिहून ठेवते, दुसरी कोणती देवता ते तळहातावरील रेषांमध्ये पेरून ठेवते, भृगुमहर्षींनी संस्कृत भाषेत, नाडीग्रंथात तामीळमध्ये आणि नोस्ट्रॅडॅमसने कुठल्याशा युरोपियन भाषेत ते आधीच लिहून ठेवले आहे आणि त्यानुसारच सर्व घटना घडत आल्या आहेत आणि पुढे घडणार आहेत वगैरे गोष्टी माझ्या बुध्दीला पटत नाहीत. ज्यांच्या अस्तित्वाबद्दलच मला दाट शंका आहे अशा या कल्पनांचा अभ्यास करण्यात मी आपला वेळ वाया घालवत नाही. उलट जे लोक विधीलिखित अटळ आहे असे सांगतात आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात तेच लोक बोटात अंगठ्या आणि गळ्यात ताईत घालून, कपाळाला अंगारा लावून, नवससायास, उपासतापास करून ते भविष्य बदलायचा प्रयत्न करतांना दिसतात याची मला गंमत वाटते. अगदी मुंगीच्या पायाला जेवढी माती चिकटली असेल तेवढासुध्दा विश्वास मी असल्या गोष्टींवर ठेवत नाही. त्यामुळे नशीबावर माझा विश्वास नाही असेसुध्दा मीच सांगतो असेही म्हणता येईल."
"पण तुमच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्याची प्रचीती येते म्हणून तर ते या गोष्टी करत असतील ना?"
"इतरांचे मी सांगू शकत नाही. कोणत्याही उपायाने कोणाचेही भले होत असेल तर मला त्याचा आनंदच वाटेल. शिवाय या तथाकथित उपायांचे इतर अनेक फायदे मला दिसतात. दुःखाने पिचलेल्या आणि अपयशामुळे निराश झालेल्यांना त्यातून दिलासा आणि धीर मिळतो, हताशपणाच्या अवस्थेत असलेल्यांना आशेचा किरण दिसतो, आपल्या पाठीशी कोणती तरी अद्भुत शक्ती उभी आहे असे वाटल्याने त्याच्या आधारामुळे आत्मविश्वास वाढतो, मनाला खंबीरपणा मिळतो, अंगात उत्साह संचारतो, काम करायला हुरुप येतो, दैववादी माणूससुध्दा आपण कांही प्रयत्न करत आहोत असे समजतो आणि त्याचे समाधान त्याला मिळते. या सगळ्या गोष्टींचा आयुष्यात प्रत्यक्ष लाभ मिळतोच. शिवाय उपास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन करण्याच्या निमित्याने प्रवास घडतो, वेगवेगळ्या जागा पाहून होतात, चार वेगळी माणसे भेटतात, त्यातून अनुभवविश्व समृध्द होते. खास नैवेद्यासाठी तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ तर अफलातून असतात. तुम्ही मला साजुक तुपातला शिरा, खव्याचा कंदी पेढा किंवा गूळखोबरे असे कांही दिलेत तर मला त्याचा आनंदच वाटेल आणि मी ते आवडीने खाईन. माझ्या कपाळाला अंगारा लावलात तर मी तो पुसून टाकणार नाही याचे कारण मला तुम्हाला दुखवायचे नाही. इतरांचा विचार करूनही आपण अनेक गोष्टी करत असतो. कुटुंबातल्या इतर कोणा ना कोणाच्या समाधानासाठी मी वर दिलेल्या कांही गोष्टी केल्या आहेत. पण त्यामुळे माझ्या आधीव्याधी नाहीशा होतील, इडापिडा टळतील आणि माझा भाग्योदय होईल अशी यत्किंचित अपेक्षा मी ठेवत नाही. तशा प्रकारचा अनुभव आजपर्यंत कधी मला आलेला नाही."
"असं कां म्हणता? आतापर्यंत तुमचं काय वाईट झालं आहे?"
"तेच तर मला म्हणायचं आहे. भाग्यावर विश्वास न ठेवता आणि त्यासाठी कांहीही न करतासुध्दा माझं ठीकच चाललं आहे."
"खरं तर तुमच्या एवढ्या योग्यतेच्या माणसानं कुठच्याकुठे पोचायला पाहिजे होतं."
