ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

लेखक: अजय भागवत. १२ जुन २००९ , पुणे ajaybhagwat@marathishabda.com

हया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे . त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :

१ . ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत

२ . ज्ञानाचे स्वरुप मांडले आहे , त्यातील कक्षा स्पष्ट केल्या आहेत

३ . ज्ञान आत्मसात करण्याच्या विवीध पातळ्यांचा विचार मांडला आहे ( ब्लूम्स टॅक्सॉनमीच्या आधारे )

४ . शेवटी , वरील विचारांचा वापर करुन काही सुचना मांडल्या आहेत . त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करुन शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे .

ज्ञानाची व्याख्या

ज्ञानाची व्याख्या करणे तितकेसे सोपे नसले तरी आपल्याला प्रयत्न करता येईल व ह्यालेखाचा आशय समजण्यासाठी त्या व्याख्येचा वापर करता येईल ह्या उद्देशाने पुढील व्याख्या केली आहे .

मानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष , वास , दृष्टी , चव , ध्वनी , अशा इंद्रियांनी मिळवतो . हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने , अनुषंगाने , बरोबरीने करतो .

प्राथमिक स्वरुपात साठवलेल्या ज्ञानाचा क्रमाक्रमाने विकास होतो . व ते अधिकचे , वाढीव ज्ञान आधिच्या ज्ञानाच्या बरोबरीने साठवले जाते . ह्या अशा ज्ञानाचे विश्लेषण केले असता , त्यात आपल्याला वेगवेगळे परिमाणं ( मापं / प्रकार ) दिसतात - हे ज्ञानाचे स्वरुप एखादी उतरंड नव्हे . एकाच वेळी आपण अनेक स्वरुपाचे ( परिमाणाचे ) ज्ञान उघड करु शकतो .

१ . तथ्य ( फॅक्ट ), उदा . एव्हरेस्टची उंची ८८६८ मी . आहे

२ . संकल्पना ( कॉन्सेप्ट ), उदा . व्याख्या , वेगवेगळ्या कल्पनातील साम्ये अथवा फरक , एखादा नियमही ( सिद्धांत ) कल्पना असतो . ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे , मिटींगला " शोभतील " असे कपडे घालावेत आणि ही कल्पना कालानुसार , स्थळानुसार बदलते . ( एव्हरेस्टची उंची अशी संकल्पनेने बदलत नाही , म्हणून ते तथ्य !)

३ . पद्धत ( प्रोसीजर ) उदा . गणित सोडवण्याची , गाडी सुरु करण्याची . पद्धत ही अनेक पायऱ्यांनी बनते , ती पुन्हा - पुन्हा त्याच क्रमाने करता येते .

४ . संरचना ( मॉडेल ) उदा . परिक्षा कशी घ्यावी , उत्तरपत्रिका कशा तपासाव्यात . संरचना आपल्याला मार्ग दाखवते .

५ . अभिसंरचना ( मेटामॉडेल ) उदा . संरचना कधी व कशी तयार केली म्हणजे ती अडचण सोपी करु / सोडवू शकेल , संरचनेचे घटक काय असावेत हे समजणे

६ . कौशल्य उदा . मी " अशा " रितीने उत्तम चित्र काढू शकते . अशा - इतरांपेक्षा वेगळ्या व अधिक परिणामकारकतेने - ते कसे हे माहित असणे

७ . निवडकौशल्य ( व त्यावर असलेला आत्मविश्वास ) उदा . मी आजपर्यंत तोरण्यावर गेलो नाहीए पण मला गडावर जाण्याचे अनेक मार्ग ऐकिव अथवा पुर्वानुभवाने माहिती आहेत , मी ह्याच वाटेचा वापर करेन

८ . विचारसंरचना ( ह्याला अनुभव असेही म्हणता येईल पण ते तितकेसे सुसंगत वाटत नाही ) ( मेटाकॉग्निशन ) उदा . मी ह्यावर कसा आणि काय विचार केला पाहिजे ?- की जेणेकरुन समोरील प्रश्नाची उकल होईल ? तोरणावर जायचे मला १० मार्ग माहिती आहेत , त्यातील योग्य तो कसा निवडावा ?

वरील ज्ञानपरिमाणं एखादी व्यक्ति कशी वापरते ते पाहूया . एक कॅप्टन हा विचार करतो आहे असे समजा -

" शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत . माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत . रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते . मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन . अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का . मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय ; वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते . चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे . ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए ."

वरील आठही ज्ञानपरिमाणं तुम्हाला ह्या विचारात स्पष्टपणे दिसतील . हे ज्ञानाचे स्वरुप लहान मुलातही दिसते फक्त त्यांच्या स्वरुपाची कक्षा वयस्कर व्यक्तिच्या कक्षेच्या तुलनेने बरीच लहान असते . परंतू ते स्वरुप आकारायला सुरुवात केव्हाच झालेली असते . ( काय केले म्हणजे बाबा मला नवे खेळणे आणून देतील ? मी मोठ्यापणी पायलट होणार .. वगैरे ).

ज्ञान कशाला म्हणता येईल ह्याची कल्पना आल्यावर आपण पुढील मुद्द्याकडे वळू शकतो . पुढचा मुद्दा आहे तो पंचेन्द्रीयांनी प्राथमिक स्वरुपात मिळवलेल्या ज्ञानाचे परिमाण कसे वाढवायचे ह्याचा . ह्यालाच आपण " शिक्षणपद्धत " म्हणू शकतो .

