कार्य-कारणभाव

माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. ते उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही आहेत.(म्हणजे
होते. आता निवृत्त आहेत). परवा त्यांची रस्त्यात गाठ पडली.आम्ही बोलत उभे राहिलो.अचानक पाऊस आला.आम्ही एका झाडाचा आश्रय घेतला.बोलणे चालूच होते.ते म्हणाले,
" आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणारी पालखी पुण्यात आली की पूर्वी मी ती बघायला जात असे.पालखी लकडीपुलाजवळच्या चौकात आली की वारकरी छोटे रिंगण धरीत.त्या रिंगणाच्या
मध्यभागीं सोनोपंत दांडेकर अभंग गात नाचत असत.ते नाचू लागले की नेमका त्यावेळी पाऊस पडत असे. खाली सोनोपंत नाचत आहेत आणि वरून पाऊस पडत नाही असे दृश्य कधी पाहिल्याचे मला आठवत नाही."
"म्हणजे पाऊस पडणे आणि प्राचार्य दांडेकरांचे अभंगनर्तन यांत काही कार्यकारणभाव आहे असे तुम्हाला वाटते काय?"मी विचारले.
"ते काय ते तुम्ही पाहा. मला वर्षांनुवर्षे काय दिसले ते तुम्हाला सांगितले."
काही वेळाने पाऊस थांबला. आम्ही आपापल्या घरी परतलो.
हे गृहस्थ भाविक आहेत. पावसात सचैल भिजलेले सोनोपंत दांडेकर अभंगसंकीर्तनात देहभान विसरून नाचत आहेत, हे दृश्य त्यांनी अनेकदा पाहिले असणार. ते त्यांच्या मनात ठसून राहिले.त्यामुळे पाऊस आणि अभंगनर्तन यांचा अन्योन्य संबंध जोडला गेला.कार्यकारणभाव निर्माण झाला.
आषाढ महिन्यात पावसाची शक्यता असतेच. पण पालखी खंडूजीबाबा चौकात आली आणि प्राचार्य दांडेकर नाचू लागले रे लागले की पाऊस आलाच हे प्रत्येकवेळी संभवत नाही. आणि समजा आला असला तरी या दोन गोष्टीत काही कार्यकारणभाव असण्याची सुतराम शक्यता नाही हे सामान्य समज (कॉमनसेन्स) असणार्‍या कोणालाही कळावे. पण शिकली सवरलेली अनेक माणसे असा कार्यकारणभाव मानतात असे प्रत्यही दिसते.मला याचे आश्चर्य वाटते.
पाऊस कसा पडतो हे आपण शाळेत शिकलो. अनुकूल वातावरणस्थिती निर्माण झाली की निसर्ग नियमानुसार पाऊस पडतो.त्यामागे कोणताही हेतू नसतो. उद्दिष्ट नसते. निसर्ग उदासीन असतो.पाऊस कशासाठी पडतो? हा प्रश्न निरर्थक आहे.
....
इथे एक वादविवाद(!!) संभवतो तो पुढील प्रमाणे :
"तुम्ही दांडेकरांच्या कीर्तनाला कधी गेला आहात काय? श्रोते कसे तल्लीन होऊन ऐकतात ते पाहिले आहे काय?"
"नाही"
"अभंग संकीर्तन(भाग १ ते ४) या त्यांच्या पुस्तकांत तुकारामाच्या अभंगांवर अत्यंत रसाळ भाषेत अप्रतिम कीर्तने लिहिली आहेत. ती तरी तुम्ही वाचली आहेत का?"
"नाही."
"बरे, तुम्ही स्वत:ला विज्ञानवादी म्हणवता .विज्ञानात निरीक्षणांना महत्त्व असते .आषाढ महिन्यातील पालखी पुण्यात किती तारखेला आली? सोनोपंत नाचत असताना पाऊस पडत होता की नाही; या निरीक्षणांच्या किती वर्षांच्या नोंदी तुम्ही ठेवल्या आहेत?"
"एकाही नाही"
"मग त्या सत्पुरुषाविषयी एक शब्द बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बंद करा ही बडबड."
या युक्तिवादाचा वैयर्थ (फोलपणा) सामान्य समज असणार्‍या कोणालाही कळेल इतका स्पष्ट आहे.
फलज्योतिषाच्या संदर्भात असाच युक्तिवाद केला जातो.
नाडिग्रंथाच्या ’अनुभवा’ विषयी सांगतात ते याच प्रकारात मोडते.
........................................................................

लेखनविषय: दुवे:

Comments

:-)

जे ज्योतीष तेच नाडीपट्टी. जाणारे लोक तिकडे जातातच. ओरडणारी लोक ओरडतात. चालू द्या.

बाकी नाडीपट्टीची एजन्सी कशी मिळवावी हो ओकसाहेब?

---------------------------------------
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये!

नाडिग्रंथाच्या ’अनुभवा’ विषयी

नाडिग्रंथाच्या ’अनुभवा’ विषयी

यनासर,
आपल्याला नाडी ग्रंथांसारख्या निरर्थक विषयावर त्या ग्रंथांचा अनुभव घ्यावासा वाटत नसेल तर आग्रह नाही.
तरीही त्यावर टीका टिपणी करायला आपणाला आवडत असेल तर निदान त्याचा अनुभव घ्यावा. असे आड आड करून तर्काने कोड्यात टाकण्याऐवजी शोधाचे कार्य हाती घेतले तर, काही कोडी पडतील वा सुटतील.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.

अभिषेक बच्चन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
माता:--जयादेवी
पिता: --अमिताभजी
ही नावे कोण्या त्रिकालदर्शी ऋषीने कांही शतकांपूर्वी एका पट्टीवर कोरून ठेवली हे खरे मानणे ही अंधश्रद्धेची परिसीमा आहे असे मला वाटते.अशा श्रद्धाळूंना त्या पट्ट्या,ते त्रिकालज्ञ ऋषी आणि तो नाडीग्रंथ लखलाभ होवो. मला या गोष्टींशी काही कर्तव्य नाही.
क्षमस्व!

चमत्कार आणि कार्यकारणभाव

जेव्हा एखादा माणूस 'चमत्कार' वाटणार्‍या घटनेमुळे भारावून जातो व त्याबद्दल तो दुसर्‍यांना सांगतो त्यावेळी दुसर्‍यांनीही आपल्यासारखं भारावून जावं असं त्याला वाटत असावं. त्यामुळे तो 'चमत्कारा'चे वर्णनच असं करीत असावा की ऐकणार्‍याला कार्यकारणभाव सापडूच नये. कारण एकदा कार्यकारणभाव सापडला की तिच्यातला 'चमत्कार' संपतो.

थेट नाडीलाच हात!

"तुम्ही दांडेकरांच्या कीर्तनाला कधी गेला आहात काय? श्रोते कसे तल्लीन होऊन ऐकतात ते पाहिले आहे काय?"
"नाही"
"अभंग संकीर्तन(भाग १ ते ४) या त्यांच्या पुस्तकांत तुकारामाच्या अभंगांवर अत्यंत रसाळ भाषेत अप्रतिम कीर्तने लिहिली आहेत. ती तरी तुम्ही वाचली आहेत का?"
"नाही."
"बरे, तुम्ही स्वत:ला विज्ञानवादी म्हणवता .विज्ञानात निरीक्षणांना महत्त्व असते .आषाढ महिन्यातील पालखी पुण्यात किती तारखेला आली? सोनोपंत नाचत असताना पाऊस पडत होता की नाही; या निरीक्षणांच्या किती वर्षांच्या नोंदी तुम्ही ठेवल्या आहेत?"
"एकाही नाही"
"मग त्या सत्पुरुषाविषयी एक शब्द बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बंद करा ही बडबड."

पी. झेड. मायर यांचा कोर्टियर्स रिप्लाय असाच आहे.