"हो कां? मला त्याची कल्पनाच नव्हती हो."
"तुमच्या मनात श्रध्दाच नसेल तर त्याचे फळ तरी कसे मिळणार? नैवेद्य म्हणून खाल्ला असतात तर त्याचा उपयोग झाला असता, खोबरे म्हणून खाल्लेत तर तो होणार नाही, फक्त कोलेस्टेरॉल वाढेल."
"प्रसाद म्हणून मी एकदम पंचवीस पेढे खाल्ले तर मला ते पचणार आहेत कां? माझे जाऊ द्या, पण इतरांना आलेली प्रचीती तरी दिसायला हवी ना."
"अहो, हांतच्या कांकणाला आरसा कशाला? आपल्या गाडगीळांच्या सुजाताच्या पत्रिकेतला मंगळ जरा जड होता. मागच्या गुरुपुष्यामृताला तिने बोटात लाल खड्याची अंगठी घातली आणि सहा महिन्यात तिचे लग्न जमले सुध्दा."
"अरे व्वा! ती एका नदीच्या रम्य किनारी उभी होती आणि तिच्या बोटातल्या अंगठीच्या प्रभावाने ओढला जाऊन एक उमदा राजकुमार अबलख घोड्यावर बसून दौडत तिच्यापाशी आला असे तर झाले नाही ना? आता सगळी राज्ये खालसा झाली आहेत आणि नद्यांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यांचे किनारे रम्य उरले नाहीत, अबलख घोडे आता रेसकोर्सवरच धांवतात, त्यामुळे अशी परीकथा कांही प्रत्यक्षात आली नसेल. ती एकाद्या मॉलमधल्या मॉडेलच्या ड्रेसकडे निरखून पहात असतांना एकादा तरुण उद्योजक तिथे आला आणि अंगठीमुळे तिच्यावर मोहित होऊन तिला आपल्या बीएमडब्ल्यूमध्ये बसवून घेऊन गेला असेही झाले नाही. पूर्वी ज्या स्थळांकडून तिला नकार आला होता, त्यांना उपरती होऊन आता ते सोयरीक करण्यासाठी गाडगीळांना शरण आले असेही ऐकले नाही. मुलीच्या बोटात लाल खड्याची अंगठी घातल्यानंतरही गाडगीळ तिच्यासाठी वरसंशोधन करत होतेच. मग त्या अंगठीने असा कोणता चमत्कार केला?"
"पण आधी तिचे लग्न जमत नव्हते आणि आता ते जमले याला तुम्ही काय म्हणाल, फक्त योगायोग?"
मी सांगितले, "तसे म्हणता येईल, पण मी म्हणणार नाही."
"तुमचा नशीबावर विश्वास नाही आणि हा योगायोगही नाही, मग आहे तरी काय?"
"योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. त्या अर्थाने हा एक योगायोग ठरतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सुजाताचे लग्न त्या अंगठीच्या प्रभावामुळे जमले असे तुम्हाला वाटते, या दोन घटनांमध्ये कार्यकारण संबंध आहे असे वाटत असल्यामुळे तुमच्या दृष्टीने तो योगायोग नव्हता. मला तसे वाटत नसल्यामुळे कदाचित त्याला योगायोग म्हणता येईल. पण सुजातामध्ये कसलीच उणीव नाही आणि गाडगीळांची परिस्थितीही चांगली आहे. तिच्या बोटात अंगठी असो वा नसो तिचं लग्न आज ना उद्या ठरणारच होतं. गाडगीळांच्या घरातल्या सगळ्याच लोकांच्या बोटात निरनिराळ्या रंगाच्या खड्यांच्या अंगठ्या नेहमीच दिसतात. म्हणजे यातही अनपेक्षित असे कांही घडलेले नाही. यामुळे मला त्यात योगायोग दिसत नाही. ज्या गोष्टींसाठी नवससायास वगैरे करतात ती गोष्ट घडण्याची अपेक्षा असतेच, खात्री नसते. मनासारखे झाले की प्रचीती आली असे म्हणायचे आणि नाही झाले तर श्रध्दा कमी पडली, पूर्वसंचित आडवं आलं वगैरे स्पष्टीकरणे तयारच असतात. त्यामुळे यात अचानक घडणार्या योगायोगाचं प्रमाण कमी असतं. "
"आयुष्यातल्या ज्या गोष्टी भाग्यानुसार घडत असतात, त्यांना तुम्हीच योगायोग म्हणता ना!"
