विज्ञान, अंधविश्वास आणि विश्वासार्हता

मध्यंतरी उपक्रम व मनोगत वर निरनिराळ्या संदर्भात विज्ञान आणि अंधविश्वास यांवर बर्‍याच टिप्पण्या होत होत्या. त्याच सुमारास अंधविश्वास या विषयावर एक इंग्रजी परिच्छेद माझ्या वाचनात आला. त्यात असं म्हंटलं होतं की जगात ठिकठिकाणी शेकडो अंधविश्वास अजूनही टिकून आहेत. उदाहरणार्थ, आपल्याकडे असा एक समज आहे की कुत्र्याचं रडणं ऐकू आलं की जवळपास कुठेतरी एखाद्या माणसाचा मृत्यु होतो. आता हे जर आपण एखाद्या शास्त्रज्ञाला सांगितलं तर त्याबद्दल तो ताबडतोब पुरावा मागेल. त्याला किती अवधीत या दोन्ही गोष्टी एकापाठोपाठ एक घडल्या त्याची आकडेवारी लागेल. त्यासाठी दोन-तीन उदाहरणं देऊन पुरणार नाहीत; शेकडो उदाहरणं लागतील. त्याशिवाय त्याला कुत्रं रडलंय पण त्यानंतर जवळपास कुठेही मृत्यु झाला नाही असं कधी झालाय का आणि कुत्रं रडल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचं केलेलं भाकीत खरं झालाय का ही माहिती सुद्धा लागेल. यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी व दुसर्‍याचं नकारार्थी असेल तर तुमचं विधान शास्त्रज्ञाच्या विवेचक बुद्धीसमोर टिकणार नाही. त्यावर भोळसट माणसं विश्वास ठेवतील पण ते विज्ञानाच्या दृष्टीनी असत्य असेल. आकडेवारीच्या पुराव्याशिवाय शास्त्रज्ञ कुत्र्याचं रडणं व मृत्यूची चाहूल यात काही सर्वसामान्य अनुभवाशी जुळणारा एखादा दुवा आहे का याचाही विचार करील. जसे, कुत्र्याला भविष्यातल्या गोष्टी जाणवण्याचं एखादं इन्द्रिय आहे का? असल्यास त्याचं कार्य कशाप्रकारे चालतं?

वैज्ञानिक शोधांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून जे तंत्रज्ञान विकसित होतं त्याचे दृश्य परिणाम (विधायक किंवा विध्वंसक) सर्वसामान्य लोकांना सारखेच अनुभवायला येतात. शिवाय असे अनुभव पूर्वनियोजन करून पुन्हा पुन्हा घेता येतात. कदाचित त्यमुळेच वैज्ञानिक सिद्धांत समजले नाहीत तरी खरे असले पाहिजेत असा विश्वास लोकांमधे निर्माण होत असावा.

शेवटी जाताजाता
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कॉलेजच्या विज्ञानशाखेत जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळी पहिल्याच दिवशी प्राध्यापकांनी सायन्सची व्याख्या सांगितली ती अशी :
"सायन्स् इज् द कंटिन्युअस् डिस्कव्हरी ऑफ् इट्स् ओन् मिस्टेक्स्"
विज्ञानातला हा प्रांजळपणा तर विज्ञानाची विश्वासार्हता वाढवत नसेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

विश्वासार्हता

विज्ञान स्वतःच्या अनुमानांचे पून्हा पून्हा परिक्षण करण्यास सदैव तयार असते. तसे ते प्रयोगांती सिद्ध झाल्यावर स्वतःची अनुमाने पून्हा पून्हा सुधारुन देखील घेते. आडमुठेपणाने आपले तेच खरे असा विज्ञानाचा आग्रह नसतो. विज्ञान सुस्पष्टपणे इतरांचे अगदी वैज्ञानिकांचे सुद्धा सदैव पितळ उघडे पाडत असते. त्यामूळे सारासार विचार करणाऱ्या प्रत्येकाला विज्ञानाबद्दल विश्वासार्हता वाटते.

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.बाबासाहेब जगताप यांनी लिहिलेल्या प्रतिसादाशी मी पूर्ण सहमत आहे.या प्रतिसादाने मूळ लेखात श्री.शरद कोरडे यांनी मांडलेल्या विचारांना पुष्टी मिळते.श्री.जगताप लिहितातः
".. त्यामुळे सारासार विचार करणार्‍या प्रत्येकाला विज्ञानाबद्दल विश्वासार्हता वाटते."

हे खरे असले तरी दुर्दैव असे की वैज्ञानिक दृष्टिकोन अभावानेच दिसतो.बुवा,बापू, महाराज इत्यादींच्या भक्तगणांची संख्या सतत वाढतेच आहे.

पण

आडमुठेपणाने आपले तेच खरे असा विज्ञानाचा आग्रह नसतो. विज्ञान सुस्पष्टपणे इतरांचे अगदी वैज्ञानिकांचे सुद्धा सदैव पितळ उघडे पाडत असते.

असे आहे असेलही पणविज्ञानवादी मात्र मला येथे वेगळेच वागतांना दिसतात, दिसले आहेत.

त्यामूळे सारासार विचार करणाऱ्या प्रत्येकाला विज्ञानाबद्दल विश्वासार्हता वाटते.

मला विश्वासार्हता ही सेटल झालेल्या मतांविषयी येते. जेंव्हा मतांतरे होत असतात तेंव्हा गोंधळाची परिस्थिती तयार होते हे पण तेव्हढेच खरे!

आवांतर असे उदा. औषधे बनवणार्‍या कंपन्यांवर विश्वास ठेवणे मला जमत नाही - ते ज्या डॉक्टरांकडे 'पटवायला' जातात त्यांच्या निदानावरही विश्वास ठेवणे मला जमत नाही.

आपला
गुंडोपंत

वा !

>> "सायन्स् इज् द कंटिन्युअस् डिस्कव्हरी ऑफ् इट्स् ओन् मिस्टेक्स्

मस्तच !
"कुत्र्यचं रडणं.." अजुन विज्ञानात सामिल व्हायचय. वेळ लागेल , संशोधन करणे आवश्यक आहे.

>>त्यासाठी दोन-तीन उदाहरणं देऊन पुरणार नाहीत; शेकडो उदाहरणं लागतील. त्याशिवाय त्याला कुत्रं रडलंय पण त्यानंतर जवळपास कुठेही मृत्यु झाला नाही असं कधी झालाय का आणि कुत्रं रडल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचं केलेलं भाकीत खरं झालाय का ही माहिती सुद्धा लागेल....

जर असं नसतं आणि एक दोन उदाहरणांवरुन जर त्याचं विज्ञान झालं असतं तर अंधश्रद्धा आणि विज्ञानातं फरक करणं अवघड गेलं असतं. हे असं आहे म्हणूनचं विज्ञान टिकुन आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे विज्ञान कुणाला जबरदस्ती करत नाही की असच करा.

विज्ञान ही एक लंबी खाण असावी, मानव ती खणत आहे . जोपर्यंत खाणीतुन काही निघत नाही तोपर्यंत "खाणीत अमुक अमुक असणारच" असं म्हणन्यात काही अर्थ नाही.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

परत आणि परत तेच!

परत आणि परत तेच आणि तेच!
----------------------------------
तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेकां
कथिती विरुद्ध गोष्टी ; त्याला इलाज नाही.
----------------------------------

[यामुळेच सामान्य माणूस कधी कधी वैज्ञानिक गोष्टीं विषयी भांबावलेला असतो. सुमारे ७० ते ८० च्या दशकात शरीराला भाजल्यावर पाण्याचा स्पर्शही नको असे सांगितले जायचे. तेच आता पाण्यात धरा असे सांगतात. येथे चांगल्यासाठी असले तरी, अनुमाने बदलल्याने सामान्य माणूस भांबावत नाही काय? हेच नाही अशी अनेक उदाहरणे असतात. परंतु त्याच वेळी ईश्वर आणि त्या अनुषंगाने येणार्‍या ध्यानासारख्या अध्यात्मिक गोष्टी, ही मात्र त्यामानाने सातत्याने टिकून राहिलेली संकल्पना आहे. शिवाय त्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळेही त्यावर विश्वास ठेवणे सोपे जात असावे. अनेकदा आलेले चमत्कारीक वैयक्तीक अनुभव यात भर घालतात. - अर्थात हे माझे अनुमान झाले. यात मतांतरे असू शकतात - आहेत.]

----------------------------------
तें भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना; त्याला इलाज नाही
----------------------------------
[वरील उदाहरणात पाहिले की अनुमानांची निश्चिती नसल्याने काही वेळा विज्ञानाला (चांगल्यासाठीही) संशयाचे भूत छळते!)

----------------------------------
विज्ञान ज्ञान देई; निर्मी नवीन किमया;
निर्मी न प्रेम शांती; त्याला इलाज नाही
---------------------------------
[येथे मात्र खरंच प्रश्न निर्माण होतात, आणि सर्व सामान्यांना या संदर्भात अणुबाँबच आठवतो - मला तरी! अनेकंना देवीची लसही आठवू शकते - त्याला इलाज नाही ;)) ]
...