कबालारियन "नावाचा अहवाल"

नाडीग्रंथाला प्रतिस्पर्धी वा (मित्र!) म्हणून याकडे बघता येईल. कार्यकारणभावाचा विचारच करायचा नाही असे ठरवल्यास अधिक लिहिण्याची गरज नाही.
विकिपिडियानी याचा उल्लेख काढून टाकल्यानंतर त्यांच्या भक्तगणांचा थयथयाट येथे वाचावयास मिळेल.
याबद्दलची चिकित्सकांची मते येथे वाचता येईल.

कार्यकारण भाच आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव

'कारण आणि परिणाम' - कॉज ऍन्ड इफेक्ट यावर विज्ञान अवलंबून आहे. विज्ञानाचा स्वीकार केला की मग अशा पोकळ समजुतींना मनात थारा उरत नाही. पाऊस का पडतो हे नक्की कळाले की मग त्याचा दांडेकरांच्या नाचण्याशी संबंध नाही, मग दांडेकरांच्या ऐवजी त्या वेळी दत्तो वामन पोतदार जरी नाचले असते तरी पाऊस पडलाच असता हे ध्यानात येते. गणपती दूध पितो, त्याऐवजी इतर कोणतीही मूर्ती असती तर तिने दूध प्यालेच असते, हा खरे तर साधा विचार आहे. नव्या गाडीला लावलेले ताईत, गाडीत ठेवलेले कसले कसले फोटो आणि गाडीला होणारे अपघात याचा संबंध नाही. गाडीची देखभाल, ड्रायव्हरचे कौशल्य, त्याची शारिरीक आणि मानसिक अवस्था, त्याला मिळालेली विश्रांती यावर गाडीला अपघात होण्याची शक्यता किती हे ठरत असते. (भारतात वाहानांचे होणारे अपघात हे बहुदा पहाटेच्या वेळी - जेंव्हा ड्रायव्हरला डुलकी लागण्याची शक्यता सर्वाधिक असते- आणि बर्‍याच वेळा देवदर्शनाला निघालेल्या मंडळींचेच होतात - हे लक्षात घेण्यासारखे आहे). स्वच्छतेच्या अभावाने संसर्गजन्य रोग फैलावतात, कुपोषणाने शरीर रोगाला बळी पडते, मानसिक, लैंगिक भावनांचा निचरा झाला नाही की अंगात येणे, भानामती असे प्रकार सुरु होतात, जन्म, वाढ आणि मृत्यू या सजीवाच्या आयुष्यातील नैसर्गिक घटना आहेत. मृत्यूच्या आधी काही नाही, मृत्यूनंतरही काही नाही. शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि एक पोटलीभर क्षार - हे खरे तर किती साधे आहे. पण इतका विवेक शाबूत राहाण्यासाठीही एक किमान स्थैर्य लागते. जेथे रोजचे जीवन म्हणजे एक झगडा आहे, तेथे एवढ्या किमान विवेकाची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. त्यापेक्षा कुठल्यातरी दैवताला, समजुतीला भाबडेपणाने शरण जाणे सोपे.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

जबरदस्त

सुंदर प्रतिसाद!
टाळ्या!!

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

बहुतांशांकरता

जेथे रोजचे जीवन म्हणजे एक झगडा आहे, तेथे एवढ्या किमान विवेकाची अपेक्षा करणेही चुकीचे आहे. त्यापेक्षा कुठल्यातरी दैवताला, समजुतीला भाबडेपणाने शरण जाणे सोपे.

बर्‍याच जणांसाठी हे खरे आहे असे वाटते.

अनिश्चितपणा आणि विवेकवाद

खरेतर 'विवेकवाद' किंवा 'रॅशनॅलिझम' म्हणजे काय आणि त्याची मर्यादा किती? हा प्रश्न अजूनही मलातरी सुटलेला नाही.
ढोबळमानाने मी विवेकवादी आहे तरीही रॅशनॅलिझम जीवनात प्रत्येक वेळी सर्व उत्तरे देऊ शकतो असे मला वाटत नाही.
'कॉज-इफेक्ट रिलेशनशीप ' किंवा 'कार्यकारणसंबंध' हे सांख्यिकीने कदाचित ९०% वारंवारतेने खरे ठरत असतील किंवा अशाने असे झाले हे विधान कार्य घडून गेल्यावर
पश्चातबुद्धी सांगता येत असले तरी असे असे झालेले असल्याने असे असे होणार आहे हे नक्की सांगता येतेच असे नाही.

उदा. पक्षी धडकल्याने विमान कोसळले हे विमान कोसळल्यानंतर कळू शकते. पण विमान कोसळेपर्यंत 'पक्षी धडकल्याने' हे कारण पूर्ण नसते. पक्षी धडकण्याच्या त्या विविक्षित क्षणापर्यंत सारेच अनिश्चित असते. म्हणजे पक्षी विमानतळापर्यंत का पोचला? त्याने विमानाच्या उतरण्याच्या / उड्डाणाच्या वेळेसच का भरारी घेतली? तो विमानाच्या मार्गात का आडवा गेला? इ.इ. या प्रश्नांची उत्तरे मिळवताना अनेक अन्य प्रश्न निर्माण होतात आणि त्या सर्वांची वैज्ञानिक उत्तरे देता येतीलच असे नाही.
- किंवा -
नव्या गाडीला लावलेले ताईत, गाडीत ठेवलेले कसले कसले फोटो आणि गाडीला होणारे अपघात याचा संबंध नाही. हे जरी बहुतेक उदाहरणांवरून खरे वाटले तरी - मग संबंध कशाचा आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. वरील प्रतिसादातील - गाडीची देखभाल, ड्रायव्हरचे कौशल्य, त्याची शारिरीक आणि मानसिक अवस्था, त्याला मिळालेली विश्रांती -ही कारणे सकृतदर्शनी योग्य असली तरी अशी किंवा अन्य कारणे नसलेल्या गाड्यांना १००% अपघात होणारच नाही असे म्हणता येते काय? म्हणजे असे की...- असो. फार पाल्हाळ लावत नाही.

या प्रतिसादात विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्याबद्दल कोणतेही मतप्रदर्शन नाही याची कृपया नोंद घेणे. किंबहुना मी विवेकवादी आहे म्हणजेच काळाच्या बेभरवसेपणाबद्दल मला खात्री आहे - कदाचित एवढा एकच विश्वास मी आत्मविश्वासपूर्वक बाळगू शकतो.

दुवा

अगदी या विषयावर नाही पण संबंधित एक रोचक दुवा.

याचा अर्थ मी दुव्याशी सहमत आहे असा नाही. पण पुस्तक वाचायला आवडेल. एखादा दृष्टीकोन पटत नसला तरी समजून घेणे मला आवडते.

कॉमन सेन्स

खरेतर कॉमन सेन्सचा आणि कार्यकारणभावाचा उपयोग विज्ञानात व्हायला हवा. बर्‍याच ठिकाणी होतोही पण प्रत्येक वेळी नाही.

उदा. विश्वाची उत्पत्ती कशी झाली? सध्याची पॉप्युलर थिअरी बिग बँग आहे. त्याला सीएमबीआर वगैरेंचे पुरावेही आहेत. एक बिंदू होता त्या बिंदूचा महास्फोट झाला आणि त्यातून विश्व निर्माण झाले. परत बिंदू सिंंग्युलॅरिटी होता त्यामुळे तिथे आत्ताचे पदार्थविज्ञानाचे, अवकाशाचे नियम लागू नाहीत.
मग अनेक प्रश्न पडतात. बिंदू कुठून आला? कार्यकारणभावाप्रमाणे बिंदू कुठूनतरी यायलाच हवा. त्याआधी काय होते? परत कार्यकारणभावाप्रमाणे काहीतरी असायलाच हवे.
ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइमला लोकांनी बरेच डोक्यावर घेतले पण त्यातूनही याची उत्तरे मिळत नाहीत.

हे एक उदाहरण झाले. स्ट्रिंग थिअरी घेतली तर प्यान्डोराची पेटी उघडल्यासारखे होईल.

--
What other people think about you is none of your business because it really isn't about you, it is about them. -- Sean Stephenson

है किसीको नही पता

'मला माहिती नाही' या उत्तराला विज्ञानात आदर आहे.

