उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
ओपन-बूक परीक्षा आणि त्यास लागणाऱ्या प्रश्नांवर आधारीत ज्ञानक
अजय भागवत
June 5, 2010 - 2:56 pm
परीक्षा पूर्णपणे बंद करण्याऐवजी, ओपन-बूक परीक्षेचा वापर करता येईल का ह्याचा मागोवा.
सॉफ्टवेअर टेस्टींग ह्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एक सर्वांगीण ज्ञानक (कोर्स) करावा ह्या विचाराने २ वर्षांपूर्वी पछाडलो गेलो. हा ज्ञानक तयार करतांना वापरलेल्या तंत्राबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आहे. हल्लीच ८ वी पर्यंतची परीक्षा न घेण्याबाबत ज्या चर्चा वाचनात आल्या त्यामुळे ह्याबद्दल लिहावे असे वाटत होते. ह्या लिखाणामुळे स्वतःचा ढोल बडवल्याचा आभास होण्याचा दोष उत्पन्न होऊ शकतो पण तसे होऊ देणे ही मुळ कल्पना नाही. (ह्या लेखात काही मराठीशब्द नवे वाटतील; त्यांचा अर्थ ह्या लेखापुरताच मर्यादित आहे.)
कृपया पुढील लेख वाचण्यासाठी - हा दुवा
दुवे:
Comments
विचार करण्याजोगा
लेख. ओपन-बुक परीक्षेचा एक मुख्य फायदा म्हणजे परीक्षेचं स्वरूप पाठांतर इतकंच न राहता (म्हणजे सूत्रं, गुणधर्म इ. लक्षात ठेवणे) शिकलेल्या गोष्टींचा उपयोग कसा करावा (सूत्रांचे कोणत्या परिस्थितीत उपायोजन करता येईल) याची चाचणी घेणारं - अशा प्रकारे बदलता येईल. अर्थात अशी पद्धत राबवताना, तीही इतक्या मोठ्या प्रमाणावर, काही अडचणी उद्भवणे साहजिक आहे. तरीही हा पर्याय निश्चितच पडताळून पहावा असा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अनुभव
मी इंजिनीअरिंग कॉलेजात शिकत असताना आम्हाला काही विषयांसाठी ओपन बूक चाचण्या असत. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना जर सर्वात धास्ती कोणत्या परिक्षेची वाटत असे तर ती या परिक्षेची. या परिक्षेतील प्रश्न इतक्या जनरल स्वरूपाचे असत की तुम्हाला त्या विषयी परिपूर्ण ज्ञान असल्यासच तुम्ही उत्तर लिहणे शक्य असे. बरोबर कितीही पुस्तके असली तरी उपयोग होत नसे. उदाहरणार्थ एक प्रश्न आठवतो. ' Discuss Fluorescence with special reference to cathode ray tube applications. आता परिक्षेच्या मर्यादित वेळात पुस्तके वाचून या प्रश्नाचे उत्तर काय लिहिणार कपाळ! या ओपन बूक परिक्षांसाठी नेहमीच्या क्लोझ्ड बूक परिक्षेच्या दहा पट तरी अभ्यास करावा लागत असे.
चन्द्रशेखर
दहा पट अभ्यास
>> या ओपन बूक परिक्षांसाठी नेहमीच्या क्लोझ्ड बूक परिक्षेच्या दहा पट तरी अभ्यास करावा लागत असे.>>
तोच प्रश्न क्लोज्ड-बूक परीक्षेला आला असता तर तेव्हढाच अभ्यास करावा लागला असता का असा प्रश्न् पडला. ओपन-बूक परीक्षेबद्दल माझा अनुभव निश्चितच वेगळा आहे कारण त्यास खास प्रश्नांची जोड दिलेली आहे. तसेच उत्तर् चुकले तर् ते का चुकले आहे ते समजावून सांगितले जाते त्यामुळे दुसर्या प्रयत्नात बहूतेकजण तोच प्रश्न बरोबर सोडवतात.
सहमत आहे
चंद्रशेखर यांच्याशी सहमत आहे. महाविद्यालयीन अभ्यासात अशी ओपनबुक परीक्षा दिली आहे आणि परीक्षेतील प्रश्न कोणालाही बुकांत सापडले नव्हते. अशा परीक्षांची धास्ती वाटत असे. दहापट अभ्यास केला म्हणून उत्तरे येतीलच याची शाश्वती नसे.
क्लोज्ड बुक्स टेस्टमध्ये पुस्तकातील पाठांशी संबंधितच प्रश्न विचारले जात. अवांतर प्रश्न सहसा नसत.
परंतु, माझ्या मुलीला शाळेत कधीतरी ओपन बुक्स टेस्ट असते. तिला विचारून तिचा अनुभव सांगेन.
परीक्षेतील प्रश्न बुकांत सापडले नव्हते.