----------------------------------
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू; त्याला इलाज नाही
----------------------------------
[माझ्या विचार रुपी सुकाणूची दिशा निर्दोष नाहीच. पण म्हणून मी कुणी आपलेच सुकाणू निर्दोष आहे, आणि फक्त तेच वापरा, असे सांगू लागला तर त्या माणसाला टाळणेच योग्य याचीही मला कल्पना आहे. याच वेळी माझे सुकाणू निर्दोष नाही, म्हणूनच मला ते आवडते.]

----------------------------------
वॄद्धपकाल येता जाणार तोल थोडा;
श्रद्धा बनेल काठी! त्याला इलाज नाही.
----------------------------------
[आयुष्याच्या सायंकाळी कुठेतरी विसावा असावाच लागतो. विज्ञान नावाच्या देवावर का होईना, पण श्रद्धा ठेवावीच लागते. विवेकवाद कधी कधी थोडावेळ बाजूला ठेवला जातोच - जे ठेवत नाहीत, ठेवू शकत नाहीत, त्यांना मानवी कसे म्हणावे, असा प्रश्न मला पडतो.]

कवि - विंदा करंदीकर (मौज १९९९)*

असो,
आयुष्यात अचानकपणे मृत्युचा जवळून अनुभव घेतलेल्यांची मते विज्ञानवादी असतात का,
यावर एखादा सर्वे घेतल्यास रोचक माहिती मिळेल असे वाटते.

आपला
गुंडोपंत

* सर्व ठळक पणा - माझा मुळ काव्यात असे काही नाही.

गहन

आयुष्यात अचानकपणे मृत्युचा जवळून अनुभव घेतलेल्यांची मते विज्ञानवादी असतात का,

गुंडोपंत हा गहन विषय आहे. पण मृत्यु हा विज्ञानवादी व अध्यात्मवादी दोहोंना खाद्य आहे
प्रकाश घाटपांडे

मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद है

माझ्या विचार रुपी सुकाणूची दिशा निर्दोष नाहीच. पण म्हणून मी कुणी आपलेच सुकाणू निर्दोष आहे, आणि फक्त तेच वापरा, असे सांगू लागला तर त्या माणसाला टाळणेच योग्य याचीही मला कल्पना आहे. याच वेळी माझे सुकाणू निर्दोष नाही, म्हणूनच मला ते आवडते.

या रुपकाच्या भाषेत "मी तुमच्या सुकाणूचे दोष दाखविले आहेत. माझे सुकाणू सध्या निर्दोष आहे (किंवा त्यातील दोष क्ष टक्क्यांपेक्षा कमी आहेत) असे मला सध्या वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे कष्ट मी घेतले आहेत. तरीही तुम्हाला संशय असल्यास कारणे सांगा. आक्षेप घेता येत नसतील तर मात्र सध्या माझेच सुकाणू वापरा... बाप, श्राद्ध, वगैरे..." या भूमिकेत काही तालिबानीपणा वाटत नाही.

हे

मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद है

हे सही बरं का! ;))
पण तुम्हाला तुमची कमिज सफेद वाटत असेल ता तो तुमचा 'प्रश्न' आहे माझा नाही! :)
माझी कमिझ जशी आहे तशीच मला हवी असेल तर...?

माझे सुकाणू वापरा... बाप, श्राद्ध, वगैरे..." या भूमिकेत काही तालिबानीपणा वाटत नाही.
अहो आला तेथेच तालिबानीपणा...

असो,

आपला
सुकाणूपंत नावाडी

तुम्ही कोणतीही कमीझ वापरा पण....

>>माझी कमिझ जशी आहे तशीच मला हवी असेल तर...?

तुमची मळकी आणि फाटकी कमीझ तुम्हाला वापरायची तर वापरा. पण ती कमीझ फाटलेली नाही आणि स्वच्छ आहे असे तुम्ही इतरांना सांगू लागलात तर मात्र सफेद कमीझवाला तुम्हाला विरोध करणारच. त्याहीपुढे जाऊन मळलेलीच कमीझ घालणे कसे योग्य आहे असे पटवायचा प्रयत्न करू लागलात तर हा विरोध अजूनच वाढणार.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+१

असेच उत्तर लिहीत होतो.

कमिझ् का झोळी?

विरोध करा हो! पण जर झोळी सुद्धा फाटकी असेल तर तुमचा विरोध काय कामाचा? ;-)

-Nile

मुळात

मुळात 'बंच ऑफ पी एच डींज्'* नी माझी मळकी आणि फाटकी कमीझ आहे हे ठरवणे हेच मला मान्य नाही!
तसेच मी 'त्यांची कमिझ मळकी आणि फाटकी आहे', असली विधानेही केलेली नाहीत हे लक्षात घेतलेले बरे.

आपली विचारसरणी उच्च 'च' आहे असे भासवण्यासाठी इतरांना कमी लेखण्याचे काही कारण मला दिसत नाही.

इत्यलम!

तर्कटांच्या चर्चेतून तसे काही साध्य होणार नाही हे मी जाणून आहे. पण मी पडलो साधा आणि सुमार बुद्धीचा सामान्य 'मानवी' इसम. सदैव जागृत असलेला अतिमानवी विवेकवाद कुठला माझ्याकडे?

आपला
गुंडोपंत

* 'बंच ऑफ पी एच डींज्' हा माझा शब्द नाही. पण ते ही एका कुजकट रुपकात मानायला हरकत नाही ;))) धनंजय ने एका ठिकाणी उद्वेगाने वापरलेला होता म्हणून लक्षात राहीला. ;))

संवाद चालू ठेवा

मुळात 'बंच ऑफ पी एच डींज्'* नी माझी मळकी आणि फाटकी कमीझ आहे हे ठरवणे हेच मला मान्य नाही!

हे पी एच डी लोक जर "मी तुमच्या सिद्धांतातील दोष दाखविले आहेत. माझे सिद्धांत सध्या निर्दोष आहे (किंवा त्यातील दोष क्ष टक्क्यांपेक्षा कमी आहेत) असे मला सध्या वाटते आहे. ते सिद्ध करण्याचे कष्ट मी घेतले आहेत. तरीही तुम्हाला संशय असल्यास कारणे सांगा." असे म्हणाले तर त्यांच्या मागणीला 'ठरविणे' संबोधिणे हा अन्याय आहे.

मी 'त्यांची कमिझ मळकी आणि फाटकी आहे', असली विधानेही केलेली नाहीत

"तुम्हाला तुमची कमिज सफेद वाटत असेल ता तो तुमचा 'प्रश्न' आहे माझा नाही! :)"
येथे 'वाटत' हा शब्द सूचक होता असे वाटते.

तर्कटांच्या चर्चेतून तसे काही साध्य होणार नाही हे मी जाणून आहे.

माहिती, ज्ञान यांची देवाणघेवाण, हेच साध्य अपेक्षित असले तर?

ठिक

संवाद चालू ठेवा
ठिक आहे,
मी मला जे वाटते या बद्दल बोललो आहे. ते मत कुणी मानलेच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही. माझ्या लिखाणात मला परत वाचूनही तसे दिसत नाहीये.रृयापैकी न्युट्रल/बॅलन्स्ड लिखाण आणि विधाने करण्याचा प्रयत्न आहे. (मला खरे तर असे लिहिणे जमत नाही तरीही आश्चर्यकारक रित्या यावेळी ते साधले आहे असे दिसून येते आहे. ;))) )
असे असून पण मी तुमच्या विरोधी गटातला आहे, असा सूर ठेउन तुम्ही आणि थत्ते माझ्या सगळ्या लेखनाकडे पाहता आहात की काय असे वाटले. म्हणून मी चर्चेतून बाहेर पडणे पसंत केले बाकी काही नाही.

असो,

एकुण या बाबतीत मला या विषयाचा ठोकळ्यांच्या स्वरूपात विचार न करता वर्णपट स्वरूपात विचार करणे जास्त योग्य वाटते. (अर्थातच येथे ठोकळ्यांच्या स्वरूपात विचार करणे मला मान्य नाही किंवा चुकीचे आहे असे माझे म्हणणे नाही. म्हणून 'मला' हा शब्द्द वेळोवेळी योजला आहे.)

पण विज्ञान विषयावर लिहिणारे आणि विज्ञानवादी म्हणजे कुणी विशेष खास लोक, अश्या स्वरूपाची जी मते मांडली जातात, त्याच्याशी मी 'फारसा' सहमत नसतो. सारासार विचाराचा मक्ता कुणा एका(च) गटाकडे नसतो इतकेच मला म्हणायचे आहे. (याचा अर्थ ते कुणी विशेष खास नसतातच असेही नाही, पण सगळेच तसे असतात, असाही नाही! तसेच मग उरलेल्यातही..)

आपला
गुंडोपंत

मक्ता

सारासार विचाराचा मक्ता कुणा एका(च) गटाकडे नसतो इतकेच मला म्हणायचे आहे.