"रोजच्या जीवनात अपेक्षित असलेल्या घटना बहुतेक वेळा ठरल्यानुसार घडत असतात. त्यांना योगायोग म्हणायची गरज नाही. पण कधीकधी जीवनाला अनपेक्षितपणे कलाटणी मिळते. एकाद्याचे नशीब अचानक फळफळलं किंवा दैवाने घात केल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटला, निश्चित वाटणा-या विनाशातून एकादा भाग्यवंत थोडक्यात बचावला किंवा दुसर्या कोणावर अचानक आकाशातून कुर्हाड कोसळली वगैरे जे आपण म्हणतो तशा गोष्टींबद्दल बोलतांना कदाचित योगायोगाने तसे घडले असेल असे मी म्हणेन. सगळेच योगायोग परिणामकारक असतातच असे नाही. अनेक वेळा योगायोगाने घडणार्या घटनांचा आपल्या जीवनावर कांहीच प्रभाव पडत नाही. दूरदेशी राहणारा एकादा जुना मित्र ध्यानी मनी नसतांना आपल्याला प्रवासात कुठे तरी भेटतो. अशा योगायोगातून चार घटका मजेत जातात आणि पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो एवढेच होते. असले योगायोग आपण कांही काळाने विसरूनही जातो. एकादी प्रसिध्द व्यक्ती अकस्मात भेटली तर ती आठवण आपण जपून ठेवतो पण त्यातून आपल्या जीवनात कांही बदल येत नाही. अशा एकाद्या आकस्मिक भेटीतून उत्कर्षाच्या नव्या संधी मिळाल्या किंवा फसगत झाली, जीवनाची दिशाच बदलली असे झाले तर मात्र तो टर्निंग पॉइंट ठरतो आणि कायम लक्षात राहतो."
"अशा गांठीभेटींचे योग आपोआप येत नाहीत. परमेश्वराने ते जुळवून आणले तरच ते येतात."
"हे ज्याने त्याने ठरवायचे आहे."
Comments
मेंदुची जडणघडण
नशीब कि योगायोग हे ठरविण्यात मेंदुची जडणघडण हीच निर्णायक ठरते.
फलज्योतिषाबाबत लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरूपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.
या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
उधृत- ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... http://mr.upakram.org/node/854
बाकी लेख उत्त्तमच
प्रकाश घाटपांडे
आवडला!
आनंद घारे, छान झालाय लेख. नशिबावरचे विचार तर माझ्या मनातलेच आहेत. :-)
"लॉटरीतले नंबर काढण्याची पध्दत किंवा विमानाची रचना समजून घेणे आपल्याला शक्य नसते. त्यामुळे आपल्याला अगम्य असलेल्या गोष्टींच्या खोलात जाण्याऐवजी ईश्वरेच्छा, भाग्य, पूर्वसंचित वगैरे कारणे दाखवून आपण तो विषय आपल्यापुरता संपवतो. "... +१
==================
+
दैव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
समजा एका मोठ्या टेबलाभोवती वीस जण बसले आहेत.टेबलावर एक मोठा, एक लहान असे दोन डबे आहेत.प्रत्येकाने पाचशे रुपयांची एक नोट मोठ्या डब्यात टाकली.आपले नाव लिहून घडी केलेली चिठ्ठी लहानात.मोठ्या डब्यात दहा हजार रुपये जमले. लहानात वीस चिठ्या.
एका मुलाला बोलावले. लहान डबा चांगला हालवून त्यातील दोन चिठ्ठ्या काढल्या. एकीवर नाव होते मोहन, दुसरीवर वसंत.डब्यातील पाच पाच हजार रुपये त्या दोघांना मिळाळे.
आता मोहन आणि वसंत याच दोन नावांच्या चिठ्ठ्या का आल्या याला कोणतेही कारण नाही.प्रत्येक चिठ्ठीवर वीस जणांतील एकाचे नाव आहेच.दोनच चिठ्ठ्या काढल्या.दोनच नावे येणार एव्हढेच.