>>आणि परीक्षेतील प्रश्न कोणालाही बुकांत सापडले नव्हते.>>
>>क्लोज्ड बुक्स टेस्टमध्ये पुस्तकातील पाठांशी संबंधितच प्रश्न विचारले जात. अवांतर प्रश्न सहसा नसत.>>
असे असेल तर हा त्या परीक्षा पद्धतीचा दोष नाही. कारण ज्या तत्वावर ही परीक्षा घेतली जावी असे त्यापद्धतीचे पुरस्कर्ते सांगतात त्यानुसार, विद्यार्थ्यांना "मगींग" ची सवय न लागावी, विद्यार्थ्यामधे त्याविषयाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा अशा पध्दतीने जर प्रश्नांची योजना केली तर निश्चितच वेगळे चित्र दिसते. थोडे मजेने असे म्हणेन, "तुम्हाला सगळी पुस्तकं, ई. पहायची परवानगी आहे ना, मग हा घ्या प्रश्न आणि दाखवा सोडवून" असा पवित्रा जर प्रश्नकर्त्याच्या असेल तर काही खरं नाही. केवळ गुगलबाबाच कदाचित त्याचे उत्तर् देऊ शकेल. त्यामुळे दहापट अभ्यास करावा लागत असेल तर "प्लान इज गुड बट इंप्लिमेंटशन इज नॉट" असे म्हणायला वाव आहे.
येथे मुद्दा असा की, अजिबातच परीक्षा न घेता जर मुलं वरच्या वर्गात जात राहीली तर ते जे काही भयानक चित्र डोळ्यासमोर येते त्यावर हा उपाय होऊ शकेल का असे वाटले, म्हणून हा लेख टाकला होता, मते आजमावण्यासाठी. चंद्रशेखर आणि तुम्ही प्रत्यक्ष अशा परीक्षा दिलेल्या व्यक्ति आहात आणि तुमचे अनुभव वेगळे आहेत् आणि दोन्ही वेळा त्याची कारणे क्लोज्ड-बूक परीक्षेपेक्षा "अवघड प्रश्न" आहेत असे दिसतेय. त्यामुळे तुम्ही असा विचार करुन सांगा की, तुम्हाला क्लोज्ड-बूक परीक्षेप्रमाणे प्रश्न दिले असते आणि ते ओपन-बूक पद्ध्तीप्रमाणे सोडवायचे असते तर हेतू साध्य झाला असता का? (हेतू- शिक्षणाचा).
अवघड प्रश्न
क्लोझ्ड बूक परिक्षेतील प्रश्न अवघड नसतात. जनरल स्वरूपाचे असतात. त्यांचे अचूक उत्तर काय हे प्राध्यापकालाही सांगणे अवघड असते. सध्याच्या परिक्षा पद्धतीत, विद्यार्थ्याच्या दृष्टीने, परिक्षेचा उद्देश हा जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे हाच असतो. त्यामुळेच या स्वरूपाच्या परिक्षा विद्यार्थ्यांना या उद्दिष्टप्राप्तीच्या दृष्टीने अवघड जातात.
ज्या शिक्षण पद्धतीत परिक्षांचा उद्देश विद्यार्थ्याने ज्ञान प्राप्ती केली आहे की नाही हे फक्त अजमावण्याचा असतो. त्या शिक्षण पद्धतीत अशा परिक्षा जास्त उपयुक्त ठराव्या. शिक्षणाच्या उद्देशाबद्दलच्या माझ्या या लेखाचा दुवा जरूर बघावा. अर्थातच अशा पद्धतीत परिक्षेत किती गुण मिळाले ही बाब पूर्णपणे गैरलागू ठरते व विद्यार्थ्याला ते सांगणेही अपेक्षित नसते. त्याला तो विषय समजला आहे किंवा नाही एवढेच सांगणे अपेक्षित ठरते.
चन्द्रशेखर
विद्यार्थ्याने ज्ञान प्राप्ती केली आहे की नाही
>>ज्या शिक्षण पद्धतीत परिक्षांचा उद्देश विद्यार्थ्याने ज्ञान प्राप्ती केली आहे की नाही हे फक्त अजमावण्याचा असतो.>>
अगदी खरे. परिक्षांचा उद्देश विद्यार्थ्याने ज्ञान प्राप्ती केली आहे की नाही हे फक्त अजमावण्याचा असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. माझा उद्देशही तोच होता व् त्यातून मला विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर माझ्या द्न्यानकाच्या परिणामकारकतेचा अवलोकनाचसाठीही उपयोग होतो. त्यामुळे, कमीतकमी अशा काही चाच्ण्या घ्याव्यात की, जेणे करुन विद्यार्थ्यांना नाही तर कमीतकमी शिक्षकांना तरी कळावे की, "बरोबर चालले आहे"- असाही विचार मनात येतो.
