जै जै म्हाराष्ट्र माजा

एकदा एका परिषदेसाठी परदेशात जायचे होते. व्हिसा आणि तिकीट यांच्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीचा आंतरजालावर शोध घेतल्यावर पुण्यातील एक एजन्सी सापडली. ती मराठी होती. दुसरी संस्था नावावरूनच मारवाडी असल्याचे दिसत होते. दोन्ही एजन्सी पुण्यात नावजलेल्या आहेत. सोईसाठी मराठी एजन्सीला अ आणि मारवाडीला ब म्हणूयात.

माझा मराठी स्वाभीमान उफाळून आला. शेवटी आपण आपल्या लोकांना सहकार्य नाही करायचे तर दुसरे कसे करणार? वगैरे वगैरे.

मी अ कडे गेलो. तिथल्या बाईंनी व्हिसासाठी माझ्याकडून सर्व कागदपत्रे घेतली. बर्‍यापैकी सौजन्याने वागत होत्या. व्हिसा फी आणि त्यांची सर्व्हिस यांचा धनादेश मी त्यांना दिला. त्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पाठवते असे सांगीतले. दोन दिवसांनी बाईंचा फोन. तुमच्या पासपोर्टची प्रत हरवली, सॉरी, परत पाठवता का? प्रत फॅक्स केली. नंतर मला फॉलोअप करण्याची गरज वाटली नाही. (बिग मिष्टेक!) दहा दिवसांनी बाईंच्या असिष्टनच फोन. अर्जातील काही माहिती बरोबर आहे का यासाठी. मी क्लीन बोल्ड. "म्हणजे अजून तुम्ही पाठवलेच नाही. अहो, मला दोन आठवड्यात जायचे आहे."
परत सॉरी वगैरे.

नंतर दोन दिवसांनी मी परत गेलो तर बाई माझ्याकडे बघायलाच तयार नाहीत. त्यांच्या सौजन्याचा पारा महाराष्ट्र बँकेइतला खाली आला होता. त्यांच्या
अशिष्टनला परत एकदा आठवण करून दिली.

मग तिकीटाची चौकशी करावी म्हणून त्यांच्याच शेजारच्या बाईकडे गेलो. बाईंनी मला त्यांचे बेष्ट एष्टीमेट दिले.

नंतर मी इतर ठिकाणी बघावे म्हणून ब ला फोन केला. त्यांनी कधी जायचे-यायचे विचारून लगेच मला एष्टीमेट दिले. त्यांचे एष्टीमेट अ पेक्षा तब्बल ३०,००० रूपयांनी कमी होते! मी आंतरजालावरही शोधले पण मल ब पेक्षा चांगला दर मिळाला नाही म्हणून मी तिकीट ब कडून घ्यायचे ठरवले आणि त्यांच्याकडे गेलो.
तिथे गेल्यावर अ आणि ब मधील अनेक फरक जाणवले.