वसंताला साडेचार हजार रुपयांचा लाभ झाला.हे त्याचे सुदैव म्हणता येईल.
मात्र या दैवाला कोणतेहे कारण नाही.वसंताची जन्मरास, जन्म नक्षत्र,शुभ योग,असेही कोणते कारण नाही. त्याचे संचित , पूर्वजन्मातील अथवा या जन्मातील सुकृत(पुण्यकर्म) याचा काही संबंध असू शकत नाही. ही यदृच्छा(लॉ ऑफ रँडमनेस) आहे.
....
एखादे कार्य यशस्वी होते अथवा होत नाही यासाठी पाच घटक कारणीभूत असतात असे गीतेच्या अठराव्या अध्यायात आहे. संबंधित श्लोक असा:
अधिष्ठानम् तथा कर्ता करणं च पृथ्ग्विधम्|
विविधाश्च पृथक् चेष्टा: दैवम् चैवात्र पंचमम्||
कारण
आता मोहन आणि वसंत याच दोन नावांच्या चिठ्ठ्या का आल्या याला कोणतेही कारण नाही
त्या मुलाने डब्यात हात घातला तेंव्हा त्याच्या बोटांजवळ ज्या चिट्ठ्या आल्या त्या त्याने पकडल्या म्हणून त्याने त्या काढल्या. हे त्यामागचे कारण आहे. (यातही लबाडी करून खुणेच्या चिट्ठ्या काढण्याचे प्रकार सुद्धा घडतात.)
याला आपण रँडमनेस म्हणू, त्यात दैवाचा संबंध नाही असे समजतो. माझी तशी खात्री आहे.
पण त्याच वीस लोकांमधले कांही लोक डोळे मिटून आपल्या नावाची चिट्ठी निघू दे असा आपापल्या देवाचा धावा करतांना दिसतात आणि त्यांच्या नावाची चिट्ठी निघाली तर त्या देवाचे आभार मानतात, त्याचा जयजय्कार करतात.
धावा न करणारे इतर काही लोक आज माझे नशीब चांगले आहे / नाही असे पुटपुटतातच.
हे सगळे समाजाच्या अंगात भिनलेले आहे.
प्रतिसाद आणि गीतेमधील श्लोकाबद्दल धन्यवाद
यदृच्छा
ही यदृच्छा हीच परमेश्वराची इच्छा अशी समजूत करुन आपले समाधान करुन घेणारे अनेक लोक आहेत.
समजा त्या लहान मुलाने बोटाशी आलेली चिठ्ठी न पकडता पुन्हा डब्बा हलवुन दुसरी चिठ्ठी पकडली तर? पहिल्याचा चान्स हुकला.
यदृच्छेचे बळी किंवा लाभार्थी यांना हे 'पटत' असत पण 'पचत' नसत. मग पुर्वसंचिताचा 'कार्यकारणभाव' देउन एका अज्ञाताच्या प्रांताचा हवाला द्यावा लागतो. अनिश्चितता पचवण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे.
प्रकाश घाटपांडे
चान्स
समजा त्या लहान मुलाने बोटाशी आलेली चिठ्ठी न पकडता पुन्हा डब्बा हलवुन दुसरी चिठ्ठी पकडली तर?
प्रश्न पहिला किंवा दुसर्या चिट्ठीचा नाही. जेंव्हा त्या मुलाने चिट्ठी बोटांच्या चिमटीत पकडली त्या क्षणी ती त्याच्या बोटांच्या जवळ असायलाच पाहिजे. डबा हालवतांना त्यातील कोणती चिट्ठी खाली जाईल किंवा वर येईल हे डायनॅमिक्सच्या नियमांनुसारच घडते. ती समीकरणे मांडण्याइतकी माहिती आपल्याकडे नसते आणि ती सोडवण्याची गरज किंवा तेवढा वेळही नसतो. त्या चिट्ठीवर कोणते नाव लिहिलेले आहे यामुळे तिची घनता, क्षेत्रफळ, आकारमान वगैरेमध्ये फरक पडत नसल्यामुळे काही फरक पडू नये. कोणत्या क्षणी त्यातली चिट्ठी बोटात पकडावी असे त्या मुलाला वाटेल त्याचा काहीच नेम नाही.