तुमच्या ब्लॉगला भेट दिली व् लेख वाचला. खूप माहिती मिळाली. येथे संदर्भ दिला आहे. (अवांतर ट्यागला संकेत शब्द चांगला पर्याय आहे.)
ओपनबुक परीक्षा.
डिफ़ेन्स अकाउन्ट्स नावाचे एक सरकारी खाते आहे. त्यातील कारकुनांना अकाउन्टन्ट बनण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. परीक्षा ग्रंथालयातच होते आणि पुस्तके पाहून, वाचून उत्तरे लिहायची असतात. परीक्षेत फक्त अर्धा टक्का कर्मचारी उत्तीर्ण होतात.
मीही एकदा एक परीक्षा दिली होती. पर्यवेक्षक दयाळू होता, त्याने परीक्षार्थींना कपाटातली पुस्तके पाहून उत्तरे लिहिण्यास परवानगी दिली होती. ज्यांनी पुस्तके पाहिली, त्यांना वेळ पुरला नाही आणि इतरांपेक्षा कमी गुण मिळाले.
अशा परीक्षांत पुस्तकांची संख्या अफाट असते, आणि त्यांतील भाग निवडून निवडून आणि सोपा करून प्राध्यापकांनी शिकवलेला असतो. आपल्या वहीतल्या नोट्स वाचून अभ्यास करणे जमते, फक्त पुस्तके वाचून परीक्षा देणे अवघड.--वाचक्नवी
ओपन-बूक परीक्षा ऐवजी वेगळे नाव निवडायला हवे
हे वेगळ्या पद्धतीने ओपन-बूक परीक्षा घेतल्यामुळे होते. प्रश्नांची निवड जर ज्ञानाचा वापर करण्याला प्रवृत्त करण्यासाठी केलेला असेल तर आधी ते पुस्तक वाचून परीक्षार्थी कमीतकमी ते ज्ञान "समजणे" ह्या पातळीपर्यंत गेलेले असले पाहिजेत. तेच जर नीटपणे झालेले नसेल तर ओपन-बूकच काय पण क्लोज्ड-बूक परीक्षेत जरी तसेच प्रश्न आले तरी तेच होईल.
जी ओपन-बूक पद्धत आणि प्रश्न निर्मिण्याची पद्धत मी वापरतो त्यात आधीच्या १५ ते ४५ मिनिटाच्या भागात एखाद्या मुद्द्याला समजावून सांगितले जाते, त्यासाठी नोट, व्हिडीयो, ऑडीयो, प्रेझेंटेशन, लेक्चर अशा एका माध्यमातून तो मुद्दा त्यांना समजतो. प्रश्न आधी ज्ञानाच्या पहिल्या दोन पातळ्या तपासतात व नंतर १०-१५ टक्के प्रश्न ज्ञान वापरुन दाखवण्याबद्दल असतात. कदाचित मी ह्या पद्धतीला ओपन-बूक परीक्षा ऐवजी वेगळे नाव निवडायला हवे असे वाटते आहे.
सहमत
माझा आय्. आय्. टी. तील अनुभव असाच आहे. आमचे एक प्राध्यापक अशा खुल्या परीक्षेला हवा तेवढा वेळही द्यायचे. फक्त इतरांशी बोलणे शक्य नसायचे! दुपारी एक पासून रात्री
बारा वाजेपर्यंत बसूनही मला इलेक्ट्रोडायनामिक्स् चे प्रश्न अजिबात सुटायचे नाहीत.
मध्येच आम्ही सगळे चहालाही जायचो पण सुतकी चेहरे घेऊन...न बोलता! तो ताण मी मुळीच विसरणार नाही.
फायनलसाठी ओपन बूक नसावी पण मोठ्या परीक्षेच्या तयारीसाठी अशी परीक्षा उपयोगी ठरते.
गौरी
क्लिष्टता
ओपन-क्लोज्ड बूकच्या क्लिष्टतेबाबत खाली काही प्रतिसादात मते मांडली आहेत.
नक्कीच विचार करण्याजोगा, पण!
वरील प्रतिसादातील सर्व निरीक्षणे सामान्यतः मान्य. माझ्या मर्यादित अनुभवापोटी खालील मुद्दे चोखंदळपणे तपासून घ्यावे लागतील. तसेच सर्व विद्यार्थी हे परीक्षार्थी नसून खर्या अर्थाने विद्यार्थी आहेत हे या प्रतिसादात गृहीत धरले आहे. मुद्दे असे.
मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना त्याच परीक्षा देताना फेर-मार्गदर्शन लागेल. त्यासाठी लागणारा जादा वेळ व संधी कशी पैदा करावी? त्यासाठी प्रथमतः वर्गातील विद्यार्थी संख्या कमी करावी लागेल.
एका झटक्यात परीक्षा पार करणारे विद्यार्थी जर फेर परीक्षार्थींना गाईड प्रमाणे वागू लागले तर काय करायचे?