ज्ञान संपादनाच्या पायऱ्या ( पातळ्या )

असे म्हणले जाते की , आपण तासभर एखादी कृती ऐकली , पाहिली की , ती कृती संपायच्या आत त्यातील ४० % ज्ञान आपण विसरलेलो असतो . दुसऱ्या दिवशी , पुढील आठवड्यात , महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व कृती विस्मरणात जाऊ शकते . ( मला ह्या क्षणी हे आठवतेय , ""Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand." Confucius, circa 450 BC")

ज्ञान कायमस्वरुपी स्मरणात ठेवण्यासाठी ते ज्ञान ह्या टप्प्यातून जावे लागते :

१ . आठवणे : एखादी गोष्ट ( तथ्य ) स्मरणात राहण्यासाठी ती समजणे आवश्यक नसते . ( उदा . बालवाडीतील मुलांनी घोकलेल्या नर्सरी ऱ्हाइम ).

२ . समजणे : एखादी गोष्ट समजली की , ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते . त्याची उदाहरणे देता येतात , त्याचे सुपरिणाम / दुष्परिणाम सांगता येतात

३ . वापर : वापर केला तर समज अधिक भक्कम होते तसेच समजले तरच बाहेरील जगात त्या ज्ञानाचा वापर करता येतो . नुसत्या " सांगता " येण्यापेक्षाच्या वरच्या पातळीत जाता येते .

. चिकित्सा ( उहापोह , पडताळणी , कसोटी ): चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने विभागून / छेदून , प्रत्येक भागाचा स्वतंत्रपणे विचार करुन त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येतो .

५ . तुलना : फायदे / तोटे , चांगल्या / वाईट बाजू , त्या गोष्टीच्या स्वरुपाशी तुलना अथवा इतर पण संबंधीत गोष्टीशी तुलना करता येते

६ . नवनिर्माण : जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो .

आठवता येणे ह्या स्थितीपासुन नवनिर्माणाच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काही सर्वमान्य पायऱ्या वापराव्या लागतात , वेळ द्यावा लागतो . ह्या लेखाच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळण्याआधी , ज्ञानाचे स्वरुप व ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या ह्यावर क्षणभर घुटमळून पुढे जाऊ . त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो -

अ ) एखादे मुल हुषार किंवा ढ कसे ठरते ? ( आयएम्पी : ज्ञानाची कक्षा , स्वरुप , अस्तित्वातच नसणे व असणे )

ब ) मानवाला शिकवता येते का ? की तो सतत स्व - शिक्षण करतो ? ( आयएम्पी : पंचेंद्रिये )

क ) तुमच्या पाठ्यपुस्तकांची ( शाळा , महाविद्यालयातील ) तुम्हाला आठवण येत असल्यास त्यात ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या का ? उदाहरणे देऊ शकाल ?

ड ) थेअरी म्हणजे काय ? ती कोणी तयार केली ? ती तयार करणाऱ्यांनी कोणते शिक्षण घेतले होते ? कोणती पुस्तके वापरली होती ?

शिक्षणसंस्थेतील शिक्षण व ज्ञान संपादनाच्या पातळ्या

शेवटच्या प्रश्नातील पुस्तकांचा धागा पकडून पुढील मुद्द्याकडे वळुया . शिक्षणसंस्थेत आपण बालवाडी , प्राथमिक .. अशा टप्प्यांनी शिकत पुढे जातो . शिक्षणसंस्थेतील शिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट्य मानवाचे ज्ञानाचे स्वरुप निर्माण ( ज्ञानकक्षा ) करणे हे आहे असे गृहीत धरले तर ते स्वरुप घडवण्यासाठी आपण शिक्षणसंस्थेत जातो . पण शिक्षणसंस्थेत घडल्या जाणाऱ्या ज्ञानकक्षा ठराविक विषयांच्या असतात - गणित , भाषा , शास्त्र , संस्कार ( इतिहास ). हा पुढील शिक्षणाचा पाया असतो जो वापरुन आपण महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या इमारती रचणार असतो . शिक्षणसंस्थेव्यतिरीक्त आपण घरी , समाजात , प्रवासात , ई वेगवेगळ्या ज्ञानकक्षा मनाप्रमाणे स्वीकारतो , नाकारतो . त्यामुळेच प्रत्येकाचे ज्ञानाचे स्वरुप वेगवेगळे असते .

दहावी पर्यंत सगळ्यांना समान विषय असल्यामुळे ह्या लेखासाठी पुढील चर्चेत हाच काळ संदर्भलेला आहे .

ज्ञानकक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया परिणामकारक असावी लागते . वरील ६ पैकी पहिल्या ३ टप्प्यांतून ज्ञान गेले नाही तर ते लक्षातही राहणार नसते . बऱ्याचशा शिक्षणसंस्थेत ३ ऱ्या टप्प्याच्याही वर मुलांना जाता यावे म्हणून वादविवाद स्पर्धा , नाटयकला इ कला , खेळ , सहली , गॅदरींग , व्यवसाय , विज्ञानप्रयोग , प्रदर्शने , असे अनेक उपक्रम आखते . त्यातील काही उपक्रमांतील सहभाग ऐच्छीक असतो व काही वेळा मर्यादीत ठेवावा लागतो . त्यामुळे सगळ्यांनाच " तो " टप्पा पार पाडता येत नाही . काही उपक्रमात त्या - त्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित ज्ञानकक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो तर काही वेळा कोणताही संबंध नसु शकतो .