म्हणूनच विज्ञानात 'पिअर रिव्यू' नावाचा प्रकार असतो. विचाराचा मक्ता एकाच गटाकडे असायला हे काय अध्यात्म आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

बरोबर

>म्हणूनच विज्ञानात 'पिअर रिव्यू' नावाचा प्रकार असतो.

बरोबर. पण PNAS सारख्या मासिकात याच पिअर रिव्ह्यूला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. म्हणून मी PNAS ला विश्वासार्ह मानत नाही.
बाकी चालू द्या.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

विश्वासार्ह

PNAS मधील सगळेच शोधनिबंध पिअर रिव्यूला वाटाण्याच्या अक्षता लावून छापलेले नसतात असे तुमच्या लिखाणातून समजले. पैकी कोणते लेख पिअर रिव्यूच्या माध्यामातून आले आहेत आणि कोणते नाहीत हे कळण्यास वाव असल्यास सरसकट PNAS विश्वासार्ह नाही असे म्हणण्यास वाव नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

ठीक

तांत्रिकदृष्ट्या तुमचे म्हणणे बरोबर आहे, सर्वच निबंध असे नसतात. पण ज्या संस्थेमध्ये व्यक्ती विज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते तिची माझ्या लेखी विश्वासार्हता नाही.

इथे विरोधाभास हा की माझाच एक निबंध PNAS मध्ये प्रकाशित झाला आहे. आमच्या बॉसला PNAS चे भारी प्रेम.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

विज्ञान नियतकालिकातील निबंध म्हणजे विज्ञान नव्हे

विज्ञान नियतकालिकातील निबंध आला म्हणजे त्यातील मजकूरास वैज्ञानिक मान्यता मिळाली असे नसते. जास्तीत जास्त असे म्हणता येईल की लिहिणार्‍या व परिक्षकांची त्यास मान्यता आहे.

कोल्ड फ्युजन, होमिओप्याथी वर प्रथितयश नियतकालिकात निबंध आले होते. नंतरच्या प्रयोगांनंतर ते खोटे ठरले. ही दोन गाजलेली उदाहरणे. पण निरनिराळे प्रयोग, त्यामागील पॉस्चुलेटस यावर नेहमीच निबंध येत असतात. त्यानंतरच्या येणार्‍या प्रत्युत्तरातून (पॉपरच्या फॉल्सिफिकेशन नंतर) त्यास मान्यता मिळते.

आता कुठल्याशा नियतकालिकात (त्याचा इम्प्याक्ट खूप जास्त असला तरी) काहींचे लेख एका तपासणीशिवाय येतात यात फारसे काही चुकत नाही. कारण पुढे अनेकांच्या तपासणीतून त्यास जायचे असते. हल्लीचे दुसरे उदाहरण म्हणजे स्ट्रींग थेअरीवर आक्षेप घेणारे लिखाण (नॉट इव्हन राँग या नावाचे पुस्तक).

अर्थात या सर्वाचा विज्ञानातील गैरप्रकार असण्या नसण्याशी काही संबंध नाही या गैरप्रकारात खोटेपणा, हात मिळवणी करून एकमेकाची पोळी भाजणे, दादागिरी: दुसर्‍याचे म्हणणे येऊ न देणे अशा गोष्टी सामिल असतीलच. वैज्ञानिक ही देखील इतरांसारखी माणसे आहेत. आपला हेतू साध्य करण्यास वाकडी वाट करणारे त्यांचातही असणे साहजिक आहे. या तपासण्या अविरत चालु ठेऊन सामुदायिक शहाणपण मिळवण्याच्या रीतिला यामुळे खूप बाधा येत नाही असे वाटते.

प्रमोद

सहमत

"मानवी क्रियेत मानव आहेत याचे खंडन करता येत नाही" - हे वाक्य सत्य आहे, पण केवळ पुनरुक्त सत्य आहे (tautology).

अनेक मानवी शोधप्रक्रियांमध्ये (सर्वांमध्ये मानव आहेत हे समजून) काही फरक करता येतो का? असा बहुधा चर्चाप्रस्ताव आहे. चर्चाप्रस्तावकाने जर वैज्ञानिक शोधप्रक्रिया या मानवी क्रियाकलापांची बिगरमानवी क्रियाकलापांशी तुलना केली असती, तर श्री. आरागॉर्न यांचे वरील विवेचन अधिक उपयोगी ठरले असते.

वाचक म्हणून आपण म्हटले असते, "मानवी वैज्ञानिकांच्या कार्यकलापांत राग-लोभ-द्वेष हे मानवी दोष पीएनाएस उदाहरणामधून दिसतात, त्या दोषांमुळे शोधप्रक्रिया दूषित आहे. मात्र वेगळ्या कुठल्या शोधप्रक्रियेत मानव नसल्यामुळे त्या प्रक्रियेत राग-लोभ-द्वेष हे दोष नाहीत. ती शोधप्रक्रिया वैज्ञानिकांच्या शोधप्रक्रियेपेक्षा या प्रकारे बरी."
- - -

राग-लोभ-द्वेषा-मद-मोह-मत्सरामुळे वैज्ञानिक शोधांमध्ये काही दोष येतात, हे खरे आहे. त्या दोषांमुळे बिघडलेले निष्कर्ष कसे ओळखावेत, कसे सुधारावेत, या प्रकारची चर्चा असती, तर पीएनएएस मासिकाच्या प्रकाशनप्रक्रियेचा अनुभव अतिशय उपयोगी ठरतो. श्री. आरागॉर्न यांनी अशा प्रकारची चर्चा जरूर सुरू करावी.

या चर्चेत मात्र त्यांच्या अनुभवकथनाने "अन्य मानवी कार्यकलापांपेक्षा वैज्ञानिकांच्या शोधप्रक्रियेत समसमान प्रमाणात दोष उद्भवतात" असा वाचकांचा गोंधळ होऊ शकतो. काही वाचकांचा झालाच आहे. श्री. आरागॉर्न यांनी हे ओळखून पुढे एका उपप्रतिसादात "असे मत नाही" असे स्पष्टीकरणही मांडलेले आहे :

माझा मुद्दा इतकाच आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात जे संशोधन होते आहे त्याकडे अधिक डोळसपणे बघण्याची गरज आहे. याचा अर्थ सर्व संशोधन निरूपयोगी किंवा चुकीचे आहे असा नव्हे.

सर्वच युगे स्पर्धेची युगे असतात,* आणि [फायदा तोट्याचे महत्त्व जाणवल्यास अशा] सगळ्याच गोष्टींकडे डोळसपण बघावे, हे बारीकसे फरक सोडता त्यांच्या स्पष्टीकरणाशीही मी सहमत आहे.

(*न्यूटनची लाइब्नित्सबरोबर कलन-गणिताच्या शोधाबद्दल झालेली स्पर्धा महत्त्वाकांक्षा, मत्सर वगैरे दाखवतात. त्या आधीच्या काळात गॅलिलेओने जिवाच्या/शिक्षेच्या भयाने आपला निष्कर्ष बदलला होता. घाबरून खोटे बोलायची प्रवृत्ती त्या काळातही होती, आजही आहे. वगैरे.)

मूळ मुद्दा

विज्ञानातला हा प्रांजळपणा तर विज्ञानाची विश्वासार्हता वाढवत नसेल?
माझा मूळ प्रतिसाद या वाक्याला उद्देशून होता. तत्वत: मी पूर्ण सहमत आहे. व्यक्तींचा सहभाग न धरता विज्ञान प्रांजळ आहे. पण प्रत्यक्षात व्यक्ती आणि विज्ञान यांना वेगळे काढता येणे अशक्य आहे. त्यामुळेच कुठलाही नवीन शोध लागल्याचे कळाल्यावर डोळसपणे बघण्याची गरज आहे असे वाटते. उदा. कोल्ड फ्युजन वगैरेंची उदाहरणे वर आलीच आहेत.

सर्वच युगे स्पर्धेची युगे असतात
सहमत परंतू आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्पर्धा अधिकाधिक कट-थ्रोट व्हायला लागली आहे. न्यूटन वगैरेंना निधी मिळवणे, त्यासाठी राजकारण करावे लागणे असे प्रकार (सुदैवाने) करावे लागत नव्हते. आज चित्र फारच वेगळे आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

व्यापक/असहमत

आता कुठल्याशा नियतकालिकात (त्याचा इम्प्याक्ट खूप जास्त असला तरी) काहींचे लेख एका तपासणीशिवाय येतात यात फारसे काही चुकत नाही.
तात्विकदृष्ट्या याच्याशी असहमत आहे. किंबहुना याच कारणामुळे मला प्नासबद्दल आकस आहे. कुठल्याही संस्थेमध्ये व्यक्ती विज्ञानापेक्षा मोठी असू शकत नाही. प्नाससारख्या जगविख्यात संस्थेमध्ये हे व्हावे याचे आणखी वाइट वाटते. याशिवाय प्नासमध्ये अशा प्रकारे निबंध छापून आला याचा त्या शास्त्रज्ञांना फायदा होतोच. रेझुमे चांगला दिसतो, प्रमोशन/ग्रांट लाही प्नासच्या नावामुळे फायदा होतो. हे सर्व चूक आहे.