माझ्या अनुभवानुसार बरेचदा शालेय विद्यार्थ्यांना मागील वर्षांमधले समजलेले नसते. थोडक्यात पाया कच्चा असतो. त्यांच्यासाठी काय करायचे? मागील पुस्तके आणून देणे? की समजावण्यासाठी जादा वेळ?
खुली परीक्षा ही एका परीने शिक्षकाचीही परीक्षा असते असे माझे मत आहे. कारण त्यासाठी वेगळ्याप्रकारे शिकवावे लागते. तसेच नवनवे प्रश्नदेखील तयार करावे लागतात. जेथे बहुसंख्य (सर्व नव्हे) शिक्षक पुस्तके व गाइडे वर्गात वाचून दाखवणे यावर वेळ निभावतात ते त्याला तयार होतील काय?
असले मुद्दे लक्षात घेऊन खुली परीक्षा पद्धती जर जागरूकपणे दहा वर्षे राबवली तर त्यापद्धतीत आपोआप सुधारणा होतील असे वाटते.
नैधृव कश्यप
काही प्रतिसाद-
शाळांनी जरी परीक्षा घेणे बंद केले तरी त्यातून विद्यार्थ्यांची सुटका होईल असे मला वाटत नाही. परीक्षा कोणीतरी घेईलच. कारण परीक्षा देऊन शिकलेले पालक मुलांच्या शिक्षणाविषयी साशंक असतील तर वेगळ्या वाटा फूटण्याची शक्यता आहे.
>>मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना त्याच परीक्षा देताना फेर-मार्गदर्शन लागेल. त्यासाठी लागणारा जादा वेळ व संधी कशी पैदा करावी? त्यासाठी प्रथमतः वर्गातील विद्यार्थी संख्या कमी करावी लागेल.>>
शून्य वेळा परीक्षा ते काही वेळा (तरी) परीक्षा असा मार्ग बरा, असे वाटते. मग ओपन-बूकच का असाही प्रश्न पडेल. त्याची उत्तरे वेगळी द्यावी लागतील. तरीही येथे असे गृहीत धरु की, ओपन-बूक परीक्षा घेणे ठरलेले आहे, अशा वेळी ४ घटक चाचण्या व् दोन सहामाही परीक्षा अशा चक्रातून जाणार्या विद्यार्थ्यांना एकेका विषयाची एक तरी परीक्षा द्यावी अशी सुरुवात करता येईल. टप्प्या-टप्प्याने इतर गोष्टी साध्य करता येतील.
>>एका झटक्यात परीक्षा पार करणारे विद्यार्थी जर फेर परीक्षार्थींना गाईड प्रमाणे वागू लागले तर काय करायचे?>>
माझ्या मते ते सगळ्यात चांगले. प्रोजेक्ट-ड्रीव्हन पद्ध्तीत हेच तर होत असते.
>>खुली परीक्षा ही एका परीने शिक्षकाचीही परीक्षा असते असे माझे मत आहे. कारण त्यासाठी वेगळ्याप्रकारे शिकवावे लागते. तसेच नवनवे प्रश्नदेखील तयार करावे लागतात. जेथे बहुसंख्य (सर्व नव्हे) शिक्षक पुस्तके व गाइडे वर्गात वाचून दाखवणे यावर वेळ निभावतात ते त्याला तयार होतील काय?>>
येथे एकच बदल अपेक्षित आहे, तो म्हणजे, प्रश्नपेढी तयार करणे- त्यासाठी हा लेख वाचावात अशी विनंती. -ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल. एखाद्या तुकडीतील एकच विषय अनेक वर्षे शिकवायचा असेल तर, एका शिक्षकाने एकजरी प्रश्न तयार केला, तरी महाराष्ट्रातील तो विषय शिकवणार्या शिक्षकांकडून किती योगदान मिळू शकेल ही कल्पना करता येईल. प्रश्न तयार करतांना वरील लेखात दिलेली पद्ध्त वापरता येईल का ह्याबद्दल आपले मत जाणून घेण्यास उत्सुक आहे. मी स्वत: तीच पद्धत वापरुन अक्षरशः हजारो प्रश्न लिहिले आहेत.
अध्यापन म्हणून काही अस्तित्वातच नाही
मुंबईतील एका ख्यातनाम शाळेतील तज्द्य ह्यांचा प्रतिसाद असा होता-
"अध्यापन म्हणून काही अस्तित्वातच नाही. जे काही आहे ते फक्त अध्ययन असते. तथाकथित अध्यापन केवळ अध्ययनासाठी मदत ह्या स्वरूपात असते तेव्हाच ते यशस्वी होते. ओपन क्लासरूम, ओपन बुक अशा सर्व ओपन पद्धतींमध्ये शिकणार्याच्या हातात नियंत्रण आणि जबाबदारी दिलेली असते त्यामुळे ते नक्कीच चांगले आहे. फक्त शालेय वयात जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये किती असेल ह्याची शंका वाटते. केवळ शिकण्यामधील/ शिक्षणपद्धतीमधील नॉव्हेल्टी सर्वसामान्य विद्यार्थ्याला दीर्घकाळ गुंतवून ठेवू शकेल का अशी शंका येते. दुसरी शंका आहे ती प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल. मला स्वत:ला बहुपर्यायी प्रश्न ही योग्य पद्धत वाटते."