अशा क्रियेतून मुलांना नेतांना ज्ञान आत्मसात करण्याची पहिल्या ३ टप्प्यातील क्रिया अतिशय परिणामकारक व्हावी असे वाटते . कारण ते टप्पे पाठ्यपुस्तकातून घडवून आणायचे असतात व त्या क्रियेत सगळ्यां विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असतो . त्या पलिकडील टप्पे शाळातील विविध उपक्रमाद्वारे व शाळेतर माध्यमातून मिळवायचे असतात . पण ते मिळवतांना त्यात सगळ्यांचा समान सहभाग नसतो आणि म्हणूनच पहिले ३ टप्पे मी पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानतो

पाठ्यपुस्तके , ३ टप्पे आणि शिक्षक

पाठ्यपुस्तके व ३ टप्पे ह्यांचा संबंध आपण पाहिला . ह्या ३ टप्प्या्तून ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणखी एक दुवा असतो तो म्हणजे शिक्षक ! शिक्षकाला पाठयपुस्तकाच्यानुसार शिकवणे नियमानुसार क्रमप्राप्तच असते . ते पुस्तक शिकवण्याकरता व शिकवणे परिणामकारक आहे की नाही हे पाहण्याकरता किती " तास " प्रत्येक शिक्षकाला दर महिन्यात मिळतात हे पहाणे फार महत्वाचे आहे . खरे म्हणजे असलेला वेळ पुरतो की नाही व त्या वेळेत परिणामकारक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते की नाही ह्या विषयावर मी भाष्य करु शकणार नाही . पण असलेल्या वेळाचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी शिक्षकासाठी त्याच विषयांची खास पाठ्यपुस्तके असावीत .

शिक्षकाकडून प्रत्येक विषयाचे लेसन प्लॅन बनवणे अपेक्षिले जाते . पाठ्यपुस्तक जर सगळ्या शाळांना समान असेल तर प्रत्येक शाळातील शिक्षक आपापल्या पद्धतीने प्लॅन बनवतांना त्यांना असे मॉडेल द्यावे की , त्यांना त्यांचा वेळ त्यात खर्च करण्यापेक्षा शिकवण्याच्या प्रक्रियेवर देता येईल . प्लॅनमधील व्हेरिअशन कमी होईल . हे मॉडेल करतांना खालील सुचना द्याव्याशा वाटतात .

१ . कोणत्याही एका विषयाचे ( गणित सोडून ) उदाहरण घेऊ . एका पुस्तकात उदा . १० धडे आहेत व त्यात सगळे मिळून १०० तथ्ये ( फॅक्ट ), पद्धती , संरचना आहेत . ह्यांना आपण १०० उद्दीष्ट्ये म्हणू . अर्थातच ह्यातील काही उद्दीष्ट्ये फक्त आठवणे ( उदा . कुप्रसिद्ध सनावळ्या ) तर काही समजणे तर काही वापर करणे अशा वेगवेगळ्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीवर नेणे आवशक आहे . त्यासाठी ते शिक्षकाला कळण्यासाठी ती १०० उद्दीष्ट्ये ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला संलग्न करावीत व पाठ्यपुस्तकात नमुद करावीत . ( उदा . उद्दीष्ट्य १ : समजणे , उद्दीष्ट्य २ : आठवणे , उद्दीष्ट्य ३ : वापर , ई ). लेसन प्लॅनला ह्याचा फायदा होईल . व शिक्षकाने काय प्रश्न विचारले पाहिजेत ते ही ठरवता येईल ( हे आपण पुढे पाहूच ).

जर एखादे उद्दीष्ट्य " आठवणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते " वापर " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे . त्याच प्रमाणे एखादे उद्दीष्ट्य " समजणे " ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते फक्त " आठवण " लाच शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे .

ही सुविधा पाठ्यपुस्तकातून शिक्षकांना मिळाली तर त्यांना लेसन प्लॅन बनवणे तर सोपे जाईलच (किंबहुना तो तर शिक्षकांसाठीच्या) पाठ्यपुस्तकातच दिलेला असावा. शिक्षकाला आपली कल्पनाशक्ती वापरता यावी ह्यासाठी त्यांनी त्यांचा लेसन प्लॅन खालील प्रमाणे बनवावा. ह्यात त्यांना कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीवर न्यायचे आहे हे डावीकडे लिहावे. ज्ञानपातळी प्रमाणे प्रश्न तयार करावे. हे प्रश्न त्यांनी वर्गात धडा शिकवतांना विचारावेत अथवा परिक्षेत वापरावेत. येथे शिक्षकांचा वेळ लेसन प्लॅन बनवण्यात न जाता , चांगले प्रश्न निर्माण करण्याकडे दिल्यामुळे शाळेची एक अशी प्रश्नपेढी तयार होईलच व शिक्षकांच्या वेळेची अधिकाधिक बचत होईल. अशा प्रश्नांच्या माध्यमातून शिकवण्यातही काही प्रयोग करुन पहाता येतील- उदा. ओपन बूक लर्निंग.