१. अ मध्ये गेल्यावर तुम्हाला एखाद्या सरकारी कार्यालयात पेन्शन मागायला जातो आहोत असे वाटते. ही खाजगी संस्था आहे याची जाणीव फारच कमी वेळा होते. तिथे गेल्यावर "सीने मे जलन आंखो में तूफान सा क्यू है, इस शहर में हर शक्स परेशान सा क्यू है" हे गाणे आठवते. याउलट ब मध्ये संपूर्णपणे प्रोफेशनल वातावरण आहे. अ मधील कर्मचारी ३५ ते ४५ या वयोगटातील असावेत तर ब मध्ये काम करणारे बहुतेक सर्व लोक २० ते २५ या वयोगटातील आहेत. त्वरित सेवा देणे हा ब संस्थेतील कर्मचार्‍यांचा स्थायी भाव जाणवला.
२. अ चे कार्यालय ब च्या पाच ते सहा पट आहे. अ मध्ये प्रत्येक कर्मचार्‍याला वेगळे टेबल, म्यानेजरला वेगळी केबीन. यामुळे परस्पर संपर्क मुख्यत्वे फोनच्या द्वारे होतो. ब मध्ये मालकासकट सर्व लोक एका खोलीत, एका रांगेत आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्माचारी कुठल्या रीतीने काम करतो आहे ते मालकाला लगेच दिसते.
३. मी अ आणि ब मध्ये गेलो असताना चहाची वेळ झाली. अ मधील कर्मचारी माझ्यासमोर चहा घेत त्यांचे काम करत होते. ब मध्ये त्यांनी मलाही चहा दिला.
दोन घोट चहा ही किरकोळ बाब आहे, पण दुसर्‍यासमोर आपण एकट्याने चहा घेणे उद्धटपणा होतो हे मराठी मनाला कळत नसेल का? (इथे कोकणस्थी विनोद आठवला, यजमान पाहुण्याला म्हणतो, "मी चहा घेऊन येतो", आत जातो आणि स्वतः चहा पिऊन परत येतो.)
४.ब मध्ये तिकिट स्वस्त मिळालेच शिवाय अनेक छोट्या-छोट्या गोष्टीं मधून इथे ग्राहकाला महत्त्व दिले जाते हे जाणवले. ब मधील मुलाने माझा पासपोर्ट प्रत काढण्यासाठी नेला आणि परत दिला तेव्हा त्याला एक प्लास्टीकचे कव्हर घालून दिले. कव्हर नक्कीच उपयोगी आहे. शिवाय मागच्या बाजूला त्यांचा पत्ता आणि फोन नंबर होताच. बाहेर जायचे म्हटल्यावर माणूस पहिल्यांदा पासपोर्ट शोधणार आणि तो मिळाल्यावर लगेच या संस्थेचे नाव. ही कल्पकता आवडली.

यानंतर मला मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे का असे फालतू प्रश्न पडत नाहीत. ग्राहकाला सौजन्यपूर्ण वागणूक आणि तत्पर सेवा दिली तर त्यात आपलाही फायदा
आहे ही साधी गोष्ट जर खोपडीत घुसत नसेल तर दुसरे काय होणार? आणि आपली वागणूक बदलायची तर त्यासाठी वाडवडिलांपासून चालत आलेला कोतेपणा, दुसर्‍याला सतत कमी लेखण्याची वृत्ती हे सर्व सोडायला हवे. पण तिथेच तर घोडे अडते.

या अनुभवानंतर मी सर्वांना अ कडे जाऊ नका, ब कडे जरूर जा असे सांगतो. आता यात मी मराठी बांधवांवर अन्याय करत असेन कदाचित, पण ते पाप (इतर पापांबरोबर) एकत्रच फेडीन म्हणतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

नावे

जर खरा अनुभव असेल तर नावे जाहिर करायला हरकत नसावी असे वाटते.

हा अनुभव 'प्रातिनिधिक' समजावा का ?

माझ्या मते..

तुम्ही नावं जाहीर करावीत् आणि त्या मराठी संस्थेच्या अधिकार्‍यालापण ही माहीती द्यावी.

आपलीच मराठी माणसं आहेत. चूक दाखवून द्या (चांगल्या शब्दात), सुधारण्याची संधी द्या. आपण ग्राहकांनी सुद्धा अशी मदत केलीच पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या अनुभवानुसार कर्मचारी जरी आगावू असले तरी अधिकारपदावरची व्यक्ती समंजस आणि दूर्-दृष्टिकोन् ठेवून् असते.
हे करूनही त्यांना सुधारायचं नसेल् (जसे सरकारी कर्मचारी) तर् त्यांनी धंदा न केलेलाच बरा..

वाईट अनुभव आहे

कार्यक्षम व्यापाराने अधिक फायदा होतो, आणि अकार्यक्षम व्यापाराने गिर्‍हाइके गळतात. चांगले व्यापारी टिकावेत हे बरे.

भारता-अंतर्गत प्रवास-नियोजनाचा माझा अनुभव आहे. मराठमोळे नाव आणि मराठी हेलसुद्धा असलेला एजंट आहे. एका मराठी एजंटाचा चांगला अनुभव आहे. सर्व योजना सांगितल्याप्रमाणे केल्या. तिकिटे हातात योग्य वेळी मिळाली. परगावात टॅक्सी वगैरेंची सोय सांगितल्याप्रमाणे होती...

व्यापारात काय कौशल्य लागते ते समजले, आणि ते अंगीकारता आले, तर एखादा मराठी व्यापारीसुद्धा उत्तम सेवा पुरवू शकतो.