या अनिश्चिततेला कोणी नशीब असे एक नाव देतो त्याप्रमाणेच रँडमनेस हे शास्त्रीय वाटणारे नाव दुसरा देतो.
+१
>>डबा हालवतांना त्यातील कोणती चिट्ठी खाली जाईल किंवा वर येईल हे डायनॅमिक्सच्या नियमांनुसारच घडते. ती समीकरणे मांडण्याइतकी माहिती आपल्याकडे नसते आणि ती सोडवण्याची गरज किंवा तेवढा वेळही नसतो.
सहमत आहे. याचप्रमाणे नाणे उडवले असता छापा पडेल की काटा हे 'अचूक' सांगणे सैध्यांतिकदृष्ट्या शक्य आहे.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
याच
आपल्याबाबत घडलेल्या अशा रँडमनेसला एखाद्याने "माझे नशीब" म्हंटले तर काय हरकत आहे?
नशीब
रँडमनेसला नशीब म्हटले तर ठीक नाही. नशीब या शब्दामागे जो संकल्पना व्यूह आहे तो आणि रँडमनेस एकच नाहीत.
माझे नशीब असे म्हणताच त्याबरोबर ते चांगले असणे किंवा फुटके असणे या गोष्टी येतात. मग लॉटरी लागली नाही कारण नशीबात नव्हते असे म्हटल्याबरोबर नशीब फुटके आहे असे समजून या व्यक्तीच्या आयुष्यात काहीच चांगले होणार नाही वगैरे स्वसमजुती येतात. यातून नैराश्याबरोबरच कृतीशून्यता येण्याचा धोका असतो.
त्याचबरोबर "मी गरीब का आहे?" याला "माझे नशीब" असे उत्तर दिले की गरीबी ही सध्याच्या समाजरचनेचा परिपाक आहे या कडे डोळेझाक होते आणि त्या समाजरचनेत बदल करण्याची इच्छाच निर्माण होऊ नये अशी व्यवस्था तयार होते.
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
त्रयस्थ व्यक्ती व ज्याचे जळते त्यालाच कळते
सहमत. त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टीकोनातून १० व्यक्तींपैकी १ व्यक्तीला यश येणे किंवा अपयश येणे याची शक्यता गणित मांडून काढता येते. मात्र ज्या व्यक्तीला हा यशाचा किंवा विशेषतः अपयशाचा अनुभव आलेला असतो त्याच्या दृष्टीने ते १०० टक्के सत्य असते तिथे रँडमनेसचे मलम लावून चालत नाही. त्या व्यक्तीला या घटनेचा कार्यकारणभाव समजणे अशक्य होते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हरकत नाही
मी सुद्धा हा शब्द अनेक वेळा वापरतो. नशीबात काय आहे हे आधीपासून ठरलेले आहे या समजुतीला माझा विरोध आहे.
सिनेमाचे रिळ
आपला जीवनपट अगोदरच ठरलेला आहे फक्त तो आपल्याला माहित नाही अशी संकल्पना मानणारे बरेच आहे. नशिबात काय असेल हे फक्त ब्रह्मदेवालाच ठाउक असे म्हणताना ते अज्ञात आहे असेच त्याला सूचित करायचे असते. विधिलिखित असा दुसरा शब्दही त्याला वापरला जातो. ज्योतिषी लोक हे विधिलिखित आम्ही काही प्रमाणात सांगु शकतो असे सांगतात व जातक ही ते मानतात.
प्रकाश घाटपांडे
मीही तसेच मानतो
लाप्लासचा डिटर्मिनिझम किंवा चतुर्थमितीविषयक चर्चा यांतही तसेच मानतात. भाकित करण्याचे फलज्योतिषाचे मार्ग खोटे आहेत, एवढेच.