चांगली कल्पना, परीक्षांचे मूळ उद्दिष्ट्य काय असावे?
दुव्यावर दिलेला लेख वाचला. त्याबद्दल उत्तर न देता हे अघळपघळ उत्तर देतो आहे, क्षमस्व.
- - -
शिकवलेल्या संकल्पना आत्मसात झालेल्या आहेत का? हे समजण्यासाठी ओपन बुक परीक्षा चांगल्या असतात. प्रश्न साधारणपणे असे असतात, की पुस्तकातले वाक्य जसेच्या तसे लिहून उत्तर पूर्ण होत नाही.
अशा परीक्षांची उत्तरे तपासणे अगदीच कठिण नसले, तरी त्या परीक्षांना गुण देणे मात्र अथिशय कठिण असते. माझ्याकडे जे थोडे विद्यार्थी येतात, त्यांना माझे सर्वच प्रश्न "ओपन-बुक" असतात, आणि "मुद्दा समजला" असे जाणवल्यावर पुन्हा गुणसंख्या देण्याचा प्रश्नच नसतो.
- - -
वैज्ञानिक मासिकांना पाठवलेल्या मासिकांचे सह-व्यवसायी परीक्षण (पियर रिव्ह्यू) म्हणजे सांख्यिक गुणवत्ता दिलेली ओपन-बुक परीक्षा होय. (येथे परीक्षक हे व्यवसायात समान स्तरावर असले, तरी निबंध उत्तीर्ण/अनुत्तीर्ण करण्यापुरते तात्पुरते वरच्या स्तरावर असतात.) शोधनिबंध पुस्तके उघडी ठेवूनच लिहिलेले असतात. मात्र पुस्तकांतली तत्त्वे नव्या ठिकाणी लागू केलेली असतात, त्याबद्दल पुस्तकांमध्ये काहीही तयार मजकूर नसतो. "अमुक निष्कर्ष पटला, तमुक निष्कर्ष तत्त्वांशी विसंगत आहे" वगैरे, अशा प्रकारचे परीक्षण देणे तसे सोपे. पण मासिकाचे संपादक कित्येकदा "गुणवत्ता संख्या द्या" म्हणतात. म्हणजे अनेक परीक्षकांचे परीक्षण एकत्र करायची त्यांची सोय होते. हा प्रकार मात्र भलताच कठिण असतो - संख्या ठरवण्यासाठी निकष काय असावेत, याबद्दल परीक्षक स्वतःच कोड्यात पडतो.
- - -
यावरून शाळेतल्या परीक्षांच्या माझ्या अनुभवाबद्दल. शाळेत मी फक्त परीक्षार्थीच होतो. परीक्षा-प्रश्नपत्र बनवणारा किंवा परीक्षकही कधीच नव्हतो.
त्या काळात परीक्षांची दोन (तरी) उद्दिष्ट्ये असतात, असे मला अनुभवावरून आठवते.
(१) विद्यार्थ्याला विषय समजला की नाही, त्याबद्दल चाचणी
(२) विद्यार्थ्याला विषयाचा अभ्यासक्रम पूर्णतया पुन्हा शिकण्यास पाठवावे की पूर्णतया पुढचा अभ्यासक्रम शिकण्यास पाठवावे, असा दुहेरी निर्णय शाळेत असतो. दुहेरीच का? तर शाळेत शिक्षकांची संख्या मर्यादित असते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेच्या मानाने अभ्यासक्रम तयार करून राबवण्यासाठी जितके शिक्षक लागतील, तितके कित्येक शाळांमध्ये नसतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ढोबळ "वर्ग" करतात, आणि प्रत्येक वर्गाच्या सरासरी (ऍव्हरेज) विद्यार्थ्याच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रम तयार करतात. या मर्यादेमुळे "या वर्गात शिकवावे की त्या वर्गात शिकवावे" हा निर्णय दुहेरी करणे आवश्यक होते. हा दुहेरी निर्णय करण्यास काही मोजमाप म्हणून एक संख्या वापरतात. (कितीका वेगवेगळे निकष असोत, शेवटचा निर्णय दुहेरी असल्यामुळे शेवटची निर्णयप्रक्रिया निकषांना [संख्यात्मक] एकत्र जोडून करावा लागतो.) ही संख्या मिळवण्यासाठी परीक्षेत गुणसंख्या देतात. मात्र ओपन-बुक परीक्षेत अशी गुणसंख्या देणे कठिण असू शकेल.