बाकी तुमच्या मुद्यांशी सहमत आहे. सुदैवाने छापले जाणारे सगळेच विज्ञान नसते. किंबहुना छापले गेल्यानंतर निबंध किती लोक वाचतात हा ही एक निकष आहे. मागे एका प्राध्यापकांशी बोलताना त्यांचा निकष वेगळाच असल्याचे समजले. त्यांचे म्हणणे जर तुमचा निबंध/संशोधन काही वर्षांनी पाठ्यपुस्तकांमध्ये आले तरच ते श्रेष्ठ. निकष अवघड आहे पण पटण्यासारखाही आहे.

बाकीचे मुद्दे आणि विज्ञानाच्या वाटचालीवर यांचा होणारा परिणाम ही चर्चा बरीच व्यापक होईल.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

श्रेय अव्हेर

"बंच ऑफ पी एच्डी" हा वाक्प्रचार एक अमेरिकन मंत्री जॉन स्नो यांनी वापरला होता, त्याचा उल्लेख श्री. विकास (उपक्रम आयडी) यांनी मागे केला होता (शोधयंत्रात सापडले) :

अर्थात अमेरिकन माजी ट्रेजरी सेक्रेटरी (अर्थमंत्री) जॉन स्नो ना मात्र या बद्दल वाटते की बाहेरून कोणी काही सांगायची गरज नाही. "बंच ऑफ पीएचडीज्" ना ते काही करू शकतील असे वाटत असेल तर ते हास्यास्पद आहे असे स्नों ना वाटते. पडलो तरी नाक वर...

(श्री. स्नो यांचा पीएच्डी-विरोध अनाठायी होता असा श्री. विकास यांचा संदर्भ दिसतो आहे. वरील उद्धरणापेक्षा विपरित.)

- - -
मला वाटते, की अशा संदर्भात मराठी संस्थळांवर ऐकलेल्या "ढुड्ढाचार्य" शब्दप्रयोगाचे उद्धरण मी कधी मागे केले असेल. त्याचा संदर्भ असा काही असू शकेल.
प्रत्येक मनुष्याकडे (बेशुद्ध, झोपलेला, रोगाने मतिमंद झालेला असे थोडे अपवाद सोडता) इच्छा आणि वेळ असल्यास सारासार विचार करायचे सामार्थ्य असते, असे माझे मत आहे. हे खरे आहे.

मात्र सर्व लोकांचे सर्व विचार सयुक्तिकच असतात, असे माझे मत नाही.

- - -
विधाने ग्राह्य-अग्राह्य असण्याचे निकष स्पष्ट सांगणारी , आणि त्या निकषांवर मते पडताळल्यानंतर अग्राह्य मते त्यागणारी विचारक्षेत्रे ही त्या बाबतीत वैज्ञानिक विचारक्षेत्रे होत.

एखाद्या विचारधारेचे फलित माहीत असल्यास, ते फलित साध्य करण्यात कुठली विचारसरणी अधिक सफल होते? हा प्रश्न विचारणे मला सुयोग्य वाटते.

अमुक विचारधारेने अमुक इतके साफल्य मिळते, तमुक विचारधारेने तमुक इतके साफल्य मिळते; अमुक साफल्य>तमुक साफल्य ; असे दिसल्यास
"अमुक विचारधारा तमुक विचारधारेपेक्षा अधिक फायद्याची, तमुक विचारधारा अधिक तोट्याची"
असा निष्कर्ष काढणे आणि एकमेकांना सांगणे मला समाजात उपयोगाचे वाटते. पुढच्यास ठेच मागचा शाहाणा. "या विचार-मार्गावर इथे-इथे ठेच लागते" असे सांगितल्यामुळे ठेचेच्या मार्गाचा अपमान होत असेलही. तरी मला ठेचेच्या मार्गाचा मान राखण्यापेक्षा मागच्यास ठेच लागू नये याबद्दल अधिक आत्मीयता वाटते.

अशा तुलनेनंतर सरस विचारसरणी अंगीकारली तर ती "आपली विचारसरणी" होते, आणि हाच निष्कर्ष
"आपली विचारधारा अधिक फायद्याची आणि तमुक विचारधारा अधिक तोट्याची"
असा सांगितला जातो. आपला अनुभव, तुलना आणि निष्कर्ष समाजात स्पष्ट सांगताना एका मार्गाला "आपला मार्ग" म्हटल्यामुळे काही मोठे चुकते, असे मला वाटत नाही.

उलट :

आपली विचारसरणी उच्च 'च' आहे असे भासवण्यासाठी इतरांना कमी लेखण्याचे काही कारण मला दिसत नाही.

विचारसरणींबद्दल कुठलेही तुलनात्मक विधान वरील उद्धरण निष्कारण ठरवते. (तुलना म्हणजे एक "उच्च" किंवा अधिक, दुसरे कमी, असे सांगणे, होय.) विचारसरणीची फलिते कमी-अधिक असली, फायदा-तोटा वेगवेगळा असला, तर तुलना सांगणे उपयोगी असते, निष्कारण नसते. म्हणून या उद्धरणाशी असहमत.

ओके!

"बंच ऑफ पी एच्डी" हा वाक्प्रचार एक अमेरिकन मंत्री जॉन स्नो यांनी वापरला होता, त्याचा उल्लेख श्री. विकास (उपक्रम आयडी) यांनी मागे केला होता (शोधयंत्रात सापडले) :

ओके! (नेहमीचा धांदरटपणा!) क्षमस्व! वरील प्रतिसादात धनंजय ऐवजी विकास असे वाचावे. प्रतिसाद आल्याने मला ते दुरुस्त करता येत नाही. आपल्याला पटत नसेल तर, संपादकांना तो शब्द विकास करण्यासाठी विनंती करेन.

प्रत्येक मनुष्याकडे (बेशुद्ध, झोपलेला, रोगाने मतिमंद झालेला असे थोडे अपवाद सोडता) इच्छा आणि वेळ असल्यास सारासार विचार करायचे सामार्थ्य असते, असे माझे मत आहे. हे खरे आहे.

तुमचे मत कळले. या मताला माझी ना किंवा हो असण्याचे काही कारण मला येथे दिसत नाही. विचार करायचाच झाला तर कदाचित मी सहमतीही दर्शवेन.

मात्र सर्व लोकांचे सर्व विचार सयुक्तिकच असतात, असे माझे मत नाही.
माझे ही नाही!

विधाने ग्राह्य-अग्राह्य असण्याचे निकष स्पष्ट सांगणारी , आणि त्या निकषांवर मते पडताळल्यानंतर अग्राह्य मते त्यागणारी विचारक्षेत्रे ही त्या बाबतीत वैज्ञानिक विचारक्षेत्रे होत.
सहमत व्हायला काही हरकत नाहीच!

एखाद्या विचारधारेचे फलित माहीत असल्यास, ते फलित साध्य करण्यात कुठली विचारसरणी अधिक सफल होते? हा प्रश्न विचारणे मला सुयोग्य वाटते.
हे ही ठीकच.

"अमुक विचारधारा तमुक विचारधारेपेक्षा अधिक फायद्याची, तमुक विचारधारा अधिक तोट्याची"
असा निष्कर्ष काढणे आणि एकमेकांना सांगणे मला समाजात उपयोगाचे वाटते. पुढच्यास ठेच मागचा शाहाणा. "या विचार-मार्गावर इथे-इथे ठेच लागते" असे सांगितल्यामुळे ठेचेच्या मार्गाचा अपमान होत असेलही. तरी मला ठेचेच्या मार्गाचा मान राखण्यापेक्षा मागच्यास ठेच लागू नये याबद्दल अधिक आत्मीयता वाटते.

हम्म! या बाबतीत बहुदा काही बाबा, बुवा, माता, तालिबानीही आणि मिशनरीही असाच विचार करून जगाला 'वाचवत' असावेत. या बाबतीत तुमच्या मताशी सहमत आहे. तुमच्या आत्मीयतेच्या वाटण्या बद्दल कौतुक!

अशा तुलनेनंतर सरस विचारसरणी अंगीकारली तर ती "आपली विचारसरणी" होते, आणि हाच निष्कर्ष "आपली विचारधारा अधिक फायद्याची आणि तमुक विचारधारा अधिक तोट्याची"
असा सांगितला जातो. आपला अनुभव, तुलना आणि निष्कर्ष समाजात स्पष्ट सांगताना एका मार्गाला "आपला मार्ग" म्हटल्यामुळे काही मोठे चुकते, असे मला वाटत नाही.

असेच बाबा, बुवा, माता, तालिबानी, सायंटॉलॉजीस्ट आणि मिशनरीही म्हणतात असे 'मला' वाटते. तुमचे म्हणणे कळले.

आपली विचारसरणी उच्च 'च' आहे असे भासवण्यासाठी इतरांना कमी लेखण्याचे काही कारण मला दिसत नाही.