[“We learn by example and by direct experience because there are real limits to the adequacy of verbal instruction.” Malcolm Gladwell, Blink: The Power of Thinking Without Thinking, 2005]

खालील तक्त्यातील धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01 हे चांगले आत्मसात केले गेले आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षक काही प्रश्न तयार करतील ते प्रश्न निरसन झाले की , ते उद्दीष्ट्य गाठले असे समजता येईल. एखादे उद्दीष्ट्य तपासतांना योग्य त्या ज्ञानपातळीचेच प्रश्न तयार करतांना कोणतीही शंका राहणार नाही. प्रत्येक शाळांमधील प्रत्येक शिक्षकातील शिकवण्याच्या पद्धतीत एक प्रकारची लय येईल. ते एकमेकांशी संवाद साधू शकतील (उदा. मराठीशब्द.कॉम सारख्या माध्यमातून प्रश्नांची देवाण-घेवाण , ई). विद्यार्थ्यांना शंका राहणार नाही की आपला पाया मजबूत राहण्यासाठी मी कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीपर्यंत शिकायचे आहे. त्यामुळे त्यांच्यातील भ्रम नाहिसा होऊन त्यांच्यातही एक लय येऊ शकेल. वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या वर्गात शिकवू शकतील/प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील (की ज्याने त्यांचा पाया आणखी मजबूत होउ शकेल.).

ज्ञानपातळी : माहिती आठवता येणे

कोणते प्रश्न असावेत ?

कोणी , काय , कधी , कुठे , कसे , सांगा

( उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा )

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?

क्रियापदे: सांग , यादी बनव , समजाव , नातं सांग , शोध , लिही , नाव दे (काय म्हणतात ते सांग) , व्याख्या सांग

... किती आहेत ?

हे..कोणी केले ?

ह्याला काय म्हणतात ?

... तेथे काय घटना घडली ते सांग

कोण कोणास म्हणाले ?

हे का झाले ते सांग

ह्याचा अर्थ काय ते सांग

हे काय आहे ?

हे कधी घडले ?

खरे की खोटे ?

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 09

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 99

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

ज्ञानपातळी: माहिती समजणे

कोणते प्रश्न असावेत ?

स्वतःच्या शब्दांत सांगता येणे , माहितीच्या स्रोतातून हवे त्याची अचूक निवड करता येणे

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?

क्रियापदे: समजावून सांग , व्याख्या विस्तृत कर , सारांश तयार कर , चर्चा कर , फरक सांग , अंदाज कर , भाषांतर कर , तुलना कर , विस्तार करुन सांग

तुझ्या शब्दात सांग , ह्या माहितीचा सारांश तयार कर

.. ह्याच्या पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांध

... तुझे विचार सांग ?

.... ह्यातील मध्यावर्ती कल्पना काय आहे ?

ह्या घटनेतील मुख्य दुवा कोण होता/आहे ?

ह्यातील फरक सांगू शकशील का ?

ह्याचे एखादे उदाहरण देऊ शकशील का ?

ह्याची व्याख्या करु शकशील का ?

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 22

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 56

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 72

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

ज्ञानपातळी: माहितीचा वापर

कोणते प्रश्न असावेत ?

सौरौउर्जेचा वापर ...ह्यासाठी केला जाऊ शकतो का ? तसेच आणखी काय उदाहरणे देता येतील ?

प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत ?

क्रियापदे: ( गणित) सोडव , ( सिद्ध करुन) दाखव , वापर , दाखले दे , तयार कर , पुर्ण कर , चालव , परिक्षा घे , गट तयार कर

... ह्याचा आणखी एखादा दाखला देता येईल का ?

हे (वेगळ्या परिस्थितीत) घडू शकते का ?

ह्यांचे ...असे वेगवेगळे गुणात्मक गट तयार कर

ह्यात काय बदल तुला करावे लागतील जर...

ही पद्धत तुला इतर कोणत्या (तुझ्या स्वतःच्या बाबत) ठिकाणी वापरता येईल ?

तु कोणते प्रश्न विचारशील ?

ह्या माहितीच्या आधारे तू एखादी रीत तयार करु शकशील का ?

ही माहिती उपयोगाची आहे का जर...

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 25

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

धडा १: उद्दीष्ट्य क्र. 48

प्रश्न:

प्रश्न:

प्रश्न:

लेखनविषय: दुवे:

Comments

भाग-१?

सुन्दर. पण वाचल्यावर वाटते की ही सुरवातच आहे. तसे असेल तर पुढचे भाग लवकर येऊ द्यात.
शरद

मी मात्र ही पद्धत वापरतो.

वाचल्यावर वाटते की ही सुरवातच आहे

हो, पण त्यास निश्चितपणे टाकलेले एक पाऊल म्हणता येईल. पुढील लेख ह्यावर काय प्रतिक्रिया येतात (येथीलच नव्हे तर इतरांचाही), त्यावर अवलंबून असेल. मी मात्र ही पद्धत वापरतो.

उत्तम

लेखाचा आवाका फारच मोठा आहे. मांडणी पद्धतशीर टप्प्यांनी गेल्यामुळे मुद्देसूदपणा प्रगतिशील झाला आहे. उत्तम.

ज्ञान म्हणजे काय ? (याविषयी लेखकाने अन्य संकेतस्थळावर उपधागा सुरू केला आहे.) यात ज्ञानशास्त्राचा (एपिस्टेमॉलॉजी शास्त्राचा) आढावा घेतला आहे.

अन्यत्र लेखकाने असे काही म्हटले आहे - प्राथमिक माहिती ज्ञानेंद्रियांमधून मिळते. याबद्दल मी जवळजवळ पूर्णतः सहमत आहे. (काही महत्त्वाची माहिती उपजत असते, तेवढा अपवाद - त्या उपजत ज्ञानाशिवाय जीवनही अशक्य झाले असते. उदाहरणार्थ - तान्हा बाळाचे दूध मागण्याचे, ओढण्याचे, घोट पिण्याचे कौशल्य.)