नशीबात काय आहे हे आधीपासून ठरलेले आहे या समजुतीला माझा विरोध आहे
या समजुतीला विरोध करणे हेही आपल्या नशीबातच अंतर्भूत आहे. माझी कुंडली पाहून दोन तज्ज्ञ ज्योतिषांनी तुमचा पत्रिका व कुंडलीवर पूर्णपणे विश्वास बसणे शक्य नाही हे सांगितले होते. या निष्कर्षाचा एकंदरीत अर्थ कसा लावावा हा प्रश्न मला पडला आहे. मी निष्कर्षावर व पर्यायाने ज्योतिषावर विश्वास ठेवला तर ती कुंडलीशी प्रतारणा होते आणि न ठेवला तर निष्कर्ष योग्य आहे (म्हणजे फलज्योतिष खरे) असे मानावे लागते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
रसेलचा न्हावी
रसेलचा या धाग्याशी अजून एका प्रकारे संबंध जोडला गेला!
प्रकटन आवडले
"योगायोग" शब्दाचा अतिरिक्त उपयोग टाळण्याबाबत म्हणणे विचार करण्यालायक आहे.
(@यनावाला -- यदृच्छेचा "कायदा" : असा कुठला कायदा मानू नये असे मला वाटते. कार्यकारणभावाच्या "कायद्या"इतकाच तो निरुपयोगी आहे, आणि विचारांच्या प्रवाहात आडथळे आणू शकतो.)
छान, सहजसोपं
अतिशय ओघवत्या शैलीत आणि कोणालाही पटावं अशा सहजसोप्या भाषेत लिहिलेलं आहे (नेहेमीप्रमाणेच). आणि मुख्य म्हणजे त्या सोपेपणासाठी कुठलीही वैचारिक तडजोड होताना दिसत नाही.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
+१.
हेच् म्हणतो!
-Nile
+१
+१..
छान लेख. श्री. राजेश यांच्याशी सहमत
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे
असेच
असेच म्हणतो
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
+१
डिट्टो.
नशीबच पांडू तर कशासाठी भांडू?
काल झालेला स्पेन वि. स्वित्झर्लंड हा विश्वचषक सामना ज्यांनी पाहिला असेल त्यांना योगायोग व नशीब यांतला फरक कळला असेल. सामन्याच्या बहुतांश कालावधीमध्ये चेंडूची मालकी स्पेनकडे होती. ८९व्या मिनिटांपर्यंत स्पेनला २७ थेट शॉट्स मारायची संधी मिळाली, त्यातले अंदाजे तीन शॉट्स गोलपोस्टच्या दांडक्यांना जाऊन धडकले.स्वित्झर्लंडला त्या तुलनेत फक्त ९ शॉट्स. स्वित्झर्लंडने धममुसळा खेळ केला. अगदी गोलकीपरला सुद्धा पिवळे कार्ड मिळण्याचा या मालिकेतला पहिला मान स्वित्झर्लंडला मिळाला. तुलनेने स्पेनचा खेळ शिस्तबद्ध होता.
मात्र निकाल काय? 0-1 असा स्पेनचा पराभव.
या निकालामागचा कार्यकारणभाव यदृच्छा वा तत्सम गणिती नियम लावून स्पष्ट करणे शक्य नाही. कालचा दिवस स्पेनचा नव्हता हेच त्याचे उत्तर आहे. यालाच काही लोक नशीब असे म्हणतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
:)
:)
आपला
गुंडोपंत
~काही सदस्यांच्या सदैव तर्कटपणामुळे मला उपक्रमाचा कंटाळा आला आहे. हल्ली येथे फार काही मजा येत नाही. चर्चा करणेच नको वाटते!~
प्लेसहोल्डर
राँटजेनने क्ष किरणांना क्ष हे (बीजगणितातील) नाव दिले कारण त्या किरणांविषयी त्याला अज्ञान होते. त्या किरणांचे नाव क्ष असल्याचा त्याचा दावाच नव्हता. (नंतर 'क्ष-किरण' हेच विशेषनाम झाले ही बाब वेगळी.) त्याचप्रमाणे योगायोग, यदृच्छा, हेही 'गाळलेल्या जागा भरा' प्रकारचे शब्द आहेत. त्यांचा अर्थ असतो की "या घटनेचे कारण माहिती नाही". या जागांना विशेषनाम प्राप्त होते तेव्हा त्यांना नशीब, देव (वरुण=पाऊस पडण्याचे कारण माहिती नाही, नेपच्यून=भरती/ओहोटी/लाटा यांचे कारण माहिती नाही, इंद्र/थॉर=विजा पडण्याचे कारण माहिती नाही, इ.), इ. शब्द दिले जातात. विशेषनाम देणे म्हणजे "हा प्लेसहोल्डर हाच त्या घटनेचे थेट (ऍटॉमिक) कारण (बरेचदा सजीव) आहे, यापलिकडे खोलात जाऊन (रिडक्शनिझमने) 'कारणशृंखला' सापडणार नाही" असा युक्तिवाद होय. नशीब या शब्दाचा योगायोग या शब्दापेक्षा वेगळा अर्थ असा की नशीब हे व्यक्तीसोबत असल्याचे सामान्यीकरण (मर्यादित निरीक्षणांतून) केले जाते; संपूर्ण व्यक्ती (किमान विवक्षित कालासाठीतरी) कमनशिबी असते, उलट, योगायोगाने मात्र एक घटना घडते.