येथे मला हा शब्द वाचण्यातून निसटला की काय असे वाटले. असो मी कोणतेही कंपॅरिझन न करता, मला माझे सुकाणू जसे आहे तसेच आवडते आहे इतके म्हंटल्यावर, 'तुमची कमीझ मळकी आणि फाटकी आहे' असे म्हणायचे काही कारण नव्हते. मी माझी कमीझ कशी आहे या बद्दल येथे काहीच सांगितलेले नाही. म्हणून मी कमी लेखण्याचा उल्लेख येथे आणला आहे. या अनुषंगाने ते वाक्य आले आहे. कशाच्या आधारावर माझ्या कमिझ विषयी ते असे म्हणत आहेत, यावर श्री थत्ते यांनी काहीही खुलासा केलेला नाही. त्यांनी सामान्य विधान केले असते तर मी कदाचित सहमतीच दर्शवली असती. पण त्यांनी वैयक्तीक विधान केल्यामुळे...

या शिवाय, हे माझे मत आहे आणि तुम्हाला त्याच्या असहमत असायचे आहे, की नाही हा तुमचा 'प्रश्न' आहे. या बद्दल मला काही म्हणायचे नाही. तरी तुमची असहमती कळली.

एक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की की या चर्चे मध्ये मी माझी किंवा इतरही कुणाची विचारसरणी चांगली की वाईट यावर काहीही टीप्पणी केलेली नाही. फक्त माझी विचारसरणी (माझ्या वैयक्तीक अनुभवातून/वाचनातून/निरिक्षणातून आलेली आहे आणि ती) मला मान्य आहे. इतकाच साधासा न्युट्रल स्टँड घेतला आहे. याच वेळी माझ्या मुख्य प्रतिसादातील आयुष्यात अचानकपणे मृत्युचा जवळून अनुभव घेतलेल्यांची मते विज्ञानवादी असतात का, यावर मात्र चर्चा काणे टाळले आहे की काय असे वाटले - असे नसेलही. कदाचित यावर बोलण्यासारखेच काही नसेल. किंवा हा मुद्दा खुपच अडचणीचा असल्याने...

आता असे 'मत सांगणेही' मान्य होण्यासारखे नसेल, तर या चर्चेतल्या विज्ञानवादाच्या शरिया कायद्याच्या सायंटॉलॉजिस्ट रक्षकांना माझा खुदा हाफीज!

आपला
गुंडोपंत

मत सांगण्याचा हक्क आणि टीका ऐकण्याचे कर्तव्य

असो मी कोणतेही कंपॅरिझन न करता, मला माझे सुकाणू जसे आहे तसेच आवडते आहे इतके म्हंटल्यावर, 'तुमची कमीझ मळकी आणि फाटकी आहे' असे म्हणायचे काही कारण नव्हते.

"ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू..."
या विधानात विज्ञान आणि अविज्ञान एकाच माळेत ओवले गेले आहेत असे वाटते (अमेरिकेत 'इक्वल टाईम फॉर क्रिएशन' चळवळीत तसेच करतात). तुम्ही श्रेष्ठत्वाचा दावा केला नव्हता. पण तुमच्या समानतेच्या दाव्यालाही माझा आक्षेप आहे.

आता असे 'मत सांगणेही' मान्य होण्यासारखे नसेल, तर या चर्चेतल्या विज्ञानवादाच्या शरिया कायद्याच्या सायंटॉलॉजिस्ट रक्षकांना माझा खुदा हाफीज!

मत सांगण्याचा तुमचा अधिकार मला मान्य आहे. त्याचसोबत 'तुमचे मत अमुक कारणांमुळे चूक वाटते' हे माझे मत सांगण्याचा अधिकार आहेच की!
'विरोध केला' म्हणजे काही 'गळा धरला' नाही. टीका केली तर बिघडते कुठे? ('विज्ञान आणि अविज्ञान समान' ही विज्ञानावरील टीकाच होती.) त्याशिवाय चर्चा कशी होईल?

याच वेळी माझ्या मुख्य प्रतिसादातील आयुष्यात अचानकपणे मृत्युचा जवळून अनुभव घेतलेल्यांची मते विज्ञानवादी असतात का, यावर मात्र चर्चा काणे टाळले आहे की काय असे वाटले - असे नसेलही. कदाचित यावर बोलण्यासारखेच काही नसेल. किंवा हा मुद्दा खुपच अडचणीचा असल्याने...

म्हणजे 'मरता मरता वाचलो' असा अर्थ असेल तर दुचाकीने प्रवास करताना क्वचित तसे वाटते. की शस्त्रक्रियेत 'फ्लॅटलाईन' झालेल्यांचे अनुभव (NDE) अपेक्षित आहेत?

अहो पण

'तुमचे मत अमुक कारणांमुळे चूक वाटते' हे माझे मत सांगण्याचा अधिकार आहेच की!
पण चुकीचे असेल तर ना? का त्या आधीच समोरच्याला चुकीचा मानून आपलेच शहाणपणाचे घोडे दामटवायचे? खरोखर चुकीचे असेल तर चुक सुधारायला वाव आहेच. त्या विषयी काही म्हणणे असण्याचे कारण नाहीच!

माझे(च) सुकाणू निर्दोष आणि तुम्ही तेच वापरा मी तुमचे चांगली की वाईट हे ही ऐकून घेणार नाही त्या आधीच तुमचे वाईट आहे असे ठरवून टाकणार हा विचार मला तरी विज्ञानवादी वाटत नाही.

'विरोध केला' म्हणजे काही 'गळा धरला' नाही.
माझी तर गळा धरायलाच का, कुस्ती खेळायलाही हरकत नाही ;)))

"ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू..."
या विधानात विज्ञान आणि अविज्ञान एकाच माळेत ओवले गेले आहेत असे वाटते
वाटते या शब्दाला महत्त्व आहे ना? आणि अविज्ञान वगैरेचा तर मी उल्लेखही केलेला नाही. मला कल्पना नाही तुम्ही 'अविज्ञान' म्हणजे काय म्हणायचेय ते. हा नवीन मुद्दा या चर्चेत आला आहे. या पुर्वी तरी याचा उल्लेख नाही.

मग? एकुणात समोरच्याला काय म्हणायचे आहे ते ऐकुनच घ्यायचे नाही. [तुम्ही मुर्ख, आम्ही(च) विज्ञानवादी] आमचेच म्हणणे ऐका, म्हणून इतक्या जोरात ढोल वाजवायचा की समोरच्याचे तुणतुणे ऐकूच गेले नाही पहिजे, असे करून काय साधते? कदाचित तुणतुण्याचा आवाज आपल्या सुरातलाच असू शकेल असा विचार केला तर?

असो, आता
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू..."

हे पाहू. यात जे म्हंटले आहे ते अजिबात चुकीचे नाही. तुम्ही वर म्हंटल्यानुसार 'सध्या' एखादे सुकाणू निर्दोष असू शकते आहे. म्हणजे उद्याही ते निर्दोषच मानले जाईल असे नाही. त्या बद्दल कायमची खात्रीही देता येईलच असे नाही. यामुळे, कोणतेही सुकाणू निर्दोष नाहीच, असे मानूनच त्या विषयी संशय घेतला तरच प्रगती आहे ना?
कोणत्याही विषयाला काही पडत्या बाजू असतातच.
--
मृत्यू चा अनुभव, मग तो कसा आला, यापेक्षा अनुभव आल्यानंतर मानसिकतेत, विज्ञानवादी विचारधारेत काय फरक पडला का, हे पहणे उद्बोधक ठरेल का? असा फरक पडत असेल का?

आपला
गुंडोपंत

खोटा दावा

>>माझे(च) सुकाणू निर्दोष आणि तुम्ही तेच वापरा मी तुमचे चांगली की वाईट हे ही ऐकून घेणार नाही त्या आधीच तुमचे वाईट आहे असे ठरवून टाकणार हा विचार मला तरी विज्ञानवादी वाटत नाही.

हा दावा पोकळ दावा आहे. तुमचे सुकाणू वाईट आहे असे म्हणण्यापूर्वी तुमचे चांगले वाईट ऐकून घेतलेले नाही हा दावा खोटा आहे. येथे 'तुमचे' म्हणजे सध्याच्या वैज्ञानिक विचारसरणीखेरीज इतरांचे असे म्हणायचे आहे. या इतरांपेक्षा 'गुंडोपंतां'चे म्हणणे अजून वेगळे आहे असे सुचवत असाल तर ते म्हणणे काय आहे हे लगेच सांगून टाका म्हणजे ते 'ऐकून' घेता येईल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

असे

येथे 'तुमचे' म्हणजे सध्याच्या वैज्ञानिक विचारसरणीखेरीज इतरांचे असे म्हणायचे आहे. असे स्पष्तीकरन तेव्हा तुम्ही दिलेले नाही सरळ वाचल्यावर माझ्यावर वैयक्तीक स्वरुपात लिखाण करत आहात असा माझा ग्रह झाला होत.
तुमचे म्हणणे तुम्ही मी आक्षेप घेतल्यावर मांडले आहे. त्या आधी नाही.

असो,
आणि त्यात खोटेपणा कुठे आहे? वर तुम्ही लिहिलेले ते खोटे आहे?