- - -

मात्र ज्ञानाचे लेखात ८ प्रकार सांगितले आहेत, ते मला फारच बोजड वाटतात. साधारणपणे मला कुठल्याही प्रकारात 'क्ष', 'अधि-क्ष', 'अधि-अधि-क्ष' वगैरे प्रकार आवडत नाहीत - बोजड वाटतात. (इतकेच काय इन्फिनिट रिग्रेसमुळे तयार होणार्‍या अगणित संकल्पना त्रासदायक वाटतात.)
३. पद्धत (प्रोसीजर), ४. संरचना (मॉड्ल), ५. अधिसंरचना (मेटामॉडेल) म्हणजे नेमके वेगवेगळे काय आहे? जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की "मेटा-मॉडेल" पाशी कशाला थांबावे? जरा विचार करून "मेटा-मेटामॉडेल" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना?)

लेखकाने सैन्याधिकार्‍याच्या विचारधारेचे उदाहरण सांगितले हे फार चांगले. पण त्या उदाहरणातील प्रत्येक वाक्यापुढे कंसात १-८ आकडे द्यायला हवे होते. त्यातील कित्येक वाक्ये कुठल्या प्रकारच्या ज्ञानात मोडतात हे मला समजत नाही.

शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत (क्र १). माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत (क्र १). रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते (क्र १ की २?). मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन (??? काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान ??? येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का?). वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु (??? काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान ??? येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का?). नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन (क्र. ३?). अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का (?). मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय (?); वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते (क्र. १ - तथ्य?). चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे (क्र २ संकल्पना, ३ पद्धत, ४ संरचना, ५ अधिसंरचना की ८ अधिसंरचना?). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए (?).

हे उदाहरण लेखकाने अगदी काळजीपूर्वक तयार केलेले आहे, पण मला समजलेले नाही.

माझ्या मते, यापेक्षा सुटसुटीत काही प्रकार शोधून सापडला पाहिजे. (किंवा अन्य विचारवंतांनी जे सुटसुटीत प्रकार सांगितले आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.)
उदाहरणार्थ एक प्रसिद्ध वर्गीकरण असे (बर्ट्रांड रसेल यांच्याकडून - माझ्या शब्दांत) -
(१) संवेदना (२) विधान आणि (३) तर्क ही तिहेरी यादी बहुतेक बाबतीत पुरेशी ठरते.
(१) संवेदना (पर्सेप्शन) - म्हणजे ज्ञानेंद्रियांमधून जे काय समजते ते. (उदाहरण : डोळ्यांना लाल, काही विशिष्ट आकार दिसतो, स्पर्शाला काही मुलायम लागते, घ्राणेंद्रियाला विशिष्ट सुवास येतो...) संवेदना ही असते किंवा नसते. खरी/खोटी नसते. सयुक्तिक/तर्कदुष्ट नसते.
(२) विधान (प्रोपोझिशन) - म्हणजे (अ) संवेदनेतून जाणवणार्‍या संकल्पनांचे संबंध (आ) अशा संबंधांचे संबंध सांगणे. विशेष "संबंधांचे संबंधांचे संबंध..." वगैरे अनवस्थिती=इन्फिनिट रिग्रेसचा काहीच त्रास होत नाही. "संबंधांचे संबंधांचे संबंधांचे... संबध" अशी कितीही लांब साखळी झाली तरी त्याला "विधान" असेच म्हणतात. उदाहरण (अ) - डोळ्यांना जाणवणारा लालपणा आणि आकार, स्पर्शाला जाणवणारा मुलायमपणा, नाकाला जाणवणारा सुवास हे सर्व एकाच वस्तूच्या संवेदना आहेत - पुढील विधानांत वापरण्याच्या सोयीसाठी या विधानाला लघुस्वरूपात "गुलाब" किंवा "रोझ" किंवा "ठ्यांय्खुस" असे काहीही म्हणतात... (आ) हा "गुलाब" या "चाफ्या"च्या "उजवीकडे" आहे - [येथे "गुलाब", "चाफा", "उजवीकडे" वगैरे, विधानांनी सांगितलेली असली पाहिजेत]. विधाने नुसती असत/नसत नाहीत. विधाने खरी/खोटी असतात. विधाने सयुक्तिकही नसतात आणि तर्कदुष्टही नसतात.
(३) तर्क (प्रॉपोझिशनल फंक्शन) - म्हणजे कोणत्याही विधानांच्या सत्यासत्यतेचे संबंध सांगणे. उदाहरण : जर 'अ' तर 'ब', आणि 'या संदर्भात' 'अ' खरे, तर 'ब' खरे. मग 'अ'='धूर आहे', 'ब'='आग आहे', 'या संदर्भात'='आता डोंगरावर' असे काही असू शकेल, पण ते सार्वकालिक महत्त्वाचे नाही. तर्क सयुक्तिक असतो किंवा तर्कदुष्ट असतो. केवळ 'अ', 'ब', अशा कल्पनांबद्दल असल्यामुळे खराही असू शकत नाही, खोटाही नाही. आणि डोळ्यांना दिसणार्‍या लालीसारखा हा तर्क नुसता असणारा/नसणारा नव्हे.