विश्वाची उत्पत्ती

बिंदू कुठून आला? कार्यकारणभावाप्रमाणे बिंदू कुठूनतरी यायलाच हवा. त्याआधी काय होते? परत कार्यकारणभावाप्रमाणे काहीतरी असायलाच हवे.
ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइमला लोकांनी बरेच डोक्यावर घेतले पण त्यातूनही याची उत्तरे मिळत नाहीत.

पॉल डेविस या शास्त्रज्ञानी गोल्डिलॉक्स एनिमा (Goldilocks Enigma) या त्यांच्या पुस्तकातील पहिल्या तीन धड्यात (दि बिग् क्वेश्चन्स, दि युनिव्हर्स एक्सप्लेनड व हौ दि युनिव्हर्स बिगॅन) विश्वाच्या उत्पत्तीविषयी छानपैकी सोप्या इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे. कदाचित आवडेल/कळेल.
आपण मराठीत या विषयी लिहिल्यास आम्हालाही हा कठीण विषय कळू शकेल.

हे

पुस्तक वाचलेले नाही. त्यावरून काही उत्तरे मिळाल्यास नक्कीच लिहीन. तसेच वाइनबर्ग यांच फर्स्ट थ्री मिनिट्स याबद्दलही ऐकले आहे.

--

पॉल डेव्हिस

यांचा बिग बँगच्या आधी काय होते यावर एक लेख सापडला. एकूणात निष्कर्ष असा की मुळात काळाची सुरूवातच बिग बँगपासून झाली त्याआधी काळच अस्तित्वात नव्हता त्यामुळे आधीला काही अर्थ नाही.

नेक्स्ट क्वेश्चन :)

अडाणी बरे..!

श्री यनावाला लिहितात ''शिकली सवरलेली अनेक माणसे असा कार्यकारणभाव मानतात असे प्रत्यही दिसते.मला याचे आश्चर्य वाटते''

अहो, शिकले सवरलेल्यांच्याच मनात कार्यकारणभाव निर्माण होतात. अडाणी असलेले बिचारे असेल त्याला नमस्कार करुन पुढे जातात. ते अस्संच का होतं आणि तस्संच का होतं याचा तर्क करत बसत नाहीत. शिकलेले लोक लैच काथ्याकूट करतात, पाहतोच ना ते आपण...!

-दिलीप बिरुटे

लय भारी

अहो, शिकले सवरलेल्यांच्याच मनात कार्यकारणभाव निर्माण होतात. अडाणी असलेले बिचारे असेल त्याला नमस्कार करुन पुढे जातात. ते अस्संच का होतं आणि तस्संच का होतं याचा तर्क करत बसत नाहीत. शिकलेले लोक लैच काथ्याकूट करतात, पाहतोच ना ते आपण...!

हॅहॅहॅ! लय भारी. शिकलेल्या लोकांत नैराश्याचे प्रमाण जास्त असते का? याविषयी काही विदासंकलन झाले आहे का?

- राजीव.

चांगला प्रश्न...

शिकलेल्या लोकांत नैराश्याचे प्रमाण जास्त असते का ?
राजीव चांगला प्रश्न विचारला. विदा नसल्यामुळे काही एक निष्कर्ष काढणे अवघड आहे. पण, माणसाचे आरोग्य हे त्याच्या आजुबाजूच्या सामाजिक वातावरणावर अवलंबून असते असे आपण म्हणतो. भोवतालचे लोक, त्यांच्या रुढी परंपरा, त्यांचे व्यवसाय,धर्म, जात, मूल्ये, शिक्षण, भाषा, राहणीमान,आचार विचार, या आणि अशा आणखी काही बाबीं माणसावर परिणाम करतात असे म्हणता येईल. आणि याच सर्व घटकांचा शिकलेल्या आणि अशिक्षीत माणसावर चांगला आणि वाईट परिणाम होऊन त्याचे नैराश्येत रुपांतर कसे होते व का होते, हे मात्र शोधावे लागेल.

पाहिले ना ! आपण शिकलेली माणसं कशातही कसा कार्य-कारणभाव शोधू लागतो.

-दिलीप बिरुटे

खरे तर

खरे तर तर्कटांच्या नादी लागायचे नाही असे ठरवले होते, पण मी कुठला आलो रॅशनल?

असो,
अजूनही मी माझ्या कुंडलीतील ग्रहांचे भमण आणि माझ्या आयुष्यात घडलेले बदल पाहून, मला तरी त्यात काही तरी कार्यकारण भाव असावा की काय, असे वाटते.
अर्थातच हे मी माझ्या कुंडलीतील ग्रहांविषयी बोलतो आहे. यात भविष्यकालीन घटनांचा वेध नसून भूतकालीन घटनांची व चिखलमातीच्या ग्रहगोलांच्या मला दिसलेल्या संगतीचे, माझे अनुमान आहे.
(सो कॉल्ड भंपक विज्ञानवाद्यांनी थयथयाट करू नये म्हणून 'मला' हा डिस्क्लेमर टाकला आहे! ;)

नाडी ग्रंथा विषयी मी काही भाष्य करू शकत नाही.
कारण एखाद्या गोष्टीवर लिहिण्यासाठी ती गोष्ट आधी सगळ्या बाजूंनी समजून घेतली पाहिजे असे मी मानतो!
उगाच मला 'भंपक' वाटते म्हणून ती गोष्ट/कल्पना/विचारच भंपक आहेत असे मानणे मला योग्य वाटत नाही.
(माझे) नाकारणे, स्विकारणे किंवा तटस्थ राहणे या नंतर येते.

मला नाडीचा (माझ्या आणि अजून एका व्यक्तीच्या चड्डीच्या नाडी शिवाय नाडी या प्रकाराचा काहीच अनुभव नाही! आणि यंदा माझ्या शिंप्याने माझ्या चड्डीच्या नाडीची स्लीझ इतकी लहान शिवली आहे की एखाद्या ओढाओढीच्या क्षणी नाडी त्यात गेली की काढणे अशक्य आहे. :( )

(काही) विज्ञानवादी आपले व्यवहार कसे ठरवतात हे आधीच्याही काही चर्चां दरम्यान दिसून आले आहेच. तेथे त्यांना तालिबानी का म्हणू नये अशी विचारणाही मी केली होती. पण ती बहुदा फारच अडचणीची झाल्याने त्यांनी त्याला उत्तर न देणेच पसंत केले होते.

आपला
गुंडोपंत

संदर्भ

(काही) विज्ञानवादी आपले व्यवहार कसे ठरवतात हे आधीच्याही काही चर्चां दरम्यान दिसून आले आहेच. तेथे त्यांना तालिबानी का म्हणू नये अशी विचारणाही मी केली होती. पण ती बहुदा फारच अडचणीची झाल्याने त्यांनी त्याला उत्तर न देणेच पसंत केले होते. कृपया धाग्याचा दुवा द्या. उत्तर देता आले नाही तर मी मत बदलतो.

अर्र्!

भलतीकडेच लागला म्हणायचा ...... :)))

असो,
तुम्ही विज्ञानवादी आहात होय?
मला कल्पनाच नव्ह्ती. मला वाटले की मानवी आहात.

तो उल्लेख,
तुमचे पुराण नको, इतिहास नको, विचारही नको, त्यावर चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे वगैरे वगैरे अशा विचार वृत्तीतून आलेल्या एका प्रतिसादा विषयी हे होते.

हा धागा प्रियालीच्या लेखनात होता. आता मला धुंडाळायचा कंटाळा आलाय.
सापडला की देइन. कदाचित तुमच्या लक्षातही असेल ते फार जुने नव्ह्तेच.

आपला
गुंडोपंत

आवडले

फारच रोचक उदाहरण. विज्ञानाला सगळ्या गोष्टींची उत्तरे माहित नाहीत हे तर विज्ञानवादीच म्हणतात. पण म्हणून ह्या गाळलेल्या जागा वाटेलत्या कचर्‍याने भरून वर "देअर इज मोर टू लाईफ दॅन एविडन्स" असे म्हणणार्‍यांसाठी चांगले उदाहरण आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

गमतीदार किस्सा

गमतीदार किस्सा आहे.
- - -
१. प्रत्येक घटना-जोडीमध्ये कार्यकारणभाव शोधण्याच्या हव्यासामुळे हे असे होणारच.