आपला
गुंडोपंत

ऐकून घेऊ की

माझी तर गळा धरायलाच का, कुस्ती खेळायलाही हरकत नाही ;)))

मग तालिबानी मनोवृत्ती चालेल की तुम्हाला.

अविज्ञान वगैरेचा तर मी उल्लेखही केलेला नाही. मला कल्पना नाही तुम्ही 'अविज्ञान' म्हणजे काय म्हणायचेय ते. हा नवीन मुद्दा या चर्चेत आला आहे. या पुर्वी तरी याचा उल्लेख नाही.

मग? एकुणात समोरच्याला काय म्हणायचे आहे ते ऐकुनच घ्यायचे नाही. [तुम्ही मुर्ख, आम्ही(च) विज्ञानवादी] आमचेच म्हणणे ऐका, म्हणून इतक्या जोरात ढोल वाजवायचा की समोरच्याचे तुणतुणे ऐकूच गेले नाही पहिजे, असे करून काय साधते? कदाचित तुणतुण्याचा आवाज आपल्या सुरातलाच असू शकेल असा विचार केला तर?

'समोरच्याचे तुणतुणे ऐकूच गेले नाही पहिजे' अशी कृती करणे येथे शक्य आहे का? तुमचे प्रतिसाद संपादित होतात का?
तुम्ही काय माल विकणार याची कल्पना "ईश्वर आणि त्या अनुषंगाने येणार्‍या ध्यानासारख्या अध्यात्मिक गोष्टी, ही मात्र त्यामानाने सातत्याने टिकून राहिलेली संकल्पना आहे." या वाक्यातून येते.

आता
ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू..."

हे पाहू. यात जे म्हंटले आहे ते अजिबात चुकीचे नाही. तुम्ही वर म्हंटल्यानुसार 'सध्या' एखादे सुकाणू निर्दोष असू शकते आहे. म्हणजे उद्याही ते निर्दोषच मानले जाईल असे नाही. त्या बद्दल कायमची खात्रीही देता येईलच असे नाही. यामुळे, कोणतेही सुकाणू निर्दोष नाहीच, असे मानूनच त्या विषयी संशय घेतला तरच प्रगती आहे ना?

सर्व सुकाणू संशयास्पद असले तरी सर्वात कमी संशयास्पद सुकाणू सध्या सर्वांनी स्वीकारावे एवढीच अपेक्षा आहे. अव्हेर करायचा असेल तर नम्रपणे करावा, ताठा नसावा, 'इक्वल' म्हणवू नये, एवढेच.

मला

मग तालिबानी मनोवृत्ती चालेल की तुम्हाला.
म्हणजे तुम्ही तालिबानी आहात तर!

मला काय चालावे आणि चालू नये हे मी ठरवणार, तुम्ही नाही!

मजकूर संपादित.

खरड

मी तालिबानी नाही.
संपादन होण्यापूर्वी प्रतिसाद वाचता आला नाही. कृपया खरडवहीत द्या.

बरे

आपले म्हणणे कळले.

चर्चा खरड वहीत नेण्यात रस नाही.
आणि आता या चर्चेतच रस नाही!

आपला
गुंडोपंत

विज्ञान

मला काय चालावे आणि चालू नये हे मी ठरवणार, तुम्ही नाही!

विज्ञान आणि अ-विज्ञान हे एकाच पारड्यात तोलावे का ह्यावर चर्चा चालली आहे. तुम्हाला काय चालावे आणि काय नाही ह्यावर कुणी टीप्पणी केलेली दिसली नाही.

तर्काच्या कसोटीवर घासून चाचण्यांनी पडताळा केलेले ज्ञान आणि 'वैयक्तिक अनुभवातून आलेले ज्ञान' ह्यांची तुलना एकाच पारड्यात कशी काय होऊ शकेल?

हे म्हणजे एकिकडे नासातील शास्त्रज्ञाने ग्रह तार्‍यांवर सखोल भाषण देत असताना त्याच मंचावर दुसर्याने 'आकाश म्हणजे देवाचा कॅनवस आणि सूर्य चंद्र म्हणजे शोभेच्या वस्तू" असले प्रवचन लावण्या सारखे आहे. दोघांची तुलना एकाच पारड्यात कधी होऊ शकेल का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

ओके

विज्ञान आणि अ-विज्ञान हे एकाच पारड्यात तोलावे का ह्यावर चर्चा चालली आहे.
तुम्हाला हा विषय असा वाटतो आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद!
तुम्हाला काय चालावे आणि काय नाही ह्यावर कुणी टीप्पणी केलेली दिसली नाही.

चर्चा परत वाचा. म्हणजे दिसेल - संपादित केले - झाले नसेल तर.

तर्काच्या कसोटीवर घासून चाचण्यांनी पडताळा केलेले ज्ञान आणि 'वैयक्तिक अनुभवातून आलेले ज्ञान' ह्यांची तुलना एकाच पारड्यात कशी काय होऊ शकेल?

असेलही कदाचित मला माहिती नाही मी शास्त्रज्ञ नाही त्त्वज्ञ नाही.
तुम्हाला या संदर्भात जास्त माहीती असवी. तुम्ही लेखातून ती द्या आम्ही ती वाचू.

आपला
गुंडोपंत

मला माहिती नाही

असेलही कदाचित मला माहिती नाही मी शास्त्रज्ञ नाही त्त्वज्ञ नाही.

हा मुद्दा सुरुवातीलाच स्पष्ट केला असतात तर इतकी चर्चा घडलीच नसती. असो. शास्त्रिय दृष्टीकोन अंगीकारायला शास्त्रज्ञ/वैज्ञानिकच असले पाहिजे असे नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

गैरसोईच्या मुद्यांना

गैरसोईच्या मुद्यांना बगल देण्यात हातखंडा असणारे काही चलाख लोक असतात.
तुम्ही लेखातून ती द्या आम्ही ती वाचू.

हे आवाहन टाळले आहे हे लक्षात आले.
आपली वाटचाल पाहिली असता, उद्बोधक लेखन फारसे दिसले नाही. तर्कटी प्रतिसादच जास्त दिसले.
तेव्हा आधी निरनिराळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहीत लिहा/लिहून दाखवा. किमान एक-एक लेखमाला तरी लिहून दाखवा. म्हणजे आम्हालाही कळेल की खोली किती आहे ते.
नुसतीच तर्कटीपणाची भंपकगीरी नको! ते करणारे इथे चिक्कार आयडीज आहेत.

विधायक काही तरी दाखवा, आम्हीही त्याचे कौतुक करू. त्यात सामीलही होउ.

विधायक विचार दिसत नसल्याने, न्युसंस व्हॅल्यु व्यतिरिक्त या आयडी मधून काही मिळते आहे, असे वाटत नाही.
म्हणून आपल्या बरोबरच्या संवादाला इत्यलम!

(लेखमालिका सातत्याने येत आहेत असे दिसले तर मात्र सुसंवाद नक्की सुरु करेन.)

आपला
गुंडोपंत

ठीक आहे

आपली वाटचाल पाहिली असता, उद्बोधक लेखन फारसे दिसले नाही. तर्कटी प्रतिसादच जास्त दिसले.

तुम्हाला उद्बोधक वाटेल असे लेखन माझ्या कडून होणे नाही. (त्यासाठी वेगळे आयडी येतात उपक्रमावर!)

म्हणून आपल्या बरोबरच्या संवादाला इत्यलम!

तुमची इच्छा! अधून मधून माझ्या प्रतिसादांमधील भंपकपणा दाखवण्याचे कष्ट घेतलेत तर आभारी राहीन.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आजची परिस्थिती

>विज्ञानातला हा प्रांजळपणा तर विज्ञानाची विश्वासार्हता वाढवत नसेल?

विज्ञानाला मोठी परंपरा आहे. या परंपरेतील दिग्गज नावे आणि त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहेच. शिवाय तत्वतः तुम्ही सांगितलेले गुणविशेष विज्ञानात आहेत त्यामुळे सामान्य माणसांच्या लेखी विज्ञान विश्वासार्ह आहे. विज्ञानाच्या परंपरेतील मोठी नावे आणि आजचा वैज्ञानिक यांच्यात बराच फरक आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा फरक सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही. आजही वैज्ञानिक म्हटले की न्यूटनपासून आइनस्टाइनपर्यंत नावे डोळ्यासमोर येतात. वस्तुस्थिती अशी आहे की आज संशोधनाचे क्षेत्र हे इतर क्षेत्रांप्रमाणेच झाले आहे. काही उदाहरणे.

प्रोसिडींग्ज ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस ही अमेरिकेतील नावाजलेली संस्था. त्यांचे PNAS या नावाचे मासिकही निघते. मासिकाचा इम्प्याक्ट फ्याक्टर चांगला त्यामुळे इथे निबंध प्रकाशित होणे गौरवाची बाब मानली जाते. (नंतर ते कुणी वाचत नाही ही गोष्ट सोडा.) आतली गंमत अशी की जर तुम्ही या संस्थेचे सदस्य असाल तर तुम्हाला ठराविक (बहुधा वर्षाला एक) निबंध डायरेक्ट प्रकाशित करता येतो, रेफरी (पंच) वगैरेंची (जे तुमच्या-आमच्या निबंधांमध्ये हजार चुका काढणार) गरज नाही! फिनमन यांनी एका पुस्तकात या संस्थेवर बरीच टिका केली आहे.