(३) पुढील शिक्षणक्रमात प्रवेश देणे. आजकाल प्रत्येक व्यावसायिक शिक्षणप्रवाहात प्रवेशासाठी वेगळी स्पर्धापरीक्षा असते, असे वाटते. मात्र त्या विषयात विद्यार्थ्याची शाळेतली जाण किती होती ते समजल्यास प्रवेशासाठीही उपयोग होऊ शकतो. असे असल्यास याबद्दल कुठलेसे संख्यात्मक मोजमाप असले, तर बरे. हे संख्यात्मक मोजमाप ओपन-बुक परीक्षेतून मिळणे कठिण जाऊ शकते.
- - -
वरील मुद्दे (२) व (३) इतकेच आहेत की "दुरुस्तीसाठी जितका स्पष्ट उपयोग" तितके "संख्यात्मक गुण देणे कठिण". ओपन-बुकने प्रथम उद्दिष्ट्य साधल्यामुळे दुसरे साधत नाही, असा काही विचार आहे.
प्रतिसाद विस्कळित झालेला आहे, दिलगीर आहे. परीक्षेची उद्दिष्ट्ये संदिग्ध असल्यामुळे (किंवा परस्परविरोधी असल्यामुळे) फायद्यातोट्याचे विश्लेषण कठिण जात आहे.
विद्यार्थ्याला अभ्यासासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून बहुतेक परीक्षा ओपन-बुक हव्यात; तर कॉलेजप्रवेश-समितीला आणि "कुठल्या वर्गात बसवावे" या निर्णयाकरिता उपयोग व्हावा म्हणून काही थोड्याच परीक्षा क्लोझ-बुक, असे करावे का? म्हणजे एकाच परीक्षाप्रसंगात ही विसंवादी उद्दिष्ट्ये एकमेकांशी संघर्ष तरी नाही करणार.
- - -
परीक्षांची उद्दिष्ट्ये
चंद्रशेखर ह्यांच्या प्रतिसादाला उत्तर दिल्याप्रमाणे, जर परीक्षाच घ्यायची नाही असा पवित्रा असेल तर हे कसे कळेल की, शिक्षक जे शिकवत् आहेत ते कितपत गुणवत्तापूर्ण आहे? तसेच वर एका प्रतिसादात म्हणाल्यानुसार, जर शाळा परीक्षा घेत नसतील तर पालकांना कसे कळणार की, <बाब्या> काय शिकतोय?
मुद्दा हा की, वेगवेगळे स्टेकहोल्डर परीक्षेशी निगडीत असतात व् त्यांना विद्यार्थ्यांच्या गुणावरुन त्यांना ते शोधत असलेल्या प्रश्नांची उत्तरे (फिडब्याक) मिळत असतो, तोच परीक्षा न घेतल्यामुळे बंद होईल. त्यामुळे परीक्षांच्या उद्दीष्टांत हे ही मुद्दे घ्यावे लागतील.
तरीही, परीक्षेचा मुळ उद्देश द्न्यान मिळवले आहे की, नाही हे तपासून पहाण्याचा असावा. नंतर त्या विद्यार्थीगटात कोण जास्त हुशार आणि कोण कमी हुशार हे ठरवण्यासाठी त्याचा वापर करावा की नाही, हा वेगळा चर्चेचा मुद्दा होईल.
[अवांतर व गमतीचा भाग- महाराष्ट्रातील काही शाळांच्या बाबतीत ज्या बातम्या पेपरमधे वाचल्या जातात त्यापाहून असे म्हणता येते की, महाराष्ट्र "ओपन-बूक" परीक्षा अंमलात आणण्यात अग्रेसर होता व् आहे. असो.]
मी तयार केलेल्या ओपन-बूक परीक्षेत विद्यार्थी सगळे प्रश्न सोडवू शकण्याला महत्व दिले जाते. व ते सगळे प्रश्न सोडवण्याकरता जर ३० मिनिटांची वेळ आवश्यक असेल तर ६० मिनिटे दिली जाते, ज्यामुळे त्यास लगेचच पुन्हा चूकलेले प्रश्न सोडवता येतात. ते सोडवू शकण्यासाठी सर्व मदत केली जाते. मुळात संगणकच सांगतो की, काय चुकले आहे...उत्तरच कोणते हे नाही सांगितले जात, तो ते योग्य रीतीने सोडवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
स्मरणशक्ति की आकलनशक्ति
अजय भागवत यांचा दुवा वाचला. त्यानंतर लक्षात आले की त्यांना त्यांच्या ज्ञानकाबद्दल जास्त म्हणायचे आहे ओपन बुक हे त्यातील एक तपासण्याचे साधन आहे. मला असे वाटले की एखादा विषय विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि तो त्याला कळला आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या ज्ञानकांची योजना आहे. ती नेमकी कशी उतरली आहे हे त्यांचे ज्ञानक बघून व विद्यार्थ्याचा प्रतिसाद बघून ठरवता येईल. कल्पना सध्याच्या परिस्थितीपेक्षा जास्त चांगली आहे असे जाणवते.