तुमच्या मित्राचा अनुभव आहे की प्राचार्य दांडेकरांचे तल्लीन नृत्य आणि पाऊस यांचे कोरिलेशन आहे. सर्व मानवांसारखी (म्हणजे माझ्यासारखी) त्यांची आधारसामग्री मर्यादित आहे. मात्र कोरिलेशन असल्यास "जोपर्यंत असिद्धता होत नाही तोवर" कार्यकारणभाव मानण्याचा मोह तुमच्या मित्राला सुटत नाही. प्रा. दांडेकर नाचतात, मग लगेच पाऊस पडतो, म्हणून ते लगेच कार्यकारणभाव शोधू लागतात. आणि असिद्धता होईपर्यंत कार्यकारणभाव सिद्धच आहे असे मानतात.

- - -
२. सामान्य ज्ञान हा भलताच असामन्य प्रकार आहे.
- - -
३. हल्लीच कोणी मला खरड केली "इतके सुशिक्षित असून तुम्ही इतके मूर्खपणे कसे काय वागलात?" त्या संवादकाला मी उत्तर दिले :
"सुशिक्षित लोक कधीकधी मूर्खपणे वागतात, तर कधीकधी सुज्ञपणे वागतात. अशिक्षित लोक कधी सुज्ञपणे वागतात, तर कधीकधी मूर्खपणे वागतात. शिक्षणाचा आणि सुज्ञपणाचा अवश्यसंबंध नाही."

सैद्धान्तिक विधान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितातः" आणि असिद्धता होईपर्यंत कार्यकारणभाव सिद्धच आहे असे मानतात."

प्राचार्यांचे नर्तन आणि पावसाचे पडणे या दोन घटनांत कोणताही कार्यकारणभाव संभवत नाही हे आपल्याला धादान्तवादाने(कॉमनसेन्स)कळतेच ,असे मला वाटते." असिद्धता होईपर्यंत कार्यकारणभाव सिद्धच आहे असे मानतात." हे विधान इथे उपयोगाचे आहे असे वाटत नाही. कारण हे विधान कोणत्याही (जनरल) दोन घटनांविषयी आहे. इथे दोन विवक्षित घटना आहेत. चर्चा वास्तवासंबंधी,व्यावहारिक आहे.उपरोक्त दोन घटनांत कार्यकारणभाव मानण्याच्या विचाराचे कोणत्याही तर्‍हेने समर्थन होऊ शकत नाही असे मला वाटते.

खांद्यावर बंदूक?

आषाढ आणि पाऊस यांचे कोरिलेशन असल्यामुळे नाच आणि पाऊस यांचे कोरिलेशन सुपरफ्लुअस आहे. जर उन्हाळ्यात असे कोरिलेशन सापडले तर कार्यकारणभावाचा शोध घ्यावा लागेल.

प्रा. दांडेकर नाचतात, मग लगेच पाऊस पडतो, म्हणून ते लगेच कार्यकारणभाव शोधू लागतात.

'दांडेकरांचे नाचणे' हेच मूलभूत (फंडामेंटल) कारण असल्याचा दावा होता. कार्यकारणभाव (=मेकॅनिझम) शोधण्याचा काही प्रयत्न दिसला नाही. (मेकॅनिझम=अधिक मूलभूत पातळीवरील कारणशृंखला पुरविणारे संक्षेपणवादी तुकडे.)

शिवाय यनावाला यांच्या परिचिताने नोंदलेल्या कोरिलेशनची आकडेवारी गुलदस्त्यात आहे. counting the hits and ignoring the misses असा प्रकार असल्याची शक्यताच अधिक आहे.

खांद्यावर बंदूक

मला खरे तर हा वाक्प्रचार येथे समजलेला नाही. पण मला न-समजलेल्या कुठल्या अर्थाने माझे वागणे असेल, ही शक्यता आहे. ("खांद्यावरून बंदूक चालवणे" हा वाक्प्रचार समाजात अनैतिक व्यवहाराबाबत वापरतात असा माझा अनुभव आहे. स्वतः नामानिराळे राहून अन्य व्यक्तीच्या मार्फत भांडण करवणे - अशा संदर्भात हा वाक्प्रचार वापरलेला मी ऐकलेला आहे. येथे मी नामानिराळा राहिलेलो नाही. अन्य व्यक्तीने माझ्या तर्फे माझ्या मुद्द्यांचा लढासुद्धा पुढे चालवलेला नाही. त्यामुळे हा वाक्प्रचार येथे कसा काय लागू आहे, ते मला कळलेले नाही. मात्र मी मराठी भाषेचे अनेक बारकावे अजून शिकतोच आहे. त्यामुळे कोणी स्पष्टीकरण दिल्यास माझे ज्ञान वाढेलच, आणि मी आभार मानेन.)

मात्र कार्यकारणभावाच्या आदल्या चर्चेनंतर ही चर्चा लगेच सुरू झाल्यामुळे त्याचा संदर्भ माझ्या मनात ताजा आहे. शिवाय या शीर्षकातच "कार्यकारणभाव" शब्द आहे.

प्रस्तुत चर्चेच्या प्रस्तावकाने आदली चर्चा वाचलीच नसेल, आणि ही चर्चा त्यांना सहज स्फुरली असेल, ही शक्यता आहेच. मी मात्र आदली चर्चा वाचलेली आहे, तीत भाग घेतलेला आहे. मग मला आदल्या चर्चेशी नाते जोडावेसे वाटले, हे चर्चेच्या दृष्टीने फार अनैतिक आहे, असे मला वाटत नाही.

'दांडेकरांचे नाचणे' हेच मूलभूत (फंडामेंटल) कारण असल्याचा दावा होता. कार्यकारणभाव (=मेकॅनिझम) शोधण्याचा काही प्रयत्न दिसला नाही. (मेकॅनिझम=अधिक मूलभूत पातळीवरील कारणशृंखला पुरविणारे संक्षेपणवादी तुकडे.)

श्री. यनावाला यांच्या मित्रांचा काय दावा होता हे मला माहीत नाही. "ढगामधून पाऊस पडतो" हा मेकॅनिझम त्यांना अमान्य असून, दांडेकरांच्या नाचण्यातून कुठल्याही मेकॅनिझमशिवाय पाऊस पडतो की काय असे त्या मित्रांचे म्हणणे होते, हेदेखील मला माहीत नाही. हे सर्व तपशील श्री. यनावाला यांनी दिलेले नाहीत. श्री. यनावाला यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या मित्राच्या म्हणण्याचा समारोप असा होता :

"ते काय ते तुम्ही पाहा. मला वर्षांनुवर्षे काय दिसले ते तुम्हाला सांगितले."

श्री. यनावाला यांनी "त्यांचा मित्र निरीक्षणांबद्दल खोटे बोलत होता" असे ध्वनितही केलेले नाही. ते म्हणतात :

पावसात सचैल भिजलेले सोनोपंत दांडेकर अभंगसंकीर्तनात देहभान विसरून नाचत आहेत, हे दृश्य त्यांनी अनेकदा पाहिले असणार. ते त्यांच्या मनात ठसून राहिले.त्यामुळे पाऊस आणि अभंगनर्तन यांचा अन्योन्य संबंध जोडला गेला.

त्यांचा मित्र "आपण अमुक बघितले" इतपत तरी सत्य सांगत होता, असे श्री. यनावाला यांनाच वाटते, असे त्यांच्या वरील वाक्यावरून वाटते. इतकेच काय अन्योन्य संबंध जोडण्याइतपत निरीक्षणे मित्राच्या मनात ठसली असावी असे कथानक ते सांगतात. त्यांच्या कथेत माझी वेगळी कथानके जोडणे मला प्रशस्त वाटत नाही.