आजचा वैज्ञानिक जे संशोधन करतो तो विषय निवडण्यामागे कारण वेगळे असते. पूर्वीचे वैज्ञानिक त्यांना त्या विषयात रस आहे म्हणून संशोधन करीत. आज जे विषय लोकप्रिय आहेत आणि ज्या विषयांना निधी मिळतो अशा विषयांमागे वैज्ञानिक लोक धावत असतात. यामुळे दर पाच वर्षांनी त्यांचा संशोधनाचा विषय बदलत असतो.

संशोधनाकडे येताना बर्‍याच लोकांच्या समजुती वेगळ्या असतात. नंतर त्यांचा भ्रमनिरास होतो. इतर क्षेत्रांप्रमाणेच इथेही रॅटरेस आहे. कालच अमेरिकेतील राइस प्रोग्राममध्ये प्राध्यापकांच्या जागेसाठी ६५ जागा असताना ११०० अर्ज आल्याचे वाचले. (र्‍याट रेस नको म्हणून मेडिकल/इंजिनिअरिंग सोडून बीएस्सी केल्याच्या निर्णयाबद्दल आज हसू येते.) भारतच नाही तर बहुतेक सर्व देशांमध्ये मुलांना शास्त्रीय संशोधनाकडे कसे वळवता येईल यावर भर असतो. अडचण ही की शिक्षण संपल्यानंतर त्यांना पुरेशी संधी आहे किंवा नाही याचा विचार कुणी करत नाही. परीणाम असा की या क्षेत्रातील बहुसंख्य लोकांचे मुख्य उद्दिष्ट सर्व्हाव्हल असते. म्हणूनच नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे संशोधन निधी न मिळाल्यामुळे संशोधकाला बंद करावे लागते आणि नोकरीही गेल्यामुळे तो वाहनचालक बनतो.

जसे पोलीस म्हणजे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी ही प्रतिमा तंतोतंत जुळत नाही तसेच वैज्ञानिकांचेही आहे. आज संशोधन करताना जर त्या क्षेत्रातील बड्या संशोधकांची तुमच्यावर मर्जी असेल तर तुम्हाला निधी पटकन मिळतो. बरेचदा ही मर्जी मिळवण्यासाठी वैज्ञानिक वाट्टेल ते करू शकतात. त्यातही तुमची राजकारण्यांशी चांगली ओळख असेल किंवा तुम्ही पंतप्रधानांचे सल्लागार वगैरे असताल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील संशोधन कार्यावर एखाद्या झारप्रमाणे राज्य करू शकता. अशा गोष्टी त्या-त्या वर्तुळात उघड आहेत पण बाहेर बोलल्या जात नाहीत.

पूर्वी न्यूटन किंवा आइनस्टाइन यांच्याकडे भरपूर वेळ असे. प्रतिभा होतीच, त्यामुळे त्यातून जग बदलणारे संशोधन झाले. आजचा प्रतिष्ठीत वैज्ञानिक घेतला तर त्याच्या हाताखाली सहाय्यक, पोस्टडॉक, पीएचडी, अंडरग्रॅड सर्व मिळून १० ते ३०-४० यापैकी कितीही लोक असू शकतात. इतके लोक आहेत म्हटल्यावर त्यांच्या पोटापाण्याची सोय बघायलाच हवी. त्यामुळे तो सतत नेटवर्किंग, मिटिंगा इ. मध्ये व्यस्त असतो. बरेचदा आपल्या हाताखाली कोणकोण आहे याची त्याला माहितीही नसते. अशा परिस्थितीत संशोधनाकडे त्याचे किती लक्ष असणार?

याखेरीज तू माझ्या निबंधाचा संदर्भ दे मी तुझा देतो यासारख्या गोष्टी चालूच असतात. निबंध कुठून आला आहे यालाही अवाजवी महत्व दिले जाते. साधारणपणे आशियाई देशांमधून आलेल्या निबंधांना दुजाभाव मिळतो असा अनुभव आहे.

याचा अर्थ सर्वच असे आहेत असा नव्हे. पण वैज्ञानिक म्हटल्यावर सर्वसामान्य माणसांच्या मनात जी प्रतिमा येते ती बदलण्याची गरज आहे हे नक्की. इतर क्षेत्रात आज जितका प्रांजळपणा आहे तितकाच संशोधन क्षेत्रात आहे हे लक्षात घ्यावे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

गल्लत

येथे विज्ञानाची प्रोसेस, संशोधनाची पद्धत, सिद्धांत मान्य करण्याचे निकष हा एक भाग आणि वैज्ञानिकांचा मानव म्हणून होणारा व्यवहार यांच्यात गल्लत होते आहे.

विज्ञानाची प्रोसेस, संशोधनाची पद्धत, सिद्धांत मान्य करण्याचे निकष हा लेखाचा मुद्दा आहे आणि त्या बाबतीत विज्ञानाची कमीझ इतरांपेक्षा सफेद आणि कमी फाटलेली आहे.

बाकी प्रतिसादातील तपशीलाशी सहमत आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

तत्वतः

>विज्ञानाची प्रोसेस, संशोधनाची पद्धत, सिद्धांत मान्य करण्याचे निकष हा लेखाचा मुद्दा आहे
तत्वतः विज्ञान प्रांजळ आहे. पण संशोधनाची पद्धत, सिद्धांत मान्य करण्याचे निकष हे वैज्ञानिकांवर अवलंबून आहे. वैज्ञानिकांना यापासून वेगळे काढता येणार नाही.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हेच

आरागॉर्न यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मानवी व्यवहार विज्ञानवादी विचारातून वजा कसे करता येतील? असाच विचार मी मांडतो आहे. श्री. आ. यांनी त्याला अगदी सुंदर रुपात उदाहरणांसहीत मांडले आहे.

आजचा वैज्ञानिक जे संशोधन करतो तो विषय निवडण्यामागे कारण वेगळे असते. पूर्वीचे वैज्ञानिक त्यांना त्या विषयात रस आहे म्हणून संशोधन करीत. आज जे विषय लोकप्रिय आहेत आणि ज्या विषयांना निधी मिळतो अशा विषयांमागे वैज्ञानिक लोक धावत असतात. यामुळे दर पाच वर्षांनी त्यांचा संशोधनाचा विषय बदलत असतो.
कोणते संशोधन(च) वरती आणायचे, आणि कोणते नाही यावरही संशोधनावा खर्च केला जाणारा निधी महत्त्वाची भुमिका बजावत असणार. शिवाय ते किती फायद्याचे हे गणितही असणारच. मगथत्त्वाचे पण फायद्याचे नसणारे संशोधन खरोखर पुढे येते की नाही या बद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहणार नाही का?

७० ते ८० च्या दशकात भाजल्यावर पाणी लाउ नका सांगणारे ' हे औषध' लावा असे सांगत होते का याचा शोध घेतला पाहिजे. (हे एक रुपक आहे असे मानावे - असेच असेल असे नाही याची नोंद घ्यावी .)

म्हणूनच मी ' औषध कंपन्यांचा मुद्दा' उपस्थित केला होता.

जसे पोलीस म्हणजे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी ही प्रतिमा तंतोतंत जुळत नाही तसेच वैज्ञानिकांचेही आहे.
या वाक्याबद्दल टाळ्या!

आज संशोधन करताना जर त्या क्षेत्रातील बड्या संशोधकांची तुमच्यावर मर्जी असेल तर तुम्हाला निधी पटकन मिळतो. बरेचदा ही मर्जी मिळवण्यासाठी वैज्ञानिक वाट्टेल ते करू शकतात. त्यातही तुमची राजकारण्यांशी चांगली ओळख असेल किंवा तुम्ही पंतप्रधानांचे सल्लागार वगैरे असताल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील संशोधन कार्यावर एखाद्या झारप्रमाणे राज्य करू शकता. अशा गोष्टी त्या-त्या वर्तुळात उघड आहेत पण बाहेर बोलल्या जात नाहीत.
मर्जी मिळवण्यासाठी वैज्ञानिक वाट्टेल ते करू शकतात? बापरे! हे तर भयंकर आहे. मग कसे काय लोकांनी या सो कॉल्ड वैज्ञानिक निष्कर्षांवर विश्वास ठेवावा?

बरेचदा आपल्या हाताखाली कोणकोण आहे याची त्याला माहितीही नसते. अशा परिस्थितीत संशोधनाकडे त्याचे किती लक्ष असणार?
इतकी विदारक स्थिती वाचून वाईट वाटले!