तुमचा 'अ' एजंट सेवा-व्यापाराची तत्त्वे लवकर शिको, अशी सदिच्छा. पण नाही शिकला तत्त्वे, तर व्यापारातून लवकर बाहेर पडो, ही सुद्धा सदिच्छाच!

असेच म्हणतो

तुमचा 'अ' एजंट सेवा-व्यापाराची तत्त्वे लवकर शिको, अशी सदिच्छा. पण नाही शिकला तत्त्वे, तर व्यापारातून लवकर बाहेर पडो, ही सुद्धा सदिच्छाच!

असेच म्हणतो.
प्रकाश घाटपांडे

सहमत

व्यापारात काय कौशल्य लागते ते समजले, आणि ते अंगीकारता आले, तर एखादा मराठी व्यापारीसुद्धा उत्तम सेवा पुरवू शकतो.

सहमत आहे. दुर्दैवाने अशी उदाहरणे फारच कमी बघायला मिळतात.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

जनरलायझेशन

मला मराठी विक्रेत्यांकडून बऱ्यापैकी चांगले अनुभव येतात. बोलण्याची (वावगी) पद्धत सोडली तर नेमके उत्तर मराठी विक्रेते देतात. याउलट धंद्यात चांगले सेटल झालेले मारवाडी-गुजराती लोक जास्त मुजोरपणा किंवा खोटारडेपणा करतात असा स्वानुभव आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जनरलायझेशन / सामान्यीकरण

मराठी उद्योजक उद्धट, कामचचुकार आणि इतरभाषीय त्या मानाने चांगले असे सामान्यीकरण करणे योग्य नाही. तथापि मराठी माणसांकडून मला आलेले अनुभव काही फारसे चांगले नाहीत. सेवा प्रदान करणार्‍याने सेवेच्या बदल्यात मूल्य आकारत असताना किमान सौजन्य आणि व्यावसायिकता दाखवायला काय हरकत आहे? रिक्षावाला रिक्षा चालवताना तंबाखू खाऊन थुंकतो, सिगारेट ओढतो, मोबाईलवर बोलतो, सिग्नल तोडतो... यावर आक्षेप घेतल्यास अपमानास्पद बोलतो. त्याला गणवेश घालायची, बॅज लावायची लाज वाटते. हे एक उदाहरण झाले. दुपारी एक ते चार बंद असणारे चितळ्यांचे दुकान ते 'आमची कोठेही शाखा नाही' ही पुणेरी पाटी या सगळ्यांतून व्यावसायिकतेचा अभाव सतत दिसत राहातो. 'मी प्रामाणिकपणे कष्ट करेन आणि त्या बदल्यात योग्य ते मूल्य आकारेन' ही निष्ठा बर्‍याच मराठी उद्योजकांत, व्यावसायिकांत, सेवादात्यांत दिसत नाही. हे खेदजनक आहे, पण् सत्य आहे.

सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

+१

बरोबर आहे...

||वाछितो विजयी होईबा||

गैरसमज

इथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. दुसर्‍या शब्दात १००% मराठी व्यावसायिक असे वागतात आणि १००% इतरप्रांतीय चांगली सेवा देतात असे म्हणायचे नाही. पण सेवादात्यांचा विदा घेतल्यास त्यात सौजन्याने न वागणारे, वेळेवर काम न करणारे मराठी व्यावसायिक बरेच निघतील असे आजवरच्या अनुभवावरून वाटते. ग्राहकाशी सौजन्याने बोलणे/वागणे हा माझ्या मते उत्तम सेवा देण्याचा एक भाग आहे. किंबहुना इतर सेवा चांगली असेल आणि वागणे उद्धट असेल तर मी तिथे न जाणेच पसंत करीन.