"काउंटिंग हिट्स अँड इग्नोरिंग मिसेस" असा प्रकार मानवसुलभ आहे, ती शक्यता आहेच. असा अनुभव मला स्वतःच्या निरीक्षणांबाबत आहे. प्रयोगशाळेतली सर्व निरीक्षणे काटेकोरपणे नोंदवण्यामागे याच धोक्याचा विचार असतो. परंतु माझ्या आयुष्यातला कितीतरी भाग मी प्रयोगशाळेबाहेर घालवतो. हे इतके सामान्य आहे की "प्रयोगशाळेबाहेर न केलेल्या, कटेकोर नसलेल्या ढोबळ निरीक्षणां"बाबत चर्चा आहे, असे मी या ठिकाणी गृहीत धरलेले आहे. पुण्यातल्या लकडी पुलावरून मी कित्येकदा गेलेलो आहे, आणि तिथे काटेकोरपणे निरीक्षणांची नोंद करणारे लोक बघितल्याचे मला मुळीच आठवत नाही. या स्वानुभवाच्या जोरावर "लकडी पुलावर काटेकोर नोंदी न-घेता चाललेले लोक" अशी चौकट मी या कथानकासाठी मानलेली आहे. अशा लोकांना मानवसुलभ चुका करता-करता भासणारी कोरिलेशने - यांच्याबद्दल माझे भाष्य आहे. ही चौकट चुकली असल्यास श्री. यनावाला मला सांगतीलच.

त्यांच्या मित्राने कितीदा निरीक्षण केले, आणि ते कितीदा निरीक्षणे विसरले, याबद्दल श्री. यनावाला यांनी काहीही सांगितलेले नाही. उलट त्यांनी कोरिलेशन ठसण्या इतपत निरीक्षणे केली असावीत असे श्री. यनावालाच वरील वाक्यांत सांगतात.

आणि हा तुम्ही म्हणता तो "मूलभूत" प्रकार काय आहे बरे? मी "मूलभूत" हा शब्द कधीकधी वापरलेला आहे. (कुठला मर्यादित नियम कुठल्या व्यापक नियमाच्या अंतर्गत आधीच सिद्ध असेल, तर व्यापक नियम अधिक "मूलभूत" आहे, अशा अर्थाने मी तो शब्द वापरलेला आहे. म्हणजे "उकळत्या पाण्यातली सर्व उष्णता-ऊर्जा बनलेल्या वाफेत असते, याच्यापेक्षा मूलभूत नियम कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेचा ताळा नेहमीच जमतो असा आहे", इत्यादि.)

पण "कोरिलेशन इम्प्लाइज कॉझेशन" अशा संदर्भात "मूलभूत" शब्द मी कधीही वापरलेला नाही. त्याचे "कारण" असे की कॉझेशन हा प्रकारच बहुतेक संदर्भांत मला अनावश्यक वाटतो. वगैरे.

आदली चर्चा

आधीच्या चर्चेत प्रतिसाद देणे तुम्ही बंद केलेत पण तोच विषय नव्या धाग्यात तुम्ही सुरू केलात. तरीही अनैतिकतेचा आरोप मी करीत नाही कारण मला जुन्या चर्चेत प्रतिसाद देण्यास तुम्ही बांधील नव्हतात. जुन्या धाग्याचा संदर्भ केवळ इम्प्लाय करणे हा नामानिराळे राहण्याचा प्रयत्न होता असे मला वाटले. तुम्ही आदल्या चर्चेशी संबंध येथे नमूद केल्यामुळे तो दावा मी मागे घेतो.

श्री. यनावाला यांच्या मित्रांचा काय दावा होता हे मला माहीत नाही. "ढगामधून पाऊस पडतो" हा मेकॅनिझम त्यांना अमान्य असून, दांडेकरांच्या नाचण्यातून कुठल्याही मेकॅनिझमशिवाय पाऊस पडतो की काय असे त्या मित्रांचे म्हणणे होते, हेदेखील मला माहीत नाही. हे सर्व तपशील श्री. यनावाला यांनी दिलेले नाहीत. श्री. यनावाला यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या मित्राच्या म्हणण्याचा समारोप असा होता :

"ते काय ते तुम्ही पाहा. मला वर्षांनुवर्षे काय दिसले ते तुम्हाला सांगितले."

मेकॅनिझम दिले नाहीत म्हणून ते प्रतिपादिलेच नाहीत असे गृहित धरणे मला योग्य वाटले. ढग नसताना, किंवा ढगांतून पाऊस पाडणारी परिस्थिती नसताना पाऊस पडतो, असाच तो दावा असणार. अन्यथा त्याचा उल्लेख यनावाला यांच्या परिचिताने, तसेच यनावाला यांनी केलाच नसता असे वाटते. दांडेकरांच्या नाचाने काही आध्यात्मिक लहरी निर्माण होऊन १अ) वरुण देव ढगांचे सीडिंग करतो, किंवा १ब) पाण्याचे थेंबच तयार करतो, किंवा २) उपस्थितांना ओले झाल्याचा भास होतो, इ. काही मेकॅनिझम नसल्यामुळे नाच->पाऊस असा थेट (=मूलभूत) दावा मी गृहीत धरतो आहे. 'मूलभूत' या शब्दाचा हा वापर तुम्हाला अध्यहृत व्याख्येसारखाच आहे असे वाटते.

त्यांनी कोरिलेशन ठसण्या इतपत निरीक्षणे केली असावीत असे श्री. यनावालाच वरील वाक्यांत सांगतात.

ते ठसण्यामागचा धादांतवादी कार्यकारणभाव "काउंटिंग हिट्स अँड इग्नोरिंग मिसेस" असा आहे. आधीच्या चर्चेत प्रयोगशाळेत सापडणारी कोरिलेशन हा विषय होता. त्यांचे मह्त्व कमी करण्यासाठी सामान्यांचे उदाहरण अग्राह्य आहे.

कॉझेशन हा प्रकारच बहुतेक संदर्भांत मला अनावश्यक वाटतो. वगैरे.

त्याविषयी जुन्या धाग्यात आणि खरडवह्यांत चर्चा करता येईलच.

अडाणी बरे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

या प्रतिसादात प्रा.डॉ.दिलीप बिरुटे लिहितातः "अडाणी असलेले बिचारे.... ते अस्संच का होतं आणि तस्संच का होतं याचा तर्क करत बसत नाहीत. "
....हे वास्तवाला धरून नाही.अल्पशिक्षित तसेच निरक्षर माणसांनासुद्धा हे असे का घडले? असे प्रत्येक घटनेचे कारण हवेच असते. मात्र निसर्गनियम आणि कार्यकारणभाव यांविषयी अनेकांची समज क्षीण असल्याने त्यांना कोणतेही सोपे कारण खरे वाटते. उदा:
** कालपर्यंत चांगले खेळत असणारे मूल आज तापाने फणफणले. कारणः-- त्याला कुणाची तरी नजर/दृष्ट लागली.
** तहसिल ऑफिसात गेलो पण अपेक्षित काम झाले नाही:
कारणः-- १)घराबाहेर पडताना नेमके कोणीतरी शिंकले.
किंवा २) बाहेर पडल्यावर मांजर आडवे गेले.
किंवा३) कुठे जातो आहेस असा एकाने प्रश्न विचारला.
**गेल्या उन्हाळ्यात विहिरीला भरपूर पाणी होते. या उन्हाळ्यात आटले.कारण:-- चुलत्याबरोबर जमिनीचा वाद आहे. त्याने करणी केली.
अशी कसलीही कारणे पटतात. मात्र झाल्या घटनेचे कारण हवेच.किंबहुना शिकल्या सवरलेल्यांपेक्षा अडाणी माणसांनाच हे अस्सेच का घडले हे हवे असते. प्रा.डॉ. दिलीप बिरुटे यांनी यावर थोडा विचार केला असता तर त्यांच्या हे निश्चितपणे लक्षात आले असते.