चर्चा बरीच ओपनबुक वर चालली असल्याने थोडे त्याविषयी.
ओपन बुक व क्लोज्ड बुक यांची तुलना परिक्षा किती कठीण आहे यावर करु नये. त्या तुलनेने सहज कमी वा जास्त कठीण करता येतात.
ओपन बुक मधे ओपन नोटस् (हाताने लिहिलेल्या), ओपन टेक्स्टबुक्स, सर्व पुस्तके त्यानंतर हल्ली बोलायचे तर सर्व साधने (म्हणजे जाल, संगणक इत्यादी.) अशी वेगवेगळी वर्गवारी केली जाते. त्यातील शालेय शिक्षणासाठी ओपन टेक्स्टबुक्स करायला हरकत नाही.
क्लोज्ड बुक्स परिक्षेचा एक महत्वाचा दोष म्हणजे प्रश्नांचा कल स्मरणशक्ति जोखण्याकडे जातो. महात्वा गांधींचा मृत्यु कुठल्या साली झाला यासारखे प्रश्न दिले जातात. गणित विज्ञानात वेगवेगळे फॉर्म्युले वापरून सोडवायची गणिते हाही त्यातलाच भाग. संस्कृत मध्ये विभक्तिप्रत्यय विचारणे हे त्यातलेच. पाठांतर केले की परिक्षेत चांगले मार्क मिळतात.
शिक्षणाच्या मूळ उद्दीष्टांशी हे फारकत घेणारे आहे. (सरकार दरबारी शिक्षणाची उद्दीष्टे कुठे नमूद केली आहेत का हे मला माहित नाही.) शिक्षणाचा एक मूळ उद्देश म्हणजे पुढील जीवनात येणार्या समस्यांना तोंड देण्यासाठी सक्षम करणे. आताची परिक्षा ते तपासण्यास बरीचशी निरुपयोगी आहे असे जाणवते.
आकलनशक्ति जास्त असणे हे पुढील जीवनात जास्त उपयोगी पडणारे असते. सतत ज्ञानकक्षा रुंदावत असतात शिकलेले बिनमहत्वाचे बनू शकते. अशा वेळी स्वतःच नवीन विषय शिकावा लागतो. ओपनबुक्स मध्ये आकलनशक्ति जोखण्यास वाव असतो . कारण स्मरणशक्तिचा भाग काढून टाकलेला असतो. म्हणून ओपनबुक्स परिक्षा पद्धती योग्य.
सध्याचे शिक्षण हे परिक्षेच्या स्वरुपाशी निगडीत झाले आहे. म्हणजे परिक्षेच्या स्वरुपामुळे काय व कसे शिकवायचे हे ठरते. हा उफराटा प्रकार स्पर्धा असल्यामुळे साहजिक होतो. तेव्हा फक्त परिक्षा पद्धत बदलली की शिक्षण पद्धती आपोआप बदलेल असे दृश्य नजरेस यायला हरकत नाही.
परिक्षा घेणार्यांना हल्ली एक सांगून ठेवले असावे की अमुक एक संख्येने मुले पास झाली पाहिजेत. ही समाजाची साहजिक गरज समजून ओपनबुक परिक्षा सोपी करावी नाहीतर विरोध कमालीचा होईल हे नक्की.
प्रमोद
प्रमोद
विचार जुळतात!
>>ओपन बुक हे त्यातील एक तपासण्याचे साधन आहे.>>
बरोबर आहे.
>>ओपन बुक व क्लोज्ड बुक यांची तुलना परिक्षा किती कठीण आहे यावर करु नये. त्या तुलनेने सहज कमी वा जास्त कठीण करता येतात.>>
सहमत!
इतर प्रतिसादातील सगळ्या उदाहरणात, जेथे ओपन-बूक परीक्षा अवघड असते असे म्हणले जातेय, असे दिसतेय की, प्रश्न जाम अवघड होता/होते. पुन्हा एकदा असे म्हणेन की, त्यासाठी परीक्षापद्धत जबाबदार नाही. 'ओपन-बूक अवघड असते' असे विधान केल्यास त्यातील महत्वाचे गुण र्हासतात.
मी जे ध्येय ठेवले आहे ते विद्यार्थ्याला मुद्दा कळला आहे की नाही हे तपासण्यासाठी तो मुद्दा समजावून झाला की, त्यावर एक छोटीशी ओपन-बूक चाचणी घेतली जाते. आणि त्यासाठी जी प्रश्न तयार करण्याची पद्धत वापरली आहे तीही मी आधी एका लेखात येथे दिली आहे. त्यावरुन उलगडा व्हावा की, प्रश्न "आठवते आहे-समजले आहे- वापर करता येतो आहे" ह्या पातळीपर्यंतच् आहेत. कारण ज्ञानकाच्या ह्या भागापर्यंतचे उद्दीष्ट विद्यार्थांनी मिळवले आहे की नाही एव्हढेच तपासायचे त्या ओपन-बूकचे काम आहे.