हा मुद्दा वैयक्तिकरीत्या घेऊ नये असे सुचवावेसे वाटते. चांगला व्यवसाय करण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी हव्यात तिचा अभाव प्रामुख्याने मराठी व्यावसायिकांमध्ये जाणवतो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

सहमत आहे

तुम्ही सामान्यीकरण केले आहे, असे मला म्हणायचे नाही. एकंदरीतच 'सौजन्य' हा काही मराठी माणसाने अभिमानाने सांगावा असा त्याचा गुण नाही. (हे माझे जनरल स्टेटमेंट असेल, पण ते बरोबर आहे, असा माझा समज आहे.) मराठी माणसाच्या अव्यवासायिक वृत्तीने मीही पोळलो आहे. फक्त मराठी माणूस आहे, म्हणून एखाद्याला मदत करायला जावी तर ती अंगलट येण्याची शक्यताच अधिक.
चांगला व्यवसाय करण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी हव्यात तिचा अभाव प्रामुख्याने मराठी व्यावसायिकांमध्ये जाणवतो.
याच्याशी सहमत आहे.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

महाराष्ट्र बँकेइतला खाली

महाराष्ट्र बँकेइतला खाली
अरेच्च्या हे उदाहरण तर एकदम चपखल बसले.

ग्राहकाला सौजन्यपूर्ण वागणूक आणि तत्पर सेवा दिली तर त्यात आपलाही फायदा
आहे ही साधी गोष्ट जर खोपडीत घुसत नसेल तर दुसरे काय होणार?

हे पटले. पण आपला अनुभव प्रतिनिधिक नसावा अशी आशा आहे. बाकी या सगळ्यात तुमचा अ बद्दल आकस नाही हे कळले तरीही बाकीच्यांना मदत म्हणून तुम्ही या अनुभवात नाव सांगितले पाहीजे होते. (तशी गरज पडेल त्यांना व्यनि चा पर्याय आहेच).

आकस

आकस नाहीच. फक्त मी मोजलेल्या दमड्यांच्या बद्ल्यात मला एखाद्या मंडळाकडे अनुदान मागायला जाणार्‍या लोकांना मिळते तशी वागणूक मिळू नये आणि योग्य सेवा मिळावी या अपेक्षा आहेत्.

ताक : महाराष्ट्र ब्यांकेचे उदाहरण चपखल आहे कारण ते अनुभवातून आलेले आहे. त्यांच्या अभूतपूर्व सेवेला कंटाळून शेवटी मी तिथले खाते बंद केले.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र कडून मला नुकताच वेगळा अनुभव आला.
मी एक तक्रार ई मेलने त्यांच्या मुख्यालयात केली. तक्रारीची दखल लगेच मुख्यालयाकडून घेतली गेली. मला उत्तरादाखल दोन ई मेल आल्या.
तसेच शाखेचे मॅनेजर फोनवर आणि प्रत्यक्ष बोलले.

एक अनुभव

मूळ एक अनुभव होता. त्यातील मराठी - अमराठी फरक सोडल्यास इतर फरक असे दिसतात.

१. अ चे कार्यालय काही पटींने मोठे होते. २. अ कडे काम करणारे वयाने मोठे होते.

याचा अर्थ अ त्याच्या व्यवसायात ब च्या मानाने प्रस्थापित आहे. कदाचित अ कडे हुकमी आणि बांधलेले (सॉफ्टवेअर, पर्यटनव्यावसायिकांची) कामे भरपूर असावीत. त्यांना देण्यात आलेली सेवा कदाचित चोख असावी. तुम्ही जर फुटकळ गिर्‍हाईक असाल तर अ ला त्यात स्वारस्य नसावे. याचा अर्थ अ तसे सांगेलच असे नाही. ब ला मात्र आपला व्यवसाय वाढवायचा आहे. तेंव्हा फुटकळ गिर्‍हाईकाला चांगली सेवा देणे भाग आहे.

अ कडील काम करणारे वयाने मोठे होते. ब कडे अगदी विशितले होते. जसे अ च्या व्यवसायाचे झाले तसेच अ कडील काम करणार्‍यांचे होऊ शकते. म्हणजे त्यांना मोठा मासा गळाला लागेस्तोवर गळ टाकून बसायला आवडत असेल. ब कडील तरुणांना आपले गिर्‍हाईक गटवून ठेवायचे असु शकते.

कोणालाही मोठ्या दुकानातील छोटा/खोटा अनुभव येत असतो.