इथे

इथे बटरफ्लाय इफेक्ट आठवला. :)

कसा? आणि का?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना यांच्या प्रतिसादातः" पक्षी विमानतळापर्यंत का पोचला? त्याने विमानाच्या उतरण्याच्या / उड्डाणाच्या वेळेसच का भरारी घेतली? तो विमानाच्या मार्गात का आडवा गेला? ... या प्रश्नांची ... वैज्ञानिक उत्तरे देता येतीलच असे नाही." असे म्हटले आहे.
.. या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकणार नाही. किंबहुना कोणतेही शास्त्र देऊ शकणार नाही. कारण या प्रश्नाला उत्तरच नाही. विमाने आकाशात फिरतात. पक्षी आकाशात उडतात. या दोन गोष्टी एकाच वेळी एकाच ठिकाणी येण्याची संभवनीयता(प्रॉबॅबिलिटी) साधारणतया कमी असली तरी शून्य नाही.त्यामुळे यदृच्छया ते घडते आणि अपघात होतो.त्यामागे कोणाचाही कोणता हेतू नसतो.जसे पाऊस कसा पडतो हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र पाऊस कशासाठी पडतो याला उत्तर नाही.हा प्रश्नच निरर्थक ठरतो.

हेच म्हणायचे आहे...

का? या शब्दाचे दोन अर्थ निघतात - कशामुळे? आणि कशासाठी?
कशामुळे? या प्रश्नाचे उत्तर घटनेनंतर देता येते. कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर घटनेनंतरही संदिग्ध असते.

सामान्य माणसाला एखादी घटना कशामुळे घडली याबरोबरच ती कशासाठी घडली हेही जाणून घेण्याची उत्सुकता असते. कशासाठी? चे उत्तर विज्ञानाला देता येत नाही किंवा तो विज्ञानाचा विषयच नव्हे हे त्यांच्या लक्षात येत नाही. तरीही ज्या प्रश्नांना (मानवी आकलनाप्रमाणे) उत्तरे नसतात असे प्रश्न मानवाला पडतातच! (ते प्रश्न पडणेच अयोग्य आहे असे विज्ञान म्हणू शकत नाही.) मग त्यांचे उत्तर देणार कोण? हा प्रश्न उरतोच! इथेच मानवाच्या बुद्धीच्या आकलनाच्या मर्यादा स्पष्ट होतात. एखादी गोष्ट मुळातच प्रमाण नसेल तर तिचे प्रामाण्य कसे मानावे?

व्यक्तीगत अनुभव कोणत्याही (वैज्ञानिक) शास्त्राप्रमाणे अतर्क्य असू शकतात. (दु:खद घटनेतील सुखद) उदाहरणार्थ, मेंगलोर विमान अपघातात वाचलेल्या एका व्यक्तीचा सीट बेल्ट आपोआप उघडला आणि ती व्यक्ती त्यासाठी अज्ञात शक्तीचे आभार मानते. यादृच्छिक वारंवारतेने ही अत्यंत दुर्मिळ घटना म्हटली पाहिजे. (कदाचित आजवर झालेल्या सर्व विमान अपघातात आपोआप सीट बेल्ट उघडणे ही पहिलीच घटना असावी.)
त्या व्यक्तीने सीट बेल्ट लावलाच नसेल, लावला असला तरी तो नीट बंद झाला नसेल इ. कारणे आपण दुरून देऊ शकलो तरी त्या व्यक्तीसाठी तो संपूर्ण सत्य अनुभव असू शकेल.त्याची वारंवारता त्या व्यक्तीसाठी १००% आहे. अशा व्यक्तीला निखळ बुद्धीप्रामाण्यवाद आणि विवेकवाद कसे पटू शकतील?

म्हणूनच विज्ञानवाद आणि अज्ञेयवाद हे दोन्ही एकाचवेळी मान्य असू शकतात. विज्ञान 'कशामुळे?' या प्रश्नाचे उत्तर देते, 'कशासाठी?' हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टीने निरर्थक आहे, विज्ञानाच्या विषयवस्तूला मर्यादा आहेत आणि जगात मानवी बुद्धीपलिकडील काही आहे हे मान्य करणे चुकीचे आहे काय?

योग्यता

तरीही ज्या प्रश्नांना (मानवी आकलनाप्रमाणे) उत्तरे नसतात असे प्रश्न मानवाला पडतातच! (ते प्रश्न पडणेच अयोग्य आहे असे विज्ञान म्हणू शकत नाही.)

कळपात राहणार्‍या प्राण्यांना एकमेकांवर संशय घेणे शिकावे लागते. समोरच्याने गोफणीत दगड 'कशासाठी' लावला असेल? किंवा युरेनियमचे उत्पादन 'कशासाठी' वाढविले असेल? असे प्रश्न पडणे फायद्याचे असते. गोफणीतील दगड 'कशामुळे' उडतो? किंवा युरेनियममधून किरणोत्सार 'कशामुळे' होतो? या प्रश्नांचे "उत्तर विज्ञानाला देता येत नाही किंवा तो विज्ञानाचा विषयच नव्हे". गोफणीचे भौतिकशास्त्र किंवा पिचब्लेंडचे रसायनशास्त्र यांच्या "विषयवस्तूला मर्यादा आहेत". परंतु हे 'कशासाठी' प्रकारचे प्रश्न सुचणे फायद्याचे असू शकते. या उपजत प्रेरणेचा अतिरेक होऊ शकतो. पूर्वी उपयोगी होत्या अशा अनेक उपजत प्रेरणांचा आज अतिरेक झाला आहे, उदा. मिळेल तेव्हा खाणे, गोड खाणे, मीठ खाणे, इ.
गॅग प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण झाली कारण तिची पूर्वी काही उपयुक्तता होती. आज ती तशी नाही. त्यामुळे, "घशात बोट घातल्यावर उलटी येणे अयोग्य आहे असेही विज्ञान म्हणू शकत नाही" असा निष्कर्ष आज काढणे चूक आहे.
त्याचप्रमाणे, नैसर्गिक शास्त्रांतही 'कशासाठी' प्रकारचे प्रश्न पडतात हे सत्य असले तरी ते प्रश्न पडणे अयोग्य आहे.

त्या व्यक्तीने सीट बेल्ट लावलाच नसेल, लावला असला तरी तो नीट बंद झाला नसेल इ. कारणे आपण दुरून देऊ शकलो तरी त्या व्यक्तीसाठी तो संपूर्ण सत्य अनुभव असू शकेल.त्याची वारंवारता त्या व्यक्तीसाठी १००% आहे. अशा व्यक्तीला निखळ बुद्धीप्रामाण्यवाद आणि विवेकवाद कसे पटू शकतील?

वैयक्तिक अनुभवांकडे दुर्लक्ष करण्याद्वारे!

पटले नाही

गॅग प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण झाली कारण तिची पूर्वी काही उपयुक्तता होती. आज ती तशी नाही. त्यामुळे, "घशात बोट घातल्यावर उलटी येणे अयोग्य आहे असेही विज्ञान म्हणू शकत नाही" असा निष्कर्ष आज काढणे चूक आहे. त्याचप्रमाणे, नैसर्गिक शास्त्रांतही 'कशासाठी' प्रकारचे प्रश्न पडतात हे सत्य असले तरी ते प्रश्न पडणे अयोग्य आहे.

- पाठीवर मारणे, मानेवर मारणे, घशात बोटे घालून उलटी काढणे हे उपाय अन्ननलिकेत अथवा श्वासनलिकेत काही अडकले तर आजही केले जातात. त्यामुळे आज त्या प्रतिक्षिप्त क्रियेचा उपयोग नाही असे म्हणता येत नाही. हे उदाहरण आपण का दिले ते समजले नाही. 'घशात बोट घातल्यावर उलटी येणे :: कशासाठी? असा प्रश्न पडणे' (प्रतिक्षिप्त क्रिया) या अर्थी हे उदाहरण दिले असल्यास प्रतिक्षिप्त क्रियेचा उपयोग कालबाह्य झाला आहे असे विधान आपणास करावयाचे आहे काय?
पण मी त्याबद्दल बोलत नाही. मानवाला कोणतेही प्रश्न पडू शकतात. त्याची उत्तरे 'ते प्रश्नच वैज्ञानिक दृष्टीने अयोग्य आहेत' म्हणून त्याची उत्तरेच शोधू नयेत हे म्हणणे - 'पृथ्वी सपाट आहे आणि त्यासंबंधी उलट बोलणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य आहे' म्हणून तसे मत मांडू नये - असे म्हणण्यासारखे झाले. ही मध्ययुगीन मानसिकता आहे.