वरुण
पाऊस वरुन पडत असल्याने पावसाच्या देवाला वरुण म्हणत असावेत.* यावरुन ण हे न आधी आलेले अक्षर आहे असा भाषाशास्त्रीय सिद्धांतही मांडता येईल व णमस्कार्स वगैरे शब्द शुद्ध आहेत असेही मानता येईल.
*याबाबत थोडा कथेचा अंदाज बांधता येईल. जेव्हा पाऊस पडण्याचे कारण माहीत नव्हते तेव्हा लोक एकमेकांना विचारु लागले, अहो अचानक पाऊस कसा सुरु झाला? हवामानखात्याने तर सांगितले होते जोरदार पाऊस पडेल म्हणून. मग आम्ही छानपैकी छत्री घरीच ठेवून आलो. कुठे सांभाळायची कटकट. मग हवामानखात्याने पाऊस होणार असे सांगूनही आता पाऊस पडतो यामागचे कारण काय? उत्तर देणारा वैतागून म्हणाला "वरुन पाऊस पडतोय" त्याचे कारण मला काय माहीत असणार? मात्र मुसळधार पावसामुळे नीट ऐकू न गेल्याने ऐकणाऱ्याने ऐकले की "वरुण पाऊस पाडतोय". त्यावरुन वरुण हा पावसाचा देव ही संकल्पना आली असावी.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वा!वा!
कथा आवडली. (काय राड!... काय राड! = कराड! :))
गाळलेली जागा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रिकामटेकडा यांनी केलेले विश्लेषण अगदी मूलगामी आहे."वरुणदेव पाऊस पाडतो." असे म्हणणे आणि "पाऊस कसा पडतो ते मला माहित नाही." असे सांगणे ही दोन्ही समानार्थी वाक्ये आहेत. "देव जाणे, देवाची करणी,आले देवाजीच्या मना " या सर्व शब्दप्रयोगांचा अर्थ"मला माहित नाही" असाच आहे.गाळलेल्या जागी देव शब्द टाकायचा.
गॉड ऑफ द गॅप्स
वैज्ञानिकांना संपूर्ण उत्तर देता आले नाही (बिग बँग, स्वजाणिवेचे स्वरूप, इ.) की त्यात आधिभौतिक तत्त्वे हा निरर्थक पदार्थ कल्पिणार्यांच्या गॉड ऑफ द गॅप्स संकल्पनेवरील आक्षेपांचे विश्लेषण मायकेल शर्मर यांनी तशा प्रकारे केले होते.
दावा
वैज्ञानिकांना संपूर्ण उत्तर देता आले नाही
आपल्याला सारे काही माहीत आहे आणि सर्व उत्तरे देऊ शकतो असा दावा कोणताही वैज्ञानिक करत नाही. इतर लोकच तशी विधाने करतात. मी सत्याच्या शोधासाठी निघालेला एक प्रवासी आहे असे वैज्ञानिक सांगतात.
गैरसमज
यू आर बार्किंग ऍट राँग हायड्रंट.
जन्म आणि मृत्यू
हे गणित कसे जमवणार? -
जन्म आणि मृत्यू कुठे व्हावा ह्यासाठी काही प्रयत्नवाद असू शकत नाही, पण प्रयत्नवादाची अनुपस्थिती देववाद सिध्द करत नाही हे ही खरे.
कृष्णाने सांगितल्याप्रमाणे प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण हेच एक उत्तर मला पटते.