अशा प्रकारे सध्या प्रचलित असलेली ज्ञानशास्त्रे त्या मानाने सुटसुटीत आहेत. लेखातील ज्ञानशास्त्रात "संवेदना"साठी वेगळे स्थानच नाही. पण "मला थंडी वाजते आणि श्वास घ्यायला त्रास होतो" हे गिर्यारोहकाचे समजणे घ्या आणि "एव्हरेस्ट शिखराची उंची सम्युद्रसपाटीपासून ८८४८ मीटर आहे" हे विधान घ्या - दोन्ही खचितच वेगळ्या प्रकारचे ज्ञान आहे.
वरील लेखातील १ पैकी काही "संवेदना" आहेत, बाकी १, २ (आणि कदाचित ६?) विधाने आहेत, आणि ३-८ तर्क आहेत, असे वाटते.

- - -

लेखाचे उद्दिष्ट्य शिक्षण आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आहे काय? मग ज्ञानशास्त्राच्या भानगडीत न पडता "ज्ञान असे काही असते" हे गृहीत धरावे. मग "आठवणे, समजणे, वापर, चिकित्सा..." ही एक उत्तम प्रयोगशील यादी आहे. शैक्षणिक आयोजन आणि धड्यांची मांडणी (ज्ञानप्राप्तीची चाचणी) याविषयीचे तक्ते पूर्णपणे पटण्यासारखे आहेत. उत्तम लेखाबद्दल अजय भागवत यांचे अभिनंदन.

भल्या माणसा, तुझी रिव्ह्यू प्रोसेस शिकव एकदा!

भल्या माणसा, तुझी रिव्ह्यू प्रोसेस शिकव एकदा!

(काही महत्त्वाची माहिती उपजत असते, तेवढा अपवाद - त्या उपजत ज्ञानाशिवाय जीवनही अशक्य झाले असते. उदाहरणार्थ - तान्हा बाळाचे दूध मागण्याचे, ओढण्याचे, घोट पिण्याचे कौशल्य.)

Boot ROM मधला प्रोग्रॅम असतो का? :-)

मात्र ज्ञानाचे लेखात ८ प्रकार सांगितले आहेत, ते मला फारच बोजड वाटतात. साधारणपणे मला कुठल्याही प्रकारात 'क्ष', 'अधि-क्ष', 'अधि-अधि-क्ष' वगैरे प्रकार आवडत नाहीत - बोजड वाटतात. (इतकेच काय इन्फिनिट रिग्रेसमुळे तयार होणार्‍या अगणित संकल्पना त्रासदायक वाटतात.)

मी शक्य तेव्हढा प्रयत्न केला ते शब्द बोजड होऊ न देण्याचा आणि कंसात मराठी प्रतिशब्दही त्याच साठी दिला.

३. पद्धत (प्रोसीजर), ४. संरचना (मॉड्ल), ५. अधिसंरचना (मेटामॉडेल) म्हणजे नेमके वेगवेगळे काय आहे? जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की "मेटा-मॉडेल" पाशी कशाला थांबावे? जरा विचार करून "मेटा-मेटामॉडेल" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना?)

शब्दांच्या जंजाळात सापडायचे नसेल तर जरा सेमी-अधिकृत मराठीत त्याचा विस्तार करतो.

  • ४. संरचना (मॉड्ल)- मॉडेलचा उपयोग आपल्याला कमी स्ट्र्क्चर्ड कामं करतांना होतो. म्हणजे एखादे काम जर वेगवेगळ्या मार्गानी करता येत असेल तर (फाटे फुटत असतील तर) गोंधळाच्या परिस्थितीत ह्या मॉडेलचा उपयोग होतो असे समजू. म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टींचा विचार करावा असे आपण सांगतो. (हे असे झालेले असेल तर हे कर नाहीतर ते कर..) व ऐनवेळी काय निर्णय घ्यायचा ते काम करणाऱ्यावर सोपवतो. ह्याला कॉग्निटीव्ह स्ट्रॅटेजी असेही म्हणता येईल.
  • ५. अधिसंरचना (मेटामॉडेल) - एखादी गोष्ट कशी साधायची हे जेव्हा आपल्याला माहित नसते तेव्हा ते अशा कशाच्या तरी आधारे आपण करायचा प्रयत्न करतो की जे आपल्याला माहित असते. ते मेटामॉडेल. एखाद्याच्या बेस्ट प्रॅक्टीस घेऊन आपल्या कशा असाव्यात हा विचार करणे
  • ८. विचारसंरचना: आखणी व एस्टीमेट ही दोन उत्तम उदाहरणे देता येतील. एखाद्या कामाचे एस्टीमेट कसे करावे हे ठरवता येणे. एस्टीमेट टेम्पलेट हे मात्र मॉडेलचे उदाहरण.

लेखकाने सैन्याधिकार्‍याच्या विचारधारेचे उदाहरण सांगितले हे फार चांगले. पण त्या उदाहरणातील प्रत्येक वाक्यापुढे कंसात १-८ आकडे द्यायला हवे होते. त्यातील कित्येक वाक्ये कुठल्या प्रकारच्या ज्ञानात मोडतात हे मला समजत नाही.

तु जे ओळखून पहायचा प्रयत्न केला आहेस तो १००% च्या जवळपास आहे.
रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते (क्र १ की २?)- कॉन्सेप्ट
मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन .- प्रोसीजर
अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का .- मॉडेल ठरवावे लागेल
चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे (क्र २ संकल्पना, ३ पद्धत, ४ संरचना, ५ अधिसंरचना की ८ अधिसंरचना?). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए (?)- मॉडेल, मेटाकॉग्निशन, असे एकत्रीत प्रकार- सैन्याधिकारी त्याच्या जवळ गेलाय, त्याला समजते आहे की हे मला योग्य रितीने ठरवावे लागणार आहे व त्यासाठी मला ज्ञात-अज्ञात मार्गांचा वापर करावा लागणार आहे. एकदा जर का हे ठरले की ते ज्ञान त्याला त्याच्या तुकडीला आठवणे-समजणे-प्रोसीजर कळणे अशा टप्प्या-टप्प्यातून नेऊन त्यांची मानसिक तयारी करायची आहे. पण त्याआधी त्याला त्याच्या पुर्वानुभवाचा कस लावून मॉडेल तयार करायचे आहे जे त्याला अजुन डोळ्यासमोर येत नाहीये.