त्या व्यक्तीने सीट बेल्ट लावलाच नसेल, लावला असला तरी तो नीट बंद झाला नसेल इ. कारणे आपण दुरून देऊ शकलो तरी त्या व्यक्तीसाठी तो संपूर्ण सत्य अनुभव असू शकेल.त्याची वारंवारता त्या व्यक्तीसाठी १००% आहे. अशा व्यक्तीला निखळ बुद्धीप्रामाण्यवाद आणि विवेकवाद कसे पटू शकतील?

वैयक्तिक अनुभवांकडे दुर्लक्ष करण्याद्वारे!

- तसे दुर्लक्षच करायचे असेल तर मग चर्चाच कशाला? माझेच मत तेवढे खरे असे म्हटले की झाले.

उपयुक्तता

मानवी संबंधांमध्ये आजही 'कशासाठी' प्रकारचे प्रश्न योग्य आहेतच. त्याचप्रमाणे गॅग प्रतिक्षिप्त क्रियेचे आजही काही उपयोग आहेत. मुद्दा असा की या उपजत प्रेरणा अनाठायी त्रास देऊ शकतात. त्यांचे अस्तित्व नेहमीच योग्य असते असे नाही.

पण मी त्याबद्दल बोलत नाही. मानवाला कोणतेही प्रश्न पडू शकतात. त्याची उत्तरे 'ते प्रश्नच वैज्ञानिक दृष्टीने अयोग्य आहेत' म्हणून त्याची उत्तरेच शोधू नयेत हे म्हणणे - 'पृथ्वी सपाट आहे आणि त्यासंबंधी उलट बोलणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य आहे' म्हणून तसे मत मांडू नये - असे म्हणण्यासारखे झाले. ही मध्ययुगीन मानसिकता आहे.

'दोन विरोधी विचारसरणींनी समान मागणी केली' या निरीक्षणावरून त्या विचारसरणी एकमेकींसारख्या असल्याचे सिद्ध होत नाही.

तसे दुर्लक्षच करायचे असेल तर मग चर्चाच कशाला?

बरोबर. या अनुभवांची वैज्ञानिक चर्चा शक्यच नाही.

माझेच मत तेवढे खरे असे म्हटले की झाले.

'माझेच' नव्हे. वैज्ञानिक वृत्तीला पटेल तेच खरे.

वैज्ञानिक वृत्ती

'दोन विरोधी विचारसरणींनी समान मागणी केली' या निरीक्षणावरून त्या विचारसरणी एकमेकींसारख्या असल्याचे सिद्ध होत नाही.

- तसे सिद्ध होऊ नये म्हणूनच मी ही चर्चा करत आहे. वैज्ञानिक विचारसरणीने कोणतेही प्रश्न नाकारण्याचा भाडपणा का करावा? वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी 'हम करेसो कायदा' अशी भूमिका घेणे योग्य वाटत नाही. मीही त्यात आलोच.

'माझेच' नव्हे. वैज्ञानिक वृत्तीला पटेल तेच खरे.

- "वैज्ञानिक वृत्ती" ही समाजापासून/मानवापासून वेगळी असते काय? मुळात कोणतीही 'वृत्ती' मानवी मनाची एक धारणा असते. ती समाजापासून वेगळी काढता येत नाही. मला असे वाटत होते की वैज्ञानिक वृत्ती 'सत्य' नाकारत नाही .इतकेच काय? पण बर्‍याचे वेळेला ती 'गृहित सत्य' मानते. वैज्ञानिक दृष्टीकोनाची माझी व्याख्या बरोबर उलट आहे -जिला सत्य पटते ती वैज्ञानिक दृष्टी ! (मग ते कितीही अविश्वसनीय का असेना..) चुभूद्याघ्या.
'सत्य म्हणजे काय?' हे विषयांतर आहेच. मी ज्याला सत्य मानतो ते इतरांना असत्य वाटणे शक्य आहे. किंवा उलट!

नकार

नाकारण्यायोग्य प्रश्नांची चांगली उदाहरणे डॉकिन्सने पर्पज ऑफ पर्पज या भाषणात दिली आहेत. हिमालय कशासाठी बनला? किंवा, मत्सराचा रंग कोणता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मला शौर्य दिसत नाही.

डॉकिन्सना विचारावे लागेल.

डॉकिन्सच्या भाषणाचा उल्लेख केल्याबद्दल आभार.
मी ज्या प्रश्नांबद्दल बोलत आहे ते डॉकिन्सनी नाकारण्यासारखे आहेत की नाही ते त्यांनाच विचारावे लागेल. :) ;)
तुम्हाला ते नाकारण्याजोगे वाटतात तेव्हा इत्यलम् .

विषयांतर -
मोठ्या आशेने हे भाषण पाहिले/ऐकले...... असो.
डॉकिन्सच्या भाषणाचा / विचारांचा परामर्श हे विषयांतर ठरेल. त्यांचे सार्थक आणि निरर्थक प्रश्न उत्क्रांतीसंदर्भात आहेत.
सबव्हर्जन् ऑफ गोल्स ऐकताना तर - 'आहारनिद्राभयमैथुनंच' या श्लोकाची प्रकर्षाने आठवण झाली.

संदर्भ

माझे मत डॉकिन्स यांच्या मतासारखेच आहे. 'कशासाठी' हा प्रश्नच चूक असल्याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. त्यांची विधाने उत्क्रांतीइतकीच मर्यादित नसून "विश्वाची निर्मिती कशासाठी" हाच विषय आहे.

बिगबँग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आपल्या प्रतिसादात श्री. आरागॉर्न लिहितातः"एक बिंदू होता त्याचा महास्फोट झाला.. त्यातून विश्व निर्माण झाले. ....
मग अनेक प्रश्न पडतात. बिंदू कुठून आला? कार्यकारणभावाप्रमाणे बिंदू कुठूनतरी यायलाच हवा. त्याआधी काय होते? परत कार्यकारणभावाप्रमाणे काहीतरी असायलाच हवे."

माझी पण हीच अडचण आहे.बिगबँगचे काही कळत नाही. त्याविषयी वाचले आहे ते असे:
*हा बिगबँग १३०० कोटी वर्षांपूर्वी झाला.
* याला महाविस्फोट म्हणतात.वस्तुतः हा स्फोट नव्हे.हे आहे अत्यंत वेगाने झालेले महाप्रसरण. प्रसरण कशाचे? तर एका संविशेषा(सिंग्युलॅरिटी) बिंदूचे.या बिंदूचे आकारमान शून्यासन्निध तर घनता, वस्तुमान आणि तापमान या गोष्टी अनंतासन्निध होत्या.
* हा बिंदू आला कुठून? समजत नाही. तो होता एव्हढेच.
* या बिंदूभोवती काही नव्हते. म्हणजे अवकाशही(स्पेस) नव्हता.बिंदू जसजसा अतीव वेगाने प्रसरण पावत गेला तसा तसा अवकाश निर्माण होत गेला.
* या बिंदूच्या पूर्वी काळही नव्हता.तो महास्फोटापासून सुरू झाला.
...हे माझ्या डोक्यावरून जाते. कारण ते कॉमनसेन्समधे बसत नाही.
* आपली सूर्यमाला ५५० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली.
* पहिली २०० वर्षे पृथ्वी अतितप्त होती. त्या अवस्थेत सजीव सृष्टीनिर्मिती अशक्यच होती.
* नंतरच्या ३५० कोटी (साडेतीन अब्ज) वर्षांत अत्यंत मंदगतीने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्याचे बरेचसे विश्वासार्ह ज्ञान विज्ञानाला आहे. ते वाचून थोडेसेतरी समजू शकते. म्हणून मी साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या काळाचा कधी विचारच करत नाही.