प्रस्थापित मनुष्य अरेरावीने वागतो असे धरले तर महाराष्ट्रात मराठी माणूस तसा वागला तर वेगळे नाही. जसे पुण्यातील चितळ्यांचे वर्णन असते तसेच कयानी बेकरीचेही असते. (पदार्थ संपवल्यावर परत मिळत नाही, विशिष्ट वेळात मिळतो.) बंगाल्यात बंगाली दुकानदार असाच वागतो अशी तक्रार मी ऐकली आहे. अगदी गुजरातेतला रिक्षावाला बघितला मराठी रिक्षावाल्याच्या तोडीस तोड सापडेल. तर या उलट उपरा माणूस दबून वागतो . त्याला तसे करणे भागच असते.

मराठी व्यावसायिक, उद्योजक, विल्डर बर्‍याच प्रमाणात यशस्वी होताना दिसतात. सार्वत्रिकीकरण स्वानुभावावरून करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनास बाधक आहे असे कोणी तर्कटाने केलेले वाचले असेलच.

प्रमोद

प्रस्थापित

>याचा अर्थ अ त्याच्या व्यवसायात ब च्या मानाने प्रस्थापित आहे.
अ आणि ब पुण्यातील पहिल्या पाच ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आहेत. उलट अ पेक्षा ब कडेच जास्त ग्राहक दिसले, ब कडील कर्मचारी अधिक व्यस्त होते.

>अ कडील काम करणारे वयाने मोठे होते. ब कडे अगदी विशितले होते. जसे अ च्या व्यवसायाचे झाले तसेच अ कडील काम करणार्‍यांचे होऊ शकते. म्हणजे त्यांना >मोठा मासा गळाला लागेस्तोवर गळ टाकून बसायला आवडत असेल. ब कडील तरुणांना आपले गिर्‍हाईक गटवून ठेवायचे असु शकते.
ब कडे मला मिळालेला तिकीटाचा दर इतर कुठेही मिळाला नाही. याचा अर्थ ब कडे फक्त गोड बोलून गिर्‍हाईक गटवणे चालते असे नाही. त्यांची सेवा खरोखर चांगली आहे.

>सार्वत्रिकीकरण स्वानुभावावरून करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनास बाधक आहे असे कोणी तर्कटाने केलेले वाचले असेलच.
वर सार्वत्रिकीकरण करण्याचा हेतू नाही असे स्पष्ट केले आहे.
इथे वैज्ञानिक दृष्टीकोन कुठून आला कळत नाही. फारतर कॉमन सेन्स किंवा तर्कनिष्ठ दृष्टीकोन म्हणता येईल. कुठली ट्रॅव्हल एजन्सी निवडायची या निर्णयामागे मी विज्ञान वापरत नाही. भाजीला मीठ कसे आहे हे कळण्यासाठी तिच्यातला सोडीयम कंटेंट मोजावा लागत नसावा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

सार्वत्रिकरण

मराठी माणूस (लेखाचे मूळ शिर्षक 'जै जै महाराष्ट्र माझा') इतर अमराठी (मारवाडी?) माणसापेक्षा कमी सेवा सुविधा पुरवतो वर उद्धटपणे वागतो. असा काहिसा अर्थ तुमच्या लेखातून व आलेल्या प्रतिसादातून वाटला. एका अनुभवाचे (अनेक अनुभव तुम्हाला व इतर प्रतिसादकर्त्यांना आले असतील) मराठी - अमराठी असे सार्वत्रिकरण झाले असे मला वाटले. कदाचित ती माझी चूक असेल. अनुभवाचे सार्वत्रिकरण करणे ही वैज्ञानिक वाटचालीतील एक महत्वाची पायरी असते. ते इथे कदाचित झाले म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन आला. तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी कशी निवडायची यात तो येत नाही हे तुमचे म्हणणे मला मान्य आहे.

तुम्हाला अ कडून कमी सेवा (दिरंगाई) जास्त दर शिवाय उद्धट वागणूक मिळाली हे खरेच आहे. फक्त ती मराठी - अमराठी या फरकातून मिळाली का इतर काही फरकातून मिळाली याचा मी अंदाज बांधत होतो. तुमची मराठी-अमराठी विभागलेले अनुमान कदाचित बरोबर असेल. माझा अंदाज हा अर्थात उपलब्ध माहितीवर होता. जी माहिती तुम्हाला जास्त आहे.

प्रमोद

 
^ वर