"माझ्या मते, यापेक्षा सुटसुटीत काही प्रकार शोधून सापडला पाहिजे. (किंवा अन्य विचारवंतांनी जे सुटसुटीत प्रकार सांगितले आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.) उदाहरणार्थ एक प्रसिद्ध वर्गीकरण असे (बर्ट्रांड रसेल यांच्याकडून - माझ्या शब्दांत)" -पासुन "वरील लेखातील १ पैकी काही "संवेदना" आहेत, बाकी १, २ (आणि कदाचित ६?) विधाने आहेत, आणि ३-८ तर्क आहेत, असे वाटते."

मी त्याचा अभ्यास करुन काही नातं लावता येतं का ते पाहीन.

लेखाचे उद्दिष्ट्य शिक्षण आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आहे काय?
आहे!

मग ज्ञानशास्त्राच्या भानगडीत न पडता "ज्ञान असे काही असते" हे गृहीत धरावे. मग "आठवणे, समजणे, वापर, चिकित्सा..." ही एक उत्तम प्रयोगशील यादी आहे. शैक्षणिक आयोजन आणि धड्यांची मांडणी (ज्ञानप्राप्तीची चाचणी) याविषयीचे तक्ते पूर्णपणे पटण्यासारखे आहेत.

नवीन संकल्पना मांडतांना ज्ञान स्वरुपपातळी, ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या लिहून त्यापासुन बाजुला झालो आहे. ती लेखाची मध्यवर्ती कल्पना नव्हे. ह्या सगळ्या लेखाकडे वरुन नजर (ऍबस्ट्रॅक्ट लेव्हल वाढवली तर) मेटाकॉग्निशन पर्यंतच्या सगळ्या पायऱ्या दिसतील.

स्कॅफोल्डींग

वरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:

१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची "चाचणी" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.

२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती "आठवणे" पातळीपेक्षा "समजणे" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.

३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील "ज्ञानाची व्याख्या" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे?- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.

तसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.

४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी

वरच्या ज्ञानपातळीचा तक्ता निवडल्यास त्या खालील ज्ञानपातळीचासुद्धा वापरणे आवश्यक असते. म्हणजेच "समजणे" साठी "आठवणे" तक्ता हवाच.

आता एक उदाहरण घेऊन आपण ही पायरी पुर्ण झाल्याची खूण प्रत्यक्षात पाहू. मी वरील लेखाचेच उदाहरण घेऊन त्यातील ज्ञानांश घेतला आहे. त्याला काही अंदाज लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे-

१. ज्ञानांश: ज्ञानाची व्याख्या
२. ज्ञान संपादन पातळी: समजणे
३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर: माध्यमिक (तुम्ही हा कठीणस्तरतक्ता तुमच्या गरजेनुसार/अनुभवानुसार बनवा).
ह्यानुसार मी ज्ञानाची व्याख्याच शिक्षण उद्दीष्ट मानतोय. खालील स्तरावर मी व्याख्येतील प्रत्येक घटक एक वेगळे शिक्षण उद्दीष्ट मानले असते.
४. तक्ता: ज्ञान संपादन पातळी: आठवणे
ज्ञानपातळी: माहिती आठवता येणे
कोणते प्रश्न असावेत? कोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा (उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा)
प्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत? क्रियापदे: सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग
उद्दीष्ट्य क्र. 01: ज्ञानाची व्याख्या
प्रश्न:

१. ज्ञानाची व्याख्या सांगा
२. ज्ञानाचे स्वरुप किती घटकांनी ओळखता येते? ते घटक कोणते ह्याची यादी बनवा?
३. ज्ञानाची प्रचलित व्याख्या कोणी लिहिली?
४. पुढील वाक्य पूर्ण करा: "चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने ..
५. एखाद्या माहितीचे फायदे/तोटे, चांगल्या/वाईट बाजू सांगता येणे ह्या ज्ञानस्वरुपाला काय म्हणतात? ६. "जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो", ह्यातील आधीच्या ज्ञानस्वरुपाच्या पायऱ्या कोणत्या?
७. "एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते", खरे की खोटे?
८. आठवणे आणि समजणे ह्यातील फरक सांगा
९. नवनिर्माण म्हणजे काय?
वरील प्रत्येक प्रश्नाचे उद्दीष्ट ज्ञानाची व्याख्या आठवणे ह्या पातळीवर तपासली जाते. एव्हढ्या स्कॅफोल्डींगने पुढील प्रश्नतक्ता कसा तयार करता येईल हे समजेल. एकदाका वरील ज्ञानपातळीचे प्रश्न विचारुन झाले की, समजणे ज्ञानपातळीचे प्रश्न विकास करता येतील. त्याचे एकच उदाहरण देऊन मी हा प्रतिसाद संपवतो.