विद्यार्थ्यांना त्या माहितीचा वापर प्रत्यक्षात करता यावा ह्यासाठी वेगळा प्रोजेक्ट-बेस्ड ज्ञानक आहे.
>>क्लोज्ड बुक्स परिक्षेचा एक महत्वाचा दोष म्हणजे प्रश्नांचा कल स्मरणशक्ति जोखण्याकडे जातो.>>>>शिक्षणाच्या मूळ उद्दीष्टांशी हे फारकत घेणारे आहे.>>
सहमत.
त्या ज्ञानकात ओपन-बूक चाच्ण्या विखूरल्या आहेत पण त्या म्हणजे सगळे काही नव्हे. इतर अनेक वेगवेगळ्या शिक्षणतंत्रांच्या सहाय्याने ते ज्ञानक तयार केले आहे, त्यामुळे कदाचित मला ओपन-बूक परीक्षेत चांगला परीणम दिसत असेल.
सध्याच्या "नो-परीक्षा" पेक्षा असे काहीतरी असावे की ज्याने सगळया स्टेक-होल्डरांना आणी विद्यार्थ्यांना कळावे की, ते "कुठे" आहेत.
विभक्ती प्रत्यय?
संस्कृत मध्ये विभक्तिप्रत्यय विचारणे हे त्यातलेच.
संस्कृतच्या परीक्षेत विभक्ती प्रत्यय विचारल्याचे मी कधी ऐकलेले नाही. शालेय परीक्षेत फारतर एखाद्या नामाचे किंवा धातूचे विशिष्ट रूप विचारले जाईल, पण प्रत्यय? मला नाही वाटत.
आणि संस्कृत म्हणजे पाठांतर हीही कल्पना चुकीची आहे.--वाचक्नवी
चुकले
विभक्तिप्रत्यया ऐवजी शब्दरूपे वापरायला हवा होता.
आणि संस्कृत म्हणजे पाठांतर हीही कल्पना चुकीची आहे.
सहमत.
परिक्षापद्धतीतून (पाठांतराधारित) हा समज आला आहे.
प्रमोद
आपण करीत ज्ञानक शिक्षण क्षेत्रातील सुधारकांना पुरक होउ शकते.
श्री.गिरीश प्रभुणे यांचे याच विषया संबंधी व्याख्यान ऐकले होते.यमगरवाडी येथे ते ज्ञान आकलन किती झाले तसेच व्य़वहारात त्या ज्ञानाचा,कलेचा वापर कसा करावा याचे प्रात्येक्षिक करायला लावतात.
जसे... आयत त्रिकोण इ. शिकवतांना आपल्या परीसरातील आयत/ त्रिकोण शोधा. मग खिडकी,दार वै..नावे आली.. त्यांची लांबी,रुंदि व इतर गुणोत्तर या चा अ भ्या स आयत कसा चौको न कसा इ..
या शाळेत मुख्यत: आदीवासी विद्यार्थी आहेत.शाळेत एका विद्यार्थ्याने घराची समस्या मांडली पाडयातील घरे पावसाळ्यात फार त्रासदायक होतात. मग सर्वानी त्यावर उपाय शोधायचा व प्रयोग करायचा आपल्या घरी .ज्याचा प्रयोगाने घराची अडचण दूर झाली त्याने पुढील वर्षी इतरांना तो प्रयोग घरोघरी पोहचवायचा.
आपण करीत ज्ञानक त्यांना व इतर शिक्षण क्षेत्रातील सुधारकांना पुरक होउ शकते.
बाकी शिक्षण क्षेत्रात प्रचंड सुधारणेची आवश्यकता आहे.ग्रामिण भागात तर फारच भय़ंकर परीस्थिती आहे.
आमचे इंजिनीअरिंग प्राध्यापक एक व्याख्या सांगायचे Intelligent is one which knows more and more about less and less.
बाकी ज्ञानक संकल्पना आवडली.
शैलु.
श्री.गिरीश प्रभुणे आणि अभय बंग
आपल्या अभिप्रायाबद्दल आभार!
>>श्री.गिरीश प्रभुणे यांचे ...... आयत कसा चौको न कसा इ.>>>
अभय बंग ह्यांचे लेख वाचले असता ते ही जवळपास अशाच शिक्षणपद्धतीबद्दल बोलतांना आढळतील.
>>बाकी शिक्षण क्षेत्रात प्रचंड सुधारणेची आवश्यकता आहे.ग्रामिण भागात तर फारच भय़ंकर परीस्थिती आहे.>>
सहमत! जमल्यास ही फित पहा - http://www.ted.com/talks/ken_robinson_says_schools_kill_creativity.html