याखेरीज तू माझ्या निबंधाचा संदर्भ दे मी तुझा देतो यासारख्या गोष्टी चालूच असतात.
अरे! ही तर कंपूबाजी झाली. म्हणजे मसा वरील लोकांना संशोधनात चांगला वाव असणार तर ;))

निबंध कुठून आला आहे यालाही अवाजवी महत्व दिले जाते. साधारणपणे आशियाई देशांमधून आलेल्या निबंधांना दुजाभाव मिळतो असा अनुभव आहे.
हे वाचून मनापासून वाईट वाटले. विज्ञान मानवी व्यवहारापासून दूर ठेवणे तर सोडाच पण त्या व्यवहारातच इतके गुरफटलेले आहे हे वाचून निराश वाटले!
मला वाटते की यात आशियायी देशात विपणनाची काही दिशाच नसते. म्हणजे आमचेच सम्शोधन कसे भारी आहे हे विकणे महत्त्वाचे असते ते आपण करत नाही. (म्हणजे परत विज्ञान राहिले बाजूला आणि मानवी व्यवहारच महत्त्वाचा... अजून निराशा!)

आपला
गुंडोपंत

सामान्यीकरण

इथे थोडे सामान्यीकरण (जनरलायझेशन) होते आहे असे वाटते. जसे पोलिस खात्यात भ्रष्टाचार आहे म्हणजे १००% सर्व पोलीस पैसे खातात असे नव्हे तसेच संशोधनाच्या क्षेत्रातही आहे. प्रमाण कमीजास्त असू शकेल. माझा मुद्दा इतकाच आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात जे संशोधन होते आहे त्याकडे अधिक डोळसपणे बघण्याची गरज आहे. याचा अर्थ सर्व संशोधन निरूपयोगी किंवा चुकीचे आहे असा नव्हे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

बरोबर आहे

मलाही तसे सामान्यीकरण अपेक्षित.

आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात जे संशोधन होते आहे त्याकडे अधिक डोळसपणे बघण्याची गरज आहे. याचा अर्थ सर्व संशोधन निरूपयोगी किंवा चुकीचे आहे असा नव्हे.

अगदी हेच मला ही म्हणायचे आहे तुमच्याशी १००% सहमती!

आपला
गुंडोपंत

अंधविश्वास आणि विज्ञान

माझ्यामते अंधविश्वास हे वैयक्तिक असतात तर विज्ञान हे सार्वत्रिक असते. (या विधानात किती तथ्य आहे याची शहानिशा केलेली नाही. हे केवळ माझे मत झाले.) एखाद्याला काळ्या रंगाचे कपडे लाभत नाहीत असे वाटते, तर एखाद्याला अमुक साली ज्या ब्याटीने पहिली सेंच्युरी मारली ती ब्याट शुभ वाटते, तर एखाद्याने अमुक व्यक्तीचा चेहरा पाहिला तर दिवस चांगला/वाईट जातो ही वैयक्तिक अंधश्रद्धेची उदाहरणे आहेत. यामुळेच अशा गोष्टींवर संशोधन करणे किंवा मतैक्यावर, अनुमानावर येणे कठिण वाटते.

त्यामानाने विज्ञान हे सर्वांसाठी सारखेच असावे. त्याचे निष्कर्ष आणि अनुमान व्यक्तीगणिक आणि प्रसंगागणिक बदलत नाहीत. (अपवादात्मक परिस्थिती सोडून आणि मनोरुग्ण किंवा गुन्हा अन्वेषण वगैरेंचे निष्कर्ष आणि अनुमान प्रत्येक केसनुसार वेगळे असतात का या विषयी फारशी कल्पना नाही.)

विश्वासार्हता

विज्ञानाची विश्वासार्हता उरली आहे का ?
मला वाटते Uncertainty Principal च्या मांडणीनंतर विज्ञानातील कोणत्याही शोधाला विश्वासार्ह्यता उरलेली नाही.

शरद

असहमत

"अन्सर्टनिटी प्रिन्सिपल"नंतर कोणत्याही शोधाच्या किंवा दृश्य-आकारमानाच्या भाकितांच्या विश्वासार्हतेला तडा गेलेला नाही.
अन्सर्टनिटी पिन्सिपल असे काही आहे :
पिंडाच्या ठिकाणाबद्दल अनिश्चितता : Δक्ष
पिंडाच्या मोमेंटमबद्दल (संवेगा[?]बद्दल) अनिश्चितता : Δप
Δक्ष*Δप ≥ ћ/2

येथे ћ म्हणजे एक अतिशय सूक्ष्म संख्या आहे = १.०५ × १०^-३४ m^2 kg / s

इतपत सूक्ष्म मोजमापे विज्ञानातले कित्येक शोध सांगत नाही. जितपत विश्वासार्हता सांगतात, त्यात अन्सर्टनिटी तत्त्वाने काडीचाही फरक पडत नाही. आणि अतिशय सूक्ष्म कणांच्या बाबतीत संभवनीयतेबद्दल अतिशय बारकाव्याने भाकिते केली जातात, ती सर्व भाकितेही विश्वासार्ह आहेत.

याबाबत अधिक विवेचन फाइनमन यांनी केलेले आहे, त्याचे उपक्रमावरील भाषांतर येथे बघावे.

अर्थात फाइनमन यांचा लेख काही दशकांपूर्वीचा आहे. विज्ञानाचा कुठलातरी शोध (भाकित) त्या शोधाच्या संदर्भक्षेत्रात अन्सर्टनिटी तत्त्वामुळे अविश्वासार्ह झाल्याचे ताजे उदाहरण तुम्हाला सांगता येईल का? नवीन माहिती चर्चेतून येथे वाचकांना मिळाली तर उत्तमच.

("शोधाच्या संदर्भक्षेत्रात" म्हणजे काय? दोन विषाणूंच्या डी-एन-ए मधील फरक याचे संदर्भक्षेत्र वेगळे, आणि रेडियो-लहरी-उत्सर्जन करणारे तारे यांचे संदर्भक्षेत्र वेगळे.)

आजच्या काळात ज्याला विद्न्यान म्हणतात ते आहे तरी काय?

नमस्कार,

विद्न्यानाचा भाषेच्या दृष्टीकोनातून अर्थ काय असू शकतो?

ज्याला आपण आज एकंदरीत पणे विद्न्यान म्हणतो त्याला अनेक टप्पे आहेत. त्यातील टप्पे असे अशू शकतात. (चूकभूल द्यावी-घ्यावी.)

कच्चा सिद्धांत : परिक्षणा आधिच व्यक्त केलेला सिद्धांत.

proposition: A statement expressing a judgment.
सिद्धांत: एका निश्चित निकालाच्या साध्यतेबाबत केलेले विधान.

Theorem : A general proposition or rule that can be proved by reasoning or by

expressing a formula.
प्रमेय : एखादा (कच्चा)सिद्धांत वा नियम जो तर्काद्वारे वा गणिती पद्धतीने पटवून देणारे सूत्र.

Experiment: A new course of action adopted without being sure of it's outcome.
प्रयोग : 'एखाद्या विचाराचा पाठपुरावा करीत तो ज्या प्रमेयावर आधारलेला असतो त्या प्रमेयाचीच सिद्धता कशी होऊ शकते' हा विशय केंद्रस्थानी ठेवून

योजनाबद्ध केलेली एक कार्यपद्धती.अशा 'योजनाबद्ध कार्यपद्धतीच्या' म्हणजेच प्रक्रियेच्या 'फलाबाबत' केवळ भाकितां व्यतिरीक्त त्यातून काय निष्पन्न होऊ
शकते? हे प्रयोगकर्त्यांना तोपर्यंत माहीत नसते.

science: The systematic study of the structure & behavior of the physical & natural world through observation & experiment.

विद्न्यान : विद्-न्यान म्हणजे जे (आधिच) जाणले गेले आहे असे ते.
एखादे 'निरीक्षण', त्या निरीक्षणातून मांडलेले 'सिद्धांत', त्या सिद्धांवर आधारलेले 'प्रमेय', त्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी केलेला 'प्रयोग', त्या
प्रयोगाच्या निष्पत्तीतून प्रकट झालेले 'परीक्षण'व या सगळ्या बाबींचा 'पद्धतशीर स्वरूपातील लिखीत दस्तावेज' म्हणजे विद्न्यान.

मुळात द्न्यान हे कृतीतच दडलेले असते. परंतु कृतीमध्ये द्न्यानाव्यतिरीक्त ही इतर गोष्टी दडलेल्या असाव्यात, ज्या कृती करणार्‍याचा हेतू ओळखून, त्याचा पूर्वाइतिहास धुंडाळून, त्याची कुवत जाणून, नियतीच्या महायोजनेशी ते कितपत सुसंगत आहे व असलेच तर त्या भविष्यातील फलाची जागा काय असू शकेल? या बाबी दडलेल्या असू शकतात. आणि म्हणूनच ह्या इतर गोष्टीच एखाद्या मनुष्याने एखादी कृती करावी की करू नये हे ठरवत असाव्यात.

'कर्म करा फळाची (आऊटकमची) चिंता करून नका.' ह्या गीतेच्या म्हणण्याचा दुसरा अर्थ 'कर्म काय करायचे? व ते कसे करायचे? या बाबतचाच विचार करा.'हा असू शकतो का?

??

काहीच कळलं नाही. उत्तरार्धातलं.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

 
^ वर