१. ज्ञानाच्या आणखी कोणत्या व्याख्या प्रचलित आहेत?- त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात लिहा.
२. ज्ञानाची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा.
३. ""शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत" ह्या परिच्छेदातील ज्ञानस्वरुपाच्या पातळ्या ओळखून दाखवा.
जाताजाता, वरील पद्ध्तीने प्रश्न तयार करणे हे सांगणे हा ह्या लेखाचा एकमेव हेतू नसुन मी शेवटी लिहिल्यानुसार, "पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक" हा संपुर्ण भागही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकालाच कल्पकतेने किंवा अननुभवी असण्यामुळे, प्रशिक्षीत नसल्यामुळे प्रश्नविकास करता येईलच असे नाही. ते एक कौशल्य आहे. ह्या लेखाचा वरील सर्व बाबींवर प्रकाश टाकणे हा हेतू होता. शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तिंना ही पद्धत आधीच माहिती असेल व ते असे कामही करत असतील अशी माझी खात्री आहे कारण मी हे मुलभूत किंवा नवे संशोधन आहे असे मानत नाही. अनेक ज्ञात गोष्टींपासुन एक पद्धत सुचविण्याचा फक्त हेतू आहे

मोठे आणि जड वाटते आहे

अहो भागवत राय,
हे एकाच वेळी १८ स्कंध लिहिल्यासारखं वाटतंय.
थोडा 'सप्ताह' वगेरे लावला तर माझ्या सारख्यांचे कल्याण होईल. पचायला सोपे जाईल.
(मी तुकड्या-तुकड्यात वाचायचा प्रयत्न केला, पण त्यात "वो बात नहीं")

(कुणीतरी सहमत पण लिहा रे, बाबांनु)
(अर्थात आपण एकाच वेळी सगळीकडे प्रकाशित करता म्हटल्यावर .... काय बोलावे?)

सहभाग आणि करुन पहाणं

सहभाग आणि करुन पहाणं अशा टप्प्यांनी ते जमतं. योगायोगाने, मी माझ्या वरील प्रतिसादात आठवणे व समजणे ह्यासाठी काही प्रश्न लिहिले आहेत ते सोडवण्यानंतर खूपशा गोष्टी समजतील ह्याची खात्री आहे.

आताशी ह्या धाग्याला दोन-तिन प्रतिसाद् मिळून पलिकडची खबरबात कळतेय. व्यनि अथवा येथे प्रश्न विचारले तर नक्की अजुन सोपं करुन लिहिन.

उद्बोधक लेख

लेख आवडला, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली जाणवते आहे.
धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे लेखाचा आवाका मोठा आहे.

तरी काही मला वाटले ते - लेसन प्लॅन तयार करताना अमूक एका धडा शिकवण्यामागची मुख्य उद्दिष्टे काय ते हे ठरवावे लागेल. (एक कदाचित अवांतर म्हणून माझ्या मते लेखकाने वर्णन केलेले १-३ टप्पे महत्त्वाचे आहेतच, पण ४-६ देखील महत्त्वाचे आहेत). ही उद्दिष्टे काय असावीत हा विचार (माझ्या मते अधिक) महत्त्वाचा आहे. पण उद्दिष्टे काय असावीत हा लेखाचा विषय नसून शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे, एका इयत्तेतून बाहेर पडणार्‍या मुलांना ठराविक पातळी गाठण्याइतके ज्ञान असावे, यासाठी या प्रश्नांच्या पेढीचा उपयोग व्हावा अशी लेखकाची इच्छा आहे असे मला वाटले, ते बरोबर आहे का? तसे असल्यास ते कमी महत्त्वाचे नाही, आणि ६०-७० मुलांना एकावेळी शिकवताना या प्रमाणीकरणाचा उपयोग नक्की होईल, एक ठराविक पातळी गाठता येईल हे म्हणणेही विचार करण्यासारखे आहे.

अगदी तुम्ही म्हणालात तेच

तरी काही मला वाटले ते - लेसन प्लॅन तयार करताना अमूक एका धडा शिकवण्यामागची मुख्य उद्दिष्टे काय ते हे ठरवावे लागेल. (एक कदाचित अवांतर म्हणून माझ्या मते लेखकाने वर्णन केलेले १-३ टप्पे महत्त्वाचे आहेतच, पण ४-६ देखील महत्त्वाचे आहेत). ही उद्दिष्टे काय असावीत हा विचार (माझ्या मते अधिक) महत्त्वाचा आहे.

वरील ह्या प्रतिसादात अगदी तुम्ही म्हणालात तेच म्हणालो आहे.
सोयीकरता पुन्हा येथे देतो-

वरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:

१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची "चाचणी" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.

२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती "आठवणे" पातळीपेक्षा "समजणे" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.

३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील "ज्ञानाची व्याख्या" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे?- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.
ही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.

तसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.

४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी

शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे

पण उद्दिष्टे काय असावीत हा लेखाचा विषय नसून शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे, एका इयत्तेतून बाहेर पडणार्‍या मुलांना ठराविक पातळी गाठण्याइतके ज्ञान असावे, यासाठी या प्रश्नांच्या पेढीचा उपयोग व्हावा अशी लेखकाची इच्छा आहे असे मला वाटले, ते बरोबर आहे का?

होय अगदी खरे आहे. लेखाच्या उद्दीष्टातच ते नमुद केले आहे- ४ . शेवटी , वरील विचारांचा वापर करुन काही सुचना मांडल्या आहेत . त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करुन शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे

पण ते तुम्ही योग्य शब्दात् मांडले आहे. - शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे...

 
^ वर