विचार

विचार करत नाही हे ठीक. तो प्रत्येकाचा चॉइस आहे. पण बिग बँग खरे आहे असे मानता की नाही हा प्रश्न आहे. याचा संबंध मूळ लेखाशी आहे.

विज्ञानात अशा बर्‍याच संकल्पना आहेत की ज्या "कॉमन सेन्स" मध्ये बसत नाहीत.

इथे दुसरी अडचण येते. कॉमन सेन्स म्हणजे नक्की काय? आपल्या रोजच्या व्यवहारांच्या आधाराने बनवलेले (किंवा डिड्युस केलेले) नियम अशी व्याख्या केली तरीही ती व्यक्तिसापेक्ष ठरते. क्रिकेटचा चेंडू एका वेळी एकच ठिकाणी असतो. ज्याने क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास केलेला नाही अशा व्यक्तीला जर इलेक्ट्रॉनचे वागणे सांगितले तर तो आपल्याला वेड्यात काढेल. कारण इलेक्ट्रॉन म्हणजे खोलीभर पसरलेले तरंग अशी व्याख्या त्याच्या कॉमनसेन्समध्ये बसत नाही. दुसर्‍या टोकाला हॉकिंग्ज, पेनरोझ यांच्यासारखे विद्वान घेतले तर त्यांची जगाकडे बघण्याची दृष्टी सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळी असेल. विश्वात ११ मिती आहेत, एकाहून अधिक विश्वे आहेत, बिग बँगच्या आधी काळच नव्हता हे सर्व त्यांच्या कॉमन सेन्समध्ये बसते आहे.

याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे केऑस थिअरी. ही थिअरी नॉन-लिनिअर वागण्यावर अवलंबून असल्याने हिच्यातही कॉमनसेन्सला फारच कमी जागा आहे. किंबहुना याच कारणासाठी केऑसला शास्त्र म्हणून बराच काळ मान्यता मिळाली नव्हती. याचे थिअरीचे नेहेमी दिले जाणारे उदाहरण म्हणजे शांघायमध्ये एका फुलपाखराने पंख फडफडवले तर टेक्सासमध्ये वादळ येऊ शकते.

मुद्दा हा की कार्यकारण भाव आणि कॉमन सेन्स या खात्रीलायक कसोट्या ठरू शकत नाहीत.

--
Знати један језик није довољно / Znati jedan jezik nije dovoljno / One language is never enough.

विज्ञानाच्या मर्यादा

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"विज्ञानाच्या विषयवस्तूला मर्यादा आहेत आणि जगात मानवी बुद्धीपलिकडील काही आहे हे मान्य करणे चुकीचे आहे काय?"
श्री.विसुनाना यांच्या प्रतिसादातून.
जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान विज्ञानाला अद्यापि झालेले नाही हे मान्य करायलाच हवे.पण ते ज्ञान वैज्ञानिक पद्धतीनेच मिळू शकेल. हे ज्ञान ज्ञानेंद्रियांद्वारेच होऊ शकते.अतीन्द्रिय ज्ञान असते यावर माझा विश्वास नाही. वस्तुनिष्ठज्ञानप्राप्तीचे सर्व मार्ग विज्ञानाकडे आहेत. विज्ञानाकडे नाही असा कोणताही मार्ग अन्य कोणत्या शास्त्रापाशी नाही, अशी माझी धारणा आहे. ती आजपर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे

हे मान्यच आहे.

वरील विचार सपशेल मान्य आहेत.

जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान विज्ञानाला अद्यापि झालेले नाही हे मान्य करायलाच हवे.पण ते ज्ञान वैज्ञानिक पद्धतीनेच मिळू शकेल.

-हे मान्यच आहे. या विचारपद्धतीने अमूर्त विचारही विज्ञानाच्या कक्षेत येतात.

हे ज्ञान ज्ञानेंद्रियांद्वारेच होऊ शकते.

-मानवी मन हे ज्ञानेंद्रिय आहे. आणि मानवी मन हे जगातील ज्या अनेक गोष्टींचे ज्ञान विज्ञानाला अद्यापि झालेले नाही त्यांपैकी एक आहे.
केक्युलेला दिवास्वप्नात स्वतःच्या तोंडात स्वतःची शेपटी पकडलेला साप दिसला आणि बेंझिन रिंगचा शोध लागला - ज्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत क्रांती झाली.
ज्या मॅक्स प्लांकने ऊर्जा कणाच्या स्वरूपात असते हे मत मांडले त्यालाच आईन्स्टाईनने त्याविषयावर त्याच्याही पुढे केलेले विचार पटत नव्हते.त्याला शेवटपर्यंत
क्वांटम फिजिक्स कळले नाही. पण आईन्स्टाईनच्या कामामुळे प्लांकला नोबेल पुरस्कार मिळाला. पुढचा इतिहास सर्वश्रृत आहे.
अर्थातच अंतर्मनात चाललेले गहन विचार हा कुतुहलाचा विषय आहे. त्यामुळे असे अपघात होतात. या अपघातांची कारणमिमांसा करणे गरजेचे आहे.
ते अतींद्रीय ज्ञान असते असे मुळीच नाही. असे मानले तर आणि तरच तिथे वैज्ञानिक दृष्टीचा अभाव असतो.

विज्ञानाकडे नाही असा कोणताही मार्ग अन्य कोणत्या शास्त्रापाशी नाही, अशी माझी धारणा आहे.

-असेच म्हणतो. या वैज्ञानिक मार्गानेच सर्व अनुभवांची चिकित्सा झाली पाहिजे असेच माझेही मत आहे.

स्वप्न पाडले?

>>केक्युलेला दिवास्वप्नात स्वतःच्या तोंडात स्वतःची शेपटी पकडलेला साप दिसला आणि बेंझिन रिंगचा शोध लागला - ज्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत क्रांती झाली.

बेन्झिनची रचना चक्राकार आहे असे केक्युलेला कळावे म्हणून त्याला ते स्वप्न पडले (कोणा अज्ञात शक्तीने ते स्वप्न पाडले) असे सुचवणे योग्य नाही. स्वप्नात अनेक गोष्ती दिसत असतात. केक्युलेने स्वप्नात दिसतेल्या गोष्टीतून स्फूर्ती घेतली हे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

बाहेरील अज्ञात शक्ती नकोच.

बेन्झिनची रचना चक्राकार आहे असे केक्युलेला कळावे म्हणून त्याला ते स्वप्न पडले (कोणा अज्ञात शक्तीने ते स्वप्न पाडले) असे सुचवणे योग्य नाही.

मलाही तसे मुळीच म्हणायचे/सुचवायचे नाही. अज्ञात 'शक्ती' ने ते स्वप्न पाडले असा शब्दप्रयोग केला की गाडी घसरते.
मला त्या संबंधाने केवळ वि़ज्ञानाला 'अद्यापि' ज्ञात नसलेल्या मनोव्यापारासंबंधी बोलायचे आहे. पुढेमागे त्याचेही रासायनिक स्पष्टीकरण मिळू शकेल.

उदासीन निसर्ग

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
एखाद्या घटनेमागे उद्दिष्ट (हेतू) काय हे शोधायचे तर ती घटना घडविणार्‍या एका तरी घटकाच्या ठिकाणी जाणीव (consciousness) असायला हवी. ती केवळ माणसाच्या ठिकाणी(आणि काही प्रमाणात काही प्रगत सजीवांत) असू शकते. म्हणजे घटना माणसाने घडवली तर त्यामागे हेतू असू शकतो.निसर्गातील अन्य घटकांच्याठिकाणी जाणीव नाही. म्हणून "पाऊस कशासाठी पडतो ?" हा प्रश्न निरर्थक आहे असे मी म्हणतो. तो निसर्ग नियमांप्रमाणे पडतो. त्यामागे कोणतेही उद्दिष्ट नाही. या अर्थाने निसर्ग उदासीन असतो.

पुण्यात पाऊस

गेले महिनाभर विश्रांती घेतलेल्या ज्या पावसाची पुणेकर चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो पाऊस आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरु झाला.

जय जय पांडुरंग हरी!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर